श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यैः नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्री दत्तात्रेयाय नमः ॥ श्री रुक्मिणीपांडुरंगाभ्यां नमः ॥ ॐ नमो जी जनार्दना । नाहीं भवअभव भावना । न देखोनि मीतूंपणा नमन श्रीचरणा सद्गुरुराया ॥ १ ॥ नमन श्रीएकदन्ता । एकपणें तूंचि आतां । एकीं दाविसी अनेकता । परी एकात्मता न मोडे ॥ २ ॥ तुजमाजीं वासु चराचरा । म्हणौनि बोलिजे लंबोदरा । यालागीं सकळांचा सोयरा । साचोकारा तूं होसी ॥ ३ ॥ तुज देखे जो नरु । त्यासी सुखाचा होय संसारु । यालागीं ’विघ्नहरु’ । नामादरु तुज साजे ॥ ४ ॥ हरुष तें वदन गणराजा । चार्ही पुरुषार्थ त्याचि चार्ही भुजा । प्रकाशिया अप्रकाशी वोजा । तो झळकत तुझा निजदंतु ॥ ५ ॥ पूर्वउत्तरमीमांसा दोनी । लागलिया श्रवणस्थानीं । निःशब्दादि वाचा वदनीं । कर जोडूनि उभिया ॥ ६ ॥ एकेचि काळी सकळ सृष्टी । आपुलेपणें देखत उठी । तेचि तुझी देखणी दृष्टी । सुखसंतुष्टी विनायका ॥ ७ ॥ सुखाचें पेललें दोंद । नाभीं आवर्तला आनंद । बोधाचा मिरवे नागबंद । दिसे सन्निध साजिरा ॥ ८ ॥ शुद्ध सत्त्वाचा शुक्लांबर । कासे कसिला मनोहर । सुवर्णवर्ण अलंकार । तुझेनि साचार शोभति ॥ ९ ॥ प्रकृति पुरुष चरण दोनी । तळीं घालिसी वोजावुनी । तयांवरी सहजासनीं । पूर्णपणीं मिरवसी ॥ १० ॥ तुझी अणुमात्र झालिया भेटी । शोधितां विघ्न न पडे दृष्टी । तोडिसी संसारफांसोटी । तोचि तुझे मुष्टी निजपरशु ॥ ११ ॥ भावें भक्त जो आवडे । त्याचें उगविसी भवसांकडें । वोढूनि काढिसी आपणाकडे । निजनिवाडें अंकुशें ॥ १२ ॥ साच निरपेक्ष जो निःशेख । त्याचें तूंचि वाढविसी सुख । देऊनि हरिखाचे मोदक । निवविसी देख निजहस्तें ॥ १३ ॥ सूक्ष्माहूनि सूक्ष्म सान । त्यामाजीं तुझें अधिष्ठान । यालागीं मूषकवाहन । नामाभिधान तुज साजे ॥ १४ ॥ पाहता नरु ना कुंजरु । व्यक्ताव्यक्तासी परु । ऐसा जाणोनि निर्विकारु । नमनादरु ग्रंथार्थीं ॥ १५ ॥ ऐशिया जी गणनाथा । मीपणें कैंचा नमिता । अकर्ताचि जाहला कर्ता । ग्रंथकथाविस्तारा ॥ १६ ॥ आतां नमूं सरस्वती । जे सारासारविवेकमूर्तीं । चेतनारूपें इंद्रियवृत्ती । जे चाळीती सर्वदा ॥ १७ ॥ जे वाचेची वाचक । जे बुद्धीची द्योतक । जे प्रकाशा प्रकाशक । स्वयें देख स्वप्रभ ॥ १८ ॥ जे शिवांगीं शक्ती उठी । जैसी डोळ्यामाजीं दिठी । किंवा सुरसत्वें दावी पुष्टी । फळपणें पोटीं फळाच्या ॥ १९ ॥ जैसा साखरेअंगी स्वादु । किं सुमनामाजीं मकरंदु । तैसा शिवशक्ती संबंधु । अनादिसिद्ध अतर्क्य ॥ २० ॥ ते अनिर्वाच्य निजगोडी । चहूं वाचांमाजीं वाडी । म्हणोनि वागीश्वरी रोकडी । ग्रंथार्थी चोखडी चवी दावी ॥ २१ ॥ सारासार निवडिती जनीं । त्या हंसावरी हंसवाहिनी । बैसली सहजासनीं । अगम्यपणीं अगोचरु ॥ २२ ॥ ते परमहंसीं आरूढ । तिसी विवेकहंस जाणती दृढ । जवळी असतां न देखती मूढ । अभाग्य दृढ अतिमंद ॥ २३ ॥ तिचें निर्धारितां रूप । अरूपाचें विश्वरूप । तें आपुलेपणें अमूप । कथा अनुरूप बोलवी ॥ २४ ॥ हा बोलु भला झाला । म्हणोनि बोलेंचि स्तविला । तैसा स्तुतिभावो उपजला । बोलीं बोला गौरवी ॥ २५ ॥ ते वाग्विलास परमेश्वरी । सर्वांगदेखणी सुंदरी । राहोनि सबाह्यअभ्यंतरीं । ग्रंथार्थकुसरी वदवी स्वयें ॥ २६ ॥ ते सदा संतुष्ट सहज । म्हणोनि निरूपणा चढलें भोज । परी वक्तेपणाचा फुंज । मीपणें मज येवोंच नेदी ॥ २७ ॥ वाग्देवतेची स्तुति । वाचाचि जाहली वदती । तेथें द्वैताचिये संपत्ती । उमस चित्तीं उमजेना ॥ २८ ॥ तिणें बोल बोलणें मोडिलें । समूळ मौनातें तोडिलें । त्यावरी निरूपण घडिलें । न बोलणें बोलें बोलवी ॥ २९ ॥ तिसी सेवकपणें दुसरा । होऊनि निघे नमस्कारा । तंव मीपणेंसीं परा । निजनिर्धारा पारुषे ॥ ३० ॥ जेथें मीपणाचा अभावो । तेथें तूंपणा कैंचा ठावो । याहीवरी करी निर्वाहो । अगम्य भावो निरूपणीं ॥ ३१ ॥ जैशा सागरावरी सागरीं । चालती लहरींचिया लहरी । तैसे शब्द स्वरूपाकारीं । स्वरूपावरी शोभती ॥ ३२ ॥ जैशा साखरेचिया कणिका । गोडिये भिन्न नव्हती देखा । तैसें निरूपण ये रसाळसुखा । ब्रह्मरसें देखा रसवृत्ति ॥ ३३ ॥ तेथें मीपणेंशीं सरस्वती । बैसविलें एका ताटें रसवृत्ती । तेणें अभिन्नशेष देऊनि तृप्ती । ते हे उद्गार येती कथेचे ॥ ३४ ॥ आतां वंदू ते सज्जन । जे कां आनंदचिद्घन । वर्षताती स्वानन्दजीवन । संतप्त जन निववावया ॥ ३५ ॥ ते चैतन्याचे अळंकार । कीं ब्रह्मविद्येचे श्रृंगार । कीं ईश्वराचें मनोहर । निजमंदीर निवासा ॥ ३६ ॥ ते अधिष्ठाना अधिवसु । कीं सुखासही सोल्हासु । विश्रांतीसी विश्वासु । निजरहिवासु करावया ॥ ३७ ॥ कीं ते भूतदयार्णव । कीं माहेरा आली कणव । ना ते निर्गुणाचे अवेव । निजगौरव स्वानन्दा ॥ ३८ ॥ ना ते डोळ्यातील दृष्टी । कीं तिचीही देखणी पुष्टी । कीं संतुष्टीसी तुष्टी । चरणांगुष्ठीं जयांचे ॥ ३९ ॥ ते पाहती जयांकडे । त्यांचें उगवे भवसांकडें । परब्रह्म डोळियांपुढें । निजनिवडें उल्हासे ॥ ४० ॥ तेथें साधनचतुष्टयसायास । न पाहती शास्त्रचातुर्यविलास । एका धरिला पुरे विश्वास । स्वयें प्रकाश ते करिती ॥ ४१ ॥ ते जगामाजीं सदा असती । जीवमात्रातें दिसती । परी विकल्पेंचि ठकिजती । नाहीं म्हणती नास्तिक्यें ॥ ४२ ॥ मातियेचा द्रोण केला । तो कौळिका भावो फळला । म्हणौनि विश्वासेंवीण नाडला । जगु ठकला विकल्पें ॥ ४३ ॥ एकाएकीं विश्वासतां । तरी वाणी नाहीं निजसत्ता । त्यांचे चरणी भावार्थता । ठेविला माथां विश्वासें ॥ ४४ ॥ ते नमस्कारितां आवश्यक । करून ठाकती एक । परी एकपणें सेवक । त्यांचाचि देख स्वयें होआवें ॥ ४५ ॥ त्यांचिया सेवेचिये गोडी । ब्रह्मसुखाची उपमा थोडी । जे भजती अनन्य आवडीं । ते जाणती गाढी निजचवी ॥ ४६ ॥ ते प्रकृतीसी पर । प्रकृतिरूपीं ते अविकार । आकार-विकार-व्यवहार । त्यांचेनि साचार बाधीना ॥ ४७ ॥ ते भोगावरी न विटती । त्यागावरी न उठती । आपुलिये सहजस्थिती । स्वयें वर्तती सर्वदा ॥ ४८ ॥ ते ज्ञातेपणा न मिरविती । पिसेपण न दाविती । स्वरूपफुंजुविस्मृती । गिळूनि वर्तती निजांगें ॥ ४९ ॥ प्रेमा अंगींचि जिराला । विस्मयो येवोंचि विसरला । प्रपंचुपरमार्थु एकु जाहला । हाही ठेला विभागु ॥ ५० ॥ स्मरण विस्मरणेंशीं गेलें । देह देहीच हारपलें । आंतुबाहेरपण गेलें । गेलें ठेलें स्मरेना ॥ ५१ ॥ स्वप्न जागृती जागतां गेली । सुषुप्ती साक्षित्वेंसीं बुडाली । उन्मनीही वेडावली । तुर्या ठेली तटस्थ ॥ ५२ ॥ दृश्य द्रष्टेनशीं गेलें । दर्शन एकलेपणें निमालें । तें निमणेंपणही विरालें । विरवितें नेलें विरणेनिशीं ॥ ५३ ॥ ज्ञान अज्ञानातें घेऊनि गेलें । तंव ज्ञातेपणही बुडालें । विज्ञान अंगी घडलें । परी नवें जडलें हें न मनी ॥ ५४ ॥ यापरी जे निजसज्जन । तिहीं व्हावें सावधान । द्यावें मज अवधान । हें विज्ञापन बाळत्वें ॥ ५५ ॥ सूर्य सदा प्रकाशघन । अग्नि सदा देदीप्यमान । तैसे संत सदा सावधान । द्यावें अवधान हें बालत्व माझें ॥ ५६ ॥ तंव संतसज्जनीं एक वेळां । थोर करूनियां सोहळा । आज्ञापिलें वेळोवेळां । ग्रंथ करविला प्राकृत ॥ ५७ ॥ एकांतीं आणि लोकांतीं । थोर साक्षेप केला संतीं । तरी सांगा जी मजप्रती । कोण ग्रंथीं प्रवर्तों ॥ ५८ ॥ पुराणीं श्रेष्ठ भागवत । त्याहीमाजी उद्धवगीत । तुवां प्रवर्तावें तेथ । वक्ता भगवंत तुज साह्य ॥ ५९ ॥ आम्हांसी पाहिजे ज्ञानकथा । वरी तुजसारिखा रसाळ वक्ता । तरी स्तुति सांडूनि आतां । निरूपण तत्त्वतां चालवी ॥ ६० ॥ तुज संतस्तवनीं उत्साहो । हा तंव कळला भावो । तरी कथेचा लवलाहो । निजनिर्वाहो उपपादीं ॥ ६१ ॥ या संतांचे कृपावचनें । एकाएकी आनंदलों मनें । तेणें वाक्यपसायदानें । स्वानंदघनें उल्हासे ॥ ६२ ॥ जैसा मेघांचेनि गर्जनें । मयूर उपमों पाहे गगनें । नाना नवेनि जीवनें । जेवीं चातक मनें उल्हासे ॥ ६३ ॥ कां देखोनि चंद्रकर । डोलों लागे चकोर । तैसें संतवदनींचें उत्तर । आले थोर सुखावित ॥ ६४ ॥ थोर सुखाचा केलों स्वामी । तुमचें पुरतें कराल तुम्ही । तरी वायांचि कां मीपणें मी । मनोधर्मीं वळंगेजों ॥ ६५ ॥ परी समर्थांचि आज्ञा । दासां न करवे अवज्ञा । तरी सांगितली जे संज्ञा । ते करीन आज्ञा स्वामींची ॥ ६६ ॥ परी तुम्हीं एक करावें । अखंड अवधान मज द्यावें । तेणें दिठिवेनि आघवें । पावेल स्वभावें निजसिद्धी ॥ ६७ ॥ अगा तुझिया मनामाजीं मन । शब्दीं ठेविलेंसे अनुसंधान । यालागीं निजनिरूपण । चालवीं जाण सवेगें ॥ ६८ ॥ आतां वंदूं कुळदेवता । जे एकाएकी एकनाथा । ते एकीवांचून सर्वथा । आणिक कथा करूं नेदी ॥ ६९ ॥ एक रूप दाविलें मनीं । तंव एकचि दिसे जनीं वनीं । एकचि कानीं वदनीं । एकपणीं ’एकवीरा’ ॥ ७० ॥ ते शिवशक्तिरूपें दोनी । नेऊन मिरवे एकपणीं । एकपणें जाली गुर्विणी । प्रसवे एकपणीं एकवीरा ॥ ७१ ॥ तें एकरूपें एकवीरा । प्रसवली बोध-फरशधरा । जयाचा कां दरारा । महावीरां अभिमानियां ॥ ७२ ॥ तेणे उपजोनि निवटिली माया । आज्ञा पाळूनि सुख दे पितया । म्हणोनि तो जाहला विजया । लवलाह्यां दिग्मंडलीं ॥ ७३ ॥ जो वासनासहस्रबाहो । छेदिला सहस्रार्जुन-अहंभावो । स्वराज्य करूनियां पहा हो । अर्पी स्वयमेवो स्वजातियां ॥ ७४ ॥ तेणें मारूनि माता जीवविली । तेचि कुळदेवता आम्हां जाहली । परी स्वनांवें ख्याति केली । एकात्मबोली एकनाथा ॥ ७५ ॥ ते जैंपासोनि निवटिली । तैंपासोनि प्रकृति पालटली । रागत्यागें शांत झाली । निजामाउली जगदंबा ॥ ७६ ॥ तया वोसंगा घेऊन । थोर दिधलें आश्वासन । विषमसंकटीं समाधान । स्वनामस्मरण केलिया ॥ ७७ ॥ ते जय जय जगदंबा । ’उदो’ म्हणे ग्रंथारंभा । मतीमाजी स्वयंभा । योगगर्भा प्रगटली ॥ ७८ ॥ आतां वंदूं जनार्दनु । जो भवगजपंचाननु । जनीं विजनीं समानु । सदा संपूर्णु समत्वें ॥ ७९ ॥ ज्याचेनि कृपापांगें । देहीं न देखती देहांगें । संसार टवाळ वेगें । केलें वाउगें भवस्वप्न ॥ ८० ॥ जयाचेनि कृपाकटाक्षें । अलक्ष्य लक्ष्येंवीण लक्षे । साक्षी विसरली साक्षें । निजपक्षें गुरुत्वें ॥ ८१ ॥ नेणें जीवेंवीण जीवविलें । मृत्युवीण मरणचि मारिलें । दृष्टि घेऊनि दाखविलें । देखणें केलें सर्वांग ॥ ८२ ॥ देहीं देह विदेह केलें । शेखीं विदेहपण तेंही नेलें । नेलेपणही हारपलें । उरीं उरलें उर्वरित ॥ ८३ ॥ अभावों भावेंशीं गेला । संदेह निःसंदेहेंशीं निमाला । विस्मयो विस्मयीं बुडाला । वेडावला स्वानंदु ॥ ८४ ॥ तेथ आवडीं होय भक्तु । तंव देवोचि भक्तपणाआंतु मग भज्यभजनाचा अंतु । दावी उप्रांतु स्वलीला ॥ ८५ ॥ नमन नमनेंशीं नेलें । नमितें नेणो काय जाहलें । नम्यचि अंगीं घडलें । घडले मोडलें मोडूनि ॥ ८६ ॥ दृश्य द्रष्टा जाण । दोहींस एकचि मरण । दर्शनही जाहलें क्षीण । देखणेपण गिळूनि ॥ ८७ ॥ आतां देवोचि आघवा । तेथें भक्तु न ये भक्तभावा । तंव देवोही मुकला देवा । देवस्वभावा विसरोनि ॥ ८८ ॥ देवो देवपणे दाटला । भक्तु भक्तपणें आटला । दोहींचाही अंतु आला । अभेद जाहला अनंतु ॥ ८९ ॥ अत्यागु त्यागेंशीं विराला । अभोगु भोगेंशीं उडाला । अयोगु योगेंशीं बुडाला । योग्यतेचा गेला अहंभावो ॥ ९० ॥ ऐशियाहीवरी अधिक सोसु । सायुज्यामाजीं होतसे दासू । तेथील सुखाचा सौरसु । अति अविनाशु अगोचरू ॥ ९१ ॥ शिवें शिवूचि यजिजे । हें ऐशिये अवस्थेचि साजे । एर्हवीं बोलचि बोलिजे । परि न पविजे निजभजन ॥ ९२ ॥ ये अभिन्न सुखसेवेआंतु । नारद आनंदें नाचत गातु । शुकसनकादिक समस्तु । जाले निजभक्तु येणेंचि सुखें ॥ ९३ ॥ सागरीं भरे भरतें । तें भरतें भरे तरियांतें । तैसें देवेंचि देवपणें येथें । केलें मातें निजभक्त ॥ ९४ ॥ सागर सरिता जीवन एक । परी मिळणीं भजन दिसे अधिक । तैसें एकपणेंचि देख । भजनसुख उल्हासे ॥ ९५ ॥ वाम सव्य दोनी भाग । परी दों नामी एकचि आंग । तैसा देवभक्तविभाग । देवपणीं साङ्ग आभासे ॥ ९६ ॥ तेवीं आपुलेपणाचेनि मानें । भक्त केलों जनार्दनें । परी कायावाचामनें । वर्तविजे तेणें सर्वार्थीं ॥ ९७ ॥ तो मुखाचें जाला निजसुख । दृष्टीतें प्रकटे सन्मुख । तोचि विवेकेंकरून देख । करवी लेख ग्रंथार्थी ॥ ९८ ॥ परी नवल त्याचें लाघव । अभंगीं घातलें माझें नांव । शेखीं नांवाचा निजभाव । उरावया ठाव नुरवीच ॥ ९९ ॥ या वचनार्था संतोषला । म्हणे भला रे भला भला । निजभाविकु तूंचि संचला । प्रगट केला गुह्यार्थु ॥ १०० ॥ हे स्तुति कीं निरूपण । ग्रंथपीठ कीं ब्रह्मज्ञान । साहित्य कीं समाधान । संज्ञाही जाण कळेना ॥ १०१ ॥ तुझा बोलुचि एकएकु । सोलीव विवेकाचा विवेकु । तो संतोषासी संतोखु। आत्यंतिकु उपजवी ॥ १०२ ॥ तुझेनि मुखें जें जें निघे । तें संतहृदयीं साचचि लागे । मुमुक्षुसारंगांचीं पालिंगें । रुंजी निजांगें करितील ॥ १०३ ॥ ग्रंथारंभु पडला चोख । मुक्त मुमुक्षु इतर लोक । श्रवणामात्रेंचि देख । निजात्मसुख पावती ॥ १०४ ॥ येणें वचनामृत तुषारें । ग्रंथभूमिका विवेकांकुरें । अंकुरली एकसरें । फळभारें सफलित ॥ १०५ ॥ कीं निर्जीवा जीवु आला । नातरी सिद्धा सिद्धिलाभु जाला । कीं निजवैभवें आपुला । प्रियो मीनला पतिव्रते ॥ १०६ ॥ तैसेनि हरुषानंदें । जी जी म्हणितलें स्वानंदें । तुमचेनि पादप्रसादें । करीन विनोदें ग्रंथार्थू ॥ १०७ ॥ श्रीरामप्रतापदृष्टीं । शिळा तरती सागरापोटीं । कीं वसिष्ठवचनासाठीं । तपे शाटी रविमंडळीं ॥ १०८ ॥ कीं याज्ञवल्कीच्या मंत्राक्षता । शुष्ककाष्ठांस पल्लवता । कीं धर्में श्वानु सरता । केला सर्वथा स्वर्गलोकीं ॥ १०९ ॥ तैसे माझेनि नांवें । ग्रंथ होती सुहावे । आज्ञाप्रतापगौरवें । गुरुवैभवें सार्थकु ॥ ११० ॥ घटित एका आणि एकादशें । राशि-नक्षत्र एकचि असे । त्या एकामाजीं जैं पूर्ण दिसे । तैं दशदशांगें चढे अधिक ॥ १११ ॥ मागां पुढां एक एक कीजे । त्या नांव एकादशु म्हणिजे । तरी एका एकपणचि सहजें । आलें निजवोजें ग्रंथार्थें ॥ ११२ ॥ तेथें देखणेंचि करूनि देखणें । अवघेंचि निर्धारूनि मनें । त्यावरी एकाजनार्दनें । टीका करणें सार्थक ॥ ११३ ॥ पाहोनि दशमाचा प्रांतु । एकादशाच्या हृदयाआंतु । एकादशावरी जगन्नाथु । ग्रंथार्थु आरंभी ॥ ११४ ॥ म्हणौनि एकादशाची टीका । एकादशीस करी एका । ते एकपणाचिया सुखा । फळेल देखा एकत्वें ॥ ११५ ॥ आतां वंदूं महाकवी । व्यास वाल्मीक भार्गवी । जयातें उशना कवी । पुराणगौरवीं बोलिजे ॥ ११६ ॥ तिहीं आपुलिये व्युत्पत्ती । वाढवावी माझी मती । हेचि करीतसें विनंती । ग्रंथ समाप्तीं न्यावया ॥ ११७ ॥ वंदूं आचार्य शंकरू । जो ग्रंथार्थविवेकचतुरू । सारूनि कर्मठतेचा विचारू । प्रबोधदिनकरू प्रकाशिला ॥ ११८ ॥ आतां वंदूं श्रीधर । जो भागवतव्याख्याता सधर । जयाची टीका पाहतां अपार । अर्थ साचार पैं असे ॥ ११९ ॥ इतरही टीकाकार । काव्यकर्ते विवेकचतुर । त्यांचे चरणीं नमस्कार । ग्रंथा सादर तिहीं होआवें ॥ १२० ॥ वंदूं प्राकृत कवीश्वर । निवृत्तिप्रमुख ज्ञानेश्वर । नामदेव चांगदेव वटेश्वर । ज्यांचें भाग्य थोर गुरुकृपा ॥ १२१ ॥ जयांचे ग्रंथ पाहतां । ज्ञान होय प्राकृतां । तयांचें चरणी माथा । निजात्मता निभावें ॥ १२२ ॥ संस्कृत ग्रंथकर्ते ते महाकवी । मा प्राकृतीं काय उणीवी । नवीं जुनीं म्हणावीं । कैसेनि केवीं सुवर्णसुमनें ॥ १२३ ॥ कपिलेचें म्हणावें क्षीर । मा इतरांचें तें काय नीर । वर्णस्वादें एकचि मधुर । दिसे साचार सारिखें ॥ १२४ ॥ जें पाविजे संस्कृत अर्थें । तेंचि लाभे प्राकृतें । तरी न मनावया येथें । विषमचि तें कायी ॥ १२५ ॥ कां निरंजनीं बसला रावो । तरी तोचि सेवकां पावन ठावो । तेथें सेवेसि न वचतां पाहा हो । दंडी रावो निजभृत्यां ॥ १२६ ॥ कां दुबळी आणि समर्थ । दोहींस रायें घातले हात । तरी दोघींसिही तेथ । सहजें होत समसाम्य ॥ १२७ ॥ देशभाषावैभवें । प्रपंच पदार्थीं पालटलीं नांवें । परी रामकृष्णादिनामां नव्हे । भाषावैभवें पालटु ॥ १२८ ॥ संस्कृत वाणी देवें केली । तरी प्राकृत काय चोरापासोनि जाली । असोतु या अभिमानभुली । वृथा बोलीं काय काज ॥ १२९ ॥ आतां संस्कृता किंवा प्राकृता । भाषा झाली जे हरिकथा । ते पावनचि तत्त्वता । सत्य सर्वथा मानली ॥ १३० ॥ वंदूं ’भानुदास’ आतां । जो कां पितामहाचा पिता । ज्याचेनि वंश भगवंता । झाला सर्वथा प्रियकर ॥ १३१ ॥ जेणें बाळपणीं आकळिला भानु । स्वयें जाहला चिद्भानु । जिंतोनि मानाभिमानु । भगवत्पावनु स्वयें झाला ॥ १३२ ॥ जयाचि पदबंध प्राप्ति । पाहों आली श्रीविठ्ठलमूर्ति । कानीं कुंडलें जगज्ज्योति । करितां रातीं देखिला ॥ १३३ ॥ तया भानुदासाचा ’चक्रपाणि’ । तयाचाही सुत सुलक्षणी । तया ’सूर्य’ नाम ठेवूनि । निजीं निज होऊनि भानुदास ठेला ॥ १३४ ॥ तया सूर्यप्रभाप्रतापकिरणीं । मातें प्रसवली रुक्मिणी । म्हणौनि रखुमाई जननी । आम्हांलागूनि साचचि ॥ १३५ ॥ हे ग्रंथारंभकाळा । वंदिली पूर्वजमाळा । धन्य निजभाग्याचि लीळा । आलों वैष्णवकुळा जन्मोनि ॥ १३६ ते वैष्णवकुळीं कुळनायक । नारद प्रल्हाद सनकादिक । उद्धव अक्रूर श्रीशुक । वसिष्ठादिक निजभक्त ॥ १३७ ॥ ते वैष्णव सकळ । ग्रंथार्थीं अवधानशीळ । म्हणौनि वैष्णवकुळमाळ । वंदिली सकळ ग्रंथार्थीं ॥ १३८ ॥ उपजलों ज्याचिया गोत्रा । नमन त्या विश्वामित्रा । जो कां प्रतिसृष्टीचा धात्रा । गायत्रीमंत्रा महत्त्व ॥ १३९ ॥ जो उपनिषद्विवेकी । तो वंदिला याज्ञवल्की । जो कविकर्तव्यातें पोखी । कृपापीयूखीं वर्षोनि ॥ १४० ॥ नमन भूतमात्रां अशेखां । तेणें विश्वंभरू जाहला सखा । म्हाणौनि ग्रंथारंभु देखा । आला नेटका संमता ॥ १४१ ॥ आतां नमूं दत्तात्रेया । जो कां आचार्यांचा आचार्या । तेणें प्रवर्तविलें ग्रंथकार्या । अर्थवावया निजबोधु ॥ १४२ ॥ तो शब्दातें दावितु । अर्थु अर्थें प्रकाशितु । मग वक्तेपणाची मातु । स्वयें वदवितु यथार्थ ॥ १४३ ॥ तो म्हणे श्रीभागवत । तें भगवंताचें हृद्गत त्यासीचि होय प्राप्त । ज्याचें निरंतर चित्त भगवंतीं ॥ १४४ ॥ तें तें हें ज्ञान कल्पादी । ’चतुःश्लोक’ पदबंधीं । उपदेशिला सद्बुद्धी । निजात्मबोधीं विधाता ॥ १४५ ॥ नवल तयाचा सद्भावो । शब्दमात्रें झाला अनुभवो । बाप सद्गुरुकृपा पहा हो । केला निःसंदेहो परमेष्ठी ॥ १४६ ॥ तो चतुःश्लोकींचा बोधु । गुरुमार्गें आला शुद्धु । तेणें उपदेशिला नारदु । अतिप्रबुद्धु भावार्थीं ॥ १४७ ॥ तेणें नारदु निवाला । अवघा अर्थमयचि झाला । पूर्ण परमानंदें धाला । नाचों लागला निजबोधें ॥ १४८ ॥ तो ब्रह्मवीणा वाहतु । ब्रह्मपदें गीतीं गातु । तेणें ब्रह्मानंदें नाचतु । विचरे डुल्लतु भूतळीं ॥ १४९ ॥ तो आला सरस्वती तीरा । तंव देखिलें व्यास ऋषीश्वरा । जो संशयाचिया पूरा । अतिदुर्धरामाजीं पडिला ॥ १५० ॥ वेदार्थ सकळ पुराण । व्यासें केलें निर्माण । परी तो न पवेचि आपण । निजसमाधान स्वहिताचें ॥ १५१ ॥ तो संशयसमुद्रा आंतु । पडोनि होता बुडतु । तेथें पावला ब्रह्मसुतु । ’नाभी’ म्हणतु कृपाळू ॥ १५२ ॥ तेणें एकांतीं नेऊनि देख । व्यासासि केला एकमुख । मग दाविले चार्ही श्लोक । भवमोचक निर्दुष्ट ॥ १५३ ॥ ते सूर्याते न दाखवुनी । गगनातेंही चोरूनी । कानातें परते सारूनी । ठेला उपदेशुनी निजबोधु ॥ १५४ ॥ तें नारदाचें वचन । करीत संशयाचें दहन । तंव व्यासासि समाधान । स्वसुखें पूर्ण हों सरलें ॥ १५५ ॥ मग श्रीव्यासें आपण । भागवत दशलक्षण । शुकासि उपदेशिलें जाण । निजबोधें पूर्ण सार्थक ॥ १५६ ॥ तेणें शुकही सुखावला । परमानंदें निवाला । मग समाधिस्थ राहिला । निश्चळ ठेला निजशांती ॥ १५७ ॥ तेथें स्वभावेंचि जाणा । समाधि आली समाधाना । मग परीक्षितीचिया ब्रह्मज्ञाना । अवचटें जाणा तो आला ॥ १५८ ॥ पहावया परीक्षितीचा अधिकारु । तंव कलीसि केला तेणें मारु तरी धर्माहूनि दिसे थोरु । अधिकारु पैं याचा ॥ १५९ ॥ कृष्णु असतां धर्म जियाला । पाठीं कलिभेणें तो पळाला । परी हा कलि निग्रहूनि ठेला । धर्माहूनि भला धैर्यें अधिक ॥ १६० ॥ अर्जुनवीर्यपरंपरा निर्व्यंग । सुभद्रा मातामहीचें गर्भलिंग । तो अधिकाररत्न उपलिंग । ज्यासी रक्षिता श्रीरंग गर्भीं झाला ॥ १६१ ॥ गर्भींच असता ज्याच्या भेणें । स्पर्शूं न शके शस्त्र द्रौण्य । त्याचा अधिकार पूर्ण । सांगावया कोण समर्थ ॥ १६२ जेणें रक्षिले गर्भाप्रती । तया परीक्षी सर्वांभूतीं । यालागीं नांवें परीक्षिती । अगाध स्थिती नांवाची ॥ १६३ ॥ तो अभिमन्यूचा परीक्षिती । उपजला पावन करीत क्षिती । ज्याचेनि भागवताची ख्याती । घातली त्रिजगतीं परमार्थपव्हे ॥ १६४ ॥ अंगीं वैराग्यविवेकु । ब्रह्मालागीं त्यक्तोदकु तया देखोनि श्रीशुकु । आत्यंतिकु सुखावला ॥ १६५ ॥ बाप कोपु ब्राह्मणाचा । शापें अधिकारु ब्रह्मज्ञानाचा । तयांच्या चरणीं कायावाचा । निजभावा नमस्कारु ॥ १६६ ॥ ब्रह्माहूनि ब्राह्मण थोरु । हें मीच काय फार करूं । परी हृदयीं अद्यापि श्रीधरु । चरणालंकारु मिरवितु ॥ १६७ ॥ म्हणोनि ब्रह्माचा देवो ब्राह्मणु । हा सत्यसत्य माझा पणु । यालागीं वेदरूपें नारायणु । उदरा येऊनु वाढविला ॥ १६८ ॥ म्हणोनि ब्राह्मण भूदेव । हें ब्रह्मींचे निजावेव । येथें न भजती ते मंददैव । अति निर्दैव अभाग्य ॥ १६९ ॥ ब्राह्मणप्रतापाचा नवलावो । तिहीं आज्ञाधारकु केला देवो । प्रतिमाप्रतिष्ठेसि पहा हो । प्रकटे आविर्भावो मंत्रमात्रें ॥ १७० ॥ तंव संत म्हाणती काय पहावें । जें स्तवनीं रचिसी भावें । तेथें प्रमेय काढिसी नित्य नवें । साहित्यलाघवें साचार ॥ १७१ ॥ गणेशु आणि सरस्वती । बैसविलीं ब्रह्मपंक्ती । तैशींच संतस्तवनीं स्तुतीं । ऐक्यवृत्ती वदलासी ॥ १७२ ॥ पाठीं कुल आणि कुलदैवता । स्तवनीं वदलासि जे कथा । ते ऐकतांचि चित्त चिंता । विसरे सर्वथा श्रवणेंचि ॥ १७३॥ जो सद्भावो संतचरणीं । तोचि भावो ब्राह्मणीं । सुखी केले गुरु स्तवनीं । धन्य वाणी पैं तुझी ॥ १७४ ॥ तरी तुझेनि मुखें श्रीजनार्दन । स्वयें वदताहे आपण । हे बोलतांचि खूण । कळली संपूर्ण आम्हांसी ॥ १७५ ॥ चढत प्रमेयाचें भरतें । तें नावेक आवरोनि चित्तें । पुढील कथानिरूपणातें । करी निश्चितें आरोहण ॥ १७६ ॥ विसरलों होतों हा भावो । परी भला दिधला आठवो । याचिलागीं सद्भावो । तुमचे चरणीं पहा हो ठेविला ॥ १७७ ॥ उणें देखाल जें जें जेथें । तें तें करावें पुरतें । सज्जनांमाजीं सरतें । करावें मातें ग्रंथार्थसिद्धी ॥ १७८ ॥ ते म्हणती भला रे भला नेटका । बरवी ही आया आली ग्रंथपीठिका । आतां संस्कृतावरी टीका । कविपोषका वदें वहिला ॥ १७९ ॥ याचि बोलावरी माझा भावो । ठेवूनि पावलों पायांचा ठावो । तरी आज्ञेसारिखा प्रस्तावो । करीन पाहा हो कथेचा ॥ १८० ॥ तरी नैमिषारण्याआंतु । शौनकादिकांप्रति मातु । सूत असे सांगतु । गतकथार्थु अन्वयो ॥ १८१ ॥ मागें दहावें स्कन्धीं जाण । कथा जाली नव-लक्षण । आतां मोक्षाचें उपलक्षण । सांगे श्रीकृष्ण एकादशीं ॥ १८२ ॥ जो चिदाकाशींचा पूर्ण चंद्र । जो योगज्ञाननरेंद्र । तो बोलता झाला शुक योगींद्र । परिसता नरेंद्र परीक्षिती ॥ १८३ ॥ तंव परीक्षिती म्हणे स्वामी । याचिलागीं त्यक्तोदक मी । तेचि कृपा केली तुम्हीं । तरी धन्य आम्ही निजभाग्यें ॥ १८४ ॥ अगा हे साचार मोक्षकथा । ज्यांसि मोक्षाची अवस्था । तिहीं पाव देऊनि मनाचे माथां । रिघावें सर्वथा श्रवणादरीं ॥ १८५ ॥ भीतरी नेऊनियां कान । कानीं द्यावें निजमन । अवधाना करूनि सावधान । कथानुसंधान धरावें ॥ १८६ ॥ बहुतीं अवतारीं अवतरला देवो । परी या अवतारींचा नवलावो । देवां न कळे अभिप्रावो । अगम्य पहा हो हरिलीला ॥ १८७ ॥ उपजतांचि मायेवेगळा । वाढिन्नला स्वयें स्वलीळा । बाळपणीं मुक्तीचा सोहळा । पूतनादि सकळां निजांगें अर्पी ॥ १८८ मायेसि दाविलें विश्वरूप । गोवळां दाविलें वैकुंठदीप । परी गोवळेपणाचें रूप । नेदीच अल्प पालटों ॥ १८९ ॥ बाळ बळियांतें मारी । अचाट कृत्यें जगादेखतां करी । परी बाळपणाबाहेरी । तिळभरी नव्हेचि ॥ १९० ॥ ब्रह्म आणि चोरी करी । देवो आणि व्यभिचारी । पुत्र कलत्र आणि ब्रह्मचारी । हेही परी दाखविली ॥ १९१ ॥ अधर्में वाढविला धर्म । अकर्में तारिलें कर्म । अनेमें नेमिला नेम । अति निःसीम निर्दुष्ट ॥ १९२ ॥ तेणें संगेंचि सोडिला संगु । भोगें वाढविला योगु । त्यागेंवीण केला त्यागु । अति अव्यंगु निर्दोष ॥ १९३ ॥ कर्मठां होआवया बोधु । कर्मजाड्याचे तोडिले भेदु । भोगामाजीं मोक्षपदु । दाविलें विशदु प्रकट करूनि ॥ १९४ ॥ भक्ति भुक्ति मुक्ति । तिन्ही केलीं एके पंक्ती । काय वानूं याची ख्याति । खाऊनि माति विश्वरूप दावी ॥ १९५ ॥ त्याचिया परमचरित्रा । तुज सांगेन परमपवित्रा । परी निजबोधाचा खरा । या अवतारीं पुरा पवाडा केला ॥ १९६ ॥ एकादशाच्या तात्पर्यार्थीं । संक्षेपें विस्तरे मुक्ति । बोललीसे आद्यंतीं । परमात्मस्थिति निजबोधें ॥ १९७ ॥ तेथें नारदें वसुदेवाप्रती । संवादूनि निमि-जायंती । सांगितली कथासंगती । ’संक्षेपस्थिति’ या नाम ॥ १९८ ॥ तेचि उद्धवाची परमप्रीति । नाना दृष्टांतें उपपत्ति । स्वमुखें बोलिला श्रीपति । ते कथा निश्चितीं ’सविस्तर’ ॥ १९९ ॥ दशमीं ’निरोध’ लक्षण । मागां केलें निरूपण । जेथें धराभार अधर्मजन । निर्दळी श्रीकृष्ण नानायुक्ति ॥ २०० ॥ ज्यांचेनि अधर्मभारें क्षिति । सदा आक्रंदत होती । जिच्या साह्यालागीं श्रीपति । पूर्णब्रह्मस्थिति अवतरला ॥ २०१ ॥ दुष्ट दैत्य आणि दानव । धराभार राजे सर्व । वधिता झाला श्रीकृष्णदेव । तो गतकथाभाव शुक सांगे ॥ २०२ श्रीशुक उवाच - कृत्वा दैत्यवधं कृष्णः सरामो यदुभिर्वृतः । भुवोऽवतारयतभारं जविष्ठं जनयन्कलिम् ॥ १ पूर्णब्रह्म स्वयें श्रीकृष्ण । बळि बळिराम लोकरमण । निधडे यादव मेळवूनि जाण । दैत्यनिर्दळण श्रीकृष्णें केलें ॥ २०३ ॥ जे यादवांसि न येत वधीं । तेथें श्रीकृष्ण करी बुद्धि । सखे स्वजन स्वगोत्रामधीं । कलह उत्पादी अतिघोर ॥ २०४ ॥ उतरावया धराभार । कलहमिसें शारंगधर । मारवी कौरबभार । पांडुकुमर क्षोभवूनि ॥ २०५ ॥ ये कोपिताः सुबहु पाण्डुसुताः सपत्नैः दुद्यूतहेलनकचग्रहणादिभिस्तान् । कृत्वा निमित्तमितरेतरतः समेतान् हत्वा नृपान् निरहरत् क्षितिभारमीशः ॥ २ ॥ दुष्ट अकर्मी अतिघोर । ज्यांची सेना धराभार । ते वधार्थ करावया एकत्र । कलहाचें सूत्र उपजवी कृष्ण ॥ २०६ ॥ येणें श्रीकृष्णसंकल्पोद्देशें । हों सरले कपटफांसे । तेणें कपट बांधून कैसे । वधवी अनायासें कौरवभार ॥ २०७ ॥ जगीं द्यूत खेळिजे दुष्टें । तेंही आरंभिलें कपटें । धर्मावरी फांसे खोटे । घालिती हटें दुर्बुद्धि ॥ २०८ ॥ बाळेभोळे अज्ञान जनीं । तेही गांजिती ना धर्मपत्नी । ते साचचि धर्माची मानिनी । आणिली बांधोनी सभेमाजीं ॥ २०९ ॥ दुःशासनें धरिले वेणीकच । तेणेंचि वाढिली कचकच । तें कर्म त्याचें त्यासीच । भंवलें साच त्याभोंवतें ॥ २१० वनी कोणी कोणा नागवी । तो नागोवा राजा आणवी । सभेसि राजा उगाणवी । तैं मृत्युची पदवी मस्तका आली ॥ २११ ॥ अन्यायेंवीण नागवी रावो । तैं धांवणिया धांवे देवो । द्रौपदीवस्त्रहरण पाहा हो । हा मुख्य अन्यावो कौरवां ॥ २१२ ॥ अग्निदानें गरदानें । धनदारा अपहारणें । घाला घालूनि मारणें । शस्त्रपाणी होणें वधार्थ ॥ २१३ ॥ अवज्ञा आणि हेळण । दुरुक्ती जें धर्मच्छळण । हेंचि निमित्तासी कारण । केलें संपूर्ण श्रीकृष्णें ॥ २१४ ॥ पतिव्रतेचे वस्त्रहरण । तेणें तत्काळ पावे मरण हेंचि कलहाचें कारण । कुळनिर्दळण येणें कर्में ॥ २१५ ॥ ऐसा जो धर्माचा विरोधी । त्यासी देवो अवश्य वधी । यालागी पाण्डवांचिये बुद्धि । अत्युग्र त्रिशुद्धी उपजवी कोपु ॥ २१६ ॥ भूभारहरणचरित्र । सखे स्वजन सुहृद स्वगोत्र । शास्त्रविवेकी अतिपवित्र । त्यांमाजीं विचित्र उपजवी कलहो ॥ २१७ ॥ धराभार हरावया गोविंदु । कळवळियाचे सखे बंधु । करविला तेथ गोत्रवधु । साह्य संबंधु राजभारेंसीं ॥ २१८ ॥ भूभारराजपृतना यदुभिर्निरस्य गुप्तैः स्वबाहुभिरचिन्तयदप्रमेयः मन्येऽवनेर्ननु गतोऽप्यगतं हि भारं यद्यादवं कुलमहो ह्यविषह्यमास्ते ॥ ३ ॥ ऐसे पक्षपाती राजे अपार । अमित सेना धराभार । मारविले अधर्मकर । मिषांतर कलहाचें ॥ २१९ ॥ पृथ्वीचे अधर्मसेनासंभार । शोधशोधूनि राजे मारिले अपार । तर्ही उतरला धराभार । हे शारंगाधर न मनीचि ॥ २२० ॥ यादव करून अतुर्बळ । नाना दुष्ट दमिले सकळ । परी यादव झाले अतिप्रबळ । हें न मनीच केवळ श्रीकृष्ण ॥ २२१ ॥ नव्हतां यादवांचें निदान । नुतरे धराभार संपूर्ण । ऐसें मानिता झाला श्रीकृष्ण । कुलनिर्दळण तो चिंती ॥ २२२ ॥ अग्नि कर्पूर खाऊनि वाढे । कापुरांतीं अग्निही उडे । तैसें यादवांचें अतिगाढें । आले रोकडें निदान ॥ २२३ ॥ केळी फळे तंव वाढे वाढी । फळपाकें माळी झाड तोडी । तैसी यादवकुळाची शीग गाढी । चढे रोकडी मरणार्थ ॥ २२४ ॥ फळ परिपाकें मरिमळी । तें घेऊन जाय माळी । तैशीं स्वकुळफळें वनमाळी । न्यावया तत्काळीं स्वयें इच्छी ॥ २२५ ॥ अनंतबाहुप्रतापें । यादव वाढलें श्रीकृष्णकृपें । तोचि निधनाचेनि संकल्पें । कालरूपें क्षोभला ॥ २२६ ॥ अतुर्बळ अतिप्रबळ । वाढलें जें यादवकुळ । ते वीर देखोनि सकळ । असह्य केवळ श्रीकृष्णासी ॥ २२७ ॥ नैवान्यतः परिभवोऽस्य भवेत् कथञ्चिन् मत्संश्रयस्य विभवोन्नहनस्य नित्यम् । अन्तः कलिं यदुकुलस्य विधाय वेणु स्तम्बस्य वह्निमिव शान्तिमुपैमि धाम ॥ ४ ॥ मज गेलिया निजधामा । हेचि प्रवर्तती अधर्मा । श्रियोन्नत अतिगर्व महिमा । मुख्य अकर्मा निजहेतु ॥ २२८ ॥ हे मद्बळें अतिप्रबळ । अतिरथी झाले सकळ । यांसि अप्रतिमल्लु दिग्मंडळ । यांतें दमिता केवळ मी एकु ॥ २२९ ॥ हे नाटोपती इंद्रादि देवां । दैत्य राक्षसां कां दानवां । शेखीं निर्दाळावया यादवां । मागुतें मज तेव्हां पडेल येणें ॥ २३० ॥ तरी आतांचि आपुले दिठी । कुळ बांधूं काळगांठीं । ऐसा विचार जगजेठी । निश्चये पोटीं दृढ केला ॥ २३१ ॥ दुवंश वंशजाळी । वाढली श्रीकृष्णकृपाजळीं । तेथें अवकृपेची इंगळी । ऋषिशापमेळीं कपटें पडली ॥ २३२ ॥ ते मूळी पेटली श्रीकृष्णसंकल्पें । धडाडली ब्रह्मशापें । ते स्वजनविरोधरूपें । काळाग्निकोपें नाशील ॥ २३३ ॥ ऐसें यादवकुळनिर्दळण । करूनियां स्वयें श्रीकृष्ण । निरसूनि निजधामा गमन । स्वलीला आपण करूं इच्छी ॥ २३४ ॥ एवं व्यवसितो राजन् सत्यसङ्कल्प ईश्वरः । शापव्याजेन विप्राणां सञ्जह्रे स्वकुलं विभुः ॥ ५ ॥ यापरी आपुले कुळ । नासूं आदरिलें तत्काळ । हाचि विचारु अढळ । केला समूळ कुळक्षयार्थ ॥ २३५ ॥ हेंचि कार्य होय कैसें । तें विचारिजे जगदीशें । ब्रह्मशापाचेनि मिसें । कुळ अनायासें नासेल ॥ २३६ इतकें हें जैं सिद्धी जाय । तैं सरलें अवतारकृत कार्य । मग स्वधामा यदुवर्य । जावों पाहे स्वलीला ॥ २३७ ॥ लीलाविग्रही सुंदरपूर्ण । गुणकर्मक्रिया अतिपावन । जगदुद्धारी श्रीकृष्ण । ब्रह्मपरिपूर्ण पूर्णावतार ॥ २३८ ॥ स्वमूर्त्या लोकलावण्य निर्मुक्त्या लोचनं नृणाम् । गीर्भिस्ताः स्मरतां चित्तं पदैस्तान् ईक्षतां क्रियाः ॥ ६ ॥ जो सकळ मंगळां मंगळ पूर्ण । जो कां गोकुळीं कामिनीरमण । मोक्षाचें तारूं स्वयें श्रिकृष्ण । ज्याचें बरवेपण अलोलिक ॥ २३९ ॥ जो भक्तकामकल्पद्रुम । मनोहर मेघश्याम । ज्याचें त्रिलोकीं दाटुगें नाम । स्वयें पुरुषोत्तम शोभतु ॥ २४० ॥ श्रीकृष्णाचिया सौंदर्यापुढें । लक्ष्मी भुलोनि झाली वेडें । मदन पोटा आलें बापुडें । तेथ कोणीकडे इंद्र चंद्र ॥ २४१ ॥ ज्याचें त्रैलोक्य पावन नाम । जो करी असुरांचे भस्म । तो बोलिजे अवाप्तकाम । भक्तां सुगम सर्वदा ॥ २४२ ॥ त्रिलोकींचे बरवेपण । भुलोनि कृष्णापाशीं आले जाण । नाम कृष्णलेशें बरवेपण । शोभे संपूर्ण तिहीं लोकीं ॥ २४३ ॥ जो सकल सौंदर्याची शोभा । जो लावण्याचा अतिवालभा । ज्याचिया अंगसंगप्रभा । आणिली शोभा जगासी ॥ २४४ ॥ जो हरिखाचा सोलींव हरिख । कीं सुख सुखावतें परमसुख । ज्याचेनि विश्रांतीसि देख । होय आत्यंतिक विसांवा ॥ २४५ ॥ तो अमूर्त मूर्तिधारण । कीं सकललोकलावण्य । शोभा शोभवी श्रीकृष्ण । सौभाग्य संपूर्ण साजिरा ॥ २४६ ॥ घृत थिजलें कीं विघुरलें । परी घृतपणा नाहीं मुकलें । तेवीं अमूर्त मूर्तीं मुसावलें । परी तें संचलें परब्रह्म ॥ २४७ ॥ तयासि देखिलियाचि पुरे । देखादेखीं देखणेंचि सरे । पहाणें पाहतेनिसीं माघारें । लाजोनि वोसरे सलज्ज ॥ २४८ ॥ दृष्टी धाली दे ढेंकर । आपण आपुले शेजार । होवोनियां परात्पर । सुखाचे साचार श्रीकृष्णरूपीं ॥ २४९ ॥ श्रीकृष्णाची चाखिल्या गोडी । रसस्वादु रसना सोडी । जाये चाखणेपणाची आवडी । चाखतें दवडी चाखोनि ॥ २५० ॥ नवल तेथींचें गोडपण । अमृतही फिकें केलें जाण । यापरी रसना आपण । हरिरसीं संपूर्ण सुखावे ॥ २५१ ॥ लागतां श्रीकृष्णसुवावो । अवघा संसारुंचि होय वावो । सेवितां श्रीकृष्णसुगंधवावो । घ्राणासि पहा वो आन नावडे ॥ २५२ ॥ वासु सुवासु सुमन । घ्रेय घ्राता घ्राण । कृष्णमकरंदे जाण । विश्रामा संपूर्ण स्वयें येती ॥ २५३ ॥ जयाचेनि अंगस्पर्शें । देह देही देहपण नासे । अंगचि अंगातें कैसें । विसरे आपैसें देहबुद्धि ॥ २५४ ॥ कठिणाचें कठिणपण गेलें । मृदुचें मृदुपणही नेलें । कृष्णस्पर्शें ऐसें केलें । स्पर्शाचें ठेलें स्पर्शत्व ॥ २५५ ॥ तयाचेनि पठणें वाचा । ठावो वाच्यवाचकांचा । नेतिशब्दें पुसोनि साचा । करी शब्दाचा निःशब्दु ॥ २५६ ॥ बोलु बोलपणेंचि ठेलें । बोलतें नेणों काय झालें । कृष्णशब्दें ऐसें केलें । वाच्यानें नेलें वाचिक ॥ २५७ ॥ चित्त चिंतितांच पाये । चित्तपणा विसरोनि जाये । मग निश्चितपणे पाहे । कृष्णचरणी राहे निवांत ॥ २५८ ॥ चित्त चिंता चिंतन । तिहींची नुरे आठवण । चिंतितांचि श्रीकृष्णचरण । ब्रह्मपरिपूर्ण निजचित्त ॥ २५९ ॥ नवल तयाचा पदक्रम । पाहतां पारुषे कर्माकर्म । मग कर्म कर्ता क्रियाभ्रम । करी निर्भ्रम पदरजें ॥ २६० पाहतां पाउलांचा माग । तुटती कर्माकर्मांचे लाग । कर्माचें मुख्य माया अंग । तिचा विभाग उरों नेदी ॥ २६१ गयीमागील कृष्ण पाउले । पाहतां कर्म कर्तेनिसीं गेलें । अकर्म म्हणणें नाहीं उरलें । ऐसें कर्म केलें निष्कर्म ॥ २६२ ॥ जयाचेनि कीर्तिश्रवणें । श्रोता नुरे श्रोतेपणें । वक्ता पारुषे वक्तेपणें । श्रवणें पावणें परब्रह्म ॥ २६३ ॥ आच्छिद्य कीर्तिं सुश्लोकां वितत्य ह्यञ्जसा नु कौ । तमोऽनया तरिष्यन्तीत्यगात्स्वं पदमीश्वरः ॥ ७ ॥ यापरी उदारकीर्ती । थोर केली अवतारख्याती । जेणें जडजीव उद्धरती । श्रवणें त्रिजगती पावन होये ॥ २६४ ॥ स्वधामा गेलिया चक्रधरु । मागां तरावया संसारु । कृष्णकीर्ति सुगम तारूं । ठेवून श्रीधरु स्वयें गेला ॥ २६५ ॥ नवल या तारुवाची स्थिती । बुडवूं नेणे कल्पांतीं । श्रवणें तरले नेणों किती । पुढेंही तरती श्रद्धाळू ॥ २६६ ॥ श्रीकृष्णकीर्तीचें तारूं । घालितां आटे भवसागरु । तेथें कोरड्या पाउलीं उतारु । श्रवणार्थी नरु स्वयें लाहे ॥ २६७ ॥ जे कृष्णकीर्ति करिती पठण । त्यांच्या संसारासि पडे शून्य । कीर्तिवंत ते अतिपावन । त्यांतें सुरगण वंदिती ॥ २६८ ॥ आदरें पढतां श्रीकृष्णकीर्ति । पायां लगती चारी मुक्ति । त्यांचेनि पावन त्रिजगती । परमनिर्वृत्ति हरिनामें ॥ २६९ ॥ श्रीकृष्णकीर्तिनामाक्षरें । रिघतांचि श्रवणद्वारें । भीतरील तम एकसरें । निघे बाहेरें गजबजोनि ॥ २७० ॥ तंव कृष्णकीर्तिकथा गजरीं । तमासि ठावो नुरेचि बाहेरी । धाकेंचि निमे सपरिवारीं । कृष्णकीर्तिमाझारीं परमानंदु । २७१ ॥ कृष्णकीर्तिप्रतापप्रकाशें । संसार कृष्णमय दिसे । कीर्ति कीर्तिमंताऐसें । दे अनायासें निजसुख ॥ २७२ ॥ जो देखिलिया देखणें सरे । जो चाखिलिया चाखणें पुरे । जो ऐकिलिया ऐकणें वोसरे । जो चिंतितां नुरे चित्तवृत्ति ॥ २७३ ॥ ज्यासि झालिया भेटी । भेटीसी न पडे तुटी । ज्यासि बोलतां गोठी । पडे मिठी परमार्थीं ॥ २७४ ॥ ज्यासि दिधलिया खेंव । खेंवाची पुरे हांव ज्याचें घेतांचि नांव । नासे सर्व महाभय ॥ २७५ ॥ तो सत्यसंकल्प ईश्वरु । स्वलीला सर्वेश्वरु । स्वपदासि शारङ्गधरु । अतिसत्वरु निघाला ॥ २७६ ॥ श्रीराजोवाच । ब्रह्मण्यानां वदान्यानां नित्यं वृद्धोपसेविनाम् । विप्रशापः कथं अभूत् वृष्णीनां कृष्णचेतसाम् ॥ ८ ॥ आदरें पुसे परीक्षिती । यादव विनीत विप्रभक्तीं । त्यांसि शापु घडे कैशिया रितीं । सांग तें मजप्रती शुकयोगींद्रा ॥ २७७ यादव दानें अतिउदार । राजे होऊनि परम पवित्र । ब्राह्मणसेवे तत्पर । आज्ञाधर कृष्णाचे ॥ २७८ यादव सदा कृष्णयोगेंसी । नित्य साधु यादवांपासी । तेथेंचि वसे नारदऋषी । शापु यादवांसी घडे कैसा ॥ २७९ ॥ दक्षशाप न बाधी कृष्णापासीं । म्हणौनि नारद वसे द्वारकेसी । तोचि श्रीकृष्ण असतां अंगेंसी । शापु यादवांसी घडे कैसा ॥ २८० ॥ यन्निमित्तः स वै शापो यादृशो द्विजसत्तम । कथमेकात्मनां भेद एतत्सर्वं वदस्व मे ॥ ९ ॥ शापासि मूळ मुख्य संतापु । कैसेनि ब्राह्मणां आला कोपु । कोणेपरीचा दिधला शापु । संक्षेपरूपु सांगावा ॥ २८१ ॥ यादव समस्त सखे बंधु । यांसि प्रतिपाळी स्वयें गोविंदु । एकात्मता स्वगोत्रसंबंधु । त्यांमाजीं युद्धभेदु घडे कैसा ॥ २८२ ॥ "आत्मा वै पुत्रनामासि" । हे श्रुति प्रमाण सर्वांसी । तेथें शाप बाधी कृष्णात्मजांसी । केवीं आलें यासी सत्यत्व ॥ २८३ ॥ कृष्णसंकल्प कुळनाशन । तोचि ब्रह्मशापासी कारण । यालागीं बाधक जाण । होय संपूर्ण यादवां ॥ २८४ ॥ सृष्टि स्रजी पाळी संहारी । हें कृष्न संकल्पमात्रें करी । तो यदुकुळनिधान निर्धारी । त्याची अवतारथोरी शुक सांगे ॥ २८५ ॥ श्रीबादरायणिरुवाच । बिभ्रद्वपुः सकलसुन्दरसन्निवेश कर्माचरन्भुवि सुमङ्गलमाप्तकामः । आस्थाय धाम रममाण उदारकीर्तिः संहर्तुमैच्छत कुलं स्थितकृत्यशेषः ॥ १० ॥ कर्मानि पुण्यनिवहानि सुमङ्गलानि गायज्जगत्कलिमलापहराणि कृत्वा । कालात्मना निवसता यदुदेवगेहे पिण्डारकं समगमन् मुनयो निसृष्टाः ॥ ११ ॥ रायासी म्हणे श्रीशुकु । कर्ता करविता श्रीकृष्ण एकु । तो शापार्थ आत्यंतिकु । आत्मजां अविवेकु उपजवी स्वयें ॥ २८६ ॥ स्वयें जावया निजधामा । थोर आवडी पुरुषोत्तमा । यालागीं अवशेषकर्मा । मेघश्यामा लवलाहो ॥ २८७ ॥ केव्हां होईल कुलक्षयो । हेंचि मनीं धरी देवो । तो देवाचाचि भावो । शपासि पहा वो दृढ मूळ ॥ २८८ ॥ जो कुलक्षयो चिंती । त्या कृष्णाची सुंदरमूर्ति । शुक सांगे परीक्षितीप्रती । स्वानंदस्थिति उल्हासे ॥ २८९ ॥ सकल सौंदर्या अधिवासु । धरोनि मनोहर नटवेषु । लावण्यकलाविन्यासु । आणी जगदीशु उल्हासे ॥ २९० नवल सौंदर्या बीक उठी । सर्वांगीं गुंतल्या जनदिठी । कृष्णस्वरूपीं पडे मिठी । होत लुलुबुटी डोळ्यां ॥ २९१ ॥ जैशी गुळीं माशीवरी माशी । तेवीं दिठीवरी दिठी कृष्णारूपासी सर्वांगी वेढोनि चौपासीं । अहर्निशीं नोसंडिती ॥ २९२ ॥ नयन लांचावले लोभा । दृष्टीसि निघालिया जिभा । यापरी श्रीकृष्णशोभा । स्वानंदगाभा साकार ॥ २९३ ॥ तो श्रीकृष्ण देखिला ज्या दिठीं । ते परतोनि मागुती निठी । अधिकाधिक घाली मिठी । देखे सकळ सृष्टी श्रीकृष्णु ॥ २९४ ॥ ऐशी डोळ्यां आवडी । म्हणौनि कामिनी वरपडी । यालागीं गोपिकां गोडी । अतिगाढी गोविंदीं ॥ २९५ ॥ कृष्ण अतिसुंदर मनोरम । म्हणाल असेल त्यासी विषयधर्म । तरी तो अवाप्तसकळकाम । आत्माराम श्रीकृष्ण ॥ २९६ ॥ कृष्ण अवाप्तसकळकाम । त्यासि कां द्वारका गृहाश्रम । स्त्रिया पुत्र राज्यसंभ्रम । विषयकाम कां भोगी ॥ २९७ ॥ चहुं आश्रमां प्रकाशकु । त्रिलोकीं कृष्ण गृहस्थ एकु । तोचि ब्रह्मचारी नैष्ठिकु । अतिनेटकु संन्यासी ॥ २९८ ॥ कृष्णदेहीं नाहीं दैवबळ । लीलाविग्रही चित्कल्लोळ । त्याची सर्व कर्में पावनशीळ । उद्धरी सकळ श्रवणें कथनें ॥ २९९ ॥ कृष्णकर्मांचे करी जो स्मरण । तें कर्म तोडी कर्मबंधन । ऐसें उदार कर्माचरण । आचरला श्रीकृष्ण दीनोद्धरणा ॥ ३०० ॥ श्रीकृष्ण असेल सकाम । म्हणाल यालागीं आचरे कर्म । ज्याचें नाम निर्दळी सर्व काम । तो स्वयें सकाम घडे केवीं ॥ ३०१ ॥ श्रीकृष्णाचा स्मरतां काम । स्वयें संन्यासी होती निष्काम । सकामाचा निर्दळे काम । ऐसें उदार कर्म आचरला ॥ ३०२ ॥ तेणें अवाप्तसकळकामें । ऐशीं आचरला अगाध कर्में । मानव तारावया मनोधर्में । कीर्ति मेघश्यामें विस्तारिली ॥ ३०३ ॥ कैसें कर्म सुमंगळु । कानीं पडतांचि अळुमाळु । नासोनियां कर्ममळु । जाती तत्काळु श्रवणद्वारे ॥ ३०४ ॥ श्रवणें उपजे सद्भावो । सद्भावें प्रकटे देवो । तेणें निर्दळे अहंभावो । ऐशी उदार पहा वो हरिकीर्ति ॥ ३०५ ॥ श्रीकृष्णकीर्तीचें स्मरण । कां करितां श्रवणपठण । मागें उद्धरले बहुसाल जन । पुढें भविष्यमाण उद्धरती ॥ ३०६ ॥ जरी केलिया होती पुण्यराशी । तरी अवधान होये हरिकथेसी । येर्हवीं ऐकतां येरांसी । लागे अनायासीं अतिनिद्रा ॥ ३०७ ॥ जे हरिकथेसी सादर । त्यांच्या पुण्या नाहीं पार । कृष्णें सुगमोपाव केला थोर । दिनोद्धार हरिकीर्तनें ॥ ३०८ ॥ कृष्णकीर्तनें गर्जतां गोठी । लाजिल्या प्रायश्चित्तांचिया कोटी । उतरल्या तीर्थांचिया उटी । नामासाठी निजमोक्षु ॥ ३०९ ॥ ऐसा निजकीर्तिउदारु । पूर्णब्रह्म शारंगधरु । लीलाविग्रही सर्वेश्वरु । पूर्णावतारु यदुवंशी ॥ ३१० ॥ उतरला धराभार येथ । सत्य न मनी श्रीकृष्णनाथ । यादव उरले अतिअद्भुत । तेही समस्त निर्दळावे ॥ ३११ ॥ ये अवतारीं हृषीकेशी । म्हणें हेंच कृत्य उरलें आम्हांसी । निर्दळोनि निजवंशासी । निजधामासी निघावें ॥ ३१२ ॥ तो यादवांमाजी माधव । कालात्मा देवाधिदेव । जाणोनि भविष्याचा भाव । काय अपूर्व करिता झाला ॥ ३१३ ॥ नारदादि मुनिगण । त्यांसि पाचारूनि आपण । करूं सांगे शीघ्रगमन । स्वयें श्रीकृष्ण साक्षेपें ॥ ३१४ ॥ ज्यांपासूनि संत दूरी गेले । तेथें अनर्थाचें केलें चाले । हें यादवनिधनालागीं वहिलें । लाघव केलें श्रीकृष्णें ॥ ३१५ ॥ भक्त संत साधु ज्यापासीं । तेथें रिघु नाही अनर्थासी । जाणे हें स्वयें हृषीकेशी । येरां कोणासी कळेना ॥ ३१६ ॥ जेथें संतांचा समुदावो । तेथें जन्ममरणां अभावो । हा श्रीकृष्णचि जाणे भावो । तो करी उपावो ब्रह्मशापार्थ ॥ ३१७ ॥ जेथूनि संत गेले दुरी । तेथें सद्यचि अनर्थु वाजे शिरीं । हें जाणोनियां श्रीहरी । द्वारकाबाहेरी ऋषी घाली ॥ ३१८ ॥ ऋषि जात होते स्वाश्रमासी । त्यांते लाघवी हृषीकेशी तीर्थमिषें स्मस्तांसी । पिंडारकासी स्वयें धाडी ॥ ३१९ ॥ पिंडारका मुनिगण । श्रीकृष्णें धडिले कोण कोण ज्यांचे करितांचि स्मरण । कळिकाळ आपण भयें कांपे ॥ ३२० विश्वामित्रोऽसितः कण्वो दुर्वासा भृगुरङ्गिराः । कश्यपो वामदेवोऽत्रिः वसिष्ठो नारदादयः ॥ १२ ॥ जे तपस्तेजें देदीप्यमान । जे पूर्णज्ञानें ज्ञानघन । ज्यातें सदा वंदी श्रीकृष्ण । ते ऋषीश्वर जाण निघाले ॥ ३२१ ॥ जे गायत्रीमंत्रासाठी । करूं शके प्रतिसृष्टी । जो विश्वामित्र महाहटी । तोही उठाउठी निघाला ॥ ३२२ ॥ जेथ न बाधी उष्णशीत । ते आश्रमीं वसे असित । ज्याचेनि नामें द्वंद्वें पळत । तोही त्वरीत निघाला ॥ ३२३ ॥ जो सूर्यासि रिघोनि शरण । अश्वाचे कर्णीं बैसोन आपण पूर्ण केले वेदपठण । तो कण्वही जाण निघाला ॥ ३२४ ॥ जो दुर्वास अत्याहारी । आहार सेवून निराहारी । तोही द्वारकेबाहेरी । त्वरेंकरूनि निघाला ॥ ३२५ ॥ भृगूचा श्रीचरण । हृदयीं वाहे नारायण । मिरवी वत्स भूषण । तो भृगुही जाण निघाला ॥ ३२६ ॥ अंगिरा स्वयें सद्बुद्धी सृष्टीं । बृहस्पति जन्मला ज्याचे पोटी । जो परमगुरु देवांच्या मुकुटीं । तोही उठी गमनार्थ ॥ ३२७ ॥ कश्यपाची नवलगोठी । सुर नर किन्नर जन्मले पोटीं । यालागी हे काश्यपी सृष्टी । तोही कश्यपु उठी निजगमनीं ॥ ३२८ ॥ मुक्तांमाजी श्रेष्ठ भावो । वेदीं वाखाणिला वामदेवो । तोही द्वारकेहूनि पहा हो । स्वयमेवो निघाला ॥ ३२९ ॥ अत्रीची नवल परी । तीनी देव जन्मले उदरीं । श्रीदत्त वंदिजे योगेश्वरीं । हे अगाध थोरी अनसूयेची ॥ ३३० ॥ तो स्वयें अत्री ऋषीश्वर । श्रीकृष्णआज्ञातत्पर । पिंडारका अतिसत्वर । प्रयाण शीघ्र तेणें केलें ॥ ३३१ ॥ जो रामाचा सद्गुरु । ब्रह्मज्ञाने अतिउदारु । ज्याचे शाटीचा प्रथाप थोरु । जिंकिला दिनकरु तपस्तेजें ॥ ३३२ ॥ ऐसा जो वसिष्ठ महामुनी । तोही कृष्णसंज्ञा मानुनी । निघाला द्वारकेहूनी । शीघ्र गमनीं पिंडारका ॥ ३३३ ॥ आणि देवर्षि नारदु । त्याचाही अगाध बोधु । ज्यासि सर्वदा परमानंदु । अति आल्हादु हरिकिर्तनी ३३४ ॥ ब्रह्मवीणा स्वयें वातु । ब्रह्मपदें गीत गातु । ब्रह्मानंदे नाचतु । निघे डुल्लतु पिंडारका ॥ ३३५ ॥ इत्यादि हे मुनिवरु । श्रेष्ठ श्रेष्ठ ऋषीश्वरु । शिष्यसमुदायें सहपरिवारु । मीनले अपारु पिंडारकीं ॥ ३३६ ॥ एवं पिंडारकीं ऋषि सर्व । शापानुग्रही महानुभाव । मीनले कृष्णवैभव । अतिअपूर्व वर्णिती ॥ ३३७ ॥ बाप लाघवी वनमाळी । कुलक्षयो घडावया तत्काळीं । कुमरीं ऋषीश्वरांसी रांडोळी । कपटमेळीं मांडिली ॥ ३३८ ॥ निंदा अवज्ञा हेळण । करितां ब्राह्मणांसि छळण । जेथ ब्रह्मद्वेष वाढे पूर्ण । कुळक्षयो जाण ते ठायीं ॥ ३३९ ॥ ब्राह्मणांच्या कोपापुढें । कुळ कायसें बापुडे । महादेवाचें लिंग झडे । इंद्रपदवी पडे समुद्रीं ॥ ३४० ॥ तो समुद्रही केला क्षार । ऐसा द्विजकोप अतिदुर्धर । हें एकाएकाचें चरित्र । ते ऋषि समग्र मीनले तेथें ॥ ३४१ ॥ धरातळीं ब्रह्म ब्राह्मण । त्यांचें वचन परम प्रमाण । हें सत्य करावया श्रीकृष्ण । कुळनिर्दळण स्वये दावी ॥ ३४२ ॥ क्रीडन्तस्तानुपव्रज्य कुमारा यदुनन्दनाः । उपसङ्गृह्य पप्रच्छुः अविनीता विनीतवत् ॥ १३ ॥ यदुनंदन समस्त । क्रीडाकंदुक झेलित । एकमेकांतें हाणित । ठकवून पळत परस्परें ॥ ३४३ ॥ ऐसा नाना क्रीडाविहार । करीत आले यदुकुमर । अंगीं श्रीमद अपार । औद्धत्यें थोर उन्मत्त ॥ ३४४ ॥ अतीत अनागत ज्ञानवंत । ऋषीश्वर मीनले समस्त । ज्यांचें वचन यथार्थभूत । त्यांसिही निश्चित ठकूं म्हणती ॥ ३४५ ॥ जैं अघडतें येऊनि पडे । तैं यांचें वचन कैसें घडे । म्हणोनि ऋषीश्वरांपुढें । मांडिलें कुडें यदुकुमरीं ॥ ३४६ ते वेषयित्वा स्त्रीवेषैः साम्बं जाम्बवतीसुतम् । एषा पृच्छति वो विप्रा अन्तर्वत्न्यसितेक्षणा ॥ १४ पहिलेच श्रीमतें उद्धट । त्यावरी मांडिलें कपट । साम्बास देऊनि स्त्रीनट । अतिवरिष्ठ बाणला ॥ ३४७ ॥ तो श्यामसुंदर डोळसु । अंगा शोभला स्त्रीवेषु । प्रमदावैभविलासु । दावी विन्यासु सलज्ज ॥ ३४८ ॥ नयनी सोगयाचें काजळ । व्यंकट कटाक्षु अतिचपल । सुंदर सुकुमार वेल्हाळ । चाले निश्चळ हंसगती ॥ ३४९ ॥ वस्त्रें बांधोनिया उदर । नावेक केलें थोर । तेणें ते गरोदर । दिसे साचार इतरांसी ॥ ३५० ॥ हात घालूनि सखियांच्या खांदीं । चालतां उदर हालों नेदी ॥ विसावा घेत पदोपदीं । येतां ऋषिवृंदीं देखिली ॥ ३५१ ॥ ऐसा स्त्रीवेष दाखवूनि । नावेक अंतरें राहोनि । इतर ऋषींजवळी येऊनि । लोटांगणें घालिती ॥ ३५२ ॥ पूर्वश्लोकींचा श्लोकार्थ तेथ । व्याख्यान नव्हेच समस्त । यालागीं तेंचि येथ । वाखाणिजेत कथान्वयें ॥ ३५३ ॥ छळाचेनि मिषें जाणा । ऋषींसि करिती प्रदक्षिणा । आत्यादरें लागती चरणा । म्हणती दर्शना आम्हीं आलों ॥ ३५४ ॥ ऐसे यदुकुमार समस्त । अविनीत परी विनीतवत । कर जोडोनि राहिले तेथ । मृदु विनवीत मुनीश्वरां ॥ ३५५ ॥ स्वामी पैल हे जे सुंदर । तुमच्या वचनीं भावार्थ थोर । आसन्नप्रसव गरोदर । स्वयें सुकुमार पुसों लाजे ॥ ३५६ ॥ प्रष्टुं विलज्जती साक्षात् प्रब्रूतमोघदर्शनाः । प्रसोष्यन्ती पुत्रकामा किं स्वित्सञ्जनयिष्यति ॥ १५ ॥ स्वयें येऊन तुम्हांप्रती । तिचेनि न बोलवे निश्चितीं । यालागीं आम्हांहातीं । सेवेसि विनंती करविली ॥ ३५७ ॥ तुम्ही सत्यदर्शी साचार । अमोघवीर्य तुमचें उत्तर । शिरीं वंदिती हरिहर । ज्ञानें उदार तुम्ही सर्व ॥ ३५८ ॥ यालागी हे गर्भवती । सादरें असे पुसती । पुत्रकाम असे वांछिती । काय निश्चितीं प्रसवेल ॥ ३५९ ॥ ऐसे कपटाचेनि वालभें । विनीत कर जोडूनि उभे । तैशींच फलें भावगर्भें । छळणलोभें पावती ॥ ३६० कर्म जाणोनियां कुडें । नारदु नाचे ऋषींपुढें । मुनि म्हणे यादवांचें गाढें । निधन रोकडें वोढवलें ॥ ३६१ ॥ मुंगिये निघालिया पांख । तिसी मरण ये अचूक । तेवीं ब्राह्मणछळणें देख । आवश्यक कुळनाश ॥ ३६२ ॥ शापीत आलिया द्विजजन । त्यांसि सद्भांवें करावें नमन । मारूं आलिया ब्राह्मण । मस्तक आपण वोढवावें ॥ ३६३ ॥ त्या ब्राह्मणांसि छळण । तें जाणावें विषभक्षण । विषें निमे भक्षित्याचा प्राण । कुळनिर्दळण द्विजछळणें ॥ ३६४ ॥ अविद्य सुविद्य न म्हणतां जाण । धरातळीं ब्रह्म ब्राह्मण । त्याचें करूं जातां छळण । कुळनिर्दळण आवश्यक ॥ ३६५ ॥ एवं प्रलब्धा मुनयः तानूचुः कुपिता नृप । जनयिष्यति वो मन्दा मुसलं कुलनाशनम् ॥ १६ ॥ ऐकें परीक्षिति नृपवरा । यापरी यादवकुमरां । निधनाचा भरला वारा । तेणें ते ऋषीश्वरां छळूं गेले ॥ ३६६ ॥ कपट जाणोनियां साचार । थोर कोपले ऋषीश्वर । मग तिंहीं काय वाग्वज्र । अतिअनिवार सोडिलें ॥ ३६७ ॥ अरे हे प्रसवेल जें बाळ । तें होईल सकळकुळा काळ । निखळ लोहाचें मुसळ । देखाल सकळ मंदभाग्यें ॥ ३६८ ॥ तच्छ्रुत्वा तेऽतिसन्त्रस्ता विमुच्य सहसोदरम् । साम्बस्य ददृशुस्तस्मिन् मुसलं खल्वयस्मयम् ॥ १७ ॥ ऐकूनि शापाचें उत्तर । भयभीत झाले कुमर । सोडूनि सांबाचें उदर । अतिसत्वर पाहती ॥ ३६९ तंव ते लोहमय मुसळ । देखते झाले तत्काळ मग भयभीत विव्हळ । एकाएकीं सकळ दचकोनि ठेले ॥ ३७० ॥ नासावें यादव कुळ । ऐसा श्रीकृष्ण संकल्प सबळ । तोचि झाला लोहाचें मुसळ । जाण तात्काळ ऋषिवाक्यें ॥ ३७१ ॥ जें जें ब्राह्मणाचें वचन । तें तें अन्यथा हों नेदी श्रीकृष्ण । ब्राह्मणाचें जें वदे वदन । तें श्रीकृष्ण स्वयें सत्यत्वा आणी ॥ ३७२ ॥ देखोनि ऋषिश्वरांचा कोप । ऐकोनि कुलक्षयाचा शाप यदुकुमरां अतिसंताप । भयें कंप सूटला ॥ ३७३ ॥ किं कृतं मन्दभाग्यैर्नः किं वदिष्यन्ति नो जनाः । इति विह्वलिता गेहान् आदाय मुसलं ययुः ॥ १८ ॥ आम्ही मंदभाग्यें करंटे । ऋषीश्वरु कोपविलें शठें निजघाता झालों पैठे । कुळक्षयो कपटें जोडिला आम्हीं ॥ ३७४ ॥ काय म्हणती नगरजन । कां छळूं गेले हे ब्राह्मण । चिंताक्रांत म्लानवदन । मुसळ घेऊन घरा आले ॥ ३७५ ॥ तच्चोपनीय सदसि परिम्लानमुखश्रियः । राज्ञ आवेदयां चक्रुः सर्वयादवसन्निधौ ॥ १९ ॥ सभेसि वसुदेव उग्रसेन । बळराम आणि अनिरुद्ध प्रद्युम्न । यादव बैसले संपूर्ण । एकला श्रीकृष्ण तेथें नाहीं ॥ ३७६ ॥ सभे सांबादि आले सकळ । पुढां ठेवूनि लोहमुसळ । शापु सांगितला समूळ । मुखकमळ अतिम्लान ॥ ३७७ ॥ श्रुत्वामोघं विप्रशापं दृष्ट्वा च मुसलं नृप । विस्मिता भयसन्त्रस्ता बभूवुर्द्वारकौकसः ॥ २० ऐकून द्विजांचा परम कोपु । यादवां सुटला भयकंपु । मिथ्या नव्हे ब्रह्मशापु । भयें संतापु सर्वांसी ॥ ३७८ ॥ प्रत्यक्ष देखोनि मुसळ । थोर सुटली खळबळ नगरनागरिकां हलकल्लोळ । यादवकुळ उरे कैसेनी ॥ ३७९ ॥ ऐक राया परीक्षिती । सबळ भविष्याची गती । वृत्तांतु श्रीकृष्णा न सांगती । विचार आपमतीं तिंहीं केला ॥ ३८० ॥ तच्चूर्णयित्वा मुसलं यदुराजः स आहुकः । समुद्रसलिले प्रास्यः लोहं चास्यावशेषितम् ॥ २१ ॥ आहुक राजा उग्रसेन । तेणें लावूनि लोहघण । मुसळ करोनियां चूर्ण । समुद्रीं जाण घालविलें ॥ ३८१ ॥ त्या मुसळाचा मध्यकवळ । चूर्ण नव्हेच अतिप्रबळ । उरला वज्रप्राय केवळ । तो समुद्रीं तत्काळ झुगारिला ॥ ३८२ ॥ कश्चिन्मत्स्योऽग्रसील्लोहं चूर्णानि तरलैस्ततः । उह्यमानानि वेलायां लग्नान्यासन्किलैरकाः ॥ २२ ॥ मत्स्यो गृहीतो मत्स्यघ्नैः जालेनान्यैः सहार्णवे । तस्योदरगतं लोहं स शल्ये लुब्धकोऽकरोत् ॥ २३ ॥ समुद्र लाटांचे कल्लोळ । तेणें तें लोहचूर्ण सकळ । प्रभासीं लागोनि प्रबळ । उठिलें तत्काळ येरिकारूपें ॥ ३८३ ॥ लोहकवळु मीन गिळी । त्या मीनातें समुद्रजळीं । अन्यत्र मत्स्यसहित जाळीं । मत्स्यघ्न आकळी निजलाघवें ॥ ३८४ ॥ तो मत्स्य मत्स्यघ्न विदारी । तंव लोह निघे त्याचे उदरीं । देखोनि हरिखला तो भारी । हें आंतुडे करीं तो सभाग्य ॥ ३८५ ॥ मत्स्योदरींचें लोह जाण । त्याचें अचूक संधान । अगाध पारधी साधे पूर्ण । यालागीं तो बाण लुब्धकें केला ॥ ३८६ ॥ भगवान्ज्ञातसर्वार्थ ईश्वरोऽपि तदन्यथा । कर्तुं नैच्छत् विप्रशापं कालरूप्यन्वमोदत ॥ २४ ॥ इति श्रीमद्भा्गवते महापुराणे परमहंसायां संहितायां एकादशस्कन्धे प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥ कोणी न सांगतां हें पेखणें । जाणितलें सर्वज्ञें श्रीकृष्णें परी द्विजशापु अन्यथा करणें । हें निजमनें स्पर्शेना ॥ ३८७ ॥ म्हणाल हें नव्हेल त्यासी । पालटवेना द्विजशापासी । जो निमाल्या आणी गुरुपदासी । कृष्ण कळिकाळासी नियंता ॥ ३८८ ॥ पाडूनि कळिकाळाचे दांत । देवकीचे गतगर्भ आणीत । ईश्वरा ईश्वरु श्रीकृष्णनाथ । जाणे सर्वार्थनिजसिद्धी ॥ ३८९ ॥ निद्रा न मोडितां तिळभरी । मथुरा आणिली द्वारकेभीतरी । श्रीकृष्ण काय एक न करी । तोही ममता न धरी कुळाची ॥ ३९० ॥ निजकुळक्षयो जर्ही न आला । तर्ही अन्यथा न करी ब्राह्मणबोला । ब्राह्मणें पांपरा जरी हाणितला । तो हृदयीं धरिला पदांकु ॥ ३९१ ॥ तेंचि श्रीवत्सलांछन । सकळ भूषणां भूषण । हृदयीं मिरवी श्रीकृष्ण । यालागी पूर्ण ब्रह्मण्यदेवो ॥ ३९२ ॥ श्रीकृष्ण शिरीं वंदी ब्राह्मण । अन्यथा न करी ब्राह्मणवचन । यालागीं ’ब्रह्मण्यदेवो’ पूर्ण । वेद बंदीजन वर्णिती ॥ ३९३ ॥ ब्राह्मणरूप स्वयें श्रीहरी । यालागीं ब्राह्मणांचा कैवारी । कुळक्षयो जाहला जरी । तरी द्विजांवरी क्षोभेना ॥ ३९४ ॥ ऐकोनि ब्राह्मणांचा शापु । न धरी मोहाचा खटाटोपु । म्हणे सिद्धी गेला कृतसंकल्पु । कुलक्षयानुरूपु संतोषे ॥ ३९५ ॥ यापरी श्रीगोविंदु । काळरूपी मानी आनंदु । कुळक्षयाचा क्षितिबाधु । अल्पही संबंधु धरीना ॥ ३९६ ॥ पूर्ण संतोष श्रीकृष्णनाथा । पुढील अध्यायीं ज्ञानकथा । अतिरसाळ स्वानंदता । अवधान श्रोतां मज द्यावें ॥ ३९७ ॥ जेथें नारद आणि वसुदेवा । संवाद होईल सुहावा । जनक आणि आर्षभदेवां । प्रश्नोत्तरीं जीवा स्वानंदु दाटे ॥ ३९८ ॥ हे रसाळ ब्रह्मज्ञान मातु । चाखवीन निजपरमार्थु । एका जनार्दना विनवितु । श्रोते कृपा करितु अर्थावबोधें ॥ ३९९ ॥ इति श्रीमद्भावगवते महापुराणे एकादशस्कन्धे परमहंस संहितायां एकाकार टीकायां विप्रशापो नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ २४ ॥ ओव्या ॥ ३९९ ॥
You can donate to the bank account given below
Scan to donate
Merchant Name : Sant Eknath Mission
UPI ID : santeknathmission@sbi
Contact Info :
Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission,
C/O Shri Venimadhav Gosavi,
ShriNath Galli, Shrikshetra Paithan, Dist. Chhatrapati
Sambhajinagar
Pin. 431006
Mobile No : +91 - 9421411135
Email : info@santeknath.org