श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्गुरु मूर्ती । चराचर तुझी विभूती । विश्वात्मा विश्वस्फूर्ती । अमूर्तमूर्ती श्रीगुरुराया ॥ १ ॥ तुझे मूर्तीचे महिमान । सकळ शास्त्रां अतर्क्य जाण । श्रुतीने घेतलें मौन । शब्दें आण वाहिली ॥ २ ॥ आण वाहिली दृष्टांती । तुजसमान नाही दुजी स्थिती । जे जे योजावी उपपत्ती । ते ते विभूती पैं तुझी । ३ ॥ तुझिया प्रभावाची ऐशी खोडी । जे दुजेपणाचें मूळ तोडी । मग एकपणाचे परवडी । दृष्टांत काढी कोण कोठें ॥ ४ ॥ कोठें तुझे स्थानमान । हेंच सर्वथा न कळे जाण । अगाध तुझें महिमान । कैसेनि ध्यान करावें ॥ ५ ॥ हेतु मातु दृष्टांतू । न रिघे ज्यांचे शिंवे आंतू । तो भागवतींचा भागवतार्थू । ओंवियांआंतू बोलविशी ॥ ६ ॥ ते माझे मर्हाटे आरुष बोल । सद्गुरूंनी केले सखोल । तेथींच्या प्रेमाचे जे बोल । जाणती केवळ गुरुभक्त ॥ ७ ॥ ज्यासी नाहीं गुरुचरणीं भक्ती । त्यासी कैसेनि होईल विरक्ती । जरी पढले श्रुतिस्मृती । शास्त्रव्युत्पत्ती केल्याही ॥ ८ ॥ करितां साधनांच्या कोटी । साधनीं समाधान नुठी । झालिया सद्गुरुकृपादृष्टी । ब्रह्मत्वें पुष्टी गुरुभक्तां ॥ ९ ॥ तो तूं सद्गुरु श्रीजनार्दन । सकळ जगाचें अधिष्टान । भूतीं भूतात्मा तूं आपण । सहजें जाण समसाम्यें ॥ १० ॥ समसाम्य सर्व भूतीं । ज्यांसी घडे सद्गुरुभक्ती । तेचि ये श्रीमहाभागवतीं । अर्थप्राप्ती प्रविष्ट ॥ ११ ॥ झालिया सद्गुरुकृपा वरिष्ठ । न करितां व्युत्पत्तीचे कष्ट । भागवतार्थीं होय प्रविष्ट । भक्त सुभट भावार्थीं ॥ १२ ॥ हृदयीं झालिया सद्भावो । भावें प्रकटे देवाधिदेवो । तेथें भागवताचा अभिप्रावो । सहजेंचि पहा वो ठसावे ॥ १३ ॥ यालागीं करितां गुरुभक्ती । प्राप्त होईजे भागवतार्थीं । तेथ काव्यादि व्युत्पत्ती । नाना युक्ती किमर्थ ॥ १४ ॥ किमर्थ करावें शास्त्र ज्ञान । किमर्थ धरावें वृथा ध्यान । चालतें बोलतें ब्रह्म पूर्ण । सद्गुरुचरण साधकां ॥ १५ ॥ वांचूनिया गुरुभजन । शिष्यासी नोहे समाधान । याहूनियां श्रेष्ठ साधन । नाहीं जाण सर्वथा ॥ १६ ॥ त्या सद्गुरुकृपापरिपाटी । एकादशीं पूर्वार्ध कोटी । वाखाणिली की मर्हाटी । यथार्थदृष्टीं निजबोधें ॥ १७ ॥ ऊंस गाळितां रस होये । तो ठेविलिया बहुकाळ न राहे । त्याचा आळूनियां पाहे । गूळ होये सपिंड ॥ १८ ॥ तोहि ठेवितां लिवाड धरी । मग साखर कीजे रायपुरी । तेही घोटूनियां चतुरीं । नाबद करिजे कोरडी ॥ १९ ॥ तैसें हे श्रीभागवत जाण । मुळीं बोलिला नारायण । तेंचि श्रीव्यासें आपण । दशलक्षण वर्णिले ॥ २० ॥ ते दशलक्षण परवडी । श्रीशुकमुखें चढली गोडी । तेथील कठिण पदबंधमोडी । टीका चोखडी श्रीधरी ॥ २१ ॥ ते श्रीधरीचें व्याख्यान । भावार्थदीपिका जाण । त्या भावार्थाची सद्भाव खूण । केलें निरूपण देशभाषा ॥ २२ ॥ मुळीं वक्ता एक नारायण । व्यास शुक श्रीधरव्याख्यान । त्यांत मुळींचे लक्षूनि गोडपण । एका जनार्दन कविकर्ता ॥ २३ ॥ मुळीं बीज श्रीनारायण । ब्रह्मयाचे ठायीं प्रेरिलें जाण । तें नारदक्षेत्रीं संपूर्ण । पीक परिपूर्ण निडारिलें ॥ २४ ॥ त्याचें व्यासें दशलक्षण । संपूर्ण केलें संवगण । शुकें परीक्षितीच्या खळां जाण । मळूनि निजकण काढिले ॥ २५ ॥ तेंचि शास्त्रार्थें जाण । श्रीधरें निजबुद्धीं पाखडून । काढिले निडाराचे कण । अतिसघन सुटंक ॥ २६ ॥ त्याची पक्वान्नें चोखडी । मर्हाटिया पदमोडी । एका जनार्दनें केली परवडी । ते जाणती गोडी निजात्मभक्त ॥ २७ ॥ त्या श्रोत्यांचेनि अवधानें । जनार्दनकृपा सावधानें । पूर्वार्ध एका जनार्दनें । संपूर्ण करणें देशभाषा ॥ २८ ॥ ते प्रथमाध्यायीं अनुक्रम । वैराग्य उत्पत्तीचा संभ्रम । कुलक्षयासी पुरुषोत्तम । करी उपक्रम ब्रह्मशापें ॥ २९ ॥ दुसर्यापासूनि चतुर्थवरी । नारदें वासुदेवाच्या घरीं । निमिजायंत प्रश्नोत्तरीं । पंचाध्यायी खरी संपविली ॥ ३० ॥ षष्ठाध्यायी श्री कृष्णमूर्ती । पाहो आलिया सुरवरपंक्ती । तिहीं प्रर्थिला श्रीपती । निजधामाप्रती यावया ॥ ३१ ॥ ऐकोनि सुरवरांची विनंती । देखोनि अरिष्टभूत द्वारावतीं । उद्धवें प्रार्थिला श्रीपती । निजधामाप्रती मज नेईं ॥ ३२ ॥ त्याचे प्रश्नांचे प्रश्नोत्तर । त्यागयुक्त ज्ञानगंभीर । सप्तमाध्यायीं शारङ्गधर । थोडेनि फार बोलिला ॥ ३३ ॥ तेथ त्यागसंग्रह लक्षण । यदुअवधूत संवादें जाण । चोविसां गुरूंचे प्रकरण । केलें संपूर्ण अष्टमीं नवमीं ॥ ३४ ॥ श्राद्धासंपन्न ज्ञानविश्वास । तेथ नाना मतांचा मतनिरास । दशमाध्यायी हृषीकेश । ज्ञानविलास बोलिला ॥ ३५ ॥ अकरावें अध्यायीं जाण । बद्धमुक्तांचे वैलक्षण्य । सांगूनि साधूचे लक्षण । भक्तीचे संपूर्ण दाविलें रूप ॥ ३६ ॥ भागवतीं बारावा अध्यावो । अतिगुह्य बोलिला देवो । तेथील लावितां अभिप्रावो । पडे संदेहो सज्ञाना ॥ ३७ ॥ बारावे अध्यायाची किल्ली । युक्तिप्रयुक्ती नातुडें बोली । जनार्दन कृपा माऊली । तेणें मागी दाविली ग्रंथाची ॥ ३८ ॥ तें द्वादशाध्यायी निरूपण । सत्संगाचा महिमा गहन । कर्माचा कर्ता कोण । त्यागितें लक्षण कर्माचें ॥ ३९ ॥ तो द्वादशाध्यावो ऐकतां । ज्ञानसंलग्नता होय चित्ता । आडवी ठाके विषयावस्था । तेणें बाधकता साधकां ॥ ४० ॥ गुणवैषम्याचें लक्षण । तेणें विषयावस्था गहन । तेथ सत्त्वशुद्धीचें कारण । केले निरूपण त्रयोदशीं ॥ ४१ ॥ तेचि प्रसंगे यथोचित । चित्तविषयांचे जें प्रथित । उगवावया हंसगीत । सुनिश्चित सांगितलें ॥ ४२ ॥ हंसगीतीं जे निरूपण ज्ञान । समाधिपर्यंत समाधान । तेंचि साधावया साधन । चवदावा आपण बोलिला देवो ॥ ४३ ॥ साधनांमाजी मुख्य भक्ती । सगुण तेचि माझी निर्गुण मूर्ती । योगयुक्त ध्यानस्थिती । बोलिला श्रीपती चतुर्दशीं ॥ ४४ ॥ विविधा सिद्धींची धारणास्थिती । देवें सांगितली उद्धवाप्रती । सिद्धी बाधिका माझे प्राप्ती । हें पंधराव्याअंती निरूपिलें ॥ ४५ ॥ एवं पंधराव्या अध्यायी पूर्वार्ध । निरूपण झाले अतिशुद्ध । आतां उरलें उत्तरार्ध । तो कथासंबंध अवधारा ॥ ४६ ॥ षोडशीं भगवद्विभूती । सतरा अठरा अध्यायांप्रती । वर्णाश्रम कर्मगती । विधानस्थिती निरूपण ॥ ४७ ॥ एकुणिसावा अध्याय गहन । ज्ञाननिर्णयाचें महिमान । उद्धवाचें यमनियमादि प्रश्न । सांगितलें ज्ञानपरिपाकें ॥ ४८ ॥ त्या ज्ञानाधिकाराचा योग । अज्ञान ज्ञान मध्यस्थ भाग । विसावें अध्यायी श्रीरंग । त्रिविध विभाग बोलिला ॥ ४९ ॥ तेथ गुणदोषांची अवस्था । उद्धवें ठेविली वेदांचे माथां । ते वेदवादसंस्था । केली तत्त्वतां एकविसांत । ॥ ५० ॥ तेचि वेदवाद व्युत्पत्ती । तत्त्वांची संख्या किती । ते तत्त्वसंख्या उपपत्ती । केली श्रीपती यथान्वयें ॥ ५१ ॥ सकळ तत्त्वांचे विवेचन । प्रकृतिपुरुषांचे लक्षण । जन्ममरणांचें प्रकरण । केलें निरूपण बाविसावां ॥ ५२ ॥ साहोनियां परापराध । स्वयें राहावें निर्द्वंद्व । हा भिक्षुगीतसंवाद । केला विशद तेविसांवा ॥ ५३ ॥ अद्वैती राहावया स्थिती । चोविसावां सांख्यव्युत्पत्ती । निर्गुणापासोनि गुणोत्पत्ती । गुणक्षया अंती निर्गुण उरे ॥ ५४ ॥ आदीं निर्गुण अंतीं निर्गुण । मध्यें भासले मिथ्या गुण । ये अद्वैतप्राप्तीलागीं जाण । केलें निरूपण सांख्याचें ॥ ५५ ॥ ते मिथ्यागुण प्रवृत्तियुक्त । त्रिगुणांचा सन्निपात । बोलिला पंचविसाव्यांत । निर्गुणोक्त निजनिष्ठा ॥ ५६ ॥ सव्विसावे अध्यायाप्रती । अनिवार अनुतापाची शक्ती । भोगितां उर्वशी कामप्राप्तीं । पावला विरक्ती पुरूरवा ॥ ५७ ॥ भजनक्रिया मूर्तिलक्षण । वैदिक तांत्रिक मिश्र भजन । या उद्धवप्रश्नांचे निरूपण । केलें संपूर्ण सत्ताविसावां ॥ ५८ ॥ महायोग्यांचे योगभांडार । परम ज्ञानें ज्ञानगंभीर । निजसुखाचें सुखसार । केवळ चिन्मात्र अठ्ठाविसावा ॥ ५९ ॥ त्याचि अध्यायामाजीं जाण । संसार असंभवाचा प्रश्न । उद्धवें केला अतिगहन । त्याचेंही प्रतिवचन दिधले देवें ॥ ६० ॥ एकादशाचा निजकळसू । भक्तिप्रेमाचे अतिविलासू । एकुणतिसावां सुरसरसू । ज्ञानोपदेशू भक्तियुक्त ॥ ६१ ॥ पुढिले दों अध्यायांआंत । स्त्रीपुत्रादि कुळाचा घात । होतां डंडळीना ज्ञानसमर्थ । तें प्रत्यक्षभूत हरि दावी ॥ ६२ ॥ ब्राह्मणांचा शाप कठिण । शापें बाधिला श्रीकृष्ण । इतरांची कथा कोण । कुळनिर्दळण ब्रह्मशापे ॥ ६३ ॥ ब्राह्मणांचा कोप समर्थ । सगळा समुद्र केला मूत । शिवाचा झाला लिंगपात । ब्रह्मक्षोभांत निमेषार्धे ॥ ६४ ॥ यालागीं सज्ञान अथवा मुग्ध । तिहीं न करावा ब्रह्मविरोध । हेंचि दावावया मुकुंद । कुलक्षयो प्रसिद्ध दाखवी ॥ ६५ ॥ निजदेहासी जो करी घात । तो जराव्याध केला मुक्त । येथवरी ज्ञाता देहातीत । क्षमायुक्त तो सज्ञान ॥ ६६ ॥ एकुणतीस अध्यायापर्यंत । कृष्णें उपदेशिला ज्ञानार्थ । पुढील दोन अध्यायांत । स्वयें दावीत विदेहत्व ॥ ६७ ॥ राम अयोध्या घेऊन गेला । कृष्णें निजदेहही सांडिला । येणें देहाभिमान मिथ्या केला । तरावया पुढिलां मुमुक्षां ॥ ६८ ॥ पंधरा अध्याय पूर्वार्ध । व्याख्यान झालें अतिशुद्ध । सूत्रप्राय उत्तरार्ध । दाविले विशद अध्यायार्थ ॥ ६९ ॥ साह्य सद्गुरु जनार्दन । श्रोतीं द्यावें अवधान । पुढील उत्तरार्ध व्याख्यान । एका जनार्दन बोलवी ॥ ७० ॥ झालिया वसंताचे रिगवणें । वृक्ष सपुष्प सफळ तेणें । तेवीं जनार्दनकृपागुणें । सार्थक वचनें कवित्वाचीं ॥ ७१ ॥ गगनीं उगवला अंशुमाळी । जेवीं विकासिजे नवकमळीं । तेवीं जनार्दनकृपामेळीं । कवित्ववनमाळी विकासे ॥ ७२ ॥ वेणु घेऊनियां हातें । विश्वा मोहिलें कृष्णनाथें । तेवीं कवीश्वर करोनि मातें । वक्ता येथें जनार्दन ॥ ७३ ॥ तो जनार्दनकृपाक्षीराब्धी । ज्याची कृपेसी नाहीं अवधी । तेणें उत्तरार्धीं प्रवेशे बुद्धी । अर्थसिद्धीसमवेत ॥ ७४ ॥ मागील कथासंगती । पंधरावे अध्यायाअंती । सिद्धी बाधिका माझे प्राप्ती । ऐसें श्रीपती बोलिला ॥ ७५ ॥ एवं सांडूनि सिद्धींचें ध्यान । माझे स्वरूपीं राखावें मन । हें ऐकोनि कृष्णवचन । उद्धवें प्रश्न मांडिला ॥ ७६ ॥ उद्धव म्हणे श्रीकृष्णनाथा । विनंती अवधारीं समर्था । तुझ्या विभूति समस्ता । मज तत्त्वतां सांगाव्या ॥ ७७ ॥ श्रीउद्धव उवाच । त्वं ब्रह्म परमं साक्षाद् अनाद्यन्तमपावृतम् । सर्वेषामपि भावानां त्राणस्थित्यप्ययोद्भवः ॥ १ ॥ भूतभौतिकांचें तूं कारण । तुझेनि जन्म-स्थिति-निदान । इतुकें करोनि अकर्ता जाण । ब्रह्म परिपूर्ण तूं यालागीं ॥ ७८ ॥ म्हणसी उत्पत्ति स्थिति मरण । भूतांतें प्रकृति करी जाण । ते प्रकृति तुझे अधीन । तुझेनि चलन प्रकृतीसी ॥ ७९ ॥ यालागीं प्रकृति ते परतंत्र । तूं परमात्मा स्वतंत्र । अनादि अव्यवो अपार । श्रुतींसी पार न कळेचि ॥ ८० ॥ प्रकृतीसी तुझें आवरण । तूं अनंत गा निरावरण । जीवांचे स्वरूप गा तूं आपण । परी जीवपण तुज नाहीं ॥ ८१ ॥ जीवू तितुका अज्ञानयुक्त । तूं ज्ञानाज्ञानातीत निश्चित । यालागीं ब्रह्म तूं साक्षात । अविनाशवंत अपरोक्ष ॥ ८२ ॥ तो तूं अपरोक्ष कैसा म्हणशी । सर्वीं सर्वत्र सबाह्य असशी । ऐसा असोनि अतर्क्य होशीं । हृषीकेशी तें ऐक ॥ ८३ ॥ उच्चावचेषु भूतेषु दुर्ज्ञेयमकृतात्मभिः । उपासते त्वां भगवन् याथातथ्येन ब्राह्मणाः ॥ २ ॥ मशकादि हिरण्यगर्भ पर्यंत । तूं सबाह्य सर्व भूतीं संतत । ऐशिया तूतें निश्चित । ब्राह्मण जाणत वेदार्थें ॥ ८४ ॥ आकळूनि उपनिषदर्थ । तुझ्या ठायीं भजनयुक्त । ते तुज सर्वगतातें जाणत । सुनिश्चित सर्वात्मा ॥ ८५ ॥ त्या सर्वात्म्याचा पाहतां पार । अचिंत्यानंत ऐश्वर्यधर । त्या तुज नेणती प्राकृत नर । ऐक विचार तयांचा ॥ ८६ ॥ जे मनाचे विकिले । उपस्थाचे अंकिले । जे रसनेचे पोसणे झाले । निद्रेनें केले घरजांवयी ॥ ८७ ॥ त्यांसी स्वतः सिद्ध स्वरूप पाहीं । सर्वगत न पडेचि ठायीं । निजात्मता न कळे देहीं । सदा विषयीं भूलले ॥ ८८ ॥ विषयीं चंचळ अंतःकरण । त्यांसी नव्हे ध्यान सगुण । निर्गुणीं प्रवेशेना मन । अज्ञान जन केवीं तरती ॥ ८९ ॥ न करितां नाना व्युत्पत्ती । न धरितां ध्यानस्थिती । तुझ्या उत्तमा ज्या विभूती । त्या सांग निश्चितीं भजनासी ॥ ९० ॥ येषु येषु च भावेषु भक्त्या त्वां परमर्षयः । उपासीनाः प्रपद्यन्ते संसिद्धिं तद् वदस्व मे ॥ ३ ॥ ज्या ज्या तुझ्या विभूती । पूर्वीं उपासिल्या संतीं । दृढ भावें करोनियां भक्ती । तुझी स्वरूपप्राप्ती पावलें ॥ ९१ ॥ त्या सकळ तुझ्या विभूती । कवण स्थिती कवण व्यक्ती । कवण भाव कवण गती । हें निश्चितीं मज सांगा ॥ ९२ ॥ म्हणसी सकळ भूतांप्रती । तूंचि वोळख माझ्या विभूती । तरी ते तुझी अतर्क्य स्थिती । न कळे श्रीपती आमुचेनि ॥ ९३ ॥ गूढश्चरसि भूतात्मा भूतानां भूतभावन । न त्वां पश्यन्ति भूतानि पश्यन्तं मोहितानि ते ॥ ४ ॥ सर्व भूतांचा हृदयस्थ । हृदयीं असोनि गुप्त । त्या तूतें भूतें समस्त । न देखत देहभ्रमें ॥ ९४ ॥ त्या देहभ्रमासी देवराया । मूळकारण तुझी माया । तेथें तुझी कृपा झालिया । माया जाय विलया गुणेंसीं ॥ ९५ ॥ मग सर्वत्र सर्वां ठायीं । सर्व भूतीं सबाह्य देहीं । तुझें स्वरूप ठायीं ठायीं । प्रकटें पाहीं सदोदित ॥ ९६ ॥ एवढें तुझे कृपेचे करणें । ते कृपा लाहिजे कवणें गुणें । यालागीं तुझ्या विभूती उपासणें । तुझे कृपेकारणें गोविंदा ॥ ९७ ॥ याचिलागी विभूतींची स्थिती । समूळ सांगावी मजप्रती । तेचि अर्थींची विनंती । पुढतपुढती करीतसें ॥ ९८ ॥ याः काश्च भूमौ दिवि वै रसायां विभूतयो दिक्षु महाविभूते । ता मह्यमाख्याह्यनुभावितास्ते नमामि ते तीर्थपदाङ्घ्रिपद्मम् ॥ ५ ॥ स्वर्गमृत्युपाताळ स्थिती । विस्तारल्या दशदिशांप्रती । त्या समस्तही तुझ्या विभूती । सांग श्रीपती मजलागीं ॥ ९९ ॥ ऐसा करोनियां प्रश्न । उद्धवें घातले लोटांगण । सकळ तीर्थांचे जन्मस्थान । मस्तकीं श्रीचरण वंदिले ॥ १०० ॥ ऐकोनी उद्धवाच्या प्रश्नासी । परम संतोषे हृषीकेशी । पुरस्करोनि उद्धवासी । काय त्यासी बोलिला ॥ १ ॥ जो वैरिगजयूथ पंचानन । कोदंडदीक्षाप्रतापगहन । सखा जिवलग पढियंता जाण । जीवप्राण जो माझा ॥ २ ॥ ज्याचें रथींचे मी धुरेवरी । ज्याच्या अश्वांचे वाग्दोरे धरीं । जो उपदेशिला कुरुक्षेत्रीं । उभय सेनेमाझारी रणांगणीं ॥ ३ ॥ तो नरावतार अर्जुन । त्याच्याऐसा तुझा हा प्रश्न । ऐसे उद्धवासी संतोषोन । काय श्रीकृष्ण बोलिला ॥ ४ ॥ श्रीभगवानुवाच । एवमेतदहं पृष्टः प्रश्नं प्रश्नविदां वर । युयुत्सुना विनशने सपत्नैरर्जुनेन वै ॥ ६ ॥ हाचि प्रश्न मजकारणें । पूर्वीं पुशिला अर्जुनें । जेव्हां तिरस्कारूनि दुर्योधनें । युद्ध सत्राणें मांडिलें ॥ ५ ॥ अरिनिर्दळणीं प्रतापपूर्ण । धीर वीर आणि सज्ञान । प्रश्नकर्त्यामाजीं विचक्षण । माझा आत्मा जाण अर्जुन ॥ ६ ॥ तेणें अर्जुनें कुरुक्षेत्रीं । युद्धसमयीं महामारी । स्वजनवधाचें भय भारी । हाचि प्रश्न करी मज तेव्हां ॥ ७ ॥ ज्ञात्वा ज्ञातिवधं गह्यं अधर्मं राज्यहेतुकम् । ततो निवृत्तो हन्ताहं हतोऽयमिति लौकिकः ॥ ७ ॥ स तदा पुरुषव्याघ्रो युक्त्या मे प्रतिबोधितः । अभ्यभाषत मामेवं यथा त्वं रणमूर्धनि ॥ ८ ॥ केवळ राज्यलोभाकारणें । गुरुगोत्र पितृव्य वधणें । हें अतिनिंद्य मजकारणें । नाहीं झुंझणें प्राणांती ॥ ८ ॥ लौकिक धर्मप्रवृत्ती । मी मारिता हे मरती । हे महामोहाची भ्रांती । उपजली चित्तीं अर्जुना ॥ ९ ॥ राज्य भोगाचें धरोनि वर्म । ज्ञातिवधाचें निंद्य कर्म । हा केवळ मज अधर्म । धर्माचा स्वधर्म बुडेल ॥ ११० ॥ ज्यांचें तीर्थ घ्यावें प्रतिदिनीं । जे पूजावे वरासनीं । ते खोंचूनि तिखट बाणीं । भोगावी अवनी स्वगोत्र रुधिरें ॥ ११ ॥ स्वगोत्र रुधिराचा पूर । पृथ्वीवरी वाहेल दुस्तर । तेणें आम्हीं होऊं राज्यधर । हें कर्म घोर न करवें मज ॥ १२ ॥ कुळीं सुपुत्र वांछिले जिंही । बाण खोंचावे त्यांचे हृदयीं । यापरी पूर्वजांसी पाहीं । झालो उतराई मानावें ॥ १३ ॥ ज्यांचे करावें श्राद्धतर्पण । त्यांचे बाणवरी घ्यावे प्राण । भलें पूर्वजां झालों उत्तीर्ण । आली नागवण निजधर्मा ॥ १४ ॥ संमत श्लोक ॥ हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ॥ युद्धीं निमालिया स्वर्गगती । जयो आलिया राज्यप्राप्ती । दोन्ही नश्वरें गा श्रीपती । कोणे हितार्थी झुंझावें ॥ १५ ॥ ऐसेनि अनुतापें जाण । सांडूनिया धनुष्यबाण । शोकाकुलित अर्जुन । म्लानवदन रणरंगीं ॥ १६ ॥ ते काळीं म्यांची जाण । तो महावीरपंचानन । नाना युक्तिं केलें समाधान । तेंही लक्षण अवधारी ॥ १७ ॥ अर्जुना देह तितुका नश्वर । मळमूत्रांचे कोठार । करितां नाना उपचार । मरणतत्पर समीप ॥ १८ ॥ जीव निज नित्य निर्मळ । अज अव्यय अचळ । अच्छेद्य अभेद्य अमळ । अचंचळ निजांगे ॥ १९ ॥ अर्जुना ऐक साचें । तुझेनि प्रयत्नें न वांचे । जीव तुझेनि मारिला न वचे । पातक हत्येचें अहंभावे ॥ १२० ॥ हो कां त्वां असते केले । तरी तुझेनि जातें मारिलें । मी मारिता येणे बोले । तुजसि गोंविलें अभिमानें ॥ २१ ॥ जो देहाचा निर्माणकर्ता । तोचि तयाचा संहर्ता । तूं करण्यामारण्या परता । व्यर्थ अहंता कां घेसी ॥ २२ ॥ जरी हे अहंता तूं न सांडिशी । तरी सकळ हत्येचिया राशी । साचचि आल्या तुजपाशी । दोषी झालासी अर्जुना ॥ २३ ॥ ऐक पां बापा पार्था । देहादि कर्मांची अहंता । जो घे आपुले माथां । तो दोषी सर्वथा तिहीं लोकीं ॥ २४ ॥ हो कां स्वधर्मचि तूं पुसशी । तरी ऐक क्षत्रियाच्या क्षात्रधर्मासी । समरांगणीं पित्यापुत्रांसी । वधिता क्षत्रियासी दोष नाहीं ॥ २५ ॥ युद्ध म्हणजे स्वधर्मतीर्थ । समरांगणीं निमे तो नित्यमुक्त । जें तुज निजभाग्यें प्राप्त । तें तूं अहित मानिसी ॥ २६ ॥ कर्ता दोष अहंतेच्या माथां । ते जो नातळे देहअहंता । तोचि कर्म करूनि अकर्ता । भोगूनि अभोक्ता तोचि एक ॥ २७ ॥ तोचि संगामाजीं निःसंग । अवघें जग तो एकला सांग । जो निरभिमानी अव्यंग । तो सौरा चांग समरंगीं ॥ २८ ॥ अर्जुना अभिमान सांडितां । तूं माझी पावशी समसाम्यता । तेव्हां सकळ पापाची वार्ता । तुज सर्वथा स्पर्शेना ॥ २९ ॥ म्हणशी केवीं जाय अहंता । तरी मज लक्षूनि तत्त्वतां । स्वधर्मकर्मातें आचरितां । चित्तशोधकता तेणें होय ॥ ३० ॥ निर्मळत्व आलिया चित्ता । तो लागे माझिया भक्तिपंथा । भजनें माझिया समरसता । माझिया निजभक्तां तत्काळ ॥ ३१ ॥ अर्जुना सांडावया अभिमान । तूं नाइकसी माझें वचन । तरी जन्ममरणांचे भूषण । सकळ दोष जाण भोगासी ॥ ३२ ॥ तूं नित्यमुक्त अज अव्ययो । हा बुडेल तुझा सद्भावो । मग जन्ममरणांचा निर्वाहो । अविश्रम पहा हो भोगिसी ॥ ३३ ॥ यालागीं करणें न करणें दोन्ही । प्रकृतीचे माथां ठेवूनी । तूं कायावाचामनींहूनी । मजलागुनी शरण रिघें ॥ ३४ ॥ यापरी गा तत्त्वतां । मज सद्भावें शरण येतां । तुज सकळ कर्मांची वार्ता । मी सर्वथा शिवों नेदी ॥ ३५ ॥ यालागीं गा कोदंडपाणी । मरतें मारितें सांडूनि दोन्ही । सौरा होयीं रणांगणीं । मी तुजलागोनी उद्धरीन ॥ ३६ ॥ तूं एक येथें कर्म करिता । मी एक तूतें उद्धरिता । ऐसे भिन्नत्व गा पार्था । माझ्या शरणागता असेना ॥ ३७ ॥ मज अनंता शरण येणें । आणि जीवत्वें वेगळे उरणें । तें गुळदगडा ऐसें जिणें । अनन्यपणें नव्हे शरण ॥ ३८ ॥ सरिता सागरा शरण गेली । ते समुद्रचि होऊनि ठेली । पुढती परतावया मुकली । समरसिली सिंधुत्वें ॥ ३९ ॥ गंगा पावोनि सिंधुत्वासी । मागील यावा वंचीना तिसीं । तेवीं सबाह्य आत्मसमरसीं । शरण अहर्निशीं अखंडत्वें ॥ १४० ॥ दीप दावाग्नी भेटों गेला । तो तेव्हढाची होऊनि ठेला । तेवीं मजलागीं जो शरण आला । तो मीचि झाला अर्जुना ॥ ४१ ॥ पार्था परिस पा चिन्ह प्राप्ताचें । हें भूताकार मज अच्युताचें । ऐसें सद्भावें जो देखे साचें । त्यासी ब्रह्मसायुज्याचें साम्राज्य लाभे ॥ ४२ ॥ मज आत्मयाचे निजस्थितीं । संसार मुळीं मुख्य भ्रांती । तेथ मारिता मी हे मरती । कोणें हे युक्ती मानावी ॥ ४३ ॥ मृगजळ जेथें नसे । तेथें तव कोरडेंचि असे । मा जे ठायीं आभासे । तेथ तर्ही असे वोल्हांशु कायी ॥ ४४ ॥ तेवीं संसाराचे रूप नाम । ठेविती तेथें निखळ ब्रह्म । हाचि ज्याचा स्वभाव परम । तें चालतें ब्रह्म वर्ततां देहीं ॥ ४५ ॥ देहा जडत्वें न बाधी कर्म । आत्मा नातळे धर्माधर्म । हें ज्यासी कळलें वर्म । तें चालतें ब्रह्म वर्ततां देहीं ॥ ४६ ॥ देही वर्ततां तो विदेह । विदेह तेंच त्याचें देह । हें माझें परम गुह्य । अर्जुनासी पाहीं सांगितलें ॥ ४७ ॥ यापरी म्यां नानायुक्तीं । युद्धीं बोधिला सुभद्रापती । तेणेंही मज करोनि विनंती । पुशिल्या विभूती तुझ्याऐशा ॥ ४८ ॥ ज्या सांगितल्या अर्जुनासी । त्याचि मी सांगेन तुजपाशीं । ऐसें पुरस्करूनि उद्धवासी । निजविभूति त्यासी सांगत ॥ ४९ ॥ उद्धवा ज्या पुशिल्या विभूती । त्या माझ्या मज न गणवती । मी जगदात्मा त्रिजगतीं । संख्यासंस्थिती गणी कोण ॥ १५० ॥ अहमात्मोद्धवामीषां भूतानां सुहृदीश्वरः । अहं सर्वाणि भूतानि तेषां स्थित्युद्भवाप्ययः ॥ ९ ॥ मी हृदयस्थ समर्थ हृदयीं । त्या मज जीवू मागें जें कांही । त्यासी विमुख मी नव्हें कहीं । पुरवीं सर्वही ईश्वरत्वें ॥ ५१ ॥ जीवू अतिअडलेपणें । जें मागे मजकरणें । तें मी त्यासी अलोट देणें । यालागी म्हणणें ईश्वर मज ॥ ५२ ॥ मी आत्मा असें हृदयीं । हा विश्वास जयांसी नाहीं । ते मृगजळाचे डोहीं । नावेसकट पाहीं बुडबुडों गेले ॥ ५४ ॥ माझे प्राप्तीचे मुख्य वर्म । मी हृदयीं असें परब्रह्म । हेंचि ज्याचे नित्य कर्म । तो विभूती मरम पैं माझी ॥ ५५ ॥ मी सर्वभूतहृदयवासी । सुहृद सोयरा मी सर्वांसी । नियंता ईश्वरसत्तेसी । नियामक भूतांसी मी एक ॥ ५६ ॥ एवं सर्व भूतांचा मी स्वामी । इयें सर्व भूतें तेंही मी । भूतांचे जन्मभूमीची मी भूमी । उत्पत्त्यादि कर्मीं मी कर्ता ॥ ५७ ॥ कृषीवळाचियेपरी । मी सृजीं पाळीं संहारीं । ब्रह्मा विष्णु त्रिपुरारी । गुणावतारी मी एक ॥ ५८ ॥ कर्माची जे क्रियाशक्ती । ते मी म्हणे श्रीपती । हे साम्यें बोलिली स्थिती । विशेष विभूती त्या ऐक ॥ ५९ ॥ अहं गतिर्गतिमतां कालः कलयतामहम् । गुणानां चाप्यहं साम्यं गुणिन्यौत्पत्तिको गुणः ॥ १० ॥ गतिमंतांमाजी जे गती । ते मी म्हणे लक्ष्मीपती । गतीसी माझेनि निजगती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १६० ॥ चेतनेनें सर्वां गती । ते चेतना चैतन्याची शक्ती । चेतनेस्तव इंद्रियप्रवृत्ती । एवं गतीची गती मी एक ॥ ६१ ॥ सकळ गतींची परम गती । प्राण्यासी मुख्यत्वें मुक्ती । ते मुक्तीसी मजमाजीं मुक्ती । एवं गतीची गती मी एक ॥ ६२ ॥ सुरनरां आकळिता । ते जाण काळाची सत्ता । त्या काळाचा मी आकळिता । जाण तत्त्वतां मी महाकाळू ॥ ६३ ॥ तेहीं गुणांची समानावस्था । ते मी जाण गा निजभक्ता । अकृत्रिम गुण जो धर्मता । तो मी तत्त्वतां म्हणे हरी ॥ ६४ ॥ गुणिनामप्यहं सूत्रं महतां च महानहम् । सूक्ष्माणामप्यहं जीवो दुर्जयानामहं मनः ॥ ११ ॥ गुणी म्हणावया हेंचि कारण । ज्या मजमाजीं सूत्र क्रियाप्रधान । मायेचें प्रथमकार्य जाण । तो गुणी मी संपूर्ण उद्धवा ॥ ६५ ॥ जगी आकाश थोर पाहीं । तें मजमाजीं खेळे लपंडायी । माझ्या महत्तत्त्वाची नवायी । मजही निश्चयीं नेमेना ॥ ६६ ॥ महत्तत्त्व जे ज्ञानप्रधान । तें मी म्हणे नारायण । सूक्ष्मामाजीं जीवूं आपण । ब्रह्मादिकां जाण अतर्क्य ॥ ६७ ॥ दुर्जयांमाजीं मी मन । त्यासी जिंकावया जाण । मजवेगळी आंगवण । नाहीं संपूर्ण आणिकासी ॥ ६८ ॥ मज लक्षितां मन आकळे । मज विसरतां चौताळे । मन न धरवे वेदशास्त्रबळें । मन नाकडे मजवीण ॥ ६९ ॥ मन तेंचि मी आहें । मज चिंतितां तें विरोनि जाये । मज विसरतां तें पाहें । सैरा जाये सुनाट ॥ १७० ॥ हिरण्यगर्भो वेदानां मंत्राणां प्रणवस्त्रिवृत् । अक्षराणामकारोऽस्मि पदानि च्छन्दसामहम् ॥ १२ ॥ वेद अध्यापक प्रसिद्ध । हिरण्यगर्भ मी म्हणे गोविंद । माझेनि जगीं अनुल्लंघ्य वेद । वेदवाद तोही मी ॥ ७१ ॥ ओंकारेवीण मंत्रश्रेणी । ते जाण बाळकाची कहाणी । मंत्रां ओंकार मी चक्रपाणी । सकळ मंत्र त्याचेनी पावन ॥ ७२ ॥ अकार उकार मकार । अर्धमात्रेसी उच्चार । या नांव ’त्रिविध ओंकार’ । पावन मंत्र येणेंसीं ॥ ७३ ॥ अक्षरांच्या उच्चारासी । अकार लागला सर्वांसी । तो अकारू मी हृषीकेशी । जाण निश्चयेसी उद्धवा ॥ ७४ ॥ अक्षरीं अकार मी मुकुंदू । छंदामाजीं गायत्री छंदू । तो मी म्हणे गोविंदू । यालागीं ब्रह्मवंदू सेविती ॥ ७५ ॥ छंदामाजीं गायत्री छंद । सकळ द्वंद्वामाजीं निर्द्वंद्व । तो मी म्हणे गोविंद । द्विजवृंद येणेंचि मज ॥ ७६ ॥ इन्द्रोऽहं सर्वदेवानां वसूनामस्मि हव्यवाट् । आदित्यानामहं विष्णू रुद्राणां नीललोहितः ॥ १३ ॥ देवांमाजी मी इंद्र जाण । वसूंमाजीं मी हुताशन । आदित्यांमाजी मी वामन । रुद्रांमाजी जाण मी नीललोहितू ॥ ७७ ॥ ब्रह्मर्षीणां भृगुरहं राजर्षीणामहं मनुः । देवर्षीणां नारदोऽहं हविर्धान्यस्मि धेनुषु ॥ १४ ॥ शापूनि ब्रह्म अपूज्य केला । शिवाचा नैवेद्य त्यागविला । विष्णू हृदयीं लाता हाणितला । भृगु वाखाणिला श्रीवत्सें ॥ ७८ ॥ ब्रह्मऋषींमाजीं संपन्न । भृगु तो मी म्हणे श्रीकृष्ण । मनुस्वरूपें मी आपण । राजर्षि जाण मुख्यत्वें ॥ ७९ ॥ देवर्षीमाजीं मुनि नारद । तोही मी म्हणे गोविंद । कामधेनु अतिशुद्ध । स्वरूप प्रसिद्ध तें माझें ॥ १८० ॥ सिद्धेश्वराणां कपिलः सुपर्णोऽहं पतत्रिणाम् । प्रजापतीनां दक्षोऽहं पितॄणामहमर्यमा ॥ १५ ॥ सिद्धांमाजीं कपिल मुनीश्वर । तो मी म्हणे सारंगधर । पक्ष्यांमाजीं खगेश्वर । तो मी श्रीधर गरुडरूपें ॥ ८१ ॥ प्रजापतींमाजी मुख्य । कृष्ण म्हणे तो मी दक्ष । पितृगणांमाजीं अध्यक्ष । अर्यमा प्रत्यक्ष स्वरूप माझे ॥ ८२ ॥ मां विद्ध्युद्धव दैत्यानां प्रह्लादमसुरेश्वरम् । सोमं नक्षत्रौषधीनां धनेशं यक्षरक्षसाम् ॥ १६ ॥ भक्तिप्रतापें अतिअगाध । तो दैत्यांमाजीं मी प्रह्लाद । नक्षत्रऔषधींचा जो स्वामी चंद्र । तें म्हणे गोविंद स्वरूप माझे ॥ ८३ ॥ यक्षराक्षसांमाजीं थोर । माझें स्वरूप तो कुबेर । ज्याचे विश्वासें निरंतर । असे भांडार हरीचें ॥ ८४ ॥ ऐरावतं गजेन्द्राणां यादसां वरुणं प्रभुम् । तपतां द्युमतां सूर्यं मनुष्याणां च भूपतिम् ॥ १७ ॥ ऐरावत जो गजेंद्र । तो मी म्हणे यादवेंद्र । वरुण जो जळचरेंद्र । तें म्हणे उपेंद्र स्वरूप माझे ॥ ८५ ॥ स्वप्रभा प्रकाशनिष्ठ । जग प्रकाशूनि उद्भट । तो सूर्य मी म्हणे वैकुंठ । अतितिखट निजतेजें ॥ ८६ ॥ मनुष्यांमाजीं जो भोगी क्षिती । सर्व भूती ज्याच्या हातीं । ज्यातें बोलती भूपती । ते माझी विभूती हरि म्हणे ॥ ८७ ॥ उच्चैःश्रवास्तुरङ्गाणां धातूनामस्मि काञ्चनम् । यमः संयमतां चाहं सर्पाणामस्मि वासुकिः ॥ १८ ॥ नागेन्द्राणामनन्तोऽहं मृगेन्द्रः शृङ्गिदंष्ट्रिणाम् । आश्रमाणामहं तुर्यो वर्णानां प्रथमोऽनघ ॥ १९ ॥ उच्चैःश्रवा तुरंगजाती । तो मी म्हणे कमळापती । सुवर्ण धातु माझी विभूती । जीलागीं लुलाती तिनी लोक ॥ ८८ ॥ दंडधारित्यांमाजी गहन । यमधर्म मी आपण । सर्पामाजी जाण । मी नारायाण वासुकी ॥ ८९ ॥ अनंत या नामातें जो धरी । तो नाग मी म्हणे श्रीहरी । नखदंष्ट्राशृंगधारी । त्यांमाजीं केसरी म्हणे देवो ॥ १९० ॥ चतुर्थाश्रम संन्यास जाण । तो मी म्हणे नारायण । वर्णाग्रज जे ब्राह्मण । ते मी ब्रह्म जाणे बोलतें ॥ ९१ ॥ तीर्थानां स्रोतसां गङ्गा समुद्रः सरसामहम् । आयुधानां धनुरहं त्रिपुरघ्नो धनुष्मताम् ॥ २० ॥ तीर्थसरितांमाजीं गांग । तें मी म्हणे श्रीरंग । तडागीं श्रेष्ठ तडाग । समुद्र सांग मी म्हणे हरी ॥ ९२ ॥ आयुधीं धनुष्य हतियेर । तें मी म्हणे सारंगधर । त्रिपुरारि मी धनुर्धर । जेणें केला संहार त्रिपुराचा ॥ ९३ ॥ धिष्ण्यानामस्म्यहं मेरुर्गहनानां हिमालयः । वनस्पतीनामश्वत्थ ओषधीनामहं यवः ॥ २१ ॥ त्रिभुवन निवासस्थान महामेरू । तो मी म्हणे धराधरू । दुर्गमत्वें अतिदुर्धरू । तो मी हिमगिरिवरू म्हणे कृष्ण ॥ ९४ ॥ वृक्षांमाजीं जो अश्वत्थू । तो मी म्हणे श्रीकृष्णनाथू । ओषधींमाजीं अतिविख्यातू । यव मी अच्युतू म्हणे वेगें ॥ ९५ ॥ पुरोधसां वसिष्ठोऽहं ब्रह्मिष्ठानां बृहस्पतिः । स्कन्दोऽहं सर्वसेनान्यामग्रण्यां भगवानजः ॥ २२ ॥ श्रीरामपौरोहित्यें श्रेष्ठ । देवो म्हणे तो मी वसिष्ठ । वेदवेत्त्यांमाजीं उद्भट । सुरगुरु वरिष्ठ मी उद्धवा ॥ ९६ ॥ स्कंद सेनापतिशिरोमणी । तो मी म्हणे चक्रपाणी । स्वधर्मप्रवर्तकू अग्रगणी । वंद्य ब्राह्मणीं तो ब्रह्मा मी ॥ ९७ ॥ यज्ञानां ब्रह्मयज्ञोऽहं व्रतानामविहिंसनम् । वाय्वग्न्यर्काम्बुवागात्मा शुचीनामप्यहं शुचिः ॥ २३ ॥ यज्ञांमाजीं ब्रह्मयज्ञ । तो मी म्हणे सर्वज्ञ । देवर्षिपितृभूतगण । आब्रह्म भुवन जेणें तृप्त ॥ ९८ ॥ जीवमात्रासी पैं जाणे । नेदावे दुःखवचन । व्रतांमाजीं जें अविहिंसन । ते मी श्रीकृष्ण स्वयें म्हणे ॥ ९९ ॥ एका वायूचेनि पवित्रपण । एक अग्नीस्तव पवित्र जाण । एकातें पवित्र करी जीवन । एक पावन वचनमात्रें ॥ २०० ॥ एक बुद्धिस्तव पवित्र जाण । या समस्तांमाजीं पवित्रपण । तें माझे स्वरूप म्हणे श्रीकृष्ण । पावना पावन मी एक ॥ १ ॥ जग माझेनि नामें पुनीत । हें सर्वांचे संमत । त्या माझें स्वरूप जें येथ । परम पुनीत पुनीतां ॥ २ ॥ योगानामात्मसंरोधो मन्त्रोऽस्मि विजिगीषताम् । आन्वीक्षिकी कौशलानां विकल्पः ख्यातिवादिनाम् ॥ २४ ॥ विविध योगांमाजीं आत्मरोधू । तो योग मी म्हणे गोविंदू । जेणें प्रकटे परमानंदू । समाधिबोधू साधकां ॥ ३ ॥ मुख्यत्वें विवेक धरोनि हातीं । जो न्यायतां विजयो वांछी चित्तीं । ते नीतीची नीति मी श्रीपती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ४ ॥ आत्मानात्मविवेक केवळ । ते आन्वीक्षिकी विद्या कुशळ । ते विद्या म्हणे मी गोपाळ । विवेक प्रबळ माझेनी ॥ ५ ॥ वादांमाजी वाद अनंत । जेथ विकल्पा नाही अंत । तो वादू मी म्हणे अच्युत । ऐक निश्चित विकल्प ॥ ६ ॥ आख्याती अन्यथाख्याती । शून्यख्याती सत्ख्याती । अनिर्वचनीय जे ख्याती । तो वादू निश्चितीं मी उद्धवा ॥ ७ ॥ स्त्रीणां तु शतरूपाहं पुंसां स्वायम्भुवो मनुः । नारायणो मुनीनां च कुमारो ब्रह्मचारिणाम् ॥ २५ ॥ शतरूपा आणि मनू । इयें दोनी मी म्हणे जनार्दनू । मुनींमाजीं मी नारायणू । बदरी सेवुनू सदा असे ॥ ८ ॥ नैष्ठिक ब्रह्मचर्यधर । माझें स्वरूप सनत्कुमार । स्वयें सांगताहे श्रीधर । जाण साचार उद्धवा ॥ ९ ॥ धर्माणामस्मि सन्यासः क्षेमाणामबहिर्मतिः । गुह्यानां सूनृतं मौनं मिथुनानामजस्त्वहम् ॥ २६ ॥ भूतां अभयदान उपक्रमू । सर्वां भूतीं मी आत्मारामू । हा संन्यासाचा मुख्य धर्मू । तो धर्म पुरुषोत्तमू स्वयें मी म्हणे ॥ २१० ॥ भूतांसी काया वाचा मनें । दुःख नेदूनि सुख देणें । या नांव संन्यासधर्म म्हणणें । तो धर्म मी म्हणे गोविंद ॥ ११ ॥ अंतरीं शुद्ध नाहीं बोध । दांत चावोनि साहतां द्वंद्व । ते क्षमा नोहे शुद्ध । ऐके विनोद क्षमेचा ॥ १२ ॥ अंतरीं ठसावलें परब्रह्म । बाह्य सर्वा भूतीं जाहला सम । ते क्षमा मी म्हणे पुरुषोत्तम । द्वंद्वाराम बाधिना ॥ १३ ॥ असत्य पापी सकळ सृष्टीं । असत्यांमाजीं पापकोटी । असत्याची खोटी गोठी । जो तो पोटीं सांडीना । ॥ १४ ॥ उभय लौकिकीं खोटेपणें । असत्यबहिर्मुख नाणें । तें मनींहूनि जेणें सांडणें । तो म्यां श्रीकृष्ण वंदिजे ॥ १५ ॥ ते गुह्यामाजीं अतिगुह्य जाण । सत्य वाचा कां मनींहूनि मौन । तें मी म्हणे मधुसूदन । सत्य प्रिय जाण निजगुह्य ॥ १६ ॥ स्रष्ट्याचे देह द्विधा जाण । मनू शतरूपा मूळमिथुन । तें मी म्हणे नारायण । मनुष्य सृजन सद्भावें ॥ १७ ॥ संवत्सरोऽस्म्यनिमिषाम् ऋतूनां मधुमाधवौ । मासानां मार्गशीर्षोऽहं नक्षत्राणां तथाभिजित् ॥ २७ ॥ सावधानेंअविकळ । न चुकतां पळें पळ । संवत्सरात्मक जो काळ । तो मी गोपाळ स्वयें म्हणे ॥ १८ ॥ त्रसरेणूपासोनि जाण । लवनिमिषदिनमान । संवत्सरवरी सावधान । गणीं मी संकर्षण काळगणना ॥ १९ ॥ मधुमाधव वसंतयुक्तू । कृष्ण म्हणे तो मी ऋतू । मार्गशीर्ष मी मासांआंतू । धान्यपाकयुक्तू आल्हादी ॥ २२० ॥ गणितां न ये पंचांगांत । नक्षत्रीं असोनि सदा गुप्त । अव्यक्त परी सज्ञाना प्राप्त । तें मी अभिजित् म्हणे हरी ॥ २१ ॥ अहं युगानां च कृतं धीराणां देवलोऽसितः । द्वैपायनोऽस्मि व्यासानां कवीनां काव्य आत्मवान् ॥ २८ ॥ युगांमाजीं कृतयुग । तें मी म्हणे श्रीरंग । जेथ संपूर्ण धर्म सांग । अधर्मभाग असेना ॥ २२ ॥ निजधैर्य अतिअद्भुत । असित देवल धैर्यवंत । तो मी म्हणे गा अच्युत । जाण निश्चित उद्धवां ॥ २३ ॥ वेदविभागी राजहंस । जो कां द्वैपायन व्यास । तो मी म्हणे हृषीकेश । निवडूनि द्विजांस दीधले वेद ॥ २४ ॥ कवि त्यांमाजीं परमार्थज्ञाता । उशना कवी जाण तत्त्वतां । तो मी म्हणे रमाभर्ता । निजात्मकविता मी शुक्र ॥ २५ ॥ वासुदेवो भगवतां त्वं तु भागवतेष्वहम् । किंपुरुषाणां हनुमान् विद्याध्राणां सुदर्शनः ॥ २९ ॥ षड्गुणभाग्यें भाग्यवंत । पूर्णांशे जो भगवंत । वासुदेवनामें विख्यात । जाण तो मी येथे श्रीकृष्ण ॥ २६ ॥ भागवतांमाजी अतिगहन । उद्धवा तूं तो मीचि जाण । ऐसें बोलतां श्रीकृष्ण । उद्धवें श्रीचरण वंदिले ॥ २७ ॥ उद्धवें करितां नमन । कृष्णें दिधले आलिंगन । आनंदे कोंदलें त्रिभुवन । स्वानंदघन तुष्टला ॥ २८ ॥ उद्धव आणि श्रीकृष्ण । दोनी एक जाहले जाण । ’मी तो तूं’ जें बोलिला श्रीकृष्ण । तें उद्धवासी आपण सत्यत्वें दावी ॥ २९ ॥ दोघांचे मोडलें दोनीपण । उद्धव जाहला श्रीकृष्ण । कृष्णाअंगी उद्धवपण । संपूर्ण जाण बाणलें ॥ २३० ॥ तेणें उद्धव झाला विस्मित । नावेक श्लाघला आपणांत । मीच कृष्णाचा प्रिय भक्त । हें जाणोनि अनंत बोलिला ॥ ३१ ॥ वानरांमाजी हनुमंत । तो मी म्हणे कृष्णनाथ । तंव उद्धव जाहला गर्वहत । लाजला पोटांत ते काळीं ॥ ३२ ॥ जेथ वानर आणि वनचर । मजहूनि कृष्णाचे प्रियकर । न कळे हरिभक्तांचा पार । मी कोण किंकर ते ठायीं ॥ ३३ ॥ ऐसें विचारूनि चित्तां । सवेंचि नमिलें कृष्णनाथा । तुझ्या विभूति अचुंबिता । कृपेनें तत्त्वतां मज सांग ॥ ३४ ॥ तंव हांसोनि श्रीधर । काय बोलिला उत्तर । सुदर्शन जो विद्याधर । तो विभूति साचार पैं माझी ॥ ३५ ॥ रत्नानां पद्मरागोऽस्मि पद्मकोशः सुपेशसाम् । कुशोऽस्मि दर्भजातीनां गव्यमाज्यं हविःष्वहम् ॥ ३० ॥ रत्नांमाजी जो पद्मराग । तो मी म्हणे श्रीरंग । मनोहरांमाजी अव्यंग । हरि म्हणे सांग पद्मकळा तो मी ॥ ३६ ॥ दशदर्भांमाझारीं । कुश तो मी म्हणे श्रीहरी । सकळ हविषांच्या शिरीं । गोघृत श्रीहरि स्वयें मी म्हणे ॥ ३७ ॥ व्यवसायिनामहं लक्ष्मीः कितवानां छलग्रहः । तितिक्षास्मि तितिक्षूणां सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥ ३१ ॥ व्यवसायाचे व्यवस्थिती । दानयुक्त अतिसंपत्ती । ते लक्ष्मी मी म्हणे श्रीपती । जाण निश्चिती उद्धवा ॥ ३८ ॥ कपटाचिये कपटगती । अगम्य जे छळणस्थिती । तो मी कृष्ण मायिकमूर्ती । अतर्क्य युक्ती छळणाची ॥ ३९ ॥ ब्रह्माचे अंगी निजजीविता । जीवासी ब्रह्मसायुज्यता । त्या कपटाचा मीचि कर्ता । देवांदेवतां अतर्क्य ॥ २४० ॥ आम्ही मायानियंते म्हणविती । तो शिवू ठकिला मोहिनीप्रती । ब्रह्मा ठकिला वत्सहरणार्थी । ठकडा निश्चितीं मी एकू ॥ ४१ ॥ सहनशीळीं सहनशक्ती । ते मी म्हणे कमळापती । सात्त्विकांची निजसत्त्ववृत्ती । ते मी श्रीपती स्वयें म्हणे ॥ ४२ ॥ ओजः सहो बलवतां कर्माहं विद्धि सात्वताम् । सात्वतां नवमूर्तीनामादिमूर्तिरहं परा ॥ ३२ ॥ बळवंतांच्या ठायीं प्रबळ । मनोबळ शरीरबळ । धैर्यबळ तें मी गोपाळ । जेणें अळुमाळ डंडळीना ॥ ४३ ॥ भक्तांच्या ठायीं भजनकर्म । जेणें माझें अनिवार प्रेम । तें कर्म म्हणे मी पुरुषोत्तम । भक्तकामनिर्दळणू ॥ ४४ ॥ नवव्यूह अर्चनस्थिती । सात्त्वतां ज्या नवमूर्ती । त्यांत वासुदेव प्रथमस्थिती । ऐक व्युत्पत्ती नवांची ॥ ४५ ॥ वासुदेव संकर्षण । अनिरुद्ध आणि प्रद्युम्न । हयग्रीव नारायण । वराह वामन नरसिंह ॥ ४६ ॥ हे नवव्यूहांची उत्पत्ती । यांमाजी मी प्रथम मूर्ती । येर आठही माझ्या विभूती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ४७ ॥ हयग्रीव वेदमूर्ती । तेथें श्रीव्यासें करूनि भक्ती । वेदव्यासपदप्राप्ती । हे केली ख्याती तिहीं लोकीं ॥ ४८ ॥ नारायण निजमूर्ती । स्रष्ट्यानें करूनि त्याची भक्ती । चतुःश्लोकी ज्ञानस्थिती । पावोन निश्चितीं ब्रह्मत्वा आला ॥ ४९ ॥ श्वेतवराह महामूर्ती । धरेनें केली पूर्ण भक्ती । तीस उद्धरूनि कृपामूर्ती । अभिनव शांती अर्पिली ॥ २५० ॥ माझी निजमूर्ती वामन । देवीं करूनि पूर्ण भजन । त्यांच्या छळें बळी बांधोन । देवांचा सन्मान स्वाधिकार केला ॥ ५१ ॥ नरहरि दिव्यमूर्ती । प्रल्हादें करूनि अनन्यभक्ती । मी सर्वात्मा सर्वांभूतीं । हे लोकप्रतीती विश्वासिली जेणें ॥ ५२ ॥ संकर्षण श्रेष्ठ मूर्ती । ब्रह्माज्ञा रैवतें केली भक्ती । अर्पूनियां रेवती । स्वानंदस्थितीं निवाला ॥ ५३ ॥ प्रद्युम्न काममूर्ती । सकाम कामुकीं करूनियां भक्ती । जे जे काम वांछिती । ते ते निश्चितीं तो पुरवी ॥ ५४ ॥ अनिरुद्ध माझा निजसखा । शिवाज्ञा भक्ती केली उखा । बाणासुर तारिला देखा । साह्य चित्ररेखा नारदाज्ञा ॥ ५५ ॥ पूर्णांशे ब्रह्मस्थिती । वासुदेव मी आदिमूर्ती । लीलेनें तारिलें नेणों किती । तेथील निजभक्ती उद्धवार्जुनीं नांदे ॥ ५६ ॥ नव भक्ति नव मूर्ती । तेथील भक्तीची स्थिती । उद्धवा म्यां तुजप्रती । यथार्थ गती सांगीतली ॥ ५७ ॥ विश्वावसुः पूर्वचित्तिर्गन्धर्वाप्सरसामहम् । भूधराणामहं स्थैर्यं गन्धमात्रमहं भुवः ॥ ३३ ॥ ज्याचें गायन अतिअपूर्व । जो विश्वावसु गंधर्व । तो मी म्हणे माधव । ऐके उद्धव सावध ॥ ५८ ॥ नृत्य करूनि मनोहरा । सबाह्य सद्भावें सुंदरा । पूर्वचित्ती जे अप्सरा । ते मी म्हणे नोवरा भीमकीचा ॥ ५९ ॥ पर्वतांमाजीं जें ’स्थैर्यपण’ । तें मी म्हणे नारायण । पृथ्वीमाजीं जो ’गंध’ जाण । तो मी श्रीकृष्ण स्वयें म्हणे ॥ २६० ॥ अपां रसश्च परमस्तेजिष्ठानां विभावसुः । प्रभा सूर्येन्दुताराणां शब्दोऽहं नभसः परः ॥ ३४ ॥ उदकाच्या ठायीं ’रस’ सुरसु । तो मी म्हणे श्रीनिवासु । तेजिष्टांमाजीं जो ’प्रकाशु’ । तो मी म्हणे निजतेजसु उद्धवा ॥ ६१ ॥ चंद्रसूर्यतारांच्या ठायीं । जें ’तेज’ तें माझें पाहीं । ’अनाहतशब्द’ तो मीही । जो गगनासीं कंहीं नातळे ॥ ६२ ॥ ब्रह्मण्यानां बलिरहं वीराणामहमर्जुनः । भूतानां स्थितिरुत्पत्तिरहं वै प्रतिसङ्क्रमः ॥ ३५ ॥ ब्राह्मणभजनीं ’बळी’ची थोरी । तो मी कृष्ण म्हणे निर्धारीं । ब्राह्मणभजनप्रतापें करीं । मी बळीच्या द्वारीं द्वारपाळु ॥ ६३ ॥ नरावतारें अतिसंपन्न । पांडवांमाजी वीर ’अर्जुन’ । तो मी म्हणे नारायण । जीवप्राण तो माझा ॥ ६४ ॥ भूतांची ’उत्पत्ति-स्थिती’ । तो मी म्हणे श्रीपती । भूतांसी जे ’प्रळयगती’ । तेही मी निश्चिती उद्धवा ॥ ६५ ॥ गत्युक्त्युत्सर्गोपादानम् आनन्दस्पर्शलक्षणम् । आस्वादश्रुत्यवघ्राणम् अहं सर्वेन्द्रियेन्द्रियम् ॥ ३६ ॥ ज्ञान-कर्म उभय इंद्रियें । त्या इंद्रियांचे मी इंद्रिय पाहे । त्यांची क्रिया जे जे आहे । ते माझेनि होये अभिव्यक्त ॥ ६६ ॥ ’गति-ग्रहण-गमन’ । ’उत्सर्ग’ आणि ’मोहन’ । ’दर्शन’ ’स्पर्शन’ ’ घ्राण’ । ’श्रवण’ स्वादन’ माझेनी । ६७ ॥ ते इंद्रक्रियेचे चलन । तिळभरी नव्हे मजवीण । ऐक त्याचेंही लक्षण । तुज मी संपूर्ण सांगेन ॥ ६८ ॥ मी मनाचेंही ’महामन’ । नयनाचेंही ’नयन’ । स्पर्शाचेंही ’स्पर्शन’ । जिव्हेची जाण ’निजजिव्हा’ ॥ ६९ ॥ मी घ्राणाचेंही निजघ्राण । श्रवणाचें ’आदिश्रवण’ । ग्रहणाचें निज ’ग्रहण’ । गतीची जाण मी ’गती’ ॥ २७० ॥ मी आनंदाचा ’आनंदु’ । मी बुद्धीचाही ’प्रबोधु’ । सकळ इंद्रियांचा ’विषय स्वादु’ । तो मी मुकुंदु उद्धवा ॥ ७१ ॥ मी वाचेची ’वाचा’ सावकाश । मी परेचाही ’परेश’ । सकळ इंद्रियांचा मी ’ईश’ । यालागीं ’हृषीकेश’ नांव माझें ॥ ७२ ॥ पृथिवी वायुराकाश आपो ज्योतिरहं महान् । विकारः पुरुषोऽव्यक्तं रजः सत्त्वं तमः परम् ॥ ३७ ॥ तत्त्वसंख्या पंचवीस । त्रिगुण घालितां अठ्ठावीस । ऐक त्यांचाही विलास । सावकाश सांगेन ॥ ७३ ॥ अहं महतत्त्व पंचतन्मात्रा । हा स्थूल प्रकृतीचा उभारा । महाभूतेंद्रियें अकरा । हे षोडश विकारांची संख्या ॥ ७४ ॥ यांत मिळाल्या प्रकृति-पुरुष । तत्त्वसंख्या पंचवीस । प्रकृतीमाजीं गुणांचा वास । हा तत्त्वविलास तत्त्वांचा ॥ ७५ ॥ प्रकृति गुणविकार । तत्त्वसंख्या निर्धार । हा म्यां सांगितला जो विचार । तें परात्पर स्वरूप माझें ॥ ७६ ॥ अहमेतत्प्रसङ्ख्यानं ज्ञानं तत्त्वविनिश्चयः । मयेश्वरेण जीवेन गुणेन गुणिना विना । सर्वात्मनापि सर्वेण न भावो विद्यते क्वचित् ॥ ३८ ॥ एवं ’पंचवीसतत्त्वसंख्यान’ । तें अवघें मीचि जाण । या गणण्याचें गणितें ’ज्ञान’ । तेंही मी आपण म्हणे देवो ॥ ७७ ॥ हेंही जाणतें जें लक्षण । तेंही देवो म्हणे मी आपण । मजवेगळें अणुप्रमाण । सर्वथा जाण असेना ॥ ७८ ॥ जीव आणि ईश्वर । गुणी आणि गुणावतार । क्षेत्रक्षेत्रज्ञ निर्धार । सर्वही साचार मीचि मी ॥ ७९ ॥ मजवेगळें अणुमात्र । उरलें नाहीं गा स्वतंत्र । मी सर्वात्मा सर्वत्र । केवळ ’चिन्मात्र’ तेंही मी ॥ २८० ॥ मजवेगळें येथें कांही । उद्धवा गा उरले नाही । सर्वसाधारण पाहीं । सर्वां देहीं असें मी ॥ ८१ ॥ उद्धवा ऐसें म्हणसी कांही । ’संक्षेपु न करावा पाहीं’ । विस्तारू न चले ये ठायीं । ऐक तेंही सांगेन ॥ ८२ ॥ सङ्ख्यानं परमाणूनां कालेन क्रियते मया । न तथा मे विभूतीनां सृजतोऽण्डानि कोटिशः ॥ ३९ ॥ पृथ्वीचिया परमाणुकणा । मी काळरूपें करी गणना । परी विभूतिसंख्याप्रमाणा । माझेनिही जाण न गणवती ॥ ८३ ॥ म्यां सृजिलें अनंत ब्रह्मगोळ । ते मज गणवतीना सकळ । मा विभूति माझ्या केवळ । कोण तोंडाळ गणूं शके ॥ ८४ ॥ मी सर्वज्ञ श्रीनारायण । माझ्या विभूति मज जाण । गणावया नाहीं आंगवण । मा निरूपण केवीं सांगें ॥ ८५ ॥ मनुष्यांमाजी माझी विभूती । नांदतसे कोणे स्थितीं । ते खूण सांगेन मी तुजप्रती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥ ८६ ॥ तेजः श्रीः कीर्तिरैश्वर्यं ह्रीस्त्यागः सौभगं भगः । वीर्यं तितिक्षा विज्ञानं यत्र यत्र स मेऽंशकः ॥ ४० ॥ ज्याची प्रबळ प्रतापशक्ती । जेथ निरंतर लक्ष्मीची वस्ती । ज्यासी मर्यादा नाहीं संपत्ती । ज्याची उदारकीर्ति स्वधर्में ॥ ८७ ॥ ज्याच्या ऐश्वर्याची परमगती । आज्ञेवरी नेमी त्रिजगती । ज्याची अनावर दानस्थिती । जेथे भाग्याची उत्पत्ती नीच नवी दिसे ॥ ८८ ॥ ज्याचें सामर्थ्य अतिदुर्धर । कोणी बोलों शकेना उत्तर । ज्याचें सौभाग्य मनोहर । आल्हादकर जननयनां ॥ ८९ ॥ ज्यासी सहनशीळतेची वोज । ज्यासी निंद्य कर्माची लाज । जो विज्ञानाचें भोज । सहजेंचि निज नाचत ॥ २९० ॥ इयें लक्षणें जेथ वर्तती । ते जाण माझी विभूती । यांत एका लक्षणाची जेथ प्राप्ती । तेही विभूती पैं माझी ॥ ९१ ॥ एतास्ते कीर्तिताः सर्वाः सङ्क्षेपेण विभूतयः । मनोविकारा एवैते यथा वाचाभिधीयते ॥ ४१ ॥ केवळ संकोच संक्षेपस्थितीं । म्यां सांगितल्या ज्या विभूति । त्या मनोविकारप्रतीती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ९२ ॥ साधकांचे साधनस्थिती । सत्य जाणाव्या माझ्या विभूती । विचारितां परमार्थगतीं । तरी या कल्पिती मनोजन्या ॥ ९३ ॥ माझें स्वरूप अद्वैत जाण । नाहीं नाम रूप गुण वर्ण । तेथ नाना विभूतिलक्षण । मिथ्या जाण वाचिक ॥ ९४ ॥ वाचं यच्छ मनो यच्छ प्राणान् यच्छेद्रियाणि च । आत्मानमात्मना यच्छ न भूयः कल्पसेऽध्वने ॥ ४२ ॥ माझें स्वरूप नित्य निर्विकार । मनबुद्धिवाचा न कळे पार । तेथ बापुडीं इंद्रियें किंकर । प्राण निर्धार तें नेणे ॥ ९५ ॥ यालागीं शमदमांच्या अनुक्रमीं । मनबुद्धि इंद्रियें वाचा नेमीं । प्राण नेमूनि प्राणधर्मीं । आत्मारामासी पावसी ॥ ९६ ॥ मनबुद्ध्यादि इंद्रियनेम । करावयाचें न कळे वर्म । म्हणसी तरी तो अनुक्रम । ऐक सुगम सांगेन ॥ ९७ ॥ ’वाचा’ नेमावी माझेनि नामें । ’मन’ नेमावें ध्यानसंभ्रमें । ’प्राण’ नेमावा प्राणायामें । ’इंद्रियें’ दमें नेमावी ॥ ९८ ॥ ’बुद्धि’ नेमावी आत्मविवेकें । ’जीव’ नेमावा परमार्मसुखें । इतुकेन तूं होसी आवश्यकें । होसी कौतुकें मद्रूप ॥ ९९ ॥ मद्रूप झालियापाठीं । संसारचि न पडे दिठीं । खुंटल्या जन्ममरणांचिया गोठी । गमनागमन आटाआटी निमाली ॥ ३०० ॥ म्यां सांगितल्या नेमपरिपाटीं । हा नेम करणें नाहीं ज्याच्या पोटीं । तो भोगी दुःखांचिया कोटी । ऐक ते गोठी सांगेन ॥ १ ॥ यो वै वाङ्मनसी सम्यगसंयच्छन् धिया यतिः । तस्य व्रतं तपो दानं स्रवत्यामघटाम्बुवत् ॥ ४३ ॥ म्यां सांगितल्या नेमाचे निगुतीं । मनबुद्धि इंद्रियपंक्ती । जो नेमीना साक्षेपस्थितीं । त्याचीं साधनें होती नश्वर ॥ २ ॥ त्याचें व्रत तप दान । योग याग शब्दज्ञान । काचे भांड्यांतील जीवन । तैशीं जाण नासती ॥ ३ ॥ जेवीं राखेमाजीं केला होम । कां अशौचें आचरला कर्म । कुपात्रीं दानधर्म । तैसा संभ्रम साधनां ॥ ४ ॥ उखरीं पेरिलें बीज । कां गोळक आवंतिला द्विज । डोहळ्यांचे सोहळे भोगी वांझ । तैशी वोज साधनां ॥ ५ ॥ यापरी गा निश्चितीं । विध्युक्त नेम नाहीं चित्ती । त्याचीं साधनें वृथा जाती । हातोहातीं उद्धवा ॥ ६ ॥ यालागीं मनादि इंद्रियवृत्ती । नेमाव्या गा यथानिगुतीं । हेंचि उद्धवाप्रती । स्वयें श्रीपति सांगत ॥ ७ ॥ तस्माद् वचो मनः प्राणान् नियच्छेन् मत्परायणः । मद्भक्तियुक्तया बुद्ध्या ततः परिसमाप्यते ॥ ४४ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कंधे षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥ मन बुद्धि इंद्रिय प्राण । अवश्य नेमावीं गा जाण । वृत्ति करोनि सावधान । माझें भजन जो करी ॥ ८ ॥ भावें करितां माझीं भक्ती । विषयवासना जळोनि जाती । विर्विकल्प उपजे शांती । माझे भक्तिपंथीं चालतां ॥ ९ ॥ चालतां माझे भक्तिपंथीं । सकळ साधनें लाजोनि जाती । भावें प्रकटें मी श्रीपती । करीं संसारनिवृत्ती निजभक्तां ॥ ३१० ॥ हो कां माझिया निजभक्तां । संसारबाधेची व्यथा । ते लाज मज भगवंता । गांजूं निजभक्तां मी नेदीं ॥ ११ ॥ हो कां माझिया निजभक्तां । संसारबाधेची व्यथा । ते लाज मज भगवंता । गांजूं निजभक्तां मी नेदी ॥ १२ ॥ प्रल्हाद गांजितां जगजेठी । मी प्रकटलों कोरडें काष्ठीं वैकुंठ सांडूनि उठाउठीं । गजेंद्रासाठीं पावलो ॥ १२ ॥ द्रौपदी जांचितां तत्काळीं । म्यां कौरवांची तोंडें केलीं काळीं । आगीनें गांजितां गोवळीं । म्यां प्राशिला ते काळीं दावाग्नी ॥ १३ ॥ गोकुळ गांजितां सुरपती । म्यां गोवर्धन धरिला हातीं । कीं गोपिकांची पुरवावया आर्ती । मी झालों श्रीपति कामारा ॥ १४ ॥ अर्जुनप्रतिज्ञेचे प्राप्ति । म्यां दिवसा लपविला गभस्ती । लावूनि जयद्रथासी ख्याती । सुभद्राप्रति वांचविला ॥ १५ ॥ अंबरीषाचे गर्भवास । म्यांचि सोसिले सावकाश । उणें आपुल्या निजभक्तांस । मी हृषीकेश येवों नेदी ॥ १६ ॥ भक्तांचे पायींची माती । मी हृदयीं वाहें श्रीपती । वानरें वनचरें भावार्थीं । म्यां आपुले पंक्ती बैसविली ॥ १७ ॥ यालागी उद्धवा पुढतपुढती । मी सांगें करावी माझी भक्ती । माझे भजनें माझी प्राप्ती । अवलीळा पावती मद्भावें ॥ १८ ॥ मद्भावें करितां माझी भक्ती । मी अनंत आतुडें त्यांच्या हातीं । शेखीं कामारा होय भक्तांप्रती । भक्तीची प्रीती मज ऐशी ॥ १९ ॥ माझिये भक्तीपरतें । सुगम साधन नाहीं येथें । हें जाणोनि म्यां तूतें । भजनपंथें लाविलें ॥ ३२० ॥ लाविल्या लागे सद्भक्ती । तैं संसार बापुडें तें किती । हेळसून चारी मुक्ती । निजसुख भोगिती मद्भक्त ॥ २१ ॥ मद्भक्तांचे महिमान । अतिशयें अगम्य गहन । ऐसें बोलूनियां श्रीकृष्ण । उद्धवासी जाण कुरवाळी ॥ २२ ॥ तेणें श्रीकृष्णकराग्रस्पर्शें । उद्धवासी झालें कैसें । व्याले धेनूचेनि वोरसें । वत्स जैसें उल्हासे ॥ २३ ॥ जेवीं कां लागतां चंद्रकर । सबाह्य निवों लागे चकोर । मेघ देखोनि मयूर । नृत्यतत्पर स्वानंदें ॥ २४ ॥ यापरी उद्धव जाण । स्वानंदें झाला परिपूर्ण । विसरला देवभक्तपण । कृष्णही कृष्णपण विसरला ॥ २५ ॥ यापरी भक्तिसुखाआंत । दोघेही ऐक्यें झाले उन्मत्त । परमानंदाचा तेथ । धेंडा नाचत स्वानंदें ॥ २६ ॥ या भक्तिसुखाची गोडी । भाग्येंविण न कळे फुडी । उद्धवभजनाचे कुळवाडी । जोडला जोडी श्रीकृष्ण ॥ २७ ॥ एका जनार्दना शरण । भजनसुखाची उणखूण । तो एक जाणे संपूर्ण । भक्तजीवनजिव्हाळा ॥ २८ ॥ जो निजभक्तांचा जिव्हाळा । तो गोकुळीं होऊनि गोंवळा । क्रीडोनि त्यांचिया खेळामेळा । गोपीगोपाळां उद्धरिलें ॥ २९ ॥ स्वयें खेळोनि त्यांचिया खेळा । उद्धरिलें बाळगोपाळा । हें नवल नव्हे त्याची कळा । उदार लीळा ते ऐका ॥ ३३० ॥ पर्वत पाषाण तृण तरुवर । भृंग मत्स्य मृग मगर । व्याघ्र वनचर विखार । पारावतें मयूर आदिकरून ॥ ३१ ॥ येणेंसी समवेत । गोकुळींचे जीव समस्त । स्वयें उद्धरी श्रीकृष्णनाथ । कृपाळू समर्थ स्वलीला ॥ ३२ ॥ कां पितृवचन पुढारां । सीतेचिया वियोगद्वारा । रिसां आणि वानरां । उद्धरी निशाचरां रघुनाथ ॥ ३३ ॥ सेवेनें तारिले रीसवानर । युद्धें तारिले निशाचर । हें नवल कांहीं नव्हे थोर । ऐक उदार लीला त्याची ॥ ३४ ॥ अयोध्येपासून लंकेपर्यंत । मार्गी वृक्षवल्ली पाषाण पर्वत । तृणादि जीव समस्त । उद्धरी रघुनाथ स्वलीला ॥ ३५ ॥ एवं नानावतारीं जनार्दन । यापरी उद्धरी सकळ जन । तेणें एका एकू केला पावन । हें नवल कोण मानावें ॥ ३६ ॥ परी नवल एक केलें मोठें । मज मूर्खाचेही मुखावाटें । श्रीभागवतबोल केले मर्हाटे । हें आश्चर्य वाटे माझेंचि मज ॥ ३७ ॥ यालागीं एका जनार्दना शरण । ज्याची कृपा ऐशी परिपूर्ण । त्याचे स्मरोनि श्रीचरण । केला संपूर्ण सोळावा ॥ ३८ ॥ इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धव संवादे एकाकारटीकायां विभूतियोगो नाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोकसंख्या ॥ ४४ ॥ ओव्या ॥ ३३८ ॥
You can donate to the bank account given below
Scan to donate
Merchant Name : Sant Eknath Mission
UPI ID : santeknathmission@sbi
Contact Info :
Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission,
C/O Shri Venimadhav Gosavi,
ShriNath Galli, Shrikshetra Paithan, Dist. Chhatrapati
Sambhajinagar
Pin. 431006
Mobile No : +91 - 9421411135
Email : info@santeknath.org