श्रीगणेशाय नमः ॥ श्री गोपालकृष्णाय नमः ॥ जय जय देवाधिदेवा । भोगिसी गुरुत्वें सुहावा । विश्वीं विश्वात्मा ये सद्भावा । तूं कृपेनें जेव्हां अवलोकिसी ॥ १ ॥ ते विश्वीं जो विश्ववासी । त्यातें विश्वासी म्हणसी । तेणें विश्वासें प्रसन्न होसी । तैं पायांपाशीं प्रवेशु ॥ २ ॥ त्या चरणारविंदकृपादृष्टी । अहं सोहं सुटल्या गांठी । एकसरें तुझ्या पोटीं । उठाउठी प्रवेशलों ॥ ३ ॥ यालागीं तूं निजात्ममाये । या हेतु जंव पाहों जायें । तंव बापपण तुजमाजीं आहे । अभिनव काये सांगावें ॥ ४ ॥ येथ मातापिता दोनी । वेगळीं असती जनीं । ते दोनी एक करोनी । एका जनार्दनीं निजतान्हें ॥ ५ ॥ आतां उभयस्नेहें स्नेहाळा । वाढविसी मज बाळा । परी नित्य नवा सोहळा । संभ्रमु आगळा निजबोधाचा ॥ ६ ॥ शिव शक्ति गणेशु । विश्व विष्णु चंडांशु । ऐसा अलंकार बहुवसु । निजविलासु लेवविशी ॥ ७ ॥ यापरी मज निजबाळा । लेणीं लेवविशी स्वलीळा । आणि लेइलेपणाचा सोहळा । पहाशीं वेळोवेळां कृपादृष्टीं ॥ ८ ॥ बाळका लेवविजे लेणें । तयाचें सुख तें काय जाणे । तो सोहळा मातेनें भोगणें । तेवीं जनार्दनें भोगिजे सुख ॥ ९ ॥ आपुल्या चिद्रत्नांच्या गांठी । आवडी घालिशी माझ्या कंठी । यालागीं मज पाठोवाठीं । निजात्मदृष्टीं सवें धांवे ॥ १० ॥ समर्थ जयाचा जनकु । त्यास मानिती सकळ लोकु । एका जनार्दनीं एकु । अमान्य अधिकु मान्य कीजे ॥ ११ ॥ बाळक स्वयें बोलों नेणे । त्यासी माता शिकवी वचनें । तैशीं ग्रंथकथाकथनें । स्वयें जनार्दनें बोलविजे ॥ १२ ॥ तेणें नवल केलें येथ । मूर्खाहाती श्रीभागवत । शेखीं बोलविलें प्राकृत । एकादशार्थ देवभाषा ॥ १३ ॥ परिसोनि प्रथम अध्यावो । उगाचि राहिला कुरुरावो । पुढें कथाकथनीं ठावो । कांहीं अभिप्रावो दिसेना ॥ १४ ॥ आपण करावा प्रश्न । तंव हा सांगेल कृष्णनिधन । यालागीं राजा मौन । ठेला धरून निवांत ॥ १५ ॥ जाणोनि त्याचा अभिप्रावो । बोलत जाहला शुकदेवो । तो म्हणे मोक्षाचा प्रस्तावो । तो हा अध्यावो परीक्षिति ॥ १६ ॥ हा एकादश अलोलिक । श्लोकाहून श्लोक अधिक । पदोपदीं मुक्तिसुख । लगटले देख निजसाधकां ॥ १७ ॥ ऐसें ऐकतांचि वचन । राजा जाहला सावधान । मुक्तिसुखीं आवडी गहन । अवधानें कान सर्वांग केले ॥ १८ ॥ ऐसें देखोन परीक्षिती । शुक सुखावे अत्यंत चित्तीं । तो म्हणे अवधानमूर्ती । ऐक निश्चितीं गुह्यज्ञान ॥ १९ ॥ द्वितीयाध्यायीं निरूपण । नारद वसुदेवसंवाद जाण । निमिजायंतांचे प्रश्न । मुख्य लक्षण भागवतधर्म ॥ २० ॥ श्रीशुक उवाच । गोविन्दभुजगुप्तायां द्वारवत्यां कुरूद्वह । अवात्सीन्नारदोऽभीक्ष्णं कृष्णोपासनलालसः ॥ १ ॥ जो मुक्तांमाजीं अग्रणी । जो ब्रह्मचारियां शिरोमणी । योगी वंदिती मुकुटस्थानीं । जो भक्तमंडणीं अतिश्रेष्ठ ॥ २१ ॥ जो ब्रह्मरसाचा समुद्र । जो निजबोधाचा पूर्णचंद्र । तो बोलता झाला शुक योगींद्र । श्रोता नरेंद्र कुरुवंशीचा ॥ २२ ॥ तो म्हणे व्यासाचा जो निजगुरु । आणि माझाही परमगुरु । नारद महामुनीश्वरु । त्यासी अतिआदरु श्रीकृष्णभजनीं ॥ २३ ॥ द्वारकेहूनि स्वयें श्रीकृष्ण । पिंडारका पाठवी मुनिगण । तेथूनि नारद आपण । द्वारकेसी जाण पुनः पुनः येतु ॥ २४ ॥ हो कां जे द्वारकेआंत । न रिघे भय काळकृत । जेथ स्वयें श्रीकृष्णनाथ । असे नांदत निजसामर्थ्यें ॥ २५ ॥ दक्षशापु नारदासी पाहीं । मुहूर्त राहों नये एके ठायीं । तो शापु हरिकीर्तनीं नाहीं । यालागीं तो पाहीं किर्तननिष्ठु ॥ २६ ॥ ज्याची गाइजे कीर्तनीं कीर्ती । तो द्वारकेसी वसे स्वयें श्रीपती । तेथें शापबाधेची न चले प्राप्ती । यालागीं नित्यवस्ती नारदासि तेथें ॥ २७ ॥ नारदासी पूर्ण ब्रह्मज्ञान । त्यासी कां कृष्णमूर्तीचें ध्यान । श्रीकृष्णदेहो चैतन्यघन । यालागी श्रीकृष्णभजन नारदा पढियें ॥ २८ ॥ यापरी कृष्णभजन । मुक्तांसी पढिये पूर्ण । त्यासी न भजे अभागी कोण । तेंचि निरूपण शुक सांगे ॥ २९ ॥ को नु राजन् इन्द्रियवान् मुकुन्दचरणाम्बुजम् । न भजेत्सर्वतोमृत्युः उपास्यममरोत्तमैः ॥ २ ॥ ऐकें बापा नृपवर्या । येऊनि उत्तमा देहा या । जो न भजे श्रीकृष्णराया । तो गिळिला माया अतिदुःखें ॥ ३० ॥ ज्या भगवंतालागुनी । माथा धरूनि पायवणी । सदाशिव बैसला आत्मध्यानीं । महाश्मशानीं निजवस्ती ॥ ३१ ॥ पोटा आला चतुरानन । इतरांचा पाडु कोण । देहा येवोनि नारायण । न भजे तो पूर्ण मृत्युग्रस्त ॥ ३२ ॥ त्यजूनि परमात्मा पूर्ण । नाना साधनें शिणती जन । त्यासी सर्वथा दृढबंधन । न चुके जाण अनिवार ॥ ३३ ॥ सांडूनि श्रीकृष्णचरण । इंद्रादि देवांचें करितां भजन । ते देव मृत्युग्रस्त पूर्ण । मा भजत्याचें मरण कोण वारी ॥ ३४ ॥ असोनि इंद्रियपाटव पूर्ण । जो न भजे श्रीकृष्णचरण । त्यासी सर्वत्र बाधी मरण । क्षणक्षण निर्दाळी ॥ तो नारद महामुनीश्वरु । मुक्त होऊनि भजनतत्परु । द्वारके वसे निरंतरु । श्रीकृष्णीं थोरु अतिप्रीति तया ॥ ३६ ॥ तमेकदा तु देवर्षिं वसुदेवो गृहागतम् । अर्चितं सुखमासीनं अभिवाद्येदमब्रवीत् ॥ ३ ॥ धन्य धन्य तो नारदु । ज्यासी सर्वीं सर्वत्र गोविंदु । सर्वदा हरिनामाचा छंदु । तेणें परमानंदु सदोदित ॥ ३७ ॥ जो श्रीकृष्णाचा आवडता । ज्यासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा । ज्याचेनि संगें तत्त्वतां । नित्यमुक्तता जडजीवां ॥ ३८ ॥ तो नारदु एके वेळां । स्वानंदाचिया स्वलीळा । आला वसुदेवाचिया राउळा । तेणें देखोनि डोळां हरिखला ॥ ३९ ॥ केलें साष्टांग नमन । बैसों घातलें वरासन । ब्रह्मसद्भावें पूजन । श्रद्धासंपूर्ण मांडिलें ॥ ४० ॥ नारद तोचि नारायण । येणें विश्वासेंकरूनि जाण । हेमपात्रीं चरणक्षाळण । मधुपर्क विधिपूर्ण पूजा केली ॥ ४१ ॥ पूजा करोनि सावधानीं । वसुदेव बैसोनी सुखासनीं । हृदयीं अत्यंत सुखावोनी । काय आल्हादोनी बोलत ॥ ४२ ॥ श्रीवसुदेव उवाच । भगवन्भवतो यात्रा स्वस्तये सर्वदेहिनाम् । कृपणानां यथा पित्रोः उत्तमश्लोकवर्त्मनाम् ॥ ४ ॥ स्वलीला कृपा केली तुम्हीं । तेणें परम सभाग्य जाहलों जी मी । तुमचेनि आगमनें आम्ही । कृतकृत्य स्वामी सन्निधिमात्रें ॥ ४३ ॥ चुकलिया निजजननी । बाळक दीन दिसे जनीं । त्यासी मातेच्या आगमनीं । संतोष मनीं निर्भर ॥ ४४ ॥ त्याहूनि श्रेष्ठ तुमची यात्रा । नित्य सुखदाती भूतमात्रां । स्वलीला तुम्ही मही विचरां । दीनोद्धारालागुनी ॥ ४५ ॥ मातेच्या आगमनीं निजबाळा । दृष्टिउत्संगीं नित्य नवा सोहळा । तुमची यात्रा दीनां सकळां । भोगवी स्वलीळा निजात्मसुख ॥ ४६ ॥ माता सुख दे तें नश्वर । तुमच्या आगमनीं अनश्वर । नित्य चित्सुख चिन्मात्र । परात्पर भोगावया ॥ ४७ ॥ तुम्ही भागवतधर्ममार्गगामी । तैंचि तुमची भेटी लाहों आम्ही । जैं पुण्यकोटी निष्कामीं । प्रयागसंगमीं केलिया ॥ ४८ ॥ नारदा तूं भगवद्रूप । तुझी भेटी करी निष्पाप । तुवां कृपा केलिया अल्प । स्वयें चित्स्वरूप ठसावे ॥ ४९ ॥ तुझेनि भक्तीसी महिमा अमूप । तुझेनि वाढला भक्तिप्रताप । तुझेनि भक्ति भगवद्रूप । तूं चित्स्वरूप निजनिष्ठां ॥ ५० ॥ तूं भक्तिप्रकाशकु दिवटा । कीं भक्तिमार्गींचा मार्गदृष्टा । नारदा तुझा उपकार मोठा । भक्तीच्या पेठा वसविल्या तुवां ॥ ५१ ॥ मुख्य भागवतशास्त्र पूर्ण । तुवां व्यासासी उपदेशून । प्रगट करविलें दशलक्षण । दीन जन उद्धरावया ॥ ५२ ॥ नारदा तूं देवासमान । हेही उपमा दिसे गौण । तेचिविषयीं निरूपण । वसुदेव आपण निरूपी ॥ ५३ ॥ भूतानां देवचरितं दुःखाय च सुखाय च । सुखायैव हि साधूनां त्वादृशामच्युतात्मनाम् ॥ ५ ॥ देवांपासूनि भूतसृष्टी । सुखदुःखें शिणे पोटीं । अतिवृष्टी कां अनावृष्टी । भूतकोटी आकांतु ॥ ५४ ॥ त्या देवांपरीस साधु अधिक । हें साचचि मज मानलें देख । देवचरिते उठी सुखदुःख । साधु निर्दोख सुखदाते ॥ ५५ ॥ त्यांहीमाजीं तुजसारिखा । जोडल्या कृपाळू निजात्मसुखा । तैं पेठ पिके परमार्थसुखा । हा महिमां लोकां कदा न कळेचि ॥ ५६ ॥ दिधल्या सुखाचि मागुती । च्युती हों नेणे कल्पांतीं । ते अच्युतात्मस्थिती । तुजपाशी निश्चितीं नारदा ॥ ५७ ॥ तुझिये महिमेपासीं । मुदल देवो नये तुकासी । तेंही सांगेन मी तुजपासीं । यथार्थेंसी नारदा ॥ ५८ ॥ देवाचा अवतार होये । दासां सुख दैत्यां भये । तेथेही ऐसे विषम आहे । हें न समाये तुजमाजीं ॥ ५९ ॥ तूं देवांचा आप्त होसी । दैत्यही विश्वासती तुजपासीं । रावण नेऊनि तुज एकांतासी । निजगुह्यासी स्वयें सांगे ॥ ६० ॥ देव रावणें घातलें बंदीं । तो रावण तुझे चरण वंदी । शेखी रामाचा आप्त तूं त्रिशुद्धी । विषम तुजमधीं असेना ॥ ६१ ॥ जरासंधु कृष्णाचा वैरी । तुझी चाल त्याच्या घरीं । आणि कृष्णाचे सभेमाझारीं । आप्तत्वें थोरी पैं तुझी ॥ ६२ ॥ नाम घेवों नेदी देवाचें । हें बिरुद हिरण्यकशिपूचें । त्यासी कीर्तन तुझें रुचे । विषमत्व साचें तुज नाहीं ॥ ६३ ॥ लांचुगी बुद्धि सदा देवांसी । तैशी नाहीं तुम्हां साधूंसी । ऐक त्याही अभिप्रायासी । यथार्थेंसीं सांगेन ॥ ६४ ॥ भजन्ति ये यथा देवान्देवा अपि तथैव तान् । छायेव कर्मसचिवाः साधवो दीनवत्सलाः ॥ ६ ॥ जे जैसे देव यागीं यजिजती । तैसतैसी फळें देव देती । न भजत्यांतें विघ्नें सूचिती । ऐसी गती देवांची ॥ ६५ ॥ जैसजैसा पुरुष वेंठे । तैसतैसी छाया नटे । तेवीं भजनें देव प्रसन्न मोठे । येरवीं उफराटें विघ्न करिती ॥ ६६ ॥ जंव जंव सूर्य प्रकाशत असे । तंव तंव छाया सरिसी दिसे । निजकर्में देवही तैसे । कर्मवशें प्रसन्न ॥ ६७ ॥ सूर्य अस्तमानीं छाया नासे । अभजनें देव क्षोभती तैसे । एवं लांचुगे देव ऐसे । तूंही अनायासे जाणसी ॥ ६८ ॥ इतर देवांची कथा कोण । थोरला देव लांचुगा पूर्ण । तोही न भेटे जीव घेतल्याविण । भेटल्याचे आपण गर्भवास सोसी ॥ ६९ ॥ त्याचें जीवें सर्वस्वें भजन । केल्या निजांग देऊनि होये प्रसन्न । परी न भजत्याच्या घरा जाण । विसरोनि आपण कदा न वचे ॥ ७० ॥ तैसी नव्हे तुमची बुद्धी । दीनदयाळ त्रिशुद्धी । तूं तंव केवळ कृपानिधी । ऐक तो विधी सांगेन ॥ ७१ ॥ तुवां व्यास देखोनि सज्ञान । उपदेशिलें गुह्यज्ञान । ध्रुव बाळक अज्ञान । म्हणोनि जाण नुपेक्षिसी ॥ ७२ ॥ प्रल्हाद उपदेशिला जेव्हां । दैत्यपुत्र न म्हणसी तेव्हां । तुझिया कृपेचा हेलावा । तो निजविसांवा दीनांसी ॥ ७३ ॥ केवळ वाटपाडा देख । भजनेंवीण एकाएक । महाकवी केला वाल्मीक । अमर आवश्यक वंदिती त्यासी ॥ ७४ ॥ देखोनि ज्याचिया ग्रंथासी । सुख वोसंडे सदाशिवासी । ऐसा तूं कृपाळू होसी । अनाथासी कुवांसा ॥ ७५ ॥ वरिवरी दाविसी मिणधा कोप । कोपोनि सांडविशी त्याचें पाप । शेखीं सायुज्याचे दीप । दाविशी सद्रूप दयाळुवा ॥ ७६ ॥ तुम्ही अच्युतात्मे निजनिर्धारीं । म्हणौनि देवो तुमचा आज्ञाधारी । तुम्ही म्हणाल त्यातें उद्धरी । येर्हवीं हातीं न धरी आनातें ॥ ७७ ॥ ऐसा तूं दीनदीक्षागुरु । ब्रह्मज्ञाने अतिउदारु । तरी पुसेन तो विचारु । निजनिर्धारु सांगावा ॥ ७८ ॥ ब्रह्मन् तथापि पृच्छामो धर्मान्भागवतांस्तव । यान्श्रुत्वा श्रद्धया मर्त्यो मुच्यते सर्वतो भयात् ॥ ७ ॥ आदरें म्हणे देवऋषी । आजि सकळ पुण्यें आलीं फळासी । मायबाप तूं घरा आलासी । निजसुखासी दायक ॥ ७९ ॥ कृपा केली मागील शिष्यां । तेचि कृपेचा घालीं ठसा । मज तुझा पूर्ण भरंवसा । सोडवीं भवपाशापासूनि ॥ ८० ॥ तुझेनि दर्शनें कृतकृत्यता । जर्ही मज जाली तत्त्वतां । तर्ही भागवतधर्मकथा । कृपेनें तत्त्वतां सांगावी ॥ ८१ ॥ ऐसे सांगावे भागवतधर्म । जेणें निरसे कर्माकर्म । श्रद्धेनें ऐकतां परम । जन्ममरण हारपे ॥८२ ॥ भवभय अति दारुण । त्या भयाचें माया निजकारण । तिचें समूळ होय निर्दाळण । ऐसे धर्म कृपेनें सांगावे ॥ ८३ ॥ मज नाही अधिकार पूर्ण । ऐसें विचाराल लक्षण । तेविषयींची हे निवारण । सावधान अवधारीं ॥ ८४ ॥ अहं किल पुरानन्तं प्रजार्थो भुवि मुक्तिदम् । अपूजयं न मोक्षाय मोहितो देवमायया ॥ ८ ॥ मज अधिकारु नाहीं पूर्ण । हें मीही जाणतो आपण । मागें म्यां केले भगवद्भजन । तें तूं कथन अवधारीं ॥ ८५ ॥ म्यां पूर्वीं आराधिलें देवराया । तें भजन ममता नेलें वायां । प्रलोभविलों देवमाया । पुत्रस्नेहालागूनि ॥ ८६ ॥ मज देव तुष्टला प्रसन्नपणें । मागसी तूं देईन म्हणे । तेथें मायेनें ठकिलें मजकारणें । माझा पुत्र होणें मी मागें ॥ ८७ ॥ तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण । परी मज न सांगे ब्रह्मज्ञान । तोचि वंदी माझे चरण । म्हणे बाळक पूर्ण मी तुझें ॥ ८८ ॥ यापरी श्रीकृष्णापासीं । ज्ञानप्राप्ति नव्हे आम्हांसी । कृष्ण परमात्मा हृषीकेशी । हें निश्चयेंसीं मी जाणें ॥ ८९ ॥ श्रीकृष्ण जन्मला माझिया कुशीं । म्हणौनि श्रद्धा आहे मजपाशीं । तेणेंचि तूं तुष्टलासी देवऋषी । तरी निजकृपेंसीं उद्धरी ॥ ९० ॥ जे मायेनें ठकिलो वाडेंकोडें । ते माया समूळ झडे । ऐसें सांगिजें रोकडें । बहू बोलोनि पुढें काय काज ॥ ९१ ॥ यथा विचित्रव्यसनाद् भवद्भिर्विश्वतोभयात् । मुच्येम ह्यञ्जसैवाद्धा तथा नः शाधि सुव्रत ॥ ९ ॥ मायाजलें भवसागरु । भरला असे अतिदुस्तरु । त्याचा उतरावया पैलपारु । होय तूं तारूं मुनिराया ॥ ९२ ॥ याचें सकळ जळ क्षार । माजीं सावजें अनिवार । एकएकें चराचर । गिळिलें साचार निजशक्तिं ॥ ९३ ॥ लाटांवरी अचाट लाटा । मोहाचिया अतिदुर्घटा । आदळती अविवेकतटा । धैर्याचिया कांठा पाडित ॥ ९४ ॥ अहं कुवावो वाजतां थोरु । अवघाचि खवळे सागरु । मी माझेनि गजरें घोरु । अतिदुर्धरु गर्जत ॥ ८५ ॥ नाना वासनांचा वळसा । पाहे पां भंवताहे कैसा । येथ तरावया धिंवसा । नव्हे सहसा सुरनरां ॥ ९६ ॥ क्रोधाचें प्रबळ भरतें । भरी द्वेषाचिया तरियांतें । असूयातिरस्कारांची तेथें । चिडाणी उते अनिवार ॥ ९७ ॥ कामपर्वताचीं शिखरें । विषमें भासती अपारें । आशेइच्छेचीं वरी थोरें । झाडें विषयांकुरें वाढलीं ॥ ९८ ॥ संकल्पविकल्पांचे मीन । निंदेच्या सुसरी दारुण । ब्रह्मद्वेषाचे नक्र पूर्ण । सागरीं जाण तळपती ॥ ९९ ॥ एवढाही हा भवसागरु । शोषितां तूं अगस्ती साचारु । तुझेनि भवाब्धीपैलपारु । पावों हा निर्धारु जाहला आम्हां ॥ १०० ॥ याचा विश्वतोभय हेलावा । तो आम्हां न बाधी तुमच्या कणवा । अप्रयासें नारददेवा । मरणार्णवा मज तारीं ॥ १०१ ॥ पायी उतरून भवसागरु । साक्षात् पावें परपारु । ऐसा भागवतधर्मविचारु । तो निजनिर्धारु प्रबोधीं ॥ १०२ ॥ ऐकोनि वसुदेवाची उक्ती । नारद सुखावला चितीं । तोचि अभिप्रावो परीक्षिती । शुक स्वमुखें स्थिति सांगत ॥ १०३ ॥ श्रीशुक उवाच । राजन् एवं कृतप्रश्नो वसुदेवेन धीमता । प्रीतस्तमाह देवर्षिः हरेः संस्मारितो गुणैः ॥ १० ॥ सांगतां वसुदेवाचा प्रश्न । श्रीशुक जाहला स्वानंदपूर्ण । नारदु वोळला चैतन्यघन । चित्सुखजीवन मुमुक्षां ॥ १०४ ॥ श्रीशुक म्हणे नरदेवा । भावो मीनला नारदाच्या भावा । ऐकोनि प्रश्नसुहावा । तो म्हणे वसुदेवा धन्य वाणी ॥ १०५ ॥ परिसतां हा तुझा प्रश्न । चित्सुखें प्रगटे नारायण । ऐसें बोलतां नारद जाण । स्वानंदें पूर्ण वोसंडला ॥ १०६ ॥ रोमांच उचलले अंगीं । स्वेद दाटला सर्वांगीं । आनंदाश्रु चालिले वेगीं । स्वानंदरंगीं डुल्लतु ॥ १०७ ॥ सप्रेम मीनलिया श्रोता । जैं पूर्ण सुखावेना वक्ता । तैं तो जाणावा अवघा रिता । कथासारामृता चवी नेणे ॥ १०८ ॥ ऐकतां वसुदेवाचा प्रश्न । नारद सुखावे पूर्ण । मग स्वानंदगिरा गर्जोन । काय आपण बोलत ॥ १०९ ॥ श्रीनारद उवाच । सम्यक् एतत् व्यवसितं भवता सात्वतर्षभ । यत्पृच्छसे भागवतान् धर्मांस्त्वं विश्वभावनान् ॥ ११ ॥ नारद म्हणे सात्वत श्रेष्ठा । वसुदेवा परमार्थ निष्ठा । धन्य धन्य तुझी उत्कंठा । तूं भावार्थी मोठा भागवतधर्मी ॥ ११० ॥ ज्याचेनि धर्माचे प्रश्नोत्तरें । हें विश्व अवघेंचि उद्धरे । हें विचारिलें तुवां बरें । निजनिर्धारें श्रीकृष्णजनका ॥ १११ ॥ तुझेनि प्रश्नोत्तरें जाण । साधक निस्तरती संपूर्ण । साधकांचें नवल कोण । महापापी पावन येणें होती ॥ ११२ ॥ श्रुतोऽनुपठितो ध्यात आदृतो वानुमोदितः । सद्यः पुनाति सद्धर्मो देवविश्वद्रुहोऽपि हि ॥ १२ ॥ भागवतधर्माचेनि गुणें । एक उद्धरती श्रवणें । एक तरती पठणें । एक निस्तरती ध्यानें संसारपाश ॥ ११३ ॥ एक श्रोतयां वक्तयांतें । देखोनि सुखावती निजचित्तें । सद्भावें भलें म्हणती त्यांतें । तेही तरती येथें भागवतधर्में ॥ ११४ ॥ हें नवल नव्हे भागवतधर्मा । जो कां देवद्रोही दुरात्मा । अथवा विश्वद्रोही दुष्टात्मा । तोही तरे हा महिमा भगवतधर्मी ॥ ११५ ॥ हृदयीं धरितां भागवतधर्म । अकर्म्याचें निर्दळी कर्म । अधर्म्याचें निर्दळी धर्म । दे उत्तमोत्तमपदप्राप्ती ॥ ११६ ॥ जेथ रिगाले भागवतधर्म । तेथ निर्दळे कर्माकर्मविकर्म । निंदा द्वेष क्रोध अधर्म । अविद्येचें नाम उरों नेदी ॥ ११७ ॥ ते भागवतधर्मी अत्यादर । श्रद्धेनें केला प्रश्न तुवां थोर । निजभाग्यें तूं अति उदार । परम पवित्र वसुदेवा ॥ ११८ ॥ तुझें वानूं पवित्रपण । तरी पोटा आला श्रीकृष्ण । जयाचेनि नामें आम्ही जाण । परम पावन जगद्वंद्य ॥ ११९ ॥ तो स्वयें श्रीकृष्णनाथ । नित्य वसे तुझियां घरांत । तुझियाऐसा भाग्यवंत । न दिसे येथ मज पाहतां ॥ १२० ॥ वसुदेव तुझिया नामतां । "वासुदेव" म्हणती अनंता । तें वासुदेव नाम स्मरतां । परमपावनता जगद्वंद्यां ॥ १२१ ॥ त्वया परमकल्याणः पुण्यश्रवणकीर्तनः । स्मारितो भगवानद्य देवो नारायणो मम ॥ १३ ॥ ज्याचेनि श्रवणें वाढे पुण्य । ज्यचेनि नामें झडे भवबंधन । तो सद्य स्मरविला तुवां नारायण । तुझी वाचा कल्याण वसुदेवा ॥ १२२ ॥ तुझा आजि ऐकतांचि प्रश्न । पूर्ण प्रगटला नारायण । मज तुझा हा उपकार पूर्ण । तूं परम कल्याण वसुदेवा ॥ १२३ ॥ आशंका : ऐकोनि नारदाचें वचन । झणें विकल्प धरील मन । यासी पुर्वीं होतें विस्मरण । आतां जाहलें स्मरण वसुदेवप्रश्नें ॥ १२४ ॥ ज्यांची ऐसी विकल्पयुक्ती । ते जाणावे निजात्मघाती । तेही अर्थींची उपपत्ती । ऐक निश्चितीं शुक सांगे ॥ १२५ ॥ अग्नि कुंडामाजीं स्वयंभ असे । तो घृतावदानें अति प्रकाशे । तेवीं सप्रेम प्रश्नवशें । सुख उल्लासे मुक्तांचें ॥ १२६ ॥ सप्रेम भावार्थे मीनला श्रोता । मुक्तही उल्हासें सांगे कथा । तेथील सुखाची सुखस्वादुता । जाणे जाणता सवर्म ॥ १२७ ॥ यालागीं मुक्त मुमुक्षु विषयी जन । भागवतधर्में निवती संपूर्ण । तोचि वसुदेवें केला प्रश्न । तेणें नारद पूर्ण सुखावला ॥ १२८ ॥ जे कां पूर्वपरंपरागत । जीर्ण भागवतधर्म येथ । सांगावया नारदमुनि निश्चित । उपपादित इतिहासु ॥ १२९ ॥ अत्राप्युदाहरन्ति इमं इतिहासं पुरातनम् । आर्षभाणां च संवादं विदेहस्य महात्मनः ॥ १४ ॥ येच अर्थीं विदेहाचा प्रश्न । संवादती आर्षभ नवजण । ते भागवतधर्म जीर्ण । इतिहास संपूर्ण सांगेन ऐक ॥ १३० ॥ आर्षभ कोण म्हणसी मुळीं । त्यांची सांगेन वंशावळी । जन्म जयांचा सुकुळीं । नवामाजीं जाहली ब्रह्मनिष्ठा ॥ १३१ ॥ प्रियव्रतो नाम सुतो मनोः स्वायम्भुवस्य यः । तस्याग्नीध्रस्ततो नाभिः ऋषभस्तत्सुतः स्मृतः ॥ १५ ॥ स्वायंभु मनूचा सुतु । जाण नामें ’प्रियव्रतु’ । त्याचा ’आग्नीध्र’ विख्यातु । ’नाभी’ त्याचा सुतु सूर्यवंशीं ॥ १३२ ॥ त्या नाभीपासूनि ज्ञानविलासु । ’ऋषभ’ जन्मला वासुदेवांशु । मोक्षधर्माचा प्रकाशु । जगीं सावकाशु विस्तारिला ॥ १३३ ॥ तमाहुर्वासुदेवांशं मोक्षधर्मविवक्षया । अवतीर्णं सुतशतं तस्यासीद् ब्रह्मपारगम् ॥ १६ ॥ ऋषभ वासुदेवाचा अंशु । ये लोकीं मोक्षधर्मविश्वासु । प्रवर्तावया जगदीशु । हा अंशांशु अवतार ॥ १३४ ॥ त्याचें पंचमस्कंधीं चरित्र । सांगितलें सविस्तर । त्यासी जाहले शत पुत्र । वेदशात्रसंपन्न ॥ १३५ ॥ त्यांहीमाजीं ज्येष्ठ पुत्र । अतिशयें परम पवित्र । ऐक त्याचे चरित्र । अतिविचित्र सांगेन ॥ १३६ ॥ तेषां वै भरतो ज्येष्ठो नारायणपरायणः । विख्यातं वर्षमेतद् यन्नाम्ना भारतमद्भुतम् ॥ १७ ॥ जो ज्येष्ठपुत्र ’भरत’ जाण । तो नारायणपरायण । अध्यापि ’भरतवर्ष’ उच्चारण । त्याचेनि नांवें जाण विख्यात ॥ १३७ ॥ जो मनसा-वाचा-कर्मणा । अखंड भजे नारायणा । असतांही राज्यधर्मीं जाणा । जो आत्मखुणा न चुके ॥ १३८ ॥ जेवीं मार्गीं चालतां । पाउलें वक्रेंही टाकिता । दैववशें अडखुळतां । आश्रयो तत्त्वतां भूमिचाचि ॥ १३९ ॥ तेवींचि तयासी असतां । राज्यधर्म चाळितां । यथोचित कर्म आचरितां । निजीं निजात्मता पालटेना ॥ १४० ॥ या नाव बोलिजे ’अखंडस्थिती’ । जे पालटेना कल्पांती । जेथ असतां सुखी होती । पुनरावृत्ति असेना ॥ १४१ ॥ ऐसें करी सदाचरण । आणि नारायणपरायण । आईक त्याचेंही व्याख्यान । विशद करूनि सांगेन ॥ १४२ ॥ नरांचा समुदाय गहन । त्यासी ’नार’ म्हणती जाण । त्याचें ’अयन’ म्हणजे स्थान । म्हणौनि म्हणती ’नारायण’ आत्मयासी ॥ १४३ ॥ त्याच्या ठायीं परायण । म्हणिजे अनन्यत्वें शरण । निवटूनियां आपुलें अहंपण । तद्रूपें जाण राहिला ॥ १४४ ॥ ऐसा तो ऋषभाचा पुत्र । जयासी नांव ’भरत’ । ज्याच्या नामाची कीर्ति विचित्र । परम पवित्र जगामाजीं ॥ १४५ ॥ तो भरतु राहिला हे भूमिकेसी । म्हणौनि ’भरतवर्ष’ म्हणती यासि । सकळ कर्मारंभीं करितां संकल्पासी । ज्याचिया नामासी स्मरताति ॥ १४६ ॥ ऐसा आत्माराम जर्ही झाला । तर्ही विषयसंग नव्हे भला । यालागीं त्याचा वृत्तांतु पुढिला । सांगेन सकळां आइकें ॥ १४७ ॥ नामें ख्याती केली उदंड । यालागीं त्यातें म्हणती ’भरतखंड’ । आणीकही प्रताप प्रचंड । त्याचा वितंड तो ऐका ॥ १४८ ॥ स भुक्तभोगां त्यक्त्वेमां निर्गतस्तपसा हरिम् । उपासीनस्तत्पदवीं लेभे वै जन्मभिस्त्रिभिः ॥ १८ ॥ तेणें दिग्मंडल जिंतिलें । समुद्रवलयांकित राज्य केलें । नानाविध भोग भोगिले । जे नाहीं देखिले सुरवरीं ॥ १४९ ॥ अनुकूळ स्त्रिया पुत्र । अनुकूळ मंत्री पवित्र । अनुकूळ राज्य सर्वत्र । ते त्यागिले विचित्र नानाभोग ॥ १५० ॥ ऐसे भोग भोगिलियापाठीं । सांडूनि वलयांकित राज्यसृष्टी । स्वयें निघाला जगजेठी । स्वहितदृष्टी हरिभजनीं ॥ १५१ ॥ जे राज्यवैभव भोगिती । त्यांसी कदा नव्हे गा विरक्ती । भरतें केली नवलख्याती । सेविला श्रीपती भोगत्यागें ॥ १५२ ॥ तों नेणेंचि जन्में जाण । होआवा मोक्षासी आरोहण । परी जाहलें जन्मांतरकारण । तेंही विंदाण सांगेन ॥ १५३ ॥ संनिहितप्रसूतकाळीं । मृगी जळ प्राशितां जळीं । ऐकोनि पंचाननाची आरोळी । उडाली तत्काळीं अतिसत्राणें ॥ १५४ ॥ धाकें गर्भु तिचा पडतां जळीं । भरत स्नान करी ते काळीं । देखोनि कृपाळु कळवळी । काढी तत्काळी दयाळुत्वें ॥ १५५ ॥ मृगी न येचि परतोन । मातृहीन हें अतिदीन । भरत पाळी भूतदयेनें । मृगममता पूर्ण वाढली ॥ १५६ ॥ स्नान संध्या अनुष्ठान । करितां मृग आठवे क्षणक्षण । आरंभिल्या जपध्यान । मृगमय मन भरताचें ॥ १५७ ॥ आसनीं भोजनीं शयनीं । मृग आठवे क्षणक्षणीं । मृग न देखतां नयनी । उठे गजबजोनि ध्यानत्यागें ॥ १५८ ॥ ममता बैसली मृगापाशीं । मृग वना गेला स्वइच्छेंसीं । त्याचा खेदु करितां भरतासी । काळ आकर्षी देहातें ।१५९ ॥ यालागी साचचि जाण । ममतेपाशीं असे मरण । जो निर्मम संपूर्ण । त्यासि जन्ममरण स्पर्शेना ॥ १६० ॥ भरत तपिया थोर अंगें । तेथ काळ कैसेनि रिघे । ममतासंधी पाहोनि वेगें । मृत्यु तद्योगें पावला ॥ १६१ ॥ देहासी येतां मरण । भरतासी मृगाचें ध्यान । तेणें मृगजन्म पावे आपण । जन्मांतरकारण जाहलें ऐसें ॥ १६२ ॥ कृपेनें केला जो संगु । तोचि योगियां योगभंगु । यालागीं जो निःसंगु । तो अभंगु साधक ॥ १६३ ॥ मृगाचेनि स्मरणें निमाला । यालागीं तो मृगजन्म पावला । जो कृष्णस्मरणें निमाला । तो कृष्णुचि जाला देहांतीं ॥ १६४ ॥ अंतकाळीं जे मती । तेचि प्राणियांसी जाण गती । यालागी श्रीकृष्ण चित्तीं । अहोरातीं स्मरावा ॥ १६५ ॥ परी मृगदेहीं जाण । भरतासी श्रीकृष्णस्मरण । पूर्वीं केलें जें अनुष्ठान । तें अंतर जाण कदा नेदी ॥ १६६ ॥ मागुता तिसरे जन्में पाहें । तो ’जडभरत’ नाम लाहे । तेथें तो निर्ममत्वें राहे । तेणें होय नित्यमुक्त ॥ १६७ ॥ बहुतां जन्मींची उणीवी । येणें जन्में काढिली बरवी । निजात्मा आकळोनि जीवीं । परब्रह्मपदवी पावला ॥ १६८ ॥ ऋषभपुत्रउत्पत्ती । शतबंधु जाण निश्चितीं । त्यांत ज्येष्ठाची स्थिती । उरल्यांची गती ते ऐका ॥ १६९ ॥ तेषां नव नवद्वीप पतयोऽस्य समन्ततः । कर्मतन्त्रप्रणेतार एकाशीतिर्द्विजातयः ॥ १९ ॥ नव नवखंडांप्रती । ते केले खंडाधिपती । एक्यायशीं जणांची स्थिती । कर्ममार्गी होती प्रवर्तक ॥ १७० ॥ उरले जे नव जण । सकळ भाग्याचें भूषण । ब्रह्मज्ञानाचें अधिष्ठान । ऐक लक्षण तयांचें ॥ १७१ ॥ नवाभवन्महाभागा मुनयो ह्यर्थशंसिनः । श्रमणा वातरसना आत्मविद्याविशारदाः ॥ २० ॥ ऋषभकुळीं कुळदीप । स्नेहसूत्रेंवीण देदीप्य । नवही जण स्वयें सद्रूप । सायुज्यस्वरूप प्रकाशक ॥ १७२ ॥ आत्माभ्यासीं परिश्रम । करून निरसिलें कर्माकर्म । यालागीं ते अकृताश्रम । निजनिभ्रम स्वयें जाहले ॥ १७३ ॥ शाब्दबोधें सदोदित । ब्रह्मज्ञानपारंगत । शिष्यप्रबोधीं समर्थ । परमाद्भुत अतिदक्ष ॥ १७४ ॥ ते ब्रह्मविद्येचें चालतें डिंब । त्यांचे अवेव ते ब्रह्मकोंब । हे विद्येचें पूर्णबिंब । स्वयें स्वयंभ परब्रह्म ॥ १७५ ॥ दशदिशा एकूचि दोरा । भरूनि पांघरुणें मुनीश्वरा । वारा वळून कडदोरा । बांधिला पुरा ग्रंथीरूप ॥ १७६ ॥ आकाशाच्या ठायीं । अंबरत्व केलें तिहीं । ते चिदंबर पाहीं । एकचि नवांही पांघरूण ॥ १७७ ॥ प्राणापान वळूनि दोन्ही । गांठी केली नाभीच्या ठायीं । तंव जीवग्रंथी सुटली पाहीं । तेंचि नवांही ब्रह्मसूत्र ॥ १७८ ॥ ऐसे परब्रह्मवैभवें । निडारले निजानुभवें । त्यांचीं सांगेन मी नांवें । यथागौरवें तें ऐक ॥ १७९ ॥ ज्यांचे नाम ऐकतां । कांपत काळ पळे मागुता । संसार नुघवी माथा । नाम स्मरतां जयांचें ॥ १८० ॥ त्यांचिया नामांची कीर्ती । आईक सांगेन परीक्षिती । ज्यांचेनि नामें आतुडे मुक्ती । जाण निश्चितीं भाविकां ॥ १८१ ॥ कविर्हरिरन्तरीक्षः प्रबुद्धः पिप्पलायनः । आविर्होत्रोऽथ द्रुमिलश्चमसः करभाजनः ॥ २१ ॥ कवि हरि अंतरिक्ष । प्रबुद्ध पिप्पलायन देख । आविर्होत्र द्रुमिल सुटंक । चमस निर्दोष करभाजन ॥ १८२ ॥ एवं नवही नांवें जाण । यांचें करितां नामस्मरण । सकळ पापा निर्दळण । हे महिमा पूर्ण तयांची ॥ १८३ ॥ त्यांची परमहंसस्थिती । सांगेन मी तुजप्रती । ज्यांचेनि पावन होय क्षिती । त्या या नव मूर्ती पुण्य पूज्य ॥ १८४ ॥ एते त भगवद्रूपं विश्वं सदसदात्मकम् । आत्मनोऽव्यतिरेकेण पश्यन्तो व्यचरन्महीम् ॥ २२ ॥ ते वेगळे दिसती नवांक । परी भगवद्रूपें अवघे एक । संतासंत जन अनेक । आपणांसगट देख एकत्वें पाहती ॥ १८५ ॥ त्यांसी तंव असंतता । उरली नाहीं सर्वथा । संत म्हणावया पुरता । भेदु न ये हाता चिन्मयत्वें ॥ १८६ ॥ जग परिपूर्ण भगवंतें । आपण वेगळा नुरे तेथें । तंव भगवद् रूप समस्तें । भूतें महाभूतें स्वयें देखे ॥ १८७ ॥ हेंही देखतें देखणें । तेंही स्वयें आपण होणें । होणें न होणें येणें जाणें । हीं गिळूनि लक्षणें विचरती मही ॥ १८८ ॥ अव्याहतेष्टगतयः सुरसिद्धसाध्य । गन्धर्वयक्षनरकिन्नर नागलोकान् । मुक्ताश्चरन्ति मुनिचारणभूतनाथ । विद्याधरद्विजगवां भुवनानि कामम् ॥ २३ ॥ वैकुंठ कैलास सुरसिद्धस्थानें । सप्तपाताळादि गमनें । एवं श्लोकोक्त चवदा भुवनें । स्वइच्छा विचरणें कामनारहित ॥ १८९ ॥ त्यांसी जीवीं नाहीं विषयासक्ती । यालागीं खुंटेना त्यांची गती । इच्छामात्रें गमनशक्ती । सुखें विचरती निष्काम ॥ १९० ॥ त एकदा निमेः सत्रं उपजग्मुर्यदृच्छया । वितायमानमृषिभिः अजनाभे महात्मनः ॥ २४ ॥ जेथें मनाचा प्रवेशु नाहीं । त्यांची पायवाट ते ठायीं । ऐसे स्वइच्छा विचरतां मही । आले ते पाहीं कर्मभूमीसी ॥ १९१ ॥ मही विचरतां वितंड । पातले ’अजनाभ’ खंड । तंव विदेहाचा याग प्रचंड । मीनले उदंड ऋषीश्वर ॥ १९२ ॥ याग वेदोक्तविधी निका । कुंडमंडप वेदिका । आवो साधोनि नेटका । विधानपीठिका अतिशुद्ध ॥ १९३ ॥ स्रुक्-स्रुवा-त्रिसंधानें । विस्तरूनि परिस्तरणें । अखंड वसुधारा दंडाप्रमाणें । ऋषिमंडणें होम करिती ॥ १९४ ॥ होम होतां संपूर्ण । पूर्णाहुतीसमयीं जाण । येतां देखिले नवही जण । देदीप्यमान निजतेजें ॥ १९५ ॥ तान् दृष्ट्वा सूर्यसङ्काशात् महाभागवतान् नृप । यजमानोऽग्नयो विप्राः सर्व एवोपतस्थिरे ॥ २५ ॥ अमित सूर्याचिया कोटी । हारपती नखतेजांगुष्टीं । तो भगवंत जिंहीं धरिला पोटीं । त्यांची तेजाची गोष्टी अलोलिक ॥ १९६ ॥ त्यांचिया अंगप्रभा । सूर्य लोपताहे उभा । जिंहीं प्रभेसी आणिली शोभा । चैतन्यगाभा साकार ॥ १९७ ॥ ते भगवद्भांववैभव । भगवंताचें निजगौरव । भक्तीचे भाग जे नव । ते हे जाण सर्व मूर्तिमंत ॥ १९८ ॥ नवखंड पृथ्वीचे अलंकार । नवविधीचें निजसार । नवरत्नांचेंही निजभांडार । तें हे साकार नवही जण ॥ १९९ ॥ कीं ते नवही नारायण । स्वयें प्रगटले आपण । नवही नृसिंह जाण । देदीप्यमान पैं आले ॥ २०० ॥ आव्हानिले तिन्ही अग्नी । उभे ठेले त्यांतें देखोनी । ते हे भागवतीं देखिले नयनीं । इतरांलागुनी दिसेना ॥ २०१ ॥ येतां देखोनि तेजोमूर्ती । ऋत्विज आचार्य उभे ठाकती । साउमा धांवे विदेहनृपती । स्वानंदवृत्ती सन्मानी ॥ २०२ ॥ सवेग घाली लोटांगण । मुगुट काढोनि आपण । मस्तकीं वंदूनियां चरण । पूर्णादरें जाण आणिता झाला ॥ २०३ ॥ विदेहस्तानभिप्रेत्य नारायणपरायणान् । प्रीतः सम्पूजयां चक्रे आसनस्थान्यथार्हतः ॥ २६ ॥ त्यांतें जाणोनि भगवत्पर । विदेहा आल्हाद थोर । त्यांचे पूजेसी अत्यादर । स्वयें सादर पैं झाला ॥ २०४ ॥ श्रद्धायुक्त चरणक्षालन । धूप दीप सुमन चंदन । पूजा मधुपर्कविधान । केलें संपूर्ण यथायोग्य ॥ २०५ ॥ तान् रोचमानान् स्वरुचा ब्रह्मपुत्रोपमान्नव । पप्रच्छ परमप्रीतः प्रश्रयावनतो नृपः ॥ २७ ॥ निजांगींच्या निजप्रभा । अंगासी आणिली शोभा । काय ब्रह्मविद्येचा गाभा । शोभे नवप्रभा शोभायमान ॥ २०६ ॥ निजहृदयींचें ब्रह्मज्ञान । परिपाकें प्रकाशलें पूर्ण । तेंचि निजांगा मंडण । इतर भूषण त्यां नाहीं ॥ २०७ ॥ मुगुट कुंडलें कंकण । मूर्खाअंगीं बाणलीं पूर्ण । ते शोभा लोपूनि मूर्खपण । बाहेर संपूर्ण प्रकाशे ॥ २०८ ॥ तैसे नव्हती हे ज्ञानघन । ब्रह्मपूर्णत्वें विराजमान । तेंचि त्यांसी निजांगा मंडण । इतर भूषण त्यां नाहीं ॥ २०९ ॥ ब्रह्मानुभवें पूर्णत्व पूर्ण । इंद्रियद्वारा विराजमान । तें त्यांसी निजशांतिभूषण । मुगुट कंकण तें तुच्छ ॥ २१० ॥ मागां वाखाणिले सनकादिक । त्यांसमान कीं अधिक । ऐसा विचारितां परिपाक । त्यां यां वेगळिक दिसेना ॥ २११ ॥ त्यांची यांची एक गती । त्यांची यांची एक स्थिती । त्यांची यांची एक शांती । भेदु निश्चितीं असेना ॥ २१२ ॥ त्यांच्याऐसे हे सखे बंधु । त्यांच्याऐसा समान बोधु । त्यांच्याऐसा हा अनुवादु । सर्वथा भेदु असेना ॥ २१३ ॥ ते चौघे हे नवजण । अवघ्यां एकचि ब्रह्मज्ञान । त्यांची यांची शांती समान । हें विदेहासी पूर्ण कळूं सरले ॥ २१४ ॥ ऐसें परिपूर्णत्व जाणोनी । राजा सुखावे स्थिति देखोनी । मग अतिविनीत होऊनी । मृदु मंजुळ वचनीं विनवीत ॥ २१५ ॥ श्रीविदेह उवाच । मन्ये भगवतः साक्षात् पार्षदान् वो मधुद्विषः । विष्णोर्भूतानि लोकानां पावनाय चरन्ति हि ॥ २८ ॥ सार्वभौम चक्रवर्ती । देहीं असोनि विदेहस्थिती । तो जनकु आर्षभांप्रती । अतिप्रीतीं विनवितु ॥ २१६ ॥ त्यांच्या भेटीसवें उलथलें सुख । विदेहासी देहेंवीण हरिख । तेणें हरिखेंकरूनियां देख । प्रीतीपूर्वक विनवितु ॥ २१७ ॥ तुमचें सामर्थ्य पाहतां येथ । तुम्हीं ईश्वररूप समस्त । देहभावें तरी भगवद्भक्त । जैसे पार्षद हरीचे ॥ २१८ ॥ देवो आपुला आपण भक्तु । ऐसा जो कां उपनिषदर्थु । तो साच करूनि वेदार्थु । निजपरमार्थु अनुभवा ॥ २१९ ॥ ’शिव होऊनि शिवु यजिजे’ । हें लक्षण तुम्हांसीच साजे । येरीं हे बोलचि बोलिजे । परी बोलते वोजें अर्थ न लभे ॥ २२० ॥ विष्णुनें सृष्टीं जें जें स्रजणें । तें तें तुम्हीं पवित्र करणे । मही विचरायाचीं कारणें । कृपाळूपणे दीनोद्धारा ॥ २२१ ॥ तुम्ही विचरा विश्वकणवा । परी भेटी होय प्राप्ति तेव्हां । आजि लाधलों तुमची सेवा । उद्भट दैवाथिलों मी ॥ २२२ ॥ आजि माझें धन्य दैव । आजि माझे धन्य वैभव । आजि धन्य मी सर्वीं सर्व । हें चरण अपूर्व पावलों ॥ २२३ ॥ दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभङ्गुरः । तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुण्ठप्रियदर्शनम् ॥ २९ ॥ सकल देहांमाजीं पहा हो । अतिदुर्लभ मनुष्यदेहो । त्याचिया प्राप्तीचा संभवो । तो अभिप्रावो अतिदुर्गम ॥ २२४ ॥ सुकृतदुष्कृत समान समीं । तैं पाविजे कर्मभूमी । तेंचि जैं पडे विषमीं । तैं स्वर्गगामी कां नरकीं ॥ २२५ ॥ समानकर्मीं नरदेह जोडे । तरी समस्तां समबुद्धि न घडे । त्यां समांमाजीं विषम गाढें । जेणें पडे तें ऐका ॥ २२६ । पापाचा एकु महाचिरा । पुण्यें जोखणीं चाराचुरा । समान आलिया तुळाभारा । येणें जन्में नरा दृढ पापबुद्धी ॥ २२७ ॥ वाळू आणि सुवर्ण । जोखितां झाल्याही समान । सोनियालागीं वेंचिती धन । वाळू ते जाण न घेती फुकट ॥ २२८ ॥ एकाचें पुण्य अत्यंत थोर । पाप लहानसहान एकत्र । करूनि जोखितां तुळाभार । समान साचार जैं होय ॥ २२९ ॥ ऐसेनि कर्में जे जन्मती । त्यांसी पुण्यावरी अतिप्रीती । पुण्य पाप दोनी झडती । तैं नित्यमुक्ति पाविजे ॥ २३० ॥ ऐशा अतिसूक्ष्म संकटीं । मनुष्यदेहीं होय भेटी । तेथेंही अभिमान अति उठी । धन दारा दिठी विषयांच्या ॥ २३१ ॥ मनुष्यदेहींचेनि आयुष्यें । विषयीं सायास करिती कैसे । अमृत देऊनि घे जैसें । तान्हें सावकाशें मृगजळ ॥ २३२ ॥ गंधर्वनगरींचीं ठाणीं । घेतलीं देऊनि चिंतामणी । तैशी लटिकियालागीं आटणी । विषयसाधनीं नरदेहा ॥ २३३ ॥ तोडूनि कल्पतरूंचे उद्यान । सायासीं तें वाहोनि रान । तेथें साक्षेपें पेरिली जाण । आणूनि आपण विजया जैशीं ॥ २३४ ॥ तैसें नरदेहा येऊनि नरां । करिती आयुष्याचा मातेरा । पूर्ण व्यवसायो शिश्नोदरां । उपहास निद्रा कां निंदा ॥ २३५ ॥ नित्य प्रपंचाची कटकट । सदा विषयांची खटपट । कदा आरायिल्या चोखट । स्वेच्छा सारीपाट खेळणें ॥ २३६ ॥ नाना विनोद टवाळी । नित्य विषयांची वाचाळी । त्यासी जपतां रामनामावळी । पडे दांतखिळी असंभाव्य ॥ २३७ ॥ घरा आली कामधेनु । दवडिती न पोसवे म्हणूनु । तेवीं श्रीरामनाम नुच्चारूनु । नाडला जनु नरदेहीं ॥ २३८ ॥ करितां नरदेहीं अहंकार । तंव तो देहचि क्षणभंगुर । देहीं देहवंता भाग्य थोर । जैं भगवत्पर भेटती ॥ २३९ ॥ ज्यांसी भगवद्भक्तीची अति गोडी । त्यांवरी भगवंताची आवडी । त्यांची भेटी तैं होय रोकडी । जैं पुण्याच्या कोडी तिष्ठती ॥ २४० ॥ ज्यांचिया आवडीच्या लोभा । भगवंतु पालटें आला गर्भा । दशावतारांची शोभा जाहली । पद्मनाभा ज्यांचेनि ॥ २४१ ॥ ऐसे कृष्णकृपासमारंभे । जे भगवंताचे वालभे । त्यांची भेटी तैंचि लाभे । जैं भाग्यें सुलभें पैं होती ॥ २४२ ॥ निष्कामता निजदृष्टी । अनन्त पुण्यकोट्यनुकोटी । रोकड्या लाभती पाठोवाठीं । तैं होय भेटी हरिप्रियांची ॥ २४३ ॥ व्याघ्रसिंहांचे दूध जोडे । चंद्रामृतही हाता चढे । परी हरिप्रियांची भेटी नातुडे । दुर्लभ भाग्य गाढें मनुष्यां ॥ २४४ ॥ व्याघ्रसिंहदुधासाठी । अतिसबळता जोडे पुष्टी । परी जन्ममरणांची तुटी । दुधासाठीं कदा नव्हे ॥ २४५ ॥ म्हणती चंद्रामृत जो आरोगी । तो होय नित्य निरोगी । मुख्य चंद्रचि क्षयरोगी । त्याचें अमृत निरोगी करी केवीं ॥ २४६ ॥ व्याघ्रसिंहदुग्धाचे शक्तीं । प्राणी जैं अजरामर होती । तैं तेणें दुग्धें जयांची उत्पत्ती । ते कां मरती व्याघ्रसिंह ॥ २४७ ॥ जैं हरिभक्तांची भेटी घडे । तैं न बाधी संसारसांकडें । जन्ममरण समूळीं उडे । त्यांची भेटी आतुडे अतिभाग्यें ॥ २४८ ॥ आजि मी भाग्यें सभाग्य पूर्ण । लाधलों तुमचें दर्शन । तरी "आत्यंतिक क्षेम" कोण । तें कृपा करून मज सांगा ॥ २४९ ॥ अत आत्यन्तिकं क्षेमं पृच्छामो भवतोऽनघाः । संसारेऽस्मिन्क्षणार्धोऽपि सत्सङ्गः शेवधिर्नृणाम् ॥ ३० ॥ म्हणों तुम्ही निष्पाप निर्मळ । तंव तुमचेनि दर्शनें तत्काळ । नासती सकळ कलिमळ । ऐसे निजनिर्मळ तुम्ही सर्व ॥ २५० ॥ स्नान केलिया गंगा । पवित्र करी सकळ जगा । ते गंगाही निजपापभंगा । तुमचे चरणसंगा वांछीत ॥ २५१ ॥ तुमची दर्शनसंग-चिद्गंगा । अत्यंत दाटुगी माजीं जगा । दर्शनमात्रें ने भव भंगा । जन्ममरण पैं गा मग कैंचे ॥ २५२ ॥ तेथें कायसा गंगेचा पडिपाडु । नाहीं तीर्थमहिमेसी पवाडु । तीर्थां भवदोष अवघडु । त्यांचा करी निवाडु दृष्टिसंगें ॥ २५३ ॥ ऐशी पवित्रता प्रबळ । दृष्टिउत्संगी वाढवा सकळ । आजि झालों मी अतिनिर्मळ । तुम्हीं दीनदयाळ मीनलेति ॥ २५४ ॥ ऐसे पवित्र आणि कृपामूर्ति । भाग्यें लाधलो हे संगती । सत्संगाची निजख्याती । सांगता श्रुति मौनावल्या ॥ २५५ ॥ ब्रह्म निर्धर्म नेणे निजधर्मा । साधुमुखें ब्रह्मत्व ये ब्रह्मा । त्या सत्संगाचा महिमा । अतिगरिमा निरुपम ॥ २५६ ॥ सत्संग म्हणों निधीसमान । निधि जोडल्या हारपे जाण । सत्संगाचें महिमान । साधकां संपूर्ण सद्रूप करी ॥ २५७ ॥ निधि सांपडलिया साङ्ग । अत्यंत वाढे विषयभोग । तैसा नव्हे जी सत्संग । निर्विषयें चांग सुखदाता ॥ २५८ ॥ इंद्रियांवीण स्वानंदु । विषयांवीण परमानंदु । ऐसा करिती निजबोधु । अगाध साधुनिजमहिमा ॥ २५९ ॥ निमिषार्ध होता सत्संग । तेणें संगें होय भवभंग । यालागीं सत्संगाचें भाग्य । साधक सभाग्य जाणती ॥ २६० ॥ संतचरणीं ज्यांचा भावो । भावें तुष्टती संत स्वयमेवो । संतसन्निधिमात्रें पहावो । संसार वावो स्वयें होय ॥ २६१ ॥ नाना विकार विषयविधी । संसारु सबळत्वें बाधी । त्या संसाराची अवधी । जाण त्रिशुद्धी सत्संग ॥ २६२ ॥ दीपाचिये संगप्राप्ती । निःशेष कापुरत्वाची शांती । तेवीं झालिया सत्संगती । संसारनिवृत्ति क्षणार्धें ॥ २६३ ॥ ते तुमची सत्संगती । भाग्यें पावलों अवचितीं । "आत्यंतिक क्षेम" कैशा रितीं । प्राणी पावती तें सांगा ॥ २६४ ॥ आत्यंतिक क्षेमाचें वर्णन । जरी म्हणाल भागवतधर्म । त्या धर्माचा अनुक्रम । साङ्ग सुगम सांगा जी ॥ २६५ ॥ धर्मान्भागवतान्ब्रूत यदि नः श्रुतये क्षमम् । यैः प्रसन्नः प्रपन्नाय दास्यत्यात्मानमप्यजः ॥ ३१ ॥ परिसावया भागवतधर्मीं । श्रवणाधिकारी असों जरी आम्ही । तरी कृपा करूनि तुम्हीं । सांगावे स्वामी सकळ धर्म ॥ २६६ ॥ नवल या धर्मांची ख्याती । सप्रेम आदरितां प्रिती । तेणें तुष्टोनियां श्रीपती । दे सेवकां हातीं आपणिया ॥ २६७ ॥ "अजन्मा" या नामाची ख्याती । वेदशास्त्रीं मिरवी श्रीपती । तो भागवतधर्माचिया प्रीती । सोशी जन्मपंक्ती भक्तांचिया ॥ २६८ ॥ एवं भागवतधर्मी जाण । जो कोणी अनन्य शरण । त्यासी तुष्टोनियां नारायण । निजात्मता पूर्ण स्वयें देतु ॥ २६९ ॥ जी भागवतधर्मश्रवणार्थ । मज अधिकारु जरी नसेल येथ । तरी मी अनन्य शरणागत । आणि तुम्ही समस्त कृपाळू ॥ २७० ॥ भूतदयेचें निडारलेपण । तुमच्या ठायीं वोसंडे पूर्ण । तुम्ही दयानिधि संपूर्ण । दीनोद्धरण तुमचेनी ॥ २७१ ॥ जेथ तुमची कृपा पूर्ण । तेथ न राहे जन्ममरण । सर्वाधिकार संपूर्ण । सहज आपण वोळंगे ॥ २७२ ॥ तंव तुमचे कृपेपरतें । आन सामर्थ्य नाहीं येथें । ऐसें जाणोनियां निश्चितें । शरण तुम्हांतें मी आलों ॥ २७३ ॥ कायसी ज्ञातेपणाची लाज । येथें तुमचे कृपें माझें काज । ऐसें विदेहें प्रार्थूनि द्विज । चरणरज वंदिलें ॥ २७४ ॥ ऐकोनि विदेहाचा नम्र प्रश्न । संतोषले नवही जण । तेंचि श्रीमुखें नारद आपण । करी निरूपण वसुदेवा ॥ २७५ ॥ श्रीनारद उवाच । एवं ते निमिना पृष्टा वसुदेव महत्तमाः । प्रतिपूज्याब्रुवन्प्रीत्या ससदस्यर्त्विजं नृपम् ॥ ३२ ॥ जो जगाचि स्थिती गति जाणता । जो हरिहरांचा पढियंता । जो निजात्मज्ञानें पुरता । तो झाला बोलता नारदु ॥ २७६ ॥ नारद म्हणे वसुदेवा । विदेहें प्रश्न केला बरवा । तेणें परमानंदु तेव्हां । त्या महानुभावां उलथला ॥ २७७ ॥ संतोषोनि नवही मूर्ती । धन्य धन्य विदेहा म्हणती । ऋत्विजही सादर परमार्थीं । सदस्य श्रवणार्थीं अतितत्पर ॥ २७८ ॥ ऐसें देऊनि अनुमोदन । बोलते जाहले नवही जण । तेचि कथेचें निजलक्षण । नव प्रश्न विदेहाचे ॥ २७९ ॥ भागवतधर्म भगवद्भक्त । माया कैसी असे नांदत । तिचा तरणोपाव येथ । केवीं पावत अज्ञानी ॥ २८० ॥ येथ कैचें असे परब्रह्म । कासया नांव म्हणिजे कर्म । अवतारचरित्रसंख्या परम । अभक्तां अधमगति कैशी ॥ २८१ ॥ कोणे युगीं कैसा धर्म । सांगावा जी उत्तमोत्तम । ऐसे नव प्रश्न परम । जनक सवर्म पुसेल ॥ २८२ ॥ ऐसे विदेहाचे प्रश्न । अनुक्रमें नवही जण । उत्तर देती आपण । तयांत प्रथम प्रश्न कवि सांगे ॥ २८३ ॥ श्रीकविरुवाच । मन्येऽकुतश्चिद् भयमच्युतस्य पादाम्बुजोपासनमत्र नित्यम् । उद्विग्नबुद्धेरसदात्मभावात् विश्वात्मना यत्र निवर्तते भीः ॥ ३३ ॥ रायें पुशिलें "आत्यन्तिक क्षेम" । तदर्थीं कवि ज्ञाता परम । तो आत्यंतिक क्षेमाचें वर्म । भागवतधर्म प्रतिपादी ॥ २८४ ॥ ऐक राया नवलपरी । आपुला संकल्प आपणा वैरी । देहबुद्धी वाढवूनि शरीरीं अतिदृढ करी भवभया ॥ २८५ ॥ जयापाशीं देहबुद्धी । त्यासी सुख नाहीं त्रिशुद्धी । ते बुडाले द्वंद्वसंधीं । आधिव्याधिमहार्णवीं ॥ २८६ ॥ जे देहबुद्धीपाशीं । सकळ दुःखांचिया राशी । महाभयाचीं भूतें चौपाशीं । अहर्निशीं झोंबती ॥ २८७ ॥ देहबुद्धीचिया नरा । थोर चिंतेचा अडदरा । संकल्पविकल्पांचा मारा । ममताद्वारा अनिवार ॥ २८८ ॥ देहबुद्धीमाजीं सुख । अणुमात्र नाहीं देख । सुख मानिती ते महामूर्ख । दुःखजनक देहबुद्धी ॥ २८९ ॥ दीपाचे मिळणीपाशीं । केवळ दुःख पतंगासी । तरी आलिंगूं धांवे त्यासी । तेवीं विषयांसी देहबुद्धी ॥ २९० ॥ ऐशी असंत देहबुद्धी कुडी । वाढवी विषयांची गोडी । तेथें महाभयाची जोडी । जन्ममरणकोडी अनिवार ॥ २९१ ॥ एवढा अनिवार संताप । देहबुद्धीपाशीं महापाप । जाणोनि धरी जो अनुताप । विषयीं अल्प गुंतेना ॥ २९२ ॥ धरितां विषयांची गोडी । भोगाव्या जन्ममरणकोडी । येणें भयें विषय वोसंडी । इंद्रियांतें कोंडी अतिनेमें ॥ २९३ ॥ इंद्रियें कोंडितां न कोंडती । विषय सांडितां न सांडती । पुढतपुढती बाधूं येती । यालागी हरिभक्ती द्योतिली वेदें ॥ २९४ ॥ इंद्रियें कोंडावीं न लगती । सहजें राहे विषयासक्ती । एवढें सामर्थ्य हरिभक्तीं । जाण निश्चितीं नृपवर्या । २९५ ॥ योगी इंद्रियें कोंडती । तीं भक्त लाविती भगवद्भक्तीं । योगी विषय जे त्यागितीं । ते भक्त अर्पिती भगवंतीं ॥ २९६ ॥ योगी विषय त्यागिती । त्यागितां देह दुःखी होती । भक्त भगवंतीं अर्पिती । तेणें होती नित्यमुक्त ॥ २९७ ॥ हें नव्हे म्हणती विकल्पक । याचिलागीं येथें देख । "कायेन वाचा" हा श्लोक । अर्पणद्योतक बोलिजेला ॥ २९८ ॥ दारा सुत गृह प्राण । करावे भगवंतासी अर्पण । हे भागवतधर्म पूर्ण । मुख्यत्वें "भजन" यां नांव ॥ २९९ ॥ अकराही इंद्रियवृत्ती । कैशा लावाव्या भगवद्भक्ती । ऐक राया तुजप्रती । संक्षेपस्थिती सांगेन ॥ ३०० ॥ ’मनें’ करावें हरीचें ध्यान । ’श्रवणें’ करावें कीर्तिश्रवण । ’जिव्हेनें’ करावे नामस्मरण । हरिकिर्तन अहर्निशी ॥ ३०१ ॥ ’करीं’ करावे हरिपूजन । ’चरणीं’ देवालयगमन । ’घ्राणी’ तुलसी आमोदग्रहण । जिंहीं हरिचरण पूजिले ॥ ३०२ ॥ नित्य निर्माल्य मिरवे शिरीं । चरणतीर्थें अभ्यंतरीं हरिप्रसाद ज्याचे उदरीं । त्या देखोनि दूरी भवभय पळें ॥ ३०३ ॥ वाढतेनि सद्भावें जाण । चढतेनि प्रेमें पूर्ण । अखंड ज्यासी श्रीकृष्णभजन । त्यासी भवबंधन असेना ॥ ३०४ ॥ सकल भयांमाजीं थोर । भवभय अतिदुर्धर । तेंही हरिभक्तीसमोर । बापुडें किंकर केवीं राहे ॥ ३०५ ॥ करितां रामकृष्णस्मरण । उठोनि पळे जन्ममरण । तेथें भवभयाचें तोंड कोण । धैर्यपण धरावया ॥ ३०६ ॥ जेथें हरिचरणभजनप्रीती । तेथें भवभयाची निवृत्ती । परम निर्भय भगवद्भक्ती । आमुच्या मतीं निजनिश्चयो ॥ ३०७ ॥ कृतनिश्चयो आमुचा जाण । येथें साक्षी वेद-शास्त्र-पुराण । सर्वात्मना भगवद्भजन । निर्भयस्थान सर्वांसी ॥ ३०८ ॥ असो वेद शास्त्र पुराण । स्वमुखें बोलिला श्रीकृष्ण । मी सर्वथा भाक्तिआधीन । भक्तिप्रधान भगवद्वा्क्य ॥ ३०९ ॥ उभवूनियां चारी बाह्या । निजात्मप्राप्तीच्या उपाया । "भक्त्याहमेकया ग्राह्यः" । बोलिला लवलाह्यां श्रीकृष्ण ॥ ३१० ॥ ये वै भगवता प्रोक्ता उपाया ह्यात्मलब्धये । अञ्जः पुंसामविदुषां विद्धि भागवतान् हि तान् ॥ ३४ ॥ न करितां वेदशात्रव्युत्पत्ति । ऐशिया अज्ञानां निजात्मप्राप्ती । सुगम जोडे ब्रह्मस्थिती । यालागीं हरिभक्ती प्रकाशिली देवें ॥ ३११ ॥ न करितां वेदशात्रपठण । जड मूढ म्हणाल तरले कोण । उन्मत्तगजेंद्रउद्धरण । गर्भसंरक्षण परिक्षितीचें ॥ ३१२ ॥ अंबरीषगर्भनिवारण । करावया भक्तीच कारण । "अहं भक्तपराधीनः" । स्वमुखें नारायण बोलिला ॥ ३१३ ॥ वनचर वानर नेणों किती । उद्धरले भगवद्भक्तीं । अस्वलें तारावया निश्चितीं । विवरीं जांबवती भक्तीस्तव वरिली ॥ ३१४ ॥ जाण पां अविवेकी केवळ । गौळी गोधनें गोपाळ । तेही उद्धरिले सकळ । श्रीकृष्णसखे प्रबळ अनन्यप्रीतीं ॥ ३१५ ॥ शास्त्रविरुद्ध अविवेकस्थिती । जारभावें श्रीकृष्णप्रीती । गोपी उद्धरिल्या नेणों किती । अनन्यभक्तिसख्यत्वें ॥ ३१६ ॥ न करितां नाना व्युत्पत्ती । सुगमोपायें ब्रह्मप्राप्ती । अबळें तारावया निश्चितीं । भगवंतें निजभक्ति प्रगट केली ॥ ३१७ ॥ तें हें राया भगवत जाण । मुख्यत्वें भक्तिप्रधान । भावें करितां भगवद्भजन । अज्ञान जन उद्धरती ॥ ३१८ ॥ हें भागवत नव्हे नव्हे । अज्ञानालागीं निजपव्हे । भवाब्धि तरावया भजनभावें । महानाव देवें निर्माण केली ॥ ३१९ ॥ भागवताचे महानावे । जे रिघाले भजनभावें । त्यांसी भवभयाचे हेलावे । भजनस्वभावें न लागती ॥ ३२० ॥ स्त्रीशूद्रादि आघवे । घालूनियां ये नावे । एकेच खेपे स्वयें न्यावे । भजनभावें परतीरा ॥ ३२१ ॥ जे आवलितां भावबळें । तोडी कर्माकर्मक्रूरजळें । स्वबोधाचेनि पाणिढाळें । काढिती एक वेळे निजात्मतीरा ॥ ३२२ ॥ वैराग्याचे निजनावाडे । अढळ बसले चहूंकडे । विषयांचे आदळ रोकडे । चुकवूनि धडपुडे काढिती कांठा ॥ ३२३ ॥ संचितक्रियमाणांच्या लाटा । मोडोनि लाविती नीट वाटा । वेंचूनि प्रारब्धाचा सांठा । निजात्मतटा काढिती ॥ ३२४ ॥ तेथ गुरुवचन साचोकारें । सांभाळित उणेंपुरें । भूतदयेचेनि दोरें । निजनिर्धारें वोढिती ॥ ३२५ ॥ तंव एकाएक एकसरीं । काढिली परात्परतीरीं । तंव प्रत्यावृत्ती येरझारी । आत्मसाक्षात्कारीं खुंटली ॥ ३२६ ॥ येथ धरिला पुरे भावो । तैं बुडणेंचि होय वावो । मग टाकावो जो ठावो । तो स्वयमेवो आपण होय ॥ ३२७ ॥ येथ पव्हणयावीण तरणें । प्रयासेंवीण प्राप्ति घेणें । सुखोपायें ब्रह्म पावणें । यालागीं नारायणें प्रकाशिली भक्ती ॥ ३२८ ॥ भागवतधर्माचिये स्थिती । बाळीं भोळीं भवाब्धि तरती । सुखोपायें ब्रह्मप्राप्ती । तेचि श्लोकार्थीं विशद सांगे ॥ ३२९ ॥ यानास्थाय नरो राजन् न प्रमाद्येत कर्हिचित् । धावन्निमील्य वा नेत्रे न स्खलेन्न पतेदिह ॥ ३५ ॥ जो श्रुतिस्मृती नेणता । भावें भजे भगवत्पथा । त्यासी विधिनिषेधबाधकता । स्वप्नींही सर्वथा प्रमादु न घडे ॥ ३३० ॥ सद्भावेंसीं सप्रेम । आचरितां भागवतधर्म । बाधूं न शके कर्माकर्म । भावें पुरुषोत्तम संतुष्ट सदा ॥ ३३१ ॥ श्रुतिस्मृति हे दोन्ही डोळे । येणेंवीण जे आंधळे । तेही हरिभजनी धांवतां भावबळें । पडे ना आडखुळें सप्रेमयोगें ॥ ३३२ ॥ प्रेमेंवीण श्रुतिस्मृतिज्ञान । प्रेमेंवीण ध्यानपूजन । प्रेमेंवीण श्रवण कीर्तन । वृथा जाण नृपनाथा ॥ ३३३ ॥ माता देखोनि प्रेमभावें । बालक डोळे झांकूनि धांवे । तें धांवेसवें झेंपावे । अति सद्भावे निजमाता ॥ ३३४ ॥ जैसा सप्रेम जो भजे भक्तु । त्या भजनासवें भगवंतु । भुलला चाले स्वानंदयुक्तु । स्वयें सांभाळितु पदोपदीं ॥ ३३५ ॥ ऐसे आचरितां भागवतधर्म । बाधूं न शके कर्माकर्म । कर्मासी ज्याची आज्ञा नेम । तो पुरुषोत्तम भजनामाजीं ॥ ३३६ ॥ ऐसा भागवतधर्में गोविंदु । तुष्टला चाले स्वानंदकंदु । तेथें केवीं रिघे विधिनिषेधु । भक्तां प्रमादु न कदा बाधी ॥ ३३७ ॥ जेवीं कां स्वामीचिया बाळा । अवरोधु न करवे द्वारपाळा । तेवीं भागवतधर्मभजनशीळा । कर्मार्गळा बाधूं न शके ॥ ३३८ ॥ ज्यासी भगवद्भजनीं विश्वासु । विधिनिषेधु त्याचा दासु । देखोनि निजभजनविलासु । स्वयें जगन्निवासु सुखावे ॥ ३३९ ॥ भागवतधर्में राहे कर्म । तंव तंव सुखावे पुरुषोत्तम । सप्रेमभक्ता बाधी कर्म । हा वृथा भ्रम भ्रांतांसी ॥ ३४० ॥ कर्म करूं पावे प्रमादु । तंव प्रमादीं प्रगटे गोविंदु । यलागीं विधिनिषेधु । न शकती बाधूं हरिभक्तां ॥ ३४१ ॥ अजामिळा कर्मबाध । यमपाशीं बांधितां सुबद्ध । तेथें प्रगटोनि गोविंद । केला अतिशुद्ध नाममात्रें ॥ ३४२ ॥ स्वधर्म कर्म हेच दोनी । निजसत्ता भोयी करूनी । जो पहुडे भजनसुखासनीं । तो पडे तैं दंडणी स्वधर्म-कर्मां ॥ २४३ ॥ भजनप्रतापसत्तलक्षणें । स्वधर्मकर्मां ऐसें दंडणें । वर्णाश्रमांचा ठावो पुसणें । होळी करणें कर्माची ॥ ३४४ ॥ एवं भागवतधर्में जे सेवक । स्वधर्मकर्म त्यांचें रंक । तें राहों न शके त्यांसन्मुख । मा केवीं बाधक हों शकेल ॥ ३४५ ॥ कैसे कैसे भागवतधर्म । केवीं भगवंती अर्पे कर्म । अतिगुह्य उत्तमोत्तम । निजभजनवर्म ऐक राया ॥ ३४६ ॥ कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वानुसृतस्वभावात् । करोति यद्यत्सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्तत् ॥ ३६ ॥ हेतुक अथवा अहेतुक । वैदिक लौकिक स्वाभाविक । भगवंतीं अर्पे सकळिक । या नांव देख "भागवतधर्म" ॥ ३४७ ॥ उदकीं तरंग अतिचपळ । जिकडे जाय तिकडे जळ । तैसें भक्ताचें कर्म सकळ । अर्पे तत्काळ भगवंतीं ॥ ३४८ ॥ ये श्लोकींचें व्याख्यान । पहिलें मानसिक अर्पण । पाठीं इंद्रियें बुद्धि अभिमान । कायिक जाण श्लोकान्वयें ॥ ३४९ ॥ भागवतधर्माची निजस्थिती । मन बुद्धि चित्त अहंकृती । आदिकरूनि इंद्रियवृत्ती । भगवंतीं अर्पिती तें ऐक ॥ ३५० ॥ बाधूं न शके स्वधर्मकर्म । ऐक राया त्याचें वर्म । मनीं प्रगटला पुरुषोत्तम । अतिनिःसीम निजबोधें ॥ ३५१ ॥ म्हणोनि संकल्पविकल्प । अवघे झाले भगवद्रूप । यालागीं भक्त नित्य निष्पाप । सत्यसंकल्प हरिदास ॥ ३५२ ॥ जेवीं बुद्धिबळांचा खेळ । राजा प्रधान गजदळ । अवघे काष्ठचि केवळ । तेवीं संकल्प सकळ भगवद्रूप ॥ ३५३ ॥ जो जो संपल्प कामी कामु । तो तो होय आत्मारामु । तेथ भजनाचा संभ्रमु । अतिनिःसीमु स्वयें वाढें ॥ ३५४ ॥ जागृति सुषुप्ती स्वप्न । तिहीं अवस्थां होय भजन । तेथ अखंड अनुसंधान । निजबोधें पूर्ण ठसावलें अंगीं ॥ ३५५ ॥ मना होतां समाधान । समाधानें अधिक भजन । पूर्ण बाणलें अनुसंधान । ध्येय-ध्याता-ध्यान समरसें भजे ॥ ३५६ ॥ तूर्या साक्षी उन्मनी । याही लाविल्या भगवद्भजनीं । जंववरी अवस्थापणीं । आपआपणीं मुकल्या नाहीं ॥ ३५७ ॥ ऐसा भावनेवीण उपजे भावो । तो तो तत्काळ होय देवो । मग अर्पणाचा नवलावो । न अर्पितां पहा हो स्वयें होय ॥ ३५८ ॥ स्वरूपें मिथ्या केलें स्वप्न । जागृती सोलूनि काढिलें ज्ञान । निवडोनि सुषुप्तिसुखसमाधान । तिहींतें पूर्ण एकत्र केलें ॥ ३५९ ॥ तये स्वरूपीं सगळें मन । स्वयेंचि करी निजात्मार्पण । तेथींचें सुखसमाधान । भक्त सज्ञान जाणती स्वयें ॥ ३६० ॥ यापरी मानसिक जाण । सहज स्वरूपीं होय अर्पण । आतां इंद्रियांचें समर्पण । होय तें लक्षण ऐक राया ॥ ३६१ ॥ दीपु लाविजे गृहाभीतरीं । तोचि प्रकाशे गवाक्षद्वारीं । तेवीं मनीं प्रगटला श्रीहरी । तोचि इंद्रियांतरीं भजनानंदु ॥ ३६२ ॥ तेचि इंद्रियव्यापार । सांगिजती सविस्तर । स्वाभाविक इंद्रियव्यवहार । भजनतत्पर परब्रह्मीं ॥ ३६३ ॥ जंव दृष्टि देखे दृश्यातें । तंव देवोचि दिसे तेथें । यापरी दृश्यदर्शनातें । अर्पी भजनसत्ते दृष्टीचा विषयो ॥ ३६४ ॥ दृश्य द्रष्टा आणि दृष्टी । देखतां तिन्ही एकवटी । सहजें ब्रह्मार्पण ते दृष्टी । भक्त जगजेठी यापरी अर्पी ॥ ३६५ ॥ दृश्य प्रकाशी दृश्यपणें । तेंचि दृष्टीमाजीं होय देखणें । ऐसेनि अभिन्नपणें । दर्शनार्पणें भजती भक्त ॥ ३६६ ॥ हे एकपणीं तीनही भाग । तिन्हीमाजीं एक अंग । ऐसें जें देखणें चांग । त्याचि अर्पणें साङ्ग सहजें अर्पी ॥ ३६७ ॥ नाना पदार्थ प्रांजळे । नीच नवे देखती डोळे । परी अर्पणाचे सोहळे । निजात्ममेळें अर्पिती स्वयें ॥ ३६८ ॥ यापरी दृष्टीचें दर्शन । भक्त करिती ब्रह्मार्पण । आतां श्रवणाचें अर्पण । अर्पी तें लक्षण ऐक राया ॥ ३६९ ॥ जो बोलातें बोलविता । तोचि श्रवणीं झाला श्रोता । तोच अर्थावबोधु जाणता । तेथें ब्रह्मार्पणता सहजेंचि ॥ ३७० ॥ शब्दु शब्दत्वें जंव उठी । तंव शब्दविता प्रगटे पाठींपोटीं । तेणें अकृत्रिम भजन उठी । ब्रह्मार्पणमिठी श्रवणीं पडे ॥ ३७१ ॥ शब्दबोलासवें अर्थवाढी । तंव शब्दविता घे शब्दार्थगोडी । तेणें हरिभजनीं आवडी । स्वयें उठी गाढी श्रवणार्पणेंसीं ॥ ३७२ ॥ शब्द जंव कानीं पडे । तंव शब्दार्थें भजन वाढें । बोलवित्याच्या अंगा घडे । अर्पण उघडें करितांचि ॥ ३७३ ॥ बोलासी जो बोलविता । त्यासीं दृढ केली एकात्मता । तें भजन चढे श्रवणाच्या हाता । ब्रह्मार्पणता निजयोगें ॥ ३७४ ॥ सद्गुरुवचन पडतां कानीं । मनाचे मनपण विरे मनीं । तेंचि श्रवण ब्रह्मार्पणीं । भगवद्भजनीं सार्थकता ॥ ३७५ ॥ श्रवणेंचि यापरी श्रवण । करितां उठिलें ब्रह्मार्पण । हेतुरहित भगवद्भजन । स्वभावें जाण स्वयें होत ॥ ३७६ ॥ भजनें तुष्टला जगन्निवास । होय वासाचा निजवास । मग घ्राणद्वारा परेश । भोगी सुवास ब्रह्मार्पणेंसीं ॥ ३७७ ॥ जो सुमना सुमनपण जोडी । तो घ्राणाचेंही घ्राण होय आवडी । मग नाना सुवासपरवडी । ब्रह्मार्पणप्रौढीं निजभोग अर्पी ॥ ३७८ ॥ वासाचा अवकाश होय आपण । घ्राणीं ग्राहकपणें जाण । तो भोगुचि स्वयें संपूर्ण । कृष्णार्पण सहज होतु ॥ ३७९ ॥ रसना रस सेवूं जाये । तंव रसस्वादु देवचि होये । मग रसनेमाजीं येऊनि राहे । ब्रह्मार्पणें पाहे रसभोगवृत्ती ॥ ३८० ॥ जे जे रसना सेवी गोडी । ते ते हरिरूपें धडफुडी । स्वादा येऊनि रोकडी । ब्रह्मार्पणपरवडी निजभोग अर्पी ॥ ३८१ ॥ रस-रसना-रसस्वादु । त्रिविधभेदें निजअभेदु । रससेवनीं परमानंदु । स्वानंदकंदु वोसंडे ॥ ३८२ ॥ कटु मधुर नाना रस । रसना सेवी सावकाश । परी ते अवघा ब्रह्मरस । स्वादीं सुरस परमानंदु ॥ ३८३ ॥ यापरी रसीं रसना । भोगें रतली कृष्णार्पणा । आतां स्पर्शविषयरचना । अर्पे ब्रह्मार्पणा तें ऐक राया ॥ ३८४ ॥ स्पर्श घेईजे निजदेहीं । तंव देहींच प्रगटे विदेही । मग स्पर्शी जें जें कांहीं । तो तो भोगु पाहीं ब्रह्मार्पणें उठी ॥ ३८५ ॥ स्पर्शास्पर्शें जें स्पर्शिजे । तंव स्पर्शावया नाडळे दुजें । तेणें एकपणाचेनि व्याजें । कृष्णार्पणवोजें भजन प्रगटे ॥ ३८६ ॥ तेथ जो जो घेईजे पदार्थु । तो तो पदार्थु होय समर्थु । तेणेंचि भजनें परमार्थु । निजस्वार्थु निजभक्तां ॥ ३८७ ॥ द्यावया कांहीं देवा जाये । तंव देतां भजन कैसें होये । देतें घेतें दान स्वयें । देवोचि होये निजांगें ॥ ३८८ ॥ जेउतें जेउतें चालवी पाये । तो तो मार्गु देवोचि होये । मग पाउला पाउलीं पाहे । निजभजन होये ब्रह्मार्पणेंशीं ॥ ३८९ ॥ चरणा चरणा निजगती । तोचि निजांगें क्षितीची क्षिती । चालतां तैशिया युक्ती । सहज ब्रह्मस्थिति निजकर्में अर्पी ॥ ३९० ॥ बोल बोलवितिया वदनीं भेटी । बोलणें लाजे त्याचिया दृष्टी । ते लाज गिळून बोलणें उठी । निजभजनपुष्टी ब्रह्मार्पणेंसी ॥ ३९१ ॥ शब्द मावळे निःशब्दीं । निःशब्दचि बोलिजे शब्दीं । तोचि अर्पणाचा विधी । जाण त्रिशुद्धी समर्पितेनिशीं ॥ ३९२ ॥ बोलु बोलविता बोलाआंतु । तो बोलु अर्पणेंसींच येतु । ऐसा शब्देंचि भजनार्थु । प्रकटे परमार्थु ब्रह्मार्पणेंसीं ॥ ३९३ ॥ ऐसा मनें-कर्में-वचनें । जो दृढावला भगवद्भजनें । तेंचि भजन अभिमानें । निजनिर्वाणें दृढ धरी ॥ ३९४ ॥ तरंग समुद्राआंतौता । म्हणे माझेनि मेघु तत्त्वतां । जगातें निवविता जीवविता । तृषा हरिता चातकांची ॥ ३९५ ॥ माझेनि सस्यें पिकतीं । माझेनि सरिता उसळती । मागुती मजमाजीं मिळती । समरसती सिंधुत्वें ॥ ३९६ ॥ तेवीं मुळींचें पूर्णपण । पावोनि भजे अभिमान । त्याचे भजनाचें लक्षण । सावधान अवधारीं ॥ ३९७ ॥ म्हणे मी सकललोककर्ता । कर्म करोनि अकर्ता । मी सर्वभोगभोक्ता । नित्य अभोक्ता मी एकु ॥ ३९८ ॥ सकळ लोकीं माझी सत्ता । सकळीं सकळांचा नियंता । सकळां सकळत्वें मी प्रकाशिता । होय मी शास्ता सकळिकांचा ॥ ३९९ ॥ सकळां भूतीं मी एकु । मीचि व्याप्य व्यापकु । जनिता जनयिता जनकु । न होनि अनेकु जगद्रूप मी ॥ ४०० ॥ मी देवांचा आदिदेवो । देवीं देवपणा माझाचि भावो । व्ययामाजीं मी अज अव्ययो । अक्षरीं अक्षरभावो माझेनि अंगें ॥ ४०१ ॥ ईश्वरीं जे जे सत्ता । ते ते माझी सामर्थ्यता । भगवंतीं भगवंतता । जाण तत्त्वतां माझेनि ॥ ४०२ ॥ मी आपरूपीं आपु । मी प्रकृतिपुरुषांचा बापु । सृष्टिरचनेचा संकल्पु । निर्विकल्पु पैं माझा ॥ ४०३ ॥ मी आदीची अनादि आदी । मी समाधीची निजसमाधी । निजशुद्धीसी माझेनि शुद्धी । यापरी त्रिशुद्धी अभिमानार्पण ॥ ४०४ ॥ मी अजन्मा न जन्मोनि जन्में । मी अकर्मा न करोनि करीं कर्में । माझेनि योगें पुरुषोत्तमें । पाविजे महिमे उत्तमत्वाचे ॥ ४०५ ॥ सच्छब्दें माझें अंग । चिच्छब्दें मीचि चांग । न होनिया तिन्ही भाग । आनंद निर्व्यंग तोचि मी ॥ ४०६ ॥ माझेनि सूर्यदृष्टी डोळस । मजमाजीं चिदाकाशाचा अवकाश । माझेनि अंगें जगन्निवास । सावकाश नांदतु ॥ ४०७ ॥ अजा अजपणें मी अज । निःशेष निर्बीजां मी बीज । माझेनि निजांगें निज । निजभोज स्वयें नाचे ॥ ४०८ ॥ अधिष्ठाना मजमाजीं अधिवासु । मी जगदीशाचा पूर्ण ईशु । मी परम पुरुषाचाही पुरुषु । परेशा परेशु मीच स्वयें ॥ ४०९ ॥ असंत माझेनि संत होये । अचित् माझेनि चिदत्व लाहे । निजानन्दासीही पाहें । आनंदु निर्वाहे माझेनि ॥ ४१० ॥ मी सकळ सिद्धींची निजसिद्धी । मी सर्वांगदेखणी बुद्धीची बुद्धी । मोक्ष म्हणणें तोही उपाधी । जाण त्रिशुद्धी माझेनि ॥ ४११ ॥ मी साचार निजधर्म । मजमाजीं ब्रह्म विसरे कर्म । ब्रह्मसमाधीचें परब्रह्म । निजनिःसीम मीच मी ॥ ४१२ ॥ हरि-हर-ब्रह्मा निजनिर्धारीं । हेही माझे अंशांशधारी । मि दशावतारांचा अवतारी । माझी निजथोरी मीही नेणें । ॥ ४१३ ॥ ऐशिया नाना विवंचना । अभिमानें भजे भगवद्भजना । "ब्रह्माहमस्मि" दृढभावना । आपण आपणा पूर्णत्वें अर्पी ॥ ४१४ ॥ जीव घालूनि पुर्णत्वाआंतु । जें जें अभिमान कल्पितु । तें तें साचचि स्वयें होतु । तेंही पूर्णत्व अर्पितु निजपूर्णत्वीं ॥ ४१५ ॥ "ब्रह्माहमस्मि" नुसधें वचन । ये अहंते नाम भगवद्भजन । मा हा तंव तद्रूप होऊन । भजे अभिमान ब्रह्मार्पणेंसीं ॥ ४१६ ॥ सांडूनि देहबुद्धीचा केरु । भजनें उठिला अहंकारु । तो अपरोक्ष निजसाक्षात्कारु । पावूनि पूर्ण निर्धारु पूर्णत्वें वर्ते ॥ ४१७ ॥ म्हणौनि मनना मीचि मनन । स्मरणा मीचि नित्य स्मरण । चित्तासी मी निजचिंतन । चिंत्यधर्मेंवीण सर्वदा ॥ ४१८ ॥ ज्याची सहसा प्राप्ति नव्हे । तें निजचित्तेंचि चिंतावें । तंव अप्राप्तीची प्राप्ति पावे । चित्त निजानुभवें सहज भजतां ॥ ४१९ ॥ तेव्हां निश्चितें जें जें चिंती चित्त । तें तें स्वयेंचि होय समस्त । या प्रतीतीं चित्त भजत । ब्रह्मार्पणयुक्त निजबोधें ॥ ४२० ॥ नाथिलें चिंती ते "अतिचिंता" । आथिलें ते "निश्चिंतता" । आथी नाथी सांडिली चिंता । सहजें न भजतां भजन होये ॥ ४२१ ॥ चित्त चिंत्य आणि चिंतन । यापरी तिहींस जाहलें समाधान । तें समाधानही कृष्णार्पण । सहजी संपूर्ण स्वयें होये ॥ ४२२ ॥ ऐसिया भगवद्भजनविधीं । भजनशील झाली बुद्धी । तैं सकळ कर्मीं समाधी । जाण त्रिशुद्धी स्वयें झाली ॥ ४२३ ॥ कर्माचरणीं समाधी । एक म्हणती न घडे कधीं । तें पावले नाहीं निजात्मबोधीं । जाण त्रिशुद्धी विदेहा ॥ ४२४ ॥ ताटस्थ्या नांव समाधी । म्हणे त्याची ठकली बुद्धी । ते समाधी नव्हे त्रिशुद्धी । जाणावी नुसधी मुर्छा आली ॥ ४२५ ॥ ताटस्थ्यापासूनि उठिला । तैं तो समाधीस मुकला । तेव्हां एकदेशी भावो आला । मंदही या बोला न मानिती सत्य ॥ ४२६ ॥ समाधी आणि एकदेशी । बोलतां बोलणें ये लाजेसी । सत्य मानी ते शब्दपिशी । शुद्ध स्वरूपासी अनोळख ॥ ४२७ ॥ येथें प्राचीन अतिसमर्थ । तें मूर्च्छा आणोनि करी तटस्थ । वांचूनि चालते बोलते समाधिस्थ । जाण पां निश्चित वसिष्ठादिक ॥ ४२८ ॥ पाहें पां देवर्षि नारदु । विनोदें न मोडे समाधिबोधु । याज्ञवल्क्याचा समाधिसंबंधु । ऋषिप्रसिद्धु परिक्षा केली ॥ ४२९ ॥ स्वरूप देखोनि मूर्च्छित जाहला । तो आपणियां आपण तरला । स्वयें तरूनि जन उद्धरिला । तो बोधु प्रकाशिला शुकवामदेवीं ॥ ४३० ॥ यालागीं समाधि आणि व्युत्थान । या दोनी अवस्थांसहित जाण । बुद्धी होये ब्रह्मार्पण । अखंडत्वें पूर्ण परमसमाधि ॥ ४३१ ॥ अर्जुना देऊनि निजसमाधी । सवेंचि घातला महायुद्धीं । परी तो कृष्ण कृपानिधी । ताटस्थ्य त्रिशुद्धी नेदीच स्पर्शों ॥ ४३२ ॥ सकळ कर्मीं समाधी । हे सद्गुरुचि बोधी बुद्धी । तरी बुद्धींही त्रिशुद्धी । निजसमाधी न मोडे ॥ ४३३ ॥ बुद्धीं आकळलें परब्रह्म । तैं अहैतुक चाले कर्म । हेंचि बुद्धीचें अर्पण परम । इतर तो भ्रम अनुमानज्ञान ॥ ४३४ ॥ स्वरूपीं दृष्टी निवधी । अनवच्छिन्न समानबुद्धी । कर्माकर्मीं अज्ञान न बाधी । "परमसमाधी" तिये नांव ॥ ४३५ ॥ निःशेष गेलिया देहबुद्धी । स्वरूपपणें फुंज न बाधी । कर्माकर्मीं अज्ञान न बाधी । ते ’परमसमाधी’ निर्दुष्ट ॥ ४३६ ॥ ते स्वरूपीं निरवधी । भजनशीळ झाली बुद्धी । ते सकळ कर्मीं समाधी । निजार्पणविधी स्वयें जाहली ॥ ४३७ ॥ जेथें शमली मनाची आधी । ते जाणावी ’परमसमाधी’ । समाधी घेणें ते देहबुद्धी । काष्ठ तें त्रिशुद्धी मूर्च्छितप्राय ॥ ४३८ ॥ मनासी ठाउकें नसे । इंद्रियीं व्यापारु तरी दिसे । कर्म निपजे जें ऐसें । तें जाणिजे आपैसें ’कायिक’ ॥ ४३९ ॥ श्वासोच्छ्वासांचे परिचार । कां निमेषोन्मेषांचे व्यापार । तेही नारायणपर । केले साचार निजस्वभावें ॥ ४४० ॥ तरी देहगेहवर्णाश्रमें । स्वभागा आलीं जीं जीं कर्में । तीं तीं आचरोनि निजधर्में । पूर्वानुक्रमें अनहंकृती ॥ ४४१ ॥ साखरेचें कारलें प्रौढ । तें देठू-कांटेनशीं सर्वही गोड । तेवीं इंद्रियकर्मगूढ । स्वादिष्ठ सदृढ ब्रह्मार्पणें ब्रह्मीं ॥ ४४२ ॥ कर्मकलापु आघवा । आचरोनि आणि गौरवा । परी कर्तेपणाचिया गांवा । अहंभावो स्पर्शेना ॥ ४४३ ॥ मजपासून झालें सत्कर्म । माझा आचार अति उत्तम । म्यां निरसिलें मरणजन्म । हा स्वभावें देहधर्म उठोंचि नेणे ॥ ४४४ ॥ देहसंगें तरी वर्तणें । परी देहधर्म धरूं नेणे । देहस्वभाव लक्षणें । ब्रह्मार्पणें विचरिती ॥ ४४५ ॥ देहधर्माचा नुठे फांटा । ज्ञानगर्वाचा न चढेचि ताठा । यालागीं सहज भजनामाजिवटा । झाला तो पैठां अनहंकृती ॥ ४४६ ॥ त्यापासूनि जें जें निपजे । तें तें देवो म्हणे माझें खाजें । यालागीं ब्रह्मार्पणवोजें । त्याचे स्वभाव सहजें नार्पितां अर्पिती ॥ ४४७ ॥ परिसाचे कसवटीवर्हें । जें जें लागे तें तें साडेपंधरें । तेवीं निपजे जें जें शरीरें । तें तें खरें परब्रह्म ॥ ४४८ ॥ त्याचा खेळु तेंचि महापूजन । त्याची बडबड तेंचि प्रिय स्तवन । त्याचे स्वभावीं स्वानंदपूर्ण । श्रीनारायण सुखावे ॥ ४४९ ॥ तो जेउती वास पाहे । आवडीं देवो तेउता राहे । मग पाहे अथवा न पाहे । तरी देवोचि स्वयें स्वभावें दिसे ॥ ४५० ॥ तयासी चालतां मार्गें । तो मार्गु होइजे श्रीरंगें । तो देवाचिया दोंदावरी वेगें । चाले सर्वांगें डुल्लत ॥ ४५१ ॥ जें जें कर्म स्वाभाविक । तें तें ब्रह्मार्पण अहेतुक । या नांव भजन निर्दोख । ’भागवतधर्म’ देख या नांव ॥ ४५२ ॥ स्वाभाविक जे वर्तन । तें सहजें होय ब्रह्मार्पण । या नांव शुद्ध आराधन । भागवतधर्म पूर्ण जाण राया ॥ ४५३ ॥ यापरी भगवद्भजनपथा । भय नाहीं गा सर्वथा । ’अभय’ पुशिलें नृपनाथा । तें जाण तत्त्वतां भजनें होय ॥ ४५४ ॥ येथें भयाचें कारण । राया तूं म्हणशील कोण । तेंही सांगों सावधान । ऐक श्रवणसौभाग्यनिधी ॥ ४५५ ॥ भयं द्वितीयाभिनिवेशतः स्यात् ईशादपेतस्य विपर्ययोऽस्मृतिः । तन्माययातो बुध आभजेत्तं भक्त्यैकयेशं गुरुदेवतात्मा ॥ ३७ ॥ आतां पूर्णत्वें सर्वत्र एक । तेथ जो म्हणे मी वेगळा देख । तेंचि अज्ञान भयजनक । दुःखदायक अतिद्वंद्वें ॥ ४५६ ॥ भयाचें मूळ दृढ अज्ञान । त्याचें निवर्तक मुख्य ज्ञान । तेथ कां लागलें भगवद्भजन । ऐसा ज्ञानाभिमान पंडितां ॥ ४५७ ॥ ऐक राया येचि अर्थी । ज्ञानासी कारण मुख्य भक्ती । हा कृतनिश्चयो आमुच्या मतीं । तेही उपपत्ती अवधारीं ॥ ४५८ ॥ अज्ञानाचें मूळ माया । जे ब्रह्मादिकां न ये आया । गुणमयी लागली प्राणियां । जाण ते राया अति दुस्तर ॥ ४५९ ॥ त्या मायेचें मुख्य लक्षण । स्वस्वरूपाचें आवरण । द्वैतांचें जें स्फुरे स्फुरण । "मूळमाया" जाण तिचें नांव ॥ ४६० ॥ ब्रह्म अद्वयत्वें परिपूर्ण । ते स्वरूपी स्फुरे जें मीपण । तेंचि मायेचें जन्मस्थान । निश्चयें जाण नृपनाथा ॥ ४६१ ॥ ते मायेच्या निजपोटीं । भयशोकदुःखांचिया कोटी । ब्रह्माशिवादींचे लागे पाठी । इतरांची गोठी ते कोण ॥ ४६२ ॥ ते माहामायेची निवृत्ती । करावया दाटुगी भगवद्भक्ती । स्वयें श्रीकृष्ण येचि अर्थीं । बोलिला अर्जुनाप्रती गीतेमाजीं ॥ ४६३ ॥ " मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते " भ. गीता-७.१४ माया म्हणिजे भगवच्छक्ती । भगवद्भजनें तिची निवृत्ती । आन उपाय तेथें न चलती । भक्त सुखें तरती हरिमाया ॥ ४६४ ॥ हरीची माया हरिभजनें । हरिभक्तीं सुखेंचि तरणें । हें निजगुह्य अर्जुनाचेनि कारणें । स्वयें श्रीकृष्णें सांगितलें ॥ ४६५ ॥ मायेचि हेचि निजपुष्टी । स्वरूपीं विमुख करी दृष्टी । द्वैतभावें अत्यंत लाठी । भ्रमाची त्रिपुटी वाढवी सदा ॥ ४६६ ॥ भयाचें जनक द्वैतभान । द्वैतजनक माया जाण । मायानिवर्तक ब्रह्मज्ञान । हें संत सज्ञान बोलती ॥ ४६७ ॥ ऐसें श्रेष्ठ जें ब्रह्मज्ञान । तें भक्तीचें पोसणें जाण । न करितां भगवद्भजन । ब्रह्मज्ञान कदा नुपजे ॥ ४६८ ॥ जरी जाहले वेदशास्त्रसंपन्न । तिहीं न करितां भगवद्भजन । मायानिवर्तक ब्रह्मज्ञान । तयांसीही जाण कदा नुपजे ॥ ४६९ ॥ शब्दज्ञानाची व्युत्पत्ती । दाटुगी होय लौकिक स्थिती । मायानिवर्तक ज्ञानप्राप्ती । न करितां हरिभक्ती कदा नुपजे ॥ ४७० ॥ हरिगुणांची रसाळ कहाणी । ते ब्रह्मज्ञानाची निजजननी । हरिनामाचेनि गर्जनीं । जीव घेऊनि माया पळे ॥ ४७१ ॥ माया पळतां पळों न लाहे । हरिनामधाकें विरोनि जाये । यालागीं हरिमाया पाहें । बाधूं न लाहे हरिभक्तां ॥ ४७२ ॥ नामाची परम दुर्धर गती । माया साहों न शके निजभक्ती । हरिभक्त माया सुखें तरती । यालागीं श्रीपती बोलिला स्वयें ॥ ४७३ ॥ सायुज्याच्या चारी मुक्ती । अंकीं वाढवी भगवद्भक्ती । ते न करितां अनन्यगती । शास्त्रज्ञां मुक्ती न घडे कदा ॥ ४७४ ॥ हरिभजनीं जे विमुख । त्यांसी सदा द्वैत सन्मुख । महाभयेंसीं दुःखदायक । प्रपंचु देख दृढ वाढे ॥ ४७५ ॥ जेवीं एकाएकीं दिग्भ्रमु पडे । तो पूर्ण म्हणे पश्चिमेकडे । तैसी वस्तुविमुखें वाढे । अतिगाढें मिथ्या द्वैत ॥ ४७६ ॥ द्वैताचिये भेदविहिरे । सुटती संकल्पविकल्पांचे झरे । तेथ जन्ममरणांचेनि पूरें । बुडे एकसरे ब्रह्मांडगोळ ॥ ४७७ ॥ जन्ममरणांचिया वोढी । नाना दुःखांचिया कोडी । अभक्त सोशिती सांकडीं । हरिभक्तांतें वोढी स्वप्नींही न लगे ॥ ४७८ ॥ भक्तीचें अगाध महिमान । तेथें रिघेना भवबंधन । तें करावया भगवद्भजन । सद्गुरुचरण सेवावे ॥ ४७९ ॥ निजशिष्याची मरणचिंता । स्वयें निवारी जो वस्तुतां । तोचि सद्गुरु तत्त्वतां । येर ते गुरुता मंत्रतंत्रोपदेशें ॥ ४८० ॥ मंत्रतंत्र उपदेशिते । घरोघरीं गुरु आहेत आइते । जो शिष्यासी मेळवी सद्वस्तूतें । सद्गुरु त्यांते श्रीकृष्ण मानी ॥ ४८१ ॥ गुरु देवो गुरु माता पिता । गुरु आत्मा ईश्वर वस्तुतां । गुरु परमात्मा सर्वथा । गुरु तत्त्वतां परब्रह्म ॥ ४८२ ॥ गुरूचे उपमेसमान । पाहतां जगीं न दिसे आन । अगाध गुरूचे महिमान । तो भाग्येंवीण भेटेना ॥ ४८३ ॥ निष्काम पुण्याचिया कोडी । अगाध वैराग्य जोडे जोडी । नित्यानित्यविवेकआवडी । तैं पाविजे रोकडी सद्गुरुकृपा ॥ ४८४ ॥ सद्गुरुकृपा हातीं चढे । तेथें भक्तीचें भांडार उघडे । तेव्हां कळिकाळ पळे पुढें । कायसें बापुडें भवभय ॥ ४८५ ॥ गुरूतें म्हणो मातापिता । ते एकजन्मीं सर्वथा । हा सनातन तत्त्वतां । जाण पा वस्तुतां मायबापु ॥ ४८६ ॥ अधोद्वारें उपजविता । ते लौकिकीं मातापिता । अधोद्वारा आतळों नेदिता । तो सद्गुरु पिता सत्यत्वें शिष्यां ॥ ४८७ ॥ गुरूतें म्हणों कुळदेवता । तिची कळकर्मीच पूज्यता । हा सर्व कामीं अकर्ता । पूज्य सर्वथा सर्वार्थीं ॥ ४८८ ॥ गुरु म्हणो देवासमान । तंव देवांसी याचेनि देवपण । मग त्या सद्गुरूसमान । देवही जाण तुकेना ॥ ४८९ ॥ गुरु ब्रह्म दोनी समान । हेही उपमा किंचित न्यून । गुरुवाक्ये ब्रह्मा ब्रह्मपण । तें सद्गुरुसमान अद्वयत्वें ॥ ४९० ॥ यालागी अगाध गुरुगरिमा । उपमा नाहीं निरुपमा । ब्रह्मीं-ब्रह्मत्व-प्रमाण-प्रमा । हे वाक्यमहिमा गुरूची ॥ ४९१ ॥ ब्रह्म सर्वांचे प्रकाशक । सद्गुरु तयाचाही प्रकाशक । एवं गुरूहूनि अधिक । नाहीं आणिक पूज्यत्वें ॥ ४९२ ॥ यालागीं गुरूतें मनुष्यबुद्धीं । पाहों नये गा त्रिशुद्धी । ऐशिये भावार्थबुद्धी । सहजें चित्तशुद्धी सच्छिष्यां ॥ ४९३ ॥ ज्यांचा गुरुचरणीं निःसीम भावो । त्यांचा मनोरथ पुरवी देवो । गुरुआज्ञा देवो पाळी पहा हो । गुरुवाक्यें स्वयमेवो जड मूढ तारी ॥ ४९४ ॥ ब्रह्मभावें जे गुरुसेवक । देवो त्यांचा आज्ञाधारक । त्यांसी नित्य पुरवी निजात्मसुख । हे गुरुमर्यादा देख नुल्लुंघी देवो ॥ ४९५ ॥ देवो गुरुआज्ञा स्वयें मानी । तंव गुरु देवासी पूज्यत्व आणी । एवं उभयतां अभिन्नपणीं । भावार्थियांलागोनी तारक ॥ ४९६ ॥ सद्भावो नाहीं अभ्यंतरीं । बाह्य भक्ति भावेंचि करी । ते भावानुसारें संसारीं । नानापरी स्वयें ठकती ॥ ४९७ ॥ ठकले ते मनुष्यगती । ठकले ते निःस्वार्थी । ठकले ते ब्रह्मप्राप्ती । दंभें हरिभक्ती कदा नुपजे ॥ ४९८ ॥ येथ भावेंवीण तत्त्वतां । परमार्थु न ये हाता । सकळ साधनांचे माथां । जाण तत्त्वतां सद्भावो ॥ ४९९ ॥ कोरडिये खांबीं धरितां सद्भावो । तेथेंचि प्रगटे देवाधिदेवो । मा सद्गुरु तंव तो पहा वो । स्वयें स्वयमेवो परब्रह्म ॥ ५०० ॥ यालागी गुरुभजनापरता । भजावया मार्गु नाही आयता । ज्ञान-भक्ति जे तत्त्वतां । ते जाण सर्वथा सद्गुरुभक्ति ॥ ५०१ ॥ गुरुहूनि श्रेष्ठ ब्रह्म । म्हणतां गुरुत्वा आला कनिष्ठ धर्म । ऐसा भाव धरितां विषम । ब्रह्मसाम्य शिष्यां नुपजे ॥ ५०२ ॥ आम्हां सद्गुरु तोचि परब्रह्म । ऐसा नित्य निजभाव सप्रेम । हेचि गुरुसेवा उत्तमोत्तम । शिष्य परब्रह्म स्वयें होये ॥ ५०३ ॥ ऐशिये गुरुसेवेआंत । प्रह्लाद झाला द्वंद्वातीत । नारद स्वानंदें गात नाचत । ब्रह्मसाम्यें विचरत सुरासुरस्थानें ॥ ५०४ ॥ ऐसीचि गुरुसेवा करितां । चुकली अंबरीषाची गर्भव्यथा । ते गर्भ जाहला देवोचि साहता । भक्ता भवव्यथा बाधों नेदी ॥ ५०५ ॥ ऐशिया अभिन्न भावना । सुबुद्धी भजती गुरुचरणां । ते पढियंते जनार्दना । त्यांसी भवभावना शिवों नेदी ॥ ५०६ ॥ गुरु ब्रह्म दोनी एक । शिष्यही असे तदात्मक । जे भेदें मानिती वेगळिक । तेही मायिक कवि सांगे ॥ ५०७ ॥ अविद्यमानोऽप्यवभाति हि द्वयोः ध्यातुर्धिया स्वप्नमनोरथौ यथा । तत्कर्मसङ्कल्पविकल्पकं मनो बुधो निरुन्ध्याद् अभयं ततः स्यात् ॥ ३८ ॥ पुरुषासी जो प्रपंचु दिसे । तो नसतांचि मिथ्या आभासे । जेवीं कां एकला निद्रावशें । स्वप्नीं निजमानसें जग कल्पी ॥ ५०८ ॥ असोनि निद्रावश दिसे स्वप्न । जो जागा होवोनि आपण । करूं बैसे मनोरथध्यान । तो नसतेंचि जन वन एकत्वीं देखे ॥ ५०९ ॥ हो कां घालोनि आसन । जो करी मूर्तिचिंतन । त्यासी ध्येय-ध्याता-उपचार-ध्यान । नसतेंच जाण कल्पित भासे ॥ ५१० ॥ जेवीं धनलोभ्याचें हारपे धन । परी वासना न सांडी धनधान्य । धनातें आठवितां मन । धनलोभें पूर्ण पिसें होये ॥ ५११ ॥ मन स्वयें जरी नव्हे धन । तरी धनकोश आठवी मन । तंव स्मृती वळघे वन । व्यामोहें पूर्ण पिसें होये ॥ ५१२ ॥ तेवीं व्यामोहाचें पूर्ण भरित । मिथ्या भासे देहादि द्वैत । तें अहंभावें मानितां आप्त । भवभय निश्चित आदळे अंगीं ॥ ५१३ ॥ भवभयाचे कारण । मनःकल्पना मुख्य जाण । त्या मनाचें करावया निरोधन । सद्गुरुवचननिजनिष्ठा ॥ ५१४ ॥ हें जाणोनि सच्छिष्य ज्ञाते । गुरुवाक्यें विश्वासयुक्तें । विवेकवैराग्याचेनि हातें । निजमनातें आकळिती ॥ ५१५ ॥ तेचि आकळती हातवटी । संक्षेपें राया सांगेन गोष्टी । सद्गुरुवाक्य परिपाटी । जे मनातें थापटी निजबोधें ॥ ५१६ ॥ चंचळत्वें विषयध्यान । करितां देखे जें जें मन । तें तें होय ब्रह्मार्पण । सद्गुरुवचननिजनिष्ठा ॥ ५१७ ॥ धरूनियां विषयस्वार्थु । मनें जो जो घेइजे अर्थु । तो तो होय परमार्थु । हा अनुग्रहो समर्थु गुरुकृपेचा ॥ ५१८ ॥ जो भुईभेणें पळों जाये । तो जेथें पळे तेथें भू ये । मग येणेंजाणें स्वयें राहे । ठायीं ठाये पांगुळला ॥ ५१९ ॥ तैसें मनासी लाविजे वर्म । जें जें देखे तेंचि ब्रह्म । जें जें करूं बैसे कर्म । तेथ पुरुषोत्तम स्वयें प्रगटे ॥ ५२० ॥ एवं इंद्रियवृत्तिउल्लाळे । मोडिले गुरुवाक्यप्रतीतिबळें । निजाधिष्ठानमेळें । कळासलें येके वेळे अखंड कुलुप ॥ ५२१ ॥ ऐसें नेमितां बाह्य कर्म । मनाचा मोडे द्वैत भ्रम । तंव बाह्य परब्रह्म । पूर्ण चिद्व्योम कोंदाटे ॥ ५२२ ॥ ऐसें भजनें मन नेमितां स्वयें । न रिघे कल्पांतकाळभये । भक्त होऊनियां निर्भयें । विचरती स्वयें निःशंक ॥ ५२३ ॥ हे अगाध निष्ठा परिपूर्ण । भोळ्याभाळ्या न टके जाण । यालागी सुगम साधन । सांगेन आन तें ऐक ॥ ५२४ ॥ श्रृण्वन्सुभद्राणि रथाङ्गपाणेः जन्मानि कर्माणि च यानि लोके । गीतानि नामानि तदर्थकानि गायन्विलज्जो विचरेदसङ्गः ॥ ३९ ॥ तरावया भाळेभोळे जन । मुख्य चित्तशुद्धीच कारण । जन्मकर्म हरीचे गुण । करावे श्रवण अत्यादरें ॥ ५२५ ॥ चुकल्या पुत्राची शुद्धिवार्ता । जेणें सादरें ऐके माता । तेणें सादरें हरिकथा । सार्थकता परिसावी ॥ ५२६ ॥ हरीचीं जन्मकर्में अनंत गुण । म्हणाल त्यांचें नव्हेल श्रवण । लोकप्रसिद्ध जें जें पुराण । तें श्रद्धा संपूर्ण ऐकावें ॥ ५२७ ॥ बहु देव बोलिले पुराणीं । तेही लागती ज्याचे चरणीं । तो समर्थ चक्रपाणी । जो वेदपुराणीं वंदिजे ॥ ५२८ ॥ त्याचीं जीं जीं जन्मे अतिअद्भुत । जीं जीं कर्मे परमार्थयुक्त । स्वमुखें बोलिला भगवंत । तीं तीं ज्ञानार्थ परिसावीं ॥ ५२९ ॥ जें जें केलें पुराणश्रवण । तें तें व्यर्थ होय मननेंविण । यालागीं श्रवण-मनन । सावधान करावें ॥ ५३० ॥ मोले घेतली जे गाये । दुभतें खातां विषय होये । तेचि दान देतां लवलाहें । दुभती होये परमामृतें ॥ ५३१ ॥ तेवीं केले जें श्रवण । तें मननें परम पावन । तेंचि उपेक्षितां जाण । परिपाकीं पूर्ण वांझ होये ॥ ५३२ ॥ हरिनाम पडतां श्रवणीं । एकां गळोनि जाये वदनीं । एकां ये कानींचे ते कानीं । जाय निघोनि हरिनाम ॥ ५३३ ॥ हरिनाम पडतां श्रवणीं । ज्याचे रिघे अंतःकरणीं । सकळ पापा होवोनि धुणी । हरिचरणीं तो विनटे ॥ ५३४ ॥ यापरी श्रवणीं श्रद्धा । मननयुक्त करितां सदा । तैं विकल्प बाधीना कदा । वृत्तिं शुद्धा स्वयें होये ॥ ५३५ ॥ ऐसें मननयुक्त श्रवण । करितां वोसंडे हर्ष पूर्ण । तेणें हर्षें हरिकिर्तन । करी आपण स्वानंदें ॥ ५३६ ॥ हरिचरित्रें अगाध । ज्ञानमुद्रा-पदबंध । कीर्तनीं गातां विशद । परमानंद वोसंडे ॥ ५३७ ॥ वानिती अजन्मयाचीं जन्में । वानिती अकर्मयाचीं कर्में । स्मरती अनामियाचीं नामें । अतिसप्रेमें डुल्लत ॥ ५३८ ॥ साधावया निजकाज । सांडूनि लौकिकाची लाज । कीर्तनी नाचती भोज । अतिनिर्लज्ज निःशंक ॥ ५३९ ॥ कीर्तनें निर्दळिले दोष । जप तप ठेले निरास । यमलोक पाडिला वोस । तीर्थाची आस निरास जाहली ॥ ५४० ॥ यमनियमां पडती उपवास । मरों टेंकले योगाभ्यास । कीर्तनगजरें हृषीकेश । निर्दळी दोष नाममात्रे ॥ ५४१ ॥ कीर्तनाचा घडघडाट । आनंदु कोंदला उद्भट । हरुषें डोले वैकुंठपीठ । तेणें सुखें नीलकंठ तांडवनाचें नाचतु ॥ ५४२ ॥ यापरी हरिकीर्तन । देत परम समाधान । हा भक्ति-राजमार्ग पूर्ण । ये मार्गीं स्वयें रक्षण चक्रपाणी कर्ता ॥ ५४३ ॥ चक्र घेऊनि भक्तांचे ठायीं । म्हणे तुझें कार्य कायी । मज जगीं वैरीचि नाहीं । भक्तद्वेषी पाहीं निजशस्त्रें नाशी ॥ ५४४ ॥ चक्रें अभिमानाचा करी चेंदा । मोहममता छेदी गदा । शंखें उद्बोधी निजबोधा । निजकमळें सदा निजभक्त पूजी ॥ ५४५ ॥ जेथें चक्रपाणी रक्षिता । तेथें न रिघे भवभयाची कथा वार्ता । यापरी कीर्तिवंता । हरि सर्वथा स्वयें रक्षी ॥ ५४६ ॥ ज्यांसी न करवे कथाश्रवण । अथवा न टके हरिकीर्तन । तिंहीं करावें नामस्मरण । राम-कृष्ण-गोविंद ॥ ५४७ ॥ अच्युत-नामाची निजख्याती । चेवल्या कल्पांतीं हों नेदी च्युती । त्या नामातें जे नित्य स्मरती । ते जाण निश्चितीं अच्युतावतार ॥ ५४८ ॥ रामकृष्णादी नामश्रेणी । अखंड गर्जे ज्यांची वाणी । त्यांसी तीर्थें येती लोटांगणीं । सुरवर चरणीं लागतीं स्वयें ॥ ५४९ ॥ बाप नामाचें निजतेज । यम वंदी चरणरज । नामापाशीं अधोक्षज । चतुर्भुज स्वयें तिष्ठे ॥ ५५० ॥ नामाचेनि पडिपाडें । कायिसें भवभय बापुडें । कळिकाळाचें तोंड कोणीकडे । नामापुढें रिघावया ॥ ५५१ ॥ जेवढी नामाची शक्ती । तेवढें पाप नाहीं त्रिजगतीं । नामापाशी चारी मुक्ती । जाण निश्चित्तीं विदेहा ॥ ५५२ ॥ ऐक राया सावधान । नामापरतें सुगम साधन । सर्वथा नाहीं नाहीं आन । निश्चय जाण नेमस्त ॥ ५५३ ॥ जन्म-नाम-कर्में श्रीधर । श्रवणें उद्धरती पामर । यालागीं हरिलीला सुभद्र । शास्त्रज्ञ नर वर्णिती ॥ ५५४ ॥ ऐसा बाणल्या भक्तियोग । न धरी जाणपणाचा फूग । त्यजूनि अहंममतापांग । विचरती निःसंग हरिकीर्तनें ॥ ५५५ ॥ करितां श्रवण स्मरण कीर्ति । तेणें वाढे सप्रेम भक्ति । भक्त विसरे देहस्फुर्ति । ऐक तेही स्थिति सांगेन राया ॥ ५५६ ॥ एवंव्रतः स्वप्रियनामकीर्त्या जातानुरागो द्रुतचित्त उच्चैः । हसत्यथो रोदिति रौति गायति उन्मादवत् नृत्यति लोकबाह्यः ॥ ४० ॥ हरिनामगुणकीर्तनकीर्ती । अखंड आवडे जागृतीं । स्वप्नींही तेचि स्थिती । दृढ हरिभक्ती ठसावे ॥ ५५७ ॥ ऐशियापरी भक्तियुक्त । दृढतर जाहलें ज्याचें व्रत । तंव तंव होय आर्द्रचित्त । प्रेमा अद्भुत हरिनामकीर्ती ॥ ५५८ ॥ आत्मा परमप्रिय हरी । त्याचे नामकीर्तीचा हर्ष भारी । नित्य नवी आवड वरी । सबाह्याभ्यंतरीं हरि प्रगटे ॥ ५५९ ॥ चुकल्या मायपूतां संकटीं । एकाकीं बहुकाळें जाहली भेटी । तेणें वोरडे घालोनि मिठी । चाले जेवीं पोटीं अनिवार रुदन ॥ ५६० ॥ तेवीं जीवशिवां अवचटी । भक्तीचे पेठे जाहली भेटी । आत्मसाक्षात्कारें पडे मिठी । ते संधीमाजीं उठी अनिवार रुदन ॥ ५६१ ॥ परमात्मयासी आलिंगन । तेणें अनिवार स्फुंदन । रोमांचित रुदन । सप्रेम पूर्ण उसासोनि करी ॥ ५६२ ॥ सवेंचि गदगदोनि हांसे । मानी मजमाजींच मी असें । चुकलों भेटलों हें ऐसें । देखोनि आपुलें पिसें हांसोंचि लागे ॥ ५६३ ॥ मी अखंडत्वें स्वयें संचलों । अभेदपूर्णत्वें अनादि रचलों । तो मी अव्ययो म्हणे जाहलों मेलों । येणें आठवें डोलडोलों हांसोंचि लागे ॥ ५६४ ॥ पळतां दोराच्या सर्पाभेण । पडे अडखळे भयें पूर्ण । तोच दोरातें वोळखोन । आपणिया आपण स्वयें हांसे ॥ ५६५ ॥ तेवीं संसाराचा अभावो । देहभाव समूळ वावो । तेथें नाथिली ममता अहंभावो । मज होता पहा वो म्हणूनि हांसे ॥ ५६६ ॥ बाप गुरुवाक्य निजनिर्वाहो । देहीं असतां विदेहभावो । माझे चारी देह झाले वावो । येणें अनुभवें पहा वो गर्जों लागे ॥ ५६७ ॥ म्हणे धन्य धन्य भगवद्भक्ती । जिणें मिथ्या केल्या चारी मुक्ती । मी परमात्मा निजनिश्चितीं । येणें उल्हासें त्रिजगती गर्जवी गजरें ॥ ५६८ ॥ धन्य भगवंताचें नाम । नामें केलों नित्य निष्काम । समूळ मिथ्या भवभ्रम । गर्जोनि निःसीम हाक फोडी ॥ ५६९ ॥ आतां दुजें नाहींच त्रिलोकीं । दिसे तें तें मीच मी कीं । मीच मी तो एकाकी । येणें वाक्यें अलोलिकी हाक फोडी ॥ ५७० ॥ दुर्धर भवबंध ज्याचेनि । निःशेष गेला हारपोनी । त्या सद्गुरूच्या निजस्तवनीं । गर्जवी वाणी अलोलिक ॥ ५७१ ॥ म्हणे संसार झाला वावो । जन्ममरणांचा अभावो । कळिकाळासी नाहीं ठावो । म्हणोनियां पहा वो हाक फोडी ॥ ५७२ ॥ ऐशा हांकावरी हाका । फोडूं लागे अलोलिका । सवेंचि गाये निजात्मसुखा । स्वानंदें देखा डुल्लतु ॥ ५७३ ॥ परम सख्याची गोड कथा । तृप्ती न बाणे स्वयें सांगतां । तेवीं निजानुभवें हरि गातां । धणी सर्वथा पुरेना ॥ ५७४ ॥ त्याचें गाणें ऐकतां । सुखरूप होय सज्ञान श्रोता । मुमुक्षां होय परमावस्था । जरी तो अवचिता गावों लागे ॥ ५७५ ॥ गातां पदोपदीं निजसुख । कोंदाटे अधिकाअधिक । वोसंडितां परम हरिख । स्वानंदें अलोलिक नाचों लागे ॥ ५७६ ॥ सारूनि दुजेपणाचें काज । निरसोनि लौकिकाची लाज । अहंभावेंविण सहज । आनंदाचे भोजें अलोलिक नाचे ॥ ५७७ ॥ जो मोलें मदिरा खाये । तो मदिरानंदें नाचे गाये । जेणें ब्रह्मानंदु सेविला आहे । तो केवीं राहे आवरला ॥ ५७८ ॥ यालागीं तो लोकबाह्यता । स्वये नाचे ब्रह्मउन्मादता । लोक मानिती तया पिशाचता । हा बोधु पंडितां सहजा न कळे ॥ ५७९ ॥ त्याचिया निजबोधाची कथा । ऐक सांगेन नृपनाथा । एक भगवंतावांचून सर्वथा । त्यासी लौकिकता दिसेना ॥ ५८० ॥ खं वायुमग्निं सलिलं महीं च ज्योतींषि सत्त्वानि दिशो द्रुमादीन् । सरित्समुद्रांश्च हरेः शरीरं यत्किंच भूतं प्रणमेदनन्यः ॥ ४१ ॥ ब्रह्मउन्मादपरमानंदें । जंव जंव पाहे स्वानंदबोधें । तंव तंव चराचर पूर्णानंदें । देखे स्वानंदकंदें दुमदुमित ॥ ५८१ ॥ पृथ्वी आप तेज वायु नभ । देखे हरिरूप स्वयंभ । भूतां महाभूतांचें डिंभ । न देखे भिन्न कोंभ अभिन्नत्वें ॥ ५८२ ॥ जेवीं न मेळवितां मेळा । पाहतां जैसा केळीचा कळा । स्वयें विकासे फळांदळां । तेवीं वस्तु हे पांचाला भूतभौतिकात्मक ॥ ५८३ ॥ जेवीं कांतोनियां रंध्रसळे । स्फटिकदीपगृहअंगमेळें । चितारिलीं अश्वगजदळें । तीं भासती सोज्ज्वळें आंतुलेनि दीपें ॥ ५८४ ॥ तेवीं सोमसूर्यादि तेजशक्ती । कां वन्हि नक्षत्रें जे लखलखिती । जननयनादि निजदीप्ती । देखे आत्मज्योती सतेज ॥ ५८५ ॥ युक्तीं मेळवितां द्रव्यांतर । अग्नि परी भासे पुष्पाकार । तेवीं वस्तु स्वलीला साचार । रविचंद्राकारा नानात्वें भासे ॥ ५८६ ॥ पृथ्वी गंधरूपें स्वयें असे । तो गंधु कस्तूर्यादिकीं भासे । तेवीं भगवत्सत्ता सर्वत्र असे । परी सात्त्विकीं दिसे अतिप्रगट ॥ ५८७ ॥ यालागीं सात्त्विकाठायीं सत्त्व । तेथ देखे भवगत्तत्त्व । सत्त्वें सत्त्वंतां महत्त्व । अति मान्यत्व हरिरूपें ॥ ५८८ ॥ पृथ्वीसी जळावरण आहे । तेंचि चतुःसमुद्र नांव लाहे । तैसें देवाचेंचि अंग पाहे । दिशात्वें वाच्य होये दशदिशां ॥ ५८९ ॥ पूर्वपश्चिमादि योग । दशदिशांचे दिग्विभाग । तेही देवाचेंचि अंग । तद्रूप श्रीरंग स्वयें भासे ॥ ५९० ॥ तृण दूर्वा दर्भ द्रुम । देखोनि म्हणे हेही हरीचे रोम । अनोळखा हें अतिविषम । निजांगीं सर्व सम हरिरूप पाहतां ॥ ५९१ ॥ जैशा आपुल्या अंगोळिया । गणितां दिसती वेगळालिया । परी असती लागलिया । स्वयें सगळिया अखंड अंगीं ॥ ५९२ ॥ तेवीं वन-वल्ली-दर्भ-दांग । देखोनि म्हणे हे हरीचें अंग । अनन्यभावें लगबग । भिन्नभाग देखेना ॥ ५९३ ॥ म्हणे दूर्व-द्रुम-वन-वल्ली । हेचि अनंत कोटि रोमावळी । हरीचेनि अंगें असे वाढली । त्या निजशोभा शोभली हरिरूपत्वें ॥ ५९४ ॥ जेवीं वटाच्या पारंबिया । लोंबोनि वाढती वेगळालिया । त्याही वटरूपें संचलिया । वटत्वा मुकलिया म्हणों नये ॥ ५९५ ॥ तेवीं चैतन्यापासोनि वोघ । निघाले सरितारूप अनेग । तेही चैतन्यघन चांग । चिद्रूपें साङ्ग सदा वाहती ॥ ५९६ ॥ हो कां चंद्रबिंबीं अमृत जैसे । बिंबीं बिंबरूप होऊनि असे । तेवीं भगवंतीं संसारु भासे । भजनविश्वासें भगवद्रूप ॥ ५९७ ॥ ऐसे वेगवेगळे भाग । पाहतां उल्हासे जंव चांग । तंव अवघें उघडें जग । देवोचि साङ्ग स्वयें झाला ॥ ५९८ ॥ यालागीं सर्व भूतांचे ठायीं । अनन्यशरण कैसा पाहीं । लवण जैसें सागरापायीं । ठायीं ठायीं जडोनि ठाके ॥ ५९९ ॥ तेथ मुंगीही देखोनि जाण । हरिरूपीं वंदी आपण । मशकासही अनन्यशरण । घाली लोटांगण भगवद्रूपें ॥ ६०० ॥ गो-खर-चांडाळ-श्वान । अतिनिंद्य जे हीन जन । ते भगवद्रूप देखोनि पूर्ण । घाली लोटांगण अनन्यभावें ॥ ६०१ ॥ हरिरूपें देखे पाषाण । भगवद्रूपें वंदी तृण । जंगमस्थावरादिकां शरण । घाली लोटांगण चिदैक्यभावें ॥ ६०२ ॥ करितां हरिनामस्मरणकीर्ती । एकाएकी एवढी प्राप्ती । झाली म्हणसी कैशा रितीं । ऐकें नृपती तो भावो ॥ ६०३ ॥ करितां पूजाविधिविधान । कां श्रवण स्मरण कीर्तन । सर्वदा चिदैक्यभावना पूर्ण । "पूर्ण प्राप्ति" जाण त्यातेंचि वरी ॥ ६०४ ॥ भक्तिः परेशानुभवो विरक्तिः अन्यत्र चैष त्रिक एककालः । प्रपद्यमानस्य यथाश्नतः स्युः तुष्टिः पुष्टिः क्षुदपायोऽनुघासम् ॥ ४२ ॥ आइके विदेहा चक्रवर्ती । ऐशी जेथें भगवद्भक्ती । तीपाशीं विषयविरक्ती । ये धांवती गोवत्स न्यायें ॥ ६०५ ॥ हें असो जेवीं जावळीं फळें । हों नेणें येरयेरां वेगळें । तेवीं भक्ति विरक्ति एके काळें । भक्त तेणें बळें बळिष्ठ होती ॥ ६०६ ॥ जेथ भक्ती आणि विरक्ती । नांदो लागती सहजस्थिती । तेथेंचि पूर्णप्राप्ती । दासीच्या स्थितीं सर्वदा राबे ॥ ६०७ ॥ यापरी भगवद्भक्ती । पूर्ण दाटुगी त्रिजगती । भक्तांघरीं नांदे प्राप्ती । भक्तिविरक्तिनिजयोगें ॥ ६०८ ॥ भक्ति विरक्ति अनुभवप्राप्ती । तिन्ही एके काळें होती । ऐक राया तेही स्थिती । विशदोक्तीं सांगेन ॥ ६०९ ॥ जैसी कीजे भगवद्भक्ती । तैसीच होय विषयविरक्ती । तदनुसारें अनुभवस्थिती । ती भक्त पावती तेचि क्षणीं ॥ ६१० ॥ जेवीं कां भुकेलियापाशीं । ताट वाढिलें षड्रसीं । तो पुष्टि तुष्टि क्षुधानाशासी । जेवीं ग्रासोग्रासीं स्वयेंचि पावे ॥ ६११ ॥ जितुका जितुका घेइजे ग्रास । तितुका तितुका क्षुधेचा नाश । तितुकाचि पुष्टिविन्यास । सुखोल्लास तितुकाचि ॥ ६१२ ॥ पुष्टि तुष्टि क्षुधानाशनी । जेवीं एके काळें येती तिनी । भोक्ता पावे स्वयें भोजनीं । तेवीं भगवद्भजनीं भक्त्यादि त्रिकु ॥ ६१३ ॥ सद्भावें करितां भगवद्भक्ती । भक्ति-विरक्ति-भगवद्प्राप्ती । तिनी एके काळें होती । ऐशिया युक्तीं जाणिजे राया ॥ ६१४ ॥ भक्ती म्हणिजे सर्व भूतीं । सप्रेम भजनयुक्ती । प्राप्ती म्हणिजे अपरोक्षस्थिती । भगवत्स्फूर्ती अनिवार ॥ ६१५ ॥ विरक्ति म्हणिजे ऐशी पहा हो । स्त्रीपुत्रदेहादि अहंभावो । समूळ जेथें होय वावो । विरक्ति निर्वाहो या नांव राया ॥ ६१६ ॥ यापरी भजनाचे पोटीं । भक्ति-विरक्ति-प्राप्ति त्रिपुटी । ऐक्यभावें सद्भक्तां उठी । हरिभजनदिठी एकेचि काळीं ॥ ६१७ ॥ यालागीं राया निजहितार्थीं । आदरें करावी हरिभक्ती । तेणें अवश्य भगवत्प्राप्ती । उपसंहारार्थी कवि सांगे ॥ ६१८ ॥ इत्यच्युताङ्घ्रिं भजतोऽनुवृत्त्या भक्तिर्विरक्तिर्भगवत्प्रबोधः । भवन्ति वै भागवतस्य राजन् ततः परां शान्तिमुपैति साक्षात् ॥ ४३ ॥ यापरी अनन्य भक्ती । जे सर्वदा सर्वभूतीं करिती । ते भक्ती-विरक्ती-भगवत्प्राप्ती । सहजें पावती अनायासें ॥ ६१९ ॥ राया हरिभक्तिदिव्यांजन । तें लेऊनि भक्त सज्जन । साधिती भगवन्निधान । निजभजनमहायोगें ॥ ६२० ॥ करितां ऐक्यभावें निजभक्ती । उत्कृष्ट उपजे पूर्ण शांती । तेणें होये असतांची निवृत्ती । भक्तां पूर्णप्राप्ति परमानंदें ॥ ६२१ ॥ यालागीं धन्य भगवद्भक्त । इंद्रियीं वर्तता विषयी विरक्त । देहीं असोनि देहातीत । नित्यमुक्त हरिभजनें ॥ ६२२ ॥ भावें करितां भगवद्भक्ती । भक्त मुक्तीही न वंछिती । तरी त्यांपाशी चारी मुक्ती । दास्य करिती सर्वदा ॥ ६२३ ॥ हा भागवतांचा निजमहिमा । अनुपम नाहीं उपमा । भावें भजोनि पुरुषोत्तमा । परमात्मगरिमा पावले ॥ ६२४ ॥ अगाध भगवंताची भक्ती । भक्तांची उत्कृष्ट प्राप्ती । ऐकतां विदेहचक्रवर्ती । आश्चर्यें चित्तीं चमत्कारला ॥ ६२५ ॥ म्हणे धन्य धन्य भगवद्भजन । हरिखें कवीस लोटांगण । घालितां चालिलें स्फुंदन । रोमांचित नयन अश्रुपूर्ण जाहले ॥ ६२६ ॥ आनंदस्वेदें कांपत । नावेक राहिला तटस्थ । सवेंचि जाहला सावचित्त । म्हणे झणीं महंत न पुसतां जाती ॥ ६२७ ॥ ऐशिया अतिकाकुलतीं । नेत्र उघडोनि पाहे नृपती । बैसली देखोनि मुनिपंक्ती । अतिशयें चित्तीं सुखावला ॥ ६२८ ॥ तेणें संतोषें डोलत । म्हणे पूर्णप्राप्त भगवद्भक्त । जगीं कैसे कैसे विचरत । तीं चिन्हें समस्त पुसों पाहों ॥ ६२९ ॥ श्रीराजोवाच । अथ भागवतं ब्रूत यद्धर्मो यादृशो नृणाम् । यथाचरति यद्ब्रूते यैर्लिङ्गैर्भगवत्प्रियः ॥ ४४ ॥ भक्तां ’पूर्णप्राप्ति’ सुगम । ऐकतां राजा निवाला परम । तो भक्तचिन्हानुक्रम । समूळ सवर्म पूसत ॥ ६३० ॥ विदेह म्हणे स्वामी मुनी । पूर्ण प्राप्ति आकळोनी । ते भक्त कैसे वर्तती जनीं । तीं लक्षणें श्रवणीं लेववी मज ॥ ६३१ ॥ भक्तलक्षणभूषण । तेणें मंडित करा श्रवण । सावध ऐकतां संपूर्ण । होइजे आपण भगवत्प्रिय ॥ ६३२ ॥ त्यांचा कोण धर्म कोण कर्म । कैसे वर्तती भक्तोत्तम । हृदयीं धरोनि पुरुषोत्तम । त्यांचें बोलतें वर्म तें कैसें ॥ ६३३ ॥ कोणेपरी कैशा स्थितीं । हरिभक्त हरीस प्रिय होती । ऐशिया लक्षणांचिया पंक्ती । समूळ मजप्रती सांगिजे स्वामी ॥ ६३४ ॥ विदेहाच्या प्रश्नावरी । संतोषिजे मुनीश्वरीं । कविधाकुटा जो कां हरी । तो बोलावया वैखरी सरसावला ॥ ६३५ ॥ श्रीहविरुवाच । सर्वभूतेषु यः पश्येद् भगवद्भावमात्मनः । भूतानि भागवत्यात्मन्येष भागवतोत्तमः ॥ ४५ ॥ हरि म्हणे रायाप्रती । अमित भक्तलक्षणस्थिती । एक दिगंबरत्वें वर्तती । एक स्वाश्रमस्थिती निजाचरें ॥ ६३६ ॥ एक सदा पडले असती । एकांची ते उन्मादस्थिती । एक सदा गाती नाचती । एक ते होती अबोलणे ॥ ६३७ ॥ एक गर्जनीं हरिनामें । एक निर्दाळिती निजकर्में । एक भूतदयाळू दानधर्में । एक भजननेमें राहती ॥ ६३८ ॥ ऐशा अनंत भक्तस्थिती । सांगतां सांगावया नाकळे वृत्ती । त्यांमाजीं मुख्य संकलितीं । राया तुजप्रती सांगेन ॥ ६३९ ॥ पूर्णप्राप्तीचा मुख्य ठावो । सर्वां भूतीं भगवद्भावो । हाचि पूर्णभक्तीचा निजगौरवो । तोचि अभिप्रावो हरि सांगे ॥ ६४० ॥ सर्व भूतीं मी भगवंत । सर्व भूतें मजआंत । भूतीं भूतात्मा मीचि समस्त । मीचि मी येथ परमात्मा ॥ ६४१ ॥ ऐसें जें पूर्णत्वाचें मीपण । तेणें वाढे आत्माभिमान । सहजें निजनिरभिमान । तें शुद्ध लक्षण ऐक राया ॥ ६४२ ॥ शुद्ध भक्तांचें निजलक्षण । प्रत्यगात्मयाचें जें मीपण । तेंही मानूनियां गौण । भावना पूर्ण त्यांची ऐसी ॥ ६४३ ॥ सर्वां भूती भगवंत । भूतें भगवंती वर्तत । भूतीं भूतात्मा तोचि समस्त । मी म्हणणे तेथ मीपणा न ये ॥ ६४४ ॥ सर्व भूतीं भगवंत पाहीं । भूतें भगवंताचे ठायीं । हें अवघें देखे जो स्वदेहीं । स्वस्वरूप पाहीं स्वयें होय ॥ ६४५ ॥ तो भक्तांमाजीं अतिश्रेष्ठ । तो भागवतांमाजीं वरिष्ठ । त्यासी उत्तमत्वाचा पट । अवतार श्रेष्ठ मानिती ॥ ६४६ ॥ तो योगियांमाजीं अग्रगणी । तो ज्ञानियांचा शिरोमणी । तो सिद्धांमाजीं मुगुटमणीं । हें चक्रपाणी बोलिला ॥ ६४७ ॥ जैशा घृताचिया कणिका । घृतेंसीं नव्हती आणिका । तेवीं भूतें भौतिकें व्यापका । भिन्न देखा कदा नव्हती ॥ ६४८ ॥ हे उत्तम भक्तांची निजस्थिती । राया जाणावी सुनिश्चितीं । आतां मध्यम भक्त कैसे भजती । त्यांची भजनगती ऐक राया ॥ ६४९ ॥ ईश्वरे तदधीनेषु बालिशेषु द्विषत्सु च । प्रेममैत्रीकृपोपेक्षा यः करोति स मध्यमः ॥ ४६ ॥ ईश्वर मानी उत्तमोत्तम । तद्भक्त मानी मध्यम । अज्ञान तो मानी अधम । द्वेषी ते परम पापी मानी ॥ ६५० ॥ ईश्वरी ’प्रेम’ पवित्र । भक्तांसी ’मैत्री’ मात्र । अज्ञानी तो कृपापात्र । उपेक्षा निरंतर द्वेषियांची ॥ ६५१ ॥ हे मध्यम भक्तांची भक्ती । राया जाण ऐशिया रितीं । आतां प्राकृत भक्तांची स्थिती । तेही तुजप्रती सांगेन ॥ ६५२ ॥ अर्चायामेव हरये पूजां यः श्रद्धयेहते । न तद्भक्तेषु चान्येषु स भक्तः प्राकृतः स्मृतः ॥ ४७ ॥ पाषाणप्रतिमा हाचि देवो । तेथेंचि ज्याचा पूर्ण भावो । भक्त-संत-सज्जनांसी पहा वो । अणुमात्र देहो लवों नेदी ॥ ६५३ ॥ ते ठायीं साधारण जन । त्याची वार्ता पुसे कोण । त्यांसी स्वप्नींही नाही सन्मान । यापरी भजन प्राकृताचें ॥ ६५४ ॥ ऐशिया स्थितीं जो जड भक्तु । तो जाणावा मुख्य प्राकृतु । प्रतिमाभंगें अंतु । मानी निश्चित्य देवाचा ॥ ६५५ ॥ यापरी त्रिविध भक्त । सांगितले भजनयुक्त । परी उत्तमांचीं लक्षणें अद्भूत । ती सांगावया चित्त उदित माझें ॥ ६५६ ॥ गृहीत्वापीन्द्रियैरर्थान् यो न द्वेष्टि न हृष्यति । विष्णोर्मायामिदं पश्यन् स वै भागवतोत्तमः ॥ ४८ ॥ > इंद्रियें विषयांतें सेविती । परी सुखदुःख नुमटे चित्तीं । विषय मिथ्यात्वें देखती । ते जाण निश्चितीं उत्तम भक्त ॥ ६५७ ॥ मृगजळीं जेणें केलें स्नान । तो नाहतां कोरडाचि जाण । तेवीं भोगीं ज्यांसी अभोक्तेपण । ते भक्त पूर्ण उत्तमोत्तम ॥ ६५८ ॥ उत्तम भक्त विषय सेविती । हा बोलु रूढला प्राकृतांप्रती । त्यांसी विषयीं नाहीं विषयस्फूर्ती । त्यागिती भोगिती दोनी मिथ्या ॥ ६५९ ॥ स्वप्नींचें केळें रायभोगें । जागा होऊनि खावों मागे । तेणें हातु माखे ना तोंडी लागे । तेवीं विषयसंगें हरिभक्त ॥ ६६० ॥ येथवरी मिथ्या विषयभान । तरी सेवावया त्यांसी काय कारण । येथ प्रारब्ध बळी पूर्ण । तें अवश्य जाण भोगवी ॥ ६६१ ॥ परी मी एक विषयभोक्ता । ही स्वप्नींही त्यास नुमटे कथा । यालागीं उत्तम भागवतता । त्यासीच तत्त्वतां बाणली ॥ ६६२ ॥ यापरी विषयासक्तीं । वर्तिजे उत्तम भक्तीं । याहून अगाध स्थिती । सांगेन तुजप्रती ते ऐक ॥ ६६३ ॥ देहेन्द्रियप्राणमनोधियां यो जन्माप्ययक्षुत् भयतर्षकृच्छ्रैः । संसारधर्मैरविमुह्यमानः स्मृत्या हरेर्भागवतप्रधानः ॥ ४९ ॥ देह-इंद्रिय-मन-बुद्धि-प्राण । हेंचि बंधाचें पंचायतन । क्षुधा तृषा भय क्लेश पूर्ण । जन्ममरण इत्यादि ॥ ६६४ ॥ या पांचां स्थानीं अपार श्रम । या नांव म्हणिजे संसारधर्म । निजभक्तां प्रसन्न आत्माराम । त्यांसी भवभ्रम स्वप्नींही नाहीं ॥ ६६५ ॥ क्षुधा लागलिया दारुण । आन्नआकांक्षें पीडे प्राण । भक्तां क्षुधेची नव्हे आठवण । ऐसें अगाध स्मरण हरीचें ॥ ६६६ ॥ भावें करितां भगवद्भक्ती । क्षुधेतृषेची नव्हे स्फूर्ती । एवढी पावले अगाध प्राप्ती । ते भवभयें निश्चितीं डंडळतीना ॥ ६६७ ॥ मनामाजीं भवभयभरणी । तें मन रातलें हरिचरणीं । आतां भयातें तेथ कोण मानी । मन मनपणीं असेना ॥ ६६८ ॥ मनीं स्फुरे द्वैताची स्फूर्ती । तेथ भवभयाची दृढस्थिती । ते मनीं जाहली हरीची वस्ती । यालागीं भवभयनिवृत्ती द्वैतेंसीं ॥ ६६९ ॥ देहबुद्धीमाजीं जाणा । नानापरी उठती तृष्णा । ते बुद्धी निश्चयें हरीच्या स्मरणा । करितां परिपूर्णा विनटली स्वयें ॥ ६७० ॥ जेथें जें जें स्फुरे तृष्णास्फुरण । तेथें स्वयें प्रगटे नारायण । तेव्हां तृष्णा होय वितृष्ण । विरे संपूर्ण पूर्णामाजीं । ६७१ ॥ यापरी गा तृष्णारहित । हरिस्मरणें भगवद्भक्त । इंद्रियक्लेशां भक्त अलिप्त । तोही वृत्तांत ऐक राया ॥ ६७२ ॥ मुख्य कष्टाचें अधिष्ठान । इंद्रियकर्मीं राया जाण । ते इंद्रियकर्मीं ब्रह्मस्फुरण । हरिभक्तां पूर्ण हरिभजनें ॥ ६७३ ॥ दृष्टीनें घेऊं जातां दर्शन । दृश्यमात्रीं प्रगटे नारायण । श्रवणीं शब्द घेतां जाण । शब्दार्थीं पूर्ण विराजे वस्तु ॥ ६७४ ॥ घ्राणीं घेतां नाना वासु । वासावबोधें प्रगटे परेशु । रसना सेवी जो जो रसु । रसीं ब्रह्मरसु निजस्वादें प्रगटे ॥ ६७५ ॥ देहीं लागतां शीत-उष्ण । अथवा कां मृदु-कठीण । तेथें स्पर्श ज्ञानें जाण । चिन्मात्र पूर्ण प्रगटे स्वयें । ६७६ ॥ आतां कर्मेंद्रियप्रवृत्ती । तेथही स्फुरे ब्रह्मस्फुर्ती । घेणें देणें गमनस्थिती । इंद्रियां गती आत्मारामें ॥ ६७७ ॥ ऐसे करितां इंद्रियें कष्ट । ते कष्टीं होय निजसुख प्रगट । तेणें इंद्रियां विश्रांति चोखट । पिकली स्वानंदपेठ हरिभक्तां ॥ ६७८ ॥ जेणें इंद्रियां कष्ट होती । तेणेंचि इंद्रिया सुखप्राप्ती । हे भगवद्भजनीं निजयुक्ती । भोगिजे हरिभक्ती हरीचेनि स्मरणें ॥ ६७९ ॥ जन्म आणि मरण । हें देहाचे माथां जाण । भक्त देहीं विदेही पूर्ण । ध्यातां हरिचरण हरिरूप जाहले ॥ ६८० ॥ यालागीं देहाची अहंता । कदा नुपजे भगवद्भक्तां । ते भक्तपूर्णतेची कथा । ऐक नृपनाथा सांगेन ॥ ६८१ ॥ देह धरिल्या पंचाननें । भक्त न डंडळी जीवें प्राणें । वंध्यापुत्र सुळीं देणें । देहाचें मरणें तेवीं देखे ॥ ६८२ ॥ छाया पालखीं बैसावी । ऐसें कोणी चिंतीना जीवीं । तैशी देहासी पदवी यावी । हा नुठी सद्भावीं लोभ भक्तां ॥ ६८३ ॥ देहासी आलिया नाना विपत्ती । भक्तां खेदु नुमटे चित्तीं । जेवीं आकाश शस्त्रघातीं । न ये काकुळती तैसे ते ॥ ६८४ ॥ जननीजठरीं देहो जन्मला । भक्तु न म्हणे मी जन्मा आला । रवि थिल्लुरीं प्रतिबिंबला । थिल्लुर मी जाहला कदा न म्हणे ॥ ६८५ ॥ सायंप्रातः सूर्य प्रकाशे । अभ्रीं गंधर्वनगर आभासे । देह प्रतिपाळी अदृष्ट तैसें । म्यां केलें ऐसें स्फुरेना ॥ ६८६ ॥ भक्तदेहासी येतां मरण । हेतुरहित हरीचें स्मरण । यालागीं देह निमाल्या आपण । न मरतां पूर्ण पूर्णत्वें उरें ॥ ६८७ ॥ थिल्लुरा समूळ नाशु झाला । तरी रवि न म्हणे तो निमाला । तेवीं देहो गेलिया भक्त उरला । सद्रूपें संचला हरिस्मरणें ॥ ६८८ ॥ आधीं काय सर्पु मारावा । मग दोरातें दोरु करावा । तो न पालटतां निजगौरवा । दोरूचि अघवा दोररूपें ॥ ६८९ ॥ तेवीं हरिभक्तां देहाच्या अभावो । मा काळ कवणा घालील घावो । आतां आम्ही ते आम्हीच आहों । तें आम्हीपणही वावो आमुचेनि आम्हां ॥ ६९० ॥ एत्यादि संसारदेहधर्म । ज्यासी स्पर्शों न शके कर्माकर्म । मोहें नव्हेचि भवभ्रम । तो भक्तोत्तम प्रधानत्वें ॥ ६९१ ॥ राया आणिकही एक खूण । तुज मी सांगेन संपूर्ण । ज्याचा काम होय नारायण । तें भक्तलक्षण अवधारीं ॥ ६९२ ॥ न कामकर्मबीजानां यस्य चेतसि सम्भवः । वासुदेवैकनिलयः स वै भागवतोत्तमः ॥ ५० ॥ हृदयीं चिंतितां आत्माराम । तद्रूप जाहला हृदयींचा काम । त्यासी सर्व कर्मी पुरुषोत्तम । देवदेवोत्तम तुष्टोनि प्रगटे । ६९३ ॥ तेथें ज्या ज्या वासना हृदयवासी । त्याही पडकल्या हरिमुखासी । एवं वासना जडल्या हरिरूपाशीं । हरि आश्रयो त्यांसी दृढ जाहला ॥ ६९४ ॥ तेथ जो जो भक्तांसी कामु । तो तो होय आत्मारामु । वासनेचा निजसंभ्रमु । पुरुषोत्तमु स्वयें होये ॥ ६९५ ॥ जगीं हरिभक्ति उत्तमोत्तम । भक्त कामेंचि करी निष्काम । चाळितां वासना-अनुक्रम । निर्वासन ब्रह्म प्रकाशे स्वयें ॥ ६९६ ॥ ग्रासोग्रासीं रामस्मरण । तें अन्नचि होय ब्रह्म पूर्ण । भक्त भोगी मुक्तपण । या रीतीं जाण विदेहा ॥ ६९७ ॥ ऐसा जो निष्कामनिष्ठ । तोचि भागवतांमाजीं श्रेष्ठ । त्यासीच प्रधानत्वपट । जाण तो वरिष्ठ उत्तमत्वें ॥ ६९८ ॥ उत्तम भक्त कैसे विचरती । त्या भक्तांची विचरणस्थिती । ते सांगितली राया तुजप्रती । यथानिगुती तीं श्लोकीं ॥ ६९९ ॥ उत्तम भक्त कोणें लिंगेंसी । आवडते जाहले भगवंतासी । तें लक्षण सांगावयासी । अतिउल्हासीं हरि बोले ॥ ७०० ॥ न यस्य जन्मकर्मभ्यां न वर्णाश्रमजातिभिः । सज्जतेऽस्मिन्नहंभावो देहे वै स हरेः प्रियः ॥ ५१ ॥ प्राकृतां देहीं देहाभिमान । तेणें गुरुकृपा करितां भजन । पालटे अभिमानाचें चिन्ह । अहं नारायणभावनायुक्त ॥ १ ॥ अहं देह हें समूळ मिथ्या । अहं नारायण हें सत्य सत्त्वतां । ऐशी भावना दृढ भावितां । ते भावनाआंतौता अभिमान विरे ॥ २ ॥ अभिमान हरिचरणीं लीन । तेव्हां भक्त होय निरभिमान । तेंचि निरहंतेचें लक्षण । हरि संपूर्ण सांगत ॥ ३ ॥ निरहंकाराचीं लक्षणें । तो जन्मोनि मी जन्मलों न म्हणे । सुवर्णाचें केलें शुनें । तरी सोनें श्वान हों नेणे तदाकारें असतां ॥ ४ ॥ तेवीं जन्मादि अहंभावो । उत्तम भक्तां नाहीं पहा हो । कर्मक्रियेचा निर्वाहो । अहंकर्ता स्वयमेवो मानीना ५ ॥ तो कर्म करी परी न म्हणे मी कर्ता । जेवीं गगनीं असोनि सविता । अग्नि उपजवी सूर्यकांता । तेवीं करोनि अकर्ता निजात्मदृष्टीं ॥ ६ ॥ सूर्ये सूर्यकांतीं अग्निसंग । तेणें होतु याग कां दाघ । तें बाधूं न शके सूर्याचें अंग । तेवीं हा चांग करूनि अकर्ता ॥ ७ ॥ अचेतन लोह चुंबकें चळे । लोहकर्में चुंबक न मैळे । तेवीं हा कर्में करूनि सकळें । अनहंकृतिबळें अकर्ता ॥ ८ ॥ देहींचीं कर्में अदृष्टें होती । मी कर्ता म्हणतां तीं बाधती । भक्तां सर्व कर्मीं अनहंकृती । परमात्मप्रतीती भजनयोगें ॥ ९ ॥ एवं देहींचीं कर्में निपजतां । पूर्णप्रतीती भक्त अकर्ता । कर्माकर्माची अवस्था । नेघे तो माथां अनहंकृती ॥ १० ॥ जरी जाहला उत्तमवर्ण । तरी तो न म्हणे मी ब्राह्मण । स्फटिक कुंकुमें दिसे रक्तवर्ण । । "मी लोहीवा पूर्ण" स्फटिक न म्हणे ॥ ११ ॥ ज्यासी नाही देहाभिमान । तो हाती न धरी देहाचा वर्ण । तैसाचि आश्रमाभिमान । भक्त सज्ञान न धरी कदा ॥ १२ ॥ अंगीं बाणला संन्यासु । परी तो न म्हणे मी परमहंसु । जेवी नटाअंगीं रजविलासु । तो राजउल्हासु नट न मानी ॥ १३ ॥ तेवीं आश्रमादि अवस्था । भक्त न धरीच सर्वथा । तैशीच जातीचीही कथा । न घे माथां भक्तोत्तम ॥ १४ ॥ जाती उंच नीच असंख्य । परी तो न म्हणे हे माझीचि एक । जेवीं गंगातीरीं गांव अनेक । परी गंगा माझा एक गांव न म्हणे ॥ १५ ॥ तेवीं जन्म-कर्म-वर्णा-श्रम-जाती । पूर्ण भक्त हातीं न धरिती । चहूं देहांची अहंकृती । स्वप्नींही न धरिती हरिभक्त ॥ १६ ॥ आशंका ॥ तरी काय वर्णाश्रम-जाती । भक्त निःशेष सांडिती । त्यांत असोनि नाहीं अहंकृती । ते हे उपपत्ति बोलिलो राया ॥ १७ ॥ तो जेव्हां पावे जन्मप्राप्ती । तेव्हां त्यासवें नाहीं वर्णाश्रम-जाती । जन्मअभिमानें माथां घेती । हे कुळगोत-जाति पैं माझी ॥ १८ ॥ ऐशा नाथिल्या अहंकृती । ब्रह्मादिक गुंतले ठाती । वाढविता वर्णाश्रम जाती । सज्ञान गुंतती निजाभिमानें ॥ १९ ॥ ऐशी अहंतेची अतिदुर्धर गती । येथें ब्रह्मादिकां नव्हे निवृत्ती । सोडूं नेणे गा कल्पांती । सज्ञान ठाकिजेती निजाभिमानें ॥ २० ॥ येथें भक्तांच्या भाविक स्थितीं । अभिमान तुटे भगवद्भक्तीं । ते निरभिमान भक्तस्थिती । राया तुजप्रती दाविली स्वयें ॥ २१ ॥ समूळ देहाभिमान झडे । तो देहीचि देवासी आवडे । ते भक्त जाण वाडेकोडें । लळेवाडे हरीचे ॥ २२ ॥ ते जें जें मागती कौतुकें । तें देवोचि होय तितुकें । त्यांचेनि परम संतोखें । देव सुखावला सुखें दोंदिल होये ॥ २३ ॥ तो जिकडे जिकडे जाये । देव निजांगें तेउता ठाये । भक्त जेउती वास पाहे । देव ते ते होय पदार्थ ॥ २४ ॥ त्यासी झणीं कोणाची दृष्टी लागे । यालागीं देवो त्या पुढें मागें । त्या सभोवता सर्वांगें । भक्तीचेनि पंगें भुलला चाले ॥ २५ ॥ निरभिमानाचेनि नांवें । देव निजांगें करी आघवें । जेवीं कां तान्हयाचेनि जीवें । जीवें भावें निजजननी ॥ २६ ॥ एवं राखतां निजभक्तांसी । तरी देव धाके निजमानसीं । जरी हा मजसीं आला ऐक्यासी । तरी हे प्रीति कोणासीं मग करावी ॥ २७ ॥ कोणासी पाहों कृपादृष्टीं । कोणापें सांगों निजगोष्टी । कोणासी खेवें देवों मिठी । ऐशी आवडी मोठी प्रेमाची ॥ २८ ॥ या काकुळतीं श्राअनंतु । ऐक्यभावें करी निजभक्तु । मग देवो भक्त दोहींआंतु । देवोचि नांदतु स्वानंदें ॥ २९ ॥ एवं आपुली आपण भक्ती । करीतसे अनन्यप्रीतीं । हेंचि निरूपण वेदांतीं । अद्वैतभक्ति या नांव ॥ ३० ॥ त्यासी चहूं भुजीं आलिंगितां । हांव न बाणेचि भगवंता । मग रिघोनियां आंतौता । परमार्थता आलिंगी ॥ ३१ ॥ ऐसें खेंवाचें मीस करी । तेणें भक्त आणी आपणाभीतरीं । मग आपण त्याआंतबाहेरी । अतिप्रीतीवरी कोंदाटे ॥ ३२ ॥ नवल आवडीचा निर्वाहो । झणीं लागे काळाचा घावो । यालागीं निजभक्तांचा देहो । देवाधिदेवो स्वयें होये ॥ ३३ ॥ ऐसा जो पढियंता परम । तो भागवतांमाजीं उत्तमोत्तम । यापरी भागवतधर्म । पुरुषोत्तम वश्य करी ॥ ३४ ॥ ऐशिया उत्तम भक्ता । भेदाची समूळ नुरे वार्ता । हेचि अभेदभक्तकथा । ऐक नृपनाथा सांगेन ॥ ३५ ॥ न यस्य स्वः पर इति वित्तेष्वात्मनि वा भिदा । सर्वभूतसमः शान्तः स वै भागवतोत्तमः ॥ ५२ ॥ अद्वैतभजनाचे वोजें । मी माझें तूं आणि तुझें । ज्यासी नुरेचि सहज निजें । तो भक्त मानिजे उत्तमत्वें ॥ ३६ ॥ यापरी ज्याचे चित्ताचे ठायीं । भेदु निःशेष उरला नाहीं । तेथ माझें तुझें हें कांहीं । तें निमालें पाहीं जेथींच्या तेथें ॥ ३७ ॥ जेवीं अग्नीशीं जें जें टेंके । तें तें अग्नीचि होऊनि ठाके । तेवीं अभेदभक्त जें जें देखे । तें तें यथासुखें स्वस्वरूप होये ॥ ३८ ॥ निजवित्त आणिकापाशीं देतां । आवांकू नुपजे त्याचिया चित्ता । न देखे पारकेपणाची वार्ता । विकल्प घालितां तरी उपजेना ॥ ३९ ॥ डावे हातींचे पदार्था । उजवे हातीं स्वयें देतां । येथें कोण देता कोण घेता । तेवीं एकात्मता सर्वभूतीं ॥ ४० ॥ आपणासकट सर्व देहीं । भक्तां भगवंतावांचूनि नाहीं । यालागीं शांति त्याचे ठायीं । स्वानंदें पाहीं निःशंक नांदे ॥ ४१ ॥ ऐशिया निजसमशांतीं । भगवद्भक्त क्रीडा करिती । यालागीं उत्तमत्वाची प्राप्ती । सुनिश्चितीं पावले ॥ ४२ ॥ हरिभक्तांची निरपेक्षता । ऐक सांगेन नृपनाथा । उत्तम भक्तांची सांगतां कथा । अतिउल्हासता हरीसी ॥ ४३ ॥ निरपेक्ष तो मुख्य भक्त । निरपेक्ष तो अति विरक्त । निरपेक्ष तो नित्यमुक्त । सत्य भगवंत निरपेक्षी ॥ ४४ ॥ त्रिभुवनविभवहेतवेऽप्यकुण्ठ स्मृतिरजितात्मसुरादिभिर्विमृग्यात् । न चलति भगवत्पदारविन्दात् लवनिमिषार्धमपि यः स वैष्णवाग्र्यः ॥ ५३ ॥ सप्रेमभावें करितां भक्ती । हरिचरणीं ठेविली चित्तवृत्ती । निजस्वार्थाचिये स्थितीं । अतिप्रीतीं निजनिष्ठा ॥ ४५ ॥ तेथें त्रिलोकींच्या सकल संपत्ती । कर जोडूनि वरूं प्रार्थिती । तरी क्षणार्ध न काढी चित्तवृत्ती । भक्त परमार्थी अतिलोभी ॥ ४६ ॥ क्षणार्ध चित्तवृत्ती काढितां । त्रिभुवनविभव ये हाता । एवढिया सांडूनि स्वार्था । म्हणाल हरिभक्तां लाभ कोण ॥ ४७ ॥ हरिचरणीं अपरोक्षस्थिति । तेथील क्षणार्धाची जे प्राप्ती । त्यापुढें त्रिभुवनसंपत्ती । भक्त मानिती तृणप्राय ॥ ४८ ॥ सकळ जगाचा स्रजिता । ब्रह्मा पितामहो तत्त्वतां । त्रैलोक्यराज्यसमर्थता । वोळगे वस्तुतां अंगणीं ज्याचे ॥ ४९ ॥ त्रिभुवनवैभवाचे माथां । ब्रह्मपदाची समर्थता । तो ब्रह्माही निजस्वार्था । होय गिंवसिता हरिचरण ॥ ५० ॥ त्यागोनि ब्रह्मवैभवसंपत्ती । ब्रह्मा बैसोनि एकांतीं । अहर्निशीं हरिचरण चिंती । तरी त्या प्राप्ति सहसा नव्हे ॥ ५१ ॥ सहसा न पवे हरिचरण । यालागीं ब्रह्मा साभिमान । तेणें अभिमानेंचि जाण । नेलीं चोरून गोपाल-वत्सें ॥ ५२ ॥ तेथें न कष्टता आपण । न मोडतां कृष्णपण । गोपाल-वत्सें जाहला संपूर्ण । पूर्णत्वें पूर्ण स्वलीला ॥ ५३ ॥ अगाध हरिलीला पूर्ण । पाहतां वेडावलें ब्रह्मपण । तेव्हां सांडोनि पदाभिमान । अनन्यशरण हरिचरणीं ॥ ५४ ॥ कैलासराणा शूलपाणी । ब्रह्मा लागे ज्याचे चरणीं । तोहि निजराज्य सांडोनी । महाश्मशानीं हरिचरण चिंती ॥ ५५ ॥ कौपीनभस्मजटाधारी । चरणोदक धरोनि शिरीं । हरिचरण हृदयामाझारीं । शिव निरंतरीं चिंतीत ॥ ५६ ॥ एवं ब्रह्मा आणि शंकर । चरणांचे न पवती पार । तेथें त्रैलोक्यवैभव थोर । मानी तो पामर अतिमंदभाग्य ॥ ५७ ॥ हरिचरणक्षणार्धप्राप्ती । त्रैलोक्यराज्यसंपत्ती । भक्त ओंवाळूनि सांडिती । जाण निश्चितीं निंबलोण ॥ ५८ ॥ हरिचरणसारामृतगोडी । क्षणार्ध जैं जोडे जोडी । तैं त्रैलोक्यवैभवाच्या कोडी । करी कुरवंडी निजभक्त भावें ॥ ५९ ॥ एवं हरिचरणांपरतें । सारामृत नाहीं येथें । यालागीं चित्तें वित्तें जीवितें । जडले सुनिश्चितें चरणारविंदी ॥ ६० ॥ निमिषार्ध त्रुटी लव क्षण । जे न सोडिती हरिचरण । ते वैष्णवांमाजीं अग्रगण । राया ते जाण "उत्तम भक्त" ॥ ६१ ॥ जे त्रिभुवनविभवभोग भोगिती । तेही पावले अनुतापवृत्ती । त्यांच्या तापाची निजनिवृत्ती । हरिचरणप्राप्ती तें ऐक ॥ ६२ ॥ भगवत उरुविक्रमाङ्घ्रिशाखा नखमणिचन्द्रिकया निरस्ततापे । हृदि कथमुपसीदतां पुनः स प्रभवति चन्द्र इवोदितेऽर्कतापः ॥ ५४ ॥ थोर हरिचरणाचा पराक्रम । पदें त्रैलोक्य आवरी त्रिविक्रम । ब्रह्मांड भेदोनि पदद्रुम । वाढला परमसामर्थ्यें ॥ ६३ ॥ ते पदद्रुमींचिया दशशाखा । त्याचि दशधा दशांगुलिका । अग्रीं अग्रफळचंद्रिका । नखमणि देखा लखलखित ॥ ६४ ॥ ते नखचंद्रिकेचे चंद्रकांत । चरणचंद्रामृतें नित्य स्रवत । भक्तचकोर ते सेवित । स्वानंदें तृप्त सर्वदा ॥ ६५ ॥ त्यांसी कामादि त्रिविधतापप्राप्ती । सर्वथा बाधूं न शके पुढती । जेवीं सूर्याची संतप्त दीप्ती । चंद्रबिंबाआंतौती कदा न रिघे ॥ ६६ ॥ जे हरिचरणचंद्रचकोर । स्वप्नींही संसारताप न ये त्यांसमोर । ऐसा चरणमहिमा अपार । हरि मुनीश्वर हर्षें वर्णी ॥ ६७ ॥ ’देहे वै स हरेः प्रियः’ । येणें श्लोकें गा विदेह्या । दाविली भक्तिलिंगक्रिया । जाण तू राया सुनिश्चित ॥ ६८ ॥ ’न यस्य स्वः पर इति’ । येणें त्याची धर्मस्थिती । राया सांगितली तुजप्रती । यथानिगुतीं यथार्थ ॥ ६९ ॥ ’यादृश’ म्हणे कैसे असती । भगवद्भजनें स्वानंदतृप्ति । त्रिविध तापांची निवृत्ती । करोनि असती हरिभक्त । ७० ॥ आतां त्यांची बोलती परी । नामें गर्जती निरंतरीं । तेचि ते संक्षेपाकारीं । उपसंहारीं हरि सांगे ॥ ७१ ॥ सकळ लक्षणांची सारस्थिति । प्रेमळाची परमप्रीती । उल्लंघूं न शके श्रीपती । तेही श्लोकार्थीं हरि सांगे ॥ ७२ ॥ विसृजति हृदयं न यस्य साक्षात् हरिरवशाभिहितोऽप्यघौघनाशः । प्रणयरसनया धृताङ्घ्रिपद्मः स भवति भागवतप्रधान उक्तः ॥ ५५ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे परमहंसायां संहितायां एकादशस्कन्धे द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥ अवचटें तोंडा आल्या हरी । सकळ पातकें संहारी । तें हरिनाम निरंतरीं । जे निजगजरीं गर्जती ॥ ७३ ॥ ऐसें ज्यांचे जिव्हेवरी । नाम नाचे निरंतरीं । तें धन्य धन्य संसारीं । स्वानंदें हरि गर्जति ॥ ७४ ॥ सप्रेम सद्भावें संपूर्ण । नित्य करितां नामस्मरण । वृत्ति पालटती आपण । तेंही लक्षण ऐक राया ॥ ७५ ॥ नामासरिसाच हरी । रिघे हृदयामाझारीं । तेणें धाकें अभ्यंतरीं । हों लागे पुरी हृदयशुद्धी ॥ ७६ ॥ तेव्हां प्रपंच सांडोनि वासना । जडोनि ठाके जनार्दना । ’अहं’कारु सांडोनि अहंपणा । सोहं सदनामाजीं रिघे ॥ ७७ ॥ चित्त विसरोनि चित्ता । जडोनि ठाके भगवंता । मनाची मोडली मनोगतता । संकल्प विकल्पता करूं विसरे ॥ ७८ ॥ कृतनिश्चयेंसीं बुद्धी । होऊनि ठाके समाधी । ऐशी देखोनि हृदयशुद्धी । तेथोनि त्रिशुद्धी न रिघे हरी ॥ ७९ ॥ हरिनामप्रेमप्रीतीवरी । हृदयीं रिघाला जो हरी । तो रिघों विसरे बाहेरी । भक्तप्रीतिकरीं कृपाळू ॥ ८० ॥ भक्तें प्रणयप्रीतीची दोरी । तेणें चरण धरोनि निर्धारीं । निजहृदयीं बांधिला हरी । तो कैशापरी निघेल ॥ ८१ ॥ भगवंत महा अतुर्बळी । अदट दैत्यांतें निर्दळी । तो कोंडिला हृदयकमळीं । हे गोष्टी समूळीं मिथ्या म्हणती ॥ ८२ ॥ जो शुष्क काष्ठ स्वयें कोरी । तो कोंवळ्या कमळामाझारीं । भ्रमर गुंतला प्रीतीवरी । केसर माझारीं कुचंबो नेदी ॥ ८३ ॥ तेवीं भक्ताचिया प्रेमप्रीतीं । हृदयीं कोंडिला श्रीपती । तेथ खुंटल्या सामर्थ्यशक्ती । भावार्थाप्रती बळ न चले ॥ ८४ ॥ बाळ पालवीं घाली पिळा । तेणें बाप राहे थोकला । तरी काय तो निर्बळ जाहला । ना तो स्नेहें भुलला ढळेना ॥ ८५ ॥ तेवीं निजभक्त लडेवाळ । त्याचें प्रेम अत्यंत गोड । निघावयाची विसरोनि चाड । हृदयीं सुरवाड हरि मानी ॥ ८६ ॥ ऐसें ज्याचें अंतःकरण । हरि न सांडी स्वयें आपण । तैसेचि हरीचे श्रीचरण । जो सांडिना पूर्ण प्रेमभावें ॥ ८७ ॥ हरीचे ठायीं प्रीति ज्या ऐशी । हरीची प्रीति त्या तैसी । जे अनन्य हरीपाशीं हरि । त्यांसी अनन्य सदा ॥ ८८ ॥ ऐसे जे हरिचरणीं अनन्य । तेचि भक्तांमाजीं प्रधान । वैष्णवांत ते अग्रगण । राया ते जाण ’भागवतोत्तम’ ॥ ८९ ॥ गौण करूनि चारी मुक्ती । जगीं श्रेष्ठ भगवद्भक्ती । त्या उत्तम भक्तांची स्थिती । संक्षेपें तुजप्रती बोलिलों राया ॥ ९० ॥ पूर्ण भक्तीचें निरूपण । सांगतां वेदां पडलें मौन । सहस्रमुखाची जिव्हा पूर्ण । थकोनि जाण थोंटावे ॥ ९१ ॥ ते भक्तीची एकांशता । तुज म्यां सांगितली हे कथा । यावरी परिपूर्णता । राया स्वभावतां तूं जाणशी ॥ ९२ ॥ हरीसारिखा रसाळ वक्ता । सांगतां उत्तमभक्त कथा । तटस्थ पडिलें समस्तां । भक्तभावार्थता ऐकोनी ॥ ९३ ॥ तंव रावो रोमांचित जाहला । रोममूळीं स्वेद आला । श्रवणसुखें लांचावला । डोलों लागला स्वानंदें ॥ ९४ ॥ पूर्ण संतोषोनि मनीं । म्हणे भलें केलें मुनी । थोर निवालों निरूपणीं । श्रवणाची धणी तरी न पुरे ॥ ९५ ॥ ऐकोनि हरीचें वचन । राजा म्हणे हे अवघे जण । अपरोक्षज्ञानें ज्ञानसंपन्न । वक्ते पूर्ण अवघेही ॥ ९६ ॥ भिन्न भिन्न करोनि प्रश्न । आकर्णूं अवघ्यांचें वचन । ऐशिया श्रद्धा राजा पूर्ण । अनुपम प्रश्न पैं करील ॥ ९७ ॥ रायासी कथेची पूर्ण चाड । पुढां प्रश्न करील गोड । जे ऐकतांचि पुरे कोड । श्रोते वाड सुखावती ॥ ९८ ॥ त्या प्रश्नाचें गुह्य ज्ञान । श्रवणीं पाववीन संपूर्ण । वदनीं वक्ता जनार्दन । यथार्थ पूर्ण अर्थवी ॥ ९९ ॥ पांवा नाना मधुर ध्वनी गाजे । परी तो वाजवित्याचेनि वाजे । तेवीं एका जनार्दनीं साजे । ग्रंथार्थवोजें कवि कर्ता ॥ ८०० ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे परमहंस संहितायां एकाकार टीकायां निमिजायंतसंवादे द्वितीयोऽध्यायः ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ ५५ ॥ ओव्या ॥ ८०० ॥
You can donate to the bank account given below
Scan to donate
Merchant Name : Sant Eknath Mission
UPI ID : santeknathmission@sbi
Contact Info :
Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission,
C/O Shri Venimadhav Gosavi,
ShriNath Galli, Shrikshetra Paithan, Dist. Chhatrapati
Sambhajinagar
Pin. 431006
Mobile No : +91 - 9421411135
Email : info@santeknath.org