Marathi / English

अध्याय २१

॥ श्री एकनाथी भागवत ॥

अध्याय एकविसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्‍गुरु वैकुंठनाथा । स्वानंदवैकुंठीं सदा वसता । तुझे ऐश्वर्य स्वभावतां । न कळे अनंता अव्यया ॥ १ ॥ तुझ्या निजबोधाचा गरुड । कर जोडूनि उभा दृढ । ज्याच्या पाखांचा झडाड । उन्मळी सुदृढ भववृक्षा ॥ २ ॥ तुझें स्वानुभवैकचक्र । लखलखित तेजाकार । द्वैतदळणीं सतेजधार । अतिदुर्धर महामारी ॥ ३ ॥ कैसा पांचजन्य अगाध । निःशब्दीं उठवी महाशब्द । वेदानुवादें गर्जे शुद्ध । तोचि प्रसिद्ध शंख तुझा ॥ ४ ॥ झळफळित सर्वदा । निजतेजें मिरवे सदा । करी मानाभिमानांचा चेंदा । ते तुझी गदा गंभीर ॥ ५ ॥ अतिमनोहर केवळ । देखतां उपजती सुखकल्लोळ । परमानंदें आमोद बहळ । तें लीलाकमळ झेलिसी ॥ ६ ॥ जीव शिव समसमानी । जय विजय नांवें दे‌उनी । तेचि द्वारपाळ दोनी । आज्ञापूनी स्थापिले ॥ ७ ॥ तुझी निजशक्ति साजिरी । रमारूपें अतिसुंदरी । अखंड चरणसेवा करी । अत्यादरीं सादर ॥ ८ ॥ तुझे लोकींचे निवासी जाण । अवघे तुजचिसमान । तेथ नाहीं मानापमान । देहाभिमान असेना ॥ ९ ॥ तेथ काळाचा रिगमु नाहीं । कर्माचें न चले कांहीं । जन्ममरणाचें भय नाहीं । ऐशिया ठायीं तूं स्वामी ॥ १० ॥ जेथ कामक्रोधांचा घात । क्षुधेतृषेचा प्रांत । निजानंदें नित्यतृप्त । निजभक्त तुझेनि ॥ ११ ॥ तुझेनि कृपाकटाक्षें । अलक्ष न लक्षितां लक्षें । तुझे चरणसेवापक्षें । नित्य निरपेक्षें नांदविसी ॥ १२ ॥ साम्यतेचें सिंहासन । ऐक्यतेची गादी जाण । त्यावरी तुझें सहजासन । परिपूर्ण स्वभावें ॥ १३ ॥ तन्मयतेचें निजच्छत्र । संतोषाचें आतपत्र । ज्ञानविज्ञानयुग्म चामर । सहजें निरंतर ढळताती ॥ १४ ॥ तेथ चारी वेद तुझे भाट । कीर्ति वर्णिती उद्भीट । अठरा मागध अतिश्रेष्ठ । वर्णिती चोखट वंशावळी ॥ १५ ॥ तेथ साही जणां वेवाद । नानाकुसरीं बोलती शब्द । युक्तिप्रयुक्तीं देती बाध । दाविती विनोद जाणीव ॥ १६ ॥ एक भावार्थी तुजलागुनी । स्तुति करिती न बोलुनी । तेणें स्तवनें संतोषोनी । निजासनीं बैसविसी ॥ १७ ॥ ऐसा सद्गुवरु महाविष्णु । जो चिद्रूपें सम सहिष्णु । जो भ्राजमानें भ्राजिष्णु । जनीं जनार्दनु तो एक ॥ १८ ॥ जनीं जनार्दनुचि एकला । तेथ एकपणें एका मीनला । तेणें एकपणाचाही ग्रास केला । ऐसा झाला महाबोध ॥ १९ ॥ या महाबोधाचें बोधांजन । हातेंवीण लेववी जनार्दन । तेणें सर्वांगीं निघाले नयन । देखणेंपण सर्वत्र ॥ २० ॥ परी सर्वत्र देखतां जन । देखणेनि दिसे जनार्दन । ऐंशी पूर्ण कृपा करून । एकपण सांडविलें ॥ २१ ॥ ऐसा तुष्टोनि भगवंत । माझेनि हातें श्रीभागवत । अर्थविलें जी यथार्थ । शेखीं प्राकृत देशभाषा ॥ २२ ॥ श्रीभागवतीं संस्कृत । उपाय असतांही बहुत । काय नेणों आवडलें येथ । करवी प्राकृत प्रबोधें ॥ २३ ॥ म्यां करणें कां न करणें । हेंही हिरूनि नेलें जनार्दनें । आतां ग्रंथार्थनिरूपणें । माझें बोलणें तो बोले ॥ २४ ॥ तेणें बोलोनि निजगौरवा । वेदविभागसद्भा वा । तो एकादशीं विसावा । उद्धवासी बरवा निरूपिला ॥ २५ ॥ तेथ भक्त आणि सज्ञान । त्यासी पावली वेदार्थखूण । कर्मठीं देखतां दोषगुण । संशयीं जाण ते पडिले ॥ २६ ॥ त्या संशयाचें निरसन । करावया श्रीकृष्ण । एकविसावा निरूपण । गुणदोषलक्षण स्वयें सांगे ॥ २७ ॥ त्या गुणदोषांचा विभाग । सांगोनिया विषयत्याग । करावया श्रीरंग । निरूपण साङ्ग सांगत ॥ २८ ॥ श्रीभगवानुवाच - य एतान्मत्पथो हित्वा भक्तिज्ञानक्रियात्मकान्‌ । क्षुद्रान्कामांश्चलैः प्राणैर्जुषन्तः संसरन्ति ते ॥ १ ॥ हा सांडूनि शुद्ध वेदमार्ग । सकाम भोग जे वांछिती ॥ २९ ॥ क्षणभंगुर देहाचा योग । हें विसरोनियां चांग । सकाम कर्माची लगबग । भवस्वर्गभोग भोगावया ॥ ३० ॥ चळतेनि प्राणसंगें । देहातें काळ ग्रासूं लागे । येथ नानाकर्मसंभोगें । मूर्ख तद्योगें मानिती सुख ॥ ३१ ॥ भोगितां कामभोगसोहळे । नेणे आयुष्य ग्रासिलें काळें । मग जन्ममरणमाळें । दुःख‌उेमाळे भोगिती ॥ ३२ ॥ काम्य आणि नित्यकर्म । आचरतां दिसे सम । तरी फळीं कां पां विषम । सुगम दुर्गम परिपाकु ॥ ३३ ॥ तें कर्मवैचित्र्यविंदान । संकल्पास्तव घडे जाण । तेचि अर्थींचें निरूपण । जाणोनि श्रीकृष्ण सांगत ॥ ३४ ॥ स्वे स्वेऽधिकारे या निष्ठा स गुणः परिकीर्तितः । विपर्ययस्तु दोषः स्यादुभयोरेष निश्चयः ॥ २ ॥ ते मी सांगेन आवश्यक । जेणें सुखःदुख भोगणें घडे ॥ ३५ ॥ मुखाचा व्यापार भोजन । तो नाकें करूं जातां जाण । सुख बुडवूनि दारुण । दुःख आपण स्वयें भोगी ॥ ३६ ॥ कां पायांचें जें चालणें । पडे जैं डो‌ईं करणें । तैं मार्ग न कंठे तेणें । परी कष्टणें अनिवार ॥ ३७ ॥ तेवीं जें कर्म स्वाधिकारें । सुखातें दे अत्यादरें । तेचि कर्म अनधिकारें । दुःखें दुर्धरे भोगवी ॥ ३८ ॥ गजाचें आभरण । गाढवासी नव्हे भूषण । परी भारें आणी मरण । तेवीं कर्म जाण अनधिकारीं ॥ ३९ ॥ मेघ वर्षे निर्मळ जळ । परी जैसें बीज तैसें फळ । एका भांगी पिके सबळ । एका प्रबळ साळी केळें ॥ ४० ॥ पाहें पां जैसें दुग्ध चोख । ज्वरितामुखीं कडू विख । तेंचि निरुजां गोड देख । पुष्टिदायक सेवनीं ॥ ४१ ॥ तेवीं सकामीं कर्म घडे । ते बाधक होय गाढें । तेंचि कर्म निष्कामाकडे । मोक्षसुरवाडें सुखावी ॥ ४२ ॥ स्वाधिकारें स्वकर्माचरण । तोचि येथें मुख्यत्वें गुण । अनधिकारीं कर्म जाण । तोचि अवगुण महादोष ॥ ४३ ॥ या रीतीं गा कर्माचरण । उपजवी दोष आणि गुण । हेंचि गुणदोषलक्षण । शास्त्रज्ञ जाण बोलती ॥ ४४ ॥ तेंचि गुणदोषलक्षण । शुद्ध्यशुद्धींचें कारण । तेचि अर्थींचें विवंचन । देवो आपण सांगत ॥ ४५ ॥ शुद्ध्यशुद्धी विधीयेते समानेष्वपि वस्तुषु । द्रव्यस्य विचिकित्सार्थं गुणदोषौ शुंभाशुभौ ॥ ३ ॥ तेथ गुणदोष अप्रमाण । परी केलें प्रमाण या हेतू ॥ ४६ ॥ न प्रेरितां श्रुतिस्मृती । आविद्यक विषयप्रवृत्ती । अनिवार सकळ भूतीं । सहजस्थितिस्वभावें ॥ ४७ ॥ ऐसी स्वाभाविक विषयस्थिती । तिची करावया उपरती । नाना गुणदोष बोले श्रुती । विषयनिवृत्तीलागुनी ॥ ४८ ॥ हें एक शुद्ध एक अशुद्ध । पैल शुभ हें विरुद्ध । मीचि बोलिलों वेदानुवाद । विषयबाध छेदावया ॥ ४९ ॥ विषयांची जे निवृत्ती । तिची वेदरुपें म्यां केली स्तुति । निंदिली विषयप्रवृत्ती । चिळसी चित्तीं उपजावया ॥ ५० ॥ चालतां कर्मप्रवृत्ती । हो विषयांची निवृत्ती । ऐशी वेदद्वारें केली युक्ती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ५१ ॥ धर्मार्थं व्यवहारार्थं यात्रार्थमिति चानघ । दर्शितोऽयं मयाऽऽचारो धर्ममुद्वहतां धुरम्‌ ॥ ४ ॥ धर्मादि व्यवहारसिद्धी । ऐक तो विधि सांगेन ॥ ५२ ॥ करितांही धर्माचरण । प्रवृत्तिधर्म तो अप्रमाण । निवृत्तिधर्म तो अतिशुद्ध जाण । हे दोषगुण स्वधर्मीं ॥ ५३ ॥ जो व्यवहार विषयासक्तीं । ते अशुद्ध व्यवहारस्थिती । जे परोपकारप्रवृत्ती । तो व्यवहार वंदिती सुरनर ॥ ५४ ॥ अद्रुष्टदाता ईश्वर । हें विसरोनि उत्तम नर । द्रव्यलोभें नीचांचे दारोदार । हिंडणें अपवित्र ते यात्रा ॥ ५५ ॥ आळस सांडोनि आपण । करूं जातां श्रवण कीर्तन । कां तीर्थयात्रा साधुदर्शन । पूजार्थ गमन देवालयीं ॥ ५६ ॥ कां अनाथप्रेतसंस्कार । करितां पुण्य जोडे अपार । पदीं कोटियज्ञफळसंभार । जेणें साचार उपजती ॥ ५७ ॥ जेणें पाविजे परपार । तिये नांव यात्रा पवित्र । हा यात्रार्थसंचार । गुणदोषविचार वेदोक्त ॥ ५८ ॥ राजा निजपादुका हटेंसीं । वाहवी ब्राह्मणाचे शिसीं । तो दोष न पवे द्विजासी । स्वयें सदोषी होय राजा ॥ ५९ ॥ जेवीं आपत्काळबळें जाण । पडतां लंघनीं लंघन । तैं घे‌ऊनि नीचाचें धान्य । वांचवितां प्राण दोष नाहीं ॥ ६० ॥ तेंचि नीचाचें दान । अनापदीं घेतां जाण । जनीं महादोष दारुण । हेंही जाण वेदोक्त ॥ ६१ ॥ जे कर्मधर्मप्रवर्तक शुद्ध । मनुपराशरादि प्रसिद्ध । तिंहीं गुणदोष विविध । शुद्धाशुद्ध बोलिले ॥ ६२ ॥ तेंचि शुद्धाशुद्धनिरूपण । तीं श्लोकीं नारायण । स्वयें सांगताहे आपण । गुणदोषलक्षणविभाग ॥ ६३ ॥ भूम्यंब्वग्न्यनिलाकाशा भूतानां पञ्च धातवः । आब्रह्मस्थावरादीनां शारिरा आत्मसंयुताः ॥ ५ ॥ वेदेन नामरूपाणि विषमाणि विषमाणि समेष्वपि । धातुषृद्धव कल्प्यन्ते एतेषां स्वार्थसिद्धये ॥ ६ ॥ भूतीं पंचभूतें समान । वस्तुही आपण सम सर्वीं ॥ ६४ ॥ नाहीं नाम रूप गुण कर्म । ऐसें जें केवळ सम । तेथ माझेनि वेदें विषम । केलें रूप नाम हितार्थ ॥ ६५ ॥ तळीं पृथ्वी वरी गगन । पाहतां दोनीही समान । तेथ दश दिशा कल्पिल्या जाण । देशांतरगमनसिद्ध्यर्थ ॥ ६६ ॥ तेवीं नाम रूप वर्णाश्रम । समाच्या ठायीं जें विषम । हा माझेनि वेदें केला नेमे स्वधर्मकर्मसिद्ध्यर्थ ॥ ६७ ॥ येणेंचि द्वारें सुलक्षण । धर्मार्थकाममोक्षसाधन । पुरुषांच्या हितालागीं जाण । म्यां केलें नियमन वेदाज्ञा ॥ ६८ ॥ रूप नाम आश्रम वर्ण । वेदु नेमिता ना आपण । तैं व्यवहारु न घडता जाण । मोक्षसाधन तैं कैंचें ॥ ६९ ॥ एवं वेदें चालवूनि व्यवहारु । तेथेंचि परमार्थविचारु । दाविला असे चमत्कारु । सभाग्य नरु तोचि जाणे ॥ ७० ॥ अत्यंत करिता कर्मादरु । तेणें कर्मठचि होय नरु । तेथ परमार्थ नाहीं साचारु । विधिनिषेधीं थोरु पीडिजे ॥ ७१ ॥ केवळ स्वधर्मकर्म सांडितां । अंगीं आदळे पाषंडता । तेणेंही मोक्ष न ये हाता । निजस्वार्था नागवले ॥ ७२ ॥ यालागीं स्वधर्म आचरतां । निजमोक्ष लाभे आ‌इता । हे वेदार्थाची योग्यता । जाणे तो ज्ञाता सज्ञान ॥ ७३ ॥ हे वेदार्थनिजयोग्यता । सहसा न ये कवणाचे हाता । याचिलागीं गा परमार्थ । गुरु तत्त्वतां करावा ॥ ७४ ॥ त्या सद्गुगरूची पूर्ण कृपा होय । तरीच आतुडे वेदगुह्य । गुरुकृपेवीण जे उपाय । ते अपाय साधकां ॥ ७५ ॥ यालागीं माझा वेद जगद्गुेरु । दावी आपातता व्यवहारु । नेमी स्वधर्मकर्मादरु । जनाचा उद्धारु करावया ॥ ७६ ॥ ऐसा माझा वेदु हितकारी । दावूनि गुणदोष नानापरी । जन काढी विषयाबाहेरीं । वेद उपकारी जगाचा ॥ ७७ ॥ देशकालादिभावानां वस्तुनां मम सत्तम । गुणदोषौ विधीयेते नियमार्थं हि कर्मणाम्‌ ॥ ७ ॥ यालागीं उद्धवासी ’सत्तम’ । म्हणे पुरुषोत्तम अतिप्रीतीं ॥ ७८ ॥ उद्धवा येथ भलता नर । भलता करील कर्मादर । यालागीं वर्णाश्रमविचार । नेमिला साचार वेदांनीं ॥ ७९ ॥ जेथ करूं नये कर्मतंत्र । ऐसा देश जो अपवित्र । आणि काळादि द्रव्य विचित्र । पवित्रापवित्र सांगेन ॥ ८० । अकृष्णसारो देशानामब्रह्मण्योऽशुचिर्भवेत्‌ । कृष्णसारोऽप्यसौवीरकीकटासंस्कृतेरिणम्‌ ॥ ८ ॥ पेरिलीं धान्यें सदा निळीं । वसुधा-जिव्हाळी ते म्हणती ॥ ८१ ॥ तेंचि पाहतां पृथ्वीवरी । एके भागीं गा उखरी । मेघ वर्षतां शरधारीं । अंकुरेना डिरी उखरत्वें ॥ ८२ ॥ तेवीं देशाची शुद्ध्यशुद्धी । तुज मी सांगेन यथाविधी । जेथ कर्मीं नोहे कार्यसिद्धी । तेथ कर्म त्रिशुद्धी न करावें ॥ ८३ ॥ कृष्णामृग जेथ नाहीं । ते जाण पां अपवित्र भुयी । कर्मादरु तिये ठायीं । न करावा पाहीं सर्वथा ॥ ८४ ॥ जेथ ब्राह्मणचि नाहीं । तो देश अपवित्र पाहीं । ब्राह्मण अकर्मीं जे ठायी । भूमी तेही अपवित्र ॥ ८५ ॥ जेथ ब्राह्मणाची अभक्ती । शेखों हेळूनि निंदिती । तो देश गा कर्माप्रती । जाण निश्चितीं अपवित्र ॥ ८६ ॥ जे देशीं कृष्णमृग असती । परी नाहीं भगवद्भतक्ती । तो देश कर्मप्रती । जाण निश्चितीं अपवित्र ॥ ८७ ॥ भक्तिहीन देश प्रसिद्ध । कीकट कलिंग मागध । तेथ स्वधर्म नव्हती शुद्ध । जाण अशुद्ध ते देश ॥ ८८ ॥ नाहीं उपलेप संमार्जन । ते स्वगृहीं भूमी अशुद्ध जाण । कां जेथ वेदबाह्य असज्जन । तेंही स्थान अपवित्र ॥ ८९ ॥ जे भूमी केवळ उखर । ते जाण सदा अपवित्र । आतां काळाचें काळतंत्र । पवित्रापवित्र सांगेन ॥ ९० ॥ कर्मण्यो गुणवान्कालो द्रव्यतः स्वत एव वा । यतो निवर्तते कर्म स दोषोऽकर्मकः स्मृतः ॥ ९ ॥ तोचि काळ अतिपवित्र । वेदशास्त्रसंमत ॥ ९१ ॥ ग्रहणकपिलाषष्ठ्यादिद्वारा । तो काळ परम पवित्र खरा । कां संतसज्जन आलिया घरा । काळाचा उभारा अतिपवित्र ॥ ९२ ॥ हो कां संपत्ति आलिया हाता । कां धर्मी उल्हास जेव्हां चित्ता । तो ’पुण्यकाळ’ तत्त्वतां । वेदशास्त्रार्थां अनुकूल ॥ ९३ ॥ पुरुषासी पर्वकाळ । जन्मात जोडे एकवेळ । मातापित्यांचा अंतकाळ । ते धर्माची वेळ अपवित्र ॥ ९४ ॥ हा पर्वकाळ मागुता । पुरुषासी नातुडे सर्वथा । तेथ श्रद्धेनें धर्म करितां । पवित्रता अक्षय ॥ ९५ ॥ स्वभावें काळाची पवित्रता । तुज मी सांगेन आतां । जो उपकारी सर्वथा । निजस्वार्था साधक ॥ ९६ ॥ ब्राह्म मुहूर्त तत्त्वतां । पवित्र जाण स्वभावतां । जो साधकांच्या निजस्वार्था । होय वाढवितां अनुदिनीं ॥ ९७ ॥ काळाची अकर्मकता । ऐक सांगेन मी आतां । कर्म करूं नये स्वभावतां । निषिद्धता महादोषु ॥ ९८ ॥ जेथ जळस्थळादि सर्वथा । विहित द्रव्य न ये हाता । तो काळ अकर्मकता । जाण तत्त्वतां निश्चित ॥ ९९ ॥ जो काळ सूतकें व्यापिला । कां राष्ट्र-उपप्लवें जो आला । जे काळीं देह परतंत्र झाला । तो काळ बोलिला अकर्मक ॥ १०० ॥ जो काळ दुर्भिक्षासी आला । जो कां ज्वरादिदोषीं दूषिला । जो काळ चोराकुलित झाला । तो काळ बोलिला अकर्मक ॥ १ ॥ जे काळीं क्रोध संचरला । जेथ तमोगुण क्षोभला । निद्रा‌आलस्यें व्यापिला । तो काळ बोलिला अकर्मक ॥ २ ॥ अकस्मात सुखसंपदा । कां अभिनव वार्ता एकदा । कां लंघिजे भल्याची मर्यादा । तो काळ सर्वदा अकर्मक ॥ ३ ॥ कां मार्गीं विषमता । पंथ क्रमिजे चालतां । तेथ पडे दुर्धर्षता । तो काळ तत्त्वतां अकर्मक ॥ ४ ॥ जे काळीं द्रव्यलोभ दारुण । जे काळीं चिंता गहन । केव्हां विकल्पें भरे मन । तो काळ जाण अकर्मक ॥ ५ ॥ ऐशी काळाची अकर्मकता । तुज म्यां सांगितली तत्त्वतां । आतां द्रव्याची शुद्धाशुद्धता । ऐक सर्वथा सांगेन ॥ ६ ॥ द्रव्यस्य शुद्ध्यशुद्धी च द्रव्येण वचनेन च । संस्कारेणाथ कालेन महत्त्वाल्पतयाऽथवा ॥ १० ॥ तेंचि ताम्रपात्रें घेतां । ये अपवित्रता तत्काळ ॥ ७ ॥ पुरुषें जळ प्रोक्षितां । पुष्पांसी ये पवित्रता । तेंचि पुरुषें अवघ्राणीतां । अपवित्रता पुष्पासी ॥ ८ ॥ अग्नीची सेवा करितां । द्विजासी परम पवित्रता । तोचि द्विज अग्निहोत्रें जाळितां । ये अपवित्रता अग्नीसी ॥ ९ ॥ दर्भीं पिंड ठेवितां पवित्र । पिंडस्पर्शें दर्भ अपवित्र । ऐशी शुद्ध्यशुद्धी विचित्र । बोले धर्मशास्त्र श्रुत्यर्थें ॥ ११० ॥ जे वस्तु संशयापन्न । त्याच्या शुद्धीसी ब्राह्मणवचन । ज्यांचे वचन प्रमाण । हरिहर जाण मानिती ॥ ११ ॥ घृतसंस्कारें शुद्ध अन्न । होमसंस्कारें नवधान्य । अग्निसंस्कारें लवण । पवित्र जाण शास्त्रार्थें ॥ १२ ॥ राकारापुढें मकार । मांडूनि करितां उच्चार । जिणोनि पापांचा संभार । होय तो नर शुद्धात्मा ॥ १३ ॥ त्याचि मकारापुढें द्यकार । ठेवूनि करितां उच्चार । अंगीं आदळे पाप घोर । तेणें होय नर अतिबद्ध ॥ १४ ॥ रजस्वला शुद्ध चरुर्थाहानीं । मेघोदक शुद्ध तिसरे दिनीं । वृद्धिसूतक दहावे दिनीं । काळ शुद्धपणीं या हेतू ॥ १५ ॥ पूर्व दिवशींचें जें अन्न । तें काळेंचि पावे गा दूषण । ज्यासी आलें शिळेपण । तें अन्न जाण अशुद्ध ॥ १६ ॥ तैसें नव्हे घृतपाचित । तें बहुत काळें तरी पुनीत । जें विटोनि विकारी होत । तें अपुनीत काळेंचि ॥ १७ ॥ जें सांचवणीं अल्प जळ । त्यासी स्पर्शला चांडाळ । तें अपवित्र गा सकळ । नये अळुमाळ स्पर्श करूं ॥ १८ ॥ तेंचि निर्झर कां अक्षोभ जळ । तेथ स्पर्शल्याही चांडाळ । त्यासी लागेना तो विटाळ । तें नित्य निर्मळ पवित्र ॥ १९ ॥ अल्प केलिया स्वयंपाक । त्यासी जैं आतळे श्वान काक । तैं तें सांडावें निःशेख । अपवित्र देख तें अन्न ॥ १२० ॥ तोचि सहस्त्रभोजनाचा पाक । त्यासी आतळल्या श्वान कां काक । सांडावें जेथ लागलें मुख । येर अन्न निर्दोख भोजनी ॥ २१ ॥ शक्त्या‌अशक्त्या अथवा बुद्ध्या समृद्ध्या च यदात्मने । अघं कुर्वन्ति हि यथा देशावस्थानुसारतः ॥ ११ ॥ बाळक वृद्ध आतुर जन । न करितां स्नान दोष नाहीं ॥ २२ ॥ पुत्र जन्मलिया देख । स्वगोत्रज जे सकळिक । त्यांसी जाण आवश्यक । बाधी सूतक दहा दिवस ॥ २३ ॥ तेंचि स्थळांतरीं पुत्रश्रवण । सूतका‌अंतीं झाल्या जाण । त्या सूतकाचें बंधन । न बाधी जाण सर्वथा ॥ २४ ॥ पूर्वदिनीं गोत्रज मरे । तें स्वगोत्रीं सूतक भरे । येरे दिवशीं दुसरा जैं मरे । तैं सूतकें सूतक उतरे दोहींचेंही ॥ २५ ॥ जेणें घेतलें होय विख । त्यासी सर्पु लाविलिया देख । तेणें विखें उतरे विख । तेवीं सूतकें सूतक निवारे ॥ २६ ॥ जें बुद्धीपूर्वक केलें आपण । तें अवश्य भोगावें पापपुण्य । जें बुद्धीसी नाही विद्यमान । तें अहेतुकपणें बाधिना ॥ २७ ॥ आपुलें जें अंतःकरण । त्यासी पवित्र करी निजज्ञान । हे ’बुद्धीची शुद्धि’ जाण । विवेकसंपन्न वैराग्यें ॥ २८ ॥ जो धनवंत अतिसंपन्न । त्यासी जुनें वस्त्र अपावन । शिविलें दंडिलें तेंही जाण । नव्हे पावन समर्था ॥ २९ ॥ तेंचि दुर्बळाप्रति जाण । अतिशयें परम पावन । हे वेदवाद अतिगहन । स्मृतिकारीं जाण प्रकाशिले ॥ १३० ॥ समर्थासी असाक्षी भोजन । तें जाणावें अशुद्धान्न । दुर्बळासी एकल्या अशन । परम पावन श्रुत्यर्थें ॥ ३१ ॥ स्वयें न करितां पंचयज्ञ । भोजन तें पापभक्षण । सकळ सुकृतासी नागवण । जैं पराङ्मुेखपण अतिथीसी ॥ ३२ ॥ स्वग्रामीं सर्वही स्वाचार । ग्रामांतरीं अर्थ आचार । पुरीं पट्टणीं पादमात्र । मार्गीं कर्मादर संगानुसारें ॥ ३३ ॥ विचारोनि देशावस्था । हे धर्ममर्यादा तत्त्वतां । याहूनि अन्यथा करितां । दोष सर्वथा कर्त्यासी ॥ ३४ ॥ पाटव्य असतां स्वदेहासी । कर्म न करी तो महादोषी । रोगें व्यापिल्या शरीरासी । कर्मकर्त्यासी अतिदोष ॥ ३५ ॥ पूर्वीं द्रव्याद्रव्यशुद्धी । सांगितली यथाविधी । तेचि मागुतेनि प्रतिपादी । धर्मशास्त्रसिद्धी वेदोक्त ॥ ३६ ॥ धान्यदार्वस्थितन्तूनां रसतैजसचर्मणाम्‌ । कालवाय्वग्निमृत्तोयैः पार्थिवानां युतायुतैः ॥ १२ ॥ स्त्रुक्स्त्रुवादिकाष्ठभाजन । जलप्रक्षालनें शुद्धत्व ॥ ३७ ॥ व्याघ्रनख गजदंत । अपवित्र जंव स्नेहयुक्त । जेव्हा होती स्नेहतीत । अतिपूनीत ते काळीं ॥ ३८ ॥ पट्टतंतु स्वयें पुनीतु । वायूनें शुद्ध ऊर्णातंतु । वस्त्रतंतु जळा‌आंतु । होय पुनीतु प्रक्षाळिल्या ॥ ३९ ॥ गोक्षीर पवित्र कांस्यमृत्पात्रीं । तेंचि अपवित्र ताम्रपात्रीं । ताम्र पवित्र आम्लेंकरीं । आम्ल लवणांतरीं पवित्र ॥ १४० ॥ घृत पवित्र अग्निसंस्कारीं । अग्नि पवित्र ब्राह्मणमंत्रीं । ब्राह्मण पवित्र स्वाचारीं । पवित्रता आचारीं वेदविधीं ॥ ४१ ॥ वेद पवित्र गुरुमुखें । गुरु पवित्र निजात्मसुखें । आत्मा पवित्र गुरुचरणोदकें । पवित्र उदकें द्विजचरणीं ॥ ४२ ॥ पृथ्वी पवित्र जळसंस्कारीं । जळ पवित्र पृथ्वीवरी । चर्म पवित्र तैलेंकरीं । तेल चर्मपात्रीं पवित्र ॥ ४३ ॥ व्याघ्रादि जें मृगाजिन । इयें स्वभावें पवित्र जाण । अग्निसंस्कारें सुवर्ण । पवित्रपण स्वभावें ॥ ४४ ॥ एवं इत्यादि परस्परीं । शुचित्व बोलिलें स्मृतिशास्त्रीं । आतां मळलिप्त झालियावरी । त्यांचेही अवधारीं शुचित्व ॥ ४५ ॥ अमेध्यलिप्तं यद्येन गन्धं लेपं व्यपोहति । भजते प्रकृतिं तस्य तच्छौचं तावदिष्यते ॥ १३ ॥ त्या गंधाचें निःशेष क्षालन । तेणें पवित्रपण तयासी ॥ ४६ ॥ नाभीखालता ज्याच्या शरीरा । अमेध्यलेप लागल्या खरा । ते ठायींचा गंधु जाय पुरा । ऐसें धुतल्या त्या नरा शुचित्व लाभे ॥ ४७ ॥ नाभीवरतें अमेध्यलेपन । अवचटें झालिया जाण । तैं करावें मृत्तिकास्नान । तेणें पावन तो पुरुष ॥ ४८ ॥ मळ धुतल्या तत्काळ जाती । परी त्या गंधाची होय निवृत्ती । प्रकृति पावे जैं निजस्थिती । ’मळनिष्कृति’ त्या नांव ॥ ४९ ॥ बाह्य पदार्थ निवृत्तिनिष्ठें । वेद बोलिला या खटापटें । आतां कर्त्याचें शुचित्व प्रकटे । ते ऐक गोमटे उपाय ॥ १५० ॥ स्नानदानतपोऽवस्थावीर्यसंस्कारकर्मभिः । मत्स्मृत्या चात्मनः शौचं शुद्धः कर्माचरेद्‌द्विजः ॥ १४ ॥ चौल तें कुमारावस्था जाण । ब्राह्मणपण उपनयनें ॥ ५१ ॥ कर्मभूमिकेलागीं स्नान । द्रव्यशुद्धीलागीं कीजे दान । वैराग्यलागीं तप जाण । कर्माचरण जडत्वत्यागा ॥ ५२ ॥ माझिया भजनीं दृढबुद्धि । त्या नांव जाण ’वीर्यशुद्धि’ । माझेनि स्मरणें ’चित्तशुद्धि’ । जाण त्रिशुद्धि उद्धवा ॥ ५३ ॥ ऐस‌ऐेसिया विधीं । ब्राह्मण जे कां सुबुद्धी । सबाह्य पावावया शुद्धी । वेद उपपादी स्वकर्में ॥ ५४ ॥ मंत्रस्य च परिज्ञानं कर्मशुद्धिर्मदर्पणम्‌ । धर्मः संपद्यते षड्‌भिरधर्मस्तु विपर्ययः ॥ १५ ॥ इयें कर्त्याचे शुद्धीकारणें । साही लक्षणें वेदु बोले ॥ ५५ ॥ देश-काळ-द्रव्यसंपन्नता । मंत्र-कर्म-निरुज कर्ता । या साहींच्या शुद्धावस्था । स्वधर्मता फलोन्मुख ॥ ५६ ॥ जें द्रव्य पावे दीनांचे आर्ता । कां माझिया निजभक्तां । या नांव ’द्रव्यपवित्रता’ । जाण तत्त्वतां निश्चित ॥ ५७ ॥ धर्मशास्त्रार्थें शुद्ध धन । कष्टें मिळवूनियां आपण । धनलोभीं ठेविल्या प्राण । अवघेंचि जाण अशुद्ध ॥ ५८ ॥ या नांव ’द्रव्यशुद्धता’ । ऐक मंत्राची पवित्रता । जेणें मंत्रें पाविजे मंत्रार्था । शुद्ध सर्वथा तो मंत्र ॥ ५९ ॥ जेथ केलिया मंत्रग्रहण । अंगीं चढता वाढे अभिमान । कां जेथ जारण-मारण-उच्चाटण । तें मंत्र जाण अपवित्र ॥ १६० ॥ या नांव ’मंत्रशुद्धि’ जाण । ऐक कर्माचें लक्षण । जेणें कर्में तुटे कर्मबंधन । तें कर्माचरण अतिशुद्ध ॥ ६१ ॥ स्वयें करितां कर्माचरण । जेणें खवळें देहाभिमान । कर्त्यासी लागे दृढ बंधन । तें कर्म जाण अपवित्र ॥ ६२ ॥ जेणें कर्में होय कर्माचा निरास । तें शुद्ध कर्म सावकाश । जेथ समबुद्धि सदा अविनाश । तो ’पुण्यदेश’ उद्धवा ॥ ६३ ॥ जरी सुक्षेत्रीं केला वास । आणि पराचे देखे गुणदोष । तो देश जाणावा तामस । अचुक नाश कर्त्यासी ॥ ६४ ॥ अन्य क्षेत्रीं देखिल्या दोष । त्याचा सुक्षेत्रीं होय नाश । सुक्षेत्रीं देखिल्या दोष । तो न सोडी जीवास कल्पांतीं ॥ ६५ ॥ जेथ उपजे साम्यशीळ । तो देश जाणावा निर्मळ । चित्त सुप्रसन्न जे वेळ । तो ’पुण्यकाळ’ साधकां ॥ ६६ ॥ स्वभावें शुद्ध ब्राह्ममुहूर्त । तेथही क्षोभल्या चित्त । तोही काळ अपुनीत । जाण निश्चित वेदार्थ ॥ ६७ ॥ येथ जो कां कर्मकर्ता । त्याची गेलिया कर्म‌अतहंता । पुढें कर्म चाले स्वभावतां । हे ’पवित्रता कर्त्याची’ ॥ ६८ ॥ येथ जो म्हणे ’ अहं कर्ता ’ । तो पावे अतिबद्धता । हे कर्त्याची अपवित्रता । देह‌अरहंता अभिमानें ॥ ६९ ॥ धर्मधर्माचे साही प्रकार । हें वेदार्थाचें तत्त्वसार । येही धर्मीं मुक्त होय नर । अधर्मीं अपवित्र अतिबद्ध ॥ १७० ॥ गुणदोषांचें लक्षण । सांगतां अतिगहन । येथ गुंतले सज्ञान । अतिविचक्षण पंडित ॥ ७१ ॥ क्कचिद्गु"णोऽपि दोषः स्याद्दोषोऽपि विधिना गुणः । गुणदोषार्थनियमस्तद्‌भिदामेव बाधते ॥ १६ ॥ एवं कर्मचि कर्मासी जाण । दोष दारुण उपजवी ॥ ७२ ॥ कर्मीं मुख्यत्वें गा आचमन । हें कर्मशुद्धीचें निजकारण । तेंचि दक्षिणाभिमुखें केल्या जाण । दोष दारुण उपजवी ॥ ७३ ॥ कानींची जेणें जाय तिडिक । तेंचि मुखीं घालितां देख । होय अत्यंत बाधक । प्राणांतिक अतिबाधा ॥ ७४ ॥ आचमनीं माषमात्र जीवन । घेतल्या हो‌ईजे पावन । तेंचि अधिक घेतां जाण । सुरापानसम दोष ॥ ७५ ॥ फणस खातां लागे गोड । तें जैं अधिक खाय तोंड । तैं शूळ उठे प्रचंड । फुटे ब्रह्मांड अतिव्यथा ॥ ७६ ॥ सूर्यपूजनीं पुण्य घडे । तेथ जैं बेलपत्र चढे । तैं पुण्य राहे मागिलीकडे । दोष रोकडे पूजकां ॥ ७७ ॥ ऐसा कर्मीं कर्मविन्यास । गुण तोचि करी दोष । कोठें दोषांचाही विलास । पुण्य बहुवस उपजवी ॥ ७८ ॥ चोराकुलितमार्गीं जाण । ब्राह्मण करितां प्रातःस्नान । तो नेतां कर्म त्यागून । दोषचि परी गुण गंभीर होय ॥ ७९ ॥ सर्पगरळेचें जीवन । ब्राह्मणें करितां प्राशन । तें पात्र घेतां हिरोन । दोषचि परी गुण गंभीर होय ॥ १८० ॥ गृहस्थासी अग्निहोत्र गुण । तोचि संन्याशासी अवगुण । ब्राह्मणीं विहीत वेदमंत्रपठण । शूद्रासी जाण तो दोष ॥ ८१ ॥ विषयनिवृत्तीलागीं सुगम । गुणदोषांचा केला नेम । हें नेणोनि वेदाचें वर्म । विषयभ्रम भ्रांतासी ॥ ८२ ॥ जंव भ्रांति तंव कर्मप्रवृत्ती । तेथ गुणदोषांची थोर ख्याती । जेवीं कां खद्योत लखलखिती । आंधारे रातीं सतेज ॥ ८३ ॥ तेवीं गुणदोषांमाजीं जाण । अवश्य अंगी आदळे पतन । तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ८४ ॥ समानकर्माचरणं पतितानां न पातकम्‌ । औत्पत्तिको गुणः सङ्गो न शयानः पतत्यधः ॥ १७ ॥ त्यांसी मद्यपानादिदोषीं जाण । नाहीं पतन पतितांसी ॥ ८५ ॥ जें नीळीमाजीं काळें केलें । त्यासी काय बाधावें काजळें । कां अंधारासी मसीं मखिलें । तेणें काय मळलें तयाचें ॥ ८६ ॥ जो स्वभावें जन्मला चांडाळ । त्यासी कोणाचा बाधी विटाळ । हो कां काळें करवें काजळ । ऐसें नाहीं बळ कीटासी ॥ ८७ ॥ निर्जीवा दीधलें विख । तेणें कोणासी द्यावें दुःख । तेवीं पतितासी पातक । नव्हे बाधक सर्वथा ॥ ८८ ॥ जो केवळ खालें निजेला । त्यासी पडण्याचा भेवो गेला । तेवीं देहाभिमाना जो आला । तो नीचाचा झाला अतिनीच ॥ ८९ ॥ रजतमादि गुणसंगीं । जो लोलंगत विषयांलागीं । त्यासी तिळगुळादि कामभोगीं । नव्हे नवी आंगीं देहबुद्धी ॥ १९० ॥ जो कनकबीजें भुलला । तो गाये नाचे हरिखेला । परी संचितार्थ चोरीं नेला । हा नेणेचि आपुला निजस्वार्थ ॥ ९१ ॥ तेवीं देहाभिमानें उन्मत्त । अतिकामें कामासक्त । तो नेणे बुडाला निजस्वार्थ । आपुला अपघात देखेना ॥ ९२ ॥ ज्यासी चढला विखाचा बासटा । त्यासी पाजावी सूकरविष्ठा । तेवीं अतिकामी पापिष्ठा । म्यां स्वदारानिष्ठा नेमिली ॥ ९३ ॥ ज्यासी विख चढलें गहन । त्यासी सूकरविष्ठेचें पान । हें ते काळींचें विधान । स्वयें सज्ञान बोलती ॥ ९४ ॥ तेवीं जेथवरी स्त्रीपुरुषव्यक्ती । तेथवरी स्वेच्छा कामासक्ती । त्याची करावया निवृत्ति । स्वदारास्थिति नेमिली वेदें ॥ ९५ ॥ वेदें निरोप दिधला आपण । तैं दिवारातीं दारागमन । हेंही वेदें नेमिलें जाण । स्वदारागमन ऋतुकाळीं ॥ ९६ ॥ तेथ जन्मलिया पुत्रासी । ’आत्मा वै पुत्रनामाऽसी’ । येणें वेदवचनें पुरुषासी । स्त्रीकामासी निवर्तवी ॥ ९७ ॥ निःशेष विष उतरल्यावरी । तो सूकरविष्ठा हातीं न धरीं । तेवीं विरक्ति उपजल्या अंतरीं । स्वदारा दूरी त्यागिती ॥ ९८ ॥ यापरी विषयनिवृत्ती । माझ्या वेदाची वेदोक्ती । दावूनि गुणदोषांची उक्ती । विषयासक्ती सांडावी ॥ ९९ ॥ यतो यतो निवर्तेत विमुच्येत ततस्ततः । एष धर्मो नृणां क्षेमः शोकमोहभयापहः ॥ १८ ॥ यालागीं गुणदोष दावित । विषयत्यागार्थ उपावो ॥ २०० ॥ एका‌एकीं सकळ विषयांसी । त्याग न करवे प्राण्यासी । यालागीं निषेधें निंदूनि त्यांसी । शनैःशनैः विषयांसी त्यागावी ॥ १ ॥ जों जों विषयांची निवृत्ती । तों तों निजसुखाची प्राप्ती । पूर्ण बाणल्या विरक्ती । साधक होती मद्रूप ॥ २ ॥ मद्रूपतेचिये प्राप्तीं । अडवी असे विषयासक्ती । ते झालिया विषयनिवृत्ती । साधक होती मद्रूप ॥ ३ ॥ जेथ माझिया स्वरूपाची प्राप्ती । तेथ निःशेष निमे अहंकृती । तेव्हा शोकमोहाची होय शांती । जाय निश्चितीं अविद्या ॥ ४ ॥ अविद्यानाशासवें जाण । नाशती जन्मभाव दारुण । तेव्हां मरणासीच ये मरण । हारपे जीवपण जीवाचें ॥ ५ ॥ अविद्या निमाल्या जीवेंसीं । ठावो नाहीं भवभयासी । जेवीं सबळबळें अंधारेंसीं । नुरेचि निशी दिनोदयीं ॥ ६ ॥ जेवीं कां मृगजळाचा पूर । न साहे दृष्टीचा निर्धार । तेवीं भवभयेंसीं संसार । झाला साचार वा‌उगा ॥ ७ ॥ प्राणी पावावया कल्याण । हे वेदोक्त स्वधर्माचरण । विषयत्यागालागीं जाण । केलें निरूपण गुणदोषां ॥ ८ ॥ जे साच वेदार्थातें नेणती । ते वेदा प्रवृत्तिपर म्हणती । परी वेदें द्योतिली विरक्ती । विषयासक्तिच्छेदक ॥ ९ ॥ वेदोक्त स्वधर्मस्तिथीं । होय विषयांची विरक्ती । प्राणी निजमोक्ष पावती । हे वेदोक्ती पैं माझी ॥ २१० ॥ हे सांडोनियां वेदस्थिती । केवळ विषयांची आसक्ति । प्राणी अतिदुःख पावती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ११ ॥ प्रवृत्ति तितुकी अनर्थहेतु । येचि अर्थींचा वृत्तांतु । चौं श्लोकीं श्रीभगवंतु । असे सांगतु उद्धवा ॥ १२ ॥ विषयेषु गुणाध्यासात्पुंसः सङ्गस्ततो भवेत्‌ । सङ्गात्तत्र भवेत्कामः कामादेव कलिर्नृणाम्‌ ॥ १९ ॥ कलेर्दुर्विषहः क्रोधस्तमस्तमनुवर्तते । तमसा ग्रस्यते पुंसश्चेतना व्यापिनी द्रुतम्‌ ॥ २० ॥ त्यासी विषयासक्ती जाण । अतिगहन उल्हासे ॥ १३ ॥ विषयासक्तीचा संभ्रम । तेणें निर्लज्ज खवळे काम । कामास्तव अतिविषम । सोशी दुर्गम उपाय ॥ १४ ॥ विषयकामार्थ जे उपाय । त्यासी प्रतिपदीं अपाय । जेव्हां विषयकामसिद्धी न होय । तेव्हा महाकलह विवादु ॥ १५ ॥ जेथ अतिजल्पाचा विवाद । तेथ खटाटोपेंसीं सन्नद्ध । खवळला उठी क्रोध । अतिविरुद्ध दुर्धर ॥ १६ ॥ क्रोध खवळल्या दारुण । बुद्धीचें तत्काळ नासे ज्ञान । तेव्हां विवेकाचें प्राशन । करी जाण महामोह ॥ १७ ॥ विवेकाचें लोपल्या भान । स्तब्ध चेतना होय जाण । तेव्हां कार्याकार्य‌आाठवण हेंही स्मरण बुडालें ॥ १८ ॥ तया विरहितः साधो जन्तुः शून्याय कल्पते । ततोऽस्य स्वार्थविभ्रंशो मूर्च्छितस्य मृतस्य च ॥ २१ ॥ न कळे सन्मार्गपंथ । आत्मघात पदोपदीं ॥ १९ ॥ केवळ जड मूढ हो‍ऊनी । जेवीं कां मूर्च्छित प्राणी । तैसेपरी स्तब्ध हो‍ऊनी । अज्ञानपणीं श्रमला ॥ २२० ॥ यापरी जीत ना मेला । जड मूढ हो‍ऊनी ठेला । थित्या निजस्वार्था मुकला । अंगीं वाजला अनर्थु ॥ २१ ॥ विषयाभिनिवेशेन नात्मानं वेद नापरम्‌ । वृक्षजीविकया जीवन्‌ व्यर्थं भस्त्रेव यः श्वसन ॥ २२ ॥ तेव्हा एकीहि स्फुरेना स्फूर्ती । मी कोण हें चित्तीं स्फुरेना ॥ २२ ॥ ऐसा भ्रमें भुलला प्राणी । जैसा उन्मत्त मदिरापानी । त्यासी स्मरणाची विस्मरणी । भ्रमिस्त मनीं पडिला ॥ २३ ॥ कां विषमसंधीज्वरु । तेणें ज्वरें हुंबरे थोरु । त्यासी नावडे आपपरु । वृथा विकारु बडबड करी ॥ २४ ॥ फाटां फुटलियावरी । भलतेंचि स्मरण करी । तया नाठवे कांहीं ते परी । प्राणी अघोरीं पडले जाण ॥ २५ ॥ कां झालिया भूतसंचार । प्राणी हुंबरें हुंहुंकार । पडिला चित्तासी विसर । म्हणे मी कुकर म्हणोनि भुंके ॥ २६ ॥ ऐसें जीविके नेणोनि प्राणी । घाबरे जैसा स्वप्नीं । म्हणे मी पडलों रणीं । ऐसे प्राणी स्वप्नीं भुलले ॥ २७ ॥ तैशी भुली लटकी भुलवणी । काममोहें व्यापिले प्राणी । जडमूढपण ठाकूनी । अंतःकरणीं वेडावले ॥ २८ ॥ मुक्यानाकीं भरे मुरकुट । तें फेंफें बें बें करी निकृष्ट । न कळे रडे करी हाहाट । ते खटपट वा‌उगी ॥ २९ ॥ तैसे दुःखबळें प्राणी । परी न कळे उंच करणी । पडिले मोहमदें भुलोनी । मुकपणीं बेंबात ॥ २३० ॥ अहंकृतीचा उभारा । शरीरीं भरलासे वारा । तो हो‍ऊनि बाधक नरा । पडले आडद्वारा अंधकूपीं ॥ ३१ ॥ कां तेलियाचा ढोर पाहीं । डोळां झांपडी स्वदेहीं । अवघा वेळ चाले परी पाहीं । पंथ कांहीं न ठकेचि ॥ ३२ ॥ भवंता फिरे लागवेगीं । परी पाहतां न लगे आगी । घाणियाचि भोंवतें वेगीं । भोवंडी अंगीं जिराली ॥ ३३ ॥ तैसे विषय भवंडित भवु । परी नकळेचि विधिमावु । जैसा सर्प भ्रमला लागे धांवूं । तैसे विषय आघवे धावंति ॥ ३४ ॥ अंवसेचें काळे गडद । तैसा जड मूढ झाला स्तब्द । स्फुरेना आप पर हा बोध । जगदांध्य वोढवलें ॥ ३५ ॥ जेंवी लोहकाराची भाती । तेवीं वृथा श्वासोच्छ्‌वास होती । वृक्षाची जैसी तटस्थ स्थिती । यापरी जीती जीत ना मेलीं ॥ ३६ ॥ सकामासी स्वर्गप्राप्ती । म्हणसी बोलिली असे वेदोक्ती । तेही प्रलोभाची वदंती । ऐक तुजप्रतीं सांगेन ॥ ३७ ॥ फलश्रुतिरियं नृणां न श्रेयो रोचनं परम्‌ । श्रेयो विवक्षया प्रोक्तं यथा भैषज्यरोचनम्‌ ॥ २३ ॥ त्यांसी दावूनियां फलश्रुती । स्वकर्मप्रवृत्तीं लाविले ॥ ३८ ॥ सकाम अथवा निष्काम । कर्मक्रिया दोंहीची सम । येथ वासनाचि विषम । सकामनिष्कामफलहेतू ॥ ३९ ॥ जेवीं कां स्वातीचें जळ । शिंपीमाजीं होय मुक्ताफळ । तेंचि सेवी जैं महाव्याळ । तैं हळाहळ हो‍ऊनि ठाके ॥ २४० ॥ तेवीं आपुली जे कां कल्पना । निष्कामें आणी मुक्तपणा । तेचि सकामत्वें जाणा । द्रुढबंधना उपजवी ॥ ४१ ॥ वेदु बोलिला जें स्वर्गफल । तें मुख्यत्वें नव्हे केवळ । जेवीं भेषज घ्यावया बाळ । दे‌ऊनि गूळ चाळविजे ॥ ४२ ॥ ओखद घेतलियापाठीं । क्षयरोगाची होय तुटी । परी बाळ हातींचा गूळ चाटी । ते नव्हे फळदृष्टी भेषजीं ॥ ४३ ॥ तेवीं वेदाचे मनोगतीं । स्वर्गफळाची अभिव्यक्ती । मूर्खासी द्यावया मुक्ती । स्वधर्मस्थिती लावितु ॥ ४४ ॥ म्हणसी कर्मवादि जे नर । वेद सांगती प्रवृत्तिपर । तो वेदार्थ निर्वत्तितत्पर । केवीं साचार मानावा ॥ ४५ ॥ श्रुत्यर्थ जैं प्रवृत्ति धरी । तैं वेदु झाला अनर्थकारी । ते प्रवृत्ति दूषूनि श्रीहरी । दावी निवृत्तिवरी वेदार्थ ॥ ४६ ॥ उत्पत्त्यैव हि कामेषु प्राणेषु स्वजनेषु च । आसक्तमनसो मर्त्या आत्मनोऽनर्थहेतुषु ॥ २४ ॥ न तानविदुषः स्वार्थं भ्राम्यतो वृजिनाध्वनि । कथं युञ्ज्यात्पुनस्तेषु तांस्तमो विशतो बुधः ॥ २५ ॥ देहात्मवादें विषयांसी । जीवेंप्राणेंसीं लोलुप ॥ ४७ ॥ विषयकामाच्या आसक्तीं । स्त्रीपुत्रांची गोडी चित्तीं । स्वजनधनांची अतिप्रीती । स्वभावस्थिती अनिवार ॥ ४८ ॥ जेणें जा‌इजे अधोगती । ऐशी जे कां कामासक्ती । ते प्राण्यासी सहजगती । विषयासक्ती स्वभावें ॥ ४९ ॥ तेचि विषयांची प्रवृत्ती । वेद बोले जैं विध्युक्ती । तैं सर्वांचा स्वार्थघाती । झाला अनर्थीं वेदवादु ॥ २५० ॥ मरतया तरटमारु केला । बुडत्याचे डोयीं दगड दीधला । आंधळा अंधकूपीं घातला । तैसा वेदु झाला अनर्थीं ॥ ५१ ॥ वेदु जैं विषयीं गोंवी । तैं प्राण्यातें कोण उगवी । राजा सर्वस्वें नागवी । तैं कोण सोडवी दीनतें ॥ ५२ ॥ नेणोनि वेदींचा मथितार्थु । स्वयें जो कां विषयासक्तु । तो मानी प्रवृत्तिपर श्रुत्यर्थु अनर्थहेतु बालिशां ॥ ५३ ॥ पुत्र पित्यास पुसे जाण । ग्रहणीं जेवूं परमान्न । येरू म्हणे सुटल्या ग्रहण । उष्ण भोजन स्वगृहीं करूं ॥ ५४ ॥ तैशी माझ्या वेदाची उक्ती । निषेधमुखें दावी प्रवृत्ती । येणें वेदाच्या मनोगतीं । विषयनिवृत्ती मुख्यत्वें ॥ ५५ ॥ विषयीं बुडते जे जन । त्यांचें करावया उद्धरण । माझा वेदवादु जाण । सकामपण त्या नाहीं ॥ ५६ ॥ कोणी एक मंदबुद्धी । केवळ विषयांध त्रिशुद्धी । ते सकाम जल्पती वेदविधी । त्यांची कुबुद्धी हरि सांगे ॥ ५७ ॥ एवं व्यवसितं केचिदविज्ञाय कुवुद्धयः । फलश्रुतिं कुसुमितां न वेदज्ञा वदन्ति हि ॥ २६ ॥ यालागीं वेद बोले फलश्रुती । स्वधर्मप्रवृत्तीलागुनी ॥ ५८ ॥ सैंधव सागरा भेटूं जातां । जेवीं कां हारपे सैंधवता । तेवीं स्वधर्मीं प्रवर्ततां । सकामता उरेना ॥ ५९ ॥ जैशी दों दिव्यांची वाती । एकवट केलिया ज्योती । तेथ न दिसे भेदगती । पाहतां ज्योती एकचि ॥ २६० ॥ जेवीं अग्नीं कापुर मिळतां । तो अग्नीचि होय तत्त्वतां । तेवीं स्वधर्मकर्मीं प्रवर्ततां । कर्मीं निष्कर्मता स्वयें प्रकटे ॥ ६१ ॥ कर्माकर्मांची वेळुजाळीं । ते स्वधर्माचे कांचणिमेळीं । पडे नित्तशुद्धीची इंगळी । ते करी होळी कर्माकर्मांची ॥ ६२ ॥ सकामता करितां कर्म । स्वधर्म नाशी फळकाम । तेव्हां सकाम आणि निष्काम । दोंहींचें भस्म स्वधर्म करी ॥ ६३ ॥ जेवीं दों काष्ठांच्या घसणी । माजीं प्रकटे जो कां वन्ही । तो दोंहीतेंही जाळूनी । स्वतेजपणीं प्रकाशे ॥ ६४ ॥ तेवीं माझा वेदवादु । स्वकर्में छेदी कर्मबाधु । हें नेणोनि जे विषयांधु । जडल्या सुबद्धु फळशो ॥ ६५ ॥ वेदें प्रवृत्तिरोचनेकारणें । स्वर्गाचि नाना फलें बोलणें । त्यांलागीं ज्याचें बैसे धरणें । तेणें नागवणें निजस्वार्थां ॥ ६६ ॥ कष्टोनि शेतीं पेरिले चणे । त्यांची उपडोनि भाजी करणें । तो लाभ कीं तेणें नाडणें । तैसें फळ भोगणें सकार्मीं ॥ ६७ ॥ वोलीं जोंधळियाचीं करबाडें । खातां अत्यंत लागतीं गोडें । त्यालागीं शेत जैं उपडे । तैं लाभु कीं नाडे निजस्वार्था ॥ ६८ ॥ तैशी सकामकामना‌उन्मत्तें । जें फळीं फळाशालोलिंगतें । ते नाडलीं स्वधर्मलाभातें । ऐक तूतें सांगेन ॥ ६९ ॥ शेतीं पेरावया आणिले चणे । त्यांचे आदरें करी जो फुटाणे । तो शाहणा कीं मूर्ख म्हणणें । तैसें फळ भोगणें सकामीं ॥ २७० ॥ घोडा विकोनि पलाण घेणें । लोणी दे‌ऊनि ताक मागणें । भात सांडूनि वेळण पिणें । तैसें फळ भोगणें सकामीं ॥ ७१ ॥ ऐसे सकाम अतिदुर्बुद्धी । जे नाडले स्वधर्मसिद्धी । यालागीं देवो म्हणे ’कुबुद्धी’ । ते कुबुद्धीची विधी हरि सांगे ॥ ७२ ॥ कामिनः कृपणा लुब्धाः पुष्पेषु फलबुद्धयः । अग्निमुग्धा धूमतान्ता स्वं लोकं न विदन्ति ते ॥ २७ ॥ काचेच्छा तो सदा दीन । ’कृपणपण’ या हेतू ॥ ७३ ॥ जळीं बक धरोनि ध्यान । जेवीं कां टपत राहे मीन । तेवीं सकामा अनुष्ठान । लुब्धोनि जाण कामासी ॥ ७४ ॥ जावया परपुरुषापासीं । लवोठवो दावी निजपतीसी । तेवीं काम धरोनि मानसीं । स्वधर्मकर्मासी आचरे ॥ ७५ ॥ जेवीं कां अज्ञान बाळ । फूल तेंचि म्हणे फळ । तेवीं स्वर्गभोग केवळ । मानी अढळ मूर्खत्वें ॥ ७६ ॥ त्याही स्वर्गभोगासी पाहें । कर्मवैकल्य होय कीं नोहे । हाही संदेह वर्तताहे । तेणेंही होय अतिदीन ॥ ७७ ॥ सकाम तो सदा दीन । दीनत्वें अतिकृपण । कृपणत्वें स्लोभपण । लोभास्तव ज्ञान महामोह ग्रासी ॥ ७८ ॥ मोहाचें खवळल्या भान । सविवेक ग्रासी ज्ञान । तेव्हां बुद्धीमाजीं तमोगुण । सबाह्य परिपूर्ण उल्हासे ॥ ७९ ॥ तमें कोंदाटल्या वृत्ती । धूमांकित होय स्थिती । जेवीं कां आंधळ्याचा सांगती । अंधारे रातीं आडवीं चुके ॥ २८० ॥ त्या आंधळ्याची जैशी स्थिती । तैशी सकामाची गती । चुकला विवेकाचा सांगती । आंधळी वृत्ती अतिमुग्ध ॥ ८१ ॥ जैसें कां अज्ञान बाळ । तैसा मुग्ध होय केवळ । कोण कर्म काय तें फळ । नेणे विवळ मुग्धत्वें ॥ ८२ ॥ माझी कोणे लोकीं स्थिती । पुढें कोण आपुली गती । हें कांहींच न स्मरे चित्तीं । धूम्रवृत्ती देहांतु ॥ ८३ ॥ न ते मामङ्ग जानन्ति हृदिस्थं य इदं यतः । उक्थशस्त्रा ह्यसुतृपो यथा नीहारचक्षुषः ॥ २८ ॥ तीं वेदाचीं गुह्य निरूपणें । तुजकारणें म्यां निरूपिलीं ॥ ८४ ॥ परिसोनि वेदाचे विभाग । उद्धव सुखावला चांग । तेणें संतोषें श्रीरंग । संबोखोनि ’अंग’ उद्धवासी म्हणे ॥ ८५ ॥ जो मी हृदयामाजिले वस्ती । परमात्मा निकटवर्ती । त्या मातें सकाम निणती । कामासक्तीं नाडले ॥ ८६ ॥ तो मी हृदयामाजीं असें । हें एकादेशित्व मज नसे । जगदाकारें मीचि भासें । जेवीं कल्लोळविलासें सागरु ॥ ८७ ॥ अलंकार झालेपणें । जेवीं असे निखळ सोनें । तेवीं जगदाकारें म्यां श्रीकृष्णें । परिपूर्ण असणें पूर्णत्वें ॥ ८८ ॥ नाम रूप वर्ण विविध । माझेन प्रकाशें जगदुद्बो ध । परी नामरूपजातिभेद । मजसी संबंध असेना ॥ ८९ ॥ आकाश जळीं बुडालें दिसे । परी तें न माखे जळरसें । तेवीं मी जगदाकारें असें । जगदादि दोषें अलिप्त ॥ २९० ॥ ऐसा मी विश्वात्मा विश्वंभरु । विश्वमूर्ति विश्वेश्वरु । त्या मज नेणती अज्ञान नरु । जे कां शिश्नोदरुपोषक ॥ ९१ ॥ ज्यासी आंधारें दाटे गाढें । कां महाकुहरीं जो सांपडे । तो कांहीं न देखे पुढें । अवचिता पडे महागर्तीं ॥ ९२ ॥ तेवीं अतिमोहममताभ्रांतें । अज्ञाननिद्रा सबाह्य व्याप्तें । जवळिल्या न देखोनि मातें । पडिले महागर्ते तमामाजीं ॥ ९३ ॥ न कळोनि माझ्या वेदार्थातें । केवळ जीं कां कामासक्तें । तीं पावलीं अधःपातातें । जवलिल्या मातें नेणोनि ॥ ९४ ॥ तो मी जवळी कैसा म्हणसी । तरी सर्वांच्या हृदयदेशीं । वसतसें अहर्निशीं । चेतनेसी चेतविता ॥ ९५ ॥ त्या माझें वेदार्थमत । नेणतीचि कामासक्त । तेचिविखीं श्रीकृष्णनाथ । विशदार्थ स्वयें सांगे ॥ ९६ ॥ ते मे मतमविज्ञाय परोक्षं विषयात्मकाः । हिंसायां यदि रागः स्याद्यज्ञ एव न चोदना ॥ २९ ॥ तेणें सकामासी उत्साहो । स्वर्गातें पहा हो मानिती सत्य ॥ ९७ ॥ ’रोचनार्थ’ स्वर्ग बोले वेद । तो प्रगटार्थ मानूनि शुद्ध । मग स्वर्गसाधनें विविध । कामलुब्ध आदरती ॥ ९८ ॥ तेथ यज्ञ हें मिषमात्र जाण । स्वयें करावया मांसभक्षण । अविधीं करिती पशुहनन । अतिदृप्त जाण कामार्थीं ॥ ९९ ॥ त्यांसी पैं गा देहांतीं । मारिले पशु मारावया येती । हातीं घे‌ऊनि गड्ग काती । सूड घेती यमद्वारीं ॥ ३०० ॥ तेथ कैंचें स्वर्गसुख । अविधि-साधनें महामूर्ख । पावले गा अघोर नरक । सकामें देख नाडले ॥ १ ॥ यथेष्ट करावया मांसभक्षण । स्वेच्छा जें कां पशुहनन । त्यांसी वेदें केलें निर्बंधन । पशुहनन यज्ञार्थ ॥ २ ॥ तेथही घातली जाण । देश काळ आणि वर्तमान । मंत्र तंत्र विधि विधान । धन संपूर्ण अतिशुद्ध ॥ ३ ॥ शक्त सज्ञान धनवंत । ऐसा कर्ता पाहिजे थेथ । मुष्टिघातें करावया पशुघात । पडे प्रायश्चित्त ’मे’ म्हणतां ॥ ४ ॥ ऐशी वेदाज्ञा नाना अवघड । घातलीं प्रायश्चित्तें अतिगूढ । तरी सकाम जे महामूढ । ते धांवती दृढ पशुहनन ॥ ५ ॥ ऐसें झाल्या पशुहनन । विभाग ये‍ईल कवळ प्रमाण । तेंचि करावें भक्षण । दांतांसी जाण न लागतां ॥ ६ ॥ विभाग भक्षितां आपण । जो करी रसस्वादन । त्यासीही प्रायश्चित्र जाण । हेंही निर्बंधन वेदें केलें ॥ ७ ॥ करावें मांसभक्षण । हे वेदाज्ञा नाहीं जाण । त्याचें करावया निराकरण । लाविलें विधान यज्ञाचें ॥ ८ ॥ स्वेच्छा पशु न मारावया जाण । यज्ञीं नेमिलें पशुहनन । न करावया मांसभक्षण । नेमिला प्रमाण यज्ञभाग ॥ ९ ॥ हेंही वेदाचें बोलणें । मूर्खप्रलोभाकारणें । येर्ह वीं पशुहिंसा न करणें । मांस न भक्षणें हें वेदगुह्य ॥ ३१० ॥ हिंसाविहारा ह्यालब्धैः पशुभिः स्वसुखेच्छया । यजन्ते देवता यज्ञैः पितृभूतपतीन्‌ खलाः ॥ ३० ॥ अविधी मारूनि पशुंसी । मिरविती श्लाघेसी यज्ञिकत्वें ॥ ११ ॥ अविधीं करूनि जीवहनन । तेणें पशूनें करिती यज्ञ । पितृदेवभूतगण । करिती यजन सुखेच्छा ॥ १२ ॥ बाबडें बीज पेरिल्या शेतीं । पिकास नाडले निश्चितीं । शेखीं निजबीजा नागवती । राजे दंडूनि घेती करभार ॥ १३ ॥ तैशी अविधी यज्ञिकांची गती । स्वर्ग स्वप्नींही न देखती । थित्या नरदेहा नागवती । शेखीं दुःख भोगिती यमदंडें ॥ १४ ॥ वृथा पशूंस दुःख देती । तेणें दुःखे स्वयें दुःखी होती । ऐशी यज्ञिकांची गती । आश्चर्य श्रीपती सांगत ॥ १५ ॥ स्वप्रोपमममुं लोकमसन्त श्रवणप्रियम्‌ । आशिषो हृदि सङ्कल्प्य त्यजन्त्यर्थान्यथावणिक्‌ ॥ ३१ ॥ येथ सकाम कामनपिसें । स्वर्ग विश्वासें मानिती सत्य ॥ १६ ॥ मुळींच मिथ्या मृगजळ । त्यामाजीं शीतळ जळ । थाया घे‌ऊनि मागे बाळ । तैसे सकाम केवळ स्वर्गालागीं ॥ १७ ॥ ’पिंपळावरून मार्ग आहे’ । ऐकोनि रुखावरी वेंघों जाये । तो जेवीं भ्रमें गुंतोनि राहे । तेवीं स्वर्गश्रवणें होये सकाम ॥ १८ ॥ स्वधर्ममार्गीं चालावया नर । वेदु स्वर्ग बोले अवांतर । ते फांटां भरले अपार । स्वर्गतत्पर सकाम ॥ १९ ॥ वाट पिंपळावरी ऐकोनी । शहाणा चाले मार्ग लक्षोनी । अश्वत्थ सांडी डावलोनी । तो पावे स्वस्थानीं संतोषें ॥ ३२० ॥ तेवीं स्वधर्माच्या अनुष्ठानीं । जो सांडी स्वर्गफळें उपेक्षूनी । तो चित्तशुद्धीतें पावोनी । ब्रह्मसमाधानीं स्वयें पावे ॥ २१ ॥ या सांडूनि स्वधर्ममार्गासी । श्रवणप्रिय स्वर्गसुखासी । सकाम भुलले त्यासी । जेवीं घंटानादासी मृग लोधे ॥ २२ ॥ तेवीं जन्मोनि कर्मभूमीसी । वेंचूनि धनधान्यसमृद्धीसी । थित्या नाडले नरदेहासी । स्वर्गसुखासी भाळोनी ॥ २३ ॥ जैसा कोणी एक वाणी । जुनी नाव आश्रयोनी । द्वीपांतरींचा लाभ ऐकोनी । न विचारितां मनीं समुद्रीं रिघे ॥ २४ ॥ उन्मत्त कर्णधाराचे संगतीं । फुटकी नाव धरोनि हातीं । घे‌ऊनियां सकळ संपत्ते । रिघे कुमती महार्णवीं ॥ २५ ॥ तो जेवीं समुद्रीं बुडे । तैसेंचि सकामांसी घडे । स्वर्ग वांछितां बापुडे । बुडाले रोकडे भवार्णवीं ॥ २६ ॥ वांछितां स्वर्गसुखफळ । बुडालें स्वधर्मवित्त सकळ । बुडालें चित्तशुद्धीचें मूळ । बुडालें मुद्दल नरदेह ॥ २७ ॥ एव्हडें हानीचें कारण । देवो सांगत आहे आपण । सकामतेसी मूळ गुण । तेंही लक्षण स्वयें सांगे ॥ २८ ॥ रजः सत्त्वतमोनिष्ठा रजःसत्वतमोजुषः । उपासत इन्द्रौख्यान्‌ देवादीन्न तथैव माम्‌ ॥ ३२ ॥ तेव्हां रजाचेनि संमतें । काम चित्ततें व्यापूनि खवळे ॥ २९ ॥ अतिकाम खवळल्या चित्तीं । गुणनुसारें विषयीं प्रीती । तेव्हा सकामाची संगती । धरी निश्चितीं भावार्थें ॥ ३३० ॥ सकामसंगती साचार । काम्यकर्मी अत्यादर । स्वर्गभोगीं महातत्पर । यजी देवपितर प्रमथादिक ॥ ३१ ॥ मी सर्वात्मा सवेश्वर । त्या माझ्या ठायीं अनादर । कामलंपटत्वें नर । देवतांतर उपासिती ॥ ३२ ॥ म्हणसी देवतांतर जें कांहीं । तें तूंचि पैं गा सर्वही । हाही ऐक्यभावो नाहीं । भेदबुद्धीं पाहीं विनियोग ॥ ३३ ॥ एंद्रादि देवद्वारां जाण । मीचि होय गा प्रसन्न । त्या माझ्या ठायीं नाहीं भजन । सकाम मन स्वर्गार्थी ॥ ३४ ॥ दृढ कामना जडली चित्तीं । सांगतां स्वर्गीं पुनरावृत्ती । तेही हितत्वेंचि मानिती । ऐक निश्चितीं अभिप्रावो ॥ ३५ ॥ इष्द्वेह देवता यज्ञैर्गत्वा रंस्यामहे दिवि । तस्यान्त इह भूयास्म महाशाला महाकुलाः ॥ ३३ ॥ तेथही कामना नागविले । स्वर्गार्थ भजले देवतांतरा ॥ ३६ ॥ स्वर्गभोगीं ठेवूनि मन । नाना यागीं करिती यजन । तेणें दिविभोग पावेन । हा निश्चिय जाण याज्ञिकां ॥ ३७ ॥ काळें भोगक्षयाच्या पतनीं । तेही घेती हितत्वें मानोनी । सवेंचि इहलोकीं जन्मोनी । ब्राह्मणपणीं सुशील ॥ ३८ ॥ वेदवेदांग‌ओध्ययन । धनधान्यें अतिसंपन्न । आम्ही विख्यात गृहस्थ हो‍ऊन । क्षीणपुण्य स्वर्गस्थ ॥ ३९ ॥ नेणोनि वेदार्थनिजस्थिती । ऐस‌ऐनशिया उपपत्तीं । सकामीं मानिली निश्चिती । ऊंस सांडोनि मागती कणीस त्याचें ॥ ३४० ॥ एवं पुष्पितया वाचा व्याक्षिप्तमनसां नृणाम्‌ । मानिनां चातिस्तब्धानां मद्वार्तापि न रोचते ॥ ३४ ॥ स्वर्गकामाचेनि उपायें । अपायीं स्वयें पडताती ॥ ४१ ॥ अवघा संसार काल्पनिक । तेथ सत्य कैंचे स्वर्गसुख । परि श्रवणमात्रें देख । भुलले मूर्ख स्वर्गसुखा ॥ ४२ ॥ जैसा नपुंसक वांछी स्त्रीसुख । परी संग तया कैंचा देख । मुळींच नाहीं बीजारोप । मा कैंचा कामसाटोप तयासी ॥ ४३ ॥ परी लटिकाचि तडतडां उडे । कष्टोनि व्यर्थाचि पहुडे । परी तया नसे भगभोग रोकडे । तैसे स्वर्ग फुडे प्राणिया ॥ ४४ ॥ गव्हांचा जो प्रथम मोड । तोंडीं घालितां लागे गोड । परी जो जाणे पिकाचा निवाड । तो मोड जाण उपडीना ॥ ४५ ॥ पालेयाची चवी घेतां । गव्हांची गोडी न लगे तत्त्वतां । मग पाला पाळूनी स्वभावतां । शेवटीं रडता गव्हांचिकारणें ॥ ४६ ॥ तेवीं वेदु बोलिला स्वर्गफल । तें स्वधर्माचें कोंवळें मूळ । तें उप्डूनि खातां तत्काळ । मोक्षफळ अंतरे ॥ ४७ ॥ हें जाणती जे सज्ञान । ते स्वर्गासी नातळती आपण । परी मूर्खाचें सकामपण । अनिवार जाण अतिशयें ॥ ४८ ॥ कामाचिया लोलंगती । सदा सकाम कर्में करिती । तेणें जन्ममरणांचे आवर्तीं । पडले नुगंडती आकल्प ॥ ४९ ॥ त्यांसी हित सांगती साधुजन । ते न मानिती संतवचन । आम्ही वेदार्थीं सज्ञान । हा ज्ञानाभिमान अतिगर्वें ॥ ३५० ॥ मी भगवंत नियंता सृष्टी । हें वेदें दाविल्या नवडे गोष्टी । निष्कामता कपाळ उठी । सकम पोटीं सुबुद्ध ॥ ५१ ॥ एवं वेद मानूनि प्रवृत्तिपर । ठकले सकळ सकाम नर । तोचि वेदार्थ ब्रह्मपर । स्वयें श्रीधर सांगत ॥ ५२ ॥ वेदा ब्रह्मात्मविषयास्त्रिकाण्डविषया इमे । परोक्षवादा ऋषयः परोक्षं मम च प्रियम्‌ ॥ ३५ ॥ चित्तशुद्धिद्वारा जाण । ब्रह्मसंपन्न जीव करी ॥ ५३ ॥ पारधी लावून बडिशपिंडी । मीनांसी जळाबाहेर काढी । तेवीं दावून स्वर्गसुखगोडी । वेद जीवास ओढी परमार्थीं ॥ ५४ ॥ परोक्षवाद वेदव्युत्पत्तीं । त्यागमुखें गा अन्योक्ती । सांडविली विषयासक्ती । ब्रह्मप्राप्तीलागूनि ॥ ५५ ॥ हें जाणोनि वेदार्थगुह्यज्ञान । जो जीव झाला ब्रह्मसंपन्न । तेथ कर्म-कर्ता मिथ्या जाण । आश्रम-वर्ण कैंचे ॥ ५६ ॥ तेथ कैंचें ध्येय-ध्याता-ध्यान । कैंचें ज्ञेय-ज्ञाता-ज्ञान । नाहीं भज्य-भजक-भजन । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ५७ ॥ तेथ कैंचे कर्म-कर्माचरण । कैंचा वेद-वेदाध्ययन । कैंचें साध्य आणि साधन । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ५८ ॥ तेथ कैंचे दोष कैंचे गुण । कैंचे पाप कैंचें पुण्य । कैंचें जन्म कैंचें मरण । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ५९ ॥ तेथ कैंचा भेदु कैंचा बोधु । कैंचा मोक्ष कैंचा बंधु । सदोदित परमानंदु । हा वेदार्थ शुद्ध उद्धवा ॥ ३६० ॥ या वेदार्थाचें निरूपण । प्रकट करितां आपण । निजस्वार्था नाडती जन । यालागीं जाण म्यां गुप्त केलें ॥ ६१ ॥ हें वेदार्थाचें गुह्य सार । मज गुप्ताचें गुप्त भांडार । तुझा देखोनि अधिकार । म्यां साचार सांगितलें ॥ ६२ ॥ हा गुह्यार्थ करितां प्रकट । सांडोनि कर्ममार्गाची वाट । कर्म ब्रह्म उभयभ्रष्ट । होतील नष्ट अनधिकारी ॥ ६३ ॥ हें जाणॊनि ज्ञाते ऋषीश्वरीं । वेदार्थनिरूपणकुसरी । हा मुख्यार्थ झांकोनि निर्धारीं । परोक्षवादावरी व्याख्यान केलें ॥ ६४ ॥ सकळलोकहितार्थ । माझेंही हेंचि मनोगत । परोक्षवाद गोड लागत । लोकासंग्रहार्थ उद्धवा ॥ ६५ ॥ मीही लोकसंग्रहार्थ । अकर्ता कर्में आचरत । वेदाचें जें परोक्ष मत । मी स्वयें राखित लोकहिता ॥ ६६ ॥ वेदाचें स्वरूप गहन । अतर्क्य अलक्ष्य अगम्य जाण । तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ६७ ॥ शब्दब्रह्म सुदुर्बोधं प्राणेन्द्रियमनोमयम्‌ । अनन्तपारं गम्भीरं दुर्विगाह्यं समुद्रवत्‌ ॥ ३६ ॥ माझी वेदरूप जे बोली । शब्दतः अर्थतः अगाध खोली । बाहीं न तरवे समुद्र । तेवीं स्वमतीं न कळे वेदपार । येचि अर्थीं नाना ऋषीश्वर । युक्तीचे संभार वेंचिले ॥ ६९ ॥ परी एवंविध तत्त्वतां । हे वेदवादाची कथा । न येचि कोणाचेही हाता । अर्थतः शब्दतः दुर्ज्ञेय ॥ ३७० ॥ ज्याची शब्दवाचकता । स्वरवर्णें शुद्ध न ये हाता । त्याची अर्थावबोधकता । अगम्य सर्वथा सुरनरां ॥ ७१ ॥ पूर्वीं हाचि वेद अनुच्छिष्ट । म्यां ब्रह्मयाहातें करविला पाठ । तेणेंही नेणोनियां स्पष्ट । कर्मीं कर्मठ हो‍ऊनि ठेला ॥ ७२ ॥ ते कर्मक्रिया अतिगोमटी । शंखें ह्रिली उठा‌उठी । ब्रह्मा विसरला वेदगोठी । पडलें सृष्टीं कर्मांध्य ॥ ७३ ॥ तो करावया वेदोद्धार । म्यां मर्दिला शंखासुर । सकळ श्रुतींचा संभार । ब्रह्मयासी साचार दीधला ॥ ७४ ॥ म्यां वेद ठेविले ब्रह्ययापुढें । तो पूर्व स्मरेना धडफुडें । तेव्हा चाकाटलें बापुडें । केवळ वेडें हो‍ऊनि ठेलें ॥ ७५ ॥ त्या वेदभागालागीं जाण । ऋषीं वेंचिलें निजज्ञान । शाखोपशाखीं रावण । वेदविभागन करूं आला ॥ ७६ ॥ परी इत्थंभूत तत्त्वतां । माझ्या वेदविभागाची वार्ता । न येचि कोणाचिया हाता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ७७ ॥ तो मी वेदस्थापक श्रीहरी । लोक राखावया मर्यादेवरी । स्वयें सत्यवतीच्या उदरीं । झालों अवतारधारी श्रीव्यास ॥ ७८ ॥ वेदविभागीं राजहंसु । यालागीं नामें ’वेदव्यासु’ । तेणें म्यां केला श्रुतिविलासु । वेदविशेषु चतुर्धा ॥ ७९ ॥ वेद अर्थत्वें अतिदुर्घट । परी वाचकत्वें झाला प्रगट । त्या चारी वाचा अतिश्रेष्ठ । ऐक स्पष्ट सांगेन ॥ ३८० ॥ नादाचें प्रथम स्फुरण । घोषमात्र सूक्षम प्राण । ती नांव ’परा’ वाचा जाण । प्रथम लक्षण ॐकारीं ॥ ८१ ॥ तोचि नादयुक्त प्राण । अंतःकरणीं होय स्फुरण । ते ’पश्यंती’ वाचा जाण । विवेकलक्षण तीमाजीं ॥ ८२ ॥ नाभीपासोनी नाभिस्वरीं । जे घुमघुमी कंठवरी । ते ’मध्यमा’ वाचा खरी । स्वयें श्रीहरी सांगत ॥ ८३ ॥ अकार-उकार-मकार । स्वरवर्णयुक्त उच्चार । जेथ प्रगट होय ओंकार । ते वाचा साचार ’वैखरी’ ॥ ८४ ॥ ते वैखरीच्या ठायीं । शाखोपशाखीं जो कांहीं । वेद अनंतरूप पाहीं । त्यासही नाहीं मर्यादा ॥ ८५ ॥ यापरी वेद अमर्याद । जरी चतुर्धा केला विशद । तरी जनासी अतिदुर्बोध । यालागीं उपवेद विभागिले ॥ ८६ ॥ ऐसेनिही जनासी न कळे वेद । यालागीं वेदावरी पद । श्रीव्यासें केले विशद । तरी वेदार्थ शुद्ध कळेना ॥ ८७ ॥ येचि अर्थीं ऋषीश्वर बहुत । सुमंतु जैमिनी भाष्य भारत । पैल सूत्रादि जे समस्त । शिणतां वेदार्थ न कळेचि ॥ ८८ ॥ एवं वाच्यता आणि लक्ष्यता । स्थूलसूक्ष्मत्वें वेदार्थज्ञाता । मजवांचूनि तत्त्वतां । आणिक सर्वथा असेना ॥ ८९ ॥ मयोपबृंहितं भूम्रा ब्रह्मणानन्तशक्तिना । भूतेषु घोषरूपेण बिसेषूर्णेव लक्ष्यते ॥ ३७ ॥ सबाह्य व्यापकत्वें संपूर्ण । ब्रह्म परिपूर्ण जो कां मी ॥ ३९० ॥ तेणें म्यां वेद अधिष्टित । या नांव बोलिजे ’उपबृंहित’ । अधिष्ठाता विकारी होत । जेवीं अभ्रांत चंद्रमा ॥ ९१ ॥ कां अग्नि काष्ठीं अधिष्ठितां । त्यासी तत्काळ ये साकारता । मग प्रबळ आणि शांतता । या विकारावस्था अग्नीसी ॥ ९२ ॥ यापरी विकारी नव्हे जाण । मी अंतर्यामी नारायण । ब्रह्मस्वरूपें परिपूर्ण । विकारनिर्दळण स्वयें कर्ता ॥ ९३ ॥ मीचि विकारांचा कर्या । करूनि मीचि अकर्ता । त्या मज न ये विकारता । ब्रह्मस्वरूपतास्वभावें ॥ ९४ ॥ ब्रह्म केवळ निर्धर्म । तें केवीं विकारी कर्म । ऐसा कांहीं कल्पिसी भ्रम । तेंही सुगम सांगेन ॥ ९५ ॥ माझी योगमाया अनंतशक्ती । जे शंभुस्वयंभूंसी न ये व्यक्ती । तिचेनि योगें मी चिन्मूर्ती । उत्पत्तिस्थितिसंहर्ता ॥ ९६ ॥ एवं योगमाया स्वभावतां । मी सकळ करूनि अकर्ता । त्या मज देशतां काळतां । विकारिता स्पर्शेना ॥ ९७ ॥ जरी सत्य असती भेदता । तरी मज येती विकारिता । माझे निजस्वरूपीं पाहतां । भेदाची वार्ता असेना ॥ ९८ ॥ जेवीं भ्रमें सर्पत्व दोरावरी । परी दोर सर्पत्व कदा न धरी । तेवीं मी परमात्मा श्रीहरी । करूनि अविकारी निजरूपें ॥ ९९ ॥ घोषरूपें अतिसूक्ष्म नादु । तो मी प्रणवरूपें निजवेदु । प्राणिमात्रीं असें स्वतःसिद्धु । परी नेणती बोधु सकामत्वें ॥ ४०० ॥ जेवीं कां विष्ठा भक्षी सूकर । उपेक्षी कस्तुरी कापुर । तेवीं सूक्ष्मवेदाचें निजसार । सकाम नर उपेक्षिती ॥ १ ॥ मी निजानंद हृदया‌आंत । त्या मज उपेक्षूनि भ्रांत । कामासक्तीं लोलंगत । द्वारें वोळंगत नीचांचीं ॥ २ ॥ त्या हृदयस्थ देवाचें ध्यान । नित्य योग्यासी निदिध्यासन । सम करोनि प्राणापान । सदा अनुसंधान नादाचें ॥ ३ ॥ माझें वेदतत्त्व जें कां गुप्त । प्रणवरूपें हृदया‌आंत । योगीसदा अनुभवित । त्यांचे स्वरूप निश्चित अवधारीं ॥ ४ ॥ जैसा कमळमृणाळबिसतंत । तैसा लूक्ष्म नाद अत्यंत । नाभीपासोनि ब्रह्मरंध्रांत । ओंकार स्वरांत लक्षिती ॥ ५ ॥ ऐसा ओंकाराच्या स्वरा‌आंत । नाभीपासोनि ब्रह्मरंध्रांत । सूक्ष्म नादाचा निजतंत । योगधारणा राखत महायोगी ॥ ६ ॥ हाचि नाद पैं प्रस्तुत । लौकिकीं असे भासत । दोंही कर्णीं देतां हात । तोचि घुमघुमित निजनादु ॥ ७ ॥ योगी म्हणती ’अनाहत शब्द’ । वेदांती म्हणती ’सूक्ष्म नाद’ । आम्ही म्हणों हा ’शुद्धवेद’ । असो अनुवाद हा नांवांचा ॥ ८ ॥ ऐशिया स्वतःसिद्ध वेदापाशीं । श्रद्धा नुपजेचि प्राणियांसी । यालागीं सूक्ष्म वेद स्थूलतेसी । म्यां जनहितासी आणिला ॥ ९ ॥ तोचि स्थूलत्वें झाला प्रकट । ते प्रकट होती वेदवाट । दृष्टांतेंकरूनि स्पष्ट । तुज मी चोखट सांगेन ॥ ४१० ॥ ऐसें बोलिला श्रीनिवास । तेणें उल्हासला हृदयहंस । म्हणे मजकारणें हृषीकेश । अत्यंत सौरस निरूपणीं ॥ ११ ॥ मजवरी बहुत स्न्नेहाळ । मज उद्धारावया गोपाळ । निरूपणीं सुकाळ । अतिसरळ अमृतरसु ॥ १२ ॥ ऐसें उद्धवाचें बोलणें ऐकोनी । काय बोलिला सारंगपाणी । म्हणे मी तोचि निरूपणीं । सांगेन तुजलागोनी उद्धवा ॥ १३ ॥ यथोर्णनाभिर्हृदयादूर्णामुद्वमते मुखात्‌ । आकाशाद्घोिषवान्प्राणो मनसा स्पर्शरूपिणा ॥ ३८ ॥ छन्दोमयोऽमृतमयः सहस्त्रपदवीं प्रभुः । तंतु काढी अतिसूक्ष्मपणीं । तेवीं निर्गुणीं ’ओंकार’ ॥ १४ ॥ तो ओंकार होतां सप्राण । सहजस्वभावें गा जाण । झाला ’हिरण्यगर्भ’ अभिधान । आपणिया आपण वेदाज्ञा ॥ १५ ॥ ’प्रभु’ म्हणजे ऐश्वर्यख्याति । अचिंत्यानंत त्याची शक्ति । तो छंदोमय वेदमूर्ती । जाण निश्वितीं उद्धवा ॥ १६ ॥ तो अविनाशी वास्तवस्थिती । नित्य सुखमय सुखमूर्ती । तेणें सप्राण नादाभिव्यक्ति । मनःशक्ती चेतवी ॥ १७ ॥ चेतविली जे मनःशक्ती । होय स्पर्श-स्वर-वर्ण कल्पिती । वेदाज्ञ ’बृहती’ म्हणती । जिचा अपरिमिती विस्तार ॥ १८ ॥ ते स्वरवर्णसंवलित मंत्र । हृदयाकाशीं विचित्र । सहस्त्रशाखीं विस्तार । वाढली अपार वैखरी ॥ १९ ॥ स्वरवर्णादि उच्चारीं । वेदधिष्ठान वैखरी । ते उपजली जेणेंकरी । तेही परी सांगेन ॥ ४२० ॥ ओंकाराठद्व्य ञ्जितस्पर्शस्वरोष्मान्तःस्थभूषिताम्‌ ॥ ३९ ॥ विचित्रभाषाविततां छन्दोभिश्चतुरुत्तरैः । अनन्तपारां बृहतीं सृजत्याक्षिपते स्वयम्‌ ॥ ४० ॥ हा ओंकार अलोलिक । अतिसूक्ष्म देख देहस्थ ॥ २१ ॥ त्याचि ओंकारासी प्राणसंगती । आधारादि चक्रीं ऊर्ध्वगती । तेथ वाचांची होय अभिव्यक्ती । परा-पश्यंती-मध्यमा ॥ २२ ॥ परावाचेच्या अभ्यंतरीं । जन्मे पश्यंती ज्येष्ठकारी । मध्यमा जन्मे तिच्या उदरीं । एवं परस्परीं जन्मती ॥ २३ ॥ तैशाचि येरीतें येरी । नोसंडोनि क्षणभरी । चालती उपरांउपरी । चक्रींच्या चक्रांतरीं समवेत ॥ २४ ॥ ’आधारचक्रीं’ परा वाचा । ’स्वाधिष्ठानीं’ जन्म पश्यंतीचा । ’मणिपूरीं’ हूनि ’विशुद्धी’ चा । ठायीं मध्यमेचा रिगुनिगू ॥ २५ ॥ तेथोनियां मुखद्वारीं । वाचा प्रकाशे वैखरी । तैं स्वर-वर्ण-उच्चारीं । नानामंत्रीं गर्जत ॥ २६ ॥ तेचि स्वर आणि वर्ण । सांगेन ’स्पर्श’ व्यक्तिलक्षण । ’अंतस्थ’ ’ऊष्म’ कोण कोण । विभागलक्षण अवधारीं ॥ २७ ॥ केवळ ’अ क च ट त प’ देख । हे ककारादि पंच पंचक । स्पर्शवर्णाचें रूपक । अक्षरें निष्टंक पंचवीस ॥ २८ ॥ सवर्णें गर्जतां उच्चार । ते अकारादि सोळाही स्वर । ’य र ल व’ यांचा विचार । जाण साचार ’अंतस्थ’ ॥ २९ ॥ ’श ष स ह’ हे वर्ण चारी । ’ऊष्म’ बोलिजे शास्त्रकारीं । विसर्गादि अनुस्वारीं । ’अंअः’ वरी विभागु ॥ ४३० ॥ येथ बावन्नावी मातृका एक । केवळ ’क्ष’ कारु गा देख । यांतु सानुनासिक निरनुनासिक । जाणति लोक शास्त्रज्ञ ॥ ३१ ॥ एवं स्वरवर्णविधि‌उच्चारीं । लौकिकी वैदिकी भाषावरी । वेदशास्त्रार्थप्रकारीं । वाढली वैखरी शब्दचातुर्यें ॥ ३२ ॥ बोलेंचि गा बोलाप्रती । चाळूनि नाना उपपत्ती । बोलें बोल निगृहिती । युक्तिप्रयुक्ती साधुनी ॥ ३३ ॥ ऐशिया नानाशब्दकुसरीं । अत्यंत विस्तरिली वैखरी । तेचि चौं चौं अक्षरीं । वाढवूनि धरी नाना छंदें ॥ ३४ ॥ वाढतां चतुरक्षरभेदें । उत्तरोत्तर नाना छंदें । वाढविलीं स्वयें वेदें । निजज्ञान बोधें बोलूनि ॥ ३५ ॥ अत‌एव अनंत अपार । अर्थतां शब्दतां अतिसुस्तर । माझ्या शब्दज्ञानाचा पार । सुरनर नेणती ॥ ३६ ॥ ऐशी वैखरीची अनंतशक्ती । यालागीं म्हणिजे ते ’बृहती’ । इच्या विस्ताराची गती । स्वयें नेणती शिव स्त्रष्टा ॥ ३७ ॥ हिरण्यगर्भत्वें स्वयें जाण । जीव-शिव-अंतर्यामीलक्षण । माझी वेदाज्ञा प्रकाशी आपण । जिचें नामाभिधान ’वैखरी’ ॥ ३८ ॥ जो मी वेदात्मा श्रीहरी । तो वेदु या रीतीं विस्तारीं । स्वयें विस्तारोनि संहारीं । मर्यादेवरी स्वकाळें ॥ ३९ ॥ मागां बोलिलीं छंदें जाण । त्या छंदांचें निजलक्षण । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । जो वेदाचें कारण निजस्वरूप ॥ ४४० ॥ गायत्र्युष्णिगनुष्टप्‌ च बृहती पङ्‌क्तिरेव च । त्रिष्टब्जगत्यतिच्छन्दो ह्यत्यष्ट्यतिजगद्विराट्‌ ॥ ४१ ॥ त्या गायग्री छंदाचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥ ४१ ॥ आठा‌अठां अक्षरीं त्रिपद । गणितां जेथ यती शुद्ध । त्या नांव ’गायत्री’ छंद । हें वेदानुवाद निजबीज ॥ ४२ ॥ हें वेदाचें निजजिव्हार । ब्रह्मज्ञानाचें परपार । परमानंदाचें सोलींव सार । जाण साचार गायत्री ॥ ४३ ॥ हें चैतन्याचें जीवन । मज गोप्याचें गुप्तधन । जेथ जीवशिवां समाधान । तें हें छंद जाण गायत्री ॥ ४४ ॥ ये छंदींचे एक एक अक्षर । अक्षराचें निजसार । सच्चिदानंदाचें निजभांडार । जाण साचार गायत्री ॥ ४५ ॥ करितां गयत्रीचें अनुष्ठान । विश्वामित्र झाला ब्राह्मण । मी कृष्ण वंदीं त्याचे चरण । माझाही तो गुरु जाण रामावतारीं ॥ ४६ ॥ यालागीं सकळ छंदीं प्राधान्य । मुख्यत्वें गायत्री छंद जाण । इतर छंद होती पावन । कासे लागोन पैं इच्या ॥ ४७ ॥ गायत्रीछंदाचें अंगीकारीं । त्यासी मिळाल्या अक्षरें चारी । ’उष्णिक्‌’ छंदाची थोरी । त्याचिवरी ठसावे ॥ ४८ ॥ उष्णिक्‌ छंदाचे अंगीकारीं । त्यासी मिळाल्या । अक्षरें चारी । ’अनुष्टप्‌’ छंदाची थोरी । त्याचिवरी ठसावे ॥ ४९ ॥ अनुष्टप्‌ छंदाचे अंगीकारीं । आणीक मिळाल्या अक्षरें चारी । ’बृहती’ छंदाची थोरी । त्याचिवरी ठसावे ॥ ४५० ॥ एवं ’पंक्ति’ ’त्रिष्टप्‌’ ’जगती’ । ’अत्यष्टि’ ’अतिजगती’ । चौं चौं अक्षरांचे अधिकप्राप्तीं । छंदें वेदोक्तीं विभाग ॥ ५१ ॥ ऐशिया चतुरक्षरमिळणीं । नाना छंदांचिया श्रेणी । वेदरायाची राजधानी । मंत्रध्वनीं गर्जती ॥ ५२ ॥ तेथ अक्षरमर्यादा न करवे । शाखांची मर्यादा न धरवे । अर्थता वाच्यता नेणवें । वेद वैभवें दुर्ज्ञेय ॥ ५३ ॥ किं विधत्ते किमाचष्टे किमनूद्य विकल्पयेत्‌ । इत्यस्या हृदयं लोके नान्यो मद्वेद कश्चन ॥ ४२ ॥ कोण तो अर्थ प्रतिपादी । स्वहितबुद्धी साधकां ॥ ५४ ॥ मंत्रकांडें मंत्रमूर्ती । सांगोपांग सायुधस्थिती । उपासना-उपास्ययुक्ती । किमर्थ भक्ती करविली ॥ ५५ ॥ ज्ञानकांड त्रिशुद्धी । कोण पदार्थ निषेधी । कोण्या अर्थातें प्रतिपादी । निजबुद्धी बोधुनी ॥ ५६ ॥ एवं वेदाचें अचळ मूळ । विधिविधानेसीं मुख्य फळ । जाणावया गा केवळ । नाहीं ज्ञानबळ सुरनरां ॥ ५७ ॥ या वेदार्थातें तत्त्वतां । मीचि एक सर्वज्ञ ज्ञाता । माझे कृपेवीण सर्वथा । हें न येचि हाता ब्रह्मादिकां ॥ ५८ ॥ तेथ उद्धवाचें मनोगत । देवो जाणे वेदींचा इत्यर्थ । तरी भक्तकृपाळू श्रीकृष्णनाथ । मजही तो अर्थ दयेनें सांगों ॥ ५९ ॥ हा उद्धवाचा निजभावो । जाणों सरला देवाधिदेवो । तो वेदार्थाचा अभिप्रावो । श्लोकान्वयो पहा हो सांगत ॥ ४६० ॥ मां विधत्तेऽभिधत्ते मां विकल्प्यापोह्यते त्वहम्‌ । एतावान्‌ सर्ववेदार्थः शब्द आस्थाय मां भिदाम्‌ । मायामात्रमनुद्यान्ते प्रतिषिद्ध्य्‌ प्रसीदति ॥ ४३ ॥ इति श्रीमद्भा्गवते महापुराणे पारमहंस्यां संहितायामेकादशस्कन्धे एकविंशोऽध्यायः ॥ २१ ॥ वेद स्वधर्म प्रतिपादीं । त्यागावी निषेधीं विषयातें ॥ ६१ ॥ तेथ अग्निहोत्रादि विधान । यज्ञान्त कर्माचरण । तें चित्तशुद्धीचें कारण । वैराग्य दारुण उपजवी ॥ ६२ ॥ दारुण वैराग्य‌उीत्पत्ती । इहामुत्रविषयनिवृत्ती । तेव्हा साधकास माझी प्राप्ती । सहजस्थिती स्वभावें ॥ ६३ ॥ एवं कर्मकांडचिये स्थिती । विधिनिषेध वेदोक्ती । साधकांसी माझी प्राप्ती । जाण निश्चितीं या हेतू ॥ ६४ ॥ विषयीं परम बाधा देखती । परी त्यागीं नाहीं सामर्थ्यशक्ती । ऐशिया साधकांप्रती । वेदें मद्भयक्ती द्योतिली ॥ ६५ ॥ येथ मंत्रमूर्ति-उपासन । माझे सगुण अनुष्ठान । तेथ करितां अनन्यभजन । रजतम जाण नासती ॥ ६६ ॥ मग केवळा सत्त्ववृत्तीं । श्रवणकीर्तनीं अतिप्रीती । तेणें मद्भा्वो सर्वांभूतीं । माझी चौथी भक्ती तेणें होय ॥ ६७ ॥ आतुडल्या माझी चौथी भक्ती । मद्भंक्तां नावडे मुक्ती । अद्वैत भजनाचिया प्रीतीं । धिक्कारिती कैवल्य ॥ ६८ ॥ अद्वैतबोधें करितां भजन । मी अनंत अपार चिद्घलन । भक्तीमाजीं आकळें जाण । ये मद्रूपण मद्भचक्तां ॥ ६९ ॥ तेव्हा भज्य-भजक-भजन । पूज्य-पूजक-पूजन । साध्य-साधक-साधन । अवघें आपण स्वयें होय ॥ ४७० ॥ माझी ऐश्वर्यसामर्थ्यशक्ती । तेही ये निजभक्तांच्या हातीं । अद्वैतभजनाचिया प्रीतीं । मत्पदप्राप्ती मद्भाक्तां ॥ ७९ ॥ मी देव तो भक्त शुद्ध । हा बाहेरी नांवाचाचि भेद । आंतुवट पाहतां बोध । सच्चिदानंद निज‌ऐंक्यें ॥ ७२ ॥ हे उपासनाकांडस्थिती । साधकीं करूनि माझी भक्ती । यापरी पावले माझी प्राप्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ७३ ॥ ’मायाप्रतिबिंबित’ चैतन्य । त्वंपदार्थें वाच्य जाण । ज्याच्या अंगीं जीवभिधान । अविद्या जाण उपजवी ॥ ७४ ॥ जेवीं स्वप्रामाजीं आपण । आन असोनि देखे अन । तेवीं आविद्यकत्वें जाण । ’जीवपण’ एकदेशी ॥ ९५ ॥ जें ’मायासंवलित’ चैतन्य । जो योगजन्य जगत्कारण । जो सर्वद्रष्टा सर्वज्ञ । सदा संपन्न ऐश्वर्यें ॥ ७६ ॥ जो सकळ कर्मांचा कर्ता । तो कर्ताचि परी अकर्ता । ज्याचे अंगीं स्वभावतां । नित्यमुक्तता स्वयंभ ॥ ७७ ॥ ज्याची अकुंठित सहजसत्ता । जो परमानंदें सदा पुरता । ज्यासी ईश्वरत्वें समर्थता । हे जाण वाचकता तत्पदार्थाची ॥ ७८ ॥ जीवाचें सांडोनियां अज्ञानत्व । शिवाचें सांडूनि सर्वज्ञत्व । दोंहीचें शोधित जें लक्ष्यत्व । ऐक्यें निजतत्त्व साधिती ॥ ७९ ॥ लग्नीं नोवरा निमासुरा । तोचि गेलिया देशावरा । विदेशीं देखिला एकसरा । तारुण्यमदभरा संपन्न ॥ ४८० ॥ ते काळींची त्यजूनि बाल्यावस्था । आजिची नेघूनि तारुण्यता । पत्नी अनुसरे निजकांता । निजस्वरूपतास्वभावें ॥ ८१ ॥ तेवीं त्वंपदतत्पदवाच्यार्थ । दोंहीचा सांडावा निश्चितार्थ । ऐक्यें अंगीकारावा लक्ष्यार्थ । हा ज्ञानकांडार्थ उद्धवा ॥ ८२ ॥ जीवशिवांचेनि ऐक्यें जाण । माझे चित्स्वरूपीं समाधान । स्वयें पाविजे आपण । हें ज्ञानकांड संपूर्ण बोलिलें वेदें ॥ ८३ ॥ वेदा आदि-मध्य-अवसानीं । मातें लक्षितीं कांडें तीनी । तोचि अर्थ उपसंहारूनी । ग्रंथावसानीं हरि बोले ॥ ८४ ॥ उद्धवा वेदाचें वचन । अर्थगंभीर अतिगहन । तेथ शिणतां ऋषिजन । अर्थावसान अलक्ष्य ॥ ८५ ॥ तें वेदार्थाचें निजसार । माझे गुह्य ज्ञानभांडार । तुज म्यां सांगितलें साचार । पूर्वापर‌अंविरोधें ॥ ८६ ॥ तें ऐकोनि देवाचें उत्तर । उद्धव चमत्कारला थोर । तेंचि वेदाचें निजसार । पुढती श्रीधर सांगो कां ॥ ८७ ॥ पान्हा लागतांचि तोंडीं । दोहक वांसरूं आंखुडी । त्यापरी अति‌आवडीं । स्वयें चडफडी उद्धव ॥ ८८ ॥ जेवीं कां पक्षिणीपुढें । चारा घ्यावयाचे चाडें । पिलें पसरीं चांचुवडें । तेवीं कृष्णाकडे उद्धवु ॥ ८९ ॥ तें उद्धवाचें मनोगत । जाणोनियां श्री‌अनंत । सकळ वेदार्थ संकळित । ग्रंथांतीं सांगत निजसारंश ॥ ४९० ॥ नानाशाखीं अतिप्रसिद्ध । त्रिकांडीं वाढला जो वेद । तेथील नाना शब्दीं हाचि बोध । जो मी अभेद परमात्मा ॥ ९१ ॥ त्या मातें धरोनि हातीं । त्रिकांडीं चालिल्या श्रुती । त्या श्रुत्यर्थाची उपपत्ती । यथास्थितीं सांगेन ॥ ९२ ॥ मी कर्मादिमध्य‌अंचतीं । मी कर्मकर्ता क्रियाशक्ती । कर्मफळदाता मी श्रीपती । हा इत्यर्थ निश्चितीं ’कर्मादिकांडीचा’ ॥ ९३ ॥ मंत्रमूर्ति आणि मंत्रार्थ । तेही मीचि गा निश्चित । पूज्य पूजक पूजा समस्त । मजव्यतिरिक्त आन नाहीं ॥ ९४ ॥ [ 'शिवो भूत्वा शिवं यजेत्‌’ श्रुति ] देवें देवोचि पूजिजे । देव् हो‍ऊनि देवा भजिजे । हें वेदींचें विजबीज् माझें । हेंचि आगमीं बोलिजे मुख्यत्वें ॥ ९५ ॥ मीच् देवो मीचि भक्त् । पूजोपचार् मी समस्त् । मीचि मातें पूजित् । हे इत्थंभूत् ’उपासना’ ॥ ९६ ॥ हें उपासनाकांडींचें निजसार् । आगमशास्त्रींचें गुह्य् भांडार् । माझ्या निजभक्तांचें वस्तीचें घर् । ते हे साचार् उपासना ॥ ९७ ॥ ’ज्ञानकांड्’ तें अलौलिक् । वेद् आपला आपण् द्योतक् । अवघा संसाराचि काल्पनिक् । तेथ् वेद् नियामक् कोणे अर्थें ॥ ९८ ॥ वोस् घरास् वस्तीस् पहा हो । निर्जीव् पाहुणा आला राहों । त्याचा कोण् करील् वोठवो । तैसा भावो वेदाज्ञे ॥ ९९ ॥ [ श्रुति-’एकमेवाद्वितीयं ब्रह्म्, नेह् नानास्ति किंचन्’ ] खांबसूत्रावरील् पुतळीसी । तीतें बोडिलें जेवीं शिसीं । तेथें नाहीं निघणें पुढारे केंसीं । तेवीं शुद्धीं वेदासी ठाव् नाहीं ॥ ५०० ॥ मूळ् संसारचि मायिक् । तेथ् वेद् तोही तद्रूप् देख् । मृगजळीं नाहीं उदक् । परी वोलावाहि देख् असेना ॥ १ ॥ जेथ् मूळीं मुख्य् अद्वैतता । तेथ् कैंचा वक्ता कैंचा श्रोता । कैंचें कर्म् कैंचा कर्ता । वेदवार्ता ते कैंची ॥ २ ॥ नाहीं दृश्य्-दृष्टा-दर्शन् । नाहीं ध्येय्-ध्याता-ध्यान् । नाहीं ज्ञेय्-ज्ञाता-ज्ञान् । वेदवचन् तेथें कैंचें ॥ ३ ॥ जेथ् भ्रमाची राणीव् । जेथ् भेदाची जाणीव् । तेथ् वेदाची शहाणीव् । गोड् गाणीव् उपनिषदांची ॥ ४ ॥ जंव् भेदाची सबल् स्थिती । तंव् वेदाची थोर् ख्याती । भेदु आलिया अद्वैतीं । वेद् विराला ’नेति’ म्हणोनी ॥ ५ ॥ जळगार् जळीं विरे । तेवीं वेदु अद्वैतीं मुरे । हें ’ज्ञानकांड्’ साचोकारें । तुज् म्यां खरें सांगितले ॥ ६ ॥ तेथ् उपजला स्वयें अग्नी । त्या अरणी जाळूनि शमे वन्ही । तेवीं ज्ञानकांडनिरूपणीं । वेदु निज् निर्दळणीं पर्वतला ॥ ७ ॥ एक् ब्रह्म् जें अद्वैत् । येणें श्रुतिवाक्यें मिथ्या द्वैत् । हें बोलूनि वेद् हारपे तेथ् । ब्रह्म् सदोदित् संपूर्ण् ॥ ८ ॥ ’मी ब्रह्म्’ हे शुद्धीं स्फुरे स्फूर्ती । तेथचि ॐकाराची उत्पत्ती । तोही ब्रह्मरूप् निश्चितीं । त्यासी ’बह्म्’ म्हण्ती एकाक्षर् ॥ ९ ॥ त्या ॐकारापासोनि गहन् । श्रुति शाखा स्वर् वर्ण् । झालें तें ब्रह्मरूप् जाण् । एवं वेद् पूर्ण् परब्रह्म् ॥ ५१० ॥ जेवीं सोन्याचे अळंकार । पाहतां सोनेंचि साचार । तेवीं श्रुतिशाखावेदविस्तार । तो अवघा ॐकार मद्रूपें ॥ ११ ॥ जो वेदप्रतिपाद्य पुरुषोत्तम । जो भक्तकामकल्पद्रुम्‌ । तो हें बोलिला मेघश्याम । आत्माराम श्रीकृष्ण ॥ १२ ॥ तिंही कांडी निजसंबंध । पूर्वापर अविरुद्ध । हा वेदार्थ परम शुद्ध । तुज म्यां विशद बोधिला ॥ १३ ॥ याहोनियां परता । वेदार्थ नाहीं गा सर्वथा । तो तुज म्यां सांगितला आतां । जाण तत्त्वता उद्धवा ॥ १४ ॥ या वेदार्थाची निजखूण । हृदयीं भोगितां आपण । होय जीवशिवां समाधान । ऐसें श्रीकृष्ण बोलिला ॥ १५ ॥ हें ऐकोनि उद्धव जाण । झाला वेदार्थीं निमग्न । दोनी टंवकारले नयन । स्वानंदीं मन बुडालें ॥ १६ ॥ चित्तचैतन्या मिळणी पाडी । कंठीं बाष्प दृढ अडी । लागतां स्वानंदाची गोडी । उभिली गुढी रोमांची ॥ १७ ॥ शरीरीं स्वेद सकंपता । नयनीं स्वानंदजळ येतां । बोल बुडाला सर्वथा । मूर्च्छा येतयेतां सांवरी ॥ १८ ॥ तंव हृदया आली आठवण । हें भलें नव्हे दुश्चित्तपण । झणीं निजधामा जा‌ईल श्रीकृष्ण । येणें धाकें नयन उघडिले ॥ १९ ॥ तंव घवघवीत । मुकुट कुंडलें मेखळा । कांसे झळके सोनसळा । आपाद बनमाळा शोभत ॥ ५२० ॥ अंतरीं भोगी चैतन्यघन । बाहेरी उघडितां नयन । आनंदविग्रही श्रीकृष्ण । मूर्ती संपूर्ण संमुख देखे ॥ २१ ॥ म्हणे श्रीकृष्ण चैतन्यघन । जैतन्यविग्रही श्रीकृष्ण । सगुणनिर्गुणरूपें जाण । ब्रह्म परिपूर्ण श्रीकृष्ण ॥ २२ ॥ बाप भाग्य उद्धवाचें । सगुणनिर्गुण दोंहीचें । सुख भोगितसे साचें । हें श्रीकृष्णकृपेचें महिमान ॥ २३ ॥ जेथ सद्गुसरुकृपा संपूर्ण । तेथ शिष्याची आवडी प्रमाण । तो जैं मागे मूर्ति सगुण । तैं तेचि जाण गुरु देती ॥ २४ ॥ पाहिजे निर्गुण निजप्राप्ति । ऐशी आवडी ज्याचे चित्तीं । तैं निर्गुणाचिये निजस्थितीं । गुरुकृपा निश्चितीं नांदवी ॥ २५ ॥ सगुण निर्गुण स्वरूपें दोनी । भोगावया आवडी ज्याचे मनीं । तेही स्थितीच्या गुरु दानीं । कृपाळुपणीं समर्थ ॥ २६ ॥ सद्गुसरूचें अगाध महिमान । जें वेदा न बोलवेचि जाण । त्याची कृपा झालिया पूर्ण । दुर्लभ कोण पदार्थ ॥ २७ ॥ ते कृष्णकृपेस्तव जाण । फिटलें उद्धवाचें दुर्लभपण । सगुण निर्गुण एक कृष्ण । हे खूण संपूर्ण बाणली ॥ २८ ॥ जाणोनि कृष्णाचें पूर्णपण । त्याचे लक्षोनि श्रीचरण । धांवोनि उद्धव आपण । घाली लोटांगण हरिचरणीं ॥ २९ ॥ तेव्हां सांवळा सकंकरण । चारी बाह्या पसरी श्रीकृष्ण । उद्धवासी प्रेमें उजलून । दीधलें आलिंगन स्वानंदें ॥ ५३० ॥ त्या आलिंगनाचें सुख । अनुभवी जाणती देख । जो उद्धवासी झाला हरिख । त्याचा जाणता एक श्रीकृष्ण ॥ ३१ ॥ तो कृष्ण म्हणे उद्धवा । हा विसाव्याचा विसावा । माझ्या वेदाचा निजगुह्यठेवा । तो हा एकविसावा तुज एकविसावा तुज सांगितला ॥ ३२ ॥ जेणें मोडे लिंगदेहाचा यावा । जेणें जीवत्व नाठवे जीवा । तो हा विसाव्याचा विसावा । तुज एकविसावा निरूपिला ॥ ३३ ॥ जेणें मिथ्यात्व ये देहभावा । जेणें शून्य पडे रूपनांवा । तो हा विसाव्याचा विसावा । एकविसावा निरूपिला ॥ ३४ ॥ जेथ अज्ञाना होय नागोवा । जेथ ज्ञान ये अभावा । तो विसाव्याचा विसावा । एकविसावा निरूपिला ॥ ३५ ॥ जेथ वेदुही वेडावला । बोधही लाजोनि बुडाला । अनुभवो स्वयें थोंटावला । तो हा निरूपिला वेदार्थ ॥ ३६ ॥ हें वेदार्थसारनिरूपण । मज विश्वात्म्याचें निजनिधान । तुज म्यां सांगितलें संपूर्ण । हे जीवींची खूण उद्धवा ॥ ३७ ॥ कोटिकोटि साधनें करितां । गुरुकृपेवीण सर्वथा । हे न ये कोणाचे हाता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ३८ ॥ ते गुरुकृपेलागीं जाण । आचरावे स्वधर्म पूर्ण । करावें गा शस्त्रश्रवण । वेदपठण तदर्थ ॥ ३९ ॥ ते कृपेलागीं आपण । व्हावें दीनाचेंही दीन । धरितां संतांचे चरण । स्वामी जनार्दन संतुष्टे ॥ ५४० ॥ गुरु संतुष्टोनि आपण । करवी भागवतनिरूपण । एका विनवी जनार्दन । कृपा नित्य नूतन करावी ॥ ४१ ॥ पूढील अध्यायीं गोड प्रश्न । उद्धव पुसेल आपण । प्रकृतिपुरुषांचें लक्षण । तत्त्वसंख्या पूर्ण विभाग ॥ ४२ ॥ त्याचें सांगतां उत्तर । जन्ममरणाचा प्रकार । स्वयें सांगेल शर्ङ्गधर । कथा गंभीर परमार्थी ॥ ४३ ॥ जे कथेचें करितां श्रवण । वैराग्य उठे कडकडून । येणें विन्यासें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगेल ॥ ४४ ॥ घटाकाशें ठाकिजे गगन । तेवीं एका जनार्दना शरण । त्याचे वंदिता श्रीचरण । रसाळ निरूपण स्वयें स्मरे ॥ ५४५ ॥ एकाकारटीकायां वेदत्रयविभागनिरूपणं नाम एकविंशोऽध्यायः ॥ २१ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ ४३ ॥ ओंव्या ॥ ५४५ ॥

Contribute to Sant Shri Eknath Maharaj Mission

You can donate to the bank account given below

Name of Account Holder:
Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission, Paithan
Current Account No:
00000036694177969
Bank Name:
State Bank Of India
IFSC Code:
SBIN0003796
Branch:
Bhaji Market, Paithan

Scan to donate

Donate QR

Merchant Name : Sant Eknath Mission

UPI ID : santeknathmission@sbi

logoseperator

Contact Info :

Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission,

C/O Shri Venimadhav Gosavi,
ShriNath Galli, Shrikshetra Paithan, Dist. Chhatrapati
Sambhajinagar
Pin. 431006

callMobile No : +91 - 9421411135

emailEmail : info@santeknath.org