Marathi / English

अध्याय २२

॥ श्री एकनाथी भागवत ॥

अध्याय बाविसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्‍गुरु खांबसूत्री । चौर्यांरशीं लक्ष पुतळ्या यंत्रीं । नाचविशी निजतंत्रीं । प्राचीनदोरीस्वभावें ॥ १ ॥ दोरी धरिली दिसो न देशी । परी पुतळ्या स्वयें नाचविशी । नवल लाघवी कैसा होशी । अलिप्ततेंसीं सर्वदा ॥ २ ॥ तेथ जैशी ज्याची पूर्वगती । तें भूत नाचे तैशा रीतीं । ते नाचविती चेतनाशक्ती । तुझ्या हातीं वीणहस्तें ॥ ३ ॥ जेवीं कां अचेतन लोहातें । चुंबक खेळवी निजसामर्थें । तेवी तूं सकळ भूतांतें । निजसत्तें नाचविशी ॥ ४ ॥ ऐशीं सदा नाचतीं परतंत्र । तरी अभिमानाचें बळ थोर । सत्य मानोनि देहाकार । आम्ही स्वतंत्र म्हणविती ॥ ५ ॥ आम्ही सज्ञान अतिज्ञाते । आम्ही कर्मकुशल कर्मकर्ते । इतर मूर्खें समस्तें । ऐशा अभिमानातें वाढविती ॥ ६ ॥ एवं देहाभिमानाचेनि हातें । विसरोनि आपुल्या अकर्तृत्वातें । स्वयें पावले कर्मबंधातें । जेवीं स्वप्नावस्थे विषबाधा ॥ ७ ॥ स्वप्नीं अतिशय चढलें विख । आतां उतरलें निःशेख । तेवीं बंधमोक्ष देख । सत्यत्वें मूर्ख मानिती ॥ ८ ॥ हे तुझे खांबसूत्रींची कळा । मिथ्या सत्यत्वें दाविशी डोळां । हा अतिशयें अगाध सोहळा । तुझी अतर्क्य लीळा तर्केना ॥ ९ ॥ अचेतनीं चेतनधर्म । प्रत्यक्ष दाविशी तूं सुगम । हेंचि तुझें न कळे वर्म । करोनि कर्म अकर्ता ॥ १० ॥ अकर्ताचि तूं होशी कर्ता । कर्ता होत्साता अकर्ता । हे तुझी कांबसूत्रता । न कळे सर्वथा कोणातें ॥ ११ ॥ तुझी माया पाहों जातां । तोचि मायेनें ग्रासिला तत्त्वतां । असो तुजचि पाहों म्हणतां । तेही सत्त्वावस्था मायेची ॥ १२ ॥ ऐसें तुझें खांबसूत्र । अकळ न कळे गा तुझें चरित्र । देखों नेदितां निजसूत्र । भूतें विचित्र नाचविशी ॥ १३ ॥ तुझेनि जग होय जाये । परि म्यां केलें हें ठावें नोहे । ऐसा तुझा खेळ पाहें । कोणें काये लक्षावा ॥ १४ ॥ यापरि खेळ वाढविशी । सवेंचि विकल्पोनि मोडिशी । विकार महत्तत्त्वीं सांठविशी । हेंही दर्तृत्व अंगासी न लगत गेलें ॥ १५ ॥ याचें मुख्यत्वें मूळ लक्षण । तुझे कृपेवीण न कळे जाण । तुझी कृपा झालिया पूर्ण । जनीं जनार्दन प्रकटे पैं ॥ १६ ॥ जनीं प्रगटल्या जनार्दन । तद्रूजप हो‌इजे आपण । हे मूळींची निजखूण । मीतूंपण रिगेना ॥ १७ ॥ मीतूंपणेंवीण प्रसिद्ध । जनीं जनार्दन निजानंद । त्याचे कृपेस्तव विशद । श्रीभागवत शुद्ध वाखाणिलें ॥ १८ ॥ तेथ एकविसाव्याचे अंतीं । वेद त्रिकांड लक्ष्यार्थस्थिती । ब्रह्म एकचि निश्चितीं । अद्वयस्थिती अविनाशी ॥ ११ ॥ हें वेदार्थसारनिरूपण । ऐकतां उद्धवा बाणली खूण । ब्रह्म एकाके परिपूर्ण । दुजेनवीण संचलें ॥ २० ॥ वेदवादें ब्रह्म एक । स्वानुभवें तैसेंचि देख । तरी ज्ञाते ऋषिजन लोक । केवीं तत्त्वें अनेक बोलती ॥ २१ ॥ येचि आशंकेलागीं जाण । उद्धवें स्वयें मांडिला प्रश्न । परी पोटांतील भिन्न खूण । उगा श्रीकृष्ण न रहावा ॥ २२ ॥ मी झालों जी ब्रह्मसंपन्न । हें ऐकतां माझें वचन । निजधामा निघेल श्रीकृष्ण । मग हें दर्शन मज कैंचें ॥ २३ ॥ ऐशिया काकुळतीं जाण । संशयेवीण करी प्रश्न । ते आयकोनि श्रीकृष्ण । सुखसमाधान भोगित ॥ २४ ॥ तंव कृष्णाचे मनीं आणिक । उद्धव मी दोघे एक । मिथ्या वियोगाचें दुःख । हें कळे तंव देख प्रश्न सांगों ॥ २५ ॥ बाविसावे अध्यायीं देख । तत्त्वसंख्या सांगेल आवश्यक । प्रकृतिपुरुषविवेक । जन्ममरणद्योतक प्रकारु ॥ २६ ॥ आत्म एक कीं अनेक । आणि तत्त्वसंख्याविवेक । हें कळावया निष्टंक । उद्धव देख पूसत ॥ २७ ॥ उद्धव उवाच- कति तत्त्वावि विश्वेश संख्यातान्यृषिभिः प्रभो । नवैकादश पञ्चत्रीण्यात्थ त्वमिह शुश्रुम ॥ १ ॥ विश्वात्मका विश्वेश्वरा । विश्वधारका विश्वंभरा । विश्वसाक्षी विश्वाकरा । विश्वैकसुंदरा श्रीकृष्णा ॥ २८ ॥ तुज विश्वात्मक म्हणतां । जड मलिन एकदेशिता । आली म्हणशी अज्ञानता । यालागीं प्रभुता उपपादी ॥ २९ ॥ जड मलिन अज्ञानता । हे मायेस्तव होती तत्त्वतां । ते मायेचा तूं नियंता । हे अगाध प्रभुता पैं तुझी ॥ ३० ॥ ऐशिया संबोधनद्वारा । विनवूनि स्वामी शारंगधरा । तत्त्वसंखेच्या विचारा । निजनिर्धारा पुसत ॥ ३१ ॥ जे तपःसामर्थ्यें समर्थ थोर । अनागतद्रष्टे ऋषीश्वर । त्यांची तत्त्वसंख्या विचित्र । पृथक्‌पृथगाकारें बोलती ॥ ३२ ॥ तत्त्वसंख्या इत्थंभूत । एकुणिसाव्या अध्यायांत । तुम्हींच निरूपिला तत्त्वार्थ । तोचि वृत्तांत सांगत ॥ ३३ ॥ ( पूर्वश्लोकार्ध ”नवैकादशपंचत्रीन्‌” ) चौदावे शोकिंच्या निरूपणीं । हे अठ्ठावीस तत्त्वगणनी । सांगितली शार्ङ्‌गपाणी । मजलागोनी निश्चित ॥ ३४ ॥ ये तत्त्वसंख्येचा विचर । प्रकृति पुरुष महदहंकार । पंच महाभूतें थोर । हा संख्याप्रकार नवांचा ॥ ३५ ॥ दाही इंद्रियें अकरावें मन । पंच विषय तीन्ही गुण । हें अठ्ठावीस संख्यागणन । स्वमुखें आपण निरूपिलें ॥ ३६ ॥ यापरी गा लक्ष्मीपती । हे मुख्यत्वें तुझी तत्त्वोक्ती । आतां ऋषीश्वरांच्या युक्ती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ३७ ॥ तें तूं ऐक गा निश्चित । तुज सांगेन तयाचा अर्थ । म्हणोनियां निरूपित । स्वयें मनोगत उद्धव ॥ ३८ ॥ म्हणे तत्त्वतां अवधारीं । मी सांगेन एक कुसरी । प्रकृतिपुरुषांमाझारीं । विचित्र परी सांगत ॥ ३९ ॥ केचित्षड्विशतिं प्राहुरपरे पंचविंशतिम्‌ । सप्तैके नव षट्‌ केचिच्चत्वार्येकादशापरे ॥ २ ॥ केचित्सप्तदश प्राहुः षोडशैके त्रतोदश । एतावत्त्वं हि संख्यानमृषयो यद्विवक्षया । येथ तत्त्वसंख्या मतवाद । ऋषीश्वरांमाजीं विवाद । त्या विवादाचे शब्द । ऐक विशद सांगेन ॥ ४० ॥ एक म्हणे तत्त्वें ’सव्वीस’ । दुजा म्हणे उगा बैस । बहु बोलावाया नाहीं पैस । तत्त्वें ’पंचवीस’ नेमस्त ॥ ४१ ॥ तिजा म्हणे तुम्हीं येथ । कैसोनि वाढविलें स्वमत । तत्त्वें नेमस्तचि ’सात’ । कैंचीं बहुत बोलतां ॥ ४२ ॥ एक म्हणे हें अभिनव । बोलतां न लाजती मानव । वृथा बोलाची लवलव । तत्त्वें ’नव’ नेमस्त ॥ ४३ ॥ तंव हांसोनि बोले एक । सांपे सज्ञान झाले लोक । मिथ्या बहु तत्त्वजल्पक । ’तत्त्वषट्क’ नेमस्त ॥ ४४ ॥ एक म्हणती परते सरा । नेणा तत्त्वसंख्यविचारा । तत्त्वें नेमिलींच ’अकरा’ । बडबड सैरा न करावी ॥ ४५ ॥ दुजा म्हणे तत्त्वविचारा । नेणोनि धरिसी अहंकारा । पुसोनियां थोरथोरां । तत्त्वें ’सतरा’ नेमस्त ॥ ४६ ॥ एक म्हणे व्युत्पत्तिबळा । कां व्यर्थ पिटाल कपाळा । न कळे भगवंताची लीळा । तत्त्वें ’सोळा’ नेमस्त ॥ ४७ ॥ एक म्हणे या गर्वितां पोरां । कोण पुसे तत्त्वविचारा । तत्त्वें नेमस्तचि ’तेरा’ । निजनिर्धारा म्यां केलें ॥ ४८ ॥ एक म्हणे सांडा चातुरी । तत्त्वें नेमस्तचि ’चारी’ । दु‌आ म्हणे या कायशा कुसरी । तत्त्वें निर्धारीं ’दोनचि’ ॥ ४९ ॥ तिजा म्हणे वाचाट लोक । कोणें धरावें यांचें मुख । निजनिर्धारीं तत्त्व ’एक’ । एकाचा अनेक विस्तार ॥ ५० ॥ एवं मतपरंपरा नाना मतीं । ऋषीश्वरीं वेंचितां युक्ती । तुझ्या तत्त्ववादाची निश्चिती । कोणें इत्थंभूतीं मानावी ॥ ५१ ॥ गायन्ति पृथगायुष्मन्निदं नो वक्तुमर्हसि ॥ ३ ॥ तूं निजात्मा परमेश्वर । तुज जाणावया ऋषीश्वर । वेंचूनि युक्तिचे संभार । तत्त्वविचार बोलती ॥ ५२ ॥ स्वामीनें सांगितलें तत्त्व एक । ऋषीश्वर बोलती अनेक । येचिविषयींचें निष्टंक । मज आवश्यक सांगावें ॥ ५३ ॥ एवं या तत्त्वनिश्चयासी । मज सांगावया योग्य होसी । ऐसा विनविला हृषीकेशी । तो उद्धवासी तुष्टला ॥ ५४ ॥ जीं जीं ऋषीश्वर बोलती । तीं तीं तत्त्वें सत्य होतीं । हें सर्वज्ञ ज्ञाते जाणती । तेचि अर्थीं हरि बोले ॥ ५५ ॥ श्रीभगवानुवाच- युक्तंच सन्ति सर्वत्र भाषन्ते ब्राह्मण यथा । मायां मदीयामुद्गृवह वदतां किं नु दुर्घटम्‌ ॥ ४ ॥ ज्याचेनि मतें जैसें ज्ञान । तो तैसें करी तत्त्वव्याख्यान । या हेतू बोलती ब्राह्मण । तें सत्य जाण उद्धवा ॥ ५६ ॥ जरी अवघीं मतें प्रमाण । तरी कां करावें मतखंडण । उद्धवा तूं ऐसें न म्हणा । ते मी निजखूण सांगेन ॥ ५७ ॥ अघटघटित माझी माया । जे हरिहरां न ये आया । जे नाथिलें वाढवूनियां । लोकत्रया भुलवीत ॥ ५८ ॥ ते माया धरोनियां हातें । ऋषीश्वर निजमतें । जो जो जें जें बोलेल जेथें । तें तें तेथें घडे सत्य ॥ ५९ ॥ केवळ दोराचा सर्पाकार । हा श्वेत कृष्ण कीं रक्तांबर । ज्यासी जैसा भ्रमाकार । त्यासी साचार तो तैसा ॥ ६० ॥ तेवीं आत्मतत्त्व एकचि जाण । अविकारी निजनिर्गुण । तेथ नाना तत्त्वांचें व्याख्यान । बोलती ब्राह्मण मायायोगें ॥ ६१ ॥ त्या मायेच्या मायिका व्युत्पत्ती । नाना वाग्वाद स्वमतीं । त्याच वादाची वादस्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ६२ ॥ ऐसें बोलोनि श्रीकृष्णनाथ । उद्धवाप्रति साङ्‌ग निरूपित । तत्त्वविचारणा यथार्थ । स्वयें सांगत आपण ॥ ६३ ॥ हें पांचवे शोकींचें नीरूपण । श्रीकृष्ण‌उ द्धवविवरण । सांगितलें तत्त्वव्याख्यान । उद्धवा जाण यथार्थ ॥ ६४ ॥ नैतदेवं यथाऽऽत्थ त्वं यदहं वच्मि तत्तथा । एवं विवदतां हेतुं शक्तयो मे दुरत्ययाः ॥ ५ ॥ माझे मायेचें प्रबळ बळ । तेणें अभिमान अतिसबळ । वाढवूनि युक्तीचें वाग्जाळ । करिती कोल्हाळ वाग्वादी ॥ ६५ ॥ प्रबळ शास्त्रश्रवणाभिमान । तुझें वचन तें अप्रमाण । मी बोलतों हेंचि प्रमाण । पत्रावलंबन केलें असे ॥ ६६ ॥ सत्त्वरजादि गुणोत्पत्ती । माझे मायेच्या अनंत शक्ती । तेणें गुणक्षोभें विवादती । स्वमतव्याप्ती‌अभिमानें ॥ ६७ ॥ यासां व्यत्करा‌आसीद्विकल्पो वदतां पदम्‌ । प्राप्ते शमदमेऽप्येति, वादस्तमनुशाम्यति ॥ ६ ॥ कां गुणक्षोभें अभिमान । विकल्प उपजवी गहन । विकल्पें युक्तीचें क्षळण । करी आपण अतिवादें ॥ ६८ ॥ सांडितां गुणक्षोभविलास । रजतमांचा होय र्क्ष्हास । सत्त्ववृत्तीचा निजप्रकाश । अति‌उल्हास शमदमांचा ॥ ६९ ॥ शमदमांचे निजवृत्ती । संकल्प-विकल्पेंसीं जाती । वाद अतिवाद उपरमती । जेवीं सूर्याप्रती आंधारें ॥ ७० ॥ सर्वज्ञ ज्ञाते जे गा होती । ते नाना तत्त्वांच्या तत्त्वोक्ती । स्वयें विवंचं जाणती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ७१ ॥ परस्परानुप्रवेशत्तत्त्वानां पुरुषर्षभ । पौर्वापर्यप्रसंख्यानं यथा वक्तुर्विवक्षितम्‌ ॥ ७ ॥ गुरूपाशीं शास्त्रपाठा । करूनि साधिली निजनिष्ठा । एक उद्धवा पुरुषश्रेष्ठा । प्रियवरिष्ठा प्रियोत्तमा ॥ ७२ ॥ तत्त्वगणनेचे जे जे लेख । एकाचें थोडें एकाचें अधिक । हा ’अनुप्रवेश’ वोळख । एकामाजीं एक उपजती ॥ ७३ ॥ तत्त्वांपासूनि तत्त्वें होतीं । कारणरूपें कार्याची स्थिती । अंतीं जेथील तेथें प्रवेशती । हे तत्त्वोपपत्ती उद्धवा ॥ ७४ ॥ पूर्वस्थिति जें तें कारण । त्यापासोनि उपजे तें कार्य जाण । हें कार्यकारणांचें लक्षण । तत्त्वविचक्षण बोलती ॥ ७५ ॥ येथ वक्त्याचें जैसें मनोगत । तैशी तत्त्वसंख्या होत । कार्य-कारण एकत्व गणित । तत्वसंख्या तेथ थोडीच ॥ ७६ ॥ एकचि कार्य आणि कारण । गणितां आणिती भिन्न । तेथ तत्त्वसंख्या अधिक जाण । होय गणन उद्धवा ॥ ७७ ॥ एवं कार्यकारणें भिन्नभिन्नें । तत्त्वसंख्या थोडी बहुत होणें । हीं तत्त्ववक्त्यांचीं लक्षणें । तुज सुलक्षणें सांगितलीं ॥ ७८ ॥ येचि विषयींची उपपत्ती । स्वयें सांगताहे श्रीपती । कार्यकारणनिजतुक्ती । उद्धवाप्रती निवाडे ॥ ७९ ॥ एकस्मिन्नपि दृश्यन्ते प्रविष्टानीतराणि च । पूर्वस्मिन्वा परस्मिन्वा तत्त्वे तत्त्वानि सर्वशः ॥ ८ ॥ आकशापासूनि वायु झाला । तो गगनावेगळा नाही गेला । वायूपासूनि अग्नि झाला । तेथ प्रवेशु आला दोंहींचा ॥ ८० ॥ अग्नीपासून आला जळरस । त्यामाजीं तिंहीचा रहिवास । जळापासून पृथ्वीचा प्रकाश । तीमाजीं प्रवेश चहूंचा ॥ ८१ ॥ तैसें कार्य आणि कारण । परस्परें अभिन्न जाण । जेवी लेणें आणि सुवर्ण । वेगळेंपण एकत्वें ॥ ८२ ॥ जेवीं तंतु आणि पट । दोनी दिसती एकवट । तेवीं कार्यकारण सगट । दिसे स्पष्ट अभिन्न ॥ ८३ ॥ साक‌एचीं नारळें केळीं । परी तीं साकरत्वा नाहीं मुकलीं । तेवीं कारणांचीं कार्यें झाली । असतां संचलीं कारणत्वें ॥ ८४ ॥ जेवीं कां पृथ्वीचा मृत्पिंड । मृत्पिंडीं अनेक भांड । होतां गाडगीं उदंड । मृतिका अखंड सर्वांमाजीं ॥ ८५ ॥ तेवीं कारणीं कार्यविशेषु । कार्यासी कारणत्वें प्रकाशु । हा परस्परानुप्रवेशु । अनन्य बिलासु अखंडत्वें ॥ ८६ ॥ एक कार्य आणि कारण । होय भिन्न आणि अभिन्न । तेणें तत्त्वसंख्यालक्ष्ण । घडे जाण न्यूनाधिक ॥ ८७ ॥ पौर्वापर्यमतोऽमीषां प्रसङ्‌ख्यानमभीप्सताम्‌ । यथा विविक्तं यद्वक्त्रं गृह्णीमो युक्तिसम्भवात्‌ ॥ ९ ॥ म्या सांगितली तैशी जाण । तत्त्वसंख्या अधिकन्यन । व्हावया हेंचि कारण । वक्त्याची जानविवक्षा ॥ ८८ ॥ जैसें ज्यासी असे ज्ञान । जैसा ईप्सित मताभिमान । तैसतैसें तत्त्वव्याख्यान । ऋषीश्वर जाण बोलती ॥ ८९ ॥ जो बोले ज्या मतयुक्ती । तें तें घडे त्या मतसंमतीं । हें मी जाणें सर्वज्ञ श्रीपती । यालागीं त्या युक्ती मीही मानीं ॥ ९० ॥ जें बोलिजे ऋषीजन । सव्वीस तत्त्वें विवंचून । उद्धवा तुज मी सांगेन । सावधान अवधारीं ॥ ९१ ॥ अनाद्यविद्यायुक्तस्य पुरुषस्यात्मवेदनम्‌ । स्वतो न स्म्भवादन्यस्तत्त्वज्ञो ज्ञानदो भवेत्‌ ॥ १० ॥ प्रकृतिपुरुषमहत्तत्त्व येथें । अहंकार आणि महाभूतें । इंद्रियें विषयसमेतें । यें तत्त्वें निश्चितें पंचवीस ॥ ९२ ॥ येथ पुरुषाहोनिया भिन्न । जीव वेगळा करूनि जाण । तत्त्वसंख्यालक्षण । केलीं संपूर्ण सव्वीस ॥ ९३ ॥ जीवाच्या भिन्नत्वाचें कारण । अनादि अविद्येस्तव जाण । घे‌ऊनि ठेला देहाभिमान । कर्मबंधन दृढ झालें ॥ ९४ ॥ अहंकर्तेपणाचा खटाटोप । तेणें अंगीं आदळे पुण्यपाप । विसरला निजरूप । विषयलोलुप्य वाढवितां ॥ ९५ ॥ लागलें बद्धतेचें बंधन । न करवे कर्मपाशच्छेदन । त्याच्या उद्धारालागीं जाण । ज्ञानदाता सर्वज्ञ ईश्वर ॥ ९६ ॥ गुरुद्वारा पाविजे ज्ञान । तेथें ईश्वराचा आभार कोण । येथ ईश्वरकृपेवीण । सद्गु।रु जाण भेटेना ॥ ९७ ॥ झालिया सद्गुेरुप्राप्ती । ईश्वरकृपेवीण न घडे भक्ती । सद्गुारु तोचि ईश्वरमूर्ती । वेदशास्त्रार्थी संमत ॥ ९८ ॥ गुरु-ईश्वरां भिन्नपण । ऐसें देखे तो नागवला आपण । एवं ईश्वरानुग्रहें जाण । ज्ञानसंपन्न होय जीवु ॥ ९९ ॥ गुरूंनी सांगितली ज्ञानस्थिती । ते ईश्वरकृपेवीण चित्तीं । ठसावेना साधकांप्रती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १०० ॥ जीव नियम्य ईश्वर नियंता । जीव अज्ञान ईश्वर ज्ञानदाता । जीव परिच्छिन्न एकदेशिता । ईश्वर सर्वथा सर्वगत ॥ १ ॥ जीव हीन दीन अज्ञान । ईश्वर समर्थ सर्वज्ञ । जीवास दृढ कर्मबंधन । ईश्वर तो जाण निष्कर्म ॥ २ ॥ एवं ईश्वरकृपें जाण । जीवासी प्राप्त होय ज्ञान । यालागीं ईश्वराहून । जीव भिन्न या हेतू ॥ ३ ॥ म्हणशी करितां कर्माचरण । जीवासी प्राप्त हो‌ईल ज्ञान । हें सर्वथा न घडे जाण । जडत्वपण कर्मासी ॥ ४ ॥ कर्मा जडत्व जाण । त्यासी बहुत अज्ञान । त्या कर्मासी अत्यंत बद्धपण । हें सज्ञान जाणती ॥ ५ ॥ कर्म स्वरूपें जड अचेतन । त्यासी चेतविता ईश्वर जाण । तें न करितां ईश्वरार्पण । ज्ञानदाता कोण कर्मासी ॥ ६ ॥ कर्मासी जडत्वें नाहीं सत्ता । कर्मक्रियेचा ईश्वर ज्ञाता । ईश्वरचि कर्मफळदाता । कर्मचेतविता ईश्वरु ॥ ७ ॥ ज्ञान तोचि ईश्वर । तेणें रचिला हा विस्तार । संहारितां तोचि निर्धार । सत्तमात्र ईश्वर जाणावा ॥ ८ ॥ जीवासी ज्ञानसायुज्यता । कां स्वर्गभोगफळदाता । अथवा इहलोकें वर्तविता । जीवासी तत्त्वतां ईश्वरु ॥ ९ ॥ यापरी अवश्य जाण । जीव ईश्वर्‌ करितां भिन्न । तत्त्वें सव्वीस संपूर्ण । बोलिले ब्राह्मण या हेतू ॥ ११० ॥ पंचवीस तत्त्वांची कथा । ते जीवेश्वरांची ऐक्यता । तेही सांगेन मी आतां । त्यांच्या मता संमत ॥ ११ ॥ पुरुषेश्वरयोरत्र न वैलक्षण्यमण्वपि । तदन्यकल्पनापार्था ज्ञानं च प्रकृतेर्गुणः ॥ ११ ॥ जीवेश्वरांचे ऐक्यता । सहजचि असे स्वभावतां । तेथ अणुमात्र भेदवार्ता । न रिघे सर्वथा निश्चित ॥ १२ ॥ स्वभावें पाहतां दर्पण । एकाचें देखिजे दोन्हीपण । परी द्विधा नव्हेचि आपण । यापरी जाण जीवशिव ॥ १३ ॥ अज्ञानप्रतिबिंब तें जीव । त्याचा द्रष्टा तो सदाशिव । तरी ऐक्यतेचें जें वैभव । तो निजस्वभाव मोडेना ॥ १४ ॥ जेवीं दर्पणामाजीं आपण । तेवीं जीवरूपें शिवुचि जाण । दोनी चेतनत्वें समान । तेंही लक्षण अवधारीं ॥ १५ ॥ जैशी चेष्टा कीजे आपण । तेचि प्रतिबिंबीं दिसे जाण । तेवीं ईश्वरसत्ता सचेतन । गमनागमन जीवासी ॥ १६ ॥ जेणें स्वरूपें असे आपण । तद्रूमप प्रतिबिंबीं दिसे जाण । तेवीं ईश्वरत्व संपूर्ण । असे अविच्छिन्न जीवामाजीं ॥ १७ ॥ जैसा अग्नि राखां झांकोळिला । तरी अग्नि अग्निपणें असे संचला । तेवीं शिवासी जीवभावो आला । परी नाहीं मुकला निजत्वा ॥ १८ ॥ ॥ आशकां ॥ "हो कां जीव शीव दोनी एक । तरी एक मलिन एक चोख । तैसें सदोख आणि निर्दोख । हे विशेख कां दिसती" ॥ १९ ॥ थिल्लरीं प्रतिबिंबला सविता । त्या प्रतिबिंबा‌अंगीं सर्वथा । थिल्लरिंचे मळ पाहतां । दिसती तत्त्वतां लागलेसे ॥ १२० ॥ तेचि निर्वाळोनि पाहतां वेगीं । बिंबप्रतिबिंबनियोगीं । सर्वथा मळ न लगे अंगीं । उभयभागीं विशुद्ध ॥ २१ ॥ आरशा‌अंगीं टिकले मळ । सुबद्ध वैसले बहुकाळ । ते प्रतिबिंबा‌अंगीं केवळ । दिसती प्रबळ जडलेसे ॥ २२ ॥ तो मळ जैं पघे फेडावा । तैं आरिसा साहणे तोडावा । परी प्रतिबिंब केव्हां । साहणे धरावा हें बोलूं नये ॥ २३ ॥ तेवीं सदोष आणि निर्दोष । केवळ अविद्याचि हे देख । जीव शिव उभयतां चोख । नित्य निर्दोख निजरूपें ॥ २४ ॥ पाहतां शुद्धत्वें स्फटिक जैसा । जे रंगीं ठेवावा दिसे त्या‌ऐसा । स्वयें अलिप्त जैसातैसा । जीव स्वभावतां तैसाचि ॥ २५ ॥ जीव स्वयें चित्स्वरूप । जे गुणीं मिळे दिसे तद्रूदप । परी गुणदोष पुण्यपाप । जीवासी अल्प लागेना ॥ २६ ॥ प्रत्यक्ष प्रतिबिंबीं मिथ्यता । दिसे निजबिंबाचिया सत्ता । तेवीं जीवशिवांसी अभिन्नता । जाण तत्त्वतां निश्चित ॥ २७ ॥ जीवशिवांचें एकपण । तेणें सव्विसांमाजीं जाण । एक तत्त्व होतां न्यून । शेष तेंचि पूर्ण पंचवीस ॥ २८ ॥ आशंका ॥ "जीवशिवांचें एकपण । ऐसें जें जाणणें तें ’ज्ञान’ । तें एक तत्त्व येथें आन । त्यांमाजीं जाण उपजलें ॥ २९ ॥ तें ज्ञानतत्त्व अंगीकारितां । पंचवीस सव्वीस तत्तकथा । दोनी मतें होती वृथा” । ऐसें सर्वथा न म्हणावें ॥ १३० ॥ येथ मूळींचें निरूपण । श्लोकाचे अंतींचा चरण । ज्ञान तें प्रकृतीचा गुण । त्यासी वेगळेपण असेना ॥ ३१ ॥ गुणकर्मांच्या खटपटा । प्रपंच अज्ञानें अतिलाठा । ज्ञान अज्ञानाचा सत्त्ववांटा । जेवीं कांटेनि कांटा फेडिजे ॥ ३२ ॥ शोधित जो सत्त्वगुण । त्या नांव बोलिजे मुख्य ’ज्ञान’ । तेंही गुणांमाजीं पडे जाण । वेगळेंपण नव्हेचि तत्त्व ॥ ३३ ॥ ज्ञान स्वतंत्र तत्त्व होतें । तरी नासतीं दोनी मतें । तें पडे गुणा‌अंतौतें । यालागीं दोनी मतें निर्दुष्ट ॥ ३४ ॥ तेचि त्रिगुणांची व्यवस्था । तुज मी सांगेन आतां । ऐक उद्धवा तत्त्वतां । गुण सर्वथा आविद्यक ॥ ३५ ॥ प्रकृतिर्गुणसाम्यं वै प्रकृतेर्नात्मनो गुणाः । सत्त्वं रजस्तम इति स्थित्युत्पत्त्यन्तहेतवः ॥ १२ ॥ उत्पत्तिस्थितिनिर्दळण । हें त्रिगुणांचें कार्य पूर्ण । ’गुणसाम्य’ ते प्रकृति जाण । आत्मा ’निर्गुण’ गुणातीत ॥ ३६ ॥ म्हणशी परमात्मा गुणातीत । परी जीवात्मा गुणग्रस्त । हेही गा मीथ्या मात । ऐक वृत्तांत सांगेन ॥ ३७ ॥ चंद्र निश्चळ निजस्वभावें । तो चाले त्या अभ्रासवें । दिसे जेवीं सवेग धांवे । तेवीं गुणस्वभावें जीवात्मा ॥ ३८ ॥ घटामाजी उदक भरितां । घटाकाश भिजेना सर्वथा । तेवीं जीवात्मा गुणीं वर्ततां । अलिप्तता गुणकर्मीं ॥ ३९ ॥ जीव अहंकर्तेपणीं विख्यात । तो केवीं म्हणावा कर्मातीत । येचि अर्थीं कृष्णनाथ । विशदार्थ सांगत ॥ १४० ॥ सत्त्वं ज्ञानं रजः कर्म तमोऽज्ञानमिहोच्यते । गुणव्यतिकरः कालः स्वभावः सूत्रमेव च ॥ १३ ॥ सत्त्वगुणास्तव ’ज्ञान’ । रजोगुणें ’कर्म’ जाण । मोह आलस्ययुक्त गहन । तमीं ’अज्ञान’ नांदत ॥ ४१ ॥ सत्त्वादि जे तिन्ही गुण । केवळ प्रकृतीचे हे जाण । यांसी स्वतंत्रपण । नव्हेचि जाण या हेतू ॥ ४२ ॥ गुणक्षोभक ’काळ’ देख । तो पुरुषाचा अवलोक । पुरुष काळ हा नामविशेख । स्वरूपें एक हे दोन्ही ॥ ४३ ॥ स्वाभाविक मायेचें स्फुरण । प्रथम कार्य जें निर्माण । त्या नांव ’महत्तत्त्व’ जाण । ’सूत्र’ ’प्रधान’ ज्यासी म्हणती ॥ ४४ ॥ यालागीं प्रकृतीहूनि भिन्न । यासी न ये वेगळेंपण । हे प्रकृति कार्यकारणीं अभिन्न । तत्त्वविचक्षण मानिती ॥ ४५ ॥ अठ्ठावीस तत्त्वें पूर्वोक्त । हें भगवंताचें निज मत । तेंचि अडीचा श्लोकीं सांगत । संख्यातत्त्वार्थ निजबोधें ॥ ४६ ॥ पुरुषः प्रकृतिर्व्यक्तमहङ्‌कारो नभोऽनिलः । ज्योतिरापः क्षितिरिति तत्त्वान्युक्तानि मे नव ॥ १४ ॥ प्रकृति पुरुष महत्तत्त्व । महाभूतें अहंभाव । अठ्ठाविसांत हीं तत्त्वें नव । इतर वैभव तें ऐक ॥ ४७ ॥ श्रोत्रं त्वग्दर्शनं घ्राणो जिह्वेति ज्ञानशक्तयः । वाक्पाण्युपस्थपाय्वङ्‌‌घ्रि कर्माण्यङ्‌गोभयं मनः ॥ १५ ॥ मुख्य ’ज्ञानेंद्रियें’ पांच जाण । पांच ’कर्मेंद्रियें’ आन । सर्वेंद्रियें ज्ञानेंद्रियांअधीन । स्वतां गमन त्यां नाहीं ॥ ४८ ॥ आंधळें पायीं चालों जाणे । पांगुळ केवळ देखणें । अंधें पंगू खांदीं घेणें । परी बोलें वर्तणें देखण्याचेनि ॥ ४९ ॥ तेंवी ज्ञानेंद्रियां कर्मेंद्रियांसी । संगत्‌ई घडली असे तैशी । यालागीं मुख्यत्वें ज्ञानेंद्रियांसी । हृषीकेशी बोलिला ॥ १५० ॥ उभय इंद्रियां चाळक । तें मनचि गा एकलें एक । येणेंचि अकरा इंद्रियें देख । य्‌अदुनायक सांगत ॥ ५१ ॥ इंद्रियविषयनिरूपण । स्वयें सांगताहे नारायण । मुख्यत्वें विषय पांच जाण । तयाचें साध्‌अन गत्यादिक ॥ ५२ ॥ शब्दः स्पर्शो रसो गन्धो रूपं चेत्यर्थजातयः । गत्युक्त्युत्सर्गशिल्पानि कर्मायतनसिद्धयः ॥ १६ ॥ रसस्पर्शादि लक्षण । पांचही विषय हे जाण । गत्यादि क्रियाचरण । तें जाण साधन या विषयांचें ॥ ५३ ॥ दृष्टि रूपातें प्रकाशी । चरण धांवती तयापाशीं । हस्त उद्यत घ्यावयासी । रसस्पर्शसिद्धीसी विषयांचे ॥ ५४ ॥ एवं उभय इंद्रियीं जाण । विषय पांचचि प्रमाण । नव्हे अधिक तत्त्व गणन । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ५५ ॥ नव एकादश तत्त्वलक्षण । मागां दों शोकीं केलें निरूपण । येणें श्लोकें परम प्रमाण । विषय जाण पांचचि ॥ ५६ ॥ केवळ ज्ञानेंद्रियीं भोगु नव्हे । कर्मेंद्रियींही भोग न फावे । उभयसंयोगें भोग पावे । परी विषय आघवे पांचचि ॥ ५७ ॥ इंहीं पांच विषयीं आपण । व्यापिलें चतुर्दश भुवन । सुरासुर भुलविले जाण । यांचें गोडपण मारक ॥ ५८ ॥ जेवीं कां मैंद गोडपणें । संगती लागोनि जीव घेणें । तेवीं विषयसंगाचें साजणें । बांधोनि नेणें नरकासी ॥ ५९ ॥ नरकीं निरय भोगिती । तेथही न सोडी निषयासक्ती । या विषयांऐसा विश्वासघाती । आन त्रिजगतीं असेना ॥ १६० ॥ ते हे पंच विषय प्रमाण । पांचचि परी अतिदारुण । ब्रह्मादिक नाडले जाण । इतरांचा कोण पडिपाडु ॥ ६१ ॥ विषयांचें जें गोडपण । तें विखाहूनि दारुण । विष एकदां आणी मरण । पुनः पुनः मारण विषयांचें ॥ ६२ ॥ पुढती जन्म पुडती मरण । हें विषयास्तव घडे जाण । संसाराचें सबळपण । विषयाधीन उद्धवा ॥ ६३ ॥ जेथ विषयांचा विषत्यागु । तेथें उन्मळे भवरोगु । त्याचा आंदणा मी श्रीरंगु । ज्यासी विषयभोगु नावडे ॥ ६४ ॥ ते हे पंच विषय गा जाण । तुज म्यां केले निरूपण । आतां त्रिगुणांचें लक्षण । ऐक सावधान सांगतों ॥ ६५ ॥ उत्पत्तिस्थितिनिर्दळण । त्रिगुणांस्तव घडे जाण । यालागीं स्वयें श्रीकृष्ण । तिन्ही गुण अंगीकारी ॥ ६६ ॥ अंगीकारूनि तिन्ही गुण । अठ्ठावीस तत्त्वें केलीं पूर्ण । हें कृष्णसंमत लक्षण । उद्धवा जाण निश्चित ॥ ६७ ॥ त्रिगुणगुणेंवीण प्रकृती । सृष्टिसर्जनीं नाहीं शक्ती । गुणद्वारा उत्पत्तिस्थिती । संहारी अंतीं स्वकार्यें ॥ ६८ ॥ तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । कार्यकारणलक्षण । यथार्थ जाण विभाग ॥ ६९ ॥ सर्गादौ प्रकृतिर्ह्यस्य कार्यकारणरूपिणी । सत्त्वादिभिर्गुणैर्धत्ते पुरुषोऽव्यक्त ईक्षते ॥ १७ ॥ प्रकृतीपासाव विकारमेळा । त्रिगुणांचिया गुणलीळा । सात कारणें कार्ये सोळा । ऐक वेगळा विभाग ॥ १७० ॥ महदहंकारमहाभूतें । सातही ’कारणे’ निश्चितें । अकरा इंद्रियें विषययुक्तें । जाणावीं येथे ’कार्यें’ सोळा ॥ ७१ ॥ यापरी निजप्रकृती । रजोगुणातें धरोनि हातीं । कार्यकारणांचिया युक्तीं । करी उत्पत्ती सृष्टीची ॥ ७२ ॥ सृजिलिये सृष्टीसी जाण । सत्त्वगुणें करी पालन । तमोगुण निर्दळण । प्रकृति आपण स्वयें करी ॥ ७३ ॥ उरुषें न करितां ’ईश्वर’ । उत्पत्ति स्थिति निर्दळण । प्रकृतीचेनि नव्हे जाण । तेंही उपलक्षण अवधारीं ॥ ७४ ॥ हात पाय न लावितां जाण । केवळ कूर्मीचें अवलोकन । करी पिलियांचें पालन । तैसें ईक्षण पुरुषाचें ॥ ७५ ॥ कां सूर्याचिया निजकिरणीं । जेवीं अग्नीतें स्त्रवे मणी । तेणें स्वधर्मकर्में ब्राह्मणीं । कीजे यज्ञाचरणीं महायागु ॥ ७६ ॥ तैसें हें जाण चिन्ह । येणें होय कार्य कारण । चाले स्वधर्म‌आ चरण । यापरी जाण उद्धवा ॥ ७७ ॥ ऐसें चालता प्रकृतिपर । ब्राह्मण करिती स्वाचार । तेणें वृद्धि कर्माचार । परापर उद्धवा ॥ ७८ ॥ तेवीं पुरुषाचें ईक्षण । प्रकृति लाहोनि आपण । उत्पत्ति-स्थिति-निर्दळण । करावया पूर्ण सामर्थ्य पावे ॥ ७९ ॥ छायामंडपींचें विचित्र सैन्य । दिसावया दीपचि कारण । तेवीं प्रकृतिकार्यासी जाण । केवळ ईक्षण पुरुषाचें ॥ १८० ॥ जगाचें आदिकारण । प्रकृति होय गा आपण । प्रकृति प्रकाशी पुरुष जाण। तो महाकारण या हेतु ॥ ८१ ॥ प्रकृति व्यक्त पुरुष अव्यक्त । हे विकारी तो विकाररहित । हे गुणमयी गुणभरित । तो गुणातीत निजांगें ॥ ८२ ॥ प्रकृति स्वभावें चंचळ । पुरुष अव्ययत्वें अचळ । प्रकृति बद्धत्वें शबळ । पुरुष केवळ बंधातीत ॥ ८३ ॥ प्रकृति स्वभावें सदा शून्य । पुरुष केवळ चैतन्यघन । प्रकृतीस होय अवसान । पुरुष तो जाण अनंत ॥ ८४ ॥ प्रकृति केवळ निरानंद । यालागीं तेथ विषयच्छंद । पुरुष पूर्ण परमानंद । विषयकंदच्छेदक ॥ ८५ ॥ प्रकृतिपुरुषांचें वेगळेंपण । तुज म्यां सांगितलें संपूर्ण । हेचि परमार्थाची निजखूण । पुरुष तो भिन्न प्रकृतीस ॥ ८६ ॥ तेंचि जाणावया विशद । नाना मतांचे मतवाद । त्या मतांचा मतप्रबोध । तुज मी शुद्ध सांगेन ॥ ८७ ॥ व्यक्तादयो विकुर्वाणा धतवः पुरुषेक्षया । लब्धवीर्याः सृजन्त्यण्डं संहताः प्रकृतेर्बलात्‌ ॥ १८ ॥ पुरुषेक्षण झालिया प्राप्त । महदहेंकराचि पदार्थ । प्रकृतिबळें समस्त । एकत्र होत ब्रह्मांडें ॥ ८८ ॥ पुरुषावलोकें वीर्यप्राप्ती । लाहोनि ब्रह्मांडांतें धरिती । यालागीं यातें ’धातु’ म्हणती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ८९ ॥ हें सामान्यतां निरूपण । तुज म्यां सांगितलें आपण । जे नाना मतवादि जाण । विशेष लक्षण बोलती ॥ १९० ॥ सप्तैव धातव इति तत्रार्थाः पञ्च खादयः । ज्ञानमात्मोभयाधारस्ततो देहेन्द्रियासवः ॥ १९ ॥ पंचवीस सव्वीस तत्त्वगणन । मागां सांगितलें निरूपण । आतां साता तत्त्वांचें लक्षण । ऐक सुलक्षण सांगेन ॥ ९१ ॥ महाभूतें जीव शिव । हा सातां तत्त्वांचा जाण भाव । प्राणेंद्रियसमुदाव । याचिपासाव पैं होत ॥ ९२ ॥ महाभूतें अचेतन । यांसी चेतविता जीव जण । त्याचाही द्रष्टा परिपूर्ण । ईश्वर जाण सातवा ॥ ९३ ॥ माया महत्तत्त्व अहं जें येथ । हें सूक्ष्मकारणें निश्चित । यांपासोनि स्थूळ भूतें होत । कारणें कार्यांत सबाह्य ॥ ९४ ॥ मन‌इंाद्रियादि जें कां येथें । तेंही यांत अंतर्भूतें । एवं जाण येणें मतें । पांच महाभूतें नेमिलीं ॥ ९५ ॥ यांसी चेतविता जीव । सर्वनियंता सदाशिव । एवं सप्ततत्त्वसमुदाव । तो हा उगव उद्धवा ॥ ९६ ॥ आतां सहा तत्त्वें ये पक्षीं जाण । तुज मी सांगेन निरूपण । जें बोलिले ऋषिजन । तें विवंचन अवधारीं ॥ ९८ ॥ षडित्यत्रापि भूतानि पञ्च षष्ठः परः पुमान्‌ । तैर्युक्त आत्मसम्भूतैः सृष्द्वेदं समुदपाविशत्‌ ॥ २० ॥ पाहें पां पंच महाभूतें । पुरुषें सृजिलिया येथें । स्वयें प्रवेशला तेथें । यालागीं त्यातें ’षट्‌’ मणती ॥ ९८ ॥ ज्यांचेनि मतें तत्त्वें चारी । तयांची ऐक नवलपरी । जो देखे प्रत्यक्षाकारीं तोचि धरी तत्त्वार्थ ॥ ९९ ॥ चत्वार्यवेति तत्रापि तेज आपोऽन्नमात्मनः । जातानि तैरिदं जातं जन्मावयविनः खलु ॥ २१ ॥ प्रत्यक्ष देखिजेती नयनीं । अग्नि आप आणि अवनी । तींचि सत्यत्वें मानी । मतज्ञानी मतवादी ॥ २०० ॥ या स्थूळातें चेतविता । तो आत्मा घेतला चौथा । या तिहींवीण साकारता । न घडे सर्वथा सृष्टीसी ॥ १ ॥ नाम रूप क्रिया कारण । सृष्टीसी मुख्यत्वें यांचेनि जाण । यालागीं भूतें तीनचि प्रमाण । बोलतें लक्षण तें ऐसें ॥ २ ॥ एवं भूतें तीन आत्मा चौथा । हे चौं तत्त्वांची व्यवस्था । आतां सतरा तत्त्वांची कथा । ऐक तत्त्वतां सांगेन ॥ ३ ॥ संख्याने सप्तदशके भूतमात्रेन्द्रियाणि च । पञ्च पञ्चैकमनसा आत्मा सप्तदशः स्मृतः ॥ २२ ॥ पंच विषय पंच भूतें । पांच इंद्रियें घेतलीं येथें । मन आत्मा मेळवूनि तेथें । केलीं निश्चितें सतरा हीं ॥ ३ ॥ यापरी तूं गा जाण । सोळा तत्त्वांचें निरूपण । तेथेंचि त्रयोदशलक्षण । स्वयें नारायण सांगत ॥ ४ ॥ तद्वत्‌ षोडशसंख्याने आत्मैव मन उच्यते । भूतेन्द्रियाणि पञ्चैव मन आत्मा त्रयोदश ॥ २३ ॥ सतरा तत्त्वांचें निरूपण । तुज सांगीतलें संपूर्ण । त्यांत मन आत्मा एक जाण । तेंही लक्षण अवधारीं ॥ ५ ॥ जेवीं कां कथा सांगतां आपण । स्वभावें हात हाले जाण । तेवी मनाचें चंचळपण । स्वभावें जाण होतसे ॥ ६ ॥ राजा सिंहासनीं बैसला । तो राजत्वें पूज्य झाला । वसंत खेळतां धांविन्नला । तरी काय मुकला राज्यपदा ॥ ७ ॥ जेवीं काळें क्षोभला अतिथोर । तरी तो बोलिजे सागर । कां निश्चळ राहिलिया नीर । तरी समुद्र समुद्रत्वें ॥ ८ ॥ तेवीं मनपणें अतिचंचळ । कां आत्मत्वें निजनिश्चळ । दोहींपरी अविकळ । जाळ केवळ परमात्मा ॥ ९ ॥ यालागीं मनाचें जें मनपण । आत्मसाक्षात्कारेंवीण । कोणासी न कळेचि गा जाण । हें मुख्य लक्षण मनाचें ॥ २१० ॥ मना‌अत्म्यांचें उभया‌इक्य । तेंचि सतरांमाजीं उणें एक । उरलीं तीं आवश्यक । सोळा हीं देख निजतत्त्वें ॥ ११ ॥ पांच इंद्रियें पंच महाभूतें । अकरावें मन ठेवूनि तेथें । जीव शिव दोनी घे‌ऊनि येथें । केलीं निश्चितें तेराचि ॥ १२ ॥ आणिकही नाना तत्त्वमतें । मागां पुशिलीं तुवां मातें । तीहीं सांगेन मी तूतें सुनिश्चितें उद्धवा ॥ १३ ॥ एकादशत्व आत्मासौ महाभूतेन्द्रियाणि च । अष्टौ प्रकृतयश्चैव पुरुषस्च नवेत्यथ ॥ २४ ॥ अकरा तत्त्वें बोलिलीं येथें । पांच इंद्रियें पंच महाभूतें । जीव शिव आणि मनातें । एकत्वें येथें गणिलीं देख ॥ १४ ॥ दृति मृदु आणि पिंवळा । एकत्वें जेवीं चांपेकळा । सुवास सुस्वाद सुनीळा । एकत्र मेळा आम्रफळीं ॥ १५ ॥ तेवीं जीव शिव आणि मन । तिन्ही एकरूपचि जाण । जेवीं हेममणी संपूर्ण । हेमसूत्रीं सज्ञान ओंविती ॥ १६ ॥ पंच इंद्रियें पंच महाभूतें । जीव शिव मन एकात्मते । एकादश तत्त्वें येथें । जाण निश्चितें या हेतू ॥ १७ ॥ प्रकृति पुरुष महदहंकार । पंच महाभूतें अविकार । सकळ विकारसंभार । यामाजीं साचार अंतर्भूत ॥ १८ ॥ एवं ऋषिश्वरांच्या व्युत्पत्ती । तत्त्वविवक्षा उपपत्ती । नव तत्त्वसंख्यायुक्ती । जाण या रीतीं उद्धवा ॥ १९ ॥ एक बोलती निजज्ञानी । प्रकृति पुरुष तत्त्वें दोनी । आन पाहतां जनींवनीं । तिसरें नयनीं दिसेना ॥ २२० ॥ जे निश्चयें अतिविष्टंक । ते म्हणती तत्त्व एक । एक तेंचि अनेक । अनेकीं एक निश्चित ॥ २१ ॥ जेवीं सुवर्णाचें भूषण । भूषणीं स्वयें सुवर्णा । तेवीं अनेकीं एकपण । एकत्वें जाण निश्चित ॥ २२ ॥ जेवीं उंसाची निजगोडी । गूळसाकरेच्या मोडी । तेचि दिसे चढोवढी । तेंवी तत्त्वपरवडी निजतत्त्वें ॥ २३ ॥ त्या जाणवया निजतत्त्वातें । ऋषीश्वरांचीं बहुत मतें । मी स्वल्पचि बोलिलों येथें । येरवीं अगणितें ग्रंथांतरीं ॥ २४ ॥ इति नानाप्रसंख्यानं तत्त्वानामृषिभिः कृतम्‌ । सर्वं न्याय्यं युक्तिमत्त्वाद्विदुषां किमशोभनम्‌ ॥ २५ ॥ येथ सर्वज्ञ ज्ञाते होती । ते नाना मतें तत्त्वयुक्ती । विवंचोनियां उपपत्ती । विभागूं जाणती यथार्थें ॥ २५ ॥ निजतत्त्व जाणावया जाण । करितां तत्त्वविवंचन । सर्वथा न लगे दूषण । तत्त्वें अधिकन्यून बोलतां ॥ २६ ॥ वस्तुतां विकारांच्या ठायीं । ज्ञात्यासी बोलावया विशेष नाहीं । विकार ते प्रकृतीच्या ठायीं । आत्मा शुद्ध पाहीं अविकारी ॥ २७ ॥ प्रकृतीहूनि आत्मा भिन्न । यालागीं तो अविकारी जाण । विकार प्रकृतीमाजीं पूर्ण । हें मुख्य लक्षण तत्त्वांचें ॥ २८ ॥ प्रकृतीहूनि वेगळेपण । पुरुषांचें जाणावया आपण । यालागीं उद्धवा जाण । तत्त्वविवंचन साधावें ॥ २९ ॥ हें ऐकोनि कृष्णवचन । उद्धव चमत्कारला जाण । प्रकृतिपुरुषांचें भिन्नपण । देवासी आपण पुसों पां ॥ २३० ॥ उद्धव उवाच- प्रकृतिः पुरुषश्चौभौ यद्यप्यात्माविलक्षणौ । अन्योन्यापाश्रयात्कृष्ण दृश्यते न भिदा तयोः ॥ २६ ॥ प्रकृतौ लक्षते ह्यात्मा प्रकृतिश्च तथाऽऽत्मनि । प्रकृति पुरुष भिन्नभिन्न । येचि अर्थीं उद्धवें जाण । साडेतीन श्लोकीं अगाध प्रश्न । देवासी आपण पुसत ॥ ३१ ॥ प्रकृतीहूनि पुरुष भिन्न । हें ऐकोनि देवाचें वचन । प्रकृतिपुरुषांवेगळा श्रीकृष्ण । हा द्रष्टा संपूर्ण दोहींचा ॥ ३२ ॥ म्हणे श्रीकृष्ण श्रेष्ठा । हे प्रकृतिपुरुषांची चेष्टा । तूं वेगळेपणें देखणा द्रष्टा । सुरवरिष्ठा श्रीपती ॥ ३३ ॥ प्रकृति पुरुष दोनी भिन्न । एक जड एक चेतन । हें मजही कळतसे जाण । परी वेगळेपण लक्षेना ॥ ३४ ॥ जैसा तप्तलोहाचा गोळ । दिसे अग्नीचि केवळ । तेवीं प्रकृतिपुरुषांचा मेळ । दिसे सबळ एकत्वें ॥ ३५ ॥ जेवीं बीज धरोनियां पोटेंसीं । निकणू कोंडा वाढे कणेंसीं । तेंवी प्रकृति जाण पुरुषेंसी । अभिन्नतेसीं जडलीसे ॥ ३६ ॥ कां नारळ चोख धरोनि पोटीं । निरस कठिण वाढे नरोटी । तेवीं पुरुषयोगें प्रकृति लाठी । झाली सृष्टे अनिवार ॥ ३७ ॥ कणावेगळा कोंडा न वाढे । तेवीं पुरुषवेगळी प्रकृति नातुडे । हें प्रकृतिपुरुषांचें बिरडें । तुजवेगळें निवाडें निवडेना ॥ ३८ ॥ जेवीं कां शिंपीचे अंगीं । जडली रुपेपणाची झगी । तेवीं पुरुषाच्या संयोगीं । प्रकृति जगीं भासत ॥ ३९ ॥ तीक्षण रविकरसंबंधीं । भासे मृगजळाची महानदी । तेवीं पुरुषाच्या संबंधीं । प्रकृति त्रिशुद्धी आभासे ॥ २४० ॥ जेवीं कां नभीं नीलिमा । वेगळी न दिसे सांडूनि व्योमा । तेवीं प्रकृति-पुरुषोत्तमां । वेगळीक आम्हां दिसेना ॥ ४१ ॥ मुख्य देहाचें जें देहपण । तेंचि प्रकृतीचें बाधकत्व जाण । या देहाहोनियां भिन्न । पुरुषाचें भान दिसेना ॥ ४२ ॥ अहंप्रत्ययें आत्मा म्हणती । तेही देहाकारें स्फुरे स्फूर्ती । देहावेगळी आत्मप्रतीती । न दिसे निश्चितीं गोविंदा ॥ ४३ ॥ डोळा सांडूनि दृष्टि उरे । वातीवेगळा दीप थारे । तैं देहावेगळा आत्मा स्फुरे । साचोकारें गोविंदा ॥ ४४ ॥ जिव्हेवीण रसस्वादू । श्रोत्रेंवीण ऐकवे शब्दू । तैं देहावेगळा आत्मबोधू । होय विशदू गोविंदा ॥ ४५ ॥ कांटेवीण फणस आतुडे । कां सोपटेंवीण ऊंस वाढे । तैं देहावेगळा आत्मा जोडे । वाडेंकोडें गोविंदा ॥ ४६ ॥ तुम्हींच सांगीतली निजात्मखूण । नरदेह ब्रह्मप्राप्तीचें कारण । शेखीं देहावेगळें आत्मदर्शन । केवीं आपण प्रतिपादां ॥ ४७ ॥ आणि आत्म्यावेगळी प्रकृति । सर्व प्रकारें न ये व्यक्ती । रूपावेगळी छाया के‌उती । कैशा रीतीं आभासे ॥ ४८ ॥ गोडीवेगळी साकर होये । परिमळवेगळा कापूर राहे । तैं आत्म्यावेगळी पाहें । प्रकृति लाहे अभिव्यक्ती ॥ २५० ॥ गोडीवेगळा वाढे ऊंस । कणेंवीण जैं वाढे भूस । तैं आत्म्यावेगळी रूपसा । माया सावकाश व्यक्तीसी ये ॥ ५१ ॥ प्रकृतिलक्षणीं आत्मा लक्षीजे । आत्मेनि प्रकृतीसी प्रकाशिजे । अनादि दोनी इये योग जे । वेगळा लाहिजे बोध केवीं ॥ ५२ ॥ प्रकृतीहूनि आत्मा भिन्न । सर्वथा आम्हां न दिसे जाण । येचि अर्थींची विनवण । उद्धव आपण करीतसे ॥ ५३ ॥ एवं मे पुण्डरीकाक्ष महान्तं संशयं ह्रदि । छेत्तुमर्हसि सर्वज्ञ वचोभिर्नयनैपुणैः ॥ २७ ॥ कमलानाभा कमलानना । कमलालया कमलधारणा । कमलिनीवासस्थाना । कमलनयना श्रीकृष्ण ॥ ५४ ॥ प्रकृतिपुरुषयोग अवघड । योग्यां न कळे भिन्न निवाड । या संशयाचें अतिजाड । ह्रदयीं झाड वाढलें ॥ ५५ ॥ ह्रदयीं संदेहाचीं मूळें । प्रकृतिभूमीं विकल्पजळें । संशयवृक्ष तेणें बळें । वाढला अहंफळें सदा फळित ॥ ५६ ॥ ज्या वृक्षाचीं सदा फळें खातां । जीव न राहे सर्वथा । तेणें संशयाची अधिकता । उसंतू चित्ता पैं नाहीं ॥ ५७ ॥ ऐशिया वृक्षाचें छेदन । कृपेनें करावें आपण । सोडूनि ज्ञानतिखवाग्बाण । करीं निर्दळण निजांगें ॥ ५८ ॥ योगयागशास्त्रपाठें । करितां धर्मकर्मकचाटें । या वृक्षाचें पानही न तुटे । हें कठिणत्व मोठें गोविंदा ॥ ५१ ॥ या वृक्षाचें करितां छेदन । ब्रह्मा झाला संदेहापन्न । तुवां हंसगीत सांगेन । उद्धरिला जाण सुपुत्र ॥ २६० ॥ मुख्य ब्रह्मयाची ऐशी अवस्था । तेथ इतरांची कोण कथा । या वृक्षाचा छेदिता । तुजवीण सर्वथा आन नाहीं ॥ ६१ ॥ छेद करितां वरिवरी । वासना मुळ्या उरल्या उरी । फांफा‌ईल चौगुण्यापरी । अतिशयें भारी बांबळे ॥ ६२ ॥ याचा समूळ मूळेंसीं कंदू । छेदिता छेदक तूं गोविंदू । तुजवेगळा संशयच्छेदू । भलता प्रबुद्धू करूं न शके ॥ ६३ ॥ म्हणशी संशय हृदयाच्या ठायीं । तेथ शस्त्रांचा रिगमू नाहीं । म्यां छेदावें कैसें कायी । ते अर्थींचे मी पाहीं सांगेन ॥ ६४ ॥ तुझें ज्ञानचक्र अलोलिक । तुझेनि शब्दतेजें अतितिख । समूळ संशयाचें छेदक । तुझें वचन एक गोविंदा ॥ ६५ ॥ ऐसें तुझे ज्ञानवचन । तुवां केलिया कृपावलोकन । समूळ संशयाचें निर्दळण । सहजेंचि जाण होताहे ॥ ६६ ॥ तरी तुवां श्रीमुकुंदा । फेडावी माझी संशयबाधा । तया उद्धवाचिया शब्दा । गोपीराद्धा सांगेन म्हणे ॥ ६७ ॥ असतां बहुसाल सज्ञान । सकळ संशयांचें निर्दळण । मीचि कर्ता हें काय कारण । तेंही लक्षण अवधारीं ॥ ६८ ॥ त्वत्तो ज्ञानं हि जीवानां प्रमोषस्तेऽत्र शक्तितः । त्वमेव ह्यात्ममायाया गतिं वेत्थ न चापरः ॥ २८ ॥ अतर्क्य तुझी माताशक्ती । त्या आवरूनि आनंदस्फूर्ती । दृढ लावूनि विषयासक्ती । तेणें जीव होती अज्ञान ॥ ६९ ॥ करितां विषयांचें ध्यान । जीव होय मना‌अधेन । त्यास मन करी हीनदीन । अतिकृपण जड मूढ ॥ २७० ॥ ऐसे केवळ जीव जे अज्ञान । ते तुझ्या कृपाकटाक्षें जाण । झाले गा ज्ञानसंपन्न । हे कृपा पूर्ण पैं तुझी ॥ ७१ ॥ तुझी कृपा झालिया परिपूर्ण । करूनि मायेचें निर्दळण । जीव होती ब्रह्म पूर्ण । तुझेनि जाण श्रीकृष्ण ॥ ७२ ॥ म्हणशी माझे गांठीं जाण । नाहीं ज्ञान ना अज्ञान । तरी तूं ज्ञानदाता आपण । झालासी पूर्ण तें ऐक ॥ ७३ ॥ धातासवितासनत्कुमारांसी । नारदप्रल्हाद‌अं बरीषांसी । कालीं उपदेशिलें अर्जुनासी । ऐसा तूं होसी ज्ञानदाता ॥ ७४ ॥ म्हणसी बहुत असती सज्ञान । त्यांसी पुलोनि साधावें ज्ञान । तुजवेगळें मायेचें नियमन । त्यांचेनि जाण कदा नोहे ॥ ७५ ॥ मायेची उत्पत्तिस्थिती । मायानिर्दळणी गती । तूं एक जाणता त्रिजगतीं । यालागीं श्रीपती कृपा करीं ॥ ७६ ॥ यापरी उद्धवें विनंती । करूनि प्रार्थिला श्रीपती । तो प्रकृतिपुरुषविभाग युक्तीं । उद्धवाप्रती सांगेल ॥ ७७ ॥ जेवीं सूर्यापाशीं मृगजळ । कां गगनीं उपजे आभाळ । काचभूमिके दिसे जळ । तैशी प्रकृती सबळ पुरुषापाशीं ॥ ७८ ॥ यापरी स्वयें श्रीकृष्ण । प्रकृतिपुरुषनिरूपण । समूळ सांगताहे आपण । तो म्हणें सावधान उद्धवा ॥ ७९ ॥ श्रीभगवानुवाच- प्रकृतिः पुरुषश्चेति विकल्पः पुरुषर्षभ । एव वैकारिकः सर्गो गुणव्यतिकरात्मकः ॥ २९ ॥ प्रकृति पुरुष हे दोनी । सदा अत्यंत वेगळेपणीं । जैसा दिवस आणि रजनी । एक लोपोनि एक प्रबळें ॥ २८० ॥ दिवस लोपतांचि जाण । अंधकारेंसीं परिपूर्ण । घे‌ऊनियां ताराग्रहण । रात्री आपण उल्हासे ॥ ८१ ॥ तेवीं लोपतां पुरुषांचे भान । घे‌ऊनि कार्येंसीं कारणगुण । ज्ञानाज्ञानेंसीं परिपूर्ण । प्रकृति जाण थोरावे ॥ ८२ ॥ येथ मुख्यत्वें जो देहाकार । तेंचि प्रकृतीचें दुर्ग थोर । तेथें ठेविला ठाणेदार । देह‌अ हंकार महायोद्धा ॥ ८३ ॥ जो जिवलग विश्वासाचा । प्रकृतीस विश्वास त्याचा । तो नेटका झुंझार दुर्गींचा । भरभारू तेथींचा तो वाहे ॥ ८४ ॥ तेथ अभिमानें आपण । प्रकृतीस निर्भय दे‌ऊनि जाण । घालूनि सामग्री विकारभरण । दुर्ग दारुण बळकाविलें ॥ ८५ ॥ ऐक्‌ उद्धवा पुरुषश्रेष्ठा । निजप्रकृतीचिया निष्ठा । देहदुर्गीं अभिमान लाठा । जाहला वरिष्ठा या हेतू ॥ ८६ ॥ देहदुर्गीं गुण अहंकार । दुर्गसामग्रीविकार । अवघी प्रकृतीच साचार । तदाकार भासात ॥ ८७ ॥ गगनीं गंधर्वनगर जाण । माड्या गोपुरें वन उपवन । तैशी प्रकृति आपण । नानाकारें जाण भासत ॥ ८८ ॥ जैशी मृगजळाची सरिता । दुरोनि दिसे प्रवाहतां । तेवीं प्रकृतीची सर्वथा । नानाकारता आभासे ॥ ८९ ॥ ऐसें प्रकृतिदुर्ग महथोर । तेथें नाना सामग्रीविकार । जे जे घाली अहंकार । ते ऐक साचार सांगेन ॥ २९० ॥ ममाङ्‌ग माया गुणमय्यनेकधा विकल्पबुद्धीश्च गुणैविधत्ते । वैकारिकस्त्रिविधोऽध्यात्ममेकं अथाधिदैवमधिभूतमन्यत्‌ ॥ ३० ॥ माझी माया गा आपण । सर्वांगें जाहली तिनी गुण । तेही अभिमानें आपण । निजसत्ता जाण आवरिले ॥ ९१ ॥ तेचि देहदुर्गाभंवतीं जाण । त्रिगुणांचें आगड पूर्ण । तेथें मांडूनि त्रिपुटीविंदाण । मारा दारुण अभिमान करी ॥ ९२ ॥ त्या दुर्गाचें दृढ रक्षण । मुख्यत्वें त्रिपुटीचि जाण । ते त्रिपुटीचें मूळ लक्षण । तुज मी आपण सांगेन ॥ ९३ ॥ अगा उद्धवा बुद्धिमंता । तुज मी सांगेन एक आतां । तेथ असती तिनी वाटा । दोनी अव्हाटा एकी नीट ॥ ९४ ॥ त्या मार्गीची उभारणी । सैन्य रचिलें दाही आरणीं । युद्धकार जो निर्वाणीं । तो तेथुनी निरीक्षी ॥ ९५ ॥ तेही मार्ग धरिले चौपाशीं । राखण बैसले तिनी वाटेशीं । तेथ रिघावया सायासीं । ज्ञानियासी काय काज ॥ ९६ ॥ आतां असो इतुली परी । देहदुर्गाची थोर भरोभरी । म्हणे ऐकें गा यया थोरी । उद्धवातें हरि सांगत ॥ ९७ ॥ कार्य कारण कर्तव्यता । कर्म क्रिया अहंकर्ता । ध्येय ध्यान विषयध्याता । दुर्ग सर्वथा दृढ केलें ॥ ९८ ॥ तेथ भोग्य भोग भोक्ता । कर्म कार्य आणि कर्ता । अभिमान जाहला वसता । प्रकृतिसंमतासंयोगें ॥ ९९ ॥ तेथ चोरद्वाराचिया लक्षीं । उघडूनि कामक्रोधखिडकी । घाला घालितां एका‌एकीं । सकळ लोकीं कांपिजे ॥ ३०० ॥ त्यांचा घे‌ऊनिया भेदरा । तापस पळाले सैरा । लंगोटी सांडिल्याही दिगंबरा । क्रोध थरथरा कांपवी ॥ १ ॥ लोभयंत्राचे कडाडे । तमधूम दाटे चहूंकडे । महामोहाचें गडद पडे । मागेंपुढें दिसेना ॥ २ ॥ दुर्गासभोंवतीं नवद्वारें । नवद्वारीं नवही यंत्रें । तेणें यंत्रद्वारें । विषय महामारें मारिती ॥ ३ ॥ देहभिमानाचें चाळक । मुख्यत्वें मनचि एक । तें दुर्धर महामारक । दुर्ग‌अचटक तेणें केलें ॥ ४ ॥ माळ चढोनि अवचट । पारके रिघती घडघडाट । ते दशमद्वाराची वाट । दे‌ऊनि कपाट दृढ बुजिलें ॥ ५ ॥ यापरी स्वयें मन । दुर्ग पन्नासी आपण । त्यासी सबाह्य राखण । घरटी जाण स्वयें करी ॥ ६ ॥ धरोनि कामाचा हात । मन रिगे पारक्यांत । मुख्य धुरांसी लोळवीत । इतरांचा तेथ कोण पाडू ॥ ७ ॥ ऐसें मनाचें मारकपण । अनिवार अतिकठिण । त्रिविधतापें खोंजूनि जन । हुंबत जाण पाडिले ॥ ८ ॥ देवांपासूनि आधिदैविक । मानस ताप आध्यात्मिक । भूतांपासाव तो भौतिक । या नांव देख त्रिविध ताप ॥ ९ ॥ सत्त्वगुणें देख अंतःकरण । रजोगुणें इंद्रियें जाण । महाभूतें विषयभान । तमोगुणें जाण प्रसवत ॥ ३१० ॥ त्रिविध विकारीं विकारबहुळ । ते हे प्रकृतीच येथें केवळ । हेचि दुर्गसामग्री प्रबळ । प्रपंच सबळ येणें जाहला ॥ ११ ॥ संकल्पमहापर्जन्योदकीं । वासनाजीवनें भरलीं टांकीं । तेणें जीवनें दुर्गाच्या लोकीं । संसारसुख दुःखीं विचरिजे ॥ १२ ॥ दुर्गनवद्वारीं समस्तें । आधिदैव आणि आधिभूतें । अध्यात्म तें कोण येथें । ऐक निश्चितें सांगेन ॥ १३ ॥ कोणे द्वारीं कोण यंत्र । कोण चेतविता कैसें सूत्र । कैसा होतसे विषयमार । तोही निर्धार तूं ऐक ॥ १४ ॥ दृग्रूपमार्कं वपुरत्र रन्ध्रे परस्परं सिध्यति यः स्वतः खे । आत्मा यदेषामपरो य आद्यः स्वयानुभूत्यखोलसिद्धसिद्धिः । चक्षु इंद्रिय यंत्र थोर । तेथ कामिनीरूपाचा महामार । घायें भेदिती जिव्हार । पडले सुरनर कोट्यनुकोटी ॥ १५ ॥ चक्षुगोल इंद्रिय शरीरीं । तेथ अधिदेव सूर्य अधोष्ठात्री । देखिल्या रूपाची धारणा धरी । तेंचि निजनिर्धारीं अध्यात्म ॥ १६ ॥ नीलपीतरूपाभरण । दृष्टीं देखिजे दर्शन । तेंचि अधिभूत सत्य जाण । दृश्याचें भान दृष्टीसी ॥ १७ ॥ सूर्य अधिदैव सिद्ध आहे । अधिभूत दृष्टी भरलें पाहें । शरीरीं चक्षुगोळही होये । परी अध्यात्मतेजेंवीण राहे अंधत्व ॥ १८ ॥ अधिदैव अधिभूत असतां पाहीं । अध्यात्म तेज जंव दृष्टीसी नाहीं । तंव देखणें न घडे कांहीं । अंधत्व ते ठायीं ठसावोनि ठाके ॥ १९ ॥ अध्यात्म अधिभूत दोनी आहे । जैं अधिदैव सूर्य अस्ता जाये । तैं दृष्टीचें देखणें ठाये । स्तब्धत्वें राहे तमामाजीं ॥ ३२० ॥ ते काळीं दृष्टीसी पाहें । स्त्रेहसूत्र मेळवून लाहे । अग्नि जरी केला साह्ये । तरी प्रकाशू नोहे रवी‌ऐसा ॥ २१ ॥ तेथ चंद्रोदयो जरी जाहला । तो सूर्यसमान नाहीं आला । निशा निरसूनि दृष्टीं साह्य जाहला । यालागीं सूर्य बोलिला अधिदैव ॥ २२ ॥ अध्यात्म अधिभूत असतां पाहीं । अधिदैव सूर्य जेथ नाहीं । तेथ दृष्टींचे न चले काहीं । तुज म्यां तेंही सांगीतलें ॥ २३ ॥ अध्यात्म अधिदैव दोनी आहे । अधिभूतें दृश्यदर्शन राहे । तैं सत्य ब्रह्मज्ञान होये । जैं गुरुकृपा पाहे पूर्णांशें ॥ २४ ॥ येथ जें दृश्याचें दर्शन । तेणें देहबुद्धी दृढ जाण । तें दृश्याचें पुशिल्या भान । होय देहेंशीं शून्य संसार ॥ २५ ॥ अधिदैव अध्यात्म अधिभूत । त्रिपुटी बोलिजे हे येथ । तुज म्यां सांगीतली साद्यंत । जाण निश्चित विभाग ॥ २६ ॥ येथूनि त्रिपुटीचें विंदान । दृश्य द्रष्टा आणि दर्शन । कर्म कर्ता क्रियाचरण । ध्येय ध्यान ध्यातृत्व ॥ २७ ॥ त्रिपुटि म्हणावयाचें कारण । परस्परें सापेक्षपण । तें अपेक्षेचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥ २८ ॥ नानाकारें अतिविलास । येथ देखणी दृष्टी डोळस । तेही सूर्येंवीण वोस । हा अनुप्रवेश परस्परें ॥ २९ ॥ सूर्य आहे डोळा नाहीं । तेथ पाहणें न चले पाहीं । हो कां डोळा आहे सूर्य नाहीं । तेथें दृष्टीचें कांहीं चालेना ॥ ३३० ॥ सूर्य दृष्टी दोनी आहे । परी दृश्य जैं नाहीं होये । तैं दोहींचें सामर्थ्य राहे । देखावें काये दृष्टीनें ॥ ३१ ॥ सूर्य प्रकाशी रूपासी । दृष्टीसी रिघोनियां स्वांशेंसीं । दाखवी नाना आकारांसी । परस्परानुप्रवेशीं बोलिजे सिद्धी ॥ ३२ ॥ इतुकें करोनियां सविता । नभोमंडळीं अलिप्तता । तेवीं जगदाकारें चेतविता । अलिप्त तत्त्वतां चिदात्मा ॥ ३३ ॥ जो जगामाजीं भरला राहे । जगाचा हृदयस्थही होये । जग जरी होये जाये । परी तो आहे जैसातैसा ॥ ३४ ॥ जेवीं आकाश‌अ भ्यंतरीं । होतां घटाकाश सहस्त्रवरी । आकाश त्या घटाभीतरीं । प्रत्यक्षाकारीं भरलें दिसे ॥ ३५ ॥ ते घटचि होती जाती । परी आकाश सहजस्थिती । तेवीं उत्पत्तिस्थिति‌अंतीं । अलिप्त श्रीपती चिदात्मा ॥ ३६ ॥ तो आदीची अनादि आदि । तो बुद्धीची अनादि बुद्धी । तो सिद्धीची अनादि सिद्धी । जाण त्रिशुद्धी परमात्मा ॥ ३७ ॥ हा प्रकाशा प्रकाशक । अर्काचाही आदि अर्क । स्वयें त्रिपुटीचा द्योतक । अलिप्त एक परमात्मा ॥ ३८ ॥ हा विवेकाचाही विवेक । हा सुखाचा सुखदायक । बुद्धीचा जो बोधक । प्रकाशा प्रकाशक परमात्मा ॥ ३९ ॥ त्यासी जाणों जातां जाणपणें । वेदांसी जाहलें लाजिरवाणें । वेडावलीं स्मृतिपुराणें । न कळे शास्त्रपठणें भांडतां ॥ ३४० ॥ देवो देवी आणि देवता । भोग्य भोग आणि भोक्ता । नाना त्रिपुटींची त्रिगुणता । जाण सर्वथा प्रकृतीचि हे ॥ ४१ ॥ हा आद्य अव्यक्त अतर्क्य । प्रकृतिपर परमात्मा एक । यासी जाणावया विवेक । न चले देख आणिकांचा ॥ ४२ ॥ याचेनि हा हृदयीं देखिजे । याचेनि हा इत्थंभूत जाणिजे । यातें धरोनि हा पाविजे । हेंही लाहिजे कृपें याचेनी ॥ ४३ ॥ हा स्वप्रकाश सहज निजें । यासी प्रकाशी ऐसें नाहीं दुजें । याचेनि प्रकाशें हा देखिजे । याचेनि हो‌इजे या‌ऐसें ॥ ४४ ॥ अधिदैव अध्यात्म अधिभूत । नेत्रद्वारा सांगितलें तेथ । तैसेंच अन्य इंद्रियीं व्यावृत्त । देव सांगत संकलितें ॥ ४५ ॥ एवं त्वगादि श्रवणादि चक्षुर्जिह्वादि नासादि च चित्तयुक्तम्‌ ॥ ३१ ॥ योऽसौ गुणक्षोभकृतो विकारः प्रधानमूलान्महतः प्रसूतः । प्रधानपासाव महदादिद्वारा । नाना विकारांचा पसारा । गुणक्षोभें क्षोभूनि पुरा । उठिला उभारा त्रिपुटीरूपें ॥ ४६ ॥ जेवीं सूर्यें चक्षुरादि विंदान । तैसेंचि श्रोत्र त्वचा रसना घ्राण । हें ज्ञानेंद्रियपंचक जाण । याचें कर्म समान त्रिपुटीरूपें ॥ ४७ ॥ येथ कर्मेंद्रियें पांच आन । तीं ज्ञानेंद्रिया अधीन । हस्त पाद गुद शिश्न । वाचा जाण पांचवी ॥ ४८ ॥ त्यांसी ज्ञानेंद्रियें प्रेरिती । तैं कर्मेंद्रियें कर्मीं वर्तती । एवं उभयपंचकस्थिती । जाण निश्चितीं दशेंद्रियें ॥ ४९ ॥ चित्तचतुष्टयचमत्कार । मन बुद्धि चित्त अहंकार । हीं एकचि परी भिन्न प्रकार । जैसा व्यापार तैसें नांव ॥ ३५० ॥ केवळ देहाकारें मीपण । तो सबळ अहंकार जाण । संकल्पविकल्प जे गहन । तेंचि मन उद्धवा ॥ ५१ ॥ गतभोगाचें जें चिंतन । तें चित्ताचें लक्षण । केवळ निश्चयात्मक जाण । बुद्धि संपूर्ण ती नांव ॥ ५२ ॥ हें गुणक्षोभाचें लक्षण । भोगसाधनें भोग्य जाण । त्याहूनि भोक्ता तो भिन्न । तेंही उपलक्षण अवधारीं ॥ ५३ ॥ त्वगिंद्रियीं विषयस्पर्शन । तेथें अधिदैव वायू जाण । त्याहूनि परमात्मा भिन्न । चित्स्वरूपें जाण अविकारी ॥ ५४ ॥ गंधविषयो घ्राणेंद्रियें । तेथ अधिदैव अश्विनौदेव होये । आत्मा त्याहूनि वेगळा पाहें । चित्स्वरूपें राहे अविकारी ॥ ५५ ॥ रसनेंद्रिय अतिगहन । रसविषयो तेथील जाण । वरुण अधिदैवत आपण । आत्मा स्वानंदपूर्ण रसातीत ॥ ५६ ॥ श्रवणेंद्रियीं विषयो शब्द । तेथ दिशा अधिदैव प्रसिद्ध । शब्दीं निजात्मा निःशब्द । चिदत्वें शुद्ध अविकारी ॥ ५७ ॥ चक्षुरिद्रियलक्षण । पूर्वीं निरूपिलें जाण । हें ज्ञानेंद्रियविंदान । त्रिपुटी संपूर्ण ऐशा रीतीं ॥ ५८ ॥ चित्त इंद्रिय जें कां येथ । चिंतन विषयो त्यासी प्राप्त । वासुदेव अधिदैवत । आत्मा अलिप्त चित्तेंसीं ॥ ५९ ॥ मनेंद्रिय अतिचपळ । संकल्प विषयो त्याचा प्रबळ । तेथ अधिदैव चंद्र निर्मळ । आत्मा केवळ मनातीत ॥ ३६० ॥ अहंकार इंद्रिय कठिण । तेथील विषयो मीपण । रुद्र अधिदैवत जाण । परमात्मा भिन्न अहंकारेंसीं ॥ ६१ ॥ बुद्धींद्रिय अतिसज्ञान । बोद्धव्य तेथींचा विषयो जाण । ब्रह्मा अधिदैवत आपण । आत्मा चिद्धन बुद्ध्यतीत ॥ ६२ ॥ चित्तचतुष्टय सकारण । त्रिपुटी सांगीतली हे संपूर्ण जाण । आतां कर्मेंद्रियांचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥ ६३ ॥ वागिंद्रियीं वाच्य विषयो । अग्नि अधिदैवत तेथील पहा हो । तेथ सरस्वतीशक्तीचा निर्वाहो । यासी अलिप्त देवो महामौनें ॥ ६४ ॥ पाणींद्रियीं ग्रहण विषयो । इंद्र अधिदैवत तेथील पहा हो । तेथ क्रियाशक्तीचा निर्वाहो । यासी अलिप्त देवो अक्रियत्वें ॥ ६५ ॥ पादेंद्रियीं गति विषयो । तेथें उपेंद्र अधिदैवो । तेथें गमशक्तीचा निर्वाहो । यासि अलिप्त देवो निश्चलत्वें ॥ ६६ ॥ गुदेंद्रियीं वसर्ग विषयो । निर्‌ऋति आधिदैवत तेथील पहा हो । क्षरशक्तीचा तेथ निर्वाहो । त्यासी अलिप्त देवो अक्षरत्वें ॥ ६७ ॥ शिश्नेंद्रियीं रति विषयो । प्रजापति येथें अधिदैवो । आनंदशक्तीचा तेथें निर्वाहो । त्यासी अलिप्त देवो परमानंदें ॥ ६८ ॥ ज्ञानकर्मेंद्रियें कर्माचरण । चित्तचतुष्टयाचें लक्षण । हें गुणक्षोभाचें कारण । समूळ जाण मायिक ॥ ६९ ॥ तेंचि गुणक्षोभाचें प्रधान मूळ । प्रकृतिविकारें होय स्थूळ । आत्मा अविकारी निर्मळ । अलिप्त केवळ प्रकृतीसी ॥ ३७० ॥ जेवीं वृत्तिभूमीसमवेत । गृहीं गृहसामग्री समस्त । अभिमानें उपार्जी गृहस्थ । परी तो त्या‌अतीत आपण जैसा ॥ ७१ ॥ तेवीं त्रिगुणक्षोभें अभिमान । वाढवी नाना विकारवन । आत्मा वसंत तो भिन्न । तेंचि निरूपण हरि बोले ॥ ७२ ॥ अहं त्रिवृन्मोहविकल्पहेतुर्वैकारिस्तामस ऐन्द्रियश्च ॥ ३२ ॥ आत्मा परिज्ञानमयो विवादो ह्यस्तीति नास्तीति भिदार्थनिष्ठः । अहंअध्यासें संसारप्राप्ती । जीवासी लागली निश्चितीं । त्या अहंकाराचे निवृत्त्‌ंई । भवनिर्मुक्ती जीवासी ॥ ७३ ॥ ऐसा बाधक्त्वें दुर्धर । कैंचा उठिला अहंकार । हाही पुसों पाहसी विचार । ऐक साचार सांगेन ॥ ७४ ॥ स्वस्वरूपातें विसरून । दृढ जें स्फुरे मीपण । तोचि अहंकार जाण। विकारें त्रिगुणक्षोभक ॥ ७५ ॥ जागृतीचा जो विसरु । तोचि स्वप्नसृष्टीचा विस्तारू । वस्तुविमूख जो अहंकारू । तोचि संसारू त्रिगुणात्मक ॥ ७६ ॥ विकारें क्षोभती तिन्ही गुण । हें विस्मरण मोहाचें लक्षण । तेणें विकारले तीन गुण । ते विभाग भिन्न अवधारीं ॥ ७७ ॥ मूळीं बोलिला वैकारिकू । तो अहंकार जाण सात्त्विकू । तो चित्तचतुष्टयद्योतकू । होय प्रकाशकू अधिदैवें ॥ ७८ ॥ सत्त्वापासोनि उपजे मन । मनापासाव विकार गहन । यालागीं वैकारिक जाण । सत्त्वगुण बोलिजे ॥ ७९ ॥ ज्ञान कर्म उभय पंचक । हा इंद्रियांचा दशक । जाहला रजोगुण द्योतक । यालागीं ऐंद्रियक म्हणिपे त्यासी ॥ ३८० ॥ तामस गुण जो कां येथें । आकाशवादि पंचीकृतें । आवरणरूपें महाभूतें । विषयसमवेतें उपजवी ॥ ८१ ॥ महाभूतें विषयपंचक । झाला तमोगुण प्रकाशक । यालागीं भूतादि देख । यासी आवश्यक बोलिजे ॥ ८२ ॥ एवं त्रिगुणगुणविकारें । काम्यक्र्मसंस्कारें । सबळ हो‍ऊनि अहंकारें । संसारीं संचरे नाना हेतु ॥ ८३ ॥ या प्रकृतिविकारांपासून । आत्मा अतिशयें भिन्न । जेवीं मृगजळातें भरून । अलिप्त भानू नभामाजीं ॥ ८४ ॥ जैसा प्रकाशोनि सर्पाकार । सर्पासी नातळे स्वयें दोर । तेवीं प्रकाशोनि संसार । निःसंग निर्विकार निजात्मा ॥ ८५ ॥ जेवीं कृष्ण पीत रक्त श्वेत । स्फटिक ठेवितां तेथतेथ । जरी तदाकार भासत । तरी तो अलिप्त शुद्धत्वें ॥ ८६ ॥ तैसा गुणसंगें जीवात्मा बद्ध । दिसे तरी तो अतिशुद्ध । हा नेणोनियां निजबोध । करिती विवाद मतवादी ॥ ८७ ॥ एक म्हणती आत्मा देही । एक म्हणती तो विदेही । एक म्हणती आत्म्याच्या ठायीं । हे दोन्ही नाहीं सर्वथा ॥ ८८ ॥ एक म्हणते आत्मा सगुण । एक म्हणती तो गुणविहीन । एक म्हणती ते वेगळी खूण । सगुण निर्गुण परमात्मा ॥ ८९ ॥ एक प्रतिपादिती भेद । एक प्रतिपादिती अभेद । एक म्हणती दोन्ही अबद्ध । आमुचें मत शुद्ध देहात्मवादू ॥ ३९० ॥ एक म्हणती हें मिथ्याभूत । प्रत्यक्ष दिसताहे जो येथ । तो प्रंपच मानिती सत्य । हेंचि मत एकाचें ॥ ९१ ॥ ऐसे भेदवाद सकळ । विचारितां अज्ञानमूळ । आत्मा चिन्मात्र केवळ । भेदातें समूळ छेदक ॥ ९२ ॥ ’आत्मा परिज्ञानमय’ शुद्ध । हें शोकींचें मूळ पद । तेणें निरसे । अज्ञानभेद । आत्मा शुद्ध बुद्ध चिदात्मा ॥ ९३ ॥ जेवीं सक्षत्र रजनी । निवटीत प्रकटे तरणी । तेवीं सभेद कार्य निरसूनी । प्रकट चित्किरणीं चिद्भामनू ॥ ९४ ॥ तेथ गुणेंसी माया उडे । भेदा‌असहित वाद बुडे । मूळासह अज्ञान खुडे । चहूंकडे सच्चिदानंद ॥ ९५ ॥ आत्म सच्चिदानंद पूर्ण । तेथ सकळ मिथ्या अज्ञान । तें अज्ञाननिरासीं साधन । विवेक सांख्यज्ञान व्यर्थ दिसे ॥ ९६ ॥ तेचि विषयींचें निरूपण । श्लोकार्धें सुलक्षण । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । साध्यसाधनविभाग ॥ ९७ ॥ व्यर्थोऽपि नैवोपरमेत पुंसां मत्तः परावृत्तधियां स्वलोकात्‌ ॥ ३३ ॥ मूळीं समूळ मिथ्या अज्ञान । अज्ञानजन्य विषयभान । तें देखोनि भुलले जन । पडिलें विस्मरण स्वस्वरूपीं ॥ ९८ ॥ मी परमात्मा हृदयस्थ सन्निधी । त्या मजपासोनि उपरमे बुद्धी । मग विषयासक्ति त्रिशुद्धी । आवडे उपाधि देह गेह दारा ॥ ९९ ॥ जें स्वस्वरूपाचें विस्मरण । तें वाढवी तीव्र विषयध्यान । तेणें जीवासी जन्ममरण । अनिवार जाण देहाभिमाने ॥ ४०० ॥ तो नासावया देहाभिमान । वैराग्ययुक्त ज्ञानध्यान । मीचि बोलिलों साधन । समूळ अज्ञानच्छेदक ॥ १ ॥ जंववरी अंगीं देहाभिमान । तंव अवश्य पाहिजे साधन । निःशेष निरसल्या अज्ञान । वृथा साधन मीही मानीं ॥ २ ॥ म्हणशी तें कोण पां अज्ञान । जें शुद्धासी लावी जीवपण । त्या जीवा‌अंगीं जन्ममरण । अनिवार जाण वाढवी ॥ ३ ॥ स्वस्वरूप विसरोनि जाण । देहीं स्फुरे जें मीपण । अत्यंत दृढतर अज्ञान । तो देहाभिमान उद्धवा ॥ ४ ॥ गौण नांव त्याचें अज्ञान । येर्क्ष्हवीं मुख्यत्वें देहाभिमान । हें ऐकोनि देवाचें वचन । दचकलें मन उद्धवाचें ॥ ५ ॥ तेचि अर्थींचा प्रश्न । देवासी पुसे आपण । कोण्या युक्तीं देहाभिमान । जन्ममरण भोगवी ॥ ६ ॥ उद्धव उवाच- त्वत्तः परावृत्तधियः स्वकृतैः कर्मभिः प्रभो । उच्यावचान्‌ यथा देहान्‌ गृह्णन्ति विसृजन्ति च ॥ ३४ ॥ सर्वत्र सदा संमुख गगन । त्यासी कदा न घडे विमुखपण । तेंवी आत्मा सबाह्य परिपूर्ण । वृत्ति विमुख जाण होय कैसी ॥ ७ ॥ जैं जाळीं बांधवे गगन । तैं अक्रिया लागे कर्मबंधन । वंध्यागर्भ सटवे जाण । तैसें जन्ममरण मुक्तासी ॥ ८ ॥ आत्म्यावेगळें कांहीं । रितें तंव उरलें नाहीं । तरी ये देहींचा ते देहीं । गमनसिद्धी पाहीं कैसेनी ॥ ९ ॥ पुथ्वी रुसोनि वोसरां राहे । आकाश पळोनि पर्क्ष्हां जाये । तैं देहींचा देहांतरा पाहें । आत्मा लाहे संसरण ॥ ४१० ॥ सात समुद्र गिळी मुंगी । तैं आत्मा उंचनीच योनी भोगी । हे अतर्क्य तर्केना मागी । भुलले योगी ये अर्थीं ॥ ११ ॥ तन्ममाख्याहि गोविन्द दुर्विभाव्यमनात्मभिः । न ह्येतत्प्रायशो लोके विद्वांसः सन्ति वश्चिताः ॥ ३५ ॥ अभिनव हे तुझी गती । सर्वथा न कळे श्रीपती । मायामोहित जे चित्तीं । त्यां तुझी स्थिती नेणवे ॥ १२ ॥ तूं आत्मा अद्वितीय अविनाश । तेथ उत्पत्ति स्थिति विनाश । नाथिला दाविसी भवभास । हा अतर्क्य विलास तर्केना ॥ १३ ॥ येथ वेदाची युक्ती ठेली । उपनिषदें वेडावलीं । पुराणें मुकीं झालीं । अतियत्नेंे लक्षिणी न वचेचि मागी ॥ १४ ॥ तुझे केवळ कृपेवीण । तुझें इत्थंभूत नव्हे ज्ञान । ऐसे जड मूढ हरिकृपाहीन । त्यांसी भवबंधन तुटेना ॥ १५ ॥ तुझे योगमायेची अतर्क्यता । ब्रह्मा भुलविला वत्सें नेतां । शिवू भुलविला मोहिनी देखतां । इतरांची कथा ते कोण ॥ १६ ॥ प्रपंचीं अथवा परमार्थी । तुझेनि चालती इंद्रियवत्ती । यालागीं गोविंदनामाची ख्याती । त्रिजगतीं वाखणिली ॥ १७ ॥ सादर कृपापूर्वक आपण । माझा सांगवा अतर्क्य प्रश्न । देहीं देहांतरा संचरण । जीवास जन्ममरण तें कैसें ॥ १८ ॥ ऐकोनि उद्धवाचा प्रश्न । हांसित्रला मधुसूदन । हें अवघें मायिक जाण । कल्पनाविंदान मनोमय ॥ १९ ॥ श्रीभगवानुवाच-मनः कर्ममयं नृणामिन्द्रियैः पंचभिर्युतम्‌ । लोकल्लोकं प्रयात्यन्य आत्मा तदनुवर्तते ॥ ३६ ॥ अकरा इंद्रियें पंच म्हाभूतें । हें सोळा कळांचें लिंगदेह येथें । मुख्यत्वें प्राधान्य मनाचें तेथें । नाना विषयांतें कल्पक ॥ ४२० ॥ येथ लिंगदेह तेंचि मन । मना‌आधीन इंद्रियें जाण । मनाचेनि देहासी गमन । तेथ देहाभिमान मनासवें ॥ २१ ॥ मन ज्यातें सोडूनि जाये । तेथ अभिमान उभा न राहे । मनोयोगें अभिमान पाहें । देहाचा वाहे खटाटोप ॥ २२ ॥ जेथ विषयासक्त मन । करी शुभाशुभ कर्माचरण । तेव्हां हो‍ऊनि कर्माधीन । देही करी गमन देहांतरा ॥ २३ ॥ आत्मा यासी अलिप्त भिन्न । परी देहासवें दावी गमन । हें अति‌अतर्क्य विंदान । ऐक लक्षण तयाचें ॥ २४ ॥ घट जेथ जेथ हिंडों वैसे । आकाश त्यासवें जात दिसे । परी ढळणें नाहीं आकाशें । आत्म्याचें तैसें गमन येथें ॥ २५ ॥ घटामाजीं भरिजे अमृत । अथवा घालिजे खातमूत । आकाश दोहींसीं अलिप्त । तेवीं सुखदुःखातीत देहस्थ आत्मा ॥ २६ ॥ घट घायें केजे शतचूर । परी आकाशीं न निघे चीर । तेवीं नश्वरीं अनश्वर । जाण साचार निजात्मा ॥ २७ ॥ घट फुटोनि जेथ नाशे । तेथ आकाश आकाशीं सहज असे । नवा घट जेथ उपजो बैसे । तों तेथ आकाशें व्यापिजे ॥ २८ ॥ तेवीं देहाचें नश्वरपण । आत्मा अखंडत्वें परिपूर्ण । आत्म्यासी देहांतरगमन । जन्ममरण असेना ॥ २९ ॥ देहीचें देहांतरगमन । वासनायोगें करी मन । तें मनोगमनाचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥ ४३० ॥ ध्यायन्मनोऽनुविषयान्‌ दृष्टान्वानुश्रुतानथ । उद्यत्सीदत्‌ कर्मतन्त्रं स्मृतिस्तदनुशाम्यति ॥ ३७ ॥ श्रुतदृष्टविषयांचें ध्यान । निरंतर वाढवी मन । तीव्र धारण दारुण । अन्य स्फुरण स्फुरेना ॥ ३१ ॥ आवडत्या विषयांचें ध्यान । अंतकाळीं ठसावे जाण । तेव्हां तदाकार होय मन । सर्वभावें आपण तन्निष्ठा ॥ ३२ ॥ तेव्हां भोगक्षयें जाण । मागल्या देहाचा अभिमान । सहजेंचि विसरे मन । पुढील ध्यान एकाग्रतां ॥ ३३ ॥ विषयवासनारूढ मन । निजकर्मतंत्रे जाण । देहांतरीं करी गमन । तेथ सप्राण संचरे ॥ ३४ ॥ मागील सांडिल्या देहातें । सर्वथा स्मरेना चित्तें । पुढें धरिलें आणिकातें । हेंही मनातें स्मरेना ॥ ३५ ॥ विषयाभिनिवेशेन नात्मानं यत्स्मरेत्पुनः । जन्तोर्वै कस्यचिद्धेतोर्मृत्युरत्यन्तविस्मृतिः ॥ ३८ ॥ जन्म त्वात्मतया पुंसः सर्वभावेन भूरिद । विषयस्वीकृतिं प्राहुर्यथा स्वप्नमनोरथः ॥ ३९ ॥ विषयाभिनिवेशें मन । ज्या स्वरूपाचें करी ध्यान । तद्रूभप होय आपण । पूर्वदेहाचें स्मरण विसरोनियां ॥ ३६ ॥ तेंचि विस्मरण कैसें । निजबालत्व प्रौढवयसें । निःशेख नाठवे मानसें । पूर्वदेह तैसें विसरोनि जाय ॥ ३७ ॥ ऐसें अत्यंत विस्मरण । त्या नांव देहाचें मरण । त्या विसरासवें जाण । चेतना सप्राण निघोनि जाये ॥ ३८ ॥ जेव्हां चेतना जाय सप्राण । तेव्हां देहासी ये प्रेतपण । त्या नांव उद्धवा मरण । जन्मकथन तें ऐक ॥ ३९ ॥ स्न्नेहें द्वेषें अथवा भयें । अंतकाळीं जें ध्यान राहे । पुरुष तद्रू्पचि होये । जन्मही लाहे तैसेंचि ॥ ४४० ॥ भरत करितां अनुष्ठान । अंतीं लागलें मृगाचें ध्यान । तो मृगचि झाला आपण । ध्यानानुरूपें मन जन्म पावे ॥ ४२ ॥ द्वेषें ध्यातां श्रीकृष्णासी । तद्रू पता झाली पौण्ड्रकासे । जैसें दृढ ध्यान ठसावे मनोरम । तेंचि जन्म पुरुषासी ॥ ४४ ॥ मग तेणें ध्यानानुभवें । जैसा कांहीं आकारू संभवे । तेथ देहाभिमान पावे । ’हें मी आघवें’ म्हणोनी ॥ ४५ ॥ येथ मन आणि अभिमान । स्वरूप एक कार्यें भिन्न । हें चित्तचतुष्टयलक्षण । जाणती सज्ञान एकात्मता ॥ ४६ ॥ दैवयोगें त्या देहाचें । बरवें वोखटें घडे साचें । तैं अभिमान घे‌ऊनि नाचे । जन्म पुरुषाचें या नांव ॥ ४७ ॥ परी हें देह नव्हे आन । हेंही स्मरेना तें मन । पूर्वील जो देहाभिमान । तोचि येथ जाण आरोपी ॥ ४८ ॥ येचि अर्थींचा दृष्टांत । स्वयें सांगताहे श्रीकृष्णनाथ । जेवीं स्वप्न आणी मनोरथ । विसरवित निजदेहा ॥ ४९ ॥ स्वगृहीं दरिद्री निद्रित । तो स्वप्नीं होय अमरनाथ । मग उर्वशीप्रमुख अप्सरांत । असे मिरवत ऐरावतीं ॥ ४५० ॥ तें दरिद्रदेह माझें गेलें । हें अमरदेह प्राप्त झालें । ऐसें स्वप्नीं नाहीं आठवलें । तैसें जन्म झालें जनासी ॥ ५१ ॥ मजूर रा‌उळींचें घृत नेतां । तो तुरुंगीं चढे मनोरथा । मन नाचूं लागे उल्हासतां । स्वकल्पिता कल्पना ॥ ५२ ॥ सवळ वारूचें उड्डाण । म्हणूनि उडूं जातां आपण । पडोनि घृतकुंभ होय भग्न । पुसती जन काय झालें ॥ ५३ ॥ बळें उडाला माझा घोडा । परी स्मरेना तो फुटला घडा । बंदीं पडला रोकडा । नेणे बापुडा मनोरथें ॥ ५४ ॥ येथवरी तीव्र जें विस्मरण । त्या नांव देहाचें मरण । अति‌उद्यत जें मनाचें ध्यान । तेंचि जन्म प्राण्यासी ॥ ५५ ॥ एवं आत्म्यासी जन्ममरण । तें केवळ भ्रमाचें लक्षण । तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ५६ ॥ स्वप्नं मनोरथं चेत्थं प्राक्तनं न स्मरत्यसौ । तत्र पूर्वमिवात्मानमपूर्वं चानुपश्यति ॥ ४० ॥ स्वप्न देखत्या पुरुषासी । विसरोनि निजदेहासी । स्वप्नींच्या दे‌अगेहांसी । साभिमानेंसीं वाढवी ॥ ५७ ॥ जागृतिदेहो राहिला तेथें । स्वप्नदेहो पावलों येथें । एवं पूर्व अपूर्व दोहींतें । न स्मरे चित्ते पुरुष जैसा ॥ ५८ ॥ जागृति आणि देखिलें स्वप्न । या दोहीं देहांसीं देखता भिन्न । तेवीं जन्म आणि मरण । जीवासी जाण असेना ॥ ५९ ॥ एवं देहासी जन्म नाश । आत्मा नित्यमुक्त अविनाश । स्वप्नमनोरथविलास । तैसा बहुवस संसार ॥ ४६० ॥ देहासी जन्म स्थिति मरण । यांसी मनचि गा कारण । मनःकल्पित संसार जाण । तेंचि श्रीक्रुष्ण सांगत ॥ ६१ ॥ इन्द्रियायनसृष्ट्येदं त्रैविध्यं भाति वस्तुनि । बहिरन्तर्भिदाहेतुर्जनोऽसज्जनकृद्यथा ॥ ४१ ॥ मनें कल्पिली सकळ सृष्टी । मनःकृत इंद्रियकामाठी । मनें वाढविली त्रिपुटी । कर्मकसवटी विभाग ॥ ६२ ॥ अधिदेव अध्यात्म अधिभूत । हें त्रैविध्य मनःकृत । वस्तु अखंडचि तेथ । त्रिधा भासत कल्पना ॥ ६३ ॥ जैसें भांडें कुंभार करी । तेथ नभ दिसे तदाकारीं । गगन सर्वथा अविकारी । तें दिसे विकारी भांडयोगें ॥ ६४ ॥ तेवीं आत्मा अविकारी नित्य शुद्ध । तेथ मनःकल्पित त्रिविध । नानापरींच्या त्रिपुटी विविध । वाढविला भेद तो ऐक ॥ ६५ ॥ कार्य कर्म आणि कर्ता । ध्येय ध्यान आणि ध्याता । ज्ञेय ज्ञान आणि ज्ञाता । या मनःकल्पिता त्रिविध ॥ ६६ ॥ अहं कोहं सोहं भेद । त्वंपद असिपद । सत्‌ चित्‌ आणि आनंद । हेही संबंध मायिक ॥ ६७ ॥ असंताचिये निवृत्ती । संतत्व प्रतिपादी वेदोक्ती । जडाचिये समाप्ती । चिदत्व बोलती वस्तूसी ॥ ६८ ॥ करितां दुःखाचा छेद । वस्तूसी म्हणती परमानंद । एवं सच्चिदानंद । जाण प्रसिद्ध मायिक ॥ ६९ ॥ असंत मिथ्या मायिक पाहीं । तैसें तत्त्व कोण ठेवीं ठायीं । जडासीचि ठाव नाहीं । तेथ चिदत्व कायी संपादे ॥ ४७० ॥ जेथ नाहीं दुःखसंबंध । तेथ कोण म्हणे आनंद । एवं वस्तूच्या ठायीं सच्चिदानंद । मायिक संबंध या हेतू ॥ ७१ ॥ जेथ जें भासे संसारभान । त्रिगुणत्रिपुटी विंदान । तें सर्व मायिक मनःकृत जाण । आत्मा तो भिन्न गुणातीत ॥ ७२ ॥ आत्मा नित्य मुक्त शुद्ध बुद्ध । तेथ भासें जो त्रिविध भेद । तो मनःकृत गुणसंबंध । जाण प्रसिद्ध मायिक ॥ ७३ ॥ पुरुष श्रोत्रिय सदाचार । त्यासी स्त्री करी व्यभिचार । तेणें दोषी म्हणती भ्रतार । तैसा भेदप्रकार आत्म्यासी ॥ ७४ ॥ जेवीं स्वप्नामाजीं नर । एकला होय संसार । तो निद्रायोगें चमत्कार । तैसा भेदप्रकार मायिक ब्रह्मीं ॥ ७५ ॥ जडाजड देहभेद । परिच्छिन्नत्वें जीवभेद । हा स्वप्रपाय मायिक बोध । आत्मा नित्य शुद्ध अद्वितीय ॥ ७६ ॥ ऐसे मायाविभेदनिष्ठ जन । त्यांसी वैराग्यसिद्ध्यर्थं जाण । काळकृत जन्ममरण । तेंचि निरूपण हरि बोले ॥ ७७ ॥ नित्यदा ह्यङ्‌ग भूतानि भवन्ति न भवन्ति च । कालेनालक्ष्यवेगेन सूक्ष्मत्वात्तन्न्‌ दृश्यते ॥ ४२ ॥ म्हणे ऐक बापा उद्धवा । स्थावरजंगमादि देहभावा । काळाचिया काळप्रभाव । लागला नीच नवा जन्ममृत्यू ॥ ७८ ॥ अतिसूक्ष्म काळगतीसीं । काळ ग्रासीतसे जगासी । या अंगींच्या जन्ममृत्यूंसी । नेणवे जीवासी मायामोहें ॥ ७९ ॥ निजमाता बाळवयासी । प्रकटावयवीं लाडवी पुत्रासी । तेचि माता पौढवयसेंसी । होय त्या पुत्रासी सलज्ज ॥ ४८० ॥ ते बाल्यावस्था काळें नेली । हे पौढवयसा नवी अली । यालागीं माता सलज्ज झाली । हे काळें केली घडामोडी ॥ ८१ ॥ ऐसा नित्य नाश नित्य जन्म । भूतांसी करी काळ सूक्ष्म । या जन्ममृत्यूंचें वर्म । नेणती संभ्रम भ्रांत प्राणी ॥ ८२ ॥ जो अवस्थाभाग काळें नेला । त्यासवें तो देहचि गेला । पुढें वयसा नवी पावला । तो काळें आणिला नवा देहो ॥ ८३ ॥ ऐसा संभव आणि असंभवो । नीच नवा काळकृत पहा वो । यालागीं त्रिविधविकारीं देहो । स्वयें स्वयमेवो देखिजे ॥ ८४ ॥ अतर्क्य काळाची काळगती । भूतें जन्ममृत्यु पावती । ते अलक्ष्य गतीचे अर्थीं । दृष्टांत श्रीपति दावीत ॥ ८५ ॥ यथार्चिषां स्त्रोतसां च फलानां वा वनस्पतेः । तथैव सर्वभूतानां वयोऽवस्थादयः कृताः ॥ ४३ ॥ नित्य नूतन दीपज्वाळा । होतां जातां न दिसती डोळां । सवेग वाहतां जळकल्लोळा । यमुनाजळा न देखिजे ॥ ८६ ॥ फळ न सांडितां वृक्षदेंठ । कडवट तुरट आंबट । तेचि गोड होय चोखट । ऐशी अतर्क्य अदृष्ट काळसत्ता ॥ ८७ ॥ तोचि काळ देहासरिसा । नित्य नूतन लागला कैसा । बाल्य तारुण्य वृद्धवयसा । देहदशा पालटी ॥ ८८ ॥ मूढ कुशळ अशक्तता । अवस्था नाशीत ये अवस्था । तेथ ’मी तोचि’ हें तत्त्वतां । स्फुरे सर्वथा कैसेनी ॥ ८९ ॥ ऐसें कल्पील तुझें मन । ते अर्थींचें निरूपण । अखंड स्फूर्तीचें कारण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ४९० ॥ सोऽयं दीपोऽर्चिषां यद्वत्‌ स्त्रोतसां तदिदं जलम्‌ । सोऽयं पुमानिति नृणां मृषा गीर्धीर्मृषायुषाम्‌ ॥ ४४ ॥ दिपज्वाळा होती जाती । अग्नी जैसा पूर्वस्थिती । यालागीं तोचि दीपू म्हणती । ऐशा युक्ती उद्धवा ॥ ९१ ॥ प्रवाह वाहती कल्लोळ । परी अखंड एकचि जळ । यालागीं म्हणती सकळ । तेंचि जळ या हेत ॥ ९२ ॥ तेवीं देहीं वयसा होती जाती । आत्मा अखंड अनुस्यूती । तोचि मी हे स्फुरे स्फूर्ती । या उपपत्ती उद्धवा ॥ ९३ ॥ म्हणसी मीपणें अहंकार रूढ । तोही अज्ञानत्वें जडमूढ । त्यासी प्रकाशक आत्मा दृढ । मीपणें अखंड वस्तुत्वें स्फुरे ॥ ९४ ॥ येथ देहासीचि जन्ममरण । आत्मा अखंडत्वें परिपूर्ण । येथ देहात्मबुद्धीचें जें मीपण । ते वाचा जाण्‌ अतिमिथ्या ॥ ९५ ॥ विषयांची विषयसिद्धी । देहीं जे कांहीं देहबुद्धी । तेही मिथ्या जाण त्रिशुद्धी । भवबंधीं स्थापक ॥ ९६ ॥ कर्मभूमीं नरदेह‌ऐतसें । निधान लाधलें अनायासें । तेथींचेनिही आयुष्यें । जे विषयविलासें विगुंतले ॥ ९७ ॥ तो अमृत विकूनि कांजी प्याला । रत्नें दे‌ऊनि कोंडा घेतला । पर्वत फोडूनि टोळ धरिला । गज विकिला इटेसाठीं ॥ ९८ ॥ डोळे फोडूनि काजळ ल्याला । नाक कापूनि शिमगा खेळला । तैसा नरदेहा नाडला । नाश केला आयुष्याचा ॥ ९९ ॥ वेंचितां धन लक्षकोटी । आयुष्यक्षणाची नव्हे भेटी । तेंही वेंचिलें विषयासाठीं । हतायु करंटीं अतिमूढें ॥ ५०० ॥ मुख्य देहोचि काल्पनिक जाण । तेथील काल्पनिक अभिमान । तें हें देहबुद्धीचें मीपण । लावी दृढ बंधन जगासी ॥ १ ॥ तें सांडितां देहाचें मीपण । कैंचें जन्म कैंचें मरण । तेव्हां संसारुचि नाहीं जाण । भवबंधन मग कैंचें ॥ २ ॥ जैसा मिथ्या बागुलाचा भेवो । बाळक सत्य मानिला पहा हो । तैसा मृषा काल्पनिक देहो । सत्यत्वें पहा हो मानिला ॥ ३ ॥ मिथ्या देहो आणि देहबुद्धी । त्यासी पुढें कैसी जन्मसिद्धी । मिथ्याभूतासी नव्हे वृद्धी । तेविखींची विधि हरि बोले ॥ ४ ॥ मा स्वस्य कर्मबीजेन जायते सोऽप्ययं पुमान्‌ । म्रियते वामरो भ्रान्त्या यथाग्निर्दारुसंयुतः ॥ ४५ ॥ देहात्मवादें देहाभिमान । जनीं वासनाबीज गहन । तेणें स्वसंकल्पें आपण । मानी जन्ममरण नसतेंचि ॥ ५ ॥ तेणें देहाभिमानें आपण । अहं कर्म कर्ता क्रियाचरण । निष्कर्मा कर्मबंधन । अमरा जन्ममरण आरोपी ॥ ६ ॥ थिल्लराचेनि जाहलेपणें । त्यांत सूर्याचें जन्म मानणें । थिल्लरनाशें सूर्याचें जिणें । नासलें म्हणे बाळक ॥ ७ ॥ तेवीं अजन्म्यासी जन्मकर्म । मानिती तो मायिक भ्रम । येचिविषयीं पुरुषोत्तम । दृष्टांत सुगम सांगत ॥ ८ ॥ जैसा अग्नि अजन्मा अव्यक्त । त्यासी काष्ठीं जन्मला म्हणत । दिसे काष्ठाकारें आकारवंत । काष्ठनाशें मानीत नाश त्यासी ॥ ९ ॥ येथ देहासीच जन्मनाश । आत्मा नित्य अविनाश । देह‌अदवस्था नवविलास । स्वयें हृषीकेश सांगत ॥ ५१० ॥ निषेकगर्भजन्मानि बाल्यकौमारयौवनम्‌ । वयोमध्यं जरा मृत्युरित्यवस्थास्तनोर्नव ॥ ४६ ॥ देहींच्या अवस्था त्या नव । ऐक तयांचाही स्वभाव । भिन्नविभागवैभव । यथागौरव सांगेन ॥ ११ ॥ पितृदेहीं पावोनि शुक्रत्व । तेथूनि जननीजठर प्राप्त । त्या नांव निषेक बोलिजेत । देहींची हे येथ प्रथमावस्था ॥ १२ ॥ जननीजठरीं रिधिरयुक्त । मुसावोनि खोटी होत । क्षणक्षणां वृद्धी प्राप्त । गर्भ ते येथ दुजी अवस्था ॥ १३ ॥ प्रसूतिवाताच्या आघातीं । उदराबाहेर उत्पत्ती । त्या नांव जन्म बोलती । जाण निश्चितीं तिजी अवस्था ॥ १४ ॥ अतिशयें आवडे स्तनपान । मुख्यत्वें माताचि प्राधान्य । रुदनाचें बळ संपूर्ण । तैं चौथी जाण बाल्यावस्था ॥ १५ ॥ मळमूत्रीं लोळे अज्ञान । गूढेंद्रिय विवेकशून्य । गोड गोजिरें कलभाषण । पंचहायन बाल्यावस्था ॥ १६ ॥ इंद्रियीं चेतना वाढत । परी पोटीं नाहीं विषयस्वार्थ । खोळावरी आसक्त चित्त । ते पांचवी येथ कुमारवस्था ॥ १७ ॥ या‌उपरी तरुणपण । इंद्रियसामर्थ्य संपूर्ण । मी शहाणा मी सज्ञान । देहीं देहाभिमान मुसमुशी ॥ १८ ॥ तेथ स्त्रीकाम आवडे चित्तीं । धनकामाची अतिप्रीती । देहगेहांची आसक्ती । नामरूपांची ख्याती लौकिकीं मिरवी ॥ १९ ॥ श्रीमदें गर्वितमानस । स्त्रीपुत्रांचा अति‌उल्हास । तृष्णा दुर्धर अतिसोस ।कामक्रोधांचा बहुवस वळसा भोंवे ॥ ५२० ॥ न साहे नोकिलेपण । ’तूं म्हणतां टाकी प्राण । ते सहावी अवस्था जाण । तरुणपण अनर्थ ॥ २१ ॥ पंधरापासोनि पंचवीस । पूर्ण तरुणपणाचा पैस । तेथ नानाविकारी मानस । नांदवी सावकाश देहाभिमान । २२ ॥ चळिसांपासोनि साठीवरी । देहीं उत्तरवयसा पुरी । झुरडी पडों लागे शरीरीं । इंद्रिशक्ती करी प्राशन काळ ॥ २३ ॥ क्षीणपणाचा सुमुहूर्त । काळ आरंभ करी जेथ । ते हे उत्तरावस्था येथ । जाण निश्चित सातवी ॥ २४ ॥ तिची हातधरणी जरा । कांपवीतसे सुभटां नरां । भोग न साहे शरीरा । इंद्रियव्यापाराहारासी ॥ २५ ॥ अस्तव्यस्त केला शरीरवेश । दांताळी पाडिली वोस । भेणें पालटे केश । धाकें सीस कांपत ॥ २६ ॥ शरीर जरा करी क्षीण । तरी विषयावस्था अतिगृहन । चिंता अनिवार दारुण । तृष्णा अपूर्ण सर्वदा ॥ २७ ॥ तेज सांडूनि जाय नयना । टाळी पडोनि ठाती काना । मुखीं लागे चोरपान्हा । तरी देहाभिमाना वाढवी ॥ २८ ॥ जरा पावलिया निजसंधी । अनिवार येती आधिव्याधी । महामोहें व्यापिजे बुद्धी । विवेक त्रिशुद्धीं बुडाला ॥ २९ ॥ पायां पडे वेंगडी । आधार टेंकण लांकुडी । वाचा लफलफी जडत्वें गाढी । हाले होंटाची जोडी उंदिरप्राय ॥ ५३० ॥ डोळां चिपडीं तोंड भरे । नाकींची लोळी वोठीं उतरे । मुखींचे लाळेचिया धारें । थिबबिबिजे उरें चिकटोनी ॥ ३१ ॥ चुंबन मागेना तोंडाप्रती । ती थुंका म्हणोनि दूर पळती । उसंत नाहीं खोकल्याहातीं । श्वास कास उठती अनिवार ॥ ३२ ॥ शरीरीं थरकंप उठी । तरी देहाभिमान दृढ पोटीं । अवघ्याते म्हणे धाकुटीं । सांगे जुनाट गोष्टी मोठमोठ्या ॥ ३३ ॥ अधोवाताचें वावधान । अनिवार सुटे जाण । जीवें जितां विटंबण । हे जरा जाण आठवी अवस्था ॥ ३४ ॥ जेवीं सु‌ईमागें दोरा जाण । तेवीं जरेसवें असे मरण । जरा शरीर पाडी क्षीण । तंव वाजे निशाण मृत्यूचें ॥ ३५ ॥ देहींच्या तुटल्या नाडी । वाचा हों लागे बोबडी । तरी देहाची धरी गोडी । अधिक आवडी स्त्रीपुत्रांची ॥ ३६ ॥ मजमागें हें अनाथें । कोण सांभाळीळ यांतें । पोटासी धरोनि त्यांतें । रडे बहुतें आक्रोशें ॥ ३७ ॥ द्रव्यलोभ अतिकठिण । अंतीं न वेंची आपण । दूरी करूनि इतर जन । सांगे उणखूण ठेव्याची ॥ ३८ ॥ नवल वासनाविंदान । विसरोन देहाचें स्मरण । सर्वस्वें जे धरिजे आठवण । तेंचि आपण दृढ होय ॥ ३९ ॥ या देहाची निःशेष आठवण । ते नाठवणें सवेंचि जाण । चेतनासहित जाय प्राण । या नांव मरण देहाचें ॥ ५४० ॥ एवं गर्भादि मरणांता । या देहींच्या नव अवस्था । येथ आत्म्याची अलिप्तता । स्वभावतां देहासी ॥ ४१ ॥ देह‌अ‌आवस्था विकारवंता ।आत्मा अलिप्त अविकारता । म्हणसी देहविकारा जडता । यासी विकारता घडे केवीं ॥ ४२ ॥ सूर्य थापटूनि जन । कदा नुठवी आपण । तो प्रकाशतांचि जाण । सहजें जन चेवती ॥ ४३ ॥ त्या जनाची कर्मकर्तव्यता । सूर्या‌अंगीं न लगे सर्वथा । तेवीं प्रकाशोनि विकारता । अलिप्त तत्त्वतां निजात्मा ॥ ४४ ॥ झालिया सूर्यकिरण प्राप्त । जेवीं अग्नि स्त्रवे सूर्यकांत । तेणें याग कां दाघ होत । त्या कर्मातीत सूर्य जैसा ॥ ४५ ॥ तेवीं चित्प्रकाशें मन । शुभाशुभ कर्में करी जाण । त्या मनोविकारा चिद्भा न । अलिप्त जाण निजात्मा ॥ ४६ ॥ येथ मनःकृत विकार पूर्ण । मनःकृत कर्माकर्म जाण । मनःकृत जन्ममरण । स्वर्गनरकगमन मनःकृत ॥ ४७ ॥ मनःकृत लक्ष्यालक्ष । मनःकृत बंधमोक्ष । तेंचि निरूपण प्रत्यक्ष । श्रीकृष्ण अध्यक्ष सांगत ॥ ४८ ॥ एता मनोरथमयीर्ह्यन्यस्योच्चावचास्तनूः । गुणसङ्‌गादुपादत्ते क्वचित्काश्चिज्जहाति च ॥ ४७ ॥ संसारविकाराचें भान । अभिमानयुक्त करी मन । स्वर्गनरक गमनागमन । देहाभिमान भोगवी ॥ ४९ ॥ आत्मा याहूनि शजें भिन्न । चिन्मात्रैक चिद्धन । तेथ आतळों न शके मन । शुद्धीं अभिमान असेना ॥ ५५० ॥ मन अभिमान प्रसवे माया । अभिमानें गुण आणिले आया । गुणीं मायिक केली काया । विकारसामग्रियासमवेत ॥ ५१ ॥ जैशी देहापाशीं छाया । तैशी स्वरूपीं मिथ्या माया । जेथ जन्ममरणेंसीं काया । रिघावया ठावो नाहीं ॥ ५२ ॥ आत्मा शुद्ध काया मलिन । काया जड आत्मा चिद्धन । अज अव्यय आत्मा परिपूर्ण । जन्ममरण देहासी ॥ ५३ ॥ तिनी गुण तिनी अवस्था । कार्य कर्म अहंकर्ता । हें देहाभिमानाचे माथां । आत्मा सर्वथा अलिप्त ॥ ५४ ॥ यापरी विकारांहून । आत्मा चिद्रूसपें सहज भिन्न । म्हणशी जीवास देहाभिमान । तेंही कथन अवधारीं ॥ ५५ ॥ जीव अलिप्त मायागुणीं । एक सांगेन ते काहणी । स्फटिक ठेविजे जैश वर्णीं । तद्रू पपणीं तो भासे ॥ ५६ ॥ हो कां तद्रूेपपणेंही दिसतां । स्फटिक अलिप्त निजशुद्धता । तेवीं सत्त्वादि गुणीं क्रीडतां । जीव तत्त्वतां अलिप्त ॥ ५७ ॥ स्फटिक काजळीं दिसे काळा । परी तो काळेपणावेगळा । तेवीं तमोगुणें जीवू मैळा । दिसोनि निराळा तमेंसीं ॥ ५८ ॥ स्फटिक आरक्तीं आरक्तकिळा । दिसोन आरक्ततेवेगळा । तेवीं रजोगुणीं राजसलीळा । भोगूनि वेगळा जीवात्मा ॥ ५९ ॥ स्फटिक श्वेतवर्णीं दिसे श्वेत । परी तो श्वेतपण अलिप्त । तेंवी सत्त्वीं दिसे ज्ञानवंत । गणज्ञानातीत जीवात्मा ॥ ५६० ॥ त्रिगुण गुणेंसीं अलिप्तता । दाविली जीवशिवांची तत्त्वतां । देहीं असोनि निःसंगता । ऐक आतां सांगेन ॥ ६१ ॥ जेवीं घटामाजील जीवन । घटीं चंद्रबिंब आणी जाण । तेवीं शुद्धासी जीवपण । देहाभिमान देहीं देखे ॥ ६२ ॥ घटनिश्चळत्वें बिंब निश्चळ । घटचंचलत्वें तें चंचळ । तेवीं देहाच्या अवस्था सकळ । मानीं केवळ जीवात्मा ॥ ६३ ॥ घटीं कालविल्या अंजन । तरी तें काळें होय जीवन । परी बिंबप्रतिबिंबा जाण । काळेपण लागेना ॥ ६४ ॥ तेवीं देहाची सुखदुःखकथा । कां पापपुण्यादि जे वार्ता । नाहीं जीवशिवांच्या माथां । देह अहंता ते भोगी ॥ ६५ ॥ ये घटींचें जळ ते घटीं भरित । चंद्रबिंब असे त्याही‌आंत । नेंवी या देहींचा त्या देहीं जात । जीवात्मा म्हणत या हेतू ॥ ६६ ॥ चंद्र गगनीं अलिप्त असे । तो मिथ्या प्रतिबिंवें घटीं भासे । तेवीं वस्तु वस्तुत्वें सावकाशें । जीवू हें पिसें देहात्मता ॥ ६७ ॥ त्रिगुणगुणीं गुणातीत । देही देहसांग अलिप्त । जीव शिव दोनी येथ । तुज म्यां साद्यंत दाखविले ॥ ६८ ॥ हें नेणोनियां समस्त । देहात्मवादें जाहले भ्रांत । स्वर्गनरकादि आवर्त । योनी भोगवीत अभिमान ॥ ६९ ॥ द्विजदेह आरंभूनि येथ । परमेष्ठिदेहपर्यंत । स्वर्गसुख देहें समस्त । भोगवी निश्चित पुण्यभिमान ॥ ५७० ॥ याहूनियां अधोमुख येथ । द्विजत्वाहूनि खालते जात । नाना दुःखयोनी भोगवित । जाण निश्चित पापाभिमान ॥ ७१ ॥ येथ पापपुण्यकर्माचरण । तें वाढविताहे जन्ममरण । यांत विरळा सभाग्य जाण । जन्ममरणच्छेदक ॥ ७२ ॥ ज्यांसी निष्काम पुण्याचिया कोडी । जिंहीं स्वधर्म जोडिला जोडी । ज्यांसी भूतदया गाढी । ज्यांची आवडी द्विजभजनीं ॥ ७३ ॥ जे अहिंसेसी अधिवास । ज्यांचें अद्वैतपत मानस । जे सारासारराजहंस । जन्ममरणांचा त्रास घेतला जिंहीं ॥ ७४ ॥ जे उपनिषदर्थचातक । जे जीवजनकाचे शोधक । जे निजात्मतत्त्वसाधक । जे विश्वासुक भावार्थीं ॥ ७५ ॥ ज्यांसी संतचरणीं सद्भातवो । जे गुरुवचनीं विकले पहा हो । त्यांसी देहीं विदेहभावो । मत्कृपें पहा हो पावती ॥ ७६ ॥ तेही निजबोधें देहाची बेडी । तोडूनि जन्ममरणाची कोडी । उभवूनि सायुज्याची गुडी । परापरथडी पावले ॥ ७७ ॥ त्यांसी संसाराचे आवर्त । सर्वथा गेले न लगत । जेवीं बुडण्याचा संकेत । मृगजळा‌आंत असेना ॥ ७८ ॥ ऐसे प्राप्तपुरुष येथ । संसारीं नाहींत गा बहुत । हिंडतां अवघ्या जगांत । एकादा कदाचित देखिजे ॥ ७९ ॥ असो देखिल्याही त्यातें । कोण आहे ओळखतें । उद्धवा जाण निश्चितें । आत्मा येथें दिसेना ॥ ५८० ॥ जरी निकट भेटला ज्ञाता । त्याचा देह देखिजे वर्ततां । परी भीतरील निजात्मता । न दिसे सर्वथा कोणासी ॥ ८१ ॥ आत्मा गेला आला म्हणती । शेखीं येणेंजाणें न देखती । तेच विषयींची उपपत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ ८२ ॥ आत्मनः पितृपुत्राभ्यामनुमेयौ भवाप्ययौ । न भवाप्ययवस्तूनामभिज्ञोद्वयलक्षणः ॥ ४८ ॥ म्हणती पित्याचा आत्मा गेला । यालागीं पितृदेह नासला । परी पैल तो आत्मा गेला । ऐसा नाहीं देखिला कोणींही ॥ ८३ ॥ म्हणती पुत्रजन्मे आत्म्यासी जन्म । करितां पुत्राचें जातककर्म । देखिजे देहाचा संभ्रम । आत्मा दुर्गम दिसेना ॥ ८४ ॥ येथ आत्म्यासी येणेंजाणें । सर्वथा नाहीं पूर्णपणें । देहासीचि जन्ममरणें । येणेंजाणें दृष्टांतें ॥ ८५ ॥ प्रत्यक्ष देहासी जन्मनाश । आत्मा साक्षित्वें अविनाश । येचि अर्थीं विशद विलास । स्वयें हृषीकेश सांगत ॥ ८६ ॥ तरोर्बीजविपाकाभ्यां यो विद्वाञ्जन्मसंयमौ । तरोर्विलक्षणो द्रष्टा एवं द्रष्टा तनोः पृथक्‌ ॥ ४९ ॥ बीजपरिपाकें वाढले वृक्षीं । पर्वत त्या वृक्षाचा साक्षी । तो पर्वत वृक्षच्छेदनें नव्हे दुःखी । तेवीं द्रष्टा साक्षी देहाचा ॥ ८७ ॥ द्रष्टा साक्षी देहमात्रासी । ते देहधर्म न लगती द्रष्ट्यासी । तो देहीं असोनि विदेहवासी । भवबंध त्यासी स्पर्शेना ॥ ८८ ॥ हा अर्थ नेणोनि अविवेकी । अतिबद्ध जाहले ये लोकीं । तोचि अर्थ पांच श्लोकीं । श्रीकृष्ण स्वमुखीं सांगत ॥ ८९ ॥ प्रकृतेरेवमात्मानमविविच्याबुधः पुमान्‌ । तत्त्वेन स्पर्शसंमूढः संसारं प्रतिपद्यते ॥ ५० ॥ कर्माकर्मकर्तेपण । आत्म्यासी सर्वथा नाहीं जाण । येचि अर्थींचें निरूपण । मागां संपूर्ण सांगीतलें ॥ ५९० ॥ आत्मा नातळे तिन्ही गुण । देही देहातीत जाण । प्रकृतीहून पुरुष भिन्न । हें निजात्मज्ञान जो नेणे ॥ ९१ ॥ तोचि संसाराचा आपण । घरजांव‌ई झाला जाण । देहभिमानासी संपूर्ण । एकात्मपण मांडिलें ॥ ९२ ॥ विषयभोग तोचि पुरुषार्थ । ऐसें मानूनियां निश्चित । शुभाशुभ कर्मीं येथ । भोगवीत नाना योनी ॥ ९३ ॥ विषयभोग अभिमानें जाण । पुढती जन्म पुढती मरण । नाना योनीं आवर्तन । देहाभिमान भोगवी ॥ ९४ ॥ तें नाना योगीं गर्भदुःख । देहभिमानें भोगिती मूर्ख । तेंचि नाना तत्त्वांचें रूपक । यदुनायक सांगत ॥ ९५ ॥ सत्त्वसङ्‌गदृषीन्‌ देवान्‌ रजसासुरमानुषान्‌ । तमसा भूततिर्यक्त्वं भ्रमितो यति कर्मभिः ॥ ५१ ॥ देहाभिमानाचिये स्थिती । त्रिगुण गुणांचीं कर्में होती । तेणें त्रिविध संसारप्राप्ती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥ ९६ ॥ न करितां कृष्णार्पण । सात्त्विक कर्म कीजे आपण । तेणें क्षोभें सत्त्वगुण । उत्तम देह जाण उपजवी ॥ ९७ ॥ सत्त्वाच्या अति‌उत्कर्षगतीं । देव‌ऋषि ब्रह्म‌ऋषि होती । सत्त्वाच्या समसाम्यस्थितीं । कल्पायु जन्मती आजानुबाहो ॥ ९८ ॥ सत्त्वगुणें क्रियायुक्त । स्वर्गीं देव होती स्वर्गस्थ । भोगक्षयें अधःपात । या योनीं जनित सत्त्वगुणें ॥ ९९ ॥ आश्रयूनि राजस गुण । करितां राजस कर्माचरण । तेणें क्षोभला रजोगुण । योनि कोण उपजवीं ॥ ६०० ॥ राजस कर्म ब्रह्मीं अर्पिती । ते दैत्यही भगवद्भ क्त होती । जे रज‌उरत्कर्षें भोग वांछिती । ते असुर होती महायोद्धे ॥ १ ॥ रजोगुणें स्वकर्माचरण । तेणें कर्में जन्मती ब्राह्मण । रजतारतम्यें जाण । चारी वर्ण जन्मती ॥ २ ॥ तामसाचे संगतीं जाण । करितां तमिष्ठ कर्माचरण । तेणें क्षोभला जो तमोगुण । तो नीच योनी दारुण उपजवी ॥ ३ ॥ भूत प्रेत पिशचक । तिर्यग्योनि असंख्य । वृक्ष पर्वत पाषाण देख । या योनी अनेक भोगवी ॥ ४ ॥ आशंका ॥ कर्म त्रिगुणात्मक साचार । परी कर्मफळभोक्ता ईश्वर । हा वेदशास्त्रें विचार । केला निर्धार तुम्हींही ॥ ५ ॥ देहसाक्षित्वें आत्मा निराळा । ऐसा गतश्लोकीं केला निर्वाळा । जैं कर्मफळभोक्ता कर्मावेगळा । तैं कर्मफळा केवीं भोगी ॥ ६ ॥ ऐसें आशंकेचें अंतर । जाणोनियां शार्ङ्‌गधर । तेचि अर्थींचें उत्तर । विशद साचार सांगत ॥ ७ ॥ नृत्यतो गायतः पश्यन्‌ यथैवानुकरोति तान्‌ । एवं बुद्धिगुणान्पश्यत्रनीहोऽप्यनुकार्यते ॥ ५२ ॥ कलाकुशल सभानायक । त्यापुढें रंग होता कौतुक । गात्या नाचत्याचे तालथाक । स्वयें देख अनुकरे ॥ ८ ॥ तेंचि अनुकार म्हणशी कैसें । प्रकृति केवळ जडांशें । जाणपण आत्म्यासी असे । येणें विन्यासें भोक्ता म्हणती ॥ ९ ॥ सभेसी बैसल्या निश्चळा । रंगींच्या अनुकरे थाकताळा । तेवीं प्रकृति पुरुष वेगळा । तो प्रकृतीची लीळा अनुकरे ॥ ६१० ॥ आशंका ॥ प्रकृतिच्छंदें अनुकारता । गुणकर्मांचा फळभोक्ता । आत्मा झाला जैं तत्त्वतां । तैं नित्यमुक्तता भंगली ॥ ११ ॥ जो करी कर्मफळस्वादन । त्यासी लागे कर्मबंधन । कर्मास्तव जन्ममरण । आत्म्यासी जाण लागलें ॥ १२ ॥ नित्यमुक्त अविकारी । या गोष्टी राहिल्या दूरी । आत्मा जाहला संसारी । गुणविकारीं अतिबद्ध ॥ १३ ॥ उद्धवा तूं ऐस‌ऐसशी । आशकां झणीं धरिशी । आत्मा अलिप्त गुणकर्मांसी । दृष्टांतेंसीं हरि सांगे ॥ १४ ॥ यथाभ्यसा प्रचलता तरवोऽपि चला इव । चक्षुषा भ्राम्यमाणेन दृश्यते भ्रमतीव भूः ॥ ५३ ॥ जेवीं गंगातीरींचा तरू । जळीं वाहतां देखे नरू । तेवीं मायागुणानुकारू । भासे विकारू आत्मत्वीं ॥ १५ ॥ ज्याचे डोळां भवंडी सबळ । तो भंवतां देखे भूमंडळ । तेवीं मायिक विकारमेळ । मिथ्या केवळ आत्म्यासी ॥ १६ ॥ जो अश्वारूढ हो‍ऊनि पाहे । जळीं प्रवाहासंमुख राहे । तो देखे मी जळीं प्रवाहें । ऐसा मिथ्या होये अनुभवू ॥ १७ ॥ तेवीं आत्मा नित्य निर्विकार । तेथ मायावी गुणसंभार । कल्पनायोगें साचार । मानिती नर मनोमय ॥ १८ ॥ आब्रह्यस्तंबपर्यंत । नाना योनी विकारवंत । कर्म क्रिया फळभोग येथ । जाण निश्चित मनोजन्य ॥ १९ ॥ ऐसें सांगतां हरि सांवळा । तेणें उल्हास उद्धवजीवाला । तया आनंदाच्या कल्लोळां । उद्धवचि लीला पोखित ॥ ६२० ॥ निववावया उद्धवाचा ताप । स्वयें सांगे तो विश्वतोमुख । जेणें उद्धवां बहु हरिख । तेंचि श्रीकृष्ण देख सांगतसे ॥ २१ ॥ यथा मनोरथधियो विषयानुभवो मृषा । स्वप्रदृष्टाश्च दाशार्ह तथा संसार आत्मनः ॥ ५४ ॥ आत्मा निजमुक्त अविकारी । तो संकल्पें कीजे विकारी । असंसारी परीसंसारी । मनोविकारीं मानिजे ॥ २२ ॥ ऐसें दुजयावीण कांहीं । कथा वार्ता सांगतां नाहीं । एक श्रोता दुसरा वक्ता पाहीं । यालागीं येही उपाये ॥ २३ ॥ जेवीं एकटा क्रमेना पंथ । मी राजा करी मनोरथ । परचक्र कल्पूनि तेथ । होय उद्यत युद्धासी ॥ २४ ॥ तो युद्ध‌आ्वेश कडकडाट । तेणें सत्राणें उडे उद्भ>ट । अडखळूनि आदळे पोट । म्हणे मी घायवट पडिलों कीं ॥ २५ ॥ मिथ्या भ्रमें पडला भुली । चालतां चालतां मृगजळीं । उतरावया पैलतीरीं । बुडी वहिली देतसे ॥ २६ ॥ गंधर्वनगरीं प्रचंड । माड्या सोपे उदंड । क्षणामाजीं विरस चंड । वितंड करी निर्वाळा ॥ २७ ॥ तेवीं संसार हा काल्पनिक । तेथील सुख आणि दुःख । मिथ्या केवळ मायिक । जाण निष्टंक निजभक्तां ॥ २८ ॥ दाशार्हवंशीं जन्मलासी । तूं उत्तम दशा पावलासी । यालागीं म्हणे हृषीकेशी । उद्धवासी दाशार्ह ॥ २९ ॥ जेवीं का स्वप्नभोग जाग । स्वप्नीं सत्य मानी आपण । तेवीं संसार हा दीर्घ स्वप्न । मायिक जाण मिथ्यात्वें ॥ ६३० ॥ जागा झालिया स्वप्न वृथा । निरहंकारीं संसार मिथ्या । हे ब्रह्मज्ञानाची मुख्य कथा । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ३१ ॥ संसार तो कल्पनामात्र । आत्मा विर्विकार चिन्मात्र । जेवीं मृगजळ भरी भास्कर । तेवीं संसार करी आत्मा ॥ ३२ ॥ उद्धवा तूं म्हणशी आतां । ऐकतां तुझे मुखींची कथा । संसार मिथ्या तत्त्वतां । तरी साधनावस्था कां सोसावी ॥ ३३ ॥ जेवीं वंध्यापुत्राचें लग्न । करावया क्कोणी न करी यत्न२ । कां मृगजळीं बांधोनि धरण । पाट जाण कोणी काढीना ॥ ३४ ॥ तेवीं मिथ्या संसारबंधन । तेथ श्रवण मनन चिंतन । विवेक वैराग्य ज्ञान ध्यान । वृथा कां जन सोशिती ॥ ३५ ॥ उद्धवा बागुलाचें भय खोटें । परी बाळकासी सत्य वाटे । तेवीं मिथ्या संसारकचाटें । जीवीं प्रकटे बद्धता ॥ ३६ ॥ तेचि अर्थींचा दृष्टांत । स्वयें श्रीकृष्ण सांगत । मिथ्या सांसरिक येथ । भ्रमें बाधीत भ्रांतासी ॥ ३७ ॥ अर्थें ह्यविद्यमानेऽपि संसृतिर्न निवर्तते । ध्यायतो विषयानस्य स्वप्नेऽनर्थागमो यथा ॥ ५५ ॥ विचारें पाहतां मिथ्या स्वप्न । तेथील विषयसेवन । सुखदुःखें बाधिती गहन । ऐक लक्षण तयाचें ॥ ३८ ॥ स्वप्नीं पुत्रलाभ राजसन्मान । तेणें सुखें औसंडे आपण । कां झालिया धनहरण । तेणें दुःखे दारुण आक्रंदे ॥ ३९ ॥ त्यासी जागें न करितां । स्वप्नसुखदुःखबाधकता । निवर्तेना सर्वथा । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ६४० ॥ तेवीं विषयासक्त जन । ज्यांसी अखंड विषयध्यान । ज्यांचेंनिषयीं सदा मन । देहाभिमान गोंवीत ॥ ४१ ॥ तयांसी देखावया उपावो । जयां विषयसक्ति होय वावो । येचि अर्थींचा दृष्टांत पहा वो । स्वयें सांगे देवो उद्धवासी ॥ ४२ ॥ न करितां श्रवण मनन । न साधितां विवेकज्ञान । न धरितां वैराग्य पूर्ण । भवभय जाण तुटेना ॥ ४३ ॥ संसार मिथ्या तोंडें म्हणतां । न तुटे सुखदुःखभयव्यथा । जन्ममरणादि अवस्था । अहंममता सुटेना ॥ ४४ ॥ ऐसे अज्ञान जन । तिंहीं अवश्य करावें साधन । विवेकें वैराग्य धरितां पूर्ण । भवबंधन निवारे ॥ ४५ ॥ यालागीं उद्धवा जाण । सकळ साधनांचे कारण । जेणें हाता चढे ब्रह्मज्ञान । तें वैराग्य पूर्ण साधावें ॥ ४६ ॥ ऐक विरक्तीची मागी । जैशी धढधडीत आगी । तैसें वैराग्य व्हावें अंगीं । तैं प्राप्तीलागीं अधिकारू ॥ ४७ ॥ ऐसे मुमुक्षु जे पुरते । परम कृपेचेनि हातें । सद्गुुरु थापटोनि ज्यांतें । करी अद्वैतें जागृत ॥ ४८ ॥ ज्यासी देहादिभिदपुष्टी । मिथ्या माया गुणत्रिपुटी । ब्रह्मानंदें कादली सृष्टी संसारू ॥ ४९ ॥ येव्हडी हे परम प्राप्ती । वैराग्यविवेकें चढे हातीं । तेंचि वैराग्य उद्धवप्रती । स्वयें श्रीपती सांगत ॥ ६५० ॥ तस्मादुद्धव मा भुड्क्ष्व विषयानसदिन्द्रियैः । आत्माग्रहणनिर्भातं पश्य वैकल्पिकं भ्रमम्‌ ॥ ५६ ॥ विषयांची जे आसक्ती । ते बाधक परमार्थप्राप्ती । विषय सांडीं सांडीं निश्चितीं । परतोनि हातीं नातळें ॥ ५१ ॥ आसक्त वृत्ति इंद्रिययोग । अतिलोलुप्यें विषयभोग । तोचि मुख्यत्वें भवरोग । यालागीं त्याग करावा ॥ ५२ ॥ विखें रांधिलें परमान्न । तें ग्रासमात्र हरी प्राण । विष एकदां मारक जाण । विषय पुनःपुनः मारक ॥ ५३ ॥ म्हणसी प्रारब्धें भोग येती । ते त्यागिले केंवी जाती । विषयत्यागाची युक्ती । वैराग्यस्थिती घडे केवीं ॥ ५४ ॥ प्रारब्धें विषयभोग येती । ते साधका दुःखरूप होती । वणवां मृगें आहाळती । तैशी स्थिती भोगणें ॥ ५५ ॥ व्याघ्रमुखीं सांपडे गाये । तैसा भोगी चरफडीत जाये । ऐसेनि अनुतापें पाहें । वैराग्य होये अनिवार ॥ ५६ ॥ वैराग्य जाहलिया धडपुडें । सद्गुहरुकृपा हाता चढे । तेणें गुरुकृपा‌उजियेडें । संसार उडे द्वंद्वेंसीं ॥ ५७ ॥ झालिया गुरुकृपा सुगम । सर्वत्र ठसावे परब्रह्म । तेथ जन्ममरण कैंचे कर्म । भवभ्रम असेना ॥ ५८ ॥ तेथ वाती लावूनि पाहतां । संसार दिसेना मागता । जेवीं निभ्रमें पाहों जातां । न लगे हाता रज्जुसर्प ॥ ५९ ॥ भवंडिचेनि वेगवशें । भिंगोरी नीट उभी दीसे । तेवीं भ्रमाचेनि आवेशें । संसार भासे सत्यत्वें ॥ ६६० ॥ केवळ जो निबिड भ्रम । संसार हें त्याचें नाम । येर्क्ष्हवीं निखिल परब्रह्म । तेथ जन्मकर्म असेना ॥ ६१ ॥ ऐसें जरी झालें ब्रह्मज्ञान । तरी प्रारब्ध भोगावें गा जाण । जेवीं कुलाल भांडें ने आपण । परी चक्रभ्रमण राहेना ॥ ६२ ॥ वृक्ष समूळ उपडल्या जाण । उपडितां न वचे सार्द्रपण । तेवीं होतांचि ब्रह्मज्ञान । प्रारब्ध जाण सोडीना ॥ ६३ ॥ त्या प्रारब्धचिये गती । विषयभोग जरी येती । तेथ उपावो न करावा निवृत्ती । निजशांती साहावें ॥ ६४ ॥ विषयभोग आलियाही जाण । निजशांति धरोनि संपूर्ण । सुखें वर्तती साधुजन । विवेकसंपन्न क्षमावंत ॥ ६५ ॥ हाता आलिया निजशांती । संसार बापुडा तो किती । तेचि शांतीची स्थिती । स्वयें श्रीपती सांगत ॥ ६६ ॥ जें निजशांतिचें कल्याण । जेणें जीव पावे समाधान । तें अतिगोड निरूपण । दों श्लोकीं श्रीकृष्ण सांगत ॥ ६७ ॥ क्षिप्तोऽवमानितोऽसद्भिः प्रलब्धोऽसूयितोऽथवा । ताडितः सन्निबद्धो या वृत्त्या वा परिहापितः ॥ ५७ ॥ निष्ठितो मूत्रितो वाज्ञैर्बगुधैवं प्रकम्पितः । श्रेयस्कामः कृच्छ्‌गत आत्मनाऽऽत्मानमुद्धरेत्‌ ॥ ५८ ॥ देहाभिमानी तामस जन । अतिदुष्ट जे दुर्जन । तिंहीं साधूंसी करितां छळण । शांतीस्तव सज्जन क्रोधी नव्हती ॥ ६८ ॥ अल्प‌उंपद्रवीं जाण । न येती क्रोधा सज्ञान । तैसें नव्हे अतिनिर्वाण । पीडा दारुण करितांही ॥ ६९ ॥ कायिक वाचिक मानसिक । त्रिविध पीडा देतां देख । साधु निजशांतीं नेटक । जाणोनि विवेक ते साहती ॥ ६७० ॥ उजू बोलतां शुद्ध युक्ती । अक्षोपूनि हेडाविती । झिडकावूनियां निर्भर्त्सिती । अपमानिती सभेसी ॥ ७१ ॥ शब्दीं शब्दाचे करूनि छळ । म्हणती दुष्ट दुर्जन दुःशीळ । अपवित्र अमंगळ । नष्ट चांडाळ हा एक ॥ ७२ ॥ ऐशा दुर्जनांच्या दुष्टोक्ती । साधु साहे निजशांती । ते शांतीची उपपत्ती । विवेकस्थिती अवधारीं ॥ ७३ ॥ पराची जिव्हा वोठ हालती । माझ्या अंगीं ते न रु‌अती । यालागीं क्रोध न ये चित्तीं । निजशांती ढळेना ॥ ७४ ॥ सभेसी सन्मानें पूजितां । लोटूनि घातला खालता । हाणोनियां चरण्घाता । नेला परता अपमानें ॥ ७५ ॥ सन्मानें जेथ पूजूं नेती । तेथ केवळ असे क्षिती । अपमानें जेथ लोटिती । तेथही क्षिती तेचि पैं ॥ ७६ ॥ येथ मान अपमान । कल्पना मनाची जाण । ऐसेनि विवेकें सज्जन । द्वेषीना जन निजशांती ॥ ७७ ॥ प्रलोभूनि नाना युक्ती । धनें ठकवूनियां निर्भर्त्सिती । धनलोभ केवळ अधःपाती । त्याची निवृत्ती जिंहीं केली ॥ ७८ ॥ त्यांसी निंदितांचि जाण । दोषी हो‌इजे आपण । यालागीं क्रोधा न ये मन । शांति संपूर्ण ढळेना ॥ ७९ ॥ शुद्ध बोलती शास्त्रार्थ । अर्थ तितुका अनर्थ । त्या अनर्था जो करी निवृत्त । त्यातें द्वेषित ते मूर्ख ॥ ६८० ॥ सद्गु‌अणीं दोष आरोपिती । नानापरी निंदा करिती । तेणें हित मानिती चित्तीं । तारक निश्चितीं हे माझे ॥ ८१ ॥ मातेचे जे करतळ । ते वरिवरी क्षाळिती बाह्य मळ । हे जनक माझे केवळ । सबाह्य मळ सकळ जिव्हाग्रें धुती ॥ ८२ ॥ ऐशियांचें करितां छळण । हितास नाडिजे आपण । कोणाचे दोषगुण । तेणें शांति जाण थोरावे ॥ ८३ ॥ चाले जेणें जीविकास्थिती । धन्य धन्य क्षेत्र वृत्ती । छळें बळें हिरोनि नेती । तेणेंही चित्तीं क्षोभ नुपजे ॥ ८४ ॥ येथ लाभालाभ दैवाधीन । त्यासी देतेंघेतें तेंचि जाण । यालागीं द्वेषीना जन । शांतीचा गुण न सांडी ॥ ८५ ॥ वृत्ति घे‌ऊनि उगे नसती । अन्यायी म्हणॊनि बांधिती । एक तोंडावरी थुंकिती । एक माथां मुतती अतिदुष्ट ॥ ८६ ॥ एक ताडिती पडिती । एक नानापरी गांजिती । तरी अंगींची ढळेना शांती । विवेक सांगाती सज्जना ॥ ८७ ॥ थुंका आणि जें मूत । तें देहाचिमाजीं उपजत । देहींचें देहास लागत । क्षोभ तेथ कोण मानी ॥ ८८ ॥ थुंका आणि जें मूत । जैसें देहीं उपजे देहाचें अपत्य । देहाचें देहावरी खेळत । दुःख तेथ कोणांचें ॥ ८९ ॥ धरितां मारितां म्हणे देख । देहो तितुका पांचभौतिक । मारिता मारिजता दोनी एक । कोणाचें दुःख कोणासी ॥ ६९० ॥ ऐशी सविवेकें ज्यासी शांती । चारी मुक्ती त्याच्या दासी होती । त्याचा अंकिला मी श्रीपती । यावरी प्राप्ती ते कायी ॥ ९१ ॥ तेथ केवळ जो मोक्षार्थी । तेणें सर्वस्वें पाळावी शांती । ते दुःखसागरावर्तीं । होय तारिती सुखरूप ॥ ९२ ॥ वैराग्य योग ज्ञान ध्यान । त्याचें फळ तें शांति जाण । ते शांति साधूनि संपूर्ण । आपणिया आपण उद्धरिती ॥ ९३ ॥ यालागीं उद्धवा जाण । साहोनि द्वंद्वांचें काठिण्य । शांति साधूनि संपूर्ण । ब्रह्म परिपूर्ण पावावें ॥ ९४ ॥ पूर्ण ब्रह्म पावल्यापाठीं । जन्ममरणाची खुंटे गोठी । परमानंदें पडे मिठी । भवभयाची तुटी तैं होय ॥ ९५ ॥ ऐकोनि श्रीकृष्णाचे बोला । उद्धव अत्यंत चाकाटला । द्वंद्वंबाध जो ऐकिला । तो न वचे साहिला आम्हांसी ॥ ९६ ॥ ऐकिल्या नाहीं ये शांतीच्या गोष्टी । मा केवीं देखिजेल दृष्टीं । ऐशी शांति ज्याच्या पोटीं । तो पुरुष सृष्टीं नसेल ॥ ९७ ॥ मागें ऐकिली ना देखिली । ऐशी शांति त्वां कैंची काढिली । हे ऐकतां तुझी बोली । भयें दचकली बुद्धि माझी ॥ ९८ ॥ ऐशी शांति ज्यासी आहे । तो मागें झाला ना पुढें होये । देवो बोलिला निजनिर्वाहें । तें दुःसह होये आम्हांसी ॥ ९९ ॥ ज्या सांगीतले द्वंद्वांसी । ते अतिदुःसह योगियांसी । केवीं साहवे आम्हांसी । तेंचि देवासी पूसत ॥ ७०० ॥ उद्धव उवाच- यथैवमनुबुद्द्येयं वद नो वदतां वर । सुधुःसहमिमं मन्ये आत्मन्यसदतिक्रमम्‌ ॥ ५९ ॥ विधुषामपि विश्वात्मन्‌ प्रकृतिर्हि बलीयसी । ऋते त्वद्धर्मनिरताशान्तांस्ते चरणालयान्‌ ॥ ६० ॥ इति श्रीमद्भा्गवते महापुराणे पारमहंस्यां संहितायामेकादशस्कन्धे द्वाविंशोऽध्यायः ॥ २२ ॥ जे सांगों जाणती वेदशास्त्रार्था । ते वक्ते म्हणिपती तत्त्वतां । त्या वक्त्यांमाजीं तुझी श्रेष्ठता । मुख्य वेदांचा वक्ता तूं होसी ॥ १ ॥ शास्त्रें लाहोनि तुझी युक्ती । तुझी तुज प्रतिपादिती । ते परोक्षवादें थोंटावती । श्रुति ’नेचि नेति’ परतल्या ॥ २ ॥ त्या तुझे मुखींच्या ज्ञानोक्ती । कृपेनें ऐकोनि कृपामूर्ती । श्रवणाचें भाग्य वानूं किती । जे ऐकती ते धन्य ॥ ३ ॥ ऐस‌ऐवशिया अतियुक्तीं । उद्धवें प्रार्थिला श्रीपती । हात जोडूनि परम प्रीतीं । म्हणे विनंती अवधारीं ॥ ४ ॥ स्वामी बोलती अति‌अगाध । हें बोलणें परम शुद्ध । माझे बुद्धीसी नव्हे बोध । पराचे अपराध कोण साहे ॥ ५ ॥ सोसावे पराचे अपराध । तेंही कठिणत्वें अतिविरुद्ध । हा दुःसह महाबोध । कैसेनी द्वंद्व सहावे ॥ ६ ॥ उत्तमें कोलिया अपराधा । कोटींमाजीं साहे एकादा । परी नीचाची विरुद्ध बाधा । कोणीही कदा न साहे ॥ ७ ॥ ज्याचें न व्हावें दर्शन । ज्यासी करूं नये नमन । त्याचे मस्तकीं वाजतां चरण । साहेल कोण गोविंदा ॥ ८ ॥ ज्याचा निःशेष जाय प्राण । तोचि साहे हें कठिण । जो होय सचेतन । त्यासी सर्वथा जाण न साहवे ॥ ९ ॥ इतरांची कायसी कथा । सज्ञान जे कां तत्त्वतां । तेही अतिक्रमू न साहती अल्पतां । मा अपमानता कोण साहे ॥ ७१० ॥ क्रोध जाहला कपिलामहामुनीसी । तेणें भस्म केलें सगरांसी । नारदें कुबेरपुत्रांसी । वृक्षत्वासी आणिलें ॥ ११ ॥ दुर्वासाची सांगतां गोठी । त्याची कथा आहे मोठी । कोप आला श्रृंगी‌ए पोटीं । मेल्या सर्पासाठीं शापिलें ॥ १२ ॥ मुख्यत्वें शांति सनकादिकांसी । द्वारीं आडकाठी केली त्यांसी । वैकुंठीं क्षोभूनि आवेशीं । जयविजयांसी शापिलें ॥ १३ ॥ सज्ञानाची ऐशी स्थिती । मा इतरांची कोण गणती । परापराधसहनशांती । दुर्लभ त्रिजगतीं गोविंदा ॥ १४ ॥ प्रकृति निजगुणीं सबळ । ते अल्पें क्षोभवीं तत्काळ । साधु सज्जन केवळ । करी विकळ । करी विकळ अशांती ॥ १५ ॥ ज्यासी तुझी पूर्ण भक्ति घडे । ज्यासी तुझी पूर्ण कृपा जोडे । जो तुझे चरणीं अखंड जडे हे शांती ॥ १६ ॥ तूं विश्वात्मा त्रिजगतीं । चोरी न चले तुजप्रती । मज हीं द्वंद्वें न साहवती । तूंही श्रीपती जाणसी ॥ १७ ॥ परम पावन निजशांती । अतिनिंद्य ते अशांती । ऐसें व्याख्यान जे ज्ञाते करिती । तेही न साहती द्वंद्वांतें ॥ १८ ॥ द्वंद्वें दुःसह सर्वार्थीं । तेथें माझा पाड किती । एवं द्वंद्वसहिष्णुतेची युक्ती । मज कृपामूर्ती सांगावी ॥ १९ ॥ सकल साधनें वश्य होती । परी हे सहिष्णुता न ये चित्तीं । ते मी लाभें निजशांती । ऐशी कृपा निश्चितीं करावी ॥ ७२० ॥ मी शांतीचें लाभें कल्याण । ऐशी कृपा करावी परिपूर्ण । म्हणोनि धरिले श्रीचरण । उद्धवें आपण निजभावें ॥ २१ ॥ ऐकोनि उद्धवाची विनंती । संतोषला कृपामूर्ती । जेवीं चातकाचिया तृषार्ती । गर्नोनि त्रिजगती निववी मेघ ॥ २२ ॥ तेवीं भक्तवचनासरिसा । उल्हासला कृष्ण कैसा । उद्धवाचिया निजमानसा । शांतीचा ठसा घालील ॥ २३ ॥ उद्धवप्रश्नाचें प्रतुत्तर । उदार सुंदर गुणगंभीर । उघडोनि शांतीचें भांडार । स्वयें शार्ङ्‌गधर सांगेल ॥ २४ ॥ नवल सांगती ते टेव । युक्तिचातुर्यवैभव । निजशांतीस पडे खेंव । ऐसें अपूर्व सांगेल ॥ २५ ॥ श्रीकृष्णमुखींच्या ज्ञानोक्ती । ऐकतां स्वयंभ प्रकटॆ शांती । ते ऐकावया उद्धव चित्तीं । जाहला निश्चितीं सावध ॥ २६ ॥ जेवीं गजग्रहणाविखीं पंचानन । साटोप धरी आपण । तेवीं शांति साधावया जाण । सावधान उद्धव ॥ २७ ॥ जळीं तळपतांचि मासा । कवडा झेलूनि ने आकाशा । तेवीं शांतीचिया आमिषा । उद्धव तैसा तळपत ॥ २८ ॥ तें भिक्षुगीतनिरूपण । पुढिले अध्यायीं श्रीकृष्ण । निजशांति बाणे संपूर्ण । तेंचि लक्षण सांगेल ॥ २९ ॥ ज्यांसी परमार्थाची चाड । तिंहीं सांडूनि साधनकवाड । शांतिसाधनीं श्रद्धा वाड । अतिदृढ राखावी ॥ ७३० ॥ श्रीकृष्ण सांगेल शांति पूर्ण । उद्धव तया अर्थीं सावधान । एका विनवी जनार्दन । श्रोतां अवधान मज द्यावें ॥ ७३१ ॥ इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे एकाकारटीकायां द्वाविंशोऽध्यायः ॥ २२ ॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ ६० ॥ ओव्या ॥ ७३० ॥

Contribute to Sant Shri Eknath Maharaj Mission

You can donate to the bank account given below

Name of Account Holder:
Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission, Paithan
Current Account No:
00000036694177969
Bank Name:
State Bank Of India
IFSC Code:
SBIN0003796
Branch:
Bhaji Market, Paithan

Scan to donate

Donate QR

Merchant Name : Sant Eknath Mission

UPI ID : santeknathmission@sbi

logoseperator

Contact Info :

Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission,

C/O Shri Venimadhav Gosavi,
ShriNath Galli, Shrikshetra Paithan, Dist. Chhatrapati
Sambhajinagar
Pin. 431006

callMobile No : +91 - 9421411135

emailEmail : info@santeknath.org