Marathi / English

अध्याय २४

॥ श्री एकनाथी भागवत ॥

अध्याय चोविसावा

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो जी गुणातीता । व्यक्तिरहिता अव्यक्ता । तुजमाजीं नाहीं द्वैतकथा । अद्वैततारहिवासी ॥ १ ॥ तुझा अद्वैत निजनिर्वाहो । तेथ नाहीं देवी देवो । उदय-अस्तांचा अभावो । रविचंद्रांसी ठावो असेना ॥ २ ॥ तेथ सशब्द हारपला वेदू । बुद्धीसी मिथ्या बोधू । तिळभरी नाहीं भेदू । अद्वयानंदू एकला ॥ ३ ॥ ऐसिया अद्वैतपणीं । प्रकृतिपुरुषांची कहाणी । सांगिजे केवळ अज्ञानीं । ज्ञातेपणीं चातुर्यें ॥ ४ ॥ जेथ मीतूंपणा नाहीं ठावो । तेथ प्रकृतिपुरुषां केवीं निर्वाहो । ज्याचा नाहीं गर्भसंभवो । त्याचें जातक पहा हो वर्तविती ॥ ५ ॥ जें जन्मलेंचि नाहीं । त्याचें श्राद्ध करावें कायी । हें ज्ञात्यासी पुसतां पाहीं । ठेवितां ठायीं ठाके ना ॥ ६ ॥ वांझेच्या पुत्राचा विवाहो । समारंभ चला पहा हो । नेणा साच जाणा वावो । तैसा निर्वाहो प्रकृतिपुरुषां ॥ ७ ॥ ऐसें नसतेंचि नाथिलें । साचाचे परी नांदविलें । एकीं अनेकत्व दाविलें । एकपण संचलें न मोडतां ॥ ८ ॥ ऐसा एकपणें एकुलता । तोचि आपण आपली झाला कांता । आपुले कांतेचा आपण भर्ता । अतिलाघवता अतर्क्य ॥ ९ ॥ जेवीं अधनारिनटेश्वरीं । जो पुरुष तोचि नारी । तेवीं प्रकृति पुरुष संसारीं । एकाकारीं नांदत ॥ १० ॥ तो पुरुष ते पतिव्रता । दोघां अनन्य प्रीति एकात्मता । येरयेरां वेगळीकता । पा‌ऊल सर्वथा न घालिती ॥ ११ ॥ दोघां एकत्र सदा असणें । दोघासीं एकचि नेसणॆं । दोघां एके सत्ता बैसणें । दोघां एकचि प्राणें वर्तती ॥ १२ ॥ दोघां एकचि देखणें । दोघां एकचि चाखणें । दोघां एकचि बोलणें । दोघां करणें एकचि ॥ १३ ॥ कैशी दोघां प्रीति अलोलिक । येरयेरांवीण न घेती विख । येरयेरांवीण न चाखिती उदक । येरयेरेंवीण देख आंधळीं ॥ १४ ॥ नवल बा‌इलेचें करणें । नपुंसका पुरुषत्व इणें देणें । मग तिचेनि अधीनपणें । पुरुषें नांदणें सर्वदा ॥ १५ ॥ मग हा तिचेनि डोळां देखे । मग हा तिचेनि बोले मुखें । तिचोनि भोगी हा सुखदुःखें । बंधमोक्ष चाखे तिचेनि ॥ १६ ॥ तिचेनि म्हणवी मी ब्रह्म । तिचेनि करी हा कर्माकर्म । तिचेनि भोगी हा मरणजन्म । धर्माधर्मविभागें ॥ १७ ॥ तिचेनि यासी पाप घडे । तिचेनि यासी पुण्य जोडे । तिचेनि हा महत्त्वा चढे । तिचेनि पडे अधःपातीं ॥ १८ ॥ एथवरी अतिप्रीतीं । वाढविली निजप्रकृती । प्रकृति पातिव्रत्यस्थिती । वश्य निजपती तियें केला ॥ १९ ॥ नवल दोघांची सोयरिकी । दोघीं भावंडें होती सखीं । तो बाप ते त्याची लेंकी । पाहतां विवेकीं तो पुत्र तिचा ॥ २० ॥ यापरी अगम्यागमन । तिंहीं दोघीं करूनि जाण । वाढविले अनेक जन । तिसरेपण नातळतां ॥ २१ ॥ ऐसा अव्यभिचारी व्यभिचारू । करूनि वाढविला संसारू । तो अति‌अतर्क्य अगोचरू । अगम्य दुर्धरू शिवादिकां ॥ २२ ॥ हा निजशक्तिप्रकृतिमेळें । भोगी शिवत्वाचे सोहळे । प्रिया न देखतां तात्काळें । सांडी सगळें शिवत्व ॥ २३ ॥ ज्यासी गांवठाव ना जीवमेळ । रूपनांव ना काळमेळ । ऐसाही प्रकृती केवळ । केला सबळ निजगुणीं ॥ २४ ॥ प्रकृती निजगुणास्तव । निजभर्ता केला सावेव । वर्ण व्यक्ति रूप नांव । नाना वैभवविलासें ॥ २५ ॥ तंव पूर्णत्व लोपोनियां शिवें । अंगावरी वाढविलें शांभवें । येरी पतिव्रता आहेवें । रूपें नांवें शिव पूजी ॥ २६ ॥ दोघांपासूनि झालें जग । परी न दिसे तिसरा भाग । न तुटे अनन्यमिळणीयोग । भिन्न विभाग दाखवितां ॥ २७ ॥ त्रैलोक्य पाहतां साङ्ग । न दिसे तिसरें अंग । दोघीं दुमदुमीत जग । भरलें चांग दुबंधीं ॥ २८ ॥ दोघां अतिप्रीति ऐशी । अनन्यमिळणी अनन्यासी । दोघें अणूमाजीं सावकाशीं । निजरहिवासी नांदत ॥ २९ ॥ पतीवीण ते पतिव्रता । सगळीचि विरे सर्वथा । प्रियेवीण असतचि नसता । होय कांहीं नव्हतां भर्तारू ॥ ३० ॥ शिव निःसंग जो पैं सदा । क्रियाकरणेंवीण नुसधा । त्यासीही अतिप्रीतीं निजप्रमदा । सुखदुःखबाधा भोगवी ॥ ३१ ॥ यापरी निजनोवरा । प्रकृती गोंविला घरचारा । मग घरवातेचा थारा । त्याच्याचि शरीरावरी केला ॥ ३२ ॥ प्रकृति पतिव्रता अवंचक । कर्माकर्मीं शिणोनि अनेक । सुखदुःखांची परवडी देख । अर्पी आवश्यक निजकांता ॥ ३३ ॥ नवल तें मीं सांगावें काये । स्त्री जोडी तें पुरुष खाये । तियेवीण तो पाहें । कंहीं न लाहे कवडाही ॥ ३४ ॥ प्रकृति पतिव्रताशिरोमणी । कांत वश्य करोनि निजगुणीं । वासना सूक्ष्म सेवया अनुदिनीं । भोगवी सुगरणी भर्ताराकरवीं ॥ ३५ ॥ तेथ प्रकृतीचेनि गदारोळें । भवाब्धीं जलक्रीडा खेळे । प्रकृति पुरुषातें बुडवी बळें । पुरुष एकें काळें प्रकृति बुडवी ॥ ३६ ॥ ऐशा प्रकृतीच्या संगा‌आंत । पुरुषास लाविलें पंचभूत । जन्ममरणांच्या बुड्या देत । अवस्थाभूत हो‌ऊनी ॥ 37 || ऐसा प्रकृतिचिया भिडा । पुरुष् केवळ् झाला वेडा । निजत्व् विसरोनि बापुडा । केला गाढा अतिदीन् ॥ ३८ ॥ ऐसा विसरोनि पूर्णत्वासी । जीवशिवद्वंद्वें स्वयें सोशी । त्यासी न्यावया निजत्वासी । गुणिया पूर्णांशीं गुरुरावो ॥ ३९ ॥ ज्याचे वचनमात्रें पहा वो । जीवाचा हारपे जीवभावो । शिवा शिवपदीं ठावो । ज्याचा वचनगौरवो नांदवी ॥ ४० ॥ ज्याची भावार्थें ऐकतां गोठी । अहंकारू निमे उठा‌उठी । जन्ममरणांसी पडे तुटी । न् दिसे दृष्टीं भवभय् ॥ ४१ ॥ ज्याचिया कृपादृष्टिपुढें । जीवशिवांचें फिटे बिरडें । माया मिथ्यात्वें समूळ् उडे । पूर्णत्वाचें उघडे भांडार् ॥ ४२ ॥ शिवू भुलविला शिवत्वासी । यावया तो निजपदासी । आज्ञा जैं पुसे सद्‌गुरूसी । तैंचि शिवासी शिवत्व् ॥ ४३ ॥ एवढी महिमा सद्‌गुरूसी । वचनें केवीं वानूं त्यासी । तवं वनिते वाणीनें वानावयासी । वदवी वाचेसी गुरुरावो ॥ ४४ ॥ तेथ् एक् मी वानिता । हें कोणें घ्यावें आपुले माथां । गुरूनें हरितली अहंता । तेथ् मी एक् कर्ता घडे केवीं ॥ ४५ ॥ तेथ् मीपणें घ्यावी अहंता । तंव् गुरूचि मीपणा‌आंतौता । गुरूवेगळा ठाव् नाहीं रिता । मीपणाचे माथां गुरुरावो ॥ ४६ ॥ माझें जें कां मीपण् । तें सद्‌गुरु झाला आपण् । तेव्हां रूप् एक् नांवें भिन्न् । एका जनार्दन् एकत्वें ॥ ४७ ॥ अवघा जनार्दनचि देखा । तोचि उपनांवें झाला एका । तेणें नामें श्री भागवत् देखा । देशभाखा अर्थवी ॥ ४८ ॥ तेविसावे अध्यायाचे अंतीं । देवो बोलिला उद्धवाप्रती । द्वंद्वभोगांची निजप्राप्ती । साहावी शांती धरोनि ॥ ४९ ॥ ज्यांसी बाणली अढळ् शांती । ते मज् अजितातें जिंकिती । तेचि साचार् परमार्थी । स्वमुखें श्रीपति बोलिला ॥ ५० ॥ तें ऐकोन् कृष्णवचन् । उद्धवाचें दचकलें मन् । द्वंद्वसहिष्णुता अतिकठिण् । कैसोनि आपण् साहावी ॥ ५१ ॥ द्वंद्वसहिष्णुतासाधन् । पुसतां उबगेल् श्रीकृष्ण् । ऐशिया भिडा उद्धव् पूर्ण् । धरोनि मौन् राहिला ॥ ५२ ॥ तो उद्धवाचा अभिप्रावो । जाणोनियां देवाधिदेवो । द्वंद्वसहिष्णुता‌उपावो । समूळ् पहा वो सांगत् ॥ ५३ ॥ अद्वयत्वें परिपूर्ण् । प्रकृतीहूनि पुरुष् भिन्न् । हें आकळल्या निजज्ञान् । द्वंद्वबंधन् बाधीना ॥ ५४ ॥ द्वंद्वें जिणावया पूर्ण् । प्रकृतिपुरुषविवंचन् । उद्धवें न् करितां प्रश्न् । स्वयें श्रीकृष्ण् सांगत् ॥ ५५ ॥ भक्त‌अंतरींचे जाणता । यालागें अंतर्यामी तत्त्वतां । तो निजभक्तांचिया स्वार्था । पूर्ण् परमार्थ् सांगत् ॥ ५६ ॥ निजभक्तांचें मनोगत् । जाणोनियां श्रीकृष्णनाथ् । करावया भक्तहित् । कृपेनें सांगत् कृपाळू ॥ ५७ ॥ जगीं धन्य् भाग्य् उद्धवाचें । कृष्ण् दैवत् तिहीं लोकींचें । कृपा वोरसोनियां साचें । प्रकृतिपुरुषांचें निज् सांगे ॥ ५८ ॥ आशंकेचें निरूपण् । उद्धवें न् सांगतांही जाण् । तें जाणोनियां श्रीकृष्ण् । कृपा निरूपण् निरूपी ॥ ५९ ॥ कृष्ण् म्हणे ज्यासी तारीन् । तो पहिलाचि तरला जाण् । करावया जगाचें उद्धरण् । कृपें श्रीकृष्ण् बोलत् ॥ ६० ॥ धेनु वत्साचेनि लोभें । जेवीं घरापुरतें दुभे । तेवीं उद्धवाचेनि वालभें । जग् पद्मनाभें उद्धरिलें ॥ ६१ ॥ श्रीभगवानुवाच् - अथ् ते संप्रवक्ष्यामि सांख्यं पूर्वैर्विनिश्चितम्‌ । यद्विज्ञाय् पुमान्‌ सद्यो जह्याद्‌ वैकल्पिकं भ्रमम्‌ ॥ १ ॥ जो योगियांचां योगेंद्र् । जो ज्ञानियांचा ज्ञानेंद्र् । जो भक्तचित्तचकोरचंद्र् । जो यादवेंद्र् यदुवंशीं ॥ ६२ ॥ जो प्रकृतिपुरुषांहूनि पर् । तो स्वयें बोले शार्ङ्गधर् । उद्धवा द्वंद्वसहनप्रकार् । अतिगुह्य् विचार् अवधारीं ॥ ६३ ॥ जें ऐकतांचि निरूपण् । सुखदुःखातीत् आपण् । हे संपूर्ण् पावे खूण् । तें गुह्य् ज्ञान् अवधारीं ॥ ६४ ॥ मी कपिलरूपें अवतरूनी । प्रकृतिपुरुष् विवंचोनी । उपदेशिली निजजननी । ते जुनी कहाणी सांगेन् ॥ ६५ ॥ जे परिसतां सावधान् । स्वयें हो‌इजे ज्ञानसंपन्न् । पुरुषाहूनि प्रकृति भिन्न् । सुखदुःख् जाण् तीपाशीं ॥ ६६ ॥ सुखदुःखें मायिक् पूर्ण् । ऐसें ज्यासी कळलें ज्ञान् । तेव्हां भवभयभ्रम् दारुण् । तत्काळ् जाण् तो सांडी ॥ ६७ ॥ जेवीं मोतियांची कंठमाळा । भ्रमें सर्प् भासली डोळां । ते भ्रमांतीं घालिती गळां । न् बाधी कंटाळा सर्पभायाचा ॥ ६८ ॥ तेवीं शिवशक्तिविवंचन् । तुज् मी सांगेन् संपूर्ण् । जें आकर्णितां सावधान् । द्वंद्वें सकारण् हारपती ॥ ६९ ॥ बह्य् सुखरूप् एकलेपणीं । तेथ् प्रकृतिपुरुष् कैंचीं दोनी । द्वंद्वसुखदुःखें ज्यापासोनी । त्रिभुवनीं न् समाती ॥ ७० ॥ तेचि अर्थींचें निरूपण् । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण् । प्रकृतिपुरुषांचें जन्म् जाण् । तें मुख्य् कारण् सुखदुःखां ॥ ७१ ॥ आसीञ्ज्ञानमथो ह्यर्थ् एकमेवाविकल्पितम्‌ । यदा विवेकनिपुणा आदौ कृतयुगेऽयुगे ॥ २ ॥ जेवीं निजेल्या पुरुषाची छाया । पुरुषातळीं जाय् लया । तेवीं सविकार् गिळोनि माया । ब्रह्म् एकल्या एकाकी ॥ ७२ ॥ ब्रह्म् एकाकी परिपूर्ण् । हेंही म्हणावया म्हणतें कोण् । नाहीं नाम् रूप् व्यक्ति पूर्ण् । ब्रह्मीं ब्रह्मपण् स्फुरेना ॥ ७३ ॥ तेथ् नाहीं युगसंख्या काळ् वेळ् । नाहीं दिनमान् घटिका पळ् । नाहीं शून्यत्वें शून्य् मंडळ् । ब्रह्म् केवळ् परिपूर्णत्वें ॥ ७४ ॥ तेथ् मी ब्रह्म् हें स्फुरे जें स्फुरण् । तेंचि मायेचें मुख्य् लक्षण् । तेंचि प्रकृतिपुरुषांचें जन्मस्थान् । जावळीं फळें जाण् जन्मलीं ॥ ७५ ॥ जेवीं कां कवळूनियां कण् । निकण् कोंडा वाढे आपण् । तेंवी पुरुषयोगें पूर्ण् । प्रकृति जाण् थोरावे ॥ ७६ ॥ धरूनि गोडपणाचा सांठा । फणसा‌अंगीं वाढे कांटा । तेवीं पुरुषयोगें ताठा । चढला मोठा प्रकृतीसी ॥ ७७ ॥ जेवीं कां डोळींचेंचि जळ् । गोठोनि डोळां होय् पडळ् । तेवीं ब्रह्मीं मायामळ् । करी शबळ् शुद्धासी ॥ ७८ ॥ पडळ् डोळा मंद् करी । माया निजानंद् आवरी । वाढोनि त्याची त्याचिवरी । वेडा करी पुरुषातें ॥ ७९ ॥ ऐसें कर्तेनवीण् आपसया । कार्यकारण् जें आलें आया । त्यातें कृतयुग् म्हणावया । वेदू लवलाह्या उदेला ॥ ८० ॥ अकार्-उकार्-मकारेंसीं । वेदू उपजे प्रकृतिपुरुषीं । जेवीं उकलल्या बीजासी । प्रथम् ये त्यासी तिवणा डिरू ॥ ८१ ॥ ते वेदींचा अभिप्रावो । ब्रह्म् सत्य् माया वावो । आपुलेनि अभेदें ब्रह्मभावो । विवेकनिपुण् पहा वो जाणती ॥ ८२ ॥ ऐसे वेदविवेकें अभेदयोगी । ते कृतादि होत् कां कलियुगीं । वर्तता ते सदा अयुगीं । युग् त्यालागीं असेना ॥ ८३ ॥ कृतयुगादि युगपंक्ती । चराचर् नाना व्यक्ती । यांसी उपजवी प्रकृती । तिची उत्पत्ती हरि सांगे ॥ ८४ ॥ तन्मायाफलरूपेण् केवलं निर्विकल्पितम्‌ । वाङ्मनोऽगोचरं सत्यं द्विधा समभवद्धहत्‌ ॥ ३ ॥ तें बृहत्‌ जें परब्रह्म् । जेथ् न् रिगे रूपनाम् । जें मनबुद्धीसी अगम्य् । जें दुर्गम् इंद्रियां ॥ ८५ ॥ जें निर्गुण निराकार । जें सत्यस्वरूप साचार । जें परेहूनि परात्पर । निर्विकार निजवस्तु ॥ ८६ ॥ तेथ अतर्क्य मायाचमत्कार । करी दृश्यद्रष्टृत्वें सविकार । तेचि प्रकृति पुरुष साचार । तेणें चराचर वाढवी ॥ ८७ ॥ जेवीं रूपासवें छायेची व्यक्ती । तेवीं ब्रह्मीं मायेची निजस्थिती । तिणें उपजविली शिवशक्ती । पुरुष प्रकृति द्विधा भेदें ॥ ८८ ॥ ब्रह्मांडीं ईश्वरस्वभावो । पिंडीं त्यासीच जीवभावो । ऐसा प्रकृतिपुरुषनिर्वाहो । मायेनें पहा हो द्विधा केला ॥ ८९ ॥ ब्रह्म अच्छेद्य वेदू बोले । तें फाडूनि द्विधा कैसें केलें । जेवीं आरिसां आपणा आपुलें । मुख देखिलें संमुख ॥ ९० ॥ आपण पुर्वामुख आहे । प्रतिबिंब पूर्वेकडे न होये । आपलें आपणा संमुख होये । हें लाघव पाहें मायेचें ॥ ९१ ॥ प्रतिबिंब दिसतां संमुख । संमुख म्हणतां अतिविमुख । पुरुष पूर्वेकडे देख । प्रतिबिंबाचें मुख पश्चिमेकडे ॥ ९२ ॥ तेवीं आत्मदृष्टि स्वरूपीं पडें । जीवदृष्टि प्रपंचाकडे । येणें संमुखत्व न घडे । विमुखत्व गाढें जीवासी ॥ ९३ ॥ तेवीं ब्रह्मीं जें ब्रह्मस्फुरण । तेंचि मूळमायेचें लक्षण । तेथ ईश्वरत्वें जाण । होय आपण्या आपण संमुख ॥ ९४ ॥ जे अद्वितीय वस्तु शुद्ध । तेथ मिथ्या मायासंबंध । अभेदीं उपजवूनि भेद । केलीं द्विविध शिवशक्ती ॥ ९५ ॥ तयोरेकतरो ह्यर्थः प्रकृतिः सोभयात्मिका । ज्ञानं त्वन्यतमो भावः पुरुषः सोऽभिधीयते ॥ ४ ॥ त्या दोहीं भागांमाझारीं । प्रकृतिभाग तो विकारी । पुरुषभाग तो अविकारी । स्वयें श्रीहरी सांगत ॥ ९६ ॥ तेथ आपण आपुली कांता । आपुले कांतेचा आपण भर्ता । एकपणीं दावूनि द्वैता । भिन्नविभागता शिवशक्ती ॥ ९७ ॥ जेवीं आपुलें एक अंग । तेथ बोलती वाम सव्य भाग । तेवीं प्रकृतिपुरुषविभाग । जाणावे साङ्ग मायिक ॥ ९८ ॥ अर्धनारीनटेश्वरीं । जो पुरुष तोचि नारी । प्रकृतिपुरुषीं तैशी परी । एक शरीरीं एकात्मता ॥ ९९ ॥ जैं पुरुषविभाग लपवीं । तैं स्वेच्छा प्रकृति नाचवी । प्रकृतिभाग जैं लपवी । तैं पुरुषाची पदवी प्रकट दिसे ॥ १०० ॥ मधील पडदा जैं तोडिती । तैं पुरुष ना प्रकृती । तेव्हां प्रकटे निजात्मस्थिती । स्त्रीपुरुषव्यक्ती समूळ मिथ्या ॥ १ ॥ ऐशी मिथ्या मायिक प्रकृती । तीपासाव गुणोत्पत्ती । गुणास्तव संसारस्थिती । स्वयें श्रीपती सांगत ॥ २ ॥ तमो रजः सत्त्वमिति प्रकृतेरभवन्गुणाः । मया प्रक्षोभ्यमाणायाः पुरुषानुमतेन च ॥ ५ ॥ प्रकृति गुणमयी पूर्ण । ते लाहोनि पुरुष‌ईक्षण । प्रकट करी तिन्ही गुण । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ ३ ॥ जेवीं सूर्यावलोकनमेळीं । कळीं विकासे कमळदळीं । ते वेगळवेगळी पांकोळी । होती मूळीं कळिकेमाजीं ॥ ४ ॥ तेवीं पुरुषाच्या ईक्षणीं । गुणमयी झाली गुर्विणी । ते तम-रज-सत्त्वगुणी । प्रसवली तिनी गुणांतें ॥ ५ ॥ जेवीं जळे बीज क्षोभूनी । दोनी दळें उलवूनी । डिरू निघाला त्यांतूनी । तरतरूनी तिवणा पैं ॥ ६ ॥ तेवीं परमात्मा मी आपण । पुरुषत्वातें पावोनि जाण । प्रकृति क्षोभवूनी पूर्ण । तिनी गुण प्रकटविले ॥ ७ ॥ जेवीं कां सूर्याचे किरणीं । सूर्यकांतीं पडे अग्नी । तेवीं पुरुषें प्रकृती भोगुनी । गुण तिनी ते प्रसवे ॥ ८ ॥ तेभ्यः समभवत्सूत्रं महान्सूत्रेण संयुतः । ततो विकुर्वतो जातो अहङ्कारो यो विमोहनः ॥ ६ ॥ ते तिनी गुण भिन्न भिन्न । भिन्नपणें वाढी समान । त्या नांव सूत्र प्रधान । क्रियाशक्ति जाण या नांव ॥ ९ ॥ क्रियाशक्तीस जडपण । तेथ चेतनात्मक उपजे ज्ञान । तेंचि महत्तत्त्व नांव जाण । भिन्नभिधान या हेतू ॥ ११० ॥ महत्तत्त्व आणि प्रधान । दोहिंचें रूप एकचि जाण । तेथ क्रिया आणि स्फुरे ज्ञान । यालागीं नांवें भिन्न दोहींचीं ॥ ११ ॥ क्रियायुक्त जें स्फुरे ज्ञान । तेथ चेतवे अभिमान । त्रिगुणीं अहंकार पूर्ण । ते ठायीं जाण उठावे ॥ १२ ॥ अहं खवळल्या दारुण । शिवासी विसरवी शिवपण । देहत्मवादें भुलवे पूर्ण । जन्ममरण भोगवी ॥ १३ ॥ त्या अहंकाराची मोहक शक्ती । भवभ्रमें पाडी भ्रांती । अहंकाराची विकार‌उत्पत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ १४ ॥ वैकारिकस्तैजसश्च तामसश्चेत्यहं त्रिवृत्‌ । तन्मात्रेन्द्रियमनसां कारणं चिदचिन्मयः ॥ ७ ॥ अहंकार अतिदुर्धर । गुणानुसारें त्रिप्रकार । गुण अहंता दृढ संसार । गुणविकार तो ऐसा ॥ १५ ॥ प्रथम अहंभावो सात्त्विक । झाला अंतःकरणद्योतक । तोचि देवताविकारजनक । यालागीं वैकारिक बोलिजे त्यासी ॥ १६ ॥ अहंकार जो राजसू । तो ज्ञानकर्मेंद्रियप्रकाशू । वांछी रजतेजविलासू । यालागीं तैजसू बोलिजे ॥ १७ ॥ तामसाहंकाराची सिद्धि । सूक्ष्म भूतांतें उत्पादी । यालागीं म्हणिजे तो भूतादी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥ १८ ॥ नवल अहंकाराची थोरी । सचेतना अचेतन नोवरी । स्वयें लग्न लावी प्रीतीवरी । चिदचिद्ग्रंथी पुरी पाडूनी ॥ १९ ॥ चिन्मात्रस्वरूपता जीवासी । लग्न लावी जड देहेंसीं । ‘ओं पुण्या’ एकात्मतेसी । कर्ता ज्योतिषी अभिमान ॥ १२० ॥ जीव ज्ञानस्वरूप चोखडा । तो करोनि जड मूढ वेडा । दृढ घाली हाडांचे खोडां । तो हा धडफुडा अहंकारू ॥ २१ ॥ तोचि सात्त्विक आणि राजस । हो‌ऊनि तिसरा तामस । त्रिविध विकारीं बहुवस । वाढवी असोस संसारू ॥ २२ ॥ अर्थस्तन्मात्रिकाज्जज्ञे तामसादिन्द्रियाणि च । तैजसाद्‌ देवता आसन्‌ एकादश च वैकृतात्‌ ॥ ८ ॥ विषय तेचि महाभूतें । तामस प्रसवला अपंचीकृतें । विषयास्तव प्रकटती भूतें । ऐक तूतें सांगेन ॥ २३ ॥ शब्दापासाव नभ उद्‌भवत । स्पर्शापासाव मारुत । रूपापासाव तेज होत । रसास्तव येथ आप उपजे ॥ २४ ॥ गंधापासोनि पृथ्वी कठिण । उपजली आपीं आपण । येरयेरांचें अनुस्यूतपण । सर्वथा जाण मोडेना ॥ २५ ॥ शब्द निःशब्दीं जन्मला । तो आकाशातें प्रसवला । आकाशीं सूक्ष्म स्पर्श झाला । तो स्पर्श व्याला मारुत ॥ २६ ॥ जन्मल्या मारुता‌आंत । शब्द स्पर्श दोनी नांदत । मारुत रूपातें प्रसवत । त्या रूपांत तेज जन्मलें ॥ २७ ॥ त्या जन्मल्या तेजा‌आंत । शब्द स्पर्श रूप नांदत । रूप रसातें प्रसवत । आप रसांत जन्मलें ॥ २८ ॥ जन्मले आपीं समरस । शब्द स्पर्श रूप रस । नांदताती सावकाश । विषयीं विषयांस प्रवेशू ॥ २९ ॥ आपामाजीं जन्मे गंध । गंधापासाव पृथ्वी शुद्ध । शब्द स्पर्श रूप रस गंध । पृथ्वी पंचविध विषययुक्त ॥ १३० ॥ विषययुक्त अपंचीकृतें । पूर्वीं लीन होतीं समस्तें । तींचि स्थूळावलीं येथें । महाभूतें प्रसिद्ध ॥ ३१ ॥ ज्ञान कर्म उभयपंचक । श्रोत्रादि इंद्रियदशक । राजसापासोनि देख । स्वाभाविक जन्मलीं ॥ ३२ ॥ सत्त्व‌अहंतेचा विकार । चित्तचतुष्टय चमत्कार । मन बुद्धि चित्त अहंकार । अकराही सुर इंद्रियाधिप ॥ ३३ ॥ महाभूतें अतिजडें देख । इंद्रियें तेथें प्रवर्तक । अंतःकरणचाळक । देव प्रकाशक कर्माचे ॥ ३४ ॥ त्रिविध अहंकारवृत्ती । गुणक्षोभें क्षोभक शक्ती । यापरी झाली उत्पत्ती । ब्रह्मांडस्थितीलागूनी ॥ ३५ ॥ मया सञ्चोदिता भावाः सर्वे संहत्यकारिणः । अण्डमुत्पादयामासुः ममायतनमुत्तमम्‌ ॥ ९ ॥ भूतां परस्परें वैर देख । पृथ्वीतें गिळूं धांवे उदक । उदकातें आवश्यक । तेज देख निर्दळी ॥ ३६ ॥ तेजातें प्राशी पवन । पवनातें ग्रासी गगन । एवं भूतांसी सौजन्य । सर्वथा जाण असेना ॥ ३७ ॥ तेथ अंतर्यामिरूपें मी जाण । स्वयें प्रवेशोनि आपण । भूतें मेळवूनि पूर्ण । करीं संरक्षण मर्यादा ॥ ३८ ॥ माझे मर्यादेची रेखा । प्रथ्वी न विरवी उदका । उदकातें तेज देखा । न लववी नखा शोषाचे ॥ ३९ ॥ तेजातें न प्राशी पवन । वायु स्वेच्छा विचरतां जाण । सर्वथा ग्रासीना गगन । गतिबंधन करीना ॥ १४० ॥ यापरी हीं महाभूतें । एकवटूनि समस्तें । स्त्रजिलें ब्रह्मांडातें । मज महापुरुषातें वस्तीशीं ॥ ४१ ॥ सप्तावरणेंसीं प्रचंड । आवो साधूनि उदंड । निर्माण केलें ब्रह्मांड । मयूरांड आकारें ॥ ४२ ॥ तस्मिन्नहं समभवं अण्डे सलिलसंस्थितौ । मम नाभ्यामभूत्पद्मं विश्वाख्यं तत्र चात्मभूः ॥ १० ॥ ऐसें ब्रह्मांड जें विद्यमान । त्यामाजीं मी नारायण । लीलाविग्रही झालों जाण । आपण्या आपण विश्वात्मा ॥४३ ॥ त्या माझे नाभीसी नाभिपद्म । विकासलें विश्वधाम । त्याहीमाजीं उत्तमोत्तम । आत्मभू नाम जन्मला ब्रह्मा ॥ ४४ ॥ नाहीं योनिद्वारा उदरगर्भू । मज आत्म्यापासूनि स्वयंभू । उपजला यालागीं आत्मभू । नामाचा शोभू ब्रह्मयासी ॥ ४५ ॥ ब्रह्मांड तो विराटदेहो । त्याचा मुख्य भाग विग्रहो । माझे नाभिकमळीं पहा हो । ब्रह्मदेवो जन्मला ॥ ४६ ॥ करावया लोकसर्जन । पद्मनाभाचे नाभीसी जाण । स्वयें जन्मला चतुरानन । रजोगुणप्राधान्यें ॥ ४७ ॥ सोऽसृजत्तपसा युक्तो रजसा मदनुग्रहात्‌ । लोकान्‌ सपालान्‌ विश्वत्मा भूर्भुवःस्वरिति त्रिधा ॥ ११ ॥ ब्रह्म रजोगुणप्रधान । नाभिकमळीं बैसोनि जाण । मी जन्ममूळ जो नारायण । त्यासी तो आपण देखेना ॥ ४८ ॥ स्वयें बैसल्या कमळासी । कमळमूळ न कळे त्यासी । देखे एकार्णव जळासी । रजोगुणेंसीं मोहित ॥ ४९ ॥ तें कमळमूळ पहावया बुडीं । एकार्णवीं घालोनि उडी । बुडतां दिवसांच्या कोडी । त्या मूळाची जोडी न लभेचि ब्रह्मा ॥ १५० ॥ तेथ निर्बुजला जळभयें । बाहेरि उसासे लवलाहें । कमळावरी बैसोनि पाहें । करावें काये स्मरेना ॥ ५१ ॥ धांव पाव गा अच्युता । निवारीं माझी जगदंधता । तुजवांचूनि सर्वथा । संरक्षिता मज नाहीं ॥ ५२ ॥ धांव पाव गा अच्युता । निवारीं माझी जगदंधता । तुजवांचूनि सर्वथा । संरक्षिता मज नाहीं ॥ ५२ ॥ ब्रह्मा माझे पोटींचें बाळ । रजें रजांध झालें केवळ । धरोनि ठेला नाभिकमळ । कृपा तत्काळ मज आली ॥ ५३ ॥ मज विश्वात्म्याचें अपत्य । जडत्वें राहिला तटस्थ । म्यां उपदेशिला तेथ । सृष्टिसर्जनार्थ तपोनिष्ठा ॥ ५४ ॥ महाकल्पादींचे मांडणी । माझिया अशरीरी वाणी । तप तप या दों वचनीं । उपदेशिला अग्रगणी चतुरानन ॥ ५५ ॥ यथोक्त तप करितां जाण । वृद्धि पावला सत्त्वगुण । त्याचिया सात्त्विकता पूर्ण । प्रत्यक्ष नारायण मी झालों ॥ ५६ ॥ काळत्रयीं अबाधिक । तूंचि विश्वात्मा निश्चित । हें चतुःश्लोकी भागवत । म्यां त्यासी तेथ उपदेशिलें ॥ ५७ ॥ माझिया उपदेशविधीं । हो‌ऊनियां समबुद्धी । कल्पकल्पांचिये अवधी । मोह त्रिशुद्धी बाधीना ॥ ५८ ॥ यापरी ब्रह्मा कल्पादी । पावला परम समाधी । प्रकटोनि निजात्मबुद्धी । सर्जनसिद्धी तेणें केली ॥५९ ॥ सुरासुर मानव पन्नागादिक । यांचे वसते तिन्ही लोक । सप्तपाताळ घरें देख । गोपुरें अलोलिक सप्तसंख्या ॥ १६० ॥ भूशब्दें पाताळलोक । भुवःशब्दें मृत्युलोक । स्वःशब्दें सर्गलोक । त्रिलोक देख यां नांव ॥ ६१ ॥ चतुर्दश भुवनें सकळ । तेथ वसते लोक लोकपाळ । तेंचि करोनियां विवळ । सांगे प्रांजळ श्रीकृष्ण ॥ ६२ ॥ देवानामोक आसीत्‌ स्वर्भूतानां च भुवः पदम्‌ । मर्त्यादीनां च भूर्लोकः सिद्धानां त्रितयात्परम्‌ ॥ १२ ॥ अधोऽसुराणां नागानां भूमेरोकोऽसृजत्प्रभुः । त्रिलोक्यां गतयः सर्वाः कर्मणां त्रिगुणात्मनाम्‌ ॥ १३ ॥ मागील श्लोकाचे अंतीं । भूर्भुवःस्वर इति । यापरी त्रिलोकी श्रीपती । जाण निश्चितीं बोलिला ॥ ६३ ॥ तेंचि पुढील श्लोकार्था । पाताळलोक होय चौथा । तो मृत्युलोक एकात्मता । जाण तत्त्वतां व्याख्यान ॥ ६४ ॥ इंद्रादि सकळ देवांसी । स्वर्ग निजमंदिर त्यांसी । यक्षरक्षभूतगंधर्वांसी । निवासासी अंतरिक्ष ॥ ६५ ॥ जेणें पाविजे निजमोक्षासी । जेथूनि गमन लोकांतरासी । ते कर्माभूमी मनुष्यासी । निजभाग्येंसी भूर्लोक ॥ ६६ ॥ त्रिलोकीवरतें जाण । सिद्ध वोळंगती आपण । तें सिद्धांचें सिद्धिस्थान । वसतें जाण निरंतर ॥ ६७ ॥ अतळ वितळ सुतळ । रसातळ महातळ । तळातळ आणि पाताळ । अधःसंख्या सकळ पाताळा ॥ ६८ ॥ सप्तपाताळीं अधिकारमेळू । अतळीं वसे मयपुत्र बळू । प्रतापें अतिप्रबळू । दैत्यमेळू समुदाय ॥ ६९ ॥ वितळीं वसे हाटकेश्वरू । जो उमाकांत कर्पूरगौरू । जेथिले हाटकनदीचा पूरू । सुवर्णसंभारूप्रवाही ॥ १७० ॥ सुतळीं महावैष्णव बळी । ज्याचा द्वारपाल वनमाळी । प्रल्हादही त्याचिजवळी । वैष्णवकुळीं नांदत ॥ ७१ ॥ त्रिपुर भेदूनि शंकरू । रसातळीं स्थापिला मयासुरू । तो मायालाघवी महावीरू । सपरिवारू वसताहे ॥ ७२ ॥ माहातळीं कद्रूसुत । जे विषधर क्रोधयुक्त । ते सर्प जाण समस्त । तेथ नांदत निजवासें ॥ ७३ ॥ तळातळीं नांदती दानव । निवातकवची वीर सर्व । फणिमुख्य राजगौरव । रचना अपूर्व ते ठायीं ॥ ७४ ॥ सातवे पाताळीं वसती नाग । शतसहस्त्र फणिगणभोग । वासुकिप्रभुख अनेग । पद्मिनीभोग भोगिती ॥ ७५ ॥ स्वर्गीं रंभा उर्वशी सुंदरी । कां पाताळीं पद्मिणी नारी । त्यांच्या सौंदर्याची थोरी । लोकांतरीं वाखाणे ॥ ७६ ॥ त्या तळीं तीं शतयोजनांवरी । शेष वसे सह्स्त्रशिरी । ज्याचा निजांगावरी । निद्रा करीं मी भगवंत ॥ ७७ ॥ त्याहूनि तळीं आत्यंतिक । अंधतामिस्त्रादि महानरक । त्याहीतळीं कूर्म देख । आवरणोदक तयातळीं ॥ ७८ ॥ ज्यांचा स्वर्गभोग होय क्षीण । अधोभोगाचें उरे पुण्य । तेणें पुण्यानुक्रमें जाण । सप्तपाताळीं जन जन्मती ॥ ७९ ॥ ज्याचे गांठीं पाप चोख । तो भोगी नाना नरक । ऐशी त्रिलोकी देख । चतुर्मुख स्वयें रची ॥ १८० ॥ ज्यांसीं निष्कामता नाहीं चित्तीं । जे स्वप्नीं न देखती विरक्ती । त्यांसी त्रिलोकीवरती गती । नाहीं निश्चितीं उद्धवा ॥ ८१ ॥ जे न करितीचि माझी भक्ती । जे नायकतीचि माझी कीर्ती । जे माझें रामनाम नुच्चरिती । भवबंधपंक्तिच्छेदक ॥ ८२ ॥ त्यांसी पुनः पुनः स्वर्गलोक । पुनः पुनः भोगिती नरक । पुनः पाताळ मृत्युलोक । नानायोनीं दुःख भोगिती ॥ ८३ ॥ जे त्रिगुणगुणी सदा सकाम । जे सर्वदा करिती सकाम कर्म । त्यांसी त्रैलोक्यबाहेरी निर्गम । त्रिगुणधर्म निघों नेदी ॥ ८४ ॥ सांगीतली पाताळविवंचना । आतां ऐक स्वर्गरचना । लोकीं लोकांतरगणना । समूळ जाणा सांगेन ॥ ८५ ॥ रविचंद्रप्रभा जेथवरी । तेथवरी पृथ्वीची थोरी । तळीं पाताळ स्वर्ग वरी । लोकलोकांतरीं निवास ॥ ८६ ॥ पायीं चालिजे तो भूलोक जोडे । येथूनि सूर्या‌ऐलीकडे । भुवर्लोकींची थोरी वाढे । तेथ वस्ती घडे यक्षरक्षगंधर्वां ॥ ८७ ॥ भुवर्लोकाहीवरी । सूर्यलोकाची वाढे थोरी । पृथ्वीपासूनि लक्षावरी । जाण निर्धारीं रविलोक ॥ ८८ ॥ वायूपासूनि चक्राकारीं । रविचंद्रतारालोक कुसरी । खेवणोनियां तयावरी । काळ सूत्रधारी भवंडीत ॥ ८९ ॥ त्या काळाहीवरी माझी सत्ता । माझेनि भेणें काळू तत्त्वतां । क्षणलवनिमिषावस्था । अधिकन्यूनता हो‌ऊं नेदी ॥ १९० ॥ नवल काळचक्रगती । मासां रवि चंद्र समान होती । सूर्या‌आड चंद्रासी गती । जाण निश्चितीं दिनद्वयें ॥ ९१ ॥ ते अमावास्याप्रतिपदेसी । चंद्र चंद्रमंडळीं सावकाशीं । सूर्यसमभागें गमन त्यासी । तें या लोकांसी दिसेना ॥ ९२ ॥ इतुक्यासाठीं ते दिवशीं । जीवें जित्या चंद्राशीं । नष्टत्व स्थापिती ज्योतिषी । तें लोकांसी सत्य मानें ॥ ९३ ॥ रवि चंद्र एकासनीं । सर्वथा नव्हती गमनीं । लक्षांतरें वसती दोन्ही । मंडळसमानीं मासांतीं गती ॥ ९४ ॥ रवि‌आड गती ज्या ग्रहासी । त्याचा अस्त सांगे ज्योतिषी । सत्य माने या लोकांसी । तो ग्रहो दृष्टीसी दिसेना ॥ ९५ ॥ दृष्टिसृष्टीचा जो न्यावो । तो ज्योतिषशास्त्रीं सत्य पहा हो । न दिसे त्याचा अस्तभावो । दिसे तो पहा हो पूजिती ॥ ९६ ॥ अभ्रा‌आड ग्रहण झालें । देखीलें तेथें पर्व फावलें । न दिसे ते देशीं नाहींच झालें । येणेहीं बोलें वर्तती ॥ ९७ ॥ रविचंद्रांहूनि आरती । राहुकेतूंची असे वस्ती । ते जैं मंडळा‌आड येती । तैं ग्रासिलें म्हणती रविचंद्रां ॥ ९८ ॥ राहू सूर्या गिळिता साचें । तैं तोंड जळतें राहूचें । मंडळीं मंडळ आड ये त्यांचे । हें सर्वग्रासांचें संमत ॥ ९९ ॥ सूर्य सूर्यमंडळीं राज्य करी । त्याच्या सर्वग्रासाची थोरी । ज्योतिषी सांगे घरोघरीं । तें देखोनि नरीं महाशब्द कीजे ॥ २०० ॥ सूर्यसर्वग्रासाचिया गोठी । जगीं एक बोंब उठी । शेखीं रवि-राहूंसी नाहीं भेटी । स्पर्शही शेवटीं असेना ॥ १ ॥ ग्रहचक्र वेगें चळतां पाहीं । रविचंद्रादिकां चालणें नाहीं । ते निश्चळ निजराज्याच्या ठायीं । न चालतां पाहीं चालती ॥ २ ॥ रविलोकाहूनि वरी । चंद्रलोक लक्षांतरीं । चंद्रलोकाहूनि दूरी । लक्षांतरीं तारालोक ॥ ३ ॥ तारालोकाहूनि वरी । बुधलोक दों लक्षांतरीं । बुधलोकाहूनि वरी । दों लक्षांतरीं शुक्रलोक ॥ ४ ॥ मिळोनियां दैत्यगण । ज्याच्या चरणां येती शरण । नित्य घालिती लोटांगण । तो शुक्राचार्य जाण दैत्यगुरु ॥ ५ ॥ शुक्रलोकाहूनि दों लक्षांतरीं । भौमलोक वसे अंबरीं । भौमलोकाहूनि दों लक्षांतरीं । देवगुरु करी निजवासू ॥ ६ ॥ ज्याचे चरण वंदिती देख । इंद्रचंद्रवरुणादि अर्क । नित्य येती आवश्यक । तो बृहस्पतिलोक गुरूचा ॥ ७ ॥ त्याहिवरी लक्ष दोनी । सूर्यसुत वसे शनी । लक्षांतरें तेथूनी । सप्त‌ऋषिजनीं निवासू ॥ ८ ॥ सप्त‌ऋषींची ऋषिपंक्ती । तेथेंचि वसे अरुंधती । यावरी वसे अमरावती । इंद्रसंपत्तीसमवेत ॥ ९ ॥ जेथ अंगें वसे इंद्र जाण । ऐरावती आरोहण । पार्षदगण मरुद्‌गण । सुरसेना जाण जयाची ॥ २१० ॥ उच्चैःश्रवा वारू जाण । कल्पतरूंचें उद्यान । कामधेनूंचें गोधन । नंदनवन क्रीडेसी ॥ ११ ॥ जेथींच्या पायर्यान चिंतामणी । रंभा उर्वशी विलासिनी । अष्टनायिका नाचणी । ज्याच्या रंगणीं नांदती ॥ १२ ॥ येणें वैभवें अमरावती । इंद्र तेथील अधिपती । येथूनि स्वर्गाचि समाप्ती । त्रैलोक्य निश्चितीं या नांव ॥ १३ ॥ आतां त्रैलोक्यबाहेरी । एक लक्ष योजनांवरीं । भक्तकृपाळू श्रीहरी । ध्रुवमंडळ करी कृपेने ॥ १४ ॥ त्रिलोकीं होतां प्रलयकाळ । ध्रुवासी कदा नव्हे चळ । तो सर्वदा अचळ । यालागीं अढळ ध्रुवपद ॥ १५ ॥ पृथ्वीपासोनि कोटि योजन । महर्लोक वसे जाण । तेथ वसती कल्पायु जन । तें वसतिस्थान तयांचें ॥ १६ ॥ तेथूनि कोटि योजनें देख । वरुता असे जनोलोक । तेथ वसती सनकादिक । ऊर्ध्वरेते देख महायोगी ॥ १७ ॥ तेथूनि दोन कोटि अधिक । वसताहे तपोलोक । तेथील निवासी आवश्यक । वैराजदेव देख तपस्वी ॥ १८ ॥ तपोलोकाहूनि देख । चौकोटी उंच अधिक । तेथ वसताहे सत्यलोक । तेथील नायक चतुरानन ॥ १९ ॥ तेथ मूर्तिमंत चारी वेद । मूर्तिमंत धर्म प्रसिद्ध । मूर्तिमंत ब्रह्मचर्य शुद्ध । तपही विशद मूर्तिमंत ॥ २२० ॥ गायत्री मूर्तिमंत तेथ । वाचा मूर्तिमंत वर्तत । दया मूर्तिमंत नांदत । योग मूर्तिमंत ब्रह्मसदनीं ॥ २१ ॥ तेथ अग्नि तिनी मूर्तिंमंत । ते एकरूपें त्रिधा भासत । सत्य सत्यलोकीं मूर्तिंमंत । असत्य तेथ असेना ॥ २२ ॥ ते लोकीं वसते कोण लोक । जे गायत्रीमंत्रजापक । जे ब्रह्मणतीर्थप्राशक । जे याग‌उपासक निष्काम ॥ २३ ॥ जे ब्राह्मणकार्यीं निमाले । जे गोसंरक्षणीं जीवें गेले । जे परोपकारार्थ वेंचले । ते पावले सत्यलोक ॥ २४ ॥ जे निष्काम द्विजां भजले । जिंहीं निष्काम द्विज पूजिले । जिंहीं निष्काम द्विज भोजिले । ते पावले सत्यलोक ॥ २५ ॥ जे कृपाळू दीनार्थ देख । कृपाळू बंधमोचक । जे सत्यवादी सात्त्विक । ते सत्यलोकनिवासी ॥ २६ ॥ जे परापवादीं मूक । परदारानपुंसक । जे परद्रव्या पराङ्‌मुख । ते सत्यलोकनिवासी ॥ २७ ॥ ऐसी सत्यलोकींची स्थिती । तेथींचा ब्रह्मा अधिपती । ब्रह्मसृष्टि याहीवरती । नाहीं निश्चितीं उद्धवा ॥ २८ ॥ ब्रह्मांडाहूनि वेगळा । कैलास निर्माण करी भोळा । वैकुंठ रची घनसांवळा । हे लोक स्वलीळा निर्मित ॥ २९ ॥ होतां ब्रह्मांडा घडामोडी । वैकुंठ कैलास न लगे वोढी । तेथील वस्तीची अभिनव गोडी । हरिहरभक्त फुडी जाणती ॥ २३० ॥ तेथ नाहीं काळाचें गमन । नाहीं कर्माचें कर्मबंधन । तेथ नाहीं जन्ममरण । हें भक्त अनन्य पावती ॥ ३१ ॥ वैकुंठकैलासरचना । सांगतां मन मुके मनपणा । ते लोकींची लोकलक्षणा । ऐक विचक्षणा सांगेन ॥ ३२ ॥ सकळ ब्रह्मांडाबाहेरी । माया‌आवरणाभीतरीं । वैकुंठ कैलास हरहरीं । स्वलीलेकरीं निर्मिजे ॥ ३३ ॥ सकळ जीवां सुखकरू । कैलासीं वसे शंकरू । जो कां पार्वतेपरमेश्वरू । जो योगेश्वरू योगियां ॥ ३४ ॥ जटाजूटी गंगाधर । पिनाकपाणी पंचवक्त्र । कर्पूरगौर गोक्षीर । अभयवरदकर निजभक्तां ॥ ३५ ॥ त्रिमात्रातीत त्र्यंबक । त्रिपुटीत्रिपुर त्रिपुरांतक । त्रिविधताप उच्छेदक । तिनी लोक सुखकारी ॥ ३६ ॥ नागभूषणीं शोभे लीला । रुद्राक्षयुक्त रुंडमाळा । नीळकंठ जाश्वनीळा । भस्मोद्धूलिधूसर ॥ ३७ ॥ त्रिशूळडमरांकित कर । त्रिनेत्र व्याघ्राजिन अंबर । रामनामीं अतितत्पर । करी निरंतर जपमाळा ॥ ३८ ॥ सहस्त्रबाहु बळिपुत्र बाण । श्रृंगी श्रृंगी चंडी पार्षद पूर्ण । साठी सहस्त्र रुद्रगण । कात्या त्रिशूळ जाण झेलती ॥ ३९ ॥ गणेश स्वामिकार्तिक । नंदी पंचमुख षण्मुख । वीरभद्रसेनानायक । जेणें लाविली सीक दक्षासी ॥ २४० ॥ भूत प्रेत पिशाचक । महाप्रथम ज्याचें सैन्यक । अवघे शिवांकित देख । शिवनामघोष गर्जती ॥ ४१ ॥ शंभु शिव शूली शंकर । उमाकांत कर्पूरगौर । भव भर्ग भवानीवर । कपर्दी ईश्वर महादेव ॥ ४२ ॥ हरहरशंकरनामोच्चारीं । धाकें कळिकाळ पळे दूरी । शिवनामें गर्जे सदा गिरी । गिरीश राज्य करी ते ठायीं ॥ ४३ ॥ जेथ शिवनामाचा उच्चार । तेथ सुखेंसीं तिष्ठे शंकर । भक्तकृपाळू ईश्वर । भोळा निरंतर भावार्थ्यां ॥ ४४ ॥ निजदासांचे त्रिगुण वैरी । छेदावया सदा त्रिशूळ करीं । निजडमरूच्या गजरीं । पापाची उरी उरों नेदी ॥ ४५ ॥ कैलासीं तृण तरु समस्त । पशु पक्षी जे जे तेथ । ते अवघेचि शिवांकित । सर्वरूपें समस्त शिवू नांदे ॥ ४६ ॥ यापरी ब्रह्मांडाबाहेरी । शिवू स्वलीला निर्माण करी । नेमूनियां कैलासगिरि । भरू राज्य करी भवानीशीं ॥ ४७ ॥ आतां वैकुंठींची स्थिती । ऐक सांगेन तुजप्रती । जे ऐकतां चित्तवृत्ती । स्वानंदस्फूर्ती वोसंडे ॥ ४८ ॥ उंस गाळूनि काढिजे सार । त्याची आळूनि कीजे साकर । तिचेही नाना प्रकार । करिती नानाकर अतिकुशळ ॥ ४९ ॥ तेवीं चैतन्यचि निश्चितें । मुसावूनि श्रीभगवंतें । वैकुंठ रचिलें तेथें । निजसामर्थ्यें नांदावया ॥ २५० ॥ स्वलीला सगुण साकार । सुकुमार अतिसुंदर । घनश्याम मनोहर । मूर्ति चिन्मात्र चोखडी ॥ ५१ ॥ शंख चक्र पद्म गदा । चारी भुजा सायुधा । डोळे लांचावले आनंदा । सगुण गोविंदा देखोनी ॥ ५२ ॥ मुकुट कुंडले मेखळा । कांसे पिंवळा सोनसळा । कौस्तुभ झळके गळां । आपाद वनमाळा शोभत ॥ ५३ ॥ चरणींची गंगा अतिपुनीत । जे जगातें पवित्र करित । ते माथां वाहे उमाकांत । निजस्वार्थ देखोनी ॥ ५४ ॥ त्या श्रीहरीचें पदद्वंद्व । वानितां मुका झाला वेद । अगम्य हरीचें निजपद । महिमा अगाध श्रीहरिचरणीं ॥ ५५ ॥ पाहतां मुकुंदाचें श्रीमुख । फिकें झालें जी पीयूख । डोळ्यां झालें परम सुख । धन्य श्रीमुख हरीचें ॥ ५६ ॥ ज्याचें निमेषार्ध देखिल्या मुख । हारपे कोटि जन्मांचें दुःख । त्रिलोकीं न माय हरिख । धन्य श्रीमुख हरीचें ॥ ५७ ॥ ज्याचा देखिलिया वदनेंदू । बांधू न शके द्वंद्वबाधू । चढता वाढता परमानंदू । स्वानंदकंदू जगाचा ॥ ५८ ॥ जयाची विक्षेपभ्रुकुटी । रची ब्रह्मांडें उठा‌उठी । ज्याचे रोमकूपीं ब्रह्मांडे कोटी । तो हरि वैकुंठीं नांदत ॥ ५९ ॥ ज्याची झालिया कृपादृष्टी । अहंकाराची विरे गांठी । दुसरें दिसों नेदी सृष्टीं । तो हरि वैकुंठीं नांदत ॥ २६० ॥ जया दादुल्याचें नाम । निर्दाळी गा मरणजन्म । समूळ उपडी कर्माकर्म । तो पुरुषोत्तम नांदत ॥ ६१ ॥ ते वैकुंठीं पाहतां साचार । अवघे चतुर्भुज नर । घनश्याम पीतांबरधर । शंख चक्र अवघ्यांसी ॥ ६२ ॥ अवघ्यांचें एक स्वरूप । अवघे दिसती एकरूप । जेथ हरि नांदे स्वयें सद्‌रूप । तेथ कोणी कुरूप दिसेना ॥ ६३ ॥ तेथ नाहीं आधी व्याधी । नाहीं विषयवार्ता उपाधी । स्त्रीपुरुषां समान बुद्धी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥ ६४ ॥ तेथ नाहीं तहानभूक । नाहीं कामक्रोध द्वंद्वदुःख । नाहीं जन्ममरण निःशेख । ऐसा वैकुंठलोक नांदत ॥ ६५ ॥ लक्ष्मीनें करावें अवलोकन । यालागीं कष्टती सुरगण । ते लक्ष्मी अंगें आपण । करी संमार्जन वैकुंठी ॥ ६६ ॥ ते वैकुंठीं जनन्नाथ । उद्धरावया निजभक्त । स्वलीला असे नांदत । दीनकृपायुक्त दयाळू ॥ ६७ ॥ अंतीं नाममात्र घेतल्यासाठीं । उद्धरल्या जीवकोटी । तो स्वामी श्रीविष्णु वैकुंठी । दीनकृपादृष्टी नांदत ॥ ६८ ॥ जैसा ज्यासी भावार्थ । तैसा पुरवी मनोरथ । पढिये पंचम पुरुषार्थ । तो हरी नांदत वैकुंठीं ॥ ६९ ॥ लोकलोकांतरगणना । ब्रह्मांडसंख्या अवघी जाणा । वैकुंठकैलासरचना । समूळ विवंचना सांगितली ॥ २७० ॥ लोक सांगीतले भिन्न । तेथील प्राप्तीचे कोण जन । ऐसें कल्पील तुझें मन । ते अर्थीं निरूपण अवधारीं ॥ ७१ ॥ महर्जनतपःसत्यलोक । वैकुंठरचना अलोलिक । तेथील प्राप्तीचे कोण लोक । ते यदुनायक सांगत ॥ ७२ ॥ योगस्य तपसश्चैव न्यासस्य गतयोऽमलाः । महर्जनस्तपः सत्यं भक्तियोगस्य मद्‌गतिः ॥ १४ ॥ निश्चळ करावया निजचित्ता । साधिली प्राणापानसमता । षट्चक्रें भिदूनि तत्त्वतां । पुढें निजात्मता पावावी ॥ ७३ ॥ तंव आयुष्या झालें अस्तमान । निजांगीं आदळे मरण । ऐसे निमाले जे योगीजन । त्यांसी ऊर्ध्व गमन महर्जनादि लोकीं ॥ ७४ ॥ जो गृहस्थाश्रमी ब्रह्मचारी । ब्रह्मचर्यनेमें व्रतधारी । जो स्वप्नींहीं नातळे नारी । जो भिक्षाहारी सर्वदा ॥ ७५ ॥ जो सदा धडधडीत विरक्ती । एक भिक्षा न धरी हातीं । सद्‌गुरूचिया सेवा करिती । आत्मज्ञानप्राप्ती पावावया ॥ ७६ ॥ जे संधीं व्हावें आत्मज्ञान । ते संधीसी आलें मरण । ऐशा ब्रह्मचारियासी जाण । ऊर्ध्व गमन महर्जनादि लोकीं ॥ ७७ ॥ जे गृहस्थाश्रमीं नेटक । जे अग्निसेवे साग्निक । जे स्वधर्में चित्तशोधक । जे सेवक द्विजदेवां ॥ ७८ ॥ जे भूतदयाळू भाविक । जे सत्यवादी सात्त्विक । जे निजात्मज्ञानसाधक । जे अवंचक गुरुभजनीं ॥ ७९ ॥ गुरुकृपा साधूनि ज्ञान । पावावें ब्रह्म सनातन । तंव वेंचलें आयुष्यधन । अंगीं निधन आदळलें ॥ २८० ॥ तेणें खोळंबली ब्रह्मप्राप्ती । परी ऊर्ध्वलोकीं होय गती । जैसी उपासना विरक्ती । तेणें तारतम्यें जाती महर्जनादि लोकीं ॥ ८१ ॥ जे वनवासी वानप्रस्थ । जे वैराग्यें अतिविरक्त । जे कंदमूळफळीं तृप्त । जे सदा नेमस्त आश्रमधर्मीं ॥ ८२ ॥ वर्षाकाळीं आसारीं राहे । हेमंतीं जळाशयें । उष्णकाळीं पंचाग्नी साहे । तपश्चर्या वाहे अतिनिष्ठा ॥ ८३ ॥ शरिरशोषणाचें पाहे । सर्वथा न धरी भये । स्वार्थाचेनि लवलाहें । तपोनिष्ठा साहे दारुण ॥ ८४ ॥ वैराग्य साधूनि पूर्ण । करावें संन्यासग्रहण । साधावया ब्रह्मज्ञान । तेचि काळीं मरण वोढवलें ॥ ८५ ॥ ऐसोनि देहान्तस्थिती । त्यासी ऊर्ध्वलोकीं होय गती । महर्जनतपोलोकप्राप्ती । तारतम्यस्थिती उपासना ॥ ८६ ॥ जो समूळसंकल्पसंन्यासी । लोकलोकांतर न घडे त्यासी । हें न टकेचि गा जयासी । आणि झाले संन्यासी विधियुक्त ॥ ८७ ॥ जे कां पोटींहून अतिविरक्त । स्वप्नीं धातूंसी न लाविती हात । जे यतिधर्मीं सदा निरत । जे सदा जपत प्रणवातें ॥ ८८ ॥ अंगीकारिले आश्रमविधी । उबगू न मानी जो त्रिशुद्धी । मरणीं डंडळीना बुद्धी । त्या गमनसिद्धी सत्यलोकीं ॥ ८९ ॥ ऐसे सत्यलोकातें पावती । तेथील्या भोगांची ज्यां विरक्ती । ते ब्रह्म्यासवें मुक्त होती । येर ते येती माघारे ॥ २९० ॥ ज्यांसी सत्यलोकीं भोगासक्ती । तेही खचोनि माघारे येती । इतर लोकांची कोण गती । पुनरावृत्ती सोडीना ॥ ९१ ॥ जेथवरी भोगासती । तेथवरी पुनरावृत्ती । जेथ भोगाची निवृत्ती । तेथ चारी मुक्ती आंदण्या ॥ ९२ ॥ ज्यां लोकीं ज्या भोगविरक्ती । तेथून ते पुढारे जाती । जे लोकीं ज्या भोगासक्ती । ते खचोनि पडती भूलोकीं ॥ ९३ ॥ तैसी नव्हे माझी भक्ती । भक्तां नाहीं इतर प्राप्ती । मद्‌भक्तां माझी गती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ९४ ॥ जे सकाम माझी सेवा करिती । त्यांसी कामनाफळीं पडे वस्ती । ज्यांसी निष्काम माझी भक्ती । त्यांसी माझी प्राप्ती अनन्य ॥ ९५ ॥ सकाम भक्तांचे पुरवूनि काम । त्यांसी मी करीं नित्य निष्काम । निजभक्तांसी निजधाम । मी पुरुषोत्तम पाववीं ॥ ९६ ॥ यालागीं गोपींची कामासक्ती । म्यांचि आणूनि निष्कामस्थिती । त्यांसी दिधली सा‌उज्यमुक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ९७ ॥ म्यां गोपिकांसी कामू केला । कीं निःशेष कामू त्यांचा हरिला । न विचारितां या बोला । कृष्ण व्यभिचारला मूर्ख म्हणती ॥ ९८ ॥ सलोकता आवडे भक्तांसी । तैं मी करीं वैकुंठवासी । भक्त मागे समीपतेसी । करीं मी तयासी जिवलग ॥ ९९ ॥ हितगुज अळोंच्यासी । हृदयींचें गोड सांगावयासी । उद्धवा तूं जैसा आवडसी । ऐशीच त्यांसीं करीं प्रीति ॥ ३०० ॥ भक्त मागे सरूपता । त्यासी मी दें चतुर्भुजता । शंखचक्रादि सायुधता । घनश्यामता सुरेख ॥ १ ॥ मुकुट कुंडलें मेखळा । कांसे मिरवे सोनसळा । वांकी तोडरू चरणकमळा । कौस्तुभ गळां मत्सम ॥ २ ॥ ठाणमाण गुणलक्षण । वीर्य शौर्य गांभीर्य पूर्ण । रूप रेखा समसमान । दोघेही अनन्य सरूपता ॥ ३ ॥ रमा दोघांसी एकत्र देखे । देवो कोण हें ते नोळखे । पार्षदक्रिया ठकलीं ठाके । कोणासी सेवकें सेवावें ॥ ४ ॥ छत्रधरू चवके चित्तीं । कोणावरी धरूं छत्री । चवरधरें चवरें हातीं । कोणाप्रती विंजावें ॥ ५ ॥ नमना येती ब्रह्मादि देव । तेही मानिती अति‌अपूर्व । दोंमाजीं कोण आदिदेव । त्यांसीही स्वयमेव कळेना ॥ ६ ॥ जेवीं दीपें दीपू लाविला । न कळे वडील कोण धाकुला । तेवीं माझी सरूपता पावला । न वचे ओळखिला आनासी ॥ ७ ॥ जेवीं आरिशाचें प्रतिबिंब । दिसे समरूपें स्वयंभ । तैशी सरूपतेची शोभ । सम विडंब दोहींचा ॥ ८ ॥ देवो हो‌ऊनियां प्रसन्न । आपली सरूपता दे संपूर्ण । नेदी हृदयींचा द्विजचरण । श्रीवत्सलांछन अविनाशी ॥ ९ ॥ श्रीवत्स चिन्ह द्यावयासी पाहीं । विष्णु म्हणे मज सामर्थ्य नाहीं । तें असे ब्राह्मणाच्या पायीं । त्याचा चरण हृदयीं धरिल्या लाभे ॥ ३१० ॥ सरूपतेमाजीं जाण । देवा-भक्तांची हे खूण । ज्याचे हृदयीं श्रीवत्सलांछन । तो स्वामी श्रीविष्णु जाण सर्वांचा ॥ ११ ॥ ऐशी सरूपता जरी झाली प्राप्त । तरी हा देवो मी एक भक्त । हा भिन्नत्वाचा भेद किंत । त्या‌आंत उरला असे ॥ १२ ॥ देवभक्तांमाजीं भेदू । भिन्न सरूपतासंवादू । जंव नाहीं अद्वयबोधू । तंव परमानंदू प्रकटेना ॥ १३ ॥ सांडूनि भिन भेदवार्ता । भक्त मागे सायुज्यता । ते गोड निरूपणकथा । तेथील स्वादता मी जाणें ॥ १४ ॥ सायुज्याचें गोडपण । माझें मी जाणें आपण । उद्धवा तुज तेंही जाण । साङ्ग संपूर्ण सांगेन ॥ १५ ॥ देह सरूपता सारिखेपण । हृदयीं भिन्न मीतूंपण । ऐशियेही मुक्तीसी जाण । भक्त सज्ञान नातळती ॥ १६ ॥ मी हो‌ऊनियां मातें । भजन स्वतःसिद्ध आ‌इतें । तें सांडूनियां भेदातें । निजभक्त चित्तें नातळती ॥ १७ ॥ देवेंसी भक्त अनादिसिद्ध । ठायीं मूळींहून अभेद । तेथ दाटूनि जो धरी भेद । तो भक्तिमंद मायिक ॥ १८ ॥ आर्त जिज्ञासु आणि अर्थार्थी । हे भेद केले मायिका भक्ति । जे अभेदभावें मज भजती । सायुज्यमुक्ती तयांसी ॥ १९ ॥ ज्यांसी रावो रंक समान । वंद्य निंद्य न मनी मन । जे न धरिती देहाभिमान । सायुज्य जाण तयांसी ॥ ३२० ॥ जैशी आपुली सा‌उली । मिथ्या आपणासवें लागली । तैशी देहबुद्धि ज्यांसी झाली । त्यांसी फावली सायुज्यता ॥ २१ ॥ जन्मूनि छाया सरिसी वाढे । माझी हे ममता नुठी पुढें । ऐसे देहाचें न बाधी सांकडें । सायुज्य रोकडें तयासी ॥ २२ ॥ सांडूनि देहाची विषयासक्ती । जो करी भावें अभेदभक्ती । त्यासीचि सायुज्यमुक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ २३ ॥ ज्यासी देहीं नुठी मीपण । भूतमात्रीं न देखे तूंपण । त्यासी सायुज्यमुक्ति जाण । साङ्ग संपूर्ण सांपडे ॥ २४ ॥ जेवढी मज आत्म्याची व्यक्ती । तेवढीच त्याची प्रतीती । त्यासीच सायुज्यता मुक्ती । सहज आपैती उद्धवा ॥ २५ ॥ त्यासी विष्णुस्वरूप व्हावा देहो । हा सर्वथा नुपजे अहंभावो । त्यासी विष्णुसगट स्वदेह वावो । यालागीं सारूप्य पहा हो वांछीना ॥ २६ ॥ निजविवेकें पाहतां ठायीं । देहो तितुका मिथ्या पाहीं । तेथ सारूप्यता कोणें ठायीं । सज्ञानीं कायी मागावी ॥ २७ ॥ सायुज्यता आलिया हाता । वस्तूवीण ठावो नाहीं रिता । सकळ भूतीं एकात्मता । सायुज्य तत्त्वतां या नांव ॥ २८ ॥ सकळ रूपें नांदतें जग । तें जो जाणे आपुलें अंग । आपण सर्वात्मा अभंग । त्यासीच साङ्ग सायुज्य ॥ २९ ॥ मी एक सबाह्याभ्यंतरीं । मी एक जंगमीं स्थावरीं । मीचि आत्मा चराचरीं । जाण त्याचे घरीं सायुज्य नांदे ॥ ३३० ॥ मीचि एक एकला । एकपणेंचि संचला । ज्यासी द्वैताचा दुष्काळ पडिला । सत्य पावला सायुज्य ॥ ३१ ॥ एवं भावार्थाच्या अतिप्रीतीं । जें जें निजभक्त वांछिती । तें तें मे पुरवीं श्रीपती । चारी मुक्ती भक्तांसी ॥ ३२ ॥ यावेगळे माझे प्रिय भक्त । भक्तिप्रतापें प्रतापवंत । भजनशौर्य अति‌अद्‌भुत । निष्काम निरत मद्‌भजनीं ॥ ३३ ॥ आर्त जिज्ञासु अर्थार्थी । या कल्पना न धरोनि हातीं । नित्य निष्काम अतिप्रीतीं । मज भजती महाभाग ॥ ३४ ॥ नेघती सालोक्य सामीप्य सरूपता । शेखीं न मागती सायुज्यता । निष्काम भजतीं भगवंता । भक्ती तत्त्वतां या नांव ॥ ३५ ॥ नवल भजनाची परवडी । आवडीतें प्रसवे आवडी । क्षणोक्षण चढोवढी । नित्य नूतन गोडी प्रेमाची ॥ ३६ ॥ माझिया आवडीं तत्त्वतां । सर्वस्वें वेंचित जीविता । कदा पालट नव्हे चित्ता । भावार्थतां विश्वासी ॥ ३७ ॥ मीच एक देवाधिदेवो । सर्वभूतीं माझाचि भावो । विकल्प विकृति संदेहो । घालितां पहा हो उपजेना ॥ ३८ ॥ नवल भावार्थाची थोरी । मद्‌भावें देखे नरनारी । श्वानसूकरादि आकारीं । नमस्कारी मद्‌भावें ॥ ३९ ॥ नवल त्याची भजनख्याती । सायुज्याचि चारी मुक्ती । माझ्या नांवावरूनि ओंवाळिती । भक्ती पढियंती येणें पाडें ॥ ३४० ॥ मांडल्या अतिविघ्न सांकडें । ग्लानी न करिती आणिकांकडे । जाणती रामनामापुढें । विघ्न बापुडें ते कायी ॥ ४१ ॥ गगन पडों पाहे कडाडें । पृथ्वी उलथावया गडबडे । ऐसें मांडलिया सांकडे । नाम पढे श्रीहरीचें ॥ ४२ ॥ ऐशी देखोनि अनन्य प्रीती। मी सर्वस्वें भुललों श्रीपती । मग न पाहतां कुळ जाती । त्याच्या घराप्रती मी धांवें ॥ ४३ ॥ ते न घेती वैकुंठींची वाट । त्यांचें घरचि मी करीं वैकुंठ । तेथें चिन्मात्रें फुटे पाहांट । पिके पेंठ संतांची ॥ ४४ ॥ उपनिषदें येती तयांपाशीं । स्वधर्म ये सुखवस्तीसी । नारदादि सनकादिकांसी । तया घरासी अतिप्रीती ॥ ४५ ॥ गर्जती नामाचे पवाडे । माझी कीर्ति गाती वाडेंकोडें । माझ्या रामनामापुढें । द्वंद्वाचें उडे बाधकत्व ॥ ४६ ॥ ऐशी देखोनि माझी भक्ती । वोरसोनियां निजशांती । धांवोनि ये तयांप्रती । वोळली मागुती जावों विसरे ॥ ४७ ॥ त्यांसी छळों ये जें जें दूषण । तें तें त्यांसी होय भूषण । माझे भक्तीचें प्रसन्नपण । जाण संपूर्ण या नांव ॥ ४८ ॥ तेथ सायुज्यादि चारी मुक्ती । त्यांचे सेवेसी स्वयें येती । ते जेथ विषय सेवूं जाती । तेथ सायुज्यमुक्ती सेवा करी ॥ ४९ ॥ ऋद्धिसिद्धि त्याच्या घरीं । हो‌ऊनि राहती कामारी । तरी तो सिद्धींची चाड न धरी । माझे भक्तीवरी निश्चयो ॥ ३५० ॥ ऐशी देखोनि निश्चयें भक्ती । मीही करीं अनन्य प्रीती । भक्त जे‌उती वास पाहती । ते‌उता मी श्रीपती स्वयें प्रकटें ॥ ५१ ॥ भक्त स्वभावें बोलों जाये । त्याचें बोलणें मीचि होयें । त्याचे बोलण्या सबाह्यें । मीचि राहें शब्दार्थें ॥ ५२ ॥ तो कौतुकें खेळे खडे । ते खडेचि मज होणें घडे । तो कृपाळु पाहे जयाकडे । त्याचे छेदीं मी गाढे भवबंध ॥ ५३ ॥ तो वास पाहे जेणें मोहरी । ते‌उती मी सुखाची सृष्टी करीं । तो म्हणे जयातें उद्धरीं । तो मी स्वपदावरी बैसवीं ॥ ५४ ॥ त्यासी अल्पही विचंबू पावे । तो सर्वांगें मी करूं धांवें । त्याचें नाम जिंहीं स्मरावें । त्यांसी म्यां तारावें सर्वथा ॥ ५५ ॥ जेवीं तान्हयालागीं माता । तेवीं भक्तांची मज चिंता । त्यांची सेवाही करितां । मी सवर्था लाजेंना ॥ ५६ ॥ माता बाळकाचें पुरवी कोड । तैसे ते माझे लळेवाड । त्यांचें प्रेमचि मज गोड । उपचारचाड मज नाहीं ॥ ५७ ॥ मी शरीर तो माझा आत्मा । प्रेमळ असे पढिया आम्हां । प्रेमळावरती सीमा । भक्तीचा महिमा चढेना ॥५८ ॥ त्यासी झणें काळ संहारी । यालागीं त्या आंतबाहेरी । मी निजांगाचें दुर्ग करीं । ऐशी प्रीति पुरी प्रेमळाची ॥ ५९ ॥ तेथ काळाचेनि हटतटें । लावूनि ब्रह्मस्थितीचे वाटे । माझे भक्त नेटेंपाटें । आपणिया आंतवटें स्वसुखें वसवीं ॥ ३६० ॥ त्याचें स्वाभाविक कर्म जाण । तें माझे प्रीतींचे पूजन । तो देखे तें माझें दर्शन । त्याची चावटी तें स्तवन खुणेचें माझें ॥ ६१ ॥ तो स्वयें करी आरोगण । तेंचि मज नैवेद्य‌अर्पण । त्याची निद्रा ते जाण । समाधि संपूर्ण पैं माझी ॥ ६२ ॥ त्याचा निमेषोन्मेषांचा व्यापार । तो मज अत्यंत प्रियकर । त्याचे श्वासाचे परिवार । मज अपार सुखविती ॥ ६३ ॥ भक्तांची शरीरस्वभावस्थिती । तेणें मी सुखावें श्रीपती । ऐसे सप्रेम भक्त आवडती । माझी अनन्यप्रीती मद्‌भक्तां ॥ ६४ ॥ चारी पुरुषार्थां नातळती । उपेक्षूनि चारी मुक्ती । सप्रेम करिती माझी भक्ती । मजचि पावती मद्‌भक्त ॥ ६५ ॥ गंगा सागरीं मीनली मिळे । मीनली त्याचीच त्यावरी लोळे । तैसा भक्त मिळोनि भावबळें । माझे भक्तीचे सोहळे मजमाजीं भोगी ॥ ६६ ॥ जेवीं कां भरें तरुणांगी । तरुणपण भोगी सर्वांगीं । तेवीं भक्त मिळोनि मजलागीं । माझे भक्तीचें भोगी वैभव ॥ ६७ ॥ कां सतरावीचें गोडपण । चंद्र जाणे आपुलें आपण । तेवीं मी हो‌ऊनि माझें भजन । भक्त सज्ञान जाणती ॥ ६८ ॥ जातिस्वभावें उदक एक । तेंचि गंगा यमुना नांवीं देख । प्रयागसंगमीं उद्धरी लोक । तेवीं भक्त भाविक मद्योगें ॥ ६९ ॥ तेवीं माझे भक्त मज मिळून । अनन्य करिती माझे भजन । येथ भाविक सात्त्विक अतिदीन । उद्धरती जाण मद्योगें ॥ ३७० ॥ पृथ्वी निधानें भरली आहे । परी पायाळेंवीण प्राप्ती नोहे । तेवीं आत्मा स्वतः सिद्ध आहे । गुरुकृपा लाहे तैं प्राप्ती ॥ ७१ ॥ चहूं पुरुषार्थातें त्यागिती । चारी मुक्ति उपेक्षिती । पंचम पुरुषार्थाची भक्ती । मज पढियंती उद्धवा ॥ ७२ ॥ येचि भक्तीचें मज कोड । हेचि भक्त माझे लळेवाड । मज अवाप्तकामा त्यांची चाड । ऐसें प्रेम गोड तयांचें ॥ ७३ ॥ आम्ही प्रेमाचे पाहुणे । भावार्थाचे आंदणे । म्यां अनन्याची सेवा करणें । जीवेंप्राणें सर्वस्वे ॥ ७४ ॥ माझें नाम आत्माराम । मी अवाप्तसकळकाम । परी प्रेमळांलागीं सकाम । ऐसें गोड प्रेम तयांचें ॥ ७५ ॥ मग आपुलिये संवसाटीं । प्रेमळू घें मी उठा‌उठी । वरीव सुखही दें शेवटीं । मज प्रीति मोटी प्रेमाची ॥ ७६ ॥ प्रेम मजसीं मोलें अधिक । संवसाटी करितां नव्हे देख । यालागीं वरीव देतां सुख । न ये तैं सेवक सेलेचा होय ॥ ७७ ॥ प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण । भावार्थाची उणखूण । जाणता मी एक श्रीकृष्ण । इतरांसी जाण कळेना ॥ ७८ ॥ मज गोपिकांची कोण गोडी । त्यांच्या प्रेमाची जाति चोखडी । यालागीं मज त्यांची आवडी । अतिगाढी उद्धवा ॥ ७९ ॥ कुब्जा काय सुंदर होती । तिच्या प्रेमाची मज प्रीती । राधा प्रार्थीं मी वनाप्रती । काय विषयासक्तीलागूनी ॥ ३८० ॥ कोण भक्ती केली गोपाळीं । काय तीं सोंवळीं कीं ओंवळीं । त्यांचे उच्छिष्ट कवळ मी गिळीं । प्रेमसंमेळीं डुल्लत ॥ ८१ ॥ पांडवांच्या बाचें मी काय लागें । त्यांचीं वेवटें सोशीं अनेगें । मी सुदाम्याच्या पायां लागें । काय त्याचेनि पांगें पांगलों ॥ ८२ ॥ मी काय अन्नासी दुकाळलों । तो यज्ञपत्न्यां सीं मागों गेलों । मी भावार्थाचा भुकेलों । प्रेमाच्या पावलों पाहुणेरा ॥ ८३ ॥ माझी काय क्षीण झाली शक्ती । मज गोपिका दावीं बांधिती । त्यांच्या निजप्रेमाची जाती । मी स्वयें श्रीपती पोखितू ॥ ८४ ॥ मी न लागतां कोणाची कवडी । अर्जुनाचीं धूतसे घोडीं । धर्माघरीं उच्छिष्टें काढीं । मज अति‌आवडी प्रेमाची ॥ ८५ ॥ मज प्रेमळांची अति‌आवडी । ते लोकेषणालाज दवडी । महत्त्वाच्या विसरवी कोडी । त्यांचा सेवेची जोडी मजलागीं ॥ ८६ ॥ सकळ अळंकार ले‌ऊनि माता । निजपुत्र मस्तकीं लाडवितां । त्याच्या कंटाळेना थुंकमुता । तेवीं प्रेमळें सर्वथा मजलागीं ॥ ८७ ॥ ऐसा प्रेमाचेनि अतिपांगें । म्यां पंगिस्त हो‌इजे श्रीरंगें । यालागीं तया पुढेंमागें । सदा सर्वांगें तिष्ठत ॥ ८८ ॥ उद्धवा यादवा समस्त । असतां माझें बहुत गोत । तूंचि प्रियकर मज जो येथ । माझें प्रेम अद्‌भुत तुजलागीं ॥ ८९ ॥ हे ऐकोनि देवाची गोठी । उद्धवें पायीं घातली मिठी । देवो सुखावोनि पोटीं । उठा‌उठी आलिंगी ॥ ३९० ॥ हृदयीं हृदय जाले संलग्न । देहीं देहा पडिलें आलिंगन । मनेंसीं एक झालें मन । स्वानंद पूर्ण वोसंडे ॥ ९१ ॥ देवो विसरला देवपण । भक्ता नाठवे भक्तगण । दोघांचें उडालें दोनीपण । स्वानंदीं पूर्ण बुडाले ॥ ९२ ॥ सेव्यसेवकता ठेली गोठी । द्वैतभावाची खुंटली दृष्टी । भक्तिसाम्राज्याच्या पाटीं । दोघां झाली भेटी निजात्मता ॥ ९३ ॥ स्थूळ लिंग आणि कारण । इंहीं उपलक्षिजे माहाकारण । ते देहचतुष्टयाची आठवण । आठवितें कोण ते ठायीं ॥ ९४ ॥ तेथ निबिड आणि निघोट । सुखस्वरूप घनदाट । नाहीं आदि मध्य शेवट । तें झालें प्रकट स्वयंभ ॥ ९५ ॥ नवल देवाचें पूर्णपण । तेथही लाघव केलें जाण । मोडों नेदीचि उद्धवपण । ऐसा भक्त आन मज मिळेना ॥ ९६ ॥ उद्धवा‌ऐसा मजपाशीं । कोण मिळेल अळोंचासी । माझे निजगोड कोणापाशीं । म्यां सावकाशीं सांगावें ॥ ९७ ॥ मज निजधामा गेलिया जाण । माझें जें निःसीम निजज्ञान । त्यासी उद्धव शुद्ध सांठवण । यालागीं उद्धवपण राखिलें ॥ ९८ ॥ उद्धव स्वानंदी निमग्न । त्यासी थापटूनि आपण । सावध करी श्रीकृष्ण । येरा भक्तपण आठवलें ॥ ९९ ॥ म्हणे जय जय श्रीकृष्णनाथा । जें मज सुख दाविलें आतां । तें नित्य निर्वाहे सर्वथा । ऐशी कृपा तत्त्वतां करावी ॥ ४०० ॥ तंव श्रीकृष्ण म्हणे उद्धवा । हा माझा निजगुह्य गोप्य ठेवा । तुज म्यां सांगीतला कणवा । पुरुषार्थ पांचवा या नांव ॥ १ ॥ हें वेदशास्त्रां अगम्य । सकळ देवांसी अतिदुर्गम । जेणें लुब्धें मी पुरुषोत्तम । तें हें भक्त प्रेमरहस्य ॥ २ ॥ मज वश्य करावयाचें वर्म । पोटीं धरावें भक्तिप्रेम । चहूं मुक्तींचा पडे भ्रम । पुरुषार्थकाम वोसरे ॥ ३ ॥ ज्यासी माझी सप्रेम भक्ती । त्याचेनि नांवें विघ्नें पळती । मजवेगळी अन्यथा गती । करावया प्राप्ती कोणाची ॥ ४ ॥ जयासी माझी अनन्य भक्ती । तेथ माझी पूर्ण कृपास्थिती । मद्‌भक्तां मजवेगळी गती । कदा कल्पांतीं असेना ॥ ५ ॥ वेदविधीं करावा बाधू । तो निःश्वसित माझा वेदू । जेथ माझा पूर्ण कृपाबोधू । तेथ विधिवादू बाधीना ॥ ६ ॥ जे कां माझे भक्त सकाम । ते फळभोगांतीं हो‌ऊनि निष्काम । तेही ठाकिती माझें निजधाम । भक्तां अन्यगमन असेना ॥ ७ ॥ ज्यासी माझें अनन्य भजन । स्वकर्म त्याचे सेवी चरण । विधिवेदू वोळंगे अंगण । त्यासी अन्यथागमन असेना ॥ ८ ॥ जेथ सप्रेम नाहीं माझी भक्ती । तेथ कर्में अवश्य बाधती । कर्मास्तव अन्यथागती । अभक्त पावती उद्धवा ॥ ९ ॥ जेथ माझी साचार भक्ती । तेथ कर्माची न चले गती । मद्‌भक्तां माझी प्राप्ती । सत्य निश्चितीं या हेतू ॥ ४१० ॥ भक्तांसी सर्वांभूतीं मद्‌भावो । तेथ कर्मबंधा कैंचा ठावो । कर्मानुगती खुंटली पहा हो । मत्प्राप्ति स्वयमेवो मद्‌भक्तां ॥ ११ ॥ भक्त पा‌ऊल ठेवी अवनीं । परी म्यां ठेविलें न धरी मनीं । कर्ता भगवंत सत्य मानी । यालागीं कर्मबंधनीं बांधवेना ॥ १२ ॥ भक्तांस नाहीं अन्यथा गती । मद्‌भक्तां माझी अनन्य प्रीती । त्या भक्तभावार्थाच्या युक्ती । विशद श्रीपती स्वयें केल्या ॥ १३ ॥ ‘न मे भक्तः प्रणश्यति’ । हें बोलिला अर्जुनाप्रती । तें साचार बिरुद श्रीपती । तो भक्तां अन्यगती घडोंचि नेदी ॥ १४ ॥ भक्तशापाची ऐकतां गोठी । देवो कैवारें सवेग उठी । सुदर्शन लावूनि पाठी । केला हिंपुटी दुर्वासा ॥ १५ ॥ एका अंबरीषाकारणें । दहा गर्भवास सोशिले जेणें । तो अनन्य भक्तांसी उणें । कोण्याही गुणें येवों नेदी ॥ १६ ॥ भक्तकैवारी श्रीकृष्ण । हे भावार्थाची निजखूण । एका जनार्दना शरण । भावो प्रमाण भक्तीसी ॥ १७ ॥ शुद्धभावेंवीण जे भक्ती । तेचि दांभिक जाण निश्चितीं । ते अपक्वचि राहे प्राप्ती । जेवीं कांकड जाती मुगांची ॥ १८ ॥ ‘भक्तियोगस्य मद्‌गतिः’ । हे मूळपदींची पदस्थिती । तेंचि वाढविलें किती । ऐसें श्रोतीं न म्हणावें ॥ १९ ॥ ‘मद्‌गती’ या पदाची व्युत्पत्ती । कोण आहे जाणे किती । हें रहस्य जाणे विरळा क्षितीं । यालागीं क्षमा श्रोतीं करावी ॥ ४२० ॥ हो कां भक्ती माझी निजजननी । ज्यां प्रेमपान्हां ये वाढवूनी । सरता केलों भगवद्‌भजनीं । ते म्यां गौण महिमेनीं वानिली ॥ २१ ॥ भगवद्‌भक्तीचें महिमान । मी केवीं जाणें अज्ञान । जें बोलिलों तें सर्वथा गौण । क्षमा पूर्ण करावी ॥ २२ ॥ भक्ति माझी निजमा‌उली । ते मी आपुल्या बोबडे बोलीं । ग्रंथाधारें गौरविली । सप्रेम भुली भुलोनी ॥ २३ ॥ प्रेमाची निजजाति कैशी । आठवों नेदी आठवणेसी । एवं विसरवूनि हेतूसी । भक्तिरहस्यासी बोलविलें ॥ २४ ॥ जेवीं कां निजबाळकातें । मा‌उली बोल बोलवी त्यातें । तेवीं भक्तीनें मज केलें येथें । म्यां चुकी कोणातें ठेवावी ॥ २५ ॥ मा‌उलीचें लोभाळूपण । प्रकट करी तो मूर्ख जाण । याहीपरी मी अज्ञान । चुकलेपण दिसताहे ॥ २६ ॥ उडिदीं काळें जेथींच्या तेथें । तेवीं चुकलेपण माझें येथें । चुकीचि मानावी निश्चितें । हेंही गुरुनाथें वारिलें ॥ २७ ॥ चुकलेपणचि मानितां । मी हों पाहें कवि कर्ता । मीपण नावडे गुरुनाथा । तेणें तें तत्त्वतां सांडविलें ॥ २८ ॥ साङ्ग झालिया कथाकथन । तेणें श्लाघें न घ्यावें मीपण । तंव गुरूंनीं दावूनि निजखूण । मीतूंपण उडविलें ॥ २९ ॥ हेही बोल बोलता । मी नव्हें नव्हें गा सर्वथा । मी नव्हें कवि कर्ता । हें गुरूंचे तत्त्वतां गुरु जाणे ॥ ४३० ॥ तंव श्रोते म्हणती चमत्कार । भक्तिसुखाचें सुखसार । भक्तिपरमामृतसागर । उघड साचार तुवां केला ॥ ३१ ॥ भागवत मुख्य भक्तिप्रधान । जें भक्तीचें सुख सनातन । तें करतळामळ करूनि जाण । तुवां परिपूर्ण दाविलें ॥ ३२ ॥ तुवां हा थोर केला उपकार । तरावया स्त्रियादि शूद्र । जग व्हावया भजनतत्पर । भागवत निजसार काढिलें ॥ ३३ ॥ भागवतींचें गुप्त पीयूख । तें त्वां प्रकटिलें भक्तिसुख । तेणें संत सुखावले देख । श्रोते सकळिक निवाले ॥ ३४ ॥ तुज संतोषोनि श्रीपती । दीधली आपली निजभक्ती । यालागीं तुवां भक्तीची कीर्ती । यथार्थस्थितीं वर्णिली ॥ ३५ ॥ तुझे भक्त्तीचा एकेक बोल । ब्रह्मसुखेंसीं सखोल । त्याहीमाजीं प्रेमाची वोल । येताति डोल चित्सुखें ॥ ३६ ॥ तुज वाखाणितां निजभक्ती । प्रेमें वोसंडे चित्तवृत्ती । विसरोनियां ग्रंथस्फूर्ती । भक्तीची कीर्ती वानिशी ॥ ३७ ॥ निजा‌आवडी वाडेंकोडें । वानितां भक्तीचे पवाडे । तुज नाठवे मागेंपुढें । प्रेम गाढें जाणवलें ॥ ३८ ॥ जंव जंव भक्तीचें निरूपण । अधिकाधिक वाढतां जाण । तंव तंव येतसे स्फुरण । तेथ कोण पुरे म्हणेल ॥ ३९ ॥ जंव जंव निरूपणा वाढी । तंव तंव भक्तीची अधिक गोडी । तेणें श्रोत्यांचीही आवडी । चढोवढी वाढली ॥ ४४० ॥ करितां भक्तिसुखनिरूपण । श्रोते वक्ते लांचावले जाण । होतां अमृतांचे आरोगण । पुरे कोण म्हणों शके ॥ ४१ ॥ यापरी गा अतिप्रीतीं । वाढली निरूपणीं भक्ती । ते आवरूनियां स्फूर्ती । पुढील ग्रंथार्थीं प्रवर्तें ॥ ४२ ॥ हें ऐकोनि संतवचन । केलें साष्टांग नमन । भली दीधली आठवण । येरवीं निरूपण नावरतें ॥ ४३ ॥ ‘भक्तियोगस्य मद्‌गतिः’ । ये पदाची पदव्युत्पत्ती । निरूपिली भगद्‌भक्ती । जेणें भगवत्प्राप्ती अतिसुलभ ॥ ४४ ॥ हे न करितां भगवद्‌भक्ती । त्रिगुणगुणीं जीवपंक्ती । बांधिल्या संसारीं उन्मज्जती । तेही स्थिती हरि सांगे ॥ ४५ ॥ मया कालात्मना धात्रा कर्मयुक्तं इदं जगत्‌ । गुणप्रवाह एतस्मिन्‌ उन्मज्जति निमज्जति ॥ १५ ॥ मुख्य मूळीं मी जगाचा धरिता । स्त्रष्टृमीचि स्त्रजिता । विष्णुरूपें मी प्रतिपाळिता । मीचि संहर्ता रुद्ररूपें ॥ ४६ ॥ हे त्रिगुण काळाची काळसत्ता । तो मी निजकाळ तत्त्वतां । स्त्रजिता पाळिता संहर्ता । गुणावस्थाविभागें ॥ ४७ ॥ जनांचें वासनाकर्म विचित्र । तेचि काळसत्ता निजसूत्र । तेणें रचिला संसार । चराचर गुणबद्ध ॥ ४८ ॥ गुणकर्में स्वर्गा चढे । गुणकर्में नरकीं पडे । नाना योनींचें सांकडें । भोगणें घडे गुणकर्में ॥ ४९ ॥ स्वर्ग भोगूनि वाडेंकोडें । महर्जनतपोलोकांपुढें । सत्यलोकवरी वरता चढे । उन्मज्जन घडे या नांव ॥ ४५० ॥ पशुपक्षिस्थावरांत । वृक्षपाषाणकृमित्व प्राप्त । महानरकीं अधःपात । निमज्जन एथ त्या नांव ॥ ५१ ॥ उंचीं चढोनि नीचीं पडणे । भोगवी नाना जन्ममरणें । तें प्रकृतिपुरुषांचें साजणें । जीवबंधनें भागवी ॥ ५२ ॥ अणुर्बृहत्‌ कृशः शूलो यो यो भावः प्रसिध्यति । सर्वोऽपि उभयसंयुक्तः प्रकृत्या पुरुषेण च ॥ १६ ॥ अणु म्हणिजे अतिसूक्ष्म सान । बृहत्‌ म्हणिजे विशाळ जाण । कृश म्हणिजे किरकोळपण । स्थूळ तें पूर्ण जडावयवीं ॥ ५३ ॥ जें जें दृष्टिगोचर झालें । जें जें नांवरूपा आलें । तें तें उभययोगें केलें । जाण घडलें प्रकृतिपुरुषीं ॥ ५४ ॥ जें उभययोगसंभव । जग ऐसें ज्याचें नांव । तें प्रकृतिपुरुष सावेव । तिसरा भाव असेना ॥ ५५ ॥ या दोहींवेगळें निरवयव । जेथूनि या दोहींचा उद्‌भव । तेचि सद्वस्तु सर्वीं सर्व । देवाधिदेव सांगत ॥ ५६ ॥ यस्तु यस्यादिरन्तश्च स वै मध्यं च तस्य सन्‌ । विकारो व्यवहारार्थो यथा तैजसपार्थिवाः ॥ १७ ॥ प्रकृतिपुरुषेंसीं साकार । जें दिसताहे चराचर । त्यासी आद्यंतें जें अनश्वर । तेंचि साचार मध्येंही ॥ ५७ ॥ लेण्या‌आधीं कनक एक । लेण्या‌अंतीं तेंचि आवश्यक । मध्येंही लेणेंरूपें देख । भासे कनक अद्वितीय ॥ ५८ ॥ न करितां मातीचें गोकुळ । पूर्वी मृत्तिकाचि केवळ । गोकुळ मोडल्या सकळ । उरे अविकळ मृत्तिका ॥ ५९ ॥ तेचि गोकुळरूपें असतां । भासे मृत्तिकाचि तत्त्वतां । तेंवी आदिमध्य‌अवसानतां । भासे चित्सत्ता अनश्वर ॥ ४६० ॥ त्रिगुणगुणें सविकार । जें जग दिसताहे साकार । तें मायिक गा चराचर । जेवीं व्यवहार स्वप्नींचा ॥ ६१ ॥ सकळ विकारांचें कारण । अंगें अविद्या आपण । ते विकारीं सत्यता स्थापितां जाण । आलें सत्यपण अविद्येसी ॥ ६२ ॥ अविद्या आपुलेनि नांवें जाण । आपुलें नास्तिक्य सांगे आपण । हें वर्म जाणती सज्ञान । नेणोनि अज्ञान मानिती सत्य ॥ ६३ ॥ अविद्या अविद्यकत्वें मिथ्या जाण । वस्तु वस्तुत्वें सदा संपन्न । येचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ६४ ॥ यदुपादाय पूर्वस्तु भावो विकुरुतेऽपरम्‌ । आदिरन्तो यदा यस्य तत्सत्यमभिधीयते ॥ १८ ॥ प्रकृति‌अंगीकारें देख । वस्तूपासाव होती लोक । जेवीं निद्रायोगें एक । होय अनेक निजस्वप्नीं ॥ ६५ ॥ जेवीं तंतूपासाव कोटि पट । कोटि पटीं तंतु एकवट । पाहतां आदि मध्य शेवट । द्वैताचें बोट रिघेना ॥ ६६ ॥ तेवीं वस्तूपासोनियां लोक । प्रकृतिपुरुषादि सकळिक । आदि-मध्य-अवसानीं एक । द्वैतवार्ता देख असेना ॥ ६७ ॥ तंतु सत्य पट मायिक । वस्तु सत्य अविद्या लटिक । जें आदि-मध्य-अवसानीं एक । तें सत्य निष्टंक उद्धवा ॥ ६८ ॥ जेवीं कां काष्ठाची बाहुली । काष्ठावयवें शोभे आली । तेवीं वस्तु वस्तुत्वें एकली । शोभा पावली जगत्वें ॥ ६९ ॥ जेवीं कां एकलें देह देख । दिसे अवयवरूपीं अनेक । तेवीं वस्तु एकली एक । आभासे अनेकस्वरूपीं ॥ ४७० ॥ जेवीं कां जळीं क्रीडतां जळा । उपजवी तरंगांच्या माळा । तेवीं वस्तूचिया स्वलीळा । जगदादि मेळा प्रकाशे ॥ ७१ ॥ तरंगा आदि-मध्य-अवसानीं । जेवीं पाणीपणें असे पाणी । तेवीं उत्पत्ति स्थिति-निदानीं । वस्तु वस्तूपणीं अनश्वर ॥ ७२ ॥ ब्रह्म सत्य प्रपंच वावो । हा साधकां साधावया निर्वाहो । कार्यकारण‌अभिन्नभावो । देवाधिदेवो बोलिला ॥ ७३ ॥ कार्य कारणीं अभिन्न । तैं ब्रह्मीं माया कैंची भिन्न । जगद्‌रूपें ब्रह्म परिपूर्ण अन्योपदेशें जाण दाविलें ॥ ७४ ॥ ब्रह्म माया काळगती । यें तिन्हीं अनादि म्हणती । तेही न घडे उपपत्ती । येचि अर्थीं हरि बोले ॥ ७५ ॥ प्रकृतिर्ह्यस्य उपादानं आधारः पुरुषः परः । सतोऽभिव्यञ्जकः कालो ब्रह्म तत्‌ त्रितयं त्वहम्‌ ॥ १९ ॥ ब्रह्मावेगळी माया । सर्वथा न ये आया । ते ब्रह्माधारें वाढोनियां । गुणकार्या वाढवी ॥ ७६ ॥ मायानियंतें ब्रह्म आपण । यालागीं यासी पुरुषपण । पुरुषाची प्रिया माया पूर्ण । प्रकृति अभिधान या हेतू ॥ ७७ ॥ ब्रह्माहून पुरुष भिन्न । हें सर्वथा मिथ्या वचन । ब्रह्म पुरुष नामाभिधान । एकासीचि जाण आलें असे ॥ ७८ ॥ माया प्रकृति अभिधान । दोहीं नांवीं मायाचि पूर्ण । आविद्यक दावी कार्य भिन्न । अविद्या जाण या हेतू ॥ ७९ ॥ माया ब्रह्मींची शक्ति जाण । तेही ब्रह्मेंसीं असे अभिन्न । वेगळी नव्हे अर्धक्षण । सदा सुलीन ब्रह्मेंसीं ॥ ४८० ॥ जेवीं शूरांची शौर्यशक्ति पूर्ण । शूरांहोनि नव्हे भिन्न । तेवीं ब्रह्मीं मायाशक्ति जाण । असे सुलीन सर्वदा ॥ ८१ ॥ माया ब्रह्मीं असतां जाण । क्षोभेंवीण नव्हे सर्जन । मायाक्षोभकू काळ पूर्ण । काळास्तव जन जन्मती ॥ ८२ ॥ ब्रह्मींची सत्ता तो काळ जाण । प्रकृति क्षोभवूनि आपण । दावी उत्पत्ति स्थिति निदान । तो काळही अभिन्न ब्रह्मेंसीं ॥ ८३ ॥ जेवीं रायाच्या राजपुत्रासी । राजाचि दमूं शके त्यासी । तेवीं झालें जें प्रकृतीचे कुशीं । तें निजसत्तेसी निर्दळी ॥ ८४ ॥ विवेकदृष्टीं पाहतां जाण । काळ परमात्मा दोन्ही अभिन्न । प्रकृति पुरुष काळ जाण । तिहींसी एकपण या हेतू ॥ ८५ ॥ ब्रह्ममाया-काळसंबंध । हे तिनी मूळींचि अभेद । दिसे जो व्यावहारिक भेद । तोही अबद्ध मिथ्यात्वें ॥ ८६ ॥ वस्तु एकलीचि आपण । प्रकृति-पुरुष काळरूपें जाण । अखंडत्वें दावितां पूर्ण । तो मी श्रीकृष्ण परमात्मा ॥ ८७ ॥ उत्पत्तीपूर्वी मी ब्रह्म पूर्ण । उत्पत्तीचें मी ब्रह्म आदिकारण । स्थितिकाळीं मी ब्रह्मरूपें जाण । एकीं अनेकपण स्वयें दावीं ॥ ८८ ॥ स्वलीला सृष्टीचे प्रांतीं जाण । प्रळयीं उरें मी ब्रह्म परिपूर्ण । तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ८९ ॥ स्वर्गः प्रवर्तते तावत्‌ पुर्वापर्येण नित्यशः । महान्‌ गुणविसर्गार्थः स्थित्यन्तो यावदीक्षणम्‌ ॥ २० ॥ महान्‌ म्हणिजे अतिथोरू । पितृपुत्रप्रवाहें संसारू । अनवच्छित्र निरंतरू । अतिदुर्धरू वाढला ॥ ४९० ॥ अतिशयेंसीं दुर्धरू । कैसेनि वाढला संसारू । तेही अर्थींचा विचारू । शार्ङ्गधरू सांगत ॥ ९१ ॥ विषयांचिये आसक्ती । वासनानिष्ठ झाली वृत्ती । ते देहात्मता अतिप्रीतीं । संसारस्थिती वाढवी ॥ ९२ ॥ खवळला जो देहाभिमान । तो शुद्धासी लावी जीवपण । नाना योनीं जन्ममरण । विशेषें जाण वाढवी ॥ ९३ ॥ ऐसेन अतिदुर्धरू । स्त्रष्टेन सृजिला संसारू । तो ब्रह्मायूपर्यंत स्थिरू । ब्रह्मप्रळयीं संहारू सृष्टीचा ॥ ९४ ॥ एक नित्यप्रळयो लागला आहे । एक दैनंदिन प्रळयो पाहें । कर्मजन्य प्रळयो लाहे । एक तो होये अवांतर प्रळयो ॥ ९५ ॥ सकळ प्रळयांच्या शिरीं । ब्रह्मप्रळयाची थोरी । तो सकळ सृष्टीतें संहारी । कांहीं संसारीं उरों नेदी ॥ ९६ ॥ ब्रह्मप्रळयीं नाश सृष्टीसी । पुढती रचावया कल्पादीसी । उंच नीच नाना योनींसी । नव्या करावयासी कारण काय ॥ ९७ ॥ ब्रह्मप्रळयीं सृष्टीचा र्हा्सू । परी निःशेष नव्हेचि नाशू । उरे वासनाबीजविलास । सुलीन रहिवासू अविद्ये‌अंगीं ॥ ९८ ॥ तेचि बीजें कल्पादि जाण । मीचि स्त्रष्टृरूपें आपण । मज म्यां अनुग्रहूनि पूर्ण । सूक्ष्म कारण लक्षविलें ॥ ९९ ॥ जेवीं वर्षाकाळीं नाना तृणें । वाढूनि शरत्काळीं होती पूर्णें । तींच उष्ण काळीं बीजकणें । होती सुलीनें पृथ्वीसी ॥ ५०० ॥ सुलीन बीजें पूर्ण क्षितीं । परी तीं कोणा व्यक्ती न येती । तेवीं वासनाबीजें प्रळयांतीं । उरे अव्यक्तीं संसारू ॥ १ ॥ जेवीं काळीं वरुषलेनि घनें । बीजें विरुढती सत्राणें । वाढती नाना जातींचीं तृणें । पूर्वलक्षणें यथास्थित ॥ २ ॥ तेवीं उत्पत्तिकाळावरी । सूक्ष्मवासना बीजांकुरीं । नाना योनी चराचरीं । जंगमस्थावरीं जग वाढे ॥ ३ ॥ व्रह्मयाचे प्रळया‌आंतू । निःशेष होय अंतू । यालागीं संसारीं अनंतू । वेदशास्त्रार्थू प्रतिपादी ॥ ४ ॥ ऐसा संसार अनंतू । याचा निःशेष होय अंतू । तेचि अर्थीं श्रीकृष्णनाथू । श्लोकींचा पदार्थू बोलिला ॥ ५ ॥ ‘स्थित्यन्तो यावदीक्षणम्‌’ । येणें पदें श्रीकृष्ण । अत्यंत प्रळयींचें लक्षण । सूत्रप्राय जाण बोलिला ॥ ६ ॥ ‘ईक्ष्ण’ या पदाचा अर्थ जाण । सद्‌गुरुकृपादृष्टि पूर्ण । तेंचि माझें कृपावलोकन । जेणें ब्रह्मज्ञान प्रकाशे ॥ ७ ॥ पूर्ण प्रकाशल्या ब्रह्मज्ञान । संसार झाला नाहींच जाण । वस्तु वस्तुत्वें परिपूर्ण । मीतूंपण असेना ॥ ८ ॥ तेथ ध्रुवमंडळाची ठेली मात । वैकुंठकैलासा झाला प्रांत । शेषशायीचाही अंत । ब्रह्मज्ञानांत हो‌ऊं सरला ॥ ९ ॥ हारपलें मीतूंपण । उडालें देव-भक्त भजन । बुडालें साकारतेचें भान । ब्रह्म सनातन सदोदित ॥ ५१० ॥ प्रपंच एक झाला होता । हे समूळ मिथ्या वार्ता । पुढें हो‌ईल मागुता । कदा कल्पांता घडेना ॥ ११ ॥ हें अत्यंत प्रळयाचें लक्षण । भाग्येंवीण न पाविजे जाण । ज्यासी साचार सद्‌गुरुचरण । ते सभाग्य जन पावती ॥ १२ ॥ अत्यंत प्रळयींची गती । न घडे गा समस्तांप्रती । हे परम निर्वाणगती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १३ ॥ ज्याची अहंममता खुंटे । त्याची निःशेष कल्पना तुटे । अत्यंत प्रळयो त्यासीच भेटे । नेटेंपाटें निजात्मता ॥ १४ ॥ देह पडलिया प्रळयो घडे । हें बोलणे सर्वथा कुडें । जितांचि हा प्रळयो जोडे । वाडेंकोडें निजनिष्ठा ॥ १५ ॥ जितांचि हा प्रळयो जाण । येणें संसारबीजदहन । आतां ब्रह्मप्रळयलक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥ १६ ॥ ब्रह्मांडप्रळयाचा अनुक्रम । तेथ अंतीं उरे पूर्ण ब्रह्म । हें उद्धवें जाणावया वर्म । पुरुषोत्तम बोलत ॥ १७ ॥ विराण्मयाऽऽसाद्यमानो लोककल्पविकल्पकः । पञ्चत्वाय विशेषाय कल्पते भुवनैः सह ॥ २१ ॥ चतुर्दशभुवनेंसीं ब्रह्मांड । काळें कल्पिलें प्रचंड । तें स्थितिकाळीं पाळूनि अंड । अंतीं नाशाचें बंड आदरी काळू ॥ १८ ॥ तो तूं काळ म्हणशी कोण । तरी काळात्मा मीचि जाण । तेणें काळें म्यां प्रळय‌ईक्षण । केलें जाण सृष्टीसी ॥ १९ ॥ पंचभूतांचे भिन्न भाग । काळसत्ता राखिले विभाग । ते सत्ता म्यां आवरितां सांग । खवळे लगबग पंचत्वासी ॥ ५२० ॥ जैसा उत्पत्तीचा उपक्रमू । तैसाचि प्रळयाचा अनुक्रमू । भूतीं भूतलयो सुगमू । पुरुषोत्तमू सांगत ॥ २१ ॥ अन्ने प्रलीयते मर्त्यं अन्नं धानासु लीयते । धाना भूमौ प्रलीयन्ते भूमिर्गन्धे प्रलीयते ॥ २२ ॥ म्यां पाहिल्या प्रळयदृष्टीं । पडोनि ठाके अनावृष्टी । तेणें अन्न क्षीण होय सृष्टीं । अन्नापाठीं शरीर ॥ २२ ॥ येथ असे ‘अन्नमय प्राण’ । हें वचन प्रत्यक्ष प्रमाण । ते अन्न होतांचि क्षीण । अन्नासवें प्राण प्राण्यांचे जाती ॥ २३ ॥ अन्नवृद्धि खुंटल्या धान्य । बीजमात्र राहे आपण । तेंही पृथ्वीसी होय लीन । तत्काळ जाण उद्धवा ॥ २४ ॥ तंव द्वादशादित्यमेळा । एकत्र रविमंडळा । तो पीठ करी पवर्तशिळा । तेही तृणसाळा उरों नेदी ॥ २५ ॥ तेणें तापलें सप्तपाताळ । पोळलें शेषाचें कपाळ । तो वमी विषाग्निकल्लोळ । महाज्वाळ धडधडीत ॥ २६ ॥ तो संकर्षणमुखानळ । पार्थिव जाळी सकळ । ब्रह्मांड जाळोनि तत्काळ । पृथ्वी केवळ भस्म करी ॥ २७ ॥ तेव्हां पृथ्वीचें पृथ्वीपण सरें । तें गंधमात्रस्वरूपें उरे । तोही गंधू जळीं विरे । तेंचि शार्ङ्गधरें सांगिजे ॥ २८ ॥ अप्सु प्रलीयते गन्ध आपश्च स्वगुणे रसे । लीयते ज्तोतिषि रसो ज्योती रूपे प्रलीयते ॥ २३ ॥ तेव्हां प्रळयमेघांचा मेळा । शुंडादंडधारा प्रबळा । शत वरुषें वर्षतां जळा । सप्तसमुद्रमेळा एकत्र जाहला ॥ २९ ॥ तेणें जळ कोंडलें सुबद्ध । ते जळीं पृथ्वीचा विरे गंध । तेव्हां जळचि एकवद । प्रळयीं प्रसिद्ध उधवलें पैं ॥ ५३० ॥ सांवर्तक मेघांचें लक्षण । सिंधु एकत्र करिती पूर्ण । पृथ्वी विरवूनियां जाण । ते जळीं आपण विरोनि जाती ॥ ३१ ॥ ते काळीं अतिदुर्धर । सांवर्ताग्नि खवळे थोर । तो जळ शोषी सर्वत्र । उरे रसमात्र अवशेष ॥ ३२ ॥ रसमात्र जळ उरे तेंही । लीन होय तेजाचे ठायीं । तेव्हां तेजचि दिशा दाही । कोंदोनि पाहीं वोसंडे ॥ ३३ ॥ सांवर्ताग्नीची मातू । जळ शोषूनि राहे निवांतू । जाळिती शक्ति स्वयें जाळितू । या नांव निश्चितू सांवर्तकाग्नी ॥ ३४ ॥ तेणेंचि काळें झंझामारुत । उठी तेजातें शोषित । तें तेज शोषितां समस्त । उरे तेथ रूप मात्र ॥ ३५ ॥ रूपं वायौ स च स्पर्शे लीयते सोऽपि चाम्बरे । अम्बरं शब्दतन्मात्र इन्द्रियाणिं स्वयोनिषु ॥ २४ ॥ तेजाचें जें उरे रूप । तें वायु शोषूनि करी अरूप । तेव्हां वायूचि एकरूप । अति‌अमूप कोंदाटे ॥ ३६ ॥ कोंदाटल्या वायुसी । गगन जेथींचें तेथें ग्रासी । तेव्हा वायु प्रवेशे स्पर्शी । तो उरे अवशेषीं स्पर्शमात्र ॥ ३७ ॥ उरल्या वायूच्या स्पर्शासी । लयो तत्काळ होय आकाशीं । आकाश प्रवेशे शब्दासी । उरे अवशेषीं शब्दतन्मात्र ॥ ३८ ॥ दशेंद्रियांची मंडळी । राजसापासोनि जन्मली । ते निजगुणीं सामावली । जेवीं पंचांगुळी मुष्टीमाजीं ॥ ३९ ॥ योनिर्वैकारिके सौम्य लीयते मनसीश्वरे । शब्दो भूतादिमप्येति भूतादिर्महति प्रभुः ॥ २५ ॥ वैकारिक जो सत्त्वगुण । व्याला देवता अंतःकरण । प्रळयस्वभावें आपण । मनामाजीं जाण प्रवेशे ॥ ५४० ॥ सकळ इंद्रियांचा राजा मन । मनःकल्पना जीवशिवपण । श्लोकपदें ‘मनसीश्वर’ पूर्ण । मनाशींच जाण हरि बोले ॥ ४१ ॥ मनोदेवता अंतःकरण । घे‌ऊनि प्रवेशे सत्त्वगुण । ज्या कार्याचें जें कारण । तेथ तीं जाण प्रवेशती ॥ ४२ ॥ शब्दतन्मात्र उरलें आधीं । ते मीनलें तामसामधीं । कारणीं कार्यासी अवधी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥ ४३ ॥ त्रिविधगुणी अहंकारू । एकवटला महाथोरू । ऐक त्याचा बडिवारू । तोचि दुर्धरू संसारीं ॥ ४४ ॥ जो शिवातें महत्त्वा चढवी । जीवातें देहात्मता गोंवी । अहंममता जग भुलवी । प्रभुत्वपदवी महत्त्वें येणें ॥ ४५ । अहंकारू ऐसा आहे । तो जैं परमार्थी साह्य होये । तैं सोहंभावाचेनि लवलाहें । विभांडी पाहें संसारू ॥ ४६ ॥ चोर जैं विश्वासू मित्र होये । तैं चोर चोरा निवारी पाहें । तेवीं अभिमानू जैं साह्य होये । तैं भवभय बाधीना ॥ ४७ ॥ याहीपरी अभिमान । सामर्थ्यें अतिगहन । यालागीं प्रभुत्वें जाण । केलें व्याख्यान उद्धवा ॥ ४८ ॥ त्रिगुणगुणीं गुणाभिमान । एकत्र हो‌ऊनियां पूर्ण । महत्तत्त्वीं होय लीन । अतिसुलीन तद्‌रूपें ॥ ४९ ॥ स लीयते महान्स्वेषु गुणेषु गुणवत्तमः । तेऽव्यक्ते संप्रलीयन्ते तत्काले लीयतेऽव्यये ॥ २६ ॥ तेंही महत्तत्त्व येथें । कारणगुणीं लीन होतें । तेंही गुणसाम्यें निश्चितें । पावे लयाते अव्यक्तीं ॥ ५५० ॥ आकारविकार समस्त । हारपोनि जाती जेथ । उरे बीजमात्र अवशेषित । त्या नांव अव्यक्त बोलिजे ॥ ५१ ॥ वटाचा आकारविकार । ना शेंडा मूळ पुष्प पत्र । उरे अवशेष बीजमात्र । तेवीं संसार अव्यक्तीं ॥ ५२ ॥ वटबीज उरलें येथ । तें दृष्टीसी तर्केना निश्चित । तेवीं भवबीज जें अव्यक्त । तें नव्हे व्यक्त जीवासी ॥ ५३ ॥ नाना तृणजातिबीज गहन । उष्णकाळीं काळ करी लीन । तेवीं भवबीज अव्यक्त जाण । होय सुलीन काळेंसीं ॥ ५४ ॥ पूर्वीं काळें क्षोभोनि अव्यक्त । जगदाकारें केलें व्यक्त । तेचि काळयोगें अव्यक्त । सुलीन होत काळेंसीं ॥ ५५ ॥ या नांव अव्यक्ताचा पहा हो । काळामाजीं बोलती लयो । काळ बोलिजे महाबाहो । त्याचा होय व्ययो पुरुषेंसीं ॥ ५६ ॥ कालो मायामये जीवे जीव आत्मनि मय्यजे । आत्मा केवल आत्मस्थो विकल्पापायलक्षणः ॥ २७ ॥ पुरुषाची पूर्ण क्षोभकता । तोचि काळ बोलिजे तत्त्वतां । उत्पत्ति-स्थिति-प्रलयांता । तिनी अवस्था काळाच्या ॥ ५७ ॥ तिनी अवस्था लोटल्या ठायीं । काळासी कर्तव्यता नाहीं । तो उपजत व्यापारें पाहीं । जीवाचे ठायीं सामावे ॥ ५८ ॥ अचेतनीं चेतविता । जडातें जो जीवविता । यालागीं जीवू ऐशी वार्ता । जाण तत्त्वतां पुरुषासी ॥ ५९ ॥ प्रकृतीचेनि योगें जाण । शुद्धासी बोलिजे जीवपण । पुरुषू हेंही अभिधान । त्यासीच जाण बोलिजे ॥ ५६० ॥ करितां प्रकृतिविवंचन । केवळ मृगजळासमान । दिसे परी साचपण । सर्वथा जाण असेना ॥ ६१ ॥ मृगजळामाजीं जो पडे । तेथ जळ नाहीं मा तो कोठें बुडे । तेवीं प्रकृति नसतां जोडे । वाडेंकोडें जीवत्व कोणा ॥ ६२ ॥ जळीं बुडालें दिसे व्योम । सत्य मानणें तो मूर्खधर्म । तैसें रूप नाम गुण कर्म । हा मिथ्या भ्रम मायिक ॥ ६३ ॥ प्रकृतिकाळींही जाण । सत्य नाहीं जीवपण । तेही अर्थींची निजखूण । उद्धवा संपूर्ण अवधारीं ॥ ६४ ॥ स्वयें अवलोकितां दर्पण । दर्पणामाजीं दिसे आपण । तरी आपुलें वेगळेपण । स्वयें आपण जाणीजे ॥ ६५ ॥ तेवीं प्रकृतिकर्म करितां । जरी दिसे प्रकृति‌आंतौता । तरी मी प्रकृतीपरता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ६६ ॥ दिसे व्योम जळीं बुडालें । परी तें नाहीं वोलें झालें । तेवीं प्रकृतिकर्म म्यां केलें । नाही माखलें ममांग ॥ ६७ ॥ यापरी करितां निर्वाहो । प्रकृतीचा झाला अभावो । तेव्हा जीवशिवनांवें वावो । जीव तोचि पहा हो परमात्मा ॥ ६८ ॥ जीवाचें गेलिया जीवपण । सहजेंचि उडे शिवपण । दोघेही आत्मत्वें जाण । होती परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ६९ ॥ जीवासी निजस्वरूप आठवो । या नांव जीवाचा परब्रह्मीं लयो । परमात्मा अज अव्ययो । अविनाश अद्वयो अनंत ॥ ५७० ॥ ब्रह्मीं स्फुरेना ब्रह्मपण । तेथ ‘मी तूं’ म्हणे कोण । परमानंद परिपूर्ण । उरे जाण उद्धवा ॥ ७१ ॥ ऐसा परमानंद म्हणसी कोण । तो मी अज अव्यय श्रीकृष्ण । आनंदस्वरूप तो मी जाण । मजवेगळें स्थान असेना ॥ ७२ ॥ ज्या स्वानंदा नांव श्रीकृष्ण । तें तुझें स्वरूप उद्धवा जाण । तेथ नाहीं गा मीतूंपण । परम कारण उर्वरित ॥ ७३ ॥ उद्धवा जीवाचा जीव मी श्रीकृष्ण । मज तुज नाहीं वेगळेपण । यालागीं जीवाची हे निजखूण । परम कारण सांगीतले ॥ ७४ ॥ जगाचा आत्मा श्रीकृष्ण । त्या माझा आत्मा तूं उद्धव पूर्ण । हें ऐकोनि श्रीकृष्णवचन । उद्धव जाण गजबजिला ॥ ७५ ॥ कृष्ण मज म्हणे आपुला आत्मा । परी मी नेणें कृष्णमहिमा । अगाध लीला पुरुषोत्तमा । ते केवीं आम्हां आकळे ॥ ७६ ॥ नाथिलेंचि उद्धवपण । माझ्या अंगीं जडलें जाण । कृष्णविवेकें पाहतां पूर्ण । माझें मीपण दिसेना ॥ ७७ ॥ मज उद्धवपण सांडितां । कृष्ण निजधामा जा‌ईल तत्त्वतां । ते न साहवे अवस्था । सखेदता सप्रेम ॥ ७८ ॥ हे उद्धवाची अवस्था । कळों सरली श्रीकृष्णनाथा । तेचि अर्थीची हे कथा । शब्दार्थता निरूपी ॥ ७९ ॥ एवं अन्वीक्षमाणस्य कथं वैकल्पिको भ्रमः । मनसो हृदि तिष्ठेत व्योम्नीवार्कोदये तमः ॥ २८ ॥ प्रकृति-पुरुषविवंचन । आदि मध्य अवसान । तुज म्यां दाविलें एकपण । तेथ कां भिन्नपण कल्पिसी वायां ॥ ५८० ॥ उत्पत्ति‌आदि ब्रह्म पूर्ण । उत्पत्तीसी तेंचि कारण । जग जन्मलें जे सगुण । तेहीं ब्रह्मरूपें जाण दाविलें तुज ॥ ८१ ॥ आणी प्रळयाच्या अंतीं । ब्रह्मचि उरे निजस्थिती । तेही विखींची प्रतीती । तुज म्यां निश्चितीं दाविली ॥ ८२ ॥ प्रकृतिहूनि पुरुष भिन्न । प्रकृति स्वातंत्र्यें मिथ्या जाण । ऐसें प्रकृतिपुरुष ज्यासी ज्ञान । त्यासी मीतूंपण भासेना ॥ ८३ ॥ जेथ नाहीं मीतूंपण । तेथ विकल्प कल्पी कोण । आद्यंती वस्तु पूर्ण । हें विवेकज्ञान जयासी ॥ ८४ ॥ जो विवेक पुरुषप्रकृती । सांख्य जागे ज्याचे चित्तीं । त्यासी विकल्पाची प्राप्ती । नव्हे कल्पांतीं उद्धवा ॥ ८५ ॥ सांख्यविवेकगभस्ती । पूर्ण उगवला ज्याचे चित्तीं । तेथ विकल्पाची अंधारीं राती । कैशा रीतीं उरेल ॥ ८६ ॥ ज्यासी पटुतर सांख्यज्ञान । विकल्प विसरे त्याचें मन । हृदयीं उगवे चिद्‌भान । अज्ञाननिशा पूर्ण निरसूनी ॥ ८७ ॥ जेथ निरसलें अज्ञान । तेथ विकल्पाचें कैंचें स्थान । यापरी सांख्यज्ञान । साधकां पूर्ण उपकारी ॥ ८८ ॥ जें साराचें निजसार । जें गुह्यज्ञानभांडार । जें कां विवेकरत्ना कर । तें सांख्या साचार उद्धवा ॥ ८९ ॥ एष सांख्यविधिः प्रोक्तः संशयग्रन्थिभेदनः । प्रतिलोमानुलोमाभ्यां परावरदृशा मया ॥ २९ ॥ इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां सांहितायामेकादशस्कन्धे चतुर्विंशोऽध्यायः ॥ २४ ॥ मी विवेकाचा विवेकू । मी अर्काचा आदि‌अर्कू । मी ज्ञानियांचा ज्ञानतिलकू । त्या माझा परिपाकू तें हें सांख्य ॥ ५९० ॥ मी वेदांचा आदिवेदू । मी बोधाचा आदिबोधू । मी आनंदाचा निजानंदू । त्या माझा प्रबोधू तें हें सांख्य ॥ ९१ ॥ तेणें म्यां सर्वज्ञें श्रीकृष्णें । निर्धारोनि निजज्ञानें । सांख्ययोगौपलक्षणें । ब्रह्म अव्ययपणें दाविलें ॥ ९२ ॥ जेवीं गरगरीत वाटोळा । करतळीं दिसे आंवळा । तेवीं सांख्ययोगलीळा । ब्रह्म तुज डोळां दाविलें ॥ ९३ ॥ जो ब्रह्म डोळां देखों जाये । तो सर्वांगें देखणा होये । ऐशी सांख्यज्ञान निजसोये । तुज म्यां पाहें दाविली ॥ ९४ ॥ हा सांख्ययोग अनुक्रम । अन्वयव्यतिरेकें उपक्रम । आलोडितां आकळे वर्म । अखंड ब्रह्म अद्वय ॥ ९५ ॥ उत्पत्ति-स्थिति-प्रळयांत । ब्रह्म अखंड निज नित्य । हेंचि सांख्ययोगें प्राप्त । जाण निश्चित साधकां ॥ ९६ ॥ ज्यांसी ब्रह्मज्ञानाचें कोड । ते सांख्ययोग पुरवी चाड । लिंगदेहाचें सुदृढ झाड । त्याचें समूळ बूड उन्मळी ॥ ९७ ॥ लिंगदेह अत्यंत कठिण । तें सांख्ययोगापुढें जाण । जेवीं अग्नीमाजीं तृण । तेवीं होय संपूर्ण भस्मांत ॥ ९८ ॥ लिंगदेह सैंधवगिरिवर । सांख्या अत्यंत प्रळयसागर । खवळला विरवूनि करी नीर । एकाकार निजात्मता ॥ ९९ ॥ खवळल्या अत्यंत चित्सागरा । नाना संशयजळगारा । उरावया नाहीं थारा । निजनिर्धारा उद्धवा ॥ ६०० ॥ सकळ संशयांचें छेदन । लिंगदेहाचें भेदन । करी तें सांख्ययोगज्ञान । उद्धवा जाण निश्चित ॥ १ ॥ अनुलोम प्रतिलोम । विवंचना वाटेल दुर्गम । हें न करितां सांख्य सुगम । आकळे तें वर्म सांगेन ऐक ॥ २ ॥ सांडूनि आकारविषमता । सर्व भूतीं भगवंतता । जो पाहे सद्‌भावता । सांख्य त्याचे हात समूळ आलें ॥ ३ ॥ कां जैसें हो‌ईल कर्माचरण । तैसें सुखेंचि हो आपण । मी कर्ता हें तूं न म्हण । इतुकेन ब्रह्म पूर्ण तूं होसी ॥ ४ ॥ याहीवरती सुगमता । मज दिसेना सर्वथा । उद्धवा तुझे निजहितार्थ । जाण तत्त्वतां सांगीतलें ॥ ५ ॥ हेंचि एक माझें वचन । विचारूनियां संपूर्ण । निजहितार्था आपण । अवश्य जाण करावें ॥ ६ ॥ ऐसें बोलिला देवाधिदेवो । तेथ जडला उद्धवाचा भावो । निःशेष ‘अहं’ सांडितां पहा हो । ब्रह्म स्वयमेवो सहजचि ॥ ७ ॥ विचारितां सांख्यज्ञान । जगातें गोंवी अहंपण । अहंपाशीं जन्ममरण । दुःख दारुण अहंभावीं ॥ ८ ॥ ऐसा अहंभावो कठिण । सांडितां न सांडे आपण । येचि गुंतीचें कारण । सर्वथा जाण कळेना ॥ ९ ॥ हें पुसों जावें देवापाशीं । तेणें विशद सांगीतलें सांख्यासी । आतां आपुली गुंती आपल्यापाशीं । तेंचि आम्हासी कळेना ॥ ६१० ॥ येचि अर्थीं श्रीकृष्ण । पंचविसावे अध्यायीं जाण । सगुण निर्गुणविभागें पूर्ण । गोड निरूपण सांगेल ॥ ११ ॥ ते सुरम रसाळ मधुर कथा । जेथ श्रीकृष्णा‌ऐसा वक्ता । उद्धव शिरोमणि श्रोता । अनुपम स्वादुता ते ठायीं ॥ १२ ॥ त्या स्वादाचें गोडपण । सांगावया समर्थ श्रीकृष्ण । सेवावया श्रोता अतिसज्ञान । निजभक्त जाण उद्धव ॥ १३ ॥ ते देवभक्तसंवाद गोडी । वेदशास्त्रें न जोडे जोडी । आलोडितां ग्रंथकोडी । ते निजगोडी नातुडे ॥ १४ ॥ आतुडावया ते निजगोडी । जैं भाग्यें भावार्थें जोडे जोडी । भावार्थाचे निज‌आवडीं । जिव्हारींची गोडी देवो दे भक्तां ॥ १५ ॥ एवं भावार्थापरतें कांहीं । देवासी आवडतें नाहीं । तो भावो नाहीं ज्यांचे ठायीं । ते मूर्ख पाहीं बालिश ॥ १६ ॥ त्या बाळकांचा धन्य भावो । खापरें मांडूनि म्हणती देवो । तेथही प्रकटे देवाधिदेवो । धरिल्या निःसंदेहो विश्वास ॥ १७ ॥ बाळकें दूध मागावयासाठीं । भावार्थें लागला देवापाठीं । कां क्षीराब्धि करूनि वाटी । उपमन्यावोठीं लाविली ॥ १८ ॥ एवं भाविकू देवाचा लाहणा । देवो भाविकांचा आंदणा । भावेंवीण देवो जाणा । कधीं कोणा न भेटे ॥ १९ ॥ यालागीं जेथ भावार्थ । तेथचि जोडे सुखस्वार्थ । भावार्थ तेथ परमार्थ । साङ्ग साद्यंत सांपडे ॥ ६२० ॥ ऐसा वाढिविल्या भावार्थ । तेणें जोडे निर्गुणनिजस्वार्थ । तेचि अर्थींचा वृत्तांत । पुढिल्या अध्यायांत हरि सांगे ॥ २१ ॥ ते कथेचें गोडपण । अमृतास विसरवी जाण । ऐसें रसाळ निरूपण । सादरें श्रीकृष्ण सांगेल ॥ २२ ॥ तें श्रीकृष्णकथापीयूख । श्रोत्याचें पावे श्रवणमुख । एका जनार्दनीं अतिसुख । सकौतुक व्याख्यान ॥ २३ ॥ श्रीभागवत अत्यादरें । श्रीकृष्णकथा सविस्तरें । अहेर विस्तारिले साजिरे । परमार्थाळंकारें साळंकृत ॥ २४ ॥ तेणें संत सज्जन सोयरे । गौरवीन श्रवणादरें । एका जनार्दनकृपाकरें । आविष्करे सामर्थ्य ॥ २५ ॥ गौरविले सोयरे सज्जन । म्हणाल उपेक्षिले इतर जन । जो श्रीभागवतीं सावधान । तो परमार्थें जाण गौरवे ॥ २६ ॥ भावार्थासारिखें गौरवण । एका जनार्दन जाणे । एका जनार्दना शरण । आपण्या आपण गौरवी ॥ ६२७ ॥ इति श्रीभागवते महापुरणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे एकाकारटीकायां प्रकृतिपुरुषसांख्ययोगो नाम चतुर्विंशोऽध्यायः ॥ २४ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ २९ ॥ ओव्या ॥ ६२७ ॥ ॥ श्री एकनाथी भागवत ॥ अध्याय चोविसावा श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो जी गुणातीता । व्यक्तिरहिता अव्यक्ता । तुजमाजीं नाहीं द्वैतकथा । अद्वैततारहिवासी ॥ १ ॥ तुझा अद्वैत निजनिर्वाहो । तेथ नाहीं देवी देवो । उदय-अस्तांचा अभावो । रविचंद्रांसी ठावो असेना ॥ २ ॥ तेथ सशब्द हारपला वेदू । बुद्धीसी मिथ्या बोधू । तिळभरी नाहीं भेदू । अद्वयानंदू एकला ॥ ३ ॥ ऐसिया अद्वैतपणीं । प्रकृतिपुरुषांची कहाणी । सांगिजे केवळ अज्ञानीं । ज्ञातेपणीं चातुर्यें ॥ ४ ॥ जेथ मीतूंपणा नाहीं ठावो । तेथ प्रकृतिपुरुषां केवीं निर्वाहो । ज्याचा नाहीं गर्भसंभवो । त्याचें जातक पहा हो वर्तविती ॥ ५ ॥ जें जन्मलेंचि नाहीं । त्याचें श्राद्ध करावें कायी । हें ज्ञात्यासी पुसतां पाहीं । ठेवितां ठायीं ठाके ना ॥ ६ ॥ वांझेच्या पुत्राचा विवाहो । समारंभ चला पहा हो । नेणा साच जाणा वावो । तैसा निर्वाहो प्रकृतिपुरुषां ॥ ७ ॥ ऐसें नसतेंचि नाथिलें । साचाचे परी नांदविलें । एकीं अनेकत्व दाविलें । एकपण संचलें न मोडतां ॥ ८ ॥ ऐसा एकपणें एकुलता । तोचि आपण आपली झाला कांता । आपुले कांतेचा आपण भर्ता । अतिलाघवता अतर्क्य ॥ ९ ॥ जेवीं अधनारिनटेश्वरीं । जो पुरुष तोचि नारी । तेवीं प्रकृति पुरुष संसारीं । एकाकारीं नांदत ॥ १० ॥ तो पुरुष ते पतिव्रता । दोघां अनन्य प्रीति एकात्मता । येरयेरां वेगळीकता । पा‌ऊल सर्वथा न घालिती ॥ ११ ॥ दोघां एकत्र सदा असणें । दोघासीं एकचि नेसणॆं । दोघां एके सत्ता बैसणें । दोघां एकचि प्राणें वर्तती ॥ १२ ॥ दोघां एकचि देखणें । दोघां एकचि चाखणें । दोघां एकचि बोलणें । दोघां करणें एकचि ॥ १३ ॥ कैशी दोघां प्रीति अलोलिक । येरयेरांवीण न घेती विख । येरयेरांवीण न चाखिती उदक । येरयेरेंवीण देख आंधळीं ॥ १४ ॥ नवल बा‌इलेचें करणें । नपुंसका पुरुषत्व इणें देणें । मग तिचेनि अधीनपणें । पुरुषें नांदणें सर्वदा ॥ १५ ॥ मग हा तिचेनि डोळां देखे । मग हा तिचेनि बोले मुखें । तिचोनि भोगी हा सुखदुःखें । बंधमोक्ष चाखे तिचेनि ॥ १६ ॥ तिचेनि म्हणवी मी ब्रह्म । तिचेनि करी हा कर्माकर्म । तिचेनि भोगी हा मरणजन्म । धर्माधर्मविभागें ॥ १७ ॥ तिचेनि यासी पाप घडे । तिचेनि यासी पुण्य जोडे । तिचेनि हा महत्त्वा चढे । तिचेनि पडे अधःपातीं ॥ १८ ॥ एथवरी अतिप्रीतीं । वाढविली निजप्रकृती । प्रकृति पातिव्रत्यस्थिती । वश्य निजपती तियें केला ॥ १९ ॥ नवल दोघांची सोयरिकी । दोघीं भावंडें होती सखीं । तो बाप ते त्याची लेंकी । पाहतां विवेकीं तो पुत्र तिचा ॥ २० ॥ यापरी अगम्यागमन । तिंहीं दोघीं करूनि जाण । वाढविले अनेक जन । तिसरेपण नातळतां ॥ २१ ॥ ऐसा अव्यभिचारी व्यभिचारू । करूनि वाढविला संसारू । तो अति‌अतर्क्य अगोचरू । अगम्य दुर्धरू शिवादिकां ॥ २२ ॥ हा निजशक्तिप्रकृतिमेळें । भोगी शिवत्वाचे सोहळे । प्रिया न देखतां तात्काळें । सांडी सगळें शिवत्व ॥ २३ ॥ ज्यासी गांवठाव ना जीवमेळ । रूपनांव ना काळमेळ । ऐसाही प्रकृती केवळ । केला सबळ निजगुणीं ॥ २४ ॥ प्रकृती निजगुणास्तव । निजभर्ता केला सावेव । वर्ण व्यक्ति रूप नांव । नाना वैभवविलासें ॥ २५ ॥ तंव पूर्णत्व लोपोनियां शिवें । अंगावरी वाढविलें शांभवें । येरी पतिव्रता आहेवें । रूपें नांवें शिव पूजी ॥ २६ ॥ दोघांपासूनि झालें जग । परी न दिसे तिसरा भाग । न तुटे अनन्यमिळणीयोग । भिन्न विभाग दाखवितां ॥ २७ ॥ त्रैलोक्य पाहतां साङ्ग । न दिसे तिसरें अंग । दोघीं दुमदुमीत जग । भरलें चांग दुबंधीं ॥ २८ ॥ दोघां अतिप्रीति ऐशी । अनन्यमिळणी अनन्यासी । दोघें अणूमाजीं सावकाशीं । निजरहिवासी नांदत ॥ २९ ॥ पतीवीण ते पतिव्रता । सगळीचि विरे सर्वथा । प्रियेवीण असतचि नसता । होय कांहीं नव्हतां भर्तारू ॥ ३० ॥ शिव निःसंग जो पैं सदा । क्रियाकरणेंवीण नुसधा । त्यासीही अतिप्रीतीं निजप्रमदा । सुखदुःखबाधा भोगवी ॥ ३१ ॥ यापरी निजनोवरा । प्रकृती गोंविला घरचारा । मग घरवातेचा थारा । त्याच्याचि शरीरावरी केला ॥ ३२ ॥ प्रकृति पतिव्रता अवंचक । कर्माकर्मीं शिणोनि अनेक । सुखदुःखांची परवडी देख । अर्पी आवश्यक निजकांता ॥ ३३ ॥ नवल तें मीं सांगावें काये । स्त्री जोडी तें पुरुष खाये । तियेवीण तो पाहें । कंहीं न लाहे कवडाही ॥ ३४ ॥ प्रकृति पतिव्रताशिरोमणी । कांत वश्य करोनि निजगुणीं । वासना सूक्ष्म सेवया अनुदिनीं । भोगवी सुगरणी भर्ताराकरवीं ॥ ३५ ॥ तेथ प्रकृतीचेनि गदारोळें । भवाब्धीं जलक्रीडा खेळे । प्रकृति पुरुषातें बुडवी बळें । पुरुष एकें काळें प्रकृति बुडवी ॥ ३६ ॥ ऐशा प्रकृतीच्या संगा‌आंत । पुरुषास लाविलें पंचभूत । जन्ममरणांच्या बुड्या देत । अवस्थाभूत हो‌ऊनी ॥ 37 || ऐसा प्रकृतिचिया भिडा । पुरुष् केवळ् झाला वेडा । निजत्व् विसरोनि बापुडा । केला गाढा अतिदीन् ॥ ३८ ॥ ऐसा विसरोनि पूर्णत्वासी । जीवशिवद्वंद्वें स्वयें सोशी । त्यासी न्यावया निजत्वासी । गुणिया पूर्णांशीं गुरुरावो ॥ ३९ ॥ ज्याचे वचनमात्रें पहा वो । जीवाचा हारपे जीवभावो । शिवा शिवपदीं ठावो । ज्याचा वचनगौरवो नांदवी ॥ ४० ॥ ज्याची भावार्थें ऐकतां गोठी । अहंकारू निमे उठा‌उठी । जन्ममरणांसी पडे तुटी । न् दिसे दृष्टीं भवभय् ॥ ४१ ॥ ज्याचिया कृपादृष्टिपुढें । जीवशिवांचें फिटे बिरडें । माया मिथ्यात्वें समूळ् उडे । पूर्णत्वाचें उघडे भांडार् ॥ ४२ ॥ शिवू भुलविला शिवत्वासी । यावया तो निजपदासी । आज्ञा जैं पुसे सद्‌गुरूसी । तैंचि शिवासी शिवत्व् ॥ ४३ ॥ एवढी महिमा सद्‌गुरूसी । वचनें केवीं वानूं त्यासी । तवं वनिते वाणीनें वानावयासी । वदवी वाचेसी गुरुरावो ॥ ४४ ॥ तेथ् एक् मी वानिता । हें कोणें घ्यावें आपुले माथां । गुरूनें हरितली अहंता । तेथ् मी एक् कर्ता घडे केवीं ॥ ४५ ॥ तेथ् मीपणें घ्यावी अहंता । तंव् गुरूचि मीपणा‌आंतौता । गुरूवेगळा ठाव् नाहीं रिता । मीपणाचे माथां गुरुरावो ॥ ४६ ॥ माझें जें कां मीपण् । तें सद्‌गुरु झाला आपण् । तेव्हां रूप् एक् नांवें भिन्न् । एका जनार्दन् एकत्वें ॥ ४७ ॥ अवघा जनार्दनचि देखा । तोचि उपनांवें झाला एका । तेणें नामें श्री भागवत् देखा । देशभाखा अर्थवी ॥ ४८ ॥ तेविसावे अध्यायाचे अंतीं । देवो बोलिला उद्धवाप्रती । द्वंद्वभोगांची निजप्राप्ती । साहावी शांती धरोनि ॥ ४९ ॥ ज्यांसी बाणली अढळ् शांती । ते मज् अजितातें जिंकिती । तेचि साचार् परमार्थी । स्वमुखें श्रीपति बोलिला ॥ ५० ॥ तें ऐकोन् कृष्णवचन् । उद्धवाचें दचकलें मन् । द्वंद्वसहिष्णुता अतिकठिण् । कैसोनि आपण् साहावी ॥ ५१ ॥ द्वंद्वसहिष्णुतासाधन् । पुसतां उबगेल् श्रीकृष्ण् । ऐशिया भिडा उद्धव् पूर्ण् । धरोनि मौन् राहिला ॥ ५२ ॥ तो उद्धवाचा अभिप्रावो । जाणोनियां देवाधिदेवो । द्वंद्वसहिष्णुता‌उपावो । समूळ् पहा वो सांगत् ॥ ५३ ॥ अद्वयत्वें परिपूर्ण् । प्रकृतीहूनि पुरुष् भिन्न् । हें आकळल्या निजज्ञान् । द्वंद्वबंधन् बाधीना ॥ ५४ ॥ द्वंद्वें जिणावया पूर्ण् । प्रकृतिपुरुषविवंचन् । उद्धवें न् करितां प्रश्न् । स्वयें श्रीकृष्ण् सांगत् ॥ ५५ ॥ भक्त‌अंतरींचे जाणता । यालागें अंतर्यामी तत्त्वतां । तो निजभक्तांचिया स्वार्था । पूर्ण् परमार्थ् सांगत् ॥ ५६ ॥ निजभक्तांचें मनोगत् । जाणोनियां श्रीकृष्णनाथ् । करावया भक्तहित् । कृपेनें सांगत् कृपाळू ॥ ५७ ॥ जगीं धन्य् भाग्य् उद्धवाचें । कृष्ण् दैवत् तिहीं लोकींचें । कृपा वोरसोनियां साचें । प्रकृतिपुरुषांचें निज् सांगे ॥ ५८ ॥ आशंकेचें निरूपण् । उद्धवें न् सांगतांही जाण् । तें जाणोनियां श्रीकृष्ण् । कृपा निरूपण् निरूपी ॥ ५९ ॥ कृष्ण् म्हणे ज्यासी तारीन् । तो पहिलाचि तरला जाण् । करावया जगाचें उद्धरण् । कृपें श्रीकृष्ण् बोलत् ॥ ६० ॥ धेनु वत्साचेनि लोभें । जेवीं घरापुरतें दुभे । तेवीं उद्धवाचेनि वालभें । जग् पद्मनाभें उद्धरिलें ॥ ६१ ॥ श्रीभगवानुवाच् - अथ् ते संप्रवक्ष्यामि सांख्यं पूर्वैर्विनिश्चितम्‌ । यद्विज्ञाय् पुमान्‌ सद्यो जह्याद्‌ वैकल्पिकं भ्रमम्‌ ॥ १ ॥ जो योगियांचां योगेंद्र् । जो ज्ञानियांचा ज्ञानेंद्र् । जो भक्तचित्तचकोरचंद्र् । जो यादवेंद्र् यदुवंशीं ॥ ६२ ॥ जो प्रकृतिपुरुषांहूनि पर् । तो स्वयें बोले शार्ङ्गधर् । उद्धवा द्वंद्वसहनप्रकार् । अतिगुह्य् विचार् अवधारीं ॥ ६३ ॥ जें ऐकतांचि निरूपण् । सुखदुःखातीत् आपण् । हे संपूर्ण् पावे खूण् । तें गुह्य् ज्ञान् अवधारीं ॥ ६४ ॥ मी कपिलरूपें अवतरूनी । प्रकृतिपुरुष् विवंचोनी । उपदेशिली निजजननी । ते जुनी कहाणी सांगेन् ॥ ६५ ॥ जे परिसतां सावधान् । स्वयें हो‌इजे ज्ञानसंपन्न् । पुरुषाहूनि प्रकृति भिन्न् । सुखदुःख् जाण् तीपाशीं ॥ ६६ ॥ सुखदुःखें मायिक् पूर्ण् । ऐसें ज्यासी कळलें ज्ञान् । तेव्हां भवभयभ्रम् दारुण् । तत्काळ् जाण् तो सांडी ॥ ६७ ॥ जेवीं मोतियांची कंठमाळा । भ्रमें सर्प् भासली डोळां । ते भ्रमांतीं घालिती गळां । न् बाधी कंटाळा सर्पभायाचा ॥ ६८ ॥ तेवीं शिवशक्तिविवंचन् । तुज् मी सांगेन् संपूर्ण् । जें आकर्णितां सावधान् । द्वंद्वें सकारण् हारपती ॥ ६९ ॥ बह्य् सुखरूप् एकलेपणीं । तेथ् प्रकृतिपुरुष् कैंचीं दोनी । द्वंद्वसुखदुःखें ज्यापासोनी । त्रिभुवनीं न् समाती ॥ ७० ॥ तेचि अर्थींचें निरूपण् । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण् । प्रकृतिपुरुषांचें जन्म् जाण् । तें मुख्य् कारण् सुखदुःखां ॥ ७१ ॥ आसीञ्ज्ञानमथो ह्यर्थ् एकमेवाविकल्पितम्‌ । यदा विवेकनिपुणा आदौ कृतयुगेऽयुगे ॥ २ ॥ जेवीं निजेल्या पुरुषाची छाया । पुरुषातळीं जाय् लया । तेवीं सविकार् गिळोनि माया । ब्रह्म् एकल्या एकाकी ॥ ७२ ॥ ब्रह्म् एकाकी परिपूर्ण् । हेंही म्हणावया म्हणतें कोण् । नाहीं नाम् रूप् व्यक्ति पूर्ण् । ब्रह्मीं ब्रह्मपण् स्फुरेना ॥ ७३ ॥ तेथ् नाहीं युगसंख्या काळ् वेळ् । नाहीं दिनमान् घटिका पळ् । नाहीं शून्यत्वें शून्य् मंडळ् । ब्रह्म् केवळ् परिपूर्णत्वें ॥ ७४ ॥ तेथ् मी ब्रह्म् हें स्फुरे जें स्फुरण् । तेंचि मायेचें मुख्य् लक्षण् । तेंचि प्रकृतिपुरुषांचें जन्मस्थान् । जावळीं फळें जाण् जन्मलीं ॥ ७५ ॥ जेवीं कां कवळूनियां कण् । निकण् कोंडा वाढे आपण् । तेंवी पुरुषयोगें पूर्ण् । प्रकृति जाण् थोरावे ॥ ७६ ॥ धरूनि गोडपणाचा सांठा । फणसा‌अंगीं वाढे कांटा । तेवीं पुरुषयोगें ताठा । चढला मोठा प्रकृतीसी ॥ ७७ ॥ जेवीं कां डोळींचेंचि जळ् । गोठोनि डोळां होय् पडळ् । तेवीं ब्रह्मीं मायामळ् । करी शबळ् शुद्धासी ॥ ७८ ॥ पडळ् डोळा मंद् करी । माया निजानंद् आवरी । वाढोनि त्याची त्याचिवरी । वेडा करी पुरुषातें ॥ ७९ ॥ ऐसें कर्तेनवीण् आपसया । कार्यकारण् जें आलें आया । त्यातें कृतयुग् म्हणावया । वेदू लवलाह्या उदेला ॥ ८० ॥ अकार्-उकार्-मकारेंसीं । वेदू उपजे प्रकृतिपुरुषीं । जेवीं उकलल्या बीजासी । प्रथम् ये त्यासी तिवणा डिरू ॥ ८१ ॥ ते वेदींचा अभिप्रावो । ब्रह्म् सत्य् माया वावो । आपुलेनि अभेदें ब्रह्मभावो । विवेकनिपुण् पहा वो जाणती ॥ ८२ ॥ ऐसे वेदविवेकें अभेदयोगी । ते कृतादि होत् कां कलियुगीं । वर्तता ते सदा अयुगीं । युग् त्यालागीं असेना ॥ ८३ ॥ कृतयुगादि युगपंक्ती । चराचर् नाना व्यक्ती । यांसी उपजवी प्रकृती । तिची उत्पत्ती हरि सांगे ॥ ८४ ॥ तन्मायाफलरूपेण् केवलं निर्विकल्पितम्‌ । वाङ्मनोऽगोचरं सत्यं द्विधा समभवद्धहत्‌ ॥ ३ ॥ तें बृहत्‌ जें परब्रह्म् । जेथ् न् रिगे रूपनाम् । जें मनबुद्धीसी अगम्य् । जें दुर्गम् इंद्रियां ॥ ८५ ॥ जें निर्गुण निराकार । जें सत्यस्वरूप साचार । जें परेहूनि परात्पर । निर्विकार निजवस्तु ॥ ८६ ॥ तेथ अतर्क्य मायाचमत्कार । करी दृश्यद्रष्टृत्वें सविकार । तेचि प्रकृति पुरुष साचार । तेणें चराचर वाढवी ॥ ८७ ॥ जेवीं रूपासवें छायेची व्यक्ती । तेवीं ब्रह्मीं मायेची निजस्थिती । तिणें उपजविली शिवशक्ती । पुरुष प्रकृति द्विधा भेदें ॥ ८८ ॥ ब्रह्मांडीं ईश्वरस्वभावो । पिंडीं त्यासीच जीवभावो । ऐसा प्रकृतिपुरुषनिर्वाहो । मायेनें पहा हो द्विधा केला ॥ ८९ ॥ ब्रह्म अच्छेद्य वेदू बोले । तें फाडूनि द्विधा कैसें केलें । जेवीं आरिसां आपणा आपुलें । मुख देखिलें संमुख ॥ ९० ॥ आपण पुर्वामुख आहे । प्रतिबिंब पूर्वेकडे न होये । आपलें आपणा संमुख होये । हें लाघव पाहें मायेचें ॥ ९१ ॥ प्रतिबिंब दिसतां संमुख । संमुख म्हणतां अतिविमुख । पुरुष पूर्वेकडे देख । प्रतिबिंबाचें मुख पश्चिमेकडे ॥ ९२ ॥ तेवीं आत्मदृष्टि स्वरूपीं पडें । जीवदृष्टि प्रपंचाकडे । येणें संमुखत्व न घडे । विमुखत्व गाढें जीवासी ॥ ९३ ॥ तेवीं ब्रह्मीं जें ब्रह्मस्फुरण । तेंचि मूळमायेचें लक्षण । तेथ ईश्वरत्वें जाण । होय आपण्या आपण संमुख ॥ ९४ ॥ जे अद्वितीय वस्तु शुद्ध । तेथ मिथ्या मायासंबंध । अभेदीं उपजवूनि भेद । केलीं द्विविध शिवशक्ती ॥ ९५ ॥ तयोरेकतरो ह्यर्थः प्रकृतिः सोभयात्मिका । ज्ञानं त्वन्यतमो भावः पुरुषः सोऽभिधीयते ॥ ४ ॥ त्या दोहीं भागांमाझारीं । प्रकृतिभाग तो विकारी । पुरुषभाग तो अविकारी । स्वयें श्रीहरी सांगत ॥ ९६ ॥ तेथ आपण आपुली कांता । आपुले कांतेचा आपण भर्ता । एकपणीं दावूनि द्वैता । भिन्नविभागता शिवशक्ती ॥ ९७ ॥ जेवीं आपुलें एक अंग । तेथ बोलती वाम सव्य भाग । तेवीं प्रकृतिपुरुषविभाग । जाणावे साङ्ग मायिक ॥ ९८ ॥ अर्धनारीनटेश्वरीं । जो पुरुष तोचि नारी । प्रकृतिपुरुषीं तैशी परी । एक शरीरीं एकात्मता ॥ ९९ ॥ जैं पुरुषविभाग लपवीं । तैं स्वेच्छा प्रकृति नाचवी । प्रकृतिभाग जैं लपवी । तैं पुरुषाची पदवी प्रकट दिसे ॥ १०० ॥ मधील पडदा जैं तोडिती । तैं पुरुष ना प्रकृती । तेव्हां प्रकटे निजात्मस्थिती । स्त्रीपुरुषव्यक्ती समूळ मिथ्या ॥ १ ॥ ऐशी मिथ्या मायिक प्रकृती । तीपासाव गुणोत्पत्ती । गुणास्तव संसारस्थिती । स्वयें श्रीपती सांगत ॥ २ ॥ तमो रजः सत्त्वमिति प्रकृतेरभवन्गुणाः । मया प्रक्षोभ्यमाणायाः पुरुषानुमतेन च ॥ ५ ॥ प्रकृति गुणमयी पूर्ण । ते लाहोनि पुरुष‌ईक्षण । प्रकट करी तिन्ही गुण । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ ३ ॥ जेवीं सूर्यावलोकनमेळीं । कळीं विकासे कमळदळीं । ते वेगळवेगळी पांकोळी । होती मूळीं कळिकेमाजीं ॥ ४ ॥ तेवीं पुरुषाच्या ईक्षणीं । गुणमयी झाली गुर्विणी । ते तम-रज-सत्त्वगुणी । प्रसवली तिनी गुणांतें ॥ ५ ॥ जेवीं जळे बीज क्षोभूनी । दोनी दळें उलवूनी । डिरू निघाला त्यांतूनी । तरतरूनी तिवणा पैं ॥ ६ ॥ तेवीं परमात्मा मी आपण । पुरुषत्वातें पावोनि जाण । प्रकृति क्षोभवूनी पूर्ण । तिनी गुण प्रकटविले ॥ ७ ॥ जेवीं कां सूर्याचे किरणीं । सूर्यकांतीं पडे अग्नी । तेवीं पुरुषें प्रकृती भोगुनी । गुण तिनी ते प्रसवे ॥ ८ ॥ तेभ्यः समभवत्सूत्रं महान्सूत्रेण संयुतः । ततो विकुर्वतो जातो अहङ्कारो यो विमोहनः ॥ ६ ॥ ते तिनी गुण भिन्न भिन्न । भिन्नपणें वाढी समान । त्या नांव सूत्र प्रधान । क्रियाशक्ति जाण या नांव ॥ ९ ॥ क्रियाशक्तीस जडपण । तेथ चेतनात्मक उपजे ज्ञान । तेंचि महत्तत्त्व नांव जाण । भिन्नभिधान या हेतू ॥ ११० ॥ महत्तत्त्व आणि प्रधान । दोहिंचें रूप एकचि जाण । तेथ क्रिया आणि स्फुरे ज्ञान । यालागीं नांवें भिन्न दोहींचीं ॥ ११ ॥ क्रियायुक्त जें स्फुरे ज्ञान । तेथ चेतवे अभिमान । त्रिगुणीं अहंकार पूर्ण । ते ठायीं जाण उठावे ॥ १२ ॥ अहं खवळल्या दारुण । शिवासी विसरवी शिवपण । देहत्मवादें भुलवे पूर्ण । जन्ममरण भोगवी ॥ १३ ॥ त्या अहंकाराची मोहक शक्ती । भवभ्रमें पाडी भ्रांती । अहंकाराची विकार‌उत्पत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ १४ ॥ वैकारिकस्तैजसश्च तामसश्चेत्यहं त्रिवृत्‌ । तन्मात्रेन्द्रियमनसां कारणं चिदचिन्मयः ॥ ७ ॥ अहंकार अतिदुर्धर । गुणानुसारें त्रिप्रकार । गुण अहंता दृढ संसार । गुणविकार तो ऐसा ॥ १५ ॥ प्रथम अहंभावो सात्त्विक । झाला अंतःकरणद्योतक । तोचि देवताविकारजनक । यालागीं वैकारिक बोलिजे त्यासी ॥ १६ ॥ अहंकार जो राजसू । तो ज्ञानकर्मेंद्रियप्रकाशू । वांछी रजतेजविलासू । यालागीं तैजसू बोलिजे ॥ १७ ॥ तामसाहंकाराची सिद्धि । सूक्ष्म भूतांतें उत्पादी । यालागीं म्हणिजे तो भूतादी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥ १८ ॥ नवल अहंकाराची थोरी । सचेतना अचेतन नोवरी । स्वयें लग्न लावी प्रीतीवरी । चिदचिद्ग्रंथी पुरी पाडूनी ॥ १९ ॥ चिन्मात्रस्वरूपता जीवासी । लग्न लावी जड देहेंसीं । ‘ओं पुण्या’ एकात्मतेसी । कर्ता ज्योतिषी अभिमान ॥ १२० ॥ जीव ज्ञानस्वरूप चोखडा । तो करोनि जड मूढ वेडा । दृढ घाली हाडांचे खोडां । तो हा धडफुडा अहंकारू ॥ २१ ॥ तोचि सात्त्विक आणि राजस । हो‌ऊनि तिसरा तामस । त्रिविध विकारीं बहुवस । वाढवी असोस संसारू ॥ २२ ॥ अर्थस्तन्मात्रिकाज्जज्ञे तामसादिन्द्रियाणि च । तैजसाद्‌ देवता आसन्‌ एकादश च वैकृतात्‌ ॥ ८ ॥ विषय तेचि महाभूतें । तामस प्रसवला अपंचीकृतें । विषयास्तव प्रकटती भूतें । ऐक तूतें सांगेन ॥ २३ ॥ शब्दापासाव नभ उद्‌भवत । स्पर्शापासाव मारुत । रूपापासाव तेज होत । रसास्तव येथ आप उपजे ॥ २४ ॥ गंधापासोनि पृथ्वी कठिण । उपजली आपीं आपण । येरयेरांचें अनुस्यूतपण । सर्वथा जाण मोडेना ॥ २५ ॥ शब्द निःशब्दीं जन्मला । तो आकाशातें प्रसवला । आकाशीं सूक्ष्म स्पर्श झाला । तो स्पर्श व्याला मारुत ॥ २६ ॥ जन्मल्या मारुता‌आंत । शब्द स्पर्श दोनी नांदत । मारुत रूपातें प्रसवत । त्या रूपांत तेज जन्मलें ॥ २७ ॥ त्या जन्मल्या तेजा‌आंत । शब्द स्पर्श रूप नांदत । रूप रसातें प्रसवत । आप रसांत जन्मलें ॥ २८ ॥ जन्मले आपीं समरस । शब्द स्पर्श रूप रस । नांदताती सावकाश । विषयीं विषयांस प्रवेशू ॥ २९ ॥ आपामाजीं जन्मे गंध । गंधापासाव पृथ्वी शुद्ध । शब्द स्पर्श रूप रस गंध । पृथ्वी पंचविध विषययुक्त ॥ १३० ॥ विषययुक्त अपंचीकृतें । पूर्वीं लीन होतीं समस्तें । तींचि स्थूळावलीं येथें । महाभूतें प्रसिद्ध ॥ ३१ ॥ ज्ञान कर्म उभयपंचक । श्रोत्रादि इंद्रियदशक । राजसापासोनि देख । स्वाभाविक जन्मलीं ॥ ३२ ॥ सत्त्व‌अहंतेचा विकार । चित्तचतुष्टय चमत्कार । मन बुद्धि चित्त अहंकार । अकराही सुर इंद्रियाधिप ॥ ३३ ॥ महाभूतें अतिजडें देख । इंद्रियें तेथें प्रवर्तक । अंतःकरणचाळक । देव प्रकाशक कर्माचे ॥ ३४ ॥ त्रिविध अहंकारवृत्ती । गुणक्षोभें क्षोभक शक्ती । यापरी झाली उत्पत्ती । ब्रह्मांडस्थितीलागूनी ॥ ३५ ॥ मया सञ्चोदिता भावाः सर्वे संहत्यकारिणः । अण्डमुत्पादयामासुः ममायतनमुत्तमम्‌ ॥ ९ ॥ भूतां परस्परें वैर देख । पृथ्वीतें गिळूं धांवे उदक । उदकातें आवश्यक । तेज देख निर्दळी ॥ ३६ ॥ तेजातें प्राशी पवन । पवनातें ग्रासी गगन । एवं भूतांसी सौजन्य । सर्वथा जाण असेना ॥ ३७ ॥ तेथ अंतर्यामिरूपें मी जाण । स्वयें प्रवेशोनि आपण । भूतें मेळवूनि पूर्ण । करीं संरक्षण मर्यादा ॥ ३८ ॥ माझे मर्यादेची रेखा । प्रथ्वी न विरवी उदका । उदकातें तेज देखा । न लववी नखा शोषाचे ॥ ३९ ॥ तेजातें न प्राशी पवन । वायु स्वेच्छा विचरतां जाण । सर्वथा ग्रासीना गगन । गतिबंधन करीना ॥ १४० ॥ यापरी हीं महाभूतें । एकवटूनि समस्तें । स्त्रजिलें ब्रह्मांडातें । मज महापुरुषातें वस्तीशीं ॥ ४१ ॥ सप्तावरणेंसीं प्रचंड । आवो साधूनि उदंड । निर्माण केलें ब्रह्मांड । मयूरांड आकारें ॥ ४२ ॥ तस्मिन्नहं समभवं अण्डे सलिलसंस्थितौ । मम नाभ्यामभूत्पद्मं विश्वाख्यं तत्र चात्मभूः ॥ १० ॥ ऐसें ब्रह्मांड जें विद्यमान । त्यामाजीं मी नारायण । लीलाविग्रही झालों जाण । आपण्या आपण विश्वात्मा ॥४३ ॥ त्या माझे नाभीसी नाभिपद्म । विकासलें विश्वधाम । त्याहीमाजीं उत्तमोत्तम । आत्मभू नाम जन्मला ब्रह्मा ॥ ४४ ॥ नाहीं योनिद्वारा उदरगर्भू । मज आत्म्यापासूनि स्वयंभू । उपजला यालागीं आत्मभू । नामाचा शोभू ब्रह्मयासी ॥ ४५ ॥ ब्रह्मांड तो विराटदेहो । त्याचा मुख्य भाग विग्रहो । माझे नाभिकमळीं पहा हो । ब्रह्मदेवो जन्मला ॥ ४६ ॥ करावया लोकसर्जन । पद्मनाभाचे नाभीसी जाण । स्वयें जन्मला चतुरानन । रजोगुणप्राधान्यें ॥ ४७ ॥ सोऽसृजत्तपसा युक्तो रजसा मदनुग्रहात्‌ । लोकान्‌ सपालान्‌ विश्वत्मा भूर्भुवःस्वरिति त्रिधा ॥ ११ ॥ ब्रह्म रजोगुणप्रधान । नाभिकमळीं बैसोनि जाण । मी जन्ममूळ जो नारायण । त्यासी तो आपण देखेना ॥ ४८ ॥ स्वयें बैसल्या कमळासी । कमळमूळ न कळे त्यासी । देखे एकार्णव जळासी । रजोगुणेंसीं मोहित ॥ ४९ ॥ तें कमळमूळ पहावया बुडीं । एकार्णवीं घालोनि उडी । बुडतां दिवसांच्या कोडी । त्या मूळाची जोडी न लभेचि ब्रह्मा ॥ १५० ॥ तेथ निर्बुजला जळभयें । बाहेरि उसासे लवलाहें । कमळावरी बैसोनि पाहें । करावें काये स्मरेना ॥ ५१ ॥ धांव पाव गा अच्युता । निवारीं माझी जगदंधता । तुजवांचूनि सर्वथा । संरक्षिता मज नाहीं ॥ ५२ ॥ धांव पाव गा अच्युता । निवारीं माझी जगदंधता । तुजवांचूनि सर्वथा । संरक्षिता मज नाहीं ॥ ५२ ॥ ब्रह्मा माझे पोटींचें बाळ । रजें रजांध झालें केवळ । धरोनि ठेला नाभिकमळ । कृपा तत्काळ मज आली ॥ ५३ ॥ मज विश्वात्म्याचें अपत्य । जडत्वें राहिला तटस्थ । म्यां उपदेशिला तेथ । सृष्टिसर्जनार्थ तपोनिष्ठा ॥ ५४ ॥ महाकल्पादींचे मांडणी । माझिया अशरीरी वाणी । तप तप या दों वचनीं । उपदेशिला अग्रगणी चतुरानन ॥ ५५ ॥ यथोक्त तप करितां जाण । वृद्धि पावला सत्त्वगुण । त्याचिया सात्त्विकता पूर्ण । प्रत्यक्ष नारायण मी झालों ॥ ५६ ॥ काळत्रयीं अबाधिक । तूंचि विश्वात्मा निश्चित । हें चतुःश्लोकी भागवत । म्यां त्यासी तेथ उपदेशिलें ॥ ५७ ॥ माझिया उपदेशविधीं । हो‌ऊनियां समबुद्धी । कल्पकल्पांचिये अवधी । मोह त्रिशुद्धी बाधीना ॥ ५८ ॥ यापरी ब्रह्मा कल्पादी । पावला परम समाधी । प्रकटोनि निजात्मबुद्धी । सर्जनसिद्धी तेणें केली ॥५९ ॥ सुरासुर मानव पन्नागादिक । यांचे वसते तिन्ही लोक । सप्तपाताळ घरें देख । गोपुरें अलोलिक सप्तसंख्या ॥ १६० ॥ भूशब्दें पाताळलोक । भुवःशब्दें मृत्युलोक । स्वःशब्दें सर्गलोक । त्रिलोक देख यां नांव ॥ ६१ ॥ चतुर्दश भुवनें सकळ । तेथ वसते लोक लोकपाळ । तेंचि करोनियां विवळ । सांगे प्रांजळ श्रीकृष्ण ॥ ६२ ॥ देवानामोक आसीत्‌ स्वर्भूतानां च भुवः पदम्‌ । मर्त्यादीनां च भूर्लोकः सिद्धानां त्रितयात्परम्‌ ॥ १२ ॥ अधोऽसुराणां नागानां भूमेरोकोऽसृजत्प्रभुः । त्रिलोक्यां गतयः सर्वाः कर्मणां त्रिगुणात्मनाम्‌ ॥ १३ ॥ मागील श्लोकाचे अंतीं । भूर्भुवःस्वर इति । यापरी त्रिलोकी श्रीपती । जाण निश्चितीं बोलिला ॥ ६३ ॥ तेंचि पुढील श्लोकार्था । पाताळलोक होय चौथा । तो मृत्युलोक एकात्मता । जाण तत्त्वतां व्याख्यान ॥ ६४ ॥ इंद्रादि सकळ देवांसी । स्वर्ग निजमंदिर त्यांसी । यक्षरक्षभूतगंधर्वांसी । निवासासी अंतरिक्ष ॥ ६५ ॥ जेणें पाविजे निजमोक्षासी । जेथूनि गमन लोकांतरासी । ते कर्माभूमी मनुष्यासी । निजभाग्येंसी भूर्लोक ॥ ६६ ॥ त्रिलोकीवरतें जाण । सिद्ध वोळंगती आपण । तें सिद्धांचें सिद्धिस्थान । वसतें जाण निरंतर ॥ ६७ ॥ अतळ वितळ सुतळ । रसातळ महातळ । तळातळ आणि पाताळ । अधःसंख्या सकळ पाताळा ॥ ६८ ॥ सप्तपाताळीं अधिकारमेळू । अतळीं वसे मयपुत्र बळू । प्रतापें अतिप्रबळू । दैत्यमेळू समुदाय ॥ ६९ ॥ वितळीं वसे हाटकेश्वरू । जो उमाकांत कर्पूरगौरू । जेथिले हाटकनदीचा पूरू । सुवर्णसंभारूप्रवाही ॥ १७० ॥ सुतळीं महावैष्णव बळी । ज्याचा द्वारपाल वनमाळी । प्रल्हादही त्याचिजवळी । वैष्णवकुळीं नांदत ॥ ७१ ॥ त्रिपुर भेदूनि शंकरू । रसातळीं स्थापिला मयासुरू । तो मायालाघवी महावीरू । सपरिवारू वसताहे ॥ ७२ ॥ माहातळीं कद्रूसुत । जे विषधर क्रोधयुक्त । ते सर्प जाण समस्त । तेथ नांदत निजवासें ॥ ७३ ॥ तळातळीं नांदती दानव । निवातकवची वीर सर्व । फणिमुख्य राजगौरव । रचना अपूर्व ते ठायीं ॥ ७४ ॥ सातवे पाताळीं वसती नाग । शतसहस्त्र फणिगणभोग । वासुकिप्रभुख अनेग । पद्मिनीभोग भोगिती ॥ ७५ ॥ स्वर्गीं रंभा उर्वशी सुंदरी । कां पाताळीं पद्मिणी नारी । त्यांच्या सौंदर्याची थोरी । लोकांतरीं वाखाणे ॥ ७६ ॥ त्या तळीं तीं शतयोजनांवरी । शेष वसे सह्स्त्रशिरी । ज्याचा निजांगावरी । निद्रा करीं मी भगवंत ॥ ७७ ॥ त्याहूनि तळीं आत्यंतिक । अंधतामिस्त्रादि महानरक । त्याहीतळीं कूर्म देख । आवरणोदक तयातळीं ॥ ७८ ॥ ज्यांचा स्वर्गभोग होय क्षीण । अधोभोगाचें उरे पुण्य । तेणें पुण्यानुक्रमें जाण । सप्तपाताळीं जन जन्मती ॥ ७९ ॥ ज्याचे गांठीं पाप चोख । तो भोगी नाना नरक । ऐशी त्रिलोकी देख । चतुर्मुख स्वयें रची ॥ १८० ॥ ज्यांसीं निष्कामता नाहीं चित्तीं । जे स्वप्नीं न देखती विरक्ती । त्यांसी त्रिलोकीवरती गती । नाहीं निश्चितीं उद्धवा ॥ ८१ ॥ जे न करितीचि माझी भक्ती । जे नायकतीचि माझी कीर्ती । जे माझें रामनाम नुच्चरिती । भवबंधपंक्तिच्छेदक ॥ ८२ ॥ त्यांसी पुनः पुनः स्वर्गलोक । पुनः पुनः भोगिती नरक । पुनः पाताळ मृत्युलोक । नानायोनीं दुःख भोगिती ॥ ८३ ॥ जे त्रिगुणगुणी सदा सकाम । जे सर्वदा करिती सकाम कर्म । त्यांसी त्रैलोक्यबाहेरी निर्गम । त्रिगुणधर्म निघों नेदी ॥ ८४ ॥ सांगीतली पाताळविवंचना । आतां ऐक स्वर्गरचना । लोकीं लोकांतरगणना । समूळ जाणा सांगेन ॥ ८५ ॥ रविचंद्रप्रभा जेथवरी । तेथवरी पृथ्वीची थोरी । तळीं पाताळ स्वर्ग वरी । लोकलोकांतरीं निवास ॥ ८६ ॥ पायीं चालिजे तो भूलोक जोडे । येथूनि सूर्या‌ऐलीकडे । भुवर्लोकींची थोरी वाढे । तेथ वस्ती घडे यक्षरक्षगंधर्वां ॥ ८७ ॥ भुवर्लोकाहीवरी । सूर्यलोकाची वाढे थोरी । पृथ्वीपासूनि लक्षावरी । जाण निर्धारीं रविलोक ॥ ८८ ॥ वायूपासूनि चक्राकारीं । रविचंद्रतारालोक कुसरी । खेवणोनियां तयावरी । काळ सूत्रधारी भवंडीत ॥ ८९ ॥ त्या काळाहीवरी माझी सत्ता । माझेनि भेणें काळू तत्त्वतां । क्षणलवनिमिषावस्था । अधिकन्यूनता हो‌ऊं नेदी ॥ १९० ॥ नवल काळचक्रगती । मासां रवि चंद्र समान होती । सूर्या‌आड चंद्रासी गती । जाण निश्चितीं दिनद्वयें ॥ ९१ ॥ ते अमावास्याप्रतिपदेसी । चंद्र चंद्रमंडळीं सावकाशीं । सूर्यसमभागें गमन त्यासी । तें या लोकांसी दिसेना ॥ ९२ ॥ इतुक्यासाठीं ते दिवशीं । जीवें जित्या चंद्राशीं । नष्टत्व स्थापिती ज्योतिषी । तें लोकांसी सत्य मानें ॥ ९३ ॥ रवि चंद्र एकासनीं । सर्वथा नव्हती गमनीं । लक्षांतरें वसती दोन्ही । मंडळसमानीं मासांतीं गती ॥ ९४ ॥ रवि‌आड गती ज्या ग्रहासी । त्याचा अस्त सांगे ज्योतिषी । सत्य माने या लोकांसी । तो ग्रहो दृष्टीसी दिसेना ॥ ९५ ॥ दृष्टिसृष्टीचा जो न्यावो । तो ज्योतिषशास्त्रीं सत्य पहा हो । न दिसे त्याचा अस्तभावो । दिसे तो पहा हो पूजिती ॥ ९६ ॥ अभ्रा‌आड ग्रहण झालें । देखीलें तेथें पर्व फावलें । न दिसे ते देशीं नाहींच झालें । येणेहीं बोलें वर्तती ॥ ९७ ॥ रविचंद्रांहूनि आरती । राहुकेतूंची असे वस्ती । ते जैं मंडळा‌आड येती । तैं ग्रासिलें म्हणती रविचंद्रां ॥ ९८ ॥ राहू सूर्या गिळिता साचें । तैं तोंड जळतें राहूचें । मंडळीं मंडळ आड ये त्यांचे । हें सर्वग्रासांचें संमत ॥ ९९ ॥ सूर्य सूर्यमंडळीं राज्य करी । त्याच्या सर्वग्रासाची थोरी । ज्योतिषी सांगे घरोघरीं । तें देखोनि नरीं महाशब्द कीजे ॥ २०० ॥ सूर्यसर्वग्रासाचिया गोठी । जगीं एक बोंब उठी । शेखीं रवि-राहूंसी नाहीं भेटी । स्पर्शही शेवटीं असेना ॥ १ ॥ ग्रहचक्र वेगें चळतां पाहीं । रविचंद्रादिकां चालणें नाहीं । ते निश्चळ निजराज्याच्या ठायीं । न चालतां पाहीं चालती ॥ २ ॥ रविलोकाहूनि वरी । चंद्रलोक लक्षांतरीं । चंद्रलोकाहूनि दूरी । लक्षांतरीं तारालोक ॥ ३ ॥ तारालोकाहूनि वरी । बुधलोक दों लक्षांतरीं । बुधलोकाहूनि वरी । दों लक्षांतरीं शुक्रलोक ॥ ४ ॥ मिळोनियां दैत्यगण । ज्याच्या चरणां येती शरण । नित्य घालिती लोटांगण । तो शुक्राचार्य जाण दैत्यगुरु ॥ ५ ॥ शुक्रलोकाहूनि दों लक्षांतरीं । भौमलोक वसे अंबरीं । भौमलोकाहूनि दों लक्षांतरीं । देवगुरु करी निजवासू ॥ ६ ॥ ज्याचे चरण वंदिती देख । इंद्रचंद्रवरुणादि अर्क । नित्य येती आवश्यक । तो बृहस्पतिलोक गुरूचा ॥ ७ ॥ त्याहिवरी लक्ष दोनी । सूर्यसुत वसे शनी । लक्षांतरें तेथूनी । सप्त‌ऋषिजनीं निवासू ॥ ८ ॥ सप्त‌ऋषींची ऋषिपंक्ती । तेथेंचि वसे अरुंधती । यावरी वसे अमरावती । इंद्रसंपत्तीसमवेत ॥ ९ ॥ जेथ अंगें वसे इंद्र जाण । ऐरावती आरोहण । पार्षदगण मरुद्‌गण । सुरसेना जाण जयाची ॥ २१० ॥ उच्चैःश्रवा वारू जाण । कल्पतरूंचें उद्यान । कामधेनूंचें गोधन । नंदनवन क्रीडेसी ॥ ११ ॥ जेथींच्या पायर्यान चिंतामणी । रंभा उर्वशी विलासिनी । अष्टनायिका नाचणी । ज्याच्या रंगणीं नांदती ॥ १२ ॥ येणें वैभवें अमरावती । इंद्र तेथील अधिपती । येथूनि स्वर्गाचि समाप्ती । त्रैलोक्य निश्चितीं या नांव ॥ १३ ॥ आतां त्रैलोक्यबाहेरी । एक लक्ष योजनांवरीं । भक्तकृपाळू श्रीहरी । ध्रुवमंडळ करी कृपेने ॥ १४ ॥ त्रिलोकीं होतां प्रलयकाळ । ध्रुवासी कदा नव्हे चळ । तो सर्वदा अचळ । यालागीं अढळ ध्रुवपद ॥ १५ ॥ पृथ्वीपासोनि कोटि योजन । महर्लोक वसे जाण । तेथ वसती कल्पायु जन । तें वसतिस्थान तयांचें ॥ १६ ॥ तेथूनि कोटि योजनें देख । वरुता असे जनोलोक । तेथ वसती सनकादिक । ऊर्ध्वरेते देख महायोगी ॥ १७ ॥ तेथूनि दोन कोटि अधिक । वसताहे तपोलोक । तेथील निवासी आवश्यक । वैराजदेव देख तपस्वी ॥ १८ ॥ तपोलोकाहूनि देख । चौकोटी उंच अधिक । तेथ वसताहे सत्यलोक । तेथील नायक चतुरानन ॥ १९ ॥ तेथ मूर्तिमंत चारी वेद । मूर्तिमंत धर्म प्रसिद्ध । मूर्तिमंत ब्रह्मचर्य शुद्ध । तपही विशद मूर्तिमंत ॥ २२० ॥ गायत्री मूर्तिमंत तेथ । वाचा मूर्तिमंत वर्तत । दया मूर्तिमंत नांदत । योग मूर्तिमंत ब्रह्मसदनीं ॥ २१ ॥ तेथ अग्नि तिनी मूर्तिंमंत । ते एकरूपें त्रिधा भासत । सत्य सत्यलोकीं मूर्तिंमंत । असत्य तेथ असेना ॥ २२ ॥ ते लोकीं वसते कोण लोक । जे गायत्रीमंत्रजापक । जे ब्रह्मणतीर्थप्राशक । जे याग‌उपासक निष्काम ॥ २३ ॥ जे ब्राह्मणकार्यीं निमाले । जे गोसंरक्षणीं जीवें गेले । जे परोपकारार्थ वेंचले । ते पावले सत्यलोक ॥ २४ ॥ जे निष्काम द्विजां भजले । जिंहीं निष्काम द्विज पूजिले । जिंहीं निष्काम द्विज भोजिले । ते पावले सत्यलोक ॥ २५ ॥ जे कृपाळू दीनार्थ देख । कृपाळू बंधमोचक । जे सत्यवादी सात्त्विक । ते सत्यलोकनिवासी ॥ २६ ॥ जे परापवादीं मूक । परदारानपुंसक । जे परद्रव्या पराङ्‌मुख । ते सत्यलोकनिवासी ॥ २७ ॥ ऐसी सत्यलोकींची स्थिती । तेथींचा ब्रह्मा अधिपती । ब्रह्मसृष्टि याहीवरती । नाहीं निश्चितीं उद्धवा ॥ २८ ॥ ब्रह्मांडाहूनि वेगळा । कैलास निर्माण करी भोळा । वैकुंठ रची घनसांवळा । हे लोक स्वलीळा निर्मित ॥ २९ ॥ होतां ब्रह्मांडा घडामोडी । वैकुंठ कैलास न लगे वोढी । तेथील वस्तीची अभिनव गोडी । हरिहरभक्त फुडी जाणती ॥ २३० ॥ तेथ नाहीं काळाचें गमन । नाहीं कर्माचें कर्मबंधन । तेथ नाहीं जन्ममरण । हें भक्त अनन्य पावती ॥ ३१ ॥ वैकुंठकैलासरचना । सांगतां मन मुके मनपणा । ते लोकींची लोकलक्षणा । ऐक विचक्षणा सांगेन ॥ ३२ ॥ सकळ ब्रह्मांडाबाहेरी । माया‌आवरणाभीतरीं । वैकुंठ कैलास हरहरीं । स्वलीलेकरीं निर्मिजे ॥ ३३ ॥ सकळ जीवां सुखकरू । कैलासीं वसे शंकरू । जो कां पार्वतेपरमेश्वरू । जो योगेश्वरू योगियां ॥ ३४ ॥ जटाजूटी गंगाधर । पिनाकपाणी पंचवक्त्र । कर्पूरगौर गोक्षीर । अभयवरदकर निजभक्तां ॥ ३५ ॥ त्रिमात्रातीत त्र्यंबक । त्रिपुटीत्रिपुर त्रिपुरांतक । त्रिविधताप उच्छेदक । तिनी लोक सुखकारी ॥ ३६ ॥ नागभूषणीं शोभे लीला । रुद्राक्षयुक्त रुंडमाळा । नीळकंठ जाश्वनीळा । भस्मोद्धूलिधूसर ॥ ३७ ॥ त्रिशूळडमरांकित कर । त्रिनेत्र व्याघ्राजिन अंबर । रामनामीं अतितत्पर । करी निरंतर जपमाळा ॥ ३८ ॥ सहस्त्रबाहु बळिपुत्र बाण । श्रृंगी श्रृंगी चंडी पार्षद पूर्ण । साठी सहस्त्र रुद्रगण । कात्या त्रिशूळ जाण झेलती ॥ ३९ ॥ गणेश स्वामिकार्तिक । नंदी पंचमुख षण्मुख । वीरभद्रसेनानायक । जेणें लाविली सीक दक्षासी ॥ २४० ॥ भूत प्रेत पिशाचक । महाप्रथम ज्याचें सैन्यक । अवघे शिवांकित देख । शिवनामघोष गर्जती ॥ ४१ ॥ शंभु शिव शूली शंकर । उमाकांत कर्पूरगौर । भव भर्ग भवानीवर । कपर्दी ईश्वर महादेव ॥ ४२ ॥ हरहरशंकरनामोच्चारीं । धाकें कळिकाळ पळे दूरी । शिवनामें गर्जे सदा गिरी । गिरीश राज्य करी ते ठायीं ॥ ४३ ॥ जेथ शिवनामाचा उच्चार । तेथ सुखेंसीं तिष्ठे शंकर । भक्तकृपाळू ईश्वर । भोळा निरंतर भावार्थ्यां ॥ ४४ ॥ निजदासांचे त्रिगुण वैरी । छेदावया सदा त्रिशूळ करीं । निजडमरूच्या गजरीं । पापाची उरी उरों नेदी ॥ ४५ ॥ कैलासीं तृण तरु समस्त । पशु पक्षी जे जे तेथ । ते अवघेचि शिवांकित । सर्वरूपें समस्त शिवू नांदे ॥ ४६ ॥ यापरी ब्रह्मांडाबाहेरी । शिवू स्वलीला निर्माण करी । नेमूनियां कैलासगिरि । भरू राज्य करी भवानीशीं ॥ ४७ ॥ आतां वैकुंठींची स्थिती । ऐक सांगेन तुजप्रती । जे ऐकतां चित्तवृत्ती । स्वानंदस्फूर्ती वोसंडे ॥ ४८ ॥ उंस गाळूनि काढिजे सार । त्याची आळूनि कीजे साकर । तिचेही नाना प्रकार । करिती नानाकर अतिकुशळ ॥ ४९ ॥ तेवीं चैतन्यचि निश्चितें । मुसावूनि श्रीभगवंतें । वैकुंठ रचिलें तेथें । निजसामर्थ्यें नांदावया ॥ २५० ॥ स्वलीला सगुण साकार । सुकुमार अतिसुंदर । घनश्याम मनोहर । मूर्ति चिन्मात्र चोखडी ॥ ५१ ॥ शंख चक्र पद्म गदा । चारी भुजा सायुधा । डोळे लांचावले आनंदा । सगुण गोविंदा देखोनी ॥ ५२ ॥ मुकुट कुंडले मेखळा । कांसे पिंवळा सोनसळा । कौस्तुभ झळके गळां । आपाद वनमाळा शोभत ॥ ५३ ॥ चरणींची गंगा अतिपुनीत । जे जगातें पवित्र करित । ते माथां वाहे उमाकांत । निजस्वार्थ देखोनी ॥ ५४ ॥ त्या श्रीहरीचें पदद्वंद्व । वानितां मुका झाला वेद । अगम्य हरीचें निजपद । महिमा अगाध श्रीहरिचरणीं ॥ ५५ ॥ पाहतां मुकुंदाचें श्रीमुख । फिकें झालें जी पीयूख । डोळ्यां झालें परम सुख । धन्य श्रीमुख हरीचें ॥ ५६ ॥ ज्याचें निमेषार्ध देखिल्या मुख । हारपे कोटि जन्मांचें दुःख । त्रिलोकीं न माय हरिख । धन्य श्रीमुख हरीचें ॥ ५७ ॥ ज्याचा देखिलिया वदनेंदू । बांधू न शके द्वंद्वबाधू । चढता वाढता परमानंदू । स्वानंदकंदू जगाचा ॥ ५८ ॥ जयाची विक्षेपभ्रुकुटी । रची ब्रह्मांडें उठा‌उठी । ज्याचे रोमकूपीं ब्रह्मांडे कोटी । तो हरि वैकुंठीं नांदत ॥ ५९ ॥ ज्याची झालिया कृपादृष्टी । अहंकाराची विरे गांठी । दुसरें दिसों नेदी सृष्टीं । तो हरि वैकुंठीं नांदत ॥ २६० ॥ जया दादुल्याचें नाम । निर्दाळी गा मरणजन्म । समूळ उपडी कर्माकर्म । तो पुरुषोत्तम नांदत ॥ ६१ ॥ ते वैकुंठीं पाहतां साचार । अवघे चतुर्भुज नर । घनश्याम पीतांबरधर । शंख चक्र अवघ्यांसी ॥ ६२ ॥ अवघ्यांचें एक स्वरूप । अवघे दिसती एकरूप । जेथ हरि नांदे स्वयें सद्‌रूप । तेथ कोणी कुरूप दिसेना ॥ ६३ ॥ तेथ नाहीं आधी व्याधी । नाहीं विषयवार्ता उपाधी । स्त्रीपुरुषां समान बुद्धी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥ ६४ ॥ तेथ नाहीं तहानभूक । नाहीं कामक्रोध द्वंद्वदुःख । नाहीं जन्ममरण निःशेख । ऐसा वैकुंठलोक नांदत ॥ ६५ ॥ लक्ष्मीनें करावें अवलोकन । यालागीं कष्टती सुरगण । ते लक्ष्मी अंगें आपण । करी संमार्जन वैकुंठी ॥ ६६ ॥ ते वैकुंठीं जनन्नाथ । उद्धरावया निजभक्त । स्वलीला असे नांदत । दीनकृपायुक्त दयाळू ॥ ६७ ॥ अंतीं नाममात्र घेतल्यासाठीं । उद्धरल्या जीवकोटी । तो स्वामी श्रीविष्णु वैकुंठी । दीनकृपादृष्टी नांदत ॥ ६८ ॥ जैसा ज्यासी भावार्थ । तैसा पुरवी मनोरथ । पढिये पंचम पुरुषार्थ । तो हरी नांदत वैकुंठीं ॥ ६९ ॥ लोकलोकांतरगणना । ब्रह्मांडसंख्या अवघी जाणा । वैकुंठकैलासरचना । समूळ विवंचना सांगितली ॥ २७० ॥ लोक सांगीतले भिन्न । तेथील प्राप्तीचे कोण जन । ऐसें कल्पील तुझें मन । ते अर्थीं निरूपण अवधारीं ॥ ७१ ॥ महर्जनतपःसत्यलोक । वैकुंठरचना अलोलिक । तेथील प्राप्तीचे कोण लोक । ते यदुनायक सांगत ॥ ७२ ॥ योगस्य तपसश्चैव न्यासस्य गतयोऽमलाः । महर्जनस्तपः सत्यं भक्तियोगस्य मद्‌गतिः ॥ १४ ॥ निश्चळ करावया निजचित्ता । साधिली प्राणापानसमता । षट्चक्रें भिदूनि तत्त्वतां । पुढें निजात्मता पावावी ॥ ७३ ॥ तंव आयुष्या झालें अस्तमान । निजांगीं आदळे मरण । ऐसे निमाले जे योगीजन । त्यांसी ऊर्ध्व गमन महर्जनादि लोकीं ॥ ७४ ॥ जो गृहस्थाश्रमी ब्रह्मचारी । ब्रह्मचर्यनेमें व्रतधारी । जो स्वप्नींहीं नातळे नारी । जो भिक्षाहारी सर्वदा ॥ ७५ ॥ जो सदा धडधडीत विरक्ती । एक भिक्षा न धरी हातीं । सद्‌गुरूचिया सेवा करिती । आत्मज्ञानप्राप्ती पावावया ॥ ७६ ॥ जे संधीं व्हावें आत्मज्ञान । ते संधीसी आलें मरण । ऐशा ब्रह्मचारियासी जाण । ऊर्ध्व गमन महर्जनादि लोकीं ॥ ७७ ॥ जे गृहस्थाश्रमीं नेटक । जे अग्निसेवे साग्निक । जे स्वधर्में चित्तशोधक । जे सेवक द्विजदेवां ॥ ७८ ॥ जे भूतदयाळू भाविक । जे सत्यवादी सात्त्विक । जे निजात्मज्ञानसाधक । जे अवंचक गुरुभजनीं ॥ ७९ ॥ गुरुकृपा साधूनि ज्ञान । पावावें ब्रह्म सनातन । तंव वेंचलें आयुष्यधन । अंगीं निधन आदळलें ॥ २८० ॥ तेणें खोळंबली ब्रह्मप्राप्ती । परी ऊर्ध्वलोकीं होय गती । जैसी उपासना विरक्ती । तेणें तारतम्यें जाती महर्जनादि लोकीं ॥ ८१ ॥ जे वनवासी वानप्रस्थ । जे वैराग्यें अतिविरक्त । जे कंदमूळफळीं तृप्त । जे सदा नेमस्त आश्रमधर्मीं ॥ ८२ ॥ वर्षाकाळीं आसारीं राहे । हेमंतीं जळाशयें । उष्णकाळीं पंचाग्नी साहे । तपश्चर्या वाहे अतिनिष्ठा ॥ ८३ ॥ शरिरशोषणाचें पाहे । सर्वथा न धरी भये । स्वार्थाचेनि लवलाहें । तपोनिष्ठा साहे दारुण ॥ ८४ ॥ वैराग्य साधूनि पूर्ण । करावें संन्यासग्रहण । साधावया ब्रह्मज्ञान । तेचि काळीं मरण वोढवलें ॥ ८५ ॥ ऐसोनि देहान्तस्थिती । त्यासी ऊर्ध्वलोकीं होय गती । महर्जनतपोलोकप्राप्ती । तारतम्यस्थिती उपासना ॥ ८६ ॥ जो समूळसंकल्पसंन्यासी । लोकलोकांतर न घडे त्यासी । हें न टकेचि गा जयासी । आणि झाले संन्यासी विधियुक्त ॥ ८७ ॥ जे कां पोटींहून अतिविरक्त । स्वप्नीं धातूंसी न लाविती हात । जे यतिधर्मीं सदा निरत । जे सदा जपत प्रणवातें ॥ ८८ ॥ अंगीकारिले आश्रमविधी । उबगू न मानी जो त्रिशुद्धी । मरणीं डंडळीना बुद्धी । त्या गमनसिद्धी सत्यलोकीं ॥ ८९ ॥ ऐसे सत्यलोकातें पावती । तेथील्या भोगांची ज्यां विरक्ती । ते ब्रह्म्यासवें मुक्त होती । येर ते येती माघारे ॥ २९० ॥ ज्यांसी सत्यलोकीं भोगासक्ती । तेही खचोनि माघारे येती । इतर लोकांची कोण गती । पुनरावृत्ती सोडीना ॥ ९१ ॥ जेथवरी भोगासती । तेथवरी पुनरावृत्ती । जेथ भोगाची निवृत्ती । तेथ चारी मुक्ती आंदण्या ॥ ९२ ॥ ज्यां लोकीं ज्या भोगविरक्ती । तेथून ते पुढारे जाती । जे लोकीं ज्या भोगासक्ती । ते खचोनि पडती भूलोकीं ॥ ९३ ॥ तैसी नव्हे माझी भक्ती । भक्तां नाहीं इतर प्राप्ती । मद्‌भक्तां माझी गती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ९४ ॥ जे सकाम माझी सेवा करिती । त्यांसी कामनाफळीं पडे वस्ती । ज्यांसी निष्काम माझी भक्ती । त्यांसी माझी प्राप्ती अनन्य ॥ ९५ ॥ सकाम भक्तांचे पुरवूनि काम । त्यांसी मी करीं नित्य निष्काम । निजभक्तांसी निजधाम । मी पुरुषोत्तम पाववीं ॥ ९६ ॥ यालागीं गोपींची कामासक्ती । म्यांचि आणूनि निष्कामस्थिती । त्यांसी दिधली सा‌उज्यमुक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ९७ ॥ म्यां गोपिकांसी कामू केला । कीं निःशेष कामू त्यांचा हरिला । न विचारितां या बोला । कृष्ण व्यभिचारला मूर्ख म्हणती ॥ ९८ ॥ सलोकता आवडे भक्तांसी । तैं मी करीं वैकुंठवासी । भक्त मागे समीपतेसी । करीं मी तयासी जिवलग ॥ ९९ ॥ हितगुज अळोंच्यासी । हृदयींचें गोड सांगावयासी । उद्धवा तूं जैसा आवडसी । ऐशीच त्यांसीं करीं प्रीति ॥ ३०० ॥ भक्त मागे सरूपता । त्यासी मी दें चतुर्भुजता । शंखचक्रादि सायुधता । घनश्यामता सुरेख ॥ १ ॥ मुकुट कुंडलें मेखळा । कांसे मिरवे सोनसळा । वांकी तोडरू चरणकमळा । कौस्तुभ गळां मत्सम ॥ २ ॥ ठाणमाण गुणलक्षण । वीर्य शौर्य गांभीर्य पूर्ण । रूप रेखा समसमान । दोघेही अनन्य सरूपता ॥ ३ ॥ रमा दोघांसी एकत्र देखे । देवो कोण हें ते नोळखे । पार्षदक्रिया ठकलीं ठाके । कोणासी सेवकें सेवावें ॥ ४ ॥ छत्रधरू चवके चित्तीं । कोणावरी धरूं छत्री । चवरधरें चवरें हातीं । कोणाप्रती विंजावें ॥ ५ ॥ नमना येती ब्रह्मादि देव । तेही मानिती अति‌अपूर्व । दोंमाजीं कोण आदिदेव । त्यांसीही स्वयमेव कळेना ॥ ६ ॥ जेवीं दीपें दीपू लाविला । न कळे वडील कोण धाकुला । तेवीं माझी सरूपता पावला । न वचे ओळखिला आनासी ॥ ७ ॥ जेवीं आरिशाचें प्रतिबिंब । दिसे समरूपें स्वयंभ । तैशी सरूपतेची शोभ । सम विडंब दोहींचा ॥ ८ ॥ देवो हो‌ऊनियां प्रसन्न । आपली सरूपता दे संपूर्ण । नेदी हृदयींचा द्विजचरण । श्रीवत्सलांछन अविनाशी ॥ ९ ॥ श्रीवत्स चिन्ह द्यावयासी पाहीं । विष्णु म्हणे मज सामर्थ्य नाहीं । तें असे ब्राह्मणाच्या पायीं । त्याचा चरण हृदयीं धरिल्या लाभे ॥ ३१० ॥ सरूपतेमाजीं जाण । देवा-भक्तांची हे खूण । ज्याचे हृदयीं श्रीवत्सलांछन । तो स्वामी श्रीविष्णु जाण सर्वांचा ॥ ११ ॥ ऐशी सरूपता जरी झाली प्राप्त । तरी हा देवो मी एक भक्त । हा भिन्नत्वाचा भेद किंत । त्या‌आंत उरला असे ॥ १२ ॥ देवभक्तांमाजीं भेदू । भिन्न सरूपतासंवादू । जंव नाहीं अद्वयबोधू । तंव परमानंदू प्रकटेना ॥ १३ ॥ सांडूनि भिन भेदवार्ता । भक्त मागे सायुज्यता । ते गोड निरूपणकथा । तेथील स्वादता मी जाणें ॥ १४ ॥ सायुज्याचें गोडपण । माझें मी जाणें आपण । उद्धवा तुज तेंही जाण । साङ्ग संपूर्ण सांगेन ॥ १५ ॥ देह सरूपता सारिखेपण । हृदयीं भिन्न मीतूंपण । ऐशियेही मुक्तीसी जाण । भक्त सज्ञान नातळती ॥ १६ ॥ मी हो‌ऊनियां मातें । भजन स्वतःसिद्ध आ‌इतें । तें सांडूनियां भेदातें । निजभक्त चित्तें नातळती ॥ १७ ॥ देवेंसी भक्त अनादिसिद्ध । ठायीं मूळींहून अभेद । तेथ दाटूनि जो धरी भेद । तो भक्तिमंद मायिक ॥ १८ ॥ आर्त जिज्ञासु आणि अर्थार्थी । हे भेद केले मायिका भक्ति । जे अभेदभावें मज भजती । सायुज्यमुक्ती तयांसी ॥ १९ ॥ ज्यांसी रावो रंक समान । वंद्य निंद्य न मनी मन । जे न धरिती देहाभिमान । सायुज्य जाण तयांसी ॥ ३२० ॥ जैशी आपुली सा‌उली । मिथ्या आपणासवें लागली । तैशी देहबुद्धि ज्यांसी झाली । त्यांसी फावली सायुज्यता ॥ २१ ॥ जन्मूनि छाया सरिसी वाढे । माझी हे ममता नुठी पुढें । ऐसे देहाचें न बाधी सांकडें । सायुज्य रोकडें तयासी ॥ २२ ॥ सांडूनि देहाची विषयासक्ती । जो करी भावें अभेदभक्ती । त्यासीचि सायुज्यमुक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ २३ ॥ ज्यासी देहीं नुठी मीपण । भूतमात्रीं न देखे तूंपण । त्यासी सायुज्यमुक्ति जाण । साङ्ग संपूर्ण सांपडे ॥ २४ ॥ जेवढी मज आत्म्याची व्यक्ती । तेवढीच त्याची प्रतीती । त्यासीच सायुज्यता मुक्ती । सहज आपैती उद्धवा ॥ २५ ॥ त्यासी विष्णुस्वरूप व्हावा देहो । हा सर्वथा नुपजे अहंभावो । त्यासी विष्णुसगट स्वदेह वावो । यालागीं सारूप्य पहा हो वांछीना ॥ २६ ॥ निजविवेकें पाहतां ठायीं । देहो तितुका मिथ्या पाहीं । तेथ सारूप्यता कोणें ठायीं । सज्ञानीं कायी मागावी ॥ २७ ॥ सायुज्यता आलिया हाता । वस्तूवीण ठावो नाहीं रिता । सकळ भूतीं एकात्मता । सायुज्य तत्त्वतां या नांव ॥ २८ ॥ सकळ रूपें नांदतें जग । तें जो जाणे आपुलें अंग । आपण सर्वात्मा अभंग । त्यासीच साङ्ग सायुज्य ॥ २९ ॥ मी एक सबाह्याभ्यंतरीं । मी एक जंगमीं स्थावरीं । मीचि आत्मा चराचरीं । जाण त्याचे घरीं सायुज्य नांदे ॥ ३३० ॥ मीचि एक एकला । एकपणेंचि संचला । ज्यासी द्वैताचा दुष्काळ पडिला । सत्य पावला सायुज्य ॥ ३१ ॥ एवं भावार्थाच्या अतिप्रीतीं । जें जें निजभक्त वांछिती । तें तें मे पुरवीं श्रीपती । चारी मुक्ती भक्तांसी ॥ ३२ ॥ यावेगळे माझे प्रिय भक्त । भक्तिप्रतापें प्रतापवंत । भजनशौर्य अति‌अद्‌भुत । निष्काम निरत मद्‌भजनीं ॥ ३३ ॥ आर्त जिज्ञासु अर्थार्थी । या कल्पना न धरोनि हातीं । नित्य निष्काम अतिप्रीतीं । मज भजती महाभाग ॥ ३४ ॥ नेघती सालोक्य सामीप्य सरूपता । शेखीं न मागती सायुज्यता । निष्काम भजतीं भगवंता । भक्ती तत्त्वतां या नांव ॥ ३५ ॥ नवल भजनाची परवडी । आवडीतें प्रसवे आवडी । क्षणोक्षण चढोवढी । नित्य नूतन गोडी प्रेमाची ॥ ३६ ॥ माझिया आवडीं तत्त्वतां । सर्वस्वें वेंचित जीविता । कदा पालट नव्हे चित्ता । भावार्थतां विश्वासी ॥ ३७ ॥ मीच एक देवाधिदेवो । सर्वभूतीं माझाचि भावो । विकल्प विकृति संदेहो । घालितां पहा हो उपजेना ॥ ३८ ॥ नवल भावार्थाची थोरी । मद्‌भावें देखे नरनारी । श्वानसूकरादि आकारीं । नमस्कारी मद्‌भावें ॥ ३९ ॥ नवल त्याची भजनख्याती । सायुज्याचि चारी मुक्ती । माझ्या नांवावरूनि ओंवाळिती । भक्ती पढियंती येणें पाडें ॥ ३४० ॥ मांडल्या अतिविघ्न सांकडें । ग्लानी न करिती आणिकांकडे । जाणती रामनामापुढें । विघ्न बापुडें ते कायी ॥ ४१ ॥ गगन पडों पाहे कडाडें । पृथ्वी उलथावया गडबडे । ऐसें मांडलिया सांकडे । नाम पढे श्रीहरीचें ॥ ४२ ॥ ऐशी देखोनि अनन्य प्रीती। मी सर्वस्वें भुललों श्रीपती । मग न पाहतां कुळ जाती । त्याच्या घराप्रती मी धांवें ॥ ४३ ॥ ते न घेती वैकुंठींची वाट । त्यांचें घरचि मी करीं वैकुंठ । तेथें चिन्मात्रें फुटे पाहांट । पिके पेंठ संतांची ॥ ४४ ॥ उपनिषदें येती तयांपाशीं । स्वधर्म ये सुखवस्तीसी । नारदादि सनकादिकांसी । तया घरासी अतिप्रीती ॥ ४५ ॥ गर्जती नामाचे पवाडे । माझी कीर्ति गाती वाडेंकोडें । माझ्या रामनामापुढें । द्वंद्वाचें उडे बाधकत्व ॥ ४६ ॥ ऐशी देखोनि माझी भक्ती । वोरसोनियां निजशांती । धांवोनि ये तयांप्रती । वोळली मागुती जावों विसरे ॥ ४७ ॥ त्यांसी छळों ये जें जें दूषण । तें तें त्यांसी होय भूषण । माझे भक्तीचें प्रसन्नपण । जाण संपूर्ण या नांव ॥ ४८ ॥ तेथ सायुज्यादि चारी मुक्ती । त्यांचे सेवेसी स्वयें येती । ते जेथ विषय सेवूं जाती । तेथ सायुज्यमुक्ती सेवा करी ॥ ४९ ॥ ऋद्धिसिद्धि त्याच्या घरीं । हो‌ऊनि राहती कामारी । तरी तो सिद्धींची चाड न धरी । माझे भक्तीवरी निश्चयो ॥ ३५० ॥ ऐशी देखोनि निश्चयें भक्ती । मीही करीं अनन्य प्रीती । भक्त जे‌उती वास पाहती । ते‌उता मी श्रीपती स्वयें प्रकटें ॥ ५१ ॥ भक्त स्वभावें बोलों जाये । त्याचें बोलणें मीचि होयें । त्याचे बोलण्या सबाह्यें । मीचि राहें शब्दार्थें ॥ ५२ ॥ तो कौतुकें खेळे खडे । ते खडेचि मज होणें घडे । तो कृपाळु पाहे जयाकडे । त्याचे छेदीं मी गाढे भवबंध ॥ ५३ ॥ तो वास पाहे जेणें मोहरी । ते‌उती मी सुखाची सृष्टी करीं । तो म्हणे जयातें उद्धरीं । तो मी स्वपदावरी बैसवीं ॥ ५४ ॥ त्यासी अल्पही विचंबू पावे । तो सर्वांगें मी करूं धांवें । त्याचें नाम जिंहीं स्मरावें । त्यांसी म्यां तारावें सर्वथा ॥ ५५ ॥ जेवीं तान्हयालागीं माता । तेवीं भक्तांची मज चिंता । त्यांची सेवाही करितां । मी सवर्था लाजेंना ॥ ५६ ॥ माता बाळकाचें पुरवी कोड । तैसे ते माझे लळेवाड । त्यांचें प्रेमचि मज गोड । उपचारचाड मज नाहीं ॥ ५७ ॥ मी शरीर तो माझा आत्मा । प्रेमळ असे पढिया आम्हां । प्रेमळावरती सीमा । भक्तीचा महिमा चढेना ॥५८ ॥ त्यासी झणें काळ संहारी । यालागीं त्या आंतबाहेरी । मी निजांगाचें दुर्ग करीं । ऐशी प्रीति पुरी प्रेमळाची ॥ ५९ ॥ तेथ काळाचेनि हटतटें । लावूनि ब्रह्मस्थितीचे वाटे । माझे भक्त नेटेंपाटें । आपणिया आंतवटें स्वसुखें वसवीं ॥ ३६० ॥ त्याचें स्वाभाविक कर्म जाण । तें माझे प्रीतींचे पूजन । तो देखे तें माझें दर्शन । त्याची चावटी तें स्तवन खुणेचें माझें ॥ ६१ ॥ तो स्वयें करी आरोगण । तेंचि मज नैवेद्य‌अर्पण । त्याची निद्रा ते जाण । समाधि संपूर्ण पैं माझी ॥ ६२ ॥ त्याचा निमेषोन्मेषांचा व्यापार । तो मज अत्यंत प्रियकर । त्याचे श्वासाचे परिवार । मज अपार सुखविती ॥ ६३ ॥ भक्तांची शरीरस्वभावस्थिती । तेणें मी सुखावें श्रीपती । ऐसे सप्रेम भक्त आवडती । माझी अनन्यप्रीती मद्‌भक्तां ॥ ६४ ॥ चारी पुरुषार्थां नातळती । उपेक्षूनि चारी मुक्ती । सप्रेम करिती माझी भक्ती । मजचि पावती मद्‌भक्त ॥ ६५ ॥ गंगा सागरीं मीनली मिळे । मीनली त्याचीच त्यावरी लोळे । तैसा भक्त मिळोनि भावबळें । माझे भक्तीचे सोहळे मजमाजीं भोगी ॥ ६६ ॥ जेवीं कां भरें तरुणांगी । तरुणपण भोगी सर्वांगीं । तेवीं भक्त मिळोनि मजलागीं । माझे भक्तीचें भोगी वैभव ॥ ६७ ॥ कां सतरावीचें गोडपण । चंद्र जाणे आपुलें आपण । तेवीं मी हो‌ऊनि माझें भजन । भक्त सज्ञान जाणती ॥ ६८ ॥ जातिस्वभावें उदक एक । तेंचि गंगा यमुना नांवीं देख । प्रयागसंगमीं उद्धरी लोक । तेवीं भक्त भाविक मद्योगें ॥ ६९ ॥ तेवीं माझे भक्त मज मिळून । अनन्य करिती माझे भजन । येथ भाविक सात्त्विक अतिदीन । उद्धरती जाण मद्योगें ॥ ३७० ॥ पृथ्वी निधानें भरली आहे । परी पायाळेंवीण प्राप्ती नोहे । तेवीं आत्मा स्वतः सिद्ध आहे । गुरुकृपा लाहे तैं प्राप्ती ॥ ७१ ॥ चहूं पुरुषार्थातें त्यागिती । चारी मुक्ति उपेक्षिती । पंचम पुरुषार्थाची भक्ती । मज पढियंती उद्धवा ॥ ७२ ॥ येचि भक्तीचें मज कोड । हेचि भक्त माझे लळेवाड । मज अवाप्तकामा त्यांची चाड । ऐसें प्रेम गोड तयांचें ॥ ७३ ॥ आम्ही प्रेमाचे पाहुणे । भावार्थाचे आंदणे । म्यां अनन्याची सेवा करणें । जीवेंप्राणें सर्वस्वे ॥ ७४ ॥ माझें नाम आत्माराम । मी अवाप्तसकळकाम । परी प्रेमळांलागीं सकाम । ऐसें गोड प्रेम तयांचें ॥ ७५ ॥ मग आपुलिये संवसाटीं । प्रेमळू घें मी उठा‌उठी । वरीव सुखही दें शेवटीं । मज प्रीति मोटी प्रेमाची ॥ ७६ ॥ प्रेम मजसीं मोलें अधिक । संवसाटी करितां नव्हे देख । यालागीं वरीव देतां सुख । न ये तैं सेवक सेलेचा होय ॥ ७७ ॥ प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण । भावार्थाची उणखूण । जाणता मी एक श्रीकृष्ण । इतरांसी जाण कळेना ॥ ७८ ॥ मज गोपिकांची कोण गोडी । त्यांच्या प्रेमाची जाति चोखडी । यालागीं मज त्यांची आवडी । अतिगाढी उद्धवा ॥ ७९ ॥ कुब्जा काय सुंदर होती । तिच्या प्रेमाची मज प्रीती । राधा प्रार्थीं मी वनाप्रती । काय विषयासक्तीलागूनी ॥ ३८० ॥ कोण भक्ती केली गोपाळीं । काय तीं सोंवळीं कीं ओंवळीं । त्यांचे उच्छिष्ट कवळ मी गिळीं । प्रेमसंमेळीं डुल्लत ॥ ८१ ॥ पांडवांच्या बाचें मी काय लागें । त्यांचीं वेवटें सोशीं अनेगें । मी सुदाम्याच्या पायां लागें । काय त्याचेनि पांगें पांगलों ॥ ८२ ॥ मी काय अन्नासी दुकाळलों । तो यज्ञपत्न्यां सीं मागों गेलों । मी भावार्थाचा भुकेलों । प्रेमाच्या पावलों पाहुणेरा ॥ ८३ ॥ माझी काय क्षीण झाली शक्ती । मज गोपिका दावीं बांधिती । त्यांच्या निजप्रेमाची जाती । मी स्वयें श्रीपती पोखितू ॥ ८४ ॥ मी न लागतां कोणाची कवडी । अर्जुनाचीं धूतसे घोडीं । धर्माघरीं उच्छिष्टें काढीं । मज अति‌आवडी प्रेमाची ॥ ८५ ॥ मज प्रेमळांची अति‌आवडी । ते लोकेषणालाज दवडी । महत्त्वाच्या विसरवी कोडी । त्यांचा सेवेची जोडी मजलागीं ॥ ८६ ॥ सकळ अळंकार ले‌ऊनि माता । निजपुत्र मस्तकीं लाडवितां । त्याच्या कंटाळेना थुंकमुता । तेवीं प्रेमळें सर्वथा मजलागीं ॥ ८७ ॥ ऐसा प्रेमाचेनि अतिपांगें । म्यां पंगिस्त हो‌इजे श्रीरंगें । यालागीं तया पुढेंमागें । सदा सर्वांगें तिष्ठत ॥ ८८ ॥ उद्धवा यादवा समस्त । असतां माझें बहुत गोत । तूंचि प्रियकर मज जो येथ । माझें प्रेम अद्‌भुत तुजलागीं ॥ ८९ ॥ हे ऐकोनि देवाची गोठी । उद्धवें पायीं घातली मिठी । देवो सुखावोनि पोटीं । उठा‌उठी आलिंगी ॥ ३९० ॥ हृदयीं हृदय जाले संलग्न । देहीं देहा पडिलें आलिंगन । मनेंसीं एक झालें मन । स्वानंद पूर्ण वोसंडे ॥ ९१ ॥ देवो विसरला देवपण । भक्ता नाठवे भक्तगण । दोघांचें उडालें दोनीपण । स्वानंदीं पूर्ण बुडाले ॥ ९२ ॥ सेव्यसेवकता ठेली गोठी । द्वैतभावाची खुंटली दृष्टी । भक्तिसाम्राज्याच्या पाटीं । दोघां झाली भेटी निजात्मता ॥ ९३ ॥ स्थूळ लिंग आणि कारण । इंहीं उपलक्षिजे माहाकारण । ते देहचतुष्टयाची आठवण । आठवितें कोण ते ठायीं ॥ ९४ ॥ तेथ निबिड आणि निघोट । सुखस्वरूप घनदाट । नाहीं आदि मध्य शेवट । तें झालें प्रकट स्वयंभ ॥ ९५ ॥ नवल देवाचें पूर्णपण । तेथही लाघव केलें जाण । मोडों नेदीचि उद्धवपण । ऐसा भक्त आन मज मिळेना ॥ ९६ ॥ उद्धवा‌ऐसा मजपाशीं । कोण मिळेल अळोंचासी । माझे निजगोड कोणापाशीं । म्यां सावकाशीं सांगावें ॥ ९७ ॥ मज निजधामा गेलिया जाण । माझें जें निःसीम निजज्ञान । त्यासी उद्धव शुद्ध सांठवण । यालागीं उद्धवपण राखिलें ॥ ९८ ॥ उद्धव स्वानंदी निमग्न । त्यासी थापटूनि आपण । सावध करी श्रीकृष्ण । येरा भक्तपण आठवलें ॥ ९९ ॥ म्हणे जय जय श्रीकृष्णनाथा । जें मज सुख दाविलें आतां । तें नित्य निर्वाहे सर्वथा । ऐशी कृपा तत्त्वतां करावी ॥ ४०० ॥ तंव श्रीकृष्ण म्हणे उद्धवा । हा माझा निजगुह्य गोप्य ठेवा । तुज म्यां सांगीतला कणवा । पुरुषार्थ पांचवा या नांव ॥ १ ॥ हें वेदशास्त्रां अगम्य । सकळ देवांसी अतिदुर्गम । जेणें लुब्धें मी पुरुषोत्तम । तें हें भक्त प्रेमरहस्य ॥ २ ॥ मज वश्य करावयाचें वर्म । पोटीं धरावें भक्तिप्रेम । चहूं मुक्तींचा पडे भ्रम । पुरुषार्थकाम वोसरे ॥ ३ ॥ ज्यासी माझी सप्रेम भक्ती । त्याचेनि नांवें विघ्नें पळती । मजवेगळी अन्यथा गती । करावया प्राप्ती कोणाची ॥ ४ ॥ जयासी माझी अनन्य भक्ती । तेथ माझी पूर्ण कृपास्थिती । मद्‌भक्तां मजवेगळी गती । कदा कल्पांतीं असेना ॥ ५ ॥ वेदविधीं करावा बाधू । तो निःश्वसित माझा वेदू । जेथ माझा पूर्ण कृपाबोधू । तेथ विधिवादू बाधीना ॥ ६ ॥ जे कां माझे भक्त सकाम । ते फळभोगांतीं हो‌ऊनि निष्काम । तेही ठाकिती माझें निजधाम । भक्तां अन्यगमन असेना ॥ ७ ॥ ज्यासी माझें अनन्य भजन । स्वकर्म त्याचे सेवी चरण । विधिवेदू वोळंगे अंगण । त्यासी अन्यथागमन असेना ॥ ८ ॥ जेथ सप्रेम नाहीं माझी भक्ती । तेथ कर्में अवश्य बाधती । कर्मास्तव अन्यथागती । अभक्त पावती उद्धवा ॥ ९ ॥ जेथ माझी साचार भक्ती । तेथ कर्माची न चले गती । मद्‌भक्तां माझी प्राप्ती । सत्य निश्चितीं या हेतू ॥ ४१० ॥ भक्तांसी सर्वांभूतीं मद्‌भावो । तेथ कर्मबंधा कैंचा ठावो । कर्मानुगती खुंटली पहा हो । मत्प्राप्ति स्वयमेवो मद्‌भक्तां ॥ ११ ॥ भक्त पा‌ऊल ठेवी अवनीं । परी म्यां ठेविलें न धरी मनीं । कर्ता भगवंत सत्य मानी । यालागीं कर्मबंधनीं बांधवेना ॥ १२ ॥ भक्तांस नाहीं अन्यथा गती । मद्‌भक्तां माझी अनन्य प्रीती । त्या भक्तभावार्थाच्या युक्ती । विशद श्रीपती स्वयें केल्या ॥ १३ ॥ ‘न मे भक्तः प्रणश्यति’ । हें बोलिला अर्जुनाप्रती । तें साचार बिरुद श्रीपती । तो भक्तां अन्यगती घडोंचि नेदी ॥ १४ ॥ भक्तशापाची ऐकतां गोठी । देवो कैवारें सवेग उठी । सुदर्शन लावूनि पाठी । केला हिंपुटी दुर्वासा ॥ १५ ॥ एका अंबरीषाकारणें । दहा गर्भवास सोशिले जेणें । तो अनन्य भक्तांसी उणें । कोण्याही गुणें येवों नेदी ॥ १६ ॥ भक्तकैवारी श्रीकृष्ण । हे भावार्थाची निजखूण । एका जनार्दना शरण । भावो प्रमाण भक्तीसी ॥ १७ ॥ शुद्धभावेंवीण जे भक्ती । तेचि दांभिक जाण निश्चितीं । ते अपक्वचि राहे प्राप्ती । जेवीं कांकड जाती मुगांची ॥ १८ ॥ ‘भक्तियोगस्य मद्‌गतिः’ । हे मूळपदींची पदस्थिती । तेंचि वाढविलें किती । ऐसें श्रोतीं न म्हणावें ॥ १९ ॥ ‘मद्‌गती’ या पदाची व्युत्पत्ती । कोण आहे जाणे किती । हें रहस्य जाणे विरळा क्षितीं । यालागीं क्षमा श्रोतीं करावी ॥ ४२० ॥ हो कां भक्ती माझी निजजननी । ज्यां प्रेमपान्हां ये वाढवूनी । सरता केलों भगवद्‌भजनीं । ते म्यां गौण महिमेनीं वानिली ॥ २१ ॥ भगवद्‌भक्तीचें महिमान । मी केवीं जाणें अज्ञान । जें बोलिलों तें सर्वथा गौण । क्षमा पूर्ण करावी ॥ २२ ॥ भक्ति माझी निजमा‌उली । ते मी आपुल्या बोबडे बोलीं । ग्रंथाधारें गौरविली । सप्रेम भुली भुलोनी ॥ २३ ॥ प्रेमाची निजजाति कैशी । आठवों नेदी आठवणेसी । एवं विसरवूनि हेतूसी । भक्तिरहस्यासी बोलविलें ॥ २४ ॥ जेवीं कां निजबाळकातें । मा‌उली बोल बोलवी त्यातें । तेवीं भक्तीनें मज केलें येथें । म्यां चुकी कोणातें ठेवावी ॥ २५ ॥ मा‌उलीचें लोभाळूपण । प्रकट करी तो मूर्ख जाण । याहीपरी मी अज्ञान । चुकलेपण दिसताहे ॥ २६ ॥ उडिदीं काळें जेथींच्या तेथें । तेवीं चुकलेपण माझें येथें । चुकीचि मानावी निश्चितें । हेंही गुरुनाथें वारिलें ॥ २७ ॥ चुकलेपणचि मानितां । मी हों पाहें कवि कर्ता । मीपण नावडे गुरुनाथा । तेणें तें तत्त्वतां सांडविलें ॥ २८ ॥ साङ्ग झालिया कथाकथन । तेणें श्लाघें न घ्यावें मीपण । तंव गुरूंनीं दावूनि निजखूण । मीतूंपण उडविलें ॥ २९ ॥ हेही बोल बोलता । मी नव्हें नव्हें गा सर्वथा । मी नव्हें कवि कर्ता । हें गुरूंचे तत्त्वतां गुरु जाणे ॥ ४३० ॥ तंव श्रोते म्हणती चमत्कार । भक्तिसुखाचें सुखसार । भक्तिपरमामृतसागर । उघड साचार तुवां केला ॥ ३१ ॥ भागवत मुख्य भक्तिप्रधान । जें भक्तीचें सुख सनातन । तें करतळामळ करूनि जाण । तुवां परिपूर्ण दाविलें ॥ ३२ ॥ तुवां हा थोर केला उपकार । तरावया स्त्रियादि शूद्र । जग व्हावया भजनतत्पर । भागवत निजसार काढिलें ॥ ३३ ॥ भागवतींचें गुप्त पीयूख । तें त्वां प्रकटिलें भक्तिसुख । तेणें संत सुखावले देख । श्रोते सकळिक निवाले ॥ ३४ ॥ तुज संतोषोनि श्रीपती । दीधली आपली निजभक्ती । यालागीं तुवां भक्तीची कीर्ती । यथार्थस्थितीं वर्णिली ॥ ३५ ॥ तुझे भक्त्तीचा एकेक बोल । ब्रह्मसुखेंसीं सखोल । त्याहीमाजीं प्रेमाची वोल । येताति डोल चित्सुखें ॥ ३६ ॥ तुज वाखाणितां निजभक्ती । प्रेमें वोसंडे चित्तवृत्ती । विसरोनियां ग्रंथस्फूर्ती । भक्तीची कीर्ती वानिशी ॥ ३७ ॥ निजा‌आवडी वाडेंकोडें । वानितां भक्तीचे पवाडे । तुज नाठवे मागेंपुढें । प्रेम गाढें जाणवलें ॥ ३८ ॥ जंव जंव भक्तीचें निरूपण । अधिकाधिक वाढतां जाण । तंव तंव येतसे स्फुरण । तेथ कोण पुरे म्हणेल ॥ ३९ ॥ जंव जंव निरूपणा वाढी । तंव तंव भक्तीची अधिक गोडी । तेणें श्रोत्यांचीही आवडी । चढोवढी वाढली ॥ ४४० ॥ करितां भक्तिसुखनिरूपण । श्रोते वक्ते लांचावले जाण । होतां अमृतांचे आरोगण । पुरे कोण म्हणों शके ॥ ४१ ॥ यापरी गा अतिप्रीतीं । वाढली निरूपणीं भक्ती । ते आवरूनियां स्फूर्ती । पुढील ग्रंथार्थीं प्रवर्तें ॥ ४२ ॥ हें ऐकोनि संतवचन । केलें साष्टांग नमन । भली दीधली आठवण । येरवीं निरूपण नावरतें ॥ ४३ ॥ ‘भक्तियोगस्य मद्‌गतिः’ । ये पदाची पदव्युत्पत्ती । निरूपिली भगद्‌भक्ती । जेणें भगवत्प्राप्ती अतिसुलभ ॥ ४४ ॥ हे न करितां भगवद्‌भक्ती । त्रिगुणगुणीं जीवपंक्ती । बांधिल्या संसारीं उन्मज्जती । तेही स्थिती हरि सांगे ॥ ४५ ॥ मया कालात्मना धात्रा कर्मयुक्तं इदं जगत्‌ । गुणप्रवाह एतस्मिन्‌ उन्मज्जति निमज्जति ॥ १५ ॥ मुख्य मूळीं मी जगाचा धरिता । स्त्रष्टृमीचि स्त्रजिता । विष्णुरूपें मी प्रतिपाळिता । मीचि संहर्ता रुद्ररूपें ॥ ४६ ॥ हे त्रिगुण काळाची काळसत्ता । तो मी निजकाळ तत्त्वतां । स्त्रजिता पाळिता संहर्ता । गुणावस्थाविभागें ॥ ४७ ॥ जनांचें वासनाकर्म विचित्र । तेचि काळसत्ता निजसूत्र । तेणें रचिला संसार । चराचर गुणबद्ध ॥ ४८ ॥ गुणकर्में स्वर्गा चढे । गुणकर्में नरकीं पडे । नाना योनींचें सांकडें । भोगणें घडे गुणकर्में ॥ ४९ ॥ स्वर्ग भोगूनि वाडेंकोडें । महर्जनतपोलोकांपुढें । सत्यलोकवरी वरता चढे । उन्मज्जन घडे या नांव ॥ ४५० ॥ पशुपक्षिस्थावरांत । वृक्षपाषाणकृमित्व प्राप्त । महानरकीं अधःपात । निमज्जन एथ त्या नांव ॥ ५१ ॥ उंचीं चढोनि नीचीं पडणे । भोगवी नाना जन्ममरणें । तें प्रकृतिपुरुषांचें साजणें । जीवबंधनें भागवी ॥ ५२ ॥ अणुर्बृहत्‌ कृशः शूलो यो यो भावः प्रसिध्यति । सर्वोऽपि उभयसंयुक्तः प्रकृत्या पुरुषेण च ॥ १६ ॥ अणु म्हणिजे अतिसूक्ष्म सान । बृहत्‌ म्हणिजे विशाळ जाण । कृश म्हणिजे किरकोळपण । स्थूळ तें पूर्ण जडावयवीं ॥ ५३ ॥ जें जें दृष्टिगोचर झालें । जें जें नांवरूपा आलें । तें तें उभययोगें केलें । जाण घडलें प्रकृतिपुरुषीं ॥ ५४ ॥ जें उभययोगसंभव । जग ऐसें ज्याचें नांव । तें प्रकृतिपुरुष सावेव । तिसरा भाव असेना ॥ ५५ ॥ या दोहींवेगळें निरवयव । जेथूनि या दोहींचा उद्‌भव । तेचि सद्वस्तु सर्वीं सर्व । देवाधिदेव सांगत ॥ ५६ ॥ यस्तु यस्यादिरन्तश्च स वै मध्यं च तस्य सन्‌ । विकारो व्यवहारार्थो यथा तैजसपार्थिवाः ॥ १७ ॥ प्रकृतिपुरुषेंसीं साकार । जें दिसताहे चराचर । त्यासी आद्यंतें जें अनश्वर । तेंचि साचार मध्येंही ॥ ५७ ॥ लेण्या‌आधीं कनक एक । लेण्या‌अंतीं तेंचि आवश्यक । मध्येंही लेणेंरूपें देख । भासे कनक अद्वितीय ॥ ५८ ॥ न करितां मातीचें गोकुळ । पूर्वी मृत्तिकाचि केवळ । गोकुळ मोडल्या सकळ । उरे अविकळ मृत्तिका ॥ ५९ ॥ तेचि गोकुळरूपें असतां । भासे मृत्तिकाचि तत्त्वतां । तेंवी आदिमध्य‌अवसानतां । भासे चित्सत्ता अनश्वर ॥ ४६० ॥ त्रिगुणगुणें सविकार । जें जग दिसताहे साकार । तें मायिक गा चराचर । जेवीं व्यवहार स्वप्नींचा ॥ ६१ ॥ सकळ विकारांचें कारण । अंगें अविद्या आपण । ते विकारीं सत्यता स्थापितां जाण । आलें सत्यपण अविद्येसी ॥ ६२ ॥ अविद्या आपुलेनि नांवें जाण । आपुलें नास्तिक्य सांगे आपण । हें वर्म जाणती सज्ञान । नेणोनि अज्ञान मानिती सत्य ॥ ६३ ॥ अविद्या अविद्यकत्वें मिथ्या जाण । वस्तु वस्तुत्वें सदा संपन्न । येचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ६४ ॥ यदुपादाय पूर्वस्तु भावो विकुरुतेऽपरम्‌ । आदिरन्तो यदा यस्य तत्सत्यमभिधीयते ॥ १८ ॥ प्रकृति‌अंगीकारें देख । वस्तूपासाव होती लोक । जेवीं निद्रायोगें एक । होय अनेक निजस्वप्नीं ॥ ६५ ॥ जेवीं तंतूपासाव कोटि पट । कोटि पटीं तंतु एकवट । पाहतां आदि मध्य शेवट । द्वैताचें बोट रिघेना ॥ ६६ ॥ तेवीं वस्तूपासोनियां लोक । प्रकृतिपुरुषादि सकळिक । आदि-मध्य-अवसानीं एक । द्वैतवार्ता देख असेना ॥ ६७ ॥ तंतु सत्य पट मायिक । वस्तु सत्य अविद्या लटिक । जें आदि-मध्य-अवसानीं एक । तें सत्य निष्टंक उद्धवा ॥ ६८ ॥ जेवीं कां काष्ठाची बाहुली । काष्ठावयवें शोभे आली । तेवीं वस्तु वस्तुत्वें एकली । शोभा पावली जगत्वें ॥ ६९ ॥ जेवीं कां एकलें देह देख । दिसे अवयवरूपीं अनेक । तेवीं वस्तु एकली एक । आभासे अनेकस्वरूपीं ॥ ४७० ॥ जेवीं कां जळीं क्रीडतां जळा । उपजवी तरंगांच्या माळा । तेवीं वस्तूचिया स्वलीळा । जगदादि मेळा प्रकाशे ॥ ७१ ॥ तरंगा आदि-मध्य-अवसानीं । जेवीं पाणीपणें असे पाणी । तेवीं उत्पत्ति स्थिति-निदानीं । वस्तु वस्तूपणीं अनश्वर ॥ ७२ ॥ ब्रह्म सत्य प्रपंच वावो । हा साधकां साधावया निर्वाहो । कार्यकारण‌अभिन्नभावो । देवाधिदेवो बोलिला ॥ ७३ ॥ कार्य कारणीं अभिन्न । तैं ब्रह्मीं माया कैंची भिन्न । जगद्‌रूपें ब्रह्म परिपूर्ण अन्योपदेशें जाण दाविलें ॥ ७४ ॥ ब्रह्म माया काळगती । यें तिन्हीं अनादि म्हणती । तेही न घडे उपपत्ती । येचि अर्थीं हरि बोले ॥ ७५ ॥ प्रकृतिर्ह्यस्य उपादानं आधारः पुरुषः परः । सतोऽभिव्यञ्जकः कालो ब्रह्म तत्‌ त्रितयं त्वहम्‌ ॥ १९ ॥ ब्रह्मावेगळी माया । सर्वथा न ये आया । ते ब्रह्माधारें वाढोनियां । गुणकार्या वाढवी ॥ ७६ ॥ मायानियंतें ब्रह्म आपण । यालागीं यासी पुरुषपण । पुरुषाची प्रिया माया पूर्ण । प्रकृति अभिधान या हेतू ॥ ७७ ॥ ब्रह्माहून पुरुष भिन्न । हें सर्वथा मिथ्या वचन । ब्रह्म पुरुष नामाभिधान । एकासीचि जाण आलें असे ॥ ७८ ॥ माया प्रकृति अभिधान । दोहीं नांवीं मायाचि पूर्ण । आविद्यक दावी कार्य भिन्न । अविद्या जाण या हेतू ॥ ७९ ॥ माया ब्रह्मींची शक्ति जाण । तेही ब्रह्मेंसीं असे अभिन्न । वेगळी नव्हे अर्धक्षण । सदा सुलीन ब्रह्मेंसीं ॥ ४८० ॥ जेवीं शूरांची शौर्यशक्ति पूर्ण । शूरांहोनि नव्हे भिन्न । तेवीं ब्रह्मीं मायाशक्ति जाण । असे सुलीन सर्वदा ॥ ८१ ॥ माया ब्रह्मीं असतां जाण । क्षोभेंवीण नव्हे सर्जन । मायाक्षोभकू काळ पूर्ण । काळास्तव जन जन्मती ॥ ८२ ॥ ब्रह्मींची सत्ता तो काळ जाण । प्रकृति क्षोभवूनि आपण । दावी उत्पत्ति स्थिति निदान । तो काळही अभिन्न ब्रह्मेंसीं ॥ ८३ ॥ जेवीं रायाच्या राजपुत्रासी । राजाचि दमूं शके त्यासी । तेवीं झालें जें प्रकृतीचे कुशीं । तें निजसत्तेसी निर्दळी ॥ ८४ ॥ विवेकदृष्टीं पाहतां जाण । काळ परमात्मा दोन्ही अभिन्न । प्रकृति पुरुष काळ जाण । तिहींसी एकपण या हेतू ॥ ८५ ॥ ब्रह्ममाया-काळसंबंध । हे तिनी मूळींचि अभेद । दिसे जो व्यावहारिक भेद । तोही अबद्ध मिथ्यात्वें ॥ ८६ ॥ वस्तु एकलीचि आपण । प्रकृति-पुरुष काळरूपें जाण । अखंडत्वें दावितां पूर्ण । तो मी श्रीकृष्ण परमात्मा ॥ ८७ ॥ उत्पत्तीपूर्वी मी ब्रह्म पूर्ण । उत्पत्तीचें मी ब्रह्म आदिकारण । स्थितिकाळीं मी ब्रह्मरूपें जाण । एकीं अनेकपण स्वयें दावीं ॥ ८८ ॥ स्वलीला सृष्टीचे प्रांतीं जाण । प्रळयीं उरें मी ब्रह्म परिपूर्ण । तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ८९ ॥ स्वर्गः प्रवर्तते तावत्‌ पुर्वापर्येण नित्यशः । महान्‌ गुणविसर्गार्थः स्थित्यन्तो यावदीक्षणम्‌ ॥ २० ॥ महान्‌ म्हणिजे अतिथोरू । पितृपुत्रप्रवाहें संसारू । अनवच्छित्र निरंतरू । अतिदुर्धरू वाढला ॥ ४९० ॥ अतिशयेंसीं दुर्धरू । कैसेनि वाढला संसारू । तेही अर्थींचा विचारू । शार्ङ्गधरू सांगत ॥ ९१ ॥ विषयांचिये आसक्ती । वासनानिष्ठ झाली वृत्ती । ते देहात्मता अतिप्रीतीं । संसारस्थिती वाढवी ॥ ९२ ॥ खवळला जो देहाभिमान । तो शुद्धासी लावी जीवपण । नाना योनीं जन्ममरण । विशेषें जाण वाढवी ॥ ९३ ॥ ऐसेन अतिदुर्धरू । स्त्रष्टेन सृजिला संसारू । तो ब्रह्मायूपर्यंत स्थिरू । ब्रह्मप्रळयीं संहारू सृष्टीचा ॥ ९४ ॥ एक नित्यप्रळयो लागला आहे । एक दैनंदिन प्रळयो पाहें । कर्मजन्य प्रळयो लाहे । एक तो होये अवांतर प्रळयो ॥ ९५ ॥ सकळ प्रळयांच्या शिरीं । ब्रह्मप्रळयाची थोरी । तो सकळ सृष्टीतें संहारी । कांहीं संसारीं उरों नेदी ॥ ९६ ॥ ब्रह्मप्रळयीं नाश सृष्टीसी । पुढती रचावया कल्पादीसी । उंच नीच नाना योनींसी । नव्या करावयासी कारण काय ॥ ९७ ॥ ब्रह्मप्रळयीं सृष्टीचा र्हा्सू । परी निःशेष नव्हेचि नाशू । उरे वासनाबीजविलास । सुलीन रहिवासू अविद्ये‌अंगीं ॥ ९८ ॥ तेचि बीजें कल्पादि जाण । मीचि स्त्रष्टृरूपें आपण । मज म्यां अनुग्रहूनि पूर्ण । सूक्ष्म कारण लक्षविलें ॥ ९९ ॥ जेवीं वर्षाकाळीं नाना तृणें । वाढूनि शरत्काळीं होती पूर्णें । तींच उष्ण काळीं बीजकणें । होती सुलीनें पृथ्वीसी ॥ ५०० ॥ सुलीन बीजें पूर्ण क्षितीं । परी तीं कोणा व्यक्ती न येती । तेवीं वासनाबीजें प्रळयांतीं । उरे अव्यक्तीं संसारू ॥ १ ॥ जेवीं काळीं वरुषलेनि घनें । बीजें विरुढती सत्राणें । वाढती नाना जातींचीं तृणें । पूर्वलक्षणें यथास्थित ॥ २ ॥ तेवीं उत्पत्तिकाळावरी । सूक्ष्मवासना बीजांकुरीं । नाना योनी चराचरीं । जंगमस्थावरीं जग वाढे ॥ ३ ॥ व्रह्मयाचे प्रळया‌आंतू । निःशेष होय अंतू । यालागीं संसारीं अनंतू । वेदशास्त्रार्थू प्रतिपादी ॥ ४ ॥ ऐसा संसार अनंतू । याचा निःशेष होय अंतू । तेचि अर्थीं श्रीकृष्णनाथू । श्लोकींचा पदार्थू बोलिला ॥ ५ ॥ ‘स्थित्यन्तो यावदीक्षणम्‌’ । येणें पदें श्रीकृष्ण । अत्यंत प्रळयींचें लक्षण । सूत्रप्राय जाण बोलिला ॥ ६ ॥ ‘ईक्ष्ण’ या पदाचा अर्थ जाण । सद्‌गुरुकृपादृष्टि पूर्ण । तेंचि माझें कृपावलोकन । जेणें ब्रह्मज्ञान प्रकाशे ॥ ७ ॥ पूर्ण प्रकाशल्या ब्रह्मज्ञान । संसार झाला नाहींच जाण । वस्तु वस्तुत्वें परिपूर्ण । मीतूंपण असेना ॥ ८ ॥ तेथ ध्रुवमंडळाची ठेली मात । वैकुंठकैलासा झाला प्रांत । शेषशायीचाही अंत । ब्रह्मज्ञानांत हो‌ऊं सरला ॥ ९ ॥ हारपलें मीतूंपण । उडालें देव-भक्त भजन । बुडालें साकारतेचें भान । ब्रह्म सनातन सदोदित ॥ ५१० ॥ प्रपंच एक झाला होता । हे समूळ मिथ्या वार्ता । पुढें हो‌ईल मागुता । कदा कल्पांता घडेना ॥ ११ ॥ हें अत्यंत प्रळयाचें लक्षण । भाग्येंवीण न पाविजे जाण । ज्यासी साचार सद्‌गुरुचरण । ते सभाग्य जन पावती ॥ १२ ॥ अत्यंत प्रळयींची गती । न घडे गा समस्तांप्रती । हे परम निर्वाणगती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १३ ॥ ज्याची अहंममता खुंटे । त्याची निःशेष कल्पना तुटे । अत्यंत प्रळयो त्यासीच भेटे । नेटेंपाटें निजात्मता ॥ १४ ॥ देह पडलिया प्रळयो घडे । हें बोलणे सर्वथा कुडें । जितांचि हा प्रळयो जोडे । वाडेंकोडें निजनिष्ठा ॥ १५ ॥ जितांचि हा प्रळयो जाण । येणें संसारबीजदहन । आतां ब्रह्मप्रळयलक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥ १६ ॥ ब्रह्मांडप्रळयाचा अनुक्रम । तेथ अंतीं उरे पूर्ण ब्रह्म । हें उद्धवें जाणावया वर्म । पुरुषोत्तम बोलत ॥ १७ ॥ विराण्मयाऽऽसाद्यमानो लोककल्पविकल्पकः । पञ्चत्वाय विशेषाय कल्पते भुवनैः सह ॥ २१ ॥ चतुर्दशभुवनेंसीं ब्रह्मांड । काळें कल्पिलें प्रचंड । तें स्थितिकाळीं पाळूनि अंड । अंतीं नाशाचें बंड आदरी काळू ॥ १८ ॥ तो तूं काळ म्हणशी कोण । तरी काळात्मा मीचि जाण । तेणें काळें म्यां प्रळय‌ईक्षण । केलें जाण सृष्टीसी ॥ १९ ॥ पंचभूतांचे भिन्न भाग । काळसत्ता राखिले विभाग । ते सत्ता म्यां आवरितां सांग । खवळे लगबग पंचत्वासी ॥ ५२० ॥ जैसा उत्पत्तीचा उपक्रमू । तैसाचि प्रळयाचा अनुक्रमू । भूतीं भूतलयो सुगमू । पुरुषोत्तमू सांगत ॥ २१ ॥ अन्ने प्रलीयते मर्त्यं अन्नं धानासु लीयते । धाना भूमौ प्रलीयन्ते भूमिर्गन्धे प्रलीयते ॥ २२ ॥ म्यां पाहिल्या प्रळयदृष्टीं । पडोनि ठाके अनावृष्टी । तेणें अन्न क्षीण होय सृष्टीं । अन्नापाठीं शरीर ॥ २२ ॥ येथ असे ‘अन्नमय प्राण’ । हें वचन प्रत्यक्ष प्रमाण । ते अन्न होतांचि क्षीण । अन्नासवें प्राण प्राण्यांचे जाती ॥ २३ ॥ अन्नवृद्धि खुंटल्या धान्य । बीजमात्र राहे आपण । तेंही पृथ्वीसी होय लीन । तत्काळ जाण उद्धवा ॥ २४ ॥ तंव द्वादशादित्यमेळा । एकत्र रविमंडळा । तो पीठ करी पवर्तशिळा । तेही तृणसाळा उरों नेदी ॥ २५ ॥ तेणें तापलें सप्तपाताळ । पोळलें शेषाचें कपाळ । तो वमी विषाग्निकल्लोळ । महाज्वाळ धडधडीत ॥ २६ ॥ तो संकर्षणमुखानळ । पार्थिव जाळी सकळ । ब्रह्मांड जाळोनि तत्काळ । पृथ्वी केवळ भस्म करी ॥ २७ ॥ तेव्हां पृथ्वीचें पृथ्वीपण सरें । तें गंधमात्रस्वरूपें उरे । तोही गंधू जळीं विरे । तेंचि शार्ङ्गधरें सांगिजे ॥ २८ ॥ अप्सु प्रलीयते गन्ध आपश्च स्वगुणे रसे । लीयते ज्तोतिषि रसो ज्योती रूपे प्रलीयते ॥ २३ ॥ तेव्हां प्रळयमेघांचा मेळा । शुंडादंडधारा प्रबळा । शत वरुषें वर्षतां जळा । सप्तसमुद्रमेळा एकत्र जाहला ॥ २९ ॥ तेणें जळ कोंडलें सुबद्ध । ते जळीं पृथ्वीचा विरे गंध । तेव्हां जळचि एकवद । प्रळयीं प्रसिद्ध उधवलें पैं ॥ ५३० ॥ सांवर्तक मेघांचें लक्षण । सिंधु एकत्र करिती पूर्ण । पृथ्वी विरवूनियां जाण । ते जळीं आपण विरोनि जाती ॥ ३१ ॥ ते काळीं अतिदुर्धर । सांवर्ताग्नि खवळे थोर । तो जळ शोषी सर्वत्र । उरे रसमात्र अवशेष ॥ ३२ ॥ रसमात्र जळ उरे तेंही । लीन होय तेजाचे ठायीं । तेव्हां तेजचि दिशा दाही । कोंदोनि पाहीं वोसंडे ॥ ३३ ॥ सांवर्ताग्नीची मातू । जळ शोषूनि राहे निवांतू । जाळिती शक्ति स्वयें जाळितू । या नांव निश्चितू सांवर्तकाग्नी ॥ ३४ ॥ तेणेंचि काळें झंझामारुत । उठी तेजातें शोषित । तें तेज शोषितां समस्त । उरे तेथ रूप मात्र ॥ ३५ ॥ रूपं वायौ स च स्पर्शे लीयते सोऽपि चाम्बरे । अम्बरं शब्दतन्मात्र इन्द्रियाणिं स्वयोनिषु ॥ २४ ॥ तेजाचें जें उरे रूप । तें वायु शोषूनि करी अरूप । तेव्हां वायूचि एकरूप । अति‌अमूप कोंदाटे ॥ ३६ ॥ कोंदाटल्या वायुसी । गगन जेथींचें तेथें ग्रासी । तेव्हा वायु प्रवेशे स्पर्शी । तो उरे अवशेषीं स्पर्शमात्र ॥ ३७ ॥ उरल्या वायूच्या स्पर्शासी । लयो तत्काळ होय आकाशीं । आकाश प्रवेशे शब्दासी । उरे अवशेषीं शब्दतन्मात्र ॥ ३८ ॥ दशेंद्रियांची मंडळी । राजसापासोनि जन्मली । ते निजगुणीं सामावली । जेवीं पंचांगुळी मुष्टीमाजीं ॥ ३९ ॥ योनिर्वैकारिके सौम्य लीयते मनसीश्वरे । शब्दो भूतादिमप्येति भूतादिर्महति प्रभुः ॥ २५ ॥ वैकारिक जो सत्त्वगुण । व्याला देवता अंतःकरण । प्रळयस्वभावें आपण । मनामाजीं जाण प्रवेशे ॥ ५४० ॥ सकळ इंद्रियांचा राजा मन । मनःकल्पना जीवशिवपण । श्लोकपदें ‘मनसीश्वर’ पूर्ण । मनाशींच जाण हरि बोले ॥ ४१ ॥ मनोदेवता अंतःकरण । घे‌ऊनि प्रवेशे सत्त्वगुण । ज्या कार्याचें जें कारण । तेथ तीं जाण प्रवेशती ॥ ४२ ॥ शब्दतन्मात्र उरलें आधीं । ते मीनलें तामसामधीं । कारणीं कार्यासी अवधी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥ ४३ ॥ त्रिविधगुणी अहंकारू । एकवटला महाथोरू । ऐक त्याचा बडिवारू । तोचि दुर्धरू संसारीं ॥ ४४ ॥ जो शिवातें महत्त्वा चढवी । जीवातें देहात्मता गोंवी । अहंममता जग भुलवी । प्रभुत्वपदवी महत्त्वें येणें ॥ ४५ । अहंकारू ऐसा आहे । तो जैं परमार्थी साह्य होये । तैं सोहंभावाचेनि लवलाहें । विभांडी पाहें संसारू ॥ ४६ ॥ चोर जैं विश्वासू मित्र होये । तैं चोर चोरा निवारी पाहें । तेवीं अभिमानू जैं साह्य होये । तैं भवभय बाधीना ॥ ४७ ॥ याहीपरी अभिमान । सामर्थ्यें अतिगहन । यालागीं प्रभुत्वें जाण । केलें व्याख्यान उद्धवा ॥ ४८ ॥ त्रिगुणगुणीं गुणाभिमान । एकत्र हो‌ऊनियां पूर्ण । महत्तत्त्वीं होय लीन । अतिसुलीन तद्‌रूपें ॥ ४९ ॥ स लीयते महान्स्वेषु गुणेषु गुणवत्तमः । तेऽव्यक्ते संप्रलीयन्ते तत्काले लीयतेऽव्यये ॥ २६ ॥ तेंही महत्तत्त्व येथें । कारणगुणीं लीन होतें । तेंही गुणसाम्यें निश्चितें । पावे लयाते अव्यक्तीं ॥ ५५० ॥ आकारविकार समस्त । हारपोनि जाती जेथ । उरे बीजमात्र अवशेषित । त्या नांव अव्यक्त बोलिजे ॥ ५१ ॥ वटाचा आकारविकार । ना शेंडा मूळ पुष्प पत्र । उरे अवशेष बीजमात्र । तेवीं संसार अव्यक्तीं ॥ ५२ ॥ वटबीज उरलें येथ । तें दृष्टीसी तर्केना निश्चित । तेवीं भवबीज जें अव्यक्त । तें नव्हे व्यक्त जीवासी ॥ ५३ ॥ नाना तृणजातिबीज गहन । उष्णकाळीं काळ करी लीन । तेवीं भवबीज अव्यक्त जाण । होय सुलीन काळेंसीं ॥ ५४ ॥ पूर्वीं काळें क्षोभोनि अव्यक्त । जगदाकारें केलें व्यक्त । तेचि काळयोगें अव्यक्त । सुलीन होत काळेंसीं ॥ ५५ ॥ या नांव अव्यक्ताचा पहा हो । काळामाजीं बोलती लयो । काळ बोलिजे महाबाहो । त्याचा होय व्ययो पुरुषेंसीं ॥ ५६ ॥ कालो मायामये जीवे जीव आत्मनि मय्यजे । आत्मा केवल आत्मस्थो विकल्पापायलक्षणः ॥ २७ ॥ पुरुषाची पूर्ण क्षोभकता । तोचि काळ बोलिजे तत्त्वतां । उत्पत्ति-स्थिति-प्रलयांता । तिनी अवस्था काळाच्या ॥ ५७ ॥ तिनी अवस्था लोटल्या ठायीं । काळासी कर्तव्यता नाहीं । तो उपजत व्यापारें पाहीं । जीवाचे ठायीं सामावे ॥ ५८ ॥ अचेतनीं चेतविता । जडातें जो जीवविता । यालागीं जीवू ऐशी वार्ता । जाण तत्त्वतां पुरुषासी ॥ ५९ ॥ प्रकृतीचेनि योगें जाण । शुद्धासी बोलिजे जीवपण । पुरुषू हेंही अभिधान । त्यासीच जाण बोलिजे ॥ ५६० ॥ करितां प्रकृतिविवंचन । केवळ मृगजळासमान । दिसे परी साचपण । सर्वथा जाण असेना ॥ ६१ ॥ मृगजळामाजीं जो पडे । तेथ जळ नाहीं मा तो कोठें बुडे । तेवीं प्रकृति नसतां जोडे । वाडेंकोडें जीवत्व कोणा ॥ ६२ ॥ जळीं बुडालें दिसे व्योम । सत्य मानणें तो मूर्खधर्म । तैसें रूप नाम गुण कर्म । हा मिथ्या भ्रम मायिक ॥ ६३ ॥ प्रकृतिकाळींही जाण । सत्य नाहीं जीवपण । तेही अर्थींची निजखूण । उद्धवा संपूर्ण अवधारीं ॥ ६४ ॥ स्वयें अवलोकितां दर्पण । दर्पणामाजीं दिसे आपण । तरी आपुलें वेगळेपण । स्वयें आपण जाणीजे ॥ ६५ ॥ तेवीं प्रकृतिकर्म करितां । जरी दिसे प्रकृति‌आंतौता । तरी मी प्रकृतीपरता । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ६६ ॥ दिसे व्योम जळीं बुडालें । परी तें नाहीं वोलें झालें । तेवीं प्रकृतिकर्म म्यां केलें । नाही माखलें ममांग ॥ ६७ ॥ यापरी करितां निर्वाहो । प्रकृतीचा झाला अभावो । तेव्हा जीवशिवनांवें वावो । जीव तोचि पहा हो परमात्मा ॥ ६८ ॥ जीवाचें गेलिया जीवपण । सहजेंचि उडे शिवपण । दोघेही आत्मत्वें जाण । होती परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ६९ ॥ जीवासी निजस्वरूप आठवो । या नांव जीवाचा परब्रह्मीं लयो । परमात्मा अज अव्ययो । अविनाश अद्वयो अनंत ॥ ५७० ॥ ब्रह्मीं स्फुरेना ब्रह्मपण । तेथ ‘मी तूं’ म्हणे कोण । परमानंद परिपूर्ण । उरे जाण उद्धवा ॥ ७१ ॥ ऐसा परमानंद म्हणसी कोण । तो मी अज अव्यय श्रीकृष्ण । आनंदस्वरूप तो मी जाण । मजवेगळें स्थान असेना ॥ ७२ ॥ ज्या स्वानंदा नांव श्रीकृष्ण । तें तुझें स्वरूप उद्धवा जाण । तेथ नाहीं गा मीतूंपण । परम कारण उर्वरित ॥ ७३ ॥ उद्धवा जीवाचा जीव मी श्रीकृष्ण । मज तुज नाहीं वेगळेपण । यालागीं जीवाची हे निजखूण । परम कारण सांगीतले ॥ ७४ ॥ जगाचा आत्मा श्रीकृष्ण । त्या माझा आत्मा तूं उद्धव पूर्ण । हें ऐकोनि श्रीकृष्णवचन । उद्धव जाण गजबजिला ॥ ७५ ॥ कृष्ण मज म्हणे आपुला आत्मा । परी मी नेणें कृष्णमहिमा । अगाध लीला पुरुषोत्तमा । ते केवीं आम्हां आकळे ॥ ७६ ॥ नाथिलेंचि उद्धवपण । माझ्या अंगीं जडलें जाण । कृष्णविवेकें पाहतां पूर्ण । माझें मीपण दिसेना ॥ ७७ ॥ मज उद्धवपण सांडितां । कृष्ण निजधामा जा‌ईल तत्त्वतां । ते न साहवे अवस्था । सखेदता सप्रेम ॥ ७८ ॥ हे उद्धवाची अवस्था । कळों सरली श्रीकृष्णनाथा । तेचि अर्थीची हे कथा । शब्दार्थता निरूपी ॥ ७९ ॥ एवं अन्वीक्षमाणस्य कथं वैकल्पिको भ्रमः । मनसो हृदि तिष्ठेत व्योम्नीवार्कोदये तमः ॥ २८ ॥ प्रकृति-पुरुषविवंचन । आदि मध्य अवसान । तुज म्यां दाविलें एकपण । तेथ कां भिन्नपण कल्पिसी वायां ॥ ५८० ॥ उत्पत्ति‌आदि ब्रह्म पूर्ण । उत्पत्तीसी तेंचि कारण । जग जन्मलें जे सगुण । तेहीं ब्रह्मरूपें जाण दाविलें तुज ॥ ८१ ॥ आणी प्रळयाच्या अंतीं । ब्रह्मचि उरे निजस्थिती । तेही विखींची प्रतीती । तुज म्यां निश्चितीं दाविली ॥ ८२ ॥ प्रकृतिहूनि पुरुष भिन्न । प्रकृति स्वातंत्र्यें मिथ्या जाण । ऐसें प्रकृतिपुरुष ज्यासी ज्ञान । त्यासी मीतूंपण भासेना ॥ ८३ ॥ जेथ नाहीं मीतूंपण । तेथ विकल्प कल्पी कोण । आद्यंती वस्तु पूर्ण । हें विवेकज्ञान जयासी ॥ ८४ ॥ जो विवेक पुरुषप्रकृती । सांख्य जागे ज्याचे चित्तीं । त्यासी विकल्पाची प्राप्ती । नव्हे कल्पांतीं उद्धवा ॥ ८५ ॥ सांख्यविवेकगभस्ती । पूर्ण उगवला ज्याचे चित्तीं । तेथ विकल्पाची अंधारीं राती । कैशा रीतीं उरेल ॥ ८६ ॥ ज्यासी पटुतर सांख्यज्ञान । विकल्प विसरे त्याचें मन । हृदयीं उगवे चिद्‌भान । अज्ञाननिशा पूर्ण निरसूनी ॥ ८७ ॥ जेथ निरसलें अज्ञान । तेथ विकल्पाचें कैंचें स्थान । यापरी सांख्यज्ञान । साधकां पूर्ण उपकारी ॥ ८८ ॥ जें साराचें निजसार । जें गुह्यज्ञानभांडार । जें कां विवेकरत्ना कर । तें सांख्या साचार उद्धवा ॥ ८९ ॥ एष सांख्यविधिः प्रोक्तः संशयग्रन्थिभेदनः । प्रतिलोमानुलोमाभ्यां परावरदृशा मया ॥ २९ ॥ इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां सांहितायामेकादशस्कन्धे चतुर्विंशोऽध्यायः ॥ २४ ॥ मी विवेकाचा विवेकू । मी अर्काचा आदि‌अर्कू । मी ज्ञानियांचा ज्ञानतिलकू । त्या माझा परिपाकू तें हें सांख्य ॥ ५९० ॥ मी वेदांचा आदिवेदू । मी बोधाचा आदिबोधू । मी आनंदाचा निजानंदू । त्या माझा प्रबोधू तें हें सांख्य ॥ ९१ ॥ तेणें म्यां सर्वज्ञें श्रीकृष्णें । निर्धारोनि निजज्ञानें । सांख्ययोगौपलक्षणें । ब्रह्म अव्ययपणें दाविलें ॥ ९२ ॥ जेवीं गरगरीत वाटोळा । करतळीं दिसे आंवळा । तेवीं सांख्ययोगलीळा । ब्रह्म तुज डोळां दाविलें ॥ ९३ ॥ जो ब्रह्म डोळां देखों जाये । तो सर्वांगें देखणा होये । ऐशी सांख्यज्ञान निजसोये । तुज म्यां पाहें दाविली ॥ ९४ ॥ हा सांख्ययोग अनुक्रम । अन्वयव्यतिरेकें उपक्रम । आलोडितां आकळे वर्म । अखंड ब्रह्म अद्वय ॥ ९५ ॥ उत्पत्ति-स्थिति-प्रळयांत । ब्रह्म अखंड निज नित्य । हेंचि सांख्ययोगें प्राप्त । जाण निश्चित साधकां ॥ ९६ ॥ ज्यांसी ब्रह्मज्ञानाचें कोड । ते सांख्ययोग पुरवी चाड । लिंगदेहाचें सुदृढ झाड । त्याचें समूळ बूड उन्मळी ॥ ९७ ॥ लिंगदेह अत्यंत कठिण । तें सांख्ययोगापुढें जाण । जेवीं अग्नीमाजीं तृण । तेवीं होय संपूर्ण भस्मांत ॥ ९८ ॥ लिंगदेह सैंधवगिरिवर । सांख्या अत्यंत प्रळयसागर । खवळला विरवूनि करी नीर । एकाकार निजात्मता ॥ ९९ ॥ खवळल्या अत्यंत चित्सागरा । नाना संशयजळगारा । उरावया नाहीं थारा । निजनिर्धारा उद्धवा ॥ ६०० ॥ सकळ संशयांचें छेदन । लिंगदेहाचें भेदन । करी तें सांख्ययोगज्ञान । उद्धवा जाण निश्चित ॥ १ ॥ अनुलोम प्रतिलोम । विवंचना वाटेल दुर्गम । हें न करितां सांख्य सुगम । आकळे तें वर्म सांगेन ऐक ॥ २ ॥ सांडूनि आकारविषमता । सर्व भूतीं भगवंतता । जो पाहे सद्‌भावता । सांख्य त्याचे हात समूळ आलें ॥ ३ ॥ कां जैसें हो‌ईल कर्माचरण । तैसें सुखेंचि हो आपण । मी कर्ता हें तूं न म्हण । इतुकेन ब्रह्म पूर्ण तूं होसी ॥ ४ ॥ याहीवरती सुगमता । मज दिसेना सर्वथा । उद्धवा तुझे निजहितार्थ । जाण तत्त्वतां सांगीतलें ॥ ५ ॥ हेंचि एक माझें वचन । विचारूनियां संपूर्ण । निजहितार्था आपण । अवश्य जाण करावें ॥ ६ ॥ ऐसें बोलिला देवाधिदेवो । तेथ जडला उद्धवाचा भावो । निःशेष ‘अहं’ सांडितां पहा हो । ब्रह्म स्वयमेवो सहजचि ॥ ७ ॥ विचारितां सांख्यज्ञान । जगातें गोंवी अहंपण । अहंपाशीं जन्ममरण । दुःख दारुण अहंभावीं ॥ ८ ॥ ऐसा अहंभावो कठिण । सांडितां न सांडे आपण । येचि गुंतीचें कारण । सर्वथा जाण कळेना ॥ ९ ॥ हें पुसों जावें देवापाशीं । तेणें विशद सांगीतलें सांख्यासी । आतां आपुली गुंती आपल्यापाशीं । तेंचि आम्हासी कळेना ॥ ६१० ॥ येचि अर्थीं श्रीकृष्ण । पंचविसावे अध्यायीं जाण । सगुण निर्गुणविभागें पूर्ण । गोड निरूपण सांगेल ॥ ११ ॥ ते सुरम रसाळ मधुर कथा । जेथ श्रीकृष्णा‌ऐसा वक्ता । उद्धव शिरोमणि श्रोता । अनुपम स्वादुता ते ठायीं ॥ १२ ॥ त्या स्वादाचें गोडपण । सांगावया समर्थ श्रीकृष्ण । सेवावया श्रोता अतिसज्ञान । निजभक्त जाण उद्धव ॥ १३ ॥ ते देवभक्तसंवाद गोडी । वेदशास्त्रें न जोडे जोडी । आलोडितां ग्रंथकोडी । ते निजगोडी नातुडे ॥ १४ ॥ आतुडावया ते निजगोडी । जैं भाग्यें भावार्थें जोडे जोडी । भावार्थाचे निज‌आवडीं । जिव्हारींची गोडी देवो दे भक्तां ॥ १५ ॥ एवं भावार्थापरतें कांहीं । देवासी आवडतें नाहीं । तो भावो नाहीं ज्यांचे ठायीं । ते मूर्ख पाहीं बालिश ॥ १६ ॥ त्या बाळकांचा धन्य भावो । खापरें मांडूनि म्हणती देवो । तेथही प्रकटे देवाधिदेवो । धरिल्या निःसंदेहो विश्वास ॥ १७ ॥ बाळकें दूध मागावयासाठीं । भावार्थें लागला देवापाठीं । कां क्षीराब्धि करूनि वाटी । उपमन्यावोठीं लाविली ॥ १८ ॥ एवं भाविकू देवाचा लाहणा । देवो भाविकांचा आंदणा । भावेंवीण देवो जाणा । कधीं कोणा न भेटे ॥ १९ ॥ यालागीं जेथ भावार्थ । तेथचि जोडे सुखस्वार्थ । भावार्थ तेथ परमार्थ । साङ्ग साद्यंत सांपडे ॥ ६२० ॥ ऐसा वाढिविल्या भावार्थ । तेणें जोडे निर्गुणनिजस्वार्थ । तेचि अर्थींचा वृत्तांत । पुढिल्या अध्यायांत हरि सांगे ॥ २१ ॥ ते कथेचें गोडपण । अमृतास विसरवी जाण । ऐसें रसाळ निरूपण । सादरें श्रीकृष्ण सांगेल ॥ २२ ॥ तें श्रीकृष्णकथापीयूख । श्रोत्याचें पावे श्रवणमुख । एका जनार्दनीं अतिसुख । सकौतुक व्याख्यान ॥ २३ ॥ श्रीभागवत अत्यादरें । श्रीकृष्णकथा सविस्तरें । अहेर विस्तारिले साजिरे । परमार्थाळंकारें साळंकृत ॥ २४ ॥ तेणें संत सज्जन सोयरे । गौरवीन श्रवणादरें । एका जनार्दनकृपाकरें । आविष्करे सामर्थ्य ॥ २५ ॥ गौरविले सोयरे सज्जन । म्हणाल उपेक्षिले इतर जन । जो श्रीभागवतीं सावधान । तो परमार्थें जाण गौरवे ॥ २६ ॥ भावार्थासारिखें गौरवण । एका जनार्दन जाणे । एका जनार्दना शरण । आपण्या आपण गौरवी ॥ ६२७ ॥ इति श्रीभागवते महापुरणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे एकाकारटीकायां प्रकृतिपुरुषसांख्ययोगो नाम चतुर्विंशोऽध्यायः ॥ २४ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ २९ ॥ ओव्या ॥ ६२७ ॥

Contribute to Sant Shri Eknath Maharaj Mission

You can donate to the bank account given below

Name of Account Holder:
Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission, Paithan
Current Account No:
00000036694177969
Bank Name:
State Bank Of India
IFSC Code:
SBIN0003796
Branch:
Bhaji Market, Paithan

Scan to donate

Donate QR

Merchant Name : Sant Eknath Mission

UPI ID : santeknathmission@sbi

logoseperator

Contact Info :

Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission,

C/O Shri Venimadhav Gosavi,
ShriNath Galli, Shrikshetra Paithan, Dist. Chhatrapati
Sambhajinagar
Pin. 431006

callMobile No : +91 - 9421411135

emailEmail : info@santeknath.org