श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ जय जय सद्गुरु परम । जय जय सद्गुरु पुरुषोत्तम । जय जय सद्गुरु परब्रह्म । ब्रह्म ब्रह्मनाम तुझेनी ॥ १ ॥ जय जय सद्गुरु चिदैक्यस्फूर्तीं । जय जय सद्गुरु चिदात्मज्योति । जय जय सद्गुरु चिन्मूर्ती । मूर्तामूर्ती चिद्रूप ॥ २ ॥ जय जय सद्गुरु सत्क्षेत्रा । जय जय सद्गुरु सत्पात्रा । जय जय सद्गुरु सन्मात्रा । सदैकाक्षरा सद्रूपा ॥ ३ ॥ जय जय सद्गुरु स्वनंदमान । जय जय सद्गुरु स्वानंदपूर्ण । जय जय सद्गुरु स्वानंदघन । आनंदा गोडपण तुझेनी ॥ ४ ॥ जय जय सद्गुरु देवअग्रणी । जय जय देवशिरोमणी । सकळ देव लागती चरणीं । देवचूडामणी गुरुराया ॥ ५ ॥ जय जय जीवादिजीवा । जय जय शिवादिशिवा । जय जय देवादिदेवा । जय जय अभिनवा गुरुराया ॥ ६ ॥ जय जय सद्गुरु सुखसंपन्ना । जय जय सद्गुरु सुखनिधाना । जय जय सद्गुरु सुखैकघना । सुख सुखपणा तुझेनि ॥ ७ ॥ तुझेनि सुखा निजसुख घडे । तुझेनि बोधा निजबोध आतुडे । तुझेनि ब्रह्मा ब्रह्मत्व जोडे । तुझेनि पडिपाडें तूं एक ॥ ८ ॥ ऐसा श्रीगुरु तूं अनंत । तुझ्या स्वरूपासी नाहीं अंत । तो तूं होऊनि कृपायुक्त । निजस्वरूप बोधिल निजभक्तां ॥ ९ ॥ आपुलें निजरूप बोधून । नुरविशी देवभक्तपण । त्याहीवरी निजभजन । अद्वयें पूर्ण करविशी ॥ १० ॥ गंगा मिळोनि सागरीं । मीनली तळपे तयावरी । तेवीं भक्त मिळोनि तुजमाझारीं । तुझें भजन करी तुझेनि ॥ ११ ॥ अद्वय करितां तुझी भक्ती । तूं संतोषसी यथानिगुती । संतोषोनि शिष्याहातीं । निजात्मसंपत्ती अर्पिशी ॥ १२ ॥ अर्पूनि निजात्मभरभार । शिष्य गुरुत्वें करिशी थोर । हा अतिलाघवी चमत्कार । अतर्क्य विचार तर्केना ॥ १३ ॥ जें अतर्क्य वेदशास्त्रांसी । ज्यालागीं वेद विवादिती अहर्निशीं । तें तूं क्षणार्धें बोधिसी । सच्छिष्यासी निजबोधें ॥ १४ ॥ तुझ्या निजबोधाची हातवटी । पढतां वेदवेदांतकोटी । तरी अलक्ष लक्षेना दृष्टीं । सर्वार्थीं गोष्टी अगम्य ॥ १५ ॥ बहुत कळलें कळलें म्हणती । नानापरीच्या युक्ति चाळिती । परी ते न कळोनि वोसणती । जेवीं शुक बोलती सुभाषितें ॥ १६ ॥ यालागीं तुझी बोधकशक्ती । अगम्य सर्वाशीं सर्वार्थीं । तुझी लाधल्या कृपायुक्ती । अगम्य पावती सुगमत्वें ॥ १७ ॥ जें अगम्य श्रीभागवत । त्याहीमाजींं एकादशार्थ । प्राकृत करविला यथार्थ । बाप समर्थ कृपाळू ॥ १८ ॥ दधि मंथूनी समस्त । जेवीं माता काढी नवनीत । ते आयितें बाळकाहातीं देत । तैसें केलें येथ जनार्दनें ॥ १९ ॥ वेदशास्त्रांचें निजमथित । व्यासें काढिलें श्रीभागवत । त्या भागवताचा मथितार्थ । जाण निश्चित एकादश ॥ २० ॥ त्या एकादशाचें गोडपण । सर्वथा नेणें मी आपण । तें जनार्दनें करूनि मथन । सारांश पूर्ण मज दीधला ॥ २१ ॥ तो स्वभावें घालितां तोंडीं । लागली एकाद्शाची गोडी । त्या गोडपणाच्या आवडीं । टीका चढोचढीं चालिली ॥ २२ ॥ यालागीं एकादशाची टीका । एकला कर्ता नव्हे एका । एकीं एक मिळोनि देखा । ग्रंथ नेटका निर्वाळिला ॥ २३ ॥ मागेंपुढें एक एका । हें एकादशाचें रूप देखा । तेणें एकपणें चालिली टीका । साह्य निजसखा जनार्दन ॥ २४ ॥ जनार्दनें पैं आपुलें । एकीं एकपण दृढ केलें । तेचि एकादशाचे अर्था आलें । एकीं मीनलें एकत्व ॥ २५ ॥ जेवीं जेवणीं गोड घांस । तेवीं भागवतीं एकादश । त्याहीमाजीं अष्टाविंश । अतिसुरस साजिरा ॥ २६ ॥ सर्वांगीं शिर प्रधान । तैसा अठ्ठाविसावा जाण । तेथील जें कां निरूपण । तो स्वानंद जाण सोलींव ॥ २७ ॥ तो हा अठ्ठाविसावा अध्यावो । ब्रम्हसुखाचा निजनिर्वाहो । उद्धवें न पुसतां पह हो । स्वयें देवाधिदेवो सांगत ॥ २८ ॥ उद्धवें न करितां प्रश्न । कां सांगताहे श्रीकृष्ण । येचि अर्थींचें निरूपण । सावधान परिसावें ॥ २९ ॥ उद्धव कृष्णोक्तीं निजज्ञान । पावोनि झाला ज्ञानसंपन्न । तेणें येऊं पाहे ज्ञानाभिमान । जाणपण अनिवार ॥ ३० ॥ जग मूर्ख मी एक ज्ञाता । ऐशी वाढती जे अहंता । ते गुणदोषांची कथा । दावील सर्वथा सर्वत्र ॥ ३१ ॥ जेथ गुणदोषांचें दर्शन । तेथ निःशेष मावळे ज्ञान । येथवरी ज्ञानाभिमान । बाधक जाण साधकां ॥ ३२ ॥ अभिमान बाधी सदाशिवा । तोही आणिला जीवभावा । तेथ मनुष्याचा कोण केवा । अहंत्वें जीवा मुक्तता कैंची ॥ ३३ ॥ गुणदोषांचें दर्शन । जैं ईश्वर देखे आपण । तोही नाडूं पवे जाण । इतरांचा कोण पडिपाडु ॥ ३४ ॥ यापरी गुणदोषदर्शन । साधकां बाधक होय पूर्ण । यालागीं त्याचें निवारण । न करितां प्रश्न हरि सांगे ॥ ३५ ॥ बाळक नेणे निजहिता । तेथ साक्षेपें प्रवर्ते माता । तेवीं उद्धवाचे निजस्वार्था । श्रीकृष्णनाथा कळवळा ॥ ३६ ॥ ज्ञानाभिमानाचें बाधकारण । सर्वथा साधकां न कळे जाण । यालागीं न करितांही प्रश्न । त्यांचे निराकरण हरि सांगे ॥ ३७ ॥ उद्धव जन्मला यादववंशीं । यादव निमती ब्रम्हशापेंसीं । तेथ वांचवावया उद्धवासी । संपूर्ण ब्रह्मज्ञानासी हरि सांगे ॥ ३८ ॥ जेथ देहातीत आत्मज्ञान । तेथ न बाधी शापबंधन । हें जाणोनियां श्रीकृष्ण । पूर्ण ब्रह्मज्ञान उपदेशी ॥ ३९ ॥ जेवीं साकरेवरी माशी । तेवीं श्रीकृष्णमूर्तीपाशीं । प्रीति जडली उद्धवासी । भाव एकदेशी दृढ झाला ॥ ४० ॥ कृष्णापासूनि दुरी जातां । उद्धव प्राण सांडील तत्त्वतां । ते मोडावया एकदेशी अवस्था । ब्रह्मसमता हरि सांगे ॥ ४१ ॥ एकदेशी झाला भावो । तो श्रीकृष्ण नावडे पहा हो । यालागीं देवाधिदेवो । ब्रह्मसमन्वयो स्वयें सांगे ॥ ४२ ॥ उद्धव असतां कृष्णाजवळी । ब्रह्मशापें होईल होळी । यालागीं त्यासी वनमाळी । सर्वब्रह्मसुकाळीं घालूं पाहे ॥ ४३ ॥ कृष्णावेगळा उद्धव जातां । वियोग बाधीना त्याचिया चित्ता । ऐशी पावाया सर्वगतता । उद्धव सर्वथा हरि बोधी ॥ ४४ ॥ श्रीभगवानुवाच-परस्वभावकर्माणि न प्रशंसेन्न गर्हयेत् । विश्वमेकात्मकं पश्यन् प्रकृत्या पुरुषेण च ॥ १ ॥ जो निःशब्दाचा सोलींव शब्द । ज्याचे निश्वासें जन्मले वेद । उद्धवहितार्थ गोविंद । ज्ञान विशुद्ध स्वयें सांगे ॥ ४५ ॥ संसारीं मुख्य तिन्ही गुण । त्रिगुणांस्तव त्रिविध जन । त्यांचें स्वाभाविक कर्म जाण । शांत दारुण आणि मिश्र ॥ ४६ ॥ त्य कर्मांचें निंदास्तवन । सर्वथा न करावें आपण । एकाचें वानितां भलेपण । इतरां कुडेपण तेणेंचि बोलें ॥ ४७ ॥ पांचांमाजीं भलेपण । एकाचें वानितां आपण । इतर जे चौघेजण । ते सहजें जाण निंदिले ॥ ४८ ॥ वामसव्य उभय भाग । दों नांवीं एकचि अंग । तेवीं प्रकृतिपुरुषात्मक जग जग । चिद्रूपें चांग एकत्वें ॥ ४९ ॥ जग ब्रह्मरूप परिपूर्ण । यालागीं निंदा आणि स्तवन । भूतमात्राचें आपण । कदाही काळीं जाण न करावें ॥ ५० ॥ सर्व भूतांच्या ठायीं । आत्माराम असे पाहीं । यालागीं निंदास्तुति कांहीं । प्राणांतीं पाहीं न करावी ॥ ५१ ॥ उद्धवा निंदास्तुतीची कथा । सांडी सांडीं गा सर्वथा । तरीच पावशी परमार्थ । निजस्वार्था निजबोधें ॥ ५२ ॥ सर्वभूतीं भगवद्भाव । हा ब्रह्मस्थितीचा निज निर्वाह । यासी कदा नव्हे अपाव । ऐक तो भाव उद्धवा ॥ ५३ ॥ जेथूनि येवूं पाहे अणाव । तेथें दृढ वाढल्या भगवद्भाव । तेव्हां अपावचि होय उपाव । विघ्नासी ठाव असेना ॥ ५४ ॥ हे स्थिती सांडूनियां दूरी । मी ज्ञाता हा गर्व धरी । निंदास्तुतीच्या भरोवरी । तो अनर्थामाझारीं निमग्न ॥ ५५ ॥ परस्वभावकर्माणि यः प्रशंसति निन्दति । स आशु भ्रश्यते स्वार्थादसत्यभिनिवेशतः ॥ २ ॥ मी एक सर्वज्ञाता पूर्ण । ऐसा धरोनि ज्ञानाभिमान । जगाचे देखे दोषगुण । निंदी ब्राह्मण मुख्यत्वें ॥ ५६ ॥ पराचें स्वाभाविक कर्म । स्वयें निंदणें हा अधर्म । हनुमंत ज्ञाता परम । त्यास वानरी कर्म सोडीना ॥ ५७ ॥ नारद ज्ञातेपणें मोठा । सत्य मानला श्रेष्ठश्रेष्ठां । तोही कळिलावा कळिकांटा । स्वभावचेष्टा अनिवार ॥ ५८ ॥ गरुड देवाचें वाहन । सदा तिष्ठे हात जोडून । तोही करी सर्पभक्षण । ऐसें कर्म जाण स्वाभाविक ॥ ५९ ॥ विचारतां जग त्रिगुण । गुणानुसारें कर्माचरण । तेथ पाहतां दोषगुण । दोषी जाण पाहे तो ॥ ६० ॥ जगीं पहावी एकात्मता । हे ब्रह्मस्थिति गा सर्वथा । सांडूनि गुणदोष पाहतां । तो निजात्मघात प्रवर्ते ॥ ६१ ॥ स्वभावें भेटल्या सज्जन । शोधूनि पाहे दोषगुण । यापरी ज्ञानाभिमान । निंदास्तवन उपजवी ॥ ६२ ॥ अभिमानाची जाती कैशी । अधिक खवळे सज्ञानापाशी । तो दाखवी गुणदोषांसी । निंदास्तवनासे उपजवी ॥ ६३ ॥ आपुले वृत्तीसी जो समान । त्याचें अळुमाळ करी स्तवन । न मने आपणासी ज्याचा गुण । त्यासी निंदी आपण यथेष्ट ॥ ६४ ॥ निंदास्तुति उपजे जेथ । भेद क्षोभला उठे तेथ । निःशेष निर्दाळी परमार्थ । महा अनर्थ अंगीं वाजे ॥ ६५ ॥ निंदेपाठीं अनर्थ । उधार लागों नेदी तेथ । रोकडा अंगीं आदळत । निजस्वार्थघातक ॥ ६६ ॥ भेद समूळ मिथ्या येथ । येचि अर्थींचा स्वप्नदृष्टांत । स्वयें सांगे श्रीकृष्णनाथ । दृढ परमार्थ साधावया ॥ ६७ ॥ तैजसे निद्रयाऽऽपन्ने पिण्डस्थो नष्टचेतनः । मायां प्राप्नोति मृत्युं वा तद्वन्नानार्थदृक् पुमान् ॥ ३ ॥ इंद्रियें जन्मलीं रजोगुणीं । तन्मात्रा विषयो तमोगुणीं । तीं इंद्रियें विषय सेवुनी । ठेलीं निद्रास्थानीं निश्चळ ॥ ६८ ॥ जागृतीं ‘विश्व’ अभिमानी । दोनी जाती मावळोनी । तेव्हां मिथ्या प्रपंच स्वप्नीं । ‘तैजस’ अभिमानी विस्तारी ॥ ६९ ॥ स्थूल देह असे निश्चळ । स्वप्नीं मनचि केवळ । विस्तारी गा भवजाळ । लोक सकळ त्रिलोकीं ॥ ७० ॥ त्या स्वप्नामाजिले सृष्टीसी जाण । उत्पत्ति स्थिति आणि निदान । स्वयें देखतांही आपण । जन्ममरण तें मिथ्या ॥ ७१ ॥ तेवीं हे अविद्या दीर्घ स्वप्न । वृथा विस्तारी अभिमान । तेथील मिथ्या जन्ममरण । तूं ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ७२ ॥ तुझ्या निजस्वरूपाच्या ठायीं । भेदाची तंव वार्ताही नाहीं । तेथील शुभाशुभ कांहीं । तुज सर्वथा पाहीं स्पर्शेना ॥ ७३ ॥ किं भद्रं किमभद्रं वा द्वैतस्यावस्तुनः कियत् । वाचोदितं तदनृतं मनसा ध्यातमेव च ॥ ४ ॥ जें जन्मलेंचि नाहीं । तें काळें गोरें सांगूं कायी । ग्रहणेवीण कांहीं । खग्रास पाहीं दिसेना ॥ ७४ ॥ उखरीं भासलें मृगजळ । तें खोल किंवा उथळ । मधुर कीं क्षार केवळ । सांगतां विकळ विवेक ॥ ७५ ॥ तेवीं मिथ्या प्रपंचाचें भान । तेथील दोष आणि गुण । निवडिती जे सज्ञान । ते जाण निमग्न अज्ञानमाजीं ॥ ७६ ॥ जेवीं अवंअसेचिये रातीं । अंधारा जोखूं आंधळे येती । त्यांसी जोखितां दोंही हातीं । एकही रती तुकेना ॥ ७७ ॥ तेवीं प्रपंच मिथ्यापणें । तेथ कानीं जें ऐकणें । कां डोळां जें देखणें । रसना जें चाखणें स्पर्शणें अंगें ॥ ७८ ॥ हाताचें घेणेंदेणें । पायांचें जें चालणें । वाचेचें जें बोलणें । कल्पणें मनें तें मिथ्या ॥ ७९ ॥ अहंकाराचा बडिवार । चित्ताचा चिंतनप्रकार । बुद्धीचा विवेकविचार । हा समूळ व्यवहार मिथ्या तेथ ॥ ८० ॥ चित्रीं जळ आणि हुताशन । अंत्यज आणि ब्राह्मण । व्याघ्र आणि हरिण । भासतांही जाण भिंतीचि भासे ॥ ८१ ॥ तेवीं हा प्रपंच द्वैतयुक्त । भासतां भासे वस्तु अद्वैत । शुभाशुभ कैचें तेथ । ब्रह्म सदोदित परिपूर्ण ॥ ८२ ॥ केळीचा दिंड उकलितां । जो जो पदर तो तो रिता । तेवीं देहादि प्रपंच विवंचितां । मिथ्या तत्ततां मायिक ॥ ८३ ॥ मिथ्या प्रपंचाच्या ठायीं । शुभाशुभ तें लटिकें पाहीं । सत्य वस्तु ठायींच्या ठायीं । शुभशुभ नाही अणुमात्र ॥ ८४ ॥ जो शुभाशुभ म्हणे आहे । त्याची कल्पना त्यासंमुख होये । निजक्ल्पनामहाभयें । जन्ममरण वाहे लटिकेंचि ॥ ८५ ॥ छाया प्रत्याह्वयाभासा ह्यसान्तोऽप्यर्थकारिणः । एवं देहादयो भावा यच्छन्त्यामृत्युतो भयम् ॥ ५ ॥ जळीं प्रतिबिंब साच नसे । जो पाहे तो बिंबला दिसे । मिथ्या प्रपंचाचें रूप तैसें । निजकल्पनावशें भासत ॥ ८६ ॥ तें प्रतिबिंब पाहोनि डोळां । मी म्हणोनि लाविजे टिळा । तेवीं देहाभिमानाचा सोहळा । जीवाच्या कपाळा आदळे ॥ ८७ ॥ कां आपुलीचि उत्तरें । पडिसादें होतीं प्रत्युत्तरें । तें मिथ्याचि परी साचोकारें । श्रवणीं अक्षरें उमटती ॥ ८८ ॥ निश्चळ दोराचें निजरूप । भ्रमें भासल्या प्रचंड सर्प । तो मिथ्या परी भयकंप । महाखटाटोप उपजवी ॥ ८९ ॥ यापरी असंत देहादिक । देहाभिमानें जीवासी देख । जन्ममरणावर्त अनेक । आकल्प दुःख भोगवी ॥ ९० ॥ ‘आत्म्स्यापासोनि देहादि भेद । उपजल हें बोलें वेद । वेदरूपें तूं प्रसिद्ध । मिथ्या वेदवाद घडे केवीं’ ॥ ९१ ॥ ऐसा उद्धवाचा आवांका । वेदवादाची आशंका । समूळ कळली यदुनायका । तेंचि उत्तर देखा देतसे ॥ ९२ ॥ आत्मैव तदिदं मिश्वं सृज्यति प्रभुः । त्राअतो त्राति विश्वात्मा ह्रियते हरतीश्वरः ॥ ६ ॥ तस्मान्नह्यात्मनोऽन्यस्मदन्यो भावो निरूपितः । निरूपितेयं त्रिविधा निर्मूला भातिरात्मनि । प्रपंच प्रत्यक्ष विद्यमान । तेणें भेदयुक्त झालें मन । तेथ बोधी माझें वेदवचन । प्रपंच अभिन्न निजात्मता ॥ ९३ ॥ मूळीं ऊंसचि बीजीं विरुढे । तो ऊंसपणें कांडा चढे । तेवीं प्रपंच वस्तुयोगें वाढे । वाडेंकोडें तद्रूप ॥ ९४ ॥ जैसें सोनियाचें झालें लेणें । तें वर्तत सोनेपणें । लेणें मोडलियाही सोनें । सोनेंपणें स्वतःसिद्ध ॥ ९५ ॥ तिळाची पुतळी केली । ते तिळावयवीं शोभे आली । ते मोडितां न मोडितां भली । असे संचली तिळरूप ॥ ९६ ॥ तेवीं उत्पत्ति स्थिति निदान । प्रपंचासी होता जाण । तेथ आदि मध्य अवसान । वस्तु परिपूर्ण संचली ॥ ९७ ॥ जें एथ भासलें चराचर । तें मी आत्माचि साचार । मजवेगळा जगासी थार । अणुमत्र असेना ॥ ९८ ॥ एवं सृज्य आणि सृजिता । पाल्य आणि प्रतिपाळिता । संहार आणि संहर्ता । मी एकात्मता भगवंत ॥ ९९ ॥ एथ उत्पत्ति स्थिति निधन । त्रिविधरूपें प्रपंच भिन्न । या सर्वांसी मी अधिष्ठान । मजवेगळें जाण असेना ॥ १०० ॥ प्रपंच मजवरी आभासे । परी मी प्रपंचामाजीं नसें । जेवीं मृगजळाचेनि रसें । सूर्य काळवशें भिजेना ॥ १ ॥ त्रिविध प्रपंचाचें जाळ । मजवरी दिसे हें निर्मूळ । जेवीं गगन भासे सुनीळ । परी तेथ अळुमाळ नीळिमा नाहीं ॥ २ ॥ ‘जग प्रत्यक्ष डोळां दिसे । तें निर्मूळ म्हणसी कैसे’ । हे आशंका मानिसी मानसें । ऐक अनायासें तो बोध ॥ ३ ॥ इदं गुणमयं विद्धि त्रिविधं मायया कृतम् ॥ ७ ॥ एतद्विद्वान्मदुदितं ज्ञानविज्ञाननैपुणम् । नचिन्दति न च स्तौति लोके चरति सूर्यवत् ॥ ८ ॥ अध्यात्म अधिदैव अधिभूत । हें त्रिविध जग मायाकृत । नसतें मजमाजीं आभासत । जाण निश्चित त्रिगुणात्मक ॥ ४ ॥ उद्धवा चिथ्या म्हणोनि तूं एथ । झणें होशी उपेक्षायुक्त । येणें मद्वाक्यें साधुसंत । ज्ञानविज्ञानार्थ पावले ॥ ५ ॥ प्रपंचाचें मिथ्या भान । तेंचि ज्ञानांचे मुख्य ज्ञान । येणें ज्ञानें जो सज्ञान । तोचि समान सर्वांभूतीं ॥ ६ ॥ यालागीं हूतांचे गुणागुण । कदा न वदे निंदास्तवन । सूर्याचे परी जाणा । विचरे आपण समसाम्यें ॥ ७ ॥ बदरिकाश्रम उत्तरदेशीं । सेतुबंध दक्षिणेसी । सूर्य संमुख सर्वांसी । विमुखता त्यासी असेना ॥ ८ ॥ सूर्य संमुख पूर्वेच्यांसी । तोचि विमुख पश्चिमेच्यांसी । नहीं तेवीं मी सर्वत्र सर्वांसी । विमुखता मजसी असेना ॥ ९ ॥ सामर्थें तम दवडूनि जाण । भूतांसी सूर्य भेटे आपण । तेविं जगाचे दवडूनि दोषगुण । साधुसज्जन विचरती ॥ ११० ॥ जें हें बोलिलें ज्ञानलक्षण । तेंचि सिद्धांचें पूर्णपण । मुमुक्षीं हें अनुसंधान । सावधान साधावें ॥ ११ ॥ हेंचि पाविजे जिजज्ञान । तेचि अर्थींचें साधन । उद्धवालागीं श्रीकृष्ण । स्वमुखें आपण सांगत ॥ १२ ॥ प्रत्यक्षेणानुमानेन निगमेनात्मसंविदा । आद्यन्तवदसञ्ज्ञात्वा निःसङ्गो विचरेदिह ॥ ९ ॥ जे जन्मोनि नाशवंत । ते सर्वही जाण असंत । आसक्ति सांडोनियां तेथ । उदास विरक्त वर्तावें ॥ १३ ॥ सटावल्याचें बारसें । कोणी न करिती उल्हासें । नश्वर देह वाढतां तैसें । मूर्ख मानसे सुखावती ॥ १४ ॥ उत्पत्तिविनाशलक्षण । त्याचें देव सांगतो प्रमाण । नित्य भूतांचें जन्ममरण । देखिजे आपण ‘प्रत्यक्ष’ ॥ १५ ॥ ‘अनुमान’ करितां साचार । जें जें दिखिजे साकार । मेरुपृथ्व्यादि आकार । होती नश्वर प्रळयांतीं ॥ १६ ॥ येचि अर्थीं वेदोक्ती । नाशवंत अष्टधा प्रकृति । जीवभाव नासे गा प्रांतीं । गर्जती श्रुती येणें अर्थें ॥ १७ ॥ एथ आपुलाही अनुभव असे । जड विकारी तें तें नासे । हें कळत असे गा आपैसें । जग अनायासें नश्वर ॥ १८॥ वडील निमाले देखती । पुत्रपौत्र स्वयें संस्कारिती । तरी स्वमृत्यूची चिंता न करिती । पडली भ्रांती देहलोभें ॥ १९ ॥ पुत्र पितरां पिंडदान देती । उत्तम गति त्यांची चिंतिती । आपुली गति न विचारितीं । नश्वर आसक्ती देहलोभें ॥ १२० ॥ आत्मा केवल प्रकाशघन । प्रपंच जड मूढ अज्ञान । हें ऐकोनि उद्धवें आपण । देवासी प्रश्न पूसतु ॥ २१ ॥ उद्धव उवाच-नैवात्मनो न देहस्य संसृतिर्द्रश्ययोः । अनात्मस्वदृशोरीश कस्य स्यादुपलभ्यते ॥ १० ॥ आत्मा नित्यमुक्त चिद्घन । त्यासी न घडे भवबंधन । देह जड मूढ अज्ञान । त्यासी संसार जाण घडेना ॥ २२ ॥ एथ भवबंधन हृषीकेशी । सांग पां बाधक कोणासी । जरी तूं संसार नाहीं म्हणसी । तो प्रत्यक्ष जगासी जडलासे ॥ २३ ॥ आत्म्यासी विचारितां जाण । भवबंधा न दिसे स्थान । येचि अर्थींचें न घडतेपण । उद्धव आपण सांगत ॥ २४ ॥ आत्माव्ययोऽगुणः शुद्धः स्वयंज्योतिनरावृतः । अग्निवद्दरुवदचिद्देहः कस्येह संसृतिः ॥ ११ ॥ आत्मा चिद्रूप अविनाशी । गुण निर्गुण नातळे ज्यासी । कर्माकर्मपापपुण्यासी । ठाव त्यापाशीं असेना ॥ २५ ॥ परादिवाचा नव्हे उच्चार । यालागीं म्हणीपें ‘परात्पर’ । प्रकृतिगुणीं अविकार । प्रकृतिपर परमात्मा ॥ २६ ॥ जयाच्या स्वप्रकाशदीप्तीं । रविचंद्रादि प्रकाशती । प्रकाशे त्रिजगती । तेजोमूर्ती परमात्मा ॥ २७ ॥ ऐशिया आत्म्याच्या ठायीं । भवबंधन न लगे कांहीं । सूर्य बुडे मृगजळाच्या डोहीं । तैं आत्म्यासी पाहीं भवबंध ॥ २८ ॥ खद्योततेजें सूर्य जळे । बागुलाभेणें काळ पळे । मुंगीचेनि पांखबळें । जैं उडे सगळें आकाश ॥ २९ ॥ वारा आडखुळीला आडीं पडे । जैं थिल्लरामाजीं मेरु बुडे । तरी भवबंध आत्म्याकडे । सर्वथा न घडे गोविंदा ॥ १३० ॥ देहाकडे भवबंधन । मूर्खही न मानिति जाण । देह जड मूढ अज्ञान । त्यासी भवबंधन कदा न घडे ॥ ३१ ॥ जैं दगडाचें पोट दुखे । कोरडें काष्ठ चरफडी भुकें । तैं देहाकडे यथासुखें । भवबंध हरिखे लागता ॥ ३२ ॥ जैं दोगरासी तरळ भरे । मृत्तिका नाहाणालागीं झुरे । कोळसेनि काळें होय अंधारें । तैं भवबंधभारें देह दाटे ॥ ३३ ॥ म्हणसी देहात्मसंगतीं । घडे भवबंधाची प्राप्ती । विचारितां तेही अर्थीं । न घडे श्रीपति तें ऐक ॥ ३४ ॥ आत्मास्वप्रकाश महावन्ही । देह तो जड मूढ काष्ठस्थानीं । तो मिळतां आत्ममिळणीं । सांडी जाळूनि तत्काळ ॥ ३५ ॥ जैं अग्निमाजीं संवादें । कापूर आठ प्रहर नांदे । तैं देहात्मनिजसंबंधें । देह भवबंधें नांदता ॥ ३६ ॥ म्हणसी काष्ठामाजीं अग्नि असे । परी तो काष्ठचि होऊनि नसे । मथूनि काढिल्या निजप्रकाशें । जाळी अनायासें काष्ठतें ॥ ३७ ॥ तेवीं आत्मा देहामाजीं असे । परी तो देहचि होऊनि नसे । देहप्रकाशक चिदंशे । भवबंधपिसें त्या न घडे ॥ ३८ ॥ आशंका ॥ म्हणशी ‘आत्म्याचे निजसंगतीं । जैं कळोनि जाय भूतव्यक्ती । तैं भूतांची वर्तती स्थिती । कैशा रीतीं’ तें ऐक ॥ ३९ ॥ छायामंडपीं दीप प्रकाशी ॥ नाचवी कागदांच्या बाहुल्यासी । तेच लावितां दीपासी । जाळी अनायासीं त्या व्यक्तीं ॥ १४० ॥ तेवीं आत्म्याचे स्वसत्तशक्तीं । भूतें दैवयोगें वर्तती । स्वयंभू झाल्या आत्मस्थिती । भूतव्यक्ती उरेना ॥ ४१ ॥ करितां आत्म्याचें अनुसंधान । संसाराचें नुरे भान । तेथ भूताकृति भिन्नभिन्न । कैंच्या जाण अतिबद्ध ॥ ४२ ॥ यापरी भवबंधन । मज पाहतां मिथ्या जाण । भवबंधालागीं स्थान । नेमस्त जाण असेना ॥ ४३ ॥ आत्म्याच्या ठायीं ना देहीं । उभयसंबंधींही नाहीं । भवबंध मिथ्या पाहीं । त्यासी ठावो कोठेंही असेना ॥ ४४ ॥ कोपों नको श्रीकृष्णनाथा । माझेनि निजनिर्धारे पाहतां । भवबंध मिथ्या तत्त्वतां । निश्चयें चित्ता मानलें ॥ ४५ ॥ ऐकोनि उद्धवाचें वचन । हरिखें वोसंडला श्रीकृष्ण । माझा उद्धव झाला सज्ञान । निजत्मखूण पावला ॥ ४६ ॥ सत्य मिथ्या भवबंधन । ऐकोनि उद्धवाचें वचन । परमानंदें डोले श्रीकृष्ण । जीवें निंबलोण करूं पाहे ॥ ४७ ॥ आत्म्यास भवबंध नाहीं । शेखींन दिसे देहाच्या ठायीं । हा विवेक नेणिजे जिंहीं । त्यासी भवबंध पाहीं हरि सांगे ॥ ४८ ॥ श्रीभगवानुवाच- यावद्देहेन्द्रियप्राणैः आत्मनः सन्निकर्षणम् । संसार फलवांस्तावद् अपार्थोऽप्यविवेकिनः ॥ १२ ॥ जो वर्णाश्रमांहीपरता । जो बंधमोक्ष अलिप्तता । जो देहद्वंद्वा नातळता । तो उद्धवहितार्था हरि बोले ॥ ४९ ॥ मी कृश स्थूळ गौर श्याम । हे देहाचे ‘देहधर्म’ । मी काणा मुका बहिरा परम । हे ‘इंद्रियधर्म’ इंद्रियांचे ॥ १५० ॥ क्षुधातृषादि अनुक्रम । हा प्रणांचा ‘प्राणधर्म’ । कामक्रोधलोभादि संभ्रम । हा ‘मनोधर्म’ मनाचा ॥ ५१ ॥ सत्त्वगुणाची ‘जागृती’ । रजोगुणें ‘स्वप्नस्फूर्ती’ । तमोगुणें जाड्य ‘सुषुप्ती’ । जाण निश्चितीं देहयोगें ॥ ५२ ॥ देहासी येतां मरण । ‘मी मेलों’ म्हणे तो आपण । देहासी जन्म होतां जाण । जन्मलेपण स्वयें मानीं ॥ ५३ ॥ इंद्रिये विषयो सेविती । ते म्यां सेविले मानी निश्चितीं । स्वर्गनरकभोगप्राप्ती । सत्य मानिती देहात्मता ॥ ५४ ॥ अन्न आकांक्षी प्राण । त्यातें भक्षी हुताशन । तत्साक्षी चिदात्मा आपण । म्हणे म्यां अन्न भक्षीलें ॥ ५५ ॥ हे अवघे माझे धर्मं । ऐसा आत्म्यासी जंव दृढ भ्रम । तंव मिथ्याचि अतिदुर्गम । संसार विषम भ्रमें भोगी ॥ ५६ ॥ त्या भोगाचें फळ गहन । अविश्रम जन्ममरण । स्वर्गनरक पापपुण्य । भ्रमें आपण सत्य मानी ॥ ५७ ॥ संसार मूळीं निमूळ । तोही भ्रमफळें सदाफळ । जो कां अविवेक्यां अतिप्रबळ । सर्वकाळ फळलासे ॥ ५८ ॥ जेथ सत्य अर्थं नाहीं । तो ‘अनर्थ’ म्हणिजे पाहीं । त्याचा फळभोग तोही । बाळबागुलन्यायीं भोगावा ॥ ५९ ॥ आशंका ॥ ‘गगनकमळांची माळा । जैं वंध्यापुत्र घाली गळां । तैं संसारभोगाचा सोहळा । आत्म्याच्या जवळां देखिजे ॥ १६० ॥ ऐसें न घडतें केवीं घडे’ । तेचि अर्थींचें वाडेंकोडें । श्रीकृष्ण उद्धवापुढें । निजनिवाडें सांगत ॥ ६१ ॥ अर्थे ह्यविद्यमानेऽपि संसृतिर्न निवर्तते । ध्यायतो विषयानस्य स्वप्नेऽनर्थागमो यथा ॥ १३ ॥ सत्यार्थ नसतांही संसार । निवर्तेना अतिदुर्धर । येचि अर्थींचा विचार । निजनिर्धार अवधारीं ॥ ६२ ॥ वंध्यापुत्राचिया ऐसें । संसारा सत्यपण नसे । सत्य म्हणों तरी हा नासे । काळवशें सहजेंचि ॥ ६३ ॥ संसार जैं सत्य होता । तैं ब्रह्मज्ञानेंही न नासता । हा संतासंत नये म्हणतां । अनिर्वाच्या कथा पैं याची ॥ ६४ ॥ अविचारितां याचें कोड । अविवेकें हा अतिगोड । विषयध्यानें वाढे रूढ । संकल्प सदृढ मूळ याचें ॥ ६५ ॥ हा नसतचि परी आभासे । निद्रिता स्वप्नीं अनर्थपिसें । तेवीं संसार मायावशें । विषय आभासें भोगवी ॥ ६६ ॥ जंव जंव विषयसेवन । तंव वाढे विषयध्यान । विषयध्यासें भवबंधन । सदृढ जाण उद्धवा ॥ ६७ ॥ विषयसेवनें भवबंधन । जीवासी झालें दृढ पूर्ण । तैं जीवन्मुक्तासी विषयभान । दैवयोगें जाण दिसताहे ॥ ६८ ॥ ‘जीवनमुक्तासी विषयप्राप्ती । तेणें बुडाली त्याची मुक्ती’ । ऐशी आशंका न धरीं चित्तीं । तेंचि श्रीपति विशद सांगे ॥ ६९ ॥ यथा ह्यप्रतिबुद्धस्य प्रस्वापो बह्वनर्थभृत् । स एव प्रतिबुद्धस्य न वै मोहाय कल्पते ॥ १४ ॥ सज्ञान आणि अज्ञान । यांसी जें विषयसेवन । त्यांचा अनुभव भिन्नभिन्न । तेंही लक्षण अवधारीं ॥ १७० ॥ जेवीं स्वप्नींची विषयप्राप्ती । स्वप्नस्थ साचचि मानती । तेचि विषय जागृतीं स्फुरती । परी सत्यप्रतीति त्यां नाहीं ॥ ७१ ॥ तेवीं अज्ञानां विषयसेवन । तेणें विषयासक्त होय मन । तेंचि मुक्तांप्रति विषय जाण । मिथ्या दर्शन विषयांचें ॥ ७२ ॥ नटनट्य-लोकाचारीं । संपादी स्त्रीपुरुषव्यवहारीं । मुक्तासी तैशी परी । गृहदारीं नांदता ॥ ७३ ॥ कां लेंकरांच्या खेळाप्रती । तुळसीदळें घेऊनि हातीं । वडे मांडे क्षीर तूप म्हणती । एकीं कल्पिती अनेकत्व ॥ ७४ ॥ तेवीं जीवन्मुक्तांसी देख । जगीं विषयो अवघा एक । त्यासी नानात्वें भाविती लोक । परी तो अनेक देखेना ॥ ७५ ॥ दृढ धरोनि देहाभिमान । ‘मी माझें’ जें विषयस्फुरण । तेंच भवबंधाचें कारण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥ ७६ ॥ शोकहर्षभयक्रोधलोभमोहस्पृहादयः । अहंकारस्य दृश्यन्ते जन्ममृत्युश्च नात्मनः ॥ १५ ॥ देहाभिमानाचें पोटीं । अनेक दुःखांचिया कोटी । त्यांची संकळितें गुणगोठी । कृष्ण जगजेठी सांगत ॥ ७७ ॥ देहाभिमानाचें कार्य एथ । अद्वैतीं वाढवी द्वैत । इष्टानिष्टीं समस्त । जग व्याप्त तेणें कीजे ॥ ७८ ॥ नश्वरा इष्टाचा नाश देख । तेणें देहअहंता मानी दुःख । या नांव गा ‘शोक’ । सकळही लोक मानिती ॥ ७९ ॥ नश्वर विषयांची प्राप्ती । तेथें आल्हाद उपजे चित्तीं । त्या नांव ‘हर्ष’ म्हणती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १८० ॥ बळी मिळोनि समर्थ । आप्त विषयो विभांडूं पाहात । तेणे कासावीस होय चित्त । ‘भय’ निश्चित या नांव ॥ ८१ ॥ आप्तकामाचें अवरोधन । ज्याचेनि अणुमात्र होय जाण । त्याचें करूं धांवे हनन । ‘क्रोध’ संपूर्ण त्या नांव ॥ ८२ ॥ गांठी झाल्याही धनकोडी । कवडी वेंचितां प्राण सोडी । या नांव ‘लोभाची’ बेडी । कृपण-परवडी पुरुषाची ॥ ८३ ॥ कर्माकर्म हिताहित । इष्टानिष्ट नाठवी चित्त । विवेकशून्य स्तब्धता प्राप्त । ‘मोह’ निश्चित या नांव ॥ ८४ ॥ नित्य करितां विषयसेवन । मनीं विषयइच्छा गहन । अखंड विषयांचें ध्यान । ‘स्पृहा’ जाण ती नांव ॥ ८५ ॥ इत्यादि हे नाना गुण । अथवा कां जन्ममरण । आत्म्यासी संबंध नाहीं जाण । हें देहाभिमान स्वयें भोगी ॥ ८६ ॥ जागृति आणि देखिजे स्वप्न । तेथ वसे देहाभिमान । ते ठायीं हे दिसती गुण । सुषुप्तीस जाण गुण नाहीं ॥ ८७ ॥ जेथ वृत्ति निरभिमान । तेथ जन्ममरणादि हे गुण । सर्वथा नुठती जाण । गुणासी कारण अभिमान ॥ ८८ ॥ जळीं स्थळीं वायु झगटी । जळीं तरंग स्थळीं नुठी । तैं तरंगता जळाचे पोटीं । तेंवी शोकादि गुणकोटी अहंतेमाजीं ॥ ८९ ॥ बद्धता झाली अहंकारासी । म्हणसी मुक्ति व्हावी त्यासी । ते अहंता लागली जेवासी । तेंचि हृषीकेशी सांगत ॥ १९० ॥ अंत्यजाचा विटाळ ज्यासी । गंगास्न्नानें शुद्धत्व त्यासी । तें गंगास्न्नान अंत्यजासी । शुद्धत्वासी अनुपयोगी ॥ ९१ ॥ तेवीं अहंता जडली जीवासी । ते त्यागितां मुक्तत्व त्यासी । परी मुक्तत्व अहंकारासी । कल्पांतेंसी घडेना ॥ ९२ ॥ देहेन्द्रियप्राणमनोऽभिमानो जीवोऽन्तरात्मा गुणकर्ममूर्तिः । सूत्रं महानित्युरुधेव गीतः संसार आधावति कालतन्त्र ॥ १६ ॥ अनंत अपार ज्ञानघन । मायातीत आत्मा पूर्ण । तोचि झाला मायेचें अधिष्ठान । ‘अंतरात्मा’ जाण यालागीं म्हणिपे ॥ ९३ ॥ माया व्यापूनि अपार । यालागीं बोलिजे ‘परमेश्वर’ । मायानियंता साचार । यालागी ‘ईश्वर’ म्हणिपे तो ॥ ९४ ॥ तोचि अविद्येमाजीं प्रतिबिंबला । यालागीं ‘जीव’ हें नाम पावला । तोचि देहाध्यासें प्रबळला । ‘अहंकार’ झाला या हेतू ॥ ९५ ॥ तो संकल्पविकल्पउपाधीनें । स्वयें होऊनि ठेला ‘मन’ । त्यासी मनासी करावया गमन । ‘दशेंद्रियें’ जाण तोचि झाला ॥ ९६ ॥ त्या इंद्रियाचा आधार । सुखदुःखभोगांचा निकर । पापपुण्याचा चमत्कार । ‘देहाचा आकार’ तोचि झाला ॥ ९७ ॥ त्या देहाचें जें कारण । ‘सत्व-रजोतमगुण’ । ते तीन्ही गुण जाण । तोचि आपण स्वयें झाला ॥ ९८ ॥ गुणक्षोभाचें निजवर्म । झाला ‘पंचविषय’ परम । विषयभोगादि क्रिया कर्म । स्वयें ‘स्वधर्म’ होऊनि ठेला ॥ ९९ ॥ तिनी गुणांचें जन्मकारण । झाला ‘महत्तत्व-सूत्रप्रधान’ । एवं संसार अवघा जाण । ईश्वर आपण स्वयें झाला ॥ २०० ॥ त्या संसाराची आधावती । गुणसाम्यें तोचि ‘प्रकृति’ । तेथ उत्पत्तिस्थिति-प्रळयार्थी । क्षोभिकाशक्ति ‘काळ’ तो झाला ॥ १ ॥ तो काळ आपल्या सत्ताशक्तीं । उपजवी पाळी संहारी अंतीं । ऐशा पुनःपुनः आवृत्ती । जेणें किती करवीत ॥ २ ॥ एवं संसार तो ब्रह्मस्फूर्ति । लीलाविग्रहें साकारस्थिती । मी विश्वेश्वर विश्वमूर्ती । बहुधा व्यक्ती मी एक ॥ ३ ॥ यालागीं जो जो पदार्थ दिसे । तेणें तेणें रूपें आत्मा भासे । मजवेगळा पदार्थ नसें । हें मानी विश्वासें तो धन्य ॥ ४ ॥ मीचि एक बहुधा व्यक्ती । वेदही साक्षी येचि अर्थीं । ‘विश्वतश्चक्षु’ या वेदोक्तीं । श्रुति मज गाती सर्वदा ॥ ५ ॥ ऐसें असतां नवल कैसें । जीव भुलला कल्पनावशें । अहतां वाढवी देहाध्यासें । तो म्हणे देव न दिसे तिहीं लोकीं ॥ ६ ॥ सत्य मानूनि भेदभान । जीव झाला अतिअज्ञान । भुलला आपण्या आपण । देहाभिमान दृढ झाला ॥ ७ ॥ देहाभिमानाचें दृढपणा । तेंचि ‘बद्धतेचें लक्षण’ । देहाभिमानाचें निरसन । ‘मुक्तता’ जाण ती नांव ॥ ८ ॥ समूळ मिथ्या देहाभिमान । मिथ्या भेदाचें भवभान । त्याचें आद्यंत निर्दळण । होतें लक्षण हरि सांगे ॥ ९ ॥ अमूलमेतद् बहुरूपरूपितं मनोवचःप्राणशरीरकर्म । ज्ञानासिनोपासनया शितेन च्छित्वा मुनिर्गां विचरत्यतृष्णः ॥ १७ ॥ भेदरूपें भवभान । मनसा वाचा कर्म प्राण । देहद्वयाचें जें स्फूरण । तें निर्मूळ जाण उद्धवा ॥ २१० ॥ भेदें बहुरूप भवपटळ । विचारितां तें निर्मूळ । विचित्र भासावया भवजाळ । आत्म्यावेगळें स्थळ असेना ॥ ११ ॥ आत्म्याहूनि संसार भिन्नं । म्हणती ते केवळ अज्ञान । त्यांसी बहुरूपें भवभान । देहभिमान वाढवी ॥ १२ ॥ त्यादेहाभिमानाचे पोटीं । कर्माकर्मांची आटाटी । जन्ममरणांचिया कोटी । दुःख संकटीं जीव भोगी ॥ १३ ॥ ऐसा दुःखादाता देहाभिमान । समूळ जाणोनियां आपण । त्याचें करावया निर्दळण । अनुतापी पूर्ण जो स्वयें होय ॥ १४ ॥ तेणें आचार्यौपास्ती । लाहोनि ज्ञानखड्गाची प्राप्ती । गुरुवाक्यसाहणेप्रती । सतेजद्युती खड्ग केलें ॥ १५ ॥ भववृक्षाचा समूळ कंद । देहाभिमान अतिसुबद्ध । अद्वैतसाधनें साधक शुद्ध । तेणें समूळ छेद करावा ॥ १६ ॥ एवं छेदूनि देहाभिमान । उरलेनि आयुष्यें जाण । मही विचरती सज्जन । निरभिमान निजनिष्ठा ॥ १७ ॥ तेथ इच्छा निंदा द्वेष तृष्णा । सर्वथा नातळें पैं जाणा । मनचि मुकलें मनपणा । इच्छादि तृष्णा तेथ कैंची ॥ १८ ॥आशंका ॥ समूळ संसारनिर्दळण । करी ऐसें तें ज्ञान कोण । त्या ज्ञानासी कोण साधन । साधल्या ज्ञान फल काय ॥ १९ ॥ याचें समूळ श्रवण । उद्धवाचें वांछी मन । तें जाणोनियां श्रीकृष्ण । स्वयें निरूपण सांगत ॥ २२० ॥ ज्ञानं विवेको निगमस्तपश्च प्रत्यक्षमैतिह्यमथानुमानम् । आद्यन्तयोरस्य यदेव केवलं कालश्च हेतुश्च तदेव मध्ये ॥ १८ ॥ नित्यनित्यविवेक । या नांव ‘ज्ञान’ चोख । देहद्वयाचा प्रकाशक । आत्मा सम्यक जाणती ज्ञाते ॥ २१ ॥ सेवावया स्वादरस-नव्हाळी । प्रथम उंसाचीं पानें साळी । मग ऊंस तोही बळें पिळी । तोही रस आळीं तैं शर्करा लाभे ॥ २२ ॥ तेहि शर्करा परिपाकबळें । तैं साखरचि केवळें । केळें आणि नारेळें । करिती नाना फळें मूळींच्या गोड्या ॥ २३ ॥ तेवीं स्थूळाचें निराकरण । लिंगदेहाचें उपमर्दन । अहंकाराचें निर्दळण । करूनि पूर्ण ब्रह्म पावती ज्ञाते ॥ २४ ॥ तें ब्रह्म निर्गुण निराकार । तद्रूपें देखती चराचर । यापरी विवेकचतुर । वस्तूचा निर्धार जाणती ॥ २५ ॥ यापरी गा विचक्षण । जाणती वस्तूचें लक्षण । या नांव पैं ‘विवेकज्ञान’ । उद्धवा जाण निश्चित ॥ २६ ॥ वस्तु निःशब्द निर्गण । तेथ जें श्रतिचें स्फुरण । इत्थंभूत शब्दज्ञान । वेद तो जाण निगम माझा ॥ २७ ॥ तो मी वेदरूप नारायण । यालागीं वेदवचन प्रमाण । श्रुत्यर्थ शब्दज्ञान । करी पावन पाठकां ॥ २८ ॥ जाणावया निजात्मस्वरूप । देहादि विषयांचा अनुताप । जेणें साधक होती निष्पाप । या नांव ‘तप’ उद्धवा ॥ २९ ॥ अनुतापें दमितां मन । होय पापाचें क्षालन । तेव्हां श्रुत्यर्थे आपण । कल्पी ‘अनुमान’ वस्तूचें ॥ २३० ॥ देह जड मूढ अचेतन । तेथ चेतनात्मक नारायण । देहाचें मानूनि मिथ्यापण । अद्वैतीं मन मुसावे ॥ ३१ ॥ तें अद्वैतप्राप्तीचें लक्षण । अनन्यभावें आपण । सद्गुरूसी रिघावें शरण । निरभिमान भावार्थें ॥ ३२ ॥ सद्भावें अनन्यशरण । तो गुरुकृपा पावे आपण । पाहोनि अधिकारलक्षण । गुरु गुह्यज्ञान उपदेशी ॥ ३३ ॥ ‘सर्वही निष्टंक परब्रह्म’ । हें श्रुतिगुह्य उत्तमोत्तम । एथ भाग्यें जो सभाग्य परम । त्यासाचि सुगम ठसावे ॥ ३४ ॥ गुरुवचन पडतां कानीं । वृत्ति निजात्मसमाधानीं । विनटोनि ठेली चिद्धनीं । सुखसमाधानीं स्वानंदें ॥ ३५ ॥ तयासी पुढतीं साधन । अथवा कर्माचें कर्माचरण । तेथ बोलों शके कोण । वेदीं मौन घेतलें ॥ ३६ ॥ जेथ द्वंद्वाची निमाली निमाली स्फूर्ती । सकळ दुःखांची समाप्ती । देहीं विदेहवस्तुप्राप्ती । ‘प्रत्यक्ष’ म्हणती या नांव ॥ ३७ ॥ पुसूनियां विसरावा ठावो ठावो । आठवेंवीण नित्य आठवो । अखंड स्यरूपानुभवो । ‘प्रत्यक्ष’ पहा हो या नांव ॥ ३८ ॥ मी आत्मा स्वानंदकंद । ऐसा अखंडत्वें परमानंद । ‘प्रत्यक्ष’ पदाचा हा निजबोध । स्वयें गोवींद बोलिला ॥ ३९ ॥ हाचि बोध सभाग्याकडे । श्रवणमात्रें त्या आतुडे । एका मननें जोडे । एका सांपडे निधिध्यासें ॥ २४० ॥ एकासी तो प्रत्यगावृत्तीं । हा बोध ठसावे चित्तीं । एका माझिया अद्वैतभक्तीं । मी सगळा श्रीपति आतुडें ॥ ४१ ॥ निजबोध साधावया पूर्ण । उद्धवा हें तों मुख्य साधन । एवं साधलिया निजज्ञान । फळ कोण तें ऐक ॥ ४२ ॥ जो मी सृष्टिआदि अनंतु । नित्यमुक्तत्वें अहेतु । तो मी भवमूळा मूळहेतु । सृष्टिसृजिता अच्युतु स्वलीला ॥ ४३ ॥ तेथ रजोगुणाचिये स्थिती । स्त्रष्टरूपें मीचि पुढतीं । अद्वैतीं दावीं अनेक व्यक्ती । सृष्टिउत्पत्तिकर्ता तो मी ॥ ४४ ॥ जैसें मूळेंवीण सफळ झाड । वाढविलें निजांगीं गोड । तेवीं सृष्टिसंरक्षणीं कोड । मज निचाडा चाड प्रतिपालनीं ॥ ४५ ॥ बुद्धिबळें एक काष्ठाचे पोटीं । तेथ राजा प्रधान पशु प्यादा उठी । त्यांसी पूर्वकर्म नाहीं गांठीं । तेवीं निष्कर्मे सृष्टिप्रकाशिता तो मी ॥ ४६ ॥ निष्कर्मे जग समस्त । सृजिता मीमांसकमत । ठकोनि ठेलें निश्चित । जग सदोदित निष्कर्मब्रह्म ॥ ४७ ॥ जेवीं बुद्धिबळांचा खेळ । अचेतनीं युद्ध प्रबळ । तेवीं लोकरक्षणीं कळवळ । सृष्टिप्रतिपाळ मी कर्ता ॥ ४८ ॥ प्रकृतीच्या जडमूढ सारी । पुरुषाचेनि सचेतन निर्धारीं । काळफांसे घेऊनि करीं । खेळविता चराचरीं मी एक विष्णु ॥ ४९ ॥ तेथ अचेतना झुंजारीं । न मरत्या महामारीं । एका जैत एक हारी । उभयपक्षांतरीं खेळविता मी ॥ २५० ॥ सोंगटीं निमलियापाठीं । कवण पुण्यात्मा चढे वैकुंठीं । कोण पडे नरकसंकटीं । तैसा जाण सृष्टीं बंधमोक्ष ॥ ५१ ॥ तेवीं न मोडतां एकलेपण । त्या खेळाच्या ऐसें जाण । जगाचें करीं मी पालन । दुजेंपण नातळतां ॥ ५२ ॥ दोराचा सर्पाकार । सबळ बळें मारी वीर । तैसा सृष्टीसी संहार । मी प्रळयरुद्र पैं कर्ता ॥ ५३ ॥ स्वप्नीं भासलें जग संपूर्ण । तेथूनि जागा होतां आपण । स्वप्न निर्दळितां कष्ट कोण । तैसा मी जाण प्रळयकर्ता ॥ ५४ ॥ सृष्टिसी उत्पत्ति स्थिति निदान । आत्मा आत्मत्वें अखंड पूर्ण । तेंचि स्वरूप सज्ञान । स्वानुभवें आपण होऊनि ठेलें ॥ ५५ ॥ तें निजरूप झालों म्हणणें । हेंही बोलणें लाजिरवाणें । तें स्वयंभ असतां ब्रह्मपणें । होणें न होणें भ्रममात्र ॥ ५६ ॥ मिथ्या दोराचा सर्पाकार । भासतां तो असे दोर । निवर्तल्या सर्पभरभार । दोर तो दोर दोररूपें ॥ ५७ ॥ तेवीं सृष्टीसी उत्पत्ति होतां । आत्मा जन्मेना तत्त्वतां । सृष्टीचा प्रतिपाळकर्ता । आत्मा सर्वथा वाढेना ॥ ५८ ॥ सृष्टीसी महाप्रळय होतां । आत्मा नायके प्रळयवर्ता । उत्पत्तिस्थितिनिदानता । आत्मा तत्त्वतां अविकारी ॥ ५९ ॥ एवं साधनीं सधूनि ज्ञान । साधक झाले सज्ञान । तें अबाधित ब्रह्म पूर्ण । स्वयें आपण होऊनि ठेले ॥ २६० ॥ अज अव्यय स्वानंदघन । साधक झाले ब्रह्म पूर्ण । हें ज्ञानाचें फळ संपूर्ण । उद्धवा जाण निश्चित ॥ ६१ ॥ हें ज्ञानफळ आलिया हाता । उत्पत्ति स्थिति प्रळय होतां । अखंड परिपूर्ण निजात्मता । ते सदृष्टांता हरि सांगे ॥ ६२ ॥ यथा हिरण्यं स्वकृतं पुरस्तात् पश्चाच्च सर्वस्य हिरण्मयस्य । तदेव मध्ये व्यवहार्यमाणं नानापदेशैरहमस्य तद्वत् ॥ १९ ॥ मुकुट कुंडले करकंकणें । न घडितां सोनें सोनेपणें । त्याचीं करितां नाना भूषणे । लेणेंपणें उणें नव्हेचि हेम ॥ ६३ ॥ ते न मोडतां अळंकारठसे । सोनें अविकार संचलें असे । तेवीं उत्पत्तिस्थितिविनाशें । माझें स्वरूप चिदंशें अविनाशी ॥ ६४ ॥ माझें स्वरूप शुद्ध परब्रह्म । तेथ नाना रूप नाना नाम । भासतांही जग विषम । ब्रह्मरस समसाम्यें ॥ ६५ ॥ जेवीं सूर्याचे किरण । सूर्यावेगळे नव्हती जाण । तेवीं जग मजशीं अभिन्न । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ ६६ ॥ विज्ञानमेतत् त्रियवस्थमङ्ग गुणत्रयं कारणकार्यकर्तृ । समन्वयेन व्यतिरेकतश्च येनैव तुर्येण तदेव सत्यम् ॥ २० ॥ सत्त्वगुणें जागरण । रजोगुणें दिसे स्वप्न । तमोगुणें सुषुप्ति जाण । लागे संपूर्ण गाढ मूढ ॥ ६७ ॥ ऐसें तिहीं अवस्थायुक्त मन । कार्य कर्तृत्व कारण । त्रिविध जग भासे संपूर्ण । ब्रह्म समन्वयें जाण सदोदित ॥ ६८ ॥ मृत्तिकेवेगळा घट न दिसे । तंतूवेगळा पट न प्रकाशे । तेवीं मजवेगळें जग नसें । जें जें भासे तें मद्रूप ॥ ६९ ॥ जो मी तिनी गुणांतें नातळता । अवस्थात्रयातें नाकळता । तिंही अवस्थांतें प्रकाशिता । तो मी चवथा जाण ‘तुरीय’ ॥ २७० ॥ तिन्ही अवस्था तिन्ही गुण । दृश्य द्रष्टा आणि दर्शन । त्रिपुटीप्रकाशिता पूर्ण । ती मी चवथा जाण ‘तुरीय’ ॥ ७१ ॥ जो मी तुरीय सच्चिद्धन । त्या माझ्या ठायीं अवस्थागुण । नभीं नीळिमा मिथ्या भान । तैसे नसते जाण भासती ॥ ७२ ॥ आशंका ॥ ‘तिंही अवस्थांचें ज्ञान पाहीं । देखिजे समस्तांच्या ठायीं । चवथें ज्ञान ‘तुरीय’ कांहीं । ऐकिलें नाहीं गोविंदा’ ॥ ७३ ॥ चौथे ज्ञान तुरीयावस्था । मिथ्या म्हणसी न विचारतां । तेचिविखीं विशदार्था । श्रीकृष्ण तत्त्वतां सांगत ॥ ७४ ॥ ‘व्यक्तिरेकतश्च’ ॥ देहादिप्रपंचव्यतिरेकता । भूतीं भूतांचा लयो पाहतां । लीन झालिया गुणावस्था । उरे मी चवथा ‘तुरीय’ ॥ ७५ ॥ तें एवंविध बोलों जातां । वेदीं मूग आरोगिले सर्वथा । हें अनुबवैकवेद्य तत्त्वतां । शब्दप्रगल्भता सरेना ॥ ७६ ॥ एथ न चले युक्तिप्रयुक्ती । न चले जाणिवेची व्युत्पत्ती । न चले लक्ष्यलक्षणस्थिति । गुरुकृपाप्राप्ती ‘तुरीय’ ॥ ७७ ॥ जागृत्यादि सर्वही सत्ता । सुषुप्ति सर्वही असतां । याचा ‘तुरीय’ मी प्रकाशिता । मजविण सर्वथा त्या भासती केवीं ॥ ७८ ॥ जो सुषुप्तीं साक्षित्व पावता । तो मी ‘तुरीय’ जाण पां चौथा । त्या मज सत्यस्वरूपता । केला निश्चितार्था निश्चयो वेदें ॥ ७९ ॥ त्या स्वरूपावेगळें एथ । जें भासे तें मिथ्याभूत । तेचि अर्थीं श्रीकृष्णनाथ । असे सांगत निजबोधें ॥ २८० ॥ न यत् पुरस्तादुत यन्न पश्चात् मध्ये च तन्न व्यपदेशमात्रम् । भूतं प्रसिद्धं च परेण यद्यद् तदेव तत्स्यादिति मे मनीषा ॥ २१ ॥ जागृतीमाजीं जें जें दिसे । तें तें जागृतीसवें नासे । स्वप्नीं जें जें आभासे । तें स्वप्नासरिसें मावळे ॥ ८१ ॥ जागृती स्वप्न निकार्येंसीं । दोनी हारपती सुषुप्तीपाशीं । सुषुप्ती हारपे जागृतीसीं । यापरी प्रपंचासी सत्यत्व नाहीं ॥ ८२ ॥ प्रपंच सृष्टीपूर्वीं नाहीं । प्रळयानंतर नुरेचि कांहीं । मध्येंचि आभासे जें कांहीं । तें मिथ्या पाहीं असंत ॥ ८३ ॥ प्रपंचाचें वोडंबर । नामरूपाचे उभारी भार । तें प्रयक्ष देखों नश्वर । गंधर्वनगर तत्प्राय ॥ ८४ ॥ पित्यादेखतां पुत्र मरे । पुत्रादेखतां पिता झुरे । काळें काळ अवघेंचि सरे । कोणीही नुरे क्रियेसी ॥ ८५ ॥ सागरीं जे लहरी उसासे । उसासली ते स्वयेंचि नासे । तेवीं नामरूपा आलें दिसे । तें अनायासें नश्वर ॥ ८६ ॥ प्रपंच हें नाममात्र । येरवीं परमात्मा मी स्वतंत्र । एवं संसाराचें जन्मपत्र । नेणोनि दुस्तर मानिती जीव ॥ ८७ ॥ प्रपंच ज्यापासूनि झाला । जेणें सर्वार्थीं प्रकाशिला । अंतीं ज्यामाजीं सामावला । तो तद्रूप संचला निजात्मा ॥ ८८ ॥ शुक्तिकारजतन्यायें जाण । प्रपंच ब्रह्मेंसीं अभिन्न । जें प्रपंचाचे स्फुरे स्फुरण । तें ब्रह्मचि पूर्ण उद्धवा ॥ ८९ ॥ त्या माझेनि सत्य श्रेतिस्मृती । तो मी सत्यपदीज्ञ श्रीपती । त्रिसत्य सत्य तुजप्रती । सांगितला निश्चितीं निजभावार्थ ॥ २९० ॥ ऐकोन देवाचें वचन । उद्धव आशंकी आपण । एकाचेनि मतें जाण । प्रपंच भिन्न मानिती ॥ ९१ ॥ प्रपंचासी देवो कांहीं । निजांगीं आतळत नाहीं । ऐसें तूं कल्पिसी कांहीं । ऐक तेविषयीं सांगेन ॥ ९२ ॥ अविद्यमानोऽप्यवभासते यो वैकारिको राजससर्ग एषः । ब्रह्म स्वयंज्योतिरतो विभाति ब्रह्मेन्द्रियार्थात्मविकारचित्रम् ॥ २२ ॥ मुख्यत्वें मन विकारी पूर्ण । त्यासी मिळूनि तिनी गूण । नसताचि संसार जाण । विचित्रा भरण दाखवी ॥ ९३ ॥ मन बुद्धि चित्ता अहंकार । आणि अधिष्ठाते सुरवर । हे सत्त्वगुणाचे विकार । जाण साचार उद्धवा ॥ ९४ ॥ रजोगुणाचीं दशेंद्रियें । पंचभूतें पंचविषये । तमोगुणिया जन्म होये । ते जनासी पाहें भुलविती ॥ ९५ ॥ जेवीं वोडंबरियाचा खेळ । नसताचि भासे प्रबळ । तेवीं त्रिगुणांचें विचित्र जाण । मिथ्या निर्मूळ आभासे ॥ ९६ ॥ ब्रह्म स्वयें अकारण । स्वप्रकाशें प्रकाशमान । तेंचि प्रपंचाचें महाकारण । प्रकाशक जाण स्वयें झालें ॥ ९७ ॥ जेवीं छायामंडपींच्या नाना व्यक्ती । तद्रूप भासे दीपदीप्तीं । तेवीं जगदाकारें स्वयंज्योती । भासें मी चिन्मूर्ति परमात्मा ॥ ९८ ॥ एवं प्रपंचाचें जें स्फूरण । तें स्वप्रकाश ब्रह्म पूर्ण । हें हातवसूनि ब्रह्मज्ञान । विकल्पच्छेदन हरि सांगे । ९९ ॥ एवं स्फुटं ब्रह्म विवेकहेतुभिः परापवादेन विशारदेन । छित्त्वाऽत्मसन्देहमुपारमेत स्वानन्दतुष्टोऽखिलकामुकेभ्यः ॥ २३ ॥ पूर्वीं बोलिलों यथानिगुती । ब्रह्मज्ञान नानायुक्तीं । ते करतलामलकस्थिती । प्रकट प्रतीती प्रमाण ॥ ३०० ॥ वेद-विवेक-अनुमान । ब्रह्मउपदेशाचें लक्षण । ज्ञानाज्ञानाचें फळ पूर्ण । तुज म्यां संपूर्ण सांगितलें ॥ १ ॥ तेथें देहेंद्रियांचें मिथ्यापण । देहात्मभावाचें निराकरण । ब्रह्म अद्वयत्वें परिपूर्ण । तेंहि गुह्य ज्ञान पकाशिलें ॥ २ ॥ म्यां प्रकाशिलें पूर्ण ज्ञान । जें दुर्लभ दुर्गम दुष्प्राप्य जाण । हेंचि सिद्धांचें समाधान । हेंचि साधन साधकां ॥ ३ ॥ जें म्यां सांगितलें ब्रह्मज्ञान । हेंचि उपदेशशस्त्र तीक्षण । साधक साधूनियां पूर्ण । संशय जाण छेदिती ॥ ४ ॥ म्यां सांगितलें ब्रह्मज्ञान । तेथ संदेह मानी मन । तेणें संदेहेंसीं देहाभिमन । येणें शस्त्रें जाण् छेदिती ॥ ५ ॥ यापरी संदेहच्छेदन । करूनि द्वैताची बोळवन । निर्दाळूनियां मीतूंपण । स्वानंदीं निमग्न साधक ॥ ६ ॥ वर्णाश्रम कुळ जाती । जीवशिवादि पदस्थिती । यांची स्फुरेना अहंकृती । या नांव ‘उत्परति’ उद्धवा ॥ ७ ॥ इहमूत्रादि फळें समस्तें । कोण कामी त्या कामातें । विषय विषयी विषयभोगातें । सर्वथा तेथें असेना ॥ ८ । यापरी नित्य निष्काम । साधक झाले ‘आत्माराम’ । परमानंदीं निमग्न परम । पावले ‘उपरम’ येणें योगें ॥ ९ ॥ देहेंद्रियें असतां प्राण । कैसेनि गेला देहाभिमान । उद्धवा ऐसें कल्पील मन । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ ३१० ॥ नात्मा वपुः पार्थिवमिन्द्रियाणि देवा ह्यसुर्वायुजलं हुताशः । मनोऽन्नमात्रं धिषणा च सत्त्वं अहङ्कृतिः खं क्षितिरर्थसाम्यम् ॥ २४ ॥ देह आत्मा नव्हे पार्थिवपणें । इंद्रियें आत्मा नव्हतीं येणें गुणें । तीं तंव देहाचीं उपकरणें । एकदेशीपणें व्यापार ॥ ११ ॥ इंद्रियाधिष्ठाते देव । तेही आत्मा नव्हती सर्व । त्यांसी इंद्रियांचा अहंभाव । आत्मपदीं ठाव त्यां कैंचा ॥ १२ ॥ देह चाळिता जो प्राण । तोही आत्मा नव्हे जाण । प्राण केवळ अज्ञान । करी गमनागमन देहवशें ॥ १३ ॥ प्राण जरी आत्मा होता । तरी तो देहासवें न वचता । यालागीं प्राणासी निजात्मता जाण सर्वथा घडेना ॥ १४ ॥ आत्मा पृथ्वी नव्हे जडपणें । जळ नव्हे द्रवत्वगुणें । अग्नि नव्हे दाहकपणें । चंचळपणें नव्हे वायु ॥ १५ ॥ आत्मा नभ नव्हे शून्यपणें । मन नव्हे संकल्पगुणें । अंतःकरण नव्हे नश्वरलक्षणें । चित्त चिंतनें नव्हे आत्मा ॥ १६ ॥ आत्मा नव्हे अभिमान । त्यासी सुखदुःखांचें बंधन । बुद्धि आत्मा नव्हे जाण । बोधकपण तीमाजीं ॥ १७ ॥ आत्मा नव्हे तिनी गुण । गुणांमाजीं विकार पूर्ण । महत्तत्व गुणांचें कारण । तें आत्मा आपण कदा नव्हे ॥ १८ ॥ प्रकृति जे गुणसाम्यावस्था । तेही आत्मा नव्हे तत्त्वतां । आत्मदृष्टीं प्रकृति पाहतां । मिथ्या तत्त्वतां ते होय ॥ १९ ॥ जेथ मूळप्रकृतिचा वावो । तेथ प्रकृतिकार्यां कैंचा ठावो । यापरी आत्मानुभवो । निःसंदेहो भोगिती ॥ ३२० ॥ यापरी साधूनियां ज्ञान । साधकीं छेदिला देहाभिमान । ऐसे होऊनियां निरभिमान । सदा सुखसंपन्न साधक ॥ २१ ॥ एवं जे नित्य निरभिमान । त्यांसी प्रारब्धें विषयसेवन । करितां न बाधी दोषगुण । त्ंचि निरूपण हरि सांगे । २२ ॥ समाहितैः कः करणैर्गुणात्मभिः गुणो भएन्मत्सुविविक्तधाम्नः । विक्षिप्यमाणैरुत किं न दूषणं घनैरुपेतैर्विगतै रवेः किम् ॥ २५ ॥ देहेंद्रियावेगळा पाहीं । अपरोक्ष आत्मा जाणितला जिंहीं । त्यांसी इंद्रियनेमें लाभ कायी । विक्षेपें नाहीं हानी त्यांसी ॥ २३ ॥ दोराचा साप खिळोनि मंत्रीं । मंत्रवादी निःशंक धरी । न खिळितां जो धरी करीं । तासीही न करी बाधा तो ॥ २४ ॥ जो मृगजळीं पोहोनि गेला । तो दैवाचा कडे पडिला । पोहेचिना तो नाहीं बुडाला । कोरडा आला ऐलतीरा ॥ २५ ॥ तेवीं देहेंद्रियांचें मिथ्याभान । जाणोनि झाले ते सज्ञान । त्यांसी इंद्रियांचें बंधन । सर्वथा जाण अनुपेगी ॥ २६ ॥ जयासी माझें अपरोक्ष ज्ञान । तेणें घालोनियां आसन । अखंड धरितां ध्यान । अधिक उपेग जाण असेना ॥ २७ ॥ जेवीं मी लीलाविग्रहधारी । तेवीं तेही वर्ततां शरिरीं । ते इंद्रियकर्मावारीं । भवसागरीं न बुडती ॥ २८ ॥ अथवा तो इंद्रियसंगतीं । दैवें अनेक विषयप्राप्ती । भोगितांही अहोरातीं । ब्रह्मस्थिति भंगेना ॥ २९ ॥ स्थिति न भंगवया हेंचि कारण । माझें स्वप्रकाश स्वानंदघन । पावले निजधाम ब्रह्म पूर्ण । तेथ विषयस्फुरण बाधीना ॥ ३३० ॥ जेवीं सूर्य उगवोनि गगनीं । लोक सोडवी निद्रेपासूनी । ते कर्मीं प्रवर्तवोनी । अलिप्त दिनमणि जनकर्मा ॥ ३१ ॥ तेवीं मी परमात्मा स्वयंजोती । प्रभा प्रकाशीं त्रिजगतीं । त्या जनकर्मांच्या क्रियाशक्ती । मी अलिप्त निश्चितीं निजात्मा ॥ ३२ ॥ मुक्तासी स्त्रीपुत्रगृहसंग । तेणें वेष्टला दिसे चांग । म्हणसी केवीं मानूं निःसंग । तें सांगे श्रीरंग रविदृष्टातें ॥ ३३ ॥ घनैरुपेतैर्विगतै रवेः किम् ॥ उंच लक्षयोजनें रविमंडळ । बारा योजनें मेघपडळ । तेणें सूर्य झांकोळिला केवळ । लोक सकळ मानिती ॥ ३४ ॥ परी सूर्य आणि आभाळासी । भेटी नाहीं कल्पांतेंसीं । तेवीं इंद्रियकर्म सज्ञानासी । कदाकाळेंसीं स्पर्शेना ॥ ३५ ॥ अभ्र आच्छादी जगाचे डोळे । जग म्हणे सूर्य आच्छादिला आभाळें । ऐसेंचि विपरीत ज्ञान कळे । मायामेळें भ्रांतासी ॥ ३६ ॥ तें अभ्र आल्या गेल्यापाठीं । सूर्यासी न पडे आठीवेठी । तेवीं गृहदारासंगासाठीं । न पडे संकटीं सज्ञान ॥ ३७ ॥ जेवीं सूर्यातें नातळे आभाळ । तेवीं ज्ञात्यासी संग सकळ । इंद्रियकर्मांचा विटाळ । ज्ञात्यासी अळुमाळ लागेना ॥ ३८ ॥ ऐक त्या ज्ञात्याचें रूप परम । तो देहीं असोनि परब्रह्म । यालागीं त्यासी इंद्रियकर्म । समविषय बाधीना ॥ ३९ ॥ ज्ञाता सर्वार्थीं अलिप्त । तेंचि करावया सुनिश्चित । आकाश दृष्टांतें श्रीकृष्णनाथ । स्वयें सांगत साक्षेपें ॥ ३४० ॥ यथा नभो वाय्वनलाम्बुभूगुणै गतागतैर्वर्तुगुणौर्न सज्जते ॥ तथाक्षरं सत्तरजस्तमोमलैः अहंमतेः संसृतिहेतुभिः परम् ॥ २६ ॥ पृथ्वी जळ अनळ अनिळ । त्यांसी नभ व्यापक सकळ । परी पृथ्व्यादिकांचा मळ । नभासी अळुमाळ लागेना ॥ ४१ ॥ नभ पृथ्वीरजें कदा न मैळे । धुरकटेना धोमकल्लोळें । अग्नीचेनि महाज्वाळें । कदाकाळें जळेना ॥ ४२ ॥ वायुचेनि अतिझडाडें । आकाश कदाकाळें न उडे । उदकाचेनि अतिचढें । आकाश न बुडे सर्वथा ॥ ४३ ॥ कां सूर्याचे निदाघकिरणीं । नभ घामेजेना उन्हाळेनी । अथवा हिमाचिया हिमकणीं । नभ कांकडोनी हिंवेना ॥ ४४ ॥ पर्जन्य वर्षतां प्रबळ । नभ वोलें नव्हे अळुमाळ । यापरी नभ निर्मळ । लावितांही मळ लागेना ॥ ४५ ॥ त्या आकाशासी अलिप्त । जें क्षराक्षरही अतीत । तें अक्षर परब्रह्म सदोदित । त्रिगुणातीत चिन्मात्र ॥ ४६ ॥ जें अजरामर अविनाशी । जें प्रकाशमान स्वप्रकाशीं । ऐसिये वस्तूची प्राप्ती ज्यासी । अद्वयत्वेंसी फावली ॥ ४७ ॥ जेवीं न मोडितां लागवेगें । सोनटका सोनें झाला सर्वांगें । तेवीं करणीवीण येणें योगें । जे झाले निजांगें परब्रह्म ॥ ४८ ॥ त्यांसी गुणांची त्रिगुण मागी । लवितांही न ल्गे अंगीं । विषयी करितां विषयभोगीं । ते विषयसांगीं निःसंग ॥ ४९ ॥ घटी चंद्रबिंब दिसे । तें घटासी स्पर्शेलें नसे । ओलें नव्हें जळरसें । देहीं जीव असे अलिप्त तैसा ॥ ३५० ॥ ते घटी कालविल्या शेण । बिंबप्रतिबिंबां नातळे जाण । तेवी देहींचें पापाचरण । जीवशिवस्थान ठाकीना ॥ ५१ ॥ घटीं कालविल्या कस्तूरी । बिंबप्रतिबिंब सुवास न धरी । तेवीं देहींच्या पापपुण्याची थोरी । जीवशिवावरी पावेना ॥ ५२ ॥ आकाश जळावयालागीं । घृते पेटविली महाआगी । आकाश असतां अग्निसंगीं । दाहो अंगीं लागेना ॥ ५३ ॥ आकाश असोनि अग्निमेळें । अग्निज्वाळे कदा न जळे । तेवीं ज्ञाता विषयकल्लोळें । कदा काळें विषयी नव्हे ॥ ५४ ॥ गुणांचेनि देहसंगे । योगी वर्तता येणें योगें । ते भोगितांही विषयभोगें । अलिप्त सर्वांगें सर्वदा ॥ ५५ ॥ हे कळलें ज्यां भोगवर्म । ते देहीं असोन परब्रह्म । त्यांसी बाधीना भोगभ्रम । अक्षर परम स्वयें झाले ॥ ५६ ॥ ते अक्षर झाले आतां । याही बोलासी ये लघुता । जन ज्ञानीं अज्ञानीं वर्तता । अक्षरता अभंग ॥ ५७ ॥ ते विसरोनि ब्रह्मरूपता । मी देही म्हणवी देहअहंता । तेथें वाढली विषयावस्था । दृढ बद्धता तेणें झाली ॥ ५८ ॥ ते निवारावया बद्धता । त्यजावी विषयलोलुपता । विषयत्यागेंवीण सर्वथा । नित्यमुक्तता घडे ना ॥ ५९ ॥ न जोडतां नित्यमुक्तता । साधक जरी झाला ज्ञाता । तरी तेणें ज्ञातेपणें सर्वथा । विषयासक्तता न करावी ॥ ३६० ॥ तथापि सङ्गः परिवर्जनीयो गुणेषु मायारचितेषु तावत् । मद्भक्तियोगेन दृढेन यावत् रजो निरस्येत मनःकषायः ॥ २७ ॥ स्वरवर्णयुक्त संपूर्ण । चहूं वेदीं झाला निपुण । तेणें बळें विषयाचरण । करितां दारुण बाधक ॥ ६१ ॥ सकळ शास्त्रांचें श्रवण । करतळामलक झाल्या पूर्ण । शब्दज्ञानाचें जें मुक्तपण । तेणेंही विषयाचरण बाधक ॥ ६२ ॥ प्राणापनांचिया समता । जरी काळवंचन आली हाता । तरी विषयांची विषयावस्था । जाण सर्वथा बाधक ॥ ६३ ॥ शापानुग्रहसमर्थ नर । आम्ही ज्ञाते मानूनि थोर । त्यांसही विषयसंचार । होय अपार बाधक ॥ ६४ ॥ आसन उडविती योगबळें । दाविती नाना सिद्धींचे सोहळे । त्यांसही विषयांचे भोगलळे । होती निजबळें बाधक ॥ ६५ ॥ इतरांची कोण कथा । मंत्रें मंत्रमूर्ति प्रसन्न असतां । त्यासीही विषयावस्था । जाण सरथा बाधक ॥ ६६ ॥ किंचित् झाल्या स्वरूपप्राप्ती । ‘मी मुक्त’ हे स्फुरे स्फूर्ती । तथापि विषयांची संगती । त्यासाही निश्चितीं बाधक ॥ ६७ ॥ अभिमानाचें निर्दळण । स्वयें करूनियां आपण । नित्यमुक्त नव्हतां जाण । विषयाचरण बाधक ॥ ६८ ॥ जेवीं चकमकेची आगी । जाळूं न शके नाटॆलागीं । तेवीं ब्रह्मप्राप्ती प्रथमरंगीं । प्रपंचसंगीं विनाशे ॥ ६९ ॥ विषय मिथ्या मायिक । ते भोगीं जंव भासे हरिख । तंववरी विषय बाधक । जाण निष्टंक उद्धवा ॥ ३७० ॥ तें त्यागावया विषयसेवन । निर्दळावा देहाभिमान । याचियालागीं माझें भजन । साक्षेपें जाण करावें ॥ ७१ ॥ व्रत तप तीर्थ दान । करितां योग याग यजन । वेदशास्त्र पुराणश्रवण । तेणें देहाभिमान ढळेना ॥ ७२ ॥ भावें करितां माझें भजन । समूळ सुटे देहाभिमान । भक्ती उत्तमोत्तम साधन । भक्तीआधीन परब्रह्म ॥ ७३ ॥ ज्ञान वैराग्य निवृत्ती । धृति शांति ब्रह्मस्थिती । यांची जननी माझी भक्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ७४ ॥ चहूं मुक्तींहूनि वरती । उल्हासें नांदे माझी भक्ती । माझे भक्तीची अनिवार शक्ती । तिसी मी निश्चितीं आकळलों ॥ ७५ ॥ माझें स्वरूप अनंत अपार । तो मी भक्तीनें आकळलों साचार । यालागीं निजभक्तांचें द्वार । मी निरंतर सेवितसें ॥ ७६ ॥ भक्तीनें आकळलों जाण । यालागीं मी भक्ताअधीन । माझिये भक्तीचें महिमान । मजही संपूर्ण कळेना ॥ ७७ ॥ बहुतीं करूनि माझी भक्ती । मज ते मोक्षचि मागती । उपेक्षूनि चारी मुक्ती। करी मद्भक्ती तो धन्य ॥ ७८ ॥ ऐशी जेथ माझी भक्ती । तेथ पायां लागती चारी मुक्ती । त्यासी सर्वस्वें मी श्रीपती । विकिलों निश्चितीं भावार्थें ॥ ७९ ॥ ते भक्तीच मुख्य ज्यास साधन । यालागीं मी त्या भक्ताअधीन । त्यांचे कदाकाळें वचन । मी अणुप्रमाण नुल्लंघीं ॥ ३८० ॥ ते मज म्हणती होईं सगुण । तैं मी सिंह सूकर होय आपण । त्यांलागीं मी विदेही जाण । होय संपूर्ण देहधारी ॥ ८१ ॥ एका अंबरीषाकारणें । दहा जन्म म्यां सोसणें । अजत्वाचा भंग साहणें । परी भक्तांसी उणें येऊं नेदीं ॥ ८२ ॥ द्रौपदी नग्न करितां तांतडी । तिळभरी हों नेदींच उघडी । झालों नेसविता वस्त्रें कोडी । भक्तसांकडीं मी निवारीं ॥ ८३ ॥ तो मी भक्तसाहाकारी । अजन्मा त्यांचेनि जन्म धरीं । समही वर्ते अरिमित्रीं । भक्तकैवारी होऊनियां ॥ ८४ ॥ जो माझिया भक्तां हितकारी । तो मज परम मित्र संसारीं । जो माझ्या भक्तांसी वैर करी । तो मी नानापरी निर्दळीं ॥ ८५ ॥ ऐसा मी भक्तसाह्य श्रीकृष्ण । त्या माझें निजभजन । न करूनियां अभाग्य जन । अधःपतन पावती ॥ ८६ ॥ म्हणशी ‘पाप असतां शरीरीं । तुझें भजन घडे कैशा परी’ । सकळ पापांची बोहरी । माझें नाम करी निमेषार्धें ॥ ८७ ॥ ऐकोनि नामाचा गजर । पळे महापातकांचा संभार । नामापाशीं महापापासी थार । अणुमात्र असेना ॥ ८८ ॥ माझिया निजनामापुढें । सकळ पाप तत्काळ उडे । तें पाप नामस्मरत्याकडे । केवीं बापुडें येऊं शके ॥ ८९ ॥ अवचटें सूर्य अंधारीं बुडे । तरी पाप न ये भक्तांकडे । भक्तचरणरेणु जेथ पडे । तेथ समूळ उडे पापराशी ॥ ३९० ॥ माझें नाम ब्रह्मास्त्र जगीं । महापाप तें बापुडें मुंगी । नामापुढे उरावयालागीं । कस त्याचे अंगीं असेना ॥ ९१ ॥ माझे नामाचा प्रताप ऐसा । मा माझे भक्तीची कोण दशा । पडलिया मद्भक्तीचा ठसा । तो नागवे सहसा कळिकाळा ॥ ९२ ॥ यालागीं माझे भजन । निर्दळी देहाभिमान । माझे निजभजनेंवीण जाण । देहाभिमान तुटेना ॥ ९३ ॥ जेणें तुटे देहाभिमान । तें कैसें म्हणशी तुझें भजन । अभेदभावें भक्ती पूर्ण । तेणें तुटे देहाभिमान निर्दळे ॥ ९४ ॥ भगवद्भाव सर्वांभूतीं । या नांव गा ‘अभेदभक्ती’ । हे आकळल्या भजनस्थिती । अहंकृती उरेना ॥ ९५ ॥ माझें नाम ज्याचे वदनीं । माझी कीर्ति ज्याचे श्रवणीं । माझा भाव ज्याचे मनीं । ज्याचे करदिचरणीं क्रिया माझी ॥ ९६ ॥ जो जागृतीमाजीं पाहे मातें । जो स्वप्नीं देखे मज एकातें । जो मजवेगळें चित्त रितें । न राखे निश्चितें निजनिष्ठा ॥ ९७ ॥ यापरी भजनस्थितीं । त्रिगुण विकार मावळती । तेणें अहंकाराची निवृत्ती । विषयासक्ति निर्दळे ॥ ९८ ॥ भक्तांसी विषयसेवन । सर्वथा बाधक नव्हे जाण । तो विषय करी मदर्पण । तेणें बाधकपण नव्हे त्यासी ॥ ९९ ॥ नाना साधनें विषयो त्यागिती । त्यागितां परम दुःखी होती । भक्त विषयो भगवंतीं अर्पिती । तेणें होती नित्यमुक्त ॥ ४०० ॥ ग्रासोग्रासीं हरिस्मरण । तैं अन्नचि होय परब्रह्म पूर्ण । त्यासी नाहीं बाधकपण । ब्रह्मार्पण सहजेंचि ॥ १ ॥ भक्तांची भजनस्थिती । विषयीं मद्रूपता भाविती । तेणें मावळे विषयस्फूर्ती । नव्हे ती या रीतों बाधक ॥ २ ॥ यापरी माझें भजन । करी मनोमळक्षाळण । विकारेंसी तिन्ही गुण । करी निर्दळण देहाभिमान ॥ ३ ॥ ऐशी न करितां माझी भक्ती । न निर्दळितां अहंकृती । करणें जे विषयासक्ती । ते जाण निश्चितीं बाधक ॥ ४ ॥ नातुडतां अकर्तत्मबोध । आदरूं नये विषयसंबंध । विषयसंबंध विषयउद्बोध । अतिशुद्ध बाधक ॥ ५ ॥ जरी विषय मिथ्या मायिक । तरी साधकां अतिबाधक । येचि अर्थीं यदुनायक । विशदार्थें देख सांगत ॥ ६ ॥ यथाऽऽमयोऽसाधिचिकित्सितो नृणां पुनः पुनः सन्तुदति प्ररोहान् । एवं मनोऽपक्क कषायकर्म कुयोगिनं विध्यति सर्वसङ्गम् ॥ २८ ॥ वैद्य नेणे रोगाचें लक्षण । नेणे धातुपुष्ट कीं क्षीण । नेणे पथ्य ना अनुताप । नाडीज्ञान कळेना ॥ ७ ॥ त्यापासाव वोखद घेतां । पुनः पुनः वाढे व्यथा । तेवीं अवैराग्यें त्याग करितां । साधकां बाधकता अनिवार ॥ ८ ॥ हृदयीं नाहीं विषयनिवृत्ति । बाह्य त्यागें वाढवी विरक्ती । ऐशी जे बहिर्मुद्रास्थिती । ते जाण निश्चितीं ‘कुयोग’ ॥ ९ ॥ सांडोनियां भगवद्भजन । वेदविधि मार्गविहीन । ऐसें जें कां त्यागलक्षण । ‘कुयोग’ संपूर्ण त्या नांव ॥ ४१० ॥ द्रव्यदाराविषयासक्ती । दृढ वासना असतां चित्तीं । बाह्य त्याग मिथ्या विरक्ती । ‘कुयोग’ निश्चितीं या नांव ॥ ११ ॥ आम्ही राजयोगी अतिश्रेष्ठ । म्हणोनि विषय भोगी यथेष्ट । वोस पडली वैराग्यपेंठ । ‘कुयोग’ चोखट या नांव ॥ १२ ॥ आपली चोरूनि विषयासक्ती । बाह्य मिरवी मिथ्या विरक्ती । हेचि ‘कुयोगाची’ स्थिती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १३ ॥ ऐशिया कुयोगियां जाण । पुढतीं जन्म पुढतीं मरण । दुःखावर्तीं पडिले पूर्ण । सोडवी कोण तयांसी ॥ १४ ॥ नव्हेचि इहलोकींचा विषयभोग । नव्हेचि परमार्थीं शुद्ध त्याग । अंतरला उभय प्रयोग । दुःखभाग कुयोग्या ॥ १५ ॥ परमार्थें त्यागसाधन । करितां अंतराय आलें विघ्न । तयासी अवगती नव्हे जाण । जरी अनुताप पूर्ण स्वयें उपजे ॥ १६ ॥ कुयोगिनो ये विहितान्तरायैः मनुष्यभूतैस्त्रिदशोपसृष्टैः । ते प्राक्तनाभ्यासबलेन भूयो युञ्जन्ति योगं न तु कर्मतन्त्रम् ॥ २९ ॥ ब्रह्मज्ञानार्थ केला त्याग । अभ्यासही मांडिला साङ्ग । मध्येंचि वोढवला उपसर्ग । विघ्नें अनेग साधकां ॥ १७ ॥ उपजे कामाचा अतिवेग । खवळे क्रोधाची लगबग । शिष्यसुहदांचे उद्वेग । मनीं उबग स्वहिताचा ॥ १८ ॥ दारारूपें उपसर्ग । देव देती पैं अनेग । ऐसा अंतरायीं योगभंग । होतां अनुराग उद्धरी ॥ १९ ॥ अभ्यास करितां अतिनिगुती । दैवें अंतराय योगा येती । तेथ निर्वेद उपजल्या चित्तीं । तोचि अभ्यास पुढतीं करी योगी ॥ ४२० ॥ निजयोग अभ्यासबळें । जाळी अंतरायदोष समूळें । परी कर्माचीं कर्मठ जाळें । योगी कदाकाळें स्पर्शेना ॥ २१ ॥ अंतरायीं योग छळितां जाण । जरी योगी पावला मरण । तरी तो नव्हे कर्माधीन । हें श्लोकार्धें श्रीकृष्ण बोलिला स्वयें ॥ २२ ॥ पूर्वीं करितां योगसाधन । अदृष्टगतीं अंतराय जाण । योगी पावल्याही मरण । गती कोण तयासी ॥ २३ ॥ अंतरायपरतंत्र । झाल्या योगी पावे जन्ममात्र । तेथही नादरी कर्मतंत्र । पूर्वाभ्यासें स्वतंत्र प्रवर्ते योगी ॥ २४ ॥ मार्गस्था मार्गी गुंती । पडोनियां लगली वस्ती । तो येरे दिवसीं तेचि पंथीं । लागे निश्चितीं निजमार्गा ॥ २५ ॥ यापरी योगिया आपण । प्राक्तनसंस्कारें जाण । योगाभ्यास करी पूर्ण । परी कर्माधीन कदा नव्हे ॥ २६ ॥ साधनीं असतां माझी भक्ती । तैं अणुमात्र न पडे गुंती । मी भक्तकैवारी श्रीपती । राखें अहोरातीं निजभक्ता ॥ २७ ॥ जेथ माझे भक्तीची आवडी । तेथ विघ्नें केवीं रिघतीं बापुडीं । महाविघ्नांचिया कोडी । माझें नाम विभांडी उद्धवा ॥ २८ ॥ भजनहीन योगीश्वर । अंतरायें पावे जन्मांतर । तरी तो कर्मीं कर्मपर । नव्हे साचार पूर्वसंस्कारें ॥ २९ ॥ ‘जे पावले जीव जीवन्मुक्ती । तेही प्रारब्धकर्में वर्तती । मा योगभ्रष्ट कर्म त्यागिती । घडे कैशा रीतीं’ म्हणशील ॥ ४३० ॥ मुक्ताचें जें मोक्षस्थान । तेंचि साधकाचें मुख्य साधन । यालागीं त्या दोघांही जाण । कर्मबंधन बाधीना ॥ ३१ ॥ मी एक कर्मकर्ता । ऐशी ज्यास नुपजे अहंता । त्यासीही जाण सर्वथा । कर्मबंधकता स्पर्शेना ॥ ३२ ॥ करोति कर्म क्रियते च जन्तुः केनाप्यसौ चोदित आनिपातात् । न तत्र विद्वान् प्रकृतौ स्थितोऽपि निवृत्ततृष्णः स्वसुखानुभूत्या ॥ ३० ॥ जन्मापासूनि मरणान्त । प्राणी जें जें कर्म करित । तें तें कोणी एक प्राचीन एथ । असे वर्तवीत निजसत्ता ॥ ३३ ॥ तेथ सज्ञान आणि अज्ञान । प्राचीन कर्में कर्माधीन । अज्ञानासी अहंकर्तेपण । ज्ञाते निरभिमान वर्तती कर्मीं ॥ ३४ ॥ म्हणसी देहीं असतां प्राण । केवीं नुठी देहाभिमान । ज्ञाता स्वसुखानुभवें पूर्ण । अहंकर्तेपण त्या स्फुरेना ॥ ३५ ॥ दोराचे सर्पाचा महाधाक । दोर जाणितल्या नुपजे देख । तेवीं अनुभविल्या ब्रह्मसुख । अहंता बाधक स्फुरेना ॥ ३६ ॥ ऐक योगभ्रष्टाचें लक्षण । त्याच्या प्राचीनसंस्कार जाण । उपजों नेदी देहाभिमान । योग संपूर्ण सिद्ध्यर्थ ॥ ३७ ॥ जें देहीं नित्य निरभिमान । तेचि ब्रह्मसुखें सदा संपन्न । त्यांसी देहींचें कर्माचरण । सर्वथा जाण बाधीना ॥ ३८ ॥ ज्ञाता देहकर्मासी अलिप्त । हेंही अपूर्व नव्हे एथ । तो देही असोनि देहातीत । तेंचि श्रीकृष्णनाथ स्वयें सांगे ॥ ३९ ॥ तिष्ठन्तमासीनमुत व्रजन्तं शयानमुक्षन्तमदन्तमन्नम् । स्वभावमन्यत् किमपीहमानं आत्मानमात्मस्थमतिर्न वेद ॥ ३१ ॥ देह उभें असतां जाण । ज्ञाता न देखे उभेंपण । मा बैसल्या बैसलेंपण । मानी कोण देहाचें ॥ ४४० ॥ परिपूर्ण ब्रह्माच्या ठायीं । उठणें बैसणें दोनी नाहीं । ज्ञाता तेंचि झाला पाहीं । उठबैस कांही जाणेना ॥ ४१ ॥ दोराचा सर्प उपजला । भोग भोगूनि स्वयें निमाला । सत्यत्व नाहीं या बोला । तैसा देहो झाला मुक्तासी ॥ ४२ ॥ देह दैवें असे एकदेशी । ज्ञाता सर्वीं देखे आपणासी । देह जातां परदेशासी । ज्ञाता गमन मानसीं देखेना ॥ ४३ ॥ वस्तु वस्तुत्वें परिपूर्णपणें । तेथ कैंचें असे येणेंजाणें । ज्ञाता सदा तद्रूपपणें । राहणेंजाणें स्पर्शेना ॥ ४४ ॥ ज्ञाता स्वयें रिघे शयनीं । परी शेजबाज न देखे अवनीं । मी निजेलों हेंही न मनी । निजीं निजरूपपणीं सर्वदा ॥ ४५ ॥ ज्ञाता जेवूं बैसे निजसुखें । परी मी भुकेलों हें न देखे । रसने नेणतां सर्व रस चाखे । जेवी येणें सुखें निजगोडीं ॥ ४६ ॥ दिसे यावत्तृम जेविला । परी तो धाला ना भुकेला । तो उच्छिष्टही नाहीं झाला । शेखीं आंचवला संसारा ॥ ४७ ॥ जरी तो स्वभावें सांगें गोष्टी । तरी अबोलणें घाली शब्दपोटीं । बोलीं अतिरसाळ गोडी उठी । तरी न सुटे मिठी मौनाची ॥ ४८ ॥ मे एक चतुर बोलका । हाही नुठी त्या आवांका । बोल बोलों नेणे फिका । बोलोनि नेटका अबोलपणा ॥ ४९ ॥ ज्ञाता पाहे निजात्मसुखें । माझें तुझें हेंही वोळखे । परी तो डोळांचि न देखे । देखे तें आपण्यासारिखें त्रैलोक्य ॥ ४५० ॥ तो जों दृश्य पाहों बैसे । तों दृश्याचा ठावोचि पुसे । जें देखे तें आपण्याऐसें । निजात्सौरसें जग देखे ॥ ५१ ॥ करूनि डोळ्यांचा अंत । ज्ञाता देखणेपणें पाहत । त्या देखण्याचा निजस्वार्थ । न चढे हात वेदशास्त्रां ॥ ५२ ॥ जाणे शब्दींचें शब्दज्ञान । मी श्रोता हे नुठी आठवण । उपेक्षूनियां देहींचे कान । करी श्रवण सर्वांगें ॥ ५३ ॥ यापरी स्वयें सज्ञान । होऊनियां सावधान । सोलूनियां शब्दज्ञान । करी श्रवण स्वभवॆं ॥ ५४ ॥ जाणे सुवास दुर्वास । भोगीं न धरी नाकाची आस । सुमना सबाह्य जो सुवास । तो भोगी सावकाश सर्वदा ॥ ५५ ॥ मृदुकठिणादि स्पर्श जाणे । परी मी जाणतों हें स्फूरों नेणे । अंगा लागे तें निजांग करणें । हा स्पर्श भोगणें सज्ञानीं ॥ ५६ ॥ ज्ञाता चालता दिसे चरणीं । परी तो चालतां स्वयें अचरणी । स्वेच्छा हिंडतांही अवनीं । तो ठायाहूनि ठळेना ॥ ५७ ॥ हस्तवापारीं देतां दान । मी दाता ही नुठी आठवण । देतेंघेतें दान होय आपण । यापरी सज्ञान वर्तवी करा ॥ ५८ ॥ कायिक वाचिक मानसिक । कर्म निफजतां स्वाभाविक । ज्ञाता ब्रह्मरूपें निर्दोख । देहासी देख स्पर्शेना ॥ ५९ ॥ अकर्तात्मनिजसत्ता । ज्ञाता सर्व कर्मीं वर्ततां । न देखे कर्म-क्रिया-कर्तव्यता । निजीं निजात्मता निजबोधें ॥ ४६० ॥ ज्ञाता नित्य निजात्मसुखें । देहीं असोनि देह न देखे । तो देहकर्मीं केवीं आडके । पूर्ण परमात्मसुखें संतुष्ट ॥ ६१ ॥ जगासी लागलें कर्मबंधन । तेथें खातां जेवितां सज्ञान । केवीं न पवे कर्मबंधन । तेंचि निरूपण हरि सांगें ॥ ६२ ॥ यदि स्म पश्यत्यसदिन्द्रियार्थं नानानुमनेन विरुद्धमन्यत् । न मन्यते वस्तुतया मनीषी स्वाप्नं यथोत्थाय तिरोदधानम् ॥ ३२ ॥ हो कां लौकिकाचे परी । ज्ञाता वर्ते लोकाचारीं । तोही प्रपंचामाझारीं । कर्में करी लौकिकें ॥ ६३ ॥ परी कार्य-कर्म-कर्तव्यता । हे ज्ञात्यासी नाहीं अहंता । तेणें प्रपंचामाजीं निजात्मता । निश्चयें तत्त्वतां वश्य केली ॥ ६४ ॥ विषयादि प्रपंचभान । सत्य मानिती अज्ञान । तो प्रपंच देखती सज्ञान । ब्रह्मपूर्ण पूर्णत्वें ॥ ६५ ॥ साकरेचा इंद्रावणघडू । जाणा गोड नेणा कडू । तैसा प्रपंचाचा पडिपाडू । लाभ आणि नाडू ज्ञानज्ञानें ॥ ६६ ॥ सुवर्णाची खोटी । मूर्ख मानिती केवळ गोटी । ज्ञाते घालूनियं मिठी । घेती ज्ञानदृष्टीं बहुमोलें ॥ ६७ ॥ तेवीं सांसारिक क्रियाकर्म । मूर्खा मूर्खपणें भासे विषम । तेंचि ज्ञात्यासी परब्रह्म । स्वानंदें आराम सर्वदा ॥ ६८ ॥ प्रपंच खाणोनि सांडावा । मग ब्रह्मभाव मांडावा । हेंही न लगे त्या सदैव । उखिताचि आघवा परब्रह्म ॥ ६९ । मिथ्या दोराचा सर्पाकार । तेथ मिळोनि अज्ञान नर । नाना अनुमानीं भयंकर । सत्य साचार मानिती ॥ ४७० ॥ तेवीं मिथ्या प्रपंचाचें भान । बाधक मानिती अज्ञान । तेंचि स्वानुभवें सज्ञान । जाणती पूर्ण परब्रह्म ॥ ७१ ॥ जेवीं स्वप्न साच निद्रिताप्रती । तेवीं प्रपंच साच निज भ्रांती । तोचि निजात्मजागृताप्रती । मिथ्या निश्चितीं निजबोधें ॥ ७२ ॥ मिथ्या प्रपंचाचें भान । जाणोनि झाले जे सज्ञान । त्यांसी सर्व कर्मीं वर्ततां जाण । देहाभिमान कदा नुपजे ॥ ७३ ॥ साधकांचा साधावया स्वार्थ । पूर्वी सर्वस्वरूपें भगवंत । बोलिला तेणें विकारवंत । झाला निश्चित म्हणशील ॥ ७४ ॥ वस्तु नव्हे विकारवंत । ते निजसाम्यें सदोदित । तेचि अर्थीं श्रीकृष्णनाथ । असे सांगत निजबोधें ॥ ७५ ॥ पूर्वं गृहीतं गुणकर्मचित्रं अज्ञानमात्मन्यविविक्तमङ्ग । निवर्तते तत्पुनरीक्षयैव न गृह्यते नापि विसृज्य आत्मा ॥ ३३ ॥ संसार तो पूर्वदशे । अति अतर्क्य मायावशें । शुद्ध वस्तु बहुधा भासे । गुणकर्मविन्यासें बहुरूप ॥ ७६ ॥ नाम रूप व्यक्ति वर्ण । कुळ गोत्र क्रियाचरण । यापरी प्रपंच भिन्न । सत्य अज्ञान मानिती ॥ ७७ ॥ प्रपंच वस्तूच्या ठायीं अध्यस्त । यालागीं वस्तु तद्रूप भासत । स्फटिक नानारंगीं अलिप्त । परी संबंधे भासत तद्रूप ॥ ७८ ॥ जग पाहतां यापरी । भिन्न भासे अज्ञानेंकरीं । तेणें आत्मा म्हणती विकारी । नर अविचारी अज्ञानें ॥ ७९ ॥ त्या अज्ञानाची होय निवृत्ती । तैं साधकां माझी सुलभ प्राप्ती । यालागीं माझी निजभक्ती । म्यां यथानिगुतीं प्रकाशिली ॥ ४८० ॥ साधकांचा निजस्वार्थ । जेणें शीघ्र होय हस्तगत । यालागीं सर्वभूतीं भगवंत । हा म्यां निजगुह्यार्थ प्रबोधिला ॥ ८१ ॥ हें धरोनियां अनुसंधान । भावें करितां माझें भजन । तेथ मावळॆ मीतूंपण । अविद्येसीं अज्ञान समूळ मिथ्या ॥ ८२ ॥ तेथ दृश्य-द्रष्टा-दर्शन । त्रिगुणेंसीं कार्यकारण । नुरेचि प्रपंचाचें भान । ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ८३ ॥ तेथ नाम रूप गुण जाती । नाहीं महाभूतें भूतव्यक्ती । चैतन्य पूर्ण सहजस्थिती । ब्रह्मीं ब्रह्मस्फूर्तीं असेना ॥ ८४ ॥ तें उंच ना ठेंगणें । मोठें ना रोड होणें । उजू ना वंकुडेपणें । असों नेणे विकारी ॥ ८५ ॥ तेथ शीत ना उष्ण । मृदु ना कठिण । कडू ना गोडपण । सुखदुःखेंवीण निर्द्वंद्व ॥ ८६ ॥ तेथ भेद ना अभेद । बोलतें ना निःशब्द । शाहणें ना मुग्ध । देखणें ना अंध दिद्रूपपणें ॥ ८७ ॥ तें एथें ना तेथें । येतें ना जातें । जवळी ना परतें । सदोदित स्वतःसिद्ध ॥ ८८ ॥ तें खातें ना न खातें । तें घेतें ना देतें । जीतें ना मरतें । परादिपर तें परात्पर ॥ ८९ ॥ तें बद्ध ना मुक्त । नित्य ना अनित्य । क्षोभे ना प्रसन्न होत । वस्तु सदोदित सद्रूपत्वें ॥ ४९० ॥ तेथ पाप ना पुण्य । आकार ना शून्य । सगुण ना निर्गुण । स्वानंदें पूर्ण सुखरूप ॥ ९१ ॥ सर्वभूतीं भगवद्भजन । करूनि माझे भक्तजन । माझें निजरूप परिपूर्ण । स्वयें आपण होऊनि ठेले ॥ ९२ ॥ त्यांसी संत म्हणोनि कांहीं घेणें । अथवा असंत म्हणोनि सांडणें । हें नुरेचि त्यांसी वेगळेपणें । ब्रह्मीं ब्रह्मपणें परिपूर्ण ॥ ९३ ॥ बद्धकाळीं बद्धता । आत्मेति घेतली नाहीं तत्त्वतां । अथवा मुक्तकाळींची मुक्तता । आत्मा सर्वथा स्पर्शेना ॥ ९४ ॥ आत्मा अविकारी पाहीं । येणॆं निरूपणें पडे ठायीं । जरी म्हणशी कळलें नाहीं । ऐक तेंही सांगेन ॥ ९५ ॥ आत्मा सर्वदा नित्य पाहीं । यालागीं त्यासी उत्पत्ति नाहीं । ‘उत्पत्ति’ न लगे ज्याचे ठायीं । तो गर्भासी कंहीं स्पर्शेना ॥ ९६ ॥ गर्भजन्म ज्यासी नाहीं । त्यासी देहाचा अभाव पाहीं । देहेंवीण ‘वृद्धी’ कंहीं । त्याचे ठायीं स्पर्शेना ॥ ९७ ॥ जो सर्वदा विदेही । कर्म न रिघे त्याच्या ठायीं । कर्मेंवीण बद्धता पाहीं । आत्म्यासी कंहीं लागेना ॥ ९८ ॥ जो निरवयव साचार । त्यासी एकही न घडे संस्कार । ज्यासी नाहीं आकार । त्यासी विकार स्पर्शेना ॥ ९९ ॥ जो गर्भजन्माअतीत । मरण रिघों न शके तेथ । काळाचहे न लगे घात । क्षयातीत परमात्मा ॥ ५०० ॥ न लगे जन्म कर्म मरण । त्यासी विकारी करी कोण । वस्तु अविकारी परिपूर्ण । यापरी जाण उद्धवा ॥ १ ॥ निबिड दाटल्या अज्ञान । आत्मा नाहीं न करवे जाण । प्रखर क्षालियाही ज्ञान । आत्मा नवा जाण नुपजवे ॥ २ ॥ ज्ञानाज्ञानीं अलिप्त । आत्मा निर्विकार नित्य । येचि अर्थीं सदृष्टांत । असे सांगत श्रीकृष्ण ॥ ३ ॥ यथा हि भानोरुदयो नृचक्षुषां तमो निहन्यान्न तु सद्विधत्ते । एवं समीक्षा निपुणा सते मे हन्यात्तमिस्त्रं पुरुषस्य बुद्धेः ॥ ३४ ॥ डोळां नांदते दृष्टीसी । तम अवरोघी तियेसी । सूर्य उगवूनि तमातें निरसी । परी नवे दृष्टीसी नुपजवी ॥ ४ ॥ तेवीं अविद्या क्षोभूनि सबळ । आत्मा नाहीं न करवेच केवळ । पुरुषबुद्धीस आणोनि पडळ । मिथ्या द्वैतजाळ दाखवी ॥ ५ ॥ तेथ पावल्या शुद्ध ज्ञानासी । अविद्या मळ मात्र निरसी । परी नवें उपजवावया आत्म्यासी । सामर्थ्य ज्ञानासी असेना ॥ ६ ॥ आत्मा निजप्रकाशेंसीं । ज्ञानाज्ञानातें प्रकाशी । तें ज्ञानज्ञान परमात्म्यासी । कदाकाळेंसीं स्पर्शेना ॥ ७ ॥ ज्ञानज्ञानविकार । अविद्यांतःपाती साचार । आत्मा अविद्येहूनि पर । नित्य निर्विकार या हेतू ॥ ८ ॥ रात्री नाहीं सूर्यासी । मा दिवसु काय आहे त्यासी । तेवीं ज्ञानज्ञान आत्म्यासी । कदाकाळेंसी स्पर्शेना ॥ ९ ॥ आत्मा निर्विकार स्वयंज्योती । अलिप्त ज्ञानज्ञानस्थिति । त्या स्वरूपाची सहज प्राप्ती । उद्धवाप्रती हरी सांगे ॥ ५१० ॥ एष स्वयंज्योतिरजोऽप्रमेयो महानुभूतिः सकलानुभूतिः । एकोऽद्वितीयो वचसां विरामे येनेषिता वागसवश्चरन्ति ॥ ३५ ॥ ‘एष स्वयंज्योति’ चें व्याख्यान । पामात्मा स्वप्रकाशघन । साधक तद्रूप आपण । अभिन्नत्वें जाण सर्वदा ॥ ११ ॥ आत्मा परिपूर्ण निजपूर्णता । त्यासी वेगळीं कैंचीं मातापिता । यालागीं आत्म्यासी जन्मकथा । जाण सर्वथा असेना ॥ १२ ॥ त्रिगुणांचे त्रिविध मळ । हे मिथ्या मायिक समूळ । आत्म्यासी न लागती अळुमाळ । यालागीं ‘निर्मळ’ निजात्मा ॥ १३ ॥ ‘अप्रमेय’ म्हणिपे तें ऐका । ऐसा तैसा इतुका तितुका । पैल तो अमका । प्रमाण देखा कदा नव्हे ॥ १४ ॥ काळा गोरा सांवळा । निळा धवळा पिंवळा । एक तेथ दूरी जवळा । या प्रमाणांवेगळा परमात्मा ॥ १५ ॥ ‘महानुभूति’ पदव्याख्यान । आत्मा अखंडदंडायमान । निजीं निजरूपें समसमान । स्वानंदघन सर्वदा ॥ १६ ॥ तेथ देश काळ वर्तमान । ध्येय ध्याता अथवा ध्यान । ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान । हेंही जाण असेना ॥ १७ ॥ नाम-रूप-जात-गोत । क्रियाकार्मासी अलिप्त । जन्ममरण कैंचें तेथ । वस्तु सदोदित स्वानंदें ॥ १८ ॥ तेथ वृद्धी आणि ऱ्हास । आदिमध्यान्तविलास । परिपाकादि विन्यास । यांचाही प्रवेश असेना ॥ १९ ॥ म्हणशी पूर्वोक्त धर्मस्थिती । तेथ न रिघे कैशा रीतीं । ‘सकळानुभूति’ या पदोक्तीं । वस्तु सर्वार्थीं अलिप्त ॥ ५२० ॥ या रीतीं धर्म आणि अधर्म । सकळ भूतांचें क्रियाकर्म । प्रकाशक मी आत्माराम । त्यासी अलिप्त परम परमात्मा ॥ २१ ॥ गंगाजळा आणि मद्यासी । आकाश व्याप्त असोनि त्यांसी । परी तें अलिप्त दोंहीसीं । तेवीं ज्ञानाज्ञानासी परमात्मा ॥ २२ ॥ जेथ ज्ञानाज्ञाचा अभावो । तेथ कर्माकर्मा कैंचा ठावो । ‘सकळानुभूति’ या नांव पहा हो । अभेदान्वयो स्वानंदें ॥ २३ ॥ ऐसा परमात्मा परमानंद । सजातीय-विजातीय-स्वगतभेद । नसोनियां वस्तु शुद्ध । जाण प्रसिद्ध निजबोधें ॥ २४ ॥ ‘विजातीय भेद’ मी देह म्हणणें । ‘सजातीय भेद’ मी जीवपणें । ‘स्वगत भेद’ मी ब्रह्म स्फुरणें । हे तिनी नेणें परमात्मा ॥ २५ ॥ तेथ ऊणखूण लक्ष्यलक्षण । युक्तिप्रयुक्ती प्रमाण । हेंही सर्वथा न रिघे जाण । ब्रह्म परिपूर्ण एकाकी ॥ २६ ॥ ऐसें एकाकी परब्रह्म । निजगुह्याचें गुह्य उत्तम । हें जाणे तो सभाग्य परम । त्यासी भवभ्रम न बाधी ॥ २७ ॥ तो देहीं असतांचि जाण । त्यासी न बाधी देहगुण । कदा न बाधी कर्माचरण । जन्ममरण बाधीना ॥ २८ ॥ ऐकोनि ऐशिया ज्ञानासी । तें स्वरूप स्पष्ट सांग म्हणसी । तरी तेथ रिगमु नाहीं वाचेसी । श्रुति शब्देंसीं परतल्या ॥ २९ ॥ जेथ अतिविवेकसंपन्न । बुद्धि प्रवेशेना आपण । सवेगपणें न पवे मन । ते वस्तु वाचेअधीन सर्वथा नव्हे ॥ ५३० ॥ खुंटली शास्त्रांची व्युत्पत्ती । दर्शनें अद्यापि विवादती । श्रुति परतल्या ‘नेति नेति’ । तेथ वचनोक्ती विरामु ॥ ३१ ॥ धरोनि जाणिवेची हांव । शब्दज्ञानें घेतली धाव । परी वस्तूचें एकही नांव । घ्यावया जाणीव न सरेचि ॥ ३२ ॥ एवं विचारितां साचार । परादि वाचा नव्हे उच्चार । यालागीं वस्तु ‘परात्पर’ । क्षराक्षराअतीत ॥ ३३ ॥ जे सर्वावयवीं सर्वदा शून्य । शेखीं शून्यही नव्हे आपण । शून्यप्रकाश चिद्वन । वस्तु परिपूर्ण एकत्वें ॥ ३४ ॥ तेथ रिघावया वचनोक्तीं । शब्दें साधिल्या नाना युक्ती । त्या चिदाकाशीं मावळती । जेवीं कां उगवतां गभस्ती खद्योत ॥ ३५ ॥ खद्योत सूर्यासी खेवं देता । तैं वस्तु येती वचनाचे हाता । वस्तूपाशीं शब्दाच्या कथा । जाण तत्त्वतां हारपती ॥ ३६ ॥ सूर्योदय झालिया पाहीं । खद्योत शोधितां न पडे ठायीं । तेवीं वस्तुप्राप्ति पाविजे जिंहीं । तैं मागमोस नाहीं शब्दांचा ॥ ३७ ॥ हो कां आंधारिये रातीं । ज्यांची दीपें चाले क्रियास्थिती । तेथ झालिया सूर्योदयप्राप्ती । तेचि उपेक्षिती दीपातें ॥ ३८ ॥ तेवीं शाब्दिका ज्ञानयुक्तीं । अनुतापें ब्रह्म विवंचिती । ज्यासी झाली ब्रह्मप्राप्ती । तेचि उपेक्षिती शब्दातें ॥ ३९ ॥ जंव जंव शब्दाचा अभिमन । तंवतव दूरी ब्रह्मज्ञान । तेचि अर्थींचें उपलक्षण । ऐक निजखूण उद्धवा ॥ ५४० ॥ कन्या द्यावया वरासी । माता पिता बन्धु ज्योतिषी । मेळवूनियां सुहृदांसी । कन्या वरासी अर्पिती ॥ ४१ ॥ तेथ भर्तारसंभोगसेजेपाशीं । जवळी मातापितासुहृदेंसीं । असणें हाचि अवरोध तिसी । पतिसुखाप्ती प्रतिबंध ॥ ४२ ॥ तेवीं योग्यता चातुर्य जाण । शब्दज्ञानें ज्ञातेपण । जवळी असतां ब्रह्मज्ञान । सर्वथा जाण हों न शके ॥ ४३ ॥ जेवीं डोळां अल्प कण न समाये । तेवीं ब्रह्मीं कल्पना न साहे । यालागीं निर्विकल्पें पाहें । ब्रह्मज्ञान होये सुटंक ॥ ४४ ॥ समस्त ज्ञानाचा उपरम । सकळ वचनांचा विराम । तैंचि पाविजे परब्रह्म । ऐसें पुरुषोत्तम बोलिला ॥ ४५ ॥ जें नाकळे बुद्धीच्या ठायीं । जें मनासी नातुडे कंहीं । जें वचनासी विषयो नव्हे पाहीं । प्रमाणाचे पायीं पावलें न वचे ॥ ४६ ॥ यापरी वस्तु न पडे ठायीं । तरी ते वस्तुचि म्हणशी नाहीं । ऐसें उद्धवा कल्पिसी कांहीं । ऐक ते विषयीं सांगेन ॥ ४७ ॥ ( मूळ श्लोकींचें पद ) ‘येनेषिता वागसवश्चरंति ॥’ येथें देहेंद्रियाप्राण । हे जडा मूढ अचेतन । त्यांसी चेतवी अत्मा चिद्धन । तेंही उपलक्षण अवधारीं ॥ ४८ ॥ आत्मप्राभा ‘दृष्टी’ प्रकाशे । परी आत्मा दृष्टीसी न स्पर्शे । आत्मा दृष्टीसबाह्य असे । परी दृष्टीसी न दिसे अदृश्यत्वें ॥ ४९ ॥ आत्मसत्ता ऐकती ‘श्रवण’ । श्रवणांसी आत्मा नातळे जाण । श्रवणां सबाह्य असोनि पूर्ण । श्रवणविषय जाण नव्हेचि आत्मा ॥ ५५० ॥ ‘वाचा’ आत्मसत्ता उठीं । आत्मा नातळे वाचिका गोठी । वस्तु शब्दाचे पाठीं पोटीं । तो शब्द शेवटीं नेणें वस्तु ॥ ५१ ॥ ‘मन’ आत्मसत्तें चपळ । मना सबाह्य आत्मा केवळ । तो मनासी नातळे अळुमाळ । मनासी अकळ निजत्मा ॥ ५२ ॥ ‘चित्त’ चेतवी चिद्धन । चित्सत्ता चित्तासी चितन । चित्ता सबाह्य चैतन्य पूर्ण । तरी चित्तासी चैतन्य कळेना ॥ ५३ ॥ आत्मसंयोगें ‘अहं’ उल्हासे । अहंता आत्मा कदा न स्पर्शे । अहंतासबाह्य आत्मा असे । परी तो आत्मा न दिसे अहंकारें ॥ ५४ ॥ आत्मप्रभाप्रकशविधीं । प्रकाशिली ‘विवेकबुद्धी’ । बुद्धी आत्मा नेणे त्रिशुद्धी । आत्मा बुद्धी-सबाह्य ॥ ५५ ॥ आत्मप्रभा ‘प्राण’ चळे । परी प्राणासी आत्मा नातळे । प्राण-सबाह्य आत्ममेळें । तरी प्राणासी न कळे परमात्मा ॥ ५६ ॥ उद्धवा तूं यापरी पाहें । जड जयाचेनि वर्तताहे । तो आत्मा स्वतःसिद्ध आहे । नाहीं नोहे कल्पांतीं ॥ ५७ ॥ यापरी आत्मा स्वतःसिद्ध । भेद नांदवूनि अभेद । द्वंद्व प्रकाशोनि निर्द्वंद्व । हा निजात्मबोध दृढ केला ॥ ५८ ॥ एवं आत्मा निर्द्वंद्व अद्वैतें । तो आहे नाहीं म्हणावया येथें । कोणी नुरेचि गा म्हणतें । आत्मा निजत्मते परिपूर्ण ॥ ५९ ॥ आत्मा निजात्मता सदोदित । संसार तेथ आरोपित । येचि श्रीकृष्णनाथ । असे सांगत श्लोकार्थें ॥ ५६० ॥ एतावानात्मसम्मोहो यद्विकल्पस्तु केवले । आत्मन्नृते स्वमात्मानमवलम्बो न यस्य हि ॥ ३६ ॥ आत्मा केवळ नित्यमुक्त । त्रिगुण गुणांसी अतीत । नभाहूनि अतिअलिप्त । सदोदित पूर्णत्वें ॥ ६१ ॥ ब्रह्म अखंडदंडायमान । सर्वदा स्वानंघन । ऐसें अलिप्तीं प्रपंचभान । तो मिथ्या जाण आरोपु ॥ ६२ ॥ आरोपासी अधिष्टान । स्वयें परमात्मा आपण । यालागीं प्रपंचाचें भान । तेथेंचि जाण आभासे ॥ ६३ ॥ परमात्म्याहूनि भिन्न । प्रपंचासी नाहीं स्थान । यालागीं उत्पत्ति स्थिति निदान । तेथेंचि जाण आभासे ॥ ६४ ॥ जेवीं दोराचा सर्प पाहीं । दोरावेगळा न दिसे कंहीं । दोर सर्प झालाचि नाहीं । तरी त्याच्या आभासे ॥ ६५ ॥ तेवीं निर्विकल्प पूर्ण ब्रह्म । नातळे रूप नाम गुण कर्म । तरी त्याच्या ठायीं मनोभ्रम । प्रपंच विषम परिकल्पी ॥ ६६ ॥ जेवीं दोरीं भासे मिथ्य सर्प । तेवीं ब्रहीं मिथ्या भवारोप । तेथ सुखदुःख भयकंप । तोही खटाटोप मायिक ॥ ६७ ॥ एवं प्रपंचाचें मिथ्या भान । वस्तु शुद्धत्वें स्वानंदघन । हें निर्दुष्ट केलें निरूपण । ब्रह्म परिपूर्ण अद्वय ॥ ६८ ॥ एवं नाना युक्ती सुनिश्चित । ब्रह्म साधिलें अबाधित । हें न मानिती जे पंडित । तें मत खंडित श्रीकृष्ण ॥ ६९ ॥ यन्नामाकृतिभिर्ग्राह्यं पञ्जवर्णमबाधितम् । व्यर्थेनाप्यर्थवादोऽयं द्वयं पण्डितमानिनाम् ॥ ३७ ॥ वेदवेदांप्रतिपाद्य एथ । सकळ शस्त्रार्थाचें निजमथित । ब्रह्म अद्वय सदोदित । म्यां सुनिश्चित नेमिलें ॥ ५७० ॥ तें हें माझें निजमत । उपेक्षूनियां जे पंडित । ज्ञातेपणें अतिउन्मत्त । अभिमानयुक्त पांडित्यें ॥ ७१ ॥ त्या पंडितांचें पांडित्यमत । प्रपंच प्रत्यक्ष अनुभूत । तो मिथ्या मानोर्नियां एथ । कैंचें अद्वैत काढिलें ॥ ७२ ॥ अद्वैतासी नाहीं गांवो । जेथ तेथ जरी पाहों जावों । अद्वैता नाहीं नेमस्त ठावो । यालागीं पहा हो तें मिथ्या ॥ ७३ ॥ रूप नाम गुण कर्म । पंचभूतें भौतिकें विषम । चतुर्वर्ण चारी आश्रम । सत्य परम मानिती ॥ ७४ ॥ सत्य मानावयां हेंचि कारण । मनोभ्रमें भ्रमलें जाण । ज्ञानाभिमानें छळिले पूर्ण । आपण्या आपण विसरले ॥ ७५ ॥ मुख्य मानिती विषयसुख । विषयार्थ पुण्य करावें चोख । स्वर्ग भोगावा आवश्यक । हें सत्य देख मानिती ॥ ७६ ॥ विषय सत्य मानिती परम । हें देहाभिमानाचें निजवर्म । तेणें सज्ञान केले अधम । मरणजन्म भोगवी ॥ ७७ ॥ पुढती स्वर्ग पुढती नरक । पुढती जननीजठर देख । यापरी पंडित लोक । केले ज्ञानमूर्ख अहंममता ॥ ७८ ॥ त्यांचे ज्ञान तें वेदबाह्य । सर्वथा नव्हे तें ग्राह्य । जैसें अंत्यजाचें अन्न अग्राह्य । तैसे तें होय अतित्याज्य ॥ ७९ ॥ ज्ञानाभिमानियाचा विचार । तें अज्ञानाचें सोलींव सार । तयाचा जो निजनिर्धार । तो जाण साचार महामोहो ॥ ५८० ॥ तयाचा जो निजविवेक । इंद्रावणफळाऐसा देख । वरी साजिरें आंत विख । तैसा परिपाक ज्ञानाभिमानियांचा ॥ ८१ ॥ नामरूपात्मक प्रपंच । मिथ्या मायिकत्वें आहाच । ज्ञानाभिमानी मानूनि साच । वृथा कचकच वाढविती ॥ ८२ ॥ प्रपंचरचनेची कुसरी । आपण जैं मानावी खरी । तैं देहबुद्धि वाजलीं शिरीं । दुःखदरिद्रीं निमग्न ॥ ८३ ॥ त्यांची योग्यता पाहतां जाण । गायत्रीतुल्य वेदपठण । सकळ शास्त्रें जाणे पूर्ण । श्रुति पुराण इतिहास ॥ ८४ ॥ अतिनिःसीम वक्तेपण । समयींचें समयीं स्फुरे स्फुरण । तेणें वाढला देहाभिमान । पंडितंमन्य अतिगर्वीं ॥ ८५ ॥ नेणे अद्वैतसमाधान । तरी योग्यतागर्व गहन । निजमताचा मताभिमान । प्राणान्तें जाण सांडीना ॥ ८६ ॥ पंडितंमन्यांचे बोलणें । अवचटें नायकावें दीनें । जे नागवले देहाभिमानें । त्यांचेनि सौजन्यें अघःपात ॥ ८७ ॥ विषभक्षित्याचा पांतीकर । अत्याग्रहें झाला जो नर । त्यासी अप्रार्थितां मरणादर । अतिदुर्धर जीवीं वाजे ॥ ८८ ॥ यालागीं न धरावी ते संगती । त्यांसी न करावी वदंती । कदा नव जावें त्यांप्रती । ते त्याज्य निश्चितीं जीवेंभावें ॥ ८९ ॥ त्यांचे न लागावें बोलीं । त्यांचे न चालावें चालीं । जे ज्ञानाभिमानभुली । मुकले आपुली हितवार्ता ॥ ५९० ॥ ते नाणावे निजमंदिरा । स्वयें न वचावें त्यांच्या द्वारा । त्यांसी न पुसावें विचारा । जे अभिमानद्वारा नाडले ॥ ९१ ॥ त्यांसी न ह्वावी हाटभेटी । कदा न देखावे निजदृष्टीं । ते त्याज्य गा उठाउठीं । जेवीं धर्मिष्ठीं परनिंदा ॥ ९२ ॥ वेदशास्त्रांचा मथितार्थ । जो कां अद्वैत परमार्थः । तो ज्यांसी नावडे निजस्वार्थ । चाविरा अनर्थ त्यांपाशीं ॥ ९३ ॥ यालागीं त्यांची संगती । साक्षेपें सांडावी निश्चितीं । साधकाचे योगस्थिति । अंतरायनिवृत्ती हरि सांगे ॥ ९४ ॥ योगिनोऽपक्क योगस्य युञ्जतः काय उत्थितैः । उपसर्गेर्विहन्येत तत्रायं विहितो विधिः ॥ ३८ ॥ योगी प्रवर्तल्या योगभ्यासीं । योग संपूर्ण नव्हतां त्यासी । उपसर्ग येती छळावयासी । तेंचि हृषीकेशी सांगत ॥ ९५ ॥ शरीरीं एखादा उठे रोग । कां खवळे विषयाची लगबग । अथवा सभ्रांत उपसर्ग । कां योगभंग विकल्पें ॥ ९६ ॥ ज्ञानाभिमान सबळ उठी । तेणें गुणदोषीं बैसे दिठी । परापवादाची चावटी । त्याची एकांतगोष्टी निजगुज ॥ ९७ ॥ देहीं शीतळता उभडे । कां उष्णता अत्यंत चढे । किंवा वायु अव्हाटीं पडे । कां क्षुधा वाढे अनिवार ॥ ९८ ॥ विक्षेप कषाय वोढवती । परदारप्रद्रव्यासक्ती । इत्यादि उपसर्ग येती । उपाय श्रीपति तदर्थ सांगे ॥ ९९ ॥ योगधारणया कांश्चित्दासनैर्धारणान्वितैः । तपोमन्त्रौषधेः कांश्चिदुपसर्गान्विनिर्दहेत् ॥ ३९ ॥ देहीं शीतळता वाढल्या जाण । तीस निवारी अग्निधारण । देहीं उष्मा चढल्या पूर्ण । सोमधारण उच्छेदी ॥ ६०० ॥ वायु अव्हाटल्या अवचितां । तैं देहीं वायु भरावा पुरता । वायु मेळवुनि वायुआंतौता । अणिती निजपंथा अभ्यासबळें ॥ १ ॥ वायु क्षोभोनि सकोप । जैं जठरावरी पडे झडप । तैं क्षुधा खवळे अमूप । तृप्तीचें रूप उठीना ॥ २ ॥ तेथ मोकळा सांडूनि प्राण । अपान वाढवावा आपण । तो जठरा आलिया जाण । तेथ क्षोभला प्राण सहजिचि ये ॥ ३ ॥ तेथ प्राणापानऐक्यता । सहजें ये साधकांच्या हाता । मग षट्चक्रें भेदितां । क्षणही सर्वथा लागेना ॥ ४ ॥ तेव्हां सतरावियेचें अमृतपान । साधकांसी फावे संपूर्ण । यापरी क्षुधानिर्दळण । येणें जाण साधिती ॥ ५ ॥ परदारा परद्रव्यासक्ती । हे पापकर्माची फळप्राप्ती । याची करावया निवृत्ती । तपश्चर्या निश्चितीं उद्धवा ॥ ६ ॥ भावें करितां मंत्रानुष्ठान । तेणे वैराग्य उपजे जाण । वैराग्यें निषयनिर्दळण । सहजें जाण साधकां ॥ ७ ॥ शुद्ध मंत्राचें पुरश्चरण । करी विघ्नांचें निर्दळण । तेथ पिशाचबाधासंचरण । घेऊनि प्राण स्वयें पळे ॥ ८ ॥ शरीरीं संचरल्या व्याधी । त्यातें निर्दळी दिव्य औषधी । मनाचा छेदावया आधी । योग त्रिशुद्धीं साधवा ॥ ९ ॥ तेथ साधल्या योगसिद्धी । समूल निर्दळी आधिव्याधी । सकळ विघ्नांतेंही छेदी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥ ६१० ॥ हें किती सांगूं भिन्न । भावें करितां माझें ध्यान । सकळ उपसर्गां निर्दळण । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ ११ ॥ कांश्चिन्ममानुध्यानेन नामसंकीर्तनादिभिः । योगेश्वरानुवृत्त्या वा हन्यादशुभदाञ्छनैः ॥ ४० ॥ आधिव्याधींसीं सकळ विघ्न । विकल्प विकर्म देहाभिमान । ज्ञानाभिमानेंसीं दहन । करी ध्यानलक्षण उद्धवा ॥ १२ ॥ माझिया ध्यानाचे परिपाठीं । उपसर्ग पळती उठाउठी । शोधितां विघ्न न पडे दृष्टी । निर्द्वंद्व सृष्टी साधकां ॥ १३ ॥ माझा लागल्या ध्यानभावो । उपसर्गाचा नुरेचि ठावो । सकळ विघ्नांचा अभावो । विकल्प वावो स्वयें होती ॥ १४ ॥ म्हणशी ‘घालोनि आसन । एकाग्र करोनियां मन । कैं ठसावेल तुझें ध्यान । तैं साधकां विघ्न बाधीना’ ॥ १५ ॥ असो न टके माझें ध्यान । तैं सोपा उपाव आहे आन । माझें करितां नामकीर्तन । विघ्ननिर्दळण हरिनामें ॥ १६ ॥ जेथ नामाचा घडघडाट । तेथ उपसर्गा न चले वाट । महाविघ्नांचा कडकडाट । करी सपाट हरिनामें ॥ १७ ॥ अखंड माझी नामकीर्ती । ज्याच्या मुखास आली वस्ती । त्या देखोनि विघ्नें पळती । उपसर्गां शांती निःशेष ॥ १८ ॥ माझ्या नामाचा निजगजर । पळवी महापापसंभार । उपसर्गां नुरवी थार । नाम सधर हरीचें ॥ १९ ॥ अवचटें घेतां माझें नाम । सकळ पातकां करी भस्म । जेथ अखंड माझें गुणनामकर्म । तेथ विघ्नसंभ्रम स्पर्शेना ॥ ६२० ॥ माझे नामकीर्तीचे पवाडे । ज्याची वाचा अखंड पढे । विघ्नें न येती तयाकडे । जेवीं सूर्यापुढें आंधार ॥ २१ ॥ माझे नामकीर्तीवीण येथें । ज्याचें तोंड न राहे रितें । तो नागवे महाविघ्नांतें । जेवीं पतंगातें हुताशु ॥ २२ ॥ नामकीर्ती दाटुगी होये । हें विश्वासें मानलें आहे । ते नाम सुखीं केवीं राहे । करावें काये म्हणशील ॥ २३ ॥ मुखीं नामनिर्वाह व्हावा । यालागीं करावी साधुसेवा । संतसेवनीं सद्भावो जीवा । तेथ नव्हे रिघावा विघ्नांसी ॥ २४ ॥ सद्भावें धरिल्या सत्संगती । त्या संगचिये निजस्थिती । मुखीं ठसावे नामकीर्ती । विकल्प चित्तीं स्फुरेना ॥ २५ ॥ मुखीं हरिनामाची गोडी । संतसेवेची अतिआवडी । तयाची गा प्रतापप्रौढी । उपसर्गकोडी निर्दळी ॥ २६ ॥ सधकांसी पाठिराखा । संत झालिया निजसखा । तैं महाविघ्नांचिया मुखा । विभांडी देखा क्षणार्धें ॥ २७ ॥ सेवितां साधूचें चरणोदक । अतिशुद्ध होती साधक । तेणें शुद्धत्वें महादोख । समूळ देख निर्दळी ॥ २८ ॥ साधूंच्या चरणतीर्थापाशीं । सकल तीर्थें येती धुद्धत्वासी । भावें सेविती त्या तीर्थासी । ते उपसर्गांसी नागवती ॥ २९ ॥ वंदितां साधुचरणरज । साधकांचें सिद्ध होय काज । निर्दळूनि विघ्नांचें बीज । स्वानंद निज स्वयें भोगिती ॥ ६३० ॥ निजभाग्यगतीं अवचितां । संतचरणरेणु पडल्या माथां । तो कळिकाळातें हाणे लाथा । तेथ विघ्नांची कथा ते कोण ॥ ३१ ॥ निधडा शूर निजबळेंसीं । धुरां निजशस्त्र देऊनि त्यासी । युद्धीं थापटिलिया पाठीसी । तो विभांडी परांसी तेणें उल्हासें ॥ ३२ ॥ तेवीं सद्भावें सत्संगती । मुखीं अखंड नामकीर्ती । भावें करितां संतांची भक्ती । महाबाधा निर्दळिती साधक ॥ ३३ ॥ कीर्ति भक्ती सत्संगती । हे त्रिवेणी लाभे ज्याप्रती । त्यासी उपसर्ग नातळती । पावन त्रिजगती त्याचेनी ॥ ३४ ॥ माझी भक्ती आणि नामकीर्ती । यांची जननी सत्संगती । तो सत्संग जोडल्या हातीं । विघ्नें न बाधिती साधकां ॥ ३५ ॥ योग याग आसन ध्यान । तप मंत्र औषधी जाण । साधितां न तुटे देहाभिमन । तो सत्संग जाण निर्दळी ॥ ३६ ॥ योगादि सर्व उपायीं जाण । निवारिती अल्पविघ्न । विघ्नांचा राजा देहाभिमान । तो त्यांचेनि जाण ढळेना ॥ ३७ ॥ तो दुर्धर देहाभिमान । ज्ञातेपणीं अतिदारुण । याचे समूळ निर्दहण । सत्संग जाण स्वयें करी ॥ ३८ ॥ नेणपणाचा अभिमान । तत्काळ जाय निघोन । तैसा नव्हे ज्ञानाभिमान । चाविरा जाण जाणिवा ॥ ३९ ॥ त्याही अभिमनाचें निर्दळण । सत्संग निजांगें करी आपण । यालागीं सत्संगासमान । आन साधन असेना ॥ ६४० ॥ एकाचेनि निजमतें । अजरामर करावें देहातें । तेहीं योगादि साधनांतें । मूर्खमतें साधिती ॥ ४१ । केचिदेहमिमं धीराः सुकल्पं वयसि स्थिरम् । विधाय विविधोपायैरथ युञ्जन्ति सिद्धये ॥ ४१ ॥ देहो तितुका प्रारब्धाधीन । त्यासी प्रारब्धें जन्ममरण । त्या देहासी अजरामरपण । पामर जन करूँ पाहती ॥ ४२ ॥ त्या प्रारब्धाचें सूत्र पूर्ण । सर्वदा असे काळाधीन । यालागीं काळकृत जन्ममरण । सर्वांसी जाण सर्वदा ॥ ४३ ॥ चौदा कल्प आयुष्य जोडी । त्या मार्कंडेयासी काळ झोडी । युगांतीं लोम झडे परवडी । त्या लोमहर्षाची नरडी मुरडिजे काळें ॥ ४४ ॥ चतुर्युगसहस्त्र संख्येसी । तो दिवस गणिजे ब्रह्मयासी । जो स्त्रजिता सकळ सृष्टीसी । त्यासी काळ ग्रासी स्वबळें ॥ ४५ ॥ स्त्रजित्या ब्रह्मयासी काळ पिळी । पाळित्या विष्णूतें काळ गिळी । क्प्रलयरिद्राचीही होळी । काळ महाबळी स्वयें करी ॥ ४६ ॥ यापरी कळ अति दुर्धर । नेणोनि अविवेकी नर । वांछिती काळजयो पामर । देह अजरामर करावया ॥ ४७ ॥ जें जें दिसे तें ते नासे । हे काळसत्ता जगासी भासे । तरी अजरामरत्वाचें पिसें । मूर्ख अतिप्रयासें वांछिती ॥ ४८ ॥ थिल्लरींचा तरंग जाण । वांच्छी अजरामरण । तंव थिल्लरासचि ये मरण । तेथ वांचवी कोण तरंग ॥ ४९ ॥ तेवी संसारचि नश्वर । त्यांतील देह अजरामर । करूं वाछिती पामर । उपायीं अपार शिणोनी ॥ ६५० ॥ देह जाईल तरी जावो । परी जीव हा चिरंजीव राहो । तदर्थ कीजे उपावो । तैसें अमरत्व पहा हो नरदेहा ॥ ५१ ॥ देह केवळ नश्वर । त्यातें अविवेकी महाधीर । करूं म्हणती अजरामर । उपायीं अपार शिणोनी ॥ ५२ ॥ केवळ काळाचें खाजें देहो । तो अमर करावया पहा हो । जो जो कीजे उपावो । तो तो अपावो । तो तो अपावो साधकां ॥ ५३ ॥ एवं मोढतेचे भागीं । देहाच्या अमरत्वालागीं । शिणोनि उपायीं अनेगीं । हठयोगी नागवले ॥ ५४ ॥ परकायाप्रवेशार्थ जाण । शिणले साधितां प्राणधारण । एवं धरितां देहाभिमान । योगीजन नाडले ॥ ५५ ॥ देहाचें नश्वरपण । जाणोनियां जे सज्ञान । ते न धरिती देहाभिमान् । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ ५६ ॥ न हि तत्कुशलादृत्यं तदायासो ह्यपार्थक । अन्तवत्त्वाच्छरीरस्य फलस्येव वनस्पतेः ॥ ४२ ॥ विचरिता हा संसार । समूळ अवघा नश्वर । तेथ देहाचा अजरामर । ज्ञाते आदर न करिती ॥ ५७ ॥ देहअजरामरविधीं । ज्ञाता सर्वथा न घाली बुद्धी । देहीं साधिल्या ज्या सिद्धी । त्याही त्रिशुद्धी बाधिका ॥ ५८ ॥ देह तापल्या ज्वरादि तापें । तदर्थ मरणभयें कांपे । तेथ शीतळ आणिल्याही साक्षेपें । तेणेंही रूपें मरणचि ॥ ५९ ॥ मिथ्या देहींचा देहाभिमान । सदा भोगवी जन्ममरण । तो अजरामर करितां जाण । देहबधन दृढ झालें ॥ ६६० ॥ साधोनियां योगसाधन । दृढ केलें देहबंधन । देहींच्या सिद्धी भोगितां जाण । अधःपतन चुकेना ॥ ६१ ॥ हो कां ज्ञानार्थ योग साधितां । प्रसंगें सिद्धी आलिया हाता । त्याही त्यागाव्या तत्त्वतां । जिनस्वार्थालागूनि ॥ ६२ ॥ ज्याची चाल रायापाशीं । लांच हाता ये तयासी । तेणेंचि पावे अपमानासी । तेवीं साधकासी घातका सिद्धि ॥ ६३ ॥ वृक्षासी मोडूनि आलिया फळें । त्या फळासी वृक्ष नातळे । तेवीं आलिया सिद्धीचे सोहळे । वैराग्यबळें त्यागावे ॥ ६४ ॥ कोरडेनि वैराग्यबळें । त्याग कीजे तो आडखळे । त्याग विवेकवैराग्यमेळें । तैं सिद्धीचे सोहळे तृणप्राय ॥ ६५ ॥ आंधळें हातिरूं मातले । पतन न देखे आपुले । तेवीं अविवेकें त्याग केले । ते ते गेले अघःपाता ॥ ६६ ॥ मूळीं देहचि नश्वर एथ । तेथींच्या सिद्धी काय शाश्वत । ऐसे विवेकवैराग्ययुक्त । होती अलिप्त देहभोगा ॥ ६७ ॥ एथ देह तितुका अनित्य । आत्मा एक नित्य सत्य । हें जाणोनि विवेकयुक्त । जडले निश्चित आत्माभ्यासीं ॥ ६८ ॥ योगं निषेवतो नित्यं कायश्चेत्कल्पतामियात् । तच्छ्द्दध्यान्न मतिमान्योगम्रुत्सृज्य मत्परः ॥ ४३ ॥ योग साधितां परमार्थ । सिद्धी वश्य झालिया हाता । त्या त्यागाव्या तत्त्वतां । निजहितार्था लागूनी ॥ ६९ ॥ सिद्धी त्यागितां न वचती । भोगबळें गळां पडती । तरी ते सांडूनि योगस्थिती । माझे भजनपंथीं लागावें ॥ ६७० ॥ माझिये भ्क्तीच्या निजमार्गीं । रिगमु नाहीं विघ्नांलागीं । मी भक्तांच्या प्रेमभागीं । रंगलों रंगीं श्रीरंग ॥ ७१॥ सद्भावें करितां माझी भक्ती । भक्तांसी नव्हे विघ्नप्राप्ती । भक्त-सबाह्य मी श्रीपती । अहोरातीं संरक्षीं ॥ ७२ ॥ करितां भगवद्भजन । भक्तांसी बाधीना विघ्न । ते भक्तीचें महिमान । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ७३ ॥ योगचर्यामिमां योगी विचरन् मदपाश्रयः । नान्तरायौर्विहन्येत निस्पृहः स्वसुखानुभूः ॥ ४४ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायामेकादशस्कन्धे अष्टाविंशोऽध्यायः ॥ २८ ॥ अनन्यप्रीतीं मज शरण । सर्वभूतीं मद्भावन । अभेदबुद्धीं माझें भजन । त्यासी सर्वथा विघ्न बाधीना ॥ ७४ ॥ माझ्या भक्ताचे उपसर्ग । सकळ निर्दळीं मी श्रीरंग । ज्यासी अनन्य भजनयोग । त्यासी माझें निजांग वस्तीसी ॥ ७५ ॥ जेथ विघ्न धांवे भक्तांकडे । तेथ तत्काळ माझी उडी पडे । निवारीं निजभक्तांचें सांकडे । तीं लळिवाडें पैं माझीं ॥ ७६ ॥ तीं लळीवाडें म्हणशी कैसीं । त्यांचे सांकडें मी सदा सोशीं । राजा दंडितां प्रल्हादासी । म्यां सर्वथा त्यासी रक्षिलें ॥ ७७ ॥ संकट मांडिलें अंबरीषासी । तैं म्यां अपामानिलें दुर्वासासीं । दाही गर्भवास मी स्वयें सोशीं । उणें भक्तांसी येऊं नेदीं ॥ ७८ ॥ बाधा होतां गजेंद्रासी । म्यां हातीं वसवूनि सुदर्शनासी । उडी घालूनि त्यापाशीं । निमिषार्धेंसीं सोडविला ॥ ७९ ॥ द्रौपदीचिये अतिसांकडीं । सभेसी करितां ते उघडी । म्यां निजांगें घालूनि उडी । वस्त्रांच्या कोडी पुरविल्या ॥ ६८० ॥ द्रौपदीचिया हातीं देतां घडी । नेसतां नेसतां दिसेल ते उघडी । यालागीं मे लवडसवडीं । नेसतीं लुगडीं स्वयें झालों ॥ ८१ ॥ दावाग्नीं पीडितां गोपाळ । निजमुखीं म्यां गिळिली ज्वाळ । एथवरी भक्तांची कळवळ । मज सर्वकाळ उद्धवा ॥ ८२ ॥ द्रौण्यस्त्राचे बाधेहातीं । म्यां गर्भीं रक्षिला परीक्षिती । गोकुळ पीडितां सुरपती । म्यां धरिला हातीं गोवर्धन ॥ ८३ ॥ वांचवावया अर्जुनासी । दिवसा लपविलें सूर्यासी । हरी पतकरूनि रणभूमीसी । सत्य भीष्पासी म्यां केलें ॥ ८४ ॥ ऐसा मी भक्तसहाकारी । नित्य असतां शिरावरी । भक्तांसी विघ्न कोण करी । मी श्रीहरि रक्षिता ॥ ८५ ॥ जे अनुसरले मद्भक्तीसी । मी विघ्न लागों नेदें त्या भक्तांसी । निजांग अर्पोनियां त्यांसी । निजीं निजसुखेंसीं नांदवीं ॥ ८६ ॥ भावें करितां माझी भक्ती । साधकां स्वसुखाची प्राप्ती । तेथें इच्छेंसीं कामलोभ जाती । माझी सुखस्थिति मद्भक्तां ॥ ८७ ॥ म्हणसी भक्तांसी देहांतीं । होईल निजसुखाची प्राप्ती । तैशी नव्हे चौथी भक्ती । देहीं वर्तती स्थिति सुखरूप ॥ ८८ ॥ देह राहो अथवा जावो । परी सुखासी नाहीं अभावो । यापरी मद्भक्त पहा हो । सुखें सुखनिर्वाहो भोगिती ॥ ८९ ॥ भक्त वर्ततां दिसती देहीं । परी ते वर्तती ठायीं । मी अवघाचि त्यांच्या हृदयीं । सर्वदा पाहीं नांदत ॥ ६९० ॥ भक्त निजबोधें मजभीतरी । मी निजांगें त्यां आंतबाहेरी । एवं निजसुखाच्या माजघरीं । परस्परीं नांदत ॥ ९१ ॥ मी देव तो एक भक्त । हेही बाहेरसवडी मात । विचारितां आंतुवटा अर्थ । मी आणि भक्त एकचि ॥ ९२ ॥ तूप थिजलें विघुरलें देख । तेवीं मी आणि भक्त दोनी एक । मज भक्तासी वेगळिक । कल्पांतीं देख असेना ॥ ९३ ॥ मी तो एकचि एथें । हेंही म्हणावया नाहीं म्हणतें । यापरी मिळोनि मातें । भक्त निजसुखातें पावले ॥ ९४ ॥ तो हा ब्रह्मज्ञानाचा कळसु । अध्याय जाण अठ्ठावीसु । बाप विंदानी हृषीकेशु । तेणें देउळासी कळसु मेळविला ॥ ९५ ॥ जेवीं अळंकारी मुकुटमणी । तेवीं अठ्ठावीस ब्रह्मज्ञानीं । श्रीकृष्ण भक्तांची निजजननी । तो उद्धवालागोनी शृंगारी ॥ ९६ ॥ माता उत्तम अलंकारकोडीं । अपत्य शृंगारी अतिआवडीं । तेवीं उत्तमोत्तम ज्ञाननिरवडी । उद्धव कडोविकडीं शृंगारिला ॥ ९७ ॥ मातेसी आवडे निपटणें । तेवीं उद्धव वृद्धपणींचें तानें । श्रीकृष्ण त्याकारणें । गुह्यज्ञानें शृंगारी ॥ ९८ ॥ माता बाळकातें शृगारी । तें लेणें मागुतें उतरी । उद्धव शृंगारिला श्रीहरी । तें अंगाबाहेरी निघेना ॥ ९९ ॥ अंगीं लेणें जडलें अलोलिक । तेणें उद्धव झाला अमोलिक । पायां लागती तिनी लोक । ब्रह्मादिक पूजिती ॥ ७०० ॥ निजात्मअळंकारें श्रीपती । उद्धव शृंगारिला ब्रह्मस्थितीं । तेणें वंद्य झाला त्रिजगतीं । त्यातें पुराणीं पढती महाकवी ॥ १ ॥ गोडीमाजीं श्रेष्ठ अमृत । तेंही फिकें करूनि एथ । उद्धवालागीं परमामृत । श्रीकृष्णें निश्चित पाजिलें ॥ २ ॥ अमर अमृतपान करिती । तेही फिकें करूनि एथ । उद्धवालागीं परमामृत । श्रीकृष्णें निश्चित पाजिलें ॥ २ ॥ अमर अमृतपान करिती । तेही मरणार्णवीं बुडती । उद्धव अक्षयीं केल श्रीपती । कथामृतीं निववूनि ॥ ३ ॥ तेणें तो सर्वांगीं निवाला । परमानंदीं तृप्त झाला । तेणें उद्धवत्वा विसरला । डोलों लागला स्वानंदें ॥ ४ ॥ तेव्हां स्वानंदउन्मत्तता । दुजें निर्दळी देखतां । संसार हाणोनि लाता । चढे माथा देवांच्या ॥ ५ ॥ चढोनि देवांचिया माथां । शेखीं गिळी देवभक्तता । मम सच्चिदानंदस्वानंदता । निजात्मता स्वयें झाला ॥ ६ ॥ तेथ सत्-चित्-आनंद । हाही नाहीं त्रिविध भेद । सदोदित परमानंद । स्वानंद शुद्ध कोंदला ॥ ७ ॥ नश्वर त्यागाचिये स्थिती । अनश्वरातें ‘संत’ म्हणती । जडाची करितां निवृत्ती । ‘चिद्रूप’ म्हणती वस्तुतें ॥ ८ ॥ जेथ दुःखाचा नाहीं बाधु । त्यातें म्हणती ‘आनंदु’ । एवं सच्चिदानंद शब्दु । ज्ञानसंबंधु मायिक ॥ ९ ॥ वस्तु संत ना असंत । चित् नव्हे अचित् । ते सुखदुःखातीत । जाण निश्चित सन्मात्र ॥ ७१० ॥ हा अठ्ठाविशींचा निजबोध । उद्धवासी तुष्टोनि गोविंद । देता झाला स्वनंदकंद । भाग्यें अगाध तो एक ॥ ११ ॥ सांडोनि निजधामा जाणें । स्वयें श्रीकृष्ण ज्याकारणें । देता झाला निजगुह्यठेवणें । त्याचें भाग्य वानणें तें किती ॥ १२ ॥ जें नेदीच पित्या वसुदेवासी । जें नेदीच बंधु बळभद्रासी । जें नेदीच पुन्ना प्रद्युम्नासी । तें उद्धवासी दीधलें ॥ १३ ॥ जें नेदीच देवकीमातेसी । जें नेदीच कुंती आतेसी । शेखीं नेदीच यशोदेसी । तें उद्धवासी दीधलें ॥ १४ ॥ म्हणाल संगितलें अर्जुनासी । तोही अत्यंत पढियंता त्यासी । त्याहातीं उतरावया धराभारासी । युद्धीं त्त्वरेंसी उपदेशिला ॥ १५ ॥ तैसें नव्हे उद्धवाकडे । सावकाश निजनिवाडे । गुप्त ठेवणें फाडोवाडें । अवघे त्यापुढें अर्पिलें ॥ १६ ॥ पित्याचिया निजधनासी । स्वामित्व लाभे निजपुत्रासी । तेवीं श्रीकृष्णाचिया गुह्यज्ञानासी । झाला मिराशी उद्धव ॥ १७ ॥ पांडवांमाजीं धन्य अर्जुन । यादवांमाजीं उद्धव धन्य । या दोघांच्या भाग्यासमान । न दिसे आन त्रिजगतीं ॥ १८ ॥ सकळ साराचा निजसारंश । तो हा एकादशीं अठ्ठवीस । जेवीं यतींमाजीं परमहंस । तेवीं अष्टावश भागवतीं ॥ १९ ॥ जेवीं क्षीराब्धीमाजीं शेषशयन । त्यावरी जैसा नारायण । तेवीं भागवतामाजीं जाण । ब्रह्मपरिपूर्ण अष्टाविंश ॥ ७२० ॥ जेवीं वैकुंठ परम पावन । त्यावरी विराजे श्रीभगवान । तेवीं भागवतामाजीं जाण । विराजमान अष्टविंश ॥ २१ ॥ एवढ्या महत्त्वाचें वैभव । कृष्णकृपेनें पावला उद्धव । बाप निजभाग्याची धांव । ब्रह्म स्वयमेव स्वयें झाला ॥ २२ ॥ उद्धव झाला ब्रह्मपूर्ण । त्यासी कृष्णकृपा प्रमाण । तें मी वाखाणीं अज्ञान । देशभाषेने प्राकृत ॥ २३ ॥ अंधासी सूर्य प्रसन्न । झालिया देखे तो निधान । तेवीं प्रकटोनि जनार्दन । हें गुह्यज्ञान बोलवी ॥ २४ ॥ जनार्दन प्रकटला आतां । हें बोलणें माझी मूर्खता । तो स्वतःसिद्ध सदा असतां । हेंही झालों मी जाणता त्याचिया कृपा ॥ २५ ॥ त्याचिया कृपें ऐसें केलें । माझें मीपण निःशेष नेलें । नेलेंपण देखों नाहीं दीधलें । जेवीं सूर्ये केलें अंधारा ॥ २६ ॥ मज कृपा करील जनार्दन । हेंही नेणें मी अज्ञान । तेणें दयाळुवें कृपा करून । हें गुह्यज्ञान बोलविलें ॥ २७ ॥ निकट असतां जनार्दन । मी नेणें त्याचें महिमान । तेणें आपला महिमा आपण । मज मुखें जाण बोलविला ॥ २८ ॥ मी जें म्हणे माझें मुख । तेंही जनार्दन झाला देख । तेणें मुखें निजात्मसुख । बोलवी निष्टंक निजात्मसत्ता ॥ २९ ॥ एवं माझेनि नांवें कविता । परी जनार्दनची झाला वक्ता । तेणें वक्तेपणें तत्त्वतां । रसाळ कथा चालविली ॥ ७३० ॥ ब्रह्मरसें रसाळ कथा । निरूपिलें श्रीभागवता । त्यामाजीं ब्रह्मतल्लीनता । जाण तत्त्वतां अष्टविंश ॥ ३१ ॥ अठ्ठाविसाव्याचें निरूपण । तें तत्त्वतां ब्रह्म परिपूर्ण । श्रद्धेनें करितां श्रवण । उद्धव संपूर्ण निवाला ॥ ३२ ॥ उद्धव निवोनियां आपण । स्वयें विचारित झाला जाण । म्हणे हें शुद्ध आत्मज्ञान । परी प्राप्ती कठिण अबळांसी ॥ ३३ ॥ या चित्स्वरूपाची प्राप्ती । सुगम होय साधकांप्रती । पुढील अध्यायीं येचि अर्थीं । उद्धव विनंती करील ॥ ३४ ॥ कडा फोडोनि मार्ग कीजे । कां उंचीं फरस बांधिजे । तेवीं सुगमें निर्गुण पाविजे । तो उपाव पुसिजे उद्धवें ॥ ३५ ॥ ब्रह्मप्राप्तीचा सुगम उपावो । स्वयें सांगेल देवाधिदेवो । तो सुरस पुढील अध्यावो । साधकां पहा हो परमार्थसिद्धि ॥ ३६ ॥ पव्हणियापरिस पायउतारा । अबळीं उतरिजे भवसागरा । तैसा साधकांलागीं सोपारा । उपाव पुढारा हरि सांगे ॥ ३७ ॥ सीतेचेनि कृपा पडिभारें । सेतु बांधिजे रामचंद्रे । तेथ समुद्र तरतीं वानरें । जीं वनचरें अतिमंदें ॥ ३८ ॥ तेवीं उद्धवप्रश्नप्रीतीसीं । भवाब्धिसेतु ह्रुषीकेशीं । बांधिला निजभक्तिउपायेंसीं । तेथ तरती आपैसीं भाविकें अबळें ॥ ३९ ॥ कृष्णभक्ति सेतुद्वारें । तरलीं जड मूढ पामरें । ते भक्ती सांगिजेल यादवेंद्रें । श्रोतां सादरें परिसावी ॥ ७४० ॥ एका जनार्दना शरण । तेणें श्रोते सुप्रसन्न । पुढील अध्यायाचें कथन । तेणें साधक जन तरतील ॥ ४१ ॥ सांडूनियां एकपण । एका जनार्दना शरण । सुगम साधे आत्मज्ञान । तें भक्तिसाधन हरि सांगे ॥ ७४२ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे भगवदुद्धवसंवादे परमहंससंहितायां एकाकारटीकायां ‘परमार्थनिर्णयो’ नाम अष्टाविंशोऽध्यायः ॥ २८ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ ४४ ॥ ओव्या ॥ ७४२ ॥
You can donate to the bank account given below
Scan to donate
Merchant Name : Sant Eknath Mission
UPI ID : santeknathmission@sbi
Contact Info :
Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission,
C/O Shri Venimadhav Gosavi,
ShriNath Galli, Shrikshetra Paithan, Dist. Chhatrapati
Sambhajinagar
Pin. 431006
Mobile No : +91 - 9421411135
Email : info@santeknath.org