॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो श्रीगुरु शिवशिवा । नमनें जीवत्व जीवा । नुरविसी तेथें देहभावा । कैसेनि रिघावा होईल ॥ १ ॥ जीवें घेउनि जीवा । देहत्व मोडूनि देहभावा । याहीवरी करविसी सेवा । हें लाघव देवा नवल तुझें ॥ २ ॥ जीव घेऊनि शंखासुरा । त्याच्या वागविसी कलेवरा । तो तूं रिघोनि मजभीतरा । माझिया शरीरा वागविसी ॥ ३ ॥ शंख मधुर ध्वनी गाजे । तो वाजवित्याचेनि वाचे । तेवीं म्यां जें जें बोलिजे । तें तें बोलणें साजे तुझेनि ॥ ४ ॥ आतां माझें ’शरीर’ जें चळे । तें तुझेनि आंगिकें मळें । ’कर्में’ निपजतीं सकळें । सत्ताबळें तुझेनि ॥ ५ ॥ माझे देहींचें जें ’मीपण’ । तें तूंचि झालासी आपण । तुझेनि प्राणें ’प्राण’ । माझाही जाण चळे देवा ॥ ६ ॥ ’दृष्टी’ जें जें काहीं देखे । तें तें तुझेनि ज्ञानउन्मेखें । ’श्रवणीं’ जें जें कांहीं ऐकें । तें तें नेटकें अवधान तुझें ॥ ७ ॥ ’रसना’ जें जें कांहीं चाखे । तें तें तुझेनि स्वादमुखें । ’बुद्धि’ जाणपणें तोखे । तेहीं अतिनिकें वेदकत्व तुझें ॥ ८ ॥ ’मन’ मनपणें अतिचपळ । तेंही तुझेंचि आंगिक बळ । विवेका ’विवेकु’ प्रबळ । अतिसोज्ज्वळ तुझेनि ॥ ९ ॥ ’वाचा’ जें जें कांहीं वदे । तें वाचिकत्व तुझेनि शब्दें । ’बोधु’ जेणें उव्दोधे । तो तुझेनि प्रबोधें प्रबोधु ॥ १० ॥ ’जागृती’ जागे तुझेनि हरिखें । ’स्वप्न’स्वप्न तुझेनि देखे । ’सुषुप्ती’सुखावे जेणें सुखें । पुर्ण संतोखें तुझेनि ॥ ११ ॥ मी जे जे ’विषय’भोगीं। तें भोक्तेपण तुझें अंगीं । तुझेनि निजसंयोगीं । मीपणें जगीं वर्तविशी मज ॥ १२ ॥ माझें करूनि खांबसुत्र । तूं झालसी सुत्रधार । हालवूनियां निजसूत्र। कर्मे विचित्र करविशी ॥ १३ ॥ ऐशिया श्रीजनार्दना । जग चेतवित्या चिद्घना । कृपाळुवा जगज्जीवना । नमन श्रीचरणा तुझेनि तुज ॥ १४ ॥ यापरी मजमाजीं तूं चाळिता । चाळकत्वें करविसी ग्रंथा । तेथें मी एक कवित्वकर्ता । हे जाणावी तत्वतां स्थूळबुद्धी ॥ १५ ॥ एका एकु जनार्दनीं । कीं जनार्दनु एकपणीं । इये पृथक् नामांचीं लेणीं । लेऊनि एकपणीं मिरविसी तुं ॥ १६ ॥ जेवीं कनकाचें भूषण । कीं भूषणीं कनकसंपूर्ण । तेवीं एका आणि जनार्दन । एकत्वें जाण जनार्दनचि ॥ १७ ॥ ऐशी ऐकोन विनवणी । सदुरु तुष्टला संतोषोनी । येथें भिन्न भिन्न सोसणी । न लगे निरुपणीं करणें तुज ॥ १८ ॥ जेव्हां कापुरा आगी झगटे । तेव्हांचि कापुरत्व खुंटे । सच्छिष्यासी सद्गुरु भेटे । तेव्हांचि फिटे भिन्नभेदु ॥ १९ ॥ जेणें फिटे भिन्नभेदु । तो श्रीभागवतीं निजबोधु । वसुदेवाप्रती नारदु । सांगत संवादु इतिहासाचा ॥ २० ॥ ज्या इतिहासाचा अर्थ । परिसतां प्रगटे परमार्थ । स्वानंदबोध हृदयांत । श्रवणें सदोदित श्रोते होती ॥ २१ ॥ तंव श्रोते संतसमुदावो । म्हणती कैसा नवलावो । सद्गुरुस्तवनीं ब्रह्मभावो । साधिला आवो अभेदत्वें ॥ २२ ॥ हे सद्गुरूची विनवणी । कीं ब्रह्मसुखाची खाणी । परिसतां सप्रेम बोलणीं । रिझली आयणी सज्जनांची ॥ २३ ॥ या देशभाषा वाणी । उघडिली परमार्थाची खाणी । बोल नव्हती हे स्पर्शमणी । लागतां श्रवणी पालटे जीव ॥ २४ ॥ यापरी श्रीभागवतीं । अनुपम अगाध स्थिति । ते कथेची संगति । लावी सुनिश् चितीं अर्थावबोधें ॥ २५ ॥ ऐकोनि संतांचें वचन । शिरीं वंदोनि त्यांचे चरण । पुढील कथानिरुपण । श्रोतीं सावधान परिसावें ॥ २६ ॥ येथें तृतीय अध्यायाचे अंतीं । निरुपितां तांत्रिक भक्ति । भजावें आवडेल ते मूर्ति । रायासी तदर्थी प्रश्न स्फुरला ॥ २७ ॥ देवो एकचि त्रिजगतीं । त्याच्या किती अवतारमूर्ति । जन्म कर्म अनेक व्यक्ती । हेंचि मुनीप्रति पुसतु ॥ २८ ॥ श्रीराजोवाच । यानि यानीह कर्माणि यैर्यैः स्वच्छन्दजन्मभिः । चक्रे करोति कर्ता वा हरिस्तानि ब्रुवन्तु नः ॥ १ ॥ मुनीश्रवांचें अगाध ज्ञान । त्याहीवरी रसाळ निरुपण । तेंणें रायाचें वेधलें मन । प्रश्नावरी प्रश्न यालागीं पुसे ॥ २९ ॥ तो म्हणे देवधिदेवो हरि । स्वलीला कैसीं जन्में धरी । स्वेच्छा जीं जी कर्मे करी । ते अगाध थोरी मज सांगा ॥ ३० ॥ म्हणती देवा नाहीं जन्म । तेथें कैंचें पुसशी कर्म । देवो अरूप अनाम । त्यासी जन्म कर्म असेना ॥ ३१ ॥ तो ’अजन्मा’परी जन्म धरी । ’अकर्मा’ परी कर्मे करी । ’विदेही’ तो देह्धारी । होऊनि संसारीं स्वधर्म पाळी ॥ ३२ ॥ त्याच्या अवतारांची स्थिति । कवण जन्म कवण व्यक्ति । किती अवतार किती मूर्ति । कृपेनें मजप्रती सांगा स्वामी ॥ ३३ ॥ जे कां अतीत अनागत । वर्तमान जे प्रस्तुत । ते अवतार समस्त । इत्थंभूत सांगावे ॥ ३४ ॥ हरिचरित्र अवतारगुण । प्रतीपादन करावयाचा प्रश्न । तो सांगावया जयंतीनंदन । स्वानंदें पूर्ण ’द्रुमिल’ सांगे ॥ ३५ ॥ श्रीद्रुमिल उवाच । यो वा अनन्तस्य गुणाननन्ताननुक्रमिष्यन् स तु बालबुद्धिः । रजांसि भूमेर्गणयेत्कथञ्चित् कालेन नैवाखिलशक्तिधाम्नः ॥ २ ॥ ज्याची लीलाशक्ति अपरिमित । ऐशा अनंत शक्ति ज्याच्या नखांत । यालागीं तो ’अनंत’ म्हणत । त्याचे गुण समस्त गणवती कोणा ॥ ३६ ॥ त्या अनंताचि गुणसमृद्धी । गणूं म्हणे तो बालबुद्धि । जेवीं का आकाशाची वृद्धि । मुंगिये त्रिशुद्धी न करवी माप ॥ ३७ ॥ सागरींचें जळ संपूर्ण । केवीं गणूं शके लवण । तेवीं अनंताचे अनंत गुण । आकळी कवण निजसत्ता ॥ ३८ ॥ पर्जन्याचिया धारा । गणितां येतील नृपवरा । पृथ्वीचिया दूर्वांकुरां । सुखें महावीरा गणितां येती ॥ ३९ ॥ वारा अफाट धांवे । तोही गणितातें पावे । निमेषोन्मेषांचे यावे । त्यांसीही संभवे गणित राया ॥ ४० ॥ पृथ्वीचिया परिमाणा । काळें काळें होय गणना । परी भगवंताचिया गुणां । वेदांसहि जाणा गणित नव्हे ॥ ४१ ॥ भगवंताचें नाम एक । घेतां वेद झाले मूक । त्याचे गुण गणितां सकळिक । शेषाचें मुख दुखंड झालें ॥ ४२ ॥ त्या अनंताचे अनंत गुण । येथ गणूं शके कवण । कांहीं एक संक्षेपें जाण । सांगेन लक्षण अवतारांचें ॥ ४३ ॥ भूतैर्यदा पञ्चभिरात्मसृष्टैः पुरं विराजं विरचय्य तस्मिन् । स्वांशेन विष्टः पुरुषाभिधानमवाप नारायण आदिदेवः ॥ ३ ॥ अवतारांमाजीं प्रथमतां । ’पुरुषावतारांची’ कथा । द्रुमिल झाला सांगता । ऐक तत्वतां महाराजा ॥ ४४ ॥ नारायणें आत्मशक्तीं । पंचमहाभूतें भूताकृती । सृजूनियां यथानिगुतीं । ब्रह्मांडाची स्थिति निर्माण केली ॥ ४५ ॥ ’विराजपुर’ ब्रह्मांडा नाम । तेथ लीला प्रवेशे देवोत्तम । यालागीं ’पुरुष’ हें नाम । पुरुषोत्तम स्वांशें पावे ॥ ४६ ॥ त्याचेनि अंशयोगें प्रकृति । झाली प्रजांतें प्रसवती । यालागीं ’पुरुष’ नामस्थिति । जाण निश्चितीं पावला ॥ ४७ ॥ तो अकर्तात्मयोगयुक्तीं । जग चेतवी चिच्छक्तीं । ज्याचेनि जगा जगत्वें स्फूर्ति । त्याची गुणकीर्ति दों श्लोकीं सांगों ॥ ४८ ॥ यत्काय एष भुवनत्रयसन्निवेशो । यस्येन्द्रियैस्तनुभृतां उभयेन्द्रियाणि । ज्ञानं स्वतः श्वसनतो बलमोज ईहा । सत्त्वादिभिः स्थितिलयोद्भव आदिकर्ता ॥ ४ ॥ त्रैलोक्य वसे जें कांही । तेंचि शरीर त्याचें पाहीं । ज्याचेनि योगें देही । ठायींच्या ठायीं वर्तती ॥ ४९ ॥ ब्रह्मादिक जे तनुधारी । त्यांच्या ज्ञानकर्मेंद्रियांची थोरी । ज्याचेनि इंद्रियेंकरीं । निजव्यापारीं वर्तती ॥ ५० ॥ जो जगाचे नयनांचा नयन । जो जगाच्या घ्राणांचें घ्राण । जो जगाच्या श्रवणांचें श्रवण । रसनेची जाण रसना जो कां ॥ ५१ ॥ जो जगाच्या हातांचे हात । ज्याचे पाय जगाच्या पायांत । जो वाचेची वाचा निश्चित । एवं उभय इंद्रियांआंत इंद्रियें ज्याचीं ॥ ५२ ॥ जीवाच्या ठायीं जें कां ज्ञान । तेंही त्याचेनि ज्ञानें जाण । त्यासी ज्ञानदाता नाहीं आन । स्वयें ज्ञानघन स्वभावतांचि ॥ ५३ ॥ ज्याचेनि प्राणें जाण । जगाचा चळे प्राण । बळ तेज क्रियाचरण । जगासी संपूर्ण ज्याचेनि ॥ ५४ ॥ रजतमसत्वादिगुणयुक्त । उत्पत्तिस्थितिप्रळयान्त । मूळीं आदिकर्ता भगवंत । जाण तो निश्चित ’पुरुषावतार’ ॥ ५५ ॥ सत्वादि त्रिगुणावस्था । उत्पत्तिस्थितिलयकर्ता । तेही गुणावतारकथा । ऐक नृपनाथा सांगेन ॥ ५६ ॥ आदावभूच्छतधृती रजसास्य सर्गे । विष्णुः स्थितौ क्रतुपतिर्द्विजधर्मसेतुः । रुद्रोऽप्ययाय तमसा पुरुषः स आद्य । इत्युद्भवस्थितिलयाः सततं प्रजासु ॥ ५ ॥ तोचि आदिकल्पीं उत्पत्ति । रजोगुणें राजसा शक्तीं । स्वयें झाला शतधृती । ’ब्रह्मा’ म्हणती जयातें ॥ ५७ ॥ एवं ब्रह्मरूपें उत्पत्ति । सृजिता झाला राजसा शक्तीं । तेथें प्रतिपाळावया स्वधर्मस्थिति । सत्वगुणें निश्चितीं ’श्रीविष्णु’ जाहला ॥ ५८ ॥ तो द्विजधर्मप्रतिपाळणु । यज्ञभोक्ता श्रीविष्णु । देखतां धर्माचा अवगुणु । अवतरे नारायणु नानावतारीं ॥ ५९ ॥ तोचि ये सृष्टीचे प्रांतीं । तमोगुणें तामसा शक्तीं । स्वयें जाहला ’रुद्रमूर्ति’। सकळ कल्पांतीं निर्दाळितु ॥ ६० ॥ जो शेताची पेरणी करी । तोचि राखे देखे सोकरी । तोचि वाळलियावरी । संवगणी करी सर्वांची ॥ ६१ ॥ तेवीं उत्पत्तिकाळीं तोचि ब्रह्मा । स्थितिकाळीं तोचि विष्णुनामा । प्रळयाकाळींही रुद्रपमा । ये पुरुषोत्तमा तेचि नामें ॥ ६२ ॥ यालागीं तो आदिकर्ता । श्रुतिशास्त्रीं दृढ वार्ता । दक्षकश्यपादिकां कर्तव्यता । त्यांसी समर्थता याचेनि ॥ ६३ ॥ यापरी विचारितां । हाचि एक सकळ कर्ता । यावांचून कर्तव्यता । अणुमात्रता नव्हे आना ॥ ६४ ॥ जो सृष्टीपूर्वीं स्वयंभ असे । जेणें उत्पत्तिस्थितिप्रळयो भासे । तोचि आदिकर्ता अनायासें । तोचि निजांशें पुरुषावतारु ॥ ६५ ॥ ऐक राया अतिविचित्र । जें परिसतां पुण्य पवित्र । तो नारायणाचा अवतार । ज्याचें चरित्र अलोलिक ॥ ६६ ॥ धर्मस्य दक्षदुहितर्यजनिष्ट मूर्त्यां । नारायणो नर ऋषिप्रवरः प्रशान्तः । नैष्कर्म्यलक्षणमुवाच चचार कर्म । योऽद्यापि चास्त ऋषिवर्यनिषेविताङ्घ्रिः ॥ ६ ॥ जो अजन्मा नित्य त्रिभुवनीं । जो न जन्मोनि जन्मला योनीं । तेणें धर्माची धर्मपत्नी । केली जननी दक्षकन्या ’मूर्ती’ ॥ ६७ ॥ ते मूर्तिमातेच्या उदरीं । नर-नारायण अवतारी । एकचि दोंरूपेंकरीं । धर्माच्या घरीं अवतरले ॥ ६८ ॥ तेणें नारदादिकांसी जाण । निरूपिलें नैष्कर्म्यलक्षण । स्वयें आचरला आपण । तें कथन ऐक राया ॥ ६९ ॥ ’नारायण’ म्हणसी कोणे देशीं । तो बदरिकाश्रमीं आश्रमवासी । नारद सनकादिक ऋषि । अद्यापि त्यापासीं सेवेसी असती ॥ ७० ॥ त्यासी स्वस्वरूपाचें लक्ष । सहजीं असे प्रत्यक्ष । ते स्वरूपनिष्ठेचा पक्ष । अलक्ष्याचें लक्ष्य प्रबोधी स्वयें ॥ ७१ ॥ तया स्वरूपाचा निजबोध । स्वयें पावावया विशद । अद्यापवरी ऋषिवृंद । नित्य संवाद करिताति त्यासीं ॥ ७२ ॥ जें स्वरूप लक्षेना जनीं । तें विशद करूनि दे वचनीं । तेंचि अनुग्रहेंकरूनी । अनुभवा आणी तत्काळ ॥ ७३ ॥ ज्ञाते बहुसाल ऋषीश्वर । त्यांमाजीं नारायणअवतार । तेथ वर्तलें जें चरित्र । अतिविचित्र ऐक राया ॥ ७४ ॥ इन्द्रो विशङ्क्य मम धाम जिघृक्षतीति । कामं न्ययुङ्क्त सगणं स बदर्युपाख्यम् । गत्वाप्सरोगणवसन्तसुमन्दवातैः । स्त्रीप्रेक्षणेषुभिरविध्यदतन्महिज्ञः ॥ ७ ॥ ऐसा नारायणाचा प्रताप । देखोनि निष्ठा दृढ तप । तेणें इंद्रासी आला कंप । म्हणे स्वर्ग निष्पाप घेईल माझा ॥ ७५ ॥ त्याचें तप देखोनि परम । म्हणे गेलें गेलें स्वर्गधाम । इंद्रें कोपें प्रेरिला काम । अप्सरासंभ्रमसमवेत ॥ ७६ ॥ कामसमवेत अप्सरा । सवें वसंतही दुसरा । क्रोधु अवघियां पुढारा । जो तापसांतें पुरा नागवी सदा ॥ ७७ ॥ तीर्थोतीर्थींच्या अनुष्ठाना । क्षमा नुपजे अंतःकरणा । कोपु येतांच जाणा । करी उगाणा तपाचा ॥ ७८ ॥ क्रोधु तापसांचा उघड वैरी । तापसां नागवी नानापरी । तोही नारायणावरी । अवघ्यां अग्रीं चालिला ॥ ७९ ॥ ऐशीं मिळोनि बिरुदायितें । आलीं बदरिकाश्रमा समस्तें । नारायणु तप करी जेथें । उठावलीं तेथें अतिआक्रमेंसीं ॥ ८० ॥ वसंतें श्रृंगारिलें वन । कोकिळा कलरवें गायन । सुगंध शीतळ झुळके पवन । पराग संपुर्ण वरुषती सुमनें ॥ ८१ ॥ तेथ भ्रमरांचें झणत्कार । कामिनीगायन कामाकार । हावभाव कटाक्षविकार । कामसंचार चेतविती ॥ ८२ ॥ नव्हेचि कामिनीकामबाधा । पराक्रमु न चलेचि क्रोधा । तोही सांडोनियां बिरुदा । परतला नुसधा म्लानवदनें ॥ ८३ ॥ मग मदनें मांडोनियां ठाण । विंधी कामिनीकटाक्षबाण । तेणें घायें नारायण । अणुप्रमाण न डंडळेचि ॥ ८४ ॥ शस्रें तोडितां आकाशासी । आकाश स्वयें सावकाशी । तेवीं कामें छळीतां नारायणासी । तो निजसंतोषीं निर्द्वंद्व ॥ ८५ ॥ आग्या निजतेजसत्ता । अग्नीतेज प्राशुं जातां । तोंड जळे चवी चाखितां । तेवीं कामिनीकामता नारायणदृष्टीं ॥ ८६ ॥ नेणतां नारायणमहिमे । धांवोनि घाला घातला कामें । तेव्हां अवघींच पराक्रमें । स्वनिंद्य धर्मे लाजलीं ॥ ८७ ॥ तेथ अवघीं झालीं पराङ्मुखें । पाठमोरीं निघालीं अधोमुखें । तेव्हां त्यांची गति निःशेखें । नारायाण देखे खुंटिली ॥ ८८ ॥ इंद्रियनियंता नारायण । नेणोनि छळूं गेलीं आपण । त्यापुढोनि पुनरागमन । सर्वथा जाण करवेना ॥ ८९ ॥ मागें न निघवे निश्चितें । ऐसें जाणिनि समस्तें । थोर गजबजलीं तेथें । भयचकितें व्याकुळें ॥ ९० ॥ जाणोनि नारायणप्रताप । आतां कोपून देईल शाप । येणें धाकें म्लानरूप । अतिसकंप भयभीतें ॥ ९१ ॥ ऐशी देखोनि त्यांची स्थिति । कृपेनें तुष्टला कृपामूर्ति । अणुमात्र कोपु नये चित्तीं । अभिनव शांति नारायणाची ॥ ९२ ॥ विज्ञाय शक्रकृतमक्रममादिदेवः । प्राह प्रहस्य गतविस्मय एजमानान् । मा भैष्ट भो मदन मारुत देववध्वो । गृह्णीत नो बलिमशून्यमिमं कुरुध्वम् ॥ ८ ॥ इंद्रें केला अपराध । तरी नारायणासी न येचि क्रोध । बापु निजशांति अगाध । न मनी विरुद्ध कामादिकांचे ॥ ९३ ॥ न येचि कामादिकांवरी कोप । इंद्रासही नेदीच शाप । नारायणाच्या ठायीं अल्प । कदा विकल्प नुपजेचि ॥ ९४ ॥ अपकार्यावरी जो कोपला । तो तत्काळ कोपें नागविला । अपकार्या जेणें उपकार केला । तोचि दादुला परमार्थी ॥ ९५ ॥ अपकार्यां उपकार करिती । त्याचे नांव गा परम शांति । ते शांतीची निजस्थिति । दावी लोकांप्रती आचरोनि ॥ ९६ ॥ परमार्थाची मुख्यत्वें स्थिति । पाहिजे गा परम शांति । ते शांतिची उत्कट गति । दावी लोकांप्रती आचरोनि ॥ ९७ ॥ भयभीत कामादिक । अप्सरागण साशंक । त्यातें अभयदानें सुख । देऊनियां देख नारायण बोले ॥ ९८ ॥ अहि कामवसंतदिक स्वामी । कृपा करूनि आलेति तुम्ही । तुमचेनि पदाभिगमीं । आश्रमभूमी पुनीत झाली ॥ ९९ ॥ तुमचें झालिया आगमन । अवश्य करावें आम्हीं पूजन । हेंचि आमुचें अनुष्ठान । कांहीं बळिदान अंगीकारा माझें ॥ १०० ॥ अवो अप्सरा देवकांता । तुम्ही भेवों नका सर्वथा । येथ आलिया समस्तां । पूज्य सर्वथा तुम्ही मज ॥ १ ॥ आश्रमा आलिया अतिथि । जे कोणी पूजा न करिती । त्यांची शून्य पुण्यसंपत्ति । आश्रमस्थिति शून्य होये ॥ २ ॥ तुम्हीं नांगीकारितां पूजन । कांहीं न घेतां बळिदान । गेल्या हा आश्रम होईल शून्य । यालागीं कृपा करून पूजा घ्यावी ॥ ३ ॥ आश्रमा आलिया अतिथी । तो पूज्य सर्वास सर्वार्थीं । अतिथि आश्रमीं जे पूजिती । ते आश्रमकीर्ति शिव वानी ॥ ४ ॥ व्याही रुसलिया पायां पडती । तेवीं विमुख जातां अतिथि । जे वंदोनियां सुखी करिती । ते सुख पावती स्वानंदे ॥ ५ ॥ व्याही रुसलिया कन्या न धाडी । अतिथि रुसलिया पुण्यकोडी । पूर्वापार जे कां जोडी । तेही रोकडी क्षयो पावे ॥ ६ ॥ वैकुंठीं ज्याची निजस्थिति । तो त्या आश्रमा ये नित्य वस्ती । जे आश्रमीं अतिथि । पूजिती प्रीतीं ब्रह्मात्मभावें ॥ ७ ॥ ऐसें बोलिला तयांप्रती । परी माझी हे अगाध शांति । हेही नारायणाचे चित्तीं । गर्वस्थिति असेना ॥ ८ ॥ ऐक राया अतिअपूर्व । असोनि निजशांतिअनुभव । ज्याच्या ठायीं नाहीं गर्व । तोचि देवाधिदेव निश्चयेंसीं ॥ ९ ॥ जो नित्य नाचवी सुरनरांसी । ज्या भेणें तप सांडिजे तापसीं । त्या अभय देवोनि कामक्रोधांसी । आपणापासीं राहविलीं ॥ ११० ॥ इत्थं ब्रुवत्यभयदे नरदेव देवाः । सव्रीडनम्रशिरसः सघृणं तमूचुः । नैतद्विभो त्वयि परेऽविकृते विचित्रं । स्वारामधीरनिकरानतपादपद्मे ॥ ९ ॥ एवं अभय देत नारायण । स्वमुखें बोलिला आपण । तेणें कामादि अप्सरागण । लाजा विरोन अधोमुख झालीं ॥ ११ ॥ देखोनि निर्विकार पूर्ण क्षमा । श्रीनारायण हा परमात्मा । कळों सरलें वसंतादि कामा । त्याचाचि महिमा वर्णिती स्वयें ॥ १२ ॥ ऐकें नरदेव चक्रवर्ती । विदेहा सार्वभौमा भूपती । त्या नारायणाची निजस्तुती । कामादि करिती सद्भावेंसीं ॥ १३ ॥ जे सदा सर्वांतें छळिती । त्यांहीं देखिली पूर्ण शांति । तेचि शांतीची स्तुति करिती । नारायणाप्रती कामक्रोध ॥ १४ ॥ जेणें संतोषे श्रीनारायण । त्यासी कृपा उपजे पूर्ण । ऐशिया परीचें स्तवन । मांडिलें संपूर्ण परमार्थबुद्धीं ॥ १५ ॥ जयजय देवाधिदेवा । तुझिया अविकारभावा । पाहतां न देखों जी सर्वां । देवांमानवांमाझारीं ॥ १६ ॥ मज कामाचेनि घायें । ब्रह्मा कन्येसी धरूं जाये । पराशरा केलें काये । भोगिली पाहें दिवा दुर्गंधा ॥ १७ ॥ ज्यातें योगी वंदिती मुगुटीं । जो तापसांमाजी धूर्जटी । तो शिवु लागे मोहिनीपाठीं । फिटोनि लंगोटी वीर्य द्रवलें ॥ १८ ॥ विष्णु वृंदेच्या श्मशानीं । धरणें बैसे विषयग्लानीं । अहल्येची काहणी । वेदीं पुराणीं वर्णिजे ॥ १९ ॥ नारदु नायके माझी गोष्टी । त्यासी जन्मले पुत्र साठी । माझी साहों शके काठी । ऐसा बळिया सृष्टीं असेना ॥ १२० ॥ जो ब्रह्मचार्यांमाजीं राजा । हनुमंतु मिरवी पैजा । तयास्तव मकरध्वजा । संगेवीण वोजा जन्मविला म्यां ॥ २१ ॥ कलंकिया केला चंद्र । भगांकित केला इंद्र । कपाटीं घातला षण्मुख वीर । जो लाडका कुमर महेशाचा ॥ २२ ॥ मज मन्मथाचा यावा । न साहवे देवां दानवां । मा तेथ इतरां मानवां । कोण केवा साहावयासी ॥ २३ ॥ मज जाळिलें महेशें । त्यासी म्या अनंगें केलें पिसें । नवल धारिष्ट तुझ्या ऐसें । पाहतां न तिहीं लोकीं ॥ २४ ॥ त्या मज कामा न सरतें केलें । शांतीचें कल्याण पाहालें। हें तुवांचि एकें यश नेलें । स्वभावा जिंकलें निजशांतियोगें ॥ २५ ॥ तो मी न सरता केला काम । क्रोधा आणिला उपशम । वासनेचा संभ्रम । नित्य निर्भ्रम त्वां केला ॥ २६ ॥ हे नारायणा तुझी निष्ठा । न ये आणिकां तपोनिष्ठां । केला अनुभवाचा चोहटा । शांतीचा मोठा सुकाळु केला ॥ २७ ॥ मागें तपस्वी वाखाणिले । म्हणती कामक्रोधां जिंकलें । त्यांसीही आम्हीं पूर्ण छळिलें । ऐक तें भलें सांगेन ॥ २८ ॥ कपिलाऐसा तेजोराशी । क्रोधें तत्काळ छळिलें त्यासी । शापु देतांचि सगरासी । तोही क्रोधासी वश्य झाला ॥ २९ ॥ कोपु आला नारदासी । वृक्ष केलें नलकूबरांसी । गौतमें अहल्येसी । कोपें वनवासी शिळा केली ॥ १३० ॥ जो सर्वदा विघ्नातें आकळी । त्या विघ्नेशातें क्रोध छळी । तेणें अतिकोपें कोपानळीं । चंद्रासी तत्काळीं दिधला शाप ॥ ३१ ॥ कोपु आला दुर्वासासी । शाप दिधला अंबरीषासी । देवो आणिला गर्भवासासी । क्रोधें महाऋषी छळिले ऐसे ॥ ३२ ॥ जे दुजी सृष्टी करूं शकती । तेही कामक्रोधें झडपिजेती । सागरीं पडे इंद्रसंपत्ती । हे क्रोधाची ख्याती पुराणप्रसिद्ध ॥ ३३ ॥ इतरांची गोठी कायासी । क्रोधें छळिलें ईश्वरासी । तेणें दीक्षिता द्विजदक्षासी । शिरच्छेदासी करविता झाला ॥ ३४ ॥ जेथ मी कामु स्वयें वसें । तेथ क्रोध वसे सावकाशें । काम क्रोध असतचि नसे । नारायणा ऐसें तुवां केलें ॥ ३५ ॥ हें परमाद्भुत तुझें वीर्य । आणिकां एवढें नाहीं धैर्य । यालागीं तुझें परिचर्य । सदा मुनिवर्य सेविती चरण ॥ ३६ ॥ शांतीच्या चाडें देवाधिदेवा । जे नित्य करिती तुझी सेवा । ते कामक्रोधादिस्वभावा । स्मरतां तव नांवा जिंकिती सुखें ॥ ३७ ॥ जेथ सन्मानें काम पुरत । तेथ आदरें अनुग्रहो करित । काम सन्मानें जेथें अतृप्त । तेथें शाप देत अतिक्रोधें ॥ ३८ ॥ यालागीं शापानुग्रहसमर्थ । ते सर्वदा कामक्रोधयुक्त । परी नवल तुझें सत्वोचित । केले अंकित कामक्रोध ॥ ३९ ॥ मज गर्व नाहीं सर्वथा । हेही तुज नाहीं अहंता । छळवाद्यां द्यावी लघुता । अथवा उपेक्षता न करिसी ॥ १४० ॥ पृथ्वी दुःखी करिती नांगरीं । ते पिकोनी त्यांतें सुखी करी । तेवीं अपकार्यां जो उपकारी । तो मोक्षाच्या शिरीं मुगुटु ॥ ४१ ॥ तुजमाजीं निर्विकार शांति । हें नवल नव्हे कृपामूर्ति । तुझ्या स्वरूपाची स्थिति । आजि निश्चितीं कळली आम्हां ॥ ४२ ॥ तूं निर्गुण निरुपम । मायातीत पूर्ण ब्रह्म । तुझें स्वभावें स्मरतां नाम । सकामाही काम स्पर्शों न शके ॥ ४३ ॥ जो नित्य स्मरे तुझें नाम । त्यासी मी कामचि करीं निष्काम । क्रोधाचि करी क्रोधा शम । मोहो तो परम प्रबोध होय ॥ ४४ ॥ जे धीर वीर निजशांतीं । ज्यांसी परमानंदें नित्य तृप्ति । ऐशियांचिया अमित पंक्ति । पायां लागती तुझिया ॥ ४५ ॥ तुज करावया नमस्कारु । पुढें सरसे महासिद्धांचा संभारु । त्यांसही न लभे अवसरु । तूं परात्परु परमात्मा ॥ ४६ ॥ तुझिया सेवकांकडे । विघ्न रिघतां होय बापुडें । तें रिघावया तुजपुढें । कोण्या परिपाडें रिघेल ॥ ४७ ॥ त्वां सेवतां सुरकृता बहवोऽन्तरायाः । स्वौको विलङ्घ्य परमं व्रजतां पदं ते । नान्यस्य बर्हिर्षि बलीन् ददतः स्वभागान् । धत्ते पदं त्वमविता यदि विघ्नमूर्ध्नि ॥ १० ॥ तापसां बहु विघ्नअपावो । आम्हीं करावा अंतरावो । हा आमुचा निजस्वभावो । नव्हे नवलावो नारायणा ॥ ४८ ॥ हृदयींचा गुप्त करोनि काम । बाह्य जप-तप-भक्तिसंभ्रम । ऐसे जे का शठ परम । विघ्नांचा आक्रम त्यांवरी चाले ॥ ४९ ॥ ते आमची विघ्नस्थिति । न चलें तुझिया भक्तांप्रती । तूं रक्षिता भक्तपति । तेथें विघ्नांची गति पराङ्मुख सदा ॥ १५० ॥ माझीया निजभक्तांसी । विघ्नें कैंची म्हणसी त्यांसी । ऐक त्याही अभिप्रायासी । सांगेन तुजपासीं देवाधिदेवा ॥ ५१ ॥ पावावया निजपदातें । लाता हाणून स्वर्गभोगातें । जे नित्य निष्काम भजती तूंतें । नाना विघ्नें त्यांतें सुरवर रचिती ॥ ५२ ॥ उल्लंघूनियां आमुतें । हे पावती अच्युतपदातें । यालागीं सुरवर त्यातें । अतिविघ्नांतें प्रेरिती ॥ ५३ ॥ बळी नेदूनि आम्हांसी । हे जाऊं पाहती पूर्णपदासी । येणें क्षोभें इंद्रादिक त्यांपासीं । नाना विघ्नांसी मोकलिती ॥ ५४ ॥ या लागीं त्यांच्या भजनापासीं । विघ्नें छळूं धांवतीं आपैसीं । विघ्नीं अभिभव नव्हे त्यांसी । तू हृषीकेशी रक्षिता ॥ ५५ ॥ सांडूनि सकाम कल्पना । जे रतले तुझ्या चरणा । त्यांस आठही प्रहर जाणा । तूं नारायणा रक्षिसी ॥ ५६ ॥ भक्त विघ्नीं होती कासाविसी । धांव धांव म्हणती हृषीकेशी । तेव्हां तूं धांवण्या धांवसी । निष्ठुर नव्हसी नारायणा ॥ ५७ ॥ विघ्न न येतां भक्तांपासीं । आधींच भक्तसंरक्षणासी । तूं भक्तांचे चौंपासीं । अहर्निशीं संरक्षिता ॥ ५८ ॥ विघ्न छळूं धांवे सकोप । तंव विघ्नीं प्रगटे तुझें स्वरूप । यालागीं भक्तांसी अल्प । विघ्नप्रताप बाधूं न शके ॥ ५९ ॥ कामें छळावें हरिभक्तांसी । तंव हरि कामाचा हृदयवासी । तेव्हां विघ्नचि निर्विघ्न त्यांसी । भय भक्तांसी स्वप्नीं नाहीं ॥ १६० ॥ विघ्न उपजवी विरोधु । तंव विरोधा सबाह्य गोविंदु । मग विरोध तोचि महाबोधु । स्वानंदकंदु निजभक्तां ॥ ६१ ॥ ज्यासी तुझ्या चरणीं भावार्थु । त्यासी विघ्नीं प्रगटे परमार्थु । ऐसा भावबळें तूं समर्थु । साह्य सततु निजभक्तां ॥ ६२ ॥ यापरी समर्थ तूं संरक्षिता । ते जिणोनि विघ्नां समस्तां । पाय देऊनि इंद्रपदमाथां । पावती परमार्था तुझिया कृपें ॥ ६३ ॥ देवो संरक्षिता ज्यासी । विघ्नें छळूं धांवती त्यासी । मा सकामाची गती कायसी । विदेहा म्हणसी तें ऐक ॥ ६४ ॥ विषयकाम धरोनि मनीं । इंद्रादि देवां बळिपूजनीं । जे भजले यागयजनीं । देव त्यांलागोनी न करिती विघ्न ॥ ६५ ॥ इंद्र याज्ञिकांचा राजा । सकाम याज्ञिक देवांच्या प्रजा । यज्ञभाग अर्पिती वोजा । पावल्या बळिपूजा न करिती विघ्न ॥ ६६ ॥ म्हणसी कामादिक विटंबिती । ते निष्काम कदा नातळती । सहज कामा वश असती । सदा कर्मे करिती सकाम ॥ ६७ ॥ जे मज कामासी वश होती । ते तप वेंचोनि भोग भोगती । जे आतुडले क्रोधाच्या हातीं । ते वृथा नागवती तपासी ॥ ६८ ॥ क्षुत्तृट्त्रिकालगुणमारुतजैव्ह्यशैश्न्यान् । अस्मानपारजलधीनतितीर्य केचित् । क्रोधस्य यान्ति विफलस्य वशं पदे गोः । मज्जन्ति दुश्चरतपश्च वृथोत्सृजन्ति ॥ ११ ॥ प्राणायामें प्राणापानीं । निजप्राणतें आकळोनी । वात वर्ष शीत उष्ण साहोनी । जे अनुष्ठानीं गुंतले ॥ ६९ ॥ क्षुधे तृषेतें नेमूनी । जिव्हा शिश्न आकळोनी । मज कामातें जिंतिलें मानूनी । निष्कामाभिमानी उन्मत्त ॥ १७० ॥ अल्प अपमानाहातीं । जे क्रोधासी वश होती । ते शाप देऊनि तपसंपत्ती । व्यर्थ नागविती निजनिष्ठा ॥ ७१ ॥ सकामाच्या अनुष्ठाना । मज कामसंगें स्त्रक्चंदना । भोग भोगिती स्वर्गांगना । अमृतपाना प्राशिती ॥ ७२ ॥ त्या मज कामातें उपेक्षिती । आणि क्रोधासी वश होती । ते निजतपा नागवती । शापदीप्ति अनुवादें ॥ ७३ ॥ जे अपार सागर तरती । ते गोष्पदोदकीं बुडती । तेवीं मज कामातें जिणोनि जाती । तेही नागविजेति निजक्रोधें ॥ ७४ ॥ मज कामाची अपूर्ण कामवृत्ति । तेचि क्रोधाची दृढ स्थिति । काम क्रोध अभक्तां बाधिती । हरिभक्तांप्रती तें न चले ॥ ७५ ॥ तुझ्या भक्तांप्रती जाण । न चले कामक्रोधादि बंधन । तो तुं भक्तपती नारायण । तुज आमुचें कामपण केवीं बाधी ॥ ७६ ॥ तेणतां तुझा महिमा । आम्ही करूं आलों निजधर्मा । तुजपासीं नित्य निजक्षमा । पुरुषोत्तमा कृपाळुवा ॥ ७७ ॥ इति प्रगृणतां तेषां स्त्रियोऽत्यद्भुतदर्शनाः । दर्शयामास शुश्रूषां स्वर्चिताः कुर्वतीर्विभुः ॥ १२ ॥ अपकार्यां उपकार करिती । या नांव ’निर्विकार निजशांति’ । तेचि शांतिची परिपाकस्थिति । विघ्नकर्त्याप्रती हरि दावी ॥ ७८ ॥ सांगोनियां आपुली स्थिती । कामादिक स्तुति करिती । तंव परमाश्चर्य देखती । स्त्रिया अत्यद्भुती अकस्मात ॥ ७९ ॥ स्वरूप वैभव अळंकार । श्रियेह्ंनियां सुंदर । सेवेलागीं अतितत्पर । सदा सादर सावधानें ॥ १८० ॥ नवल लाघव नारायणा । कैसें यां दखविलें विंदाना । तया स्त्रियांखालीं स्वर्गांगना । दिवा खद्योत जाण तैशा दिसती ॥ ८१ ॥ ते देवानुचरा दृष्ट्वा स्त्रियः श्रीरिव रूपिणीः । गन्धेन मुमुहुस्तासां रूपौदार्यहतश्रियः ॥ १३ ॥ या स्त्रिया देखोनि दिठीं । कामु मूर्च्छित पडिला सृष्टीं । वसंत घटघटां लाळ घोंटी । क्रोधाची दृष्टी तटस्थ ठेली ॥ ८२ ॥ भ्रमर विसरले झणत्कार । कोकिळा विसरल्या पंचम स्वर । प्राण विसरला संचार । देवानुचर भुलले ॥ ८३ ॥ देखोनि त्यांचिया स्वरुपासी । अप्सरा दिसती जैशा दासी । अत्यंत लज्जा झाली त्यांसी । काळिमेसी उतरल्या ॥ ८४ ॥ त्यांचे अंगींचा सुगंध वातु । तेणें भुलला वसंतु । मलयानिल झाला भ्रांतु । त्यांचा अंगवातु लागतां ॥ ८५ ॥ नारायणाची विद्या कैसी । जे भुलवूं आले आपणासी । भुली पाडिली तयांसी । योगमायेसी दावूनि ॥ ८६ ॥ सुंदरत्वें रंभा तिलोत्तमा । जिया मंदरमथनीं जिंतिलिया रमा । रमेहूनियां उत्तमा । उत्तमोत्तमा अतिरुपें ॥ ८७ ॥ तानाह देवदेवेशः प्रणतान्प्रहसन्निव । आसामेकतमां वृङ्ध्वं सवर्णां स्वर्गभूषणाम् ॥ १४ ॥ तें अतिआश्चर्य देखोन । झाले कामादिक मूर्च्छापन्न । तयांप्रति नारायण । काय हांसोन बोलिला ॥ ८८ ॥ आम्हीं अवश्य पूजावें तुम्हांसी । कांहीं अर्पावें बलिदानासी । संतोषावया इंद्रासी । यांतील एकदी दासी अंगीकारा तुम्हीं ॥ ८९ ॥ यांचें सौंदर्य अतिथोर । म्हणाल होईल अपमानकर । तुम्हांसमान जे सुंदर । तिचा अंगीकार करावा तुम्हीं ॥ १९० ॥ म्हणाल यांत नाहीं हीन । अवघ्या सौंदर्यें संपुर्ण । कोणी न दिसे आम्हांसमान । केवीं आपण अंगीकारावी ॥ ९१ ॥ जरी नाहीं तुम्हांसमान । सकळ सौंदर्यें अतिसंपन्न । तरी एकीचें करावें वरण । होईल भूषण स्वर्गासी ॥ ९२ ॥ ऐसें नारायणाचें वचन । ऐकोनि हरिखलीं संपुर्ण । करूनियां साष्टांग नमन । मस्तकीं वचन वंदिलें ॥ ९३ ॥ ओमित्यादेशमादाय नत्वा तं सुरवन्दिनः । उर्वशीमप्सरः श्रेष्ठां पुरस्कृत्य दिवं ययुः ॥ १५ ॥ इन्द्रायानम्य सदसि श्रृण्वतां त्रिदिवौकसाम् । ऊचुर्नारायणबलं शक्रस्तत्रास विस्मितः ॥ १६ ॥ ऐकोनि नारायणवचन । मस्तकांबुजी करूनियां नमन । उर्वशी पुढां सून । कामादि गण निघाले वेगीं ॥ ९४ ॥ नारायणांचे ऊरूस्पर्शी । उभी होती नारायणापाशीं । तेंचि नांव झालें तिसी । म्हणती ’उर्वशी’ स्वर्गांगना ॥ ९५ ॥ ते देवांचे देवदूत । स्वर्गा पावले समस्त । मग शक्राचे सभेआंत । सांगती अद्भुत नारयणशक्ति ॥ ९६ ॥ तिहीं नारायणाचें चरित्र । सांगितलें अतिपवित्र । तेणें अवघेचि सुरवर । झाले थोर विस्मित पैं ॥ ९७ ॥ इंद्रें देखोनि उर्वशी । तिसी भुलला अहर्निशीं । बाहेर यावें सभेसी । हें वर्षानुवर्षी नाठवे ॥ ९८ ॥ हे प्रथमावतारवार्ता । जे कां नारायणाची कथा । पुढील अवतार आतां । नृपनाथा अवधारीं ॥ ९९ ॥ ऐक राया अतिअपूर्व । छळवादियां पूजा सर्व । करून दाखवी स्वयमेव । ’पूर्णानुभव’ या नांव ॥ २०० ॥ (आशंका) ॥ भावें करितां भगवद्भजन । यापरी इंद्र करी विघ्न । नारायण चैतन्यघन । तेणें विघ्नें संपूर्ण पराभविलीं ॥ १ ॥ मा बाळ्याभोळ्यां करितां भक्ति । ऐशीं विघ्नें जैं छळूं येती । तै कदा नव्हे भगवत्प्राप्ति । ऐसा विकल्प चित्तीं झणीं धरिशी ॥ २ ॥ ब्रह्मादिकां सर्व भूतां । भ्रुकुटिमात्रें ज नियंता । त्या भगवंतातें भजतां । विघ्नें सर्वथा बाधूं न शकती ॥ ३ ॥ ज्याचेनि इंद्रा इंद्रपण । तो भावें भजतां श्रीनारायण । भक्तांसी विघ्न करी कोण । हरि रक्षण निजभक्तां ॥ ४ ॥ इंद्रमुख कामादिक । विघ्नें छळिती सकळ लोक । त्यांचाही नारायण चाळक । तो भक्तांसी देख स्पर्शीं नेदी ॥ ५ ॥ विघ्नांसी भुलविलें जेणें संपूर्ण । तो नित्य स्मरतां नारायण । आपधाकें विघ्ने पळतीं जाण । भक्तसंरक्षण हरिनामें ॥ ६ ॥ करावया निजभक्तकैवार । देवो धरी नानावतार । त्याच्या अवतारांचें चरित्र अतिविचित्र अवधारीं ॥ ७ ॥ हंसस्वरूप्यवददच्युत आत्मयोगं । दत्तः कुमार ऋषभो भगवान् पिता नः । विष्णुः शिवाय जगतां कलयावतिर्णः । तेनाहृता मधुभिदा श्रुतयो हयास्ये ॥ १७ ॥ सनकादिक ब्रह्मनंदन । तिहीं पित्यासी केला प्रश्र्न । प्रश्नखंडणमिसेजाण । केलें ब्रह्मज्ञान ’हंसावतारें’ ॥ ८ ॥ नित्य स्मरतां हरीचें नाम । महाविघ्नें होतीं भस्म । त्याचे अवतारसंभ्रम । उत्तमोत्तम अवधारीं ॥ ९ ॥ ज्याचेनि नामें पळे कृतांतु । ज्याचेनि नामें जन्ममरणां घातु । तो अवतारु ’श्रीदत्तु’ । मूर्तिमंतु परब्रह्म ॥ २१० ॥ नैष्ठिक ब्रह्मचारी निश्चितीं । ज्यासी स्वप्नीं नाहीं वीर्यच्युति । यालागीं ’कुमार’ म्हणती । अवतारमूर्ति सनकादिक ॥ ११ ॥ आणि आमुचा जो कां पिता । ’ऋषभ’ नारायण ज्ञाता । तोही अवतार नृपनाथा । जाण तत्वतां भगवन्मूर्ति ॥ १२ ॥ इहीं नामीं-रूपीं संपूर्ण । अवतारीं अवतरे नारयण । जो जगाचा प्रतिपाळण । स्वांशें श्रीकृष्ण अवतरे ॥ १३ ॥ तोचि स्वयें गा श्रीकृष्ण । मधुकैटभ निर्दाळून । नामें जो कां ’मधुसूदन’ । तोचि अवतरून ’हयग्रीव’ झाला ॥ १४ ॥ तेणें शंख मर्दून पुढती । उध्दरिल्या बुडाल्या श्रुती । आणोनि दिधल्या ब्रह्ययाहातीं । जाण निश्चितीं वेदरक्षणा ॥ १५ ॥ गुप्तोऽप्यये मनुरिलौषधयश्च मात्स्ये । क्रौडे हतो दितिज उद्धरताम्भसः क्ष्माम् । कौर्मे धृतोऽद्रिरमृतोन्मथने स्वपृष्ठे । ग्राहात्प्रपन्नमिभराजममुञ्चदार्तम् ॥ १८ ॥ तेणेंचि ’मत्स्यावतारें’ । प्रलयकालांबुमहाभारें । मनूसगट रक्षिलें धरे । निजनिर्धारे औषधींसीं ॥ १६ ॥ तेणेंचि ’कमठावतारा’ । स्वपृष्ठीं धरूनि गिरिवरा । मंथोनिया क्षीरसागरा । अमृत सुरवरां अर्पिलें ॥ १७ ॥ श्वेतवाराह महामूर्ति । धरेनें केली पूर्ण भक्ति । तिसी उध्दरोनि कृपामूर्ति । अभिनव शांति अर्पिली ॥ १८ ॥ तेणे आर्तत्राणा तांतडी । वैकुंठींहून घालोनि उडी । ’गजाचें ग्राहबंधन तोडी’ । उध्दरिलें आवडीं गजेंद्रातें ॥ १९ ॥ संस्तुन्वतोऽब्धि पतितान् श्रमणानृषींश्च । शक्रं च वृत्रवधतस्तमसि प्रविष्टम् । देवस्त्रियोऽसुरगृहे पिहिता अनाथा । जघ्नेऽसुरेन्द्रमभयाय सतां नृसिंहे ॥ १९ ॥ मार्कं एके वेळीं । बुडतां अकाळप्रळयजळीं । तेणें स्मरतां वनमाळी । तारी तत्काळीं ’वटपत्रशायी’ ॥ २२० ॥ शाळिग्राम पूजितां ऋषीश्वरीं । नळ वानरु ते अवसरीं । देवपूजा टाकी सागरीं । चेष्टा वानरी स्वभावें ॥ २१ ॥ तें देखोनि ऋषीश्वरीं । ’शिळा न बुडोत तुझ्या करीं’ । ऐसा शाप ते अवसरीं । क्षोभेंकरीं दिधला ॥ २२ ॥ तैं शाळिग्राम सागरोदरीं । तरतां देखिले ऋषीश्वरीं । काढावया रिघतां भीतरीं । लहरीकरीं निर्बुजले ॥ २३ ॥ ते काळीं ऋषीश्वरीं । ’आर्तिहरण’ स्तविला हरि । तेथ अवतरोनि श्रीहरि । ऋषीतें तारी पूजेसहित ॥ २४ ॥ वृत्र वधिला वज्रघातें । ते ब्रह्महत्या इंद्रातें । तेणें दोषें तो अंधतमातें । जाण पां निश्चितें बुडत होता ॥ २५ ॥ तेथ अवतरोनि श्रीअनंतें । चतुर्धा वांटूनि ते हत्येतें । शुध्द केलें इंद्रातें । कृपावंतें कृपाळुवें ॥ २६ ॥ जिणोनियां अमरपुरें । हिरोनि देवांचीं अंतौरें । तीं कोंडोनियां समग्रें । मुरें महा असुरें एकंदर केलें ॥ २७ ॥ तो मुरमर्दन श्रीहरि । यालागीं नांवें ’मुरारि’ । देवस्त्रिया काढोनि बाहेरी । देवांच्या करीं अर्पिता झाला ॥ २८ ॥ जो असुरांमाजीं चूडामणी । जो द्वेषियांमाजीं अग्रगणी । तो हरिनाम ऐकतां कानीं । अतिक्षोभें मनीं प्रज्वळों लागे ॥ २९ ॥ जो पूर्ण क्रोधाचा उदधि । जो अविवेकाचा महानिधि । जो हरि स्मरे त्या पुत्रातें बाधी । गर्वमदीं उन्मत्त ॥ २३० ॥ तो हिरण्यकशिपु नखधारीं । स्वयें निवटी ’नरकेसरी’ । जो निजभक्तांचा कैवारी । अभयकारी साधुंचा ॥ ३१ ॥ देवासुरे युधि च दैत्यपतीन् सुरार्थे । हत्वान्तरेषु भुवनान्यदधात्कलाभिः । भूत्वाथ वामन इमामहरद्बलेः क्ष्मां । याञ्चाछलेन समदाददितेः सुतेभ्यः ॥ २० ॥ समुद्रमंथनाच्या शेवटीं । क्षीरसागराचे तटीं । सुरां असुरां कळी मोठी । अमृतासाठीं मांडली ॥ ३२ ॥ तेव्हां अमृत विटे जें देखोनि । तो अवतारु घेतला मोहिनी । तेणें असुरां सुरापानी । अमृतदानी देवांसी ॥ ३३ ॥ तेथ चोरूनि घेतां अमृतग्रासा । निवटिला राहूचा घसा । त्याच्या कबंधावरी म्हाळसा । वास नेवासा स्वयें केला ॥ ३४ ॥ सुरसाह्य नारायणु । द्वारके कुश निर्दाळूनु । का लवणासुरमर्दूनु । अवतरे आपणु ’कुमार’ रूपें ॥ ३५ ॥ ऐसा मन्वंतरामन्वंतरीं । निजभक्तकाजकैवारी । सुरकार्यार्थ श्रीहरि । नाना अवतारीं अवतरे स्वयें ॥ ३६ ॥ तो सुरसाह्य जगज्जीवन । स्वयें कुब्ज झाला ’वामन’ । अंगें याचक होऊन । देवांचा अपमान उतरला जेणें ॥ ३७ ॥ दानें दाटुगा बळी । त्यासी देवांचेनि नव्हे कळी । मग त्रिविक्रमरूपें आकळी । याञ्चाछळें बळी छळिला जेणें ॥ ३८ ॥ तरी भावबळें बळी प्रबळु । तेणें देवो केला द्वारपाळु । विष्णु सत्व पाहे छळछळूं । शेखीं दासांचा दयाळु दास्य करी स्वयें ॥ ३९ ॥ यापरी बळीचा छळ । करूनि घेतलें दिङ्मंडळ । तेणें अमरगण सकळ । अर्पूनि तत्काळ सुखी केले ॥ २४० ॥ निःक्षत्रियामकृत गां च त्रिःसप्तकृत्वो । रामस्तु हैहयकुलाप्ययभार्गवाग्निः । सोऽब्धिं बबन्ध दशवक्त्रमहन्सलङ्कं । सीतापतिर्जयति लोकमलघ्नकीर्तिः ॥ २१ ॥ तो देवाधिदेवोत्तमु । स्वयें झाला ’परशुरामु’ । तेणें क्षत्रियांचा पराक्रमु । केला निर्धर्मु निजप्रतापें ॥ ४१ ॥ तो गोब्राम्हणकैवारी । सहस्त्रार्जुनातें संहारी । सहस्त्र भुजांची कांडोरीं करी । केली बोहरी दानवकुळा ॥ ४२ ॥ जमदग्नीचा कोपाग्नि । परशुरामतेजें प्रज्वळूनि । हैहयकुळ जाळुनि । आहाळिली अवनी क्षत्रियांची ॥ ४३ ॥ तेणें तीन सप्तकें वीररसु । देऊनि क्षत्रियमद बहुवसु । त्या रोगाचा केला नाशु । धरेचे ईशु धरामर केले ॥ ४४ ॥ जो अवतारांचें मूळ पीठ । जो वीरवृत्ति अतिउद्भट । तो अवतारांमाजीं श्रेष्ठ । अतिवरिष्ठ ’श्रीराम’ ॥ ४५ ॥ पापें पळती रामनामें । नामांकित वंदिजे यमें । गणिकेचीं कर्माकर्में । श्रीरामनामें निर्दळिलीं ॥ ४६ ॥ नामें कळिकाळासी धाक । यमदूतां न मिळे भीक । रामनामगजरें देख । पळे निःशेख जन्ममरण ॥ ४७ ॥ जो देवांचे बंद सोडी । नवग्रहांची बेडी तोडी । जेणें रामराज्याची रोकडी । उभविली गुढी तिन्ही लोकीं ॥ ४८ ॥ ज्याचेनि शिळा तरती सागरीं । असुर मारिले वानरीं । जेणें सुवर्णाची नगरी । वोपिली पुरी शरणागतासी ॥ ४९ ॥ जो प्रतापाचा मरिगळा । जेणें सेतु बांधिला अवलीळा । चरणीं उध्दरिली शिळा । जो निजजिव्हाळा निजभक्तां ॥ २५० ॥ तो अवतार मूर्तिमंत । राया अद्यापि असे वर्तत । हा संवाद त्रेतायुगांत । द्रुमिल सांगत विदेहासी ॥ ५१ ॥ यालागीं श्रीराम राम । नित्य जपे जो हें नाम । तो पुरुषांमाजीं पुरुषोत्तम । कर्माकर्म-अतीत तो ॥ ५२ ॥ तें रामनाम अवचटें । भीतरीं रिघे कर्णपुटें । तैं कळिमळांचीं मळकटें । नामोद्धाटें नासती ॥ ५३ ॥ ऐशी रामनामाची ख्याती । जगदुद्धारें केली कीर्ती । धन्य धन्य जे परिसती । धन्य जे गाती रामचरित ॥ ५४ ॥ भूमेर्भरावतरणाय यदुष्वजन्मा । जातः करिष्यति सुरैरपि दुष्कराणि । वादैर्विमोहयति यज्ञकृतोऽतदर्हान् । शूद्रान् कलौ क्षितिभुजो न्यहनिष्यदन्ते ॥ २२ ॥ आतां भावी अवतारवार्ता । तुज मी सांगेन नृपनाथा । श्रीकृष्णावतारकथा । परमाद्भुता विचित्र ॥ ५५ ॥ जो परेहून परात्परु । जो कां अजन्मा अक्षरु । जो श्रुतिशास्त्रां अगोचरु । तो पूर्णावतारु ’श्रीकृष्ण’ ॥ ५६ ॥ जेथें नाममात्र रिघों न लाहे । जेथें रूपाची न लभे सोये । ज्या ब्रह्मत्व अंगीं न साहे । तो अवतार पाहें श्रीकृष्ण ॥ ५७ ॥ जो वर्णाश्रमांसी नातळे । ज्यासी ईश्वरत्वही वोंविळें । जो अज अव्यय स्वानंदमेळें । तो अवतारु स्वलीलें श्रीकृष्णनाथु ॥ ५८ ॥ ऐसा गुणधर्मकर्मातीतु । तो अवतारु श्रीकृष्णनाथु । प्रगटला यदुवंशाआंतु । स्वयें जगन्नाथु स्वइच्छें ॥ ५९ ॥ जैसें खळाळ कल्लोळ चंचळ । भासे परी तें केवळ जळ । काळी भरडी पांढरी चोळ । परी ते केवळ वसुधाचि ॥ २६० ॥ जे गोडी नाबदरासीं । तेचि वेगळी रवेयासी । तैसा अवतार यदुवंशीं । पूर्णांशेंसीं श्रीकृष्ण ॥ ६१ ॥ जैसा दीपु लावितां तत्क्षणीं । सवेंचि प्रगटे तेजाची खाणी । तैसा उपजतांचि बाळपणीं । अभिनव करणी स्वयें केली ॥ ६२ ॥ जें ब्रह्मादिक देवां नव्हे । तें बाळलीलास्वभावें । करूनि दाविलें आघवें । देवाधिदेवें श्रीकृष्णें ॥ ६३ ॥ वणवा गिळिला मुखें । पर्वत उचलिला नखें । पूतनेचें स्तन विखें । प्याला निजमुखें जीवासगट ॥ ६४ ॥ जेणें वत्सहरणमिसें । स्त्रष्ट्यासही लाविलें पिसें । जो वत्सवत्सपवेशें । झाला सावकाशें एकाकी एक ॥ ६५ ॥ अघ चिरिला जाभाडा । काळियाच्या कुटिल्या फडा । यमलोकीं घेऊनि झाडा । आणिला रोकडा गुरुपुत्र जेणें ॥ ६६ ॥ जे प्रजा पीडूनि कर घेती । जयां नावडे धर्मनाती । ऐसे राजे भारभूत क्षितीं । नेणों किती निर्दाळिले ॥ ६७ ॥ एकां सैन्यें एकां स्वांगें । एकां वधवी आन प्रयोगें । एकां गोत्रकलहप्रसंगें । अग्रपूजायोगें एकांसी ॥ ६८ ॥ अधर्मा लावील सीक । धर्माचें वाढवील बिक । हें अवतारकौतुक । राया तूं आवश्यक देखशील पुढां ॥ ६९ ॥ जैं जैं लोटेल अहोरात्र । तैं तैं करील नवें चरित्र । तया कृष्णसुखासी पात्र । भक्त पवित्र होतील ॥ २७० ॥ साधूंसी स्वानंदसोहळा । नित्य नवा होईल आगळा । ते श्रीकृष्णाची लीला । देखसी डोळां नृपनाथा ॥ ७१ ॥ तोचि बौद्धरूपें जाण । पुढां धरील दृढ मौन । तेव्हां कर्माकर्मविवंचन । सर्वथा जाण कळेना ॥ ७२ ॥ तो तटस्थपणें सदा । प्रवर्तवील महावादा । तेणें वादमिसें सदा । वाढवील मदा महामोहातें ॥ ७३ ॥ मोह उपजवील दुर्घट । एक कर्मी करील कर्मठ । एक होतील कर्मभ्रष्ट । न कळे चोखट निजात्महित ॥ ७४ ॥ कैसें माजवील मत । वेद मिथ्या मानित । वेदविहिता नातळत । तो जाण निश्चित महामोहो ॥ ७५ ॥ मोहें केला सर्वांसी छळ । एकां ज्ञानाभिमान प्रबळ । ते कर्म निंदिती सकळ । त्यागिती केवळ जाड्य म्हणौनी ॥ ७६ ॥ ऐशिये वर्ततां मोहस्थिती । पुर्ण कळीची होय प्रवॄत्ती । तेव्हां नीच ते राजे होती । प्रजा नागविती चोरप्राय ॥ ७७ ॥ शूद्राहूनि अतिकनिष्ठ । राजे होती परम श्रेष्ठ । वर्णावर्ण करिती भ्रष्ट । अतिपापिष्ठ अधर्मी ॥ ७८ ॥ अपराधेंवीण वितंड । भलेत्यांसी करिती दंड । मार्गस्थांचा करिती कोंड । करिती उदंड सर्वापहरण ॥ ७९ ॥ अबळांचे निजबळ राजा । तो राजाचि स्वयें नागवी प्रजा । ऐसा अधर्म उपजे क्षितिभुजां । तें गरुडध्वजा न साहवे ॥ २८० ॥ जेव्हां स्वधर्माचें जिणें । अधर्में निलाग गांजणें । यालागीं श्रीनारायणें । अवतार धरणें ’कल्की’ नामा ॥ ८१ ॥ तो शस्त्रधारा प्रबळ । नष्ट राजे निर्दाळील सकळ । महामोहाचें मूळ । स्वयें समूळ उच्छेदील ॥ ८२ ॥ तेव्हां धर्माची पाहांट फुटे । सत्यासी सत्व चौपटे । तेव्हां वेदोक्त विधान प्रगटे । स्वधर्मराहाटें राहटती सर्व ॥ ८३ ॥ एवंविधानि जन्मानि कर्माणि च जगत्पतेः । भूरीणि भूरियशसो वर्णितानि महाभुज ॥ २३ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥ जयाचीं गा अनंत नामें । अनंत अवतार अनंत जन्में । अनंत चरित्रें अनंत कर्में । अनंतोत्तमें हरिकीर्ती ॥ ८४ ॥ अगाध भगवंताचा महिमा । त्याच्या पार नाहीं जन्मकर्मा । त्याचा अनुष्टुप् हा महिमा । तुज म्यां नरोत्तमा निरूपिला येथें ॥ ८५ ॥ ऐशीं अवतारचरित्रनामें । परिसतां विचित्र कर्में । राजा अत्यंत सप्रेमें । मनोधर्में निवला ॥ ८६ ॥ जे जे अवतारीं देवो सगुण । जाहला परी निर्गुणाचे गुण । प्रकट करीतचि आपण । कर्माचरण स्वयें दावी ॥ ८७ ॥ धन्य धन्य ते हरिगण । जे वर्णिती भगवद्गुण । ज्यांचेनि वचनें संपूर्ण । निवे अंतःकरण श्रोत्यांचें ॥ ८८ ॥ श्रोत्यांचें अवधान निवे । तेथ वक्ता स्वानंदसुख पावे । ग्रंथ वोसंडे स्वभावें । साहित्यगौरवें रसाळ ॥ ८९ ॥ जेवी चंद्रकरें साचा । मुखबंध सुटे चकोरांचा । तेवीं एका जनार्दनाचा । संतकृपा वाचा फुटली त्यासी ॥ २९० ॥ जेवीं सूर्यकिरणस्पर्शें । कमळकळी स्वयें विकासे । तेवीं संतकृपासौरसें । ग्रंथु विकासे अर्थावबोधें ॥ ९१ ॥ तेचि कृपेनें तत्वतां । अर्थिलें श्रीभगवता । आतां पंचमाध्यायीं कथा । सावध श्रोतां अवधारिजे ॥ ९२ ॥ राजा प्रश्न करील गोड । जो परिसतां पुरेल कोड । साधकांची उपशमेल चाड । होय निवाड धर्माधर्माचा ॥ ९३ ॥ जेथ भजना भजनहातवटी । प्रश्नोत्तरें कथा गोमटी । अतिशयें रसाळ गोठी । जेणें सुटे गांठी अधर्माची ॥ ९४ ॥ तें उत्तमोत्तम निरूपण । भरीत संतांचे श्रवण । जनार्दनकृपा पूर्ण । एका जनार्दन सांगेल ॥ ९५ ॥ अंगी वारियाचेन संचरणें । घुमारा घुमों लागे तेणें । तेवीं एकाजनार्दनें । कविता करणें निजांगें ॥ २९६ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे निमिजायंतसंवादे एकाकारटीकायां चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक २३ ॥ ओव्या २९६ ॥
You can donate to the bank account given below
Scan to donate
Merchant Name : Sant Eknath Mission
UPI ID : santeknathmission@sbi
Contact Info :
Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission,
C/O Shri Venimadhav Gosavi,
ShriNath Galli, Shrikshetra Paithan, Dist. Chhatrapati
Sambhajinagar
Pin. 431006
Mobile No : +91 - 9421411135
Email : info@santeknath.org