Marathi / English

अध्याय ५

॥ श्री एकनाथी भागवत ॥

अध्याय पांचवा

श्रीगणेशाय नमः । श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्गुरु देवा उदारा । म्हणतां कृपण तूं खरा । मागतें आपुलिया घरा । दुजेपणें दारा येवों नेदिसी ॥ १ ॥ अवचटें मागतयासी । जैं भेटी होय तुजसी । तैं घोट भरूं धांवसी । देखतांचि घेसी जीवें त्यातें ॥ २ ॥ जे जे मागों येती तुजपासीं । ते बांधोन ऐक्यतेमाजीं सूदसी । शेखीं त्यांचे सोडवणेसी । भेटी दुसर्‍यासी स्वप्नींही नव्हे ॥ ३ ॥ अणुमात्र तुझी प्राप्ती । अवचटें चढे ज्याचे हातीं । त्याचिये संसारसंपत्ती । सर्वस्वें निश्चितीं नाडिसी तूं ॥ ४ ॥ मैंदाचा विडा घेतां । तो प्रवर्ते आपुले घाता । तेवीं तुझी प्रसन्नता । झालिया जीविता स्वयें नाशी ॥ ५ ॥ जे जे तुजपें मागों आले । ते ते सर्वस्वें नागवले । शेखीं नागवे तुवां केले । निर्लज्ज झाले तिहीं लोकीं ॥ ६ ॥ ऐशी तुझी निर्वाणगती । त्या तुझी उदार कीर्ती । घडे म्हणशी कैशा रीतीं । ते अगाध स्थिति अवधारीं ॥ ७ ॥ मागें उदार वाखणिले । तेही आपणियांऐसे केले । मग सर्वस्व आपुलें । दान दिधलें दातृत्वें ॥ ८ ॥ षड्गुणैश्र्वर्यवैभवेंसीं । आपणियातें दाना देसी । दिधलें तें घेवों नेणसी । कदाकाळेंसीं कल्पांतीं ॥ ९ ॥ आपणियां दिधलें दान । यालागीं तूं दासां अधीन । मग त्यांचेनि छंदें जाण । सर्वस्वें आपण नाचसी ॥ १० ॥ बळीनें सर्वस्व केलें दान । शेखीं तूं झालासि त्या‌अधीन । त्याचें व्दारपाळपण । अद्यापि आपण चालविसी ॥ ११ ॥ धर्में अर्पिलें अग्रपूजेसी । शेखीं तूं त्याची सेवा करिसी । नाना संकटें स्वयें सोशिसी । अंगें काढिसी उच्छिष्टें ॥ १२ ॥ तुझा निजभक्तु अंब‌ऋषी । त्याचे गर्भवास तूं सोशिसी । तुज गौळिये राखिती हृषीकेशी । शेखीं त्या गोपाळांसी रक्षिलें ॥ १३ ॥ एवं स्वस्वरूप द्यावयासी । उदारत्व तुजपासीं । हें न ये गा आणिकांसी । हृषीकेशी कृपाळुवा ॥ १४ ॥ तो तूं परम उदार ऐसा । राया रंका समभावें सरिसा । भावो तेथ भरंवसा । तूं आपैसा आतुडसी ॥ १५ ॥ त्या तुझिया प्राप्तीलागीं । कपाटें सदा सेविती योगी । एक ते झाले भोगविरागी । एक ते त्यागी सर्वस्वें ॥ १६ ॥ एक हिंडती दशदिशे । एक तुजलागीं झाले पिसे । परी तुझी भेटी स्वप्नींही दिसे । ऐसा न दिसे क्षण एक ॥ १७ ॥ ऐशियाही तुझी प्राप्ती । सुलभ असे एके रीतीं । जरी संतचरणीं रंगती । अतिप्रीतीं सप्रेम ॥ १८ ॥ संतचरणीं जो विनटला । तो निजप्राप्तीसी पावला । संतस्वरूपें अवतरला । स्वयें संचला परमात्मा ॥ १९ ॥ यालागीं जीं जीं संतांची रूपें । तीं तीं श्रीहरीचीं स्वरूपें । म्हणौनि संतांचिये कृपे । अतिसाक्षेपें अर्जावें ॥ २० ॥ ते ज्ञानार्थाचे परम पिसे । यालागीं ग्रंथाचेनि मिसें । त्यांचे चरण अनायासें । सावकाशें वंदीन ॥ २१ ॥ संतकरुणावलोकन । तें मज नेत्रींचें अंजन । चरणकृपा पाहतां जाण । श्रीजनार्दन प्रकाशे ॥ २२ ॥ तया जनार्दनाचिये सेवे । गुरुत्वाचेनि आडनांवें । रिघलों निजस्वभावें । जीवेंभावें भजनासी ॥ २३ ॥ भज्य-भजक-भजना । एके अंगी त्रिविध भावना । दावूनियां जगज्जीवना । जनीं जनार्दना निजभक्ती ॥ २४ ॥ हे अभेदभक्ती चोखडी । परम ऐक्यें भजनगोडी । अधिकाधिक चढोवढी । वाढे आवडी निजभक्तां ॥ २५ ॥ देवो आपली सर्वस्वजोडी । वेंची भक्तांचिये वोढी । ऐशी अभेदभक्तीची गोडी । पढिये गाढी गोविंदा ॥ २६ ॥ यालागीं भक्तांचा शरीरभार । स्वयें वागवी श्रीधर । आपुलेनि अंगें परपार । पाववी साचार निजभक्तां ॥ २७ ॥ ’निजभक्तांचा’ देहभावो । निजांगें वागवी देवाधिदेवो । तरी अभक्तांचा देहो । वागवावया पहा हो काय आन आहे ’ ॥ २८ ॥ भक्तां नाहीं देह‍अहंता । यालागीं देवो वागविता । पूर्ण देहाभिमान अभक्तां । त्यांसी अतिबध्दता या हेतू ॥ २९ ॥ यालागीं जो निरभिमान । तोचि भगवभ्दक्त संपूर्ण । ज्याच्या अंगीं देहाभिमान । त्यासी भक्तपण कदा न घडे ॥ ३० ॥ निजभक्त तारितां कौतुकें । त्याची रोमावळी केवीं दुखे । निर्भय करोनि पूर्ण हरिखें । देवो निजमुखें निजभक्तां तारी ॥ ३१ ॥ यालागीं निरभिमानता । जे विनटले भक्तिपंथा । ते पावो देवोनि विघ्नांचे माथां । पावती तत्वतां भगवत्पद ॥ ३२ ॥ भक्तांची ऐशी स्थिती । तरी अभक्तां कवण गती । तेचिं पुसावया नृपती । प्रश्र्नार्थी प्रवर्ते ॥ ३३ ॥ पंचमामाजीं निरूपण । अभक्तांची गति लक्षण । युगीं युगीं पूजाविधान । सांगेल पावन हरीचें ॥ ३४ ॥ अवतारचरितपुरुषार्थु । सांगोन संपला चतुर्थु । आतां अभक्तांचा वृत्तांतु । राजा पुसतु मुनीसी ॥ ३५ ॥ श्रीराजोवाच । भगवन्तं हरिं प्रायो न भजन्त्यात्मवित्तमाः । तेषामशान्तकामानां क निष्ठाविजितात्मनाम्‌ ॥ १ ॥ राजा म्हणे जी मुनिवरा । जो भगवभ्दजनीं पाठिमोरा । ऐशिया अभक्ता नरा । कोण दातारा गति त्यासी ॥ ३६ ॥ जे कामालागीं अति‌उभ्दट । जे सक्रोध क्रोधें तेजिष्ठ । ते अतिलोभें लोभिष्ठ । जे परम श्रेष्ठ प्रपंची ॥ ३७ ॥ जे गर्वाचे अग्रगणी । जे अहंकाराचे चूडामणी । जे विकारांची प्रवाहश्रेणी । जे उघडली खाणी विकल्पांची ॥ ३८ ॥ ज्यांचे सद्‍बुध्दि‌आड आभाळ । महामोहाचें सदा सबळ । जे छळणार्थी अतिकुशळ । जे अतिप्रबळ प्रलोभें ॥ ३९ ॥ दिवसा न देखती निश्र्चितें । ते अंधारीं देखणीं दिवाभीतें । तेवीं नेणोनि परमार्थतें । जे अतिज्ञाते प्रपंचीं ॥ ४० ॥ जे नेणती आत्महित । ज्ञान विकूनि काम पोसित । ऐसे जे कां अभक्त । त्यांची गति निश्र्चित सांग मज ॥ ४१ ॥ तुम्हांऐसे सद्‍बुध्दी । चालते बोधाचे उदधी । भाग्यें लाधलों ज्ञाननिधी । हा प्रश्र्न त्रिशुध्दी सांगवा ॥ ४२ ॥ राजा साक्षेपें बहुवस । पुसे अभक्तगतिविन्यास । तो सांगावया ’चमस’ । सावकाश सरसावला ॥ ४३ ॥ श्रीचमस उवाच । मुखबाहूरुपादेभ्यः पुरुषस्याश्रमैः सह । चत्वारो जज्ञिरे वर्णा गुणैर्विप्रादयः पृथक्‌ ॥ २ ॥ जो कां जगाचा जनकु । मुख्य गुरुत्वें तोचि एकु । त्यासी न भजे जो अविवेकु । तो नाडला लोकु सर्वस्वें ॥ ४४ ॥ पुरुषापासूनि जन्मले जाण । चार्‍ही आश्रम चार्‍ही वर्ण । त्यांचे उत्पत्तीचें स्थान । ऐक संपूर्ण नृपनाथा ॥ ४५ ॥ मुखीं वेदविद ब्राह्मण । बाहूं जन्मले राजन्य । उरूं जन्मले वैश्यवर्ण । चरणीं जन्मस्थान शूद्रवर्णा ॥ ४६ ॥ मूळीं अवघे तीन गुण । गुणयोगें वर्ण जाण । त्रिगुणीं चारी वर्ण । जन्मलक्षण घडे कैसें ॥ ४७ ॥ सत्वगुणें शुध्दे ब्राह्मण । सत्वरजमिश्रें राजे जाण । रजतमें वैश्यवर्ण । केवळ तमोगुण शूद्रवर्ण ॥ ४८ ॥ क्षत्रिय वैश्य आणि ब्राह्मण । व्दिजन्मे हे तिन्ही वर्ण । त्यांसी गायत्री वेदाध्ययन । शूद्र ते जाण संस्काररहित ॥ ४९ ॥ ब्रह्मचर्य आणि गार्हस्थ्य । तिहीं वर्णां अवश्य प्राप्त । चहूं आश्रमां आश्रयभूत । जाण निश्र्चित ब्राह्मण ॥ ५० ॥ गार्हस्थ्य पुरुषाच्या चरणीं । ब्रह्मचर्य हृद्‍यस्थानीं । वक्षःस्थळीं वसती वनी । शिरोमणि संन्यास ॥ ५१ ॥ य एषां पुरुषं साक्षाद्‌ आत्मप्रभवमीश्वरम्‌ । न भजन्त्यवजानन्ति स्थानाद्‍भ्रष्टाः पतन्त्यधः ॥ ३ ॥ हे ब्राह्मणादि वर्ण पहा हो । ज्यापासोनि जन्मप्रभवो । तो न भजतां देवोधिदेवो । उत्तमदेहो अधःपाती ॥ ५२ ॥ पूर्वोत्तरमीमांसा दोनी । नानाशास्त्रार्थकडसणी । स्वरूप बोलती निर्वचूनी । एवं शब्दज्ञानीं अतिचतुर ॥ ५३ ॥ यापरी जे पंडीत । ज्ञानभिमानें अति‌उन्मत्त । तेणें अभिमानेंचि येथ । भजनीं निश्र्चित विमुख केले ॥ ५४ ॥ एक अज्ञानी सर्वथा । स्वप्नीं नेणती परमार्था । ते नेणपणेंचि तत्वतां । श्रीजगन्नाथा न भजती ॥ ५५ ॥ शेळी उंसाची चवी गाढी । नेणोनि पाचोळा करांडी । तेवीं नणोनि हरिभक्तीची गोडी । अज्ञानें बापुडीं विषयलुब्ध ॥ ५६ ॥ आलोडूनि वेदशास्त्रार्थ । ज्ञातपणें जे पंडित । गर्वें हेळसिती भक्तिपंथ । अति‌उन्मत्त ज्ञातृत्वें ॥ ५७ ॥ जेवीं ज्वरिताचें मुख । दूध मानी कडू विख । तेवीं ज्ञानगर्वें पंडित देख । ठेले विमुख हरिभजनीं ॥ ५८ ॥ यापरी ज्ञानाभिमानी । विमुख झाले हरिभजनीं । ते जरी वर्णामाजीं अग्रगणी । तरी अधःपतनीं पडतील ॥ ५९ ॥ हो कां वर्णांमाजीं अग्रगणी । जो विमुख हरिचरणीं । त्याहूनि श्र्वपच श्रेष्ठ मानीं । जो भगवभ्दजनीं प्रेमळु ॥ ६० ॥ आम्ही मुक्त हें मानुनी । जे विमुख भगवभ्दजनीं । ते पचिजती अधःपतनीं । तिर्यग्योनीं जन्ममरणें ॥ ६१ ॥ मनुष्यदेहीं जे भजननष्ट । ते होती गा स्थानभ्रष्ट । अधःपातें भोगिती कष्ट । अति‌उभ्दट यातना ॥ ६२ ॥ ज्ञानाभिमानें जे न भजती । ते प्रौढपतनीं पचिजती । अज्ञानांही तेचि गती । सर्वथा नृपती म्हणों नये ॥ ६३ ॥ दूरे हरिकथाः केचिद्‌ दूरे चाच्युतकीर्तनाः । स्त्रियः शूद्रादयश्चैव तेऽनुकम्प्या भवादृशाम्‌ ॥ ४ ॥ एका पित्याचे दोघे अर्भक । एक प्रबुध्द एक बाळक । पित्यासी अवमानितां देख । तादी जनक प्रबुध्दासी ॥ ६४ ॥ बाळक पित्याचे माथां चढे । जरी लाता हाणे तयाकडे । तरी त्यासी दोषु न घडे । दोषांचें सांकडें सज्ञानासी ॥ ६५ ॥ ज्ञात्यांपासोनि भजन ठाके । ते कवळिजती महादोखें । अज्ञानें तरती भाविकें । साधुकृपामुखें अनुगृहीतां ॥ ६६ ॥ अज्ञाना नाहीं विशेष बाधु । तो साधुविश्र्वासें होय शुध्दु । ज्ञानाभिमानियां भाव विरुध्दु । यालागीं सुबुध्दु दोष बाधी ॥ ६७ ॥ अज्ञानी विश्र्वासें साधु वंदी । ज्ञानाभिमानीं दोहोंतें निंदी । यालागीं त्यातें त्रिशुध्दी । अवश्य बाधी अतिदोष ॥ ६८ ॥ साधुविश्र्वासें अज्ञान फिटे । ज्ञानाभिमानियां विकल्प मोठे । त्यांसी विश्र्वास कदा न घटे । अभिमानहटें अधःपात ॥ ६९ ॥ एवं विचारितां नेटेंपाटें । अहंतेचें बंधन मोठें । अभिमान‍ऐसें नाहीं खोटें । दुजें वोखटें त्रिलोकीं ॥ ७० ॥ अभिमानु ईश्र्वरा बाधी । तोहो शबळ कीजे सोपाधी । अभिमानें देहबुध्दी । बाधक त्रिशुध्दी सुरनरांसी ॥ ७१ ॥ यालागीं जे अज्ञान जन । ज्यांसी नाहीं ज्ञानाभिमान । तेही विश्र्वासल्या संपूर्ण । साधु सज्जन अनुग्रहो करिती ॥ ७२ ॥ ज्यासी म्हणती नीच वर्ण । स्त्रीशूद्रादि हीन जन । ज्यासी कां दूरी शास्त्रश्रवण । ज्यासी दूरी श्रवण वेदोक्त ॥ ७३ ॥ त्यांसी जाहलिया सभ्दाव संपूर्ण । ते होतु कां हीन जन । परी संतकृपेसी आयतन । विश्र्वासें पूर्ण अधिकार झाला ॥ ७४ ॥ ऐसे पूर्ण भावार्थी । त्यांसी तुम्हांऐशा साधुसंतीं । अनुग्रहोनि तारिती । कृपामूर्ती कृपाळु ॥ ७५ ॥ अज्ञानी यापरी तरती । परी ज्ञानभिमान ज्यांच्या मतीं । ते ब्रह्मादिकां न तरती । त्यांचीही स्थिति मुनि सांगे ॥ ७६ ॥ विप्रो राजन्यवैश्यौ वा हरेः प्राप्ताः पदान्तिकम्‌ । श्रौतेन जन्मनाथापि मुह्यन्त्याम्नायवादिनः ॥ ५ ॥ अज्ञान जे नीच वर्ण । भावें धरोनि संतचरण । निजविश्र्वासें संपूर्ण । जन्ममरण निरसिती ॥ ७७ ॥ येर द्विजन्मे जे कां तिन्ही । स्वभावें प्राप्त हरिचरणीं । आम्ही अधिकारी वेदाज्ञानी । जन्मभिमानी अतिगर्वी ॥ ७८ ॥ जन्माभिमान कर्माभिमान । अग्रपूज्यत्वें पूज्याभिमान । अल्पमात्र वेदींचें ज्ञान । तो वेदाभिमान वाढविती ॥ ७९ ॥ ज्यासी प्राप्त उपनयन । ज्यासी प्राप्त गायत्री पूर्ण । ज्यासी हरीचें आवडे भजन । त्याचे धरितां चरण हरि भेटे ॥ ८० ॥ ऐसे उत्तम जे ब्राह्मण । त्यांसी वेदावादें ज्ञानाभिमान्‌ । तेणें गर्वें पडे मोहन । तेंचि निरूपण विशद सांगे ॥ ८१ ॥ कर्मण्यकोविदाः स्तब्धा मूर्खाः पण्डितमानिनः । वदन्ति चाटुकान्‌ मूढा यया माध्व्या गिरोत्सुकाः ॥ ६ ॥ न कळे विधिविधानमंत्र । कोणे कर्मीं कैसें तंत्र । नेणोनियां गर्व थोर । ताठा अपार ज्ञातृत्वाचा ॥ ८२ ॥ गारोडियासी विद्या थोडी । परी सर्वांगीं बिरुदें गाढीं । कां जाणी जाणपणें जोडी । कडोविकडीं आसनपूजा ॥ ८३ ॥ दे‌ऊनि पतंगाचे ढाळ । स्फटिका‌अंगीं माणिक कीळ । तैसे मूर्खही केवळ । मिरविती प्रबळ ज्ञानाभिमानें ॥ ८४ ॥ आपण विधान नेणती । शेखीं सज्ञानाही न पुसती । कर्म आपमतीं करिती । लौकिकीं स्फिती वाढवावया ॥ ८५ ॥ मिथ्या मधुर शब्दें चाटुक । जे भोगीं अणुमात्र नाहीं सुख । तरी इहमुत्र भजविती लोक । अप्सरादिक भोगलिप्सा ॥ ८६ ॥ येथ भोग भोगावे चोखडे । आणि पुढें स्वर्गभोग जोडे । येणें वचनें बापुडे । यागाकडे धांवती ॥ ८७ ॥ कर्ता सर्वस्वें नागवो । परि आचार्यत्व आम्हां येवो । ऐशी यांची बुध्दि पहा हो । यागप्ररोहो आरंभिती ॥ ८८ ॥ पावावया अतिप्रतिष्ठा । नाना कर्मांच्या कर्मचेष्टा । करूनि दाविती खटपटा । कर्मारंभु मोठा आरंभुनी ॥ ८९ ॥ ना तरी जैसा मद्यपानी । मद्यरसा अमृत मानी । या वचनगोडिया मद्यपानीं । प्रवर्तिजे जनीं स्वादलिप्सा ॥ ९० ॥ तें सेविलिया काय जोडे । थिती सावधानता बुडे । मग दुर्भगत्व रोकडें । पिशाचत्व गाढें अंगीं वाजे ॥ ९१ ॥ तैसें केवळ पतनात्मक । त्या नांव म्हणती स्वर्गसुख । जाणोनि प्रवर्तती ते मूर्ख । फळकामुक अभिलाषी ॥ ९२ ॥ उंडणी लंघू न शके भिंतीसी । तरी चढों रिघते सायसीं । चढतां पडे आपैसी । तेवीं स्वर्गसुखासी दृढ पतन ॥ ९३ ॥ कर्माभिनिवेशपडिपाडें । कामलोभ दृढ वाढे । तेणें दांभिक करणें घडे । क्रोधाचें चढे महाभरितें ॥ ९४ ॥ रजसा घोरसङ्कल्पाः कामुका अहिमन्यवः । दाम्भिका मानिनः पापा विहसन्त्यच्युतप्रियान्‌ ॥ ७ ॥ ते काय करितील बापुडे । शुध्द सत्वें सांडिलें फुडें । मग रजोगुणें कामाकडे । झाले धडफुडे अतिकामी ॥ ९५ ॥ तेव्हां उर्वशीच्या अति‌आवडी । स्वर्गभोगाची अतिगोडी । यालागीं यागपरवडी । पुण्याची जोडी जोडूं धांवे ॥ ९६ ॥ तेथ मंत्रतंत्रद्रव्यशुध्दी । नाहीं यागयजनविधी । तेणें स्वर्ग नव्हेचि त्रिशुध्दी । ठकले दुर्बुध्दी अविहिताचारें ॥ ९७ ॥ तया अलब्ध कामासाठीं । सर्वांर्गीं क्रोधु उठी । जेवीं परिपाकापाठीं । धरी कडुवटी आंबिलकांजी ॥ ९८ ॥ जंव जंव पिकिजे कोरिफडें । तंव तंव कडूपण गाढें । तैसा कामनाशापुढें । क्रोध वाढे अत्युग्र ॥ ९९ ॥ क्रोध काळिया-नाग खरा । देतु व्देषाचा फुंफारा । घाली पूज्यतेच्या आकारा । धुधुःकारा साधुनिंदेचा ॥ १०० ॥ ऐसा क्रोधाचा वसौटा । होय तमाचा चोहटा । मग दंभाचे नाणवठां । हीनकसाचा खोटा विकरा मांडी ॥ १ ॥ मग जो जो भेटे भेटे प्राणिया । त्यासी अभिचारयोगक्रिया । लावूनि बाहेर मुद्रिया । पापाचारें पापिया प्रवृत्ति मांडी ॥ २ ॥ स्वधर्माचा फोडोवाडें । प्रतिपदीं पाडा पढे । अधर्माची खाणी उघडे । समूळ कुडें कर्माचरण ॥ ३ ॥ तेणें पापाचार पिके । गगनचुंबित जाहलीं टेंकें । मग अधमोत्तम एकें तुकें । घालिती यथासुखें अधर्मघालणी ॥ ४ ॥ तेथ ठाणें दे‌ऊनि अभिमाना । वाढविती ज्ञानाभिमाना । मग निंदिती साधुजना । विपुळाती सज्जना उपहासयुक्त ॥ ५ ॥ जगीं सर्वत्र पाहती दोष । तथापि देखिल्याही निर्दोष । तरी करूनियां उपहास । करिती सावकाश असदारोपणें ॥ ६ ॥ यापरी अभिमानविदां । पापबुध्दीची दृढ बाधा । सहजानुवादें सदा । साधुनिंदा अनुवादती ॥ ७ ॥ जे कां हरीतें आवडती । जे सदा करिती हरिभक्ती । त्यांतें सदा उपहासिती । अनुवादती गुणदोष ॥ ८ ॥ व्दिज स्मरती हरिनाम । त्या नांव म्हणती अधर्म । ऐकोनि हरिकीर्तनसंभ्रम । म्हणती हें परम महापाप ॥ ९ ॥ ऐसा जो हरिनामातें निंदी । हरिकीर्तनीं दुर्बुध्दी । तो खळ जाणावा त्रिशुध्दी । भजनापवादी दुर्जन ॥ ११० ॥ वदन्ति तेऽन्योन्यमुपासितस्त्रियो गृहेषु मैथुन्यपरेषु चाशिषः । यजन्त्यसृष्टान्नविधानदक्षिणं वृत्त्यै परं घ्नन्ति पशूनतद्विदः ॥ ८ ॥ स्त्रीकामें अतिकामुक । मैथुनापरतें नाहीं सुख । येणें भ्रमें काममूर्ख । स्त्रिया आवश्यक उपासिती ॥ ११ ॥ यापरी मंदबुध्दी । कैसे संवादती शब्दीं । मनुष्यजन्में हेचि सिध्दी । नाना भोगविधी भोगाव्या स्त्रिया ॥ १२ ॥ जें स्त्रीभोगीं सद्यसुख । तें त्यागविती ते अतिमूर्ख । वैराग्यमिसें लोक । ठकिले देख महामूढीं ॥ १३ ॥ सांडूनि गृहभोग अंगना । जयां वैराग्यें उभ्दट भावना । ते निजकर्में दंडिले जाणा । नागवूनि वना दवडिले दैवें ॥ १४ ॥ काय गृहश्रमीं देव नसे । मग वना धांवताति पिसे । साचचि देव वनीं वसे । तरी कां मृग ससे न तरती व्याघ्र ॥ १५ ॥ घालोनियां आसनें । देवो भेटता जरी ध्यानें । तरी बकाचीं पाळिंगणें । कां पां तत्क्षणें नुध्दरती ॥ १६ ॥ एकान्त रहिवास विवरीं । तेथचि भेटता श्रीहरी । तरी न तरोनियां उंदिरीं । कां पां घरोघरीं चिंवताती ॥ १७ ॥ देवो सर्वज्ञ चोखडा । तेणें पशुपक्षियां केला जोडा । तोही लोकीं मानूनियां वेडा । त्यागाचा गाढा पाडिला मोळा ॥ १८ ॥ ’आनंदा उपस्थ एकायतन’ । हें देवाचें वेदवचन । तेंही न मानूनि अज्ञान । त्यागाचें संपूर्ण मांडिती बंड ॥ १९ ॥ मैथुनीं परम सुख । देवेंचि रचिलें देख । तेंही त्यागोनियां मूर्ख । वीतरागें लोक संन्यासी होती ॥ १२० ॥ जे जगामाजीं केवळ पिशी । ते स्वयें होती संन्यासी । देवें दंड दे‌ऊनि त्यांसी । लाविलें भिकेसी दारोदारीं ॥ २१ ॥ त्यागोनियां निजस्त्रियेसी । कर्मत्यागें होती संन्यासी । तो स्त्रीशाप बाधी त्यांसी । मागतां भिकेसी पोट न भरे ॥ २२ ॥ हातावरी पावले दंड । खांडमिशा केलें मुंड । हिंडती भगवीं गुंडगुंड । हा स्त्रीशापें वितंड विटंबु केला ॥ २३ ॥ घे‌ऊनियां दोहीं हातीं । उदंड गांडीसी लाविती माती । त्रिकाळ जळीं बुडविजती । ऐसी स्त्रीशापें ख्याती लाविली त्यांसी ॥ २४ ॥ लंगोटी लाविली गांडीसी । झोळीं लाविली हातासी । त्याहीवरी दंड दे‌ऊनि त्यासी । स्त्रीशापें संन्यासी लाविले भिके ॥ २५ ॥ स्त्रीसुखापरतें नाहीं सुख । स्त्रीत्यागापरता नाहीं दोख । हेंचि नेणोनियां मूर्ख । दंडिले अनेक वैराग्य त्यागें ॥ २६ ॥ स्त्रीसंगेंवीण विविध भोग । ते जाणावे अति‌उव्देग । निजभाग्यें जे सभाग्य साग्ड़ । ते स्त्रीयोगें भोग भोगिती नाना ॥ २७ ॥ हेंचि देवाचें प्रसन्न होणें । जे सदा इष्ट भोग भोगणें । ते भोग जेणें त्यागणें । तेंचि क्षोभणें देवाचें ॥ २८ ॥ स्त्रियादि भोग त्यागिले रोकडे । पुढें निजमोक्ष हें वचन कुडें । यापरी भोळे लोक बापुडे । वैराग्यवादें फुडें नाडिले येथ ॥ २९ ॥ ऐसा‌ऐसिया अनुवादा । करिती परस्परें संवादा । म्हणती त्यागाची बुध्दि कदा । आम्हांसी गोविंदा दे‌ऊं नको ॥ १३० ॥ त्याग करोनि भीक मागणें । यापरीस भलें मरणें । मुक्ति देखिली नाहीं कोणें । आपदा भोगणें जग देखे ॥ ३१ ॥ कोणासी तरी मुक्ती । कोठें तरी देखिजेती । तरी ते साच मानूं येती । मिथ्या वदंती वैराग्यत्यागा ॥ ३२ ॥ ऐशी सदा त्यागाची करूनि निंदा । भोग भोगावे म्हणती सदा । ऐस‍ऐशिया आशीर्वादा । देती सदा स्वाध्यायासी ॥ ३३ ॥ स्त्रीसुख परम मानून । स्वयें सदा होती स्त्रैण । मग जागृती सुषुप्ति स्वप्न । स्त्रियेचें ध्यान अहर्निशीं ॥ ३४ ॥ नाहीं सग्दुरूचें भजन । नाहीं वृध्दासी पूजन । नाहीं अतिथींसी अन्न । स्त्री‌आधीन सर्वस्वें ॥ ३५ ॥ स्त्रियेचें दुखवूं नेदी मन । कदा नुल्लंघी स्त्रियेचें वचन । नित्य स्त्रियेचें अनुसंधान । सभ्दावें उपासन स्त्रियेचें सदा ॥ ३६ ॥ नाहीं कुळदेवता कुळवृत्ती । नाहीं पिता-माता-सग्दुरुभक्ति । संपत्ति वोपी स्त्रियेहातीं । आपण सर्वार्थीं ती‌अधीन वर्ते ॥ ३७ ॥ पूर्वश्लोकार्ध - यजन्त्यसृष्टान्नविधानदक्षिणं वृत्त्यै परं घ्नन्ति पशूनतद्विदः ॥ ते स्त्रीभोग भोगावयासी । धनार्जन अर्जावयासी । यागु आरंभी जीविकेसी । केवळ दंभेंसीं उदरार्थ ॥ ३८ ॥ यागें व्हावी सर्वसिध्दि । हेही नाहीं दृढ बुध्दि । रोकडिये जीविकावधि । उपाय त्रिशुध्दी हाचि केला ॥ ३९ ॥ यज्ञदीक्षेची प्रतिष्ठा । तेणें पूज्य हो‌ईन वरिष्ठां । अग्रपूजा माझा वांटा । ऐशिया उत्कंठा आदरी यागु ॥ १४० ॥ ऐशिया नाना विवंचना । आधीं संकल्पूनि मना । मग प्रवर्ते यागयजना । जोडावया धना कृतनिश्र्चयो ॥ ४१ ॥ न पाहे विधिविधाना । नाहीं आदरु मंत्रोच्चारणा । न करी अन्नसंपादना । कोरडे कणां हवन मांडी ॥ ४२ ॥ मी यज्ञ करितों अंगें । ऐसें जगापासीं सांगे । आणि तेणें यागयोगें । चालवी प्रसंगें जीविकायोगु ॥ ४३ ॥ स्वयें नेणती विधिविधाना । आणि न पुसती सज्ञाना । परी पशूंचिया हनना । प्रवर्तती जाणा शठ नष्ट दंभें ॥ ४४ ॥ मग तेथींचा पुरोडाश । सेविती यथासावकाश । आम्ही पवित्र झालों निर्दोष । ऐसाही उल्हास लागती करूं ॥ ४५ ॥ गौणता आवाहनविसर्जना । तेथ कैंची पूजा दक्षिणा । सत्पात्राची अवगणना । करिती हेळणा ज्ञानगर्वें ॥ ४६ ॥ केवळ जीविकेच्या आशा । करूं लागती पशुहिंसा । आम्ही याज्ञिक या आवेशा । पिटिती ठसा तिहीं लोकीं ॥ ४७ ॥ केवळ जीविकेचिया दुराशा । अविधी करिती पशुहिंसा । मज दोष हो‌ईल ऐसा । कंटाळा मानसा कदा नुपजे ॥ ४८ ॥ श्रिया विभूत्याभिजनेन विद्यया त्यागेन रूपेण बलेन कर्मणा । जातस्मयेनान्धधियः सहेश्वरान्सतोऽवमन्यन्ति हरिप्रियान्‌ खलाः ॥ ९ ॥ यापरी वर्ततां स्थिती । त्याहीवरी झालिया संपत्ती । तैं गर्वाचा भद्रजाती । तैशिया उन्नतीं डुलों लागे ॥ ४९ ॥ कां लेंडिये आला लोंढा । वाहवी वाळलिया लेंडा । कां मर्कटाचिया तोंडा । मदिरेचा भांडा सांपडे जैसा ॥ १५० ॥ तैसा मी एकु ज्ञाता फुडा । म्हणौनि नाचे तडातडां । सज्ञान आम्हांपुढां । कवण बापुडा आन आहे ॥ ५१ ॥ ऐशियाहीवरी अदृष्टता । रत्नें मोतिलगा वस्तुजाता । गजवाजिनृयानप्राप्तता । तेणें गर्वें इंद्रमाथां मोचे फेडी ॥ ५२ ॥ यज्ञीं यागस्वाहाकारीं । इंद्र आमुची आशा करी । त्याची आम्हांहूनि थोरी । कैशापरी मानावी ॥ ५३ ॥ मग शिष्य-सुहृत्‌-सज्जनीं । परिवारिल्या सेवकजनीं । मजसमान त्रिभुवनीं । समर्थ कोणी असेना ॥ ५४ ॥ जैशी कां कांटीभोंवतीं हरळी । तैशी शिष्यांची मांदियाळी । ते महिमेच्या गर्वमेळीं । मानी पातांतळीं ध्रुवमंडळ ॥ ५५ ॥ जैसें विंचुवा विष थोडें । परी प्रबळ वेदनेसी चढे । तेवीं विद्या थोडी परी गाढें । गर्वाचें फुडें अतिभरितें ॥ ५६ ॥ तो अज्ञानामाजीं सर्वज्ञता । मिरवी आपुली योग्यता । जेवीं अंधारीं खद्योता । सतेजता झगमगी ॥ ५७ ॥ अल्पज्ञाता विद्येसाठीं । वाचस्पती नाणी दृष्टीं । जेवीं मुंगी पांखासाठीं । गरुडाचे पृष्ठीं पाय देवों पाहे ॥ ५८ ॥ निखळ तांबियाचें नाणें । देवों रिघे दामोक्यायेसणें । तेणें आपुलेनि दातेपणें । मानी ठेंगणें बळीतें ॥ ५९ ॥ कर्ण दातृत्वें मानिजे फुडा । तोही न मांडे आम्हांपुढां । प्रत्यहीं भारसुवर्णहुडा । उपजे तेणें गाढा दाता कर्णु ॥ १६० ॥ आम्ही निजार्जितें वित्तें । दान देवों सत्पात्रातें । मा दातृत्वें कर्णातें । विशेषु येथें तो कायी ॥ ६१ ॥ सदा अपकारुचि जोडे । त्यासीही अल्प उपकारु घडे । इतुकियासठीं न उकल पडे । सर्वस्व रोकडें बुडवी-सदा ॥ ६२ ॥ एवं अल्प दानासाठीं । दातृत्वाचे त्रिकुटीं । मेघाच्यापरी अति‌उभ्दटीं । स्वमुखें उठी गर्जतु ॥ ६३ ॥ बरवेपणाचेनि पांगें । मदनासी विटावों लागे । सौंद्‍र्य माझेनि अंगें । दुजें मजजोगें असेना ॥ ६४ ॥ कीं कावळा बरवेपणासाठीं । राजहंसा नाणी दिठीं । कां आस्वली मानी पोटीं । मीही गोमटी सीतेपरीस ॥ ६५ ॥ तेवीं बरवेपणाचा जाण । थोर चढे देहाभिमान । जेवीं देखोनि हिरवें रान । म्हैसा संपूर्ण उन्मादे ॥ ६६ ॥ यावरी कांहीं एक पराक्रम । केलिया न मानी तीनही राम । जेवीं गोग्रहणीं संग्राम । शौर्यधर्म उत्तराचा ॥ ६७ ॥ कां अंगींचेनि माजें । रानसोरु न मानी दुजें । तैसा बळाचेनि फुंजें । स्वयें गर्जे मुसमुसितु ॥ ६८ ॥ ते आधींच म्हणविती सज्ञान । त्याहीवरी ’याज्ञिक’ हें महिमान । तें याज्ञिक कर्माचरण । दाविती आपण लोकांप्रती ॥ ६९ ॥ आलिया धनिक जनांप्रती । आपुली स्तविती कर्मस्थिती । मग कर्ममुद्रा नानायुक्ती । स्वयें दाविती लौकिका ॥ १७० ॥ ऐशियाही कर्माचारा । ज्ञातृत्वाचा गर्व पुरा । जेवीं दिवाभीतु अंधारा । निघे बाहेरा घुंघातु ॥ ७१ ॥ अजांचें लेंडोरें पेटे । तेथ ज्योतिज्वाळा कदा नुमटे । परी धुरकटलें धुपधुपी मोठें । धुवें थिकटे दिग्मंडळ ॥ ७२ ॥ यापरी नाना दंभोपाधीं । अतिगर्वाच्या उन्मादीं । अंध जाहली सद्‍बुध्दी । तो साधूतें निंदी हरिहरांसहित ॥ ७३ ॥ जेवीं दाटलेनि काविळें । दृष्टीतें करी पिंवळें । मग देखों लागे सकळें । आचूडमूळें पीतवर्ण ॥ ७४ ॥ तेवीं निंदोपाधी अतिगर्वीं । मंद जाहली प्रज्ञाछवी । मग निर्दुष्टीं दोष लावी । शुध्दातें भावी अतिमलिन ॥ ७५ ॥ जो योगियांच्या मुगुटीं । ज्यातें म्हणती धूर्जटी । त्याची पाहतां राहाटी । दिसे शेवटीं अतिमंद ॥ ७६ ॥ रागें उमा घेतली आगी । यालागीं याज्ञिकाचें शिर भंगी । सकामु तरी मोहिनीलागीं । नग्न लागवेगीं पाठीं लागे ॥ ७७ ॥ विष्णु सदाचा कपटी । कांहीं न देखों शुध्द दृष्टीं । वृंदा पतिव्रता गोमटी । तेणें केली शेवटीं व्यभिचारिणी ॥ ७८ ॥ जेथ विष्णु व्यभिचारवासी । ते वृंदेच्या वृंदावनापाशीं । जट्याळ गांठ्याळ मिळती राशी । केवीं साधुत्व त्यांसी मानूं आम्ही ॥ ७९ ॥ साधु मानूं सनत्कुमार । त्यांसीही वैकुंठीं क्रोध थोर । शब्दासाठीं हरिकिंकर । जयविजय वीर शापिले ॥ १८० ॥ श्रेष्ठ मानूं चतुरानन । तोही निलागचि हीन । उमा नोवरी देखोन । म्हणतां ’सावधान’ वीर्य द्रवलें ॥ ८१ ॥ नारद ब्रह्मचारी निजांगें । तोही कृष्णदारा स्वयें मागे । तो कृष्णें ठकविला तत्प्रसंगें । साठी पुत्र वेगें स्त्रानीं व्याला ॥ ८२ ॥ ज्यातें म्हणती सत्य ’धर्म’ । तोही केवळ अधर्म । गोत्रवधाचा संभ्रम । हा पूर्ण अधर्म धर्मासी ॥ ८३ ॥ व्यास तरी तो जारपुत्र । तेणेंचि कर्में पराशर । व्देषिया वसिष्ठ-विश्र्वमित्र । अतिमत्सर परस्परें ॥ ८४ ॥ साधु म्हणों दुर्वास ऋषी । तो छळूं गेला अंबरीषासी । पितृद्रोह प्रल्हादासी । साधुत्व त्यासी केवीं मानूं ॥ ८५ ॥ एवं वाखाणिले पुराणीं । तेही साचे न मानती मनीं । मा आतांचे वर्तमानीं । साधु कोणी असेना ॥ ८६ ॥ ऐकोनियां अचाट गोष्टी । येरें धांवती येरांपाठीं । एक करिती तोंडपिटी । अतिचावटी उदरार्थ ॥ ८७ ॥ एक मुद्रावंत आसनीं । एक बसती बकध्यानी । परी सत्य माने मनीं । ऐसा साधु कोणी असेना ॥ ८८ ॥ ऐशी आपुलियाचि युक्तीं । साक्षेपें साधूंतें निंदिती । साधु असती हे वस्ती । अणुमात्र चित्तीं असेना ॥ ८९ ॥ जे जे हरीचे पढियंते । ते ते नावडती तयांतें । जेवीं दाखवितां दर्पणातें । क्षोभे निजचित्तें निर्नासिक ॥ १९० ॥ ज्या ईश्र्वराचेनि वर्तिजती । तो ईश्र्वरु आहे हें न मानिती । तो ईश्र्वर आहे कोणे स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन राया ॥ ९१ ॥ सर्वेषु शश्वत्तनुभृत्स्ववस्थितं । यथा खमात्मानमभीष्टमीश्वरम्‌ । वेदोपगीतं च न शृण्वतेऽबुधा । मनोरथानां प्रवदन्ति वार्तया ॥ १० ॥ जो सर्व भूतांचे ठायीं । निरंतर अंतर नाहीं । समसाम्यें सर्वदा पाहीं । उणापुरा कदाही कल्पांतीं नव्हे ॥ ९२ ॥ जो सर्वांमाजीं असे सर्वदा । परी सर्वपणा नातळे कदा । जेवीं पद्नपत्र जलस्पंदा । अलिप्त बुब्दुदा असोनि संगें ॥ ९३ ॥ तेवीं असोनि सकळ जनीं । घसवटेना जनघसणीं । नभ जैसें अलिप्तपणीं । नरचूडामणी सबाह्य ॥ ९४ ॥ तैसें अलिप्तपण न मोडे । परी रची अनंत ब्रह्मांडें । तें ब्रह्मांड अंडें प्रचंडें । वागवी उदंडें अकर्तात्मयोगें ॥ ९५ ॥ यालागीं तो ’अंतर्यामी’ । अभिधान बोलिजे नित्य निगमीं । जो सर्वांच्या हृद्‍यग्रामीं । चेतनानुक्रमीं लक्षिजे ॥ ९६ ॥ त्या ईश्र्वरातें नित्य ध्यातां । कां आवडीं नाम मुखीं गातां । तरी अभीष्ट मनोरथां । होय वर्षता अखंडधारीं ॥ ९७ ॥ त्या ईश्र्वराच्या गातां गोष्टी । सर्व अनिष्टां होय तुटी । जो देखतांचि दृष्टीं । स्वानंदसृष्टि तुष्टला वर्षे ॥ ९८ ॥ एवं सुखदाता तोचि शास्ता । जो कां अंतकाचा नियंता । अकाळें काळही सत्ता । ज्या भेणें सर्वथा करूं न शके ॥ ९९ ॥ श्र्वासोच्छ्‍वासांचिया परिचारा । ज्या भेणें नेमस्त वाजे वारा । ज्याचेनि धाकें धरा । न विरवे सागरा जळीं असतां ॥ २०० ॥ ज्याचे आज्ञेवरी जाण । सूर्य चालवी दिनमान । ज्याचे पुरातन आज्ञेभेण । समुद्र आपण रेखा नुल्लंघी ॥ १ ॥ ज्यातें सदा गायिजे वेदीं । जो वाखाणिजे उपनिषदीं । ज्याची पवित्र कीर्ति दुर्बुध्दी । स्वयें त्रिशुध्दी नायकती कदा ॥ २ ॥ ज्याचें नाम स्मरतां जाण । सकळ दोषां निर्दळण । ज्याचे कृतांत वंदी चरण । जन्ममरण विभांडी ॥ ३ ॥ ज्याची कथा कर्णपुटीं । पडतां विकल्पांचिया कोटी । निर्दळूनि उठा‌उठी । पाडी मिठी परब्रह्मीं ॥ ४ ॥ यापरी जो पवित्र मूर्ती । ज्यालागीं वेद सदा वर्णिती । अभाग्य नायकती त्याची कीर्ती । वार्ता करिती मनोरथांच्या ॥ ५ ॥ अस्वल आपुलिया गुणगुणा । नायके वाजतिया निशाणा । तेवीं नायकोनि हरीच्या गुणा । विषयसंभाषणा आदरें वदती ॥ ६ ॥ यालागीं ते अतिमंद । अविनीत सदा स्तब्ध । विषयांलागीं विषयांध । अतिलुब्ध लोलुप्यें ॥ ७ ॥ लोके व्यवायामिषमद्यसेवा नित्या हि जन्तोर्न हि तत्र चोदना । व्यवस्थितिस्तेषु विवाहयज्ञ सुराग्रहैरासु निवृत्तिरिष्टा ॥ ११ ॥ वेदें न करितां प्रेरणा । विषयांवरी सहज वासना । स्वभावें सकळ जनां । सदा जाण सर्वांसी ॥ ८ ॥ मांससेवना मद्यपाना । मिथुनीभूत मैथुना । ये अर्थीं सर्व जनां । तीव्र वासना सर्वदा ॥ ९ ॥ तेथें सेव्यासेव्यपरवडी । विवंचना कोण निवडी । लागली विषायांची गोडी । ते अनर्थकोडी करितील ॥ २१० ॥ आगी लागलिया कापुसा । विझवितां न विझे जैसा । तेवीं विषयवंता मानसा । विवेकु सहसा उपजेना ॥ ११ ॥ झाल्या लोलिंगत बडिशा । निजमरण विसरे मासा । कां मुठी चणियांच्या आशा । नळीमाजीं । आपैसा वानरू अडके ॥ १२ ॥ दूध मिळालिया मांजर । न म्हणे व्दिज‍अंत्यजघर । तेवीं विषय‍उन्मत्त नर । न करिती विचार सेव्यासेव्य ॥ १३ ॥ कां खवळल्या विषयचाडें । योनिसंकरु घडेल पुढें । यालागी वेदें चोखडे । वर्णाश्रमपाडें विभाग केले ॥ १४ ॥ जैसें अफाट पृथ्वीचें अंग । तेथें सप्तव्दीपें करूनि विभाग । मग भिन्नाधिकारें चांग । धरा साग्ड़ आक्रमिली ॥ १५ ॥ कां अनावृत मेघजळा । धरणें धरूनि घालिजे तळां । मग नेमेंचि ढाळेढाळां । पिकालागीं जळा काढिजे पाट ॥ १६ ॥ आणि पवना नादाकारा । साधूनि कीजे वाजंतरा । मग जेवीं नाना ध्वनि मधुरा । वाजविजे यंत्रा सप्त स्वरें ॥ १७ ॥ तैसें उच्छृंखळां विषयांसी । वेदें नेमिलें नेमेंसीं । तेचि वेदाज्ञा ऐशी । ऐक तुजपासीं सांगेन ॥ १८ ॥ आवरावया योनिभ्रष्टां । मैथुनीं विवाहप्रतिष्ठा । लावूनियां निजनिष्ठा । वर्णवरिष्ठा नेमिले ॥ १९ ॥ ब्राह्मण जातां रजकीपासीं । ते तंव कडू न लगे त्यासी । रजक जातां ब्राह्मणीपाशीं । तिखट त्यासी ते न लगे ॥ २२० ॥ भलती स्त्री भलता नर । मैथुनीं होय वर्णसंकर । तो चुकवावया प्रकार । विवाहनिर्धार नेमिला वेदें ॥ २१ ॥ धर्मपत्नीपाणिग्रहण । विवाह नेमिला सवर्ण । तेथें सप्तम पंचम त्यजून । स्वगोत्रीं लग्न करूं नये ॥ २२ ॥ तीन्ही वेद तीन्ही वर्ण । वेदें सांडूनियां जाण । सवेद आणि सवर्ण । पाणिग्रहण नेमिलें ॥ २३ ॥ कन्या सवेद सवर्ण । जीसी नाहीं रजोदर्शन । तेही पित्यापासीं याचून । करावें लग्न विधानोक्त ॥ २४ ॥ धर्म-अर्थ-कामाचरण । अन्यत्र न करावें आपण । ऐशी वाहूनियां आण । पाणिग्रहण वेदोक्त ॥ २५ ॥ करितां वधूवरां पाणिग्रहण । साक्षी व्दिज-देव-हुताशन । इतर स्त्रिया मातेसमान । स्वदारागमन नेमिलें वेदें ॥ २६ ॥ एवं नेमूनियां विवाहासी । वेदरायें दिली आज्ञा ऐशी । सांडूनि सकळ स्त्रियांसी । स्वदारेपाशीं मैथुन ॥ २७ ॥ दिवा मैथुन नाहीं स्त्रियांसी । रात्रीं त्यजूनि पूर्वापर प्रहरांसी । मैथुन स्त्रियेपासीं । मध्यरात्रीसी नेमस्त ॥ २८ ॥ नेमिलें स्वदारामैथुन । तेंही अहोरात्र नाहीं जाण । प्रजार्थ स्त्रीसेवन । ऋतुकाळीं गमन नेमस्त ॥ २९ ॥ ऋतुकाळीं ज्यां स्त्रीगमन । ते पुरुष ब्रह्मचारी पूर्ण । वेद निवृत्तिपर जाण । त्यागरूपें आपण भोगातें नेमी ॥ २३० ॥ ’आत्मा वै पुत्रनामासि’ । पुत्र झालिया स्त्रियेसी । संग करूं नये स्त्रीपासीं । शनैःशनैः विषयांसी त्यागवी वेद ॥ ३१ ॥ सेवावया आमिषा । वेदें नेमु केला कैसा । न घडावया पशुहिंसा । संकट आयासा स्वयें द्योती ॥ ३२ ॥ आवडीं खावया मांसा । अथवा स्वर्गाचिया आशा । जे करिती पशुहिंसा । तयां पुरुषां अधःपतन ॥ ३३ ॥ निष्काम कर्मीं पशुहिंसा । करी तरी तो निष्काम कैसा । तेथ निगमाचा नेमु ऐसा । मुख्य अहिंसा सर्व धर्मीं ॥ ३४ ॥ नित्य न करावया मांसभक्षण । यज्ञीं पुरोडाशसेवन । तेंहि परिमित जाण । स्वेच्छा मांसादन वारिलें वेदें ॥ ३५ ॥ याग करूनि ’सौत्रामणी’ । प्रवर्तावें सुरापानीं । हे वेदाज्ञा जो सत्य मानी । तो स्वधर्माचरणीं नागवला ॥ ३६ ॥ जे कर्मीं मद्यपान घडे । तो स्वधर्म म्हणतां जीभ झडे । लोलुपते भुलले बापुडे । वेद विषयांकडे वोढिती ॥ ३७ ॥ यागु करितां सोत्रामणी । स्वयें न व्हावें मद्यपानी । तें यज्ञशेष अवघ्राणीं । परी सर्वथा वदनीं घालूं नये ॥ ३८ ॥ हे विषयांचें त्रिविध विंदान । मैथुन-मांसभक्षण-सुरापान । यदर्थीं निवृत्तीचि प्रमाण । हें मनोगत पूर्ण वेदाचें ॥ ३९ ॥ विषयांपासूनि निवृत्ती । वेद विभागें हेंचि द्योती । परी धरावी विषयासक्ती । हे वेदोक्ति सर्वथा न घडे ॥ २४० ॥ वेंचोनियां निजधन । करोनियां विवाह यज्ञ । सेवावें मद्य-मांस-मैथुन । हें वेदवचन कदा न घडे ॥ ४१ ॥ धनं च धर्मैकफलं यतो वै । ज्ञानं सविज्ञानमनुप्रशान्ति । गृहेषु युञ्जन्ति कलेवरस्य । मृत्युं न पश्यन्ति दुरन्तवीर्यम्‌ ॥ १२ ॥ नायकोनि भगवत्कथा । ज्ञानाभिमानी नाडले तत्वतां । धनें परमार्थ यावा हाता । तोही स्वधर्मता न लाविती धर्मीं ॥ ४२ ॥ विषयांचिया कामना । सर्वस्वें वेंचिती धना । तेंचि धर्मार्थ वेंचितां जाणा । सांडिती प्राणा कवडीसाठीं ॥ ४३ ॥ जया धनाचेनि पांगें । हा धर्मचि आलासे निजांगें । जेवीं पायाळाचेनि योगें । महानिधि वेगें आतुडे हातीं ॥ ४४ ॥ बीज तेथें सद्रुम फळ । चंदन तेथें परिमळ । जळाचे ठायीं केवळ । नांदती सकळ रसस्वाद ॥ ४५ ॥ देह तेथ असे कर्म । रूप तेथ वसे नाम । धन तेथ उत्तमोत्तम । सकळ धर्म सदा वसती ॥ ४६ ॥ जेवीं एकादशीव्रतयोगें । जागरीं गीतनृत्यपांगें । तुष्टला देवो लागवेगें । आतुडे धनयोगें निजभक्तां करीं ॥ ४७ ॥ तेवीं धनाचिया पाठोवाठीं । परम धर्मेंसी पडे गांठी । धर्म तेथ उठा‌उठी । ज्ञानाची भेटी विज्ञानेंसीं ॥ ४८ ॥ चंद्रास्तव वाढती कळा । जीवनास्तव जिव्हाळा । तेवीं धनास्तव सोज्जळा । धर्माचा सोहळा धार्मिकां घरीं ॥ ४९ ॥ धर्म तेथ शुध्द ज्ञान । ज्ञान तेथ विज्ञान । विज्ञान तेथ समाधान । शांति संपूर्ण नांदे तेथ ॥ २५० ॥ एवढें फळ ज्या धनापासीं । तें मूर्ख वेंचिती विषयांसी । देहलोभें भुललीं पिसीं । अंगीच्या मृत्यूसी विसरले ॥ ५१ ॥ जळते घरीं ठेवा ठेवणें । मरत्या देहा सुरवाड करणें । तो नागवला वेदु म्हणे । तें वेदाचें बोल॥णें नायके कोणी ॥ ५२ ॥ उपजलेनि दिवस-दिवसें । देहातें काळु ग्रासीतसे । हें नित्य नवें मरण कैसें । देहलोभवशें विसरले ॥ ५३ ॥ ज्याचे त्या देखतां कैसा । काळु गिळी बाळवयसा । मग तारुण्याची दशा । मुरडूनि घसा ग्रासी काळ ॥ ५४ ॥ गिळोनियां तारुण्यपण । आणी वार्धक्य कंपायमान । ऐसें काळाचें विंदान । दुर्धर पूर्ण ब्रह्मादिकां ॥ ५५ ॥ जयाचेनि चपेटघातें । मरण आणी अमरांतें । मा मूर्ख तेथें जीवितातें । अक्षय चित्तें दृढ मानिती ॥ ५६ ॥ मूळीं देहचि तंव अनित्य । मा तेथींचे भोग काय शाश्र्वत । परी धन वेंचूनि विषयार्थ । भुलले जाणा भ्रांत स्त्रीलोभें ॥ ५७ ॥ ऐसे नश्र्वर भोग जगीं । ते भोगावया रिघावें स्वर्गीं । तदर्थ प्रवर्तती यागीं । लागवेगीं भोगेच्छा ॥ ५८ ॥ सुख भोगावया वेगीं । पतंगु जेवीं उडी घाली आगीं । तेवीं इहामुत्रभोगीं । पतनालागीं पावती ॥ ५९ ॥ स्त्री-आमिष-मद्यपान । हे वेदोक्त भोग जाण । तेथ केवीं घडे पतन । तें वेदविधान नेणती मूर्ख ॥ २६० ॥ यद्घ्राणभक्षो विहितः सुरायास्तथा पशोरालभनं न हिंसा । एवं व्यवायः प्रजया न रत्या इमं विशुद्धं न विदुः स्वधर्मम्‌ ॥ १३ ॥ वेदविहित कर्माचरण । तेथ सर्वथा नव्हे पतन । जेथ चुके वेदविधान । तेथें पावे पतन सज्ञान ॥ ६१ ॥ वेदींच्या अर्थवादासरिसा । मनीं बांधोनि भोगाशा । यज्ञमिषें पशुहिंसा । भोगलिप्सा करूं धांवती ॥ ६२ ॥ वेदें बोलिलें ’आलभन’ । त्या नांव म्हणती पशुहनन । हें सकाम मानिती विधान । निष्कामा हनन कदा न घडे ॥ ६३ ॥ निष्कामासी यागयजन । स्वधर्मार्थ करावे यज्ञ । तेथ पशूचें आलभन । सर्वथा हनन करूं नये ॥ ६४ ॥ पशूचें करूं नये हनन । देवतोद्देशें अंगस्पर्शन । या नांव बोलिजे ’आलभन’ । हें यज्ञाचरण निष्काम ॥ ६५ ॥ हरिश्र्चंद्राच्या यागीं । शुनःशेप-पशुप्रसंगीं । तेणें घावो लागों नेदितां अंगीं । वेदोक्त प्रयोगीं यज्ञसिध्दी केली ॥ ६६ ॥ वेदोक्त मंत्रभागार्थ । देव सुखी करोनि समस्त । आपण झाला निर्मुक्त । हा ऋग्वेदार्थ ब्राह्मणीं ॥ ६७ ॥ यापरी पशुघात । यज्ञीं न लगे निश्र्चित । तो हरिश्र्चंद्र यागार्थ । पशुघात निवारी ॥ ६८ ॥ तेथ मीमांसकांचें मत । देवतोद्देशें जो पशुघात । या नांव ’आलभन’ म्हणत । स्वर्गफलार्थ आवश्यक ॥ ६९ ॥ केवळ मांसभक्षणार्थ । जे करिती पशुघात । हिंसादोष तेथें प्राप्त । ऐसें बोलत मीमांसक ॥ २७० ॥ देवतोद्देशें पशूंचा घात । तेणें स्वर्गभोग होय प्राप्त । तोही भोगक्षयें क्षया जात । तेणें हिंसा प्राप्त याज्ञिकां ॥ ७१ ॥ याग करितां ’सौत्रामणी’ । पुरोडाश घ्यावा अवघ्राणीं । परी प्रवर्तावें सुरापानीं । हें वेदविधानीं असेना ॥ ७२ ॥ एवं जेथें पशुहनन । तें कर्म सदोष पूर्ण । यालागीं तेथ अधःपतन । बोलिलें जाण याज्ञिकांसी ॥ ७३ ॥ वेदें विहिलें पाणिग्रहण । तें प्रजार्थ स्वदारागमन । परी रत्यर्थ नित्य मैथुन । हे वेदाज्ञा जाण असेना ॥ ७४ ॥ मद्य-मांस-मैथुनप्रसंग । स्व‍इच्छा न करावया भोग । वेदें द्योतिला विवाह याग । भोगत्यागनियमार्थ ॥ ७५ ॥ नेणोनि ऐसिया शुध्द घर्मा । यागमिषें अधर्मा । प्रवर्तानि काम्य-कर्मा । भोग संभ्रमा भोगिती मूर्ख ॥ ७६ ॥ ये त्वनेवंविदोऽसन्तः स्तब्धाः सदभिमानिनः । पशून्‌ द्रुह्यन्ति विश्रब्धाः प्रेत्य खादन्ति ते च तान्‌ ॥ १४ ॥ नेणोनि शुध्द वेदविधानातें ।अतिगर्वाचेनि उध्दतें । आपणियां मानूनि ज्ञाते । अविधी पशूतें घातु करितीं ॥ ७७ ॥ केवळ अभिचारमतें । पावोनि सकळ भोगातें । ऐशिया मानोनि विश्र्वासातें । स्वेच्छा पशूतें घात करिती ॥ ७८ ॥ अविधी पशूतें वधिती । त्या याज्ञिकांचे देहांतीं । मारिले पशू मारूं येती । झळकत काती घे‌ऊनियां ॥ ७९ ॥ एवं निमालिया याज्ञिकांसी । भक्षिले पशु भक्षिती त्यांसी । जैसें सेविलें विष प्राणियांसी । ग्रासी प्राणांसी समूळ ॥ २८० ॥ द्विषन्तः परकायेषु स्वात्मानं हरिमीश्वरम्‌ । मृतके सानुबन्धेऽस्मिन्बद्धस्नेहाः पतन्त्यधः ॥ १५ ॥ परमात्मा जो श्रीहरी । तो अंतर्यामी सर्व शरीरीं । तेथ पराचा जो व्देषु करी । तेणें व्देषिला हरि निजात्मा ॥ ८१ ॥ परासी जो करी अपघातु । तेणें केला निजात्मघातु । त्यासी सकुटुंब अधःपातु । रौरवांतु ते बुडती ॥ ८२ ॥ ये कैवल्यमसम्प्राप्ता ये चातीताश्च मूढताम्‌ । त्रैवर्गिका ह्यक्षणिका आत्मानं घातयन्ति ते ॥ १६ ॥ सज्ञानी स्वतां तरती । अज्ञानी सज्ञानां शरण येती । तेणें त्यांसी कैवल्यप्राप्ती । त्यांच्या वचनोक्तिविश्र्वासें ॥ ८३ ॥ जे अज्ञान ना सज्ञान । ज्यांसी केवळ ज्ञानाभिमान । ज्यांचें विषयीं लोलुप मन । ते पुरुष जाण आत्मघाती ॥ ८४ ॥ साधावया अर्थ काम । जे करिती अभिचारधर्म । हें त्रैवर्णिक घोर कर्म । आत्मघाती परम ज्याचें त्यासी ॥ ८५ ॥ देहाचिया गोमटिया । जे करिती अभिचारक्रिया । तेणें कर्में आप‍आपणियां । सृजिला राया निजघातु ॥ ८६ ॥ जो स्वयें बैसली खांदी तोडी । तो खांदीसहित पडे बुडीं । तेवीं काम्यकर्माच्या वोढी । क्रियेसी रोकडीं अधःपात ॥ ८७ ॥ एत आत्महनोऽशान्ता अज्ञाने ज्ञानमानिनः । सीदन्त्यकृतकृत्या वै कालध्वस्तमनोरथाः ॥ १७ ॥ काम क्रोधी अति‌अभ्दुत । क्रूरकर्मी जे अशांत । तिहीं आप‍आपणिया अनहित । निजात्मघात जोडिला ॥ ८८ ॥ स्वयें कर्म करिती अविधी । तेचि म्हणती शुध्द विधी । अज्ञान तेंचि प्रतिपादी । ज्ञान त्रिशुध्दी म्हणोनियां ॥ ८९ ॥ ते काम्यकर्मीं छळिले । कां महामोहें आकळिले । गर्वदंभादि भेदें खिळिले । काळसर्पें गिळिले सद्‍बुध्दीसीं ॥ २९० ॥ गर्वादिज्वरितमुखें । गोडपणीं कडू ठाके । विषप्राय विषयसुखें । अतिहरिखें सेविती ॥ ९१ ॥ ऐशा विषयांलागीं पहाहो । आप्त मानूनि निजदेहो । रचूनि नाना उपावो । अर्थसंग्रहो स्वयें करिती ॥ ९२ ॥ हित्वात्ममायारचिता गृहापत्यसुहृत्स्त्रियः । तमो विशन्त्यनिच्छन्तो वासुदेवपराङ्मुखाः ॥ १८ ॥ मरणेंसी झटें घेत । श्री मेळविती श्रीमंत । गृह दारा पुत्र वित्त । नाना वस्तुजातसंग्रहो ॥ ९३ ॥ ऐसे भोग आयासयुक्त । सांडूनि ज्ञानगर्वी समस्त । ज्ञानाभिमानें ने‍इजेत । अंधतमांत अतिगर्वें ॥ ९४ ॥ जेथ अंधाराचे डोळे । हो‌ऊनि ठाकती आंधळे । तेथ मोहरात्रीचें काळें । अंधतममेळें अधिक कांटे ॥ ९५ ॥ जया अंधारातें प्रकाशूं येतां । निखिळ काळा होय सविता । जेथ गाढ मूढ अवस्था । अतिमौढ्यता स्वयें पावे ॥ ९६ ॥ जेथ सुषुप्तीसी झोंप लागे । आळसु आळसिजे सर्वांगें । तेथ घर बांधोनि निजांगें । निंदा क्रोध दोघे सदा वसती ॥ ९७ ॥ तेथ भजनविमुख नरां । अधःपतन अभिमानव्दारा । जेवीं अथावीं पडिला चिरा । तेवीं बाहेरा निघों न शके ॥ ९८ ॥ जे वासुदेवीं सदा विमुख । ज्यासीं हरिभजनीं नाहीं हरिख । त्यांची दशा हे अधोमुख । अतिदुःखें दुःख भोगिती ॥ ९९ ॥ ऐशी अभक्तांची गति । सांगितली आहाच स्थिति । वांचूनि त्यांची दुर्गति । वाग्देवता भीती स्पष्ट वदतां ॥ ३०० ॥ अभक्तांची गति बोलणें । यापरीस चांग मुकें होणें । प्राणु जावो कां सर्व प्राणें । परी ते दोष कोणें बोलावे ॥ १ ॥ राया तुझिया प्रश्र्नकाजीं । हे दशा बोलणें पडे आजी । येर्‍हवीं अभक्तवादें आम्हांमाजीं । वाचेची पांजी विटाळली नाहीं ॥ २ ॥ यावरी आतां नृपनाथा । वक्ता आणि समस्त श्रोतां । राम-स्मरणें तत्वतां । वाचेसी प्रायश्र्चित्ता सवें कीजे ॥ ३ ॥ ऐकोनि अभक्तांची गती । अतिशयेंसीं दुःखप्राप्ती । राजा कंटाळला चित्तीं । यालागीं निश्र्चितीं हरिनाम स्मरे ॥ ४ ॥ ज्या स्मरविलें हरीतें । तोचि यासी पुसों येथें । युगायुगीं भक्त त्यातें । कोणे विधीतें भजन करिती ॥ ५ ॥ श्री राजोवाच । कस्मिन्‌ काले स भगवान्‌ किं वर्णः कीदृशो नृभिः । नाम्ना वा केन विधिना पूज्यते तदिहोच्यताम्‌ ॥ १९ ॥ ज्याचेनि स्मरणें तत्वतां । कर्माकर्में नुधाविती माथा । त्या भगवंताची कथा । माझिया हितालागीं सांगा ॥ ६ ॥ जो परमात्मा श्रीहरी । तो सृष्ट्यादि यगयुगांतरीं । कोणें नामें रूपें वर्णाकारीं । भक्त कैशापरी पूजिती ॥ ७ ॥ आणि ते काळींच्या प्रजा । कैसेनि यजिती अधोक्षजा । कवणे विधीं करिती पूजा । तें योगिराजा सांगिजे ॥ ८ ॥ तुमचे मुखींचें कृपावचन । त्यापुढें अमृतही गौण । वचनें परमानंद पूर्ण । जन्ममरण उच्छेदी ॥ ९ ॥ त्याहीमाजीं भगवग्दुण । युगानुवर्ती नारायण । त्याचें भजनपूजनविधान । कृपा करून सांगिजे स्वामी ॥ ३१० ॥ ऐकोनि रायाचें वचन । संतोषले अवघे जण । जाणोनि हरिगुणांचा प्रश्र्न । कनिष्ठ ’करभाजन’ बोलता झाला ॥ ११ ॥ श्रीकरभाजन उवाच । कृतं त्रेता द्वापरं च कलिरित्येषु केशवः । नानावर्णाभिधाकारो नानैव विधिनेज्यते ॥ २० ॥ नाना वर्ण नानाकारें । नाना नाम नानोपचारें । कृता-त्रेता-व्दापरें । भक्त निर्धारे केशवु यजिती ॥ १२ ॥ ’क’कार ब्रह्मा ’व’कार विष्णु । ’श’कार स्वयें त्रिनयनु । केशव तो गुणविहीनु । प्रकाश पूर्ण तिहींचा ॥ १३ ॥ केशव केवळ अर्धमात्रा । न ये व्यक्ताव्यक्त उच्चारा । व्याप्येंवीण व्यापकु खरा । सबाह्याभ्यंतरा एकत्वें ॥ १४ ॥ तोचि युगपरत्वें रूप नाम । भजनविधि क्रियाधर्म । भक्त पूजिती पुरुषोत्तम । तो अनुक्रम अवधारीं ॥ १५ ॥ कृते शुक्लश्चतुर्बाहुर्जटिलो वल्कलाम्बरः । कृष्णाजिनोपवीताक्षान्‌ बिभ्रद्‌ दण्डकमण्डलू ॥ २१ ॥ कृतयुगीं श्र्वेतवर्णधर । जटिल चतुर्भुज वल्कलांबर । दंडकमंडल्वंकित कर । अजिन ब्रह्मसूत्र अक्षमाला हातीं ॥ १६ ॥ ब्रह्मचर्यें दृढव्रत । ये चिन्हीं चिन्हांकित । परमात्मा मूर्तिमंत । भक्त यापरी यजिती ॥ १७ ॥ मनुष्यास्तु तदा शान्ता निर्वैराः सुहृदः समाः । यजन्ति तपसा देवं शमेन च दमेन च ॥ २२ ॥ ते काळींचे सकळ नर । सदा शांत निवैर । समताबुध्दी निरंतर । सुहृन्मित्र परस्परें ॥ १८ ॥ तैं तपें करावें देवयजन । त्या तपाचें मुख्य लक्षण । शम-दम साधूनि संपूर्ण । भगवभ्दजन स्वयें करिती ॥ १९ ॥ तैं देवाचें नामोच्चरण । दशधा नामीं नामस्मरण । तेंचि नाम कोण कोण । ऐक सावधान नृपनाथा ॥ ३२० ॥ हंसः सुपर्णो वैकुण्ठो धर्मो योगेश्वरोऽमलः । ईश्वरः पुरुषोऽव्यक्तः परमात्मेति गीयते ॥ २३ ॥ हंस सुपर्ण वैकुंठ । धर्म योगेश्र्वर श्रेष्ठ । अमल ईश्र्वर वरिष्ठ । पुरुष अव्यक्त नामपाठ परमात्मा म्हणती ॥ २१ ॥ ते काळींचे भक्त श्रेष्ठ । या नामांचा नामपाठ । गायन करिती घडघडाट । भवसंकट निर्दाळिती ॥ २२ ॥ हें कृतयुगींचें यजन । तुज सांगितलें संपूर्ण । आतां त्रेतायुगींचें भजन । मूर्तीचें ध्यान तें ऐक ॥ २३ ॥ त्रेतायां रक्तवर्णोऽसौ चतुर्बाहुस्त्रिमेखलः । हिरण्यकेशस्त्रय्यात्मा स्रुक्स्रुवाद्युपलक्षणः ॥ २४ ॥ त्रेतीं यज्ञमूर्तिं पुरुषोत्तमु । रक्तवर्ण ज्वलनोपमु । पिंगटकेश निर्धूमु । देवदेवोत्तमु चतुर्बाहू ॥ २४ ॥ तया यज्ञपुरुषा निर्मळा । त्रिगुणांची त्रिमेखळा । वेदत्रयीचा पूर्णमेळा । मूर्तीचा सोहळा तदात्मकचि ॥ २५ ॥ स्त्रुक-स्त्रुवा-पाणिग्रहण । हेंचि तयाचें उपलक्षण । त्रेतायुगीं नारायण । येणें रूपें जाण निजभक्त ध्याती ॥ २६ ॥ तं तदा मनुजा देवं सर्वदेवमयं हरिम्‌ । यजन्ति विद्यया त्रय्या धर्मिष्ठा ब्रह्मवादिनः ॥ २५ ॥ तैंचे जे मनुष्य जाण । त्रिवेदीं करिती भजन । सर्वदेवस्वरूप हरि पूर्ण । यापरी यजन त्रेतायुगीं ॥ २७ ॥ त्रेतायुगीं सर्वही नर । वेदोक्तीं नित्य सादर । सर्वही भजनतत्पर । धर्मिष्ठ समग्र अतिधार्मिक ॥ २८ ॥ ते धर्मिष्ठ धार्मिक जन । अष्टधा नामीं नामस्मरण । गजरें करिती सदा पठण । तें नामाभिधान ऐक राया ॥ २९ ॥ विष्णुर्यज्ञः पृश्निगर्भः सर्वदेव उरुक्रमः । वृषाकपिर्जयन्तश्च उरुगाय इतीर्यते ॥ २६ ॥ विष्णु यज्ञ पृश्र्निजन्म । सर्वदेव उरुक्रम । वृषाकपि जयंतनाम । उरुगाय परम नामें स्मरती ॥ ३३० ॥ व्दापरीं भगवध्द्‍यान । ते युगींचें पूजाविधान । भक्त कैसें करिती भजन । नामस्मरण तें ऐक ॥ ३१ ॥ द्वापरे भगवाञ्श्यामः पीतवासा निजायुधः । श्रीवत्सादिभिरङ्कैश्च लक्षणैरुपलक्षितः ॥ २७ ॥ व्दापरीं घनश्यामवर्ण । अतसीपुष्पप्रभासमान । पीतांबरपरिधान । श्रीवत्सचिन्ह‍अंकित ॥ ३२ ॥ शंख-चक्र-पद्म-गदा । चारी भुजा सायुधा । इहीं लक्षणीं गोविंदा । लक्षिती सदा निजभक्त ॥ ३३ ॥ तं तदा पुरुषं मर्त्या महाराजोपलक्षणम्‌ । यजन्ति वेदतन्त्राभ्यां परं जिज्ञासवो नृप ॥ २८ ॥ शशांकछत्र मणि चामर । राजलक्षणीं राजोपचार । यापरी व्दापरींचे नर । अतिसादर पूजेसी ॥ ३४ ॥ शीघ्र पावावया परात्पर । वैदिक तांत्रिक पूजा मिश्र । तत्वजिज्ञासु करिती नर । भजनतत्पर या रीतीं ॥ ३५ ॥ ते काळीचें नामस्मरण । जेणें हो‌ई कलिमलदहन । त्या नामांचें अभिधान । ऐक सांगेन नृपनाथा ॥ ३६ ॥ नमस्ते वासुदेवाय नमः सङ्कर्षणाय च । प्रद्युम्नायानिरुद्धाय तुभ्यं भगवते नमः ॥ २९ ॥ ’वासुदेवा’ तुज लोटांगण । ’संकर्षणा’ तुज नमन । ’प्रद्युम्रा’ प्रणाम पूर्ण । अभिनंदन ’अनिरुध्दा’ ॥ ३७ ॥ नारायणाय ऋषये पुरुषाय महात्मने । विश्वेश्वराय विश्वाय सर्वभूतात्मने नमः ॥ ३० ॥ ’नारायणा’ ऋषिवरा । ’महापुरुषा’ सुरेंद्रा । ’विश्र्वरूपा’ विश्र्वेश्र्वरा’ । महात्म्या श्रीवरा नमन तुज ॥ ३८ ॥ ’सर्व भूतीं तूं भूतात्मा’ । तुज नमो पुरुषोत्तमा । व्दापरीं ऐशिया नामां । नृपोत्तमा सदा स्मरती ॥ ३९ ॥ त्या नामांच्या पाठा । तेणें देवासी संतोष मोठा । वेगीं सांडोनि वैकुंठा । धावे अवचटा कीर्तनामाजीं ॥ ३४० ॥ इति द्वापर उर्वीश स्तुवन्ति जगदीश्वरम्‌ । नानातन्त्रविधानेन कलावपि तथा शृणु ॥ ३१ ॥ यांहीं नामीं स्तुतिस्तवन । व्दापरींचे करिती जन । आतां कलियुगींचें भजन । तंत्रोक्त विधान ऐक राया ॥ ४१ ॥ कृष्णवर्णं त्विषाकृष्णं साङ्गोपाङ्गास्त्रपार्षदम्‌ । यज्ञैः सङ्कीर्तनप्रायैर्यजन्ति हि सुमेधसः ॥ ३२ ॥ कलियुगीं श्रीकृष्णदेवो । वर्णूं कृष्णवर्णप्रभावो । प्रभा इंद्रनीळकीळ-समुदावो । मूर्ती तशी पहा हो शोभायमान ॥ ४२ ॥ मूर्ति सर्वावयवीं साग्ड़ । वेणुविषाणादि उपांग । चारी भुजा पराक्रमी चांग । आयुधें अव्यंग शंखचक्रादिक ॥ ४३ ॥ पृष्ठभागीं निजपार्षद । नंदसुनंदादि सायुध । कलियुगीं प्रज्ञाप्रबुध्द । यापरी गोविंद चिंतिती सदा ॥ ४४ ॥ मधुपर्कादिक विधान । साग्ड़ केलें जें पूजन । तेंही मानोनियां गौण । आवडे कीर्तन कलियुगीं कृष्णा ॥ ४५ ॥ नवल कैसें राजाधिराजा । कीर्तन तेचि महापूजा । ऐशी आवडी अधोक्षजा । कीर्तनें गरुडध्वजा उल्हासु सदा ॥ ४६ ॥ कीर्तन पढियें गोविंदा । यालागीं सन्मानी नारदा । तो कृष्णकीर्ती पढे सदा । नामानुवादा गर्जतु ॥ ४७ ॥ कीर्तन करितां नामानुवाद । संकटीं रक्षिला प्रल्हाद । कीर्तनें तुष्टे गोविंद । छेदी भवबंध दासांचा ॥ ४८ ॥ गजेंद्रें नामस्मरण । करितां पावला नारायण । त्याचें तोडोनि भवबंधन । निजधामा आपण स्वयें नेला ॥ ४९ ॥ अधमाधम अतिविखटी । तोंडा रामु आला अवचटीं । ते गणिका कीं वैकुंठीं । कृष्णें नामासाठीं सरती केली ॥ ३५० ॥ महादोषांचा मरगळा । अतिनष्ट अजामेळा । तोही नामें निर्मळ केला । प्रतापु आगळा नामाचा ॥ ५१ ॥ नामें विनटलीं गोविंदीं । ते संकटीं राखिली द्रौपदी । नाम तोडी आधिव्याधी । जाण त्रिशुध्दी दासांची ॥ ५२ ॥ अंतरशुध्दीचें कारण । मुख्यत्वें हरिकीर्तन । नामापरतें साधन । सर्वथा आन असेना ॥ ५३ ॥ कीर्तनीं हरीची आवडी कैशी । वत्सालागीं धेनु जैशी । कां न विसंबे जेवीं माशी । मोहळासी क्षणार्ध ॥ ५४ ॥ तेवीं नाम स्मरतया भक्ता । अतिशयें आवडी अच्युता । दासांची अणुमात्र अवस्था । निजांगें सर्वथा निवारी स्वयें ॥ ५५ ॥ यालागी हरिकीर्तनीं गोडी । जयासी लागली धडफुडी । त्यासी नाना साधनांच्या वोढी । सोसावया सांकडीं कारण नाहीं ॥ ५६ ॥ ज्यासी कीर्तनीं कथाकथनीं । चौगुण आल्हाद उपजे मनीं । तो उध्दरला सर्व साधनीं । पवित्र अवनी त्याचेनी ॥ ५७ ॥ एकचि जरी नाम वाचे । सदा वसे श्रीरामाचें । तरी पर्वत छेदोनि पापाचे । परमानंदाचें निजसुख पावे ॥ ५८ ॥ आवडीं करितां हरिकीर्तन । हृद्‍यीं प्रगटे श्रीजनार्दन । त्याहोनि श्रेष्ठ साधन । सर्वथा आन असेना ॥ ५९ ॥ थोर कीर्तनाचें सुख । निष्ठा तुष्टे यदुनायक । कीर्तनें तरले असंख्य । साबडे लोक हरिनामें ॥ ३६० ॥ यालागीं कीर्तनाहूनि थोर । आन साधन नाहीं सधर । मा कवण हेतू पामर । कीर्तन नर निंदिती ॥ ६१ ॥ एवं नामकीर्तनीं विमुख । ते स्वप्नींही न देखती सुख । कीर्तनव्देषें मूर्ख । अतिदुःख भोगिती ॥ ६२ ॥ ज्यांचे हृद्‍यीं व्देषसंचार । जळो जळो त्याचा आचार । सर्व काळ व्देषी नर । दुःख दुस्तर भोगिती ॥ ६३ ॥ कलियुगीं जे बुध्दिमंत । ते नामकीर्तनीं सदा निरत । गौरवूनि नाम स्मरत । हर्षयुक्त सप्रेम ॥ ६४ ॥ ; नाना अवतार अतिगहन । त्यांत श्रीराम कां भगवान्‌ कृष्ण । यांचें चरित्र अतिपावन । त्यांचें चरणवंदन सांगत ॥ ६५ ॥ ध्येयं सदा परिभवघ्नमभीष्टदोहं । तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम्‌ । भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं । वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम्‌ ॥ ३३ ॥ लय लक्षें ध्यानलक्षणें । देव देवी ध्येय ध्यानें । तृणप्राय केलीं जेणें । हरिचरणस्मरणें तत्काळ ॥ ६६ ॥ यालागीं ध्यानासी तें वरिष्ठ । ध्यातां छेदी कल्पनादि कष्ट । भक्तांचें अति‌अभीष्ट । मनोरथ इष्ट सदा पुरवी ॥ ६७ ॥ नित्य ध्यातां हरीचे चरण । करी भक्तदेहरोगदुःखहरण । इतुकेंच राया नव्हे जाण । करी निर्दळण भवरोगा ॥ ६८ ॥ भक्तांचे पुरवी मनोरथ । ते तूं म्हणसी विषययुक्त । परमानंदें नित्य तृप्त । निववी निजभक्त चरणामृतें ॥ ६९ ॥ वानूं चरणांची पवित्रता । शिवु पायवणी वाहे माथां । जे जन्मभूमी सकळ तीर्थां । पवित्रपण भक्तां चरणध्यानें ॥ ३७० ॥ अवचटें लागल्या चरण । पवित्र झाले पाषाण । मा जे जाणोनि करिती ध्यान । त्यांचें पवित्रपण काय वानूं ॥ ७१ ॥ जो सदा शत्रुत्वें वर्ततां । जेणें चोरून नेली निजकांता । त्याच्या बंधू शरणागता । दिधली आत्मता निजभावें ॥ ७२ ॥ कोरडी आत्मतेची थोरी । तैशी नव्हे गा नृपकेसरी । दे‌ऊनि सुवर्णाची नगरी । अचळतेवरी स्थापिला ॥ ७३ ॥ यालागीं शरणागतां शरण्य । सत्य जाण हरीचे चरण । यापरतें निर्भय स्थान । नाहीं आन निजभक्तां ॥ ७४ ॥ भक्तांची अणुमात्र व्यथा । क्षण एक न साहवे भगवंता । प्रल्हादाची अतिदुःखता । होय निवारिता निजांगें ॥ ७५ ॥ दावाग्नि गिळूनि अंतरीं । गोपाळ राखिले वनांतरीं । पांडव जळतां जोहरीं । काढिले बाहेरी विवरव्दारें ॥ ७६ ॥ करूनि सर्वांगाचा वोढा । नित्य निवारी भक्तांची पीडा । जो कां भक्तांचिया भिडा । रणरंगीं फुडां वागवी रथु ॥ ७७ ॥ ते चरण वंदितां साष्टांगीं । भक्तां प्रतिपाळी उत्संगी । ऐसी प्रणतपाळु कृपावोघीं । दुसरा जगीं असेना ॥ ७८ ॥ तरावया भवाब्धि प्रबळ । चरणांची नाव अडंडळ । अनन्यशरण सकळ । तारी तत्काळ चरणानुरागें ॥ ७९ ॥ ते महापुरुषाचे श्रीचरण । शरणागता निजशरण्य । ज्यांचें सनकादिक ध्यान । करिती अभिवंदन सभ्दावें ॥ ३८० ॥ अगाध चरणांचें महिमान । वानितां वेदां पडिलें मौन । ब्रह्मा सदाशिव आपण । करितां स्तवन तटस्थ ठेले ॥ ८१ ॥ अगम्य अतर्क्य श्रीचरण । जाणोनि ब्रह्मादिक ईशान । साष्टांगें अभिवंदन । करूनियां स्तवन करिती ऐसें ॥ ८२ ॥ त्यक्त्वा सुदुस्त्यजसुरेप्सितराज्यलक्ष्मीं । धर्मिष्ठ आर्यवचसा यदगादरण्यम्‌ । मायामृगं दयितयेप्सितमन्वधावद्‌ । वन्दे महापुरुष ते चरणारविन्दम्‌ ॥ ३४ ॥ जे राज्यश्रियेकारणें । अमर लोलंगत मनें । तें राज्य श्रीरामें त्यागणें । वचनाकारणें पित्याच्या ॥ ८३ ॥ श्रीराम धर्मिष्ठ चोख । पितृवचनप्रतिपाळक । उभ्दट राज्य सांडोनि देख । निघे एका‌एक वनवासा ॥ ८४ ॥ वनवासा चरणीं जातां । सवें घेतली प्रिया सीता । येणें बोलें स्त्रीकामता । श्रोतीं सर्वथा न मानावी ॥ ८५ ॥ तरी केवळ स्त्री नव्हे सीता । ते निजभक्त जाण तत्वतां । सांडूनि राजभोगा समस्तां । सेवेच्या निजस्वार्था वना आली ॥ ८६ ॥ राज्यीं असतां रघुवीरें । दास्य दासां वांटलें अधिकारें । ते मी एकली एकसरें । सेवा वनांतरीं अवघीचि करीन ॥ ८७ ॥ ते सेवा यावया हाता । सकळ सेवेच्या निजस्वार्था । चरणचालीं चालोनि सीता । आली तत्वतां वनवासासी ॥ ८८ ॥ कैसें श्रीरामसेवेचें सुख । चरणीं चालतां नाठवे दुःख । विसरली मायामाहेरपक्ष । अत्यंत हरिख सेवेचा ॥ ८९ ॥ ऐशिया मनोगत-सभ्दावा । वना आली करावया सेवा । श्रीराम जाणे भक्तभावा । येरां देवां दानवां कळेना ॥ ३९० ॥ निजभक्तांचें मनोगत । जाणता एक रघुनाथ । कां श्रीरामसेवेचा स्वार्थ । जाणती निजभक्त भजनानंदें ॥ ९१ ॥ भगवभ्दजनाचें सुख । भक्त जाणती भाविक । भावेंवीण भजनसुख । अनोळखी अभाविकां ॥ ९२ ॥ पूर्ण भाविक भक्त सीता । हें कळलेंसे रघुनाथा । यालागीं तिचिया वचनार्था । होय धांवता मृगामागें ॥ ९३ ॥ मायिक मृगाचें सुवर्णभान । जरी जाणे रघुनंदन । तरी भक्तलळे पाळण । करी धावन मृगामागें ॥ ९४ ॥ बाळकाचेनि छंदें जाण । जेवी मा‌उली नाचे आपण । तेवीं मायामृगापाठीं धावन । करी रघुनंदन निजभक्तवाक्यें ॥ ९५ ॥ जो राम वानरांच्या गोष्टी । ऐकतां विकल्प न धरीं पोटीं । तो सीतेच्या वचनासाठीं । धांवे मृगापाठीं नवल कायी ॥ ९६ ॥ भलतैसें भक्तवचन । मिथ्या न म्हणे रघुनंदन । यालागीं निजचरणीं धावन । करी आपण मृगामागें ॥ ९७ ॥ एवं भक्तवाक्यें उठा‌उठी । जो पायीं धांवे मृगासाठीं । ज्याचे चरणरेणु अणुकुटी । वंदिती मुकुटीं शिवादि सर्व ॥ ९८ ॥ तो मृगामागें धांवतां जाण । पावन केले पाषाण । त्याच्या चरणां अनन्य शरण । अभिवंदन सभ्दावें ॥ ९९ ॥ एवं महापुरुषाचे चरण । अभिवंदनें करिती स्तवन । कलियुगीं कीर्तनें जन । परम पावन नित्ययुक्त ॥ ४०० ॥ एवं युगानुरूपाभ्यां भगवान्युगवर्तिभिः । मनुजैरिज्यते राजन्श्रेयसामीश्वरो हरिः ॥ ३५ ॥ एवं कृतादि-कलियुगवरी । इहीं नामीं रूपीं अवतारीं । सभ्दावें तैंच्या नरीं । भजिजे श्रीहरी श्रेयार्थ ॥ १ ॥ त्यांमाजीं कलियुगाची थोरी । वानिजे सभ्दावें ऋषीश्र्वरीं । येथें हरिकीर्तनावरी । मुक्ती चारी वोळगण्या ॥ २ ॥ कलिं सभाजयन्त्यार्या गुण ज्ञाः सारभागिनः । यत्र सङ्कीर्तनेनैव सर्वस्वार्थोऽभिलभ्यते ॥ ३६ ॥ अवधारीं राया सर्वज्ञा । धन्य धन्य कलियुग जाणा । जेथ सर्व स्वार्थ हरिकीर्तना-। नामस्मरणासाठीं होती ॥ ३ ॥ कलियुगीं दोष बहुत । केवीं कीर्तनें होय स्वार्थ । तेथें दोषत्यागें जे गुण घेत । ते नित्यमुक्त हरिकीर्तनीं ॥ ४ ॥ हरिकीर्तनें शुध्द चित्त । दोषत्यागें गुण संग्रहीत । ऐसे सारभागी कलियुगांत । परममुक्त हरिकीर्तने ॥ ५ ॥ कलीच्या गुणांतें जाणते । नामें मोक्ष जोडणें येथें । जाणोनि करिती कीर्तनातें । ते जाण निश्र्चितें नित्यमुक्त ॥ ६ ॥ कलियुगीं हेंचि सार । नाम स्मरावें निरंतर । करिती नामाचा निजगजर । ते मुक्त नर नृपनाथा ॥ ७ ॥ स्‌ंमत श्लोक - ध्यायन्‌ कृते यजन्यज्ञैस्त्रेतायां द्वापरेऽर्चयन्‌ । यदाप्नोति कलौ संकीर्त्य केशवम्‌ ॥ कृतयुगीं शमदमादिसाधन । त्रेतायुगीं वेदोक्त यज्ञ । व्दापरीं आगमोक्त पूजन । तंत्रविधान विधियुक्त ॥ ८ ॥ यापरी त्रियुगीं जना । परम संकट साधना । करितांही परी मना । अणुमात्र जाणा उपरमु नव्हे ॥ ९ ॥ तीं अवघींच साधनें । कलीनें लाजविलीं कीर्तनें । जेथ गातां नाचतां आपणें । वश्य करणें परमात्मा ॥ ४१० ॥ आखरीं हुंबळी गुणें । ऐकतां गोवळांचें गाणें । देव भुलला जीवेंप्राणें । त्यांसवें नाचणें स्वानंदें ॥ ११ ॥ कृष्णा कान्हो गोपाळा । या आरुष नामांचा चाळा । घे‌ऊन गर्जती वेळोवेळां । तेणें घनसांवळा सुखावे ॥ १२ ॥ तेणें सुखाचेनि संतोषें । देवो परमानंदें उल्हासे । एवं कलियुगीं कीर्तनवशें । भक्त अनायासें उध्दरती ॥ १३ ॥ कीर्तन‍आवर्तनमेळीं । जळती पापांच्या वडवाळी । भक्त उध्दरती तत्काळीं । हरिनामें कलि दाटुगा ॥ १४ ॥ कलियुगीं हेचि थोरी । नामसंकीर्तनावारी । चहूं वर्णां मुक्त करी । तेथ न विचारी स्त्री शूद्र ॥ १५ ॥ वेदु अत्यंत कृपणु जाला । त्रिवर्णांचे कानीं लागला । स्त्रीशूद्रादिकांसी अबोला । धरूनि ठेला अद्यापि ॥ १६ ॥ तें वेदाचें अतिन्यून । उध्दरीं हरिनामकीर्तन । स्त्री शूद्र अंत्यज जन । उध्दरण हरिनामें ॥ १७ ॥ कीर्तनें स्वधर्मु वाढे । कीर्तनें स्वधर्मु जोडे । कीर्तनें परब्रह्म आतुडे । मुक्ति कीर्तनापुढें लाजोनि जाय ॥ १८ ॥ कीर्तनानंदें चारी मुक्ति । हरिभक्तांतें वरूं येती । भक्त त्यांतें उपेक्षिती । तरी पायां लागती दास्यत्वें ॥ १९ ॥ एवढी कलियुगीं प्रचीती । कीर्तनाची परम ख्याती । राया जाण गा निश्र्चितीं । विकल्प चित्तीं झणें धरिसी ॥ ४२० ॥ कृतत्रेताव्दापारासी । निषेधु नाहीं नामासी । कलियुगीं नामापाशीं । चारी मुक्ती दासी स्वयें होती ॥ २१ ॥ न ह्यतः परमो लाभो देहिनां भ्राम्यतामिह । यतो विन्देत परमां शान्तिं नश्यति संसृतिः ॥ ३७ ॥ जे जन्ममरणांच्या आवर्तीं । पडिले संसारी सदा भ्रमती । त्या प्राणियां कलियुगाप्रती । कीर्तनें गती नृपनाथा ॥ २२ ॥ कलियुगीं कीर्तनासाठीं । संसाराची काढूनि कांटी । परमशांतिसुखसंतुष्टीं । पडे मिठी परमानंदीं ॥ २३ ॥ ऐसा कीर्तनीं परम लाभु । शिणतां सुरनरां दुर्लभु । तो कलियुगीं झाला सुलभु । यालागी सभाग्यां लोभु हरिकीर्तनीं ॥ २४ ॥ ’कीर्तनास्तव चारी मुक्ती । भक्तांपासीं वोळंगती । हें न घडे ’ कोणी म्हणती । ऐक ते स्थिती नृपनाथा ॥ २५ ॥ कीर्तनीं हरिनामाचा पाठा । तेणें देवासी संतोष मोठा । वेगीं सांडोनि वैकुंठा । धांवे अवचटा कीर्तनामाजीं ॥ २६ ॥ हरिकीर्तना लोधला देवो । विसरला वैकुंठा जावों । तोचि आवडला ठावो । भक्तभावो देखोनी ॥ २७ ॥ जेथ राहिला यदुनायक । तेथेचि ये वैकुंठलोक । यापरी मुक्ति ’सलोक’ । कीर्तनें देख पावती भक्त ॥ २८ ॥ नामकीर्तन-निजगजरीं । भक्तां निकट धांवे श्रीहरी । तेचि ’समीपता’ मुक्ति खरी । भक्तांच्या करीं हरिकीर्तनें ॥ २९ ॥ कीर्तनें तोषला अधोक्षज । भक्ता प्रत्यक्ष गरुडध्वज । श्याम पीतवासा चतुर्भुज । तें ध्यान सहज ठसावे ॥ ४३० ॥ भक्तु कीर्तन करी जेणें ध्यानें । तें ध्यान दृढ ठसावें मनें । तेव्हां देवाचीं निजचिन्हें । भक्तें पावणें संपूर्ण ॥ ३१ ॥ श्याम चतुर्भुज पीतांबरधारी । शंखचक्रादि आयुधें करीं । हे ’सरूपता’ भक्तातें वरी । कीर्तनगजरीं भाळोनी ॥ ३२ ॥ तेव्हां देव भक्त समसमान । समान अवयव सम चिन्ह । भावें करितां हरिकीर्तन । एवढें महिमान हरिभक्तां ॥ ३३ ॥ दोघां एकत्र रमा देखे । देवो कोण तेंही नोळखे । ब्रह्मा नमस्कारीं चवके । देवो तात्विकें न कळे त्यासी ॥ ३४ ॥ भावें करितां हरिकीर्तन । तेणें संतोषे जनार्दन । उभयतां पडे आलिंगन । मिठी परतोन सुटेना ॥ ३५ ॥ तेव्हां सबाह्यांतरीं । देवो प्रगटे चराचरीं । दुजें देखावया संसारीं । सर्वथा उरी उरेना ॥ ३६ ॥ वृत्ति स्वानंदीं निमग्न । परतोनि कदा नव्हे भिन्न । ’सायुज्यमुक्ति’ या नांव पूर्ण । जेणें दुजेपण असेना ॥ ३७ ॥ ऐशी लाहूनि पूर्ण सायुज्यता । तो जैं करी हरिकथा । ते कथेची तल्लीनता । जीवां समस्तां अतिप्रिय ॥ ३८ ॥ यापरी हरिकीर्तनापासीं । चारी मुक्ती होती दासी । भक्त लोधले हरिभजनसी । सर्वथा मुक्तीसी न घेती ॥ ३९ ॥ एवं योगयागादि तपसाधनें । पोरटीं केलीं हरिकीर्तनें । कलियुगीं नामस्मरणें । जड उध्दारणें हरिकीर्तनीं ॥ ४४० ॥ कृतादिषु प्रजा राजन्कलाविच्छन्ति सम्भवम्‌ । कलौ खलु भविष्यन्ति नारायणपरायणाः ॥ ३८ ॥ कीर्तनासाठीं चारी मुक्ति । हेचि कलियुगीं मुख्य भक्ति । यालागीं इंद्रादि देवपंक्ति । जन्म इच्छिती कलियुगीं ॥ ४१ ॥ स्वर्ग नव्हे भोगस्थान । हें विषयाचें बंदिखान । कलियुगीं सभाग्य जन । जन्मोनि कीर्तन हरीचें करिती ॥ ४२ ॥ जेथीच्या जन्मा देव सकाम । तेथ कृतादि युगींचे उत्तमोत्तम । प्रजा अवश्य वांछिती जन्म । कीर्तनधर्म निजभजना ॥ ४३ ॥ कृतयुगींचे सभाग्य जन । यागीं पावले स्वर्गस्थान । तेही कलियुगीचें जाण । जन्म आपण वांछिती ॥ ४४ ॥ कृत त्रेत आणि व्दापर । तेथीलही मुख्य नर । कलियुगीं जन्म तत्पर । निरंतर वांछिती ॥ ४५ ॥ तैंचे लोक करिती गोष्टी । चारी पुरुषार्थ कीर्तनासाठीं । कलियुगीं हे महिमा मोठी । धन्य धन्य सृष्टीं कलियुग ॥ ४६ ॥ जे असती धन्यभागी । ते जन्म पावती कलियुगीं । ऐसें कलीच्या जन्मालागीं । नर-सुर-उरगीं उत्कंठा ॥ ४७ ॥ तरावया दीन जन । कलीमाजीं श्रीनारायाण्‌ । नामें छेदी भवबंधन । तारी हरिकीर्तन सकळांसी ॥ ४८ ॥ यालागीं कलिमाजीं पाहीं । श्रध्दा हरिकीर्तनाच्या ठायीं । जन तरती सुखोपायीं । संदेहो नाहीं नृपनाथा ॥ ४९ ॥ कलियुगीं बहुसाल नर । होतील नारायणीं तत्पर । भक्तीचें भोज विचित्र । स्त्रीशूद्र माजविती ॥ ४५० ॥ क्वचित्क्वचिन्महाराज द्रविडेषु च भूरिशः । ताम्रपर्णी नदी यत्र कृतमाला पयस्विनी ॥ ३९ ॥ कावेरी च महापुण्या प्रतीची च महानदी । ये पिबन्ति जलं तासां मनुजा मनुजेश्वर । प्रायो भक्ता भगवति वासुदेवेऽमलाशयाः ॥ ४० ॥ विशेषें द्रविड देशाचे ठायीं । अतिशयें भक्ति वाढेल पाहीं । तेथेंही तीर्थविशेष भुयी । ते ते ठायीं अति‌उत्कट ॥ ५१ ॥ ताम्रपर्णीच्या तीरीं । हरिभक्तीची अगाध थोरी । कृतमालेच्या परिसरीं । उत्साहेंकरीं हरिभक्ति नांदे ॥ ५२ ॥ निर्मळजळा पयस्विनी । जीचिये पयःप्राशनीं । वृत्ति वाढे हरिचरणीं । दृढ भगवभ्दजनीं बुध्दी ॥ ५३ ॥ देखतां कावेरीची थडी । पळती पापांचिया कोडी । जेथ श्रीरंग वसे आवडीं । तेथें भक्ति दुथडी उभ्दट नांदे ॥ ५४ ॥ प्रतीचीमाजीं देतां बुडी । चित्तशुध्दि जोडे रोकडी । भजन वाढे चढोवढी । भक्तीची गुढी वैकुंठीं उभारे ॥ ५५ ॥ ऐकें नरवरचूडामणी । या पंचनदींचिया तीर्थस्त्रानीं । अथवा पयःप्राशनीं । भगवभ्दजनीं दृढ बुध्दी ॥ ५६ ॥ या तीर्थांचें केल्या दर्शन । होय कलिमलक्षालन । केल्या स्त्रान पयःप्राशन । भगवभ्दजन उल्हासे ॥ ५७ ॥ दर्शन स्पर्शन स्त्रान । या तीर्थींचें करितां जाण । वासुदेवीं निर्मळ भजन । नित्य नूतन दृढ वाढे ॥ ५८ ॥ यापरी जे भगवभ्दक्त । ते ऋणत्रयासी निर्मुक्त । सुरनरपितरां पंगिस्त । हरिभक्त कदा नव्हती ॥ ५९ ॥ देवर्षिभूताप्तनृणां पित्‍ईणां न किङ्करो नायमृणी च राजन्‌ । सर्वात्मना यः शरणं शरण्यं गतो मुकुन्दं परिहृत्य कर्तम्‌ ॥ ४१ ॥ शरणागता निजशरण्य । मुकुंदाचे श्रीचरण । सभ्दावें रिघाल्या शरण । जन्ममरण बाधीना ॥ ४६० ॥ जेथ बाधीना जन्ममरण । तेथें देव-ऋषि-आचार्य-पितृगण । यांच्या ऋणांचा पाड कोण । ते झाले उत्तीर्ण भगवभ्दजनें ॥ ६१ ॥ जो विनटला हरिचरणीं । तो कोणाचा नव्हे ऋणी । जेवीं परिसाचिये मिळणीं । लोह काळेपणीं निर्मुक्त ॥ ६२ ॥ सकळ पापांपासूनी । सुटिजे जेवीं गंगास्त्रानीं । तेवीं विनटल्या हरिचरणीं । निर्मुक्त त्रै‌ऋणीं भगवभ्दक्त ॥ ६३ ॥ भावें करितां भगवभ्दक्ती । सकळ पितर उध्दरती । ऋषीश्र्वरां नित्य तृप्ती । भगवभ्दक्ति-स्वानंदें ॥ ६४ ॥ स्वानंदें भगवभ्दक्ती । तेणें सर्व भूतें सुखी होती । पुत्रें केल्या भगवभ्दक्ती । आप्त उध्दरती मातापितरें ॥ ६५ ॥ सकळ देवांचा नियंता । अति‌उल्हासें त्यातें भजतां । देव‌ऋणाची वार्ता । भगवभ्दक्तां बाधीना ॥ ६६ ॥ ज्यांसी अनन्य भगवभ्दजन । ते कदा नव्हती कर्माधीन । कर्म ज्याचे आज्ञाधीन । त्या हरीसी शरण जो झाला ॥ ६७ ॥ तो नव्हे कर्माचा सेवक । नव्हे देवांचा पा‌इक । नव्हे प्राकृताचा रंक । अनन्य भाविक हरिभक्त ॥ ६८ ॥ जो हरीचा शरणागत । तो कोणाचा नव्हे अंकित । कर्माकर्मीं तो अलिप्त । नित्यमुक्त ऋणत्रयासी ॥ ६९ ॥ वासुदेव सर्वां भूतीं । हे दृढ ठसावे प्रतीती । यालागीं अलिप्त कर्मगती । सकळ ऋणनिर्मुक्ती भगवभ्दक्तां ॥ ४७० ॥ स्वपादमूलम्भजतः प्रियस्य त्यक्तान्यभावस्य हरिः परेशः । विकर्म यच्चोत्पतितं कथञ्चिद्धुनोति सर्वं हृदि सन्निविष्टः ॥ ४२ ॥ सांडूनि देहाच्या अभिमाना । त्यजूनि देवतांतरभजना । जे अनन्य शरण हरिचरणां । ते कर्मबंधना नातळती ॥ ७१ ॥ यापरी जे अनन्य शरण । तेचि हरीसी पढियंते पूर्ण । हरिप्रियां कर्मबंधन । स्वप्नींही जाण स्पर्शों न शके ॥ ७२ ॥ राया म्हणसी ’भगवभ्दक्त । विहितकर्मीं नित्यनिर्मुक्त ’ । ते जरी विकर्म आचरत । तरी प्रायश्र्चित्त न बाधी त्यांसी ॥ ७३ ॥ जेवीं पंचाननाचें पिलें । न वचे मदगजांचेनि वेढिलें । तेवीं हरिप्रियीं विकर्म केलें । त्यांसी न वचे बांधिलें यमाचेनि ॥ ७४ ॥ स्मरतां एक हरीचें नाम । महापातक्यां वंदी यम । मा हरीचे पढियंते परम । तयां विकर्में यम केवीं दंडी ॥ ७५ ॥ आशंका ॥ ’वेदाज्ञा विष्णूची परम । वेदें विहिलें धर्माधर्म । भक्त आचरतां विकर्म । केवीं वेदाज्ञानेम न बाधी त्यांसी ’ ॥ ७६ ॥ जेवीं रायाचा सेवक आप्त । ति व्दारपाळां नव्हे अंकित । तेथ रायाचा पढियंता सुत । त्यांचा पंगिस्त तो केवीं होय ॥ ७७ ॥ हरिनामाचें ज्यासी स्मरण । वेद त्याचे वंदी चरण । मा जो हरीचा पढियंता पूर्ण । त्यासी वेदविधान कदा न बाधी ॥ ७८ ॥ भक्तापासूनि विकर्मस्थिती । कदा न घडे गा कल्पांतीं । अवचटें घडल्या दैवगतीं । त्या कर्मा निर्मुक्ति अच्युतस्मरणें ॥ ७९ ॥ बाधूं न शके कर्माकर्म । ऐसा कोण भागवतधर्म । ते भक्तीचें निजवर्म । उत्तमोत्तम अवधारीं ॥ ४८० ॥ त्यजूनि देहाभिमानवोढी । सर्वां भूतीं हरिभक्ति गाढी । तो कर्माकर्में पायीं रगडी । मुक्ति पाय झाडी निजकेशीं ॥ ८१ ॥ तो ज्याकडे कृपादृष्टीं पाहे । त्याचें निर्दळे भवभये । तो जेथ म्हणे राहें । तेथें लाहे मुक्तिसुख ॥ ८२ ॥ त्याचेनि अनुग्रहकरीं । देव प्रगटे दीनाच्या अंतरीं । त्याच्या कर्माकर्माची बोहरी । स्वयें श्रीहरी करूं लागे ॥ ८३ ॥ जेवीं प्रगटल्या दिनमणी । अंधार जाय पळोनी । राम प्रगटल्या हृद्‍यभुवनीं । कर्माकर्मधुणी सहजचि ॥ ८४ ॥ भगवंताची नामकीर्ति । याचि नामें परम भक्ति । भक्तीपाशीं चारी मुक्ति । दासीत्वें वसती नृपनाथा ॥ ८५ ॥ ऐकोनि भक्तीची पूर्ण स्थिती । रोमांचित झाला नृपती । आनंदाश्रु नयनीं येती । सुखावलिया वृत्तीं डुल्लतु ॥ ८६ ॥ आंगतां वैदेहाची स्थिती । नारदु सुखावे निजचित्तीं । तो उल्हासें वसुदेवाप्रती । सांगे समाप्ति इतिहासाची ॥ ८७ ॥ श्रीनारद उवाच । धर्मान्‌ भागवतानित्थं श्रुत्वाथ मिथिलेश्वरः । जायन्तेयान्‌ मुनीन्‌ प्रीतः सोपाध्यायो ह्यपूजयत्‌ ॥ ४३ ॥ नारद इतिहास सांगतु । तेवींच आनंदें डुल्लतु । तेणें आनंदें बोलतु । भक्तीचें मथितु वसुदेवाप्रती ॥ ८८ ॥ यापरी जयंतीसुतीं । भगवंताची उभ्दट भक्ती । सांगितली परम प्रीतीं । मिथिलेशाप्रती निजबोधें ॥ ८९ ॥ ऐकोनि त्यांचिया वचना । सुख जाहलें विदेहाचिया मना । मग अतिप्रीतीं पूजना । जयंतीनंदनां पूजिता झाला ॥ ४९० ॥ श्रवणें जाहली अतिविश्रांती । तेणें पूजेलागीं अतिप्रीती । विदेहा उल्हासु चित्तीं । स्वानंदस्थितीं पूजिता झाला ॥ ९१ ॥ पूजेचा परम आदरु । जयंतीनंदना केला थोरु । उपाध्याय जो अहल्याकुमरु । तेणेंही अत्यादरु पूजेसी केला ॥ ९२ ॥ ततोऽन्तर्दधिरे सिद्धाः सर्वलोकस्य पश्यतः । राजा धर्मानुपातिष्ठन्नवाप परमां गतिम्‌ ॥ ४४ ॥ यापरी ते भागवतश्रेष्ठ । नवही जण अतिवरिष्ठ । समस्तां देखतांचि स्पष्ट । झाले अदृष्ट ऊर्ध्वगमनें ॥ ९३ ॥ ते भागवतधर्मस्थितीं । अनुष्ठूनि भगवभ्दक्ती । राजा पावला परम गती । पूर्णप्राप्ती निजबोधें ॥ ९४ ॥ भावें करितां भगवभ्दक्ती । देहीं प्रगटे विदेहस्थिती । ते पावोनि नृपती । परम विश्रांती पावला ॥ ९५ ॥ त्वमप्येतान्‌ महाभाग धर्मान्‌ भागवतान्‌ श्रुतान्‌ । आस्थितः श्रद्धया युक्तो निःसङ्गो यास्यसे परम्‌ ॥ ४५ ॥ सकळ भाग्यांचिया पंक्ती । जेथें ठाकल्या येती विश्रांती । ते वसुदेवा भाग्यस्थिती । तुझ्या घराप्रती क्रीडत ॥ ९६ ॥ वसुदेवा तुझेनि नांवें । देवातें ’वासुदेव’ म्हणावें । तेणें नामाचेनि गौरवें । जनांचे आघवे निरसती दोष ॥ ९७ ॥ येवढ्या भाग्याचा भाग्यनिधि । वसुदेवा तूंचि त्रिशुध्दि । तुवां भागवतधर्माचा विधि । आस्तिक्यबुध्दीं अवधारिला ॥ ९८ ॥ श्रध्देनें केलिया वस्तुश्रवणा । मननयुक्त धरावी धारणा । तैं निःसंग हो‌ऊनियां जाणा । पावसी तत्क्षणा निजधामासी ॥ ९९ ॥ जया निजधामाच्या ठायीं । कार्य कारण दोन्ही नाहीं । त्या परम पदाचे ठायीं । निजसुखें पाहीं सुखरूप होसी ॥ ५०० ॥ युवयोः खलु दम्पत्योर्यशसा पूरितं जगत्‌ । पुत्रतामगमद्यद्वां भगवानीश्वरो हरिः ॥ ४६ ॥ तुम्हां दांपत्याचिये कीर्ती । यशासी आली श्रीमंती । तुमचे यशें त्रिजगती । परमानंदें क्षिती परिपूर्ण झाली ॥ १ ॥ ज्यालागीं कीजे यजन । ज्यालागीं दीजे दान । ज्यालागीं कीजे तपाचरण । योगसाधन ज्यालागीं ॥ २ ॥ जो न वर्णवे वेदा शेषा । जो दुर्लभ सनकादिकां । त्या पुत्रत्वें यदुनायका । उत्संगीं देखा खेळविसी ॥ ३ ॥ जो कळिकाळाचा निजशास्ता । जो ब्रह्मादिकांचा नियंता । जो संहारकाचा संहर्ता । जो प्रतिपाळिता त्रिजगती ॥ ४ ॥ जो सकळ भाग्याचें भूषण । जो सकळ मंडणां मंडण । षडूगुणांचें अधिष्ठान । तो पुत्रत्वें श्रीकृष्ण सर्वांगीं लोळे ॥ ५ ॥ दर्शनालिङ्गनालापैः शयनासनभोजनैः । आत्मा वां पावितः कृष्णे पुत्रस्नेहं प्रकुर्वतोः ॥ ४७ ॥ परब्रह्ममूर्ति श्रीकृष्ण । सादरें करितां अवलोकन । तेणें दृष्टि होय पावन । डोळ्यां संपूर्ण सुखावबोधु ॥ ६ ॥ कृष्णमुखींचीं उत्तरें । प्रवेशतां कर्णव्दारें । पवित्र झालीं कर्णकुहरें । कृष्णकुमरें अनुवादें ॥ ७ ॥ आळवितां श्रीकृष्ण कृष्ण । अथवा कृष्णेंसीं संभाषण । तेणें वाचा झाली पावन । जैसें गंगाजीवन संतप्तां ॥ ८ ॥ नाना यागविधीं यजिती ज्यातें । तेथ न घे जो अवदानातें । तो वारितांही दोंहीं हातें । बैसे सांगातें भोजनीं कृष्ण ॥ ९ ॥ दुर्लभु योगयागीं । तो वेळ राखे भोजनालागीं । मुखींचें शेष दे तुम्हांलागीं । लागवेगीं बाललीला ॥ ५१० ॥ तेणें संतप्त संतोखी । तोही ग्रास घाली तुम्हां मुखीं । तुम्हां ऐसें भाग्य त्रिलोकीं । नाहीं आणिकीं अर्जिलें ॥ ११ ॥ तेणें कृष्णशेषामृतें । रसना विटों ये अमृतातें । मा इतर रसा गोड तेथें । कोण म्हणतें म्हणावया ॥ १२ ॥ तेणें श्रीकृष्णरसशेषें । अंतरशुध्दि अनायासें । जें नाना तपसायासें । अतिप्रयासें न लभे कदा ॥ १३ ॥ देतां कृष्णाशीं चुंबन । तेणें अवघ्राणें घ्राण पावन । चुंबितांचि निवे मन । स्वानंद पूर्ण उल्हासे ॥ १४ ॥ तुम्हां बैसले देखे आसनीं । कृष्ण सवेग ये धांवोनी । मग अंकावरी बैसोनी । निजांगमिळणीं निववी कृष्णु ॥ १५ ॥ तेणें श्रीकृष्णाचेनि स्पर्शें । सर्वेंद्रियीं कामु नासे । तेणें कर्मचि अनायासें । होय आपैसें निष्कर्म ॥ १६ ॥ सप्रेमभावें संलग्न । देतां श्रीकृष्णासी आलिंगन । तेणें देहाचें देहपण । मीतूंस्फुरण हारपे ॥ १७ ॥ शयनाच्या समयरूपीं । जना गाढ मूढ अवस्था व्यापी । ते काळीं तुम्हांसमीपीं । कृष्ण सद्रूपीं संलग्न ॥ १८ ॥ योगी भावना भावून । कर्म कल्पिती कृष्णार्पण । तुमचीं सकळ कर्में जाण । स्वयें श्रीकृष्ण नित्यभोक्ता ॥ १९ ॥ पुत्रस्नेहाचेनि लालसें । सकळ कर्में अनायासें । स्वयें श्रीकृष्ण सावकाशें । परम उल्हासें अंगीकारी ॥ ५२० ॥ तुमची पवित्रता सांगों कैसी । पवित्र केलें यदुवंशासी । पुत्रत्वें पाळूनि श्रीकृष्णासी । जगदुध्दारासी कीर्ति केली ॥ २१ ॥ नाम घेतां ’वसुदेवसूनु’ । स्मरतां ’देवकीनंदनु’ । होय भवबंधच्छेदनु । ऐसें पावनु नाम तुमचें ॥ २२ ॥ तुम्ही तरा अनायासीं । हें नवल नव्हे विशेषीं । केवळ जे का कृष्णव्देषी । ते वैरी अनायासीं विरोधें तरती ॥ २३ ॥ वैरेण यं नृपतयः शिशुपालपौण्ड्र । शाल्वादयो गतिविलासविलोकनाद्यैः । ध्यायन्त आकृतधियः शयनासनादौ । तत्साम्यमापुरनुरक्तधियां पुनः किम्‌ ॥ ४८ ॥ शिशुपाल दंतवक्र । पौंड्रक-शाल्वादि महावीर । कृष्णासीं चालविती वैर । व्देषें मत्सरें ध्यान करिती ॥ २४ ॥ घनश्याम पीतांबर कटे । विचित्रालंकारीं कृष्णु नटे । गदादि आयुधीं ऐसा वेठे । अतिबळें तगटे रणभूमीसी ॥ २५ ॥ ऐसें वैरवशें उभ्दट । क्रोधें कृष्णध्यान उत्कट । ते वैरभावें वरिष्ठ । तद्रूपता स्पष्ट पावले व्देषें ॥ २६ ॥ कंसासी परम भयें जाण । अखंड लागलें श्रीकृष्णध्यान । अन्नपान शयनासन । धाकें संपूर्ण श्रीकृष्ण देखे ॥ २७ ॥ कंसास्‌ उर भयावेशें । शिशुपाळादिक महाव्देषें । सायुज्य पावले अनायासें । मा श्रध्दाळू कैसे न पावती मोक्ष ॥ २८ ॥ तुम्ही तरी परम प्रीतीं । चित्तें वित्तें आत्मशक्तीं । जीवें वोवाळां श्रीपति । पायां ब्रह्मप्राप्ति तुमच्या लागे ॥ २९ ॥ पूर्ण प्राप्ति तुम्हांपासीं । ते तुमची न कळे तुम्हांसी । बालक मानितां श्रीकृष्णासी । निजलाभासी नाडणें ॥ ५३० ॥ मापत्यबुद्धिमकृथाः कृष्णे सर्वात्मनीश्वरे । मायामनुष्यभावेन गूढैश्वर्ये परेऽव्यये ॥ ४९ ॥ तुम्ही बाळकु माना श्रीकृष्ण । हा भावो अतिकृपण । तो परमात्मा परिपूर्ण । अवतरला निर्गुण कृष्णावतारें ॥ ३१ ॥ यासी झणें म्हणाल लेकरूं । हा ईश्र्वराचा ईश्र्वरु । सर्वात्मा सर्वश्र्वरु । योगियां योगींद्रु श्रीकृष्ण ॥ ३२ ॥ हा अविकारु अविनाशु । परात्परु परमहंसु । इंद्रियनियंता हृषीकेशु । जगन्निवासु जगदात्मा ॥ ३३ ॥ मायामनुष्यवेषाकृती । हा भासताहे सकळांप्रती । गूढ‍ऐश्र्वर्य महामूर्ती । व्यापक त्रिजगतीं गुणातीतु ॥ ३४ ॥ भूभारासुरराजन्य हन्तवे गुप्तये सताम्‌ । अवतीर्णस्य निर्वृत्यै यशो लोके वितन्यते ॥ ५० ॥ काळयवनादि असुर । कां जरासंधादि महावीर । अथवा राजे अधर्मकर । अतिभूभार सेना ज्यांची ॥ ३५ ॥ तो उतरावया धराभार । धर्म वाढवावया निर्विकार । संतसंरक्षणीं शार्ग्ड़धर । पूर्णावतार श्रीकृष्ण ॥ ३६ ॥ प्रतिपाळावया निजभक्तांसी । सुख द्यावया साधूंसी । अवतरला यदुवंशीं । हृषीकेशी श्रीकृष्ण ॥ ३७ ॥ तो असुरगजपंचाननु । सज्जनवन‍आनंदघनु । तुमच्या उदरीं श्रीकृष्णु । अवतार पूर्णु पूर्णांशेंसीं ॥ ३८ ॥ उध्दरावया त्रिजगती । थोर उदार केली कीर्ती । ज्याच्या अवताराची ख्याती । पवाडे पढती ब्रह्मादिक ॥ ३९ ॥ तरावया अतिदुस्तर । ज्याची कीर्ति गाती सुरनर । परमादरें ऋषीश्र्वर । कृष्णचरित्र सर्वदा गाती ॥ ५४० ॥ ज्याचें नाम स्मरतां भक्त । कळिकाळ नागवत । तो अवतार श्रीकृष्णनाथ । तुम्हांआंत प्रगटला ॥ ४१ ॥ श्रीकृष्ण परब्रह्मैकनिधी । त्यासी पाहूंनका बाळबुध्दीं । इतुकेन तुम्ही भवाब्धी । जाणा त्रिशुध्दी तरलेती ॥ ४२ ॥ ऐशी श्रीकृष्ण‍अवतारकथा । नारद वसुदेवा सांगतां । शुक म्हणे गा नृपनाथा । विस्मयो समस्तां थोर झाला ॥ ४३ ॥ श्रीशुक उवाच । एतत्‌ श्रुत्वा महाभागो वसुदेवोऽतिविस्मितः । देवकी च महाभागा जहतुर्मोहमात्मनः ॥ ५१ ॥ निमिजायंत मुनिगण । इतिहास पुरातन जीर्ण । कृष्ण परमात्मा ब्रह्म पूर्ण । नारद आपण निरूपी हर्षें ॥ ४४ ॥ शुक म्हणे परीक्षिती । ऐकोनि नारदवचनोक्ती । देवकीवसुदेवो चित्तीं । अतिविस्मितीं तटस्थ ॥ ४५ ॥ तया नारदाचेनि वचनें । कृष्ण परमात्मा बोलें येणें । देवकी वसुदेव निजपनें । दोघें जणें विस्मित ॥ ४६ ॥ तीं परम भाग्यवंत दोन्ही । जो पुत्रस्नेहो होता श्रीकृष्णीं । तो सांडोनियां तत्क्षणीं । कृष्णपरब्रह्मपणीं निश्र्चयो केला ॥ ४७ ॥ श्रीकृष्णीं ब्रह्मभावो । धरितां निःशेष मोहस्नेहो । हृद्‍यींचा निघोनि गेला पहा हो । बाप नवलावो भाग्याचा ॥ ४८ ॥ इतिहासमिमं पुण्यं धारयेद्यः समाहितः । स विधूयेह शमलं ब्रह्मभूयाय कल्पते ॥ ५२ ॥ इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥ जो निमिजायंतसंवादु । वसुदेवा सांगे नारदु । हा इतिहास अतिशुध्दु । जीवशिवभेदुच्छेदकु ॥ ४९ ॥ सावधानपणें श्रोता । तल्लीन हो‌ऊनि तत्वतां । हे इतिहासाची कथा । सादरता जो परिसे ॥ ५५० ॥ तेणें सकळ पुण्यांचिया राशी । श्रवणें जोडिल्या अहर्निशीं । तो गा पुरुषु अवश्यतेसी । ब्रह्मप्राप्तीसी सत्पात्र ॥ ५१ ॥ सार्थक एक एक पद । परिसतां होय अंतर शुध्द । यालागीं पावे ब्रह्मपद । परमानंद निजबोधें ॥ ५२ ॥ हे ’पंचाध्यायी’ म्हणणें घडे । पंचवक्त्र चंद्रचूडें । एकादशाचें ज्ञान गाढें । वर्णावया फुडें ध्वज उभविला ॥ ५३ ॥ हे पंचाध्यायी नव्हे जाण । एकादशाचे पंचप्राण । उपदेशावया शुध्द ज्ञान । सामोरे आपण स्वभक्तां आले ॥ ५४ ॥ हे पंचाध्यायी नव्हे केवळ । पंचम आलापे शुककोकिळ । एकादश वसंतकाळ । भक्त-अलिकुळ आलापवी स्वयें ॥ ५५ ॥ हाही नव्हे प्रकार । हे शर्करा पंचधार । चाखों धाडिली सत्वर । ज्ञानगंभीर निजभक्त ॥ ५६ ॥ हे पंचाध्यायी नव्हे सिध्द । एकादशाचे पंच गंध । भक्त आंवतावया शुध्द । धाडिली प्रसिध्द गंधाक्षता ॥ ५७ ॥ एकादश अतिविवेकी । यावया पंचाध्यायी पालखी । पुढें धाडिली कवतुकीं । निजभक्तविखीं कृपाळुवें ॥ ५८ ॥ हे कृष्ण-उध्दव‍अर्धमात्रा । अर्धोद्‍यो महायात्रा । ते यात्रेलागीं हांकारा । पंचाध्यायी खरा साधकां करी ॥ ५९ ॥ श्रीकृष्ण‍उध्दवमेळा । देखोनि ब्रह्मसुखाचा सोहळा । तो सांगों आली कळवळा । भक्तांजवळां पंचाध्यायी ॥ ५६० ॥ अहंकाराचें मेट होतें । तें उठवूनि श्रीकृष्णनाथें । केलें आत्मतीर्थें मुक्तें । अभयहस्तें उध्दवासी ॥ ६१ ॥ ते मुक्ततीर्थनवा‌ई । पुढें सांगों आली पंचाध्यायी । संसारश्रांत जे जे कांहीं । ते धांवा लवलाहीं विश्रांतीसी ॥ ६२ ॥ कृष्ण‍उध्दवगोडगोष्टी । हे निर्विकल्प कपिलाषष्ठी । ते पर्वकाळकसवटी । सांगों उठा‌उठीं पंचाध्यायी आली ॥ ६३ ॥ उध्दवालागीं भवसागरीं । उतरावया पाय‍उतारीं । भागवतमिषें श्रीहरी । सुगम सोपारी पायवाट केली ॥ ६४ ॥ पव्हणियाहूनि पाय‍उतारा । भागवतमार्ग अतिसोपरा । तो मार्गु दावावया पुरा । हांकारी स्त्रीशूद्रां पंचाध्यायी ॥ ६५ ॥ पुढील निरूपण‍आवडी । अतिशयें वाढे चढोवढी । ते कृष्णवाक्यरसगोडी । पंचाध्यायी फुडी साधावया सांगे ॥ ६६ ॥ कृष्ण‍उध्दवसंवादीं । हो‌ईल परब्रह्म-गवादी । साधकमुमुक्षांची मांदी । धांवे त्रिशुध्दी निजसुखार्थ ॥ ६७ ॥ परब्रह्म झालें सावेव । स्वरूपसुंदर ज्ञानगौरव । मनोहर रूपवैभव । स्वर्गींचे देव पाहों येती ॥ ६८ ॥ तो देवांचा स्तुतिवादु । सवेंचि उध्दवाचा निर्वेदु । कृष्ण‍उध्दवमहाबोधु । जेणें परमानंदु वोसंडे ॥ ६९ ॥ ते पुढील अध्यायीं कथा । रसाळ सांगेन आतां । अवधान द्यावें श्रोतां । ग्रंथार्था निजबोधें ॥ ५७० ॥ स्वयें वावडी करूनि पूर्ण । तिसी उडविजे जेवीं आपण । मग उडालेपणें जाण । आपल्या आपण संतोषिजे ॥ ७१ ॥ तेवीं मजनांवें कविता । करूनि स्वयें सग्दुरु वक्ता । एवं वदवूनियां ग्रंथार्था । श्रोतेरूपें सर्वथा संतोषे स्वयें ॥ ७२ ॥ तो एकपणेंवीण एकला एका । दुजेनवीण जनार्दनु सखा । तेणें पुढील ग्रंथ‍आवांका । विशदार्थें देखा विवंचिला ॥ ७३ ॥ नातळोनि दुजेपण । एका जनार्दना शरण । धरोनि श्रोत्यांचे चरण । पुढील अनुसंधान पावेल ॥ ७४ ॥ एका जनार्दन नांवें देख । दों नांवीं स्वरूप एक । हें जाणे तो आवश्यक । परम सुख स्वयें पावे ॥ ७५ ॥ एकाजनार्दना शरण । त्याची कृपा परिपूर्ण । पंचाध्यायी निरूपण । झाली संपूर्ण जनार्दनकृपा ॥ ५७६ ॥ इति श्रीमद्‍भागवते महापुराणे एकादशस्कंधे वसुदेवनारदसंवादे एकाकार-टीकायां पंचमोऽध्यायः ॥ ५ ॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक ५२ ॥ ओव्या ५७६ ॥

Contribute to Sant Shri Eknath Maharaj Mission

You can donate to the bank account given below

Name of Account Holder:
Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission, Paithan
Current Account No:
00000036694177969
Bank Name:
State Bank Of India
IFSC Code:
SBIN0003796
Branch:
Bhaji Market, Paithan

Scan to donate

Donate QR

Merchant Name : Sant Eknath Mission

UPI ID : santeknathmission@sbi

logoseperator

Contact Info :

Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission,

C/O Shri Venimadhav Gosavi,
ShriNath Galli, Shrikshetra Paithan, Dist. Chhatrapati
Sambhajinagar
Pin. 431006

callMobile No : +91 - 9421411135

emailEmail : info@santeknath.org