श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्गुरु चतुरक्षरा । चतुरचित्तप्रबोधचंद्रा । ’जनार्दना’ सुरेंद्रइंद्रा । ज्ञाननरेंद्रा निजबोधा ॥१॥ तुझी करितांचि गोठी । प्रगटसी पाठींपोटीं । सन्मुख ठसावसी दृष्टी । हृदयगांठी छेदूनी ॥२॥ छेदूनि विषयवासना । स्वयें प्रगटसी जनार्दना । भवअभवभावना । नेदिसी मना आतळों ॥३॥ आतळतां तुझे चरण । आकळलें राहे मन । सहज देशी समाधान । आनंदघन अच्युता ॥४॥ ऐशिया जी गुरुनाथा । समसाम्यें चरणीं माथा । पुढील परिसावी जी कथा । जेथ वक्ता श्रीकृष्णु ॥५॥ उद्धवें विनविलियावरी । कृपा कळवळला श्रीहरी । निजज्ञान अतिविस्तारीं । बोधकुसरीं सांगतु ॥६॥ होतें कृष्णाचे मानसी । ’मज गेलिया निजधामासी । माझें निजज्ञान कोणापासीं । अतियत्नेंसीं ठेवावें’॥७॥ तंव देखिली उद्धवाची अवस्था । सुख जाहलें श्रीकृष्णनाथा । वैराग्ययुक्त उपदेशिता । होय सर्वथा निजज्ञान ॥८॥ एवं वांचवावया उद्धवासी । कृष्ण ब्रह्मज्ञान उपदेशी । शाप न बाधी ब्रह्मवेत्यांसी । हें हृषीकेशी जाणतु ॥९॥ ब्रह्मउपदेशाची हातवटी । उपदेशूं जाणे जगजेठी । वैराग्य उपजवी उठाउठीं । जेणें पडे मिठी निजतत्वीं ॥१०॥ नव्हतां वैराग्य दारुण । उपदेशु केला तो वृथा जाण । हे श्रीकृष्णचि जाणे खूण । वैराग्यविंदान बोलतु ॥११॥ पहिलें उद्धवाच्या बोलासी । अनुमोदन दे हृषीकेशी । तेणें अन्वयें सावकाशीं । ज्ञानवैराग्य त्यासी बोलतु ॥१२॥ श्रीभगवानुवाच । यदात्थ मां महाभाग तच्चिकीर्षितमेव मे । ब्रह्माभवो लोकपालाः स्वर्वासं मेऽभिकाङ्क्षिणः ॥ १ ॥ जो वेदांचा वेदवक्ता । जो ज्ञानियांचा ज्ञानदाता । तो श्रीकृष्णु म्हणे भाग्यवंता । ऐकें निजभक्ता उद्धवा ॥१३॥ जें तूं बोलिलासी भावयुक्त । तें वचन तुझें सत्य सत्य । तेचिं माझें मनोगत । जाण निश्चित निर्धारें ॥१४॥ माझी अवस्था जाश्वनीळा । ब्रह्मादिदेवां सकळां । येथ आले होते मिळोनि मेळा । लोकपाळांसमवेत ॥१५॥ येऊनि माझी घेतली भेटी । अपेक्षा जे होती पोटी । पुशिली माझ्या प्रयाणाची गोठी । जेणें तुज मोठी अवस्था ॥१६॥ म्यां वेगीं यावें वैकुंठा । हे समस्तांसी उत्कंठा । आदिकरून नीळकंठा । सुरवरिष्ठां झालीसे ॥१७॥ मया निष्पादितं ह्यत्र देवकार्यमशेषतः । यदर्थमवतीर्णोऽहमंशेन ब्रह्मणार्थितः ॥ २ ॥ ज्यालागीं ब्रह्मेनि प्रार्थिलें । तें देवकार्य म्यां संपादिलें । अवतार नटनाट्य धरिलें । ज्येष्ठत्व दिधलें बळिभद्रा ॥१८॥ ज्येष्ठकनिष्ठभावना । दोघांमाजीं नाहीं जाणा । कृष्णा आणि संकर्षणा । एकात्मता निजांशें ॥१९॥ कुलं वै शापनिर्दग्धं नङ्क्ष्यत्यन्योन्यविग्रहात् । समुद्रः सप्तमे हअहनि एतां पुरीं च प्लावयिष्यति ॥ ३ ॥ उरलें असे आमुचें कुळ । शापनिर्दग्ध केवळ । अन्योन्यविग्रहें सकळ । कलहमूळ नासेल ॥२०॥ भूमि मागोनि समुद्रापाशीं । म्यां रचिलें द्वारकेसी । मज गेलिया निजधामासी । तो सातवे दिवसीं बुडवील ॥२१॥ यर्ह्येवायं मया त्यक्तो लोकोऽयं नष्टमङ्गलः । भविष्यत्यचिरात्साधो कलिनापि निराकृतः ॥ ४ ॥ ऐकें उद्धवा हितगोष्टी । म्यां सांडलिया हे सृष्टि । थोडियाचि काळापाठीं । नष्टदृष्टी जन होती ॥२२॥ अधर्म वाढेल प्रबळ । लोक होतील नष्ट अमंगळ । ते अमंगळतेचें मूळ । ऐक समूळ सांगेन ॥२३॥ मज नांदतां ये सृष्टीं । कलि उघडूं न शके दृष्टी । मज गेलियापाठीं । तो उठाउठीं उठेल ॥२४॥ कलि वाढेल अतिविषम । ब्राह्मण सांडितील स्वधर्म । स्वभावें नावडे दानधर्म । क्रियाकर्म दंभार्थ ॥२५॥ न वस्तव्यं त्वयैवेह मया त्यक्ते महीतले । जनोऽभद्ररुचिर्भद्र भविष्यति कलौ युगे ॥ ५ ॥ म्यां सांडिलिया महीतळी । प्रबळ बळें वाढेल कळी । आजीच तुवां निघिजे तत्काळीं । जंव तो कळी नातळे ॥२६॥ कळी आतळेल जेव्हां । जनीं अधर्मु वाढेल तेव्हां । कुविद्येच्या उठती हांवा । सैंघ धांवा निंदेच्या ॥२७॥ न लभे स्वार्थाची कवडी । तरी करिती निंदेच्या कोडी । ऐसी कलियुगीं वस्ती कुडी । तुवां अर्ध घडी न रहावें ॥२८॥ त्वं तु सर्वं परित्यज्य स्नेहं स्वजनबन्धुषु । मय्यावेश्य मनः संयक् समदृग्विचरस्व गाम् ॥ ६ ॥ उद्धवा तूं यालागीं । येथोनि निघावें वेगीं । एकलाचि आंगोवांगीं । हितालागीं सर्वथा ॥२९॥ धनधान्यसमृद्धीसीं । सांडावें स्वजनगोत्रजांसी । भ्रातादुहितानिजभगिनींसी । स्त्री-पुत्रासी त्यजावें ॥३०॥ स्नेहो ठेवूनि घरदारीं । अंगें तूं जरी निघालासि बाहेरी । तरी तो त्यागूचि कठिण भारी । अनर्थकारी होईल ॥३१॥ आधीं समूळ स्नेहो सांडावा । पाठीं अभिमानुही दंडावा । वासनाजटाजूट मुंडावा । मग सांडावा आश्रमु ॥३२॥ ’स्नेहो कैसेनि सांडे । अभिमानु कैसेनि दंडे’। हें तुज वाटेल सांकडें । तरी रोकडें परियेसीं ॥३३॥ माझें स्वरूप जें सर्वगत । तेथ ठेवोनियां चित्त । सावधानें सुनिश्चित । राहावें सतत निजरूपीं ॥३४॥ तये स्वरूपीं चित्ता । निर्धारेंसीं धारणा धरितां । निजभावें तन्मयता । तद्रूपता पावेल ॥३५॥ भृंगी जड कीटी मूढ । ध्यानें तद्रूप होय दृढ । अभ्यासीं कांहीं नाहीं अवघड । तो अभ्यास गूढ विशद केला ॥३६॥ माझें स्वरूप ज्ञानघन । ध्याता जीवु स्वयें सज्ञान । या स्थितीं करितां ध्यान । सहजें जाण तद्रूप ॥३७॥ तेथ समसाम्यें समस्त । समत्व पावेल चित्त । तेणें समभावें निश्चित । तेथींचा तेथ रहावें ॥३८॥ आधीं गृहाश्रमातें त्यागावें । मग म्यां म्हणसी कोठें राहावें । ऐसें मानिसील स्वभावें । तेविखीं बरवें परियेसीं ॥३९॥ स्वरूपसाम्यें समदृष्टी । समभावें विचरें सृष्टीं । निवासस्थानांची आटाटी । सर्वथा पोटीं न धरावी ॥४०॥ जेथ अल्प काळ वसती घडे । त्या ठायाचा अभिमान चढे । वसतिस्थान ऐसें कुडें । वस्तीचें सांकडें सर्वथा न धरीं ॥४१॥ तूं सर्वीं सर्वगत होसी । सर्वाधार सर्वदेशी । ऐसा मी होऊन मज पावसी । न हालतां येसी निजधामा ॥४२॥ ’मज निजधामा न्यावें’। होतें पुशिलें उद्धवें । तें निजबोधस्वभावें । स्वयें केशवें सांगितलें ॥४३॥ न करितां हे उपायस्थिती । सर्वथा न घडे माझी प्राप्ती । मग तूं निजधामाप्रती । कैशा गती येशील ॥४४॥ गरुडीं वाऊनि वेगेंसीं । न्यावें निजधामा म्हणसी । गति तेथ नाहीं पाखांसी । गम्य गरुडासी तें नव्हे ॥४५॥ सांडूनि उभय पक्षांसी । साधक पावती मद्रूपासी । पक्षाभिमान असे गरुडासी । गमन त्यासी तेणें नव्हे ॥४६॥ म्हणसी न्यावें घेवोनि खांदीं । मज खांदाचि नाहीं त्रिशुद्धी । तुज न सांडितां अहंबुद्धी । गमनसिद्धी तेथ नाहीं ॥४७॥ न त्यागितां अहंभावस्थिती । केल्या नाना उपाययुक्ती । तेणें निजधामाप्रती । नव्हे गती सर्वथा ॥४८॥ जें जें देखसी साकार । तें तें जाण पां नश्वर । तेचि विखींचा निर्धार । करीं साचार निजबोधें ॥४९॥ यदिदं मनसा वाचा चक्षुर्भ्यां श्रवणादिभिः । नश्वरं गृह्यमाणं च विद्धि मायामनोमयम् ॥ ७ ॥ जें जें ’दृष्टीं’ देखिलें । तें तें दृष्यत्वें वाळिलें । जें जें ’श्रवणा’ गोचर झालें । तेंही वाळिलें शब्दत्वें ॥५०॥ जें जें ’वाचा’ वदे । तें तें वाळिजे जल्पवादें । वाचिक सांडविलें वेदें । ’नेति’ शब्दें लाजिला ॥५१॥ जें जें ’संकल्पें’ आकळिलें । तें तें कल्पित पैं झालें । जें जें ’अहंकारा’ आलें । तें तें वाळिलें विजातीय ॥५२॥ जें जें ’इंद्रियां’ गोचरें । तें तें जाण पां नश्वरें । हें नित्यानित्यविचारें । केलें खरें निश्चित ॥५३॥ तोही ’नित्यानित्यविवेक’ । जाण पां निश्चित मायिक । एवं मायामय हा लोक । करी संकल्प सृष्टीतें ॥५४॥ जेव्हडा देखसी संसार । तेव्हडा मायिक व्यवहार । हा वोळख तूं साचार । धैर्यनिर्धार धरोनी ॥५५॥ जैशी स्वप्नींची राणीव । केवळ भ्रमचि जाणीव । तैसेंचि जाण हें सर्व । भववैभवविलास ॥५६॥ पुंसोऽयुक्तस्य नानार्थो भ्रमः स गुणदोषभाक् । कर्माकर्मविकर्मेति गुणदोषधियो भिदा ॥ ८ ॥ परमात्मेंसी जो विभक्त । तो पुरुष बोलिजे ’अयुक्त’ । त्यासी नानात्वें भेदु भासत । निजीं निजत्व विसरोनी ॥५७॥ त्या विसराचेनि उल्हासें । मिथ्या भेदु सत्यत्वें भासे । त्या भेदाचेनि आवेशें । अवश्य दिसे गुणदोषु ॥५८॥ जरी भेदूचि नाहीं । तरी गुणदोष कैंचा पाहीं । दिसावया ठावोचि नाहीं । शुद्धाचे ठायीं सर्वथा ॥५९॥ यालागीं भेदाच्या उद्भटीं । गुणदोषदृष्टी उठी । तेथें कर्माकर्मत्रिपुटी । भेददृष्टी ठसावे ॥६०॥ भेदें थोर केलें विषम । कर्म अकर्म विकर्म । जन्ममरणादि धर्म । निजकर्म प्रकाशी ॥६१॥ कर्में विकर्में नरकयातना । काम्यकर्में स्वर्गु जाणा । कर्मेंचि करूनि कर्ममोचना । समाधाना पाविजे ॥६२॥ येथ म्हणती ’कर्म’ कोण । ’अकर्माचें’ काय लक्षण । ’विकर्माचा’ कवण गुण । तेंही संपूर्ण परिस पां ॥६३॥ काया वाचा अथवा मन । करिजे तितुकें ’कर्म’ जाण । सूक्ष्म स्फूर्तीचें जें भान । तें मूळ जाण कर्माचें ॥६४॥ मनसा वाचा देहीं । सर्वथा कर्मबीज नाहीं । ’अकर्म’ म्हणिजे तें पाहीं । न पडे ठायीं देहवंता ॥६५॥ जें कर्मावेगळें सर्वांगें । जेथ कर्म लावितांही न लगे । जें नव्हे कर्मठाजोगें । तें जाण सवेगें ’अकर्म’ ॥६६॥ विधिनिषेधजोडपाडें । जेथ विशेष कर्म वाढे । ’विकर्म’ त्यातें म्हणणें घडें । थोर सांकडें पैं याचें ॥६७॥ कर्म सर्वसाधारण । तेंचि विकारातें पावलें जाण । उठिले विधिनिषेध दारुण । ’विकर्म’ जाण तें म्हणिपें ॥६८॥ जें विधीसी नातुडे । तें निषेधाचे अंग चढे । करितां चुके ठाके विकळ पडे । तेंही रोकडें ’निषिद्धचि’ ॥६९॥ ऐसें कर्म विकारलें । तें ’विकर्म’ पदें वाखाणिलें । एवं कर्माकर्म दाविलें । विभाग केले तुजलागीं ॥७०॥ जीवासी आविद्यक उत्पत्ती । त्याचीं कर्में आविद्यकें होतीं । श्रीधरव्याख्यानाची युक्ती । तेही उपपत्ती परियेसीं ॥७१॥ अविद्यायुक्त जीव परम । त्यासी नित्यक्रिया तेंचि ’कर्म’ । नित्य न करणें तें ’अकर्म’ । ’विकर्म’ तें निषिद्ध ॥७२॥ ऐशी कर्माकर्मविकर्मत्रिपुटी । भेदानुरूपें वाढली सृष्टीं । तेथ गुण-दोषबुद्धीच्या पोटीं । भेददृष्टी वाढती ॥७३॥ अभेदीं भेदु कैसा उठी । जेणें गुणदोषीं नांदे दृष्टी । विधिनिषेधीं पाडी गांठी । तेही गोठी परियेसीं ॥७४॥ पुरुष एकला एकु असे । तोचि मनोरथपूजे बैसे । ध्येय-ध्याता-ध्यानमिसें । वाढवी पिसें भेदाचें ॥७५॥ तेथे नानापरीचे उपचार । पूजासामाग्रीसंभार । ऐसा एकपणीं अपार । भेदु साचार वाढवी ॥७६॥ तेथ ’ध्येय’ उत्तम म्हणे जाण । ’ध्याता’ नीच होये आपण । तदंगें ’ध्यान’ गौण । गुणदोष जाण वाढवी ॥७७॥ ध्यानीं गुणदोष विचित्र । ध्येय म्हणे परम पवित्र । ध्याता आपण होये अपवित्र । शौचाचारदोषत्वें ॥७८॥ एवं ध्यानाचिये दृष्टीं । आपणचि आपुल्या पोटीं । गुणदोषांची त्रिपुटी । भेददृष्टी वाढवी ॥७९॥ ध्येय-ध्याता-ध्यान । आघवाची आहे आपण । तें सांडोनियां जाण । गुणदोषलक्षण वाढवी ॥८०॥ उद्धवा हे अवघी सृष्टी । वाढली असे भेददृष्टीं । तेणें भेदें उठाउठी । कर्मत्रिपुटी वाढविली ॥८१॥ जंव जंव भेदाचा जिव्हाळा । जंव जंव विषयांचा सोहळा । पाळिजे इंद्रियांचा लळा । तंव तंव आगळा संसारु ॥८२॥ सापा पाजिजे पीयूख । तेंचि परतोनि होय विख । तैसें इंद्रियां दीजे जंव जंव संतोख । तंव तंव दुःख भोगिजे ॥८३॥ तस्माद् युक्तेन्द्रियग्रामो युक्तचित्त इदं जगत् । आत्मनीक्षस्व विततमात्मानं मय्यधीश्वरे ॥ ९ ॥ यालागी इंद्रियांच्या द्वारीं । विषयो नेदावा चतुरीं । जेवीं विषें रांधिली क्षीरधारी । सांडिजे दुरी न चाखतां ॥८४॥ घमघमित अमृतफळें । वरी सर्पें घातलिया गरळें । तें न सेविती काउळे । सेवनीं कळे निजघातु ॥८५॥ तैसें सेवितां विषयांसी । कोण गोडी मुमुक्षासी । प्रतिपदीं । आत्मघातासी । अहर्निशीं देखती ॥८६॥ आत्मघातु न देखती । ते विषयी विषयो सेविती । जैशी दिवाभीता मध्यराती । असतां गभस्ति मध्यान्हीं ॥८७॥ तैसेंचि विषयसेवन । मुमुक्षांसी घडे जाण । तेणें न चुके जन्ममरण । आत्मपतन तयांचें ॥८८॥ म्हणसी ’प्राणियांची स्थिती । विषयावरी निश्चितीं । विषयत्यागें केवीं राहती’ । ते सुगम स्थिती अवधारीं ॥८९॥ असतां इंद्रियांचा नेमु । करी चित्ताचा उपरमु । ऐसा दोंहीपरी सुगमु । उत्तमोत्तमु हा त्यागु ॥९०॥ इंद्रियें असोतु विषयांवरी । मन रिघों नेदी त्यांभीतरी । हाही त्यागु सर्वांपरी । योगेश्वरीं बोलिजे ॥९१॥ मनासी विषयांचें बळ । विषयध्यासें तें चपळ । नव्हे म्हणती तें निश्चळ । ऐक समूळ तो उपावो ॥९२॥ माझें स्वरूप सर्वगत । मनाबाहेरी आणि आंत । जेथ जेथ जाईल चित्त । तेथ तेथ तें असे ॥९३॥ मजवेगळें जावयासी । ठावो नाहीं पैं चित्तासी । स्वदेशीं हो परदेशीं । अहर्निशीं मज आंतु ॥९४॥ ऐसें निजरूप संतत । पाहतां थोरावेल चित्त । त्या चित्तामाजीं आद्यंत । पाहें समस्त हें जग ॥९५॥ अथवा जीवस्वरूप तुझें चांग । त्यामाजीं पाहतां हें जग । जगचि होईल तुझें अंग । अतिनिर्व्यंग निश्चित ॥९६॥ चरें आणि अचरें । लहानें कां थोरें । जीवरूपीं सविस्तरें । पाहें निर्धारे हें जग ॥९७॥ म्हणसी जीवु तो एकदेशी । त्यामाजीं केवीं पहावें जगासी । त्यासी ऐक्यता करीं मजसीं । जेवीं कनकेंसीं अळंकार ॥९८॥ चिंतितां कीटकी भिंगुरटी । तेचि ते होऊन उठी । तैसा तूं उठाउठीं । होईं निजदृष्टीं निजतत्व ॥९९॥ हो कां सैंधवाचा खडा । पडल्या सिंधूमाजिवडा । तो होवोनि ठाके त्याएवढा । तैसा तूं रोकडा मी होसी ॥१००॥ जेथ मीतूंपणाचा भेद । फिटोनि जाईल विशद । परमानंदें शुद्धबुद्ध । मुक्त सिद्ध तूं होसी ॥१॥ ज्ञानविज्ञानसंयुक्त आत्मभूतः शरीरिणाम् । अत्मानुभवतुष्टात्मा नान्तरायैर्विहन्यसे ॥ १० ॥ शास्त्रश्रवणें दृढ ’ज्ञान’ । मननाभ्यासें होय ’विज्ञान’ । या दोंहींची जाणोनि खूण । ब्रह्मसंपन्न तूं होसी ॥२॥ ऐसिया स्वार्थाचेनि लवलाहें । अविश्रम भजावे तुझे पाये । म्हणसी ’वोढवतील अंतराये । त्यासी काये करावें’ ॥३॥ सांडोनि दांभिक लौकिक । त्यजोनियां फळाभिलाख । जो मज भजे भाविक । विघ्न देख त्या कैंचें ॥४॥ त्याच्या विघ्ननाशासी देख । करीं चक्राची लखलख । घेऊनि पाठिसी अचुक । उभा सन्मुख मी असें ॥५॥ यापरी गा उद्धवा । जो मज भजे निजभावा । त्यासी विघ्न करावया देवां । नव्हे उठावा मज असतां ॥६॥ एवं ब्रह्मसंपन्न जाहलियावरी । आत्मा तूंचि चराचरीं । जंगमीं आणि स्थावरीं । सुरासुरीं तूंचि तूं ॥७॥ तुजहूनि कांहीं । अणुभरी वेगळें नाहीं । तेथ विघ्न कैंचें कायी । तुझ्या ठायीं बाधील ॥८॥ ब्रह्मादिकांसी जो ग्रासी । त्या काळाचा तूं आत्मा होसी । पाठी थापटून हृषीकेशी । उद्धवासी सांगतु ॥९॥ ऐशी बाध्यबाधकता फिटली । संकल्पकल्पना तुटली । ब्रह्मानंदें पाहांट फुटली । वाट मोडली कर्माची ॥११०॥ ऐसा ब्रह्मानुभवी जो देख । कर्म तेथ होय रंक । वेद तयाचे सेवक । विधिविवेक कामारी ॥११॥ हेंचि किती सांगो कायी । मी त्याचा आज्ञाधारक पाहीं । प्रतिष्ठिती जे जे ठायीं । तेथ पाहीं प्रगटतु ॥१२॥ वचनमात्रासाठीं । प्रगटलों कोरडे काष्ठीं । दुर्वासा वाइला पाठीं । त्वांही दिठीं देखिलें ॥१३॥ म्हणसी ’देव ज्याचा आज्ञाधारु । कर्म त्याचें होय किंकरु । तरी ज्ञाते यथेष्टाचारु । विषयीं साचारु विचरती’ ॥१४॥ ज्ञात्यासी स्वेच्छा विषयाचरण । सर्वथा न घडे गा जाण । तेही विषयींचें लक्षण । सावधान परियेसीं ॥१५॥ ज्यासी दग्धपटअ भिमान । मिथ्या प्रपंचाचें भान । मृषा विषयांचें दर्शन । विषयाचरण त्या नाहीं ॥१६॥ जयासी प्रपंचाची आवडी । विषयाची अतिगोडी । यथेष्टाचरणाची वोढी । पडे सांकडी तयासी ॥१७॥ ज्ञातयाच्या ठायीं । सत्यत्वें विषयो नाहीं । मा भोगावया कायी । अभिलाषी पाहीं तो होईल ॥१८॥ आतां ज्ञातयाचें कर्म । ऐक सांगों त्याचें वर्म । नातळतां मनोधर्म । क्रियाकर्म आचरती ॥१९॥ दोषबुद्ध्योभयातीतो निषेधान्न निवर्तते । गुणबुद्ध्या च विहितं न करोति यथार्भकः ॥ ११ ॥ गुणदोषातीत ज्ञाता । तो निषेधीं न वर्ते सर्वथा । परी भ्यालेपण चित्ता । नाहीं तत्वतां तयासी ॥१२०॥ तो विहितही कर्म करी । तेथ गुणत्वें बुद्धि न धरीं । कुलालचक्राचियेपरी । पूर्वसंस्कारीं वर्तत ॥२१॥ संकल्पु नाहीं वृत्तीं । हेतु स्फुरेना चित्तीं । ऐसीं कर्में ज्ञाते करिती । शरीरस्थितीं केवळ ॥२२॥ तेथ सत्कर्म सिद्धी गेलें । तेणें फुगेना म्यां हें केलें । अथवा माझारीं विकळ पडिलें । तेणें तगमगिलेंपण नाहीं ॥२३॥ निद्रितामागें बैसला वाघु । अथवा पुढें आला स्वर्गभोगु । त्यासी नाहीं रागविरागु । तैसा लागु ज्ञात्याचा ॥२४॥ गुणदोषीं चित्तवृत्ती । सांडोनिया सहजस्थिती । बाळकें जेवीं क्रीडती । तैशी स्थिति ज्ञात्याची ॥२५॥ ’अभिमानें कर्मप्राप्ती । त्या अभिमानातें त्यागिती । मग निरभिमानें केवीं वर्तती । कर्मस्थिती त्यां न घडे’ ॥२६॥ ऐसा विकल्पु जरी करिसी । ते स्थिति न कळे इतरांसी । निरभिमानता स्वानुभवेंसी । केवीं येरासी कळेल ॥२७॥ देह प्रारब्धाचेनि मेळें । स्वभावें सर्व कर्मीं चळे । तेथ अज्ञानाचेनि बळें । अभिमानु खवळे ’मी कर्ता’ ॥२८॥ तेथ गुरुवाक्य-अनुवृत्ती । अभ्यासूनि यथा निगुतीं । अज्ञानेंसहित निरसिती । अभिमानस्थिति निजबोधें ॥२९॥ शेष-प्रारब्धाचेनि मेळें । निरभिमानें देह चळे । ज्ञाते कर्में करिती सकळें । जाण केवळें शरीरें ॥१३०॥ केवळ शरीरें कर्में होतीं । तींच ’अहेतुक’ बोलिजेती । अर्भकदृष्टांतें उपपत्ती । हेचि स्थिति सांगितली ॥३१॥ निरभिमानाचीं लक्षणें । कृष्ण उद्धवातें ऐक म्हणे । येरु आनंदला अंतःकरणें । सादरपणें परिसतु ॥३२॥ सर्वभूतसुहृच्छान्तो ज्ञानविज्ञाननिश्चयः । पश्यन्मदात्मकं विश्वं न विपद्येत वै पुनः ॥ १२ ॥ पहिलें शास्त्रश्रवणें ’ज्ञान’ । तदनुभवें होय ’विज्ञान’ । ऐसा ज्ञानविज्ञानसंपन्न । निरभिमान तो होय ॥३३॥ साचचि निरभिमानता । जरी आली होय हाता । तरी ’शांति’ तेथ सर्वथा । उल्हासता पैं पावे ॥३४॥ दाटूनि निश्चळ होणें । कां दांत चावूनि साहणें । ते ’शांति’ ऐसें कोण म्हणे । आक्रोशपणें साहातु ॥३५॥ ’शांति’ म्हणिजे ते ऐशी । सागरीं अक्षोभ्यता जैसी । चढ वोहट नाहीं तिसी । सर्वदेशी सर्वदा ॥३६॥ नाना सरितांचे खळाळ । आणूनि घालिती समळ जळ । तो तिळभरी नव्हे डहुळ । अति निर्मळ निजांगें ॥३७॥ तैशी नानाभूतविषमता । स्वार्थविरोधें अंगीं आदळतां । पालटू नव्हे ज्याच्या चित्ता । ते जाण सर्वथा ’निजशांति’ ॥३८॥ ऐसी शांति ज्यासी देखा । तोचि सर्वभूतांचा सखा । आवडता सर्व लोकां । ’सुहृद’ तो कां सर्वांचा ॥३९॥ नवल सख्यत्वाची परी । सर्वस्व दे निजमैत्रीं । स्वार्थीं वंचनार्थ न करी । कृपापात्रीं उपदेशु ॥१४०॥ अतर्क्य त्याची पाहती दिठी । मद्रूपें देखे सकळ सृष्टी । जगासी मज अभिन्न गांठी । निजदृष्टीं बांधली ॥४१॥ मग तो जेउतें पाहे । तेउता मीचि तया आहें । तो जरी मातें न पाहे । तें न पाहणेंही होये मीचि त्याचें ॥४२॥ त्याची पाहती जे दिठी । ते मीचि होये जगजेठी । ऐशी तया मज एक गांठी । सकळ सृष्टीसमवेत ॥४३॥ अवघें जगचि मी होये । तेव्हां ’तो मी’ हे भाष जाये । ऐसा तो मजमाजीं समाये । समसाम्येंसमत्वें ॥४४॥ सांडोनियां मनोधर्म । ऐसा ज्यासी मी झालों सुगम । त्यासी पुढती कैंचें जन्म । दुःख दुर्गम ज्याचेनीं ॥४५॥ मातेच्या उदरकुहरीं । रजस्वलेच्या रुधिरामाझारीं । पित्याचेनि रेतद्वारीं । गर्भसंचारी संसरण ॥४६॥ जे मातेच्या उदरीं । जंतु नाकीं तोंडीं उरीं शिरीं । विष्ठामूत्राचे दाथरीं । नवमासवरी उकडिजे ॥४७॥ जठराग्नीच्या तोंडीं । घालूनि गर्भाची उंडी । उकडउगकडूनि पिंडीं । गर्भकांडीं घडिजेति ॥४८॥ ते गर्भींचे वेदना । नानापरींची यातना । नको नको रघुनंदना । चिळसी मना येतसे ॥४९॥ अवघ्यांच्या शेवटीं । प्रसूतिवातु जो आटी । सर्वांगीं वेदना उठी । योनिसंकटीं देहजन्म ॥१५०॥ ऐसें अपवित्र जें जन्म । तें न पवतीच ते नरोत्तम । जींहीं ठाकिलें निजधाम । ते पुरुषोत्तम समसाम्यें ॥५१॥ मी असतां पाठीपोटीं । त्यांसी काइशा जन्मगोठी । कळिकाळातें नाणिती दिठी । आले उठाउठी मद्रूपा ॥५२॥ जेथ जन्म नाहीं जाहलें । तेथ मरण न लगतांचि गेलें । ऐसे भजोनि मातें पावले । भजनबळें मद्भक्त ॥५३॥ कृष्ण उद्धवातें थापटी । म्हणे वेगें उठीं उठीं । हेचि हातवशी हातवटी । जन्मतुटी तेणें होय ॥५४॥ जैसें मेघमुखींचें उदक । वरिच्यावरी झेलिती चातक । तैसें कृष्णवचनांसी देख । उद्धवें मुख पसरिलें ॥५५॥ कां चंद्राकिरणीं चकोर । जेवीं अत्यंत सादर । तेवीं उद्धवाचा आदर । दिसे थोर हरिवचनीं ॥५६॥ हो कां पक्षिणी देखोनि पिलें । जाणोनि चार्यांचे वेळे । सांडोनियां आविसाळें । मुख कोंवळें जेवीं पसरी ॥५७॥ तेवीं देखोनि कृष्णमुख । उद्धवासी अत्यंत हरिख । श्रवणाचे मुखें देख । कृष्णपीयूष सेवित ॥५८॥ श्रीशुक उवाच । इत्यादिष्टो भगवता महाभागवतो नृप । उद्धवः प्रणिपत्याह तत्त्वं जिज्ञासुरच्युतम् ॥ १३ ॥ शुक म्हणे कौरवनाथा । कृपा उपजली भगवंता । उपदेशिलें महाभागवता । ज्ञानकथा निजबोधु ॥५९॥ तें ऐकोनि उद्धव । श्रवणीं थोर उठी हांव । कैसें बोलिला ज्ञानगौरव । अतिअपूर्व श्रीकृष्ण ॥१६०॥ श्रीकृष्ण श्रीमुखें सांगे कोड । तें निरूपण अतिगोड । जीवीं उठली श्रवणचाड । नुल्लंघी भीड देवाची ॥६१॥ आवडीं कळवळे चित्त । घाली साष्टांग दंडवत । हात जोडोनि पुसत । प्रेमळ भक्त उद्धव ॥६२॥ श्रीउद्धव उवाच । योगेश योगविन्यास योगात्मन्योगसम्भव । निःश्रेयसाय मे प्रोक्तस्त्यागः सन्न्यासलक्षणः ॥ १४ ॥ ऐकें योगियांच्या योगपती । योग्यांचा ठेवा तूं श्रीपती । योगीं प्रगट तूं योगमूर्ती । योग उत्पत्ती तुजपासीं ॥६३॥ मज मोक्षासी कारण । त्यागु संन्यासलक्षण । बोलिलासी तो अति कठिण । परम दारुण हा त्यागु ॥६४॥ त्यागोऽयं दुष्करो भूमन् कामानां विषयात्मभिः । सुतरां त्वयि सर्वात्मन्नभक्तैरिति मे मतिः ॥ १५ ॥ पाहतां या त्यागाची रीती । मज तंव दुर्धरु गा श्रीपती । मग इतरांची येथ मती । कवण्या स्थितीं होईल ॥६५॥ कामु जयाच्या चित्तीं । विषयीं आसक्त मती । त्यासी या त्यागाची गती । नव्हें श्रीपति सर्वथा ॥६६॥ तुझी कृपा जंव नव्हे । तंव तो अभक्तां केवीं करवे । त्यागु बोलिला जो देवें । तो सर्वांसी नव्हे सर्वथा ॥६७॥ तूं सर्वात्मा असतां हृदयीं । चित्त प्रवेशेना तुझे ठायीं । तें आवरिलें असे विषयीं । नवल कायी सांगावें ॥६८॥ ऐसे प्रपंची आसक्त । यालागीं विमुख झाले अभक्त । त्यांसी त्यागु नव्हे हा निश्चित । चित्त दुश्चित सर्वदा ॥६९॥ त्यागु कां नव्हे म्हणसी । तें परिस गा हृषीकेशी । कठिणत्व जें त्यागासी । तें तुजपाशीं सांगेन ॥१७०॥ सोऽहं ममाहमिति मूढमतिर्विगाढः त्वन्मायया विरचितात्मनि सानुबन्धे । तत्त्वञ्जसा निगदितं भवता यथाहं संसाधयामि भगवन्ननुशाधि भृत्यम् ॥ १६ ॥ तुझी माया विचित्र उपाधी । शरीरीं केली आत्मबुद्धी । आत्मीयें शरीरसंबंधीं । विपरीत सिद्धी वाढली ॥७१॥ ’मी-माझें’ वाढलें गाढ । तेणें मति झाली मूढ । गृहासक्ति लागली दृढ । त्यागु अवघड यालागीं ॥७२॥ ऐशी ही बुद्धि विवळे । अप्रयासें तत्व आकळे । तैशी कृपा कीजे राउळें । दास गोपाळें तारावया ॥७३॥ ऐकें गा पुरुषोत्तमा । निजदासां आपुल्या आम्हां । सोडवी गा संसारश्रमा । आत्मयारामा श्रीकृष्णा ॥७४॥ तुज सांडोनि हृषीकेशी । पुसों जावें आणिकांपासीं । तें नये माझिया मनासी । विषयीं सर्वांसी व्यापिलें ॥७५॥ सत्यस्य ते स्वदृश आत्मन आत्मनोऽन्यं वक्तारमीश विबुधेष्वपि नानुचक्षे । सर्वे विमोहितधियस्तव माययेमे ब्रह्मादयस्तनुभृतो बहिरर्थभावाः ॥ १७ ॥ पुसों जावें ब्रह्मयासी । तो गुंतला सृष्टिकर्मासी । प्रजाउत्पत्ति मानसी । अहर्निशीं चिंतितु ॥७६॥ जो आपुल्या निजस्वभावीं । सदा संसारु वाढवी । तो केवीं संसारु तोडवी । केलें न बुडवी सर्वथा ॥७७॥ वाढों नेदी संसारासी । कोपु आला प्रजापतीसी । शापु दिधला नारदासी । ब्रह्म उपदेशी म्हणौनी ॥७८॥ ऐसे संसारी आसक्त । नित्य संसारयुक्त । त्यांसी पुसों न मनी चित्त । जाण निश्चित श्रीकृष्णा ॥७९॥ पुसों जावें ऋषींप्रती । तंव ते सदा आपमती । आपुलें मत प्रतिष्ठिती । अन्यथा देती शापातें ॥१८०॥ जीवीं धरोनि अर्थासक्ती । शिष्यांतें उपदेशिती । विषयो धरोनियां चित्तीं । जीविकावृत्तीं उपदेशु ॥८१॥ गुरूसीच विषयासक्ती । तेथ शिष्यासी कैंची विरक्ती । ऐशियासी जे पुसती । ते भ्रंशती स्वार्थातें ॥८२॥ सत्यस्वरूप स्वप्रकाश । आत्मा तूं अविनाश । युक्तिप्रयुक्तीं उपदेश । विकल्पनिरास जाणसी ॥८३॥ ब्रह्मज्ञानाचा वक्ता । तुजवेगळा श्रीकृष्णनाथा । न दिसे गा सर्वथा । मज पाहतां त्रिलोकीं ॥८४॥ एवं आत्मा तूं तत्वतां । तूंचि आत्मज्ञानदाता । आत्मबोधीं संस्थापिता । कृष्णनाथा तूं एकु ॥८५॥ तस्माद्भवन्तमनवद्यमनन्तपारं सर्वज्ञमीश्वरमकुण्ठविकुण्ठधिष्ण्यम् । निर्विण्णधीरहमु हे वृजिनाभितप्तो नारायणं नरसखं शरणं प्रपद्ये ॥ १८ ॥ यालागीं जी यादवपती । नित्य शुद्ध पवित्र मूर्ती । तुज मायामोहो नातळती । पवित्र ख्याती यालागीं ॥८६॥ गोंवळांचे उच्छिष्टकवळें । ज्याची पवित्रता न मैळे । तेणेंचि उच्छिष्टबळें । गोंवळें सकळें तारिलीं ॥८७॥ प्राणें शोषिलें पूतनेसी । तरी पवित्रता अधिक कैशी । तेणेंचि उद्धरिलें तिसी । दोषें दोषांसी तारकु ॥८८॥ करूनि कालीयमर्दन । मर्दिला त्याचा अभिमान । तरी मैळेना पवित्रपण । निर्विषें जाण तारिला ॥८९॥ रजक अपवित्र अत्यंत । आतळे तया अधःपात । त्यासी मारूनियां निश्चित । केला पुनीत सायुज्या ॥१९०॥ करूनि गोपिकांसी निंद्य काम । तेणें त्या केल्या नित्य निष्काम । तेचि पवित्रता अनुत्तम । सायुज्यधाम पावल्या ॥९१॥ करितां सुकर्म कुकर्म । ज्याची पवित्रता अनुत्तम । यालागीं नामें ’पुरुषोत्तम’ । अकर्तात्म निजबोधें ॥९२॥ जो आकळे गुणांआंतु । त्यासी ते गुण करिती प्रांतु । त्या गुणांसी तुजमाजीं अंतु । यालागीं तूं ’अनंतु’ सर्वथा ॥९३॥ देशतः कालतः पार । तुज न करवेचि साचार । यालागीं अनंत तूं अपार । श्रुतींसी पार न कळेचि ॥९४॥ तुज म्यां करावी विनंती । किती यावें काकुळती । तूं हृदयस्थ ज्ञानमूर्ती । जाणता त्रिजगतीं तूं एकु ॥९५॥ ज्ञान अज्ञान मायाशक्ती । ईश्वराआधीन गा असती । त्या ईश्वराची तूं ईश्वरमूर्ती । सत्यकीर्ति तूं श्रीकृष्णा ॥९६॥ तूं सर्वांचा नियंता । सर्व करूनि अकर्ता । ऐसा ’ईश्वरु’ तूं कृष्णनाथा । भोगूनि अभोक्ता तूं एकु ॥९७॥ देशतः कालतः स्वभावेंसीं । नाशु न पावे ज्या स्थानासी । तेथींचा तूं निवासवासी । पूर्ण पूर्णांशी अवतारु ॥९८॥ नराचें अविनाशस्थान । यालागी तूं ’नारायण’ । तुझेनि जीवासी चळणवळण । चाळकपण तुजपाशीं ॥९९॥ ऐसा ईश्वर तूं आपण । ’नरसखा-नारायण’ । युद्धसमयीं अर्जुनासी जाण । ब्रह्मज्ञान त्वां दिधलें ॥२००॥ दारुण होतां संग्रामासी । पावडा पावो युद्धासी । तेव्हां ब्रह्मज्ञान सांगसी । निज सख्यासी अर्जुना ॥१॥ ऐसा कृपाळू तूं नारायण । यालागीं तुज आलों शरण । त्रिविधतापें तापलों जाण । दुःख दारुण संसारु ॥२॥ संसार म्हणजे अंधकूप । माजीं कामक्रोधादि दुष्ट सर्प । निंदा स्पर्धा कांटे अमूप । दुःखरूप मी पडिलों ॥३॥ तेथ पडीलियापाठीं । ब्रह्मद्वेषाचा शूळ पोटीं । भरला जी उठाउठी । तेणें हिंपुटी होतुसें ॥४॥ तेथून निघावया त्रिशुद्धी । उपावो न दिसे गा निजबुद्धी । कृपाळुवा कृपानिधी । आत्मबोधीं मज काढीं ॥५॥ श्रीभगवानुवाच । प्रायेण मनुजा लोके लोकतत्त्वविचक्षणाः । समुद्धरन्ति ह्यात्मानमात्मनैवाशुभाशयात् ॥ १९ ॥ भूत संचरलियापाठीं । सुटती जल्पवादगोठी । त्यातें गुणिया पाहोनि दिठीं । अक्षता त्राहाटी मंत्रोनी ॥६॥ पाहतां पांचभौतिक संसारु । सहजें झाला असे थोरु । माजीं झोंबलासे कृष्णवियोगखेचरु । उद्धव लेंकरूं झडपिलें ॥७॥ मिसें उद्धवाची झडपणी । अहं-म्हैसासुर लागला जनीं । त्यासी करावया झाडणी । कृष्ण गुणी चालिला ॥८॥ तेथ झाडणीलागीं आतां । यदुअवधूतसंवाद कथा । त्याचि मंत्रूनि मंत्राक्षता । होय झाडिता श्रीकृष्णु ॥९॥ श्रीकृष्ण म्हणे उद्धवासी । सावध होईं निजमानसीं । येऊनियां मनुष्यलोकासी । आपआीपणांसी उद्धरिती ॥२१०॥ पाहतां यया परमार्था । साह्य नव्हे माता पिता । पुत्र भ्राता दुहिता कांता । साह्य सर्वथा हे नव्हती ॥११॥ साह्य परमार्था नव्हे व्याही । शेखीं साह्य नव्हे जांवयी । आपणिया आपण साह्य पाहीं । जो निजदेहीं विवेकी ॥१२॥ मुमुक्षुमार्गींचे सज्ञान । लोक तत्वविचक्षण । विचारूनि कार्याकारण । स्वबुद्धीं जाण उद्धरले ॥१३॥ नित्यानित्यविवेकें । अनित्य सांडिती त्यागमुखें । नित्य तें यथासुखें । हित संतोखें अंगीकारिती ॥१४॥ नित्यत्वें जें उरलें जाण । तें स्वरूप माझें चिद्घन । तेंचि साधकांचे साधन जाण । अनन्यपणें चिंतिती ॥१५॥ भावितां माझी दृढ भावना । मीचि ते होती जाणा । कीटकी-भृंगीचिया खुणा । आपआणपणियां उद्धरिती ॥१६॥ आत्मनो गुरुरात्मैव पुरुषस्य विशेषतः । यत्प्रत्यक्षानुमानाभ्यां श्रेयोऽसावनुविन्दते ॥ २० ॥ पश्वादि योनींच्या ठायीं । हिताहितज्ञान असे पाहीं । मा पुरुषाच्या पुरुषदेहीं । ज्ञान पाहीं स्फुरद्रूप ॥१७॥ जें कर्म करितों मी देहीं । तेणें तरेन कीं नाहीं । हें ज्याचे त्याचे ठायीं । स्फुरद्रूप पाहीं कळतसे ॥१८॥ सांडूनि अशुभ वासना । जो न करी विषयकल्पना । तो आपुला गुरु आपण जाणा । नरकयातना चुकविली ॥१९॥ जो कंटाळला जन्मगर्भासी । मरमरों उबगला मरणासी । आधि लागली मानसीं । जन्ममरणासी नासावया ॥२२०॥ आवडी नुपजे स्त्रीपुत्रांसी । निद्रा न लागे अहर्निशीं । काळें ग्रासिलें आयुष्यासी । निजहितासी न देखिजे ॥२१॥ तुझीच तुजचि देखतां । काळें गिळिली बाल्यावस्था । तारुण्याचा ग्रासिला माथा । वार्धक्याभंवता लागला असे ॥२२॥ केवळ वार्धक्याचा जरंगा । त्यासीही काळु लागला पैं गा । आयुष्य व्यर्थ जातसे वेगा । हा निजनाडु जगा कळेना ॥२३॥ क्षणक्षणा काळु जातसे व्यर्थ । कांही न साधे जी परमार्थ । जन्ममरणांचा आवर्त । पुढें अनर्थ रोकडा ॥२४॥ स्वर्ग नरक कर्म ब्रह्म । चहूं प्राप्तींसी मनुष्यधर्म । यालागीं त्यजूनि पापकर्म । मोक्षधर्म धरावा ॥२५॥ नरदेह मोक्षाचा वांटा । वृथा जातसे कटकटा । हृदयीं आधी लागला मोठा । विषयचेष्टा विसरला ॥२६॥ ’प्रत्यक्ष’ लक्षणें अनित्य । संसारु दिसे नाशवंत । यालागीं तो नव्हे आसक्त । होय विरक्त इहभोगीं ॥२७॥ याचिपरी ’अनुमाना’ । परलोकभोगभावना । आतळों नेदी मना । नश्वर पतना जाणोनि ॥२८॥ कैं कृपा करील गोविंद । कैं तुटेल भवबंध । कैं देखेन तो निजबोध । परमानंद जेणें होय ॥२९॥ धांव पाव गा श्रीहरी । कृपा करीं दीनावरी । मज उद्धरीं भवसागरीं । भक्तकैवारी श्रीकृष्णा ॥२३०॥ जैसी जीवनावेगळी मासोळी । तैसा बोधालागीं तळमळी । प्रेमपडिभराच्या मेळीं । देह न सांभाळी सर्वथा ॥३१॥ एक नेणोनि नरदेहा मुकले । एकीं नव्हे म्हणोनि उपेक्षिले । एक ज्ञानगर्वे गिळिले । एक भुलले विषयार्थी ॥३२॥ एक साधनाभिमानें ठाकिले । एक करूं करूं म्हणता गेले । एक करितां अव्हाटां भरले । करणें ठेलें तैसेंचि ॥३३॥ जरी विवेक कळला मना । तरी न तुटती विषयवासना । तेणें संतप्त होऊनि जाणा । नारायणा चिंतितु ॥३४॥ कृष्ण म्हणे उद्धवासी । सविवेक वैराग्य असे ज्यासी । तोचि आपुला गुरु आपणासी । विशेषेंसी जाणावा ॥३५॥ त्याचिये निजबुद्धीसी । मीचि विवेकु प्रकाशीं । तो स्वयें जाणे निजबोधासी । निजमानसीं विवेकें ॥३६॥ ज्यासी जैसा भावो । त्यासी मी तैसा देवो । ये अर्थी संदेहो । उद्धवा पहा हो न धरावा ॥३७॥ उद्धवा येथ केवळ । पाहिजे निजबुद्धि निर्मळ । तरी आत्मबोध तत्काळ । होय सफळ सर्वथा । ॥३८॥ पुरुषत्वे च मां धीराः साङ्ख्ययोगविशारदाः । आविस्तरां प्रपश्यन्ति सर्वशक्त्युपबृंहितम् ॥ २१ ॥ एवं वैराग्यें पूर्ण भरित । धीर पुरुष विवेकयुक्त । सांख्ययोग विवंचित । निजीं निज प्राप्त तत्काळ ॥३९॥ नरदेहीं विवेक वसे । निजरूप पावले कैसे । जें सर्वशक्तियुक्त असे । तें सावकाशें देखती ॥२४०॥ जें प्रसवे सर्वशक्तींतें । तें सर्वशक्ति-शक्तिदातें । जें नातळे सर्वशक्तीतें । त्या स्वरूपातें पाहताति ॥४१॥ उद्धवा काय सांगों गोष्टी । बहुत शरीरें सृजिलीं सृष्टीं । मज नरदेहीं आवडी मोठी । उठाउठीं मी होती ॥४२॥ एकद्वित्रिचतुस्पादो बहुपादस्तथापदः । बह्व्यः सन्ति पुरः सृष्टास्तासां मे पौरुषी प्रिया ॥ २२ ॥ केलीं एकचरणी शरीरें । दोंपायांची अपारें । तींपायांचीं मनोहरें । अतिसुंदरें चतुष्पदें ॥४३॥ सर्पादि योनींच्या ठायीं । म्यां चरणचि केले नाहीं । एकें चालती बहु पायीं । केलीं पाहीं शरीरें ॥४४॥ ऐशीं शरीरें नेणो किती । म्यां निर्माण केलीं ये क्षितीं । मज कर्त्यातें नेणती । मूढमति यालागीं ॥४५॥ मज कर्त्याची प्राप्ति । होआवयालागीं निश्चितीं । स्वांशें प्रकाशोनि ज्ञानशक्ती । पौरुषी प्रकृति म्यां केली ॥४६॥ जेणें देहें मज पावती । त्या देहाची मज अतिप्रीति । यालागीं श्रुति नरदेह वर्णिती । देव वांछिती नरदेहा ॥४७॥ ऐशी नरदेहाची प्रीती । कृष्ण सांगे उद्धवाप्रती । येणें शरीरें मज पावती । नाना युक्तिविचारें ॥४८॥ अत्र मां मृगयन्त्यद्धा युक्ता हेतुभिरीश्वरम् । गृह्यमाणैर्गुणैर्लिङ्गैरग्राह्यमनुमानतः ॥ २३ ॥ येऊनि नरदेहाप्रती । कर्त्याची गवेषणा जे करिती । जो मी ईश्वर त्रिजगतीं । उत्पत्तिस्थितिसंहर्ता ॥४९॥ बुद्धियुक्तीं विवेक करणें । ते जडें प्रकाशपणें । त्याचाही मी प्रकाशकु म्हणे । येणें लक्षणें लक्षिती ॥२५०॥ ऐशा नानापरींच्या अनुमानां । मी तंव वश नव्हें जाणा । जे लक्षिती सांडोनि अभिमाना । साक्षात्पणा ते येती ॥५१॥ ज्याची आशा होय निराश । तोचि ब्रह्म पावे सावकाश । तेणें कळीकाळावरी कांस । जाण अवश्य घातली ॥५२॥ मुख तंव स्वतःसिद्ध असे । तें निर्मळ आरिसां दिसे । तेवीं बुद्धीचेनि विवेकवशें । आत्मा भासे नरदेहीं ॥५३॥ येचिविखींचा इतिहास जाण । तुज मी सांगेन पुरातन । यदुअवधूतसंवादलक्षण । ज्ञानसाधन साधकां ॥५४॥ अत्राप्युदाहरन्तीममितिहासं पुरातनम् । अवधूतस्य संवादं यदोरमिततेजसः ॥ २४ ॥ हरिखें म्हणतसे गोविंदु । उद्धवा आमुचा पूर्वज यदु । तेणें ब्रह्मज्ञानासी संवादु । केला विशदु अवधूतासीं ॥५५॥ राजा यदु म्हणसी कैसा । क्षात्रसृष्टीचा सूर्यो जैसा । राजा चंद्राच्या प्रकाशा । निजतेजवशा लोपितु ॥५६॥ तेणें गुरूचीं लक्षणें ऐकतां । सायुज्यमुक्ति आली हाता । ते हे पुरातन कथा । तुज मी आतां सांगेन ॥५७॥ अवधूतं द्विजं कञ्चिच्चरन्तमकुतोभयम् । कविं निरीक्ष्य तरुणं यदुः पप्रच्छ धर्मवित् ॥ २५ ॥ कोणी एक अवधूतु । निजतेजें प्रकाशवंतु । ब्रह्मानंदें डुल्लतु । यदूनें येतु देखिला ॥५८॥ त्या अवधूताचें लक्षण । यदु निरीक्षी आपण । देखिलें ब्रह्मसूत्रधारण । होय ब्राह्मण ब्रह्मवेत्ता ॥५९॥ ऐसा तो अवधूतु । निर्भय निःशंक वर्ततु । यदु व्याहाळिये होता जातु । देखिला वनांतु सन्मुख ॥२६०॥ आंतुला प्राण तत्त्वतां । बाहेर रिघों नेदी सर्वथा । स्वभावें प्राणापानसमता । झाली न धरितां धारणा ॥६१॥ नवल तयाचें पाहणें । दृश्य दृश्यत्वें देखों नेणे । झाला सर्वांगें देखणें । देखणेंपणें पाहातसे ॥६२॥ मी एकु वनीं वसता । हेंही नाठवे त्याचिया चित्ता । झाली सर्वत्र सर्वगतता । समसाम्यता समत्वें ॥६३॥ कर्म कार्य कर्ता जाण । अवघा जाहला तो आपण । क्रियेनें वाहूनियां आण । निंबलोण जीवें केलें ॥६४॥ देहाचिया माथां । ठेविली होती अहंता । तें देहमिथ्यात्व पावतां । समूळ अहंता पळाली ॥६५॥ नित्यानित्य होमद्वारें । ब्रह्माग्नि प्रज्वळला एकसरें । जाळूनि आश्रमांची चारी घरें । केलें खरें निराश्रमी ॥६६॥ त्या आश्रमामाजीं होती । शास्त्रश्रवणविधिवादपोथी । ते जळाली जी निश्चितीं । भस्म हातीं न लगेचि ॥६७॥ विधिनिषेध पैजा । जळाली पंचायतनदेवपूजा । होता संचितक्रियमाणपुंजा । तोही वोजा जळाला ॥६८॥ यापरी तो अवधूतु । ब्रह्मानंदें जी डुल्लतु । निजसुखें वेल्हावतु । देखिला येतु यदुरायें ॥६९॥ संकल्प-विकल्परहित । शुद्ध सर्वांगी विभूत । यालागीं बोलिजे ’अवधूत’ । येर्हलवीं विख्यात ब्राह्मणु ॥२७०॥ सभोंवता समस्तु । प्रपंच निजबोधें असे धूतु । यालागीं बोलिजे ’अवधूतु’ । येर्हरवीं विख्यातु ब्राह्मणु ॥७१॥ अहं धुई तो ’अवधूतु’ । तोचि योगी तोचि पुनीतु । जो का अहंकारग्रस्तु । तोचि पतितु जन्मकर्मी ॥७२॥ वार्धक्य यावें देहासी । तंव देहपण नाहीं देहापासीं । रिगमु नव्हेच जरेसी । तारुण्यासी तें मूळ ॥७३॥ आणिकही त्याचीं लक्षणें । नीच नवा बोधु मैळों नेणें । भोगिजे नित्य नूतनपणें । परम तारुण्यें टवटवला ॥७४॥ निजबोधाचिया सत्ता । द्वैत जिंतिलें तत्त्वतां । ऐसा निःशंकु विचरतां । भय सर्वथा त्या नाहीं ॥७५॥ ऐशीं लक्षणें निर्धारितां । अवधूत निजबोधें पुरता । यदूसी उपजली विनीतता । श्रद्धा सर्वथा अनिवार ॥७६॥ करूनि साष्टांग दंडवत । अतिनम्र श्रद्धायुक्त । हात जोडूनि पुसत । प्रसन्न चित्त रायाचें ॥७७॥ श्रीयदुरुवाच । कुतो बुद्धिरियं ब्रह्मन्नकर्तुः सुविशारदा । यामासाद्य भवाल्लोकं विद्वांश्चरति बालवत् ॥ २६ ॥ अपूर्व बुद्धि हे स्वामी । तुमचे ठायीं देखों आम्ही । जे न लभे यमनियमीं । कर्मधर्मीं आचरतां ॥७८॥ दिसतोसी सर्वार्थी कुशळ । परी कांही न करूनि निश्चळ । अकर्तात्मबोधें तूं केवळ । जैसें बाळ अहेतुक ॥७९॥ तूं बालाऐसा वर्तसी । परी बालबुद्धि नाहीं तुजपासीं । सर्वज्ञ सर्वथा होसी । ऐसें आम्हांसी दिसतसे ॥२८०॥ येवोनियां या लोकासी । पावोनियां नरदेहासी । सार्थकता तुझ्याऐसी । आणिकापाशीं न देखों ॥८१॥ प्रायो धर्मार्थकामेषु विवित्सायां च मानवाः । हेतुनैव समीहन्ते आयुषो यशसः श्रियः ॥ २७ ॥ प्रायशा ये लोकीं लोक । धर्मअर्थकामकामुक । येचिविखीं ज्ञान देख । आवश्यक करिताति ॥८२॥ आम्ही स्वधर्म करितों म्हणती । स्नानसंध्येची कीर्ति मिरविती । शेवटीं गायत्रीचें फळ देती । अर्थप्राप्तीलागोनी ॥८३॥ वेदोक्त आम्ही करितों याग । संस्थापितों वेदमार्ग । शेखीं तो करिती जीविकायोग । स्वर्गभोग वांछिती ॥८४॥ एक म्हणती आम्ही स्वकर्मक । कुश मृत्तिका नाशिती उदक । समयीं आलिया याचक । इवलीसी भीक न घालिती ॥८५॥ दांभिक वाढवावया स्फीती । वैष्णवदीक्षा अवलंबिती । देवपूजा झळफळीत दाविती । शंख लाविती दों हातीं ॥८६॥ आयुष्यदानी पुण्यपुरुष । आम्ही चिकित्सक अहिंस । स्थावर जंगम जीव अशेष । मारूनियां यश मिरविती ॥८७॥ यश वाढवावया कारण । तुळापुरुष करिती दान । देहो मूत्रविष्ठें परिपूर्ण । धन त्यासमान जोखिती ॥८८॥ परी परमार्थाचिया चाडा । कोणी वेंचीना कवडा । भूल कैशी पडली मूढां । स्वार्थ रोकडा विसरले ॥८९॥ पूर्वीं अदृष्टीं नाहीं प्राप्ती । ते श्रीकामा उपास्ती करिती । श्रियेचा स्वामी श्रीपती । त्यातें न भजती अभाग्य ॥२९०॥ लक्ष्मी विश्वगुरु हरीची पत्नी । तीतें जो तो राखे अभिलाषूनी । नेदिती हरीची हरिलागोनी । त्यातें पतनीं हरि पचवी ॥९१॥ रोगत्यागें आयुष्य मागती । यालागीं सविता उपासिती । देहो नश्वर हें नाठवे चित्तीं । पडली भ्रांती निजपदा ॥९२॥ एवं आयुष्य-यश-श्रीकामीं । समस्त भजतां देखों आम्ही । परी नवल केलें तुवां स्वामी । परब्रह्मीं निजबोधु ॥९३॥ विषयबळ अलोलिक । मिथ्या भ्रमें भ्रमले लोक । ज्ञानसाधनें साधोनि देख । विषयसुख वांछिती ॥९४॥ वेदांतवार्तिकवाक्स्फू र्ती । अद्वैत ब्रह्म प्रतिपादिती । शेखीं पोटासाठीं विकिती । नवल किती सांगावें ॥९५॥ एक म्हणविती योगज्ञानी । वायुधारणा दाविती जनीं । टाळी लावूनि बैसती ध्यानीं । जीविका मनीं विषयांची ॥९६॥ ऐसे विविदिषा लोक । साधनें साधूनि झाले मूर्ख । तुवां केलें जी अलोलिक । आत्मसुख साधिलें ॥९७॥ ऐसें स्वामी अवधूता । तुवां तृणप्राय केलें जीविता । तुच्छ करोनि लोकां समस्तां । निजात्महिता मीनलासी ॥९८॥ निजानंदें निवालासी । अंतरी शीतळ झालासी । ऐसें दिसताहे आम्हांसी । उपलक्षणेंसी परियेसीं ॥९९॥ त्वं तु कल्पः कविर्दक्षः सुभगोऽमृतभाषणः । न कर्ता नेहसे किञ्चिज्जडोन्मत्तपिशाचवत् ॥ २८ ॥ सर्वज्ञज्ञाता तूं होसी । तें ज्ञातपण दिसों न देसी । कांहीं करिसी ना वांछिसी । जडत्वें दाविसी निजशांती ॥३००॥ सर्वथा उगा अससी । परी तूं अंगें विकळ नव्हसी । अंगीं अव्यंगु दिसतोसी । स्वरूपरूपेंसीं शोभितु ॥१॥ ज्ञान एकलेपणें ठेलें । दुजेनिवीण परदेशी झालें । तें तुजमाजीं सामावलें । यालागीं आलें ’कवि’ पद ॥२॥ करूनि झालासी अकर्ता । हेचि तुझी थोर ’दक्षता’ । ब्रह्मरसें ’रसाळ’ बोलतां । चवी अमृता ते कैंची ॥३॥ ब्रह्मरस तू प्यालासी । ब्रह्मानंदें मातलासी । जगीं ’उन्मत्त’ झालासी । दृष्टीं नाणिसी कोणातें ॥४॥ सदा सावध निजरूपेंसी । यालागीं ’माझें-तुझें’ न म्हणसी । तेंचि ’पिसेंपण’ तुजपाशीं । दिसे जगासी सर्वथा ॥५॥ निजबोधें तृप्त झालासी । परमानंदें निवालासी । तीं हीं लक्षणें तुजपासीं । निर्धारेंसीं दिसताती ॥६॥ जनेषु दह्यमानेषु कामलोभदवाग्निना । न तप्यसेऽग्निना मुक्तो गङ्गाम्भःस्थ इव द्विपः ॥ २९ ॥ कामलोभदावाग्नी- । माजीं जळतां लोक तीन्ही । देखत असों जी नयनीं । वेगळा कोणी दिसेना ॥७॥ ते दावाग्नीमाजीं असतां । तूं न पोळसी गा अवधूता । नवल तुझी अक्षोभ्यता । नकळे सर्वथा आम्हांसी ॥८॥ वणवा जळे दोंही थडीं । गजें गंगाजळीं दिधली बुडी । त्यासी न लागती तापाच्या वोढी । तैसें निरवडीं तुज देखों ॥९॥ ऐशीं द्वंद्वें तुज नातळती । दृढ राहिलासी ब्रह्मस्थितीं । कांही एक करीन विनंती । कृपामूर्ति दयाळुवा ॥३१०॥ त्वं हि नः पृच्छतां ब्रह्मन्नात्मन्यानन्दकारणम् । ब्रूहि स्पर्शविहीनस्य भवतः केवलात्मनः ॥ ३० ॥ तूं ब्रह्मवेत्ता ब्राह्मण । निजानंदें परिपूर्ण । त्या आनंदाचें कारण । विशद करून सांगावें ॥११॥ तूं देहीं वर्तसी विदेहस्थिती । तुज विषय आतळूं न शकती । हे अलिप्तपणाची प्राप्ती । कवण्या रीतीं तुज झाली ॥१२॥ तुज नाहीं रायाची भीड । न करिसी धनवंताची चाड । दीनवचन मानिसी गोड । पुरविसी कोड निजबोधें ॥१३॥ ऐसा केवळ तूं कृपाळू । आर्तबंधु दीनदयाळु । निजात्मभावें तूं केवळु । भक्तवत्सलु भावार्थे ॥१४॥ ऐसा यदूचा संवादु । आवडीं सांगे गोविंदु । उद्धवासी म्हणे सावधु । हृदयीं बोधु धरावा ॥१५॥ श्रीभगवानुवाच । यदुनैवं महाभागो ब्रह्मण्येन सुमेधसा । पृष्टः सभाजितः प्राह प्रश्रयावनतं द्विजः ॥ ३१ ॥ श्रीमुखें श्रीकांत । यदूचें भाग्य वर्णित । ब्राह्मणभक्त सत्त्वयुक्त । बुद्धिमंत श्रद्धाळु ॥१६॥ भगवद्भाग्यें भाग्यवंतु । यदूसी भेटला तो अवधूतु । त्यासी होऊनि अतिविनीतु । असे विनवितु निजहिता ॥१७॥ मृदु मंजुळ वचनीं प्रार्थिला । मधुपर्कविधानें पूजिला । अवधूत अतिसंतोषला । बोलता झाला निजमुखें ॥१८॥ श्रीब्राह्मण उवाच । सन्ति मे गुरवो राजन् बहवो बुद्ध्युपाश्रिताः । यतो बुद्धिमुपादाय मुक्तोऽटामीह ताञ्छृणु ॥ ३२ ॥ क्षीरसागर उचंबळला । कीं कृपेचा मेघ गर्जिन्नला । निजसुखाचा वाधावा आला । तैसें बोलिला ब्राह्मणु ॥१९॥ ऐकें राजया चूडामणी । यदुकुळदीप दिनमणी । धन्य धन्य तुझी वाणी । निजगुणीं निवविलें ॥३२०॥ राजा आणि सात्त्विकु । सिद्धलक्षणें लक्षकु । पृथ्वीमाजीं तूचि एकु । न दिसे आणिकु सर्वथा ॥२१॥ सुंदर आणि सगुण । उत्तमोत्तम केला प्रश्न । पुसिलें निजानंदकारण । तें यथार्थ जाण सांगेन ॥२२॥ गुरूविण आत्मप्राप्ती । सर्वथा न घडे गा नृपती । ते गुरूही मी तुजप्रती । यथानिगुतीं सांगेन ॥२३॥ निजबुद्धीच्या विवेकस्थितीं । बहुत गुरु म्यां केले असती । जे जे सद्गुयण म्यां देखिले भूतीं । ते ते स्थितीं तो गुरु ॥२४॥ बुद्धीनें अंगिकारिलें गुणा । निजधैर्यें धरिली धारणा । तेणें मी मुक्त झालों जाणा । स्वेच्छा अटणा करीतसें ॥२५॥ संसारु तरावया । मुख्य ’सद्बुेद्धि’ गा राया । रिगमू नाहीं आणिका उपाया । व्यर्थ कासया शिणावें ॥२६॥ सद्बु द्धि नाहीं ज्यापासीं । तो संसाराची आंदणी दासी । उसंत नाहीं अहर्निशीं । दुःखभोगासी अनंत ॥२७॥ सद्बुनद्धि नाहीं हृदयभुवनीं । तेथ वैराग्य नुपजे मनीं । मा तो तरेल कैसेनीं । विवेक स्वप्नीं न देखे ॥२८॥ वैराग्याचेनि पडिपाडें । ज्यासी सद्बु द्धि सांपडे । तेथ संसार कोण बापुडें । घायें रोकडें विभांडी ॥२९॥ आधीं संसारु एकु असावा । मग तो खटाटोपें नासावा । जो रिघाला विवेकगांवा । त्यासी तेव्हां तो नाहीं ॥३३०॥ संसारनाशासी मूळ । शिष्य-प्रज्ञाचि केवळ । तिचें झाल्या अढळ बळ । होये मृगजळ संसारु ॥३१॥ जे मी गुरु सांगेन म्हणे । तें निजप्रज्ञेचेनि लक्षणें । हेयादेयउरपायपणें । घेणें त्यजणें सविवेकें ॥३२॥ हेचि मर्हा ठिया भाखा । सांगेन तें सावध ऐका । जेणें शिष्याचा आवांका । पडे ठाउका प्रत्यक्ष ॥३३॥ ऐक प्रज्ञेचीं लक्षणें । सांगेन दृष्टांतपणें । सूप चाळणी रांधणें । घेणें त्यजणें विवेकें ॥३४॥ चाळणीमाजीं जें जें पडे । सूक्ष्म निजतत्त्व तळीं सांडे । उरती गुणदोषांचे खडे । करिती बडबडे खडबडित ॥३५॥ ऐसी जे अवस्था । ते त्यागावी सर्वथा । भ्रंशु होईल स्वार्था । हे राखतां त्रिशुद्धी ॥३६॥ सुपाची दशा ते ऐशी । त्यजी रजःकण भुसासी । निडारल्या निजबीजासी । निजहृदयेंसीं राखत ॥३७॥ स्वयें वैराग्यें तापणें । ते दशा ’रांधणें’ म्हणें । अपक्कासी परिपक्क करणें । निजगुणें निजांगें ॥३८॥ एवं या दोनी दशा । दृढ धराव्या वीरेशा । तेणें परमार्थु होये आपैसा । जेवी आरिसा हातींचा ॥३९॥ यदूसी म्हणे ब्राह्मण । जें म्यां सांगितलें लक्षण । तेथें ठेवूनियां मन । सावधान परियेसीं ॥३४०॥ जो जो जयाचा घेतला गुण । तो तो गुरु म्यां केला जाण । गुरूसी आलें अपारपण । जग संपूर्ण गुरु दिसे ॥४१॥ ज्याचा गुण घेतला । तो सहजें गुरुत्वा आला । ज्याचा गुण त्यागरूपें घेतला । तोही गुरु झाला अहितत्यागें ॥४२॥ एवं त्यागात्यागसमतुकें । दोहींसी गुरुत्व आलें निकें । राया तूं पाहें पां विवेकें । जगचि असकें गुरु दिसे ॥४३॥ ऐसें पाहतां सावकाशीं । गुरुत्व आलें जगासी । हेंचि साधन जयापासीं । तोचि परमार्थासी साधकु ॥४४॥ ऐसें सांगतां अचाट । तुज वाटेल हें कचाट । तरी गुरु सांगो श्रेष्ठ श्रेष्ठ । मानिले वरिष्ठ निजबुद्धीं ॥४५॥ पृथिवी वायुराकाशमापोऽग्निश्चन्द्रमा रविः । कपोतोऽजगरः सिन्धुः पतङ्गो मधुकृद्गजः ॥ ३३ ॥ मधुहा हरिणो मीनः पिङ्गला कुररोऽर्भकः । कुमारी शरकृत्सर्प ऊर्णनाभिः सुपेशकृत् ॥ ३४ ॥ गुरु सांगेन अशेष । संख्याप्रमाण ’चोवीस’ । त्यांचीं नांवें तूं परिस । सावकाश सांगेन ॥४६॥ पृथ्वी वायु आकाश । अग्नि आप सीतांश । सातवा तो चंडांष । कपोता परिस आठवा ॥४७॥ अजगर सिंधु पतंग । मधुमक्षिका गज भृंग । हरिण मीन वेश्या साङ्ग । नांवें सुभग ’पिंगला’ ॥४८॥ टिटवी आणि लेंकरूं । कुमारी आणि शरकारु । सर्प कातणी पेशस्करु । इतुकेन गुरु चोवीस ॥४९॥ पावावया तत्त्व पंचविसावें । चोविसां गुरूंसी उपासावें । विवेकयुक्तिस्वभावें । गुरु भजावे निजबुद्धीं ॥३५०॥ ठाकावया निजबोधासी । निजविवेकें अहर्निशीं । गुरुत्व देऊनि अनेकांसी । निजहितासी गुरु केले ॥५१॥ कोण युक्ति कोण विचारु । कोणें लक्षणें कोण गुरु । केला तोही निजनिर्धारु । सविस्तारु परियेसीं ॥५२॥ एते मे गुरवो राजन् चतुर्विंशतिराश्रिताः । शिक्षा वृत्तिभिरेतेषामन्वशिक्षमिहात्मनः ॥ ३५ ॥ ऐकें राजवर्य नृपती । विवेकधवलचक्रवर्ती । गुरुसंख्या तुजप्रती । यथानिगुतीं सांगितली ॥५३॥ यांचिया शिक्षिता वृत्ती । शिकलों आपुलिया युक्तीं । मग पावलों आत्मस्थिती । विकल्पभ्रांती सांडूनी ॥५४॥ यतो यदनुशिक्षामि यथा वा नाहुषात्मज । तत्तथा पुरुषव्याघ्र निबोध कथयामि ते ॥ ३६ ॥ नहुषाचा पुत्र ययाती । ययातीचा यदु निश्चितीं । ’नहुषनंदन’ यदुसी म्हणती । मूळ व्युत्पत्ती तेणें योगें ॥५५॥ यालागीं म्हणे ’नाहुषनंदना’ । पुरुषांमाजीं पंचानना । सांगेन गुरूंच्या लक्षणा । विचक्षणा परियेसीं ॥५६॥ ज्या गुरूचें जें शिक्षित । मी शिकलों सुनिश्चित । तें ते सांगेन समस्त । सावध चित्त करीं राया ॥५७॥ ऐकावया गुरुलक्षण । यदूनें सर्वांग केलें श्रवण । अर्थीं बुडवूनियां मन । सावधान परिसतु ॥५८॥ शब्द सांडोनियां मागें । शब्दार्थामाजीं रिगे । जें जें परिसतु तें तें होय अंगें । विकल्पत्यागें विनीतु ॥५९॥ भूतैराक्रम्यमाणोऽपि धीरो दैववशानुगैः । तद्विद्वान्न चलेन्मार्गादन्वशिक्षं क्षितेर्व्रतम् ॥ ३७ ॥ परमार्थी मुख्य शांती । साधकांसी पाहिजे निश्चितीं । यालागीं प्रथम गुरु क्षिती । निजशांतीलागूनी ॥३६०॥ ’पृथ्वी’ गुरु त्रिविध पाहीं । पर्वत वृक्ष आणि मही । यांचीं लक्षणें धरितां देहीं । गुरुत्व पाहीं पृथ्वीसी ॥६१॥ अंतरनिग्रहो ते ’शांती’ । बाह्येंद्रियनिग्रहो ते ’दांती’ । उभयसहिष्णुता ते ’क्षांती’ । क्षांतीसी क्षिति गुरु केली ॥६२॥ पृथ्वीते नानाभूतीं । माझी माझी म्हणौनि झोंबती । नाना भेदीं भिन्न करिती । निजवृत्तिव्यवहारें ॥६३॥ त्या भूतांचे भिन्न वर्तन । पृथ्वी संपादी आपण । मोडों नेदी अभिन्नपण । अखंड जाण सर्वदा ॥६४॥ तैसें योगियांचे लक्षण । करितां कर्म भिन्नभिन्न । वृत्ति अखंडदंडायमान । सर्वदा जाण असावी ॥६५॥ देहासी अदृष्टयोगें गती । भूतें अदृष्टयोगें आक्रमिती । भूतीं निजात्मता भाविती । द्वंद्वें न बाधिती साधकां ॥६६॥ येथ भूतीं पृथ्वी पूजिली । नातरी विष्ठामूत्रीं गांजिली । हर्षविषादा नाहीं आली । निश्चल ठेली निजक्षांती ॥६७॥ भूतें पार्थिवेंचि तंव झालीं । तिंहीं पृथ्वी पूजिली ना गांजिली । ऐक्यें द्वंद्वभावा मुकलीं । निश्चळ झाली निजरूपें ॥६८॥ तैसाचि योगियाही जाणा । भूतवैषम्यें डंडळेना । सर्वभूती निजात्मभावना । विषमीं समाना भावितां ॥६९॥ आतां पृथ्वीची अभिनव शांति । ते सांगेन राया तुजप्रती । जे शांति धरोनि संती । भगवद्भक्ती पावले ॥३७०॥ पृथ्वी दाहेंकरूनि जाळिली । नांगर घालूनि फाळिली । लातवरीं तुडविली । तोडिली झाडिली पैं भूतीं ॥७१॥ तो अपराधु न मनूनि क्षिती । सवेंचि भूतांतें प्रसन्न होती । तेथेंचि पिकवूनि नाना संपत्ती । तृप्ति देती भूतांतें ॥७२॥ ऐसऐेशिया निजशांती-। लागीं गुरु म्यां केली क्षिती । ऐक सभाग्या भूपती । शांतीची स्थिति अभिनव ॥७३॥ एकें अपराधु केला । दुजेनि उगाचि साहिला । इतुकेनि शांतु केवीं झाला । उपेक्षिला अपराधी ॥७४॥ ऊंसु मोडी त्या गोड भारी । छेदितें शस्त्र गोड करी । पिळिलियाआळिलियावरी । स्वादाचिया थोरी अपकार्यां देतु ॥७५॥ अपराध साहोनु अंगी । त्याच्या प्रवर्ते हितालागीं । तेचि ’शांति’ पैं जगीं । होय दाटुगी निर्द्वंद्व ॥७६॥ अपराध साहोनि अंगावरी । अपराध्या होईजे उपकारी । हें शिकलों पृथ्वियेवरी । परोपकारीं पर्वत ॥७७॥ शश्वत्परार्थसर्वेहः परार्थैकान्तसम्भवः । साधुः शिक्षेत भूभृत्तो नगशिष्यः परात्मताम् ॥ ३८ ॥ पृथ्वीपासोनि झाले । ते पर्वतही म्यां गुरु केले । त्यांपासोनि जें जें शिकलें । तेंही वहिलें परियेसीं ॥७८॥ रत्नं-निकर समस्त । पर्वत परार्थचि वाहत । तृण जळ नाना अर्थ । तेही परार्थ धरितसे ॥७९॥ कोणासी नेमी ना निवारी । उबगोनि न घाली बाहेरी । याचकाचे इच्छेवरी । परोपकारीं देतसे ॥३८०॥ ग्रीष्माअंतीं सर्व सरे । परी तो देतां मागें न सरे । सवेंचि भगवंते कीजे पुरें । वर्षोनि जळधरें समृद्धी ॥८१॥ जंव जंव उल्हासें दाता देतु । तंव तंव पुरवी जगन्नाथु । विकल्प न धरितां मनाआंतु । देता अच्युतु अनिवार ॥८२॥ सत्य अच्युत दाता । हें न मनेचि तत्त्वतां । यालागीं दरिद्रता । विकल्पवंता लागली ॥८३॥ एवं पर्वताची जे उत्पत्ती । ते परोपकारार्थ एकांतीं । उपकारावांचूनि चित्तीं । दुजी वृत्ति जाणेना ॥८४॥ त्या पर्वताऐशी तत्त्वतां । असावी साधकासी उदारता । काया वाचा आणि चित्ता । सर्वस्व देतां उल्हासु ॥८५॥ चेष्टामात्रें परोपकारता । सर्वदा करावी समस्तां । कोटिलाभा हाणोनि लाता । उपकारीं तत्त्वतां उद्यतु ॥८६॥ परमार्थाचिया चाडा । स्वार्थ सांडोनि रोकडा । परोपकारार्थ अवघडा । रिघे सांकडा परार्थें ॥८७॥ उपकारुचि साकारला । कीं परोपकारु रूपा आला । तैसा जन्मोनि उपकारी झाला । उपकारला सर्वांसी ॥८८॥ ऊंसु जैसा अवधारीं । सर्वासी गोडपणें उपकारी । तैसाचि योगिया संसारीं । परोपकारी मधुरत्वें ॥८९॥ जैसे पर्वतीं निर्झर । तैसे उपकाराचे पाझर । सुकों नेणती निरंतर । कृतोपकार जग केलें ॥३९०॥ सांडोनि कृपणवृत्तीची संगती । उपकारी पर्वत एकांतीं । राहिलासे उपकारमूर्ती । धैर्यवृत्ति निर्धारें ॥९१॥ परोपकारालागीं निश्चित । गुरु केला म्यां पर्वत । आतां वृक्षापासोनि जें शिक्षित । तेंही समस्त परियेसीं ॥९२॥ सर्वांगें सर्वभावेंसी । सर्वकाळ सर्वदेशीं । पराधीन होआवें सर्वांसी । हें वृक्षापाशीं शिकलों ॥९३॥ वृक्ष जेणें प्रतिपाळिला । तो त्या आधीन जाहला । कां जो छेदावया रिघाला । त्याही झाला स्वाधीनु ॥९४॥ योगिया पालखीसी घातला । तेव्हां त्याचिया आधीन झाला । एकीं शूळीं द्यावया चालविला । तेव्हां त्याच्याही बोला आधीनु ॥९५॥ सांडूनि देहींची अहंता । योगियासी झाली पराधीनता । विश्व माझा आत्मा सर्वथा । सर्वांच्या वर्तता बोलाआंतु ॥९६॥ सर्वं तें मीचि आहें । यालागीं साधक बाधक न पाहे । त्याच्या बोलामाजीं राहे । वर्तता होये संतोषें ॥९७॥ प्राप्त जें जें सुखदुःख । तें तें अदृष्टाआधीन देख । आत्मा मानुनी सकळ लोक । पराधीन देख वर्तत ॥९८॥ सकळ लोकीं निजात्मता । देखता जाहली पराधीनता । हें वृक्षापासोनि तत्त्वतां । ’परात्मता’ शिकलों ॥९९॥ आणीक एक लक्षण । वृक्षापासोनि शिकलों जाण । अतिथीचें पूजाविधान । तें सावधान परियेसीं ॥४००॥ अतिथि आल्या वृक्षापासीं । वंचनार्थु न करी त्यासी । पत्रपुष्पफलमूळच्छायेसीं । त्वचाकाष्ठांसी देतसे ॥१॥ जो वृक्षासी प्रतिपाळी । कां जो घावो घालूं ये मूळीं । दोंहीसीही सममेळीं । पुष्पीं फळीं संतुष्टी ॥२॥ जैसा वृक्ष समूळ सगळा । अर्थियांलागीं सार्थक जाहला । तैसा चित्तें वित्तें देहें बोला । साधु संतुष्टला अर्थ्यांसी ॥३॥ अतिथीसी नव्हे पराङ्मुदख । हा साधूसी गुण अलोलिक । अन्न धन उदक । यथासुखें देतुसे ॥४॥ अर्थी आल्या अर्थावयासी । विमुख न व्हावें सर्वस्वेंसी । हें शिकलों वृक्षापासीं । विवेकेंसीं निजबुद्धीं ॥५॥ एवं पृथ्वी गुरु झाली ऐसी । दुजें गुरुत्व तें वायूसी । आलें जें जें युक्तीसी । तें तें परियेसीं नरदेवा ॥६॥ गुरुत्व जें वायूसी । तें दों प्रकारीं परियेसीं । एक तें प्राण वृत्तीसीं । बाह्य वायूसी दुसरें ॥७॥ प्राणवृत्त्यैव सन्तुष्येन्मुनिर्नैवेन्द्रियप्रियैः । ज्ञानं यथा न नश्येत नावकीर्येत वाङ्मनः ॥ ३९ ॥ प्राणाचियेपरी । जो विषयीं आसक्ती न धरी । विषय सेविलियाही वरी । नव्हे अहंकारी प्राणु जैसा ॥८॥ प्राणाभ्यासें क्षुधा अद्भुत । तेव्हां प्राणासीच क्षोभ येत । तेणें काया वाचा चित्त । विकळ पडत इंद्रियें ॥९॥ तया प्राणासी आधारु । भलतैसा मिळो आहारु । परी धडगोडांचा विचारु । न करी साचारु पैं प्राणु ॥४१०॥ तैसाचि योगिया पाहीं । तो अभिमान न धरी देहीं । विषयो सेवी परी कांही । आसक्ति नाहीं तयासी ॥११॥ क्षुधेचिया तोंडा । मिळे कोंडा अथवा मांडा । परी रसनेचा पांगडा । न करी धडफुडा तयासी ॥१२॥ ज्ञानधारणा न ढळे । इंद्रियें नव्हती विकळें । तैसा आहार युक्तिबळें । सेविजे केवळें निजधैर्यें ॥१३॥ प्राणास्तव इंद्रियें सबळें । प्राणायोगें देह चळे । त्या देहकर्मा प्राणु नातळे । अलिप्त मेळें वर्ततु ॥१४॥ त्या प्राणाच्या ऐसी स्थिती । योगियाची वर्तती वृत्ती । सर्व करूनि न करी आसक्ती । देहस्थिति नातळे ॥१५॥ ब्रह्मादिकांचा देह पाळूं । कां सूकरादिकांचा देह टाळूं । ऐसा न मानीच विटाळू । प्राणु कृपाळु समभावें ॥१६॥ तैसेंचि योगियाचें कर्म । न धरी उंच नीच मनोधर्म । कदा न देखे अधमोत्तम । भावना सम समभावें ॥१७॥ आवडीं प्रतिपाळावा रावो । रंकाचा टाळावा देहो । ऐसा प्राणासी नाहीं भावो । शुद्ध समभावो सर्वत्र ॥१८॥ प्राण अपान समान उदान । सर्व संधी वसे व्यान । इतुकीं नामें स्थानें पावोनि जाण । न सांडी प्राण एकपणा ॥१९॥ तैसे उंच नीच वर्णावर्ण । अधमोत्तमादि गुणागुण । देखोनियां योगी आपण । भावना परिपूर्ण न सांडी ॥४२०॥ प्राणु असोनि देहाभीतरीं । बाह्य वायूसी भेद न धरी । तैशी योगिया भावना करी । बाह्यभ्यंतरीं ऐक्यता ॥२१॥ विषयेष्वाविशन्योगी नानाधर्मेषु सर्वतः । गुणदोषव्यपेतात्मा न विषज्जेत वायुवत् ॥ ४० ॥ पार्थिवेष्विह देहेषु प्रविष्टस्तद्गुवणाश्रयः । गुणैर्न युज्यते योगी गन्धैर्वायुरिवात्मदृक् ॥ ४१ ॥ ऐक्यता साधावी चतुरीं । ते वायूच्या ऐशी दोंहीपरी । बाह्य आणि अंतरीं । ऐक्यकरीं वर्तावें ॥२२॥ प्राणवृत्तीचीं लक्षणे । तुज सांगितलीं संपूर्णें । आतां बाह्य वायूचीं चिन्हें । सावधानें परियेसीं ॥२३॥ वायु सर्वांतें स्पर्शोनि जाये । परी अडकला कोठें न राहे । तैसें विषय सेवितां पाहे । आसक्तु नव्हे योगिया ॥२४॥ असोनि इंद्रियांचेनि मेळें । तो विषयांमाजी जरी खेळे । तरी गुणदोष आसक्ति मेळें । बोधु न मळे तयाचा ॥२५॥ वस्त्र चंदन वनिता माळा । सदा भोगितां विषयसोहळा । वायु नातळे जेवीं जाळा । तेवीं योगी वेगळा विषयांसी ॥२६॥ जैसें वारेनीं जाळ उडे । परी जाळीं वारा नातुडे । तेवीं भोग भोगितां गाढे । भोगीं नातुडे योगिया ॥२७॥ जातया वायूचे भेटी । सुगंध कोटी घालिती मिठी । त्यांची आसक्ती नाहीं पोटीं । उठाउठीं सांडितु ॥२८॥ तैसा आत्मत्वें योगिया पाहीं । प्रवेशलासे सर्वां देहीं । देह गुणाश्रयो पाहीं । ठायींच्या ठायीं तोचि तो ॥२९॥ निजात्मदृष्टीचेनि बळें । तो देहगुणांसी नातळे । जैसा गंधावरी वारा लोळे । परी नाकळे गंधासी ॥४३०॥ तेचि परिपूर्ण आत्मस्थिती । राया मी सांगेन तुजप्रती । जैसी आकाशाची प्रतीती । सर्व पदार्थीं अलिप्त ॥३१॥ अन्तर्हितश्च स्थिरजङ्गमेषु ब्रह्मात्मभावेन समन्वयेन । व्याप्त्याव्यवच्छेदमसङ्गमात्मनो मुनिर्नभस्त्वं विततस्य भावयेत् ॥ ४२ ॥ सर्व पदार्थी समत्व । यालागीं आकाशासी गुरुत्व । असंगत्व अभेदत्व । निर्मळत्व जाणोनी ॥३२॥ विषमीं असोनि समत्व । संगीं असोनि असंगत्व । भेदु करितां अभेदत्व । यालागीं गुरुत्व आकाशा ॥३३॥ वैर सर्पामुंगुसांसी । आकाश दोंहीचे हृदयवासी । वैर निर्वैरता आकाशासी । ते स्थिती योगियासी पाहिजे ॥३४॥ तेणें आकाशदृष्टांतें । ब्रह्मभावें आपणियातें । योगी देखिजे पुरतें । व्यापकत्वें आपुल्या ॥३५॥ ब्रह्मसमन्वयें पाहतां पाहीं । स्थावरजंगमांच्या ठायीं । तिळभरी वाढी रिती नाहीं । आपण पैं पाहीं कोंदला ॥३६॥ आकाश सर्व पदार्थीं असे । परी असे हें सर्वासी न दिसे । तेवीं दृश्य-द्रष्टा-अतीतदशें । सर्वत्र असे योगिया ॥३७॥ नभ न खोंचे सांबळें । जळेना वणव्याचेनि जाळें । नव्हतां ज्वाळांवेगळें । असे सगळें टवटवित ॥३८॥ तैसीं योगियासी द्वंद्वे सकळें । बाधूं न शकतीं कवणे काळें । नव्हतां द्वंद्वावेगळें । स्वरूप सगळें शोभत ॥३९॥ योगिया छेदावया लवलाहें । सोडिले शस्त्रांचे समुदाये । तो शस्त्रांमाजीं अपणियातें पाहे । न रुपती घाये जेवीं गगना ॥४४०॥ जें जें द्वंद्व बाधूं आलें । तें तें स्वरूप देखे आपुलें । सहजें द्वंद्वभावा मुकलें । अबाधित उरलें निजरूप ॥४१॥ गगन बुडालें दिसे डोहीं । परी तें उदकें भिजलेंचि नाहीं । तैसा असोनियां सर्व देहीं । अलिप्त पाहीं योगिया ॥४२॥ आकाशा चिखल माखूं जातां । तें न माखे माखे लाविता । तैसा योगिया दोषी म्हणतां । दोषु सर्वथा म्हणत्यासी ॥४३॥ गगन असोनियां जनीं । मैळेना जनघसणीं । तैसा योगिया सकळ कर्में करूनी । कर्मठपणीं न मैळे ॥४४॥ मोटे बांधितां आकाशातें । चारी पालव पडती रिते । तेवीं कर्मी बांधितां योगियातें । कर्म तेथें निष्कर्म ॥४५॥ घटामाजीं आकाश असे । तें वाच्य कीजे घटाकाशें । पाहतां घटा सबाह्य समरसें । आकाश असे परिपूर्ण ॥४६॥ तैसा आत्मा म्हणती देहीं । तंव तो देहा सबाह्य पाहीं । देह मिथ्यात्वें ठायींचे ठायीं । चिन्मात्र पाहीं परिपूर्ण ॥४७॥ तेजोऽबन्नमयैर्भावैर्मेघाद्यैर्वायुनेरितैः । न स्पृश्यते नभस्तद्वत्कालसृष्टैर्गुणैः पुमान् ॥ ४३ ॥ नभ पृथ्वीरजें न गदळे । उदकेंकरीं न पघळे । अग्नीचेनि ज्वाळें न जळे । वायुबळें उडेना ॥४८॥ कडकडीत आभाळें । येऊनि आकाश झांकोळे । त्या समस्तां नभ नातळे । अलिप्त बळें संस्थित ॥४९॥ तैसेंचि योगियासी । असतां निजात्मसमरसीं । काळें सृजिलिया गुणांसी । वश्य त्यांसी तो नव्हे ॥४५०॥ काळाचें थोर सामर्थ्य जाण । देहासी आणी जरामरण । योगी देहातीत आपण । जन्ममरण न देखे ॥५१॥ स्वप्नीं चिंतामणी जोडला । सवेंचि अंधकूपीं पडला । जागा जाहल्या न म्हणे नाडला । तैसा घडला देहसंगु ॥५२॥ जो ब्रह्मादि देहांसी खाये । तो काळु वंदी योगियाचे पाये । जो काळाचाही आत्मा होये । निधडा पाहें महाकाळु ॥५३॥ विजू कडकडूनि आकाशीं । तेजें प्रकाशी गगनासी । गगन नातळे ते विजूसी । असोनि तिशीं सबाह्य ॥५४॥ तैसा सत्त्वगुण प्रकाशी ज्ञान । त्यासी योगिया नातळे जाण । ज्ञानस्वरूप निखळ आपण । वृत्तिज्ञान मग नेघे ॥५५॥ झालिया सूर्यउिदयासी । दीपप्रभा नये उपेगासी । तेवीं ’सहज’ आलिया हातासी । वृत्तिज्ञानासी कोण पुसे ॥५६॥ सत्त्वें प्रकाशिलें ज्ञान । तें आवडोनि नेघे जाण । अथवा खवळल्या रजोगुण । कर्मठपण त्या न ये ॥५७॥ हो कां तमोगुणाचेनि मेळें । क्रोधमोहांसी नातळे । गुणातीत झाला बळें । बोधकल्लोळें स्वानंदें ॥५८॥ उदकासी गुरुपण । आलें तें ऐक लक्षण । अवधूत म्हणे सावधान । नृपनंदन यदुवीरा ॥५९॥ स्वच्छः प्रकृतितः स्निग्धो माधुर्यस्तीर्थभूर्नृणाम् । मुनिः पुनात्यपां मित्रमीक्षोपस्पर्शकीर्तनैः ॥ ४४ ॥ लक्षणें पाहतां जळ । स्वभावें अतिनिर्मळ । प्रकृतीस्तव कोमळ । मधुर केवळ सर्वांसी ॥४६०॥ पवित्र व्हावया प्राणियांसी । तीर्थीं तीर्थत्व उदकासी । इतुकीं लक्षणें योगीयासी । अहर्निशीं असावीं ॥६१॥ उदकीं रिघाले जे समैळ । ते स्वभावें करी निर्मळ । परी न धरी अहंबळ । जे म्यां हे मळ क्षाळिले ॥६२॥ तैसें योगियासी भजनशीळ । भावें भाविक जे केवळ । त्यांचे निरसूनि कळिमळ । न धरी बळ गुरुत्वें ॥६३॥ प्राणु गेला तरी प्राणियांसी । कठिणत्व उपजेना मानसीं । जें जें भेटे तयासी । मृदुता कैसी वर्तत ॥६४॥ जेवीं चंद्रकिरण चकोरांसी । पांखोवा जेवीं पिलियांसी । जीवन जैसें कां जीवांसी । तेवीं सर्वांसी मृदुत्व ॥६५॥ जळ वरिवरी क्षाळी मळ । योगिया सबाह्य करी निर्मळ । उदक सुखी करी एक वेळ । योगी सर्वकाळ सुखदाता ॥६६॥ उदकाचें सुख तें किती । सवेंचि क्षणें तृषितें होती । योगिया दे स्वानंदतृप्ती । सुखासी विकृती पैं नाहीं ॥६७॥ उदकाची जे मधुरता । ते रसनेसीचि तत्त्वतां । योगियांचें गोडपण पाहतां । होय निवविता सर्वेंद्रियां ॥६८॥ लागल्या योगियाची गोडी । अमृताची चवी थोडी । ब्रह्मेंद्रादि पदें बापुडीं । अर्धघडीमाजीं करीत ॥६९॥ तापले आले उदकापाशीं । अंगस्पर्शे निववी त्यांसी । तैसीचि दशा योगियासी । स्पर्शें तापासी निवारी ॥४७०॥ उदकें निवविलें ज्यासी । परतोनि ताप होये त्यासी । योगी कृपेनें स्पर्शें ज्यासी । त्रिविध तापांसीं निर्मुक्त ॥७१॥ योगी ज्यासी निववी जिवेंभावें । त्यासी जीवु गेलियाही तापु नव्हे । निवालेपणें तो वोल्हावे । स्वानुभवें डुल्लत ॥७२॥ मेघमुखें अधःपतन । उदकाचें देखोनि जाण । अधःपाते निवती जन । अन्नदान सकळांसी ॥७३॥ तैसें योगियासी खालुतें येणें । जे इहलोकीं जन्म पावणें । जन निववी श्रवणकीर्तनें । निजज्ञानें उद्धरी ॥७४॥ पर्जन्योदक देखतां जाण । जेवीं निवती सकळही जन । कां गंगादिकांचें दर्शन । करी मोचन पापाचें ॥७५॥ तैसें योगियाचें दर्शन । भाग्येंवीण नव्हे जाण । ज्याने देखिले त्याचे चरण । करी मोचन भवरोगा ॥७६॥ न घडे दर्शन स्पर्शन । तरी करावें त्याचें नामस्मरण । इतुकेनि भवमूळ जाण । करी छेदन तें नाम ॥७७॥ सांडूनि भगवंताचें कीर्तन । केल्या भक्ताचें नामस्मरण । केवीं तुटेल भवबंधन । ऐसें न म्हणा सर्वथा ॥७८॥ देवासी पूर्वी नामचि नाहीं । त्यासी भक्तीं प्रतिष्ठूनि पाहीं । नामरूपादि सर्वही । नानाविलासही अर्पिले ॥७९॥ ऐसा भक्तीं देव थोर केला । आणूनि वैकुंठीं बैसविला । भक्तउकपकारें दाटला । मग त्याच्या बोलामाजीं वर्ते ॥४८०॥ देवो भक्तवचनेंकरी । झाला नर ना केसरी । प्रगटला खांबामाझारीं । शब्द करी भक्ताचा ॥८१॥ आतांही प्रत्यक्ष प्रमाण । दासांचेनि वचनें जाण । पाषाणप्रतिमे देवो आपण । आनंदघन प्रगटे पैं ॥८२॥ भक्तभावें आभारला । देवो उपकारें दाटला । यालागीं नुलंघवे बोला । पांगें पांगला भक्तांच्या ॥८३॥ एवं जेथ भक्तांचें नाम घेणें । तेथ अवश्य देवें धांवणें । भक्तउेपकारा उत्तीर्ण होणें । वेगें पावणें यालागीं ॥८४॥ यालागीं भक्ताचें नाम घेतां । तुटती भवबंधनव्यथा । ऐसें सांगतां अवधूता । प्रेम सर्वथा न संडे ॥८५॥ आतां अग्नि गुरु जो करणें । त्याचीं सांगेन लक्षणें । काना मना एक करणें । सावधपणें परियेसीं ॥८६॥ तेजस्वी तपसा दीप्तो दुर्धर्षोदरभाजनः । सर्वभक्ष्योऽपि युक्तात्मा नादत्ते मलमग्निवत् ॥ ४५ ॥ अग्नि निजतेजें देदीप्यमान । साक्षात हातीं न धरवे जाण । उदरमात्रीं सांठवण । सर्व भक्षण निजतेजें ॥८७॥ तैसाचि योगियाही जाण । भगवद्भावें देदीप्यमान । त्यासी धरावया आंगवण । नव्हे जाण सुरनरां ॥८८॥ हातीं न धरवे खदिरांगारु । तैसा योगिया अतिदुर्धरु । तयासी न शके आवरूं । मायाव्यवहारु गुणेंसीं ॥८९॥ अग्नीसी जेवीं मुखचि पात्र । तैसें योगियासी उदर मात्र । ठेवा ठेवणें विचित्र । नाहीं पात्र गांठीसी ॥४९०॥ अग्नीनें जें जें सेवणें । तें जाळूनि आपुल्याऐसें करणें । यापरी सर्व भक्षणें । नाहीं स्पर्शणें मळासी ॥९१॥ चंदन सुवासे दुर्गंध धुरे । निंब कडू ऊंस गोडिरे । तें जाळूनि आकारविकारें । कीजे वैश्वानरें आपणाऐसीं ॥९२॥ तैसा योगी जें अंगीकारी । तें आत्मदृष्टीं निर्धारी । दोष दवडूनियां दूरी । मग स्वीकारी निजबोधें ॥९३॥ भोग्य जें भोगूं जाये । तेथ आत्मप्रतीति पाहे । भोक्ता तद्रूपचि होये । हा भोगु पाहे योगिया ॥९४॥ अग्नींत पडिलें जें समळ । तें अग्निमुखें होय निर्मळ । योगिया जें सेवी अळुमाळ । परम मंगळ तें होय ॥९५॥ अग्निमुखीं यागु घडे । तेणें अदृष्टें स्वर्ग जोडे । योगियाचे मुखीं जें पडे । तेणें जोडे निजपद ॥९६॥ आणिक अग्नीचें चिन्ह । ऐक राया सावधान । तेंचि साधकासी साधन । सिद्ध लक्षण सिद्धाचें ॥९७॥ क्वचिच्छन्नः क्वचित्स्पष्ट उपास्यः श्रेय इच्छताम् । भुङ्क्ते सर्वत्र दातृणां दहन्प्रागुत्तराशुभम् ॥ ४६ ॥ भीतरीं तेजस्वी वरी झांकिला । होमकुंडीं अग्नि पुरिला । कां यज्ञशाळे प्रज्वळला । याज्ञिकीं केला महायागु ॥९८॥ जो जो उपासका भावो जीवीं । त्या त्या श्रेयातें उपजवीं । पूर्वोत्तर अशुचित्वें आघवीं । जाळूनि हवी सेवितु ॥९९॥ तैशीचि योगियाची लीळा । भाविकां प्रकट दिसे डोळां । एकां गुप्तचि होऊनि ठेला । न दिसे पाहिला सर्वथा ॥५००॥ ऐशियाच्याही ठायीं । भावबळ भाविक पाहीं । अर्पिती जें जें कांहीं । तेणें मोक्ष पाहीं मुमुक्षां ॥१॥ तें पडतांचि योगियांच्या मुखीं । संचित क्रियमाणें असकीं । जाळोनियां एकाएकीं । करी सुखी निजपदीं ॥२॥ आणीकही अग्नीचें लक्षण । राया तुज मी सांगेन जाण । जेणें सगुण आणि निर्गुण । दिसे समान समसाम्यें ॥३॥ स्वमायया सृष्टमिदं सदसल्लक्षणं विभुः । प्रविष्ट ईयते तत्तत् स्वरूपोऽग्निरिवैधसि ॥ ४७ ॥ अग्नि सहजें निराकार । त्यासी काष्ठानुरूपें आकार । दीर्घ चक्र वर्तुल थोर । नानाकार भासतु ॥४॥ तैसीचि भगवंताची भगवद्ग।ती । स्वमायाकल्पित कल्पनाकृती । तेथ प्रवेशला सहज स्थितीं । बहुधा व्यक्ती तो भासे ॥५॥ जैसें गंगेचें एक जळ । भासे भंवरे लहरी कल्लोळ । तैसा जगदाकारें अखिल । भासे सकळ जगदात्मा ॥६॥ कां छायामंडपींच्या चित्रासी । दीप प्रभा भासे जैसी । राम रावण या नांवेंसी । दावी जगासी नटनाट्य ॥७॥ तैशा नानाविधा व्यक्ती । नाना मतें नानाकृती । तेथ प्रवेशोनि श्रीपती । सहजस्थितीं नाचवी ॥८॥ तैशी योगियाची स्थिती । पाहता नानाकार व्यक्ती । आपणियातें देखे समवृत्ती । भेदभ्रांति त्या नाहीं ॥९॥ तेथ जें जें कांहीं पाहे । तें तें आपणचि आहे । या उपपत्ती उभवूनि बाहे । सांगताहे अवधूतु ॥५१०॥ या देहासी जन्म नाशु । आत्मा नित्य अविनाशु । हा दृढ केला विश्वासु । गुरु हिमांशु करूनि ॥११॥ विसर्गाद्याः श्मशानान्ता भावा देहस्य नात्मनः । कलानामिव चन्द्रस्य कालेनाव्यक्तवर्त्मना ॥ ४८ ॥ शुक्लकृष्णपक्षपाडी । चंद्रकळांची वाढीमोडी । ते निजचंद्रीं नाहीं वोढी । तैशी रोकडी योगियां ॥१२॥ जन्मनाशादि षड्विकार । हे देहासीच साचार । आत्मा अविनाशी निर्विकार । अनंत अपार स्वरूपत्वें ॥१३॥ घटु स्वभावें नाशवंतु असे । त्यामाजीं चंद्रमा बिंबलासे । नश्वरीं अनश्वर दिसे । विकारदोषें लिंपेना ॥१४॥ घटासवें चंद्रासी उत्पत्ती । नाहीं नाशासवें नाशप्राप्ती । चंद्रमा आपुले सहजस्थितीं । नाशउ त्पत्तिरहितु ॥१५॥ तैसा योगिया निजरूपपणें । देहासवें नाहीं होणें । देह निमाल्या नाहीं निमणें । अखंडपणें परिपूर्ण ॥१६॥ काळाची अलक्ष्य गती । दाखवी नाश आणि उत्पत्ति । ते काळसत्ता देहाप्रती । आत्मस्थिती नातळे ॥१७॥ एवं काळाचें बळ गाढें । म्हणती ते देहाचिपुढें । पाहतां आत्मस्थितीकडे । काळ बापुडें तेथ नाहीं ॥१८॥ सूक्ष्म काळगती सांगतां । वेगें आठवलें अवधूता । सिंहावलोकनें मागुता । अग्निदृष्टांता सांगतु ॥१९॥ कालेन ह्योघवेगेन भूतानां प्रभवाप्ययौ । नित्यावपि न दृश्येते आत्मनोऽग्नेर्यथार्चिषाम् ॥ ४९ ॥ काळनदीचा महावेगु । सूक्ष्मगती वाहतां वोघू । तेथ भूततरंगा जन्मभंगु । देखतांचि जगु न देखे ॥५२०॥ जराजर्जरित जाण । वाहतां नदीमाजीं वोसण । षड्विकार तेचि परिपूर्ण । भंवरे दारुण भंवताति ॥२१॥ बाल्य-तारुण्यांचें खळाळ । वार्धक्याचें मंद जळ । जन्ममरणांचे उसाळ । अतिकल्लोळ उठती ॥२२॥ वोघवेगाच्या कडाडी । पडत आयुष्याची दरडी । स्वर्गादि देउळें मोडी । शिखरींचे पाडी सुरेंद्र ॥२३॥ तळीं रिचावितां घोगें । पाताळादि विवरें वेगें । नाशूनियां पन्नगें । अंगभंगें अडिमोडी करी ॥२४॥ ऐशिया जी काळवोघासीं । घडामोडी भूततरंगांसी । होतसे अहर्निशीं । तें कोणासी लक्षेना ॥२५॥ जैं महाप्रळयीं मेघु गडाडी । तैं पूर चढे कडाडी । ब्रह्मादिक तरुवर उपडी । समूळ सशेंडी वाहविले ॥२६॥ जैं आत्यंतिक पूरु चढे । तैं वैकुंठ कैलासही बुडे । तेथ काळा रिगू न घडे । हें अवचट घडे एकदां ॥२७॥ अनिवार काळनदीची गती । सूक्ष्म लक्षेना निश्चितीं । ते सूक्ष्मगतीची स्थिती । अतिनिगुतीं परियेसीं ॥२८॥ दीपू तोचि तो हा म्हणती । परी शिखा क्षणक्षणा जाती । ते लक्षेना सूक्ष्मगती । अंतीं म्हणती विझाला ॥२९॥ प्रत्यक्ष प्रवाहे गंगाजळ । ते काळींचे म्हणती बरळ । तैशी काळगती अकळ । लोक सकळ नेणती ॥५३०॥ प्रत्यक्ष पाहतां देहासी । काळ वयसेतें ग्रासी । बाल्य-कौमार-तारुण्यांसी । निकट काळासी न देखती ॥३१॥ अलक्ष्य काळाची काळगती । यालागीं गुरु केला गभस्ती । त्यापासोनि शिकलों स्थिति । तेही नृपति परियेसीं ॥३२॥ गुणैर्गुणानुपादत्ते यथाकालं विमुञ्चति । न तेषु युज्यते योगी गोभिर्गा इव गोपतिः ॥ ५० ॥ सूर्य काळें निजकिरणीं । रसेंसहित शोषी पाणी । तोचि वर्षाकाळीं वर्षोनी । निववी जनीं सहस्त्रधा ॥३३॥ सर्व शोषूनि घे किरणीं । तें शोषितें लक्षण नेणे कोणी । देतां मेघमुखें वरुषोनी । निववी अवनी जनेंसीं ॥३४॥ तैसीचि योगियाची परीं । अल्प ज्याचें अंगीकारी । त्याचे मनोरथ पूर्ण करी । सहस्र प्रकारी हितत्वें ॥३५॥ ज्यांचें सेविती योगी आत्माराम । त्यांचे पुरती सकळ काम । अंतीं करोनियां निष्काम । विश्रामधाम आणिती ॥३६॥ एवं योगी आपुले योगबळें । विषयो सेविती इंद्रियमेळें । जे देती त्यांसी यथाकाळें । कृपाबळें निवविती ॥३७॥ त्यांसी विषयो देतां कां घेतां । आसक्ति नाहीं सर्वथा । रसु चोखूनि घेतां देतां । अलिप्त सविता तैसे ते ॥३८॥ बुध्यते स्वे न भेदेन व्यक्तिस्थ इव तद्गतः । लक्ष्यते स्थूलमतिभिरात्मा चावस्थितोऽर्कवत् ॥ ५१ ॥ सूर्यो थिल्लरामाजीं बिंबला । मूढ म्हणती थिल्लरीं बुडाला । त्याचेनि कंपें कंपु मानिला । डहुळें डहुळला म्हणती तो ॥३९॥ त्या थिल्लरातें नातळतां । गगनीं अलिप्त जेवीं सविता । तैसीच योगियांची योग्यता । देहातीतता देहकर्मीं ॥५४०॥ त्यासी देहबुद्धीचेनि छंदें । म्हणती योगिया देहीं नांदे । त्या देहाचेनि नाना बाधें । स्वबुद्धिभेदें बांधिला म्हणती ॥४१॥ त्यासी देहाचें बाधितभान । हें न कळें त्याचें गुह्यज्ञान । दोराचेनि सापें जाण । डसोनि कोण मारिला ॥४२॥ एवं आत्मा तो चिदाकाशीं । मिथ्या देहीं मिथ्यात्वेंसीं । बिंबोनि दावी देहकर्मासी । नव्हे तें त्यासी बाधक ॥४३॥ देखे आपणातें जळीं बिंबला । परी न म्हणे मी जळीं बुडाला । तैसा देहातीतु बोधु झाला । नाहीं भ्याला देहकर्मा ॥४४॥ देखोनि मृगजळाचा पूरु । मूर्ख करूं धांवती तारूं । तैसा मिथ्या हा संसारु । भयंकरु मूर्खासी ॥४५॥ यालागीं दारागृहपुत्रप्राप्ती । तेथ न करावी अतिप्रीती । येचिविषयीं रायाप्रती । कथा कपोती सांगतु ॥४६॥ नातिस्नेहः प्रसङ्गो वा कर्तव्यः क्वापि केनचित् । कुर्वन्विन्देत सन्तापं कपोत इव दीनधीः ॥ ५२ ॥ संसारदुःखाचें मूळ । स्त्रीआसक्तीच जाण केवळ । स्त्रीलोभाचें जेथ प्रबळ बळ । दुःख सकळ त्यापासीं ॥४७॥ स्त्रीपासाव झाले पुत्र । त्याचे ठायीं स्नेह विचित्र । करितां दुःखासी पात्र । संसारी नर होताति ॥४८॥ आसक्ति आणि स्नेहसूत्र । या दोन्हीपासाव दुःख विचित्र । पदोपदीं भोगिती नर । अस्वतंत्र होऊनि ॥४९॥ यालागीं भलतेनि भलते ठायीं । आसक्ति स्नेहो न करावा पाहीं । अतिस्नेहो मांडिजे जिंहीं । दुःख तिंही भोगिजे ॥५५०॥ स्नेहदुःखाची वार्ता । कपोता-कपोतीची कथा । तुज सांगेन नृपनाथा । स्वस्थचित्ता परियेसीं ॥५१॥ कपोतः कश्चनारण्ये कृतनीडो वनस्पतौ । कपोत्या भार्यया सार्धमुवास कतिचित्समाः ॥ ५३ ॥ कपोतीचें स्नेह गोड । धरोनी स्त्रीसुखाची चाड । वनीं वृक्ष पाहोनियां गूढ । करी नीड कपोता ॥५२॥ तेणें वनचरें वनस्थळीं । नीडामाजीं स्त्रीमेळीं । वासु केला बहुकाळीं । भार्ये जवळी भूलला ॥५३॥ कपोतौ स्नेहगुणित हृदयौ गृहधर्मिणौ । दृष्टिं दृष्ट्याङ्गमङ्गेन बुद्धिं बुद्ध्या बबन्धतुः ॥ ५४ ॥ कपोता आणि कपोती । परस्परें दोघां अतिप्रीती । स्नेहो वाढलासे चित्तीं । हृदयीं आसक्ती नीच नवी ॥५४॥ हावभाव विलासस्थिती । येरेयेरांकडे पाहती । परस्परें कुरवाळिती । वोठंगिती येरयेरां ॥५५॥ येरयेरां वेगळें होणें । नाहीं जीवें अथवा मनें । दोघें वर्तती एकें प्राणें । खाणें जेवणें एकत्र ॥५६॥ शय्यासनाटनस्थान वार्ताक्रीडाशनादिकम् । मिथुनीभूय विश्रब्धौ चेरतुर्वनराजिषु ॥ ५५ ॥ सेवितां ज्याची अतिगोडी । तें घालिती येरयेरांच्या तोंडीं । जीवेंप्राणें शिणोनी जोडी । तें दे आवडीं स्त्रियेसी ॥५७॥ स्त्रियेसी सांडूनि दुरी । पाऊल न घाली बाहेरी । हात धरोनि परस्परीं । आंतबाहेरी हिंडती ॥५८॥ सदा एकांतीं बसती । एके स्थानीं दोघें असती । दोघें क्रीडाविहार करिती । खेळ खेळती विनोदें ॥५९॥ एकांतीं गोड बोली । सासुसासर्यांेचा विकल्पु घाली । दिराभावांच्या मोडी चाली । बोलाच्या भुलीं भुलवित ॥५६०॥ एके आसनीं बैसती । येरयेरांतें टेंकती । एके शय्ये निद्रा करिती । अहोरातीं एकत्र ॥६१॥ मैथुनसुखाचेनि वैभवें । विश्वासोनि जीवेंभावें । हिताहित कांही नाठवे । गृहिणीगौरवें नाचतु ॥६२॥ खेंडकुलिया आराम । त्यामाजीं दोघां समागम । नाममात्रें गृहाश्रम । विषयसंभ्रम वनराजीं ॥६३॥ यं यं वाञ्छति सा राजन् तर्पयन्त्यनुकम्पिता । तं तं समनयत्कामं कृच्छ्रेणाप्यजितेन्द्रियः ॥ ५६ ॥ जीवितापरीस समर्थ । जे जे मागे ते ते अर्थ । जीवेंप्राणें शिणोनि देत । काममोहित होऊनि ॥६४॥ जाणोनि जीवींचे खुणे । न मागतां अर्थ देणें । त्याहीवरी जरी त्या मागणें । तरी विकूनि देणें आपणियातें ॥६५॥ धर्माची वेळ नाठवणें । दीनावरी दया नेणे । कृपा स्त्रियेवरी करणें । जीवेंप्राणें सर्वस्वें ॥६६॥ बैसली साकरेवरी माशी । मारितांही नुडे जैशी । तैसा भोगितां विषयांसी । जरामरणासी नाठवी ॥६७॥ जैशी पूर्वजांची भाक । पाळिती सत्यवादी लोक । तैसा स्त्रियेचेंचि सुख । पाळी देख सर्वस्वें ॥६८॥ जैसी आत्मउिपासकासी । एकात्मता होये त्यासी । तैसें स्त्रीवांचोनि दृष्टींसी । जगीं आणिकासी न देखे ॥६९॥ कपोती प्रथमं गर्भं गृह्णन्ती काल आगते । अण्डानि सुषुवे नीडे स्वपत्युः सन्निधौ सती ॥ ५७ ॥ आधींचि प्रिया पढियंती । तेही झाली गर्भवती । जैशी लोभियाचे हातीं । सांपडे अवचितीं धनलोहे ॥५७०॥ तैसें तिच्या गर्भाचें कोड । अधिकाधिक वाढवी गोड । जैसें मदिरा पिऊनि माकड । नाचे तडतड डुल्लतु ॥७१॥ तैसे गर्भाचे सोहळे । सर्वस्वें पुरवी डोहळे । तिचे लीळेमाजी खेळे । प्राप्तकाळें प्रसूती ॥७२॥ स्वनीडा-आंतौती । जाहली अंडांतें प्रसवती । प्रसूतिवाधावा सांगति । ऐकोनि पति उल्हासे ॥७३॥ तेषु काले व्यजायन्त रचितावयवा हरेः । शक्तिभिर्दुर्विभाव्याभिः कोमलाङ्गतनूरुहाः ॥ ५८ ॥ अघटित घटी हरीची माया । अलक्ष लक्षेना ब्रह्मया । अवेव अंडामाजीं तया । देवमाया रचियेले ॥७४॥ रसें भरलीं होतीं अंडें । त्यांमाजीं नख पक्ष चांचुवडें । उघडिलीं डोळ्यांचीं कवाडें । करी कोडें हरिमाया ॥७५॥ अंडे उलोनि आपण । कोंवळी पिलीं निघालीं जाण । पितरें दृष्टीं देखोन । जीवेंप्राणें भुललीं ॥७६॥ प्रजाः पुपुषतुः प्रीतौ दम्पती पुत्रवत्सलौ । श्रृण्वन्तौ कूजितं तासां निर्वृतौ कलभाषितैः ॥ ५९ ॥ अत्यंत कोंवळीं बाळें । दोघें जणें पुत्रवत्सलें । शांतविती मंजुळें । अतिस्नेहाळें प्रजांसी ॥७७॥ जे समयीं जैसें लक्षण । तैसें प्रजांचें पोषण । अंगें करिताति आपण । दोघें जण मिळोनि ॥७८॥ गोड गोजिरे बोल । ऐकोनि दोघां येती डोल । धांवोनियां वेळोवेळ । निंबलोण उतरिती ॥७९॥ तासां पतत्रैः सुस्पर्शैः कूजितैर्मुग्धचेष्टितैः । प्रत्युद्गरमैरदीनानां पितरौ मुदमापतुः ॥ ६० ॥ त्यांचेनि आलिंगनचुंबनें । मृदु मंजुळ कलभाषणें । दों पक्षांचेनि स्पर्शनें । दोघे जणें निवताति ॥५८०॥ माता पिता दोघें बैसति । सन्मुख अपत्यें धांवती । लोल वक्र विलोकिती । वेगें दाविती येरयेरां ॥८१॥ मग देवोनियां खेवे । दूरी जाती मुग्धभावें । तेथूनि घेऊनियां धांवे । वेगें यावें तयांपासीं ॥८२॥ मायबापांच्या पाखोव्यापासीं । हीनदीनता नाहीं बाळांसी । जे जन्मोनि त्यांचे कुशीं । त्या दोघांसी सभाग्यता ॥८३॥ लाडिकीं लळेवाडें बाळें । लाडें कोडें पुरविती लळे । देखोनि निवती दिठी डोळे । स्नेह आगळें येरयेरां ॥८४॥ ऐसी खेळतां देखोनि बाळें । दोघें धांवती एक वेळे । उचलूनियां स्नेहबळें । मुख कोवळें चुंबिती ॥८५॥ स्नेहानुबद्धहृदयावन्योन्यं विष्णुमायया । विमोहितौ दीनधियौ शिशून् पुपुषतुः प्रजाः ॥ ६१ ॥ अजाची जे अजा माया । त्या कैसी भुलवी गा राया । अन्योन्यस्नेह बांधोनि हृदया । पिलीं पोसावया उद्यत ॥८६॥ स्त्रीपुत्रांचा मोह गहन । त्यांचें करावया पोषण । चिंतातुर अतिदीन । करी भ्रमण अन्नार्थ ॥८७॥ एकदा जग्मतुस्तासामन्नार्थं तौ कुटुम्बिनौ । परितः कानने तस्मिन्नर्थिनौ चेरतुश्चिरम् ॥ ६२ ॥ एवं टणकीं जालीं बाळें । कुटुंब थोर थोरावलें । अन्न बहुसाल पाहिजे झालें । दोघे विव्हळें गृहधर्मे ॥८८॥ यापरी कुटुंबवत्सलें । पुत्रस्नेहें स्नेहाळें । दोघें जणें एके वेळे । अन्न बहुकाळें अर्थिती ॥८९॥ सहसा मिळेना अन्न । यालागीं हिंडती वनोपवन । बहुसाल श्रमतांही जाण । पूर्ण पोषण मिळेना ॥५९०॥ बहुसाल मेळवूनि चारा । दोघे जणें जाऊं घरा । मग आपुल्या लेंकुरां । नाना उपचारां प्रतिपाळूं ॥९१॥ ऐसऐआशिया वासना । मेळवावया अन्ना । दोघेंजणें नाना स्थानां । वना उपवना हिंडती ॥९२॥ दृष्ट्वा तान्लुब्धकः कश्चिद्यदृच्छातो वनेचरः । जगृहे जालमातत्य चरतः स्वालयान्तिके ॥ ६३ ॥ माता पिता गेलीं दुरी । उडतीं पिलें नीडाभीतरीं । क्षुधेनें पीडिलीं भारी । निघालीं बाहेरी अदृष्टें ॥९३॥ ते वनीं कोणी एक लुब्धक । पक्षिबंधनीं अतिसाधक । तेणें ते कपोतबाळक । अदृष्टें देख देखिले ॥९४॥ तेणें पसरोनियां काळजाळें । पाशीं बांधिलीं तीं बाळें । कपोत-कपोतींचे वेळे । राखत केवळें राहिला ॥९५॥ कपोतश्च कपोती च प्रजापोषे सदोत्सुकौ । गतौ पोषणमादाय स्वनीडमुपजग्मतुः ॥ ६४ ॥ बाळकांच्या अतिप्रीतीं । कपोता आणि कपोती । चारा घेऊनि येती । नीडाप्रति लवलाहें ॥९६॥ स्त्रीसुखाची आसक्ती । तेचि वाढत्या दुःखाची सूती । स्त्रीसंगें दुःखप्राप्ती । सांगों किती अनिवार ॥९७॥ पुरुषासी द्यावया दुःख । स्त्रीसंगूचि आवश्यक । पुत्रपौत्रद्वारा देख । नानादुःख भोगवी ॥९८॥ कपोती स्वात्मजान्वीक्ष्य बालकान् जालसंवृतान् । तानभ्यधावत्क्रोशन्ती क्रोशतो भृशदुःखिता ॥ ६५ ॥ तंव काळजाळीं एके वेळें । कपोती बांधली देखे बाळें । तोंड घेऊनि पिटी कपाळें । आक्रोशें लोळें दुःखित ॥९९॥ बाळें चरफडितां देखे जाळीं । आक्रंदोनि दे आरोळी । बाळांसन्मुख धांवे वेळोवेळीं । दुखें तळमळी दुःखित ॥६००॥ सासकृत्स्नेहगुणिता दीनचित्ताजमायया । स्वयं चाबध्यत शिचा बद्धान्पश्यन्त्यपस्मृतिः ॥ ६६ ॥ दुःख द्यावया भ्रतारासी । आक्रंदें कपोती चालिली कैसी । शतगुणें स्नेहो वाढला तिसी । मृतपुत्रांसी देखोनि ॥१॥ पुत्रस्नेहें केलें वेडें । गुण आठआतठवूनि रडे । हिताहित न देखे पुढें । बळेंचि पडे जाळांतु ॥२॥ मायामोहें भुलली कैशी । जेथ बांधलें देखे पुत्रासी । ते जाळीं घाली आपणासी । मोहें पिशी ते केली ॥३॥ कपोतः स्वात्मजान्बद्धानात्मनोऽप्यधिकान्प्रियान् । भार्यां चात्मसमां दीनो विललापातिदुःखितः ॥ ६७ ॥ अंतरला स्त्रीबाळकीं । कपोता तो एकाएकीं । रुदन करी अधोमुखीं । अतिदुःखीं विलपतु ॥४॥ जीवाहोनि प्रिय अधिक । ते निर्जीव देखिले बाळक । अनुकूल अनुरूपक । भार्या देख अंतरली ॥५॥ अहो मे पश्यतापायमल्पपुण्यस्य दुर्मतेः । अतृप्तस्याकृतार्थस्य गृहस्त्रैवर्गिको हतः ॥ ६८ ॥ धर्म अर्थ आणि काम । या तिहींचा आश्रयो गृहाश्रम । तो भंगला मी अनाश्रम । अतृप्त काम सांडूनि ॥६॥ पूर्वपापाचा आवर्तु । मज सांडूनि अकृतार्थु । माझा कामु नव्हतां तृप्तु । धर्मकामार्थु भंगला ॥७॥ गृहीं त्रैवर्गुचि भंगला । चौथा पुरुषार्थ असे उरला । तो साधूनि घेऊं वहिला । आश्रमु भंगल्या क्षिती काय ॥८॥ ऐसें म्हणसी जरी निगुतीं । ये अर्थीं मी दुर्मती । विषयवासना नोसंडिती । कैसेनि मुक्ति साधेल ॥९॥ म्यां पूर्वी अल्प पुण्य होतें केलें । यालागीं अंतरायीं घर घेतलें । माझें परलोकसाधन ठेलें । विधुर केलें मजलागीं ॥६१०॥ हो कां गृहीं असतां गृहस्थां । काय परलोक साधे समस्तां । इतरांची असो कथा । मज साधनता तंव होती ॥११॥ अनुरूपानुकूला च यस्य मे पतिदेवता । शून्ये गृहे मां सन्त्यज्य पुत्रैः स्वर्याति साधुभिः ॥ ६९ ॥ स्त्रीपुरुषांची चित्तवृत्ती । अनुकूल वर्ते धर्मप्रवृत्तीं । तरीच परलोक साधिती । इतरां प्राप्ती ते नाहीं ॥१२॥ एकांच्या भार्या त्या तोंडाळा । एकांच्या त्या बहु वोढाळा । एकांच्या त्या अतिचांडाळा । एकी दुःशीला दुर्भगा ॥१३॥ एकीचा तो क्रोध गाढा । एकी अत्यंत खादाडा । एकी सोलिती दांत दाढा । आरिसा पुढां मांडूनि ॥१४॥ एकीं वोंगळा आळसिणी । एकी त्या महाडाकिनी । एकी सुकुमार विलासिनी । बरवेपणीं गर्वित ॥१५॥ तैशी नव्हे माझी पत्नी । सदा अनुकूळ मजलागुनी । मजसी वर्ते अनुरूपपणीं । धर्मपत्नी धार्मिक ॥१६॥ मी जेव्हां धर्मीं तत्पर । तेव्हां धर्मासी ते अतिसादर । मज कामीं जेव्हां आदर । तेव्हां कामचतुर कामिनी ॥१७॥ मजवांचोनि तत्त्वतां । न भजे आणिकां देवां देवतां । मज सांडूनि न वचे तीर्था । माझें वचन सर्वथा नुल्लंघी ॥१८॥ एवं रूपगुणकुलशील । मजसी सदा अनुकूल । पतिव्रता जे केवळ । पत्नी निर्मळ पैं माझी ॥१९॥ मज सांडूनि शून्यगृहीं । पुत्रेंसहित साध्वी पाहीं । जातसे स्वर्गाच्या ठायीं । मज अपायीं घालूनि ॥६२०॥ सोऽहं शून्ये गृहे दीनो मृतदारो मृतप्रजः । जिजीविषे किमर्थं वा विधुरो दुःखजीवितः ॥ ७० ॥ नाशिली स्त्री नाशिल्या प्रजा । येथ म्यां रहावें कवण्या काजा । दुःखें प्राण जाईल माझा । लोकलाजा निंदित ॥२१॥ एवढें अंगीं वाजलें दुःख । काय लौकिकीं दाखवूं मुख । भंगलें संसाराचें सुख । जितां मूर्ख म्हणतील ॥२२॥ जळो विधुराचें जिणें । सदा निंद्य लाजिरवाणें । न ये श्राद्धींचें आवतणें । सदा वसणें एकाकी ॥२३॥ ऐसेनीं वसतां ये लोकीं । शून्य गृहीं एकाकी । धडगोड न मिळे मुखीं । परम दुःखी मी होईन ॥२४॥ तांस्तथैवावृतान्शिग्भिर्मृत्युग्रस्तान्विचेष्टतः । स्वयं च कृपणः शिक्षु पश्यन्नप्यबुधोऽपतत् ॥ ७१ ॥ ऐसें बोलोनि केलें काये । मृतस्त्रीपुत्रांकडे पाहे । काळपाशीं बांधिली आहे । चेष्टा राहे निःषेष ॥२५॥ ऐसें देखतांही अबुद्धी । विवेकें न धरीचि बुद्धी । आपण जाऊनि त्रिशुद्धी । जाळामधीं पडियेला ॥२६॥ मेल्या मागें मरणें । देखों हेंचि सर्वांसी करणें । परी जन्ममृत्यु निवारणें । हा स्वार्थु कवणें न धरिजे ॥२७॥ पहा पां स्त्रीपुत्राकरणें । आपुलाही जीवु देणें । परी भगवत्पदवी साधणें । हें न मने मनें सर्वथा ॥२८॥ तं लब्ध्वा लुब्धकः क्रूरः कपोतं गृहमेधिनम् । कपोतकान्कपोतीं च सिद्धार्थः प्रययौ गृहम् ॥ ७२ ॥ जाळीं पडला कपोता दुर्बुद्धी । झाली लुब्धकाची कार्यसिद्धी । सहकुटुंब घेऊनि खांदीं । निघे पारधी निजस्थाना ॥२९॥ ऐसा जो कोणी गृहमेधी । त्यासी सर्वथा काळु साधी । जैशी कपोत्याची बुद्धी । तैसी बुद्धी गृहमेध्या ॥६३०॥ बाळकांच्या काकुळतीं । मरण पावली कपोती । ऐसें देखत देखतां दुर्मती । तेथ निश्चितीं उडी घाली ॥३१॥ यापरी तो कपोता । कुटुंबाची मेधा वाहतां । मरण पावला सर्वथा । विवेकु चित्ता न धरीचि ॥३२॥ एवं कुटुम्ब्यशान्तात्मा द्वन्द्वारामः पतत्त्रिवत् । पुष्णन्कुटुम्बं कृपणः सानुबन्धोऽवसीदति ॥ ७३ ॥ ऐसा कुटुंबी गृहस्थु । कुटुंबपोषणीं आसक्तु । विषयवासना अशांतु । पावे घातु सकुटुंब ॥३३॥ गृहासक्ती गृहाश्रमु । तो केवळ द्वंद्वाचा आरामु । कपोत्या ऐसा पडे भ्रमु । वृथा जन्मु दवडावा ॥३४॥ यः प्राप्य मानुषं लोकं मुक्तिद्वारमपावृतम् । गृहेषु खगवत्सक्तस्तमारूढच्युतं विदुः ॥ ७४ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥ येवोनियां कर्मभूमीसी । जो पावला उत्तम देहासी । त्याहीमाजीं उत्तमता कैशी । अग्रवर्णासी पैं जन्म ॥३५॥ आलिया मनुष्यदेहासी । मुक्तीचा दारवंटा मुक्त त्यासी । लव निमिष येकु दिशीं । यावज्जन्मेंसीं मोकळा ॥३६॥ इतरां वर्णांची हे गती । मा ब्राह्मण तरी पुण्यमूर्ती । ते सदा मुक्तचि असती । वृथा आसक्तीं गुंतले ॥३७॥ विद्वांस आणि वैराग्य । तें ब्रह्मादिकां न लभे भाग्य । वृथा आसक्तीं केले अभाग्य । शिश्नोदरा साङ्ग वेंचले ॥३८॥ मनुष्यदेहीं गृहासक्तु । तो बोलिजे ’आरूढच्युतु’। कपोत्याचे परी दुःखितु । सिद्ध स्वार्थु नाशिला ॥३९॥ विषयीं सर्वथा नाहीं तृप्ति । ऐसें श्रुतिपुराणें बोलती । करितां विषयाची आसक्ती । थित्या मुकती नरदेहा ॥६४०॥ नवल नरदेहाची ख्याती । रामनामाच्या आवृत्तीं । चारी मुक्ती दासी होती । तो देहो वेंचिती विषयासी ॥४१॥ विषयसुखाचिये आसक्ती । कोणा नाहीं झाली तृप्ती । मृगजळाचिये प्राप्ती । केवीं निवती तृषार्त ॥४२॥ यालागीं जाणतेनि मनुष्यें । नरदेहींचेनि आयुष्यें । विषयांचेनि सायासें । व्यर्थ कां पिसे कष्टती ॥४३॥ नरदेहाऐसें निधान । अनायासें लाधलें जाण । सांडीं सांडीं अभिमान । तेणें समाधान पावसी ॥४४॥ पुढती नरदेहाची प्राप्ती । होईल येथ नाहीं युक्ति । यालागीं सांडूनि विषयासक्ती । भावें श्रीपति भजावा ॥४५॥ कलियुगीं सुगम साधन । न लगे योग याग त्याग दान । करितां निर्लज्ज हरिकीर्तन । चारी मुक्ति चरण वंदिती ॥४६॥ इटेसाठीं परीस पालटे । येतां कां मानिती वोखटें । तैसा कीर्तनाचेनि नेटेंपाटें । देवो भेटे प्रत्यक्ष ॥४७॥ एका जनार्दनु म्हणे । नश्वर देहाचेनि साधनें । जनीं जनार्दनु होणें । हे मुद्रा तेणें लाविली ॥४८॥ एका जनार्दना शरण । तंव जनार्दनु झाला एक एकपण । जैसें सुवर्ण आणि कंकण । दों नांवीं जाण एक तें ॥४९॥ तोचि एका एकादशीं । श्रीकृष्ण सांगे उद्धवासी । अवधूत सांगे यदूसी । गुरूपदेशीं उपदेशु ॥६५०॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे यदुअवधूतेतिहासे एकाकारटीकायां सप्तमोऽध्यायः ॥७॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक ॥७४॥ ओव्या ॥६५०॥
You can donate to the bank account given below
Scan to donate
Merchant Name : Sant Eknath Mission
UPI ID : santeknathmission@sbi
Contact Info :
Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission,
C/O Shri Venimadhav Gosavi,
ShriNath Galli, Shrikshetra Paithan, Dist. Chhatrapati
Sambhajinagar
Pin. 431006
Mobile No : +91 - 9421411135
Email : info@santeknath.org