Marathi / English

अभंग

Left border

संत तुकाराम महाराज कॄत अभंग

शरण शरण एकनाथा । पायी माथा ठेविला ॥१॥ नका पाहु गुण दोष । झालो दास पायांचा ॥२॥ आता मज उपेक्षिता । नाही सत्‍ता आपुली ॥३॥ तुका म्हणे भागवत । केले श्रॄत सकळा ॥४॥

Left border
Left border

श्री संत निळोबाराय कॄत अभंग

द्वारकेचि मूर्ती एकनाथा घरी । पाणी वाहे हरि कावडीने ॥१॥ श्रीखंडया चंदन उगाळूनि करी । वस्त्र गंगातीरी धूत असे ॥२॥ सेवेसी तत्पर उभा ठायी ठायी । देवपूजेसमयी तिष्ठतसे ॥३॥ निळा म्हणे देव रावे ज्याचे घरी । दत्तचौपदार करितसे ॥४॥ दासोपंतांचा अभिमान । गेला घेताची दर्शन ॥१॥ धन्य धन्य एकनाथा । तुमचे चरणी माझा माथा ॥२॥ दत्तात्रय चोपदार येथे उभे क।ठीकर ॥३॥ यवन अंगावरी थुंकला । प्रसाद देवुनी मुक्‍त केला ॥४॥ निळा शरण तुमच्या पाया । अनन्यभावे नाथराया ॥५॥ सकल संतांचा हा राजा । स्वामी एकनाथ माझा ॥१॥ ज्यांचे घेताचि दरुषण । पुन्हा नाही जन्म मरण ॥२॥ ज्यांचे वाचिता भागवत । प्राणी होय जीवन मुक्‍त ॥३॥ निळा म्हणे लीन व्हावे । शरण एकनाथा जावे ॥४॥ मातापिता समर्थ । स्वामी माझा एकनाथ ॥१॥ काळ रुळतो चरणी । देवा घरी वाहे पाणी ॥२॥ ज्यांचे अनुग्रहे करुन । झालो पतित पावन ॥३॥ जो वसे प्रतिष्ठानी । निळा त्यासी लोटांगणी ॥४॥ धन्य धन्य गोदातीर धन्य प्रतिष्ठान । धन्य तेथील जन रहिवासी ॥१॥ कॄष्णकमलातीर्थी चरण नाथांचे । उद्धरी जगाचे कलिदोष ॥२॥ जया तीर्थी स्नान तत्पदी दर्शन । पूर्वज उद्धरण कुळासहित ॥३॥ निळा म्हणे जया घडो तेथील वारी । तया पुण्यासही न वर्णवे ॥४॥ भानुदासाचे कुळी महाविष्णुचा अवतार । आदी क्षेत्री स्थान वस्ती गोदातीर ॥१॥ ओवाळु आरती स्वामी एकनाथा । तुमचे नाम घेता हरे भवभयचिंतां ॥२॥ जनार्दनाची कॄपा दत्तात्रयाचा प्रसाद । भागवती टीका नारायण आत्मबोध ॥३॥ ब्रह्मा विष्णु महेष ज्यासी छळावया येती । नढळे ज्याची निष्ठा होसी एकात्मता भक्‍ति ॥४॥ कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणि वाहे । अनन्य भक्‍तिभावे निळा वंदी त्याचे पाय ॥५॥

Left border
Left border

कवी श्री मुक्‍तेश्वर कॄत रचना

भजा हो भजा माझ्या एकनाथासी । त्रिकाळी श्रीदत्तात्रेय दर्शन त्यांसी । प्रतिष्ठान अधिष्ठान मान्य सर्वांशी । प्रगट परब्रह्म भानुदासाचे वंशी ॥धॄ॥ एकनाथा शरण जाता चुके भवभय । एकावांचुनि काही न दिसे अवघे अद्वैय । एका भावे भजता त्यासी लाभे निजसोय । एवढा ज्याचा महिमा वाचे वर्णिता न ये ॥१॥ करुणेचा अवतार तो हा विश्वतारक । कळेना स्वामीचे सहजा सहजी कौतुक । कर्ज फेडी त्याच्या घरचे कमलानायक । करी देवदास्य ज्याच्या आज्ञाधारक ॥२॥ नाम ऐकोबाचे गोड आवडे मना । नामकॄत सेविता भेटी झाली चिद्‍घना । नावडे अधिक काही मज त्या विना । नाठवे देहभान प्रेमे करिता कीर्तन ॥३॥ थरथर कापे काळ स्वामी स्मरता समर्थ । थकित होवोनि जन हे पाहती हर्ष परमार्थ । थकले माझे चित्‍त पुरले मनीचे मनोरथ । थयथय नाचे मुक्‍तेश्वर म्हणे मी झालो कॄतार्थ ॥४॥

Left border

संत श्री एकनाथ महाराज मिशनसाठी योगदान द्या

खाली दिलेल्या बँक खात्यात आपण दान करू शकता

खाताधारकाचे नाव:
Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission, Paithan
चालू खात्याचा क्रमांक:
00000036694177969
बँकेचे नाव:
State Bank Of India
IFSC कोड:
SBIN0003796
शाखा:
Bhaji Market, Paithan
logoseperator

संपर्क माहिती :

शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन,

द्वारा, श्री वेणीमाधव गोसावी,
श्रीनाथ गल्ली, श्रीक्षेत्र पैठण, जिल्हा छत्रपती
संभाजीनगर
पिन. ४३१००६

callमोबाईल क्रमांक : +९१ - ९४२१४१११३५

emailईमेल : info@santeknath.org