तेथूनि पुढे बरे होईल । भक्तिसुखें दोंद वाढेल । फेरा चौऱ्यांशीचा चुकेल । धनमोकासी ॥१॥ मी आलो रायाचा जोशी । होरा ऐका दादांनो ॥धृ॥ मनाजी पाटील देहगांवचा । विश्वास धरु नका त्याचा । हा घात करील नेमाचा । पाडील फशी ॥२॥ वासना बायको शेजारीण । झगडा घाली मोठी दारूण । तिच्या पायी नागवण । घर बुडविसी ॥३॥ एकाजनार्दनी कंगाल जोशी । होरा सांगतो लोकांसी । जा शरण सद्गुरुसी । फेरा चुकवा चौऱ्यांयशी ॥४॥
बहिरा झालो या या जगी ॥धृ॥ नाही ऐकिले हरिकीर्तन । नाही केले पुराण श्रवण । नाही वेदशास्त्र पठण । गर्भी बधिर झालो त्यागूने ॥१॥ नाही संतकीर्ती श्रवणी आली । नाही साधुसेवा घडियेली । पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थे व्रते असोनि त्यागिली ॥२॥ माता माऊली पाचारिता । शब्द नाही दिला मागुता । बहिरा झालो नरदेही येता । एकाजनार्दनी स्मरेन आता ॥३॥
मुका झालो वाचा गेली ॥धृ॥ होतो पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्शास्त्र पुराणी । चारी वेद मुखोद्गत वाणी । गर्वामध्ये झाली सर्व हानी ॥१॥ जिव्हा लांचावली भोजना । दुग्ध घृत शर्करा पक्वान्ना । निंदिले उपान्ना । तेणे पावलो मुखबंधना ॥२॥ साधुसंतांची निंदा केली । हरिभक्तांची स्तुती नाही केली । तेणे वाचा पंगू झाली । एकाजनार्दनी कृपा लाधली ॥३॥
मोडकेंसे घर तुटकेसे छप्पर । देवाला देवघर नाही ॥१॥ मला दादला नलगे बाई ॥धृ॥ फाटकेच लुगडे तुटकीसी चोळी । शिवाया दोरा नाही ॥२॥ जोंधळ्याची भाकर आंबाडयाची भाजी । वर तेलाची धार नाही ॥३॥ मोडका पलंग तुटकी नवार । नरम बिछाना नाही ॥४॥ सुरतीचे मोती गुळधाव सोने । रांज्यात लेणे नाही ॥५॥ एकाजनार्दनी समरस झाले । तो रस येथे नाही ॥६॥
अहं वाघा सोहं वाघा प्रेमनगारा वारी । सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी ॥१॥ मल्लारीची वारी माझ्या मल्लारीची वारी ॥धृ॥ इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी । बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी ॥२॥ आत्मनिवेदन रोडगा निवतील हारोहारी । एकाजनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कुंचा वारी ॥३॥
विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला । तम घाम अंगासी आला ॥धृ॥ पंचप्राण व्याकुळ झाला । त्याने माझा प्राण चालिला । सर्वांगाचा दाह झाला ॥१॥ मनुष्य इंगळी अति दारुण । मज नांगा मारिला तिने । सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥२॥ ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागे सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरा ॥३॥ सत्व उतारा देऊन । अवघा सारिला तमोगुण । किंचित् राहिली फुणफुण । शांत केली जनार्दने ॥४॥
एडका मदन तो केवळ पंचानन ॥धृ॥ धडक मारिली शंकरा । केला ब्रह्मयाचा मातेरा । इंद्रचंद्रासी दरारा । लाविला जेणे । तो केवळ पंचानन ॥१॥ धडक मारिली नारदा । केला रावणाचा चेंदा । दुर्योधना मारिली गदा । घेतला प्राण । तो केवळ पंचानन ॥२॥ भस्मासुर मुकला प्राणासी । तेचि गती झाली वालीसी । विश्वामित्रासरिखा ऋषी । नाडिला जेणे । तो केवळ पंचानन ॥३॥ शुकदेवांनी ध्यान धरोनी । एडका आणिला आकळोनी । एकाजनार्दनी चरणी । बांधिला जेणें । तो केवळ पंचानन ॥४॥
नाथाच्या घरची उलटी खूण । पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥ आंत घागर बाहेरी पाणी । पाण्याला पाणी आले मिळोनी ॥२॥ आजी म्या एक नवल देखिले । वळचणीचे पाणी आढ्या लागले ॥३॥ शेतकऱ्याने शेत पेरिले । राखणदाराला तेणे गिळिले ॥४॥ हांडी खादली भात टाकिला । बकऱ्यापुढे देव कापिला ॥५॥ एकाजनार्दनी मार्ग उलटा । जो तो गुरुचा बेटा ॥६॥
भूत जबर मोठे ग बाई । झाली झडपड करु गत काई ॥१॥ सूप चाटूचे केले देवऋषी । या भूताने धरिली केशी ॥२॥ लिंबू नारळ कोंबडा उतारा । त्या भूताने धरिला थारा ॥३॥ भूत लागले नारदाला । साठ पोरे झाली त्याला ॥४॥ ऊत लागले ध्रूवबाळाला । उभा अरण्यात ठेला ॥५॥ एकाजनार्दनी भूत । सर्वांठायी सदोदित ॥६॥
सत्वर पाव गे मला । भवानीआई रोडगा वाहिन तुला ॥१॥ सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥ सासू माझी जाच करती । लवकर निर्दाळी तिला ॥३॥ जाऊ माझी फडफड बोलती । बोडकी कर ग तिला ॥४॥ नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे त्याला ॥५॥ दादला मारुन आहुती देईन । मोकळी कर गे मला ॥६॥ एकाजनार्दनी सगळेचि जाऊं दे । एकटीच राहू दे मला ॥७॥
अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासूर मर्दना लागुनी । त्रिविध तापाची कराया झाडणी । भक्तांलागोनी पावसी निर्वाणी ॥१॥ आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वैत सारुनी माळ्व मी घालीन । हाती बोधाचा झेंडा मी घेईन । भेदरहित वारीसी जाईन ॥२॥ नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा । करुनी पोरी मागेन ज्ञानपात्रा। धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा । दंभ संसार सांडिन कुपात्रा ॥३॥ पूर्ण बोधाची घेईन परडी । आशा तृष्णेच्या पाडीन दरडी । मनोविकार करीन कुर्वंडी । अद्भूत रसाची भरीन दुरडी ॥४॥ आता साजणी जाले मी नि:संग । विकल्प नवऱ्याचा सोडियला संग । कामक्रोध हे झोडियेले मांग । केला मोकळा मारग सुरंग ॥५॥ ऐसा जोगवा मागुनी ठेविला । जाउनी महाद्वारी नवस फेडिला । एकपणे जनार्दन देखिला । जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥
हजरत मौला मौला । सब दुनिया पालनवाला ॥१॥ सब घरमो सांई बिराजे । करत है बोलबाला ॥२॥ गरीब नवाजे मै गरीब तेरा । तेरे चरणकु रतवाला ॥३॥ अपना साती समजके लेना । सलील वोही अल्ला ॥४॥ जीन रूपसे है जगत पसारा । वोही सल्लाल अल्ला ॥५॥ एकाजनार्दनी निजवद अल्ल। आसल वोही बिटपर अल्ला ॥६॥
सांगते तुम्हां वेगळे निघा । वेगळे निघून संसार बघा ॥१॥ संसार करिता शिणले भारी । सासुसासरा घातला भरी ॥२॥ संसार करिता शिणले बहू । दादला विकून आणले गहू ॥३॥ गव्हाचे दिवसे जेविली मावशी । मजला वेडी म्हणता कैशी ॥४॥ संसार करिता दगदगलें मनी । नंदा विकिल्या चौघीजणी ॥५॥ एकाजनार्दनी संसार केला । कामक्रोध देशोधडी गेला ॥६॥
कलिमाजी दैवते उघड दिसती फार । नारळ आणि शेंदूर यांचा भडिमार ॥१॥ लटिका देव लटिका भक्त लटिके सर्व वाव । सात धान्याचे धपाटे मागती काय त्यांचा बडिवार ॥२॥ तेल रांधा मागती मलिदा वरती काजळ कुंकु । फजितखोर ऐसे देव तयाचे तोंडावर थुंकु ॥३॥ तीर्थाजाती उदंड । त्याचे पाठीमागे तोंड ॥१॥ मनवासना ठेउनी घरी । तीर्था नेली भांडखोरी ॥२॥ गंगेत मारिता बुडी । मन लागले बिऱ्हाडी ॥३॥ नमस्कार करिता देवासी । मन पायपोसापाशी ॥४॥ लवकर करी प्रदक्षिणा । उशीर झालासे भोजना ॥५॥ एकाजनार्दनी स्थिर मन । नाही तव काय साधन ॥६॥ वरुषला मेघ खडकावरुता । चिखल ना तत्वता थेंब नाही ॥१॥ वाया तो प्राणी आला नरदेहा । गेला वाया पहा भक्तिवीण ॥२॥ अरण्यात जैशी सुकरे बैसती । तैसे मठाप्रति करुनी बैसे ॥ ३॥ उदय होताचि लपते उलुक । तैसा तो मुर्ख समाधी बैसे ॥४॥ एकाजनार्दनी वाया गेले सर्व । संसार ना देव दोन्ही शुन्य ॥५॥ आम्ही ब्रह्मपुरीचे ब्राह्मण । यातीकुळ नाही लहान ॥१॥ आम्हा सोवळे वोवळे नाही । विटाळ न देखो कवणे ठायी ॥२॥ आम्हा सोयरे जे जाहले । ते यातिकुळा वेगळे केले ॥३॥ एकाजनार्दनी बोधु । यातिकुळींचा फिटला संबंधु ॥४॥ कामक्रोध लोभ दंभ मद मत्सर । षड्वैरी तत्पर हेचि येथे ॥१॥ क्षुधा तृषा मोद शोक जरा मरण । षड्ऊर्मी पूर्ण देहीं हेचि ॥२॥ आशा मनिषा कल्पना इच्छा तृष्णा वासना । हे अठरा गुण जाणा देहामाजी ॥३॥ एकाजनार्दनी त्यजोनी अठरा । तोचि संसारामाजी शुद्ध ॥४॥ श्वानाचा तो धर्म करावी वसवस । भलेबुरे त्यास न कळे काही ॥१॥ वेश्यांचा धर्म द्रव्यते हरावे । भलेबुरे भोगावे न कळे कांही ॥२॥ निंदकाचा धर्म निंदाती करावी । भले बुरे त्यागावी नकळे काही ॥३॥ सज्जनांचा धर्म सर्वाभूती दया । भेदाभेद तया नकळे काही ॥४॥ संतांचा धर्म अंतरी ती शांती । एकाजनार्दनी वस्ती सर्वांठायी ॥५॥ पांथस्थ घरासी आला । प्रात:काळी उठोनि गेला ॥१॥ तैसे असावे संसारी । जैसी प्राचीनाची दोरी ॥२॥ बाळी घराचार मांडिला । तो सवेचि मोडूनि गेला ॥३॥ एका विनवी जनार्दना । ऐसे करी गा माझ्या मना ॥४॥ जया म्हणती नीच वर्ण । स्त्री शुद्रादी हीनजन ॥१॥ सर्वांभूती देव वसे । नीचाठायी काय नसे? ॥२॥ नीच कोठोनि जन्मला । पंचभूता वेगळा जाला ॥३॥ तया नाही जनन । सवेचि होत पतन ॥४॥ नीच म्हणोनि काय भुलि । एकाजनार्दनी देखिली ॥५॥ िषयवासना भाजी त्याचे मूळ । मग सुख कल्लोळ प्राप्ती तुज ॥१॥ आशेचे काबाड कल्पना सगळी । उपटोनि मुळी टाकी परती ॥२॥ भेदाचे भांडे वैराग्याचे हातें । धुवोनि सरते करी बापा ॥३॥ शांतीचेनि सवे धरी वेगे सोय । एकाजनार्दनी पाय पावशील ॥४॥ वैराग्य प्रथम असावी शांती । तेणे विरक्ति अंगी जोडे ॥१॥ हेचि मुख्यवर्म साधता साधन । येणे जनार्दन जवळी असे ॥२॥ उपासना मार्ग हेचि कर्मकांड । हेचि ब्रह्मांड जनीवनी ॥३॥ हेचि देहस्थिती विदेह समाधी । तुटती उपाधी कर्माकर्म ॥४॥ एकाजनार्दनी शांतीक्षमा दया । यांविण उपाय उपाधी ते ॥५॥ नीती सांगतो ऐका एक । दास सभेचा सेवक । मन टाळू नका एक । कोणी एक ॥१॥ सांडावरुन जाऊं नये । लांच खाऊं नये । चोहट्यात राहू नेये । कोणी एक ॥२॥ अक्रीत घेऊं नये । इमान सोडु नये । बैमान होऊं नये । कोणी एक ॥३॥ सज्जनाशी विंटू नये । नीचासवे बांटू नये । तस्कराशी पुसूं नये । कोणी एक ॥४॥ भक्तिमार्ग खंडू नये । कुभांडयासी तंडूं नये । खळासंगे भांडू नये । कोणी एक ॥५॥ सत्पुरुषाशी छळूं नये । शिवेचा गुंडा डाळूं नये । केला नेम टाळू नये । कोणी एक ॥६॥ सद्गुरु सेवा सोडूं नये । कुलंधर्मासी मोडू नये । पापद्रव्य जोडू नये । कोणी एक ॥७॥ संपत्ति आलिया माजू नये । अभिमाने फुगूं नये । सभा देखून लाजूं नये । कोणी एक ॥८॥ असत्यवाद करु नये । खोटा संग धरु नये । मोचकाशी मैत्री करु नये । कोणी एक ॥९॥ भलते भरी पडू नये । अनाचार करु नये । कपट मनी धरु नये । कोणी एक ॥१०॥ जन्मा आलिया स्वभावे । काही सार्थक करावे । ऐसे मनी विचारवे । कोणी एक ॥११॥ एकाजनार्दनी भावे । संतचरणी लीन व्हावे । सदा हरिनाम उच्चारावे । कोणी एक ॥१२॥
कैसी समचरणींची शोभा । अवघा जगी विठ्ठल उभा ॥१॥ येणे विठ्ठले लाविले पिसे । जिकडे पाहे तिकडे दिसे ॥२॥ पाहते पाहणीयामाझारी । पाहते गेले पाहण्यापरि ॥३॥ एकाजनार्दनी एकू । विठ्ठल अवलोकी लोकु ॥४॥ चंद्र पौर्णिमेचा दिसे पा सोज्वळ । तैसा श्रीविठ्ठल पंढरीये ॥१॥ क्षीरसिंधुसम भीवरा ती वाहे । स्नान करिता जाय महत्पाप ॥२॥ सनकसनंदन सम पुंडलिक । शोभा अलोलिक वर्णूं काय ॥३॥ लक्ष्मी प्रत्यक्ष रखुमाई राही । एकाजनार्दनी पायी लीन झाला ॥४॥ वारकरी पंढरीचा । धन्य धन्य जन्म त्याचा ॥१॥ जाय नेमें पंढरीसी । चुको नेदी तो वारीसी ॥२॥ आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखी ॥३॥ एकाजनार्दनी करी वारी । धन्य तोचि बा संसारी ॥४॥ माझे माहेर पंढरी । आहे भीवरेचे तीरीं ॥१॥ बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥ पुंडलिक बंधु आहे । त्याची ख्याती सांगू काये ॥३॥ माझी बहीण चंद्रभागा । करितसे पापभंगा ॥४॥ एकाजनार्दनी शरण । करी माहेरींची आठवण ॥५॥ माझ्या वडिलांचे दैवत । कृपाळू हा पंढरीनाथ ॥१॥ पंढरीसी जाऊं चला । भेंटू रखुमाई विठ्ठला ॥२॥ पुंडलिके बरवे केले । कैसे भक्तिने गोंविले ॥३॥ एकाजनार्दनी नीट । पायी जडलीसे वीट ॥४॥
सुखाची विश्रांती सुख समाधान । मनाचे उन्मन नाम गाता ॥१॥ ते हें नाम सोपे रामकृष्णहरि । प्रपंच-बोहरी उच्चारिता ॥२॥ अंहभाव व्देष नुरे ती वासना । व्दैताची भावना दुरी ठाके ॥३॥ एकाजनार्दनी नाम हे सोपारे । येणेचि पै सरे भवसिंधू ॥४॥ ॐ नमो सद्गुरु निर्गुणा । पारनाही तव गुणा । बसोनी माझिया रसना । हरिगुणा वर्णवी ॥१॥ हरिगुण विशाळ पावन । वदवी तू कृपा करुन । मी मूढमति दीन । म्हणोनि कीव भाकितसे ॥२॥ तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण । हरिगुण वर्णीन मी जाण । एका वंदितसे चरण । सद्गुरुचे आदरे ॥३॥ ज्या सुखाकारणे देव वेडावला । वैकुंठ सांडुनी संतसदनी राहिला ॥१॥ धन्य धन्य संतांचे सदन । जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण ॥२॥ सर्व सुखांची सुख्रराशी । संतचरणी भुक्तिमुक्ति दासी ॥३॥ एकाजनार्दनी पार नाही सुखा । म्हणोनी देव भुलले देखा ॥४॥ वैष्णवाघरी देव सुखावला । बाहीर न वजे दवडोनी घातिला ॥१॥ देव म्हणे माझे पुरतसे कोडा । संगती या गोड वैष्णवांची ॥२॥ जरी देव नेउनी घातिला दुरी । परतोनी पाहे तव घराभीतरी ॥३॥ कीर्तनाची देवा आवडी मोठी । एकाजनार्दनी पडली मिठी ॥४॥ संतांच्या विभूती । धर्मलागी अवतरती ॥१॥ धर्मरक्षणाकारणे । साधु होताती अवतीर्णे ॥२॥ जगा लावावे सत्पथी । हेची साधूची पै कृती ॥३॥ एकाजनार्दनी साधु । हृदयी वसे ब्रह्मानंदु ॥४॥ देवा माझे मन लागो तुझे चरणी । संसार व्यसनी पडोनेदी ॥१॥ नामस्मरण घडो संतसमागम । वाउगाचि भ्रम नको देवा ॥२॥ पायी तिर्थयात्रा मुखी रामनाम । हाचि माझा नेम सिद्धि नेई ॥३॥ आणिक मागणे नाही नाही देवा । एकाजनार्दनी सेवा दृढ देई ॥४॥ भक्तिप्रेमाविण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तथा तया माजी ॥१॥ प्रेमसुख देई प्रेमसुख देई । प्रेमेविण नाही समाधान ॥२॥ रांडवेने जेवी श्रृगांरु केला । प्रेमेवीण जाला ज्ञानी तैसा ॥३॥ एकाजनार्दनी प्रेमे अतिगोड । अनुभवी सुरवाड जाणतील ॥४॥ जगाचिये नेत्री दिसे तो संसारी । परि तो अंतरी स्फटिक शुद्ध ॥१॥ वायांची हांव न धरी काही पोटी । वाउगी ती गोष्टी न करी जगा ॥२॥ स्त्रियापुत्र धन नाही तेथे मन । इष्टमित्र कारण नाही ज्याचे ॥३॥ एकाजनार्दनी प्रपंच परमार्थ । सारिखाचि होत तया लागी ॥४॥ अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता । चरणी जगन्नाथा चित्त ठेले ॥१॥ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथाचा नाथ जनार्दन ॥२॥ एकाजनार्दनी एकपणे उभा । चैतन्याची शोभा शोभतसे ॥३॥ पोटींचे बाळ अवगुणी वोखटे । परि मायबापा स्नेहो मोठे ॥१॥ तयापरि उदरा आलो जी स्वामी । अवगुणांच्यापरि नुपेक्षा तुम्ही ॥२॥ गुण नाही तेथे कर्म कैचे धड । परिमायबापा वाटतसे कोड ॥३॥ एकाजनार्दनी उद्भव साचे । म्हणोनि हरिदासा कौतुक त्याचे ॥४॥ शांतीचेनि मंत्रे मंत्रुनि विभूती । लाविली देहाप्रती सर्व अंगा ॥१॥ तेणे तळमळ हारपली व्यथा । गेली सर्व चिंता पुढीलांची ॥२॥ लिगाडाची मोट बांधोनि टाकिली । वासना भाजली क्रोध अग्नी ॥३॥ एकाजनार्दनी शांत जाहला देह । कामनीक देव प्रगटला ॥४॥
खाली दिलेल्या बँक खात्यात आपण दान करू शकता
संपर्क माहिती :
शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन,
द्वारा, श्री वेणीमाधव गोसावी,
श्रीनाथ गल्ली, श्रीक्षेत्र पैठण, जिल्हा छत्रपती
संभाजीनगर
पिन. ४३१००६
मोबाईल क्रमांक : +९१ - ९४२१४१११३५
ईमेल : info@santeknath.org