भक्तिची लक्षणे (ओ.क्र.४०१-४०३) माझे नाम माझे स्मरण । माझी कथा माझे किर्तन । माझ्या चारित्रांचे पठण । गुणवर्णन नित्य माझे ॥ माझा जप माझे ध्यान । माझी पूजा माझे स्तवन । नित्य करिता माझे चिंतन । विषयध्यान विसरले ॥ भक्तांचे विषय सेवन । तेही करिता मदर्पण । या नाव भक्तीची अंगे जाण । स्वये नारायण विधीसी सांगे ॥
शिष्ये करावे माझे भजन । ऐसे वांछी जरी गुरुचे मन । तो गुरुत्वा मुकला जाण । अभिमाने पूर्ण नागवला ॥ जगी दाटुगा ज्ञानाभिमान । धनालागी विकती ज्ञान । ते जाण शिश्नोदरपरायण । तेथे अर्धक्षण ज्ञान न थारे ॥ मुख्यत्वे गुरुचे लक्षण । ज्ञान असोनि निरभिमान । सर्वांगी शांतीचे भूषण । तो सद्गुरु पूर्ण परब्रह्म ॥
नातरी श्वेत कॄष्ण गाई । दोहोनी क्षीर मेळविता एके ठायी । केले तेथे भेदू नाही । वर्णावर्णाचा ॥ तैसे अद्वितीयेचा गावी । वर्णावर्ण पदवी । नसोनिया अनुभवी । सुखवस्ती वासु ॥
सद्गुरु भक्तास बद्धता नाही (ओ.क्र.३९-४४) जै पतंग भक्षी वडवानळासी । दर्दुरी गिळिजे शेषासी । जै खदयोते गिळिजे रविबिंबासी । तै गुरुभक्तांसी बद्धता ॥ जै वायसे युद्ध कीजे खगपतींसी । पिपिलिका सप्तसागर शोषी । कीं मुर्कुटे गिळिजे ब्रह्मांडासी । तै गुरुभक्तांसी बद्धता ॥ जै चित्रींचिया हुताशने । दग्ध होती महावने । कि रज्जूसर्पाचिया पाने । मृत्यु पावे कृतांतू ॥ कि मक्षिकाचेनि थडके । महागिरी पडो शके । किंवा प्रेताचेनि धाके । झडपोशके महाकाळ ॥ कि वांझेचेनि सुते । रणीं जिंकीजे इंद्राते ।
मुक्त कोण ? (ओ. क्र. ५१७ - ५२३) जग भासे जे सकळ । तो जगदात्माचि निखळ । ऐसा निश्चयो ज्याचा प्रबळ । मुक्त केवळ तो एकु ॥ मी देहो नव्हे निश्चिते । अनात्मा न म्हणे कोणातें । विश्व मीचि परमार्थे । मुक्ती तया वोळगणी ॥ ज्याची नि:शेष आस तुटली । त्याचीचि अविदया निवटली । त्यासीचि शांती नि:शेष जाली । स्थिती वंदिली सदाशिवे ॥ ज्यासी नाठवे जन्मलेपण । देहत्वे देह न भेटे जाण । तो स्वप्नीही न देखे निजमरण । हे स्थिती संपूर्ण हरिहरां वंदय ॥
मायेचा उपकार (ओ.क्र.३३३-३४२) माया अवघे म्हणती कुडी । परि ते मायेची उत्तमखोडी । स्वरुप आच्छादुनी गाढी । वाढवी श्रद्धा ॥ माया ब्रह्म राखे गुप्तता । यालागी आवडे समस्तां । मुमुक्षु अतिअवस्था । वैराग्यता श्रद्धाळू ॥ तेचि ब्रह्म प्रगट असते । तरी कोणीच त्याते न पुसते । अवघेचि उपेक्षिते । हेळणा करुनी ॥ सूर्य परब्रह्म प्रत्यक्ष दिसे । त्याते उपेक्षिती लोक जैसे । नमस्कारी श्रद्धा नसे । ब्रह्मासि पै तैसे होते ॥ अग्नि देवाचे निजमुख । त्यावरी पाय देऊनि घेती सेक । आळशी तेथ थुंकी थुंक । ब्रह्मासिही देख तैसे होते ॥ मनकर्णिका ब्रह्मजळ । तेथे करिती मूत्रमळ । एवं प्रत्यक्षासि केवळ । उपेक्षा होतसे ॥ तैसी परब्रह्माच्या अभक्ती । अवघ्या होती अधोगती । ते चुकविली निश्चिती । मायादेवी ॥
फणस जंबीर कर्दळी दाटा । हाती घेउनी नारंगी फाटा ॥१॥ वारियाने कुंडल हाले । डोळे मोडित राधा चाले ॥२॥ राधा पाहुन भुलले हरि । बैल दुभे नंदाघरी ॥३॥ हरि पाहुनी भुलली चित्ता । राधा घुसळी डेरा रिता ॥४॥ मन मीनलेसे मना । एका भुलला जनार्दना ॥५॥ भुलविले वेणुनादे । वेणु वाजविला गोविंदे ॥१॥ पांगुळले यमुनाजळ । पक्षी राहिले निश्र्चळ ॥२॥ तॄणचरे लुब्ध झाली । पुच्छ वाहुनिया ठेली ॥३॥ नाद न समाये त्रिभुवनी । एका भुलला जनार्दनी ॥४॥ कशी जाऊं मी वॄंदावना । मुरली वाजवी कान्हा ॥धॄ॥ पैल तीरी हरि वाजवी मुरली । नदी भरली यमुना ॥१॥ कांसे पितांबर कस्तुरी टीळक । कुंडल शोभे काना ॥२॥ काय करु बाई कोणाला सांगु । नामाची सांगड आणा ॥३॥ नंदाच्या हरीने कौतुक केले । जाणे अंतरीच्या खुणा ॥४॥ एकाजनार्दनी मनीं म्हणा । देवमहात्म्य कळेना कोणा ॥५॥ पाहिला नंदाचा नंदन । तेणे वेधियेले मन ॥१॥ मोर मुकुट पितांबर । काळ्या घोंगडीचा भार ॥२॥ गोधने चारी आनंदे नाचत । करी काला दहीभात ॥३॥ एकाजनार्दनी लडिवाळ बाळ तान्हा । गोपाळांशी कान्हा खेळे कुंजवना ॥४॥
खाली दिलेल्या बँक खात्यात आपण दान करू शकता
संपर्क माहिती :
शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन,
द्वारा, श्री वेणीमाधव गोसावी,
श्रीनाथ गल्ली, श्रीक्षेत्र पैठण, जिल्हा छत्रपती
संभाजीनगर
पिन. ४३१००६
मोबाईल क्रमांक : +९१ - ९४२१४१११३५
ईमेल : info@santeknath.org