॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्गुरु त्र्यंबका । ब्रह्मगिरिनिवासनायका । त्रिगुणत्रिपुरभेदका । कामांतका गिरिजेशा ॥ १ ॥ तुझा अनाहताचा डमरु । सर्व शब्दें करी गजरु । वेदानुवादें निरंतरु । त्रिकांडीं थोरु गर्जत ॥ २ ॥ तुझें हातींचें खट्वांग । करी जीवाचा जीवभंग । अनंगेंसीं जाळूनि अंग । अंगसंग तैं देशी ॥ ३ ॥ त्रिनयना त्र्यंबकलिंगा । तुजपासोनि प्रवाहे चिद्गंगा । ते पवित्रपणें उद्धरी जगा । प्रकाशगर्भा शंकरा ॥ ४ ॥ प्रत्यक्ष दिसती दोन्ही लोचन । तिसरा गुप्त ज्ञाननयन । यालागीं तूं त्रिलोचन । नयनेंवीण दीसशी ॥ ५ ॥ निजांगें वाहसी बोधचंद्र । यालागीं तूं चंद्रशेखर । चंद्रसूर्यादि चराचर । तुझेनि साचार प्रकाशे ॥ ६ ॥ ’ भव ’ या नांवाची ख्याती । भवप्रकाशक तुझी चिच्छ्क्ती । तूंचि विष्णु प्रजापती । रुद्र तूं अंतीं संहर्ता ॥ ७ ॥ मोडूनियां नामरूपमुद्रा । जीव आणिशी एकाकारा । अत्यंत प्रळयींच्या प्रळयरुद्रा । चित्समुद्रा शिवरूपा ॥ ८ ॥ शिव शिव जी गुरुराया । निजभावें लागतां पायां । तंव गुरुशिष्यत्व गेलें लया । दावूनियां निजरूप ॥ ९ ॥ तें निजरूप देखतां दृष्टीं । कैंचा जीव कैंची सृष्टी । निमाली त्रिगुणेंसीं त्रिपुटी । पडली मिठी स्वानंदीं ॥ १० ॥ त्या स्वानंदाचे उद्गार । सांवरतां नावरती थोर । त्या स्वानंदाचें निजसार । सत्य साचार एकादश ॥ ११ ॥ त्याहीमाजीं अतिगहन । सुखस्वानंदनिरूपण । तो हा एकुणिसावा अध्याय जाण । परमकारण शास्त्रार्थीं ॥ १२ ॥ जें ऐकतां निरूपण । परमानंद उथळे जाण । एका विनवी जनार्दन । श्रोतां अवधान मज द्यावें ॥ १३ ॥ सत्रावे अठरावे अध्यायांप्रती । स्वधर्मकर्में ब्रह्मप्राप्ती । वर्णाश्रमस्थितिगती । उद्धवाप्रती सांगीतली ॥ १४ ॥ एकुणिसावे अध्यायीं जाण । जेणें ज्ञानें साधिलें निजज्ञान । त्या ज्ञानाचें त्यागलक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ १५ ॥ कर्म-कर्तव्यता-कारण । जीवन्मुक्तासी नाहीं जाण । उद्धवाचे यमादि प्रश्न । हेही श्रीकृष्ण सांगेल ॥ १६ ॥ शास्त्रयुक्त पांडित्यज्ञान । प्रपंचाचें मिथ्या निरूपण । तें ’आनुमानिक’ पुस्तकज्ञान । सत्यपण त्या नाहीं ॥ १७ ॥ पूर्वे आहे माझें गमन । हें पूर्वील शुद्ध स्मरण । परी दिग्भ्रम पडिल्या जाण । पश्चिमे आपण पूर्व मानी ॥ १८ ॥ तैसें शाब्दिक शास्त्रज्ञान । बोले आन करी आन । तेणें नव्हे समाधान । सर्वथा जाण साधकां ॥ १९ ॥ जेवीं कां दिग्भ्रम मोडे । तैं पूर्वेचा चाले पूर्वेकडे । तेवीं अपरोक्षज्ञान जैं जोडे । तैं साधक पडे स्वानंदीं ॥ २० ॥ जें जें ऐके वेदांतश्रवण । तें अंगें होत जाण आपण । हें अपरोक्षाचें लक्षण । सत्यत्वें जाण अतिशुद्ध ॥ २१ ॥ ऐसें नव्हतां अपरोक्षज्ञान । सांडूं नये श्रवणमनन । अवश्य करावें साधन । प्रत्यगावृत्ती जाण अत्यादरें ॥ २२ ॥ झालिया अपरोक्षज्ञान । प्रपंचाचें मिथ्या भान । विषयांसी पडलें शून्य । कल्पना जाण निमाली ॥ २३ ॥ तेणेंचि पुरुषें आपण । त्यागावें गा ज्ञानसाधन । हेंचि निरूपणीं निरूपण । देव संपूर्ण सांगत ॥ २४ ॥ श्रीभगवानुवाच- यो विद्याश्रुतसंपन्न आत्मवात्रानुमानिकः । मायामात्रमिदं ज्ञात्वा ज्ञानं च मयि संन्यसेत् ॥ १ ॥ वेदशास्त्रार्थीं परिनिष्ठित । श्रवणमननाभ्यासयुक्त । ज्यासी ब्रह्मविद्या प्राप्तः । सुनिश्चित स्वानुभवें ॥ २५॥ तोचि अनुभव ऐसा । दोराअंगी सर्पु जैसा । न मारितां नाशे आपैसा । भवभ्रम तैसा त्या नाहीं ॥ २६ ॥ जेवीं कां नटाची रावो राणी । दोघें खेळती लटिकेपणीं । तेवीं प्रकृतिपुरुषउभवणी । मिथ्यापणीं जो जाणे ॥ २७ ॥ जैशीं भिंतीमाजीं नानाकार । चित्रें लिहिलीं विचित्र । ते भिंतीचि एक साचार । तेंवी ऐक्यें चराचर जो देखे ॥ २८ ॥ स्वप्नींचीं नाना कर्में जाण । त्याचें जागृतीं नव्हे बंधन । तेवीं मिथ्या निजकर्माचरण । जीवीत्वेंसीं प्राण जो देखे ॥ २९ ॥ ऐशी साचार ज्याची स्थिती । त्या नांव शुद्ध ’आत्मप्राप्ती’ । ’निजानुभव’ त्यातें म्हणती । हें जाण निश्चितीं उद्धवा ॥ ३० ॥ आणिक एक तेथींची खूण । ’विषयावीण स्वानंद पूर्ण’ । हें अनुभवाचें मुख्य लक्षण । सत्य जाण सात्वता ॥ ३१ ॥ ऐसा अनुभव नसतां देख । केवळ ज्ञान जें शाब्दिक । त्यातें म्हणिजे ’आनुमानिक’ । जाण निष्टंक निजभक्ता ॥ ३२ ॥ ज्याच्या अनुभवाभीतरीं । नाहीं अनुमानासी उरी । जो अपरोक्षसाक्षात्कारीं । निरंतरी नांदत ॥ ३३ ॥ ऐसा जो पुरुष जाण । तेणें ज्ञानाचें साधन । आणि वृत्तिरूप जें ज्ञान । तेंही आपण त्यागावें ॥ ३४ ॥ तें न त्यागितां लवलाहें । सहजचि त्याचा त्याग होये । जेवीं सूर्योदयीं पाहें । सचंद्र तेज जाये तारागणाचें ॥ ३५ ॥ जेवीं हनुमंत देखोनि येतां । नवचंडी पळे तत्त्वतां । मा राहावया येरां भूतां । उरी सर्वथा उरेना ॥ ३६ ॥ तेवीं माझे साक्षात्कारीं । त्यासी बद्धता नाहीं खरी । मा ज्ञान तियेचे निवृत्तीवरी । कैशापरी राहेल ॥ ३७ ॥ माझिया अनुभवाच्या ठायीं । बंधमोक्ष मिथ्या पाहीं । तेथ साधनज्ञानाचा कांहीं । उपेगु नाहीं उद्धवा ॥ ३८ ॥ परमात्मस्वरूपाच्या ठायीं । बंधमोक्ष मायिक पाहीं । तेथें ज्ञानध्यान जें कांहीं । न त्यागितां पाहीं त्यागिलें ॥ ३९ ॥ त्यागोनियां ज्ञानध्यान । ज्ञानियांसी माझी प्रीति गहन । तेंचि प्रीतीचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ४० ॥ ज्ञानिनस्त्वहमेवेष्टः स्वार्थो हेतुश्च संमतः । स्वर्गश्चैवापवर्गश्च नान्योऽर्थो मदृते प्रियः ॥ २ ॥ जो मी अद्वयानंदस्थिती । त्या माझी ज्ञानियांसी प्रीती । ते प्रीतीची उपपत्ती । ऐक निश्चितीं उद्धवा ॥ ४१ ॥ ज्ञानियांसी अतिवल्लभ । जो मी परमात्मा स्वयंभ । ज्ञानियांचा परम लाभ । मी पद्मनाभ निजधन ॥ ४२ ॥ ज्ञानियांसी जो स्वर्ग चांग । तो मज वेगळा नाहीं मार्ग । ज्ञानियांचा जो मोक्षभाग । तो मी श्रीरंग निजात्मा ॥ ४३ ॥ ज्ञानियांचें स्वधर्मसाधन । तें मी परमात्मा नारायण । मजवेगळें कांहीं आन । ज्ञात्यांसी जाण असेना ॥ ४४ ॥ ज्ञात्यांसी स्वर्गमोक्षसुख । मजवेगळें उरलें नाहीं देख । मी चिदात्मा निजव्यापक । भावें निष्टंक पावले ॥ ४५ ॥ ज्ञात्यांचा अर्थ स्वार्थ परमार्थ । मी पुरुषोत्तम गा समस्त । आद्य अव्यय अनंत । माझें निजसुख प्राप्त त्यां जाहलें ॥ ४६ ॥ ऐशी ज्ञानियांसी माझी प्रीती । तेही तैसेच मज प्रिय होती । तेंचि स्वयें श्रीपती । उद्धवाप्रती सांगत ॥ ४७ ॥ ज्ञानविज्ञानसंसिद्धाः पदं श्रेष्ठं विदुर्मम । ज्ञानी प्रियतमोऽतो मे ज्ञानेनासौ बिभर्ति माम् ॥ ३ ॥ ज्ञानविज्ञाननिजसंपत्ती । जाहलियावीण माझी प्राप्ती । कोणासी नव्हे स्वरूपस्थिती । मत्पदीं गती ज्ञानविज्ञानें ॥ ४८ ॥ करितां गुरुमुखें शास्त्रशुद्धश्रवण । तेणें जाहलें तें म्हणिजे ’ज्ञान’ । त्याचा अनुभव तेंचि ’विज्ञान’ । ऐक लक्षण त्याचेंही ॥ ४९ ॥ स्वयें स्वयंपाक केला जाण । न जाणे कटु मधुर लवण । जंव चाखिला नाहीं आपण । ते दशा सज्ञान ’ज्ञान’ म्हणती ॥ ५० ॥ केलिया रसाचें रसस्वादन । स्वयें गोडी सेवी आपण । ऐशी जे दशा तें ’विज्ञान’ । उद्धवा जाण निश्चितीं ॥ ५१ ॥ एवं विज्ञानज्ञाननिजसंपत्तीं । माझ्या उत्तमपदाची पदप्राप्री । माझें वास्तवस्वरूप जे जाणती । त्यांची मज प्रीती अनन्यत्वें ॥ ५२ ॥ वेद-शास्त्र-युक्तिबळें । माझें स्वरूप काइसेनि न कळे । तें ज्यासी वस्तुतां आकळे । मज त्यावेगळें प्रिय नाहीं ॥ ५३ ॥ तेंचि अतिप्रीतीचें लक्षण । त्याच्या पाउलापाउलीं जाण । सर्वांग वोडवीं मी आपण । करीं निंबलोण । सर्वस्वें ॥ ५४ ॥ त्यासी जे वेळे जें लागे । तें मी न मागतां पुरवीं वेगें । त्यासी विरुद्ध ये जेणें मार्गें । तें मी निजांगें निवारीं ॥ ५५ ॥ त्यासी झणीं संसारवारा लागे । यालागीं मीच मी पुढेंमागें । सभंवतां राहें सर्वांगें । अतिप्रीतिपांगें पांगलों ॥ ५६ ॥ जेणें ज्ञानें ज्ञानी प्रिय होती । त्या ज्ञानाची पवित्र कीर्ती । देवो सांगे उद्धवाप्रती । यथार्थस्थिती निजबोधें ॥ ५७ ॥ तपस्तीर्थं जपो दानं पवित्राणीतरणि च । नालंकुर्वन्ति तां सिद्धिं या ज्ञानकल्या कृता ॥ ४ ॥ सकळ साधनां नव्हे जे शुद्धी । ते ज्ञानलेशें होय त्रिशुद्धी । ऐक उद्धवा सुबुद्धी । ते ज्ञानशुद्धीचा महिमा ॥ ५८ ॥ ’तप’ जें परार्क पंचाग्नी । ’तीर्थ’ गंगादि सविता त्रिवेणी । ’जपु’ जे नाना मंत्रश्रेणी । गो-भू-तिल ’दानीं’ सुवर्णादि ॥ ५९ ॥ आणिकही इतर ’पवित्रें’ । जें ’स्वधर्मकर्मादि’ स्वाचारें । नाना ’याग’ अग्निहोत्रें । पवित्रकरें अतिशुद्ध ॥ ६० ॥ एवं तपादिक जें साधन । या सकळांची शुद्धी गहन । ते ज्ञानलेशासमान । पवित्रपण तुळेना ॥ ६१ ॥ ज्ञाननिष्ठा अर्धक्षणें । जे पवित्रता स्वयें लाहणें । तें तपादि नाना साधनें । नाहीं पावणें कल्पांतीं ॥ ६२ ॥ ऐसें जें ’पवित्रज्ञान’ । तें मुख्यत्वें धरोनि जाण । माझे करावें भजन । तेंचि निरूपण हरि बोले ॥ ६३ ॥ तस्माञ्ज्ञानेन सहितं ज्ञात्वा स्वात्मानमुद्धव । ज्ञानविज्ञानसंपन्नो भज मां भक्तिभावितः ॥ ५ ॥ याकारणें गा उद्धवा । ऐसा पवित्र ज्ञानाचा यावा । तेथ प्रक्षाळूनि निजभावा । जीवु तो वोळखावा परमात्मत्वें ॥ ६४ ॥ जीवु परमात्मा दोनि एक । ऐसें जाणणें तें ’ज्ञान’ देख । ऐक्यें भोगणें परमात्मसुख । ’विज्ञान’ सम्यक त्या नांव ॥ ६५ ॥ ऐसा ज्ञानविज्ञानसंपन्न । होऊन करावें माझें भजन । त्या निजभजनाची खूण । ऐक संपूर्ण उद्धवा ॥ ६६ ॥ तेव्हां जेथें देखे जें कांहीं । तें मीवांचूनि आन नाहीं । मग अनन्यभावें तिये ठायीं । भजे पाहीं भावार्थें ॥ ६७ ॥ ऐशिया माझ्या भजनाहातीं । उसंत नाहीं अहोरातीं । जागृति-स्वप्न-सुषुप्तीं । माझी निजभक्ती न मोडे ॥ ६८ ॥ विसरोनि जावें जेथें । तेथेंचि देखे मातें । मरण आलें विस्मरणातें । स्मरणही तेथें हारपलें ॥ ६९ ॥ यापरी ज्ञानविज्ञानसंपन्न । मजवेगळें न देखती आन । तैसेंचि माझें अनन्य भजन । ’शुद्धभक्ति’ जाण या नांव ॥ ७० ॥ मागां मुनीश्वरीं याचि गतीं । माझी करोनि अनन्य भक्ती । मज पावले जैशा रीतीं । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ७१ ॥ ज्ञानविज्ञानयज्ञेन मामिष्ट्वाऽऽत्मानमात्मनि । सर्वयज्ञपतिं मां वै संसिद्धिं मुनयोऽगमन् ॥ ६ ॥ जे ज्ञानधनें अतिसंपन्न । परम पवित्र विज्ञानें जाण । ऐसे ब्रह्मभूत जे ब्राह्मण । यज्ञद्वारा यजन करिती माझें ॥ ७२ ॥ हृदयाच्या निजभुवनीं । विकल्पाची भूमि खाणोनी । शम-दम-विरक्ती कुंडें तिन्ही । केलीं आवो साधुनी श्रद्धेचा ॥ ७३ ॥ तेथ क्षराक्षर अरणी दोन्ही । गुरुमंत्रें दृढ मंथूनी । काढिला सूक्ष्म निर्धूमाग्नी । कुंडीं स्थापूनी पेटविला ॥ ७४ ॥ शुद्धसत्त्वाचें घृत तेथ । रजतमद्रव्येंसीं मिश्रित । वैराग्यस्त्रुवेनें आहुती देत । मंत्र तेथ युक्तीचे ॥ ७५ ॥ घेऊनि विद्याशस्त्र लखलखित । संकल्पपशूचा करूनि घात । तेणें यज्ञपति श्रीअनंत । केला तृप्त निजबोधें ॥ ७६ ॥ तेथ पूर्णाहुतीस कारण । घालितां जीवभावाचें अवदान । यज्ञभोक्ता मी श्रीनारायण । परमात्मा जाण सुखी झालों ॥ ७७ ॥ यापरी माझें यजन । करूनियां मुनिगण । निवारूनि जन्ममरण । माझी सिद्धि जाण पावले ॥ ७८ ॥ मुनीश्वरीं साधिली सिद्धी । तेचि उद्धवालागीं त्रिशुद्धी । व्हावया कृष्ण कृपानिधी । प्रपंचनिषेधीं वस्तु सांगे ॥ ७९ ॥ त्वय्युद्धवाश्रयति यस्त्रिविधो विकारो मायान्तराऽऽपतति नाद्यपवर्गयोर्यत् । जन्मादयोऽस्य यदमी तव तस्य किं स्युराद्यन्तयोर्यदसतोऽस्ति तदेव मध्ये ॥ ७ ॥ ’मी उद्धव’ ऐसें म्हणतां । तूं कोण आहेसी तत्त्वतां । ऐक त्या स्वरूपाची कथा । तुज मी आतां सांगेन ॥ ८० ॥ जन्म स्थिति आणि निधन । त्रिविधविकारेंसीं त्रिगुण । त्यांची अधिष्ठात्री माया जाण । तिसी चळण तुझेनी ॥ ८१ ॥ मायादि गुणकार्यां समस्तां । तूं आश्रयो पैं सबाह्यतां । तुझेनि अंगें यासी चपळता । तूं यापरता चिदात्मा ॥ ८२ ॥ ’माझेनि गुणकर्मा चळणता । तैं प्रपंचासी आली सत्यता’ । हें मायामय गा तत्त्वतां । मृगजळता आभासु ॥ ८३ ॥ सकळ प्रपंचाचें जें भान । तें तंव मृगजळासमान । दिसे तेंही मिथ्या दर्शन । वस्तुत्वें जाण सत्य नव्हे ॥ ८४ ॥ तूं जन्ममरणापरता । त्रिगुणांतें नातळता । प्रपंचासी अलिप्तता । तुझी तत्त्वतां तूं ऐक ॥ ८५ ॥ तेचि प्रपंचाची अलिप्त युक्ती । ऐशी आहे परम प्रतीती । उत्पत्तिस्थितिप्रळयांतीं । प्रपंचाची वस्ती सत्यत्वें नाहीं ॥ ८६ ॥ उत्पत्ति आदीं प्रपंच नसे । अंतीं कांहीं उरला न दिसे । मध्यें जो कांहीं आभासे । तो मायावशें मिथ्याभूत ॥ ८७ ॥ प्रपंचाआदीं परब्रह्म । अंतीं तेंचि उरे निरुपम । मध्यें स्थितिकाळीं तेंचि ब्रह्म । मिथ्या भवभ्रम भ्रांतासी ॥ ८८ ॥ सूर्याआदीं मृगजळ नसे । अस्तमानीं उरलें न दिसे । मध्यें जें काहीं आभासे । तेथही नसे जळलेश ॥ ८९ ॥ सर्पाआदीं दोरत्वें दोरु । अंतीं दोर उरे साचारु । मध्यें भ्रमें भासे सर्पाकारु । तोही दोरु दोररूपें ॥ ९० ॥ यापरी आद्यंतीं विचारिता । वस्तु सत्य प्रपंच मिथ्या । हें उद्धवा जाण तत्त्वतां । वेदशास्त्रार्थां संमत ॥ ९१ ॥ ऐशी या प्रपंचाची घडामोडी । होतां जन्ममरणकोडी । उद्धवा तुज न लागे वोढी । तूं परापरथडीं नित्यमुक्त ॥ ९२ ॥ निर्गुण निःसंग निर्विकार । अज अव्यय अक्षर । ब्रह्म अनंत अपरंपार । तें तूं साचार उद्धवा ॥ ९३ ॥ हे ऐकोनि देवाची गोष्टी । उद्धवें बांधिली शकुनगाठीं । हरिखें आनंदु न जिरे पोटीं । एकला सृष्टीं न समाये ॥ ९४ ॥ ’तूं ब्रह्म’ म्हणतां यदुराजें । तेणें हरिखाचेनि फुंजें । उद्धव नाचे स्वानंदभोजें । वैकुंठराजे तुष्टले ॥ ९५ ॥ स्वमुखें तुष्टोनि श्रीकृष्ण । मज म्हणे ’तूं ब्रह्म पूर्ण’ । आजि मी सभाग्य धन्य धन्य । धांवोनि श्रीचरण वंदिले ॥ ९६ ॥ ’तूंचि अंगें परब्रह्म’ । ऐसें बोलिला मेघश्याम । तेचि अर्थींचें निजवर्म । उद्धव सप्रेम पूसत ॥ ९७ ॥ उद्धव उवाच- ज्ञानं विशुद्धं विपुलं यथैतद्वैराग्यविज्ञानयुतं पुराणम् । आख्याहि विश्वेश्वर विश्वमूर्ते त्वद्भक्तियोगं च महद्विमृग्यम् ॥ ८ ॥ विष्वक्सेना विश्वेश्वरा । विश्वमूर्ती विश्वंभरा । जेणें पाविजे ब्रह्मसाक्षात्कारा । त्या ज्ञाननिर्धारा मज सांगा ॥ ९८ ॥ नुसधें सांगती ज्ञान । ते केवळ मूढ जाण । सांग तूं वैराग्ययुक्ति तीक्ष्ण । जें छेदी बंधन जीवांचें ॥ ९९ ॥ ज्ञानेंवीण वैराग्य आंधळें । तें अरडीदरडी आदळे । वैराग्येंवीण ज्ञान पांगळें । युक्ति देखे परी न चले पुरुषार्थ ॥ १०० ॥ विवेक वैराग्य दोनी । प्रवेशल्या हृदयभुवनीं । तों विषयावस्था निरसूनी । सोहंपणीं जीव वर्तें ॥ १ ॥ जंव ज्ञानासी न भेटे विज्ञान । तंव न निरसे जीवपण । यालागीं सांगावें विज्ञान । जें जीवशिवपण निवारी ॥ २ ॥ असंभावनादोषशून्य । तें बोलिजे ’शुद्ध ज्ञान’ । जें विपरीतभावनेवीण । त्यातें सज्ञान ’विपुल’ म्हणती ॥ ३ ॥ ऐसें विशुद्ध-विपुल-ज्ञान । तद्युक्त वैराग्य-विज्ञान । त्यांमाजींही श्रेष्ठ तुझें भजन । कृपा करून सांगिजे ॥ ४ ॥ ज्ञान-विज्ञान-वैराग्यस्थितीं । जुनाट तुझी भगवद्भक्ती । मज सांगावी सुनिश्चितीं । कृपामूर्ती श्रीकृष्णा ॥ ५ ॥ तुझे उत्तमभक्तिकारणें । साधु पडले गवेषणें । धरणें बैसले जीवेंप्राणें । ते भक्ती सांगणें मजलागीं ॥ ६ ॥ तुझी करितां उत्तम भक्ती । त्रिविध ताप क्षया जाती । आपुली लाभे निजमुक्ती । उद्धव ते अर्थीं विनवीत ॥ ७ ॥ तापत्रयेणाभिहतस्य घोरे सन्तप्यमानस्य भवाध्वनीश । पश्यामि नान्यच्छरणं तवाङ्घ्रि द्वन्द्वातपत्रादमृताभिवर्षात् ॥ ९ ॥ जे त्रिविध तापें तापले । जे कामक्रोधीं जर्जर केले । आशातृष्णा विसंचिले । जे निर्बुजले जन्ममरणें ॥ ८ ॥ संसारमार्ग अतिघोर । दुःखें नुल्लंघवे दुस्तर । ऐसे श्रमले जे नर । त्यांसी निजछत्र हरिपादपद्म ॥ ९ ॥ तुझ्या चरणारविंदापरतें । शरण्य न देखों अणिकांतें । यालागीं कायावाचाचित्तें । शरण भावार्थें तुज आलों ॥ ११० ॥ छत्र निवारी केवळ ताप । चरणछत्राचें भिन्न रूप । त्रिविध तापेंसीं संताप । निरसोनि निष्पाप करी जन ॥ ११ ॥ एक शरण निजचित्तें । एक वैरें मिसळले तूतें । एक ते भजनभावार्थें । एक ते भयार्तें स्मरले तूतें ॥ १२ ॥ एक ते सुहृदत्वें सगोत्र । एकाचें केवळ स्नेहसूत्र । एका अंगसंग कामतंत्र । एक आज्ञाधारक नेमस्त ॥ १३ ॥ एवं नानापरी विचित्र । जिंहीं ठाकिलें चरणच्छत्र । भवभय जें महाघोर । तें त्यांसमोर हों न शके ॥ १४ ॥ भक्त वैरी आणि सुहृद । अवघ्यां देणें निज ऐक्यपद । बाप उदारता अगाध । तूं स्वानंदबोध सर्वांचा ॥ १५ ॥ होमें जें दीजे अग्नीवरी । तें अग्नी आपुल्याऐसें करी । मा अवचटें पडिल्यावरी । तेंही करी तैसेंचि ॥ १६ ॥ एवं नानायोगें गोविंदा । जे मीनले तुझिया संबंधा । त्यांची निरसोनि संसारबाधा । समत्वें निजपदा तूं नेसी ॥ १७ ॥ त्या तुझें चरणछत्र येथें । निवारी त्रिविध तापांतें । सदा वर्षे परमामृतें । शरण चरणांतें यालागीं ॥ १८ ॥ ज्या संसारभयाभेण । तुझ्या चरणा आलों शरण । त्या भवभयाचें निरूपण । उद्धव आपण सांगत ॥ १९ ॥ दष्टं जनं संपतितं बिलेऽस्मिन् कालाहिना क्षुद्रसुखोरुतर्षम् । समुद्धरैनं कृपयाऽऽपवर्ग्यैर्वचोभिरासिञ्च महानुभाव ॥ १० ॥ संसारकुहरामाजीं जन । गृहदाराकूपीं पडले जाण । त्याहीमाजीं दुःख गहन । काळसर्पें दारुण डंखिलें ॥ १२० ॥ त्या काळसर्पाचें विख । क्षणक्षणां चढे देख । अभिमानें भुलले लोक । विषयसुख वांछिती ॥ २१ ॥ नवल काळसर्पाचा पडिपाडु । विषप्राय विषय केले गोडु । गोडांचा गोड परमार्थ दृढु । तो केला कडू जीवेंभावें ॥ २२ ॥ विखाहूनि विषय अधिक । विख एक वेळां मारक । विषयो पुनः पुनः घातक । काळसर्पें लोक भुलविले ॥ २३ ॥ विषय तो केवळ विख । त्यालागीं भुलले मूर्ख । विषयांची तृष्णा देख । अधिकाधिक वाढविती ॥ २४ ॥ ऐसे दुःखनिमग्न जे जन । त्यांचें करावें जी उद्धरण । म्हणशील ’हे करितील साधन । तैं उद्धरण करीन मी’ ॥ २५ ॥ स्वामी तुझी कृपा न होतां । कोट्यानुकोटी साधन तें वृथा । तुझी कृपा जाहलिया अच्युता । भवव्यथा स्पर्शेना ॥ २६ ॥ ऐकें कृपाळुवा श्रीअनंता । तुझ्या मोक्षफळरूप ज्या कथा । तेणें अमृतें शिंपोनि कृष्णनाथा । जनां समस्तां उद्धरीं ॥ २७ ॥ तुझे मुखींचें कथापीयूख । बिंदुमात्र लाभतां देख । भवसर्पाचें उतरे विख । उपजवी सुख स्वानंदें ॥ २८ ॥ ’सकळ जनांच्या विषयीं’ । म्हणसी आग्रह कां तुझ्या ठायीं । जन मातें प्रार्थीत नाहीं । देवा ऐसें कांहीं कल्पिसी ॥ २९ ॥ अंधळें अंधकूपीं पडतां । देखणेनीं लावावें सत्पथा । तेवीं ज्ञानांध दुःखी बुडतां । उद्धरावया तत्त्वतां मी प्रार्थितसें ॥ १३० ॥ जन अंध कां जाहले म्हणसी । संसारसर्पें ग्रासिलें त्यांसी । यालागीं विसरोनि निजसुखासी । विषयसुखासी लोधले ॥ ३१ ॥ ऐशिया दीनांतें श्रीअनंता । कृपेनें उद्धरावें तत्त्वतां । म्हणोनि चरणीं ठेविला माथा । श्रीकृष्णनाथा प्रार्थिलें ॥ ३२ ॥ ऐकोनि भक्ताची विनंती । संतोषला भक्तपती । उत्तम सभेची ज्ञानस्थिती । उद्धवाप्रती सांगेल ॥ ३३ ॥ जे सभेसी मुख्यत्वें हृषीकेशी । देवर्षी आणि ब्रह्मर्षी । तेथ मीनले राजर्षी । तपोराशी ज्ञाननिधी ॥ ३४ ॥ ते सभेचा ज्ञानमथितार्थ । उद्धवासी सांगेल श्रीकृष्णनाथ । श्रोतीं अवधान द्यावें तेथ । एका विनवीत जनार्दनु ॥ ३५ ॥ ज्ञान आणि पुरातन । वक्ता भगवंत आपण । श्रोता उद्धव सावधान । काय श्रीकृष्ण बोलिला ॥ ३६ ॥ श्रीभगानुवाच- इत्थमेतत्पुरा राजा भीष्मं धर्मभृतां वरम् । अजातशत्रुः पप्रच्छ सर्वेषां नोऽनुश्रृण्वताम् ॥ ११ ॥ तुवां पुशिलें जैशा रीतीं । तैसियाचि गा उपपत्तीं । धर्में पुशिले भीष्माप्रती । देहांतीं शरपंजरीं ॥ ३७ ॥ ऐक त्या धर्माची थोरी । ज्यासी शत्रु नाहीं संसारीं । सत्यवादी निजनिर्धारीं । जो ऋषिमंत्रीं जन्मला ॥ ३८ ॥ करावया पांडवनिर्दळण । वज्रदेही व्हावया आपण । वर्म पुसतां दुर्योधन । धर्म असत्य वचन न बोले ॥ ३९ ॥ ऐसा राजा युधिष्ठिर । निर्मत्सर परम पवित्र । तेणें करूनि अत्यादर । भीष्म महावीर विनविला ॥ १४० ॥ जो परम धार्मिक निजनिर्धारीं । जो स्वधर्मनियमें व्रतधारी । जो यावज्जन्म ब्रह्मचारी । जो महाशूरीं वंदिजे ॥ ४१ ॥ न मोडतां गुरुत्वाची पायरी । जो परशुरामेंसीं युद्ध करी । परी काशीश्वराची कुमरी । जो न करीच नोवरी ब्रह्मचर्यें ॥ ४२ ॥ धनुर्विद्येसी गुरु परशुराम । तो रणीं जिंतिला करूनि नेम । तेणें संतोषोनि परम । आपुलें नाम आंकणां घातलें ॥ ४३ ॥ अधिक संतुष्टे परशुराम । माझ्या ब्रह्मचर्याचा व्रतनेम । भीष्मा तुज कदा बाधिना काम । वर परम दीधला ॥ ४४ ॥ जनकसंतोषाकारणें । आपुलें तारुण्य दीधलें जेणें । वार्धक्य घेऊनि आपणें । सुखी करणें शंतनु ॥ ४५ ॥ पित्यानें दीधलें आशीर्वादा । ’ऐक भीष्मा अतिप्रबुद्धा । वार्धकीं क्षीणशक्तीची आपदा । ते तुज कदा बाधेना’ ॥ ४६ ॥ यालागीं जंव जंव म्हातारपण । तंव तंव त्याचा प्रताप गहन । काळाची शक्ति खुंटली जाण । ज करवे क्षीण भीष्मासी ॥ ४७ ॥ यालागीं तोडरीं काळ काम । आंकणा रिघाला परशुराम । हाचि धर्मिष्ठीं ’वरिष्ठधर्म’ । हें साजे नाम भीष्मासी ॥ ४८ ॥ ज्याचिये प्रतिज्ञेच्या निर्धारीं । देवासी लावूनियां हारी । निःशस्त्रा करी शस्त्रधारी । एवढी थोरी प्रतिज्ञेची ॥ ४९ ॥ न मोडतां भजनमर्यादा । युद्धीं मिसळोनि गोविंदा । हारी लावूनियां मुकुंदा । चरणारविंदा लागला ॥ १५० ॥ आण वाहूनि निर्धारीं । शस्त्रास्त्रें सांडिलीं दूरीं । पुढती बाण भेदितां जिव्हारीं । शस्त्र करीं न धरीच ॥ ५१ ॥ बाणीं खडतरलें जिव्हार । विकळता देखोनि थोर । भीष्में करूनि निजनिर्धार । जाहला तत्पर देहत्यागा ॥ ५२ ॥ हें दक्षिणायन अतिघोर । भीष्में ऐकतां उत्तर । काळासी करूनियां दूर । स्वशरीर राखिलें ॥ ५३ ॥ मग निजात्मनिर्धारीं । भीष्म पहुडे शरपंजरीं । त्यातें युधिष्ठिर प्रश्न करी । महाऋषीश्वरीं परिवारिला ॥ ५४ ॥ आम्हां सकळां देखतां । जाहला युधिष्ठिर पुसता । तेचि पुरातन कथा । तुज मी आतां सांगेन ॥ ५५ ॥ निवृत्ते भारते युद्धे सुहृन्निधनविह्वलः । श्रुत्वा धर्मान् बहून्पश्चान्मोक्षधर्मानपृच्छत ॥ १२ ॥ मी संधि करितां श्रीकृष्ण । तें न मानीच दुर्योधन । व्यासें वर्जितां आपण । तरी दृप्तपण युद्धासी ॥ ५६ ॥ एवं दैवबळें कुरुक्षेत्रीं । कौरवपांडवां झुंजारीं । सापत्न दुर्योधनादि वैरी । सपरिवारीं मारिले ॥ ५७ ॥ युद्ध निवर्तल्यापाठीं । धर्म बैसल्या राज्यपटीं । तेणें अभिमान घेतला पोटीं । महादोषी सृष्टीं मी एक ॥ ५८ ॥ मी राज्यीं बैसवितां आपण । म्हणें म्यां मारिला गुरु ब्राह्मण । म्यां मारिला कर्ण दुःशासन । राजा दुर्योधन म्यां मारिला ॥ ५९ ॥ उत्पत्तिस्थितिप्रलयकर्ता । येथ ईश्वरु जाण तत्त्वतां । तें सांडोनियां सर्वथा । ’अहं कर्ता’ म्हणे धर्म ॥ १६० ॥ देहाभिमानाचे खटाटोपीं । थोर होऊनियां अनुतापी । गोत्रहंता मी महापापी । ऐसें आरोपी निजमाथां ॥ ६१ ॥ त्यासी द्यावया समाधान । समयो भीष्माचें निर्याण । तेथें म्यां नेउनियां जाण । धर्में केले प्रश्न ते ऐका ॥ ६२ ॥ राजधर्म दानधर्म । पुशिला तेणें आपद्धर्म । मुख्यत्वें पुशिला ’मोक्षधर्म’ । उत्तमोत्तम परियेसीं ॥ ६३ ॥ तानहं तेऽभिधास्यामि देवव्रतमुखाच्छ्रुतान् । ज्ञानवैराग्यविज्ञान श्रद्धाभक्त्युपबृंहितान् ॥ १३ ॥ ते भीष्ममुखींचे मोक्षधर्म । म्यां परिशिले अतिउत्तम । जे निरसिती भवभ्रम । सकळ कर्मदाहक ॥ ६४ ॥ ज्ञान विज्ञान श्रद्धा भक्ती । अनित्य नासे वैराग्यस्थिती । भीष्में सांगितली धर्माप्रती । ते मी निश्चितीं सांगेन ॥ ६५ ॥ म्हणणें भीष्मासी ’देवव्रत’ । तेणें देवावरी ठेवूनि चित्त । शरपंजरीं सुनिश्चित । निजात्मयुक्त पहुडला ॥ ६६ ॥ तेणें सांगितला मोक्षधर्म । त्यांत मुख्यत्वें ’ज्ञान’ प्रथम । तें ज्ञान सांगे पुरुषोत्तम । अतिउत्तम अवधारीं ॥ ६७ ॥ नवैकादश पञ्च त्रीन् भावान् भूतेषु येन वै । ईक्षेताथैकमप्येषु तञ्ज्ञानं मम निश्चितम् ॥ १४ ॥ प्रकृति पुरुष महत्तत्त्व । पंचतन्मात्रा सूक्षस्वभाव । अहंकारासकट ’नव’ । तत्त्ववैभव हे संख्या ॥ ६८ ॥ ’एकादश’ बोलिजेतें । तें अकराही इंद्रियें येथें । ’पंच’ ते पंचमहाभूतें । ’तिनी’ ते निश्चित तीन गुण ॥ ६९ ॥ हे तत्त्वसंख्या उणखूण । गणितां अठ्ठावीस जाण । इयें सर्व भूतीं समसमान । तत्त्वें जाण वर्तती ॥ १७० ॥ हिरण्यगर्भादि स्थावरान्त । तत्त्वें समान गा समस्त । अधिक उणें नाहीं येथ । जाण निश्चित उद्धवा ॥ ७१ ॥ तैसेंचि गा जीवचैतन्य । प्रतिबिंबलेंसे समसमान । जें नाम रूप अभिमान । सर्वांसी जाण प्रकाशक ॥ ७२ ॥ थिल्लरीं विहिरीं सागरीं । चंद्रमा प्रतिबिंब समचि धरी । तेवीं ब्रह्मादि मशकवरी । जीवत्व शरीरीं समसाम्यें ॥ ७३ ॥ भूतें समसमान चैतन्य । एकात्मता देखणें जाण । या नांव गा ’शुद्धज्ञान’ । माझाही जाण हा निश्चय ॥ ७४ ॥ आतां विज्ञानाचें लक्षण । तुज मी सांगेन संपूर्ण । ते श्लोकार्धें निरूपण । स्वयें नारायण सांगत ॥ ७५ ॥ एतदेव हि विज्ञानं न नथैकेन येन यत् ॥ पूर्वीं देखतेनी स्वभावें । व्यापक वस्तूनियें सर्वें । व्यापिलीं असती देहादि तत्त्वें । हें मानी जीवेंभावें निश्चित ॥ ७६ ॥ जेवीं कां घटमात्रास । सबाह्य व्यापक आकाश । तेवीं सकळ प्रपंचास । चिदाभास व्यापक ॥ ७७ ॥ ऐसें जें कां शुद्ध ज्ञान । तें ज्ञेयप्राप्तीचें कारण । ज्ञेय पावलिया ज्ञान । हारपे जाण वृत्तींसीं ॥ १८ ॥ ज्ञानैकगम्य वस्तु जे । यालागीं त्या ’ज्ञेय’ म्हणिजे । ज्ञेय पावलिया ज्ञान लाजे । जेवीं कां सूर्यतेजें खद्योत ॥ ७९ ॥ जळीं रिघल्या लवण । लवणपणा मुके जाण । तेवीं ज्ञेय पावलिया ज्ञान । ज्ञातेपण हारवी ॥ १८० ॥ ज्ञेय पावलिया सम्यक । स्वरूपीं चिन्मात्रैक एक । तेथ मिथ्या व्याप्यव्यापक । साधक बाधक असेना ॥ ८१ ॥ जेवीं उदेलिया गभस्ती । सतारा लोपे रोहिणीपती । तेवीं जगेंसीं ज्ञानसंपत्ती । ज्ञेयाचे प्राप्तीपुढें लोपे ॥ ८२ ॥ ऐसें अपरोक्ष नव्हतां साङ्ग् । देहादि प्रपंचाचें लिंग । आत्म्यवेगळें देखे जग । शब्दें लगबग ब्रह्मज्ञाना ॥ ८३ ॥ शुद्ध शब्दिक जें ब्रह्मज्ञान । तेहीं गुणात्मक जाण । वस्तु निराकार निर्गुण । जन्ममरण तिशी नाहीं ॥ ८४ ॥ त्रिगुण तितुकें नाशवंत । येचि विखीं प्रस्तुत । सांगाताहे श्रीकृष्णनाथ । अंतवंत साकार ॥ ८५ ॥ (उत्तरार्ध) स्थित्युत्पत्त्यप्ययान्पश्येद्भावानां त्रिगुणात्मनाम् ॥ १५ ॥ जरी नसतें नाशवंत । तरी सगुण मानूं येतें सत्य । उत्पत्तिस्थितिनिदानवंत । जाण येथ त्रिगुणाचि ॥ ८६ ॥ रजोगुणें होय उत्पत्ति । सत्वगुणें कीजे स्थिती । तमोगुण नाशी अंतीं । हा गुणप्रवृत्ती-स्वभावो ॥ ८७ ॥ या गुणांमाजीं वस्तु असे । जिचेनि गुणकर्म प्रकाशे । परी जन्ममरणादि दोषें । अलिप्त वसे अविनाशी ॥ ८८ ॥ जे तिनी गुणां आश्रयभूत । जिचेनि गुणकर्में वर्तत । ती वस्तु त्रिगुणातीत । तेचि सांगत श्रीकृष्ण ॥ ८९ ॥ आदावन्ते च मध्ये च सुज्यात्सृज्यं यदन्वियात् । पुनस्तत्प्रतिसंक्रामे यच्छिष्येत तदेव सत् ॥ १६ ॥ गुणां आदि-मध्य-अवसानीं । सृष्टिउत्पत्ति-स्थिति-निदानीं । जें असे अविनाशपणीं । तें मी मानें संतत्वें ॥ १९० ॥ तेंचि संतत्व गा ऐसें । ज्याचेनि आधारें जग वसे । जें जगा सबाह्य भरलें असे । जग प्रकाशे ज्याचेनी ॥ ९१ ॥ हें जगचि होय जाये । परीं तें संचलेंचि राहे । ऐशी जे निजवस्तु आहे । ते तूं पाहे संतत्वें ॥ ९२ ॥ जैसे घटमठ होती जाती । आकाश राहे सहजगती । तेवीं ब्रह्मांडा लयोत्पत्ती । वस्तूची स्थिती संचली ॥ ९३ ॥ जेवीं अलंकारपूर्वीं सोनें । अलंकारीं सोनें सोनेंपणें । अलंकारनाशीं नासों नेणे । जेवीं कां सोनें निजस्थिती ॥ ९४ ॥ तेवीं आकळोनि चराचर । वस्तु असे अखंडाकार । होतां जातां आकारविकार । वस्तु अणुमात्र विकारेना ॥ ९५ ॥ ऐशी जे वस्तु अखंडपणें । तिच्या ठायीं चार प्रमाणें । इहीं प्रामार्णीं वस्तु जाणणें । प्रपंच देखणें मिथ्यात्वें ॥ ९६ ॥ श्रुतिः प्रत्यक्षमैतिह्यमनुमानं चतुष्टयम् । प्रमाणेष्वनवस्थानाद्विकल्पात्स विरज्यते ॥ १७ ॥ एक अद्वैत ब्रह्म पाहीं । दूसरें आणिक कांहीं नाहीं । प्रपंच विथ्या वस्तूचे ठायीं । हें प्रमाण पाहीं ’वेदवाक्य’ ॥ ९७ ॥ ’प्रत्यक्ष’ देखिजे आपण । देहादिकांचें नश्वरपण । हें दुसरें परम प्रमाण । जें क्षणिकत्व जाण प्रपंचा ॥ ९८ ॥ मार्कंडेयो आणि भुशुंडी । इंहीं प्रपंचाची राखोंडी । देखिली गा रोकडी । वेळां कोडी कल्पांतीं ॥ ९९ ॥ महाजनप्रसिद्ध हें श्रवण । प्रपंचासी क्षणिकपण । हें तिसरें गा प्रमाण । उद्धवा जाण ’ऐतिह्य’ ॥ २०० ॥ शास्त्रप्रसिद्धी अनुमान । मिथ्या प्रपंचाचें भान । दिसे मृगजळासमान । वस्तुतां जाण असेना ॥ १ ॥ दोर दोरपणें साचार । भ्रमें भासे नानाकार । काष्ठ सर्प कीं मोत्यांचा हार । ना हे जळधार जळाची ॥ २ ॥ तेवीं वस्तु एक चिद्घन । तेथ भ्रमें मतवाद गहन । हें शून्य किंवा सगुण । कर्मधर्माचरण तें मिथ्या ॥ ३ ॥ यापरी करितां ’अनुमान’ । मिथ्या प्रवृत्तिप्रपंचज्ञान । हें वेदान्तमत प्रमाण । सत्य जाण उद्धवा ॥ ४ ॥ तंतूवेगळा पट कांहीं । योजेना आणीकिये ठायीं । तेंवी ब्रह्मावेगळा पाहीं । प्रपंचु नाहीं सत्यत्वें ॥ ५ ॥ चहूं प्रमाणीं प्रपंचस्थिती । मिथ्या साधिली निश्चितीं । ते प्रपंचीं विषयासक्ती । सांडूनि विरक्ती धरावी ॥ ६ ॥ येचिविखींचें निरूपण । स्वयें सांगताहे नारायण । उभय लोकीं विषयध्यान । तें मिथ्या जाण अमंगळ ॥ ७ ॥ कर्मणां परिणामित्वादाविरिञ्चादमङ्गलम् । विपश्चिन्नश्वरं पश्येददृष्टमपि दृष्टवत् ॥ १८ ॥ करूनि कर्मांचें साधन । पाविजे लोक तो नश्वर जाण । आदिकरूनि ब्रह्मसदन । नश्वरत्वें जाण अमंगळ ॥ ८ ॥ जें ते लोकींचें सुख गहन । तें विखें रांधिलें जैसें अन्न । खातां गोड परिपाकें मरण । तेवीं अधःपतन स्वर्गस्था ॥ ९ ॥ जैसा देखिला हा लोक येथ । तैसाचि स्वर्गभोग तेथ । जे दोन्ही जाण अंतवंत । नाश प्राप्त दोंहीसी ॥ २१० ॥ काळें पांढरें दोनी सुणीं । जेवीं सम अपवित्रपणीं । तेवीं इहपरलोक दोन्ही । नश्वरपणीं समान ॥ ११ ॥ इहामुत्र भोगासक्ती । यांवरी धरावी विरक्ती । या नांव ’वैराग्यस्थिती’ । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १२ ॥ मागील तुझी प्रश्नस्थिती । पुशिली होती माझी भक्ती । ते मी सांगेन तुजप्रती । यथानिगुतीं निजबोधें ॥ १३ ॥ भक्तियोगः पुरैवोक्तः प्रीयमाणाय तेऽनघ । पुनश्च कथयिष्यामि मद्भक्तेः कारणं परम् ॥ १९ ॥ पूर्वीं भक्तीची महत्ख्याती । तुज सांगितली निजस्थिती । ते भक्तीची तुज अति प्रीती । तरी मी मागुतीं सांगेन ॥ १४ ॥ ऐक उद्धवा पुण्यमूर्ती । ज्यासी आवडे माझी भक्ती । तो मज पढिया त्रिजगतीं । भजनें परम प्राप्ती मद्भक्तां ॥ १५ ॥ ते भक्तीचें निजलक्षण । प्रथम भूमिका आरंभून । देवो सांगताहे आपण । येथें सावधान व्हावें श्रोतां ॥ १६ ॥ श्रद्धामृतकथायां मे शश्वन्मदनुकीर्तनम् । परिनिष्ठा च पूजायां स्तुतुभिःस्तवनं मम ॥ २० ॥ अमृतरूपा ज्या माझ्या कथा । श्रद्धायुक्त श्रवण करितां । फिकें करूनियां अमृता । गोडी भक्तिपंथा तत्काळ लागे ॥ १७ ॥ अमर अमृतपान करिती । तेही शेखीं मरोनि जाती । माझें कथामृत जे सेविती । ते नागवती कळिकाळा ॥ १८ ॥ सेवितां कथासारामृत । अतिशयें जाहले उन्मत्त । मातले मरणातें मारित । धाकें पळे समस्त संसारु ॥ १९ ॥ सेवितां कथामृतसार । मद्भावीं रंगलें अंतर । तैं माझे गुण माझें चरित्र । गाती सादर उल्हासें ॥ २२० ॥ माझे नाम माझीं पदें । नाना छंदें अद्वैतबोधें । कीर्तनीं गाती स्वानंदें । परमानंदें डुल्लत ॥ २१ ॥ सप्रेम संभ्रमाचे मेळीं । गर्जती नामाच्या कल्लोळीं । नामासरिसी वाजे टाळी । जाहली होळी महापापां ॥ २२ ॥ ऐशिया कीर्तनाचे आवडीं । जाहलीं प्रायश्चित्तें देशधडी । तीर्थें होऊनि ठेलीं बापुडीं । फिटलीं सांकडीं जपतपांचीं ॥ २३ ॥ ऐकोनि कीर्तनाचा गजर । ठेला यमलोकींचा व्यापार । रिकामें यमकिंकर । यमें पाशभार लपविला ॥ २४ ॥ देखोनि कीर्तनाचे गोडी । देव धांवे लवडसवडीं । वैकुंठींहूनि घालीं उडी । अतितांतडीं स्वानंदें ॥ २५ ॥ ऐसा कीर्तनाचा गजर । करितां नित्य निरंतर । त्या अधीन मी श्रीधर । भुललों साचार कीर्तनें ॥ २६ ॥ जैसें कीर्तन तैशीच पूजा । आदरें पूजी गरुडध्वजा । पुष्पादिसंभारसमाजा । अतिवोजा घमघवीत ॥ २७ ॥ अतिनिष्ठा सावधान । यापरी करी माझें पूजन । माझी स्तुति माझें स्तवन । रिकामा अर्ध क्षण जावों नेदी ॥ २८ ॥ आदरः परिचर्यायां सर्वाङ्गैरभिवन्दनम् । मद्भक्तपूजाऽभ्यधिका सर्वभूतेषु मन्मतिः ॥ २१ ॥ ’इंद्रिये’ वेंचिलीं पूजाविधानें । ’वाचा’ वेंचली हरिकीर्तनें । ’हृदय’ वेंचलें माझोनि ध्यानें । ’अष्टांग’ नमनें वेंचले ॥ २९ ॥ ऐसा अत्यादरे वाडेंकोडें । सबाह्य वेंचला मजकडे । माझे भक्त देखिल्या पुढें । हरिखें मजकडे येवोंचि विसरे ॥ २३० ॥ माझे भक्त भाग्यें येती घरा । तैं पर्वकाळ दिवाळी दसरा । तेथें तीर्थें धांवती माहेरा । जेवीं सासराहूनि कुमारी ॥ ३१ ॥ पहावया भक्तपूजेची आवडी । सनकादिकांची पडे उडी । नारदप्रल्हादादि भक्तकोडी । चढोवढी धांवती ॥ ३२ ॥ तेथ सिद्ध येती गा अलोटें । सुरवरांचे टेक फुटे । महानुभवांचा ढीग दाटे । पितर नेटेंपाटें धांवती ॥ ३३ ॥ वेदांसी रिघावा न घडे । विधि निर्बुजला मागें मुरडे । माझ्या भक्तपूजेचेनि कोडें । दारापुढें थाट दाटे ॥ ३४ ॥ मद्भक्तपूजेचिया उल्हासा । मज टक पडे हृषीकेशा । इतरांचा पाड काइसा । भक्तपूजनीं ऐसा महिमा आहे ॥ ३५ ॥ मागां सांडूनि माझी पूजा । जेणें मद्भक्त पूजिले वोजा । तेणें मज पूजिलें अधोक्षजा । परिवारसमाजासमवेत ॥ ३६ ॥ प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती । भक्त माझ्या सचेतन मूर्ति । त्यांसी पूजिल्या मीं श्रीपती । यथानिगुतीं संतोषें ॥ ३७ ॥ जैसा मद्भाव मद्भक्तीं । तोचि भावो सर्वांभूतीं । नानाकार भूताकृती । परी आत्मस्थिती अविकार ॥ ३८ ॥ दिसे देहाकृती मुंडली । तीतें म्हणती हे रांडली । परी आत्म्याची रांड नाहीं जाहली । असे संचली आत्मस्थिति ॥ ३९ ॥ दीर्घ वक्र आणि वर्तुळ । दिसती भिन्न इंगळ । परी अग्नि एकचि केवळ । तेवीं भूतें सकळ मद्रूपें ॥ २४० ॥ चित्रांमाजीं नानाकृती । पाहतां अवघी एकचि भिंती । तेवीं मी चिदात्मा सर्वभूतीं । निजभावें निश्चितीं जाणावा ॥ ४१ ॥ सांडूनि अहंकार दुजा । सर्व भूतीं भावो माझा । हे उत्तमोत्तम माझी पूजा । मज अधोक्षजा पढियंती ॥ ४२ ॥ ऐशी जो माझी पूजा करी । तो मज पढियंता गा भारी । मी सर्वांगे राबें त्याच्या घरीं । तो मजवरी मिराशी ॥ ४३ ॥ त्याच्या चेष्टांची जे गती । तेचि माझी भजनस्थिती । हेंचि स्वमुखें श्रीपती । उद्धवाप्रती सांगता ॥ ४४ ॥ मदर्थेष्वङ्गचेष्टा च वचसा मद्गुणेरणम् । मय्यर्पणं च मनसः सर्वकामविवर्जनम् ॥ २२ ॥ लौकिक शरीर कर्मगती । तद्वारा निपजे माझी भक्ती । अभिनव माझी भजनस्थिती । सांगों किती उद्धवा ॥ ४५ ॥ बैसोनियां हाटवटीं । सांगतां लौकिकीही गोष्टी । त्यांमाजीं माझे कीर्तन उठी । मद्गुणें गोमटी गर्जे वाचा ॥ ४६ ॥ स्वधर्मकर्मक्रिया करणें । तेही अर्पी मजकारणें । मजवेगळें कांहीं करणें । करूं नेणे अणुमात्र ॥ ४७ ॥ सर्वेंद्रियांचिये स्थितीं । सहजें निपजे माझी भक्ती । माझें नाम माझी कीर्ती । वाचा रिती राहो नेणे ॥ ४८ ॥ मनासी आवडे जें जें कांहीं । ते तें अर्पी मजचि पाहीं । शेखीं आपुलें मन तेंही । माझ्या ठायीं समर्पीं ॥ ४९ ॥ माझे स्वरूपाचे ठायीं जाण । केवीं घडे मनाचें अर्पण । तेचिविषयींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ २५० ॥ मदर्थेऽर्थपरित्यागो भोगस्य च सुखस्य च । इष्टं दत्तं हुतं जप्तं मदर्थं यद्व्रतं तपः ॥ २३ ॥ मी परमात्मा परम स्वार्थ । ऐसा करूनि निश्चितार्थ । वेंचिती धन धान्य सर्वार्थ । निजपरमार्थ साधावया ॥ ५१ ॥ परमार्थ साधावया अव्यंग । साचार पोटींचा विराग । मी भेटावया श्रीरंग । सकळ भोग सांडिती ॥ ५२ ॥ छत्र चामर हस्ती घोडे । त्यागून होती गा उघडे । ऐसें वैराग्य धडपुडें । मज रोकडें पावायया ॥ ५३ ॥ माझें पावावया निजसुख । द्रव्यदारापुत्रादिक । त्यागूनि सांडिती निःशेख । यापरी देख अनुतापी ॥ ५४ ॥ आवडीं करितां माझें भजन । विसरे भोगाची आठवण । माझे प्राप्तीलागीं जाण । रिता क्षण जावों नेदी ॥ ५५ ॥ माझोनि उद्देशें परम । करी श्रौतस्मार्त स्वकर्म । अग्निहोत्रादि याग परम । व्रत नेम भजलागीं ॥ ५६ ॥ माझें ठाकावया चिद्रूप । गायत्रादि मंत्रजप । माझें पावावया निजस्वरूप । दुष्कर तप आचरती ॥ ५७ ॥ मी विश्वात्मा विश्वतोमुखी । विश्वंभर होतसें सुखी । यालागीं तो दीनमुखीं । करी आवश्यकीं अन्नदान ॥ ५८ ॥ हृदयीं मी स्वतःसिद्ध जाण । त्या माझें करूनि आवाहन । आपण करी जें भोजन । तेंही मदर्पण तो करी ॥ ५९ ॥ कवळकवळीं हरिस्मरण । तें अन्नचि होय ब्रह्म पूर्ण । यापरी माझे भक्त जाण । कर्म मदर्पण स्वयें करिती ॥ २६० ॥ ऐशीं सर्व कर्में कृष्णार्पण । सर्वदा जो करी जाण । त्यांचे मन होय मदर्पण । तेंचि निरूपण देवो सांगे ॥ ६१ ॥ एवं धर्मैर्मनुष्याणामुद्धवात्मनिवेदिनाम् । मयि सञ्जायते भक्तिः कोऽन्योऽर्थोऽस्यावशिष्यते ॥ २४ ॥ सर्व कर्में मदर्पण । करितां शुद्ध होय मन । जेवीं लोह कमावितां जाण । होय दर्पण सोज्ज्वळ ॥ ६२ ॥ पुटीं घालितां सुवर्ण । अधिक तेज चढे जाण । करितां वस्त्राचें क्षाळण । स्वच्छपण धोवटी ॥ ६३ ॥ तैसीं सर्व कर्में मदर्पण । करितां निर्मळ होय मन । ते काळीं मनाचें अर्पण । मद्रूपीं जाण हों लागे ॥ ६४ ॥ पूर दाटलिया सरितांसी । सवेग ठाकती सिंधूसी । तेवीं निर्मळत्वें मनासी । माझ्या स्वरूपासी पावणें ॥ ६५ ॥ माझे स्वरूपीं मनाचे स्थिती । तैं आर्त जिज्ञासु अर्थार्थी । हे तीनही ते काळीं हारपती । माझी भक्ती चौथी उल्हासे ॥ ६६ ॥ माझें भांडवल मज एक भक्ती । तेथ दुजी तिजी आणि चौथी । हे साधकांची साधनभ्रांती । बहुता भक्ती मज नाहीं ॥ ६७ ॥ तेचि माझी मुख्य भक्ती । येणें साधनें होय प्राप्ती । जे भक्तीस्तव भक्त म्हणविती । ब्रह्मा उमापती सनकादिक ॥ ६८ ॥ निःशेष मावळल्या अहंकृती । भूतें निजात्मरूप दिसती । माझ्या स्वरूपाची ’सहजस्थिती’ । ते माझी मुख्य भक्ती उद्धवा ॥ ६९ ॥ ये भक्तीच्या लेशस्थितीं । आर्त जिज्ञासु अर्थार्थी । प्रकाशले गा वर्तती । निजस्वार्थी साधक ॥ २७० ॥ हेचि आर्ताच्या विषयीं । आर्तीतें प्रकाशी पाहीं । मग ’आर्त’ ऐसे त्याच्या ठायीं । नांवाची नवायी उपतिष्ठे ॥ ७१ ॥ रोगिया नांव आर्तता । हें व्याख्यान नव्हे परमार्था । भगवत्प्राप्तीची तीव्र व्यथा । ते आर्तता परमार्थी ॥ ७२ ॥ जो भगवंताचे प्राप्तीलागीं । कडां घालूं धांवे वेगीं । कां रिघों पाहे जळते आगीं । तो ’आर्ता’ सावेगीं बोलिजे ॥ ७३ ॥ आर्ताची स्थिति ऐसी । जिज्ञासु निवारी त्यासी । मनुष्यदेह ब्रह्मप्राप्तीसी । तो आत्महत्येसी नको योजूं ॥ ७४ ॥ मागील भक्त कोणें रीतीं । जाणोनि पावले भगद्भक्ती । जीवेंभावें त्या विवरी युक्ती । ’जिज्ञासा’ निश्चितीं या नांव ॥ ७५ ॥ मज जाणावयाची ऐशी जे आशा । तीतें म्हणती शुद्ध ’जिज्ञासा’ । तेही प्रकाशक माझ्या प्रकाशा । मी जिज्ञासु ऐसा तेणें जाणें ॥ ७६ ॥ ब्रह्मप्रापक युक्तीचा ठसा । या नांव ’शुद्ध-जिज्ञासा’ । वेदशास्त्रजाणीववळसा । ’लौकिक-जिज्ञासा’ त्या नांव ॥ ७७ ॥ सर्वां अर्थीं मीचि अर्थना । शुद्ध ’अथार्थी’ या नांव जाणा । म्हणती अर्थार्थीं द्रव्यकामना । ते मंद व्याख्याना प्रवर्तती ॥ ७८ ॥ दृष्टी पडे नाना अर्थीं । जो विवंचोनि लावी परमार्थीं । त्या नांव बोलिजे ’अर्थार्थीं’ । त्यातेंही निजभक्ती प्रकाशे माझी ॥ ७९ ॥ एवं आर्त-जिज्ञासु-अर्थार्थी । त्यांतें प्रकाशे माझी ’सहजभक्ती’ । तीतें भक्त चतुर्धा मानिती । अधिकारस्थितिविभागें ॥ २८० ॥ भक्त कल्पनेचिया भ्रांती । माझी भक्ति चतुर्धा मानिती । ते मिथ्या गा वदंती । माझी निजभक्ती एकली ॥ ८१ ॥ ऐशिये निजभक्तीची प्राप्ती । आत्मनिवेदनाची स्थिती । उद्धवा म्यां तुजप्रती । यथानिगुतीं निरूपिली ॥ ८२ ॥ माझिये निजभक्तीचें सार । भक्त पावले जे साचार । त्यांचे सर्वही व्यापार । मदाकार होऊनि ठाकती ॥ ८३ ॥ तो जेउती वास पाहे । ते दिशाचि मी होऊनि ठायें । तो जेउतें चालवी पाये । ते धरा मी होयें धराधर ॥ ८४ ॥ तो करूं बैसल्या भोजन । षड्रस होय मी आपण । त्यासी करावया प्राशन । निजजीवन मी होयें ॥ ८५ ॥ त्यासी चालतां निजपदीं । बोधें दृष्याची निवारीं मांदी । शांति पायघड्या घाली आधीं । करी पदोपदीं निंबलोण ॥ ८६ ॥ शम दम आज्ञाधारी । हात जोडूनि उभे द्वारीं । ऋद्धिसिद्धी दासी घरीं । विवेक कामारी घरींचा सदा ॥ ८७ ॥ त्याचा बैसता अवकाश । अंगें मी होय हृषीकेश । तो निजावया सावकाश । समाधि मी त्यास आंथुरीं ॥ ८८ ॥ तो जे कांहीं बोल बोले । ते निःशब्द ब्रह्म-शब्दा आलें । यालागीं श्रोत्यांसी वहिलें । होय भलें समाधान ॥ ८९ ॥ तो अवलीला बोले वोठीं । शब्दासवें माझी गोठी उठी । श्रोत्यांची तेथ पडे मिठी । स्वभावें गोठी ऐकतां ॥ २९० ॥ चढतां परेचे उपरी । वैकुंठ कैलास पायरी । उन्मनी घालोनि बाहेरी । सुखशेजारीं तो पहुडे ॥ ९१ ॥ मिळोनियां मुक्ती चारी । पाणी वाहती त्याच्या घरीं । श्रीसहित राबें मी श्रीहरी । येरांची थोरी कोण पुसे ॥ ९२ ॥ अवचटें ये त्याच्या मुखासी । म्हणे ज्यासी ’तूं उद्धरिलासी’ । तो माथां वाहें मी हृषीकेशी । शब्दें निजधामासी पाववीं वेगीं ॥ ९३ ॥ जे पावले माझी ’सहजभक्ती’ । त्यांचे लळे पाळीं मी या रीतीं । त्यांची मज अनन्य प्रीती । सांगों किती उद्धवा ॥ ९४ ॥ बहुत बोलीं काय कारण । मी देहो तो आत्मा जाण । तो माझा जीवप्राण । हे जाणती खूण निजभक्त ॥ ९५ ॥ नांदतां ’सहजभक्ती’ आंत । मी देवो तो माझा भक्त । येरवीं मी सगळा त्याआंत । तो समस्त मजमाजीं ॥ ९६ ॥ निजभक्त मजभीतरीं । मी तया आंतबाहेरी । ऐसे सामरस्यें नांदों भारी । वेगळे बाहेरीं नाममात्र ॥ ९७ ॥ माझिया सायुज्या जे आले । ते मीचि होऊनियां ठेले । परी मी होऊनि मज भजलें । ते ’भक्त’ मानिले म्यां ऐसे ॥ ९८ ॥ सायुज्यापरीस भक्ति गोड । याचि निरूपणांचे कोड । उद्धवा तुझी जाणोनि चाड । विशद निवाड सांगितला ॥ ९९ ॥ ऐशिया माझ्या निजभक्तांसी । अवशेष अर्थ नुरेचि त्यांसी । मी तुष्टलों गा हृषीकेशी । निज भावासी सर्वस्वें ॥ ३०० ॥ ’भक्तिप्राधान्य भागवतशास्त्र’ । तें निजभक्तीचें निजसार । तुज मी सांगितले साचार । अत्यादरपूर्वक ॥ १ ॥ उद्धवा तुझे प्रीतीचेनि व्याजें । मज गुह्यांचें निजगुह्य हें जें । तें भक्तीचें करूनियां खाजें । तुज म्यां वोजें दीधलें ॥ २ ॥ म्यां सांगितलें जैशा रीतीं । तैशी सेवावी माझी निजभक्ती । ऐसें बोलत श्रीपती । उद्धव प्रीतीं उचलिला ॥ ३ ॥ मागां टाकूनि पीतांबरें । सांडोनियां शंखचक्रें । उद्धव उचलिला श्रीधरें । तरी प्रेम न सांवरे देवाचें ॥ ४ ॥ हांव न बाणेचि दों करीं । मग चारी भुजा पसरी । उद्धवातें हृदयावरी । प्रीतीं थोरीं आलिंगी ॥ ५ ॥ हृदयीं हृदय एक जाहलें । ये हृदयींचें ते हृदयीं घातिलें । कृष्णें सर्वस्व जें आपुलें । तें हृदयीं सूदलें उद्धवाचे ॥ ६ ॥ देव आवाप्तकाम निचाड । त्यासीही भक्तीची ऐसी चाड । अतिशयें उद्धव लागला गोड । स्वानंदें कोड पुरवी त्याचें ॥ ७ ॥ उद्धव प्रेमाचा लवलाहो । आलिंगन सोडूं विसरे देवो । कृष्णहृदया हृदय जडल्या पहा हो । उद्धवा उद्धवो विसरला ॥ ८ ॥ ऐसे स्वानंदीं वाडाकोडा । दोघेहि मिसळले निचाडचाडा । भक्तिसुखाचा सुरवाडा । उद्धव गाढा मीनला ॥ ९ ॥ कृष्णें सर्वस्व आपुलें । उद्धवाचे हृदयीं सूदलें । हें उद्धवा कळों नाहीं दीधलें । लाघव केलें गोविंदें ॥ ३१० ॥ हा अर्थ कळल्या उद्धवासी । हा येईल मजसी ऐक्यासी । पुढील कथा सुरस ऐसी । मग कोणापाशीं सांगावी ॥ ११ ॥ उद्धवा मज वाडेंकोडें । अखंड हेंचि बोलों आवडे । परी तैसा श्रोता न जोडे । हें थोर सांकडें मजलागीं ॥ १२ ॥ भक्तिसुखाचा सुरवाड । सांगतां माझें पुरे कोड । ऐसा श्रोता कैंचा गोड । यालागीं उद्धवा आड प्रेम सूये ॥ १३ ॥ सूर्यापासूनि फांकती किरण । तैसें सुटलें आलिंगन । कृष्ण उद्धव जाहले भिन्न । परी अभिन्नपण मोडे ना ॥ १४ ॥ पुढील कथेची संगती । दूर ठेली श्लोकसंगती । श्रोतां विरुद्ध न घ्यावें चित्तीं । समूळार्थ निश्चितीं विचारावा ॥ १५ ॥ मूळींचें पद संकोचित । तेथ उत्तम भक्तिभावार्थ । स्वयें बोलिला श्रीकृष्णनाथ । तोचि म्यां अर्थ विस्तरिला ॥ १६ ॥ नारळांतल्या वस्त्राची घडी । उकलितां थोर वाढे वाढी । तेवीं मूळपदाची घडामोडी । कथा एवढी विस्तारली ॥ १७ ॥ मूळपदाचा पदपदार्थ । श्लोकीं पहावा सावचित्त । श्लोकौत्तरार्धीं भगवंत । ध्वनितार्थ बोलोनि गेला ॥ १८ ॥ त्याचि ध्वनिताचे पोटीं । होती भक्तिरहस्याची पेटी । ते म्यां उघडूनि दाविली दिठीं । वृथा चावटी झणें म्हणाल ॥ १९ ॥ तंव श्रोते म्हणती नवल येथ । मूळींचें पद होतें गुप्त । तें काढिलें भक्तिसारामृत । सुहृदयस्थ हरीचें ॥ ३२० ॥ तुझे हृदयीं श्रीकृष्णनाथ । प्रकटोनि आपुलें हृद्गत । ग्रंथीं असे बोलवित । हें सुनिश्चित कळलें आम्हां ॥ २१ ॥ आम्हा ऐकतां भक्तिसारामृत । चित्तीं चैतन्य उथळत । होशी देखणा सुनिश्चित । ग्रंथ यथार्थ अर्थिला ॥ २२ ॥ हें ऐकोनि संतांचे वचन । हरिखला एकाजनार्दन । मस्तकीं वेदिले श्रीचरण । पुढील निरूपण अवधारा ॥ २३ ॥ निजभक्तीचे दृढीकरण । आदरें करिताहे श्रीकृष्ण । सांगितलें तेंचि निरूपण । पुढती जाण सांगता ॥ २४ ॥ यदाऽऽत्मन्यर्पितं चित्तं शान्तं सत्त्वोपबृंहितम् । धर्मं ज्ञान सवैराग्यमैश्वर्यं चभिपद्यते ॥ २५ ॥ आपुलें जें कां अंतःकरण । तें करितां गा मदर्पण । माझी निजभक्ति उल्हासे जाण । जिचें निरूपण म्यां केलें ॥ २५ ॥ मद्रूपीं अर्पावया मन । सुगम वर्म सांगेन जाण । माझें करितां नामस्मरण । पापनिर्दळण तेणें होय ॥ २६ ॥ सकाम स्मरतां नाम । नाम पुरवी सकळ काम । निर्विकल्पें स्मरतां नाम । करी भस्म पापाचें ॥ २७ ॥ होतां पापाचें क्षालण । रज तम जिणोनि जाण । सहजें वाढे सत्त्वगुण । धर्मपरायण धार्मिक ॥ २८ ॥ स्वधर्मनिष्ठ सत्त्वगुणें । अढळ पडे वैराग्याचें ठाणें । वैराग्यें विषय निर्दळणें । निजज्ञान तेणें प्रकाशे ॥ २९ ॥ वाढल्या सविवेक ज्ञान । लागे स्वरूपाचें अनुसंधान । चढे शांतीचें समाधान । तैं मदर्पण मन होये ॥ ३३० ॥ मन जाहल्या मदर्पण । निजभक्ति उल्हासे जाण । जिचें गतश्लोकीं निरूपण । म्यां संपूर्ण सांगितलें ॥ ३१ ॥ निजभक्ति पावल्या संपूर्ण । भक्तें न मागतां जाण । अष्ट महासिद्धी आपण । त्याचें आंगण वोळंगती ॥ ३२ ॥ जो सिद्धींकडे कदा न पाहे । त्यासी अवशेष कोण अर्थ राहे । माझी संपूर्ण पदवी लाहे । मदैक्य होये मद्भक्तां ॥ ३३ ॥ ऐशी न जोडतां माझी भक्ती । न लाभतां आत्मस्थिती । वर्तणें जैं विषयासक्तीं । तैं अनर्थप्राप्ती अनिवार ॥ ३४ ॥ यदर्पितं तद्विकल्पे इंद्रियैः परिधावति । रजस्वलं चासन्निष्ठं चित्तं विद्धि विपर्ययम् ॥ २६ ॥ जो सत्य न मानी वेदशास्त्रार्थ । साच न म्हणे तो परमार्थ । जो ग्रहदाराद्रव्यासक्त । लोलंगत विषयांसी ॥ ३५ ॥ तेणें अत्यंत समळमेळें । दारुण रजोगुण खवळे । तेणें चित्त होय ज्ञानांधळें । विपरीत कळे ज्ञानार्थ ॥ ३६ ॥ ज्यासी विषयांच्या युक्ती गहन । त्यासी म्हणती अतिसज्ञान । जो करी युक्तीचें छळण । होय मान्य पंडितपणें ॥ ३७ ॥ ज्यासी प्रपंचाचा अतिविस्तार । त्यास म्हणती भाग्य थोर । जो नाना भोगीं पाळी शरीर । सुकृती नर त्या म्हणती ॥ ३८ ॥ जो अनुपाती परमार्थविखीं । त्यासी म्हणती परम दुःखी । जो नाना विषयांतें पोखी । त्यांते महासुखी मानिती ॥ ३९ ॥ ज्याचेनि बोलें मनुष्य मरे । त्याचें सिद्धत्व मानिती खरें । जो उदास राहटे अनाचारें । मुक्त निर्धारे तो म्हणती ॥ ३४० ॥ ज्याचा दांभिक आचार । त्यातें म्हणती पवित्र नर । जे स्त्रियादि शूद्रां देती मंत्र । ते ज्ञाते थोर मानिती ॥ ४१ ॥ जो कां अनुतापी वैरागी । त्यानें म्हणती अतिअभागी । जो उघड विषयांतें भोगी । तो राजयोगी मानिती ॥ ४२ ॥ स्वयें द्रव्याचा अभिलाखी । द्रव्य वेंची त्यातें मूर्ख लेखी । न वेंची त्यातें म्हणती विवेकी । धर्मज्ञ लोकीं हा एक ॥ ४३ ॥ ज्याचे गांठी बहुसाल धन । तो सर्वांसी अवश्य मान्य । तोचि पवित्र तोचि सज्ञान । ऐसें विपरीत ज्ञान हों लागे ॥ ४४ ॥ आपण सर्वात्मा सर्वेश । हें विसरोनियां निःशेष । अधर्मी अकर्मी अनीश । मी अज्ञान पुरुष हें मानी ॥ ४५ ॥ तेथ कैं उपजे माझी भक्ती । कैसेनि होईल माझी प्राप्ती । ऐसे भ्रमले नेणों किती । संसारआवर्ती वर्ततां ॥ ४६ ॥ परमात्मप्राप्तीचीं कारणें । अतिगुह्य चारी लक्षणें । पोटंतुल्या कृपागुणें । उद्धवाकारणें हरि सांगे ॥ ४७ ॥ धर्माची भजन भोय । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । माझी प्राप्ती अवश्य होय । ते चारी उपाय अवधारीं ॥ ४८ ॥ धर्मो मद्भक्तिकृत्प्रोक्तो ज्ञानं चैकात्म्यदर्शनम् । गुणेष्वसङ्गो वैराग्यमैश्वर्यं चाणिमादयः ॥ २७ ॥ ऐक उद्धवा निजवर्म । गुह्य सांगेन मी परम । माझी भक्ति जे सप्रेम । उत्तम ’धर्म’ तो जाण ॥ ४९ ॥ ऐक्यें एकात्मता निजबोध । परतोनि कदा नुपजे भेद । या नांव गा ’ज्ञान’ शुद्ध । कृष्ण परमानंद सांगत ॥ ३५० ॥ धनधान्य रत्नांच्या राशी । उर्वशी आल्या शेजारासी । तें अवघें तृणप्राय ज्यासी । ’वैराग्य’ त्यासी आम्ही म्हणों ॥ ५१ ॥ ऐक उद्धवा सुबुद्धी । माझ्या ज्या अष्ट महासिद्धी । त्या मजवेगळ्या दूरी कधीं । जाण त्रिशुद्धी न ढळती कदा ॥ ५२ ॥ माझे निजभक्तीच्या निर्धारीं । जो माझी पदवी घे ऐक्येंकरीं । माझ्या सिद्धी त्याच्या घरीं । होती किंकरी निजदासी ॥ ५३ ॥ सिद्धी सेवा करिती । हेंचि नवल सांगों किती । श्रियेसहित मी श्रीपती । भक्तांची भक्ती सर्वस्वें करीं ॥ ५४ ॥ ’ऐश्वर्याचें मुख्य लक्षण’ । अतिशयेंसी संपूर्ण । भगवत्पदवी घेणें आपण । अतिसंपन्न ऐश्वर्यें ॥ ५५ ॥ म्यां हे सांगितली जे बोली । ते निजगुह्यभांडाराची किल्ली । येणें उघडूनि स्वानंदखोली । भोगीं आपुली सुखसिद्धी ॥ ५६ ॥ चहूं पदांचीं उत्तरें । वाखाणिलीं अतिगंभीरें । ऐकोनि उद्धव चमत्कारें । अत्यादरें विस्मित ॥ ५७ ॥ धर्मादि चहूं पदांचा अर्थ । अलोलिक सांगे श्रीकृष्णनाथ । तरी यमादिकांचा उत्तमार्थ । देवासी प्रत्यक्ष पुसो पां ॥ ५८ ॥ गुह्यार्थ सांगेल श्रीकृष्ण । यालागीं यमादिकांचे प्रश्न । उद्धव पुसताहे आपण । परमार्थ पूर्ण आकळावया ॥ ५९ ॥ पांच श्लोक पंचतीस प्रश्न । उद्धवें केलें ज्ञानगहन । ज्याचें ऐकतां प्रतिवचन । समाधान जीवशिवां ॥ ३६० ॥ पहिल्या श्लोकींचे सहा प्रश्न । दुसर्यामाजीं नव जाण । तिसरा चौथा आठ आठ पूर्ण । चारी प्रश्न पंचमीं ॥ ६१ ॥ उद्धव उवाच- यमः कतिविधः प्रोक्तो नियमो वाऽरिकर्शन । कः शमः को दमः कृष्ण का तितिक्षा र्थतिः प्रभो ॥ २८ ॥ अहंरिपुनिर्दळणा श्रीपती । ’यम’ ’नियम’ प्रकार किती । ’शम’ ’दम’ ’कोण म्हणीजेती तितिक्षा’ ’धृती’ ते कैशी ॥ ६२ ॥ किं दानं किं तपः शौर्यं किं सत्यमृतमुच्यते । कस्त्यागः किं धनं चेष्टं को यज्ञः का च दक्षिणा ॥ २९ ॥ कोण ’दान’ कोण ’तप’ येथ । ’शौर्य’ कोण कैसें तें ’सत्य’ । ’ऋत’ जें कां म्हणिजेत । तेंही निश्चित सांगावें ॥ ६३ ॥ कोणता जी ’त्याग’ येथें । इष्ट ’धन’ कोण पुरुषातें । ’यज्ञ’ कशातें म्हणिजेतें । ’दक्षिणा’ तेथें ते कायी ॥ ६४ ॥ पुंस किंस्विद्बलं श्रीमन् दया लाभश्च केशव । का विद्या ह्रीः परा का श्रीः किं सुखं दुःखमेव च ॥ ३० ॥ पुरुषासी ’बळाची’ कोण शक्ती । ’दया’ बोलिजे कोणे स्थितीं । ’लाभ’ तो कोण गा श्रीपती । सांग कृपामूर्ती केशवा ॥ ६५ ॥ ’विद्या’ म्हणावें कशातें । ’लज्जा’ कोणे ठायीं वर्ते । उत्कृष्ट ’लक्ष्मी’ कोण येथें । तेही अनंतें सांगावी ॥ ६६ ॥ येथील कोण पां कैसें ’सुख’ । मज सांगावें कृपापूर्वक । सुखाचे सांगाती जें ’दुःख’ । त्याचेंही रूपक सांगावें ॥ ६७ ॥ कः पण्डितः कश्च मूर्खः कः पन्था उत्पथश्च कः । कः स्वर्गो नरकः कः स्वित्को बन्धुरुत किं गृहम् ॥ ३१ ॥ ’पण्डिताचें’ काय लक्षण । ’मूर्ख’ म्हणावया कोण गुण । ’सुमार्ग’ म्हणावया तो कोण । सांगे निरूपण ’उन्मार्गाचें’ ॥ ६८ ॥ ’स्वर्ग’ कशातें बोलिजे । ’नरक’ कैसा वोळखिजे । सखा ’बंधु’ कोण म्हणिजे । ’गृह’ माझें तें कोण ॥ ६९ ॥ क आढ्यः को दरिद्रो वा कृपणः कः क ईश्वरः । एतान् प्रश्नान्मम ब्रूहि विपरीतांश्च सत्पते ॥ ३२ ॥ ’आढ्य’ कैसेनि म्हणिजे । ’दरिद्री’ कैसेनि जाणिजे । ’कृपण’ कोणातें बोलिजे । ’ईश्वर’ वोळखिजे तो कैसा ॥ ३७० ॥ हे माझे प्रश्न जी समस्त । यांचा सांगावा विशदार्थ । जो लौकिकाहूनि विपरीत । उपयुक्त परमार्थ ॥ ७१ ॥ लौकिकाहूनि विपरीतार्थ । त्यातें बोलती गा ’विपरीत’ । या अवघियांचा मथितार्थ । परमार्थयुक्त प्रश्न सांगा ॥ ७२ ॥ ज्ञानें सज्ञान संतमूर्ती ॥ त्यांचा स्वामी तूं निश्चितीं । यालागीं तूतें गा ’सत्पत्ती’ । सज्ञान म्हणती शास्त्रार्थें ॥ ७३ ॥ माझ्या प्रश्नांची प्रश्नोक्ती । परमार्थप्राप्तीलागीं श्रीपती । मज सांगावें यथार्थस्थिती । देवासी विनंती उद्धवें केली ॥ ७४ ॥ ऐकोनि भक्ताची विनवण । कृपा द्रवला नारायण । परमार्थरूप त्याचे प्रश्न । स्वयें श्रीकृष्ण सांगेल ॥ ७५ ॥ प्रथम तीं श्लोकीं यम नियम । विशद सांगेल पुरुषोत्तम । इतर प्रश्न अतिउत्तम । सांगे मेघश्याम अध्यायांतीं ॥ ७६ ॥ श्रीभगवानुवाच- अहिंसा सत्यमस्तेयमसङ्गो ह्रीरसञ्चयः । आस्तिक्यं ब्रह्मचर्यं च मौनं स्थैर्यं क्षमाभयम् ॥ ३३ ॥ प्रथम श्लोकींचा उभारा । यमाचीं लक्षणें बारा । पुशिल्या प्रश्नानुसारा । प्रतिउत्तरा हरि बोले ॥ ७७ ॥ पुढां प्रश्न आहेत फार । यालागीं यमनियमांचें उत्तर । आवरूनि संक्षेपाकार । स्वयें श्रीधर सांगत ॥ ७८ ॥ ’अहिंसा’ कायावाचामनें । परपीडात्याग करणें । ’सत्य’ यें यथार्थ बोलणें । ’अचौर्य’ लक्षणें तीं ऐक ॥ ७९ ॥ हातें चोरी नाहीं करणें । परी परद्रव्याकारणें । मनीं अभिलाष नाहीं धरणें । ’अस्तेय’ लक्षण त्या नांव ॥ ३८० ॥ असतां देहगेहसंगती । ज्याचे पोटीं नाहीं आसक्ती । जेवीं यात्रेमाजीं लोक येती । परी संगासक्ती त्यां नाहीं ॥ ८१ ॥ स्फटिक ठेविला ज्या रंगावरी । त्यासारिखा दिसे बाहेरी । आपण निर्विकार अंतरीं । तेवीं जो शरीरीं ’असंगता’ ते ॥ ८२ ॥ निंद्य कर्माकारणें । पोटांतूनि कंटाळणें । लौकिकीं निंद्य कर्मा लाजणें । ’ह्रीं’ म्हणणें या नांव ॥ ८३ ॥ इहलोकीं संग्रह करूं नेणें । जाणे दैवाधीन देहाचे जिणें । स्वर्गसुख भोगाकारणें । नाहीं संग्रहणें पुण्यातें ॥ ८४ ॥ पुण्यें स्वर्गभोगप्राप्ती । पुण्यक्षयें होय पुनरावृत्ती । जेणें क्षयो पावे पुण्यसंपत्ती । तें न संचिती निजभक्त ॥ ८५ ॥ या नांव गा ’असंचयो’ । ऐक ’आस्तिक्याचा’ निर्वाहो । सर्वत्र माझा ब्रह्मभावो । कोठेंही अभावो घेऊं नेणें ॥ ८६ ॥ ’ब्रह्मचर्य’ ऐसें येथ । जैसे आश्रमप्रयुक्त । बोलिलें शास्त्रीं यथोचित । तेंचि निश्चित करावें ॥ ८७ ॥ ’मौनिं’ न बोलावें इतुकें जाण । मिथ्यालाप असंभाषण । नित्य करावें वेदपठण । गायत्रीस्मरण कां हरिनाम ॥ ८८ ॥ स्तिरवृत्ति आत्मारामीं । कां असावी निजधर्मीं । भावार्थें संतसमागमीं । ’स्थिरता’ उपक्रमीं या नांव ॥ ८९ ॥ स्वदेह दंडिलें कां वंदिलें । परी क्षमा सम दोंही काळें । देहाचा भोग तो दैवमेळें । येणें विवेकमेळें क्षमावंत ॥ ३९० ॥ या नांव ’क्षमा’ म्हणिजे । अभय तें ऐसें जाणिजे । जें जें पारिखें देखिजे । तें तें होइजे आपणचि ॥ ९१ ॥ आत्मा एक पंचभूतें एक । दुजें पाहतां नाहीं देख । निमालें भयाचें महादुःख । ’अभय’ निःशेख या नांव ॥ ९२ ॥ निमाल्या दुजयाच्या गोठी । वोखदासी भय न मिळे सृष्टीं । अभयाची स्वानंदपुष्टी । निजदृष्टीं ठसावें ॥ ९३ ॥ या नांव गा बाराही ’यम’ । उद्धवा सांगितले सवर्म । आतां जयाचें नाम ’नेम’ । तेंही सुगम अवधारीं ॥ ९४ ॥ शौचं जपस्तपो होमः श्रद्धाऽऽतिथ्यं मदर्चनम् । तीर्थाटनं परार्थेहा तुष्टिराचार्यसेवनम् ॥ ३४ ॥ शौचाची ऐशी परी । अंतरीं शुचि विवेकेंकरीं । बाह्य तें वेदाज्ञेवरी । ’शौच’ करीं मृज्जलें ॥ ९५ ॥ परिसें ’जपाचा’ विचार । ज्यासी जैसा अधिकार । तैसा जपावा नाममंत्र । कां स्वतंत्र गुरुनाम ॥ ९६ ॥ ब्राह्मणाचा जप वेदोच्चार । संन्यासी जपे ओंकार । द्विजन्म्यासी आगममंत्र । कां नाममंत्र सर्वांसी ॥ ९७ ॥ तपाचा जो मुख्य प्रकार । जेणें शुद्ध होय अभ्यंतर । तो स्वधर्मीं गा सादर । अत्यादर करावा ॥ ९८ ॥ शरीरशोषणा नांव तप । हा मूर्खाचा खटाटोप । हृदयीं श्रीहरि चिंतणें सद्रूप । परम ’तप’ या नांव ॥ ९९ ॥ ऐक होमाचा विचार । देवाचे मुख वैश्वानर । पंचमहायज्ञ अग्निहोत्र । ’होम’ साचार या नांव ॥ ४०० ॥ भजनाची अतिआवडी । कां धर्माची अधिक गोडी । या नांव ’श्रद्धा’ रोकडी । जाण धडपडी उद्धवा ॥ १ ॥ नसतांही अन्नधनें । आतिथ्यें दे समाधानें । मस्तकीं वंदूनियां दीनें । निववी वचनें सुखरूपें ॥ २ ॥ दीन देखोनि तत्त्वतां । अतिनम्र विनीतता । यथाशक्ति अर्पणें अर्था । ’आतिथ्य’ तत्त्वतां या नांव ॥ ३ ॥ पोटींच्या कळवळेंनि वोजा । अत्यादरें गरुडध्वजा । सांङ्ग साजिरी करणें पूजा । श्रद्धा समाजासंभारीं ॥ ४ ॥ मेळवूनि ब्राह्मणसंभार । श्रद्धायुक्त षोडशोपचार । पूजितां संतोषें मी श्रीधर । ’पूजा’ पवित्र ब्राह्मणांची ॥ ५ ॥ शुद्ध व्हावया अंतःकरण । करावें गा तीर्थगमन । तीर्थयात्रीं श्रद्धा गहन । ’तीर्थाटन’ या नांव ॥ ६ ॥ पदोपदीं माझें नाम । गर्जतां स्मरती माझें कर्म । यात्रा करणें निजनिष्काम । ’तीर्थयात्रा’ परम या नांव ॥ ७ ॥ परोपकारार्थ पर्वत । जेंवी कां सामग्री वाहत । तेवीं क्रियामात्रें उपकारार्थ । सदा वर्तत उपकारीं ॥ ८ ॥ जेवीं का चंद्राचे किरण । लागतंचि निवनिती जाण । तेवीं जयाचें आचरण । ’उपकारें’ जन सुखी करी ॥ ९ ॥ जें प्राप्त जाहलें अदृष्टीं । तेणें काळ यथासुखें लोटी । कदा समासम नाहीं पोटीं । ’यथालाभसंतुष्टी’ या नांव ॥ ४१० ॥ कायावाचामनें धनें । जो विनटला गुरूकारणें । त्याचें उठे संसारधरणें । ’गुरुसेवा’ म्हणणें या नांव ॥ ११ ॥ उभय शौचाचे दोनी गुण । जपादि येर दशलक्षण । हे बारा ’नेम’ जाण । देवो आपण बोलिला ॥ १२ ॥ एते यमाः सनियमा उभयोर्द्वादश स्मृताः । पुंसामुपासितास्तात यथाकामं दुहन्ति हि ॥ ३५ ॥ दोंही श्लोकीं यम नियम । निरूपिले उत्तमोत्तम । बारा बारा यांचें वर्म । गुह्य परम शास्त्रार्थी ॥ १३ ॥ पुरुष यांचें उपासन । जरी करी सकामन । तैं कामधेनूच्या ऐसें जाण । करिती पूर्ण सकळ काम ॥ १४ ॥ हेचि पैं गा यम नेम । पुरुष उपासी निष्काम । तैं त्यासी माझें निजधाम । अतिसुगम निजप्राप्ती ॥ १५ ॥ आतां शमदमादिक तुझे प्रश्न । जेणें हाता पावे ब्रह्मज्ञान । तें सांगेन गुह्य निरूपण । सावधान उद्धवा ॥ १६ ॥ प्रश्नोत्तर सांगेल श्रीकृष्ण । तें अवधारितां सावधान । तत्काळ होय ब्रह्मज्ञान । हें परम प्रमाण अतिगुह्य ॥ १७ ॥ तृप्त व्हावया बालकासी । निजकरें माता ग्रास दे त्यासी । तेवीं श्रीकृष्ण उद्धवासी । ब्रह्मज्ञानासी देतसे ॥ १८ ॥ जो रसु गोड लागे पित्यासी । तो बळेंचि पाजी बालकासी । तेवीं श्रीकृष्ण उद्धवासी । ब्रह्मरसासी देतसे ॥ १९ ॥ आधींचि तानयाचें प्रेम मोठें । वरी लागतां त्याचें मुखवटें । मग स्वानंदाचेनि नेटें । पान्हा लोटे अनिवार ॥ ४२० ॥ तेवीं स्वयें श्रीकृष्ण । दाटूनि देतसे ब्रह्मज्ञान । तेथें उद्धवें पुशिलें प्रश्न । तेणें अधिक जाण तुष्टला ॥ २१ ॥ आधींच पर्जन्य खरा । वरी मीनलासे वीजवारा । मग अनिवार वर्षे धारा । खणोनि धरा वाहतसे ॥ २२ ॥ तेवीं द्यावया ब्रह्मज्ञान । मिष उद्धवाचे प्रश्न । स्वानंदें तुष्टला श्रीकृष्ण । ब्रह्म पूर्ण देतसे ॥ २३ ॥ निमोले देतां मिठाचे खडे । चिंतामणी हातीं चढे । कां विटेसाठीं परीस जोडे । न घे तो नाडे निजस्वार्था ॥ २४ ॥ तेवीं उद्धवाचे थोडे प्रश्न । तेणें आतुडे ब्रह्म पूर्ण । एका विनवी जनार्दन । श्रोतां अवधान मज द्यावें ॥ २५ ॥ उद्धवाचे चौतीस प्रश्न । त्यांत यम नियम जाहले जाण । उरले बत्तीस गुण । तेंही विवंचन अवधारा ॥ २६ ॥ प्रश्नीं दयेचें प्रतिउत्तर । न सांगेचि शारंगधर । त्या अर्थीं भावगर्भ सार । षड्गुणैश्वर्य बोलिलें ॥ २७ ॥ एही विखींचें व्याख्यान । पुढें सांगेल श्रीकृष्ण । दयेच्या ठायीं भाग्य संपूर्ण । कोण कारण सांगावया ॥ २८ ॥ एवं उरले एकतीस प्रश्न । आधिक एक सांगेल श्रीकृष्ण । ’कर्मस्वसंगम शौच’ जाण । कार्यकारणसंबंधा ॥ २९ ॥ ऐसे हे तेहतीस प्रश्न । व्याख्यान सांगेल श्रीकृष्ण । तें करतळीं ब्रह्मज्ञान । उद्धवासी जाण देतसे ॥ ४३० ॥ शमो मन्निष्ठता बुद्धेर्दम इन्द्रियसंयमः । तितिक्षा दुःखसंमर्षो जिह्वोपस्थजयो धृतिः ॥ ३६ ॥ बुद्धि जे कां विवेकवंती । असार सांडूनि सार धरिती । तिणें मनाच्या सकळ वृत्ती । विवेकस्थिती आवरोनि ॥ ३१ ॥ त्या वृत्तीसमवेत आपण । बुद्धि परमात्मीं मिळे जाण । जेवीं सागरासी लवण । दे आलिंगन भावार्थें ॥ ३२ ॥ समुद्रीं मिळतां लवण । समुद्रचि होय आपण । तेवीं आत्मनिश्चयें बुद्धि पूर्ण । चैतन्यघन स्वयें होय ॥ ३३ ॥ ऐसा बुद्धीचा उपरम । त्यानें म्हणिजे गा ’शम’ । यापूर्वी करावया दम । तोही अनुक्रम अवधारीं ॥ ३४ ॥ शत्रूचें जें दुर्दमन । तो दमु येथें नव्हे जाण । करावें इंद्रियदमन । तेंही लक्षण अवधारीं ॥ ३५ ॥ जेणें सहाय होती शमासी । त्या युक्तीं राखणें इंद्रियांसी । विधीवेगळें नेदी भोगासी । आवरी अहर्निशीं वैराग्यें ॥ ३६ ॥ ऐसें इंद्रियांचें निग्रहण । त्या नांव गा ’दम’ गुण । आतां तितिक्षेचें लक्षण । ऐक संपूर्ण सांगेन ॥ ३७ ॥ महासुख आलें होये । तें जेणें उल्हासें अंगीं वाहे । तेणेंचि उल्हासे पाहे । दुःखही साहे निजांगीं ॥ ३८ ॥ तेज आणि महा अंधारी । नभ समत्वें अंगीं धरी । तेवीं जो अविकारी । सुखदुःखपरी साहता ॥ ३९ ॥ गोफणेचा सुवर्णपाषाण । लागे तो दुःखी होय पूर्ण । तेचि वोळखिलिया सुवर्ण । दुःख जाऊन सुख वाटे ॥ ४४० ॥ तैसें द्वंद्वांचें निजस्वरूप । वोळखिलिया सद्रूप । तेव्हा द्वंद्वें होती चिद्रूप । हें मुख्य स्वरूप तितिक्षेचें ॥ ४१ ॥ सांडूनियां देहअहंते । सुखदुःखांहीपरतें । देखणें जें आपणातें । तेचि येथें ’तितिक्षा’ ॥ ४२ ॥ स्वप्नींचे दरिद्र आणि सधनता । जागृतीसी दोन्ही मिथ्या । तेवीं सुखदुःखापरता । देखणें तत्त्वतां ते ’तितिक्षा’ ॥ ४३ ॥ जिव्हा आणि दुसरें शिश्न । यांचा जयो करावा आपण । या नांव ’धृति’ संपूर्ण । विद्याधारण धृती नव्हे ॥ ४४ ॥ जेवीं कृष्णसर्प धरिजे हातीं । हे दोनी धरिजे तैशिया रीतीं । अळुमाळ ढिलावतां धृती । परतोनि खाती धरित्यासी ॥ ४५ ॥ ज्यासी द्रव्यदारासक्ती । तेथ कदा न रिगे हे धृती । द्रव्यदाराअनासक्ती । त्याचे घरीं धृती पोषणी सदा ॥ ४६ ॥ दण्डन्यासः परं दानं कामत्यागस्तपः स्मृतम् । स्वभावविजयः शौर्यं सत्यं च समदर्शनम् ॥ ३७ ॥ सर्व भूतांसी न द्यावें दुःख । याचे पोटीं आलें सुख । ’महादान’ तें हेंचि देख । द्यावें सुख सर्वांसी ॥ ४७ ॥ दुःख निरसूनि भूतांसी । सुख देणें गा सर्वांसी । हेंचि उत्तम दान पृथ्वीसी । आन यासी तुकेना ॥ ४८ ॥ जन्ममरणाचें दुःख । निरसूनि द्यावें निजसुख । याचि नांवें ’दान’ देख । अलौकिक उद्धवा ॥ ४९ ॥ या नांव गा ’परमदान’ । उद्धवा निश्चयेंसीं जाण । ऐक तपाचें लक्षण । तुज संपूर्ण सांगेन ॥ ४५० ॥ करूनियां कामाचा त्याग । तप करणें तें अतिचांग । हृदयीं असतां कामदाघ । तपाचें लिंग शोभेना ॥ ५१ ॥ सकाम वना जाय तपासी । तो वनींही चिंती वनितेसी । तें तपचि बाधक होय त्यासी । काम आंगेंसीं वर्ततां ॥ ५२ ॥ त्यागोनि कामाची कामस्थिती । तैं तपाची उत्तम गती । अखंड लागे माझी स्मृती । ’शुद्धतप’ प्राप्ती या नांव ॥ ५३ ॥ माझ्या ठायीं अनुताप । त्या नांव गा ’शुद्ध’ तप । कां हृदयीं चिंतितां चित्स्वरूप । हें ’परमतप’ तपांमाजीं ॥ ५४ ॥ ऐक शौर्याचा विचार । रणीं मर्दूनि अरिवीर । जिंतिला शत्रूंचा संभार । तो एथ शूर मानेना ॥ ५५ ॥ प्रवाहरूपें अनिवार । जीवभाव लागला थोर । त्यातें जिंके जो महावीर । तो ’परम शूर’ बोलिजे ॥ ५६ ॥ ”माझा सदाचार निर्वाहो । मी सज्ञान निःसंदेहो । माझा पवित्र ब्राह्मणदेहो” । हा ’जीवभावो’ जीवाचा ॥ ५७ ॥ देहाचे माथां वर्णाश्रम । आश्रमाचे माथां कर्म । तो कर्माभिमान ज्यां परम । त्यांसी देहभ्रम अनिवार ॥ ५८ ॥ जिणोनि जीवाचे स्वभाव । चिदानंदाची राणीव । भोगिजे स्वराज्यवैभव । हें परम गौरव शौर्याचें ॥ ५९ ॥ ज्या नांव बोलिजे निजसत्य । तें मी सांगेन निश्चित । सम ब्रह्म देखणें संतत । तें ’परम सत्य’ उद्धवा ॥ ४६० ॥ वस्तु न देखतां सर्वसम । जें जें देखणें गा विषम । तेंचि असत्य अतिदुर्गम । ’सत्य’ तें ब्रह्म समसाम्य ॥ ६१ ॥ केवळ जें सत्य भाषण । तें निजसत्य नव्हे जाण । तेचिविखींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ६२ ॥ ऋतं च सूनृता वाणी कविभिः परिकीर्तिता । कर्मस्वसङ्गमः शौचं त्यागः संन्यास उच्यते ॥ ३८ ॥ इतर कवींची वदंती । ’ऋत’ या नांव सत्य म्हणती । हें सत्य मानावें प्रवृत्तीं । सम ब्रह्म निवृत्तीमाजीं सत्य ॥ ६३ ॥ ऋत म्हणिजे तें ऐसें येथ । सत्य वाचा जें श्रोत्यांचें हित । तेंही दुःखसंबंधरहित । ’ऋत’ निश्चित या नांव ॥ ६४ ॥ चित्रीं पाहतां दिसे विषम । त्यामाजीं भिंती सदा सम । तेवीं जग देखतां विषम । ज्यां ब्रह्म सम निजबोधें ॥ ६५ ॥ या नांव गा ’सत्य’ जाण । उद्धवें केला नाहीं जो प्रश्न । त्या शौचाचें निरूपण । देवो आपण सांगत ॥ ६६ ॥ नव्हतां शुद्ध अंतःकरण । त्याग संन्यास न घडे जाण । अंतरशुद्ध्यर्थ शौच पूर्ण । स्वधर्माचरण हरि सांगे ॥ ६७ ॥ अंतरीं कर्ममळाचें बंधन । त्याचें स्वधर्में करावें क्षालन । कर्मे कर्माचें निर्दळण । करूनि आपण निष्कर्म व्हावें ॥ ६८ ॥ ते स्वधर्मीं फळाशा सुटता । कर्मबंधनें तुटती सर्वथा । यालागीं फळनिराशता । अंतरशौचता अतिशीघ्र ॥ ६९ ॥ नैराश्यें स्वधर्माचरण । तेणें अंतरमळाचें क्षालन । या नांव गा शौच जाण । ’शौच’ संपूर्ण नैराश्यें ॥ ७० ॥ ’शौच’ शुद्धअंतःकरणीं । ते भूमिका संन्यासग्रहणीं । यालागीं शौच अप्रश्नीं । सारंगपाणी बोलिला ॥ ७१ ॥ सकळ संकल्पांचा त्याग । हाचि पैं ’संन्यास’ चांग । ऐसें बोलिला तो श्रीरंग । ’त्याग’ तो चांग या नांव ॥ ७२ ॥ मी देह हे दृढता जीवीं । संकल्पें तगमग नित्य नवी । बाह्य दंड कमंडलु भगवीं । हें संन्यासपदवी लौकिक ॥ ७३ ॥ धर्म इष्टं धनं नॄणां यज्ञोऽहं भगवत्तमः । दक्षीणा ज्ञानसंदेशः प्राणायामः परं बलम् ॥ ३९ ॥ धन धान्य पशु रत्न । हें प्राण्यासी नव्हे इष्ट धन । मोक्षामार्गीं सबळ जाण । इष्ट धन तो धर्म ॥ ७४ ॥ घरीं जें पुरिलें धन । तें घरींच राहे जाण । धर्म तो स्वयें चालतें धन । अंगा बंधन येवो नेदी ॥ ७५ ॥ धर्मिष्ठायेवढा कृपण । न देखें मी आणिक जाण । मरतांही स्त्रीपुत्रां वंचून । अवघेंचि धन सवें ने ॥ ७६ ॥ धार्मिकीं धर्मार्थ वेंचूनि धन । मी भांडारी केला नारायण । जे समयीं जें जें लागे जाण । तें मी आपण स्वयें पुरवीं ॥ ७७ ॥ यालागीं धर्म तो इष्ट धन । हें सत्य सत्य माझें वचन । ऐक यज्ञाचें व्याख्यान । यथार्थ जाण सांगतों ॥ ७८ ॥ अग्नि तो माझें मुख जाण । यज्ञभोक्ता मी नारायण । अवघा यज्ञचि मी श्रीकृष्ण । परम प्रमाण वेदोक्त ॥ ७९ ॥ तेथें माझें स्वरूप ब्राह्मण । मद्दीक्षादीक्षित जाण । सद्भावें करूनियां यजन । माझें सुख संपूर्ण पावले ॥ ४८० ॥ तेथ अधर्मद्रव्याचेनि कोडें । अविधी दांभिक याग घडे । तोही मज मुखींच पडे । परी ते कोरडे खडखडीत ॥ ८१ ॥ अविधी जाहले पशुघातकी । तेणें अवदानें मी नव्हें सुखी । दंभे पडले कुंभिपाकीं । महानरकीं रौरवीं ॥ ८२ ॥ सर्व भूतांच्या भूतमुखीं । अर्पी तें पावे यज्ञपुरुखीं । हे दीक्षा नेणोनि याज्ञिकीं । जाहले नारकी हिंसादोषें ॥ ८३ ॥ जो मद्भावें दीक्षित जाण । विश्वतोमुखीं ज्यांचे यजन । तयांचा ’यज्ञ’ तो मी नारायण । दक्षीणा कोण ते ऐका ॥ ८४ ॥ यज्ञासी मोल नाहीं देख । ज्यासी ज्ञानदक्षिणा अमोलिक । हातां येतांचि याज्ञिक । महासुख पावले ॥ ८५ ॥ दक्षिणा आल्या ज्ञानघन । याज्ञिक होती अतिसंपन्न । कल्पांतीं वेंचेना तें धन । निजीं समाधान जीवशिवां ॥ ८६ ॥ सर्वांमाजीं प्राण सबळ । प्राणबळें बळी सकळ । प्राणयोगें मन चपळ । अतिचंचळ प्राणस्पंदे ॥ ८७ ॥ यापरी गा बळिष्ठ प्राण । प्राणाअधीन सदा मन । तो प्राण जिंकावा आपण । ’बळवंतपण’ या नांव ॥ ८८ ॥ गज उपडिजे पायीं धरून । घायीं चूर कीजे पंचानन । प्राण न जिंकतां जाण । शूरांचें प्रमाण नव्हे बळ ॥ ८९ ॥ प्राणाअधीन जीव मन । त्या प्राणाचें करूनि दमन । तो स्वयें कीजे गा स्वाधीन । ’अतिबळ’ जाण या नांव ॥ ४९० ॥ दृढ प्राणायाम साधिल्यापाठीं । थोरला देवो धांवे भेटी । भेटलिया न सुटे मिठी । ऐसा ’बळी’ सृष्टीं प्राणायामी ॥ ९१ ॥ भगो म ऐश्वरो भावो लाभो मद्भक्तिरुत्तमः । विद्याऽऽत्मनि भिदाबाधो जुगुप्सा ह्रीरकर्मसु ॥ ४० ॥ उद्धवें पुशिला दयेचा प्रश्न । तें न सांगोनि श्रीकृष्ण । परम भाग्याचें निरूपण । स्वयें आपण सांगत ॥ ९२ ॥ केवळ भाग्येंवीण । दया तितुकी वांझ जाण । यालागीं भाग्यनिरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ९३ ॥ म्हणसी कृपणाचें भाग्य । तो असतेनि धनें अभाग्य । परम भाग्य त्याचें चांग । जो दयेतें साङ्ग प्रतिपाळी ॥ ९४ ॥ त्या परम भाग्याचें लक्षण । तुज मी सांगेन संपूर्ण । ऐक तेथींची उणखूण । उदारपण भाग्याचें ॥ ९५ ॥ ’ज्ञान’ आणि ’वैराग्य’ पूर्ण । ’लक्ष्मी’ आणि ’औदार्य’ गुण । ’ऐश्वर्य’ आणि ’यश’ गहन । हे षड्गुण जाण महाभाग्य ॥ ९६ ॥ हे षड्गुण माझें भाग्य । भाग्यें पावे जो सभाग्य । तोचि दयेतें पाळी साङ्ग । अतिअव्यंग पूर्णत्वें ॥ ९७ ॥ जो षड्गुणेंशीं संपन्न । तोचि दीनदयाळू जाण । देऊं जाणे दान सन्मान । दरिद्रविच्छिन्न करूं शके ॥ ९८ ॥ ऐशिया सभाग्याची भेटी । होय तें भाग्य पाहिजे ललाटीं । माझ्या भाग्यास सृष्टीं । आणिक दृष्टीं दिसेना ॥ ९९ ॥ ऐसोनि ऐश्वर्यें संपन्न । तो दयेचें माहेर जाण । तिसी सोहळे करिती आपण । दया संपन्न त्याचेनि ॥ ५०० ॥ यालागीं दयेचे पोटीं । म्यां सांगितली भाग्याची गोठी । भूतदया जयाच्या पोटीं । तो अभाग्य सृष्टीं कदा नोहे ॥ १ ॥ तुवां पुशिला लाभ तो कोण । ऐक त्याचेंही लक्षण । माझी उत्तम भक्ति जाण । ’लाभ’ संपूर्ण त्या नांव ॥ २ ॥ माझी करिता उत्तम भक्ती । चारी मुक्ती पायां लागती । सुरवर लोटांगणीं येती । लाभ श्रीपति मी लाभें ॥ ३ ॥ हा लाभ न येतां हातीं । धनादिकांची जे प्राप्ती । तो नाडु जाण निश्चितीं । नरकगतिदायक ॥ ४ ॥ यालागीं परम लाभ माझी भक्ती । जेणें मी लाभें श्रीपती । ऐक विद्येची व्युत्पत्ती । यथानिगुतीं सांगेन ॥ ५ ॥ दृढ वासनेचिया संबंधा । शुद्धास आणी जीवपदा । अभेदीं उपजवी भेदा । ’अविद्याबाधा’ या नांव ॥ ६ ॥ देहाचे माथां वर्णाश्रम । आश्रमाचे माथां कर्म । त्या कर्माचा अभिमान परम । तो ’जीवधर्म’ देहबुद्धी ॥ ७ ॥ ते छेदोनि जीवाची बाधा । तो मेळविजे चिदानंदा । ती नांव शुद्ध ’आत्मविद्या’ । येर ते अविद्या सर्वही ॥ ८ ॥ जे निरसी गा अविद्या । ते बोलिजे शुद्ध विद्या । येरी शास्त्रादि चौदा विद्या । ते जाण अविद्या पाल्हेली ॥ ९ ॥ जे निरसी जीवाची बाधा । ते बोलिजे शुद्ध आत्मविद्या । आइक ह्रीच्या संबंधा । लाजावें सदा निंद्यकर्मी ॥ ५१० ॥ केवळ अवयव झांकणें । ते लज्जा येथ कोण म्हणे । गेलियाही जीवेंप्राणें । अकर्म न करणें ते ’लज्जा’ ॥ ११ ॥ श्रीर्गुणा नैरपेक्ष्याद्याः सुखं दुःखसुखात्ययः । दुःखं कामसुखापेक्षा पण्डितो बन्धमोक्षवित् ॥ ४१ ॥ सकळ साम्राज्यवैभवेंसीं । चतुर्दशभुवनविलासेंसीं । अंगीं लक्ष्मी आलिया जयापाशीं । परी थुंकोनि तिसी पाहेना ॥ १२ ॥ ऐशी ज्याचे निरपेक्षता । ते उत्कृष्ट ’श्री’ तत्त्वतां । त्यासी मी श्रीकृष्ण वंदीं माथां । इतरांची कथा कायसी ॥ १३ ॥ ज्यासी लक्ष्मीची निरपेक्षता । त्याची नित्य वस्ती माझे माथां । त्याहीहोनि पढियंता । आणिक सर्वथा मज नाहीं ॥ १४ ॥ सुख आणि महादुःख । दोनींतें ग्रासोनियां देख । प्रकटे स्वानंद स्वाभाविक । या नांव ’सुख’ उद्धवा ॥ १५ ॥ जेथ दुजयाची चाड नाहीं । इंद्रियांचा पांग न पडे कांहीं । विषयावीण आनंद हृदयीं । ’निजसुख’ पाहीं या नांव ॥ १६ ॥ विसरोनि हें निजसुख । कामापेक्षा करणें देख । याचि नांव गा परम ’दुःख’ । केवळ ते मूर्ख सेविती ॥ १७ ॥ नित्य होतां कामप्राप्ती । कदा नव्हे कामतृप्ती । कामापेक्षा पाडी दुःखावर्ती । दुःख निश्चितीं कामापेक्षा ॥ १८ ॥ हा बंध हा मोक्ष चोख । जाणणें जें अलौकिक । कदा नव्हे आनुमानिक । ’पंडित’ देख या नांव ॥ १९ ॥ ऐशी न जोडतां अवस्था । आम्ही सज्ञान वेदशास्त्रतां । ऐशी अभिमानि पंडितता । ते न ये सर्वथा उपेगा ॥ ५२० ॥ ज्यासी शांति आणि समाधान । साचार बंधमोक्षाचें ज्ञान । तो ’महापंडित’ जाण । ऐसें श्रीकृष्ण बोलिला ॥ २१ ॥ मूर्खो देहाद्यहंबुद्धीः पन्था मन्निगमः स्मृतः । उत्पथश्चित्तविक्षेपः स्वर्गः सत्त्वगुणोदयः ॥ ४२ ॥ वेदशास्त्र नेणता एक । त्यासी मूर्ख म्हणती लोक । ते मूर्खता येथें न मने देख । केवळ मूर्ख देहाभिमानी ॥ २२ ॥ केवळ नश्वर देह देख । तो मी म्हणोनि मानी हरीख । देहाभिमानें भोगी नरक । यापरता मूर्ख कोण आहे ॥ २३ ॥ विटाळें देहाचा संभवो । विटाळें देहाचा उद्भवो । विटाळेंचि निधन पहा हो । विटाळासी ठावो देहापाशीं ॥ २४ ॥ देहाचें निजरूप येथ । अस्थि चर्म विष्ठा मूत्र । तो मी म्हणवूनि जो श्लाघत । ’मूर्ख’ निश्चित तो जाण ॥ २५ ॥ ऐशी जे कां देहअहंता । ती नांव परममूर्खता । चालणें माझ्या वेदपंथा । ’सन्मार्गता’ ती नांव ॥ २६ ॥ ज्यासी जाहली चित्तविक्षेपता । तो निंदी गुरुदेवता । जो न मानी वेदशास्त्रार्था । तो उत्पथामाजीं पडे ॥ २७ ॥ जो गुरुदोषदर्शी समत्सरता । जो क्रोध करी सुहृदआप्तां । जो धिक्कारी मातापिता । ’चित्तविक्षेपता’ त्या नांव ॥ २८ ॥ जो सन्मानालागीं पाही । साधुसज्जनांतें करी द्रोही । जो दोष देखे ठायीं ठायीं । ’चित्तविक्षेप’ पाहीं या नांव ॥ २९ ॥ जो वदे परापवादा । जो करूं रिघे परनिंदा । जो विश्वासे स्त्रियेचे शब्दा । ’चित्तविक्षेपबाधा’ । ती नांव ॥ ५३० ॥ जो सन्मार्गापासूनि चेवता । पडे अधर्मअकर्मउत्पथा । तेही ’चित्तविक्षेपता’ । जाण तत्त्वतां उद्धवा ॥ ३१ ॥ आपण तत्त्वतां परब्रह्म । जाणणें हा ’वेदमार्ग’ उत्तम । हें नेणोनि वर्तणें सकाम । तोचि परम ’उन्मार्ग’ ॥ ३२ ॥ स्वर्गशब्दाची व्युप्तत्ती । ते सत्त्वगुणाची उत्पत्ती । जेणें निजसुखाची होय प्राप्ती । परी इंद्रलोकगति तो स्वर्ग नोहे ॥ ३३ ॥ अमरभुवना जे जे गेले । ते परतोनि पतना आले । शुद्धसत्त्वीं जे मिसळले । ते पावले निजसुख ॥ ३४ ॥ ऐसा जो कां सत्त्वगुण । तोचि येथें ’स्वर्ग’ जाण । आतां नरकाचें लक्षण । तुज संपूर्ण सांगेन ॥ ३५ ॥ नरकस्तमउन्नाहो बंधुर्गुरुरहं सखे । गृहं शरीरं मानुष्यं गुणाढ्यो ह्याढ्य उच्यते ॥ ४३ ॥ कामक्रोधलोभउद्रेक । तेणें खवळे महामोह देख । तो बुडवी सज्ञान विवेक । एकलें एक तम वाढे ॥ ३६ ॥ अरुणोदयीं दाट कुहर । निबिड पडे अंधकार । न कळे दिवसनिशाव्यवहार । सूर्यचंद्र दिसेना ॥ ३७ ॥ यापरी गा निजचित्तीं । अंधमते वाढे वृत्ती । कर्तव्याकर्तव्यस्थिती । एकही स्फूर्ति स्फुरेना ॥ ३८ ॥ ऐसा तमाचा उन्नाह उद्रेक । त्या नांव जाण ’महानरक’ । परी यमयातना जें दुःख । तो नरक म्हणों नये ॥ ३९ ॥ यमयातनां पाप झडे । महामोहें पाप वाढे । याम्य नरक ते बापुडे । अतिनरक गाढे महामोहीं ॥ ५४० ॥ काम क्रोध लोभ देख । हेचि तीनी निरयदायक । तेथ महामोहो आवश्यक । जें होय एक अंधतम ॥ ४१ ॥ इतुका मिळे जेथ समुदावो । त्यांते बोलिजे ’तमउन्नाहो’ । ऐसा जेथ घडे भावो । तो पुरुष पहा हो नरकरूप ॥ ४२ ॥ जो घोरनरकाप्रती जाये । त्याचा तेथूनि उद्धार होये । ’तमउन्नाह’ ज्या प्राप्त होये । त्याचा निर्गम नोहे महाकल्पांतीं ॥ ४३ ॥ ऐशी तमउन्नाहाची ख्याती । ऐकोनि उद्धव कंटाळे चितीं । ऐसे बुडते जीव तमोवृत्तीं । त्यांची उद्धारगति कोण करी ॥ ४४ ॥ ऐसा उद्धवाचा भावो । जाणोनि बोलिला देवाधिदेवो । बुडतयातें उद्धरी पहा हो । गुरुरावो निजसखा ॥ ४५ ॥ ऐसा गुरु तो तूं कोण म्हणशी । मी नित्य लागें ज्याच्या पायांशीं । जो दे चिन्मात्र पूर्णब्रह्मासी । ’गुरु’ नाम तयासी बोलिजे ॥ ४६ ॥ त्या ब्रह्मापरीस अधिकता । गुरूसी आलिसे तत्त्वतां । ब्रह्म ब्रह्मत्वें हा प्रतिपादिता । येर्हवीं ब्रह्माची वार्ता कोण पुसे ॥ ४७ ॥ अज अव्यय अनंत । अच्छेद्य अभेद्य अपरिमित । हे ब्रह्ममहिमा समस्त । सद्गुरूंनीं येथ विस्तारिली ॥ ४८ ॥ ऐशी ऐकतां सद्गुरुकीर्ती । जडजीव उद्धरती । ’गुरु’ नामाची महाख्याती । ऐकोनि कांपती यमकाळ ॥ ४९ ॥ त्या सद्गुरूचें महिमान । करी बुडत्याचें उद्धरण । निवारी जन्ममरण । शिष्यसमाधान निजदाता ॥ ५५० ॥ सुहृद आप्त सखा बंधु । शिष्याचे सद्गुरु प्रसिद्धु । निवारूनि नरकसंबंधु । परमानंदु सुखदाता ॥ ५१ ॥ आतां गृहाचें लक्षण । तुज मी सांगेन संपूर्ण । माड्या गोपुरें धवलारें जाण । गृहप्रमाण तें नव्हे ॥ ५२ ॥ मनुष्यदेह तो गृहाश्रम । जेथें नित्य वसें मी पुरुषोत्तम । तेथील करितां स्वधर्मकर्म । आत्माराम उल्हासे ॥ ५३ ॥ ज्या नरदेहाचिये प्राप्ती । इंद्रादिक देव वांछिती । वेद वानी ज्या देहाची कीर्ति । निजमोक्षप्राप्ती नरदेहीं ॥ ५४ ॥ निज ’गृह’ जें साचार । तें जाणावें नरशरीर । आतां आढ्यपणाचा विचार । तोही प्रकार अवधारीं ॥ ५५ ॥ जो ज्ञानगुणीं अतिसंपन्न । जें कल्पांतींही न वेंचे धन । तोचि ’आढ्यतम’ जाण । येर तें धन नश्वर ॥ ५६ ॥ नश्वर धनाची आढ्यता । अवश्य नेत अधःपाता । ज्ञानधने जे आढ्यता । तेणें ये हाता परब्रह्म ॥ ५७ ॥ दरिद्रो यस्त्वसंतुष्टः कृपणो योऽजितेन्द्रियः । गुणेष्वसक्तधीरीशो गुणसङ्गो विपर्ययः ॥ ४४ ॥ ऐक दरिद्राचें लक्षण । गांठीं असतां कोटी धन । ज्याचें संतुष्ट नाहीं मन । परम ’दरिद्री’ जाण या नांव ॥ ५८ ॥ ज्याचे गांठीं नाहीं कांचवटी । परी संतुष्टता नित्य पोटीं । तोचि संपन्न सकळ सृष्टीं । सत्य गोष्टी हे उद्धवा ॥ ५९ ॥ गांठीं असोनियां धन । जो पोटा न खाय आपण । सदा लोलिंगत मन । दरिद्रलक्षण या नांव ॥ ५६० ॥ यापरी जें कृपणपण । ऐक त्याचेंही लक्षण । जेवीं राजा बांधी सेवकजन । तेवीं इंद्रियांअधीन जो होय ॥ ६१ ॥ निर्धारितां निजरूप जाण । सर्वांचा राजा तो आपण । तें विसरोनि होय दीन । इंद्रियांअधीन होऊनि ठाके ॥ ६२ ॥ मन तयाचें आज्ञाधार । मनाचीं इंद्रियें किंकर । त्यांचाही हा होय डिंगर । अजितेंद्रियें होय थोर ’कृपणत्व’ ऐसें ॥ ६३ ॥ निज किंकराचीं किंकरें । त्या इंद्रियांचीं हा वोळंगे द्वारें । अजितेंद्रियत्वें अतिखरें । निजांगीं सुभरे कृपणत्व ॥ ६४ ॥ या नांव गा ’कृपणपण’ । तुज म्यां सांगितले जाण । आतां ईश्वराचें सुलक्षण । ऐक संपूर्ण उद्धवा ॥ ६५ ॥ कनक आणि कामिनी । ज्यासी नावडे मनींहुनी । तोचि ’ईश्वर’ त्रिभुवनीं । सत्य सत्य हे वाणी उद्धवा ॥ ६६ ॥ तुवां जितुके केले प्रश्न । तितुके ज्यासी वोळंगती गुण । त्यांसीही ज्याचें अलिप्तपण । ईश्वरत्व संपूर्ण त्या नांव ॥ ६७ ॥ कनक आणि कामिनी । यांचा पंगिस्त मनींहूनी । तोचि ’अनीश्वरु’ जनीं । हें सत्य मानीं उद्धवा ॥ ६८ ॥ शमादि सांगितले प्रश्न । त्यांचें जें विपरित लक्षण । तेंचि अनीश्वरत्व जाण । अशमादि गुण जे ठायीं ॥ ६९ ॥ एत उद्धव ते प्रश्नाः सर्वे साधु निरूपिताः । किं वर्णितेन बहुना लक्षणं गुणदोषयोः ॥ ४५ ॥ उद्धवा तुझे सकळ प्रश्न । म्यां निरूपिले सुलक्षण । जेणें होइजे ब्रह्मसंपन्न । तैसें व्याख्यान सांगितले ॥ ५७० ॥ संसारीं गुणदोषलक्षण । सांगता अपरिमित जाण । यालागीं धरावें गा मौन । परम कठिण गुणदोष ॥ ७१ ॥ गुणदोष नायकावे कानीं । गुणदोष न देखावे नयनीं । गुणदोष न बोलावे वदनीं । गुणदोष मनीं न धरावे ॥ ७२ ॥ ब्रह्मज्ञानाचें मुख्य लक्षण । तेंही बहुत नाहीं निरूपण । श्लोकार्धें श्रीकृष्ण । स्वमुखें आपण सांगत ॥ ७३ ॥ गुणदोषदृशिर्दोषो गुणस्तूभयवर्जितः ॥ ४६ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायामेकादशस्कन्धे एकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥ ब्रह्म एक परिपूर्ण । तेथें कैंचे दोष कैंचे गुण । अविद्या क्षोभली ते जाण । गुणदोषलक्षण वाढवी ॥ ७४ ॥ जो देखों लागे दोषगुण । त्याची अविद्या क्षोभली जाण । जो न देखे गुणदोषभान । तो ’ब्रह्मसंपन्न’ उद्धवा ॥ ७५ ॥ पराचा देखावा दोषगुण । हाचि दोषांमाजीं महादोष जाण । गुणदोष न देखावा आपण । हा उत्तम गुण सर्वार्थीं ॥ ७६ ॥ ब्रह्मीं नाहींत दोषगुण । हें सर्वार्थीं सत्य जाण । जो देखे गा दोषगुण । ब्रह्मत्व जाण तेथें नाहीं ॥ ७७ ॥ जे गुणदोष देखों लागले । त्यांचें ब्रह्मत्व कैसेनि गेलें । त्यांपाशीं तें वोस जाहलें । कीं रुसूनि गेलें तेथूनी ॥ ७८ ॥ जेवीं रविबिंबा राहु ग्रासी । तैं दिवसा देखिजे नक्षत्रांसी । तेवीं अविद्या ब्रह्मत्व जैं प्राशी । तैं गुणदोषांसी देखिजे ॥ ७९ ॥ आदरें सांगे श्रीकृष्ण । उद्धवा न देखावे दोषगुण । हे माझे जीवींची निजखूण । तुज म्यां संपूर्ण सांगितली ॥ ५८० ॥ जनीं चौर्यांशीं लक्षयोनी । त्यांत गुणदोष एके स्थानीं । न देखावे मनुष्ययोनीं । तूं इतुकेनी नित्यमुक्त ॥ ८१ ॥ म्हणसी स्वाचारपरिपाठीं । गुणदोष देखावे दृष्टीं । उद्धवा हे गोष्टी । स्वधर्मराहाटी ते भिन्न ॥ ८२ ॥ निजदोष निरसावयाकारणें । स्वधर्मकर्म आचरणें । तेणें गुणदोष देखणें । तैं नागवी धांवणें तैसें जाहलें ॥ ८३ ॥ साळी पिकावया शेतीं । तृण जाळूनि दाढ करिती । तेथ पिकली साळी जैं जाळिती । तैं तोंडीं माती पडली कीं ॥ ८४ ॥ व्हावया दोषनिवृत्ती । वेदें द्योतिली धर्मप्रवृत्ती । तेणें स्वधर्में जैं दोष देखती । तैं निजप्राप्ती नागवले ॥ ८५ ॥ जेवीं कां सोंगें नटनटी । दाविती हावभाव नाना गोठी । परी तो भाव नाहीं त्यांचे पोटीं । स्वधर्म त्या दृष्टीं करावा ॥ ८६ ॥ न देखोनि दोषगुण । स्वधर्म-मर्यादा नोसंडून । करावें गा स्वधर्माचरण । हें मुख्य लाक्षण कर्मांचें ॥ ८७ ॥ ऐशिया स्वधर्मगती । कर्ममळ निःशेष जाटी । साधकां निजपदप्राप्ती । गुणदोषस्थिती सांडितां ॥ ८८ ॥ गुणदोष देहाचे ठायीं । आत्मा नित्य विदेही । गुणदोष त्याच्या ठायीं । सर्वथा नाहीं उद्धवा ॥ ८९ ॥ साधकें न देखावे दोषगुण । सिद्धासी सहजचि नाहीं जाण । जरी दिसों लागले दोषगुण । तरी आली नागवण दोघांसी ॥ ५९० ॥ साधकाची प्राप्ती बुडे । सिद्धाची सिद्धी तत्काल उडे । एवं गुणदोषांचें सांकडें । दोंहीकडे उद्धवा ॥ ९१ ॥ गुणदोषीं भरली सृष्टी । तेथ न ठेवावी निज-दृष्टी । हे कळवळोनियां पोटीं । श्रीकृष्णें गोष्टी सांगितली ॥ ९२ ॥ गुणदोष विविधभेद । ऐसे आहेत निषिद्ध । तरी कां पां स्वमुखें श्रीगोविंद । बोलिला प्रसिद्ध वेदानुवादें ॥ ९३ ॥ येचि अर्थींचा प्रश्न । पुढें उद्धव करील जाण । तेंचि व्यासाचें निरूपण । विसावा जाण जीवशिवां ॥ ९४ ॥ तेथ सकाम आणि निष्काम भक्त । यांचे अधिकार अभिव्यक्त । स्वयें सांगेल भगवंता । कथा अद्भुत ते आहे ॥ ९५ ॥ संतीं द्यावें अवधान । श्रोतां व्हावें सावधान । एका विनवी जनार्दन । रसाळ निरूपण पुढें आहे ॥ ५९६ ॥ इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे भगवद्उद्धवसंवादे एकाकारटीकायां एकोनविंशोऽध्यायः ॥१९॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४६॥ ओव्या ॥५९६॥
खाली दिलेल्या बँक खात्यात आपण दान करू शकता
संपर्क माहिती :
शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन,
द्वारा, श्री वेणीमाधव गोसावी,
श्रीनाथ गल्ली, श्रीक्षेत्र पैठण, जिल्हा छत्रपती
संभाजीनगर
पिन. ४३१००६
मोबाईल क्रमांक : +९१ - ९४२१४१११३५
ईमेल : info@santeknath.org