Marathi / English

अध्याय २0

॥ श्री एकनाथी भागवत ॥

अध्याय विसावाx

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्‍गुरु चित्समुद्‍रा । मुक्तमोतियांचा तुजमाजीं थारा । ज्ञानवैराग्यशुक्तिद्वारा । सभाग्य नरा तूं देशी ॥ १ ॥ तुझी खोली अमर्याद । माजीं चिद्‍रत्‍नें अतिविविध । देखोनि निजप्रबोधचांद । भरतें अगाध तुज दाटे ॥ २ ॥ उलथल्या स्वानंदभरत्यासी । गुरु‌आज्ञा-मर्यादा नुल्लंघिसी । स्वानंदलहरी चढोवढीसीं । तुजमाजीं अहर्निशीं उसळती ॥ ३ ॥ ब्रह्मविद्या महाबंदर । तेथ निजभक्ति हें तारूं थोर । त्यासी वागवितां तूं कर्णधार । प्रेमाचें साचार चढविशी शीड ॥ ४ ॥ तेथ भक्त संत सज्ञान नर । स्वयें पावविशी परपार । त्यांची मागुती येरझार । सत्य साचार खुंटली ॥ ५ ॥ एक लावूनि कासेसी । भवसागरीं वागविशी । बुडण्याचें भय त्यासी । महाकल्पेंसीं बाधीना ॥ ६ ॥ एक बुडाले भक्तिसमरसीं । ते घातले शेषशयनापाशीं । एक बैसविले अढळतेसी । ते ब्रह्मादिकांसी न ढळती ॥ ७ ॥ तुझ्या सागरत्वाची परी । विजातीय तिळभरी । राहों नेदिसी भीतरीं । हे अगाध थोरी पैं तुझी ॥ ८ ॥ अत्यंतप्रळयीं जैं हा चढे । तैं ’संसार’ हें नांवहि बुडे । वैकुंठकैलासावरता वाढे । मागें पुढें हाचि हा ॥ ९ ॥ ऐशिया सद्‍गुरुसमुद्रोदकीं । एका एकपणें हरीत कीं । भीतरीं पडतां आवश्यकीं । अंगीकारी कीं जनार्दन ॥ १० ॥ तो जनार्दन स्वयें देखा । एकादशाची करी टीका । तेणें अभंगीं घालूनि एका । कवित्व लोकां ऐकवी ॥ ११ ॥ जनार्दना आवडे एक । तो मी एका भेटतांचि देख । निजात्मभावें पडिलें ऐक्य । आपुलें निजसुख भोगवी ॥ १२ ॥ बोलवी निजसुखाचि कथा । त्यासी आपणचि होय श्रोता । मग अर्थाच्या यथार्थतां । समाधानता देतसे ॥ १३ ॥ यापरी गा जनार्दनें । एकादश मर्‍हाटा करणें । नव्हे माझे युक्तिचें बोलणें । हें स्वयें सज्ञानें जाणिजेल ॥ १४ ॥ त्या एकादशाची गतकथा । एकोणिसावा संपतां । गुणदोषांची कांहीं वार्ता । उद्धवासी तत्त्वतां सांगीतली ॥ १५ ॥ गुणदोष जो देखणें । तोचि महादोष जाणणें । गुणदोष स्वयें न देखणें । तो गुण म्यां श्रीकृष्णें मानिजे ॥ १६ ॥ हें ऐकोनि देवाचें उत्तर । उद्धव चमत्कारला थोर । काय गुणदोषांचा विचार । घरोघर लोकीं केला ॥ १७ ॥ तुम्हींच वेदमुखें आपण । प्रकटिलें गुणदोषलक्षण । तें तुमचें वेदवचन । केवीं अमान्य करावें ॥ १८ ॥ ऐसें विधिनिषेधलक्षण । विचारितां तें वेदवचन । कां पां निषेधी श्रीकृष्ण । उद्धव तो प्रश्न स्वयें पुसे ॥ १९ ॥ विसावे अध्यायीं निरूपण । सांगावया गुणदोषलक्षण । भक्ति ज्ञान कर्म जाण । तिन्ही अधिकार भिन्न सांगेल ॥ २० ॥ उद्धव म्हणे हे श्रीकृष्ण । तूं वेदरूपें आपण । बोलिलासी दोषगुण । तें परम प्रमाण आम्ही मानूं ॥ २१ ॥ हा विधि हा निषेध । हें दाविताहे तुझा वेद । तो वेदानुवाद विशद । ऐक प्रसिद्ध सांगेन ॥ २२ ॥ उद्धव उवाच- विधिश्च प्रतिषेधश्च निगमो हीश्वरस्य ते । अवेक्षतेऽरविन्दाक्ष गुणं दोषं च कर्मणाम्‌ ॥ १ ॥ कमलनयना श्रीकृष्णा । विधिनिषेधलक्षणा । दाखवीतसे दोषगुणां । तुझी वेदाज्ञा प्रसिद्ध ॥ २३ ॥ तुझिया वेदाचे वेदविधीं । गुणदोषीं जडली बुद्धी । ते मी सांगेन प्रसिद्धी । कृपानिधी अवधारीं ॥ २४ ॥ वर्णाश्रमविकल्पं च प्रतिलोमानुलोमजम्‌ । द्रव्यदेशवयःकालान्‌ स्वर्गं नरकमेव च ॥ २ ॥ तुझी जे का वेदवाणी । उघडी गुणदोषांची खाणी । अधममध्यमोत्तम मांडणी । वर्णाश्रमपणीं भेद दावी ॥ २५ ॥ द्रव्य विहित अविहित । हेंही वेद असे दावित । देश पुनित अपुनीत । काळही दावीत सुष्टुदुष्टत्वें ॥ २६ ॥ पूर्ववयीं चित्त निश्चिंत । तारुण्यीं तेंचि कामासक्त । वार्धक्यीं तें अतिकुश्चित । तेवीं शुद्धीं उपजवित गुणदोष वेदु ॥ २७ ॥ तुझाचि गा वेद देख । सूचिताहे स्वर्ग नरक । तेणें कर्माचें आवश्यक । साधक बाधक तो दावी ॥ २८ ॥ वर्णाश्रमांमाजील गुज । प्रतिलोमानुलोमज । ऐसे नाना भेदें भोज । वेदेंचि सहजा नाचविजे ॥ २९ ॥ उत्तम वर्णाची जे नारी । हीन वर्णाचा गर्भ धरी । तेचि संतती संसारीं । अभिमान धरी ’प्रतिलोमज’ ॥ ३० ॥ तेचि संतती प्रसिद्ध । सूत वैदेह मागध । ऐशिया नामाचें जें पद । तें जाण शुद्ध प्रतिलोमज ॥ ३१ ॥ हीन वर्णाची जे नारी । उत्तम पुरूषाचा गर्भ धरी । ते ’अनुलोमज’ संसारीं । शास्त्रकारीं बोलिजे ॥ ३२ ॥ अंबष्ट आणि मूर्धावसिक्त । पारशव आणि सात्वत । इत्यादि नांवें जे वर्तत । ते जाण समस्त अनुलोमज ॥ ३३ ॥ ऐसे नाना भेदप्रकार । अविधिविधींचा विचार । वेद प्रकाशितो साचार । गुणदोषां माहेर वेद तुझा ॥ ३४ ॥ गुणदोषभिदादृष्टिमन्तरेण वचस्तव । निःश्रेयसं कथं नॄणां निषेधविधिलक्षणम्‌ ॥ ३ ॥ हे गुण आणि हे दोष । उभयतां वैर लावी देख । तुझा वेद गा आवश्यक । होय प्रकाशक गुणदोषां ॥ ३५ ॥ वैर लावूनि वेदवाणी । वाढवी गुणदोषमांडणी । तेथ मोक्ष पाविजे प्राणी । वेदवचनीं घडे केवीं ॥ ३६ ॥ रा‌ऊळ बोलिलें आपण । जे न देखावे दोषगुण । तूंचि म्हणसी वेद प्रमाण । तैं दोषगुण देखावे ॥ ३७ ॥ एवं ऐकतां तुझें वचन । उभयतां आली नागवण । वेद प्रमाण कीं अप्रमाण । हे समूळ जाण कळेना ॥ ३८ ॥ तुझ्या वचना विश्वासावें । तैं गुणदोषां न देखावें । तुझें वेदवचन मानावें । तैं देखावें गुणदोषां ॥ ३९ ॥ ऐसे तुझेनि बोलें जाण । संशयीं पडले सज्ञान । मा इतर साधारण जन । त्यांची कथा कोण ये ठायीं ॥ ४० ॥ (आशंका) माझें वचन वेदवचन । दोनी एकरूपें म्हणसी प्रमाण । तरी गुणदोषदर्शन । कां पां विलक्षण परस्परें ॥ ४१ ॥ माझें वेदाचें विधिविधान । नव्हतां वेदार्थाचें ज्ञान । म्हणशी मोक्ष न घडे जाण । वेद प्रमाण या हेतू ॥ ४२ ॥ त्या मोक्षामाजीं काय कठिण । सकळ कर्में सांडिता जाण । घरा मोक्ष ये आपण । सहजचि जाण न प्रार्थितां ॥ ४३ ॥ म्हणसी वेदार्थ न कळतां । कर्म करितां कां त्यागितां । कदा मोक्ष न ये हाता । जाण तत्त्वतां निश्चित ॥ ४४ ॥ भासला दोराचा सर्प थोर । तेथ जपतां नाना मंत्रभार । करितां वाजंत्र्यांचा गजर । मारितां तिळभर ढळेना ॥ ४५ ॥ तो सादरें निरीक्षितां जाण । होय त्या सर्पाचें निरसन । तेवीं निर्धारितां वेदवचन । भवभय जाण निरसे ॥ ४६ ॥ भवभयाची निर्मुक्तता । त्या नांव ’मोक्ष’ जाण तत्त्वतां । तो वेदर्थावीण हाता । न ये सर्वथा आणिकें ॥ ४७ ॥ वेदविधान न करितां । कर्म त्यागिलें उद्धततां । तेणें निजमोक्ष न ये हाता । परी पाखंडता अंगीं वाजे ॥ ४८ ॥ विधियुक्त जो कर्मत्यागु । करूनि संन्यास घेतल्या साङ्गु । तैं म्हणसी न पडे वेदपांगु । हाहीं व्यंगु विचारु ॥ ४९ ॥ श्रवणांग संन्यासग्रहण । तेथही असे विधिविधान । गुरुमुखें जें महावाक्य-श्रवण । तोही जाण वेदार्थ ॥ ५० ॥ (आशंका) । करितां देवांपितरांचें यजन । ते हो‌ऊनियां प्रसन्न । मोक्ष देतील आपण । हेंही वेदेंवीण घडेना ॥ ५१ ॥ स्वाहाकारें तृप्त सुर । स्वधाकारें तृप्त पितर । वेदविनियोगेंवीण देवपितर । प्रसन्नाकार कदा नव्हती ॥ ५२ ॥ पितृदेवमनुष्याणां वेदश्चक्षुस्तवेश्वर । श्रेयस्त्वनुपलब्धेऽर्थे साध्यसाधनयोरपि ॥ ४ ॥ नाथिलेंचि चराचर । देव मनुष्य आणि पितर । वेदें प्रकाशूनि साचार । पूज्यत्वें थोर प्रतिपादी ॥ ५३ ॥ त्याहीमाजीं अतिविषम । उत्तम मध्यम आणि अधम । हा त्रिविध भेदसंभ्रम । वेद उपक्रम करूनि दावी ॥ ५४ ॥ यापरी गुणदोषलक्षण । तुवांचि वाढविलें आपण । या नांव म्हणसी मोक्षसाधन । तरी कां गुणदोष निवारिसी ॥ ५५ ॥ ऐशिया निरूपण घडामोडी । तुझेनि बोलें पडे आडी । तेणें गुणदोषांची परवडी । बाधा रोकडी अंगीं वाजे ॥ ५६ ॥ अवघा संसार काल्पनिक । तेथ एक स्वर्ग एक नरक । हा मोक्ष ह अतिबंधक । येणें वेदवादें लोक भ्रमविले तुवां ॥ ५७ ॥ पूर्वीं पुरुषाचे पोटीं । नव्हती गुणदोषांची गोठी । तुझ्या वेदानुवादपरिपाठीं । गुणदोषीं दृष्टी दृढ झाली ॥ ५८ ॥ एवं तुझेनि बोलें जाण । लोकांसी आली नागवण । भोगावया नरक दारुण । भ्रामक जाण वेदोक्ति तुझी ॥ ५९ ॥ गुणदोषभिदादृष्टिर्निगमात्ते न हि स्वतः । निगमे नापवादश्च भिदाया इति ह भ्रमः ॥ ५ ॥ एवं नानागुणदोषदृष्टीं । तुझेनि वेदें वाढविली सृष्टी । स्वतां पुरुषाचे पोटीं । गुणदोषदृष्टि असेना ॥ ६० ॥ तुझ्या वेदानुवादविस्तरें । गुणदोष झाले खरे । ते तुझेनिही बलात्कारें । चित्ताबाहेरें न निघती ॥ ६१ ॥ अनादि वेद प्रमाण । हें तुझें मुख्य वेदवचन । आतां न देखावे दोषगुण । हें नवें वचन मानेना ॥ ६२ ॥ पहिले प्रकाशिले दोषगुण । आतां निवारावया काय कारण । हें न कळतां संपूर्ण । भ्रमित मन होतसे ॥ ६३ ॥ या भ्रमाची भ्रमनिवृत्ती । कृपेनें करावी कृपामूर्ती । ऐकोनि उद्धवाची वचनोक्ती । काय श्रीपती बोलिला ॥ ६४ ॥ ऐकोनि उद्धवाची विनंती । योगत्रयाची उपपत्ती । अधिकारभेदें वेदार्थप्राप्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ ६५ ॥ श्रीभगवानुवाच- योगास्त्रयो मया प्रोक्ता नृणां श्रेयोविधित्सया । ज्ञानं कर्म च भक्तिश्च नोपायोऽन्योऽस्ति कुत्रचित्‌ ॥ ६ ॥ तेथ मेघगंभीरा वाणी । गर्जोनि बोले शार्ङ्गपाणी । माझे परम कृपेवांचूनी । माझी वेदवाणी कळेना ॥ ६६ ॥ वेदशास्त्रार्थे अतिसंपन्न । जरी झाले अतिसज्ञान । परी माझ्या अनुग्रहेंवीण । माझा वेदार्थ जाण कळेना ॥ ६७ ॥ ब्रह्मा चहूं मुखीं वेद पढे । त्यासीही वेदार्थाचें चोखडें । वर्म नातुडेचि धडफुडें । मा इतर बापुडे ते किती ॥ ६८ ॥ ब्रह्मा वेदार्थ आकळिता । तैं शंखासुर वेद कां नेता । ब्रह्मा वेदार्थीं लीन होता । तैं नाभिलाषिता सरस्वती ॥ ६९ ॥ माझा वेदाचा वेद्य निर्धार । तुज मी सांगेन साचार । ऐक उद्धवा सादर । वेदविचार तो ऐसा ॥ ७० ॥ माझ्या वेदासी नाहीं बहु बंड । वृथा न बोले उदंड । ज्ञान-भक्ति-कर्मकांड । वेद त्रिकांड नेमस्त ॥ ७१ ॥ माझिया वेदांची वेदोक्ती । या तिंही योगांतें प्रतिपादिती । या वेगळी उपायस्थिती । नाहीं निश्चितीं उद्धवा ॥ ७२ ॥ कोण ते तिनी योग । कैसे अधिकाराचे भाग । तेही पुसशी जरी चांग । तरी ऐक साङ्ग सांगेन ॥ ७३ ॥ निर्विण्णानां ज्ञानयोगो न्यासिनामिह कर्मसु । तेष्वनिर्विण्णचित्तानां कर्मयोगस्तु कामिनाम्‌ ॥ ७ ॥ जे कां ब्रह्मभुवनपर्यंत । साचार जीवींहूनि विरक्त । जे विधिपूर्वक संकल्पयुक्त । कर्म त्यागित संन्यासी ॥ ७४ ॥ ऐशिया अधिकार्‍यांकारणे । म्यां ’ज्ञानयोग’ प्रकट करणें । जेणें कां निजज्ञानसाधनें । माझी पावणें सायुज्यता ॥ ७५ ॥ आतां जे कां केवळ अविरक्त । विषयालागीं कामासक्त । त्यांलागीं म्यां प्रस्तुत । ’कर्मयोग’ येथ प्रकाशिला ॥ ७६ ॥ उंच नीच अधिकारी देख । दोनी सांगितले सविशेख । आतां तिसरा अधिकारी अतिचोख । अलोलिक अवधारीं ॥ ७७ ॥ यदृच्छया मत्कथादौ जातश्रद्धस्तु यः पुमान्‌ । न निर्विण्णो नातिसक्तो भक्तियोगोऽस्य सिद्धिदः ॥ ८ ॥ हरिकथा अवघेचि ऐकती । परी माझी श्रद्धा नुपजे चित्तीं । कोणा एका अभिनवगती । श्रद्धा‌उत्पत्ती श्रवणेंचि होय ॥ ७८ ॥ आ‌ईक श्रद्धेचें लक्षण । जें जें करी कथाश्रवण । तें हृदयीं वाढे अनुसंधान । सप्रेम मनन उल्हासे ॥ ७९ ॥ नवल कथेची आवडी । दाटती हरिखाचिया कोडी । हृदयीं स्वानंदाची उभवी गुढी । एवढी गोडी श्रवणार्थीं ॥ ८० ॥ विषयांचें दोषदर्शन । मुख्यत्वें बाधक स्त्री आणि धन । आवरावीं रसना-शिश्न । हे आठवण अहर्निशीं ॥ ८१ ॥ घायीं आडकलें फळें । तें पानपेना उपचारबळें । तेवीं विषयदोष भोगमेळें । कदाकाळें शमेना ॥ ८२ ॥ येतां देखोनियां मरण । स्वयें होय कंपायमान । तेवीं विषयभोगदर्शन । देखोनि आपण चळीं कांपे ॥ ८३ ॥ एवं विषयीं दोषदर्शन । सर्वदा देखे आपण । परी त्यागालागीं जाण । सामर्थ्य पूर्ण आथीना ॥ ८४ ॥ सेवकीं राजा बंदीं धरिला । तया स्त्रीचंदनादि भोग दीधला । परी तो त्यासी विषप्राय जाहला । भोगीं उबगला अगत्यता ॥ ८५ ॥ एवं भोगितां त्या भोगासी । नित्य पाहे निजनिर्गमासी । तेवीं भोगितां हा विषयासी । अहर्निशीं अनुतापी ॥ ८६ ॥ यापरी जो नव्हे विषयासक्त । ना निधडा नव्हे विरक्त । त्यालागीं माझा भक्तिपंथ । मी बोलिलों निश्चित वेदवाक्यें ॥ ८७ ॥ येहींकरितां माझी भक्ती । माझ्या स्वरूपीं लागे प्रीती । सहजें होय विषयविरक्ती । एवं सिद्धिदाती भक्ति हे माझी ॥ ८८ ॥ मी वेदोक्त बोलिलों आपण । ते हे त्रिविध योग संपूर्ण । ज्ञान-कर्म-उपासन । वेदोक्त लक्षणविभाग ॥ ८९ ॥ तेथ कोण देखे दोषगुण । कोणासी दोंहीचें अदर्शन । मध्यम भागें वर्ते कोण । तेंही लक्षण अवधारीं ॥ ९० ॥ जो आसक्त विषयांवरी । तो कर्ममार्गींचा अधिकारी । त्यासी गुणदोषांहातीं नाही उरी । हें सांगेल श्रीहरि पुढिले अध्यायीं ॥ ९१ ॥ जो कां विरक्त ज्ञानाधिकारी । तो गुणदोषांहूनि बाहेरी । तो पाहतां अवघे संसारीं । न देखे तिळभरी गुणदोष ॥ ९२ ॥ जग अवघें ब्रह्म पूर्ण । तेथ कैंचे दोषगुण । ऐसे कां जे ज्ञानसंपन्न । त्यां दोषदर्शन असेना ॥ ९३ ॥ अति‌आसक्त ना विरक्त । ऐसे कां जे माझे भक्त । ते पूर्वीं गुणदोष देखत । परी सांडित विवेकें ॥ ९४ ॥ भूतीं भूतात्मा मी परेश । तेथ देखों नये गुणदोष । ऐसे भजननिष्ठ राजहंस । ते गुणदोष सांडिती ॥ ९५ ॥ मी वेदार्थीं बोलिलों दोषगुण । ते दोषत्यागालागीं जाण । पराचे देखावे दोषगुण । हें वेदवचन असेना ॥ ९६ ॥ ऐसे करावें वेदार्थश्रवण । दोष त्यजूनि घ्यावा गुण । परी पुढिलांचे दोषगुण । सर्वथा आपण न देखावे ॥ ९७ ॥ जो ज्याचा गुणदोष पाहे । तो त्याचा पापविभागी होये । जे पुढिलांचे गुणदोष गाये । निरया जाये तेणें दोषें ॥ ९८ ॥ आतां कर्माचा अधिकारु । सांगताहे शारंगधरु । तो जाणोनियां विचारु । कर्मादरु करावा ॥ ९९ ॥ तावत्कर्माणि कुर्वीत न निर्विद्येत यावता । मत्कथाश्रवणादौ वा श्रद्धा यावन्न जायते ॥ ९ ॥ तंवचि करावा कर्मादर । जंव विरक्ति नुपजे साचार । ठाकल्या विरक्तीचें घर । स्वर्ग संसार मळप्राय ॥ १०० ॥ हो कां वमिलिया मिष्टान्ना । परतोनि श्रद्धा न धरी रसना । तेवीं विषयभोगीं जाणा । साचार मना चिळशी उपजे ॥ १ ॥ तेथ कर्माची परिपाठी । समूळ खूंटली गा गोठी । कां दैवयोगें उल्हासु पोटीं । माझ्या कथेचा उठी श्रवणादरु ॥ २ ॥ करितां माझी कथा श्रवण । प्रेमें वोसंडे अंतःकरण । विसरे देहगेहांची आठवण । तेथें प्रत्यवाय जाण बाधीना ॥ ३ ॥ जैसें माझे कथेचें श्रवण । तैसेंचि माझे हृदयीं स्मरण । तेथें प्रत्यवाय न रिघे जाण । येथून बोळवण त्याची झाली ॥ ४ ॥ करितां मत्कथाश्रवण । लोपल्या कोटिकर्माचरण । प्रत्यवाय न बाधी जाण । हा प्रताप पूर्ण मत्कथेचा ॥ ५ ॥ (संमतिश्लोक) मत्कर्म कुर्वतां पुसां कर्मलोपो भवेद्यदि । तत्कर्म तेषां कुर्वन्ति तिस्त्रः कोट्यो महर्षयः ॥ १ ॥ (अर्थ) माझी करितां सप्रेम भक्ती । भक्तांचीं नित्यकर्में जैं राहती । तेतीस कोटी ऋषिमहंतीं । संपूर्ण करिती कर्में त्यांचीं ॥ ६ ॥ एवढें मत्कथेचें महिमान । माझें करितां कीर्तन पूजन । तेथें प्रत्यवायाचें तोंड कोण । संमुख वदन दावूं न शके ॥ ७ ॥ हो कां पूर्ण विरक्त नर । कां माझे सेवेसी जो तत्पर । तेथ कर्म बापुडें किंकर । हें स्वयें श्रीधर बोलिला ॥ ८ ॥ कर्में करितां स्वधर्मस्थितीं । उद्धवा आहे माझी प्राप्ती । ते मी सांगेन तुजप्रती । यथानिगुती अवधारीं ॥ ९ ॥ स्वधर्मस्थो यजन्यज्ञैरनाशीः काम उद्धव । न याति स्वर्गनरकौ यद्यन्यत्र समाचरेत्‌ ॥ १० ॥ गृहस्थाश्रमी स्वधर्मस्थिती । जरी विचरेना ’अन्यगती’ । तरी येथेंचि लाहे विरक्ति । सुनिश्चितीं उद्धवा ॥ ११० ॥ अन्यगतींचें विचरण । तें तूं म्हणशील कोण । ऐक त्याचेंही लक्षण । समूळ खूण सांगेन ॥ ११ ॥ परद्रव्य-परदारा-रती । परापवादाची वंदती । ही नांव गा ’नारकी गती’ । जाण निश्चितीं उद्धवा ॥ १२ ॥ दिविभोगाचेनि श्रवणें । ज्याच्या मनाचें बैसे धरणें । कर्में तदनुकूल करणें । तैं स्वर्गा भोगणें अलोट ॥ १३ ॥ या जाण दोन्ही ’अन्यगती’ । यांतूनि काढूनियां वृत्ती । यज्ञादिकीं मज यजिती । तैं नैराश्यस्थिती नित्यनैमित्यें ॥ १४ ॥ तैं न पडे स्वर्गीचें पेणें । न घडे नरकासी जाणें । येचि लोकीं विरक्त होणें । तेंचि बोलणें हरि बोले ॥ १५ ॥ अस्मिंल्लोके वर्तमानः स्वधर्मस्थोऽनघः शुचिः । ज्ञान विशुद्धमाप्नोति मद्‍भक्तिं वा यदृच्छया ॥ ११ ॥ असतां ये लोकीं वर्तमान । ऐसें करितां स्वधर्माचरण । होय पुण्यपापांचें निर्दळण । निर्मळत्वें जाण तो अतिपवित्र ॥ १६ ॥ तेथ निरसोनि भवभान । प्रकाशे माझें शुद्ध ज्ञान । कां सप्रेम माझें भजन । ’पराभक्ति’ जाण तो लाहे ॥ १७ ॥ जे भक्तीमाजीं मी आपण । सदा होय भक्ता‌अधीन । तेथ मोक्षासहित ज्ञान । ये‌ऊनि आपण पायां लागे ॥ १८ ॥ ऐक ज्ञानाचा परिपाक । संसारा नांव ’महादुःख’ । मोक्ष तो म्हणे ’परमसुख’ । मद्‍भक्त देख दोनी न मानी ॥ १९ ॥ सप्रेम करितां माझें भजन । नाठवे भवभयबंधन । तेथ मोक्षासी पुसे कोण । मद्‍भक्तां भक्तिचा पूर्ण उल्हास ॥ १२० ॥ ज्यातें म्हणती ’महादुःख’ । तें भक्तांसी भगवद्‌रूप देख । ज्यातें म्हणती ’परमसुख’ । तेंही आवश्यक भगवंत ॥ २१ ॥ यापरी भक्त माझ्या भजनीं । विसरला सुखदुःखें दोनी । मी एकु भगवंतूवांचूनी । आन त्रिभुवनीं देखेना ॥ २२ ॥ ऐशी माझी भक्ति पूर्ण । साधूनि आणितां न ये जाण । जैं मी भगवंत होय प्रसन्न । तैं यदृच्छा जाण हे भक्ति लाभे ॥ २३ ॥ मी कैसेनि होय प्रसन्न । ऐसें कल्पील तुझें मन । तेथ नरदेह गा कारण । माझे प्रसन्नपण व्हावया ॥ २४ ॥ स्वर्गिणोऽप्येतमिच्छन्ति लोकं निरयिणस्तथा । साधकं ज्ञानभक्तिभ्यामुभयं तदसाधकम्‌ ॥ १२ ॥ ज्यांसी स्वर्गभोगाची अति गोडी । जिंहीं अमरत्वाची उभविली गुढी । जे पडले स्वर्गाचे बांदवडीं । ते वांछिती आवडीं नरदेहातें ॥ २५ ॥ नरकयातना महाघोर । जिंहीं भोगिला भोग थोर । ते मनुष्यदेहातें नर । अतिसादर वांछिती ॥ २६ ॥ नरदेह परम पावन । जो भक्तिज्ञानाचें आयतन । जेणें साधे ब्रह्मज्ञान । तो धन्य धन्य नरदेह ॥ २७ ॥ जेणें नरदेहें जाण । निःशेष खुंटे जन्ममरण । जेणें जीव पावे समाधान । स्वानंदघन स्वयें होय ॥ २८ ॥ ज्या नरदेहाचे संगतीं । होय अविद्येची निवृत्ती । लाभे भगवत्पदप्राप्ती । हे विख्यात ख्याती नरदेहीं ॥ २९ ॥ ज्या नरदेहाची प्राप्ती । प्राणिमात्र वांछिती । प्राणी बापुडे ते किती । स्वयें प्रजापती नरदेह वांछि ॥ १३० ॥ ऐसें नरदेहाचें श्रेष्ठपण । येथ साधे भक्तिविज्ञान । परी भक्तिज्ञानास्तव जाण । मनुष्यपण साधेना ॥ ३१ ॥ न नरः स्वर्गतिं काङ्क्षेन्नारकीं वा विचक्षणः । नेमं लोकं च काङ्क्षेत देहावेशात्प्रमाद्यति ॥ १३ ॥ झालिया नरदेहाची प्राप्ती । अधर्में होय नरकागती । कां संचितां पुण्यसंपत्ती । तेणें स्वर्गप्राप्ती अनिवार ॥ ३२ ॥ स्वर्गे होय पुनरावृत्ती । नरकीं घोर दुःखप्राप्ती । म्हणूनि दोंहीचीही प्रीती । नरदेहीं आसक्ती धरूं म्हणती ॥ ३३ ॥ मनुष्यदेहाची आवडी । तेचि देहबुद्धि रोकडी । जेथ कामक्रोधांची जोडी । प्रसाद कोडी क्षणक्षणां ॥ ३४ ॥ स्वर्ग नरक इहलोक । यांची प्रीती सांडूनि देख । साधावें गा आवश्यक । ज्ञान चोख कां निजभक्ती ॥ ३५ ॥ ज्ञान साधावयालागीं जाण । कष्टावें न लगे गा आपण । सप्रेम करितां माझें भजन । दवडितां ज्ञान घर रिघे ॥ ३६ ॥ गव्हांची राशी जोडल्या हातीं । सकळ पक्कान्नें त्याचीं होतीं । तेवीं आतुडल्या माझी भक्ती । ज्ञानसंपत्ती घर रिघे ॥ ३७ ॥ द्रव्य झालिया आपुले हातीं । सकळ पदार्थ घरास येती । तेवीं जोडल्या माझी भक्ती । भुक्तिमुक्ति होती दासी ॥ ३८ ॥ म्हणती करितां भगवद्‍भक्ती । विघ्नें छळावया आड येती । तेथें मी सुदर्शन घे‌ऊन हातीं । राखें अहोरातीं निजभक्तां ॥ ३९ ॥ पक्ष्याचेनि नामोच्चारें । म्यां वेश्या तारिली चमत्कारें । पाडूनि विघ्नांचें दातौरें । म्यां व्यभिचारें उद्धरिली ॥ १४० ॥ यालागीं नरदेह पावोन । जो करी माझें भजन । तोचि संसारीं धन्य धन्य । उद्धवा जाण त्रिशुद्धी ॥ ४१ ॥ भावें करितां माझे भक्तीसी । भाविका उद्धरीं मी हृषीकेशी । जे चढले ज्ञानाभिमानासी । ते म्यां यमासी निरविले ॥ ४२ ॥ साधितां माझी भक्ति कां ज्ञान । ज्यासी चढे ज्ञानाभिमान । तो म्यां आपुलेनि हातें जाण । दीधला आंदण महादोषां ॥ ४३ ॥ उद्धवा तूं ऐसें म्हणशी । ’ते कां दीधले यमहातेशी’ । तो जाचूनियां महादोषियांसी । ज्ञानाभिमानासी सांडवी ॥ ४४ ॥ यालागीं सांडूनि देहाभिमान । भावें करितां माझें भजन । पूर्वील साधु सज्ञान । नरदेहें जाण मज पावले ॥ ४५ ॥ एतद्विद्वान्पुरा मृत्योरभवाय घटेत सः । अप्रमत्त इदं ज्ञात्वा मर्त्यमप्यर्थसिद्धिदम्‌ ॥ १४ ॥ केवल अस्थि चर्म मूत्र मळ । पाहतां देहो अतिकश्मळ । परी ब्रह्म परिपूर्ण निश्चळ । हें निर्मळ फळ येणें साधे ॥ ४६ ॥ ऐसे नरदेहांचे कारण । जाणोनि पूर्वील सज्ञान । सांडोनियां देहाभिमान । ब्रह्मसमाधान पावले ॥ ४७ ॥ देह निंद्य म्हणोनि सांडावा । तरी एवढा लाभ हारवावा । वंद्य म्हणोनि प्रतिपाळावा । तैं ने‌ईल रौरवा निश्चित ॥ ४८ ॥ देह सांडवा न मांडावा । येणें परमार्थचि साधावा । तें सावधान ऐक उद्धवा । गुप्त निजठेवा सांगेन ॥ ४९ ॥ जेणें देहें वाढे भवभावो । तेणेंचि देहेंकरीं पहा हो । होय संसाराचा अभावो । अहंभावो सांडितां ॥ १५० ॥ सांडावया देहाभिमान । पूर्वील साधु सज्ञान । हो‌ऊनि नित्य सावधान । ब्रह्मसंपन्न मद्‌रूपें ॥ ५१ ॥ नरदेहें ब्रह्मप्राप्ती । ऐसें मानूनि निश्चितीं । म्हणसी विषयभोगांचे अंतीं । ब्रह्मस्थिती साधीन ॥ ५२ ॥ ऐसें निश्वासतां आपण । रोकडी आली नागवण । देहासवें लागलें मरण । हरिहरां जाण टळेना ॥ ५३ ॥ एवं देहाचें अनिवार्य मरण । तें केव्हां ये‌ईल न कळे जाण । यालागीं पूर्वीच आपण । निजस्वार्थ जाण साधावा ॥ ५४ ॥ धरितां निजदेहाची गोडी । अवचितां आदळे यमधाडी । बुडे निजस्वार्थाची जोडी । तें निजनिवाडीं हरि सांगे ॥ ५५ ॥ छिद्यमानं यमैरेतैः कृतनीडं वनस्पतिम्‌ । खगः स्वकेतमुत्सृज्य क्षेमं यति ह्यलम्पट: ॥ १५ ॥ जेवीं कां वृक्षाचे अग्रीं नीड । पक्षी करूनि वसे अतिगूढ । तळीं त्याचि वृक्षाचें बूड । छेदिती सदृढ निर्दय नर ॥ ५६ ॥ तें देखोनि वृक्षच्छेदन । पक्ष्यें सांडोनि गृहाभिमान । पळाल्या पाविजे कल्याण । राहतां मरण अचूक ॥ ५७ ॥ त्या वृक्षाचिया ऐसें जाण । देहासवें लागलें मरण । तेथें जीवासी राहतां जाण । दुःख दारुण अनिवार ॥ ५८ ॥ अहोरात्रैश्छिद्यमानं बुद्धाऽऽयुर्भयवेपथुः । मुक्तसङ्गः परं बुद्ध्वा निरीह उपशाम्यति ॥ १६ ॥ अहोरात्र आयुष्यभंग । कळिकाळाचा सवेग वेग । हा जाण नीच नवा रोग । अंगीं साङ्ग लागला ॥ ५९ ॥ काळें काळ वयसा खातु । हा देखोनि आयुष्याचा घातु । जाणोनि नरदेहाचा पातु । होय अनासक्तु देहगेहां ॥ १६० ॥ जाणोनि देहाचें क्षणिकपण । त्यागावया देहाभिमान । साधावया भक्तिज्ञान । अतिसावधान जो होय ॥ ६१ ॥ न सांडितां देहाभिमान । अंगीं आदळे मरण । तेणें भयें कंपायमान । वैराग्य पूर्ण स्वयें धरी ॥ ६२ ॥ वैराग्ययुक्त करितां भक्ति । होय देहाभिमानाची निवृत्ती । तैं घर रिघे ज्ञानसंपत्ती । पायां लागती मुक्ती चारी ॥ ६३ ॥ ऐशी झालिया निजात्मप्राप्ती । सहजेंचि राहे प्रवृत्ती । निवृत्तीसी होय निवृत्ती । संसाराची शांती स्वयें होय ॥ ६४ ॥ ऐसे नरदेहा ये‌ऊनि देख । पुरुष पावले ’परमसुख’ । हें न साधिती जे मूर्ख । त्यांसी देवो देख निंदित ॥ ६५ ॥ नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम्‌ । मयानुकूलेन नभस्वतेरितं पुमान्‌ भवाब्धिं न तरेत्स आत्महा ॥ १७ ॥ चौर्‍यायशीं लक्ष जीवयोनी । त्यांत मनुष्यदेहावांचूनी । अधिकारी ब्रह्मज्ञानीं । आन कोणी असेना ॥ ६६ ॥ जेणें देहें होय माझी प्राप्ती । यालागीं ’आद्य देहो’ यातें म्हणती । याची दुर्लभ गा अवाप्ती । भाग्यें पावती नरदेह ॥ ६७ ॥ ’सदृढ’ म्हणजे अव्यंग । ’अविकळ’ म्हणजे सकळ भाग । नव्हे बहिरे मुके अंध पंग । सर्वांगें साङ्ग संपूर्ण ॥ ६८ ॥ भरतखंडीं नरदेहप्राप्ती । हे परम भाग्याची संपत्ती । तेथही विवेकु परमार्थी । त्याचा वशवर्ती मी परमात्मा ॥ ६९ ॥ मी परमात्मा जेथ वशवर्ती । तेथ सुरनरांचा केवा किती । परी हा देह न लभे पुढती । दुर्लभ प्राप्ती नरदेहा ॥ १७० ॥ जोखितां पुण्यपाप समान । तैं नरदेहाची प्राप्ती जाण । तें पुढती पावावया आपण । जोखूनि कर्माचरण कोणी न करी ॥ ७१ ॥ पुण्य झालिया अधिक । स्वर्ग भोगणें आवश्यक । पापाचें वाढल्या तुक । भोगावे नरक अनिवार ॥ ७२ ॥ ऐशी कर्माची गति गहन । एथ काकतालीयन्यायें जाण । अचवटें लाभे माणुसपण । भवाब्धितारण महातारूं ॥ ७३ ॥ ’सुलभ’ म्हणिजे अविकळ । ’सुकल्प’ म्हणिजे विवेकशीळ । यासी वागविता केवळ । नावाडा अति कुशळ गुरु कर्णधार ॥ ७४ ॥ कानीं निजगुज उपदेशिता । यालागीं गुरु ’कर्णधार’ म्हणती तत्त्वतां । कानीं धरितांचि उद्धरी भक्तां । यालागीं सर्वथा गुरु कर्णधार ॥ ७५ ॥ भवाब्धीमाजीं नरदेह तारूं । तेथ सद्‍गुरु तोचि कर्णधारु । त्यासी अनुकूल वायु मी श्रीधरु । भवाब्धिपरपारु पावावया ॥ ७६ ॥ कैसा गुरु कर्णधार कुशळ । आवर्त खळाळ आंदोळ । चुकवूनि विकल्पाचे कल्लोळ । साम्यें पाणिढाळ सवेग काढी ॥ ७७ ॥ लावूनि विवेकाचें आवलें । तोडिती कर्माकर्मांचीं जळें । भजनशिडाचेनि बळें । नाव चाले सवेग ॥ ७८ ॥ कामक्रोधादि महामासे । तळपती घ्यावया आमिषें । त्या घालूनि शांतिचेनि पाशें । तारूं उल्हासें चालवी ॥ ७९ ॥ ठाकतां सारूप्यादि बंदरें । तारुवामाजीं अतिगजरें । लागलीं अनुहाताचीं तुरें । जयजयकारें गर्जती ॥ १८० ॥ नेतां सलोकतेचे पेंठे । तारूं उलथेल अवचटें । लावितां समीपतेचे वाटे । तारूं दाटे दोंही सवां ॥ ८१ ॥ करावें सरूपतेमाजीं स्थिरु । तंव तो दाटणीचा उतारु । ऐसा जाणोनियां निर्धारु । लोटिलें तारूं सायुज्यामाजीं ॥ ८२ ॥ ते धार्मिकाची धर्मपेंठ । नाहीं सुखसारा खटपट । वस्तु अवघीच चोखट । घ्यावी एकवट संवसाटी ॥ ८३ ॥ ऐसें दुर्लभ नरदेहाचें तारूं । जेथ मी श्रीगुरुरूपें कर्णधारु । येणें न तरेच जो संसारु । तो जाणावा नरु आत्महंता ॥ ८४ ॥ नरदेह वेंचिलें विषयांसाठीं । पुढें नरक भोगावया कल्पकोटी । तरी आपुलेनि हातें निजपोटीं । शस्त्र दाटी स्वयें जेवीं ॥ ८५ ॥ परपारा अवश्य आहे जाणें । तेणें नाव फोडूनि भाजिजे चणें । कां पांघरुणें जाळूनि तापणें । हिंवाभेणें सुज्ञांनीं ॥ ८६ ॥ तैसें येथ झाले गा साचार । थित्या नरदेहा नागवले नर । पुढां दुःखाचे डोंगर । अतिदुस्तर वोढवले ॥ ८७ ॥ सकळ योनीं विषयासक्ती । सर्वांसी आहे निश्चितीं । नरदेहीं तैशीच विषयस्थिती । तैं तोंडीं माती पडली कीं ॥ ८८ ॥ पावोनि श्रेष्ठ नरशरीर । जो नुतरेचि संसारपार । तो आत्महत्यारा नर । सत्य साचार उद्धवा ॥ ८९ ॥ कोटी ब्रह्महत्या-गोहत्यांसी । प्रायश्चित्त आहे शास्त्रार्थेंसीं । परी आत्महत्या घडे ज्यासी । प्रायश्चित त्यासी असेना ॥ १९० ॥ जो आत्महत्या करूनि निमाला । तो मरतांचि नरकासी गेला । प्रायश्चित्तासी कोण आहे उरला । मा शस्त्रार्थें बोला बोलावें ॥ ९१ ॥ अमृत विकूनि कांजी प्याला । तैसा नरदेहीं भोगु भोगविला । हा थोर नाड जीवासी झाला । विसरोनि आपुला निजस्वार्थ ॥ ९२ ॥ लाहोनि उत्तम शरीर । व्यर्थ विषयासक्तीं नर । नरकीं बुडाले अपार । हें शारङ्गधर बोलिला ॥ ९३ ॥ असोत या मूर्खांचिया गोठी । ऐक उत्तमांची हातवटी । जे वेदार्थपरिपाठीं । निजहितदृष्टी सावध ॥ ९४ ॥ अतिविरक्त जे स्वभावें । तिंहीं काय कर्तव्य करावें । कोणा अर्थातें त्यजावें । तेंचि देवें सांगिजे ॥ ९५ ॥ यदाऽऽरम्भेषु निर्विण्णो विरक्तः संयतेंद्रियः । अभ्यासेनात्मनो योगी धारयेदचलं मनः ॥ १८ ॥ जो कर्मारंभींच विरक्त । फळाशा नातळे ज्याचें चित्त । मज निजमोक्ष व्हावा येथ । हेंही पोटांत स्मरेना ॥ ९६ ॥ खडतर वैराग्याची दृष्टी । इंद्रियांसी विषयांची गोष्टी । करूंचि नेदी महाहटी । धारणा नेहटीं दृढ राखे ॥ ९७ ॥ करूनियां श्रवण मनन । माझ्या स्वरूपाचें अनुसंधान । अखंड करी निदिध्यासन । तिळभरी मन ढळों नेदी ॥ ९८ ॥ धरोनि धारणेचें बळ । स्वरूपीं मन अचंचळ । अणुभरी हो‌ऊं नेदी विकळ । राखे निश्चळ निजबोधें ॥ ९९ ॥ एकाकी मन पाहें । स्वरूपीं कैसें निश्चळ होये । त्या अभ्यासाचे उपाये । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण ॥ २०० ॥ धार्यमाणं मनो यर्हि भ्राम्यदाश्वनवस्थितम्‌ । अतंद्रितोऽनुरोधेन मार्गेणात्मशं नयेत्‌ ॥ १९ ॥ स्वरूपीं लावितां अनुसंधान । जरी निश्चळ नव्हे मन । न सांडी आपुला गुण । चंचळपणा स्वभावे ॥ १ ॥ साधक आळसें विकळे । कां आठवी विषयसोहळे । तैं स्वरूपींहूनि मन पळे । निज चंचळे स्वभावें ॥ २ ॥ तेथें नेहटूनि आसन । स्वयें हो‌ऊनि सावधान । स्मरोनि सद्‍गुरुचे चरण । स्वरूपीं मन राखावें ॥ ३ ॥ नेदीतां विषयदान । हटावलें क्षोभे मन । तरी न सांडोनि अनुसंधान । द्यावें अन्नपान विधानोक्त ॥ ४ ॥ (आशंका) ॥ ’सर्पा पाजिलें पीयूष । तेंचि परतोनि होय विष । तेवीं मनासी देतां विषयसुख । अधिक देख खवळेल’ ॥ ५ ॥ तरी ऐसें द्यावें विषयदान । जेणें आकळलें राहे मन । तेचि अर्थींचें निरूपण । स्वयें नारायण सांगता ॥ ६ ॥ मनोगतिं न विसृजेज्जितप्राणो जितेंद्रियः । सत्त्वसंपन्नया बुद्धया मन आत्मवशं नयेत्‌ ॥ २० ॥ मोकळें न सोडून मन । न सोडुनि अनुसंधान । करावें अन्नपानशयन । हें विषयदान निजहिता ॥ ७ ॥ साधकें सधूनि आपण । जरी जिंतिले इंद्रियप्राण । तरी मोकळें सोडूं नये मन । स्वरूपीं नेहटून राखावें ॥ ८ ॥ जो मनासी विश्वासला । तो कामक्रोधीं नागवला । संकल्पविकल्पीं लुटिला । विसंचिला महामोहे ॥ ९ ॥ जाणोनि मनाचें महाबळ । त्यासी विवेक द्यावा मोकळ । तो हालों नेदी केवळ । करी निश्चळ निजांगें ॥ २१० ॥ मनाविवेकाचे उभयसंधीं । सत्त्वसंपन्न होय बुद्धी । ते विषयांचे कंद छेदी । तोडी उपाधी सविकार ॥ ११ ॥ मन जेथ जेथ पळोनि जाये । तेथ तेथ विवेक उभा राहे । मग सत्त्वबुद्धीचेनि साह्यें । मोडी पाये मनाचे ॥ १२ ॥ ऐसें मनाचें खुंटलिया बळ । मग स्वरूपीं होय निश्चळ । जेवीं जळगार केवळ । ठाके गंगाजळ वस्तीसी ॥ १३ ॥ यापरी स्वरूपीं मन । स्वयें पावे समाधान । तेचि योग परम पावन । समाधान जीवशिवां ॥ १४ ॥ जीवपरमात्म्याची एकात्मता । तोच ’परमयोग’ तत्त्वतां । येचिविखींची कथा । अश्वदृष्टांता हरि सांगे ॥ १५ ॥ एष वै परमो योगो मनसः संग्रहः स्मृतः । ह्रदयज्ञत्वमन्विच्छन्‌ दम्भस्येवार्वतो मुहुः ॥ २१ ॥ जैसा वारु उपलाणी । वश्य करी अश्वसाहणी । मागें तरटांचा कर झणाणी । पुढें राखे नेहटुनी रागबागा ॥ १६ ॥ तेथ जें जें पा‌ऊल वोजा करी । तेथ मान दे जीजीकारीं । जेथ फुटोनि पडे बाहेरी । तेथ तरट मारी सवर्म ॥ १७ ॥ जेथ हटावला न सांडी खोडी । ते ठायीं दे मोकळवाडी । परी निःशेष पीडी ना सोडी । ऐसा पडिपाडीं राखत ॥ १८ ॥ दमनीं देखोनि अत्यादरु । स्वामीहृदय जाणे वारु । आणि वारुवाचें अभ्यंतरु । कळे साचारु स्वामीसी ॥ १९ ॥ ऐसें उभयहृदय ऐक्ययोगें । वारू न धरितां रागबागें । अडणें उडणें सांडी वेगें । मग नाचों लागे मोकळा ॥ २२० ॥ ऐसें वश्य केलिया अश्वातें । मग कर्त्याचिया मनोगतें । वारू नाचे काचेनि सुतें । यापरी मनातें दमावें ॥ २१ ॥ मनोजयो कीजे आपण । तोचि ’परमयोग’-कारण । हेंचि मागिले श्लोकीं निरूपण । तुज म्यां संपूर्ण सांगितलें ॥ २२ ॥ ’नृदेहमाद्यं’ या श्लोकाचे अंतीं । कर्मवैराग्यद्वारा मुक्ती । आतां सांगितली हे स्थिती । उत्तमगतीं अभ्यासें ॥ २३ ॥ मुख्यतः सांख्ययोगें माझी प्राप्ती । तें मी सांगेन तुजप्रती । मिथ्या संसाराची स्फुर्ती । ब्रह्मसंविती साचार ॥ २४ ॥ हें ज्ञानगहन निरूपण । तुज मी सांगेन गुह्य ज्ञान । जें असोनि त्रिगुणीं वर्तमान । अलिप्त जाण गुणकार्या ॥ २५ ॥ ’तुज मी सांगेन गुह्य ज्ञान’ । हें ऐकोनि देवाचें वचन । उद्धव स्वयेंचि झाला कान । अतिसावधान श्रवणार्थीं ॥ २६ ॥ देखोनि उद्धवाचा अत्यादरु । आर्तचित्तचकोरचंद्रु । निजज्ञानगुणसमुद्रु । काय यादवेंद्रु बोलिला ॥ २७ ॥ सांख्येन सर्वभावानां प्रतिलोमानुलोमतः । भवाप्ययावनुध्यायेन्मनो यावत्प्रसीदति ॥ २२ ॥ जें सृष्टिपूर्वीं अलिप्त । तेंचि सृष्टि‌उदयीं सृष्टि‌आंत । महत्तत्त्वादि देहपर्यंत । तत्त्वीं अनुगत तेचि वस्तु ॥ २८ ॥ आणि सृष्टीच्या स्थितिविशेषीं । गुणकार्यातें तेंचि प्रकाशी । शेखीं गुणकार्यातें तेंचि ग्रासी । उरे अवशेषीं ते वस्तु ॥ २९ ॥ नग न घडतां सोनेंचि साचें । नग घडवितां सोनेंपण न वचे । नग मोडितां सोन्याचे । घडामोडीचें भय नाहीं ॥ २३० ॥ मेघापूर्वीं शुद्ध गगन । मेघा सबाह्य गगन जाण । मेघ विराल्या गगनीं गगन । अलिप्त जाण संचलें ॥ ३१ ॥ तेवीं उत्पत्तिस्थितिप्रळयांतीं । वस्तु संचली अलिप्तस्थितीं । तेहीविखींची उपपत्ती । उद्धवा तुजप्रती सांगेन ॥ ३२ ॥ कुलाल जें जें भांडें घडित । त्यासी मृत्तिका नित्य व्याप्त । तेवीं जें जें तत्त्व उपजत । तें तें व्यापिजेत वस्तूनें ॥ ३३ ॥ सागरीं जे जे उपजे लहरी । तिसी जळचि सबाह्यांतरीं । तेवीं महत्तत्त्वादी देहवरी । सबाह्याभ्यंतरीं चिन्मात्र ॥ ३४ ॥ हो कां जो जो पदार्थ निफजे । तो आकाशें व्यापिजे सहजें । तेवीं जें जें तत्त्व उपजे । तें तें व्यापीजे चैतन्यें ॥ ३५ ॥ अनुलोमें पाहतां यापरी । वस्तूवेगळें तिळभरी । कांहीं न दिसे बाहेरी । निजनिर्धारीं विचारितां ॥ ३६ ॥ पृथ्वीपासूनि प्रकृतीवरी । लयो पाहतां प्रतिलोमेंकरीं । जेवीं जळगारा जळाभीतरीं । तेवीं लयो चिन्मात्रीं तत्त्वांचा ॥ ३७ ॥ प्रकृत्यादि तत्त्वें प्रबळलीं । विकरोनि लया गेलीं । वस्तु अलिप्तपणें संचली । नाहीं माखली अणुमात्र ॥ ३८ ॥ एवं उत्पत्तिस्थितिप्रळयांत । वस्तु अविनाशी अलिप्त । नित्य शुद्ध बुद्ध मुक्त । जाण निश्चित उद्धवा ॥ ३९ ॥ ऐशा वस्तूच्या ठायीं भवजल्प । तो जाण पां मिथ्या आरोप । जेवीं दोरा‌अंगीं सर्प । वृथा भयकंप भ्रांतासी ॥ २४० ॥ सर्प दवडोनि दोर शुद्ध । करावा ऐसा नाहीं बाध । एकला एक परमानंद । ऐसें गोविंद बोलिला ॥ ४१ ॥ ऐशिये वस्तूच्या ठायीं जाण । मन विसरे मनपण । येणें साधनें पैं जाण । होय ब्रह्म पूर्ण साधकु ॥ ४२ ॥ हें परम अगाध साधन । ज्यासी नाटोपे गा जाण । त्याचें निश्चळ व्हावया मन । सुगम साधन देवो सांगे ॥ ४३ ॥ निर्विण्णस्य विरक्तस्य पुरुषस्योक्तवेदिनः । मनस्त्यजति दौरात्म्यं चिन्तितस्यानुचिन्तया ॥ २३ ॥ जन्ममरणांचें महा‌आवर्त । भोगितां वैराग्यें अतिसंतप्त । अत‌एव विषयीं विरक्त । जैसें विषयुक्त परमान्न ॥ ४४ ॥ मघमघीत अमृतफळ । त्यावरी सर्पें घातली गरळ । तेवीं विषयमात्रीं सकळ । देखे केवळ महाबाधा ॥ ४५ ॥ ऐसेनि विवेकें विवेकवंत । श्रद्धापूर्वक गुरुभक्त । गुरूनें सांगितला जो अर्थ । तो हृदयांत विसरेना ॥ ४६ ॥ गुरूनें बोधिला जो अर्थ । तो सदा हृदयीं असे ध्यात । चित्तीं चिंतिलाचि जो अर्थ । तोचि असे चिंतित पुनः पुनः ॥ ४७ ॥ करितां प्रत्यग्‌वृत्तीं चिंतन । संकल्प विकल्प सांडी मन । त्यजोनियां देहाभिमान । ब्रह्मसंपन्न स्वयें होय ॥ ४८ ॥ झालिया ब्रह्मसंपन्न । स्वरूपीं लीन होय मन । हाही एक उपावो जाण । न ठाके तरी आन अवधारीं ॥ ४९ ॥ यमादिभिर्योगपथैरान्वीक्षिक्या च विद्यया । ममार्चोपासनाभिर्वा नान्यैर्योग्यं स्मरेन्मनः ॥ २४ ॥ त्यजोनियां सकळ भोग । यमनियमेंसीं योगमार्ग । आसनस्थ हो‌ऊनि चांग । दे मुद्रा साङ्ग ’अधारीं’ ॥ २५० ॥ तेव्हां अपान ऊर्ध्वमुखें वाढे । जों वरता ’स्वाधिष्ठाना’ चढे । प्राण प्राणायामें अडे । तो मागुता मुरडे नाभिस्थाना ॥ ५१ ॥ सम होतां प्राणापान । पिंडब्रह्मांडाचें शोधन । स्वयें वायु करी गा आपण । मलक्षालन शरीरीं ॥ ५२ ॥ कफ पित्त दोन्ही खाये । नाडींतें शोधीत जाये । जुने संचित मल पाहें । तेही लवलाहें निर्दळी ॥ ५३ ॥ नवल वायूचें प्रबळ बळ । पिंडब्रह्मांडींचे सकळ मळ । धो‌ऊनि करी गा निर्मळ । पवित्रता केवळ महयोगें ॥ ५४ ॥ तेथें प्रगटे रोगाची परवडी । महाविघ्नांची पडे उडी । धांवती विकल्पाच्या कोडी । सिद्धींची रोकडी नागवण पावे ॥ ५५ ॥ इतुकीं अंगीं आदळतां जाण । साधक न सांडी जैं आंगवण । तैं सम होती प्राणापान । सत्य जाण उद्धवा ॥ ५६ ॥ प्राणापानांच्या मिळणीं । शक्ति चेतवे कुंडलिनी । ते प्राणापानांतें घे‌उनि । सुषुम्नास्थानीं प्रवेशे ॥ ५७ ॥ ते आद्यशक्ति अचाट । चढे पश्चिमेचा महाघाट । तेथें षड्चक्रांचा कडकडाट । पूर्वींच सपाट पवनें केला ॥ ५८ ॥ कुंडलिनी चालतां वाटा । चुकल्या आधिव्याधींच्या लाटा । बुजाल्या विकल्पांच्या वाटा । महाविघ्नांच्या झटा बाधूं न शकती ॥ ५९ ॥ साधितां उल्हाटशक्तिचे उलट । उघडे ब्रह्मरंघ्रींचें कपाट । तंव लोटले सहस्त्रदळाचे पाट । अतिचोखट चंद्रामृत ॥ २६० ॥ तें प्राशूनि कुंडलिनी बाळा । संतोषें सांडी गरळा । ते शरीरीं वोतली कळा । तेणें पालटला देहभाव ॥ ६१ ॥ शरीराकारें वोतिली कळा । तेणें देहो दिसे अतिसोज्ज्वळा । ना तो ब्रह्मरसाचा पुतळा । कीं उमलला कळा शांतिसुखाचा ॥ ६२ ॥ जीवाचें जीवन मुसावलें । कीं ब्रह्मविद्येसी फळ आलें । ना ते चैतन्या कोंब निघाले । तैसे शोभले अवयव ॥ ६३ ॥ त्या देहाचेनि लाघवें । जगाच्या डोळां सामावे । जीवामाजीं वावरों पावे । निजस्वभावें सबाह्य ॥ ६४ ॥ तो पवनाची करोनि पायरी । सुखें चाले गगनावरी । या नांव परम ’खेचरी’ । सिद्धेश्वरीं बोलिजे ॥ ६५ ॥ त्याचिया अंगींचिया दीप्ती । खद्योतप्राय गभस्ती । त्याचें चरणामृत वांछिती । अमरपति इंद्रचंद्र ॥ ६६ ॥ क्रमूनी औटपीठ गोल्हाट । भ्रमरगुंफादि शेवट । भेदूनि सोहंहंसाचें पीठ । परमात्मा प्रकट हो‌ऊनि ठाके ॥ ६७ ॥ हा योगाभ्यासें योग गहन । अवचटें कोणा साधे जाण । हा मार्ग गा अतिकठिण । स्वयें श्रीकृष्ण बोलिला ॥ ६८ ॥ हेंचि मानतें श्रीकृष्णनाथा । तरी आन साधन न सांगता । हा मूळश्लोकार्थ पाहातां । कळेल तत्त्वतां साधूंसी ॥ ६९ ॥ हा ऐकतां अतिगोड वाटे । परी करितां काळीज फाटे । तरी न साधेचि महाहटें । येथ ठकले लाठे सुरनर ॥ २७० ॥ असो हें अत्यंत कठिण । तुज मी सांगेन गा आन । ’आन्वीक्षिकी’ विद्या जाण । त्वंपदशोधनविवेकु ॥ ७१ ॥ तत्पदाहूनि वेगळा । पांचभौतिक तत्त्वांचा गोळा । चुकोनि व्यापका सकळा । कोठें निपजला एकदेशी ॥ ७२ ॥ अनादि मायाप्रवाहयोगें । तन्मात्राविषयसंगें । मनाचेनि संकल्पपांगें । वेगळें सवेगें मानलें ॥ ७३ ॥ मनें मानिला जो भेदु । त्यासी करावा अभेदबोधु । येचि अर्थीं स्वयें गोविंदु । विवेक विशदु दाखवी ॥ ७४ ॥ पांचभौतिक शरीर खरें । तेथ पृथ्वी प्रत्यक्ष जळीं विरे । पृथ्वीचा गंध जळीं भरे । तैं पृथ्वी सरे निःशेष ॥ ७५ ॥ त्या जळाचा जळरसु । शोधुनि जैं घे हुताशु । तैं जळाचा होयर्‍हासु । विरे निजनिःशेषु तेजतत्त्वीं ॥ ७६ ॥ त्या तेजाचें कारणरूप । गिळी वायूचा पूर्ण प्रताप । तेव्हां तेजाचें मावळे स्वरूप । वायूची झडप लागतां ॥ ७७ ॥ त्या वायूचा स्पर्शगुण । नेतां गगनें हिरून । तेव्हां वायूचें नुरे भन । राहे मुसावोन गगनचि ॥ ७८ ॥ केवळ गगना नुरे उरी । तें गुणकार्येंसीं रिघे अहंकारीं । अहंकारु रिघे मायेमाझारीं । माया परमेश्वरीं मिथ्या होय ॥ ७९ ॥ रात्रि आपुलिया प्रौढीं । अंधारातें वाढवी वाढी । तेथ नक्षत्रें खद्योत कोडी । मिरवती गाढीं निजतेजें ॥ २८० ॥ ते रात्रि येतां सूर्यापुढें । स्वकार्येंसीं सगळी उडे । पाहों जातां मागेंपुढें । कोणीकडे असेना ॥ ८१ ॥ तेवीं परमेश्वरीं माया । कार्यकारणेंसीं गेली वायां । मिथ्यात्वेंचि न ये आया । नुरेचि दिसावया मागमोसु ॥ ८२ ॥ मायाप्रतिबिंबित चैतन्या । आणी ’जीव’ या अभिधाना । ते माया गेलिया जाणा । होय जीवपणार्‍हासु ॥ ८३ ॥ बुडालें जीवशिवांचें भान । उडालें मनाचें मनपण । कोंदलें चैतन्यघन । परम समाधान साधकां ॥ ८४ ॥ करितां त्वंपदाचें शोधन । होय तत्पदीं समाधान । हे ’आन्वीक्षिकी विद्या’ जाण । विवेकसंपन्न पावती ॥ ८५ ॥ न करितां योगसाधन । न लगे त्वंपदाचें शोधन । याहोनि सुलभ साधन । तुज मी आन सांगेन ॥ ८६ ॥ जेथ कष्ट करितां तरी थोडे । परी योगाचे सकळ फळ जोडे । त्वंपदशोधन त्यापुढें । होय बापुडें लाजोनि ॥ ८७ ॥ ते माझी गा निजभक्ति । माझ्या रामकृष्णादि ज्या मूर्तीं । पूजितां त्या अतिप्रीतीं । मी श्रीपती संतोषे ॥ ८८ ॥ तेथें माझें श्रवण माझें कीर्तन । माझें नाम माझें स्मरण । माझें ध्यान माझें भजन । माझें चिंतन सर्वदा ॥ ८९ ॥ हृदयीं माझें सदा ध्यान । मुखीं माझें नाम माझें स्तवन । श्रवणीं माझी कथ माझें कीर्तन । करीं माझें पूजन सर्वदा ॥ २९० ॥ चरणीं प्रदक्षिणा यात्रागमन । अष्टांगीं सर्वदा माझें नमन । ऐसें अनन्य माझें भजन । विनटलेंपण मद्‍भक्तिं ॥ ९१ ॥ ऐसे विनटले जे माझे भजनीं । त्यांसी मी विकलों चक्रपाणी । त्यांवेगळे पढियंतें कोणी । आन त्रिभुवनीं मज नाहीं ॥ ९२ ॥ यापरी करितां माझें भजन । न लगे योगादिकांचें स्मरण । मी भक्तिवेगळा श्रीकृष्ण । नातुडें जाण उद्धवा ॥ ९३ ॥ अवचटें दैवगतीं येथ । योगियासी जैं घडे दुरित । तैं त्यासी न लगे कर्मप्रायश्चित । तेंचि सांगत श्रीकृष्ण ॥ ९४ ॥ यदि कुर्यात्‌ प्रमादेन योगी कर्म विगर्हितम्‌ । योगेनैव दहेदंहो नान्यत्तत्र कदाचन ॥ २५ ॥ भक्तासी निंद्य कर्म न घडे । त्यासी मी राखता मागें पुढें । हें आलें गा योग्याकडे । तेथही घडे प्रमादें ॥ ९५ ॥ प्रमादें घडलें जें पाप । त्याचा तीव्र अनुताप । जेवीं दावाग्नीं पोळल्या सर्प । तैसा सकंप पापासी ॥ ९६ ॥ गोमाशी लागतां सिंहासी । तो जेवीं झाडी सर्वांगासी । तेवीं योगी देखोनि पापासी । जो अहर्निशीं अनुतापी ॥ ९७ ॥ तेणें हो‌ऊनि सावचित्त । योगबळें निजयोगयुक्त । पाप निर्दाळावें समस्त । हेंचि प्रायश्चित्त योगियासी ॥ ९८ ॥ हे सांडोनियां योगस्थिती । जैं लावूं धांवे शेणमाती । तैं नागवला गा निश्चितीं । नव्हेचि निष्कृती पापाची ॥ ९९ ॥ हृदयीं नाहीं अनुतापवृत्ती । वरिवरी गा शास्त्रोक्तीं । लावूं जातां शेणमाती । नव्हे निवृत्ती पापाची ॥ ३०० ॥ माझें क्षणार्ध अनुसंधान । कोटि कल्मषां करी दहन । तेथ इतरांचा केवा कोण । हें स्वयें श्रीकृष्ण बोलिला ॥ १ ॥ ज्याचे अधिकारीं माझें ध्यान । सांडोनियां जाण । प्रायश्चित्त सांगतां आन । लागे दूषण सांगत्यासी ॥ २ ॥ यालागीं मुख्यत्वें जाण । येथ अधिकारचि प्रमाण । येचिविखींचें निरूपण । श्रीनारायण सांगत ॥ ३ ॥ स्वे स्वेऽधिकारे या निष्ठा स गुणः परिकीर्तितः । कर्मणां जात्यशुद्धानामनेन नियमः कृतः । गुणदोषविधानेन सङ्गानां त्याजनेच्छया ॥ २६ ॥ न प्रेरितां शास्त्रें श्रुतीं । विषयीं स्वाभाविक प्रवृत्ती । तिची करावया निवृत्ती । माझि वेदोक्ती प्रवर्तली ॥ ४ ॥ एका‌एकीं विषयत्यजन । करावया अशक्त जन । त्यासी वेद दावी दोषगुण । त्यागावया जाण विषयांसी ॥ ५ ॥ हे माता हे सहोदर । येथ करूं नये व्यभिचार । हे वेद न बोलता अधिकार । तैं यथेष्टाचार विषयांचा ॥ ६ ॥ जेथवरी स्त्रीपुरुषव्यक्ती । तेथवरी कामासक्ती । मी नेमितों ना वेदोक्ती । तैं व्यभिचारप्राप्ती अनिवार ॥ ७ ॥ सकळ स्त्रिया सांडून । त्यजूनियां इतर वर्ण । सवर्ण स्त्री वरावी आपण । अष्टवर्षा जाण नेमस्त ॥ ८ ॥ तिचें वेदोक्त पाणिग्रहण । तेथ साक्षी अग्नि आणि ब्राह्मण । इतर स्त्रीयांची वाहूनि आण । स्वदारागमन विध्युक्त ॥ ९ ॥ यापरी म्यां सकळ लोक । स्त्रीकामें अतिकामुक । स्वदारागमनें देख । केले एकमुख वेदोक्तीं ॥ ३१० ॥ याचिपरी म्यां अन्नसंपर्क । वेदवादें नेमिले लोक । येरवीं वर्णसंकर देख । होता आवश्यक वेदेंवीण ॥ ११ ॥ तो चुकवावया वर्णसंकर । वर्णाश्रमांचा प्रकार । वेद बोलिला साचार । विषयसंचार त्यागावया ॥ १२ ॥ विषयांची जे प्रवृत्ती । तेचि ’अविद्या’ बाधा निश्चितीं । जे विषयांची अतिनिवृत्ती । ती नांव ’मुक्ति’ उद्धवा ॥ १३ ॥ करावया विषयनिवृत्ती । वेदें द्योतिली कर्मप्रवृत्ती । वर्णाश्रमाचारस्थिती । विषयासक्तिच्छेदक ॥ १४ ॥ नित्य नैमित्तिक कर्मतंत्र । नाना गुणदोषप्रकार । वेदें द्योतिले स्वाधिकार । विरक्त नर व्हावया ॥ १५ ॥ स्वकर्में होय चित्तशुद्धी । तेणें वैराग्य उपजे त्रिशुद्धी । वैराग्य विषयावस्था छेदि । गुणकार्या‌उपाधी रजतम हे ॥ १६ ॥ तेव्हां उरे शुद्ध-सत्त्वगुण । तेथें प्रकटे गुरुभजन । गुरुभजनास्तव जाण । ज्ञान विज्ञान घर रिघे ॥ १७ ॥ पूर्ण करितां भगवद्‍भक्ति । तै गुरुभजनीं अधिकारप्राप्ती । सद्‍गुरुमहिमा सांगों किति । मी आज्ञावर्ती गुरुचा ॥ १८ ॥ गुरु ज्यावरी अनुग्रहो करी । त्यासी मी भगवंत उद्धरीं । आदरें वा‌ऊनियां शिरीं । निज‍ऐश्वर्यावरी बैसवीं ॥ १९ ॥ गुरु परमात्मा परेशु । ऐसा जयाचा विश्वासु । त्याचा अंकिला मी हृषीकेशु । जो जगदीशु जगाचा ॥ ३२० ॥ जेथ मी अंकित झालों आपण । तेथ समाधीसीं ज्ञानविज्ञान । वोळंगे गुरुभक्ताचें अंगण । तेथ केवा कोण सिद्धींचा ॥ २१ ॥ त्या गुरुचें करूनि हेळण । जो करी माझें भजन । तेणें विखेंसीं मिष्टान्न । मज भोजन घातलें ॥ २२ ॥ तोंडीं घास डो‌ईं टोला । ऐसा भजनार्थ तो झाला । तो जाण सर्वस्वें नागवला । वैरी आपला आपणचि ॥ २३ ॥ येथवरी गुरूचें महिमान । माझेनि वेदें द्योतिलें जाण । करूनि विषयनिर्दळण । स्वाधिकारें जन तरावया ॥ २४ ॥ यालागीं ज्यासी जो अधिकार । तो तेणें नुल्लंघावा अणुमात्र । ह वेदें केला निजनिर्धार । स्वकर्में नर तरावया ॥ २५ ॥ तरी म्हणशी कर्मचि पावन । हेंही सर्वथा न घडे जाण । स्वाधिकारेंवीण कर्माचरण । तें अतिदारुण बाधक ॥ २६ ॥ संन्यास करी गृहस्थधर्म । तें त्यासी वोडवलें अकर्म । गृहस्थ करी करपात्रकर्म । तेचि अधर्म तयासी ॥ २७ ॥ हितासी वोखद घेतां जाण । त्याचें चुकलिया अनुपान । तेंचि अन्यथा होय आपण । पीडी दारुण मरणांत ॥ २८ ॥ तैसें अनाधिकारें करितां कर्म । तेंचि बाधक होय परम । हें वेदें जाणोनियां वर्म । स्वधर्म सुगम नेमिले ॥ २९ ॥ स्वाधिकारें स्वधर्मनिष्ठा । हाचि पुरुषाचा गुण मोठा । तेणें फिटे गुणकर्ममळकटा । प्रिय वैकुंठा तो होय ॥ ३३० ॥ वेदें बोलिला जो गुण । तो अंगीकारावा आपण । वेदें ठेविलें ज्यासी दूषण । तें सर्वथा जाण त्यजावें ॥ ३१ ॥ हेंचि गुणदोषलक्षण । करितां वेदविवंचन । गुंतले गा अतिसज्ञान । माझे कृपेवीण वेदार्थ न कळे ॥ ३२ ॥ निषेधमुखेंकरितां त्यागु । वेद त्यागवी विषयसंगु । हें वर्म जाणोनि जो चांगु । तो होय निःसंगु महायोगी ॥ ३३ ॥ उद्धवा हें वेदतत्त्वसार । तुज म्यां सांगितलें साचार । ज्यालागीं शिणताति सुरनर । ऋषीश्वर तपस्वी ॥ ३४ ॥ परी माझे कृपेवीण सर्वथा । हें न ये कोणाचिये हाता । तें तुज म्यां सांगितलें आतां । तुझे हितार्था निजगुह्य ॥ ३५ ॥ मागें म्यां केलें निरूपण । गुणदोष देखणें तो दोष जाण । त्याचेंही विशद विवेचन । तुज मीं संपूर्ण सांगितलें ॥ ३६ ॥ पराचा देखावा दोषगुण । हें नाहीं नाहीं माझें वेदवचन । दोष त्यजोनियां आपण । घ्यावा गुण हा वेदार्थ ॥ ३७ ॥ त्यजोनि पराचे दोषगुण । स्वयें गुण घ्यावा आपण । हेंही माझे कृपेवीण । नव्हे जाण उद्धवा ॥ ३८ ॥ न देखोनि पराचे दोषगुण । स्वयें हो‌इजे ब्रह्मसंपन्न । म्हणशी ऐशी कृपा परिपूर्ण । केवीं आपण लाहिजे ॥ ३९ ॥ तेचिविखींचें निरूपण । कृपेनें सांगताहे श्रीकृष्ण । माझे कृपेचें आयतन । उद्धवा जाण मद्‍भक्ती ॥ ३४० ॥ जातश्रद्धो मत्कथासु निर्विण्णः सर्वकर्मसु । वेद दुःखात्मकान्‌ कामान्‌ परित्यागेऽप्यनीश्वरः ॥ २७ ॥ माझे कथेचेनि श्रवणें । उठी संसाराचें धरणें । ऐसा विश्वासु धरिला ज्याणें । जीवेंप्राणें निश्चितीं ॥ ४१ ॥ म्हणे अर्धोदकीं प्राणांतीं । जैं हरिकथा आठवे चित्तीं । तैं उठे जन्ममरणपंक्ती । येथवरी भक्ति मत्कथेची ॥ ४२ ॥ ऐशिया भावार्थाचे स्थिती । अनिवार उपजे विरक्ती । नावडे कर्माची प्रवृत्ती । विषयासक्ती नावडे ॥ ४३ ॥ नावडे इतर कथावदंती । नावडे लौकिकाची प्रीती । परी निःशेष त्यागाप्रती । सामर्थ्यशक्ति ज्या नाहीं ॥ ४४ ॥ तेणें अनन्यभावें जाण । अत्यादरें करावें भजन । येचिविखींचें निरुपण । स्वमुखे श्रीकृष्ण सांगत ॥ ४५ ॥ ततो भजेत मां प्रीतः श्रद्धालुर्दृढनिश्चयः । जुषमाणश्च तान्कामान्दुःखोदर्कांश्च गर्हयन्‌ ॥ २८ ॥ त्यागवया नाहीं सामर्थ्यशक्ती । त्यासी विषयभोग जेव्हां येती । ते भोगी ऐशिया रीतीं । जेवीं श्रृंगारिती सुळीं द्यावया ॥ ४६ ॥ त्यांसी केळें साखर चोखटी । दूधतूप लावितां ओठीं । शूळ भरेल या भोगापाठीं । तो धाक पोटीं धुकधुकीं ॥ ४७ ॥ तेवीं विषय भोगितां जाण । पुढें निरय अतिदारुण । मज कां विसरला नारायण । मधुसूदन माधव ॥ ४८ ॥ मी पडिलों विषयबंदिखानीं । वेगीं पावें गरुडा वळंघोनी । कृपाळुवा चक्रपाणी । मजलागोनी सोडवीं ॥ ४९ ॥ विषयमहाग्रहाचे तोंडीं । मी सांपडलों बडिशपिंडी । गजेंद्राचेपरी तांतडीं । घालीं उडी मजलागी ॥ ३५० ॥ धांव पाव गा गोविंदा । निवारीं माझी विषयबाधा । उपेक्षूं नको मुकुंदा । घे‌ऊनि गदा धांव वेगीं ॥ ५१ ॥ तूं अडलियांचा सहाकारी । भक्तकाजकैवारी । मज बुडतां विषयसागरीं । वेगे उद्धरीं गोविंदा ॥ ५२ ॥ मी पडिलों विषयसागरीं । बुडविलों कामलोभलहरीं । क्रोधें विसंचिलों भारी । अभिमानसुसरीं गिळियेलों ॥ ५३ ॥ तूं दीनदयाळ श्रीहरी । हें आपुलें बिरुद साच करीं । मज दीनातें उद्धरीं । निजबोधकरीं धरोनियां ॥ ५४ ॥ हे विषयबाधा अतिगहन । कां पां न पवे जनार्दन । येणें अट्टहासें जाण । करी स्मरण हरीचें ॥ ५५ ॥ न सुटे विषयवज्रमिठी । पडिलों कामदंष्ट्रांचिये पोटीं । कांहीं केलिया न सुटे मिठी । आतां जगजेठी धांव वेगीं ॥ ५६ ॥ ऐसा निजभक्तांचा धांवा । क्षणही मज न साहवे उद्धवा । माझी कृपा होय तेव्हां । पूर्ण स्वभावा अनुतापें ॥ ५७ ॥ उद्धवा जेथ अनुताप नाहीं । तेथ माझी कृपा नव्हे कहीं । कृपेचें वर्म हेंच पाहीं । जैं अनुताप देहीं अनिवार ॥ ५८ ॥ माझे कृपेवीण निश्चितीं । कदा नुपजे माझी भक्ती । माझी झालिया कृपाप्राप्ती । अनन्यभक्ती तो करी ॥ ५९ ॥ माझे कृपेचें लक्षण । प्राप्त विषय भोगितां जाण । न तुटे माझें अनन्य भजन । ’पूर्ण कृपा’ जाय या नांव ॥ ३६० ॥ मग चढत्या वाढत्यां प्रीतीं । नीच नवी करी माझी भक्ती । देह गेह स्त्री पुत्र संपत्ती । वेंची माझे प्रीतीं धनधान्य ॥ ६१ ॥ माझे भक्तिलागीं आपण । सर्वस्व वेंची हें नवल कोण । स्वयें वंचीना जीवप्राण । ऐसें अनन्यभजन सर्वदा ॥ ६२ ॥ माझ्या भजनाची अतिप्रीती । स्मरण न सांडी अहोरातीं । माझा विसर न पडे चित्तीं । त्याची फळप्राप्ती हरि सांगे ॥ ६३ ॥ प्रोक्तेन भक्तियोगेन भजतो माऽसकृन्मुनेः । कामा हृदय्या नश्यन्ति सर्वे मयि हृदि स्थिते ॥ २९ ॥ माझी जे कां निजभक्ती । मागां सांगितली तुजप्रती । त्या हातवटिया मीं श्रीपती । यजिलों अतिप्रीतीं वारंवार ॥ ६४ ॥ पळपळ क्षणक्षण । माझें न विसरत स्मरण । करिती अनन्य भजन । मदर्पण तें मीचि ॥ ६५ ॥ दिवसदिवसां चढोवढी । अनिवार प्रीति वाढे गाढी । लागतां नीच नवी गोडी । भजे आवडीं पुनः पुनः ॥ ६६ ॥ केलीचि भक्ती करितां । उबगु न ये सर्वथा । अधिक हर्ष वाटे चित्ता । उल्हासता मद्‍भजनीं ॥ ६७ ॥ मज आकळूनि आपले मनीं । मनींहोनि प्रीति भजनीं । तेथ सकळ काम जाती नासोनी । जेवीं कां तरणीं खद्योत ॥ ६८ ॥ जेवीं कां केसरी देखोनी । मदगजां होय भंगणी । तेवीं काम जाती हृदयींहूनी । मी चक्रपाणी प्रकटल्या ॥ ६९ ॥ ’मी प्रकटलों’ ऐसें म्हणतां । लाज लागेल या वचनार्था । मजवीण ठावो नाहीं रिता । ’प्रकटलों’ आतां म्हणे कोण ॥ ३७० ॥ उद्धवा जाण तत्त्वतां । मी सदा हृदयीं वसता । भक्तांची भ्रांती जातां । मी स्वभावतां प्रकटचि ॥ ७१ ॥ भक्तीं करूनि माझी भक्ती । नाशिली गा निजभ्रांती । तेथ स्वयंभ मी श्रीपती । सहजस्थितीं प्रकटचि ॥ ७२ ॥ मी हृदयीं प्रकटल्यापुढें । भक्तांसी अलभ्य लाभ जोडे । फिटे संसाराचें सांकडें । ऐक पां फाडोवाडें सांगेन ॥ ७३ ॥ भिद्यते ह्रदयग्रन्थिश्छिद्यन्ते सर्वसंशयाः । क्षीयन्ते चास्य कर्माणि मयि दृष्टेऽखिलात्मनि ॥ ३० ॥ उद्धवा मी ज्यासी हृदयीं भेटें । तो मी हृदयमाजीं न संठें । सर्वात्मा सर्वरूपें प्रकटें । नव्हे धाकुटें स्वरूप माझें ॥ ७४ ॥ ऐसा मी प्रकटलियापाठिं । संसारुचि न पडे दिठीं । मावळे गुणेंसी भेदत्रिपुटी । पळे उठा‌उठी भवभय ॥ ७५ ॥ लागतां सूर्याचे किरण । घृताचें नासे कठिणपण । तेवीं मी प्रकटल्या नारायण । न फोडितां जाण लिंगदेह नाशे ॥ ७६ ॥ धु‌ई दाटली चहूंकडे । ते चंडवातें तत्काळ उडे । तेवीं माझ्या स्वप्रकाशापुढें । वासनेचें उपडे समूळ जाळ ॥ ७७ ॥ समूळ उपडितां वासनेसी । संशय निमे जीवेंभावेंसीं । तेथ क्षयो झाला कर्मासी । जेवीं रवीपाशीं अंधारें ॥ ७८ ॥ तेवीं गुण नासती स्वकार्येंसीं । अविद्या नासे अज्ञानेंसीं । जीव नासे शिवपणेंसीं । चिदचिद्‍ग्रंथीसीं अहंकारु ॥ ७९ ॥ तेथ सोहंहंसाची बोळवण । न करितांचि जाहली जाण । भेणें पळाले जन्ममरण । पडलें शून्य संसारा ॥ ३८० ॥ यापरी भक्तियोगें गहन । माझें करूनियां भजन । भक्त पावले समाधान । ऐसेनि जाण निजभजनें ॥ ८१ ॥ एवं भक्ति-ज्ञान-कर्मयोग । या तिहीं योगांचा विभाग । तुज म्यां सांगितला साङ्ग । हें वर्म चांग मत्प्राप्ती ॥ ८२ ॥ येथ विशेषें माझी भक्ति । न पाहे साह्य सांगाती । नव्हे आणिकांची पंगिस्ती । साधी मत्प्राप्ती अंगोवांगीं ॥ ८३ ॥ न करितां माझें भजन । सर्वथा नुपजे माझें ज्ञान । कर्म न करितां मदर्पण । तेंचि जाण अकर्म ॥ ८४ ॥ यालागीं मुख्य जें निजज्ञान । तें अपेक्षी माझें भजन । तेथ कर्म बापुडें रंक जाण । भजनेंवीण सरेना ॥ ८५ ॥ एवं ज्ञान कर्में परमार्थीं । माझे भक्तिस्तव होती सरतीं । ते भक्तिची निजख्याती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ८६ ॥ तस्मान्मद्‍भक्तियुक्तस्य योगिनो वै मदात्मनः । न ज्ञानं न च वैराग्यं प्रायः श्रेयो भवेदिह ॥ ३१ ॥ करूं नेणे कर्माचरण । न साधितां वैराग्यज्ञान । भावें करितां माझें भजन । माझ्या स्वरूपीं मन ठेवूनी ॥ ८७ ॥ तेथ ज्ञानकर्मादिकें जाण । मुख्य वैराग्यही आपण । मद्‍भक्तीसी येती लोटांगण । चरणां शरण पैं येती ॥ ८८ ॥ शरण येणें हें कायशी गोठी । केवळ जन्मती भक्तीच्या पोटीं । मग लडेवाळें घालूनि मिठी । स्वानंदाची गोमटी मागती गोडी ॥ ८९ ॥ एवं भक्ति आपुले अंकीं जाण । करी ज्ञानादिकांचे लालन । परमानंद पाजूनि पूर्ण । करी पालन निजांगें ॥ ३९० ॥ ते आतुडल्या माझी भक्ति । ज्ञानादिकें कामारी होती । तेचिविखींची उपपत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥ ९१ ॥ यत्कर्मभिर्यत्तपसा ज्ञानवैराग्यतश्च यत्‌ । योगेन दानधर्मेण श्रेयोभिरितरैरपि ॥ ३२ ॥ सर्वं मद्‍भक्तियोगेन मद्‍भक्तो लभतेऽञ्जसा स्वर्गापवर्गं मद्धाम कथाञ्चिद्यदि वाञ्छति ॥ ३३ ॥ जें पाविजे स्वधर्मकर्मादरें । जें पाविजे निर्बंध तपाचारें । जें सांख्यज्ञानविचारें । पाविजे निर्धारें जें वस्तु ॥ ९२ ॥ जें पाविजे विषयत्यागे । जें पाविजे अष्टांगयोगें । जें वातांबुपर्णाशनभोगें । जें दानप्रसंगें पाविजे ॥ ९३ ॥ जें साधें वेदाध्ययनें । जें साधे सत्यवचनें । जें साधे अनेकीं साधनें । तें मद्‍भजनें पाविजे ॥ ९४ ॥ हें न सोशितां साधनसांकडें । नुल्लंघितां गिरिकपाटकडे । हीं सकळ फळें येती दारापुढें । जैं माझी आतुडे निजभक्ति ॥ ९५ ॥ उद्धवा तूं म्हणसी जाण । ऐशी ते तुझी भक्ति कोण । ब्रह्मभावें जें गुरुभजन । ते भक्तिचा पूर्ण हा प्रतापु ॥ ९६ ॥ सद्‍गुरुभजनापरती । साधकांसी नाहीं प्राप्ती । मी भगवंत करीं गुरुभक्ति । इतरांचा किती पवाडु ॥ ९७ ॥ मीही सद्‍गुरुचेनि धर्में । पावलों एवढिये महिमे । त्या सद्‍गुरूचे गुरु गरिमे । कोणे उपमे उपमावें ॥ ९८ ॥ जे गुरुब्रह्म अभेदभक्त । अवचटें अणुमात्र वांछित । तैं वैकुंठादि समस्त । मी त्यांसी देत स्वर्गापवर्ग ॥ ९९ ॥ हेंही बोलतां अत्यंत थोडें । मी त्यांच्या भजनसुरवाडें । भुललों गा वाडेंकोडें । त्यां मागेंपुढें सदा तिष्ठें ॥ ४०० ॥ मद्‍भक्त नैराश्यें अतिगाढे । ते मागतील हें कदा न घडे । तेंही लक्षण तुजपुढें । अतिनिवाडें सांगेन ॥ १ ॥ न किञ्चित्साधवो धीरा भक्ता ह्येकान्तिनो मम । वाच्छन्त्यपि मया दत्तं कैवल्यमपुनर्भवम्‌ ॥ ३४ ॥ ज्यासी नघेणेंपणाचा प्रबोधु । साचार झाला अतिविशादु । ऐसा निरपेक्ष जो शुद्धु । तो सत्य साधु मज मान्या ॥ २ ॥ ज्याच्या ठायीं निरपेक्षता । धैर्य त्याचे चरण वंदी माथां । ज्याच्या ठायीं अधीरता । तेथ निरपेक्षता असेना ॥ ३ ॥ कोटिजन्में बोधु जोडे । तैं हे निरपेक्षता आतुडे । निरपेक्षतेवरुतें चढे । ऐसें नाहीं फुडें साधन ॥ ४ ॥ ऐशिये निरपेक्षताप्राप्तीं । माझ्या भजनीं अतिप्रीती । ती लाभे माझी चौथी भक्ती । जीसी ’एकांती’ म्हणे वेदु ॥ ५ ॥ ऐक एकान्तभक्तीची मातु । देवाभक्तांसी होय एकांतु । भक्त रिघे देवा‌आंतु । देव भक्तांतु सबाह्य ॥ ६ ॥ ऐसें अभेद माझें भजन । या नांव ’एकान्तभक्ति’ जाण । मजवेगळें कांहीं भिन्न । न देखे आन जगामाजीं ॥ ७ ॥ त्यांसी चहूं पुरुषार्थेंसीं मुक्ति । मी स्वयें देताहें श्रीपती । ते दुरोनि दृष्टीं न पाहाती । मा धरिती हातीं हें कदा न घडे ॥ ८ ॥ ते स्वमुखें कांहीं मागती । हें न घडे कदा कल्पांतीं । सांडुनि माझी एकांतभक्ति । कैवल्य न घेती ते निजभक्त ॥ ९ ॥ मोक्षही न घ्यावया कोण भावो । त्याचाही मथित अभिप्रावो । स्वयें सांगे देवाधिदेवो । अगम्य पहा हो श्रुतिशास्त्रां ॥ ४१० ॥ नैरपेक्ष्यं परं प्राहुर्निःश्रेयसमनल्पकम्‌ । तस्मान्निराशिषो भक्तिर्निरपेक्षस्य मे भवेत्‌ ॥ ३५ ॥ जो निरपेक्ष निर्विशेष । तो मज पूज्य महापुरुष । मोक्ष्य त्याचे दृष्टीं भूस । धन्य नैराश्य तिहीं लोकीं ॥ ११ ॥ ऐक निरपेक्षतेचा उत्कृष्ट । तेथ चारी पुरुषार्थ फळकट । वैकुंठकैलासादि श्रेष्ठ । ते पायवाट निरपेक्षा ॥ १२ ॥ निरपेक्षापाशीं जण । वोळंगे येती सुरगण । तेथ ऋद्धिसिद्धींचा पाड कोण । वोळंगे अंगण कळिकाळ ॥ १३ ॥ स्वयें महादेव आपण । सर्वस्वें करी निंबलोण । श्रियेसहित मी आपण । अंकित जाण तयाचा ॥ १४ ॥ निरपेक्ष जो माझा भक्त । जो मजसमान समर्थ । हेंही बोलणें अहाच येथ । तो मीचि निश्चित चिद्‌रूपें ॥ १५ ॥ मी परमात्मा परमानंद । भक्त मद्‍भजनें शुद्ध स्वानंद । दोघे अभेदें स्वानंदकंद । सच्चिदानंद निजरूपें ॥ १६ ॥ ऐसे मद्‍भावें भक्त संपन्न । ते न देखती दोषगुण । तेचिविखींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ १७ ॥ न मय्येकान्तभक्तानां गुणदोषोद्‍भवा गुणाः । साधूनां समचित्तानां बुद्धेः परमुपेयुषाम्‌ ॥ ३६ ॥ जो न देखे विषयभेदु । ज्यासी समत्वाचा निजबोधु । तोचि बोलिजे ’ शुद्ध साधू ’ । परमानंदु मद्‍भजनें ॥ १८ ॥ मी एक परमात्मा सर्व भूतीं । न देखे द्वैताची प्रतीती । ऐशी ज्याची भजनस्थिती । ’एकांतभक्ति’ त्या नांव ॥ १९ ॥ सदा समभावें एकाग्र । माझ्या भजतीं अतितत्पर । ते प्रकृतीचे परपार । पावले साचार मद्‌रूपीं ॥ ४२० ॥ ऐसे मद्‍भावें भक्त परिपूर्ण । ते न देखने दोषगुण । उद्धवा म्यां हे निजखूण । पूर्वी तुज जाण सांगितली ॥ २१ ॥ साकरेची साली फेडणें । कीं कापुराचा कोंडा काढणें । रत्‍नदीपाची काजळी फेडणें । तेवीं गुणदोष देखणें सृष्टीमाजीं ॥ २२ ॥ ज्याचा घ्यावा अवगुण । मुख्य अवगुणी मी आपण । ज्याचा घ्यावा उत्तम गुण । तोही जाण मद्‌रूप ॥ २३ ॥ यापरी भक्तजगजेठी । मद्‌रूपें देखे सकळ सृष्टी । त्यासी गुणदोषांची गोष्टी । न पडे दृष्टीं सर्वथा ॥ २४ ॥ गुणदोष न देखावे जाण । हेंचि साधनीं मुख्य साधन । येचि अर्थींचें निरूपण । आदरें श्रीकृष्ण सांगत ॥ २५ ॥ एवमेतान्मयाऽऽदिष्टाननुतिष्ठन्ति मे पथः । क्षेमं विन्दति मत्स्थानं यद्‍ब्रह्म परमं विदुः ॥ ३७ ॥ इति श्रीभागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायामेकादशस्कन्धे विंशोऽध्यायः ॥ २० ॥ उद्धवा यापरी जाण । म्यां वेदवादें आपण । उपदेशिले गा जन । भक्तिज्ञानकर्मयोगें ॥ २६ ॥ कर्मेंचि कर्मे छेदिजेती । ऐशी ’कर्मयोगाची’ गती । स्वधर्मकर्में माझी प्राप्ती । ते म्यां तुजप्रती सांगितली ॥ २७ ॥ नित्यानित्यविवंचन । करूनि अनित्यनिर्दळण । हें ’ज्ञानयोगाचें’ लक्षण । तुज म्यां संपूर्ण सांगितलें ॥ २८ ॥ तैशीच करितां ’माझी भक्ती’ । सकळ फळें पायां लागती । भक्तांसी अनायासें माझी प्राप्ती । हेंही तुजप्रती सांगितलें ॥ २९ ॥ अधिकारभेदेंसीं साङ्ग । त्रिकांड त्रिविध वेदमार्ग । माझे प्राप्तीलागीं चांग । विशद विभाग म्यां केले ॥ ४३० ॥ म्यां सांगितल्या‌ऐसें जाण । जो वेदमार्गें करी अनुष्ठान । तो माझी प्राप्ती पावे संपूर्ण । सगुण निर्गुण यथारुची ॥ ३१ ॥ सगुणसाक्षात्कार जो येथ । तें पंचरात्रागम-मत । वैकुंठचि मुख्य म्हणत । हें मत निश्चित तयांचें ॥ ३२ ॥ सप्तावरणांबाहेरी । मायावरणाभीतरीं । वैकुंठ रचिलें श्रीहरीं । हें बोलिजे निर्धारीं वेदान्ती ॥ ३३ ॥ तेथ आगमाचें मनोगत । माया ते ’भगवल्लीला’ म्हणत । स्वलीला वैकुंठ रची भगवंत । क्षयो तेथ असेना ॥ ३४ ॥ जेथ लीलाविग्रही मेघश्याम । स्वयें वसे पुरुषोत्तम । तेथ नाहीं गुण काळ कर्म । मायादि भ्रम रिघेना ॥ ३५ ॥ एवं जन्मक्षयातीत । वैकुंठ अक्षयी निज नित्य । तेथ पावले ते नित्यमुक्त । हें ’आगत-मत’ उद्धवा ॥ ३६ ॥ मंत्रें आराध्यदैवतें प्रसन्नें । हें वेदार्थियांचें बोलणें । तें म्यां तुजप्रती अनुसंधानें । बोलिलों जाणें उद्धवा ॥ ३७ ॥ भावार्थभक्तींचे लक्षण । ते प्रसन्नतेची खूण । हें पूर्वीं केलें निरूपण । निरुतें जाण उद्धवा ॥ ३८ ॥ ते अर्थीं वेदांती म्हणत । अत्यंतप्रळयींचा जो आघात । तो वैकुंठकैलासादि समस्त । साकारवंत निर्दाळी ॥ ३९ ॥ ते काळींचें उर्वरित । केवळ जें गुणातीत । तें पूर्ण ब्रह्म सदोदित । जाण निश्चित उद्धवा ॥ ४४० ॥ जेथ काळ ना कर्म । जेथ गुण ना धर्म । जेथ माया पावे उपरम । तें परब्रह्म उद्धवा ॥ ४१ ॥ माझें स्थान वैकुंठ जाण । तेथील प्राप्ति सायुज्य सगुण । ’पूर्ण-सायुज्यता’ संपूर्ण । ब्रह्म परिपूर्ण सदोदित ॥ ४२ ॥ पावावया पूर्ण परब्रह्म । साधकांसी कोणे मार्गीं क्षेम । वेदोक्त मद्‍भक्ति सुगम । उत्तमोत्तम हा मार्ग ॥ ४३ ॥ आणिके मार्गीं जातां जाण । कामलोभादि उठे विघ्न । कां बुडवी ज्ञानाभिमान । ये नागवण प्रत्यवायाची ॥ ४४ ॥ तैसें नाहीं भक्तिपंथीं । सवें नवविध सांगती । चढता पा‌उलीं अतिविश्रांती । भजनयुक्ती मद्‍भावें ॥ ४५ ॥ येथील मुख्यत्वें साधन । गोलियाही जीवप्राण । कदा न देखावे दोषगुण । तैं ब्रह्म परिपूर्ण पाविजे ॥ ४६ ॥ जेथ नाहीं भयभ्रांती । जेथ नाहीं दिवसराती । जेथ नाहीं शिवशिवस्थिती । तें ब्रह्म पावती मद्‍भक्त ॥ ४७ ॥ जेथ नाहीं रूपनाम । जेथ नाहीं काळकर्म । जेथ नाहीं मरणजन्म । तें परब्रह्म पावती ॥ ४८ ॥ जेथ नाहीं ध्येयध्यान । जेथ नाहीं ज्ञेयज्ञान । जेथ नाहीं मीतूंपण । तें ब्रह्म परिपूर्ण पावती ॥ ४९ ॥ ज्यासी नाहीं मातपिता । जें नव्हे देवोदेवता । जें बहु ना एकुलता । तें ब्रह्म तत्त्वतां पावती ॥ ४५० ॥ जेथ नाहीं वर्णाश्रम । जेथ नाहीं क्रियाकर्म । जेथ नाहीं मायाश्रम । तें परब्रह्म पावती ॥ ५१ ॥ जें गुणागुणीं अतीत । जें लक्ष्यलक्षणारहीत । जें स्वानंदें सदोदित । ते ब्रह्म प्राप्त मद्‍भक्तां ॥ ५२ ॥ पूर्णकृपेचा हेलावा । न संठेचि देवाधिदेवा । तो हा एकादशींचा विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥ ५३ ॥ जेथ ठावो नाहीं देहभावा । जेथ सामरस्य जीवशिवां । तो हा एकादशींचा विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥ ५४ ॥ जेथ उगाणा होय अहंभावा । जेथ शून्य पडे मायेच्या नांवा । तो हा एकादशींचा विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥ ५५ ॥ जेथ देवभक्तांचा कालोवा । एकत्र होय आघवा । तो हा एकादशींचा विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥ ५६ ॥ कष्टीं स्वानंद स्वयें जोडावा । त्या स्वानंदाचा आ‌इता ठेवा । तो हा एकादशीं विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥ ५७ ॥ करोनि भेदाचा नागोवा । होय अभेदाचा रिगावा । तो हा एकादशींचा विसावा । तुज म्यां उद्धवा दीधला ॥ ५८ ॥ काढोनि भावार्थाचा भावो । सोलीव सोलिवांचा सोलावो । गाळुनी गाळिवांचा भक्तिभावो । उद्धवासी देवो देतसे ॥ ५९ ॥ यापरी श्रीकृष्णनाथ । हो‌ऊनियां स्वानंदभरित । विसाव्या अध्यायींची मात । हरिखें सांगत उद्धवा ॥ ४६० ॥ अतां विसाव्याचा विसावा । स्वानंदासुखाचा हेलावा । तो मी सांगेन एकविसावा । ऐक उद्धवा सादर ॥ ६१ ॥ वेदीं शुद्धाशुद्धलक्षण । हें पुढिले अध्यायीं निरूपण । एका विनवी जनार्दन । श्रोतां अवधान मज द्यावें ॥ ६२ ॥ इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंथे भगवदुद्धवसंवादे एकाकार-टीकायां वेदत्रयीविभागयोगो नाम विंशोऽध्यायः ॥ २० ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ ३७ ॥ ओंव्या ॥ ४६२ ॥

संत श्री एकनाथ महाराज मिशनसाठी योगदान द्या

खाली दिलेल्या बँक खात्यात आपण दान करू शकता

खाताधारकाचे नाव:
Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission, Paithan
चालू खात्याचा क्रमांक:
00000036694177969
बँकेचे नाव:
State Bank Of India
IFSC कोड:
SBIN0003796
शाखा:
Bhaji Market, Paithan
logoseperator

संपर्क माहिती :

शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन,

द्वारा, श्री वेणीमाधव गोसावी,
श्रीनाथ गल्ली, श्रीक्षेत्र पैठण, जिल्हा छत्रपती
संभाजीनगर
पिन. ४३१००६

callमोबाईल क्रमांक : +९१ - ९४२१४१११३५

emailईमेल : info@santeknath.org