Marathi / English

अध्याय २३

॥ श्री एकनाथी भागवत ॥

अध्याय तेविसावा

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्‌गुरु विश्वरूप । विश्वा साबाह्य तूं चित्स्वरूप । तुझें निर्धारितां रूप । तूं अरूपाव्यय ॥ १ ॥ चराचर जें सावेव । तें तुज अरूपाचे अवेव । जीवशीव हे तुझी माव । अद्वयवैभव पै तुझें ॥ २ ॥ घृतपुतळी दिसे साकार । घृतपणें ते निराकार । तैसा तूं अव्यय अक्षर । जगदाकार भाससी ॥ ३ ॥ ठसावलें जें दिसे जग । निर्धारितां तुझें अंग । अंग पाहतां तूं अनंग । अनंगाचा माग तुजमाजीं नाहीं ॥ ४ ॥ देखिजे तें तूं नव्हसी । नव्हे तें तूंचि होसी । होणें न होणें नाहीं तुजपाशीं । ऐसा तूं जगासी जगद्‌गुरु ॥ ५ ॥ शब्द तुजहोनियां दूरी । तूं शब्द सबाह्य अंतरीं । बोलका तूं चराचरीं । वेदशास्त्रीं तूं वक्ता ॥ ६ ॥ उंसापासून गोडी दिसे । उंसा सबाह्य गोडीचि असे । गोडियेमाजीं ऊंस नसे । वेदांसी तुज तैसें सौजन्य ॥ ७ ॥ वेदांचा वक्ता तूंचि होसी । वेदीं प्रतिपादिजे तुम्हांसी । शेखीं वेदांसी नाकळसी । निःशब्दवासी गुरुराया ॥ ८ ॥ जेवीं कां निःशब्द अनाहतध्वनी । असे ध्वनिमात्रीं मिळूनी । तो अनाहत वाजविजे जनीं । ऐसें नाहीं कोणी वाजंत्र ॥ ९ ॥ तेवीं तूं वेदाचा वक्ता । सकाळ शास्त्रां युक्तिदाता । परी वेदशास्त्रार्थसंमता । तुज तत्त्वतां न बोलवे ॥ १० ॥ म्हणों तूं केवळ निःशब्द । तंव निःशब्द आणि सशब्द । हाही मायिक अनुवाद । तूं एवंविध न कळसी ॥ ११ ॥ तूं न कळसीचि तत्त्वतां । ऐशीया युक्तींचा तूंचि विज्ञाता । ज्ञाताचि हें जंव स्थापूं जातां । तंव अज्ञानता असेना ॥ १२ ॥ जेथ अज्ञानता नाहीं । तेथ ज्ञातेपण कैंचे कायी । हो कां मुख्यत्वें नोवरी नाहीं । तैं नोवरी पाहीं म्हणे कोण ॥ १३ ॥ ज्ञाता ना अज्ञाता । तूं बोलता ना नबोलता । तूं बहु ना एकुलता । तुझी अलक्ष्यता लक्षेना ॥ १४ ॥ तूं जगदाकार निःशब्द निर्विकार । तू निर्गुण निरहंकार । हेंही म्हणतां पडे विचार । तूं जगदाकार जगदात्मा ॥ १५ ॥ जगदाकारें तूं प्रसिद्ध । तेथ कोणाचें कोणा बाधे द्वंद्व । पर नाहीं मा परापराध । अतिविरुद्ध कोणासी ॥ १६ ॥ यापरी सद्‌गुरुनाथा । तुझे चरणीं द्वंद्वसमता । तेणें समसाम्यें निजकथा । श्रीभगवता चालविसी ॥ १७ ॥ तेंचि श्रीभागवतीं । बाविसावे अध्याया‌अंतीं । उद्धवें पुशिलें निजशांती । द्वंद्वसमाप्ति‌उपावो ॥ १८ ॥ उद्धवें प्रश्न केला वाडा । जेणें ब्रह्मज्ञानाची पुरे चाड । तो श्रीशुकासी लागला गोड । तेणें पुरे कोड परीक्षितीचें ॥ १९ ॥ ऐकोनि उद्धवाची प्रश्नोक्ती । शुक्र सुखावला आनंदस्फूर्ती । तो म्हणे सावध परीक्षिती । तुष्टला श्रीपती उद्धवासी ॥ २० ॥ ब्रह्मज्ञानाची निर्वाणस्थिती । ते जाण पां मुख्यत्वें शांती । ते उद्धवें पुशिली अतिप्रीतीं । तेणें श्रीपती संतोषला ॥ २१ ॥ तो शांति आणि निवृत्ती । सांगेल चौं अध्यायोक्ती । ऐक राया परिक्षीती । ते मी तुजप्रती सांगेन ॥ २२ ॥ ऐकें पांडवकुलदीपका । कौरवकुळीं कुलतिलका । तूं शांतीसी अधिकारी निका । निजात्मसुखा साधकू ॥ २३ ॥ साधावया ब्रह्मप्राप्ती । तूं त्यक्तोदक श्रवणार्थीं । यालागीं शांती आणि निवृत्ती । ऐक नृपती हरि सांगे ॥ २४ ॥ तेविसावे अध्यायीं निरूपण । दुर्जनीं क्षोभविलें मन । त्या मनासी ये क्षमा पूर्ण । तेंचि श्रीकृष्ण सांगेल ॥ २५ ॥ भिक्षुगीतसंरक्षण । तें मनोजयाचें लक्षण । प्रकृतिजयाचें निरूपण । सांगेल संपूर्ण चोविसावा ॥ २६ ॥ सांगोनि त्रिविध त्रिगुण । परी लक्षविलें निजनिर्गुण । हें गुण्जयाचें निरूपण सुलक्षण पंचविसावा ॥ २७ ॥ सव्विसावा अध्यावो येथ । तो धडधडीत विरक्त । सांगोनियां ऐलगीत । स्त्रियादि सम्स्त विषयत्यागु ॥ २८ ॥ गुण विषय प्रकृति मन । या चहूंचें समाधान ।चहूंचे समाधान । चहूं अध्यायीं विशद जाण । स्वमुखें श्रीकृष्ण सांगेल ॥ २९ ॥ यापरी परीक्षितीस जाण । करोनियां सावधान । श्रीशुकयोगींद्र आपण । कथालक्षण निरूपी ॥ ३० ॥ बादरायणीरुवाच- स एवमाशंसित उद्धवेन भागवतमुख्येन दाशार्हमुख्य । सभाजयन्‌ भृत्यवचो मुकुन्दस्तमाबभाषे श्रवणीयवीर्यः ॥ १ ॥ शुक म्हणे परीक्षिती । ऐकोनि उद्धवाची विनंती । वचनें संतोषला श्रीपती । तो उद्धवाप्रती संबोधी ॥ ३१ ॥ कोटी जन्मांतीं केवळ । द्विजत्वें पाविजे सक्तुळ । हें माहापुण्याचें निजफळ । तेंचि निष्फळ हरिभक्तीविणें ॥ ३२ ॥ सदा सफळ आंब्याचा रुख । त्यावरी उपजे कांवरुख । तो सफळींही निष्फळ देख । तैसे उत्तम लोक भजनेंवीण ॥ ३३ ॥ ते स्थिति नाहीं उद्धवापासीं । उत्तम जन्म यादववंशीं । सभासदता आल्याही हातासी । श्रीमदासी भुलेचिना ॥ ३४ ॥ झालियाही राज्यसंपत्ती । जो विसंबेना भगवद्भक्ती । भागवतमुख्यत्वाची प्राप्ती । त्यासीच निश्चितीं महाराजा ॥ ३५ ॥ सगुण सुंदर पतिव्रता । अनुकूळ मिळालिया कांता । जो विसंबेना भगवत्पथा । भागवतमुख्यता त्या नांव ॥ ३६ ॥ इंहीं गुणीं अतियुक्त । विवेकेंसी अतिविरक्त । श्रीकृष्णचरणीं अनुरक्त । मुख्य भागवत उद्धवू ॥ ३७ ॥ वयें धनें जें श्रेष्ठपण । तें श्रेष्ठत्व अतिगौण । भगवत्प्राप्ती ते श्रेष्ठ जाण । तेणें भाग्यें परिपूर्ण उद्धवू ॥ ३८ ॥ जो श्रीकृष्णचा विश्वासी । श्रीकृष्ण एकांत करी ज्यासी । गुण ज्ञान सांगे ज्यापाशीं । त्याच्या भाग्यासी केवीं वानूं ॥ ३९ ॥ परब्रह्म जें कां साक्षात । जें उद्धवासी झालें हस्तगत । त्याच्या बोलामाजीं वर्तत । भाग्यें भाग्यवंत तो एक ॥ ४० ॥ उद्धवभाग्य वानित वानित । शुक्र झाला सद्गदित । स्वानंदें वोसंडला तेथ । ठेला तटस्थ महासुखें ॥ ४१ ॥ उद्धवभाग्याचा उद्रेक । सांगतां वोसंडला श्रीशुक्त । तें देखोनि करुनायक । जाहला आत्यंतिक विस्मित ॥ ४२ ॥ ज्याचें निजभाग्य सांगतां । श्रीशुकासी होतसे अवस्था । उद्धव भाग्याचा तत्त्वतां । मजही सर्वथा मानला ॥ ४३ ॥ तंव शुक म्हणे रायासी । परम भाग्य तें उद्धवासीं । तेणें विनवितां हृषीकेशी । वचनमात्रेंसीं तुष्टला ॥ ४४ ॥ उद्धवासी शांतीची चाड । तो प्रश्न श्रीकृष्णांसी झाला गोड । त्यांचे पुरवावया कोड । निरूपण वाड सांगेल ॥ ४५ ॥ परम शांतीचा अधिकारी । तूंचि एक निजनिर्धारीं । ऐसें उद्धवप्रेमपुरस्करीं । शांति श्रीहरि सांगत ॥ ४६ ॥ श्रीभगवानुवाच- ब्रार्हस्पत्य स वै नात्र साधुर्वै दुर्जनेरितैः । दुरुक्तैर्भिन्नमात्मानं यः समाधातुमीश्वरः ॥ २ ॥ उद्धवा तू जें बोलिलासी । मीही सत्य मानीं त्यासी । दुर्जनीं केल्या अपमानासी । सहावया कोणासी शांत्ति नाहीं ॥ ४७ ॥ देव पादुका वाहती शिरसीं । मुख्य इंद्र लागे ज्याच्या पायांसीं । अष्ट महासिद्धि ज्याच्या दासी । ब्रह्मज्ञान ज्यपाशीं वचनांकित ॥ ४८ ॥ ऐसा देवगुरु बृहस्पती । त्याचा शिष्य तूं विवेकमूर्ती । यालागीं शांतीच्या साधक युक्तीं । तूंचि निश्चितीं जाणसी ॥ ४९ ॥ शांति आकळावया उद्धवासी । आदरें सत्कारी हृषीकेशी । अनुमोदूनि त्याचे बोलासी । शुद्ध शांतीसी हरि सांगे ॥ ५० ॥ निंदा अवज्ञा हेळण । दुर्जनीं केलिया अपमान । हें साहे तो ईश्वर जाण । निजबोधें पूर्ण तो मद्रूप ॥ ५१ ॥ ज्यासी सर्वभूतीं निजात्मता । दृढ बाणलीसे तत्त्वतां । तो दुर्जनाचिया आघाता । साहे सर्वथा यथासुखें ॥ ५२ ॥ जो स्वयें होय अवघें जग । त्यासी लागतां उपद्रव अनेग । उठेना क्रोधाची लगबग । साहे अनद्वेग यथासुखें ॥ ५३ ॥ निजांगीं लागतां निजकर । नुठी क्रोधद्वेषांचा उद्गार । निजात्मता जो देखे चराचर । शांति त्याचें घर स्वयें रिघे ॥ ५४ ॥ उद्धवा ऐसा ज्यासी निजबोधू । त्यासी म्हणिजे सत्य साधू । तोचि साहे पराचा अपराधू । शांतिशुद्ध तो एक ॥ ५५ ॥ नेणोनियां निजबोधातें । इतर जे सज्ञान ज्ञाते । ते न साहती द्वंद्वातें । एक तूतें सांगेन ॥ ५६ ॥ न तथा तप्यते विद्ध पुमान्बाणैः सुमर्मगैः । यथा तुदन्ति मर्मस्था ह्यसतां परुषेषवः ॥ ३ ॥ तिख्याचे अतितिख बाण । जेणें घायें होती विकळ प्राण । त्याहूनि दुर्जनाचे वाग्बाण । अधिक जाण रुपती ॥ ५७ ॥ लोहाचे बाण जेथ लागती । तेचि अंगें व्यथित होती । परी वाग्बाणांची अधिक शक्ती । घायें भेदिती पूर्वज ॥ ५८ ॥ लोहबाणाचे लागलिया घाये । ते पानपाल्या व्यथा जाये । परी वाग्बाण रुपल्या पाहें । तें शल्य राहे जन्मांत ॥ ५९ ॥ वर्मस्पर्शाचें बासटें जाण । विंधितां निंदेचे वाग्बाण । तेणें भेदितांचि अंतःकरण । सर्वांगीं पूर्ण भडका उठी ॥ ६० ॥ दुर्जनाचिया दुरुक्ती । अपमानाची उद्धती । साहावयालागीं शांती । नव्हे निश्चितीं प्राकृतां ॥ ६१ ॥ ऐशिया रीतीं यथोचित । उद्धवाचें मनोगत । संलक्षूनि श्रीकृष्णनाथ । शांतीचा निश्चितार्थ सांगों पाहे ॥ ६२ ॥ पूर्वीं सांगीतलें निजशांतीसी । वेगीं साधीं म्हणे उद्धवासी । ते अटक वाटेल तयासी । अतिसंकोचासी पावेल ॥ ६३ ॥ होतें उद्धवाचे मानासीं । हे शांति असाध्य सर्वांसी । जाणोनियां हृषीकेशी । सांगे इतिहासेंसीं भिक्षुगीत ॥ ६४ ॥ कथयन्ति महत्पुण्यमितिहासमिहोद्धव । तमहं वर्णयिष्याचि निबोध सुसमाहितः ॥ ४ ॥ अशांतिक्षोभाचे चित्तमळ । क्षाळावया जी तत्काळ । इतिहासगंगा केवळ । अतिनिर्मळ कृष्णोक्ति ॥ ६५ ॥ श्रीकृष्णवदनब्रह्माद्रीं । श्रीभागवत‌औदुंबरीं । जन्मली शांतिगोदावरी । निजमूळाकारीं निर्मळ ॥ ६६ ॥ ते गुप्त ओघें नारदगती । उद्धवगंगाद्वारीं व्यासोक्ती । तेचि शुकमुखकुशावर्तीं । प्रकटे अवचितीं पवित्रपणें ॥ ६७ ॥ तया पवित्र ओघाचिये गती । श्रद्धाधृती समरसे भक्ती । त्याचि अरुणा वरुणा सरस्वती । हे संगमप्राप्ती जेथ होय ॥ ६८ ॥ तेणें सांतिगंगेची स्थिती । भरूनि उथळे अति‌उन्नती । तेथ श्रवणार्थी बुडी देती । ते पवित्र होती निजक्षमा ॥ ६९ ॥ ते शांतिगंगा अतिविख्यात । उद्धव करावया पुनीत । प्रकट करी श्रीकृष्णनाथ । भिक्षुगीतविन्यासें ॥ ७० ॥ केनचिद्भिक्षुणा गीतं परिभूतेन दुर्जनैः । स्मरता धृतियुक्तेन विपाकं निजकर्मणाम्‌ ॥ ५ ॥ उद्धवा कोणी एक संन्यासी । दुर्जनैः उपद्रवितां त्यासी । म्हणे क्षयो होय दुष्टकर्मासी । येणें संतोषें मानसीं क्षमावंत ॥ ७१ ॥ आपुलें अंगींचे मळ । पुढिलीं क्षाळितां सकळ । जो क्रोधेंसीं करी तळमळ । तो मूर्ख केवळ आत्मघाते ॥ ७२ ॥ लोक म्हणती ज्यासी दुर्जन । संन्यासी म्हणे ते माझे स्वजन । माझे दोषांचें निर्दळण । यांचोनि धर्में जाण होतसे ॥ ७३ ॥ संमुख कोणी निंदा करिती । तेणें अत्यंत सुखावे चित्तीं । म्हणे मज तुष्टला श्रीपती । पापाची निष्कृती सहजें होय ॥ ७४ ॥ ऐसोनि विवेकें तत्त्वतां । शांतीसी ढळो नेदी सर्वथा । चढोनि निजधैर्याचे माथां । गातिली गाथा ते ऐक ॥ ७५ ॥ उद्धवासी म्हणे श्रीकृष्णनाथ । ये अर्थीं हो‌ईं सावचित्त । अतिलोभी तो अतिविरिक्त । झाला तो वृत्तांत सांगेन ॥ ७६ ॥ अवन्तिषु द्विजः कश्चिदासीदाढ्यतमः श्रिया । वार्तावृत्तिः कदर्यस्तु कामी लुब्धोऽतिकोपनः ॥ ६ ॥ मालवदेशीं अवंतिनगरीं । तेथ ब्राह्मण वसे गृहद्वारीं । कृषिवाणिज्यवृत्तिवरी । जीविका करी निंरतर ॥ ७७ ॥ गांठीं धनधान्यसमृद्धी । अमर्याद द्रव्यसिद्धी । परी अतिशयें कृपणबुद्धी । पोटाही त्रिशुद्धी न खाय ॥ ७८ ॥ पोटा सदा खाय कदत्र । तेहीं नाहीं उदरपूर्ण । तेथ स्त्रीपुत्रादि दासीजन । जठरतर्पण न पावती ॥ ७९ ॥ न करी नित्यनैमित्य । स्वप्नीं नेणे धर्मकृत्य । देव ब्राह्मण अतिथी येथ । सदा जात पराङ्मुख ॥ ८० ॥ कवडी एक लाभू पाहे । तैं मातापित्यांचें श्राद्ध आहे । तें सांडूनि अंत्यजगृहा जाये । न मनी भये स्पर्शाचें ॥ ८१ ॥ मी उत्तम हा हीनवर्ण । हे धनलोभें गिळी आठवण । हाता येतां देखोनि धन । स्वीकारी अन्न पतिताचें ॥ ८२ ॥ धनकामासाठीं देख । न मनी पाप महादोख । कवडीच्या लोभें केला मूर्ख । नाठवे नरकमहापातू ॥ ८३ ॥ यापरी तो कर्मभ्रष्ट । अकर्म करी क्रियानष्ट । अतिवंचक महाशठ । केवळ नष्ट धनलोभी ॥ ८४ ॥ त्या धनलाभाचा अवरोधू । होतां देखोनि खवळे क्रोधू । गोहत्यादि ब्रह्मवधू । करावया सिद्धू स्वयें होय ॥ ८५ ॥ धनकामीं क्रोधाची वस्ती । धनापाशीं पापें असती । धनलोभीं ज्याची स्थिती । कदर्यवृत्ती त्या नांव ॥ ८६ ॥ ऐसें धन सांचिलें फाडोवाडें । त्याचाही व्यय जैं करणें पडे । तैं प्राणांताचि ये‌ऊनि घडे । विचार पुढें असेना ॥ ८७ ॥ वानराचे गाळींचे चणे । हाता न येती जितां प्राणें । तैसा द्रव्याचा व्ययो करणें । तेंचि मरणें कदर्या ॥ ८८ ॥ ज्ञातयोऽतिथयस्तस्य वाङ्मात्रेणापि नार्चिताः । शुन्यावसथ आत्मापि काले कामैरनर्चितः ॥ ७ ॥ घरींचा भात वेंचेल कांहीं । यालागीं वैश्वदेव करणें नाहीं । तेथ अतिथि आलिया पाहीं । कोणे समयीं कोण पूजी ॥ ८९ ॥ अतिथि आलिया जाण । ऐसे बोल बोले आपण । जे वचनमात्रें जाती प्राण । त्यासी मागे कोण अन्नोदक ॥ ९० ॥ देखोनि त्याचिया घरासी । ब्रह्मचारी नित्य उदासी । आशा त्यजिली संन्यासीं । जेवीं राजहंसीं गोमय ॥ ९१ ॥ भिकारीं सांडिलें त्याचें द्वार । अतिथीं डावलिलें निरंतर । पाहुणा दूरी पाहे बिढार । निराशी पितर सर्वदा ॥ ९२ ॥ दारा न ये कोरान्नकर । घर सांडूनि गेले उंदिर । का‌उळीं वोसंडिलें तें घर । चिडियां साचार न मिळे दाणा ॥ ९३ ॥ मुंग्यांसी पडे नित्य लंघन । तिंही धरिलें बिढार आन । पोटा ना खाय जो आपण । तेथ कथा कोण इतरांची ॥ ९४ ॥ अत्यंत भूक लगल्या पोटीं । चणेही न खाय जगजेठी । तेथ कायसी सेवकांची गोठी । कावलीं पोटीं स्त्रीपुत्रें ॥ ९५ ॥ जैं वमन घडे त्यासी । तैं न करी फळाहारासी । अधिक वेंचू कोण सोशी । यालागीं उपवासी स्वयें पडे ॥ ९६ ॥ तेथ कुळगुरूचा सन्मान । कुळधर्म गोत्रभोजन । व्याही जांव‌ई यांचा मान । धनलोभी जाण कदा न करी ॥ ९७ ॥ ऋतुकाळें फळें येती पूर्ण । त्यांसी दृष्टिभेटी हाटीं जाण । परी जिव्हेसी आलिंगन । प्राणांतीं आपण हों नेदी ॥ ९८ ॥ मातेचें स्तनपान सेविलें । तेंचि क्षीर रसना चाखिलें । पुढें दूधचि वर्जिलें । व्रत धरिलें धनलोभें ॥ ९९ ॥ तस रसनेचें माहेर । तेणेंवीण ते गादली थोर । धनलोभ अतिनिष्ठुर । करितां करकर भेटों नेदी ॥ १०० ॥ वस्त्रें मळकीं अतिजीर्ण । मस्तक सदा मलिन । मुखीं वास निघती जाण । स्वप्नींही पान न खाय ॥ १ ॥ सण वार दिवाळी दसरा । तैं जुने जोंधळे धाडी घरा । अन्नेंविण पीडी लेंकुरां । कदर्यु खरा या नांव ॥ २ ॥ धनलोभी धर्महीन । देखोनि कदर्युवर्तन । विमुख झाले स्वजन । तेंचि निरूपण हरि सांगे ॥ ३ ॥ दुःशीलस्य कदर्यस्य द्रुह्यन्ते पुत्रबान्धवाः । दारा दुहितरो भृत्या विषण्णा नाचरन्‌ प्रियम्‌ ॥ ८ ॥ नाहीं स्वधर्मीं निजशीळ । दानधर्म खुडी सकळ । अत्यंत धनलोभी केवळ । त्यासी दुःशीळ बोलिजे ॥ ४ ॥ अन्ना‌आच्छादनेंवीण । कुटुंबेंसहित आपण । जो कदर्थवी निजप्राण । कदर्यु पूर्ण त्या नांव ॥ ५ ॥ कदर्यु नरासी तंव देख । मुख स्त्री होय विमुख । स्वजन आणि सेवक ।पुत्रही पराङ्मुख होती त्यासी ॥ ६ ॥ आपले जे कां सखे बंधू । तेही करूं लागती विरोधू । द्रव्यविभागाचा संबंधू । कलह सुबद्धू आरंभे ॥ ७ ॥ गांठीं असोनि अमित धन । न करी माहेरसणबोळवण । कन्या क्षोभोनियां जाण । शाप दारुण त्या देती ॥ ८ ॥ गोत्रज सदा चिंतित । हा मरे तैं जेवूं दूधभात । आप्त ते झाले अनाप्त । अवघे अनहित वांछिती ॥ ९ ॥ जयाचिया द्रव्यासी जाण । नाहीं धर्माचें संरक्षण । तें काळेंचि होय क्षीण । तेंचि लक्षण हरि सांगे ॥ ११० ॥ तस्यैंव यक्षवित्तस्य च्युतस्योभयलोकतः । धर्मकामविहीनस्य चिक्रुधुः पञ्चभागिनः ॥ ९ ॥ खाय ना जेवी ना लावी हात । ठेव्यापाशीं जैसें भूत । तैंसे याचें यक्षवित्त । असे राखत ग्रहो जैसा ॥ ११ ॥ केवळ धर्मकामरहित । धनलोभी जैसें भूत । त्या नांव बोलिजे यक्षवित्त । जीवाहून आप्त अर्थ मानी ॥ १२ ॥ स्वशरीरीं भोग नाहीं जाण । तेणें इहलोक झाला शून्य । नाहीं स्वधर्मकर्म पंचयज्ञ । परलोक शून्य तेणें झाला ॥ १३ ॥ यज्ञाचे पंच विभागी । यज्ञभाग न पवे त्यांलागीं । ते कोपोनियां पंचविभागीं । वित्तनाशालागीं उद्यत ॥ १४ ॥ पावोनि ब्राह्मणजन्म वरिष्ठ । धनलोभें स्वधर्मनष्ट । तो होय उभय लोकीं भ्रष्ट । पावे कष्ट कृपणत्वें ॥ १५ ॥ करितां अति‌आयास । जोडला अर्थ बहुवस । त्यासी अधर्में आला नाश । तोही विलास हरि सांगे ॥ १६ ॥ तदवध्यानविस्त्रस्तपुण्यस्कन्धस्य भूरिद । अर्थोऽप्यगच्छन्निधनं बह्वायासपरिश्रमः ॥ १० ॥ पंचयज्ञदेवता सकळ । येणें उपेक्षिल्या केवळ । तिंहीं द्रव्यलाभाचें मूळ । पुण्यक्षयें तत्त्काळ छेदिलें ॥ १७ ॥ द्रव्यप्राप्तिपुण्यदिवाकर । अस्तमाना गेला तो भास्कर । मग द्रव्यलाभाचा अंधकार । अधर्में थोर दाटला ॥ १८ ॥ प्रयासें संचिली संपत्ती । तिसी अधर्मांधराची ये राती । क्षोभल्या पंचधा यज्ञमूर्ती । पंचधा पावती महानाश ॥ १९ ॥ जो सुखी न करी कुंटुंबालागीं । जो निजात्मा निववीना नाना भोगीं । जो द्रव्य न वेंची धर्मालागीं । त्यसी पंचविभागी ऊठती ॥ १२० ॥ दायाद चोर राजा आगी । अधर्में रोग संचरे अंगीं । हे पांचजण विभागी । द्रव्यनाशालागीं पावती ॥ २१ ॥ नाहीं द्विजपूजा श्रद्धायुक्त । नाहीं लौकिकक्रिया उचित । नाहीं दानादि धर्म वेदोक्त । द्रव्यक्षयो तेथ आवश्यक ॥ २२ ॥ जेथ नाहीं वडिलांसी सन्मान । जेथ नाहीं पंचमहायज्ञ । जेथ गुरूसीं करी अभिमान । तेथ क्षयो जाण उद्धवा ॥ २३ ॥ ज्यांसी परांचा द्वेष सदा । जे बोलती परापवादा । जे चढती धनगर्वमदा । तेथ क्षयो सदा उद्धवा ॥ २४ ॥ त्याच द्रव्यक्षयाचें लक्षण । ग्रंथाधारीं निरूपण । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । दयाळू पूर्ण निजभक्तां ॥ २५ ॥ ज्ञातयो जगृहुः किश्चित्‌ किश्चिद्दस्यव उद्धव । दैवतः कालतः किश्चिद्बह्यबन्धोर्नृपार्थिवात्‌ ॥ ११ ॥ स्त्री पुत्र हो‌ऊनि एक । तिंही ठेवा नेला कित्येक । गोत्रज मिळोनि सकळिक । बलात्कारें देख वांटा नेला ॥ २६ ॥ चोरीं फोडोनियां घर । काढूनि नेलें भांडार । आगी लागोनियां घर । वस्तु अपार जळाल्या ॥ २७ ॥ हिंसाळ्यानें गेलें शेत । प्रवर्त बुडाला जेथींचा तेथ । विश्वासू ठेवा घे‌ऊनि जात । खतखूत हारपलें ॥ २८ ॥ भांडीं ठेविला कापूर उडे । समुद्रामाजीं तारूं बुडे । पातिकरावरी घाला पडे । चहूंकडे अपावो ॥ २१ ॥ ठक ये‌ऊनि एकांतीं । मुलाम्याचीं नाणीं देती । धनलोभाचे काकुळती । हातींची संपत्ती त्यांसी दे ॥ १३० ॥ स्वचक्रपरचक्रविरोधधाडी । खणती लावूनि घर फोडी । तळघरींचे ठेवे काढी । भरोनि कावडी धन नेती ॥ ३१ ॥ पाणी रिघे पेंवा‌आंत । तेणें धान्य नासे समस्त । धटू झोंबोनि हरी शेत । दैवहत तो झाला ॥ ३२ ॥ गोठणीं सेणयां रोगू पडे । निमाले गायीम्हशींचे वाडे । उधारें नेले ठाणबंदी घोडे । तो रणीं म्हायुद्धीं ॥ ३३ ॥ भूमिनिक्षेप जे करूं जाती । ते आपणियाकडे धूळी ओढिती । तेथ घालूनि निजसंपत्ती । तोंडीं माती स्वयें घाली ॥ ३४ ॥ बुद्धि सांगती वाड । येथूनि तोंडीं घाला दगड । ऐसे ठेवे बुजिले दृढ । त्याची चाड धरूं गेला ॥ ३५ ॥ ठेवे ठेविले जे अनेक । ते पृथ्वीनें गिळिले निःशेख । भाग्य झालें जैं विमुख । झाले अनोळख ते ठाय ॥ ३६ ॥ अधर्में अदृष्ट झालें क्षीण । विपरीत देहींचें चिन्ह । पालटला निजवर्ण । ब्राह्मणपण लक्षेना ॥ ३७ ॥ देखे तो पुसे ज्ञाति कोण । तो सांगे जरी मी ब्राह्मण । ऐक त्याचें न मनी मन । वर्णाग्रपण मावळलें ॥ ३८ ॥ एवं निःशेष नासलें धन । ब्रह्मवर्चस्व गेलें जाण । म्लानवदन हीनदीन । खेदखिन्न अतिदुःखी ॥ ३९ ॥ स एवं द्रविणे नष्टे धर्मकामविवर्जित । उपेक्षितश्च स्वजनैश्चिन्तामाप दुरत्ययाम्‌ ॥ १२ ॥ गेलें शेत निमाली कुळवाडी । घर पाडिलें परचक्रधाडीं । धन नासलें नाहीं कवडी । अधर्माचें जोडी हे दशा ॥ १४० ॥ नाहीं स्वधर्मकर्म ना दान । विहित भोग न करी आपण । त्या धनलोभ्याचें नासलें धन । जेवीं कां स्वप्न रंकाचें ॥ ४१ ॥ दैव झालें पराङ्मुख । त्या हतभाग्याची दशा देख । स्त्रीपुत्रें झालीं विमुख । तिंहीं निःशेख दवडिला ॥ ४२ ॥ ऐक धनलोभाच्या ठायीं । इष्ट मित्र पूर्वींचि नाहीं । गोत्रजांसी त्याचें सुख कायी । दवडिला पाहीं उपेक्षितू ॥ ४३ ॥ निंदा प्रत्यक्ष करिती लोक । रांडा पोरें थुंकती देख । खावया नाहीं निःशेख । मागतां भीक मिळेना ॥ ४४ ॥ भिकेलागीं जेथ जेथ गेला । म्हणती काळमुखा येथें कां आला । होता धनलोभें भुलला । भला नागविला ईश्वरें ॥ ४५ ॥ यापरी धिक्कारिती लोक । धन जा‌ऊनि झाला रंक । चिंतावर्तीं पडला देख । द्‌ःखें महादुःख पावला ॥ ४६ ॥ तस्यैवं ध्यायतो दीर्घं नष्टरायस्तपस्विनः । खिद्यतो बाष्पकण्ठस्य निर्वेदः सुमहानभूत्‌ ॥ १३ ॥ धनलोभ्याचें गेलें धन । धनासवें न वचेचि आठवण । तें आठवतां फुटताहे मन । तळमळी जाण अतिदुःखें ॥ ४७ ॥ कांटा रुतल्या भुजंगकपाळीं । पुच्छ तुटल्या सापसुरळी । हो कां जळावेगळी मासोळी । तैसा तळमळी अतिदुःखें ॥ ४८ ॥ मनें आठवितांचि धन । हृदयीं चालिलें स्फुंदन । अश्रुधारा स्त्रवती नयन । मूर्च्छापन्न क्षणक्षणां ॥ ४९ ॥ पोटीं दुःखें अति चरफडे । धाय मोकलूनियां रडे । उठे बैसे पाहे पडे । लोळे गडबडे आरडत ॥ १५० ॥ मग म्हणे रे कटकटा । झालें एक वेळ करंटा । अहा विधातया दुष्टा । काय अदृष्टा लिहिलेंसी ॥ ५१ ॥ मज ठावो नाही कोणीकडे । विचार संभवेना पुढें । अतिदुःख आलें जी रोकडें । तेणें विचारें रडे महादुःखी ॥ ५२ ॥ हें अल्पदुःख पावलों येथें । पुढें थोर दुःख आहे मातें । यम दंडील निष्ठर घातें । कोण तेथें सोडवी ॥ ५३ ॥ म्यां नाहीं दीधलें दान । मी नाहीं स्मरलों नारायण । मज येती नरक दारुण । तेथ कोण सोडवी ॥ ५४ ॥ म्यां नाहीं केले पंचमहायज्ञ । नाहीं दीधलें अतिथींसी अन्न । नाहीं केलें पितृतर्पण । माझे दुःख कोण निवारी ॥ ५५ ॥ म्यां नाहीं केली द्विजपूजा । नाहीं भजलों अधोक्षजा । नाहीं वंदिले वैष्णवरजा । माझे दुःखसमाजा कोण नाशी ॥ ५६ ॥ मी सर्वथा अकर्मकाती । बुडालों अघोरीं । धांव पाव गा श्रीहरी । मज उद्धरीं दीनातें ॥ ५७ ॥ कृष्णा माधवा मुरारी । अच्युता अनंता श्रीहरी । गरुडध्वजा गोवर्धनधारी । मज उद्धरीं दीनातें ॥ ५८ ॥ तुवां रक्षिलें प्रल्हादासी । अंबरीषासी गर्भवासीं । उदरीं राखिलें परीक्षितीसी । तैसें मज दीनासी उद्धरीं ॥ ५९ ॥ तुवां तारिलें अहल्येसी । उद्धरिलें नष्टा अजामिळासी । उडी घातली गजेंद्रासी । तेणें वेगेंसी मज तारीं ॥ १६० ॥ महादोषांची श्रेणी । नामें तारिली कुंटिणी । तेणें लाघवें चक्रपाणी । मज दुष्टालागोनी उद्धरीं ॥ ६१ ॥ जळो जळो हा धनकाम । गेलें वृथा माझें जन्म । फुकाचें जें रामनाम । तें मी अधम न म्हणेंचि ॥ ६२ ॥ रामनामाच्या प्रतापासाठीं । जळती म्हापापांच्या कोटी । थोर अधम मी एक सृष्टीं । नाम वाक्पुटीं न म्हणेंचि ॥ ६३ ॥ ऐसा मानोनि अपराध । अनुतापें करितां खेद । उपजला अतिनिर्वेद । तेंचि गोविंद स्वयें सांगे ॥ ६४ ॥ स चाहेदमहो कष्टं वृथाऽऽत्मा मेऽनुतापितः । न धर्माय न कामाय यस्यार्थायास ईदृशः ॥ १४ ॥ हात चुरूनि म्हणे कटकटा । ब्राह्मणदेहो मोक्षाचा वांटा । तो लाहोनि मी अतिकरंटा । धनलोभचेष्टा नाडलों ॥ ६५ ॥ जेणें देहें लाभे मोक्षसुख । त्या देहासी म्यां दीधलें दुःख । धनलोभी मी परम मूर्ख । मज‌ऐसा आणिक असेना ॥ ६६ ॥ न वेंचितां धर्मकामासी । अर्थ जोडिला सायासीं । त्या अर्थाची दशा ऐसी । अतिदुःखेंसीं मज फळला ॥ ६७ ॥ बाप धनलोभाचें कवतिक । नाही इहलोक ना परलोक । थितें अंतरले मोक्षसुख । भोगवी नरक अनिवार ॥ ६८ ॥ देखें ज्या नरकाचे ठायीं । आकल्प बुडतां ठावो नाहीं । धनलोभ घाली तैसें ठायीं । तें म्यां नरदेहीं जोडिलें ॥ ६९ ॥ जो जन्मला ब्राह्मणदेहीं । तो पूज्य होय लोकीं तिहीं । मोक्ष लागे त्याच्या पायीं । म्यां अभाग्यें तोही नाशिला ॥ १७० ॥ लोभें जें धन संचिलें । तें निःशेष नासोनि गेलें । परी मजलागीं अतिदुःखी केलें । बांधोनि दीधलें महानरका ॥ ७१ ॥ उत्तम देहो झाला प्राप्त । तो धनलोभें केला व्यर्थ । आयुष्य गेलें हातोहात । अतिसंतप्त अनुतापें ॥ ७२ ॥ धनलोभींचे अचाट । वृथा गेले माझे कष्ट । वैराग्य उपजलें उद्भट । अतिचोखट सविवेक ॥ ७३ ॥ धनलोभी जो कां नर । तो सकल दुःखांचें भांडार । धनबद्धक तो पामर । स्वमुखें साचार निंदीत ॥ ७४ ॥ प्रायेणार्थाः कदर्याणां न सुखाय कदाचन । इह चात्मोपतापाय मृतस्य नरकाय च ॥ १५ ॥ प्रायशा जे धनबद्धक । त्यांसी इहलोकीं नाहीं सुख । धनरक्षणीं अतिदुःख । तें जातां देख प्राणान्त ॥ ७५ ॥ धनागमनीं अतिकष्ट । धनरक्षणीं कलह श्रेष्ठ । धननाशें होय हृदयस्फोट । इहलोकीं कष्ट धनलोभ्या ॥ ७७ ॥ जो धर्म करीन स्वयें न खाये । जो मजसारिखा कदर्यु होये । त्यासी चढतें वाढतें दुःख पाहें । नाहीं सुखसोये कदर्या ॥ ७८ ॥ लोभाची वस्ती जिये ठायीं । तेथ स्वप्नींही सुख नाहीं । लोभ अतिशयें निंद्य पाहीं । तें आपण स्वमुखेंही सांगत ॥ ७९ ॥ यशो यशस्विनां शुद्धं श्लाघा ये गुणिनां गुणाः । लोभः स्वलोऽपि तान्‌ हन्ति श्वित्रो रूपमिवेप्सितम्‌ ॥ १६ ॥ रणीं पडतां मुख्य धुरेसी । जो अंगें विभांडी त्या रणासी । खांदीं वा‌ऊनि आणी रायासी । येवढी कीर्ति ज्यासी जोडली ॥ १८० ॥ लोभ संचरोनि त्यापाशीं । एक शेत मागवी रायासी । तेचि अपकीर्ति होय त्यासी । जग उपहासी मूर्खत्वा ॥ ८१ ॥ त्यासी न मागतां राजा जाण । करूं पाहे आपणासमान । त्यासी लोभें आणोनि नागवण । मूर्खपण स्थापिलें ॥ ८२ ॥ स्वयें करितां कन्यादान । सकळ कुळ होय पावन । तेथेंही लोभें घेतां धन । अधःपतन धनलोभिया ॥ ८३ ॥ दाता दे‌ऊनियां दान । दानप्रसंगें उपार्जी धन । तेंचि दात्यासी दूषण । लोभ लांछन दानासी ॥ ८४ ॥ वेदशास्त्रें करूनि पठण । पंडित झाले अतिसज्ञान । तेही धनलोभें छळिले जाण । ज्ञानाभिमान प्रतिष्ठे ॥ ८५ ॥ देहप्रतिष्ठेचिये सिद्धी । पंडित-पंडितां वादविधी । नाना छळणोक्ती विरोधीं । ठकिले त्रिशुद्धी ज्ञातें लोभें ॥ ८६ ॥ सविवेक सज्ञान ज्ञात्यासी । लोभ आणी निंदस्पदासी । इतरांची गति का‌इसी । ते लोभाची दासी हो‌ऊनि ठाती ॥ ८७ ॥ लोभ शुद्धीसी करी अशुद्ध । लोभ तेथ निंदास्पद । तोचि दृष्टांत विशद । ऐक प्रसिद्ध सांगत ॥ ८८ ॥ कुलशील अतिसुकुमार । रूपें सर्वांगमनोहर । नाकीं श्वेतता अणुमात्र । निंद्य सुंदर तेणें होय ॥ ८९ ॥ तेवीं अल्पही लोभाची जे वस्ती । नाशी गुणौदार्ययशः कीर्ती । लोभा‌ऐसा त्रिजगतीं । कर्ता अपकीर्ती आन नाहीं ॥ १९० ॥ धनलोभीं सदा विरोधू । धनलोभ तोडी सखे बंधू । धनलोभा‌ऐसा नाहीं बाधू । अति‌अशुद्धू आणिक असेना ॥ ९१ ॥ अर्थस्य साधने सिद्धे उत्कर्षे रक्षणे व्यये । नाशोपभोग आयासस्त्रासश्चिन्ता भ्रमो नृणाम्‌ ॥ १७ ॥ प्रथम शिणावें द्रव्य जोडितां । दुसरें शिणावें तें वाढवितां । द्रव्य जरी झालें उत्कर्षतां । तरी लोभ सर्वथा पुरे न म्हणे ॥ ९२ ॥ द्रव्यालागीं भावार्थतां । जैसे कष्टती सर्वथा । तैसा जरी कष्टे परमार्था । तैं ब्रह्म तत्त्वतां खेळणें होय ॥ ९३ ॥ एवं कष्टीं जोडल्या द्रव्यासी । रक्षणीं अतिचिंता मानसीं । अतिशय लागली जीवासी । अहर्निशीं धुकधुकी ॥ ९४ ॥ स्त्री पुत्र हो माता पिता । त्यांसी पतिजेना सर्वथा । आपणाहूनि परता । विश्वासू अर्था मानेना ॥ ९५ ॥ विसरोनियां निजघाता । चोरापासोनि राखे वित्ता । वित्तरक्षणीं निजचिंता । तिन्ही अवस्था एकाग्र ॥ १६ ॥ ऐसी एकाग्रता करूनी । जरी लागता भगवद्भजनीं । तरी वश्य होता चक्रपाणी । अर्धक्षणीं साधका ॥ ९७ ॥ उचिचानुचित विवाहासी । द्रव्य वेंचितां उदरासी । अतिशय होय कासविसी । धनव्ययो त्रासासी उपजवी ॥ ९८ ॥ एवं जोडूनि रक्षीतां द्रव्यासी । अवचटें नाश होय जैं त्यासी । तै अतिभ्रम चढे मानसीं । होती धनपिशीं बद्धक ॥ ९९ ॥ द्रव्यार्जनीं वसे प्रयास । द्रव्यरक्षणीं चिंतेचा वास । द्रव्यव्ययीं वळसा त्रास । भ्रमाचा रहिवास धननाशीं ॥ २०० ॥ आसिमध्यावसानीं पाहीं । द्रव्य तें समूळ अपायी । तेथ सुखाचा लेश नाहीं । हें ऐसें पाहीं मज जाहलें ॥ १ ॥ आयास-त्रास-चिंतेसहित । धनापाशीं भ्रम नांदत । अर्थ तितुका अनर्थयुक्त । तोचि अर्थ स्वयें सांगे ॥ २ ॥ स्तेयं हिंसानृतं दम्भः कामः क्रोधः स्मयो मदः । भेदो वैरमविश्वासः संस्पर्धा व्यसनानि च ॥ १८ ॥ अर्थ सर्वांगे अनर्थभूत । हें माझें वचन त्रिसत्य । पृथ्वीमाजीं जे जे अनर्थ । ते ते अर्थांत उपजती ॥ ३ ॥ पुसाल अर्थींचे अनर्थ । ते सांगता असंख्य अनंत । संक्षेपें सांगेन येथ । पंधरा अनर्थ अर्थासी ॥ ४ ॥ प्रथम अनर्थ अर्थासी । चोरी वसे अर्थापासीं । अर्थु नाहीं गा जयापाशीं । चोरापासून त्यासी भय नाहीं ॥ ५ ॥ द्रव्य नाहीं ज्याच्या हातीं । त्यातें देखोनि चोर भिती । कांहीं मागेल आम्हांप्रती । म्हणोनि लपती त्या भेणें ॥ ६ ॥ अतर्क्य नेत्रांतरें नेणें । कां धातुवादें सर्वस्व घेणें । परस्व भोळ्यांनीं बुडवणें । कां विजनीं हरणें सर्वस्व ॥ ७ ॥ मार्गीं पडलें धन पराचे । स्वयें जाणोनि अमकियाचें । नाही देणें त्यासी साचें । हेंही चोरीचें लक्षण ॥ ८ ॥ स्वर्णस्तेयें नरकप्राप्ती । ऐसे विवेकीही चोरी करिती । मा इतरांची कायशी गती । चोरीची वस्ती धनापाशीं ॥ ९ ॥ जंगीं महापापिणी चोरी । तीस कोणी बैसों नेदी द्वारीं । ते राहिली सुवर्णामाझारीं । धन तेथ चोरी निश्चित ॥ २१० ॥ देखतांचि त्या धनासी । विकल्पी होती संन्यासी । इतरांची कथा का‌इसी । चोरी धनापाशीं स्वयें नांदे ॥ ११ ॥ प्रथम अनर्थलक्षण । धनापाशीं चोरी जाण । धन हिंसेचे आयतन । तेंही निरूपण अवधारीं ॥ १२ ॥ धनालागीं द्वंद्व दारुण । पुत्रपौत्र मरिती जाण । धनालागीं घेती प्राण । सहृदपण सांडोनी ॥ १३ ॥ धनलोभाचें कवतिक । कन्या बापासी देतसे विख । पितृघाताचें न मानी दुःख । निष्ठुर देख धनलोभ ॥ १४ ॥ धनलोभी सांडी बापमाये । स्त्री घे‌ऊनि वेगळा राहे । तेथही धनलोभ पाहें । वैर होये स्त्रीपुरुषां ॥ १५ ॥ धनलोभाची नवलपरी । पुत्र पित्यातें जीवें मारी । पिता पुत्रातें संहारी । कठिण भारी धनलोभ ॥ १६ ॥ जे नवमास वाहे उदरांत । जे सदा सोशी नरकमूत । ते मातेचा करी घात । द्रव्यानिमित्त निजपुत्र ॥ १७ ॥ अभिनव धनलोभाची त्राय । नवल तें मी सांगों काय । पोटींचा पुत्र मारी माय । ऐसा अनर्थ होय धनसाठीं ॥ १८ ॥ एवं हिंसा ते हे संपूर्ण । दुसरें अनर्थलक्षण । आतां असत्याचें विंदान । तेंही निरूपण स्वयें सांगे ॥ १९ ॥ असत्य जन्मलें अर्थाच्या पोटीं । अर्थबळें तें दाटुगें सृष्टी । अर्थासवें असत्य उठी । असत्याची गांठी अर्थेंसीं ॥ २२० ॥ तो अर्थ असे जयापाशीं । कां अर्थ‌अपेक्षा जयासी । तेथ असत्य वसे कुटुंबेंसीं । धन तें मिरासी मिथ्यात्वीं ॥ २१ ॥ अर्थबळ थोर असत्यासी । मिथ्या बोलवी बापसी । धनलोभें झकवी मातेसी । सत्यत्व धनापाशीं असेना ॥ २२ ॥ क्रयविक्रयीं धनलोभें जाण । मिथ्या बोलती साधरण । परी वेदशास्त्रसंपन्न । धनार्थ सज्ञान बोलती मिथ्या ॥ २३ ॥ वेदींचा आठव न ये पूर्ण । तो संभावनेलागीं जाण । म्हणवी मी वेदसंपन्न । करावया यजन नीचाचें ॥ २४ ॥ भाग दे‌ऊनि मध्यस्था । मी चतुःशास्त्रीं । विख्याता । ऐसें मिथ्यात्वें छळी पंडिता । राजद्रव्यार्थालागुनी ॥ २५ ॥ विरक्त म्हणविती परमार्थी । तेथही असत्यें घातली वस्ती । नाथिल्या सिद्धि दाविती । अर्थप्राप्तीलागोनी ॥ २६ ॥ अर्थीं असत्याचा बडिवारू । सद्भावें केला जो सद्गुरू । त्यासी मिथ्या नास्तिक विचारू । एकान्तीं नरू प्रतिपादी ॥ २७ ॥ अर्थ नाहीं जयापाशीं । ना अर्थकल्पना जयासी । असत्य स्वर्शेना तयासी । कदाकाळेंसीं कल्पांतीं ॥ २८ ॥ अर्थापाशीं असत्य जाण । त्याचें सांगीतलें लक्षण । आतां अर्थापाशीं दंभ संपूर्ण । तेही वोळखण अवधारीं ॥ २९ । पोटीं नाहीं परमार्थ । धरोनियां अर्थस्वार्थ । स्वयें म्हणविती हरिभक्त । या नांव निश्चित भजनदंभू ॥ २३० ॥ धन जोडावयाकारणें । टिळे माळा मुद्रा धारणें । धनेच्छा उपदेश देणें । या नांव जाणणें दीक्षादंभू ॥ ३१ ॥ देखोनि धनवंत थोरू । त्यासी उपदेशीं अत्यादरू । नेमूनि गुरुपुजाकरभारू । सांगे मंत्रू दांभिक ॥ ३२ ॥ जयांपासोनि होय अर्थप्राप्ती । ते समर्थ शिष्य आवडती । दीन शिष्यातें उपेक्षिती । हे दांभिकस्थिती गुरुत्वा ॥ ३३ ॥ तुरूसी द्यावें तनु मन धन । ऐसें उपदेशूनि जाण । जो द्रव्य संग्रही आपण । तें दांभिकपण गुरुत्वा ॥ ३४ ॥ जेथ धनलोभ गुरूपाशीं । तो काय तारील शिष्यासी । धनलोभाची जाती ऐसी । करी गुरुत्वासी दांभिक ॥ ३५ ॥ आखाडभूती‌ऐसा जाण । गुरुपाशील न्यावया धन । उपदेश घे हो‌ऊनि दीन । तो दांभिक जाण शठ शिष्य ॥ ३६ ॥ गुरूपदेशें शिकोनि युक्ती । स्वयें ज्ञानाभिमाना येती । गुरूतें मानी प्राकृतस्थिती । तोही निश्चितीं दांभिक ॥ ३७ ॥ मी एक सधन सज्ञान । ऐसा सूक्ष्मरूप ज्ञानभिमान । करी गुरु‌आज्ञेचें हेळण । हेंही लक्षण दंभाचें ॥ ३८ ॥ अहं ब्रह्म हेही स्फूर्ती । न साहे जेथ स्वरूपस्थिती । तेथ मी ज्ञाता हे घोंगडी युक्ती । स्फुरे निश्चितीं सूक्ष्मदंभें ॥ ३९ ॥ जीवासी देहाचें मध्यस्थान । तेथ दंभाचें अधिष्ठान । त्यासी मिळोनियां मन । ज्ञानाभिमान उपजवी ॥ २४० ॥ नवल दंभाचें कवतिक । आम्ही अग्निहोत्री याज्ञिक । तेचि जीविका करूनि देख । नाडले वेदपाठक धनलोभें ॥ ४१ ॥ सोडोनि परमार्थाची पोथी । ब्रह्मज्ञान सांगे नाना युक्तीं । तेही ज्ञाते दंभे नाडिजेती । द्रव्यासक्ती धनलोभें ॥ ४२ ॥ मंत्रतंत्रांची कथा कोण । मुख्य गायत्री वेंचिती ब्राह्मण । आम्ही स्वधर्मनिष्ठापावन । म्हणती जाण दांभिक ॥ ४३ ॥ दंभें नाडिले संन्यासी । लौकिक राखणें पडे त्यांसी । ज्यालागीं मुंडिले शिसीं । त्या अर्थासी विसरले ॥ ४४ ॥ दृष्टि सूनि अन्नसन्मान । संन्यासी करिती शौच स्न्नान । शुद्ध न करवेचि निजमन । वादव्याख्यान अतिदंभें ॥ ४५ ॥ घ्यावया परद्रव्य परान्न । कां देहप्रतिष्ठेलागीं जाण । मिथ्या दाखवी सात्त्विकपण । हें दंभलक्षण पैं चौथें ॥ ४६ ॥ द्रव्यापाशीं वसे काम । अतिशयें अतिदुर्बम । द्रव्य तेथ कामसंभ्रम । अतिविषम सांगात ॥ ४७ ॥ द्रव्य नसतां अपेक्षाकाम । तो सबाह्य करवी अतिश्रम । अनेक कष्टांचें विषम । अतिदुर्गम भोगावी ॥ ४८ ॥ धन झालिया उन्मादकाम । करूं लागे अगम्यागम । उपजवी नाना अधर्म । निंद्य कर्म धनवंता ॥ ४९ ॥ कामु जडलासे धनेंसीं । तो सदा छळी धनवंतासी । काम खवळे धनापाशीं । अहर्निशीं मुसमुशित ॥ २५० ॥ धनापाशीं अति उद्धतू । काम पांचवा अनर्थू । काम तेथ निश्चितू । क्रोध नांदतू सैन्येंसीं ॥ ५१ ॥ कामप्राप्तीसी आडवी काडी । होतां क्रोधाची पडे उडी । खवळला अति कडाडी । तपाच्या कोडी निर्दाळित ॥ ५२ ॥ जप तप निष्ठा नेम । शिणोनि साधलें दुर्गम । क्रोध अति खवळल्या परम । ते करी भस्म क्षणार्धें ॥ ५३ ॥ धनाकडे कोणी दावी बोट । तेथ क्रोध उठी अचाट । वाढवी प्राणान्त कचाट । क्रोध अतिदुष्ट धनेंसीं ॥ ५४ ॥ धनागमनीं अवरोधू कां धनव्ययाचा संबंधू । ते संधीं खवळे क्रोधू । अतिविरोधू उन्मत्त ॥ ५५ ॥ धनापाशीं क्रोध समर्थू । हा सहावा अति‌अनर्थू । धनापाशीं गर्व अद्भुतू । तेंचि निश्चितू सांगत ॥ ५६ ॥ धनगर्वाचिये पुष्टी । सखा बाप नाणी दृष्टी । मातेतें म्हणे करंटी । इतरांच्या गोष्टी त्या काय ॥ ५७ ॥ सिद्ध साधक तापसी । त्यांतें देखोनि उपहासी । म्हणे करंटे ते होती संन्यासी । हरिदासासी विटावी ॥ ५८ ॥ अंगीं धनाचें समर्थपण । त्याहीवरी जैं झालें ज्ञान । तैं गर्वाचा ताठा चढे पूर्ण । जेवीं आरें धारणू गिळिला ॥ ५९ ॥ धनज्ञानगर्वाची जाती कैसी । गर्व करी सद्गुरूसी । त्याच्या वचनातें हेळसी । शेखीं धिक्कारेंसी निर्भर्त्सी ॥ २६० ॥ धनज्ञानगर्वाचें लक्षण । देखे सद्गुरूचे अवगुण । गुरूसी ठेवी मूर्खपण । मी एक सज्ञान हें मानी ॥ ६१ ॥ जो भ्रांत म्हणे सद्गुरूसी । गुरु मानी त्यांते द्वेषी । बाप गर्वाची जाती कैशी । देखे गुणदोषांसी सर्वांच्या ॥ ६२ ॥ नवल गर्वाची पैं काहणी । गुणू सर्वथा सत्य न मानी । दोष पडतांचि कानीं । सत्य मानी निश्चित ॥ ६३ ॥ सात्त्विक ये गर्वितापुढें । त्यासी सर्वथा मानी कुडें । अतिसात्त्विकता दृष्टी पडे । तरी मानी वेडें अर्बुजा ॥ ६४ ॥ अंगीं भवंडी भरे लाठी । तैं भूमी लागे ललाटीं । साष्टांग नमावया सृष्टीं । पात्र गर्वदृष्टीं दिसेना ॥ ६५ ॥ तेथें कोण दे सन्मान श्रेष्ठा । कायसी वृद्धाची प्रतिष्ठा । धनगर्वे चढला ताठा । मी एक मोठा ब्रह्मांडीं ॥ ६६ ॥ एक गुरुसेवाविश्वासकू । निजसेवा झाला वश्यकू । त्यासी गर्व चढे मी सेवकू । तो अतिबाधकू सेवका ॥ ६७ ॥ ऐसा अतिगर्वें उन्नद्ध । हा सातवा गर्वबाध । आतां धनापाशीं महामद । तोही संबंध द्विज सांगे ॥ ६८ ॥ ज्यासी चढे धनमदू । तो उघडे डोळां होय अंधू । कानीं नायके शब्दबोधू । धनमदें स्तब्धू सर्वदा ॥ ६९ ॥ धनमदें अति‌अंहता । धनमदें उद्धतता । धनमदें अद्वातद्वता । करी सर्वथा अधर्म ॥ २७० ॥ धनमद अति अपवित्र । तो चढल्या होय अतिदुस्तर । न म्हणे पात्र अपात्र । विचरे विचित्र योनीसी ॥ ७१ ॥ जो धनमदा वश होय । तो न मानी कोणाचेंही भय । न जावें तेथ स्वयें जाय । न खावें तें खाय यथेष्ट ॥ ७२ ॥ न धरावा तो संग धरी । न करावें तें कर्म करी । न बोलावें तें उच्चारी । जनाभीतरीं उद्भतू ॥ ७३ ॥ न देखे आपुलें केलें । परापवाद स्वयें बोले । नायके बापाचें शिकविलें । वेडें केलें धनमदें ॥ ७४ ॥ शिकविलें तें नायके । वरिलें तें करी आवश्यकें । साधुनिंदा निजमुखें । यथासुखें जल्पत ॥ ७५ ॥ न मानी स्वयाती स्वाचारू । न मानी दोष अनाचारू । न मानी वडीलांचा विचारू । धनमदें थोरू मातला ॥ ७६ ॥ आधींच तारुण्यें अतिलाठा । वरी धनमदें चढला ताठा । यापरी मातला मोठा । न चाले वाटा सुपंथीं ॥ ७७ ॥ स्त्रीकामें अतिविव्हळ । न विचारी कुळशीळ । न म्हणे सकाळ सांज वेळ । विचरे केवळ खरू जैसा ॥ ७८ ॥ अभिलाषूनि परनारी । दिवसा विचरे दुपारीं । गतालकाही अंगीकारी । भय न धरी पापाचें ॥ ७९ ॥ जो मातला करूनि मद्यपान । तो मद तत्काळ उतरे जाण । त्याहूनि धनमद दारुण । आल्याही मरण उतरेना ॥ २८० ॥ अकर्म करितां आपण । तेंचि निजघातें घे‌ईल प्राण । हेही नाठवे आठवण । धनमदें जाण भुलला ॥ ८१ ॥ महा‌अनर्थी धनमद जाण । हें आठव्या अनर्थाचें लक्षण । आतां धनापाशीं भेद पूर्ण । तेंचि निरूपण द्विज सांगे ॥ ८२ ॥ भेद जन्मला धनाचे कुशीं । धन तेथ भेदाची मिराशी । भेद सपरिवार धनापाशीं । अहर्निशीं जागत ॥ ८३ ॥ हाता आलिया बहु धन । मातेहूनि राखे भिन्न । पित्यासी करी वंचन स्त्रियेसीही जाण कळों नेदी ॥ ८४ ॥ अर्थ पुत्रासी अतर्क्यता । तेथ इतरांची कोण कथा । भेदू तो अर्थापरता । जगीं सर्वथा असेना ॥ ८५ ॥ माथां साहोनि शस्त्रघात । बंधु बंधूसी रणीं साह्य होत । तेचि बंधू अनास होत । वांटितां अर्थविभाग ॥ ८६ ॥ मित्र मित्रांसी वेंचिती प्राण । तेथें प्रवेशोनियां धन । विकल्पा आणी मित्रपण । भेद दारुण धनापाशीं ॥ ८७ ॥ आपणचि गांठीं बांधिलें धन । तें क्षणक्षणां पाहे आपण । येथवरी धनापाशीं जाण । विकल्प पूर्ण नांदत ॥ ८८ ॥ ऐसा धनापाशीं भेदू जाण । हें नववें अनर्थलक्षण । अतिशयें अतिनिर्वाण । वैर दारुण धनेंसीं ॥ ८९ ॥ धनापाशीं वैर पूर्ण जाण । हें अंगें भोगूनि आपण । सांगे कदर्यु ब्राह्मण । वैरलक्षण धनाचें ॥ २९० ॥ पित्यापुत्रांमाजीं विरोधू । पाडितो हा द्रव्यसंबंधू । वैरी करी सखे बंधू । तो हा प्रसिद्धू धनलोभ ॥ ९१ ॥ आपुल्या कळवळ्याचे सुहद । त्यांसी धनलोभ पाडी द्वंद्व । धनास्तव अतिसुबुद्ध । वैर विरुद्ध सर्वांसी ॥ ९२ ॥ प्राणाहूनि पढिये मित्रू । त्यांसी धनलोभ करी शत्रू । धनलोभ अति‌अपवित्रू । वैरी दुस्तरू जगीं हा ॥ ९३ ॥ बंधुकलहें धन वांटितां । अधिक न ये आपुल्या हाता । तैं वांटा करिती जे धर्मतां । त्या साधूंसी तत्त्वतां वैर चाळी ॥ ९४ ॥ जिचे उदरीं जन्मला आपण । जिचें सदा केलें स्तनपान । ते मातेसी धनलोभें जाण । वैर संपूर्ण चालवी ॥ ९५ ॥ आपली जे कां निजजननी । अर्थ तीतें करी वैरिणी । बाहेर घाली घरांतूनी । मुख परतोनी पाहेना ॥ ९६ ॥ ज्याचेनि तुटे भवबंधन । ज्याचेनि बोलें हो‌इजे पावन । त्या सद्गुरूसी अबोला जाण । धनाभिमान धरवित ॥ ९७ ॥ धनाभिमानाचा बडिवार । सद्गुरूमाजीं पाडी वैर । धनाभिमानी अणुमात्र । नव्हे निर्वैर कोणासी ॥ ९८ ॥ जें हें सांगितलें निरूपण । त्या नांव वैर संपूर्ण । हें दहावें अनर्थलक्षण । अविश्वासी धन तें ऐक ॥ ९९ ॥ धनाभिमानाचा विलास । न मानी पित्याचा विश्वास । पूर्ण बंधूचा अविश्वास । केवीं सुहदांस पातेजे ॥ ३०० ॥ ’आत्मा वै पुतनामासी’ । जो साचार धणी सर्वस्वासी । त्या पातेजेना निजपुत्रासी । अति‌अविश्वासी धनलोभ ॥ १ ॥ धर्म अर्थ काम संपूर्ण । त्रिसत्य सत्य हें वचन । पूर्वजांची भाक निर्वाण । दे‌ऊनि आपण जे परणी ॥ २ ॥ जिणें जीवू प्राण सर्वस्वेंसीं । साचार अर्पिला भ्रतारासी । ऐशियेही धर्मपत्नीसी । अविश्वासी धनलोभ ॥ ३ ॥ जे उदरीं वाहे नवमासीं । जे सर्वदा विष्ठामूत्र सोशी । धनलोभाची जाती कैशी । तेही मातेसी न विश्वासे ॥ ४ ॥ धनाभिमान ये जयापाशीं । तो विश्वासेना सद्गुरूसी । इतरांची कथा कायसी । पूर्ण अविश्वासी धनमानी ॥ ५ ॥ अविश्वासाचें मुख्य कारण । धन आणि दुसरी स्त्री जाण । तेथ मोहावलें ज्याचें मन । तो अतिसंपन्न अविश्वासें ॥ ६ ॥ जो धनमानी आणि स्त्रीजित । त्यासी विमुख होय हृदयस्थ । त्यातें सद्गुरूही उपेक्षित । परम अनर्थ अविश्वासें ॥ ७ ॥ सकळ दोषां मुकुटमणी । अविश्वास बोलिला पुराणीं । जो प्रकटतां अर्धक्षाणीं । करी धुळदाणी वृत्तीची ॥ ८ ॥ अविश्वासा अभिमान भेटे । तैं मुक्ताची मुक्तता तुटे । मग विकल्पाचेनि नेटें । घाली उफराटें देहबंदीं ॥ ९ ॥ अविश्वासें कवळिल्या चित्ता । अभिमानें म्हणे मी ज्ञाता । तेव्हां उभ‌उभ्यां पळे आस्तिकता । देखे नास्तिकता सर्वत्र ॥ ३१० ॥ अविश्वास येतां पहा हो । सकुटुंब पळे सद्भावो । मग लोकत्रयीं अभावो । नांदवी निर्वाहो विकल्पेंकरूनी ॥ ११ ॥ वाडेंकोडें अविश्वासी । विकल्पू नांदे अहर्निशी । जेथ रिगाव अविश्वासासी । विकल्प त्यासी नागवी ॥ १२ ॥ अंगोवांगीं अविश्वास । परमार्थराष्ट्र पाडी वोस । दद्गुरूचेही दावी दोष । न मनी विश्वास ब्रह्मयाचा ॥ १३ ॥ यालागीं सकळ दोषांचा राजा । अविश्वासाहूनि नाहीं दुजा । तो रिगोनियां निजपैजा । विभांडी वोजा महासिद्धि ॥ १४ ॥ जिकडे अविश्वासें चाली केली । तिकडे परमार्था पळणी झाली । विकल्पाची धाडी आली । ते संधी नागवली बहुतेकें ॥ १५ ॥ सिद्धाचें गेलें सिद्धिभूषण । साधकें सपा‌ई नागवलीं जाण । रानभरी झाले साधारण । श्रद्धेचें उद्यान छेदिलें ॥ १६ ॥ यमनियमांचीं नगरें जाळी । क्रोधू तापसा करी होळी । मोक्षफळें सफळिता केळी । समूळ उन्मळी मोहगजू ॥ १७ ॥ शमदमाचें घरटें । खाणोनि सांडिलें आव्हाटे । वोस विवेकाचे चोहटे । कोणी ते वाटे वागेना ॥ १८ ॥ व्रतोपवास यांचीं साजिरीं । निष्काम उपवनें चौफेरीं । तीं जाळिलीं उपरा‌उपरी । नानापरी विकल्पें ॥ १९ ॥ ऐशिया अविश्वासासी । ज्ञानाभिमानी आले भेटीसी । विकल्पें अभय दे‌ऊनि त्यांसी । आपणियापाशीं राहविलें ॥ ३२० ॥ ऐशिया अविश्वासापुढें । परमार्थ का‌इसें बापुडें । विकल्पाचें बळ गाढें । तो करी कुडें तत्काळ ॥ २१ ॥ पोटांतून जो अविश्वासी । तो सदा देखे गुणदोषांसी । अखंड द्वेषी परमार्थासी । हा त्यापाशीं स्वभावो ॥ २२ ॥ यापरी अविश्वासी । बद्धवैर पडे परमार्थासी । यालागीं जो पोटींचा अविश्वासी । हांसल्याही त्यापाशीं न वचावें दीनीं ॥ २३ ॥ सकळ दोषांमाजीं समर्थ । सकळ दोषंचें राजत्व प्राप्त । तो ह आकरावा अनर्थ । असे नांदत धनामाजीं ॥ २४ ॥ अकराहीं इंद्रियांसी । पूर्ण करी अविश्वासेंसी । यालागीं अकरावें स्थान यासी । वस्ति अविश्वासासी मनामाजीं ॥ २५ ॥ मुख्यत्वें स्पर्धेचें आयतन । बहुविद्या का बहुधन । हेंचि स्पर्धेचें जन्मस्थान । येथूनि जाण तें वाढे ॥ २६ ॥ विद्या झालिया संपन्न । पंडित पंडितां हेळण । मुख्य गुरूशीं स्पर्धा करी जाण । हें स्पर्धालक्षण विद्येचें ॥ २७ ॥ गांठीं झालिया धन । स्पर्धा खवळे दारुण । कुबेर परधनें संपन्न । मी स्वसत्ता जाण धनाढ्य ॥ २८ ॥ माझिया निजधनापुढें । गणितां अल्प गंगेचे खडे । माझिये धनाचेनि पडिपाडें । कोण बापुडें उभे राहे ॥ २९ ॥ मग जे जे देखे धनवंत । ते ते हेळूनि सांडी तेथ । यापरी स्पर्धा अद्भुत । धरूनि अर्थ उल्हासे ॥ ३३० ॥ एवं धरूनियां अर्थ । स्पर्धा बारावा अनर्थ । सदा नांदे धना‌आंत । तो हा वृत्तांत सांगीतला ॥ ३१ ॥ आतां तीन अर्थांचा मेळा । एके पदीं झाला गोळा । तोही नांदे धनाजवळा । ऐक वेगळा विभाग ॥ ३२ ॥ स्त्री द्यूत आणि मद्यपान । या तिहींतें वाढवी धन । हे तीन अनर्थ दारुण । धनवंता पूर्ण आदळती ॥ ३३ ॥ जो कां पुरुष निर्धन । तो स्त्रियेस जडिसासमान । देखोनि निर्धनाचें वदन । प्रत्यक्ष जाण स्त्री थुंकी ॥ ३४ ॥ धनहीन पुरुषाचे घरीं । कलहो स्त्री-पुरुषांमाझारीं । निर्भर्त्सूनि नानापरी । दवडी घराबाहेरी पुरुषातें ॥ ३५ ॥ धनवंता पुरुषासी स्त्री लवोटवो करी कैसी । कुटका देखोनि शुनी जैसी । हालवी पुच्छासी कुंकात ॥ ३६ ॥ त्या धनाची झालिया तुटी । स्त्री वसवसोनि लागे पाठी । आतां नावडती तुमच्या गोठी । रागें उठे फडफडोनी ॥ ३७ ॥ दिवसा पोरांची तडातोडी । रात्रीं न सोसे तुमची वोढी । हातीं नाहीं फुटकी कवडी । जळो गोडी जिण्याची ॥ ३८ ॥ ऐशापरी कडोविकडी । निर्भर्त्सूनि दूरी दवडी । निर्धन पुरुषाची आवडी । न धरी गोडी स्वदारा ॥ ३९ ॥ यापरी निर्धन पुरुषासीं । स्वस्त्री वश्य नव्हे त्यासी । स्त्रीबाधा धनवंतासी । अहर्निशीं अनिवार ॥ ३४० ॥ लक्षूनि धनवंत नर । वेश्या मिरवी श्रृंगार । हावभाव चमत्कार । त्यासी धनाढ्य थोर भाळले ॥ ४१ ॥ वेश्याकामसंगें जाण । अखंड लांचावलें मन । तद्योगें मद्यपान । करिती सधन धनमदें ॥ ४२ ॥ मद्यापानें जो उन्मत्त । तो स्वेच्छा खेळे द्यूत । एवं हेही तिव्ही अनर्थ । जाण विश्चित अर्थासी ॥ ४३ ॥ अर्थापाशीं पंधरा अनर्थ । ते सांगीतले इत्थंभूत । सुखाचा लेशु येथ । नाहीं निश्चित धनवंता ॥ ४४ ॥ एते पञ्चदशानर्था ह्यर्थमूलामता नृणाम्‌ । तस्मादनर्थमर्थाख्यं श्रेयोऽर्थीं दूरतस्त्यजेत्‌ ॥ १९ ॥ एवं हे पंधराही अनर्थ । मूर्ख अथवा पंडित । जे अर्थसंग्रह करित । अवश्य हे तेथ उठती ॥ ४५ ॥ त्यासी नाम मात्र हा अर्थ । येर्क्ष्हवीं मूर्तिमंत अनर्थ । यालागीं श्रेयार्थी जे हरिभक्त । तिंही निश्चित त्यागावा ॥ ४६ ॥ जेवीं कां बोळ हुंगेना माशी । ढेंकुण न ये तेलापाशीं । वोळंबा न लगे अग्नीसी । तेवीं जो अर्थासी नातळे ॥ ४७ ॥ जेवीं कां अग्नीमाजीं लवण पडे । तें तडफडोनि बाहेर उडे । तेवीं मोक्षाचिये चाडे । जो त्यागी रोकडें निजधन ॥ ४८ ॥ बचनाग मुखीं घालितां आपण । क्षणार्ध दावी गोडपण । तोचि परिपाकीं आणी मरण । तैसा अर्थ जाण अनर्थीं ॥ ४९ ॥ यालागीं जो मिक्षार्थी । तेणें अर्थ न धरावा हातीं । काया वाचा चित्तवृत्ती । अर्थ निश्चितीं त्यागावा ॥ ३५० ॥ अर्थमूळ सकळ भेद । पूर्वीं बोलिला एवंविध । तोचि पुनःपुनः गोविंद । करूनि विशद सांगत ॥ ५१ ॥ भिद्यन्ते भ्रातरो दाराः पितरः सुहृदस्तथा । एकास्त्रिग्धाः काकिणिना सद्यः सर्वेऽरयः कृताः ॥ २० ॥ इष्टमित्रांचें मित्रत्व मोडी । बंधुबंधूंचा स्न्नेह बिघडी । सुहृदांचें सौजन्य तोडी । फुटकी कवडी अर्थाची ॥ ५२ ॥ पित्यापुत्रांमाजीं विरोध । स्त्रीपुत्रांमाजीं द्वंद्व । तो हा जाण अर्थसंबंध । विभांडी हार्द सुहृदांचें ॥ ५३ ॥ काकिणी म्हणजे वीसकवडी । ते आप्तांचा स्न्नेह तोडी । त्यांतील एक फुटकी कवडी । भेदू पाडी सुहृदांसी ॥ ५४ ॥ अर्थेनाल्पीयसा ह्येते संरब्धा दीप्तमन्यवः । त्यजन्त्याशु स्पृधो घ्रन्ति सहसोत्सृज्य सौहृदम्‌ ॥ २१ ॥ अति‌अल्प अर्थासाठीं । सुहृदता सांडोनि पोटीं । कोपें खवळला उठी । शस्त्रमुठी उद्यत ॥ ५५ ॥ तेथें आप्त हो‌ऊनि अनाप्त । परस्परें करिती घात । अर्थ अनर्थी प्राणांत । निजस्वार्थघातकू ॥ ५६ ॥ जितां अर्थ अनर्थ करी । मेल्या ने नरकद्वारीं । उत्तम देहाची बोहरी । अर्थ करी ते ऐक ॥ ५७ ॥ लब्ध्वा जन्ममरप्रार्थ्यं मानुष्यं तद्द्विजाग्यताम्‌ । तदानादृत्य ये स्वार्थं घ्रन्ति यान्त्यशुभां गतिम्‌ ॥ २२ ॥ कोटि जन्माचें शुद्ध सुकृत । तेणें कर्मभूमीं नरदेह प्राप्त । तेथेंही वर्णाग्र्य समर्थ । सत्कुळप्रसूत ब्राह्मणत्वें ॥ ५८ ॥ ऐसे जन्म पावावया येथ । अमरही मरण मागत । इंद्रादि देव जे स्वर्गस्थ । तेही वांछित हें जन्म ॥ ५९ ॥ जे सत्यलोकपर्यंत । ऐश्वर्य पावले अद्भुत । तेही हें जन्म वांछित । उत्कंठित अहर्निशीं ॥ ३६० ॥ येथ करितां भगवद्भक्ती । पायां ल्लगती चारी मुक्ती । यालागीं हे जन्मप्राप्ती । अमर मागती अहर्निशीं ॥ ६१ ॥ ऐसें उत्तम जन्म पावोनी । अति‌अभाग्य मी त्रिभुवनीं । निजस्वार्थातें उपेक्षूनी । भुललों धनीं धनलोभें ॥ ६२ ॥ धनलोभाचिया भ्रांती । कां लोकेषण लौकिकस्थिती । जो उपेक्षी भगवद्भक्ती । अशुभ गती तयासी ॥ ६३ ॥ तेचि कैशी अशुभ गती । धनलोभ्यां नरकप्राप्ती । चौर्क्ष्यायशीं लक्ष योनींप्रती । गर्भ भोगिती अतिदुःखें ॥ ६४ ॥ जया ब्राह्मणजन्मा‌आंत । स्वर्गमोक्ष सहजें प्राप्त । तेचि अर्थींचा इत्यर्थ । स्वयें सांगत धनलोभी ॥ ६५ ॥ स्वर्गापवर्गयोर्द्वारं प्राप्य लोकमिमं पुमान्‌ । द्रविणे कोऽनुषज्जेत मर्त्योऽनर्थस्य धामनि ॥ २३ ॥ ब्राह्मणें करितां स्वधर्म । वासना झळंबे स्वर्गकाम । तैं इंद्रचंद्रादिकांचें धाम । पावे द्विजोत्तम सहजचि ॥ ६६ ॥ ज्याचिया याजनस्थिती । इतरांसी होय स्वर्गप्राप्ती । एवं स्वर्ग तो ब्राह्मणांच्या हातीं । त्यांसी ते गती सहजचि ॥ ६७ ॥ सांडूनि ईषणात्रयासी । निष्काम स्वधर्म ज्या द्विजासी । मोक्ष लागे त्याच्या पायांसी । तिष्ठे अहर्निशीं आज्ञाधारी ॥ ६८ ॥ तो अनुग्रही जयांसी । ते पावती निजमोक्षासी । एवढें सामर्थ्य ब्राह्मणापाशीं । अनायासीं सहजचि ॥ ६९ ॥ स्वर्ग जयाची पायरी । मोक्ष ज्याचा आज्ञधारी । एवढी ब्राह्मणत्वाची थोरी । धनलोभावारी नाशिती ॥ ३७० ॥ ब्राह्मणजन्म पावल्या जाण । निःशेष खुंटे जन्ममरण । तेथ मी नाडलों जाण । जोडूनि धन धनलोभें ॥ ७१ ॥ दुर्लभ येथें माणुसपण । त्यामाजीं अतिदुर्लभ ब्राह्मण्य । तेंही पावोनि मे आपण । धनलोभें पूर्ण नागवलों ॥ ७२ ॥ पावोनि ब्राह्मणशरीर । धनें नाडले थोरथोर । अर्थ अनर्थाचें मुख्य घर । दुःख दुर्धर वाढवी ॥ ७३ ॥ अर्थ अनर्थाचें भाजन । तें निःशेष त्यागावें धन । वैराग्यें तापला पूर्ण । स्वयें ब्राह्मण बोलत ॥ ७४ ॥ आशंका ॥ दैवें जोडिलें संपत्तीसी । ने‌ऊनि सांडावे बिदीसी । कां घालावें जळप्रवाहेंसीं । त्याग अर्थासी तो कैसा ॥ ७५ ॥ तें अर्थत्यागनिरूपण । स्वयें सांगताहे ब्राह्मण । जे असतील सधन । तिंहीं सावधान परिसावें ॥ ७६ ॥ देवर्षिपितृभूतानि ज्ञातीन्बन्धूंश्च भागिनः । असंविभज्य चात्मानं यक्षवित्तः पतत्यधः ॥ २४ ॥ दैवें जोडिलिया धन । आचरावे पंचमहायज्ञ । करावें भगवत्पूजन । उल्हासें जाण महोत्साहें ॥ ७७ ॥ स्वयें करावें पितृतर्पण । षण्णवति श्राद्धें जाण । पितर उद्धरावे आपण । गयावर्जन करोनियां ॥ ७८ ॥ जित्यां पितरां क्रिकाळीं नमन । कदा न करावें हेळण । त्यांची अवज्ञा आपण । प्राणांतीं जाण न करावी ॥ ७९ ॥ त्यांसी गौरवूनि आपण । यथारुचि द्यावें अन्न । यथाशक्ती द्यावें धन । सेवेनें संपूर्ण सुखी करावीं ॥ ३८० ॥ पिता स्वयमेव नारायण । माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण । ऐसें भावें ज्याचें भजन । सुपुत्र जाण तो एक ॥ ८१ ॥ व्याचे सेवेनें सुखी पितर । तेंचि पितृतर्पण साचार । जितां अवज्ञा तो अनाचार । मेल्या श्राद्धविचार तो लौकिक ॥ ८२ ॥ जो पितृवचन अविश्वासे । तेणें केल्या पापराशी । जो पितृवचन विश्वासी । मोक्ष त्यापाशीं वोळंगणा ॥ ८३ ॥ जितमृतपितृतर्पण । ते सांगीतली उणखूण । या नांव गा पितृभजन । ऋषिपूजन तें ऐक ॥ ८४ ॥ सन्मानें आणूनि ब्राह्मण । श्रद्धा कीजे चरणक्षाळण । चरणतीर्था अभिवंदन । सबाह्य जाण स्वयें कीजे ॥ ८५ ॥ धूपें दीपें यथोक्त पूजन । यथारुचि तृप्ति सदन्न । यथाशक्ति द्यावें धन । ऋषिपूजन या नांव ॥ ८६ ॥ ब्राह्मण तेचि ऋषिश्वर । ब्राह्मणें तृप्त सनत्कुमार । ब्राह्मणमुखें शार्ङ्गधर । धाला ढेंकर देतसे ॥ ८७ ॥ बंधु स्वगोत्र स्वजन । त्यांची दरिद्रपीडा दारुण । निरसावी दे‌ऊनि धन । हा मुख्य धर्म जाण श्रेष्ठत्वें ॥ ८८ ॥ कुटुंब पीडूनि आपण । अन्यत्रां द्यावें अन्नधन । तोचि अधर्म परिपूर्ण । शुद्ध पुण्य तें नव्हे ॥ ८९ ॥ कुटुंबासी यथोवित । सुखी करूनि समस्त । याहूनि उरला जो अर्थ । तो श्रेयार्थ वेंचावा ॥ ३९० ॥ अतिथि आलिया देख । अन्न द्यावें आवश्यक । तो झालिया पराङ्मुख । पुण्य निःशेष हरासे ॥ ९१ ॥ सकळ दानांमाजीं जाण । अतिश्रेष्ठ अन्नदान । दीनास दे‌ऊनि सन्मान । द्यावें सदन्न अतिश्रद्धा ॥ ९२ ॥ कुटुंब सुखी करी आपण । स्वेच्छा दे दीनभोजन । परी कदर्थवी जो निजप्राण । तोही दारुण अधर्म ॥ ९३ ॥ जैसें कीजे दीनतर्पण । त्यांत आपणही एक दीन । तेथ न करूनि अधिकन्यून । करावें भोजन समभागें ॥ ९४ ॥ पंक्तीमजीं प्रपंचपण । तें अन्नदानीं अतिविघ्न । यालागीं करावें भोजन । समभागीं आपण सकळांसीं ॥ ९५ ॥ धनाचा सद्व्ययो खरा । द्यावें अनाथप्रेतसंस्कारा । अर्पावें दीनांच्या उद्धारा । धाडावें घरा अयाचितांच्या ॥ ९६ ॥ अंध पंगु मुके दीन । यांसी संरक्षी जो आपण । त्याचेंचि सार्धक धन । शुद्ध पुण्य तयाचें ॥ ९७ ॥ साधुसज्जनां विचंबू अडी । तो विचंबू जो सधन तोडी । त्याच्या निजधर्माची गुडी । उभारे रोकडी वैकुंठीं ॥ ९८ ॥ दुर्बळ जो कां भगवद्भक्त । त्यासी संरक्षी जो धनवंत । तेणें तुष्टला भगवंत । त्यातें उद्धरीत भक्ता‌आधीं ॥ ९९ ॥ सकळमंगळां मंगळ पूर्ण । सकळ कल्याणाचें कल्याण । ते हे सद्‌गुरुश्रीचरण । तेथ निजधन जयांचें अर्पे ॥ ४०० ॥ तयांच्या निजधर्माचें निशाण । सत्यलोकीं लागलें जाण । वैकुंठी कैलासी संपूर्ण । भेरीनिशाण त्राहटिलें ॥ १ ॥ स्वधर्में जोडलें निजधन । जो करी सद्गुरूसी अर्पण । तोचि कर्मीं निष्कर्म जाण । परम पावन तो एक ॥ २ ॥ जो चढत्यावाढत्या भगवद्भक्ती । गुरूसी अर्पी निजसंपत्ती । त्यातें अंगीकारूनि लक्ष्मीपती । आपुली निजभक्ती त्यासी दे ॥ ३ ॥ ज्यासी अनन्य गुरुभक्ती । त्याच्या द्वारीं चारी मुक्ती । दासीत्वें उभ्या असती । त्यापासोनि श्रीपती परता नव्हे ॥ ४ ॥ ज्याचें तनु मन धन । गुरुचरणीं अर्पे पूर्ण । त्यासी भवभयाचें भान । कल्पांतीं जाण दिसेना ॥ ५ ॥ दैवें जोडली जे संपत्ती । ते वेंचोनि ऐशा निगुतीं । अर्थें परमार्थप्राप्ती । सभाग्य लाहती निजनिष्ठा ॥ ६ ॥ ऐसें न वेंचोनि धन । स्वयाति कुटुंब पीडी पूर्ण । जो पोटा न खाय आपण । तें यक्षधन संचित ॥ ७ ॥ एवं कदर्थूनि निजप्राण । जें सांचिलें यक्षधन । तें अधःपातासी कारण । दुःख दारुण धनलोभ्या ॥ ८ ॥ म्हणे मीही याच निष्ठा । यक्षवित्तें झालों करंटा । हातींचा स्वार्थ गेला मोटा । वंचलों कटकटा निजमोक्षा ॥ ९ ॥ सांचोनियां यक्षवित्त । म्यां माझें केलें अनहित । ऐसा तो खेदयुक्त । कष्टें बोलत निजदुःख ॥ ४१० ॥ व्यर्थयार्थेहया वित्तं प्रमत्तस्य वयो बलम्‌ । कुशला येन सिध्यन्ति जरठः किं नु साधवे ॥ २५ ॥ निजभोगविवर्जित । शिणोनि काया वाचा चित्त । कष्टें मिळवावया वित्त । झालों उन्मत्त अविवेकी ॥ ११ ॥ करितां वित्ताचे आयास । गेलें तारुण्य बळ आयुष्य । शरीर क्षीण झालें निःशेष । तरी वित्ताचा शोष शमेना ॥ १२ ॥ अर्थें अर्थ वाढवितां । अनिवार वाढली चिंता । तेथें विसरलों निजस्वार्था । अर्थलोभता कदर्यु ॥ १३ ॥ जेणें वित्तें जीवितें साचार । भूतदया परोपकार । करूनियां विवेकी नर । भवाब्धिपरपार पावले ॥ १४ ॥ मज निर्दैवाचें येथ । वृथा वित्त वृथा जीवित । आयुष्यही गेलें व्यर्थ । निजस्वार्थ बुडाला ॥ १५ ॥ म्हणाल असतां जीवें जीत । साधूनि घे‌ऊं निजस्वार्थ । तें आतां न चले येथ । अर्थ सामर्थ्य दोनी गेलीं ॥ १६ ॥ अधर्मास्तव गेलें वित्त । जरेनें गिळिलें सामर्थ्य । केवळ मी जरठ येथ । दैवहत उरलों असें ॥ १७ ॥ कटकटा जोडितां अर्थ । लोक नाडले समस्त । ऐसें जाणोनि प्रस्तुत । स्वयें सांगत कदर्यु ॥ १८ ॥ कस्मात्संक्लिश्यते विद्वान्‌ व्यर्थयार्थेहयासकृत्‌ । कस्यचिन्मायया नूनं लोकोऽयं सुविमोहितः ॥ २६ ॥ येथ अज्ञानची कोण गती । जे अर्थ अनर्थी म्हणती । तेही अर्थार्थी होती । ज्ञाते भ्रमती अर्थासी ॥ १९ ॥ ऐसे भ्रमले से सज्ञान । तेही अर्जावया धन । युक्तायुक्त प्रयत्न । अनुदिनीं जाण स्वयें करिती ॥ ४२० ॥ सज्ञान भ्रमावया कारण । ईश्वराची माया पूर्ण । अघटघटी जीचें लक्षण । त्या धनी सज्ञान मोहिले ॥ २१ ॥ कृष्णमाया मोहिले पंडित । नव्हे म्हणाल हा इत्यर्थ । जे जोडिताति अर्थ । निजसुखार्थ भोगेच्छा ॥ २२ ॥ भोगांमाजीं जे म्हणती सुख । ते जाणावे केवळ मूर्ख । येथ अर्थींचा विवेक । कदर्यु देख बोलत ॥ २३ ॥ किं धनैर्धनदैर्वा किं कामैर्वा कामदैरूत । मृत्युना ग्रस्यमानस्य कर्मभिर्वोत जन्मदैः ॥ २७ ॥ कटकटा वर्णाग्यें पूज्य पहा हो । त्या द्विजासी भुलवी मायामोहो । भोगीं वाढवीजे जो देहो । तोचि पहा हो नश्वर ॥ २४ ॥ त्या देहासी जे नाना भोग । तोच त्यासी क्षयरोग । धन जोडणें अनेग । तोचि मार्ग निर्धनत्वा ॥ २५ ॥ तें धन मिळे अनायासीं । यालागीं धनवंत उपासी । अर्थ जोडोनियां प्रयासें । भोगितां कामासी सुख काय ॥ २६ ॥ कामसुख कामिनीमेळीं । सुखार्थ स्त्रियेतें प्रतिपाळी । तेचि नानापरी सळी । देतां किंकळी सुटेना ॥ २७ ॥ स्त्रीपुत्रकामभोगादिक । तेणें देहासी द्यावें सुख । तो देहोचि मरणोन्मुख । नित्य अंतक लागला ॥ २८ ॥ जे जे अतिक्रमे घडी । ते ते काळ वयसा तोडी । येथ कोण भोगाची गोडी । धनकामें वेडीं सज्ञानें केलीं ॥ २९ ॥ सर्पमुखीं दुर्दुर जातां । तो दर्दुर होय माशा खाता । तेणें न सुटे सर्पग्रासता । जाण तत्त्वतां जयापरी ॥ ४३० ॥ तेवीं नानाभोगमेळें । देहींचा मृत्यु मागें न टळे । हें जाणॊनि आंधळे । धनकामें झाले सज्ञान ॥ ३१ ॥ स्वयें कर्ता तोचि मरणधर्म । त्यासी कोण निववी भोगकाम । हा केवळ मायेचा भ्रम । भ्रमले परम महासिद्ध ॥ ३२ ॥ धनें हो‌ईल परलोक । तोही भोगू दुःखदायक । भोगक्षयें कर्ममूर्ख । येती देख अधःपाता ॥ ३३ ॥ करितां भोग्य काम्य कर्म । पुढती मरण पुढती जन्म । भोगणें पडे अविश्रम । हें दुःख परम धनकामा ॥ ३४ ॥ धनकामासी निजसुख । सर्वात्मना नाहीं देख । मीही ऐसाचि होतों मूर्ख । निजभाग्यें देख धन गेलें ॥ ३५ ॥ नूनं में भगवांस्तुष्टः सर्वदेवमयो हरिः । येन नीतो दशामेतां निर्वेदश्चात्मनः प्लवः ॥ २८ ॥ मी पूर्वी होतों अति‌अभाग्य । आतां झालों अतिसभाग्य । मज तुष्टला श्रीरंग । विवेकवैराग्य पावलों ॥ ३६ ॥ मझें संचित जें कां धन । तेंचि माझें मुख्य अज्ञान । तें हरोनि आपण । कृपा पूर्ण मज केली ॥ ३७ ॥ भक्तांचें अज्ञान हरी । याचिलागीं नांवें तो ’हरी’ । तेणें कृपा करून पुरी । विवेक अंतरीं उपजविला ॥ ३८ ॥ वैराग्य विवेकविण आंधळे । विवेक वैराग्यवीण पांगळें । ते माझे हृदयीं जावळीं फळें । एक वेळे उपजविलीं ॥ ३९ ॥ ऐशी हरीनें कृपा करूनी । माझें धनेंसीं अज्ञान हरूनी । विवेक वैराग्य यें दोनी । माझे हृदयभुवनीं प्रकाशिलीं ॥ ४४० ॥ परी कोणे काळें कोणे देशीं । कोण समयविशेषीं । हरी कृपा करितो कैशी । हें कोणासी कळेना ॥ ४१ ॥ भक्तांचें हरावया चित्त । हरि हरितो त्यांचें वित्त । वित्तत्यागें करूनि सुचित्त । दे विवेकयुक्त वैराग्य ॥ ४२ ॥ ऐसें घेतेंदेतें विंदान । ब्रह्मादिकां अतर्क्य जाण । यालागीं तो भगवंत पूर्ण । त्यासी साही गुण वशवर्ती ॥ ४३ ॥ त्याचें अचिंत्यानंतरूप । परी मजलागीं झाला सकृप । माझें धनेंसी निरसूनि पाप । ज्ञानदीप उजळला ॥ ४४ ॥ हो कां कृपा उपजली भगवंता । परी म्यां वंचिल्या यज्ञदेवता । त्या क्षोभल्या करिती घाता । हेंही सर्वथा घडेना ॥ ४५ ॥ करीं चक्र धगधगित । ज्याचा पाठिराखा हरि समर्थ । विघ्नाचा वारा न रिघे तेथ । देव वंदीत तयासी ॥ ४६ ॥ देवीं वंदूनि प्रल्हादासी । शांत करविलें नृसिंहासी । तो पाठिराखा नरहरी ज्यासी । विघ्न त्यापाशीं रिघे केवीं ॥ ४७ ॥ जेणें देवांचिया कोडी । क्षणें सोडविल्या बांदवडी । त्याचे भक्तांची लोंव वांकडी । देवें बापुडीं केवीं करिती ॥ ४८ ॥ जो सकळ देवांचा नियंता । ज्याचे चरण देव वंदिती माथां । तो भगवंत साह्य असतां । विघ्न सर्वथा बाधीना ॥ ४९ ॥ ज्याचेनि बळें वाढले देव । देव जयाचे अवयव । तो हरि तुष्टला स्वयमेव । तेथ विघ्नसंभव कोणाचा ॥ ४५० ॥ सर्वदेवमय श्रीहरी । इंद्रचंद्ररूपें माझा हरी । ऐशिया मज दीनावरी । विघ्न संसारीं असेना ॥ ५१ ॥ ऐशिये कृपेचे कारण । ये जन्मीं नाहीं साधन । हें माझें पूर्वील जुनें ऋण । देवापाशीं जाण ठेविलें होतें ॥ ५२ ॥ पूर्वीं कोण जन्मीं कोण देशीं । तीर्थक्षेत्रीं कोण वंशी । कोण आचरलों सत्कर्मासी । तेणें हृषीकेशी तुष्टला ॥ ५३ ॥ मातें अतिदुःखी देखोन । हरि तुष्टला कृपापूर्ण । त्याचे कृपेस्तव जाण । विवेकसंपन्न मी झालों ॥ ५४ ॥ हो कां धनक्षयें झालें दुःख । तेणें दुःखें पावलों निजसुख । भवाब्धि तरावया देख । वैराग्यविवेक दृढ तारूं ॥ ५५ ॥ हरिखें वोसंडूनि ब्राह्मण । म्हणे उरले आयुष्येनि जाण । वृथा जावों नेदीं अर्थ क्षण । करीन निर्दळण सुखदुःखां ॥ ५६ ॥ सोऽहं कालावशेषेण शोषयिष्येऽङ्गमात्मनः । अप्रमत्तोऽखिलस्वार्थे यदि स्यात्सिद्ध आत्मनि ॥ २९ ॥ का‌इसा भवभयाचा पाड । घे‌ईन कोटि जन्मंचा सूड । नासल्या आयुष्याचा कैवाड । करीन निवाड येणें देहें ॥ ५७ ॥ देहासी आली वार्धक्यता । परी वृद्धत्व नव्हे माझिया चित्ता । तेणें चित्तें चिंतूनि भगवंता । भवबंध आतां छेदीन ॥ ५८ ॥ उरले आयुष्यें येथ । कळिकाळाचे पाडीन दांत । गर्भदुःखाचें खणोनि खत । मरणाचा घात मी करीन ॥ ५९ ॥ जेणें देहें सत्यानृत । कर्में आचरलों समस्त । तें देह मी शोषीन येथ । विदेहस्थ निजभावें ॥ ४६० ॥ घालूनि निजबोधाची धाडी । फोडीन देहाची बांदवडी । तोडूनि सुखदुःखांची बेडी । उभवीन गुढी सायुज्याची ॥ ६१ ॥ आजी वैराग्यविवेकयुक्त । मी निजस्वार्थीं सावचित्त । जो जो साधीन परमार्थ । तो तो हस्तगत मज होय ॥ ६२ ॥ मजचि साधे निजस्वार्थ । हाचि नेम नाहीं येथ । जो जो वैराग्यविवेकयुक्त । त्यासी परमार्थ आंदण ॥ ६३ ॥ वैराग्यविवेकाचें लक्षण देहगेहस्त्रियदि धन । असतां आसक्त नव्हे मन । वैराग्य पूर्ण या नांव ॥ ६४ ॥ म्यां जो आरंभ केला पहा हो । यासी देवोदेवीसमुदावो । येणेंसहित देवाधिदेवो । मज साह्य होवो हें प्रार्थित ॥ ६५ ॥ तत्र मामनुमोदेरन्‌ देवास्त्रिभुवनेश्वराः । मुहूर्तेन ब्रह्मलोकं खट्वाङ्गः समसाधयत्‌ ॥ ३० ॥ इंद्रियाधिष्ठात्री देवता । मज साह्य होतू समस्ता । सिद्दि पावावया परमार्था । इंद्रियजयता मज द्यावी ॥ ६६ ॥ जो त्रिभुवनेश्वर विख्यात । तो साह्य झालिया भगवंत । देवता साह्य होती समस्त । त्या अंतर्भूत हरिरूपीं ॥ ६७ ॥ देवतारूपें भावूनि हरी । सकळ देवांची सेवा करीं । साह्य हो‌ऊनि दीनोद्धारीं । मज भवसागरीं तारावें ॥ ६८ ॥ म्हणाल वयसेचा शेवट । केवळ झालासी तूं जरठ । वार्धकीं हे खटपट । वृथा कष्ट कां करिशी ॥ ६९ ॥ ऐसा न मानावा अर्थ । खट्वांगराजा विख्यात । मुहूर्तें साधिला परमार्थ । निजस्वार्थ फावला ॥ ४७० ॥ त्याहूनि माझें तंव येथ । आयुष्य असेल बहुत । देव साह्य होत समस्त । निमेषें परमार्थ साधीन ॥ ७१ ॥ आजी विवेकवैराग्य जैसें आहे । हें जैं निर्वाहलें राहे । तैं कळिकाळ बापुडें काये । म्यां जितिला होये संसार ॥ ७२ ॥ हा पूर्वी कैसा होता येथ । आतां पालटलें याचें वृत्त । झाला विवेकवैराग्ययुक्त । आश्चर्यें सांगत श्रीकृष्ण ॥ ७३ ॥ श्रीभगवानुवाच- इत्यभिप्रेत्य मनसा ह्यावन्त्यो द्विजसत्तमः । उन्मुच्य हृदयग्रन्थीन्‌ शान्तो भिक्षुरभून्मुनिः ॥ ३१ ॥ ऐसा तो अवंतीच ब्राह्मण । अतिकदर्यु होता जाण । त्याच्या हातींचें गेलिया धन । वैराग्यचिन्ह पालटले ॥ ७४ ॥ यालागीं वैराग्यविविवेक चित्तीं । झाल्या आंदणी ब्रह्मप्राप्ती । कृष्ण सांगे उद्धवाप्रती । निजात्मस्थिती साधावया ॥ ७५ ॥ पूर्वीं होता ब्राह्मणाधम । धनलोभी निंद्यकार्म । तोचि झाला द्विजोत्तम । विवेकें परम वैरागी ॥ ७६ ॥ पूर्वीं केलिया निश्चितार्था । मी साधीन सर्वथा । ऐशिया अति‌उल्हासता । निजपरमार्था साधक ॥ ७७ ॥ माझिया दुःखाचें कारण । माझा मीचि झालों जाण । धरितां काम लोभ धनाभिमान । दुःख दारुण मज माझें ॥ ७८ ॥ मज दुःख दे‌ऊनि गेलें धन । धन तें दुःखाचें भाजन । स्त्रीपुत्रार्थ सलोभी आपण । तिंहीच जाण मज दवडिलें ॥ ७९ ॥ धरावा ज्ञातीचा अभिमान । तंव स्वयातीं सांडिलों जाण । मजसी विमुख झाले स्वजन । त्यांचा लोभ कोण मज आतां ॥ ४८० ॥ स्त्री पुत्र स्वजन धन । यांच्या लोभांचें मुख्य कारण । माझा मज देहाभिमान । त्यासी माझें नमन साष्टांग ॥ ८१ ॥ नमन स्त्रीपुत्रादि धनांसी । नमन स्वयातिस्वजनांसी । नमन देहाभिमानासी । संबंध तुम्हांआम्हांसी असेना ॥ ८२ ॥ जेवीं कां जळा आणि चंद्रबिंबासी । एकत्र वास दिसे दोहींसी । परी चंद्र अलिप्त जळेंसीं । तेवीं संबंध तुम्हांसीं मज नाहीं ॥ ८३ ॥ जेवीं कां अखंड अहर्निशीं । छाया जडलीसे रूपासी । तैं रूप न बैसे निजच्छायेसी । तेवीं संबंधू तुम्हांसीं मज नाहीं ॥ ८४ ॥ जेवीं तारुण्य ये देहापाशीं । तेणें तारुण्यें देहो मुसमुशी । शेखीं तारुण्य सांडी देहासी । तेंवी म्यां तुम्हांसी सांडिलें ॥ ८५ ॥ वनीं वसंताचें रिगवणें । वनश्री शोभा मिरवी तेणें । तो वस्तूं जेवीं सांडी वनें । तेवीं म्यां सांडणें अहंममता ॥ ८६ ॥ बाप सवैराग्य विवेक । त्याग करविला अलोलिक । देहाभिमाना तिळोदक । दीधलें देख ममतेसी ॥ ८७ ॥ जेवीं भ्रष्टलिया पुत्रासी । पिता घडस्फोटें त्यागी त्यासी । तेंवी त्यागूनि देहाभिमानासी । स्वयें संन्यासी तो झाला ॥ ८८ ॥ जेवीं कां ये फळ परिपाकातें । सांडी जन्मला निजदेहातें । देंठ न धरी त्या फळातें । फळ देंठातें धरीना ॥ ८९ ॥ तेवीं हा न धरी अहंतेसी । अहंता लाजिली न ये यापाशीं । हाही देहाभिमानासी । सद्भावेंसीं नातळे ॥ ४९० ॥ जळीं जेवीं पद्मिनीपान । असोनि जळेंसी अलिप्त जाण । तेवीं नातळोनि देहाभिमान । संन्यासग्रहण विध्युक्त ॥ ९१ ॥ अन्य संन्यासी करोनि होम । जाळिला म्हणती क्रोधकाम । शेखीं तिळतूप होय भस्म । क्रोधकाम संचले ॥ ९२ ॥ तैशी नव्हेच याची होमस्थिती । जाळिल्या विकल्पाच्या वृत्ती । कमक्रोधांची पूर्णाहुती । केली अहंकृतीसमवेत ॥ ९३ ॥ होमूनि निजस्वभावासी । झाला त्रिदंडी संन्यासी । आज्ञा घे‌ऊनि गुरूपाशीं । सुखें सुखवासी विचरत ॥ ९४ ॥ स चचार महीमेतां संयतात्मेन्द्रियानिलः । भिक्षार्थं नगर ग्रामनसङ्गोऽलक्षितोऽविशत्‌ ॥ ३२ ॥ जिणॊनियां मनपवन । सांडोनिया मानाभिमान । परमानंदें परिपूर्ण । पृथ्वीमाजीं जाण विचरत ॥ ९५ ॥ ज्यासी नावडे देहसंगती । त्यासी कैंचा संगू सांगती । एकला विचरे क्षिती । आत्मस्थिती निजभोधें ॥ ९६ ॥ अखंड वसे वनांतरीं । भिक्षेलागीं निघे नगरीं । खेट खर्वट ग्रामीं पुरीं । भिक्षा करी यथाप्राप्त ॥ ९७ ॥ मी एक भिक्षेसी येता । हा नेम न करी सर्वथा । अलक्ष्य येवोनि अवचितां जें आलें हाता तेणें सुखी ॥ ९८ ॥ पंचागार सप्तागार । हाही नेम नाहीं निर्धार । कोणोविखींचा अहंकार । अणुमात्र धरीना ॥ ९९ ॥ तं वै प्रवयसं भिक्षुमवधूतमसज्जनाः । दृष्टा पर्यभवन्‌ भद्र बह्वीभिः परिभूतिभिः ॥ ३३ ॥ न करी देहमळक्षाळण । मुसलवत्‌ करी स्न्नान । यालागीं तो धूसरवर्ण । अवधूतपण या हेतू ॥ ५०० ॥ ऐसा विचरतां पृथ्वीसी अवचटें आला अवंतीसी । अतिवृद्ध आणि संन्यासी । अवधूतवेषी देखिला ॥ १ ॥ संन्यास घेतलिया जाण । पूर्वभूमिका अवलोकन । एक वेळां करावी आपण । पद्धतिलेखन आचार्याचें ॥ २ ॥ ते नगरींचे म्हणती जन । अरे हा कदर्यु ब्राह्मण । याचें हारपल्या धन । संन्यासे जाण हा झाला ॥ ३ ॥ हें ऐकोनियां अतिदुर्जन । त्यासभोंवते मीनले जाण । परस्परें दावूनि खूण । विरुद्ध छळण मांडिलें ॥ ४ ॥ त्यासी बहुसाल उपद्रवितां । क्षणार्ध पालट नव्हे चित्ता । क्रोध न येचि सर्वथा । अतिविवेकता महाधीरू ॥ ५ ॥ त्याच्या उपद्रवाची कथा । आणि त्याचि सहनशीलता । तुज मी सांगेन तत्त्वतां । सावधानता अवधारीं ॥ ६ ॥ दृष्टि ठेवूनि येथींच्या अर्था । विवेकें कुशळ होय श्रोता । अर्थ धरी भावार्थता । शांति तत्त्वतां तो लाभे ॥ ७ ॥ विवेकचित्तचकोरचंद्रा । भागवतभाग्यें शुद्धमुद्रा । शांतिसौभाग्यनरेंद्रा । ऐक सुभद्रा उद्धवा ॥ ८ ॥ आकळावया निजशांतीसी । कृष्ण संबोधी उद्धवासी । ऐसें सावध करोनि त्यासी । म्हणे दशा ते ऐसी शांतीची ॥ ९ ॥ अवरोधितां जीविकेसी । सन्मान देतां अपमानेंसीं । जो सर्वथा न ये क्षोभासी । शांति त्यापाशीं तें ऐक ॥ ५१० ॥ केचित्रिवेणुं जगृहुरेके पात्रं कमण्डलुम्‌ । पीठं चैकेऽक्षसूत्रं च कन्थां चीरणि केचन ॥ ३४ ॥ दुर्जनीं वेढूनि संन्यासी । छळणार्थ लागती पायांसी । तेणें नमनप्रसंगेंसीं । करिती स्पर्शासी अवघेही ॥ ११ ॥ एक म्हणती वृद्ध संन्यासी । एक म्हणती किती चातुर्मासी । एक पुसती संप्रदायासी । कोणे गुरूनें तुम्हांसी मुंडिलें ॥ १२ ॥ एक खुणाविती एकांसी । पूर्वभूमी पुसा यासी । एक म्हणती यापाशीं । धनसंग्रहासी पुसा रे ॥ १३ ॥ एक म्हणती अहो स्वामी । तुमची कवण पूर्वभूमी । तुम्ही व्यापारी कीं उदिमी । कोणे ग्रामीं निवासू ॥ १४ ॥ एक म्हणती कांहीं आहे धन । एक म्हणती आतां निर्धन । एक म्हणती न करा छळण । विरक्त पूर्ण संन्यासी ॥ १५ ॥ ऐसें करितां छळण । संन्यासी अनुद्वेग जाण । निःशब्दवादें धरिलें मौन । कांहीं वचन न बोले ॥ १६ ॥ एक म्हणती त्रिदंडा कारण । हा पूर्वीं होता अतिसधन । कोरूनि भरिलें असेल धन । हेंचि लक्षण त्रिदंडा ॥ १७ ॥ एक म्हणती सहस्त्रदोरीं । कंथा केली असे अतिथोरी । एक म्हणती त्यामाझारीं । धन शिरोवेरीं खिळिलेंसे ॥ १८ ॥ एक म्हणती काय पाहतां तोंड । येणें मांडिलेंसे पाखंड । ऐसा निर्भर्त्सिता वितंड । एकें त्रिदंड हरितला ॥ १९ ॥ एकें हरितलें पाणिपात्र । एकें नेलें पीठ पवित्र । एकें नेलें अक्षसूत्र । काषायवस्त्र तें एकें ॥ ५२० ॥ एज न्गभे हा माझा ऋणायित । भला सांपडला येथ । म्हणोनि कंथेसी घाली हात । कौपीनयुक्त तेणें नेली ॥ २१ ॥ ऐसें करितांही दुर्जन । त्याचें गजबजीना मन । कांहीं न बोले वचन । क्षमेनें पूर्ण निजधैर्य ॥ २२ ॥ तो म्हणे जाणेंयेणें हीं दोनी । केवळ अदृष्टा‌अधीनी । यालागीं मागण्याची ग्लानी । न करूनि मुनी निघाला ॥ २३ ॥ संन्यासी जातां देखोनी । सभ्य सभ्य शठ ये‌ऊनी । साष्टांग नमस्कार करूनी । अतिविनीतपणीं विनवित ॥ २४ ॥ मग म्हणती हरहर । अपराध घडला थोर । मातले हे रांडपोर । पात्रापात्र न म्हणती ॥ २५ ॥ स्वामी कोप न घरावा मनीं । वस्त्रें घ्यावीं कृपा करूनी । परतविला पायां लागूनी । पूर्ण छळणीं छळावया ॥ २६ ॥ प्रदाय च पुनस्तानि दर्शितान्याददुर्मुनेः । संन्यासी आणूनि साधुवृत्ती । दंडकमंडलू पुढें ठेविती । एक वस्त्रें आणोनि देती । एक ते नेती हिरोनी ॥ २७ ॥ एक ते म्हणती वृद्ध संन्यासी । याचीं वस्त्रें द्यावी यासी । एक म्हणती या शठासी । दंडितां आम्हांसी अतिपुण्य ॥ २८ ॥ वस्त्रें न देती उपहासीं । संन्यासी निघे सावकाशीं । एक परतवूनि त्यासी । दे‌ऊनी वस्त्रांसी जा म्हणती ॥ २९ ॥ एक धांवूनि हाणे माथां । वस्त्रें हिरोनि जाय परता । एक म्हणती द्या रे आतां । वृद्ध कां वृथा शिणवाल ॥ ५३० ॥ यावरी संन्यासी आपण । गेला वस्त्रें वोसंडून । करोनिया संध्यास्न्नान । भिक्षार्थ जाण निघाला ॥ ३१ ॥ अन्नं च भैक्ष्यसंपन्नं भुञ्जानस्य सरित्तटे ॥ ३५ ॥ मूत्रयन्ति च पापिष्ठाः ष्ठीवन्त्यस्य च मूर्धनि । यतवाचं वाचयन्ति ताडयन्ति न वक्ति चेत्‌ ॥ ३६ ॥ भिक्षा मागोनि संपूर्ण । शास्त्रविभागें विभागून । सरितातटीं करितां भोजन । तें देखोनि दुर्जन तेचि आले ॥ ३२ ॥ अरे हा संन्यासी नव्हे साचा । कदर्यु आमुचे गांवींचा । होय नव्हे न बोले वाचा । हा ठकपणाचा उपावो ॥ ३३ ॥ यासी बोलविल्यविण राहे । तो याचाचि दासीपुत्र होये । ऐशी शपथ करूनि पाहें । आले समुदायें तयापाशीं ॥ ३४ ॥ एक म्हणे याचें मौन । उडवीन मी न लागतां क्षण । हा जेणें करी शंखस्फुरण । तो उपावो जाण मी जाणें ॥ ३५ ॥ तो म्हापापी अतिदुर्मती । जेवितां त्याचे मस्तकीं मुती । तरी क्रोध न ये त्याचे चित्तीं । निजात्मस्थितीं निवाला ॥ ३६ ॥ जरी अंतरीं क्रोध आला । तरी तो अशांतचि झाला । बाहेरी न बोलेचि बोला । लोकलाजे भ्याला पोटास्थे ॥ ३७ ॥ तैसा नव्हे हा संन्यासी । धू‌ओनि सांडिलें निजलाजेसी । निजशांतीची दशा कैशी । क्रोध मानसीं वोळेना ॥ ३८ ॥ आंत एक बाह्य एक । या नांव मुख्य दांभिक । तैसा संन्यासी नव्हे देख । सबाह्य चोख निजशांति ॥ ३९ ॥ तंव ते दूर्जन म्हणती । अरे हा न बोले निश्चितीं । संमुख मुखावरी थुंकिती । अतिनिदिती नोकूनी ॥ ५४० ॥ एक हाणीती लात । एक टोले देती माथां । एक म्हणती न बोलतां । यासी सर्वथा न सोडा ॥ ४१ ॥ तर्जयन्त्यपरे वाग्भिः स्तेनोऽयमिति वादिनः । बन्धन्ति रज्ज्वा तं केचिद्वध्यतां बध्यतामिति ॥ ३७ ॥ आणिक एक दुरूनि जाण । वर्मीं विंधिती वाग्बाण । याच्या वेषाचें लक्षण । आम्हीं संपूर्ण जाणीतलें ॥ ४२ ॥ याचे वेषाचा विचारू । शठ नष्ट दांभिक थोरू । भिक्षामिसें हिंडे हेरू । धरा चोरू निश्चितीं ॥ ४३ ॥ ऐसे विकल्पवाक्यें गर्जती । एक बांधा बांधा म्हणती । एक दृढदोरीं बांधिती । दोहीं हातीं अधोमुख ॥ ४४ ॥ क्षिपन्त्येकेऽवजानन्त एष धर्मध्वजः शठः । क्षीणवित्त इमां वृत्तिमग्रहीत्स्वजनोञ्झितः ॥ ३८ ॥ त्याचें पूर्ववृत्त जे जाणते । ते अपमानूनि निंदिती । पूर्वीं कदर्यू याची ख्याती । हा आम्हांप्रती संन्यास मिरवी ॥ ४५ ॥ येणें सूक्तासूक्तीं संचिलें धन । अधर्में वित्त झालें क्षीण । स्वजनीं सांडिला दवडून । पोटासी अन्न मिळेना ॥ ४६ ॥ अन्न मिळावया पोटासी । झाला कपटवेष संन्यासी । लाज नाहीं या निर्लज्जासी । योग्यता आम्हांसी दावितां ॥ ४७ ॥ पूर्वींलागूनि हा वंचकू । आतां झाला संन्यासी दांभिकू । याचें मत नेणे हा भोळा लोकू । महाठकू दृढमौनी ॥ ४८ ॥ हो कां बहुरुप्याचीं सोंगें जैसीं । तेवीं हा उत्तमवेषें संन्यासी । हो‌ऊनि ठकूं आला आम्हांसी । मारितां यासी दोष नाहीं ॥ ४९ ॥ अहो एष महासारो धृतिमान्‌ गिरिराडिव । मौनेन साधयत्यर्थं बकवद्दृढनिश्चयः ॥ ३९ ॥ हा दांभिकांमाजीं महाबळी । धरिल्या वेषातें प्रतिपाळी । आम्हीं पीडितां न डंडळी । जेवीं कां वाहटोळीं महामेरू ॥ ५५० ॥ याच्या धैर्याचें शहाणपण । साधवया अन्न‌आच्छादन । बकाच्या ऐसें धरिलें मौन । स्वार्थ पूर्ण लक्षूनी ॥ ५१ ॥ बक गिळावया मासा । मौन धरोनि राहे जैसा । हाही जाणावा तैसा । भोळ्या माणसां नाडील ॥ ५२ ॥ आतां हा धनलोभार्थ जाणा पूर्वील उपद्रव नाणी मना । तेचि झालीसे दृढ धारणा । उपद्रवगणना या नाहीं ॥ ५३ ॥ एक म्हणती धैर्यमूर्ती । म्हणोनियां लाता हाणिती । एक ते नाकीं काड्या खुपसिती । याची निहशांती पाहों पां ॥ ५४ ॥ ऐसे‌ऐसे उपद्रवती । नानापरी उपहासिती । तरी द्वेष नुपजे चित्तीं । निजशांती निश्चळू ॥ ५५ ॥ जंव जंव देखती त्याची शांती । तंव तंव दुर्जन क्षोभा येती । नाना उपद्रव त्यासी देती । तेंचि श्रीपती सांगत ॥ ५६ ॥ इत्येके विहसन्त्येनमेके दुर्वातयन्ति च । तं बबन्धुर्निरुरुधुर्यथा क्रीडनकं द्विजम्‌ ॥ ४० ॥ कदर्या बाणली पूर्ण शांती । ऐसे एक उपहासिती । एक नाकीं चुना लाविती । एक मुख माखिती काजळें ॥ ५७ ॥ एक अतिशठ साचोकारे । पुढं ठाकोनि पाठिमोरे । शर्धा करिती अधोद्वारें । नाकीं तोंडीं भरे दुर्गंध ॥ ५८ ॥ तरी त्याचिया निजस्थिती । अणुमात्र क्षोभ न ये चित्तीं । तोचि संन्यासी त्रिजगतीं । ज्याची ढळॆना शांती क्षोभविल्याही ॥ ५९ ॥ एवं क्षोभेना त्याचें मन । देखोन खवळले दुर्जन । त्यासी गळां श्रृंखला निरोधून । आणिला बांधून चौबारा ॥ ५६० ॥ यासी वोळख रे कोणी तुम्ही । हा धनलोभी जो अकर्मी । तो आजी सांपडविला आम्हीं । अति‌अधर्मी दांभिक ॥ ६१ ॥ जेवीं गारुडी बांधी माकडा । तेवीं संन्यासी बांधिला गाढा । मिळोनियां चहूंकडा । मागांपुढां वोढिती ॥ ६२ ॥ एक ओढिती पूर्वेशी । एक ओढिती पश्चिमेसी । संन्यासी हांसे निजमानसीं । सुख सर्वांसी होये येणें ॥ ६३ ॥ देह प्रारब्ध भोगी जाण । याचा मजसी संबंध कोण । येणें विवेकें क्षमापूर्ण । कोणाचें मन्‌ दुखवीना ॥ ६४ ॥ जेथ स्वगोत्र सो‌इरे स्वजन । जिंहीं दीधला अतिसन्मान । त्यांदेखतां अपमान । अनुद्विग्न जो साहे ॥ ६५ ॥ त्यापाशीं शांति संपूर्ण । उद्धवा निश्चयेंसीं जाण । ज्याचें लोकेषणे लाजे मन । अशांति जाण ते ठायीं ॥ ६६ ॥ ऐसा क्षोभवितां पहा हो । क्षोभा न चढे त्याचा भावो । त्या सन्याशाचा अभिप्रावो । स्वयें देवादिदेवो सांगत ॥ ६७ ॥ एवं स भोतिकं दुःखं दैविकं दैहिकं च यत्‌ । भोक्तव्यमात्मनो दिष्टं प्राप्तं प्राप्तमबुध्यत ॥ ४१ ॥ भिक्षु बोले निजविवेक । त्रिविध प्रारब्धें बांधले लोक । तेणें भोगणें पडे आवश्यक । रावो रंक सुटेना ॥ ६८ ॥ भूतांची पीडा ते भौतिक । देवांची पीडा ते दैविक । देहीं उपजती ज्वरादिक । हे पीडा देख दैहिक ॥ ६९ ॥ यापरी त्रिविध दुःख । प्रारब्ध झालें जनक । तें भोगितां मानी असुख । तो केवळ मूर्ख अतिमंद ॥ ५७० ॥ जे भोग आले प्रारब्धेंसीं । तेथे साह्य केल्या हरिहरांसी । भोग न चुकती प्राण्यासी । हें जाणोनि संन्यासी क्षमावंत ॥ ७१ ॥ कृष्ण साह्य पांडवांसी । ते भोगिती नष्टचर्यासी । तेथें साह्य केल्या हरिहरांसी । प्रारब्ध कोणासी टळेना ॥ ७२ ॥ परिभूत इमां गाथामगायत नराधर्मैः । पात्यद्भिः स्वधर्मस्थो धृतिमास्थाय सात्त्विकीम्‌ ॥ ४२ ॥ दुर्जनांच्या उपद्रवाहातीं । निजशांति न सांडीच यती । धरोनियां सात्त्विकी धृती । स्वधर्मस्थिती न ढळेचि ॥ ७३ ॥ तेणें भिक्षूनें गायिली गाथा । ते तुज मी सांगेन आतां । उद्धवा अतिसावधानता । तो बोध तत्त्वतां अवधारीं ॥ ७४ ॥ तो बोधू धरितां चित्तीं । द्वंद्वसाम्या पावे स्थिती । सहजें उल्हासे निजशांती । सायुज्यमुक्ती घर रिघे ॥ ७५ ॥ जगीं उद्धवाचें भाग्य पूर्ण । ज्यासी श्रीकृष्ण करी सावधान । काय बोलिला भिक्षु आपण । तें निरूपण अवधारीं ॥ ७६ ॥ द्विज उवाच- नायं जनो मे सुखदुःखहेतुर्न देवताऽऽत्माग्रहकर्मकालाः । मनः परं कारणमामनन्ति संसारचक्रं परिवर्तयेद्यत्‌ ॥ ४३ ॥ सुजन दुर्जन साधारण । ऐसे जे त्रिविध जन । माझ्या सुखदुःखांसी कारण । सर्वथा जाण ते नव्हती ॥ ७७ ॥ जन तितुके पांचभौतिक । माझाही देहो तोचि देख । जनांसी मज सहजें ऐक्य । उपजे सुखदुःख मनापाशीं ॥ ७८ ॥ देवता सुखदुःखदायक । ऐसें म्हणावें आवश्यक । तीं दैवतें मनःकाल्पनिक । त्याचें सुखदुःख मजसी न लगे ॥ ७९ ॥ देवतारूपें मन आपण । मनें कल्पिले देवतागण । ते जैं सुखदुःखें देती जाण । तैं मुख्य कारण मन झालें ॥ ५८० ॥ जेथ जैसा मनाचा सद्भावो । तेथ तद्रूपें भासे देवी देवो । जेथ मनाचा विकल्प पहा हो । तेथ थिता देवो दिसेना ॥ ८१ ॥ यालागीं सकळ देवता । त्या जाण मनःकल्पिता । त्यांपासाव सुखदुःखव्यथा । ते मनाचे माथां निश्चित ॥ ८२ ॥ आत्मा सुखदुःखांसी कारण । हें समूळ मिथ्यावचन । आत्म्याचे ठायीं द्वैतभान । त्रिशुद्धी जाण असेना ॥ ८३ ॥ मी एक सुखदुःखांचा दाता । हा एक सुखदुःखांचा भोक्ता । हें आत्म्याचे ठायीं तत्त्वतां । जाण सर्वथा असेना ॥ ८४ ॥ जन्मकाळींचे ग्रह दारुण । म्हणों सुखदुःखांसी कारण । ग्रहांचा ग्रहो मन आपण । जन्ममरण भोगवी ॥ ८५ ॥ ग्रहांची ग्रहगती देहान्तवरी । मनाची ग्रहगती त्याहूनि थोरी । दुःख भोगवी नाना प्रकारीं । जन्मजन्मांतरीं सोडीना ॥ ८६ ॥ दुष्ट ग्रह चारी दिवस पीडी । मनाची पीडा जन्मकोडी । दुष्ट ग्रहो भोगूनि सोडी । मन न सोडी कल्पांतीं ॥ ८७ ॥ जैं मन न धरी देहाभिमान । तैं ग्रहांची पीडा मानी कोण । यालागीं सुखदुःखां कारण मनचि जाण महाग्रहो ॥ ८८ ॥ येथ निजकर्म दुःखदायक । हेंही म्हणतां न ये देख । कर्म कर्मबंधमोचक । तें दुःखादायक घडे केवीं ॥ ८९ ॥ स्वकर्म शुद्ध स्वाभाविक । त्यासी मनें करूनि स्कामिक । नानापरी अतिदुःख । योनि अनेक भोगवी ॥ ५९० ॥ हो कां कर्माचिनि क्रियायोगें ।जैं मनःसंकल्प कर्मी न लगे । तैं सुखदुःखांचीं अनेगें । विभांडी वेगें निजक्र्म ॥ ९१ ॥ देह सुखदुःखांसी काय जाणे । आत्मा सुखदुःख सर्वथा नेणे । येथ सुखदुःखांचे गाडे भरणें । मनें भोगवणें निजसत्ता ॥ ९२ ॥ येथ सुखदुःखदायक । मनचि झालें असे एक । मना‌अधीन हो‌ऊनि लोक । मिथ्या सुखदुःख भोगिती ॥ ९३ ॥ काळ सुखदुःखांचा दाता । हेंही न घडे गा सर्वथा । मनःसंकल्पसंकेता । काळाची सत्ता लागली ॥ ९४ ॥ अजरामर असतां आपण । मनें घेतलें मज आहे मरण । तेथचि काळ लागला जाण । क्षणें क्षण निर्दाळित ॥ ९५ ॥ आपुलेनि हातें आपण । पठडे खोंविलें दाभण । रात्रीं रुततांचि तें जाण । सर्पभयें प्राण सांडिला ॥ ९६ ॥ त्यासी सर्प नाहीं लागला । मा विखें केवीं तो घारला । परी निजशंके स्वयें निमाला । तैसा काळ लागला जनासी ॥ ९७ ॥ एकासी सर्प झोंबला पाठेसी । काय रुतलें म्हणे सांगातियासी । तो म्हणे कांटी लागली होती कैसी । ते म्यां अनायासीं उपडिली ॥ ९८ ॥ तो नव्हे सर्पा साशंक । यालागीं त्यासी न चढेचि विख । निजव्यापारीं देख । यथासुख वर्तत्‌ ॥ ९९ ॥ त्यासी सांगोनि बहुकाळें खूण । देतां सर्पाची आठवण । तत्काळ विषें आरंबळोन । आशंका प्राण सांडिला ॥ ६०० ॥ तेवीं निर्विकल्पपुरुखा । उठी संकल्पाची आशंका । ते काळीं काळू देखा । बांधे आवांका‌अ निर्दळणीं ॥ १ ॥ निःशंकपणे साचार । ज्याचें मन म्हणे मी अमर । त्यांचे काळ वर्जी घर । काळ दुर्धर मनःशंका ॥ २ ॥ जो निर्विकल्प निजनिवाडें । काळ सर्वथा न ये त्याकडे । नश्वर नाहीं मा तयापुढें । काळ कोणीकडे रिघेल ॥ ३ ॥ यापरी गा काळ देख । नव्हे सुखदुःखदायक । सुखदुःखांचें जनक । मनचि एक निश्चित ॥ ४ ॥ मनःकल्पित संसार जाण । मनें कल्पिलें जन्ममरण । संसारचक्रीं आवर्तन । मनास्तव जाण पुनः पुनः ॥ ५ ॥ हे साही प्रकार जाण । म्हणती सुखदुःखांसी कारण । विचारितां हे अप्रमाण । मनोजन्य सुखदुःखें ॥ ६ ॥ नवल लाघवी कैसें मन । शुद्धि उपजवी मीपण । चिद्रूपा लावूनि जीवपण । सुखदुःखें जाण भोगवी ॥ ७ ॥ डोळींचा कणू अल्प एक । तो शरीरासी दे अतिदुःख । तेवीं वासनामात्रें मन देख । दारुण सुखदुःख भोगवी ॥ ८ ॥ म्हणाल येथ अविद्या एक । ते होय सुखदुःखदायक । अविद्या ब्रह्म असतां देख । मनेंवीण सुखदुःख कदा नुपजे ॥ ९ ॥ अविद्या ब्रह्म असतां पाहीं । मन लीन सुषुप्तीच्या ठायीं । तेव्हां सुखदुःखचि नाहीं । भोग कोणेंही कंहीं देखिजेना ॥ ६१० ॥ मन दुश्चित जेव्हां पाहीं । तेव्हां जो भोग भोगिजे देहीं । तें सुखदुःख न पडे ठायीं । स्वयें स्वदेहीं देखिजे ॥ ११ ॥ यालागीं सुखदुःखांचें कारण । मनचि आपण्या आपण । तेणें लावूनि जन्ममरण । भोवंडी दारुण भवचक्रीं ॥ १२ ॥ भवचक्रीं प्रत्यावर्तन । कोणे रीती करवी मन । तेचि अर्थींचें निरूपण । भिक्षु आपण्या आपण निरूपी ॥ १३ ॥ मनो गुणान्वै सृजते बलीयस्ततश्च कर्माणि विलक्षणानि । शुक्लानि कृष्णान्यथ लोहितानि तेभ्यः सवर्णाः सृतयो भवन्ति ॥ ४४ ॥ मनो कल्पोनि निजसत्तें । उपजवी नाना वृत्तींतें । त्याचि त्रिगुणा होती येथें । गुणविभागातें गुणावृत्ती ॥ १४ ॥ सत्त्वरजतमादि गुणीं । सुरनरतिर्यगादि योनी । मनें त्रिभुवन उभवूनी । संसारभुवनीं स्वयें नांदे ॥ १५ ॥ त्या मनाची प्रौढी गाढी । क्षणें रची क्षणें मोडी । मन ब्रह्मादिकां भुली पाडी । इतर बापुडीं तीं कायी ॥ १६ ॥ मनाचा बलात्कार कैसा । निर्गुणीं पाडी गुणाच्या फांसा । लावूनि जीवपणाचा झांसा । संसारवळसा आवर्तीं ॥ १७ ॥ केवळ विचारितां मन । तें जड मूढ अचेतन । त्याचें केवीं घडे स्त्रजन । तेंचि निरूपण सांगत ॥ १८ ॥ अनीह आत्मा मनसा समीहता हिरण्यमयो मत्सख उद्विचष्टे । मनः स्वलिङ्ग परिगृह कामान्‌ जुषन्निबद्धो गुणसङ्गतोऽसौ ॥ ४५ ॥ आत्मा चित्स्वरूप परिपूर्ण । निःसंग निर्विकार निर्गुण । त्यासी संसारबंधन । सर्वथा जाण घडेना ॥ १९ ॥ जो स्वप्रकाशें प्रकाशघन निजतेजें विराजमान । जो परमात्मा परिपूर्ण । त्यासी क्रियाचरण कदा न घडे ॥ ६२० ॥ विचारितां निजनिवाडें । मनाचे जडत्वचि जोडे । त्यासीही संसार न घडे । भवबंध घडे तो ऐका ॥ २१ ॥ नवल मनाचें विंदान । शुद्धीं उपजवी मीपण । तेचि वस्तूसी जीवपण । सगुणत्वा जाण स्वयें आणी ॥ २२ ॥ मनःसंकल्पाचें बळ । शुद्धासी करी शबळ । लावूनि त्रिगुणांची माळ । भवबंधजाळ स्वयें बांधे ॥ २३ ॥ जेवीं घटामाजील घटजळ । आकळी अलिप्त चंद्रमंडळ । तेवीं मनःसंकल्पें केवळ । कीजे शबळ चिदात्मा ॥ २४ ॥ घटींचें हालतां जीवन । चंद्रमा करी कंपायमान । तेवीं शुद्धासी जन्ममरण । मनोजन्य सुखदुःखें ॥ २५ ॥ आत्मा स्वप्रकाश चित्स्वरूप । मन जड कल्पनारूप । तें मानूनि आपुलें स्वरूप । त्याचें पुण्यपाप स्वयें भोगी ॥ २६ ॥ जीवाचा आप्त आवश्यक । सुहृद सखा परमात्मा एक । तो मनाजीवाचा नियामक । द्रष्टा देख साक्षित्वें ॥ २७ ॥ अविद्या प्रतिबिंबे नेटका । जीव जो कां माझा सखा । तो मनोभ्रमें भ्रमोनि देखा । भोगी सुखदुःखां मनोजन्म ॥ २८ ॥ मनाची एकात्मता परम । जीवासी पडला थोर भ्रम । आपण असतांही निष्कर्म । कर्माकर्म स्वयें भोगी ॥ २९ ॥ सूळीं जीव मनाचा नियंता । तोचि मनाच्या एकात्मता । मनाचिया सुखदुःखव्यथा । आपुले माथां नाथिल्या सोशी ॥ ६३० ॥ जेवीं अति‌आप्तता प्रधान । रायासी लावी दृढबंधन । मग राजा तो होय दीन । तो भोगावी तें आपण सुखदुःख भोगी ॥ ३१ ॥ ते दशा झाली जीवासी । मनें संसारी केलें तयासी । मग नाना जन्ममरणें सोशी । अहर्निशीं सुखदुःखें ॥ ३२ ॥ त्या मनासी निग्रहो न करितां । जीवाची न चुके व्यथा । मनाचेनि छंदें नाचतां । साधनें सर्वथा व्यर्थ होती ॥ ३३ ॥ दानं स्वधर्मो नियमो यमश्च श्रुतं च कर्माणि च सद्व्रतानि । सर्वे मनोनिग्रहलक्षणान्ताः परो हि योगो मनसः समाधिः ॥ ४६ ॥ न लक्षितं मनोनियमन । सर्वस्वही दिधल्या दान । एक मी दाता होय अभिमान । तेणें दानें मन दाटुगें होय ॥ ३४ ॥ चुकोनि मनोनिग्रहाचें वर्म । आचरतां वर्णाश्रमधर्म । तेणें उल्हासे मनोधर्म । माझें स्वकर्म अतिश्रेष्ठ ॥ ३५ ॥ मीचि एक तिहीं लोकीं । स्वचार निष्ठ स्वंयपाकी । यापरी स्वधर्मादिकीं । मन होय अधिकीं चाविरें ॥ ३६ ॥ मनोनियमनीं नाहीं बुद्धी । तैं यमनियम ते उपाधी । मी एक साधक त्रिशुद्धी । हेंचि प्रतिपादी मनोधर्म ॥ ३७ ॥ करितां वेदशास्त्रश्रवण । गर्वाचें भरतें गहन । पंडित्यीं अति‌अभिमान । मनोनियमन तेथें कैंचें ॥ ३८ ॥ करूं जातां निजकर्म । कर्मक्रिया अतिदुर्गम । कर्मठतेचा चढे भ्रम । मनोनियमन घडे केवीं ॥ ३९ ॥ कर्म केवळ देहाचे माथां । आत्मा देहीं असोनि विदेहता । त्यासी कर्मीं कर्मबद्धता । कर्मठ मूर्खतां मानिती ॥ ६४० ॥ अनंतव्रतें झाले व्रती । तेणें धनधान्य वांछिती । मनोनिग्रहो नाहीं चित्तीं । सद्व्रते जाती सुनाट ॥ ४१ ॥ व्रत दान स्वधर्म सकळ । यांसी मनोनिग्रहो मुख्य फळ । तेणेंवीण अवघीं विकळ । साधनें निष्फळ साधकां ॥ ४२ ॥ दानादिक सप्त पदार्थ । हे ज्ञानाचे अंगभूत । तीं साधनें समस्त । निष्फळ येथ केवीं म्हणा ॥ ४३ ॥ दानादिकें जीं जीं येथें । इहामुत्र फळ ये त्यांतें । तें फळचि निष्फळ येथें । जन्ममरणांतें वाढवी ॥ ४४ ॥ येथ साधक होय सज्ञान । फळाशा निःशेष त्यागून । दानादि स्वधर्माचरण । चित्तशुद्धीसी जाण उपयोगी ॥ ४५ ॥ माझी व्हावी चित्तशुद्धी । ऐशी उपजावया बुद्धी । भगवत्कृपा पाहिजे आधीं । तैं साधनें सिद्धी पावती ॥ ४६ ॥ साधनीं माझी मुख्य भक्ती । त्यांत विशेषें नामकीर्ती । नामें चित्तशुद्धि चित्तीं । स्वरूपस्थिती साधकां ॥ ४७ ॥ नामापरतें साधन । सर्वथा नाहीं आन । नामें भवबंधच्छेदन । सत्य जाण उद्धवा ॥ ४८ ॥ स्वरूपस्थित निश्चळ मन । जेथ लाजोनि जाय साधन । तेथ दानादिकांचें प्रयोजन । सहजचि जाण खुंटले ॥ ४९ ॥ समाहितं यस्य मनः प्रशान्तं दानादिभिः किं वद तस्य कृत्यम्‌ । असंयतं यस्य मनो विनश्यद्दानादिभिश्चेदपरं किमेभिः ॥ ४७ ॥ येथ ज्या पुरुषाचें मन । ठाकी आपुलें जन्मस्थान । त्यासी दानादिकांचें कोण । पयोजन साधनीं ॥ ६५० ॥ पूर्णतृप्तापाशीं जाण । ओगरलिया सदन्न । तो जेवीं न पाहे हुंगोन । तेवीं साधन अमनस्का ॥ ५१ ॥ गंगा उतरावया महापूरीं । अतिप्रयासीं ताफा करी । तोचि पूर वोहटल्यावरी । ताफा अव्हेरी निःशेष ॥ ५२ ॥ तेवीं कामक्रोधादिवेगशून्य । ज्याचें निर्विकल्पीं निश्चळ मन । त्यासी दानादिकीं प्रयोजन । नाहीं जाण निश्चित ॥ ५३ ॥ जेवीं सूर्योदय झाल्यापाठीं । उपेगा न ये लक्ष दिवटी । तेवीं निर्विकल्पता मनीं उठी । तैं साधनें कोटी सुनाट ॥ ५४ ॥ एवं समाहित ज्याचें मन । त्यासी दानादि नाना साधन । करावया नाहीं प्रयोजन । कल्पनां पूर्ण निमाल्या ॥ ५५ ॥ ज्याचें नेम न मनी चित्त । जें सदा विवेकरहित । जें अनिवार विषयासक्त । त्यासीही अनुपयुक्त साधनें ॥ ५६ ॥ जेवीं मदगजांच्या लोटीं । सैन्य पळे बारा वाटीं । तेवीं विषयासक्तापाठीं । साधनें हिंपुटी हो‌ऊनि ठाती ॥ ५७ ॥ जो विषयासक्तकामना । तो सर्वथा नातळे साधना । करी तैं तेथेंही जाणा । विषयकल्पना संकल्पीं ॥ ५८ ॥ स्वयें करितां पै साधना । जें जें फळ वांछी वासना । तें तेंचि फळे जाणा । करी उगाणा दानादिकांचा ॥ ५९ । जेवीं कां पूर्णबळाचा वारू । त्यावरी बैसला निर्बळ नरू । तो त्यासी सर्वथा अनावरू । नव्हे स्थिरू अणुमात्र ॥ ६६० ॥ तैसें ज्याचें अतिदुर्मन । सदा कामक्रोधीं परिपूर्ण । जो स्वयें झाला मनाचे आधीन । ज्याचा विवेक निमग्न महामोहीं ॥ ६१ ॥ तेथ साधनचि करी कोण । करी तें मोहास्तव जाण । तेणें वाढे तमोगुण । मनोनियमन घडेना ॥ ६२ ॥ श्रवणादि इंद्रियबंधन । करूनि करितां साधन । तेणें वश्य नव्हे मन । मना‌अधीन इंद्रियें ॥ ६३ ॥ मनोवशेऽन्ये ह्यभवंस्म देवा मनश्च नान्यस्य वशं समेति । भीष्मो हि देवः सहसः सहीयान्‌ युञ्ज्याद्वशे तं स हि देवदेवः ॥ ४८ ॥ मनें आकळिलें सर्वांसी । परी मन नाकळे कोणासी । मनें छळिलें देवांसी । तें केवीं इंद्रियांसी आटोपे ॥ ६४ ॥ चंद्र अधिष्ठाता मनासी । मनें छळिलें चंद्रम्यासी । व्यभ्चारोनि गुरुपत्नीसी । क्षयरोगी त्यासी मनें केलें ॥ ६५ ॥ ब्रह्मा अधिष्ठाता बुद्धीसी । मन ब्रह्मयाची बुद्धि भ्रंशी । निजपुत्री वरितां त्यासी । स्वकन्येसी अभिलाषी ॥ ६६ ॥ चित्तीं वासुदेवाचें अधिष्ठान । त्यातेंही हळूच ठकी मन । लावूनि वृंदेचें ध्यान । श्मशानीं जाण पाडिला ॥ ६७ ॥ रुद्र अधिष्ठाता अहंकारीं । त्यातेंही मन सिंतरी । अभिलाषितां ऋषिनारी । शापिला ऋषीश्वरीं लिंगपातें ॥ ६८ ॥ ऐसें देवां दुर्जय जें मन । त्यासी आवरी इतर कोण । म्हणाल इंद्रियें नियमितील मन । तरी मनाधीन इंद्रियें ॥ ६९ ॥ जैं इंद्रियें धरोनि हातीं । मन एकाग्र हो‌इजे अर्थीं । तेव्हा इतर इंद्रियाची स्थिती । राहे निश्चितीं सुनाट ॥ ६७० ॥ इंद्रियविषयां होय संगती । ते काळीं जैं दुश्चिती मनोवृत्ती । तेव्हां न घडे विषयप्राप्ती । इंद्रियां स्फुरेना ॥ ७१ ॥ जेव्हा अनासक्त मनोधर्म । तेव्हां इंद्रियांचें न चले काम । मना‌अधीन । इंद्रियग्राम । इंद्रियां मनोनेम कदा न घडे ॥ ७२ ॥ इंद्रियांचा राजा मन । इंद्रियें न चालती मनेंवीण । पुरुषातेंही मन आपण । वश्य जाण स्वयें करी ॥ ७३ ॥ अतिबळियां बळी मन । तेथ इंद्रियें बापुडिं कोण । मनाचें करावया दमन । नव्हे आंगवण वरिष्ठां ॥ ७४ ॥ काळ निजसत्ता सर्व ग्रासी । परी मनाची लोंव नुपडे त्यासी । करितां उत्पत्तिस्थितिप्रळयांसी । मन काळासी नाटोपे ॥ ७५ ॥ शस्त्रें न तुटे सर्वथा मन । त्यासी विरवूं न शकेचि जीवन । मन जाळूं न शके न शके दहन । मनातें गगन शून्य करूं न शके ॥ ७६ ॥ मनासी लागों न शके व्याधी । मन रोडेजे ऐशी नाहीं आधी । मन आकळावया सिद्धी । पाहतां त्रिशुद्धी दिसेना ॥ ७७ ॥ मन ब्रह्मादिकांच्या रची कोडी । मन ब्रह्मांडें घडी मोडी । मन निजकल्पनाकडाडीं । नाचवी धांदडी त्रैलोक्या ॥ ७८ ॥ मन कळिकाळातें छळी । मन प्रळयानळातें गिळी । मन बळियांमाजीं अतिबळी । मनातें आकळी ऐसा नाहीं ॥ ७९ ॥ मन देवांसी दुर्धर । मन भयंकरां भयंकर । मनें आकळिले हरिहर । मनासमोर कोण राहे ॥ ६८० ॥ मनाचा अनिवार मार । कोण राहे मनासमोर । मनास पर्जी ऐसा थोर । सुर नर असुर दिसेना ॥ ८१ ॥ मनासी मेळवी हातोफळी । ऐसा त्रिलोकीं नाहीं बळी । मन कळिकाळातें आकळी । प्रळयरुद्रातें गिळी न माखतां दाढ ॥ ८२ ॥ ऐसा मनाचा अगाध भावो । यालागीं यातें म्हणिजे देवो । मनाचा भयानकां भेवो । यालागीं भीष्मदेवो मनातें म्हणती ॥ ८३ ॥ ऐशी मनाची अनावर स्थिती । यासी आकळावयाची सवर्म युक्ती । साचार सांगेन तुम्हांप्रती । सावधानस्थिती अवधारा ॥ ८४ ॥ जेवीं हिरेनि हिरा चिरिजे । तेंवी मनेंचि मन धरिजे । हेंही तैंचि गा लाहिजे । जैं गुरुकृपा पाविजे संपूर्ण स्वयें ॥ ८५ ॥ मन गुरुकृपेची आंदणी दासी । मन सदा भीतसे सद्गुरूसी । तें ठेवितां गुरुचरणापाशीं । दे साधकांसी संतोष ॥ ८६ ॥ या मनाची एक उत्तम गती । जरी स्वयें लागलें परमार्थीं । तरी दासी करी चारी मुक्ती । दे बांधोनि हातीं परब्रह्म ॥ ८७ ॥ मनचि मनाचें द्योतक । मनचि मनाचें साधक । मनचि मनाचें बाधक । मनचि द्यातक मनासी ॥ ८८ ॥ जेवीं वेळु वाढवी वेळुजाळी । वेळुवेळुवां कांचणीमेळीं । स्वयें पाडूनि इंगळी । समूळ जाळी आपण्यातें ॥ ८९ ॥ तेवीं मन मनासी चिंती मरण । तैं सद्गुरूसी रिघवी शरण । त्याचे वचनीं विश्वासोन । करवी गुरुभजन निरभिमानें ॥ ६९० ॥ सद्‌गुरुकृपा झालियां संपूर्ण । हें मनचि मनासी दावी खूण । तेणें निजसुखें सुखावोन । मनचि प्रसन्न मनासी होय ॥ ९१ ॥ मन मनासी झालिया प्रसन्न । तेव्हां वृत्ति होय निरभिमान । ऐसें साधकां निजसमाधान । मनें आपण साधिजे ॥ ९२ ॥ पावोनि गुरुकृपेची गोडी । मनोविजयाची निजगुढी । मनें उभवूनि लवडसवडी । दीजे रोकडी साधकांहातीं ॥ ९३ ॥ यापरी साधकांसी संपूर्ण । मन आपला विजयो दे आपण । शेखीं सद्‌गुरुनिजबोधीं पूर्ण । मन होय लीन निजात्मता ॥ ९४ ॥ जेवीं कां सैंधवाचा खडा । रिघोनि सिंधूमाजिवडा । स्वयें विरोनियां रोकडा । सिंधू‌एवढा तो होय ॥ ९५ ॥ यापरी साधक जाण । होतांच निरभिमान । स्वयें होती ब्रह्म पूर्ण । मीतूंपण गिळोनी ॥ ९६ ॥ मग त्याचिया निजदृष्टी । मीचि एक अवघे सृष्टीं । मावळली द्वंद्वत्रिपुटी । सुखदुःख पाठीं लागेना ॥ ९७ ॥ तेथे कैंचें सुख कैंचें दुःख । कैंचा बंध कैंचा मोक्ष । कोण पंडित कोण मूर्ख । ब्रह्म एक एकलें ॥ ९८ ॥ तेथ कोण देव कोण भक्त । कोण शांत अशांत । मावळलें द्वैताद्वैत । वस्तु सदोदित स्वानंदें ॥ ९९ ॥ तेथ उगाणलें क्रियाकर्म । लाजा विराले धर्माधर्म । कैंचें अधम उत्तम मध्यम । परिपूर्ण ब्रह्म कोंदलें ॥ ७०० ॥ तेथ कैंचा शास्त्र कैंचा वेद । कैंची बुद्धी कैंचा बोध । निःशेष निमाला भेद । परमानंद कोंदला ॥ १ ॥ यापरी मनोविजयें पहा हो । ऐशिया स्थिती मावला भावो । तेंचि स्वयें वदे देवो । ये अर्थीं संदेहो असेना ॥ २ ॥ मनोजयाचा सद्भावो । ब्रह्मादिकां अगम्य पहा हो । जो स्वांगें करी स्वयमेवो । तो देवाधिदेवो निजबोधें ॥ ३ ॥ जो निजमनातें जिंकोनी । जनीं पावला जनार्दनीं । तो धन्य धन्य त्रिभुवनीं । त्याचोनि अवनी पवित्र ॥ ४ ॥ तेणेंचि पूर्वज तारिले । तेणें सकळ कुळ उद्धरिलें । तेणेंचि परब्रह्म आंगविलें । जेणें जिंकिलें मनातें ॥ ५ ॥ मनोजयें जे अतिसमर्थ । शांति सर्वस्वें विकिली तेथ । त्यांसी सुखदुःखांचे आवर्त । गेले न लगत निजात्मता ॥ ६ ॥ ऐशी भिक्षूची निजवाणी । उल्हासें सांगे शार्ङ्गपाणी । उद्धवास म्हणे संतोषोनी । धन्य त्रिभुवनीं मनोजय ॥ ७ ॥ जेणें निजमनातें जिंकिलें । त्यासी मी किती वानूं बोलें । तेणें मज आपुलें पोसणें केलें । कीं विकत घेतलें उखितेंचि ॥ ८ ॥ मज सुखरूपा त्याचेनि सुखप्राप्ती । मज नित्यतृप्ता त्याचेनि तृप्ती । मज अनंता त्यामाजीं वस्ती । मी दाटुगा त्रिजगतीं त्याचेनि ॥ ९ ॥ ’मी तो’ या शब्दकुसरी । त्याही जाण आम्हांबाहेरी । आंतुवटे निजविचारीं । तोचि मी निर्धरीं निजा‌ऐक्यता ॥ ७१० ॥ मनोजयें हे पदवी प्राप्त । तो मनोजय न करूनि तेथ । प्राकृत रिपुजयें जे गर्वित । त्यातें निर्भर्त्सित स्वयें भिक्षुं ॥ ११ ॥ तं दुर्जयं शत्रुमसह्यवेगमरुन्तुदं तं न विजित्य केचित्‌ । कुर्वन्त्यसद्विग्रहमत्र मर्त्यैर्मित्रण्युदासीनरिपून्विमूढाः ॥ ४९ ॥ पार्थिव शत्रु सबळ येती । तेथ सामदानादिकां स्थिती । कारणीं लावोनियां ख्याती । जिंकिले जाती निजांगें ॥ १२ ॥ हे प्रकार मनाच्या ठायीं । करितां न चलती पाहीं । मनासी करावी शिष्टा‌ई । तें कोणाचें कांहीं ऐकेना ॥ १३ ॥ मनासी द्यावें विषयदान । परी विषयीं तृप्त नव्हे मन । तेणें अधिकचि होय दारुण । आवरी कोण तयासी ॥ १४ ॥ न चले शमदमाचि प्रकारू । तरी मनासी करावा मारू । तेथ न चले हातियेरू । मारणीं विचारू स्फुरेना ॥ १५ ॥ यापरी हा मनोवैरी । दुर्जयत्वें कठिण भारी । तो सुखदुःखांच्या भरोवरी । सर्वदा मारी जन्ममरणें ॥ १६ ॥ इतर शत्रु नावरती । तरी पळों ये हातोहातीं । रिघोनियां गडदुर्गाप्रती । वांचती गती देखिजे ॥ १७ ॥ परी पळावया मनापुढें । पळतां त्रैलोक्य होय थोडें । जेथ लपावें अवघडें । तेथही रोकडें मन पावे ॥ १८ ॥ मनाचे सेनापति शूर । कामक्रोधादि महावीर । त्यांचा मार अतिदुर्धर । घायीं थोरथोर लोळविती ॥ १९ ॥ बाह्य शत्रु ते दूरदेशीं । येतां बहु दिन लागती त्यांसी । मनःशत्रु तो अंगेंसीं । अहर्निशीं जडलासे ॥ ७२० ॥ आसनीं भोजनीं एकांतीं । जपीं अथवा घ्यानस्थितीं । मनाची उडी पडे अवचितीं । विभांडी सर्वार्थीं वैराकरें ॥ २१ ॥ बाह्य शत्रूचें अल्प दुःख । मनाची पीडा विशेख । जन्ममरणांचे आवर्त देख । मन आवश्यक भोगवी ॥ २२ ॥ बाह्य शत्रु मरणात्मक । मन मरणासी अटक । हा वैरी न जिंकितां देख । जीवाचें अतिदुःख टळेना ॥ २३ ॥ मनाचे सवेग वेगासी । न साहवे सुरनरांसी । कष्टीं न जिंकवे कोणासी । यालागीं मनासी दुर्जयत्व ॥ २४ ॥ ऐशिया मनातें न जिंकित । बाह्य शत्रु जिणोनि येथ । जे होती अतिगर्वित । ते निश्चित जाण महामूर्ख ॥ २५ ॥ मनेंचि जिंकावें मनासी । हें गतशोकीं तुजपाशीं । सांगीतलें यथार्थेंसीं । मनोजयासी उपावो ॥ २६ ॥ एवं मनातें ऐशियापरी । न साधवेचि करूनि वैरी । तरी मनासी करोनि मैत्री । मन सुखी करी मित्रत्वें ॥ २७ ॥ प्राकृत मित्रांची मैत्री । उपकारीं प्रत्युपकारी । तेही विषयसुखावरी । येरयेर घरीं उचितानुकाळें ॥ २८ ॥ तैशी नव्हे मनाची मैत्री । उपकारेंवीण प्रत्युपकारी । सकळ दुःखातें निवारी । सुखसागरीं नांदवी ॥ २९ ॥ प्राकृतीं अतिमित्रत्व ज्यासी । निजदुःख सांगतां त्यापाशीं । सर्वथा निवारेना त्यासी । म्हणे हें आम्हांसी असाध्य ॥ ७३० ॥ तैसें मित्रत्वा नव्हे मन । मना बैसवूनि सावधान । करितां निजदुःख निवेदन । हरी जन्ममरणमहाबाधा ॥ ३१ ॥ मरणभय असतां चित्तीं । कनककामिनींची आसक्ती । स्त्रिया अतिशयें निर्भर्त्सिती । तरी निर्लज्जवृत्ती लाजेना ॥ ३२ ॥ परदारा परधन । परद्रोहो परनिंदा जाण । लागल्या न सांडितां क्षण । नरक दारुण भोगावया ॥ ३३ ॥ उसंत नाहीं क्षुधेहातीं । द्वंद्वदुःखांची अतिप्राप्ती । नावरे इंद्रियवृत्ती । ऐसें मनाप्रती सांगतां ॥ ३४ ॥ ऐसें ऐकतां स्वयें मन । वैराग्यें खवळे पूर्ण । वेंचूनि विवेकाचें धन । दुःखनिर्दळण करूं पावे ॥ ३५ ॥ चोर भांडारी करित पूर्ण । चोर चोरातें निवारी जाण । तेवीं मनासीं करितां मित्रपण । मनाचे अवगुण मनचि नाशी ॥ ३६ ॥ अधर्मीं प्रवर्ततां आपण । मनचि मनासी जाण । असत्याची वाचेसी आण । आपण्या आपण मन घाली ॥ ३७ ॥ कैशी मनाची मैत्री परम । निःशेष जाळावया कर्माकर्म । जोडावया चित्तशुद्धिचें वर्म । स्मरे हरिनाम अहर्निशीं ॥ ३८ ॥ श्रीराम जयराम दों अक्षरीं । महापातका होय बोहरी । नाम न विसंबे क्षणभरी । अखंडाकारीं हरी स्मरे ॥ ३९ ॥ तेव्हां असत्याचें शीस तोडी । अधर्माची साली काढी । कल्पनेचे पाय मोडी । तटका तोडी आशेचा ॥ ७४० ॥ विकल्पाचा घरठाव मोडी । प्रपंचाचे दांत पाडी । अविश्वासू तीं ठायीं तोडी । विश्वासाची गुढी उभवी मन ॥ ४१ ॥ ऐसेनि परिपक विश्वासीं । ये‌ऊनि सद्‌गुरुचरणांपाशीं । तनु मन धन सर्वस्वेंसीं । गुरुवचनासी विश्वासे ॥ ४२ ॥ पूर्ण विश्वासाचें लक्षण । होतां गुरुवाक्यश्रवण । परीसीं लोह पालटे जाण । तैसें अंतकःरण पालटे ॥ ४३ ॥ गुरुवचन सांगोन राहे । परी मनींचें मनन न राहे । कीटकी भ्रमरी ऐसा पाहे । तद्रूप होये निदिध्यासें ॥ ४४ ॥ तेव्हां कमनीय कामिनी धन । तें देखे विष्ठेसमान । निंदा द्वेष मानाभिमान । हे मनाचे अवगुण मनचि नाशीं ॥ ४५ ॥ धन्य धन्य मनाची मैत्री । विश्वास धरोनि निर्धारीं । जन्ममरण जीवें मारी । जीवातें करी अजरामर ॥ ४६ ॥ ऐशी मनाशीं करितां मैत्री । मन परम उपकारी । जीवातें धरूनि निजकरीं । स्वानंदसागरीं बुडी दे ॥ ४७ ॥ तेथ मनाचें मनपण सरे । जीवाचें जीवपण विरे । बंधमोक्षांची धांव पुरे । समूळ ओसरे भवभय ॥ ४८ ॥ मनाचें मित्रत्व यापरी । आपुलें कुळ स्वयें संहारी । आपणही मरे मित्रोपकारीं । मन मित्राचारीं अवंचक ॥ ४९ ॥ ऐसें मैत्रीसी मन सादर । जवळी असतां निरंतर । त्यातें वोसंडूनि पामर । प्राकृत नर मित्र करिती ॥ ७५० ॥ वैर करोनि मनचि मारावें । मित्रत्वें मनें मन साधावें । इयें दोनीं जैं न संभवे । तैं उपेक्षावें मनातें ॥ ५१ ॥ मन म्हणेल तें न करावें । मनातें हातीं न धरावे । मनातें कांहीं नातळावें । जीवेंभावें निःशेष ॥ ५२ ॥ मन म्हणेल जें सुख । तें सांडावें आवश्यक । मन म्हणेल जें दुःख । तेंही निःशेख त्यजावें ॥ ५३ ॥ ऐसें उदास मन देख । जो करी आवश्यक । तरी तो झाला अमनस्क । शांती अलोलिक ते ठायीं ॥ ५४ ॥ शत्रु मित्र उदासीन । करूनि वश्य न करी मन । जो धरी देहाभिमान । त्याचें भवभ्रमण सरेना ॥ ५५ ॥ देहं मनोमात्रमिप्तं गृहीत्वा ममाहमित्यन्धधियो मनुष्याः । एषोऽहमन्योऽयमिति भ्रमेण दुरन्तपारे तमसि भ्रमन्ति ॥ ५० ॥ आत्मा विदेहो चिद्धन । तेथ मी देही हें मानी मन । त्या देहासवें मी-माझेपण । जन्ममरण सुखदुःखें ॥ ५६ ॥ आत्मा नित्यमुक्त विदेही । तो मनाच्या एकात्मता पाहीं । विदेही तो म्हणवी देही । शेखीं देहाच्या ठायीं आत्मत्व मानी ॥ ५७ ॥ मी देह हें मानी मन । तेणें दृढ होय देहाभिमान । तेव्हां देहचि होय आपण । मी-माझेपण ते ठायीं ॥ ५८ ॥ मी सच्चिदानंद परिपूर्ण । हें आपलें विसरे आपण । मी वैश्य शूद्र क्षत्रिय ब्राह्मण । मूर्ख सज्ञान मी एक ॥ ५९ ॥ मी रोडका बोडका कुब्ज काण । मी धाटामोठा विचक्षण । हे नाथिले घे‌ऊनि देहगुण । माणुसपण स्वयें मिरवी ॥ ७६० ॥ स्वप्नामाजीं संन्यासी । आपण देखे अंत्यजवंशीं । तो आतळों मी ब्राह्मणासी । जीवास तैसी दशा झाली ॥ ६१ ॥ स्वयें परमात्मा भेदशून्य । तेथ मी माझे स्त्री पुत्र धन । स्वजन दुर्जन उदासीन । त्रिविध भेद पूर्ण सत्यत्वें मानी ॥ ६२ ॥ ऐसी देहात्मभावसिद्धी । सत्य मानितां भेदविधी । जीवाची निजात्मबुद्धी । झाली त्रिशुद्धी आंधळी ॥ ६३ ॥ जैसा स्वप्नींचा मिथ्या वेव्हार । तैसा मनःकल्पित संसार । तो मानितांचि साचार । देह‌अहंकार द्रुढ झाला ॥ ६४ ॥ दृढ होतां देहाभिमान । पुढती जन्म पुढती । भवचक्रीं परिभ्रमण । निजभ्रमें जाण जीवासी ॥ ६५ ॥ जेवीं केवळ अग्नीप्रती । घणघाय कदा न लागती । तेचि लोहाचिया संगतीं । घण वरी घेत सुबद्ध ॥ ६६ ॥ तेवीं नित्यमुक्त परिपूर्ण । तेणों धरितां देहाभिमान । अंगीं लागलें जीवपण । जन्ममरण तेथें सोशी ॥ ६७ ॥ जेवीं डोळे बांधोनि व्यापारू । मंवे तेलियाचा ढोरू । तेवीं अहंकारें अंध नरू । परिभ्रमे थोरू भवचक्रीं ॥ ६८ ॥ तेथ सोशितां जन्ममरण । अतिदुःखी होय आपण । तरी न सांडी देहाभिमान । अंधतमीं जाण तो घाली ॥ ६९ ॥ ज्याचे दुःखें न पविजे पार । जो तरवेना अतिदुस्तर । जो भोग भोगवी अघोर । तो संसार मनोजन्य ॥ ७७० ॥ मनचि सुखदुःखांसी कारण । हें आठवे श्लोकीं निरूपण । भिक्षु बोलोनि आपण । जनादि दुःखकारण मिथ्यात्वें दावी ॥ ७१ ॥ जनस्तु हेतुः सुखदुःखयोश्चेत्‌ किमात्मनश्चात्र ह भौमयोस्तत्‌ । जिह्वां क्वचित्संदशाति स्वदद्भिस्तद्वेदनायां कतमाय कुप्येत्‌ ॥ ५१ ॥ जननीजठरीं ज्यासी जनन । त्या नांव बोलिजेती जन । ते सुखदुःखांसी कारण । सर्वथा जाण मज नव्हती ॥ ७२ ॥ जन जनासी दे दुःखबाधू । तेथ आत्म्यासी काय संबंधू । आत्मा देहातीत शुद्ध । सुखदुःखबाधू त्या न लगे ॥ ७३ ॥ देहें देहासे हो‌ईल दुःख । देहो तितुका पांचभौतिक । त्यांसी परस्परें असे ऐक्य । सर्वथा सुखःदुख घडेना ॥ ७४ ॥ जळामाजीं जळ सूतां । जेवीं जळासी नव्हे व्यथा । कां दीपू दीपें एकवटतां । दीपासी सर्वथा दुःख न बाधी ॥ ७५ ॥ तेवीं पार्थिवें पार्थिवासी । सुखदुःखबाधा न घडे त्यासी । आत्मा नातळे सुखदुःखांसी । तो देहासी स्पर्शेना ॥ ७६ ॥ म्हणाल जो देहाचा अभिमानी । सुखदुःखें होती त्यालागोनी । दुःखभोक्ता दुजेपणीं । पाहतां कोणी दिसेना ॥ ७७ ॥ आपुली जिव्हा आपुले दांतीं । रगडिली होय अवचितीं । तया कोपाची अतिप्राप्ती । कोणाप्रती करावी ॥ ७८ ॥ तेथील कोपाच्या कडाडीं । दांत पाडी कीं जीभ तोडी । तैशी जगीं एकात्मता धडफुडी । कोप यावया सवडी असेना ॥ ७९ ॥ जो पुढिलाचे ढक्यांनीं पडे । तो त्यावरी कोपें वावडे । स्वयें निसरोनि गडबडे । तो लाजिला मागेंपुढें न कोपतां निघे ॥ ७८० ॥ तेवीं मीचि भूतें मीचि भोक्ता । माझ्या दुःखाचा मी दाता । जगीं मीच मी एकात्मता । कोणावरीं आतां कोपावें ॥ ८१ ॥ माझ्या सुखद्‌ःखांसी कारण । यापरी नव्हतीच जन । म्हणाल जरी देवतागण । तेंही प्रमाण घडेना ॥ ८२ ॥ दुःखस्य हेतुर्यदि देवतास्तु किमात्मनस्तत्र्‌ । यदङ्गेन क्वचित्क्रुध्येत कस्मै पुरुषः स्वदेहे ॥ ५२ ॥ आतां दुसरें कारण मतीं । देवांपासोनि दुःखप्राप्ती । देवांची देहामाजीं वस्ती । आत्मा निजस्थितीं विदेही ॥ ८३ ॥ देहींच्या इंद्रियविकारीं । देव झाले अधिष्ठात्री । आत्मा अखंड अविकारी । सुखदुःखांमाझारी अलिप्त ॥ ८४ ॥ भूमी सहजें निर्विकार । तिची भिंती तीवरी सविकार । तेवीं वस्तु नित्य निर्विकार । तेथ भासती सविकार अधिष्ठात्रीं देव ॥ ८५ ॥ भिंती पडल्या भूमिवरी । ते मेळवी आपण्यामाझारी । तेवीं निर्गुणनिर्विकारी । इंद्रियें अधिष्ठात्री येती ऐक्या ॥ ८६ ॥ स्वदेहीं परदेहीं जाण । इंद्रियें अधिष्ठात्रीं समान । इंद्रियांचें सुखदुःख दारुण । आपुलें आपण भोगिती देव ॥ ८७ ॥ हातें हाणतां तोंडावरी । तेथ इंद्र अग्नि अधिष्ठात्री । तेव्हा इंद्रचि अग्नीतें मारी । आत्मा अविकारी दुःखातीत ॥ ८८ ॥ हो कां मुखें डसल्या हातासी । अग्नीनें घाय केलें इंद्रासी । आत्मा अलिप्त इंद्रादिदेवांसी । सुखदुःख त्यासी स्पर्शेना ॥ ८९ ॥ परमुखें स्वमुखावरी थुंकिजे । दोहीं मुखी अग्नीनें नांदिजे । तेथ कोणें कोणावरी कोपिजे । आत्मस्वरूपी दुजें असेना ॥ ७९० ॥ थुंक आणि जें कां मूत । देहीं उपजे तें देहाचें अपत्य । तें देहींचें देहावरी लोळत । कोपे तेथ कोण कोणा ॥ ९१ ॥ स्वमुखें परमुखा चुंबन दीजे । तेथ अग्नीनें अग्नीसी चुंबीजे । तेणें सुखें कोण फुंजे । आत्मत्वीं दुजें असेना ॥ ९२ ॥ स्वदेहें परदेहा आलिंगन । उभयस्पर्शीं वायूचि जाण । तेणें सुखें सुखावे कोण । दुजेपण असेना ॥ ९३ ॥ यापरी देवतागण । नव्हे सुखदुःखांसी कारण । आत्म्याचे ठायीं दैवतें जाण । हारपती पूर्ण अभेदत्वें ॥ ९४ ॥ देवीं देहो पीडितां निःशेख । देहाभिमान्या हो‌ईल दुःख । हें मानिती ते अतिमूर्ख । तेंही देख घडेना ॥ ९५ ॥ पुर म्हणिजे देहो देख । ते पुरी जा पुरनिवासक । तो सकळ देहीं पुरुष एक । तेथ कोणाचें दुःख कोण मानी ॥ ९६ ॥ जेवीं संभ्रम आवेशवेगीं । निजकर हाणतां निजांगीं । तेथील व्यथेचा भागी । कोपवयालागीं आप आपण्या ॥ ९७ ॥ देखतां आपलें एकपण । कोणाची व्यथा मानी कोण । कोण कोणावरी कोपे जाण । आपण्या आपण एकला ॥ ९८ ॥ तेवीं विश्वात्मा मीचि एक । मीचि दैवतें मीचि लोक । तेथ कोण कोणा दुःखदायक । म्यां कोणावरी देख कोपावें ॥ ९९ ॥ यापरी स्वयें विचारितां । देवांपासाव सुखदुःखता । समूळ न घडे सर्वथा । दैनिकी व्यथा असेना ॥ ८०० ॥ आत्मा सुखदुःखांसी कारण । मूळीं मजचि हें अप्रमाण । आत्म्याच्या ठायीं कार्यकारण । सुखदुःख जाण असेना ॥ १ ॥ आत्मा यदि स्यात्सुखदुःखहेतुः किमन्यतस्तत्र निजस्वभावः । न ह्यात्मनोऽन्यद्यदि तन्मृषा स्यात्क्रुध्येत कस्मान्न सुखं न दुःखम्‌ ॥ ५३ ॥ आत्मा केवळ एकला एक । तेथ कैंचें सुख कैंचें दुःख । आत्मा सुखदुःखदायक । म्हणती ते मूर्ख अविवेकी ॥ २ ॥ जेवीं विघुरलें घृत जाण । त्यासी नसे आकार ना वर्ण । तेंचि सहजें थिजोनि जाण । दिसे शुभ्रवर्ण कणिकारूपें ॥ ३ ॥ त्या घृतकणिका मिळतां देख । नाहीं परस्परें सुखदुःख । तेवीं निजात्मा एकला एक । तोचि अनेक स्वरूपें ॥ ४ ॥ जळीं जळाच्या जळलहरी । आदळतांही परस्परीं । सुखदुःख नुमटे त्यांमाझारीं । तेवीं चराचरीं परमात्मा ॥ ५ ॥ परमात्मा एकला एक । एकपणेंचि तो अनेक । तेथ विजातीय नाहीं देख । मा सुखदुःख कोणाचें ॥ ६ ॥ आत्मा सुखरूप अवघा एक । तेथ आभासे जें अनेक । तें मायामय काल्पनिक । स्वप्नप्राय देख मिथ्यात्वें ॥ ७ ॥ मृगजळीं पाहतां दिसे जळ । परी तें कोरडें देख केवळ । तेवीं देसे जें जगड्वाळ । तें मिथ्या समूळ मायिक ॥ ८ ॥ जेथ मिथ्या द्वैत मायिक । तेथ परमात्मा एकला एक । तेव्हांचि हारपलें सुखदुःख । कोपावया निःशेख ठावो नाहीं ॥ ९ ॥ जेथ निजात्मता एकपण । तेथ सुखदुःखें नाहीं जाण । कोणावरी कोपे कोण । आपल्या आपण एकला ॥ ८१० ॥ जेथ आत्म्याचा निजानुभवो । तेथ द्वैताचा अभावो । सुखदुःखें झाली वावो । कोपासी ठावो असेना ॥ ११ ॥ हे निजात्मता नेणोनि देख । सत्य मानिती जे सुखदुःख । ते होत कां वेदशास्त्रज्ञ लोक । तयां क्रोध देख विभांडी ॥ १२ ॥ ज्यासी सर्व भूतीं निजात्मता । तेथ कोण कोणा दुःखदाता । कोण कोणावरी कोपता । निजात्मता एकली ॥ १३ ॥ आत्मा सुखदुःखांचा दाता । यापरी नव्हे गा तत्त्वतां । आपण्या आपण व्यथा । मूर्खही सर्वथा न देती ॥ १४ ॥ एथिलेनि चौथे मतें । ग्रह मानावे दुःखदाते । तेंही न घडे गा येथें । ऐक निश्चितें सांगेन ॥ १५ ॥ ग्रहा निमित्तं सुखदुःखयोश्चेत्‌ किमात्मनोऽजस्य जनस्य ते वै । ग्रहैर्ग्रहस्यैव वदन्ति पीडां कुध्येत कस्मै पुरुषस्ततोऽन्यः ॥ ५४ ॥ जननीजठरीं जन्मे जाण । त्या देहाचें नांव म्हणती जन । ते जन्मकाळीं जें होय लग्न । त्या जन्मापासून पूर्ण ग्रहगति लागे ॥ १६ ॥ तेथ द्वादशाष्टमनजन्मस्थ । शुभाशुभ ग्रह जे येत । ते सुखदुःखांतें देत । आत्मा अलिप्त ग्रहगतीं ॥ १७ ॥ मुळीं आत्म्यासी जन्म नाहीं । मा ग्रह लागती कवणे ठायीं । जेथ शेतचि पेरिलें नाहीं । तेथ उंदिरीं कायी करांडावें ॥ १८ ॥ मुख्यत्वें घर केलें नाहीं । तेथली माडी जळेल कायी । आत्म्यासी तंव जन्मचि नाहीं । मा ग्रहगती का‌ई लागेल ॥ १९ ॥ ग्रहांची ग्रहगती देहापासीं । आत्मा अलिप्त देहभावासी । जेवीं का‌उळा न चढे कैलासी । तेवीं ग्रह आत्म्यासी न लागती ॥ ८२० ॥ जेवीं कां अग्नीतें न चाखे माशी । घारी झडपीना चंद्रम्यासी । तेवीं लागावया । सामर्थ्य ग्रहांसी असेना ॥ २१ ॥ आत्मा सर्वाचा अवघा एक । तैं ग्रहांचा आत्म तोचि देख । तया निजात्म्यासी देतां दुःख । ग्रह पीडी आवश्यक आप‌आपण्या ॥ २२ ॥ देह जाड मूढ अज्ञान । तें सुखदुःखांचें नेणे ज्ञान । आत्म्यासी सुखदुःख देतां जाण । तैं आपण्या पीडिती ग्रह ॥ २३ ॥ आपणाचि आपणाप्रती । कदा न देववे दुःखप्राप्ती । यालागीं आत्म्यासी ग्रहगती । जाण कल्पांतीं बाधीना ॥ २४ ॥ ग्रहग्रहांमाजीं वैरस्थिती । ग्रह ग्रहांतें पीडा देती । तेही अर्थींची उपपत्ती । यथानिगुती अवधारा ॥ २५ ॥ ज्योतिषशास्त्रसंमती शनि-भौमसूर्या वैरप्राप्ती । गुरु-शुक्र दोनी वैरी होती । बुध-सोमांप्रती महावैर ॥ २६ ॥ तेथ एकांची ते शीघ्रगती । एक ग्रह मंदगामी होती । अतिचार कां वक्रगती । मंडळमेदें येती एकत्र ॥ २७ ॥ वैरी मीनल्या एके राशी । एके चरणीं एकत्रवासी । तैं राहु गिळी सूर्यासी । सूर्य चंद्रासी कुहू करी ॥ २८ ॥ ऐसे ग्रहाचि ग्रहांसी जाण । परस्परें पीडिती आपण । मी आत्मा त्यांहूनि भिन्न । सुखदुःख कोण मज त्यांचे ॥ २९ ॥ अलंकार मोडितां खणाण । सोनें मोडेना आपण । तेवीं ग्रह ग्रहांसी पीडितां जाण । मज आत्म्यासी कोण सुखदुःख ॥ ८३० ॥ रणभूमीं युद्धझोटधरणी । होतां घायवट नव्हे धरणी । तेवीं ग्रहपीडेपासूनी । मी अलिप्तपणीं निजात्मा ॥ ३१ ॥ रजस्वला चालतां भूमीसी । तो विटाळ बाधीना पृथ्वीसी । तेवीं ग्रहीं पीडितां ग्रहांसी । मी सुखदुःखांसी अलिप्त ॥ ३२ ॥ एवं ग्रहांनिमित्त जें कांहीं । सुखदुःख उमटे देहीं । तें मज आत्म्यासी न लगे कंहीं । मग कोणें पाहीं कोणा कोपावें ॥ ३३ ॥ सुखदुःख नुमटे ज्याच्या ठायीं । त्यासी क्रोधाचि न ये कंहीं । एवं ग्रहनिमित्त दुःख कांहीं । सर्वथा नाहीं या हेतू ॥ ३४ ॥ सुखदुःखदातें निजकर्म । म्हणतां जनांसी पडे भ्रम । आत्मा केवळ निष्कर्म । त्यासी जड कर्म केवीं बाधी ॥ ३५ ॥ कर्मास्तु हेतुः सुखदुःखयोश्चेत्किमात्मनस्तद्धि जडाजडत्वे । देहस्त्वचित्पुरुषोऽयं सुपर्णः क्रुध्येत कस्मै न हि कर्ममूलम्‌ ॥ ५५ ॥ कर्म जडत्वें अतिबद्ध । आत्मा चिद्रूपें परम शुद्ध । त्यासी कर्मा‌आ कर्मबाध । सर्वथा संबंध धरीना ॥ ३६ ॥ रवीसी अंधारीं लपवे । वणवा तृणामाजीं बांधवे । गोचिडाचेनि मुखलाघवें । जरी लागवे दीपासी ॥ ३७ ॥ चंडवातातें तुष राखे । थिल्लरचिखलें चंद्र माखे । तैं कर्मजन्य सुखदुःखें । आत्मा यथासुखें बद्धता भोगी ॥ ३८ ॥ आत्मा कर्माकर्म संहारी । सुख-दुःखांची होळी करी । तो कर्मफळांचा फळहारी । मूर्ख गव्हारीं मानिजे ॥ ३९ ॥ स्वप्नींची स्वप्नसंतती । जागृतीं कोणा भेटों येती । तरी कर्माची सुखदुःखप्राप्ती । आत्म्याप्रती बाधक ॥ ८४० ॥ जेवीं अग्नीवरी मुंगी न चले । तेवीं आत्मा न माखे कर्ममळें । आकाश न खोंचे शस्त्रबळें । तेवीं आत्मा कर्मफळें स्पर्शेना ॥ ४१ ॥ कर्म तितुकें आविद्यक । आत्मा विद्या‌अविद्यातीत चोख । त्यासी कर्माचें सुखदुःख । मानिती मूर्ख देहमोहें ॥ ४२ ॥ कर्म अतिजड आत्मा शुद्ध । कर्म परिच्छिन्न आत्मा अगाध । कर्म कर्मठतां नित्यबद्ध । आत्मा चिदानंदस्वरूप ॥ ४३ ॥ कर्म मिथ्याभूत मायिक । आत्मा नित्य अमायिक । कर्मासी ब्रह्म‌अनोळख । ब्रह्म तेथ देख कर्म नाहीं ॥ ४४ ॥ दोराचे सर्पी सर्पत्व नाहीं । मा तो डसोनि चढेल कायी । तेवीं स्वरूपीं कर्म मिथ्या पाहीं । तें आत्म्यासी कायी बाधील ॥ ४५ ॥ वांझ राणीचा लाडका नातू । राजबळें जगा दंडितू । तेवीं कर्माची सुखदुःखमातू । कर्मठांतू दाटुगी ॥ ४६ ॥ एवं कर्माचि मिथ्या एथें । तें केवीं दे सुखदुःखांतें । हें जाणोनियां निश्चितें । कोणें कोणातें कोपावें ॥ ४७ ॥ कर्म सुखदुःखांचें दातें । यापरी न घडे एथें । म्हणाल काळ दे सुखदुःखांतें । तेंही निश्चितें घडेना ॥ ४८ ॥ कालस्तु हेतुः सुखदुःखयोश्चेत्‌ किमात्मनस्तत्र तदात्मकोऽसौ । नाग्रेर्हि तापो न हिमस्य तत्स्यार्त्क्रुध्येत कस्मै न परस्य द्वन्द्वम्‌ ॥ ५६ ॥ काळ शीतकाळीं शीतें पीडी । उष्णकाळीं उबारा सोडी । वर्षाकाळीं पर्जन्य धाडी । त्रिमाळिकें पाडी धवळारें ॥ ४९ ॥ बैसवूनि सातवांकडी । अखंडधारा डोळा नुघडी । जीवमात्रा तेणें पीडी । पडे सांकडी अन्नाची ॥ ८५० ॥ अनाचिया चिडाणीं । पीडती पशुपक्षिप्राणी । ते काळीं सुखदुःख न मानी कोणी । दुखदाता जनीं निजकाळू ॥ ५१ ॥ अतिताप अतिशीत । सोडूनियां अतिवात । काळ जगातें खात । जग कांपत काळासी ॥ ५२ ॥ ऐकोनि काळाची गोठी । देव कांपती उठा‌उठी । इतरांची कायसी गोठी । धाके पोटीं विधाता ॥ ५३ ॥ अतिवृष्टि अनावृष्टि । जन पीडी नाना संकटीं । शेखीं प्रळयो करी उठा‌उठी । दुखदाता सृष्टीं महाकाळ ॥ ५४ ॥ ऐसें बोलती ज्ञाते लोक । ते ज्ञातेपणें झाले मूर्ख । काळ तोचि ईश्वरू देख । सुखदायक सर्वांसी ॥ ५५ ॥ ईश्वराहूनि काळ भिन्न म्हणे तो जड मूढ अज्ञान । काळ तोचि ईश्वर जाण । कृपाळू पूर्ण विश्वात्मा ॥ ५६ ॥ काळ स्वकाळीं वर्षोनि जीवन । सुखी करी संतप्त जन । पृथ्वी निववूनियां जाण । नव धान्य वाफवी ॥ ५७ ॥ ते काळीं जैं शीत न वाहे । तैं वाफिलें धान्य राख होये । तेव्हां शीतकण वर्षोनि पाहें । करी लवलाहें सफळित धान्यें ॥ ५८ ॥ तीं आर्द्र धान्यें भूतांसी । उपेगा न येती संग्रहासी । यालागीं उष्ण काळेंसीं । काळ शोषी आर्द्रता ॥ ५९ ॥ यापरी शीतोष्णपर्जन्यांसी । काळ उत्पादी भूतहितासी । तेंचि कठिण वाटे त्यासी । देहभ्रमासी भुलोनि ॥ ८६० ॥ हिरोनि अतिजीर्ण वस्त्रांसी । नवीं नेसवी जो साक्षेपेंसीं । ऐशिया हितकारिया काळासी । वैरी पिशीं म्हणताती ॥ ६१ ॥ तेवीं जराजर्जरित विकळ । तें देह निर्दळी सकाळें काळ । आणिक नवें दे तत्काळ । ऐसा कृपाळू काळ जनासी ॥ ६२ ॥ जुनें घे‌ऊनि दे नव्यासी । ऐसा उपकारिया काळासी । अपकारी म्हणती पिशीं । देहमोहेंसीं लोभिटें ॥ ६३ ॥ जन वैशिया निजभावना । जे जे धरी दृढ वासना । काळ कृपाळू तत्क्षणा । ते ते देह जाणा त्या देत ॥ ६४ ॥ महामहोत्साहें पिता पुत्रासी । सांडवूनि जीर्ण वासांसी । नवीं वस्त्रें दे तयासी । तेवीं जगासी प्रळयकाळू ॥ ६५ ॥ तेवीं प्रळयकाळीं जगासी । काळ जीर्ण देह नाशी । मग नूतन देह सर्वांसी । अतिकृपेंसी गौरवी ॥ ६६ ॥ यापरी काळ कृपाळू । त्यासी वैरी म्हणे जन बरळू । जगाचा निजात्मा स्वयें काळू । तो दुःखाचा सळू कोणासी नेदी ॥ ६७ ॥ जनांचा देहीं दृढ भावो । भवनानुसारें काळ पहा हो । देहपाठीं उपजवी देहो । जन्ममरणनिर्वाहो तेणें वाढे ॥ ६८ ॥ जो साचार वांछी विदेहभावो । त्याचा काळ निर्दळी अहंभावो । निजानंदें निववूनि स्वयमेवो । जन्ममरणांचा ठावो विभांडी ॥ ६९ ॥ जैशी ज्यासी होय बुद्धी । काळ तैशी दे त्यासी सिद्धी । हें नेणिजे देहमोहंधीं । काळ त्रिशुद्धी कृपाळू ॥ ८७० ॥ काळ तोचि निजात्मा जनीं ऐसें जाणे जो निजज्ञानी । तैं कोणाचें दुःख कोण कां मानी । दुसरें कोणी असेना ॥ ७१ ॥ मी एक एथें दुःखदाता । पैल तो एक दुःखभोक्ता । हेही नाहीं द्वैतकथा । जगासी एकुलता निजात्मा काळ ॥ ७२ ॥ काळ निजात्मा दोनी एक । तैं कोणाचें कोणास होय सुख । कोण कोणाचा मानी शोक । द्वंद्वदुःख असेना ॥ ७३ ॥ जेवीं नाममात्र मृगजळ । तेथ नाहीं तिळभरी जळ । तेवीं आत्मत्वीं जगड्व्याळ । तो भ्रम केवळ मनाचा ॥ ७४ ॥ आत्मा एकत्वें अभेद । काळनामें तोचि प्रसिद्ध । जीव तदंशें चिदत्वें शुद्ध । त्यासी काळादि द्वंद्व बाधिना ॥ ७५ ॥ आगीनें काय आगी जळे । कां उन्हाळेनि सूर्य पोळे । सागरू बुडे लहरीबळें । कीं अंधारातें काळें काजळें कीजे ॥ ७६ ॥ कीं हिमाचळ हिमकणें कांपे । तुपासी मोडशी होय तुपें । तैं काळसत्ता खटाटोपें । आत्मा अमूपें द्वंद्वें भोगी ॥ ७७ ॥ आप आपणियां आपदा । कोणा न करवे विरुद्धा । तेवीं आत्म्यासी द्वंद्वबाधा । काळचोनि कदा करवेना ॥ ७८ ॥ एवं एकात्मता अभेद । तेथ काळाचा न चले बाध । अभेदीं सर्वथा नाहीं द्वंद्व । कोणावरी क्रोध करावा ॥ ७९ ॥ जीव-शिवत्वें मी केवळ । मीचि आत्मा मीचि काळ । मिथ्या द्वंद्वदुःखागोंधळ । क्रोधाचा कल्लोळ कोणावरी करूं ॥ ८८० ॥ काळ सुखदुःखांचा दाता । यापरी नव्हे विचारितां । सुखदुःखांची बाधकता । आत्म्यासी सर्वथा असेना ॥ ८१ ॥ सुखदुःखादि हेतुषट्क्‌ । ’नायं जनो’ इत्यादिक । याचा करितां निजविवेक । नव्हती बाधक आत्म्यासी ॥ ८२ ॥ यांही वेगळीं बाधकपणें । देशवासें त्रिगुणगुणें । आत्म्यासी बाधावयाकारणें । कोठे कोणी दिसेना ॥ ८३ ॥ निजात्म्यासी बाधकता । कायसेनि न संभवे सर्वथा । जनासी बाधक देह‌अहंता । त्याचि निजार्था भिक्षु बोले ॥ ८४ ॥ न केनचित्क्वापि कथञ्चनास्य द्वन्द्वोपरागः परतः परस्य । यथाहमः संसृतिरूपिणः स्यादेवं प्रबुद्धो न बिभेति भूतैः ॥ ५७ ॥ आत्मा गुणातीत शुद्ध । परात्परतर स्वानंद । परिपूर्ण सच्चिदानंद । तेथ द्वंद्वबाध रिघेना ॥ ८५ ॥ द्वंद्व रिघावया आत्मभुवनीं । कैसोनि कायिसेनि कोणाचेनी । कर्मकार्यक्रियाकरणी । बाधकपणीं असेना ॥ ८६ ॥ अभेदा नाहीं द्वंद्वबाध । स्वानंदासी दुःखसंबंध । पूर्णासी कैंचे विरुद्ध । परमानंद एकला ॥ ८७ ॥ ॥ आशंका ॥ आत्म्यासी न घडे द्वंद्वसंबंध । देहो जडत्वें नेणे द्वंद्वं । तरी सुखदुःखांचा महाबाध । कोणासी प्रसिद्ध होतसे ॥ ८८ ॥ सुखदुःखभोगासी जाण । सोसावया जन्ममरण । एथ मुख्यत्वें देहाभिमान । तेंही लक्षण अतर्क्य ॥ ८९ ॥ जेवीं असोनि भर्तारापाशीं । व्यभिचार करितां अहेवेसी । पोट वाढल्याही परपुरुषीं । तें कोणासी कळेना ॥ ८९० ॥ तैसें अभिमानाचें विंदान । चित्स्वरूपीं जडोनि जाण । मिथ्या दावूनि जीवपण । सुखदुःखें आपण स्वेच्छा भोगी ॥ ९१ ॥ जेवीं रायापाशील कुडा मंत्री । राजबळें अधर्म करी । प्रजेतें छळी नानापरी । तैसा शरीरीं अभिमान ॥ ९२ ॥ कां अग्नीसंगें लोह जाण । अग्निप्राय होय आपण । तया हातीं धरूं शके कोण । पोळी दारुण सर्वांसी ॥ ९३ ॥ तेवीं चिद्रूपाचा अभिमान । देहात्मता खवळोनि पूर्ण । सुखदुःखादी जन्ममरण । वाढवितां कोण आवरी ॥ ९४ ॥ स्वप्नींचा देह केवळ मन । त्याही देहासी असे मनपण । तैसा हाही देहो मनचि जाण । अभिमानें कठिण स्थूळ केला ॥ ९५ ॥ कार्यकारणरूपें जाण । संसारचि मनोभिमान । वाढवूनि सुखदुःख दारुण । जन्ममरण स्वयें भोगी ॥ ९६ ॥ भोगिलेचि भोग भोगितां । नानापरींची पावे व्यथा । तरी न सांडी अहंता । देहात्मता वाढवी ॥ ९७ ॥ ब्रह्मप्रळय होतां जाण । देह‌अहंता नव्हे क्षीण । प्रणयीं विरेना अभिमान । सुखदुःख जाण तो भोगी ॥ ९८ ॥ यामाजीं जीव असे कैसा । जपाकुसुमीं स्फटिक जैसा । दिसोन त्या रंगा‌ऐसा । स्वयें तैसा होयेना ॥ ९९ ॥ आत्मात्वीं सुखदुःख नाहीं । तें प्रत्यक्ष दिसताहे देहीं । हें अविचाररमणीय पाहीं । कल्पनेच्या ठायीं आभासे ॥ ९०० ॥ तें देह माझें म्हणोनि तत्त्वतां । अभिमानें घे‌ऊनि माथां । जन्ममरणादि आवर्तां । सुखदुःखभोक्ता स्वयें होय ॥ १ ॥ येणेंचि विवेकें निजज्ञानी । प्राप्ततत्त्व गुरुवचनीं । ते वर्ततांही जनींवनीं । देहभिमानी कदा नव्हती ॥ २ ॥ ऐसे प्रबुद्ध जे आत्मप्रतीतीं । त्यांसी प्रारब्धाचिये निजगती । नाना सुखदुःखें देतां भूतीं । आत्मस्थिती ढळेना ॥ ३ ॥ त्यांसी द्वेष नुपजे भूतीं । कोप सर्वथा न ये चित्तीं । मी एक त्रिजगतीं । जाणोनि निश्चितीं निर्द्वंद्व ॥ ४ ॥ तो देखोनियां विषमासी । भय न धरी मानसीं । पारकें न म्हणे कोणासी । आप्त सर्वांसी निजात्मा ॥ ५ ॥ समविषमभाव ना भेद । ज्ञाता सर्वरूपें अभेद । तो न मानीं कोणाचा भयखेद । सुखस्वानंद सर्वदा ॥ ६ ॥ निंदा‌उपद्रव अनुद्विग्न । साहोनियां सुखसंपन्न । हें सिद्धाचें मुख्य लक्षण । तेंचि साधन साधकां ॥ ७ ॥ एतां स आस्थाय परात्मनिष्ठामध्यासितां पूर्वतमैर्महर्षिभिः । अहं तरिष्यामि दुरन्तपारं तमो मुकुन्दाङ्घ्रिनिषेवयैव ॥ ५८ ॥ माझ्या पूर्वापरभाग्योदयें । अद्वैतात्मनिष्ठा उपजलीं पाहें । जे निष्ठेचेनि समवायें । नाना दुःखें साहें निर्द्वंद्व ॥ ८ ॥ द्वंद्वसुखदुःखसहिष्णुपण । हें सिद्धाचें सहज लक्षण । माझें मुख्यत्वें हेंचि साधन । मनोजयो जाण येणें होये ॥ ९ ॥ हेंचि परमार्थसाधन वरिष्ठा । हेचि महा‌ऋषींची निजनिष्ठा । हेंचि निजभजन वैकुंठा । निजात्मनिष्ठा येणें साधे ॥ ९१० ॥ येणीं न बाधे द्वंद्वदुःख । येणें पाविजे नित्यसुख । दुस्तर संसारतारक । हा निजविवेक आम्हांसी ॥ ११ ॥ दुस्तर तरावया भवसागरू । हा विवेकू सुकल्प तारूं । एथ सद्गुरू कर्णधारू । परात्परपारू पाववी ॥ १२ ॥ हा विवेक कैसोनि ये हाता । हेही करणें न लगे चिंता । निजभावें एकाग्रता । शरण भगवंता रिघावें ॥ १३ ॥ सांडोनि लौकिकाचे लाजे । सांडोनि अभिमानाचें ओझें । भगवंता शरण रिघिजे । तैं लाहिजे विवेक ॥ १४ ॥ तानें बाळ जेवीं जननीसी । अनन्य शरण सर्वभावेंसीं । ऐशिया अनन्यता अहर्निशीं । शरण हरिसी रिघावें ॥ १५ ॥ हरीसी रिघालिया शरण । मुख न दाखवी जन्ममरण । तेथ बाधूं शके द्वंद्व कोण । हरी रक्षण निजभक्तां ॥ १६ ॥ मोक्षदाता मुकुंद पूर्ण । त्यासी कैसें रिघावें शरण । तो अनंतत्वें निजनिर्गुण । तेथ कोण पावेल ॥ १७ ॥ असो हरिरूप अतिनिर्गुण । त्याची मूर्ति चिंतितां सगुण । ध्यानीं स्थिरावल्या संपूर्ण । द्वंद्वदुःखें जाण हारपती ॥ १८ ॥ ध्यानीं मूर्ति न ये संपूर्ण । तैं दृढ धरावे हरीचे चरण । तेणें उठोनि पळे जन्ममरण । आपभावें आपण पळती द्वंद्वें ॥ १९ ॥ जैं न धरवती दृढ चरण । तैं करावें नामस्मरण । ज्याचेनि नाममात्रें जाण । यम काळ पूर्ण कांपती ॥ ९२० ॥ जेथ हरिनामाचा नित्य घोख । तेथ मरणा मरण आलें देख । जन्माचें होय काळें मुख । लाजोनि निःशेख तें पळे ॥ २१ ॥ रामनामाच्या गजरापुढें । का‌इसें द्वंद्वदुःख बापुडें । अवघें भवभयचि उडे । नामपवाडे गर्जतां ॥ २२ ॥ अखंड नामें गर्जे वाणी । त्याचे बोलांमाजीं चक्रपाणी । तेथ ऋद्धिसिद्धि वाहे पाणी । मुक्ती आंदणी तयाची ॥ २३ ॥ निर्विकल्प भावार्थें आपण । सगुण निर्गुण कां नामस्मरण । भक्त भावार्थें आदरी जाण । तें तें होय पूर्ण सद्भावेंचि ॥ २४ ॥ भावार्थें जे भगवत्प्रीती । तेचि जाणावी साचार भक्ती । भावें तुष्टला श्रीपती । दे निजशांती साधकां ॥ २५ ॥ ते निजशांतीच्या पोटीं । हरपती द्वंद्वतुःखकोटी । परमानंदें कोंदे सृष्टी । मी तूं दृष्टीं दिसेना ॥ २६ ॥ ऐसेनि अभेदभावें जाण । सेवितां मुकुंदश्रीचरण । मी आपणिया आपण । तारीन जाण निश्चित ॥ २७ ॥ तारीन म्हणतां उधारू । बोलीं दिसताहे उशिरू । जो झाला हरिचा डिंगरू । त्यासी संसारू असेना ॥ २८ ॥ ऐशी भिक्षूनें गा‌इली गाथा । ते अत्यंत रुचली श्रीकृष्णनाथा । हरिखे ओसंडोनि चित्ता । उद्धवाचा माथा थापटी ॥ २९ ॥ ऐशी जे हे निजशांती । माझ्या उद्धवासी व्हावी प्राप्ती । ऐसा कळवळोनि श्रीपती । काय उद्धवाप्रती बोलिला ॥ ९३० ॥ श्रीभगवानुवाच- निर्विद्य नष्टद्रविणो गतक्लमः प्रव्रज्य गां पर्यटमान इत्थम्‌ । निराकृतोऽसद्भिरपि स्वधर्माद्‌ अकम्पितोऽमुं मुनिराह गाथाम्‌ ॥ ५९ ॥ ज्याचे निःश्वासीं जन्मले वेद । ज्याचेनि चरणीं गंगा प्रसिद्ध । ज्याचें नाम छेदी भवबंध । तो उद्धवासी गोविंद स्वमुखें बोले ॥ ३१ ॥ यालागीं उद्धवाचे भाग्य थोर । ज्यासी तुष्टोनि शार्ङ्गधर । दाखवी निजशांतीचें घर । निरंतर वस्तीसी ॥ ३२ ॥ उद्धवा ऐक सावधान । धनलोभ्याचें नासोनि धन । तो धननाशु झाला प्रसन्न । केला विवेकसंपन्न वैरगी ॥ ३३ ॥ जो धनलोभी न खाता । ज्याचें नांव न घेती सर्वथा । तोचि वैराग्यें केला सरता । माझे मुखीं कथा तयाची ॥ ३४ ॥ त्याचें नाम माझे मुखीं जाण । त्याचें कर्म वर्णी मी आपण । तो मज पढियंता जाण । जो विवेकसंपन्न वैरागी ॥ ३५ ॥ वैराग्यपरतें भाग्य थोर । जगीं नाहीं आन सधर । विवेकवैराग्यें जो साचार । तो माझें जिव्हार उद्धवा ॥ ३६ ॥ जो विवेकवैराग्यें आथिला । तो जाण मजमाजीं आला । मी अधीन त्याचिय बोला । तो मज विकला । सर्वस्वें ॥ ३७ ॥ लोभ्याचें निःशेष गेलें धन । धनासवें गेले मानाभिमान । अभिमानासवें जाण । गेलें द्वंद्र दारुण सुखदुःख ॥ ३८ ॥ धन जातां झाली विरक्ती । तेणें नेमस्त झाला यती । भिक्षार्थ हिंडता क्षितीं । दुर्जनीं दुरुक्तीं निर्भर्त्सिला ॥ ३९ ॥ पीडितां नाना विकारीं । उपद्रवितां नानापरी । न डंडळीच निज निर्धारीं । स्वधर्मधैर्य करी निर्द्वंद्व ॥ ९४० ॥ संन्याशाचा स्वधर्म पूर्ण । मी देहातीत नारायण । साचार हरविला देहाभिमान । यालागीं जाण न डंडळी ॥ ४१ ॥ जेवीं छायेसी लागतां घावो । पुरुषासी नाहीं भयसंदेहो । तेवीं दुर्जनीं दंडिता देहो । नाहीं दुःखभेवो निरहंकार ॥ ४२ ॥ देहासी होतां नाना व्यथा । आपुली जे देहातीतता । तेचि भिक्षूनें गायिली गाथा । ते तुज म्यां आतां निरूपिली ॥ ४३ ॥ येथ सुखदुःखांसी कारण । आपला भ्रम आपणा जाण । येचि अर्थींचें निरूपण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ४४ ॥ सुखदुःखप्रदो नान्यःपुरुषस्यात्मविभ्रमः । मित्रोदासीनरिपवः संसारस्तमसः कृतः ॥ ६० ॥ आविद्यक जें निज‌अज्ञान । तेथें मनपणें उठी मन । मनें भेद करूनियां पूर्ण । सुखदुःखें जाण भोगावी ॥ ४५ ॥ आत्मा केवळ भेदशून्य । तेथ शत्रु मित्र उदासीन । मनें कल्पूनियां जाण । मन संपूर्ण स्वयें चाळी ॥ ४६ ॥ ऐसें भेदीं ठसावलें मन । तेंचि पुरुषाचें अज्ञान । तेणें द्वंद्वदुःखेंसीं जाण । संसार दारुण सभ्रांता ॥ ४७ ॥ मन सुखदुःखांसी कारण । मनःकल्पित संसार जाण । त्या मनाचें निग्रहण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ४८ ॥ तस्मात्सर्वात्मना तात निगृहाण मनो धिया । मय्यावेशितया युक्त एतवान्‌ योगसंग्रहः ॥ ६१ ॥ जो नासूं पाहे संसारदुःख । तेणें मन नेमावें आवश्यक । मनावेगळें दुःखदायक । नाहीं आणिक त्रिलोकीं ॥ ४९ ॥ मन अतिशयें चंचळ । तें सहसा नव्हे निश्चळ । त्यासी विवेक द्यावा मोकळ । अभेदशील अहर्निशीं ॥ ९५० ॥ मन सिंतरील वीवेकासी । यालागीं हातकडिया दोहींसी । करूनियां अहर्निशीं । येरयेरांपाशीं राखावीं ॥ ५१ ॥ मन जेथ विकल्पूं धांवे । तेथ महामारी वीवेकू पावे । मन जेथ अधर्में संभवे । तेथ विवेक धांवे हांकित ॥ ५२ ॥ मन जाय कामक्रोधांपाशीं । विवेक ओढी धरोनि केशीं । मन रिघतां निंदेपाशीं । विवेक त्यासी बुकाली ॥ ५३ ॥ मन म्हणे विषय सुटी । विवेक हाणे वैराग्यकाठी । मन विवेक पावोन । रणकंदन आरंभी ॥ ५५ ॥ ऐसा मनां विवेकांचा झगडा । गार्क्ष्हाणें आलें सद्गुरूपुढां । तेणें करावया निवाडा । अद्वैतवाडां कोंडिलीं ॥ ५६ ॥ तो दृष्टी देखतांचि ठावो । मनाचा मोडला स्वभावो । देहींचा सांडोनि अहंभावो । विवेकेंसीं पहा हो ऐक्य केलें ॥ ५७ ॥ तेथ मनाचें गेलें मनपण । विवेक विसरला आकळण । जीवाचें विरालें जीवपण । वस्तु संपूर्ण अद्वयें ॥ ५८ ॥ जेवीं सुवर्णाचीं नागभूषणें । फडा पुच्छ मिरवी नागपणें । तें न मोडितां नागत्वाचें लेणें । सोनें सोनेपणें नागत्व विसरे ॥ ५९ ॥ तेवीं जाणोनि वस्तु पूर्ण । न मोडितां जग जाण । जीव विसरला जीवपण । मनत्वा मन मन मूकलें ॥ ९६० ॥ ऐशिया विवेकयुक्ती जाण । माझे स्वरूपीं प्रवेशे मन । जेथ मनपणें नुठी मन । मनोनिग्रहण या नांव ॥ ६१ ॥ ऐक चतुरचित्तचिंतामणी । विवेकचक्रवर्तिचूडामणी । उद्धवा भक्तशिरोमणी । मनोनिग्रहणीं प्रवर्त ॥ ६२ ॥ आवडीं भुलला कृष्णनाथ । तो उद्धवासी म्हणे तात । मनोनिग्रही तूं एथ । हो‌ईं साक्षेपयुक्त सादर ॥ ६३ ॥ साक्षेपें निग्रहूनि मनासी । जो सांडवी मनोजन्य भेदासी । शांती सांडूं नेणे त्यासी । जेवीं तान्हयासी मा‌उली ॥ ६४ ॥ निजशांति बाणल्या शुद्ध । त्यासी न बाधी न कोण द्वंद्व । होचि योगसंग्रहो प्रसिद्ध । बोलिले सिद्ध महायोगी ॥ ६५ ॥ सांडूनि संसाररस्फुर्ती । चित्स्वरूपीं जडे वृत्ती । जीव शीव एकत्व येती । योगसंग्रहस्थिती या नांव ॥ ६६ ॥ ऐशिया योगसंग्रहशांती । साधका द्वंद्वें न बाधीती । हें असो जया भिक्षुगीतभक्ती । द्वंद्वनिर्मुक्ति तया लाभे ॥ ६७ ॥ य एतां भिक्षुणा गीतं ब्रह्मनिष्ठां समाहितः । धारयञ्छ्रावयञ्छ्र्ण्वन्‌ द्वन्द्वैर्नैवभिभूयते ॥ ६२ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां श्रीकृष्णोद्धवसंवादे एकादसस्कन्धे त्रयोविंशोऽध्यायः ॥ २३ ॥ साधावया शांतीची प्राप्ती । कोटिसाधनें न लभे शांती । हा भिक्षुगीतार्थ धरितां चित्तीं । शांति आपैती साधकां ॥ ६८ ॥ योगनिष्ठां ब्रह्मज्ञान । तें हें भिक्षुगीतनिरूपण । जो हृदयीं धरी सावधान । शांति आंदण तयाची ॥ ६९ ॥ ये भिक्षुगीतेचा गीतार्थू । जो जीवीं धरी समाहितू । त्यासी द्वंद्वांचा न बाधी घातू । अतिशांतू निजबोधें ॥ ९७० ॥ भिक्षूगीतार्थें समाधान । हें सांगतां नवल कोण । जो सादरें करी श्रवण । त्यासी द्वंद्वें जाण न बाधिती ॥ ७१ ॥ परदेशा गेला बहुतकाळ भर्ता । त्याचे पत्र सादर ऐके कांता । तैशिया अति‌एकाग्रता । भिक्षुगीता ऐकावी ॥ ७२ ॥ निघोनि गेलिया पुत्रासी । त्याची शुद्धि ये मातेपाशीं । ऐकोनियां उणखुणेसी । चरफडी जैसी विव्हळ ॥ ७३ ॥ तीजवळ ज्या सोयर्क्ष्या असती । त्याही स्त्रेहें कळवळती परी माता जैसी तळमळी चित्तीं । तें आणिकाप्रती असेना ॥ ७४ ॥ तैसें भिक्षुगीतश्रवण । करितां द्रवे ज्याचें मन । जो सात्त्विकें वोसंडे पूर्ण । तो द्वंद्वांसी जाण नाटोपे ॥ ७५ ॥ असो नव्हे सादरें श्रवण । तरी करितां याचें नित्य पठण । भिक्षुगीतप्रतापेंकरून । द्वंद्वें जाण नातळती ॥ ७६ ॥ पडतां पंचाननाची घाणी । मदगजां होय महापळणी । तेवीं भिक्षुगीतपठणीं । होय भंगणी द्वंद्वांची ॥ ७७ ॥ निर्लोभ हो‌ऊनि मानसीं । बैसोनि साधुसज्जनांपाशीं । जो निरूपी भिक्षुगीतासी । द्वंद्वें त्यासी नातळती ॥ ७८ ॥ अर्थे पाठें श्रवण करितां । द्वद्वें निवारी भिक्षुगीता । हे वर्म कळलेंसे श्रीकृष्णनाथा । तो सांगे हितार्था उद्धवा ॥ ७९ ॥ ज्या भिक्षुगीताची फळश्रुती । स्वमुखें सांगताहे श्रीपती । त्या भिक्षूचें भाग्य वानूं किती । धन्य त्रिजगतीं तो एक ॥ ९८० ॥ विवेकवैराग्यसमरसीं । जो साहे अतिद्वंद्वांसी । तोचि पढियंता हृषीकेशीं । हें उद्धवासी दाविलें ॥ ८१ ॥ जगासी उद्धवाचा उपकार। गुह्य ज्ञान परात्पर । उघडूनि श्रीकृष्णें भांडार । भिक्षुगीतसार प्रकटिलें ॥ ८२ ॥ उद्धव न पुसता जैं शांती । तैं हें कां सांगता श्रीपती । कृष्णासी उद्धवाची प्रीती । त्यासी नाना उपपत्ती उपदेशी ॥ ८३ ॥ हेंचि जडजीवां उद्धरण । येणें उपायें तरती दीन । जग तारावया जगज्जीवन । उद्धवमीषें श्रीकृष्ण बोलिला ॥ ८४ ॥ श्रीकृष्ण बोलिला भिक्षुगीत । जें वेदशास्त्रार्थमथित । उपनिषदांचें सारभूत । वर्तिकांतर्गत रहस्य ॥ ८५ ॥ येणें आप‌आपणीयां आपण । लागताहे निजात्मलग्न । हें ज्ञानचेंही गुह्य ज्ञान । भक्तकृपें श्रीकृष्ण बोलिला ॥ ८६ ॥ येणें जीवाचें जीवत्व उडे । शिवायें शिवत्वही बुडे । द्वंद्वाचें बाधकत्व मोडे । स्वानंदाचें उघडे भांडार ॥ ८७ ॥ वेदें मौन धरिलें जेथ । सशब्द शास्त्रें लाजलीं तेथ । ऐसें अतिरहस्य भिक्षुगीत । तें मी प्राकृत बोलिलों ॥ ८८ ॥ जेवीं जडी बुडते पाषाण । श्रीरामें तारिले आपण । तेवीं मी जड मूढ अज्ञान । बोलवी ब्रह्मज्ञान जनार्दनकृपा ॥ ८९ ॥ अहल्या जे व्यभिचारिणी । ते लागतां श्रीरामचरणीं । तिचेनि नामें पापा धुणी । प्रातःस्मरणीं पढविली ॥ ९९० ॥ तेवीं सद्‌गुरुकृपेची करणी । माझी प्राकृत जड मूढ वाणी । मानिजें साधुसज्ञानीं । तैशीं बोलणीं बोलविलीं ॥ ९१ ॥ सरस्वती ज्यासी वोळे । तो मुकाही वेदशास्त्र बोले । तैसें जनार्दनें आम्हां केलें । भिक्षुगीत बोलविलें प्राकृत ॥ ९२ ॥ राजमुद्रा चढे ज्याचे हातीं । त्यातें समस्त सन्मानिती सन्मानिती । तेवीं माझी वाणि सरती । केली निश्चितीं जनार्दनें ॥ ९३ ॥ बाळकाची बोबडी वाणी । ऐकोनी संतोषे निजजननी । तेवीं माझी आरिख वाणी । संतसज्जनीं प्रियकर ॥ ९४ ॥ मी माझें उंच नीच बोलणें । हेहीं माथां घ्यावें कोणें । मीपण ने‌ऊनि जनार्दनें । ग्रंथकथनें कथवित ॥ ९५ ॥ आधींच हें श्रीभागवत । त्यामाजीं गूढ एकादशार्थ । त्याहीमाजीं भिक्षुगीत । अतिगुह्यार्थ निर्द्वंद्व ॥ ९६ ॥ त्या भिक्षुगीताची टीका । एकला कर्ता नव्हे एका । तें एकपण हिरोनि देखा । ग्रंथार्थलेखा जनार्दन वदवी ॥ ९७ ॥ तेथ एक ना अनेक । ऐसें जनार्दनें केलें देख । त्यावरी द्वंद्वसाम्य-कवतिक । ग्रंथ सम्यक वाखाणवी ॥ ९८ ॥ एका जनार्दना शरण । जनार्दनू झाला एकपण । ऐसोनि‌एकत्वें जाण । केलें संपूर्ण भिक्षुगीत ॥ ९९ ॥ माझे निजगुरूचाही गुरू । श्रीदत्त परमगुरू । तो भिक्षुगीतार्थें साचारू । योग्यां योगेश्वरू तुष्टला ॥ १००० ॥ तेणें तोखलेनि अद्भुतें । आदरें अश्वासूनी मातें । अभय दे‌ऊनि निजहस्तें । पूर्ण ग्रंथार्थें डुल्लतू ॥ १ ॥ एका जनार्दना शरण । श्रोतां व्हावें सावधान । पुढील अध्यायीं श्रीकृष्ण । प्रकृतिपुरुषलक्षण सांगेल ॥ २ ॥ ते प्रकृति-पुरुषांची कथा । विवंचना हृदयीं धरितां । मी सुखदुःखद्वंद्वांपरता । निजात्मता निजबोधू ॥ ३ ॥ संतसज्जनां साष्टांग नमन । श्रोतजनांसी लोटांगण । एका विनवी जनार्दन । अतिगोड निरूपण पुढें आहे ॥ ४ ॥ इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे एकाकारटीकायां भिक्षुगीतनिरूपणं नाम त्रयोविंशोऽध्यायः ॥ २३ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥ ६२ ॥ ओंव्या ॥ १००४ ॥

संत श्री एकनाथ महाराज मिशनसाठी योगदान द्या

खाली दिलेल्या बँक खात्यात आपण दान करू शकता

खाताधारकाचे नाव:
Shantibrahma Shri Eknath Maharaj Mission, Paithan
चालू खात्याचा क्रमांक:
00000036694177969
बँकेचे नाव:
State Bank Of India
IFSC कोड:
SBIN0003796
शाखा:
Bhaji Market, Paithan
logoseperator

संपर्क माहिती :

शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन,

द्वारा, श्री वेणीमाधव गोसावी,
श्रीनाथ गल्ली, श्रीक्षेत्र पैठण, जिल्हा छत्रपती
संभाजीनगर
पिन. ४३१००६

callमोबाईल क्रमांक : +९१ - ९४२१४१११३५

emailईमेल : info@santeknath.org