श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो देव सहज निज । तूं विश्वात्मा चतुर्भुज । अष्टभुज तूंचि विश्वभुज । गुरुत्वें तुज गौरव ॥ १ ॥ निजनिश्याचिया भावार्थ । तूं गुरुनामें अभयदाता । अभय देऊनि तत्त्वतां । भवव्यथा निवारिसी ॥ २ ॥ निवारूनि जन्ममरण । आपण्या भेटसी आपण । तेव्हां गुरुशिष्यनामीं संपूर्ण । तुझें एकपण आभासे ॥ ३ ॥ तें एकपण पाहतां दिठीं । एका जनार्दनीं पडे मिठी । गुरुत्वें कोंदे सकळ सृष्टी । स्वानंदपुष्टी जग नांदे ॥ ४ ॥ तो स्वानंदैकचिद्धन । जगद्गुरु जनार्दन । एका जनार्दना शरण । एकीं एकपण दृढ केलें ॥ ५ ॥ दृढ केलें जें एकपण । तेंही सद्गुरु झाला आपण । तेथें खुंटले मीतूंपण । एका जनार्दन एकत्वें ॥ ६ ॥ यापरी एकाकी एकला । एका जनार्दनें कवयिता केला । तो एकादशाचा पावला । अतिसखोला एकत्वबोध ॥ ७ ॥ त्या एकत्वाची निजस्थिती । पावला पुरूरवाभूपती । दृढ अनुताप विरक्ती । भगवद्भक्ती सत्संगें ॥ ८ ॥ हें सव्विसावे अध्यायीं जाण । स्वमुखें बोलिला श्रीकृष्ण । सत्संगें भगवद्भजन । तेणें वैराग्य पूर्ण साधकां ॥ ९ ॥ न करितां भगवद्भक्ती । कदा नुपजे विरक्ती । विरक्तीवीण भगवत्प्राप्ती । नव्हे कल्पांतीं साधकां ॥ १० ॥ ऐसें बोलिला श्रीकृष्ण । तें उद्धवें जीवीं धरूनि पूर्ण । भगवद्भक्ति पूजाविधान । क्रियायोग जाण पुसत ॥ ११ ॥ उद्धव उवाच-क्रियायोगं समाचक्ष्व भवदाराधनं प्रभो । यस्मात्वां ये यथार्चन्ति सात्वताः सात्वतर्षभ ॥ १ ॥ निजभक्तानुग्रहार्थ । सत्त्वमूर्ति तूं श्रीअनंत । तुझे निजभक्त जे सात्वत । ते तुज पूजित कोणे विधीं ॥ १२ ॥ तें साधूचें आराधन । तुझे क्रियायोगें निरपूजन । । कृपाकरोनियां आपण । मज संपूर्ण सांगावें ॥ १३ ॥ म्हणसी जरी हें आणिकांतें पुसावें । हें माझेनि जाण सर्वथा नव्हे । तुज सांडूनि दूरी जावें । हे लाजही जीवें साहवेना ॥ १४ ॥ मी तुझा दास जीवेंभावें । तुझेनि प्रभुत्वगौरवें । मी कळिकाळा नागवें । कृपाप्रभावें तुझेनी ॥ १५ ॥ तूं कृपाळु कृपायुक्त । कृपेने होसी भक्तांचा भक्त । त्या तुझा मी चरणांकित । सलगीं गुह्यार्थ स्वयें पुसें ॥ १६ ॥ इतका करूनि अत्यादर । कां पुससी पूजाप्रकार । तरी हा श्रेष्ठश्रेष्ठीं केला विचार । तो निजनिर्धार अवधारीं ॥ १७ ॥ एतद्वदन्ति मुनयो मुहुर्निःश्रेयसं नृणाम् । नारदो भगवान् व्यास आचार्योऽङ्गिरसः सुतः ॥ २ ॥ पूर्वीं वेदविचारनिष्ठ । सुरवर्य मुनिश्रेष्ठ । हेंचि अनुवादले स्पष्ट । अतिवरिष्ठ विवेकी ॥ १८ ॥ पूजाविधान प्रसिद्ध । बोलिला देवर्षि ‘नारद’ । अंगिराचा पुत्र अगाध । ‘देवगुरु’ प्रबुद्ध हेंचि बोले ॥ १९ ॥ जो ‘व्यास’ सत्यवतीसुत । जो कां नारायण मूर्तिमंत । जेणें प्रकट केला वेदार्थ । जो विख्यात महाकवि ॥ २० ॥ पुराणकविकर्ता तो साङ्ग । यालागीं व्यसोच्छिष्टमिदं जग’ । तेणेंही भगवत्पूजामार्ग । हा क्रियायोग बोलिजे ॥ २१ ॥ असो इतरांची चावटी । जो पितामह सकळ सृष्टी । जो जन्मला विष्णूच्या पोटीं । तेणेंही या गोष्टी दृढ केल्या ॥ २२ ॥ निःसृतं ते मुखाम्भोजाद्यदाह भगवानजः । पुत्रेभ्यो भृगुमुख्येभ्यो देव्यै च भगवान् भवः ॥ ३ ॥ तुवांचि कल्पचिया आदीं । हेचि पूजाविधानविधी । उपदेशिला पुत्रबुद्धीं । स्वयें त्रिशुद्धी विधाता ॥ २३ ॥ तेणेंही कल्पादीसीं आपण । नाभिकमळासनीं बैसोन । भृगुकश्यपादि पुत्रांसी जाण । हें पूजाविधान उपदेशी ॥ २४ ॥ श्रीमहादेवेंही आपण । हें क्रियायोगविधिविधान । भावें भवनीसी जाण केलें निरूपण एकांतीं ॥ २५ ॥ एतद्वै सर्ववर्णानामाश्रमाणां च संमतम् । श्रैयसामुत्तमं मन्ये स्त्रीशूद्राणां च मानद ॥ ४ ॥ एवं श्रेष्ठपरंपरा । तुवां प्रकट केली दीनोद्धारा । दीनदयाळु तूं खरा । याही विचारा अवधारीं ॥ २६ ॥ आश्रमधर्मविधिविधान । तेथ अधिकारी द्विजन्मे जन । त्यांसी कर्मबाधा बाधी गहन । गुंतले ब्राह्मण कर्मठत्वें ॥ २७ ॥ तैसें नव्हे तुझें भजन । भजनाधिकारी सर्व वर्ण । दीनोद्धारी भजन पूर्ण । स्त्रिया शूद्रजन उद्धरिले ॥ २८ ॥ कर्मीं गुंतले उत्तमोत्तम । भजनें उद्धरिले अधमाधम । भजनें सर्वांसही सुगम । भजनें स्वधर्मसार्थक ॥ २९ ॥ भजनमहिमा निःसीम । अधमा पदवी उत्तमोत्तम । भजनहीन जे उत्तम । ते अधमाधम स्वयें होती ॥ ३० ॥ सर्व वर्ण आणि आश्रम । भगवद्भजनें गति उत्तम । हेंचि भक्तीचें निजवर्म । भक्त निष्काम जाणती ॥ ३१ ॥ करूनियां भगवद्भक्ती । भक्त स्वयें भगवद्रूप होती । यालागीं भक्तांतें श्रीपती । अतिप्रीतीं मानिसी ॥ ३२ ॥ तुझें भजनपूजन करितां । तूं निजभकतांचा होसी त्राता । तूंचि भक्तांसी सन्मान-दाता । ते भजनकथा मज सांग ॥ ३३ ॥ एतत्कमलपत्राक्ष कर्मबन्धविमोचनम् । भक्ताय चानुरक्ताय ब्रूहि विश्वेश्वरेश्वर ॥ ५ ॥ कमळनाभि नारायणा । भक्तविश्राम कमळवदना । कमलालया कमलनयना । विनंती श्रीकृष्णा अवधारीं ॥ ३४ ॥ तुवां पाहिल्या कृपादृष्टीं । तत्कालपैं उठउठीं । सुटती कर्मबंधाच्या गांठी । स्वानंदपुष्टी निजभक्तां ॥ ३५ ॥ जेवीं घृताचें कठिणपण । क्षणें विरवी सूर्यकिरण । तेवीं कर्मबंधा निर्दळण । तुझें कृपावलोकन करी कृष्णा ॥ ३६ ॥ कां सैंधवाचा महागिरी । जेवीं विरे सिंधूमाअझारीं । तेवीं कर्मबंधा बोहरी । तुझी कृपा करी श्रीकृष्णा ॥ ३७ ॥ तुझी झालिया कृपादृष्टी । कर्माकर्मांसी पडे तुटी । जेवीं सूर्योदयासाटीं । नातुडे भेटीं खद्योत ॥ ३८ ॥ तमीं दाटती खद्योतकोडी । तेवीं अज्ञानीं कर्माची आडाडी । तुझा कृपासूर्य जोडल्या जोडी । कर्में जाती बापुडीं विरोनी ॥ ३९ ॥ ऐशिया निष्कर्मकॄपायुक्त । तुझे नांदती निजभक्त । जे कां विषयीं अतिविरक्त । सदा अनुरक्त हरिचरणीं ॥ ४० ॥ तें पूर्णकृपेचें आयतन । तुझें भजनपूजाविधान । तें मज सांग कृपा करून । मी अतिदिन पैं तुझें ॥ ४१ ॥ म्हणसी तुज हा अधिकार नाहीं । परी मी शरण आलों तुज पाहीं । शरणागताची तुझ्या ठायीं । उपेक्षा नाहीं श्रीकृष्णा ॥ ४२ ॥ तुवां उद्धरिलें पशु-गीध-गजांसी । गणिके तारिलें कुंटणीसी । तेचि कृपा करीं आम्हांसी । हृषीकेशी कृपाळुवा ॥ ४३ ॥ म्हणसी ‘ब्रह्म शिव असतां सृष्टीं । मजचि पुसायाची श्रद्धा मोठी । कैसेनि पां वाढली पोटीं’ । ऐक ते गोठी सांगेन ॥ ४४ ॥ ब्रह्मा जगाचा कर्ता होये । तोही विसरला निहात्मसोये । तो तुझ्या पोटा येऊनि पाहें । निजज्ञान लाहे तुझेनि ॥ ४५ ॥ शिव पायवणी वाहे माथां । तुझें नाम सदा जपतां । तुझे कृपेस्तव तत्त्वतां । तोही निजात्मता पावला ॥ ४६ ॥ यालागीं तूं ईश्वराचा ईश्वर । नियंत्या नियंता सर्वेश्वर । विश्वीं विश्वास विश्वंभर । विश्वेश्वर तूं कृष्णा ॥ ४७ ॥ यापरी तूं ज्ञाननिधी । पूर्ण बोधाचा उदधी । जेणें होय निजात्मसिद्धी । ते पूजाविधी मज सांग ॥ ४८ ॥ ऐसा भक्तवचनें तो संतोषला । पूर्ण निजबोधें द्रवला । निजात्मकृपा कळवळला । काय बोलिला श्रीकृष्ण ॥ ४९ ॥ श्रीभगवानुवाच-नह्यन्तोऽनन्तपारस्य कर्मकाण्डस्य चोद्धव । संक्षिप्तं वर्णयिष्यामी यथावदनुपूर्वशः ॥ ६ ॥ ज्याचें ऐकतां वचन । वेदवाक्या पडे मौन । ज्याची करितां आठवण । मनपणा मन स्वयें मुके ॥ ५० ॥ जो वेदार्थप्रकाशक । जो अर्काचा आदि अर्क । तो उद्धवासी यदुनायक । स्वमुखें देख बोलत ॥ ५१ ॥ आगमनिगमोक्तप्रकार । माझी पूजाविधी सविसतर । सांगतां अनंत अपार । न कळे पार ब्रह्मादिकां ॥ ५२ ॥ उद्धवा ऐक पां तत्त्वतां । मी देवादिदेव झालों वक्ता । तरी पूजाविधानकथा । समूळ सर्वथा न सांगवे ॥ ५३ ॥ जरी झाले अतिसज्ञान । तरी पूजाविधिविधान । सांगावया समर्थपण । सर्वथा जाण असेना ॥ ५४ ॥ एवं पूर्वोक्तप्रकार । अगमनिगमनिजसार । निवडूनि संक्षेपाकार । तुज मी साचार सांगेन ॥ ५५ ॥ पूजाविधिनिजसार । त्रिविध विधान त्रिप्रकार । ऐक त्याचाही विचार । विधिउपचारविभागें ॥ ५६ ॥ वैदिकस्तात्रिको मिश्र इति मे त्रिविधो मखः । त्रयाणामेप्सितेनैव विधिना मां समर्चयेत् ॥ ७ ॥ वेदींचे मंत्र वेदींचें अंग । वेदोक्त माझी पूजा साङ्ग । या नांव गा ‘वैदिक’ मार्ग । आगम प्रयोग तो ऐक ॥ ५७ ॥ आगममंत्र आगमचि अंग । माझी आगमोक्त पूजा सा~घ्ग् । या नांव् गा ‘तांत्रिक्’ मार्ग् । मिश्रप्रसंग् तो ऐक् ॥ ५८ ॥ वेदींचे मंत्र् तंत्रींचें अंग् । एवं मिश्रित् उभय् भाग् । माझी पूजा निपजे साङ्ग् । ‘मिश्र्’ मार्ग् या नांव् ॥ ५९ ॥ हे त्रिविधविधि पूजा साङ्ग् । तो जाण् माझा ‘त्रिविध्’ याग् । येणें मे संतोषें श्रीरंग् । पार्श्वदेशीं साङ्ग् सपरिवार् ॥ ६० ॥ ऐसें माझें त्रिविध् भजन् । जेथ् ज्याची श्रद्धा पूर्ण् । त्या विधीं करितां पूजन् । मज् तृप्ती समान् भावार्थें ॥ ६१ ॥ भावार्थें जें माझें पूजन् । तेणें मी संतृप्त् जनार्दन् । हा आगमोक्त् यज्ञ् संपूर्ण् । त्रिविध् लंक्षण् समसाम्यें ॥ ६२ ॥ वैदिकादि त्रिविध् गती । पूजितां तृप्त् मी श्रीपती । पूजाधिकाराची स्थिती । ऐक् तुजप्रती सांगेन् ॥ ६३ ॥ यदा स्वनिगमेनोक्तं द्विजत्वं प्राप्य् पूरुषः । यथ् यजेत् मां भक्त्या श्रद्धया तंनिबोध् मे ॥ ८ ॥ द्विजन्मे जे तिन्ही वर्ण् । त्यांचें अधिकारलक्षण् । गर्भाष्टमीं उपनयन् । तैं अधिकार् पूर्ण् ब्राह्मणा ॥ ६४ ॥ क्षत्रियांचा अधिकार् शुद्ध् । बारा वर्षां व्रतबंध् । सोळा वर्षां प्रसिद्ध् । व्रतबंध् वैश्यासी ॥ ६५ ॥ गायत्रीउपदेश् पावोन् । दुसरें जन्म् उपनयन् । या लागीं ‘सावित्र्’ जन्म् जाण् । द्विजन्मे त्रिवर्ण् वेदोक्तविधी ॥ ६६ ॥ वेदोक्त् अधिकारलक्षण् । या नांव् उद्धवा जाण् । आतां माझें पूजाविधिस्थान् । ऐक् संपूर्ण् निजभक्ता ॥ ६७ ॥ अर्चायां स्थण्डिलेऽग्नौ वा सूर्ये वाप्सु हृदि द्विजे । द्रव्येण् भक्तियुक्तोऽर्चेत् स्वगुरुं माममायया ॥ ९ ॥ माझें पूजाअधिष्ठान् । अष्टविध् पूजास्थान् । त्याचेंही निजलक्षण् । ऊणखूण् ते ऐक् ॥ ६८ ॥ प्रिय् ‘प्रतिमा’ पूजास्थान् । हें माझें प्रथम् अधिष्ठान् । कां पृथ्वीतळीं ‘स्थंडिलीं’ जाण् । पूजास्थान् दुसरें ॥ ६९ ॥ ‘अग्नीचें तेज्’ स्वरूप् माझें । तें पूजास्थान् जाण् तिजें । ‘सूर्यमंडळीं’ जे पूजा कीजे । तें चवथें माझें पूजास्थान् ॥ ७० ॥ ‘उदकीं’ जें माझें पूजन् । तें पांचवें पूजस्थान् । ‘हृदयीं’ जें माझें आवाहन् । तें पूजास्थान् सहावें ॥ ७१ ॥ शालिग्राम् केवळ् अचेतन् । ‘ब्राह्मण्’ मझें स्वरूप् सचेतन् । तें अखंडत्वें ब्रह्मपूर्ण् । पूजासन्मान् षोडशोपचारें ॥ ७२ ॥ ब्राह्मणीं ज्याचा ब्रह्मभावो । तो परम् भाग्याचा स्वयमेवो । ब्रह्मादिकां पूज्य् पहा हो । मी देवाधिदेवो स्वयें वंदीं ॥ ७३ ॥ सकळ् पूज्यांमाजीं जाण् । मुख्यत्वें पूज्य् ब्राह्मण् । तें सातवें पूजस्थान् । उद्धवा जाण् अतिश्रेष्ठ् ॥ ७४ ॥ सकळ् पूज्यां पूज्यत्वें पूजा । जो वरिष्ठां वरिष्ठ् वोजा । जो विनटता आत्मा मझा । वंद्य् ‘गुरुराजा’ सर्वांसी ॥ ७५ ॥ ज्याचे सद्भावें धरितां चरण् । मी सुखावें ब्रह्म् पूर्ण् । ज्याचें मद्रूपें करितां स्तवन् । मी परमात्मा जाण् उल्हासें ॥ ७६ ॥ सद्गुरूचें नामस्मरण् । निर्दळी बवभय् दारुण् । निवरोनी जन्ममरण् । निववी संपूर्ण् निजबोधें ॥ ७७ ॥ तो मी परमात्मा नारायण् । गुरुरूपें प्रकटोनि जाण् । परब्रह्माचें पूर्णपण् । शिष्यद्वारा संपूर्ण् प्रकाशक् ॥ ७८ ॥ ब्रह्माचें परब्रह्मपणा । सद्गुरूचेनि सत्य् जण् । एव्हडें अगाध् महिमान् । अतिगहन् गुरूचें ॥ ७९॥ एवं ‘सद्गुरु’ ज्ञानघन् । जो हरिहरां वद्य् पूर्ण् । तो माझें सद्रूप् अधिष्ठान् । हें पूजस्थान् आठवें ॥ ८० ॥ हें आठवें पूजास्थान । अखंड आठवे आठवण । तेणें आठवें साङ्ग संपूर्ण । उद्धवा जाण् अमी पूजिलों ॥ ८१ ॥ एवं ही आठही पूजास्थानें । तुज सांगितलीं सुलक्षणें । तेथलीं पूजेचीं लक्षणें । तेही भिन्नपणें सांगेन ॥ ८२ ॥ सकळ अधिष्ठानां गोडपण । जें पूजनीं होय संपूर्ण । तें पूजेचें मुख्य लक्षण । निजवर्म खूण ते ऐक ॥ ८३ ॥ सांडूनि लोकरंजनव्यापार । त्यजूनि दांभिक उपचार । दवडूनि शठत्वाचा व्यवहार । भजनतत्पर सद्भावें ॥ ८४ ॥ हीं अष्टौ महापूजास्थानें । येथ ‘अमायिक’ जें जें भजन । तें तें अतिगोड पूजन । उद्धवा जाण निश्चित ॥ ८५ ॥ एथ निष्कपट जे जे सेवा । ते ते अतिवल्लभ देवाधिदेवा । आतां पूजाविधि आघवा । ऐक बरवा सांगेन ॥ ८६ ॥ पूर्वं स्न्नानं प्रकुर्वीत धौतदन्तोऽङ्गशुद्धये । उभयैरपि च स्न्नानं मन्त्रैर्मृद्रहणादिना ॥ १० ॥ मळत्याग दंतधावन । यथाकाळीं करूनि जाण । देहसुद्धयर्थ करावें स्न्नान । मृत्तिकाग्रहण पूर्वक ॥ ८७ ॥ ऐसें झालिया मळत्यागस्न्नान । मग करावें मंत्रस्न्नान । वैदिक तांत्रिक विधान । दीक्षाग्रहण यथाविधि ॥ ८८ ॥ जैसा सद्गुरुसंप्रदावो । तैसा चालवावा आम्नावो । त्या विधीं स्न्नान करूनि पाहा हो । निर्मळ भावो धरावा ॥ ८९ । सन्धोपास्त्यादि कर्माणि वेदेनाचोदितानि मे । पूजां तैः कल्पयेत्सम्यक् सङ्कल्पः कर्मपावनीम् ॥ ११ ॥ वर्णाश्रमनिजविधींसीं । वेदें संध्या बोलिली जैसी । ते ते वर्णाश्रमीं संध्या तैसी । नित्यनैमित्येंसीं करावीं ॥ ९० ॥ वेदोक्त आचरावें स्वकर्म । निःशेष त्यागावें निषिद्ध काम्य । या नांव शुद्ध स्वधर्म । उत्तमोत्तम अधिकारू ॥ ९१ ॥ वेदोक्त सांडणें स्वकर्म । हाचि मुख्यत्वें अतिअधर्म । हाता आलिया परब्रह्म । न त्यागितां कर्म स्वयें राहे ॥ ९२ ॥ स्वयें स्वधर्म जो सांडणें । तेंचि अधर्माचें मुख्य ठाणें । स्वधर्में चित्तशुद्धि साधणें । यालागीं त्यागणें अहंता ॥ ९३ ॥ तेथें स्वधर्मकर्म आचरतां । ऐसा भाव उपजे चित्ता । ‘मी नव्हें एथ कर्मकर्ता । फळभोक्ता मी नव्हे’ ॥ ९४ ॥ देह जड मूढ अचेतन । त्यासी चेतवी जनीं जनार्दन । तेथ माझें मीपण कर्तेपण । सर्वथा जाण रिघेना ॥ ९५ ॥ या बुद्धीं जें कर्माचरण । तें भावार्थें भावीं ब्रह्मार्पण । यापरी निरभिमान । माझें उपासन साधकां ॥ ९६ ॥ माझी प्रतिमा पूजाविधान । तें प्रथम माझें पूजास्थान । तें प्रतिमाक्रियालक्षण । ऐक संपूर्ण उद्धवा ॥ ९७ ॥ शैली दारुमयी लौही लेप्या लेख्य च सैकती । मनोमयी मणिमयी प्रतिमाष्टविधा स्मृता ॥ १२ ॥ अष्टधा प्रतिमास्थिती । ज्या पूजितां सद्यःश्रेय देती । ऐशिया प्रतिमांची जाती । ऐक तुजप्रती सांगेन ॥ ९८ ॥ गंडक्यादि ‘शिळामूर्ती’ । कां दारु मांदार ब्रह्म ‘काष्ठमूर्ती’ । अथवा सुवर्णादि ‘धातुमूर्ती’ । सद्यः फळती सधकां ॥ ९९ ॥ मृत्तिकाकापडकीटणमूर्ती । या नांव ‘लेप्या’ म्हणिजेती । कां स्थंडिलीं लिहिल्या अतिप्रीतीं । त्या ‘लेख्या’ मूर्ती पूजकां ॥ १०० ॥ वाळुवेची जे केली मूर्ती । ती नांव ‘सिकतामूर्ति’ म्हणती । तेही पूज्य गा निश्चितीं । सुवर्णमूर्तीसमान ॥ १ ॥ मूर्ति ‘रत्नमयी’ सोज्ज्वळ । हिरा मरकत इंद्रनीळ । पद्मराग मुक्ताफळ । या मूर्ति केवळ अतिपूज्य ॥ २ ॥ मूर्तीमाजीं अतिप्राधान्य । ‘मनोमयी’ मूर्ति पावन । जिचें करितां उपासन । समाधान साधकां ॥ ३ ॥ तेंचि प्रतिमापूजाविधान । स्थावरजंगमलक्षण । तेही अर्थींचे निरूपण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥ ४ ॥ चलाचलेति द्विविधा प्रतिष्ठा जीवमन्दिरम् । उद्वासावाहने न स्तः स्थिरायामुद्धवार्चने ॥ १३ ॥ अचेतनाचेतनप्रकार । जडातें जीववी साचार । ‘जीव’ शब्दें चिन्मात्र । मुख्य परमेश्वर बोलिजे ॥ ५ ॥ भक्तभावार्थें साचार । त्या जीवाचें निजमंदिर । प्रतिमा जंगम-स्थावर । आगमशास्त्रसंमतें ॥ ६ ॥ तेथें स्थावरमूर्तिपूजन । साधकें करितां आपण । न लगे आवाहनविसर्जन । तेथ अधिष्ठान स्वयंभ ॥ ७ ॥ अस्थिरायां विकल्पः स्यात् स्थण्डिले तुभवेदद्वयम् । स्न्नपनं त्वविलेप्यायामन्यत्र परिमार्जनम् ॥ १४ ॥ जंगम प्रतिमांच्या ठायीं । आवाहनविसर्जन पाहीं । एकीं आहे एकीं नाहीं । ऐक तेही विभाग ॥ ८ ॥ शालग्राममूर्तीसी जाण । स्वयंभ माझें अधिष्ठान । तेथ आवाहनविसर्जन । सर्वथा जाण लागेना ॥ ९ ॥ शालग्रामाचा कुटका । ज्याचे पूजेसी आहे फुटका । तेथ परमात्मा निजसखा । सर्वदा देखा नांदत ॥ ११० ॥ इतर मूर्ती जंगमा जाण । तेथ आवाहनविसर्जन । साक्षेपें करावें आपण । हें विधिविधान आगमोक्त ॥ ११ ॥ स्थंडिलीं मूर्तिआवाहन । सर्वेंचि पूजांतीं विसर्जन । हें उभय भावनाविधान । स्थांडिलीं जाण आवश्यक ॥ १२ ॥ आपले हृदयींचा चिद्वन । मूर्तीमाजीं कीजे आवाहन । पूजांतीं करूनि विसर्जन । देव हृदयीं जाण ठेवावा ॥ १३ ॥ एथ आपणचि ब्रह्म परिपूर्ण । हेंचि व्हावया निजस्मरण । आवाहनविसर्जनें जाण । निजात्मआठवण साधका ॥ १४ ॥ हा आगमींचा निजात्मभावो । आपणचि आपला देवो । आपला आपण पूजक पहा हो । हा निजात्म-आठवो निजपूजे ॥ १५ ॥ ‘देव होऊनि देव पूजिजे’ । हें निजात्मता गोड खाजें । उपासनाकांड-व्याजें । उद्धवासी दीजे श्रीकृष्णें ॥ १६ ॥ हे निजात्मता निजगोडी । प्रतिपदीं न लभतां रोकडी । उपासना-तडातोडी । कोण कोरडी सोशील ॥ १७ ॥ हें आगमींचें निजगुह्य जाण । प्रतिपदीं सुखसंपन्न । सधक स्वयें होती चिद्धन । तें हें उपासन उद्धवा ॥ १८ ॥ ऐसें ऐकतां कृष्णवचन । उद्धव स्वानंदें झाला पूर्ण । धांवोनि धरिले श्रीकृष्णचरण । म्हणे समूळ निरूपण मज सांग ॥ १९ ॥ तंव देव म्हणे स्थिर राहें । जें हें आगमोक्त गुह्य आहे । तें माझे कृपेंवीण पाहें । प्राप्त नोहे साधकां ॥ १२० ॥ आगमोक्त गुह्य गहन । असो हें माझें गुप्तधन । तुवां पुशिलें पूजाविधान । ऐक सावधान उद्धवा ॥ २१ ॥ लेप्या लेख्या ज्या मूर्ति जाण । त्यांसीं करावेनां स्न्नान । इतरां मूर्तीसी स्न्नपन । यथाविधान करावें ॥ २२ ॥ द्रव्यैः प्रसिद्धैर्मद्यागः प्रतिमादिष्वमायिनः । भक्तस्य च यथालब्धैर्हदि भावेन चैव हि ॥ १५ ॥ पूजक सकाम होय चांग । तैं पूजाद्रव्य व्हावें साङ्ग । पूजासाधन झालिया व्यंग । फळ निर्व्यग उपजेना ॥ २३ ॥ भक्त निष्काम वाडेंकोडें । तैं पूजाद्रव्याचें सांकडें । सर्वथा कांहीं न पडे । भक्तभाव आवडे भगवंता ॥ २४ ॥ तेथ अनायासें जें प्राप्त । तेणें भगवंत होय तृप्त । तोचि पूजायाग यथोक्त । जाण निश्चित उद्धवा ॥ २५ ॥ निष्कामवृत्तीं फल मूल । दूर्वांकुर कां निर्मळ जळ । इतकेन पूजायाग सकळ । होय अविकळ मद्भावें ॥ २६ ॥ जेथ माझा सद्भाव दृढ । तेथ उपचारांचा कोण पाड । भक्तांचा भावाचि मज गोड । तेणें सुख सुरवाड मद्भक्तां ॥ २७ ॥ बाह्य उपचार जे कांहीं । ते प्रतिमामूर्तिपूजेसी पाहीं । मानसपूजेचे तंव ठायीं । वाणी नाहीं उपचारां ॥ २८ ॥ तेथ मनचि होय माझी मूर्ती । मनोमय उपचारसंपत्ती । निर्लोभें जें मज अर्पिती । तेणें मी श्रीपती संतुष्ट ॥ २९ ॥ प्रतिमादि अष्टौ पूजास्थान । यथोक्त पूजेचें विधान । तुज मी साङ्ग सांगेन । ऐक सावधान उद्धवा ॥ १३० ॥ स्न्नानालङ्करणं प्रेष्ठमर्चायामेव तूद्धव । स्थण्डिले तत्त्वविन्यासो वह्नावाज्यप्लुप्तं हविः ॥ १६ ॥ सूर्ये चाभ्यर्हण प्रेष्ठं सलिले सलिलादिभिः । प्रतिमामूर्ति पूजास्थान । ते मूर्तीस जें महास्न्नपन । या नांव बोलिजे ‘स्न्नान’ । साङ्ग भूषण मुकुटादी ॥ ३१ ॥ जे लोकीं उत्तम प्रकार । कां आपणासी जे प्रियकर । जे जे अनर्घ्य अळंकार । तेणें श्रद्धा मी श्रीधर पूजावा ॥ ३२ ॥ स्न्नान भोजन अलंकार । साङ्ग पूजा सपरिकर । हा प्रतिमापूजाप्रकार । ऐक विचार स्थंडिलाचा ॥ ३३ ॥ स्थडिलीं जे पूजास्थान । तेथ तत्त्वांचें धरोनि ध्यान । करावें तत्त्वविन्यासलेखन । पूजाविधान या हेतू ॥ ३४ ॥ आत्मतत्त्वादि तत्त्वविवंच । स्थंडिली विवंचूनि साच । हृदय शिर शिखा कवच । नेत्र अस्त्र दिशंअ निजपूजा ॥ ३५ ॥ अग्नीचे ठायीं जें पूजन । तेथ माझें करूनि ध्यान । आज्यप्लुत हविहवन । हें पूजाविधान अग्नीचें ॥ ३६ ॥ अग्नि देवांचें वदन । येणें विश्वासें संपूर्ण । हविर्द्रव्य करितां हवन । ‘अग्निपूजन’ या हेतू ॥ ३७ ॥ सूर्याच्या ठायीं प्रकाशमान । मंडळात्मा सूर्यनारायण । तेथ सौरमंत्रें उपस्थान । पूजाविधान या हेतू ॥ ३८ ॥ विचारितां श्रुतीचा अर्थ । ‘आपोनारायण’ साक्षात् । येथ पूजाविधान यथोक्त । जळीं जळयुक्त तर्पण ॥ ३९ ॥ ‘हृदयीं’ जें माझें पूजास्थान । तेथें मनें मनाचें अर्चन । मनोमय मूर्ति संपूर्ण । पूजाविधान मानसिक ॥ १४० ॥ माझें मुख्यत्वें अधिष्ठान । ब्रह्ममूर्ति जे ‘ब्राह्मण’ । तेथील जें पूजाविधान । आज्ञापालन दासत्वें ॥ ४१ ॥ बह्मासी ज्यचेनि ब्रह्मपण । तो सद्गुरु’ माझें पूजास्थान । सर्वार्थीं श्रेष्ठ पावन । तेथील पूजन तें ऐसें ॥ ४२ ॥ जीवें सर्वस्वेंसीं आपण । त्यासी रिघावें अनन्य शरण । त्याच्या वचनासी प्राण । निश्चयें जाण विकावा ॥ ४३ ॥ गुरूची नीचसेवा सेवन । आवडीं करणें आपण । हेंचि तेथील पूजाविधान । येणें सुखसंपन्न साधक ॥ ४४ ॥ सद्गुरुसेवा करितां पाहीं । ब्रह्मसायुज्य लागे पायीं । गुरुसेवेपरतें कांहीं । श्रेष्ठ नाहीं साधन ॥ ४५ ॥ सद्गुरुस्वरूप तें जाण । अखंडत्वें ब्रह्म पूर्ण । तेथें आवाहन विसर्जन । सर्वथा आपण न करावें ॥ ४६ ॥ निष्कपटभावें संपूर्ण । सद्गुरूसी जो अनन्य शरण । त्याचे मीही वंदीं चरण । येथवरी जाण तो धन्य ॥ ४७ ॥ निर्लोभभावें सहज । पूजितां तोषे अधोक्षज । त्या भावाचें निजगुज । स्वयें यदुराज सांगत ॥ ४८ ॥ श्रद्धयोपाहतं प्रेष्ठं भक्तेन मम वार्यपि ॥ १७ ॥ भोर्यप्यभक्तोपहतं न मे तोषाय कल्पते । गन्धो धूपः सुमनसो दीपोऽअन्नाद्यं च किं पुनः ॥ १८ ॥ माझ्या ठायीं अतिप्रीतीं । श्रद्धायुक्त अनन्य भक्तीं । भक्त ‘भावें’ जळ अर्पिती । तेणें मी श्रीपति सुखावें ॥ ४९ ॥ तो जळबिंदु यथासुखें । म्यां मुखीं झेलिजे आदिपुरुखें । तंव भक्तभावाचेनि हरिखें । मी सुखरूप सुखें सुखावें देख ॥ १५० ॥ माझें त्रैलोक्यासी सुख । ऐसा मीही सुखरूप देख । त्या मज होय परम संतोख । भाविकांचें उदक सेवितां ॥ ५१ ॥ त्या जळबिंदूचिया साठीं । रमा नावडे गोमटी । ब्रह्मा जन्मला माझे पोटीं । तोही शेवटी नावडे ॥ ५२ ॥ भाविकांचेनि उदकलेखें । मज वैकुंठही झालें फिकें । शेषशयनींचीं निद्रासुखें । त्यांचींही तुकें उतरलीं ॥ ५३ ॥ भाविकांच्या उदकापुढें मज आणिक कांहीं नावडे । तेथही गंधादि पूजा जोडे । नैवेद्य चोखडे रसयुक्त ॥ ५४ ॥ ते पूजेचिये सुखप्राप्ती । उपमा नाहीं त्रिजगतीं । ऐसा भाविकांचिये भक्तीं । मी श्रीपती सुखावें ॥ ५५ ॥ भावें करितां भगवद्भक्ती । ‘मी कृतकृत्य झालों निश्चितीं । ऐशिया निश्चियें जो भावार्थी । त्याचेचि जळें संतृप्ति मज होय ॥ ५६ ॥ येर जो अभक्त दंभस्थितीं । जीवीं द्रव्याशा बाह्य विरक्ती । लौकिकप्रतिष्ठेपुरती । माझी भक्ति जो मिरवी ॥ ५७ ॥ ऐशिया अभक्ताचिया स्थितीं । छत्र चामर गजसंपत्ती । मज अर्पितांही अभक्तीं । सुखलेश चित्तीं उपजेना ॥ ५८ ॥ क्षीरसागर निवडी राजहंस । तेथ निसूं दीधला कापुस । तेवीं अभक्तभजनीं संतोष । मी हृषीकेश पावोना ॥ ५९ ॥ कागाची गायनकळा । जेवीं तोषेना किन्नरशाळा । तेवीं अभक्ताची भजनलीला । माझी चित्कळा तोषेना ॥ १६० ॥ जेवीं रजस्वलेचें पक्कन्न । उत्तम परी तें अतिहीन । तेवीं अभक्तांचें भजन । कदा जनार्दन स्पर्शेना ॥ ६१ ॥ ज्या भजना नातळे नारायण । ऐसें जें अभक्तांचें भजन । तेणें भजनें जनार्दन । अणुमात्र जाण तोषेना ॥ ६२ ॥ एवं भक्ताभक्तभजनमार्ग । दावूनि अधिकाराचे भाग । आतां समूळ पूजामार्ग । साङ्ग श्रीकृष्ण सांगत ॥ ६३ ॥ शुचिः सम्भृतसम्भारः प्राग्दर्भैः कल्पितासनः । आसीनः प्रागुदग्वार्चेदर्चायामथ संमुखः ॥ १९ ॥ करूनि मलस्न्नान आपण । वैदिक तांत्रिक मंत्रस्न्नान । सारूनि नित्यविधान । ‘शुचित्वपण’ या नांव ॥ ६४ ॥ मग देवपूजासंभार । शोधूनि करावे पवित्र । यथास्थानीं पूजाप्रकार । गंधादि उपचार ठेवावे ॥ ६५ ॥ श्वेतकंबल चैलाजिन । पूर्वदर्भाग्नीं आसन । पूर्वामुख वैसावें आपण । अथवा जाण उदड्मुख ॥ ६६ ॥ स्थावरमूर्ती पूजितां देख । आसन करावें मूर्तिसंमुख । हा आसनविधि निर्दोख । पूजान्यासादिक हरि सांगे ॥ ६७ ॥ कृतन्यासः कृतन्यासां मदर्ची पाणिना मृजेत् । कलशं प्रोक्षणीयं च यथावदपसाधयेत् ॥ २० ॥ विधियुक्त घालूनि आसन । गुरूसी करावें नमन । परमगुरु-परमेष्ठीसी जाण । करावें अभिवंदन अतिप्रीतीं ॥ ६८॥ जो मंत्र प्राप्त आपणांस । त्या मंत्राचे देहीं करावे न्यास । मंत्रमूर्ति आणोनि ध्यानास । पूजा ‘मानस’ करावी ॥ ६९ ॥ जे मूर्ति आली ध्यानासी । तेचि आणावया प्रतिमेसी । हातीं धरोनिया अर्चेसी । करावें न्यासासी प्रतिमाअंगीं ॥ १७० ॥ कलश आणि प्रोक्षणी जाण । साधावीं यथाविधान । जळें करोनिया पूर्ण । दूर्वादि चंदन द्रव्ययुक्त ॥ ७१ ॥ तदद्भिर्देवयजनं द्रव्याण्यात्मानमेव च । प्रोक्ष्य प्रात्राणि त्रीण्यद्भिस्तैस्तैर्द्रव्यैश्च साधयेत् ॥ २१ ॥ तें प्रौक्षणपात्रींचें जळ । नखोदकें न करूनी निर्मळ । तेणें पूजसंभार सकळ । कुशाग्रें केवळ प्रोक्षावा ॥ ७२ ॥ तेणेंचि पोक्षावें देवसदन । आपणासी करावें पोक्षण । प्रोक्षोनि देवपूजास्थान । पूजाविधान मांडावें ॥ ७३ ॥ पाद्य-अर्घ्य-आचमनीयें । तदर्थ मांडावीं पात्रत्रयें । जळें पूर्ण करूनि पाहें । भिन्न द्रव्य आहे पात्रत्रयासी ॥ ७४ ॥ श्यामक-दूर्वा-अब्ज-विष्णुक्रांता । ‘पाद्यपात्रीं’ हे द्रव्यशुद्धता । गंध पुष्प फल अक्षता । एवं कुशाग्रता ‘अर्घ्यपात्रीं’ ॥ ७५ ॥ एळा वाळा जातीफळ । लवंग कर्पूर कंकोळ । ‘आचमनपात्रीं’ हा देव्यमेळ । शुद्ध जळ समयुक्त ॥ ७६ ॥ पाद्यार्घ्याचमनीचार्थं त्रीणि पात्राणि दैशिकः । हृदा शीष्णार्थ शिखाया गायत्र्या चाभिमन्त्रयेत् ॥ २२ ॥ गुरुमंत्रदीक्षा जैसी ज्यासी । तोचि निजमार्ग शिष्यासी । तेणें पाद्यादि तिहीं पात्रांसी । संप्रदायेंसी मांडावे ॥ ७७ ॥ पाद्य द्यावें हृदयमंत्रें । अर्घ्य अर्पावें शिरोमंत्रे । आचमन द्यावें शिखामंत्रें । गुरुसंस्कारें आगमोक्त ॥ ७८ ॥ तेंचि तिनी पात्रें जाण । गायत्रीमंत्रें आपण । अभिमंत्रोनियां पूर्ण । देवार्पण करावीं ॥ ७९ ॥ गुरुसंप्रदाय नेटक । यालागीं त्यातें ‘देशिक’ । स्वयें बोलिला यदुनायक । दीक्षाविवेक निजद्रष्टा ॥ १८०॥ आगमशास्त्रींचा निजमार्ग । भूतशुद्धि प्राणप्रतिष्ठायोग । तेणेंचि अन्वयें श्रीरंग । श्लोकार्थें साङ्ग सांगत ॥ ८१ । पिण्डे वाय्वग्निसंशुद्धे हृत्पद्मस्थां परां मम । अणवीं जीवकलां ध्यायेन्नादांते सिद्धभाविताम् ॥ २३ ॥ वायुबीजें आवाहूनी । पिंगला प्राण पूरूनि । तोचि कुंभकें स्तंभूनि । मात्राधारणीं धरावा ॥ ८२ ॥ वायु जो धारणा धरावा । तो जंव फुटेना अव्हासव्हा । तंवचि वरी निरोधावा । मग रेचावा शनैः शनैः ॥ ८३ ॥ ऐसें करितां प्राणधारण । स्वयें कल्पावें शरीरशोषण । शरीर शोषलें मानूनि जाण । देहदहन मांडावें ॥ ८४ ॥ आदारस्थित जो अग्नी । तो अग्निबीजें चेतवूनी । तोचि देह लावूनि दहनीं । भस्म मानूनी निजदेह ॥ ८५ ॥ देह दहनें अतिसंतप्त । तेथ चंद्रबीजें चंद्रामृत । आणोनि निववाये समस्त । नवा देह तेथ कल्पावा ॥ ८६ ॥ देह कल्पावा जो एथ । पूर्व पाटव्य इंद्रिययुक्त । त्याच्या हृदयपद्माआंत । अण्वी जीवकळा तेथ पहावी माझी ॥ ८७ ॥ माझी जीवकळा परम । सूक्ष्महूनि अति सूक्ष्म । यालागीं ‘अणवी’ तिचें नाम । विश्रामधाम जगाचें ॥ ८८ ॥ अकार उकार मकारस्थिती । यांतें प्रकाशे अण्वी जीवज्योती । ते तंव शब्दाहूनि परती । योगीं नादांतीं लक्षिजे ॥ ८९ ॥ ते देहीं सबाह्य परिपूर्ण । असोनि सूक्ष्मत्वें अलक्ष्य जाण । तीतें हृत्पद्मीं योगिजन । लक्षिती आसनप्राणायामें ॥ १९० ॥ ते अण्वी जीवकाळा अव्यक्त । तीतेंकरोनियां व्यक्त । योगी निजभावनायुक्त । हृदयीं चिंतित महामूर्ती । ९१ ॥ ‘नार’ जीवसमूह जाण । त्यांचे जें आयतनस्थान । ते महामूर्ति श्रीनारायण । हृदयीं सज्जन चिंतिती ॥ ९२ ॥ तयाऽऽत्मभूतया पिण्डे व्याप्ते संपूज्य तन्मयः । आबाह्यर्चदिषु स्थाप्य न्यस्ताङ्गं मां प्रपूजयेत् ॥ २४ ॥ जेवीं गृह प्रकशी दीपस्थिती । तेवीं देह प्रकाशी जीवज्योती । ते सांगोपांग माझी मूर्ती । हृदयीं चिंतिती साकार ॥ ९३ ॥ जेवीं तूप तूपपणें थिजलें । तेंचि अवर्ण वर्णव्यक्ती आलें । तेवीं चैतन्य माझें मुसावलें । लीलाविग्रहें झालें साकार ॥ ९४ ॥ ऐशी ते माझी सगुण मूर्ती । चिन्मात्रतेजें हृदयदीप्ती । तिनें व्यापूनि देहाची स्थिती । चित्तीं निजभक्ती उपजवी ॥ ९५ ॥ देह जड मूढ अचेतन । तेथ मूर्ति प्रकटोनि चिद्धन । अचेतना करोनि सचेतन । करवी निजभजन उल्हासें ॥ ९६ ॥ जेवीं हरणुलीचें सोंग जाण । हरिणीरूपें नाचे आपण । तेवीं भक्तभावें नारायण । भजनपूजन स्वयें कर्ता ॥ ९७ ॥ यापरी अभेदभजन । मूर्ति पूजितां चिद्धन । पूज्य पूजक हे आठवण । सहजें जाण मावळे ॥ ९८ ॥ मावळल्या हा भजनभेद । उल्हासे भक्तीचा अभेदबोध । हा गुरुमार्ग अतिशुद्ध । प्रिय प्रसिद्ध मजलागीं ॥ ९९ ॥ जेथ माझी अभेदभक्ती । तेथ मी सर्वस्वें श्रीपती । आतुडलों भक्तांच्या हातें । स्वानंदप्रीती उल्हासें ॥ २०० ॥ जेवीं कां अफाट मेघजळा । धरण बांधोनि घालिजे तळां । तेवीं मज अनंताचा एकवळा । अभेदभजनाला आतुडे ॥ १ ॥ अडवीं वर्षलें सैरा जळ । तेणें नुपजेचि उत्तम फळ । तेंचि तळां भरलिया प्रबळ । तेणें पिकती केवळ राजागरें ॥ २ ॥ तैसें माझें स्वरूप वाडेंकोडें । अभेदक्तांमाजीं आतुडे । तैं बर्ह्मानंदें गोंधळ पडे । शीग चढे भक्तीची ॥ ३ ॥ अभेदभक्तांच्या द्वारपाशीं । तीर्थें येती पवित्र व्हावयासी । सुरनर लागते पायांसी । मी हृषीकेषी त्यांमाजीं ॥ ४ ॥ अभेदभक्तांपाशीं देख । सकळ तीर्थें होती निर्दोख । बक्तीचें माहेर तें आवश्यक । मजही सुख त्यांचेनी ॥ ५ ॥ अभेद जे क्रियास्थिती । या नांव माझी उत्तम भक्ती । ऐसा अतिउल्हासें श्रीपती । उद्धवाप्रती बोलत ॥ ६ ॥ अभेदभक्ती वाडेंकोडें । श्रीकृष्ण सांगे उद्धवापुढें । कथा राहिली येरिकडे । तेंही धडफुडें स्मरेना ॥ ७ ॥ देह विसरला निरूपण । तंव उद्धवासी बाणली खूण । तोही विसरला उद्धवपण । कृष्णा कृष्णपण नाठवे ॥ ८ ॥ अभेदभजनाचा हरिख । देव भक्त झाले एक । दोघां पडोनि ठेलें ठक । परम सुख पावले ॥ ९ ॥ उद्धव निजबोधें परिपूर्ण । तरी पूजाविधानप्रश्न । एथ करावया काय कारण । ऐशी आशंका मन कल्पील ॥ २१० ॥ तरी उद्धवाच्या चित्तीं । उगा राहतांचि श्रीपती । जाईल निजधामाप्रती । यालागीं प्रश्नोक्ती तो पुसे ॥ २११ ॥ उपासनाकांड गुह्यज्ञान । आगमोक्तपूजाविधान । उद्धवमिषें श्रीकृष्ण । वेदार्थ आपण स्वयें बोले ॥ १२ ॥ सकळ वेदार्थ शास्त्रविधी । ग्रंथीं श्रीकृष्ण प्रतिपादी । जैसी श्रद्धा तैसी सिद्धी । व्हावया त्रिशुद्धी साधकां ॥ १३ ॥ असो हे ग्रंथव्युत्पत्ती । ऐकता अद्वैतभक्ती । उद्धव निवाला निजचित्तीं । तेणें श्रीपति सुखवला ॥ १४ ॥ संतोषें म्हणे श्रीकृष्ण । उद्धवा होईं सावधान । पूढील पूजाविधान । तुज मी सांगेन यथोक्त ॥ १५ ॥ पूज्य पूजक एकात्मता ध्यान । करोनियां दृढ धारण । तेंचि बाह्य पूजेलगीं जाण । करावें आवाहन प्रतिमेमाजीं ॥ १६ ॥ प्रतिमेसंमुख आपण । आवाहनमुद्रा दाखवून । माझी चिक्तळा संपूर्ण । प्रतिमेसी जाण भावावी ॥ १७ ॥ तेव्हां मूर्तीचें जडपण । निःशेष न देखावें आपण । मूर्ति भावावी चैतन्यघन । मुख्य ‘आवाहन’ या नांव ॥ १८ ॥ गुरुमुखें मंत्र निर्दोष । तेणें मंत्रें मूर्तींसी न्यस । करावे सर्वांगीं सावकाश । शास्त्रविन्यास आगमोक्त ॥ १९ ॥ एवं आवाहन संस्थापन । सन्निधि सन्निरोधन । संमुखीकरण स्वायतन । या मुद्रा आपण दावाव्या ॥ २२० ॥ अवगुंठन संकलीकरण । या अष्टौ मुद्रा दावूनि जाण । मग होऊनि सावधान । पूजाविधान मांडावें ॥ २१ ॥ पाद्योपस्पर्शार्हणादीनुपचारान्प्रकल्पयेत् । धर्मादिभिश्च नवभिः कल्पयित्वाऽऽसनं मम ॥ २५ ॥ पद्ममष्टदलं तत्र कर्णिकाकेसरोज्ज्वलम् । उभाभ्यां वेदतन्त्राभ्यां महां तूभयसिद्धये ॥ २६ ॥ स्न्नानमंडप कल्पूनि जाण । तेथ आणावा देव चिद्धन । पाद्य अर्घ्य आचमन । मधुपर्क-विधान करावें ॥ २२ ॥ अभ्यंग अंगमर्दन । पुरुषसूक्तें थथोक्त स्न्नान । पीतंबरपरिधान । स्न्नानमंडपीं जाण देवासी ॥ २३ ॥ इतार यथोक्त पूजन । करावें सिंहासनीं संपूर्ण । तें आसन पीठावरण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ २४ ॥ सिंहासनीं आवरणक्रम । आधारप्रकृति-कूर्म क्षेम । क्षीराब्धि श्वेतद्वीप कल्पद्रुप । मनोरम भावावा ॥ २५ ॥ त्या तळीं रत्नमंडप नेटक । त्यामाजीं विचित्र पर्यंक । त्या मंचकाचा विवेक । यदुनायक सांगत ॥ २६ ॥ धर्म ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । हेचि माचवे अतिवर्य । अधर्म अज्ञान अनैश्वर्य । अवैराग्येंसीं पाय गातें चारी ॥ २७ ॥ ईश्वरतत्त्व निजसूत । गुणागुणीं वळोनि तेथ । मंचक विणिला अचुंबित । योगयुक्त महामुद्रा ॥ २८ ॥ त्या मंचकावरी शेषपुटी । शोभे अतिशयेंसीं गोमटी । सहस्त्रफणीं मणितेज उठी । छत्राकार पृष्टीं झळकत ॥ २९ ॥ शेषपुटीमाजीं निर्मळ । विकासलें रातोत्पळ । सकर्णिक अष्टदळ । शोभे कमळ मनोहर ॥ २३० ॥ सत्शक्ति कमळकंदमूळ । ज्ञाननाळ त्याचें सरळ । प्रकृति अष्टधा जे सबळ । तेंचि अष्टदळ कमळाचें ॥ ३१ ॥ ऐसें कमळ अतिसुंदर । षड्विकार तेचि केसर । वैराग्यकर्णिका सधर । मघमघी थोर सुवासें ॥ ३२ ॥ पूर्वादि कमळदळीं जाणा । देवता न्यासाव्या त्या त्या स्थाना । विमळा उत्कर्षणी आणि ज्ञाना । क्रियाशक्ती जाणा चौथी पैं ॥ ३३ ॥ योगा प्रह्वी सत्या ईशाना । कर्णिका योजिजे मध्यस्थाना । कल्पूनि अनुपम रचना । अनुग्रहा जाणा स्थापावी ॥ ३४ ॥ आत्मा अंतरात्मा परमात्मा । हा संमुखभाग देवोत्तमा । सत्त्व रज आणि मोह तमा । पुरुषोत्तम पृष्ठिभाग ॥ ३५ ॥ ऐशापरी पीठन्यास । आगमोक्त सावकाश । करूनियां हृषीकेश । सिंहासनास आणावा ॥ ३६ ॥ छत्र आणि युग्म चामर । नाना वाद्यें जयजयकार । दावूनि पीठ मुद्रा सधर । आसनीं श्रीधर बैसवावा ॥ ३७ ॥ मज सर्वगतासी आवाहन । मज अधिष्ठानासी आसन । मज निर्विकारासी जाण । दाविती आपण विकारमुद्रा ॥ ३८ ॥ मज चिद्रूपालागीं लोचन । निःशब्दा कल्पिती श्रवण । मज विश्वमुखासी वदन । निमासुरें जाण भाविती ॥ ३९ ॥ मी विश्वांघ्री दों पायीं चालत । मज विश्वबाहूसी चारी हात । मज सर्वगतातें एथ । स्थान भावित एकदेशी ॥ २४० ॥ मज निरुपचारासी उपचार । मज विदेहासी अळंकार । मज सर्वसमाना अरिमित्र । भावना विचित्र भाविती ॥ ४१ ॥ मज अकर्त्या कर्मबंधन । अजासी जन्मनिधन । नित्यतृप्तासी भोजन । निर्गुणा सगुण भाविती ॥ ४२ ॥ या अवघियांचा अभिप्रावो । उपासनाकांडनिर्वाहो । जैस जैसा भजनभावो । तैसा मी देवो तयांसी ॥ ४३ ॥ मी अवाप्त सकळकाम । परी भक्तप्रेमालागीं सकाम । जैसा भक्तांचा मनोधर्म । तैसा पुरुषोत्तम मी तयां ॥ ४४ ॥ भक्त जैसा भावी मातें । मी तैसाचि होयें त्यातें । तो जें जें अर्पी भावार्थे । तें अर्पे मातें सहजचि ॥ ४५ ॥ मी सर्वत्र भरलों असें । तेथ जो जेथ मज उद्देशें । भक्त भावार्थें अर्पुं बैसे । तें अर्पे अनायासें सहजें मज ॥ ४६ ॥ मी सर्वत्र देवाधिदेव । तैसा प्राणीयांचा नव्हे भाव । यालागीं भक्तांचा जेथ सद्भाव । तेथ मी देव सहजेंचि ॥ ४७ ॥ यालागें वडेंकोडें । भक्तभावार्थ मज आवडे । भक्तभावाहूनि पुढें । वैकुंठ नावडे क्षीराब्धीही ॥ ४८ ॥ भक्तभावार्थाचीं भूषणें । अंगीं बाणावया श्रीकृष्णें । म्यां निर्गुणेंही सगुण होणें । भावार्थगुणें भक्तांच्या ॥ ४९ ॥ यालागीं मी अजन्मा जन्में । अकर्माही करीं कर्में । अनमा मी धरीं नामें । भक्त मनोधर्में तरावया ॥ २५० ॥ निर्गुणीं लागल्या मन । मनचि होय चैतन्यघन । सगुणीं ठसावल्या मन । साधक श्रीकृष्ण स्वयें होती ॥ ५१ ॥ निर्गुणाचा बोध अटक । यालागीं उपासनविवेक । सगुणमूर्ति भावूनि देख । तरले साधक अनायासें ॥ ५२ ॥ हे आगमोक्त उपासनविधी । येणें भोगमोक्ष उभयसिद्धी । साधक पावती त्रिशुद्धी । मी कृपानिधि संतुष्टें ॥ ५३ ॥ तेंचि उपासनाविधिविधान । मागां सांगतां पूजन । देव सिंहासनीं बैसल्या पूर्ण । पुढें आवरणपूजा ऐक ॥ ५४ ॥ सुदर्शनं पाञ्चजन्यं गदासीषुधनुर्हलान् । मुसलं कौस्तुभं मालां श्रीवत्सं चानुपूजयेत् ॥ २७ ॥ अण्वी जीवकळेसी ‘देहावरण’ । सिंहासनीं ‘शक्त्यावरण’ । सुदर्शनादि आयुधावरण’ । आपुलीं आपण हरि सांगे ॥ ५५ ॥ सतेज धार सुदर्शन । शंख शोभे पांचजन्य । नंदक तो खड्ग जाण । गदा गहन कौमोदकी ॥ ५६ ॥ शार्ङ्ग-धनुष अतिसबळ । सुवर्णपुंखें बाण सरळ । हल आणि मुसळ । आयुधें प्रबळ पूजावीं ॥ ५७ ॥ या आठवी भुजा सायुधा सरळा । कंठी कौस्तुभ वनमाळा । कांसे कशिला पिंवळा । घनसांवळा शोभत ॥ ५८ ॥ ब्रह्मण्यदेव रमानाथ । ब्राह्मणाचा चरणघात । हृदयीं अलंकार मिरवत । शोभा अद्भुत तेणें शोभे ॥ ५९ ॥ चिद्रत्नांच्या अळंकारीं । गुण काढोनियां बाहेरी । वोविली वैजयंती कुसरी । ते हृदयावरी रुळत ॥ २६० ॥ यापरी साळंकार सायुध । शंखचक्रपद्मेसीं अगाध । ऐसा शोभला स्वयंबोध । नारदादि संनिध तिष्ठती सदा ॥ ६१ ॥ यापरी साळंकार सायुध । पूज्य पूजोनियां गोविंद । मग पूजावे पार्षद । ऐक विशद सांगेन ॥ ६२ ॥ नन्दं सुनन्दं गरुडं चण्डमेव च । महाबलं बलं चैव कुमुदं कुमुदेक्षणम् ॥ २८ ॥ नंद सुनंद देवापाशीं । गरुड सदा तिष्ठे दृष्टीसी । चंड प्रचंड दोनी बाहींसीं । अहर्निशीं तिष्ठती ॥ ६३ ॥ बळ आणि महाबळ । सुमुख संज्ञें अवधानशीळ । कुमुद कुमुदाक्ष केवळ । पाठीसी प्रबळ बळें उभे ॥ ६४ ॥ गरुड दृष्टीं तिष्ठे आपण । येर नंदादि जे अष्टौ जन । ते अष्टौ दिशांप्रति जाण । पार्षदावरण हरिनिकटीं ॥ ६५ ॥ दुर्गां विनायकं व्यासं विष्वक्सेनं गुरून् । स्वे स्वे स्थाने त्वभिमुखान् पूजयेत्प्रोक्षणादिभिः ॥ २९ ॥ दुर्गा विनायक जाण । व्यास आणि विष्वक्सेन । चहूं कोनीं चारी स्थापून । करावें पूजन देवाभिमुख ॥ ६६ ॥ मूळमूर्तीसी अभिन्नाकारु । गुरु आणि परमगुरु । परमेष्ठिगुरूसी एकाकारु । पूजाप्रकारु करावा ॥ ६७ ॥ इंद्रादि अष्टौ लोकपाळ । आह्वानूनियां सकळ । स्थापूनि अष्टौ दिशा केवळ । तेही तत्काळ पूजावे ॥ ६८ ॥ गुरु-दुर्गादिक लोकपाळ । पूजावे सांगोपांग सकळ । प्रोक्षणपाद्यादि अविकळ । पूजा निश्चळ करावी ॥ ६९ ॥ तेचि पूजेचे पूजोपचार । कोण कोण पैं प्रकार । साही श्लोकीं शार्ङ्गधर । संक्षोपाकार सांगत ॥ २७० ॥ दन्दनोशीरकर्पूरकुड्कुमागुरुवासितैः । सलिलैः स्नापयेन्मन्त्रैर्नित्यदा विभवे सति ॥ ३० ॥ स्वर्णधर्मानुवाकेन महापुरुषविद्यया । पौरुषेणापि सूक्तेन सामभीरजनादिभिः ॥ ३१ ॥ एळा वाळा कर्पूर । चंदन कुंकुम केशर । त्यांमाजीं मेळवूनि अगर । धूपिलें नीर स्न्नपनासी ॥ ७१ ॥ सुवासित सपरिकर । गंगाजळ अतिपवित्र । शंखमुद्रापुरस्कार । शंखीं तें नीर भरावें ॥ ७२ ॥ ऐसें जळ घेऊनि शुद्ध । आपस्तंबशाखेचें प्रसिद्ध । ‘सुवर्णधर्मनुवाक’ पद । तेणें अभिषेक विशद मज करावा ॥ ७३ ॥ अथवा केवळ ‘पुरुषसूक्त’ । ‘रुद्राभिषेक’ ‘विष्णुसूक्त’ । इंहीं मंत्रीं मंत्रोक्त । देवासीं यथोक्त स्न्नान द्यावें ॥ ७४ ॥ कां सामवेदींचें गायन । त्यामाजीं सामनीराजन । तेणेंहीकरूनियां जाण । देवासी स्न्नान करावें ॥ ७५ ॥ असल्या वैभवसंपन्न । नित्य द्यावें हें महास्न्नान । नातरी पर्वविशेषें जाण । करावें आपण जयंत्यादिकीं ॥ ७६ ॥ आगमोक्त सुलक्षण । ‘महापुरुषविद्या’ पूर्ण । तेणेंही करूनि आपण । देवासी स्न्नान करावें ॥ ७७ ॥ देवासी पूर्ण झालिया स्न्नान । करावें मंगळनीरांजन । मग वस्त्रें अलंकार भूषण । देवासी आपण अर्पावीं ॥ ७८ ॥ वस्त्रोपवीताभरणपत्रस्वग्गन्धलेपनैः । अलङ्कुर्वीत सप्रेम मद्भक्तो मां यथोचितम् ॥ ३२ ॥ देवो स्वरूपें घनसांवळ । कांसे कसावा सोनसळा । हेमसूत्र अर्पूनि गळां । रत्नमेखळा बाणावी ॥ ७९ ॥ वंकीअंदुवांचा गजर । चरणीं नूपुरांचा झणत्कार । मुकुटकुंडें मनोहर । हृदयीं गंभीर महापदक ॥ २८० ॥ जडित मोतिलग पत्रवेली । अतिशोभित दिसे निढळीं । तिलक पिंवळा तयातळी । कंठी झळाळी कौस्तुभ ॥ ८१ ॥ बाहीं बाहुवटे वीरकंकणें । करमुद्रिका रत्नखेवणें । पीतांबर झळके कोणें मानें । रविबिंब तेणें लाजविलें ॥ ८२ ॥ सांवळें अंगीं गोमटी । शुभ्र चंदनाची शोभे उटी । सुमनमाळा वीरगुंठीं । होत घरटीं मधुकरां ॥ ८३ ॥ वैजयंती वनमाळा । आपाद रुळे गळां । घवघवीत दिसे डोळां । घनसांवळा शोभत ॥ ८४ ॥ एवं वस्त्रालंकारभूषणीं । स्वयं पूजावा शार्ङ्गपाणी । प्प्जेहूनियां मनीं । श्रद्धा कोटिगुणीं असावी ॥ ८५ ॥ भक्त असो अतिसंपन्न । अथवा हो कां अतिनिर्धन । जेथ शुद्ध श्रद्धा संपूर्ण । तेथ नारायण संतुष्टे ॥ ८६ ॥ सकळ पूजेचें कारण । मुख्य श्रद्धाचि गा प्रमाण । अत्यंत श्रद्धे जो संपन्न । तो देवाचा पूर्ण पढियंता ॥ ८७ ॥ पाद्यमाचमनीयं च गन्धं सुमनसोऽक्षतान् । धूपदीपोपहर्याणि दद्यान्मे श्रद्धयार्चकः ॥ ३३ ॥ एवं मूर्ति शृंगारिल्या पूर्ण । द्यावें पाद्य अर्घ्य आचमन । देऊनि मथुपर्कविधान । करावें पूजन श्रद्धयुक्त ॥ ८८ ॥ गंधाक्षता शुद्ध सुमन । धूप दशांग दीपदान । दीपावली नीराजन । श्रद्धा मदर्चन साधकां ॥ ८९ ॥ गुडपायससर्पींषि शष्कुल्यापूपमोदकान् । संयावदधिसूपांश्च नैवेद्यं सति कल्पयेत् ॥ ३४ ॥ झाल्या घूप दीप नीरांजन । देवासी वोगरावें भोजन । नानापरीचें पक्वाना । अन्न सदन्न रसयुक्त ॥ २९० ॥ मांडा साकरमांडा गुळवरी । शष्कुला अमृतफळें क्षीरधारी । दुधामाजीं आळिली क्षिरी । वाढिली परी वळिवट ॥ ९१ ॥ मधुवडा कोरवडा । लाडू तिळवयांचा जोडा । रुची आला अंबवडा । ठायापुढां वाढिंनला ॥ ९२ ॥ पत्रशाकांची प्रभावळी । भात अरुवार जिरेसाळी । सूप सोलींव मुगदाळी । गोघृत परिमळीं सद्यस्तप्त ॥ ९३ ॥ सांजा सडींव गुळयुक्त । एळा मिरें घालूनि आंत । पाक केला घ्रुतमिश्रित । सेवितां मुखांत अरुवार ॥ ९४ ॥ कथिका तक्राची गोमटी । आम्ररसें भरली वाटी । शिखरणी केळांची वाडिली ताटीं । देखोनि लाळ घोंटी अमरेंद्र ॥ ९५ ॥ दधि दुग्ध साय साकर । नैवेद्या वाढिले परिकर । देव न पाहे उपचार । श्रद्धा श्रीधर तृप्त होय ॥ ९६ ॥ सामर्थ्य असलें करावयासी । तरी हे परवडी प्रतिदिवशीं । नैवेद्य अर्पावे देवासी । ना तरी पर्वविशेषीं अर्पावे ॥ ९७ ॥ उपास्यमूर्ति जे साचार । ते जयंतीस सविस्तर । पर्वविशेषीं उपचार । पूजा अपार हरि सांगे ॥ ९८ ॥ अभ्यङ्गोन्मर्दनादर्श दन्तधावाभिषेचनम् । अनाद्यगीतनृत्यादि पर्वणि स्युरुतान्वहम् ॥ ३५ ॥ पर्वे बोलिलीं आगमोक्तीं । अथवा वार्षिक पर्वे येती । कां निजमूर्तीची जयंती । ते पूजा श्रीपति स्वयें सांगे ॥ ९९ ॥ दंतधावन उद्वर्त्तन । मूर्तिसी द्यावें अभ्यंजन । पंचामृते करूनि स्न्नपन । विचित्राभरण पूजावी ॥ ३०० ॥ पूजोनि साळंक्रुत देवासी । नैवेद्य अर्पावे षड्सीं । देऊनि करोद्वर्तनासी । मुखवासासी अर्पावें ॥ १ ॥ देव विसरला देवपणासी । तें देवपण भेटे देवासी । ऐशिया दाखवावें आदर्शासी । तेणें देवदेवासी उल्हासु ॥ २ ॥ पर्वाविशेषीं जयंतीसी । मेळवूनि संतविष्णवांसी । करावें गीतनृत्यकीर्तनासी । अतिप्रेमेंसीं अहोरात्र ॥ ३ ॥ आगमोक्त दीक्षा हवन । करितां तत्काळ देव प्रसन्न । त्या होमाचें विधिविधान । ऐक सावधान उद्धवा ॥ ४ ॥ विधिना विहिते कुण्डे मेखलागर्तवेदिभिः । अग्निमाधाय परितः समूहेत्पाणिनोदितम् ॥ ३६ ॥ परिस्तीर्याथ पर्युक्षेदन्वाधाय यथाविधि । प्रोक्षण्याऽऽसाद्य द्रव्याणि प्रोक्ष्याग्नौ भावयेत माम् ॥ ३७ ॥ आगमोक्त कुंडविधान । लांबी रुंदी खोली कोण । गणूनि उंचीचें प्रमाण । कुंड संपूर्ण साधावें ॥ ५ ॥ स्वशाकह जें वेदप्रोक्त । मेखळायुक्त साधावी गर्त । योनीसकट वेदी तेथ । लक्षणोक्त साधावी ॥ ६ ॥ तेथ करूनि अग्न्याधान । प्रतिष्ठिला जो हुताशन ॥ त्यासी करूनि करस्पर्शन । परिसमूह करावें ॥ ७ ॥ दर्भी करावें परिस्तरण । मग करावें पर्युक्षण । इध्माबर्हिविसर्जन । त्रिसंधान ठेवावें ॥ ८ ॥ करूनि बर्हीचें आस्तरण । करावें आज्यस्थालीस्थापन । व्याहृतीं समिधाहोम जाण । ‘अन्वाधान’ त्या नांव ॥ ९ ॥ प्रोक्षणीपात्रींचें विधान । करूनि भरावें जळ पूर्ण । तेणें कुशाग्रजळें आपण । होमद्रव्यें जाण प्रोक्षावीं ॥ १० ॥ कुंडीं प्रदीप्त हुताशन । तेथ करावें माझें ध्यान । तें ध्यानमूर्तीचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ११ ॥ तप्तजाम्बूनदप्रख्यं शड्खचक्रगदाम्बुजैः । लसच्चतुर्भुजं शान्तं पद्मकिञ्जल्कवाससम् ॥ ३८ ॥ स्फुरत्किरीटकटककटिसूत्रवराङ्गदम् । श्रीवत्सवक्षसं भ्राजत्कौस्तुभं वनमालिनम् ॥ ३९ ॥ जैसा तप्तस्वर्णभा । तैशी मूर्तीची अंगप्रभा । चतुर्भुज साजिरी भोभा । चिन्मात्रगाभा मूर्तिप्रभा प्रबळ् प्रकाशे ॥ १२ ॥ शंखचक्रगदाकमळ । कांसे पीतांबर सोज्ज्वळ । लोपूनि अग्निप्रभाज्वाळ । मूर्तिप्रभा प्रबळ प्रकाशे ॥ १३ ॥ मुकुटकुंडले मेखळा । श्रीवत्स शोभे वक्षस्थळा । आपाद रुळे वनमाळा । झळके गळां कौस्तुभ ॥ १४ ॥ ध्यायन्नभ्यर्च्य दारूणि हविषाभिघृतानि च । प्रास्याज्यभागावाघारौ दत्त्वा चाज्यप्लुतं हविः ॥ ४० ॥ ऐसें साङ्ग माझें ध्यान । अग्नीमाजीं भावूनि जाण । करूनि आवाहन पूजन । विध्युक्त हवन मांडावें ॥ १५ ॥ अग्नि विधियुक्त आव्हानूनी । समिधा होमघृतें अभिघारूनि । आज्यभाग दों अवदानीं । प्रथमहवनीं होमावा ॥ १६ ॥ तेथ तिलाज्य हविर्द्रव्य पूर्ण । घृतप्लुत अवदान । आगमोक्त होमविधान । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ १७॥ जुहुयान्मूलमन्त्रेण षोडशर्चावदानतः । धर्मादिभ्यो यथान्यायं मन्त्रैः स्विष्टकृतं बुधः ॥ ४१ ॥ लक्षूनि मुखबोध देवाचा । मूलमंत्रें होम साधकांचा । कां पुरुषसूक्त सोळा ऋचा । हा होमाचा विधिमार्ग ॥ १८ ॥ धर्मादिक पीठार्चन । इतर देवता आवरण । त्यांसीही एकएक अवदान । नाममंत्रें जाण होमावें ॥ १९ ॥ मग स्विष्टकृताचें अवदान । साधकें द्यावें सविधान । ऐसें हें माझें निजभजन । भक्त सज्ञान जाणती ॥ २० ॥ होमादि मूर्तिभजनविधि । येणें तत्काळ साधकां सिद्धी । भक्त पावती निजपदीं । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥ २१ ॥ अभ्यर्च्याथ नमस्कृत्य पार्षदेभ्यो बलिं हरेत् । मूलमन्त्रं जपेद्ब्रह्म स्मरन्नारायणात्मकम् ॥ ४२ ॥ यापरी होम विधियुक्त अर्चन । करूनि करावें सष्टांग नमन । मग देवाचे जे पार्षदगण । त्यांसी बळिहरण कल्पावें ॥ २२ ॥ मग बाह्यप्रतिमापूजास्थान । तेथें येवोनियां आपण । मूलमंत्राचें स्मरण । ध्यानयुक्त जाण करावें ॥ २३ ॥ पूज्य-पूजक अभिन्न । परात्पर जो कां नारायण । ते परब्रह्मीं लावूनी मन । घालावें आसन सावधानवृत्तीं ॥ २४ ॥ ध्यानीं जंव स्थिरावे मन । तंव स्थिर राखावें आसन । तेथूनि उपरमल्या मन । पुढें पूजाविधान हरि सांगे ॥ २५ ॥ दत्वाऽऽचमनमुच्छेषं विष्वक्सेनाय कल्पयेत् । मुखवासं सुरभिमत्ताम्भूलाद्यमथार्हयेत् ॥ ४३॥ एवं विसर्जिलिया ध्यान । झालें देवाचें भोजन । ऐसें भावूनि आपण । शुद्धाचमन अर्पावें ॥ २६ ॥ अग्नीमाजील मूर्तिध्यान । प्रतिमा पूजिली जे आपण । दोहीं शुद्धाचमन । यथोक्त जाण करावें ॥ २७ ॥ देवाचिया भुक्तशेषासे । भाग द्यावा विष्वक्सेनासी । मग काढूनि उच्छिष्टासी । द्यावें देवासी करोद्वर्तन ॥ २८ ॥ कापुरें घोळिवा सुपारीफोडी । सुवर्णवर्णा पानांची विडी । काथ सुवासिला परवडीं । अभिनव गोडी तांबूला ॥ २९ ॥ एळा लवंगा कंकोळ । अल्प अर्पिलें जाटीफळ । सुरंग रंगलें तांबूल । दिसे मुखकमळ साजिरें ॥ ३३० ॥ चोवा कस्तूरी बुका सधर । अर्पूनि पुष्पांजळीसंभार । जेणें शीघ्र संतोषे श्रीधर । तें प्रेम साचार हरि सांगे ॥ ३१ ॥ उपगायन्गृणन्नृत्यन् कर्माण्याभिनयन्मम । मत्कथाः श्रावायञ्छृण्वन् मुहूर्तं क्षणिको भवेत् ॥ ४४ ॥ ज्ञान ध्यान उपासकत । हे गौण जाण सर्वथा । देव भावाचा भोक्ता । भावें तत्त्वतां देव भेटे ॥ ३२ ॥ ध्यानीं तुटलिया निजमन । करावें माझें नामस्मरण । कां माझ्या गुणांचें श्रवण । आदरें जाण करावें ॥ ३३ ॥ करितां हरिगुणयशश्रवन । तेणें सुखावे अंतःकरण । सुखें सुखावोनि आपण । स्वयें हरिकीर्तन करावें ॥ ३४ ॥ निर्लज्ज नटाचे परी । हरिरंगणीं नृत्य करी । हावभावकटाक्षकुसरी । अभिनयो धरी कर्माचा ॥ ३५ ॥ गोवर्धनउद्धरण । अंगें दावावें आपण । कां मांडूनियां दृढ ठाण । त्र्यंबकभंजन दावावें ॥ ३६ ॥ पूतनाप्राणशोषण । कुवल्याचें निर्दळण । दावूनि मल्लमर्दन । हरिकीर्तन करावें ॥ ३७ ॥ नवल प्रेमाचा उद्धोध गद्यपद्यनामप्रबंध । भुजंगप्रयातादि अगाध । गाती स्वानंद स्तुतिस्तोत्रें ॥ ३८ ॥ स्तवैरुच्चावचैः स्तोत्रैः पौराणैः प्राकृतैरपि । स्तुत्वा प्रसीद भगवन्निति वन्देत दण्डवत् ॥ ४५ ॥ माझीं स्तुतिस्तोत्रें पुराण । सादरें करावीं श्रवण । श्रोता मिळालिया आपण । कथानिरूपण सांगावें ॥ ३९ ॥ शुद्ध न ये स्तोत्रपठण । करितां अबद्ध गायन । पाठका दोष न लगे जाण । तेणें होय निर्दळण महादोषां ॥ ३४० ॥ वेदींचें उपनिषत्पठण । कां ऋचामंत्रें हरीचें स्तवन । ये लौकिकीं उच्चावचें जाण । देवासी समान निजभावें ॥ ४१ ॥ पुराणींचें श्रेष्ठ स्तोत्र । अथवा पढतां नाममात्र । अर्थें भावार्थें साचार । समान श्रीधर मी मानीं ॥ ४२ ॥ नेणें वेद शास्त्र पुराण । केवळ भाळाभोळा जाण । तेणें करितां प्राकृत स्तवन । मी जनार्दन संतोषें ॥ ४३ ॥ वेदीं चुकल्या स्वरवर्ण । पाठका दोष बाधी गहन । प्राकृत करितां हरीचें स्तवन । दोषनिर्दळण तेणें होय ॥ ४४ ॥ शास्त्रश्रवण पुराणस्थिती । पाहिजे पंचमीसप्तमीव्युत्पत्ती । प्राकृत अबद्धही नामकीर्ती । भगवत्प्राप्तिप्रापक ॥ ४५ ॥ संस्कृत वाणी देवें केली । प्राकृत चोरापासून झाली । असोत या पक्षाभिमानी बोली । देवाची चाली निरभिमान ॥ ४६ ॥ वेदशास्त्र हो पुराण । कां प्राकृतभाषास्तवन । एथें भावचि श्रेष्ठ जाण । तेणें नारायण संतोषे ॥ ४७ ॥ देवासी प्रेमाचें पढियें कोड । न पाहे व्युत्पत्तीचें काबाड । भाविकांचा भावर्थचि गोड । तेणें भक्तांची भीड नुल्लंघी देवो ॥ ४८ ॥ एवं भावार्थें करितां स्तवन । देव होय भक्ताअधीन । तेणें भावार्थें करूनि नमन । हरिचरण वंदावे ॥ ४९ ॥ मुहूर्त निमेष क्षणेंक्षण । हरिचरणीं सुखावल्या मन । इतर व्यापार तेणें सुखें जाण । सहजें आपण वोसरती ॥ ३५० ॥ जेणें तुटें माझें अनुसंधान । तें कर्म त्यागावें आपण । जेणें स्वरूपनिष्ठ होय मन । तें समाधान राखावें ॥ ५१ ॥ सप्रेम करितां नमन । नित्य नूतन समाधान । त्या नमनाचें लक्षण । लोटांगण दंडवत ॥ ५२ ॥ सुटल्या दंड सत्राणें । संमुख विमुख पाहों नेणे । तैशीं घालीं लोटांगणें । देहाभिमानें अहेतुक ॥ ५३ ॥ असतां देहाचें अनुसंधान । जो परमार्थे करी नमन । त्या नमस्काराचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥ ५४ ॥ शिरो मत्पादयोः कृत्वा बाहुभ्यां च परस्परम् । प्रपन्नं पाहि मामीश भीतं मृत्युग्रहर्णवात् ॥ ४६ ॥ मस्तक माझ्या चरणांवरी । उभय बाहु परस्परीं । दोनी चरण दोंही करीं । धरी निर्धारीं भावार्थें ॥ ५५ ॥ संसारसागराच्या पोटीं । मृत्युग्रहें घातली मिठी । चरणीं लागलों उठाउठीं । मज जगजेठी सोडवीं ॥ ५६ ॥ भवभयें भ्यालों दारुण । यालागीं तुज आलों शरण । निवारी माझें जन्ममरण । भावें श्रीचरण दृढ धरिले ॥ ५७ ॥ तूं स्वामे असतां शिरीं । मज मृत्यु बापुडें केवीं मारी । भावें लोटांगण चरणांवरी । कृपा उद्धरीं कृपाळुवा ॥ ५८ ॥ देखोनि साष्टांग नमन । ऐकोनि भयभीतस्तवन । मज तुष्टला नारायण । ऐसें आपण भावावें ॥ ५९ ॥ इति शेषां मया दत्तां शिरस्याधाय सादरम् । उद्वासयेच्चेदुद्वास्यं ज्योतिर्ज्योतिषि तत्पुनः ॥ ४७ ॥ म्यां दीधला शेषप्रसाद । तो शिरीं धरोनि स्वानंद । स्थावरमूर्ति जेथ प्रसिद्ध । तेथ उद्वाससंबंध न करावा ॥ ३६० ॥ जंगम जे प्रतिमामूर्ती । तेथ आवाहिली निजत्मज्योती । ते उद्वासुनियां मागुती । निजात्मस्थितीं ठेवावी ॥ ६१ ॥ मूर्तीमाझारील ज्योति । आणोनियां हृदयस्थितीं । मग निजात्मज्योतीसी ज्योती । यथास्थितीं मेळवावी ॥ ६२ ॥ विसर्जनान्त पूजास्थिती । ऐकोनि उद्धवाचे चित्तीं । साधकां पूज्य कोण मूर्ती । देव ते अर्थीं स्वयें सांगे ॥ ६३ ॥ अर्चादिषु यदा यत्र श्रद्धा मां तत्र चार्चयेत् । सर्वभूतेष्वात्मनि च सर्वात्माहमवस्थितः ॥ ४८ ॥ उद्धवा जे मूर्ति ज्या पढियंती । तोचि त्यासी पूज्य मूर्ती । तुवांही अणुमात्र चित्तीं । संदेह ये अर्थीं न धरावा ॥ ६४ ॥ विष्णु विरिचि सविता जाण । शिव शक्ति कां गजवदन । या मूर्तीमाजीं मी आपण । सर्वीं समान सर्वात्मा ॥ ६५ ॥ सर्व प्रतिमांचें पूजन । करितां मज पूजा समान । भक्तांची जेथ प्रीति गहन । तिये अधीन मी परमात्मा ॥ ६६ ॥ जेवीं बाळकाचेनि मेळें । माता तदनुकूल खेळे । तेवीं भक्तप्रेमाचिये लीळें । म्यां चित्कल्लोळें क्रीडिजे ॥ ६७ ॥ या सर्व भूतांच्या ठायीं । आणि आतारादि लीलादेहीं । मी सर्वांसी समान पाहीं । ये अर्थीं नाहीं संदेहो ॥ ६८ ॥ उद्धवा मी नाहीं ऐसें । कोणीही ठिकाण रितें नसे । परी प्राण्यांचें भाग्य कैसें । त्या मज विश्वासें न भजती ॥ ६९ ॥ जो जेथ मज भजों बैसे । त्या मी तेथ तैसाचि असें । हें उपासनाकांडविशेषें । गुप्त अनायासें प्रकाशिलें ॥ ३७० ॥ उपासनाकांडींचा निर्वाहो । मी सर्वांभूतीं देवाधिदेवो । हा ज्यासी न कळे मुख्य भावो । त्यासी मूर्तिनिवाहो द्योतिला ॥ ७१ ॥ हो कां माझी प्रतिमामूर्ती । तेही मी चिदात्मा निश्चितीं । तेथ करितां भावे भक्ती । भक्त उद्धरती उद्धवा ॥ ७२ ॥ एवं क्रियायोगपथैः पुमान्वैदिकतन्त्रिकैः । अर्चन्नुभयतः सिद्धिं मत्तो विन्दत्यभीप्सिताम् ॥ ४९ ॥ एवं क्रियायोगलक्षण । वैदिक तांत्रिक मिश्र जाण । आगमनिगम विस्तार गहन । तो मुख्यार्थ पूर्ण सांगितला ॥ ७३ ॥ येणें क्रियायोग भजनमार्गें । भक्त जैं भोगमोक्ष मागे । तैं उभय सिद्धी लागवेगें । म्यां श्रीरंगें अर्पिजे ॥ ७४ ॥ भक्त निष्काम अनन्यभक्ती । तैं भोग मोक्षादि संपत्ती । घेऊनियां मी श्रीपती । त्यांच्या द्वाराप्रती सदा तिष्ठें ॥ ७५ ॥ मदर्चां सम्प्रतिष्ठाप्य मन्दिरं कारयेद्दृढम् । पुष्पोद्यानानि रम्यणि पूजायात्रोत्सवाश्रितान् ॥ ५० ॥ साङ्ग माझी प्रतिमामूर्ती । करूनि जे प्रतिष्ठा करिती । दृढ देवालय उभारिती । अतिप्रीतीं मद्भावें ॥ ७६ ॥ वन उपवन उद्यान । पुष्पवाटिका लावाव्य पूर्ण । नित्यपूजेचें विधान । उत्साहीं जाण महापूजा ॥ ७७ ॥ यात्रा बहुजनसमाजा । वार्षिक पर्व महापूजा । चालवावया अधोक्षजा । उपाय सहजा हरि सांगे ॥ ७८ ॥ पूजादीनां प्रवाहार्थं महापर्वस्वथान्वहम् । क्षेत्रापणपुरग्रामान् दत्त्वा मत्सार्ष्टितामियात् ॥ ५१ ॥ नित्यपूजा महापूजा । वार्षिक पर्वें चालवाव्य वोजा । नित्यनिर्वाह करी राजा । ग्रामसमाजा अर्पूनि ॥ ७९ ॥ ‘क्षेत्र’ म्हणिजे शेत गहन । हाटउत्पन्न द्रव्य ‘आपण’ । हाटेंविण तो ‘ग्राम’ जाण । ऐक लक्षण पुराचें ॥ ३८० ॥ हाटयुक्त तें ‘पुर’ पाहीं । जे अर्पिती देवालयीं । ते माझें ऐश्वर्य पाहीं । सर्वां ठायीं पावती ॥ ८१ ॥ मूर्तिप्रतिष्ठा पूजाविधान । देवालयीं केलिया जाण । कर्त्यासी फळ कोण कोण । तेंही श्रीकृष्ण सांगत ॥ ८२ ॥ प्रतिष्ठया सार्वभौमं सद्मना भुवनत्रयम् । पूजाचिना ब्रह्मलोकं त्रिभिर्मत्साम्यतामियात् ॥ ५२ ॥ जो मूर्तिप्रतिष्ठा करूनि ठाये । तो सार्वभौम राज्य लाहे । जो देवालय करी स्वयें । तो स्वामी होये तिहीं लोकीं ॥ ८३ ॥ जो करी पूजाविधान । तो पावे ब्रह्मसदन । ये तीनी जो करी आपण । तो मजसमान ऐश्वर्य पावे ॥ ८४ ॥ ऐसे हे तिघे साधक । पोटींहूनि सकामुक । कामनेसारखे लोक । ते आवश्यक पावती ॥ ८५ ॥ ज्यासी माझें निष्काम भजन । त्याचे प्राप्तीचें निजलक्षण । तें अत्यादरें श्रीकृष्ण । स्वानंदें पूर्ण सांगत ॥ ८६ ॥ मामेव नैरपेक्ष्येण भक्तियोगेन विन्दति । भक्तियोगं स लभते एवं यः पूजयेत माम् ॥ ५३ ॥ मज मुख्यत्वें जीवीं धरून । ज्यासी माझें निष्काम भजन । निष्कामता जे अनन्य । ते पुरुष जाण मी होती ॥ ८७ ॥ तो वर्तमानदेहीं असतां । माझें निजरूप होय तत्त्वतां । त्या आम्हां आंतौता । भेद सर्वथा असेना ॥ ८८ ॥ करितां निष्काम भजन । भक्त झाला मजसमान । ‘समान’ म्हणावया जाण । वेगळेपण असेना ॥ ८९ ॥ एवं भक्त तो मजभीतरीं । मी भक्ताआंतबाहेरी । ऐसे मिळाले परस्परीं । निजभक्तजनावरी नांदत ॥ ३९० ॥ गूळ जेवीं गोडियेसी । कां कल्लोळ जैसा सागरासी । ऐशिया निजभक्तीपाशीं । आम्हां तयांसी रहिवासु ॥ ९१ ॥ ऐशी निष्काम जो भक्ति करी । तो धन्य धन्य चराचरीं । जो देवाद्विजांची वृत्ति हरी । तो पचे अघोरीं तें ऐक ॥ ९२ ॥ यः स्वदत्तां परैर्दत्तां हरेत सुरविप्रयोः । वृत्तिं स जायते विड्भुग्वर्षाणामयुतायुतम् ॥ ५४ ॥ कर्तुश्च सारथेर्हेतोः अनुमोदितुरेव च । कर्मणां भागिनः प्रेत्य भूयो भूयसि तत्फलम् ॥ ५५ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे श्रीकृष्णोद्धवसंवादे सप्तविंशोऽध्यायः ॥ २७ ॥ जो देवालयाची वृत्ति हरी । जो ब्राह्मणवृत्तीचा लोप करी । तो अयुतायुतवर्शसहस्त्रीं । योनी सूकरी विष्ठा भोगी ॥ ९३ ॥ जो द्विजदेवांची वृत्ति हरी । त्यासी जो होय सहाकारी । कां जो अनुमोदन करी । ते तिघे अघोरीं पचिजेती ॥ ९४ ॥ ते जन्ममरणांच्या आवर्तीं । तेंचि फळ पुढतपुढतीं । मरमरोनि गा भोगिती । जाण निश्चितीं उद्धवा ॥ ९५ ॥ माझे प्राप्तीची चाड चित्ता । तरी नातळावी अधर्मता । अधर्मवंताची कथा । स्वभावें सर्वथा न करावी ॥ ९६ ॥ न देखावें दोषदर्शन । न बोलावें मर्मस्पर्शन । भूतमात्रांचा द्वेष जाण । सर्वथा आपण न करावा ॥ ९७ ॥ नयकावी परनिंदा । न बोलावें परापवादा । अधर्माचिया संवादा । कोणासी कदा न मिळावें ॥ ९८ ॥ त्रिलोकींचें पाप असकें । ज्यास घेणें असेल आवश्यकें । तैं साधुनिंदा निजमुखें । यथासुखें करावी ॥ ९९ ॥ सकळ दुःखांचिया राशी । अवश्य याव्या मजपाशीं । ऐसी आवडी ज्याचे मानसीं । तेणें ब्रह्मद्वेषासी करावें ॥ ४०० ॥ सकळ काळ वृथा जावा । ऐसें आवडे ज्याचे जीवा । तेणें सारिपटादि आघवा । खेळ मांडावा अहर्निशीं ॥ १ ॥ मी हृदयस्थ आत्माराम । स्वतःसिद्ध परब्रह्म । तो मी व्हावया दुर्गम । अधर्म कर्म जगासी ॥ २ ॥ तें निर्दाळावया कर्माकर्म । वर्म आहे गा अतिसुगम । अखंड स्मरावें रामनाम । पुरुषोत्तम अच्युत ॥ ३ ॥ जेथें हरिनामाचा गजर । तेथ कर्माकर्मांचे संभार । जाळूनि नुरवीं भस्मसार । ऐसें नाम पवित्र हरीचें ॥ ४ ॥ नाम निर्दळी पाप समस्त । हें सकळशस्स्त्रसंमत । जो विकल्प मानी एथ । तो जाण निश्चित वज्रपापी ॥ ५ ॥ वज्रपापाचे पर्वत । निर्दळी श्रीमहाभागवत । तें जनार्दनकृपा एथ । झालें प्राप्त अनायासें ॥ ६ ॥ ते भागवतींचा पाहतां अर्थ । हरीचें नाम अतिसमर्थ । वर्णिलेंसे परमाद्भुत । स्वमुखें अच्युत बोलिला ॥ ७ ॥ एथही जो विकल्प धरी । तो अतिअभाग्य संसारीं । महादुःखदोषसागरीं । विकल्पेंकरीं बुडाला ॥ ८ ॥ संकल्पविकल्पेंकरीं जाण । जनांसी झालें दृढ बंधन । त्या भवबंधाचें छेदन । जनार्दन निजनाम ॥ ९ ॥ जनार्दनाचें निजनाम । निर्दळी भवभय परम । तें नाम स्मरे जो सप्रेम । तो पुरुषोत्तम स्वयें होय ॥ ४१० ॥ स्वयें होणें ब्रह्म पूर्ण । ये अर्थींचें गोड निरूपण । अठ्ठाविसावे अध्यायीं जाण । उद्धवा श्रीकृष्ण सांगेल ॥ ११ ॥ ते कथा जैं श्रवणीं पडे । तैं जीवीं स्वयंभ सुख वाढे । मग आंतबाहेर दोंहीकडे । करी वाडेंकोडें समसाम्य ॥ १२ ॥ जे कथेचें गोडपण । जीव गेल्या न सोडी जाण । ऐसें रसाळ निरूपण । उद्धवासी श्रीकृष्ण सांगेल ॥ १३ ॥ श्रवणें उपजे ब्रह्मभावो । तो हा अठ्ठाविसावा अध्यावो । उद्धवासी देवाधिदेवो । निजकृपें पहा हो सांगेल ॥ १४ ॥ अक्षरें भरोनि अक्षरासीं । देव सांगेल उद्धवासी । तें निरूपण अठ्ठाविसाव्यासी । ब्रह्मसुखेंसीं लगडेल ॥ १५ ॥ ब्रह्मसुखाची सांठवण । तो हा अठ्ठाविसावा जाण । ते उघडूनियां उणखूण । उद्धवासी श्रीकृष्ण सांगेल ॥ १६ ॥ तें कृष्णउधवनिजज्ञान । एका विनवी जनार्दन । तुमचे कृपेंकरूनि पूर्ण । श्रोतां अवधान मज द्यावें ॥ १७ ॥ श्रोतां दीधल्या अवधान । ग्रंथीं उल्हासे निरूपण । एका जनार्दन शरण । शिरीं श्रीचरण वंदिले ॥ ४१८ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे, एकाकारटीकायां सप्तविंशोऽध्यायः ॥ २७ ॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक ५५ ॥ ओंव्या ४१८ ॥
खाली दिलेल्या बँक खात्यात आपण दान करू शकता
संपर्क माहिती :
शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन,
द्वारा, श्री वेणीमाधव गोसावी,
श्रीनाथ गल्ली, श्रीक्षेत्र पैठण, जिल्हा छत्रपती
संभाजीनगर
पिन. ४३१००६
मोबाईल क्रमांक : +९१ - ९४२१४१११३५
ईमेल : info@santeknath.org