श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ जय सद्गुरु अनादी । जय जय सद्गुरु सर्वादी । जय जय सद्गुरु सर्वासिद्धी । जय जय कृपानिधि कृपाळुवा ॥ १ ॥ जय जय वेदवाचका । जय जय वेदप्रकाशक । जय जय वेदप्रतिपालका । जय जय वेदात्मका वेदजा ॥ २ ॥ जय जय विश्वप्रकाशका । जय जय विश्वप्रतिपाळका । जय जय विश्वनिवासका । अकर्तात्मका अव्यया ॥ ३ ॥ तुझी अव्यय अक्षर स्थिती । नाहीं नाम रूप व्यक्ती । तो तूं नांदसी जातिगोतीं । लोकस्थितीव्यवहारें ॥ ४ ॥ तुज जगीं नाही दुसरें । तो तूं गृहस्थ घरदारें । तूं पुरुष ना नपुंसक साचोकारें । कीं स्त्रीपुत्रें नांदसी ॥ ५ ॥ अज आणि वंदिसी पिता । अजन्मा तो नमिसी माता । जगीं तुझी सर्वसमता । शेखीं अतिमित्रता चाळिसी ॥ ६ ॥ तूं जगन्नाथ जगचाळक । कीं एकाचा होसी सेवक । तूं परिपूर्ण पूर्णात्मक । कीं मागसी भीकं रंकत्वें ॥ ७ ॥ तूं नैष्ठिक ब्रह्मचारी । कीं व्यभिचारें तारिसी नारी । तूं सर्वज्ञ कीं गुरूच्या द्वारीं । तृणकाष्टें शिरीं वाहसी स्वयें ॥ ८ ॥ जो तूं कळिकाळतें ग्रासिसी । तो तूं बागुलाभेणें लपसी । तूं मायानियंता हृषीकेशी । शेखीं माया बांधिजशी उखळीं ॥ ९ ॥ तूं आत्माराम नित्यतृप्त । शेखीं गोवळांचा खाशी भात । तुझा ब्रह्मदिकां न कळे अंत । तो तूं उभा रडत यशोदेपाशीं ॥ १० ॥ त्रैलोक्य दाविसी उदरीं । तो तूं गोपिकांचे कडियेवरी । तूं जगाचा चाळक श्रीहरी । त्या तुज लेंकुरी शिकवेजे चालूं ॥ ११ ॥ जो तूं सर्ववंद्य सर्वेश्वर । तो तूं होसी पांढरा डुकर । एवं करितां तुझा निर्धार । वेदांसी विचार कळेना ॥ १२ ॥ वेदीं घेतलें महामौन । ज्ञाते झाले नेणकोण । योगी वळंघले रान । तुझें महिमान कळेना ॥ १३ ॥ मुख्यत्वें जन्म नाहीं जाण । तो कृष्ण कैसें दावी मरण । तें ऐकावया निरूपण । परीक्षिती पूर्ण श्रद्धाळू ॥ १४ ॥ प्रथमाध्यायीं वैराग्यार्थ । मुसळ बोलिलें शापयुक्त । तेंचि ग्रंथावसानीं एथ । असे पुसत परीक्षिती ॥ १५ ॥ राजोवाच - ततो महाभागवत उद्धवे निर्गते वनम् । द्वारवत्यां किमकरोद्धगवान् भूतभावनः ॥ १ ॥ जो पांडवकुळीं कुळरत्न । कीं कौरवकुळीं कुळभूषण । जो धर्माचें निजरक्षण । कलीचें निग्रहण जेणें केलें ॥ १६ ॥ ऐसा राजा परीक्षीती । धैर्यवीर्यउदारकीर्ति । तेणें स्वमुखें श्रीशुकाप्रती । केली विनंती अतिश्रद्धा ॥ १७ ॥ उद्धव पावोनि पूर्ण ज्ञान । तो बदरिकश्रमा गेलिया जाण । मार्गे द्वारकेसी श्रीकृष्ण । काय आपण करिता झाला ॥ १८ ॥ उत्पत्तिस्तितिनिदान । जोइच्छामात्रें करी जाण । तो स्वदेहाचें विसर्जन । कैसेनि श्रीकृष्ण करिता झाला ॥ १९ ॥ ब्रह्मशापोपसंसॄष्टे स्वकुले यादवर्षभः । प्रेयसीं सर्वनेत्राणां तनुं स कथमत्यजत् ॥ २ ॥ ब्रह्मशापें श्रीकृष्णनाथ । निःशेष निजकुळासी घात । कैसेनि करविला एथ । हें सुनिश्चित सांगावें ॥ २० ॥ जननयना आल्हादकर। कृष्णतनु अतिसुंदर । जीसी देखतांचि त्रिनेत्र । हर्षें निर्भर स्वानंदें ॥ २१ ॥ ऐशी आल्हादकारक तनु । कैसेनि सांडी श्रीकृष्णु । ब्रह्मशापासी भिऊन । तो का निजतनु सांडिता झाला ॥ २२ ॥ कृष्ण परब्रह्म परिपूर्ण । त्यासी बाधीना शापबंधन । तोही सत्य करी ब्रह्मवचन । यादववंशीं तनु सांडूनि ॥ २३ ॥ दॄष्टीं देखतां श्रीकृष्ण । सुखें सुखावे जीवप्राण । त्याच्या सौंदर्याचें निरूपण । राजा आपण सांगत ॥ २४ ॥ प्रत्याक्रष्टुं नयनमबला यत्रलग्नं न शेकुः दृष्टा न सरति ततो यत्सतामात्मलग्नम् । यच्छ्रीर्वाचां जनयति रति किं नु मानं कवीना दृष्टा निष्णॊर्युधि रथगतं यच्च तत्साम्यमीयुः ॥ ३ ॥ ज्याची अकराही इंद्रियां सदा गोडी । भोगिजे तंव तंव प्रीती गाढी । कदा वीट नुपजे अनावडी । अवीट गोडी कृष्णाची ॥ २५ ॥ बाळा पौढा मुग्धा प्रगल्भा व्यक्ती । ऐशी चतुर्विधा स्त्रियांची जातीं । तिंहीं देखिल्या श्रीकृष्णमूर्ती । दृष्टी मागुती परतेना ॥ २६ ॥ ज्या धार्मिका धैर्यवृत्ती । ज्या पतिव्रता महासती । तिंहीं देखिल्या कृष्णमूर्ती । दृष्टि मागुती परतेना ॥ २७ ॥ ज्या का अबळा अभुक्तकामा । ज्या अतिवृद्धा अतिनिष्कामा । तिंहीं देखिल्या मेघश्यामा । नयन सकामा हरिरूपीं ॥ २८ ॥ जेवीं लवणजळा भेटी । तेवीं श्रीकृष्णीं स्त्रियांची दिठी । मिसळलिया उठाउठी । पुरतोनि मिठी सुटेना ॥ २९ ॥ एवं देखिलिया श्रीकृष्णमूर्ती । स्त्रियांचिया निजात्मशक्ती । दृष्टीं परतेना मागुती । ऐशी नयनां प्रीती हरिरूपीं ॥ ३० ॥ स्त्रिया बापुड्या त्य किती । जे का संत विरक्त परमार्थी । त्यांचे श्रवणीं पडतां कीर्ती । चित्तीं श्रीकृष्णमूर्ती ठसावे ॥ ३१ ॥ चित्तीं ठसावोनि श्रीकृष्णमूर्ती । चित्तचि आणी कृष्णस्थितीं । ऐशी कृष्णाची कृष्णकीर्ती । चित्तवृत्ती आकर्षी ॥ ३२ ॥ संतांची आकर्षी चित्तवृत्ती । हें नवल नव्हे कृष्णकीर्ती । कीर्ती ऐकतां असंतीं । तेही होती तद्रूप ॥ ३३ ॥ लागतां चंदनाचा पवन । खैर धामोडे होती चंदन । तेवीं कृष्णकीर्तीश्रवण । दे समाधान समसाम्यें ॥ ३४ ॥ भावें ऐकतां श्रीकृष्णकीर्ती । असंतही संतत्वा येती । मग संतासंअ दोनी स्थिती । हारपती समसाम्यें ॥ ३५ ॥ महाकवि वर्णीतां श्रीकृष्णकीर्ती । पावले परम सौभाग्यस्थिती । ते कृष्णकीर्ती जे वर्णिती । तेही पावती ते शोभा ॥ ३६ ॥ कवीश्वरां नवरसिकु । नवरंगडा श्रीकृष्ण एकु । जो जो वर्णिजे रसविशेखु । तो तो यदुनायकु स्वयें होय ॥ ३७ ॥ महाकवि आदिकरूनी । कवीश्वरांची कीर्तिजननी । जे विनटले हरिकीर्तनीं । वंद्य वाणी तयांची ॥ ३८ ॥ श्रीकृष्णकीर्तिपवाडे । ज्याची वाणी अबद्धही पढे । ते वाचा वंदिजे चंद्रचूडें । त्याच्या पायां पडे यमकाळ ॥ ३९ ॥ जेथें श्रीकृष्णकीर्तिकीर्तन । तेथें कर्माकर्मांची उजवण । होय संसाराची बोळवण । जन्ममरणसमवेत ॥ ४० ॥ यापरी कीर्तीचें महिमान । सर्वार्थीं अगाध जाण । श्रीकृष्णकीर्तिकविता । जाण परम पावन तिंही लोकीं ॥ ४१ ॥ कवीश्वरांची श्रीकृष्णकीर्ति । ऐकतां वाढे श्रद्धा प्रीती । तेणें थोरावे कॄष्णभक्ती । हें कविताशक्ती अगाध ॥ ४२ ॥ ऐशी अगाध श्रीकृष्णकीर्ती । मा त्या कृष्णाची कृष्णमूर्ती । जे अखंड ध्यनीं देखती । ते ते होती तद्रूप ॥ ४३ ॥ ज्यांसी अखंड ध्यानीं श्रीकृष्णमूर्ती । ते ते तद्रूप पावती । हें नवल नव्हे कृष्णस्थिती । जे द्वेषें देखती तेही मुक्त ॥ ४४ ॥ ज्याचे रथीं मेघश्याम । सारथी झाला पुरुषोत्तम । यालागीं पार्थाचा पराक्रम । मिरवी नाम विजयत्वें ॥ ४५ ॥ सदा जयशील संपूर्ण । यालागीं अर्जुना नाम ‘जिष्णु’ । ज्याचे युद्धींचा कठिण पणु । सिद्धी श्रीकृष्णु पाववी ॥ ४६ ॥ तो बैसोनि अर्जुनाचे रथीं । विचरतां युद्धक्षिती । जे जे देखती श्रीकृष्णमूर्ती । ते ते कृष्णस्थिती पावले ॥ ४७ ॥ जेथ कृष्णाचा पडे पदरेणु । तेथें चहूं मुक्तींसी होय सणु । ऐशी पावन कृष्णतनु । कैसेनि श्रीकृष्णु सांडिता झाला ॥ ४८ ॥ म्हणाल ब्रह्मशापाभेण । शरीर सांडी श्रीकृष्ण । हा बोलचि अप्रमाण । कृष्ण बर्ह्म पूर्ण परमात्मा ॥ ४९ ॥ हेळण छळण दुर्वचन । द्विजा न करावा अपमान । त्यांचा वाढवावया पूर्ण सन्मान । तनुत्यागें श्रीकृष्ण द्विजशाप पाळी ॥ ५० ॥ कृष्न परमात्मा परिपूर्ण । तेणेंही निजकुळ निर्दळून । सत्य करी ब्राह्मणवचन । विप्रशापें आपण निजतनु त्यागी ॥ ५१ ॥ तो तनुत्यागप्रकार । साङ्ग समूळ सविस्तर । सांगताहे शुक योगींद्र । परिसे नरेंद्र त्यक्तोदक ॥ ५२ ॥ पांडवकुळीं कुळदीपक । जन्मला परीक्षितीच एक । जो होऊनि त्यक्तोदक । भागवतपरिपाक सेवित ॥ ५३ ॥ ब्रह्मानारदव्यासपर्यंत । भागवत-उपदेश गुह्य गुप्त । तो परीक्षितीनें जगाआंत । केला प्रकटार्थ दीनोद्धार ॥ ५४ ॥ धर्मवंशीं अतिधार्मिक । जन्मला परीक्षितीच एक । भागवतरसीं अतिरसिक । अति नेटक श्रवणार्थी ॥ ५५ ॥ ऐसा जो कां परीक्षिती । तेणें अत्यादरें केली विनंती । शुक सुखावोनि चित्तीं । काय त्याप्रती बोलिला ॥ ५६ ॥ ऋषिरुवाच-दिवि भुव्यन्तरिक्षे च महोत्पातान् स्मुत्थितान् । दृष्टाऽऽसीनान् सुधर्मयां कृष्णः प्राह यदूनिधम् ॥ ४ ॥ शुक म्हणे परीक्षिती । उद्धव गेलिया वनाप्रती । मांगे विघ्नभूत द्वारवती । त्रिविध उत्पातीं हतिव्यास ॥ ५७ ॥ दिवि-भुवि-अंतरिक्षगत । उठिले ग महोत्पात । दिवस उल्कापात होत । भूतें खाखात अंतरिक्षीं ॥ ५८ ॥ गगनीं उगवले त्रिविध केतु । दंडकेतु धूमकेतु । शिखाकेतु अति अद्भुतु । दिवसाही दिसतु सर्वांसी ॥ ५९ ॥ धरा कांपोनि अतिगजरीं । भूस्फोट झाला नगरद्वारीं । भूकंप तीन दिवसवरी । घरोघरीं आंदोळ ॥ ६० ॥ वारा सुटला अति झडाडें । समूळ उन्मळतीं झाडें । द्वारकेमाजीं धुळी उडे । डोळा नुघडे जनांचा ॥ ६१ ॥ अंतरिक्षीं नग्न भूतें । धांवती खाखातें खिंखातें । रुधिरवृष्टि होय तेथें । अकस्मातें निरभ्रीं ॥ ६२ ॥ रविचंद्राचें मंडळ । खळें करीत सर्वकाळ । ग्रह भेदिती ग्रहमंडळ । क्रूरग्रहमेळ शत्रुसदनीं ॥ ६३ ॥ सन्मुख आकाशाचे पोटीं । दिग्दाह देखती दृष्टीं । अभ्रेंवीण कडाकडाटी । पडती वितंडी महाविजा ॥ ६४ ॥ घारी झडपिती सत्राणें । जेवितां पुढील नेती भाणें । दिवसा दिवाभीत घुंगाणे । राजद्वारीं श्वानें सैंघ रडती ॥ ६५ ॥ बैसल्या सुधर्मासभेप्रती । संकल्पविकल्पांची निवृत्ती । ते सभेसी वीर वोसणती । मारीं मारीं म्हणती परस्परें ॥ ६६ ॥ तें ऐकतांचि उत्तर । दचकती महाशूर । सुधर्मासभेसी चितातुर । यादववीर समस्त ॥ ६७ ॥ यादव बैसले सभेसी । छाया देखती वीणशिसीं । सुधर्मासभेपाशीं । अरिष्टें ऐशीं उठतीं ॥ ६८ ॥ ऐशीं अरिष्टें अनिवार । दुःखसूचकें दुस्तर । देखोनि यादव थोरथोर । विघ्नविचार विवंचिती ॥ ६९ ॥ द्वारकेचें विघ्ननिर्दळण । करूं ठेविलेंसे सुदर्शन । ते द्वारकेमाजीं महाविघ्न । काय कारण उठावया ॥ ७० ॥ जंव पातया पातें लवे । तंव चक्र एकवीस वेळा भंवे । ते द्वारकेसी विघ्न संभवे । देखोनि आघवे अतिचकित ॥ ७१ ॥ सर्व विघ्नांचें आकर्षण । करी या नांव म्हणिपे ‘कृष्ण’ । तो कृष्ण येथें असतां जाण । उत्पात दारुण कां उठती ॥ ७२ ॥ एवं विचाररूढ यादवांसी । चिंतातुर देखोनियां त्यांसी । बुद्धि सांगावया त्यांपाशीं । काय हृषीकेशी बोलत ॥ ७३ ॥ एते घोरा महोत्पाता द्वार्वंत्या यमकेतवः । मुहूर्तमपि न स्थेयमत्र नो यदुपुङ्गवाः ॥ ५ ॥ जो जगाचा सूत्रधारी । जो मायायंत्रींचा यंत्रकारी । तो यादवांप्रती श्रीहरी । आलोच करी विघ्नांचा ॥ ७४ ॥ यादवकुळासी आला प्रांत । हें जाणे श्रीकृष्णनाथ । यांचा द्वारकेसी होऊं नये घात । यालागीं समस्त प्रभासा धाडी ॥ ७५ ॥ द्वारवते सातवी पुरी । येथील मरण मोक्षोपकारी । यादव समस्त देवाधिकारी । यालागीं ते बाहेरी श्रीकृष्ण काढी ॥ ७६ ॥ कुळनाशाचें मूळ देखा । प्रभासीं निघालीसे एरिका । हाचि कृष्णाचाही आवांका । तो धाडी सकळिकां प्रभासासी ॥ ७७ ॥ यादवांसी ब्रह्मशाप । घडलासे घोररूप । यालागीं द्वारकेमाजीं संताप । उत्पातरूप उठती ॥ ७८ ॥ उत्पात उठले अनेक । हे अनिवार अरिष्टसूचक । अविलंबें तत्काळिक । परम दुःख पावाल ॥ ७९ ॥ यालागीं तुम्हीं आवश्यक । येथें न राहावें मुहूर्त एक । स्त्रिया पुत्र सुहृद लोक । तात्काळिक निघावें ॥ ८० ॥ म्हणाल यादववीर उद्भट । आम्हांसी काय करील अरिष्ट । येणें गर्वें अतिअनिष्ट । परम कष्ट पावाल ॥ ८१ ॥ ब्राह्माणाचे शापापुढें । कायसें शौर्य बापुडें । तुम्हीं न विचारितां मागेंपुढें । आतांचि रोकडें निघावे ॥ ८२ ॥ द्वारकेमाजीं आजि कोणी । सर्वथा पिऊं नये पाणी । स्त्रीपुत्रसुहृदजनीं । परिवारोनि निघावें ॥ ८३ ॥ कुळासी घडला ब्रह्मशाप । तेणें द्वारकेसी उठिला संताप । तें फेडावया कुळाचें पाप । क्षेत्र पुण्यरूप प्रभास ॥ ८४ ॥ स्त्रियो बालाश्च वृदश्च शङ्खोद्धारं ब्रजन्त्वितः । वयं प्रभासं यास्यामो यत्र प्रत्यक् सरस्वती ॥ ६ ॥ वस्तीसी अतिगूढ शंखोद्धार । तेथें ठेवावी स्त्रीवृद्धकुमार । आम्हीं समस्त यादववीर । निघावें सत्वर प्रभासेसी ॥ ८५ ॥ जेथें प्राची सरस्वती । मिळाली असे सागराप्रती । तेथें जाऊनि समस्तीं । करावें विध्युक्तीं तीर्थविधान ॥ ८६ ॥ तत्रभिषिच्य शुचय उपोष्य सुसमाहिताः । देवताः पूजयिष्यामः स्नपनालेपनार्हणैः ॥ ७ ॥ तेथें वेदोक्तविधान । करावें तीर्थीं तीर्थस्न्नान । तीर्थविध्युक्त उपोषण । करावें आपण निराहार ॥ ८७ ॥ तेथें सद्भावें शुचिर्भूत । राहोनियां समस्त । तीर्थदेवता विध्युक्त । निःशापार्थ पूजावी ॥ ८८ ॥ स्न्नान वस्त्रें अलंकार । चंदनादि पूजासंभार । समर्पूनि पूजा षोडशोपचार । श्रद्धा हरिहर पुजावे ॥ ८९ ॥ ब्राह्मणांस्तु महभागान् कृतस्वस्त्ययना वयम् । गोभूहिरण्यवासोभिर्गजाश्वरथवेश्मभिः ॥ ८ ॥ वेदवेदांगपारंगत । शमदमादितपयुक्त । ब्राह्मण जे स्वधर्मनिरत । विघ्नशांत्यर्थ पूजावे ॥ ९० ॥ व्हावया अरिष्टनिरसन । करिती शांत्यर्थ स्वस्तिवाचन । त्या ब्राह्मणांसी आपण । द्यावें दान श्रद्धायुक्त ॥ ९१ ॥ गोदान भूदान गजदान । अश्वदान सुवर्णदान । तिळदान वस्त्रदान । द्यावें गृहदान अतिश्रद्धा ॥ ९२ ॥ रथीं संजोगोनि अश्ववर । दान द्यावें रहंवर । द्विज सुखी होती अपार । तो तो प्रकार करावा ॥ ९३ ॥ जें जें ब्राह्मण अपिक्षित । तें तें द्यावें श्रद्धायुक्त । ब्राह्मण तुष्टमान जेथ । अरिष्ट तेथ रिघेना ॥ ९४ ॥ विधिरेष ह्यरिष्टघ्नो मङ्गलायनमुत्तमम् । देवद्विजगवां पूजा भूतेषु परमो भवः ॥ ९ ॥ जेथ हरीचें देवतार्चन । जेथ शालग्रामशिलार्चन । जेथ सधुसंतां सन्मान । ते अरिष्टनाशन महापूजा ॥ ९५ ॥ जेथ सद्भावें द्विजपूजन । जेथ भावार्थें गोशुश्रूषण । जेथ भूतदया संपूर्ण । तेथें कदा विघ्न रिघेना ॥ ९६ ॥ अंध पंगु अशक्त जन । जेथ पावती अवश्य अन्न । जेथ सुखी होती दीन । तेथ कदा विघ्न बाधीना ॥ ९७ ॥ जेथें भूतदाय अलोलिक । ते सकळ अरिष्टच्छेदक । परममंगळप्रकाशक । सुखदायक सर्वार्थीं ॥ ९८ ॥ इति सर्वे समाकर्ण्य यदुवृद्धा मधुद्विषः । तथेति नौभिरुत्तीर्य प्रभासं प्रययू रथैः ॥ १० ॥ जो मधुकैटभमर्दन । जो मुरारी मधुसूदन । जो परमात्मा श्रीकृष्ण । तो करी प्रेरण प्रभास ॥ ९९ ॥ यादवांमाजीं वृद्ध सज्ञान । पुत्र मित्र सुहृद स्वजन । तिहीं श्रीकृष्णाचें वचन । बहुसन्मानें वंदिलें ॥ १०० ॥ सकळ समृद्धिसंभारा । स्त्रीवृद्धादि बाळकुमारा । नावा भरोनियां समग्रा । शंखोद्धारा न्या म्हणती ॥ १ ॥ पालाणोनि रथ कुंजर । चतुरंग सेनासंभार । कृष्णसहित यादववीर । निघाले समग्र प्रभासासी ॥ २ ॥ तस्मिन् भगवताऽऽदिष्टं यदुदेवेन यादवाः । चक्रुः परमया भक्त्या सर्वश्रेयोपबृंहितम् ॥ ११ ॥ यादवा प्रभासा पावोन । जैसें होतें श्रीकृष्णवचन । त्याहूनि विशेष जाण । स्नानदान तिंहीं केलें ॥ ३ ॥ यादव समस्त मिळोन । केलें पारणाविधिभोजन । मग महामद्य आणूनि जण । मद्यपान मांडिलें ॥ ४ ॥ ततस्तस्मिन्महापानं पपुर्मैरेयकं मधु । दिष्टविभ्रंशितधियो यद्द्रवैर्भ्रश्यते मतिः ॥ १२ ॥ करूनियां तीर्थविधान । करावें अरिष्टनिरसन । बाप अदृष्टाचें विदान । तेथें मद्यपान मांडिलें ॥ ५ ॥ ज्याची गोडपणें पडे मिठी । उन्मादता अतिशयें उठी । तें मद्यपान उठाउठी । वडिलींधाकुटीं मांडिलें ॥ ६ ॥ ज्याचा वास येतांचि घ्राणीं । उन्माद चढे तत्क्षणीं । तैशिया मद्याचे जिव्हेवरी । भ्रांत करी सज्ञान ॥ ८ ॥ तें मद्यपान यादववीरीं । आदरिलें स्वेच्छाचारीं । आग्रह करूनि परस्परीं । लहानथोरीं मांडिलें ॥ ९ ॥ महापानाभिमत्तानां वीराणां दृप्तचेतसाम् । कृष्णमायाविमूढानां सङ्घर्षः सुमहानभूत् ॥ १३ ॥ पूर्वीं अतिमित्रत्व पोटांत । ते महापानें झाले मत्त । वीर मातले अतिदृप्त । नोकूनि बोलत परस्परें ॥ ११० ॥ कृष्णमाया हरिला बोध । अवघे झाले बुद्धिमंद । सांडूनि सुहृदसंबंध । निर्वाणयुद्ध मांडिलें ॥ ११ ॥ नोकूनि बोलतां विरुद्ध । अतिशयें चढला क्रोध । शस्त्रें घेऊनि सन्नद्ध । सुहृदीं युद्ध मांडिलें ॥ १२ ॥ युयुधुः क्रोधसंरब्धा वेलायामाततायिनः । धनुर्भिरसिभिर्भल्लैर्गदाभिस्तोमरर्ष्टिभिः ॥ १४ ॥ क्रोधें नेत्र रक्तांबर । वेगें वोढूनि हातियेर । समुद्रतीरीं महावीर । युद्ध घोरांदर ते करिती ॥ १३ ॥ धनुष्यें वाऊनियां जाणा । बाण सोडिती सणसणां । खड्गे हाणिती खणखणां । सुहृदांच्या प्राणां घ्यावया ॥ १४ ॥ एकीं उचलोनियां भाले । परस्परें हाणिते झाले । एकीं उचलोनि गदा बळें । वीर कलेंवरें पाडिती ॥ १५ ॥ एक तोमरें लवलाहीं । राणीं खवळले भिडती पाहीं । एक टोणप्याच्या घायीं । वीर ठायीं पाडिती ॥ १६ ॥ यापरी चतुरंगसेना । मिसळली रणकंदना । आपुलालिया अंगवणा । गज रथ रणा आणिती ॥ १७ ॥ पतत्पताकै रथकुञ्जरादिभिः खरोष्ट्रगोभिर्महिषैर्नरैरपि । मिथः समेत्याश्वतरैः सुदुर्मदा न्यहञ्छरैर्दद्भिरिव द्विपा वने ॥ १५ ॥ पताकांसीं रथ कुंजर । रणीं पाडिले अपार । पाखरांसीं असिवार । मारिले खरोष्ट्र रणामाजीं ॥ १८ ॥ म्हैसे मारूनियां रणीं । पाडिलिया वीरश्रेणी । जैसे उन्मत गज वनीं । दंतीं खणाणी भीडत ॥ १९ ॥ यापरी यादववीर । रणीं मातले महाशूर । घाय मारोनि निष्ठूर । रणीं अपार पाडिले ॥ १२० ॥ कृष्णमाया केले भ्रांत । युद्धीं न देखतां स्वार्थ । परस्परें प्राणघात । व्यर्थ करित सुहृअदांचा ॥ २१ ॥ रणीं पाडिलें अपार । तंव खवळले कृष्णकुमर । ज्यांच्यांमाजीं प्रीति थोर । ते युद्धातुर चालिले ॥ २२ ॥ प्रद्युम्नसाम्बौ युधिरूढमत्सरौ अक्रूरभोजावनिरुद्धसात्यकी । सुभद्रसङ्ग्रामजितौ सौदारुणौ गदौ सुमित्रासुरथौ समीयतुः ॥ १६ ॥ ज्यांज्यांमाजीं अतिप्रीती । ते ते निर्वाणयुद्ध करिती । बाप संहारक काळगती । सखे मारिती संख्यातें ॥ २३ ॥ प्रद्युम्न सांब अतिमित्र । त्यासीं युद्ध मांडले घोरांदर । अक्रूर भोज दोन्ही वीर । युद्धीं सत्वर मिसळले ॥ २४ ॥ अनिरुद्ध आणि सात्यकी । उठावले क्रोधतवकीं । वाणीं वर्षोनि अनेकीं । एकामेकीं भीडती ॥ २५ ॥ सुभद्र संग्रामजित दोनी । खवळले रणांगणीं । वर्षोनियां तीक्ष्ण बाणीं । उन्मत्त रणीं मातले ॥ २६ ॥ कृष्णपुत्र कृष्णबंधु । दोंहीचेंही नाम गदु । त्यांसी समत्सर क्रोधु । युद्धसंबंधु परस्परें ॥ २७ ॥ सुमित्र आणि सुरथ । या दोंहीसीं द्वेष अद्भुत । परस्परें करावया घात । युद्धाआंत मिसळले ॥ २८ ॥ अन्ये च ये वै निशठोल्मुकादयः सहस्रजिच्छतजिद्भानुमुख्याः । अन्योन्यमासाद्य मदान्धकारितां जघ्नुर्मुकुन्देन विमोहिता भृशम् ॥ १७ ॥ यादवकुळीं बळें अधिक । निशठादि उल्मुकादिक । शतजित्सहस्त्रजिद्भानुमुख्य । हेही युद्धीं देख खवळले ॥ २९ ॥ मद्यपानें अतिगर्वित । कृष्णमाया हरिलें चित्त । महामोहें केले भ्रांत । सुहृदां घात स्वयें करिती ॥ १३० ॥ ब्रह्मशापाची केवढी ख्याती । बंधु बंधुतें जीव घेती । कृष्णमाया पाडिले भ्रांतीं । युद्ध स्वयातीमाझारीं ॥ ३१ ॥ दाशार्हवृष्णयन्धकभोजसात्वता मध्यर्बुदा माथुरशूरसेनाः । विसर्जनाः कुकुराः कुन्तयश्च मिथस्ततस्तेऽथ विसृज्य सौहृदम् ॥ १८ ॥ यादवांची एक जाती । तेचि बारा नामीं नामांकिती । त्या बाराही ज्ञाती युद्धी भिडती । ऐक परीक्षिती तीं नामें ॥ ३२ ॥ दाशार्ह सात्वक अंधक जाण । अर्बुद माथुर शूरसेन । कुंती कुकुर विसर्जन । मधु भोज वृष्ण्य बारा नामें ॥ ३३ ॥ पूर्वील यादवांचें साजणें । ज्ञातीचें अल्पही ऐकतां उणें । जीवेंसीं सर्वस्व वेंचणें । परी वांचवणें स्वयाती ॥ ३४ ॥ तेचि यादव पैं गा आतां । सांडोनियां सुहृदता । ज्याचे चरणीं ठेविजे माथा । त्याच्या जीवघाता पेटले ॥ ३५ ॥ पुत्रा अयुध्यन्पितृभिर्भ्रातृभिश्च स्वस्त्रीयदौहित्रपितृव्यमातुलैः । मित्राणि मित्रैः सुहृदः सुहृद्भिः ज्ञातींस्त्वहन् ज्ञातय एव मुढाः ॥ १९ ॥ कृष्णमाया आकळिलें चित्त । अवघे झाले परम भ्रांत । न कळे आप्त अनाप्त । रणीं उन्मत्त मातले ॥ ३६ ॥ ज्याचे चरण वंदिजे भावार्था । श्रद्धा घेइजे चरणीतीर्थ । त्या निजपित्याचिया माथां । पुत्र शस्त्रघाता प्रवर्तर्ले ॥ ३७ ॥ बंधु शिरक्ल्या रणांगणीं । बंधु बंधूंतें सोडवी निर्वाणीं । तेचि बंधु बंधूंतें रणीं । निर्वाणबाणीं खोंचिती ॥ ३८ ॥ जो लळे पुरवूनि खेळविता । जैसा बाप तैसा चुलता । त्यासी पुतण्या प्रवर्ते घाता । शस्त्रें माथां हाणोनी ॥ ३९ ॥ कन्येचा सुत दौहित्र । ज्यासी श्राद्धी अधिकार । तो आज्यासी करी मार । घाय निष्ठुर हाणोनी ॥ १४० ॥ मामाभाचे परस्परीं । प्रवर्तले महामारीं । सुहृद सुहृदांच्या शिरीं । सतेज शस्त्रौं हाणिती ॥ ४१ ॥ मित्र मित्रांच्या मित्रतां । वेंचिति अर्था जीविता । ते मित्र मित्रांच्या जीवघाता । सक्रोधता उठिले ॥ ४२ ॥ आयुष्य सरलें निःशेख । चढलें काळासर्पाचें विख । अवघे होऊनियां मूर्ख । ज्ञातीसी देख वधिते झाले ॥ ४३ ॥ शरेषु क्षीयमाणेषु भज्यमानेषु धन्वसु । शस्त्रेषु क्षीयमाणेषु मुष्टिभिर्जह्रुरेरकाः ॥ २० ॥ युद्ध मांडिले घोरांदर । सरले भातडींचे शर । धनुष्यदंडें येरायेर । घायें निष्ठुर हाणिती ॥ ४४ ॥ घाय हाणितां अतिबळें । धनुष्ये मोडलीं तत्काळें । क्षीण झालीं शस्त्रें सकळें । हतियेर-बळें खुंटलीं ॥ ४५ ॥ ब्रह्मशापाची एरिका । तीरीं निघाली होती देखा । ते मुष्टीं घेऊनि क्रोधतवका । एकमेकां हाणिती ॥ ४६ ॥ ता वज्रकल्पा ह्यभवन् परिघा मुष्टिना भृताः । जघ्रुर्द्विषस्तैः कृष्णेन वार्यमाणास्तु तं च ते ॥ २१ ॥ ते एरिका घेतांचि हातीं । झाली वज्रप्राय धगधगिती । अतितीक्षण परिघाकृती । तेणें हाणीती परस्परें ॥ ४७ ॥ नाना शस्त्रें लागतां पाहीं । यादव न डंडळती कंहीं । तेही एरिकेच्या घायीं । पडती ठायीं अचेतन ॥ ४८ ॥ एरिकेच्या निजघायीं । यादवांसी उरी नाहीं । दुधड तोडूनियां पाहीं । पडती ठायीं परस्परें ॥ ४९ ॥ एरिकेच्या निजघायीं इतर । यादव उरले महाशूर । जे कां नेटके जुंझार । निधडे वीर निजयोद्धे ॥ १५०॥ यादव उरले भद्रजाती । हे आणिकासि नाटोपती । त्यां निर्दळावया निश्चितीं । निवारणार्थीं हरि धांवे ॥ ५१ ॥ तो म्हणे बह्मशापाची एरिका । ही सर्वथा हातीं धरूं नका । सांडा युद्धाचा आवांका । शिकविले ऐका माझें ॥ ५२ ॥ धर्मतां निवारी श्रीकृष्ण । त्यासीही मारूं धांवले जाण । हें कृष्णमायेचें विंदान । न चुकत मरण पैं आलें ॥ ५३ ॥ एक म्हणती श्रीकृष्णासी । आधीं झोडोनि पाडा यासी । ठकूं आला आम्हांसी । म्हणोनि एरिकेसीं धांविनले ॥ ५४ ॥ एक म्हणती धरा केशीं । एक म्हणती भीड कायसी । एक म्हणे मी श्रीकृष्णासी । एका घायेंसीं लोळवीन ॥ ५५ ॥ प्रत्यनीकं मन्यमाना बलभद्रं च मोहिताः । हन्तुं कृतधियो राजन्नापन्ना आततायिनः ॥ २२ ॥ पैल पैल तो बळिभद्रु । हाचि आमुचा मुख्य शत्रु । यासी चला आघीं मारूं । यादवभारु लोटला ॥ ५६ ॥ मदमोहें अतिदुर्मती । वज्रप्राय एरिका हातीं । घेऊनि बळिभद्रावरी येती । तेणें तोही निश्चितीं क्षोभला ॥ ५७ ॥ अथ तावपि सङ्क्रुद्धावुद्यम्य कुरुनन्दन । एरकामुष्टिपरिघौ चरन्तौ जघ्रतुर्युधि ॥ २३ ॥ शुक म्हणे कुरुनंदना । यादव टेंकले आत्ममरणा । ते मारावया रामकृष्ण । आततायी जाणा लोटले ॥ ५८ ॥ यादव उठले हननासी । देखोनि राम्-हृषीकेशी । अतिक्रोध चढला त्यांसी । तेही युद्धासी मिसळले ॥ ५९ ॥ एरका जे कां परिघाकृती । वज्रप्राय धगधगिती । दोघीं जणीं घेऊनि हातीं । यादवां ख्यातीं लाविली ॥ १६० ॥ रामकृष्णांच्या निजघातीं । यादवांची जाती व्यक्ती । अवघेचि रणा येती । कृष्ण काळशक्तीं क्षोभला ॥ ६१ ॥ निजकुळाचें निधन । देखोनियां श्रीकृष्ण । कर्तव्यार्थ झाला पूर्ण । ऐसें संपूर्ण मानिले ॥ ६२ ॥ ब्रह्मशापोपसृष्टानां कृष्णमायावृतात्मनाम् । स्पर्धाक्रोधः क्षयं निन्ये वैणवोऽग्निर्यथा वनम् ॥ २४ ॥ ब्रह्मशापें छळिलें विधीं । कृष्णमाया ठकली बुद्धी । मद्यपानउन्मादमदीं । क्रोधें त्रिशुद्धी क्षया नेले ॥ ६३ ॥ वेळुवाच्या वेळुजाळीं । जेवीं कांचणीं पडे इंगळी । तेणें वनाची होय होळी । तेवीं यदुकुळीं कुलक्षयो ॥ ६४ ॥ एवं नष्टेषु सर्वेषु कुलेषु स्वेषु केशवः । अवतारितो भुवों भार इति मेनेऽवशेषितः ॥ २५ ॥ स्वकुळ नाशूनि श्रीधर । अवशेष धराभार । उतरला मानी चक्रधर । तेणें सुखें थोर सुखावे ॥ ६५ ॥ जेवीं कां आलें पेरी माळी । निजजीवनें प्रतिपाळी । शेखीं तोचि खणे समूळीं । तेवीं यदुकुळीं श्रीकृष्ण ॥ ६६ ॥ यादव निजबळें प्रतिपाळी । त्यातें स्वयें निजांगें निर्दळी । हें दाखवीतां वनमाळी । ममतामेळीं अलिप्त ॥ ६७ ॥ कृष्ण पाळी यादवां समस्तां । त्यांची दाविली अतिममता । शेखीं करूनि कुळाचे घाता । निरभिमानता हरि दावी ॥ ६८ ॥ स्त्रीपुत्रेंसीं निजजीविता । सकळ कुळाच्या होतां घाता । ज्ञात्यासी नुपजे ममता । ते ‘नित्यमुक्तता’ हरि दावी ॥ ६९ ॥ ज्ञात्यासी नाहीं अहंममता । तेचि दावावया तत्त्वतां । कुळेंसी होतां पुत्रघाता । स्वप्नींहीं ज्ञाता ग्लानि नेणे ॥ १७० ॥ ब्राह्मणाचा शाप दारुण । अन्यथा हों नेदी श्रीकृष्ण । निजकुळ निर्दळी आपण । विप्रवचनसत्यत्वा ॥ ७१ ॥ करूनि कुळक्षयाचें काम । सुख मानी पुरुषोत्तम । तें देखोनि म्हणे बळराम । अवतारकर्म संपलें ॥ ७२ ॥ रामः समुद्रवेलायां योगमास्थाय पौरुषम् । तत्त्याज मानुष्यं संयोज्यात्मानमात्मनि ॥ २६ ॥ मग बळिभद्रें आपण । समित्रतीरीं योगासन । दृढ घालोनियां जाण । निर्वाणध्यान मांडिलें ॥ ७३ ॥ आकर्षूनि देहींचा प्राण । निःशेष सांडिला देहाभिमान । मग परमपुरुषध्यान । करितांचि आपण तद्रूप झाला ॥ ७४ ॥ जेवीं घटामाजील गगन । सहजें महदाकाश पूर्ण । तेवीं सांडितां देहाभिमान । झाला संकर्षण बळराम ॥ ७५ ॥ होतें मनुष्यनाट्य अवलंबिलें । तें देह निःशेष त्यागिलें । जे कां पूर्वरूप आपुलें । तें होऊनि ठेलें बळिराम ॥ ७६ ॥ समुद्रतीरीं योगासन । तें देह ठेविलें अचेतन । हें रामनिर्याण देखोन । स्वयें श्रीकृष्ण सरसावला ॥ ७७ ॥ रामनिर्याणमालोक्य भगवान् देवकीसुतः । निषसाद धरोपस्थे तूष्णीमासाद्य पिप्पलम् ॥ २७ ॥ बळभद्र झाला देहातीत । हें देखोनि देवकीसुत । भगवान् श्रीकृष्णनाथ । स्वयें इच्छित निजधाम ॥ ७८ ॥ तेव्हां धरातळीं धराधर । मौनें अश्वत्थातळीं स्थिर । वीरासनीं शार्ङ्गधर । श्यामसुंदर बैसला ॥ ७९ ॥ ज्याच्या स्वरूपाचे आवडीं । शिवविरिंच्यादि झालीं वेडीं । ज्याच्या दर्शनाची गोडी । दृष्टी नोसंडी क्षणार्ध ॥ १८० ॥ दृष्टीनें चवी चाखिली गाढी । तंव तंव रसना चरफडी । तिणें कीर्तनरसें रसगोडी । चवी चोखडी चाखिली ॥ ८१ ॥ प्राशनेंवीण कृष्णरस । रसना सेवी अतिसुरस । तेव्हां विषयरस तो विरस । होय निरस संसार ॥ ८२ ॥ श्रवणीं पडतां श्रीकृष्णकीर्ती । त्रिविध तापां उपशांती । ज्याची वर्णितां गुणनामकीर्ती । चारी मुक्ती कामाऱ्या ॥ ८३ ॥ चरणकमलमकरंद । तुळशीमिश्रित आमोद । सेवितां घ्राणीं परमानंद । इतर गंध ते तुच्छ ॥ ८४ ॥ ज्याचा लागतां अंगसंग । देहबुद्धीसी होय भंग । स्वानंदविग्रही श्रीरंग । अंगप्रत्यंगसुखकारी ॥ ८५ ॥ ज्याचें अवडीं वंदितां पाये । समाधि लाजिली मागें ठाये । तो अश्वत्थातळीं पाहें । बैसला आहे निजशोभा ॥ ८६ ॥ तें अंतकाळेचें कॄष्णध्यान । शुक्रासे आवडलें संपूर्ण । तोही स्वानंदें वोसंडून । श्रीकृष्णध्यान वर्णित ॥ ८७ ॥ बिभ्रच्चतुर्भुजं रूपं भ्राजिष्णु प्रभया स्वया । दिशो वितिमिराः कुर्वन् विधूम इव पावकः ॥ २८ ॥ प्रांतींचें श्रीकृष्णध्यान । पांचां श्लोकीं निरूपण । श्रोता परीक्षिती सावधान । वक्ता ज्ञानघन शुकयोगींद्र ॥ ८८ ॥ पिंपळातळीं प्रकाशघन । ते काळींची मूर्ति जाण । निजतेजें देदीप्यमान । दिशा परिपूर्ण तेणें तेजें ॥ ८९ ॥ ना धूम ना इंगळ । आरक्ततेवीण अग्निज्वाळ । तैशी कृष्णमूर्ती तेजाळ । प्रकाश प्रबळ अतिदीप्त ॥ १९० ॥ कृष्णमूर्तीचे निजप्रभा । लोपली रविचंद्राची शोभा । शून्यत्वें ठाव नाहीं नभा । सच्चिदानंदगाभा साकार ॥ ९१ ॥ चैतन्यतेजें तनु मुसावली । शांतिरसाची वोतिली । चतुर्भुजत्वें रूपा आली । तेणें दिशांची गेली काळिमा ॥ ९२ ॥ श्रीवत्साङ्कं घनश्यामं तप्तहाटाकवर्चसम् । कौशेयाम्बरयुग्मेन परिवीतं सुमङ्गलम् ॥ २९ ॥ सुन्दरस्त्मितवक्त्राब्जं नीलकुन्तलमण्डितम् । पुण्डरीएकाभिरामाक्षं स्फुरन्मकरकुण्डलम् ॥ ३० ॥ कृष्णमूर्ति स्वच्छ स्वयंभ । अंगीं प्रत्यंगीं बिंबलें नभ । तेणें घनश्यामता-शोभ । अतिसप्रभ साजिरी ॥ ९३ ॥ आधींच नेटका श्रीकृष्ण । वरी घनश्यामता बाणली पूर्ण । तेणें मुसावलें बरवेंपण । लागलें ध्यान नरनारी ॥ ९४ ॥ नरनारे बापुड्याअ किती । संन्यासी भुलोनि ठाती । विरक्त वेधले परमार्थी । देखोनि मूर्ती कृष्णाची ॥ ९५ ॥ देखतां श्रीकृष्णदर्शन । शिवासी लागलें नित्यध्यान । पार्वत्याही निजमन । कृष्णार्पण स्वयें केलें ॥ ९६ ॥ ऐसें अंगींचें बरवेंपण । त्याहीवरी हास्यवदन । साजिरें राजीवलोचन । आकर्ण पूर्ण आरक्त ॥ ९७ ॥ मस्तकींचे नीलालक । सुगंधसुमनीं गुंफिले चोख । कृष्णीं कृष्णरूप मधुक । कृष्णकेशीं देख विगुंतले ॥ ९८ ॥ स्फुरत्कुंडलें मकराकार । ऐसें वर्णिती कविवर । परी तीं आकारीं निर्विकार । श्रवणें विकार मावळती ॥ ९९ ॥ फावलिया कृष्णश्रवण । आकारविकारां बोळवण । ते श्रीकृष्णश्रवणीं पूर्ण । देदीप्यमान कुंडलें ॥ २०० ॥ तप्त सुवर्णासमान । उभय पीतांबर जाण । एक कासे विराजमान । दुजा प्रावरण शोभत ॥ १ ॥ ब्रह्मण्यदेवो श्रीकृष्ण । लक्ष्मी डावलूनि पूर्ण । दक्षिणांगीं विप्रचरण । श्रीवत्सलांच्छन गोविंद ॥ २ ॥ कटिसूत्रब्रह्मसूत्रकिरीटकटकाङ्गदैः । हारनूपुरमुद्राभिः कौस्तुभेन विराजितम् ॥ ३१ ॥ वनमालापरीताङ्गं, मूर्तिमद्भिर्निजायुधैः । कृत्वोरौ दक्षिणे पादमासीनं पङ्कजारुणम् ॥ ३२ ॥ कंठीं कौस्तुभ सोज्वळा । कटीं मिरवे रत्नमेखळा । ब्रह्मसूत्र रुळे गळा । आपाद वनमाळा शोभत ॥ ३ ॥ माथां मुकुटाचें खेवणें । लखलखीत अनर्घ्य रत्नें । कीर्तिमुखें बाहुभूषणें । वीरकंकणें विचित्रें ॥ ४ ॥ यंत्रउपासती उपासका । तैशा कराग्रीं करमुद्रिका । त्रिकोण षट्कोण कर्णिका । जडितमाणिका शस्त्रोक्त ॥ ५ ॥ वैजयंतीचा सोहळा । पदक एकावळी गळां । नाना रत्नें हार मुक्ताफळा । तुळशीमाळा सुगंधा ॥ ६ ॥ दोनी मोतीलग पदर । रत्नें जडित पीतांबर । किंकिणी क्षुद्रघंटिका विचित्र । मनोहर शोभती ॥ ७ ॥ वांकीअंदुवांचा गजर । चरणीं नूपुरांचा झणत्कार । रुळे बिरुदांचा तोडर । मनोहर हरिचरणीं ॥ ८ ॥ रातोत्पलां कठिणपण । त्यांहूइ सुकुमार चरण । घवघवईत श्रीकृष्ण । शोभा संपूर्ण शोभत ॥ ९ ॥ शंख चक्र गदा कमळ । मूर्तिमंत आयुधें सकळ । आश्रऊनि पिंपळ । बैसळा केवळ वीरासनीं ॥ २१० ॥ त्या वीरासनाचें लक्षण । तळीं सूनि दक्षिण चरण । त्याचि मांडीवरी जाण । वामचरण आलोहित ॥ ११ ॥ लाजवूनि संध्यारागासी । उणें आणोनि बाळसूर्यासी । चरणशोभा हृषीकेशीं । अतिदीप्तीसीं आरक्त ॥ १२ ॥ मुसलावशेषायःखण्डकृतेषुर्लुब्धको जरा । मृगास्याकारं तच्चरणं विव्याध मृगशङ्कया ॥ ३३ ॥ करूनि निजकुळाची होळी । सरस्वतीतीरीं वनमाळीं । टेंकोनि बैसला पिंपळातळीं । चरणनवाळी आरक्त ॥ १३ ॥ आरक्त श्रीकृष्णचरण । भावूनि मृगमुखासमान । जराव्याधें विंधिला बाण । अतिसत्राण भेदिला ॥ १४ ॥ ब्रह्मशापाचें मुसल घन । यादवीं पिष्ट करितां जाण । उरला अवशेष लोहकण । तो समुद्रीं जाण टाकिला ॥ १५ ॥ तो पडतांचि समुद्रजळीं । त्यातें मीन सगळेंचि गिळी । त्या मीनातें जराव्याध गळीं । जाळ्यामेळीं आकळित ॥ १६ ॥ व्याध करी मीनविदारण । तंव निघाला तो लोहकण । त्याचा जरव्याधें केला बाण । तेणें कृष्ण चरण विंधिला ॥ १७ ॥ मत्सयोदरींचा लोहघन । त्याचा केलिया दृढ बाण । थोर पारधी साधे संपूर्ण । व्याधें जाणोनि बाण तो केला ॥ १८ ॥ भेदावया कृष्णचरण । मुळीं ब्रह्मशापचि कारण । यालागीं जराव्याधाचा बाण । कृष्णचरणीं पूर्ण खडतरला ॥ १९ ॥ व्याधें अवचितें विंधिला । परी कृष्ण नाहीं दचकला । बाण सत्राणें खडतरला । तेणें सुखी झाला श्रीकृष्ण ॥ २२० ॥ चतुर्भुजं तं पुरुषं दृष्टा स कृतकिल्बिषः । भीतः पपात शिरसा पादयोरसुरद्विषः ॥ ३४ ॥ बाण श्रीकृष्णचरणीं पूर्ण भेदला । जराव्याधाचा हात निवाला । म्हणे म्यां मोठा मृग विंधिला । म्हणोनि धांवला धरावया ॥ २१ ॥ देखोनि चतुर्भुज पुरुषासी । भय सुटलें जराव्याधासी । म्हणे मज घडल्या महापापराशी । परमपुरुषासी विंधिलें ॥ २२ ॥ म्हणे कटकटा रे अद्रुष्टा । आचरविलें कर्मा दुष्टा । ऐशिया मज महापापिष्ठा । दुःखदुर्घटा कोण वारी ॥ २३ ॥ जगाचा परमात्मा श्रीहरी । तो म्यां विंधिला बाणेंकरीं । माझ्या पापासमान थोरी । नाहीं संसारीं आनासी ॥ २४ ॥ भयें सुटला थोर कंप । मज घडलें महापाप । जगाचें जें ध्येय स्वरूप । त्यासी संताप म्यां दिधला ॥ २५ ॥ ज्याचे अमर वंदिती चरण । ज्यासी संत येती लोटांगण । त्या श्रीकृष्णासी विंधिला बाण । पाप संपूर्ण मज घडलें ॥ २६ ॥ अवचटॆं आत्महत्या घडे । तें पाप कदा न झडे । जगाचा आत्मा कृष्ण वाडेंकोडें । ते आत्महत्या पडे मस्तकीं माझे ॥ २७ ॥ जगाचें आत्महनन । कर्ता मी एक पाफी पूर्ण । त्या पापाचें पुरश्चरण । सर्वथा जाण दिसेना ॥ २८ ॥ प्रमादें बर्ह्महत्या घडे । तेणें पापें तो समूळ बुडे । तें पूर्णब्रह्म म्यां मूढे । बाणें सदृढें विंधिलें ॥ २९ ॥ पापकर्मा मी व्याधरूप । तेणें म्यां जोडलें पाप अमूप । कृष्ण परमात्मा चित्स्वरूप । त्यासीही संताप दिधला म्यां ॥ २३० ॥ येणें अनुतापें तप्त पूर्ण । धांवोनि घाली लोटांगण । श्रीकृष्णाचे श्रीचरण । मस्तकीं जाण दृढ धरिले ॥ ३१ ॥ मर्दी दैत्यांचा अभिमान । मधुद्वेष्टा जो मधुसूदन । त्याचे दृढ धरूनि चरण । करी रुदन अट्टहासें ॥ ३२ ॥ चरणीं घातली परम मिठी । उठवितां कदा नुठी । मज क्षमा करीं कृपाड्रुष्टीं । कृपाळू सृष्टीं तूंचि एक ॥ ३३ ॥ अजानता कृतमिदं पापेन मधुसूदन । क्षन्तुमर्हसि पापस्य उत्तमश्लोक मेऽनघ ॥ ३५ ॥ अतिभीत जराव्याध । म्हणे मी पापात्मा अतिअशुद्ध । नेणतां घडला हा अपराध । लिंगभेद मज घडला ॥ ३४ ॥ जो ईश्वरप्रतिमा उच्छेदी । तो महापापी लिंगभेदी । त्या तुज ईश्वरासी म्यां दुर्बुद्धीं । अदृष्टविधीं विंधिलें ॥ ३५ ॥ ऐसा मी पापी पापाकर्मा । महापापी पापात्मा । माझा अपराध करावा क्षमा । पुरुषोत्तमा कृपाळुवा ॥ ३६ ॥ तूं कृपाळु त्रिजगतीं । गर्भीं राखिला परीक्षिती । गजेंद्राचें अतिआकांतीं । उडी कृपामृर्ती घातली ॥ ३७ ॥ पांडव जळतां जोहरीं । तुवां काढिले विवरद्वारीं । शेखीं अर्जुनाचा कैवारी । घेशी जुंझारी भीष्मासीं ॥ ३८ ॥ द्रौपदीचे अतिसांकडीं । धांवलासी लवडसवडीं । तिळभरी न दिसतां उघडी । नेसतीं लुगडीं तूं होसी ॥ ३९ ॥ ऐसी कृपाळुत्वाची ख्याती । श्रुतिपुराणें वाखणिती । तुझी उत्तम श्लोककीर्ती । ऋषि वर्णिती महासिद्ध ॥ २४० ॥ नेणतां आचरलों दुष्कर्मा । तें मज करावया क्षमा । तूं कृपाळु परमात्मा । पुरुषोत्तमा क्षमाशीळ ॥ ४१ ॥ अजामिळ दुराचारी । पुत्रलोभें नाम उच्चारी । त्याचे पापाची झाली बोहरी । ऐशी निष्पाप थोरी नामाची ॥ ४२ ॥ नामें निष्पाप दुर्मती । नामें निष्पाप पितृघाती । नामें दुराचारी तरती । हे निष्पाप ख्याती नामाची ॥ ४३ ॥ यस्यानुस्मरणं नृणामज्ञानध्वान्तनाशनम् । वदन्ति तस्य ते विष्णो मयासाधु कृतं प्रभो ॥ ३६ ॥ ज्या विष्णूचें नामस्मरण । कोटीजन्मांचें घन अज्ञान । नराचें निर्दाळी पूर्ण । सकळ कल्याणदायक ॥ ४४ ॥ ऐसें ज्याचे नामस्मरण । त्याचे स्वरूपासी म्यां जाण । निजबळें विंधिला निर्वाण बाण । अपराध पूर्ण हा माझा ॥ ४५ ॥ ज्याचें अगाध महिमान । सदा वर्णिती साधु सज्जन । जो स्वरूपें सच्चिद्धन । स्वामी श्रीकृष्ण जगाचा ॥ ४६ ॥ जगाचें जीवन श्रीकृष्ण । त्या कृष्णासही मी आपण । विंधिला निर्वाणींचा बाण । हा अपराध पूर्ण पैं माझा ॥ ४७ ॥ त्रैलोक्यराजा कृष्ण समर्थ । तो म्यां केला राजघात । जगाचा आत्मा श्रीकृष्णनाथ । तो आत्मघात म्यां केला ॥ ४८ ॥ श्रीकृष्ण जगाचा जनिता । त्या म्यां केलें पितृघाता । जगप्रतिपाळणीं श्रीकृष्णमाता । त्या मातृघाता म्यां केलें ॥ ४९ ॥ श्रीकृष्ण ब्राह्मण ब्रह्मबोध । तो म्यां केला ब्रह्मवध । याहीहोनि अगाध । जगीं अपराध असेना ॥ २५० ॥ राजघात आत्मघात । मातृपितृ-ब्रह्मघात । मजचि घडला समस्त । जे म्यां श्रीकृष्णनाथ विंधिला ॥ ५१ ॥ तन्माऽऽशु जहि वैकुण्ठ पाप्मानं मृगलुब्धकम् । यथा पुनरहं त्वेवं न कुर्यां सदतिक्रमम् ॥ ३७ ॥ ऐशिया मज पापरूपासी । कृपा करावी हृषीकेशी । निष्कृती होय पापासी । त्या उपायासी करीं वेगीं ॥ ५२ ॥ कोरणिये कृपेचा संबंध । तेणें न फिटे दोषबाध । माझा जेव्हां तूं करीसी वध । तेव्हां मी शुद्ध होईन ॥ ५३ ॥ मी लुब्धक पापबुद्धी । मृगलोभी पशुपारधी । त्या मज तूं निजहस्तें वधीं । तैं मी त्रिशुद्धी उद्धरालें ॥ ५४ ॥ जेणें देहें केलें पापकर्मा । तो देह निवटीं पुरुषोत्तमा । पुढती ऐशिया असत्कर्मा । न करीं अधर्मा तें करीं ॥ ५५ ॥ बाण विंधिला तुझिया पायां । हें अगाध पाप केलें काया । तीसी शीघ्र वधावें यदुराया । तैं महापापा या होय निस्तारु ॥ ५६ ॥ जेणें देहें केलें पापाचरण । त्याचें प्रायश्चित्त हेंचि पूर्ण । करीं निजहस्तें देहदंडण । म्हणोनि चरण दृढ धरिले ॥ ५७ ॥ देहें केलें पापाचरण । देहलोभी तो पापी पूर्ण । स्थूल लिंग आणि कारण । यांचें करीं छेदन निजतेजचक्रें ॥ ५८ ॥ यस्यात्मयोगरचितं न विदुर्विरिञ्चो रुद्रादयोऽस्य तनयाः पतयो गिरां ये । त्वन्मायया पिहितदृष्टय एतदञ्जः किं तस्य ते वयमसद्गतयो गृणीमः ॥ ३८ ॥ देहसंभवाचें मूळ जाण । स्थूल सूक्ष्म आणि कारण । यासी नातळतां तूं श्रीकृष्ण । चतुर्भुज संपूर्ण देह धरिसी ॥ ५९ ॥ स्थूल-सूक्ष्म-कारणता । ये तिन्ही त्रिगुणेसीं नातळतां । तूं योगमायेचिया सत्ता । नाना अवतारता देह धरिसी ॥ २६० ॥ नवल तुझा लीलाविग्रहो । मत्स्य कूर्म श्वेतवराहो । होतां न धरिसे संदेहो । जन्मभयो तुज नाहीं ॥ ६१ ॥ वोडवल्या जन्म एक । ब्रह्मादिक होती रंक । तो तूं अवतार अनेक । धरीसी निःशंक निजात्मतां ॥ ६२ ॥ अदृष्टाचिये निजगतीं । देहासी नाना भोग होती । तूं अदृष्टेंवीण श्रीपती । नाना भ्गसंपत्ती भोगिसी ॥ ६३ ॥ आयुष्य तंववरी देहधारण । वेदें नेमस्त केलें जाण । नवल तुझें लीलाविदान । आयुष्येंवीण देह धरिसी ॥ ६४ ॥ काळसत्ता दुर्धर पूर्ण । ब्रह्मादिकां अलोट मरण । तुज काळ वेळ नसतां जाण । स्वलीला मरण दाविसी ॥ ६५ ॥ तुझे योगमायेची योगगती । लीलाविग्रहें देहस्थिती । अतर्क्य सर्वांसी सर्वार्थीं । तेही उपपत्ती निर्धारीं ॥ ६६ ॥ ब्रह्मा जगाचा आदिकर्ता । त्यासाही न कळे तुझी सत्ता । तूं नाना अवतारीं देह धरिता । त्याचा कर्ता नव्हे ब्रह्मा ॥ ६७ ॥ तूं स्वलीला देह कैसा धरिसी । अवतारचरित्रें कैसी करिसी । कैसेनि तो देहो सांडिसी । हें ब्रह्मादिकांसी कळेना ॥ ६८ ॥ ज्यासी तूं मानिसी अतिसन्मानीं । सदाशिव जो कां त्रिकाळज्ञानी । त्यासीही अतर्क्य तुझी करणी । शार्ङ्गपाणी श्रीकृष्णा ॥ ६९ ॥ सदाशिवाचे निजवचनीं । तूं दुजेन झालासी मोहिनी । ते शिवासी न कळे तुझी करणी । तत्क्षणीं तो भुलला ॥ २७० ॥ जाणोनि योग ज्ञान दोनी । सनकादिक ब्रह्मज्ञानी । जिंहीं मायापडळ छेदूनी । स्वानंदभुवनीं सुखरूप ॥ ७१ ॥ त्यांसीही तुझी स्वलीलाशक्ती । सर्वथा न कळेचि श्रीपती । ते जयविजयां शाप देती । सकोपस्थितीं वैकुंठी ॥ ७२ ॥ पारंगत वेदशास्त्रार्थीं । ब्रहस्पत्यादि वाचस्पती । त्यांसीही लीलाविग्रहस्थिती । न कळे निश्चितीं श्रीकृष्ण ॥ ७३ ॥ जे सज्ञान ज्ञाते परमार्थी । त्यांसीही अतर्क्य अवतारशक्ती । मा इंद्रादि देवांसी ते स्थिती । कैशा रीतीं कळेल ॥ ७४ ॥ इंद्रादि देवां दिविभोगनिष्ठीं । माया आच्छादी तयांच्या दृष्टी । त्यांसी तुझे लीलेची गोष्टी । न कळे जगजेठी निश्चित ॥ ७५ ॥ तेथ मायावी देहवंता । उद्बोध नव्हे पैं सर्वथा। तुझी लीला श्रीकृष्णनाथा । अतर्क्य सर्वथा सर्वांसी ॥ ७६ ॥ सुखें होईल ब्रह्मज्ञान । परी तुझें स्वलीलादेहधारण । याचें नेणती पर्यवसान । अतिसज्ञान साकल्यें ॥ ७७ ॥ तेथ मी तंव अधम जन । असद्गतीचें भाजन । त्या मज तुझें लीलावर्णन । सर्वथा जाण अतर्क्य ॥ ७८ ॥ आतां असो हें निरूपण । बहु बोलाचें काय कारण । माझ्या पापाचें पुरश्चरण । देहदंडाणं करीं कृष्णा ॥ ७९ ॥ तुझेनि हस्तें देहदंडण । तेणें सकळ पापांचें निर्दळण । मज उद्धरावया जाण । हे कृपा पूर्ण करावी ॥ २८० ॥ म्हणोनि घातलें लोटांगण । धांवोनि धरिले दोनी चरण । ऐकोनि व्याधाचें स्तवन । कृपा श्रीकृष्ण तुष्टला ॥ ८१ ॥ श्रीभगवानुवाच- मा भैर्जरे त्वमुत्तिष्ठ काम एष कृतो हि मे । याहि त्वं मदनुज्ञातः स्वर्गं सुकृतिनां पदम् ॥ ३९ ॥ जो वेदार्थाचा मथित बोध । जो जगदादि-आनंदकंद । जो स्वरूपें स्वानंद शुद्ध । तो व्याधेंसीं गोविंद सकृप बोले ॥ ८२ ॥ तूं जीवघातक पारधी । भय मानिसी ममापराधीं । तुज अभय गा त्रिशुद्धीं । माझी कार्यसिद्धी त्वां केली ॥ ८३ ॥ कुमारीं सांब केला स्त्रीरूप । कपटें ब्राह्मणां आला कोप । कुळासी झाला ब्रह्मशाप । हा त्रिविध संकल्प माझाचि ॥ ८४ ॥ शापावशेष लोह जाण । त्याचा तुवां करोनि बाण । मृगलोभें विंधिला चरण । यासही कारण संकल्प माझा ॥ ८५ ॥ मी बुद्धीची अनादि बुद्धी । मी क्रियेची क्रिया त्रिशुद्धी । तेथें अहंकर्तृत्वाचे विधी । तूं वृथा अपराधी म्हणविसी ॥ ८६ ॥ मिथ्या धरूनि देहाभिमान । म्हणसी घडलें मज पाप पूर्ण । त्याही पापासी पुरश्चरण । माझें दर्शन मुख्यत्वें ॥ ८७ ॥ माझिया नामा एकासाठीं । जळती महापातकांच्या कोटी । त्या मज तुवां देखिलें दृष्टीं । परम भाग्यें भेटी घडली तुज ॥ ८८ ॥ माझी घ्यावया क्षणार्ध भेटी । एक रिघाले गिरिकपाटीं । एक योगयागसंकटीं । झाले महाहटी नेमस्त ॥ ८९ ॥ एवं नाना नेमआटाटी । शिणतांही कल्पकोटी । स्वप्नींही न लभे माझी भेटी । त्या मज त्वां दृष्टीं देखिलें ॥ २९० ॥ माझें होतांचि दर्शन । सकळ पातकां निर्दळण । तूं तंव पुण्यात्मा परिपूर्ण । पापाभिमान धरूं नको ॥ ९१ ॥ पापाभिमानें अधोगती । पापाभिमानें स्वर्गा जाती । निरभिमानें माझी प्राप्ती । सत्य वचनोक्ती पैं माझी ॥ ९२ ॥ तूं ऐसें मानिसी आपण । परब्रह्म परमात्मा श्रीकृष्ण । त्यासी विंधिला निर्वाणबाण । हें पाप दारुण अनिवार ॥ ९३ ॥ लोहपरिसा आलिंगन । तेणें लोह होय सुवर्ण । त्यासी फोडूं आल्या लोहघण । आघातें सुवर्ण तो होय ॥ ९४ ॥ तेवीं भक्तीं घेतल्या माझी भेटी । पातकें जातीं उठाउठी । का द्वेषे देखिल्या मज दृष्टीं । पातकां तुटी तत्काळ ॥ ९५ ॥ हो कां इतरांच्या अपराधतां । प्राणी पावे अधःपाता । तोचि अपराध माझा करितां । नित्यमुक्तता अपराध्यां ॥ ९६ ॥ ममापराधें नरक पावे । तैं माझें सामर्थ्य बुडालें आघवें । माझेनि अपराधें सुख पावे । मुक्तिवैभवें भयानिर्मुक्त ॥ ९७ ॥ विष म्हणोनि अमृतपान । केल्या अमरत्व न चुके जाण । तेवीं द्वेषेंही माझें दर्शन । करी पावन प्राण्यासी ॥ ९८ ॥ जाणोनि अग्नि लविला घरीं । तो जाळूनि सर्वही भस्म करी । मा नेणतांही ठेविला वळचणीवरी । तोही करी तैसेंचि ॥ ९९ ॥ तेवीं भावें अथवा द्वेषें पूर्ण । ज्यासी घडे माझें दर्शन । तो होय परम पावन । हें सत्य जाण जराव्याधा ॥ ३०० ॥ मज ठाकावया निजधाम । त्वां सिद्ध केलें माझें काम । तेणें तुष्टलों मी आत्माराम । तूं पावन परम तिंहीं लोकीं ॥ १ ॥ ज्या नांव म्हणसी ‘पाप’ पूर्ण । जेणें देहें मज विंधिला बाण । तेणेंचि देहें तूं आपण । होसी स्वर्गभूषण सुरवंद्य ॥ २ ॥ याग करूनि याज्ञिक । पावती सुख पतनात्मक । तैसें तुज न घडे देख । तूं अक्षय सुख पावसी ॥ ३ ॥ माझिया दर्शनाचें पुण्य । दिविभोगें नव्हे क्षीण । यालागीं अक्षय सुख संपूर्ण । तूं सर्वथा जाण पावसी ॥ ४ ॥ तूं विकल्प सांडोनियां पोटीं । जराव्याधा सवेग उठीं । मिथ्या माझ्या गोष्टी । तूं अक्षय्य तुष्टी पावसी ॥ ५ ॥ तूं ऐसें जीवीं कल्पिसी । आपण निघालां निजधामासी । मागें अक्षय सुखासी । कोणापाशीं मागावें ॥ ६ ॥ जैसें बोलती इतर लोक । ममज्ञा तैशी नव्हे देख । ठाकठोक आतांचि रोख । अक्षय सुख पावसी ॥ ७ ॥ माझे आज्ञेचें लाहोनि बळ । ध्रुव अद्यापि झाला अढळ । माझी आज्ञा बंदी कळिकाळ । कोणेपरी विकळ करूं न शके ॥ ८ ॥ ऐसें श्रीमुखें आपण । जंव बोलों नपुरे श्रीकृष्ण । तंव घवघवीत विमान । व्याधासी जाण उतरलें ॥ ९ ॥ इत्यादिष्टो भगवता कृष्णेनेच्छाशरीरिणा । त्रिः परिक्रम्य तं नत्वा विमानेन दिवं ययौ ॥ ४० ॥ जो सदा पूजिजे सुरासुरीं । जो परमात्मा चराचरीं । जो लीलाविग्रहदेहधारी । जो योगीश्वरीं वंदिजे ॥ ३१० ॥ ऐसा अतिवरिष्ठ श्रीकृष्ण । तेणें जराव्याध आज्ञापून । कृष्णैच्छामात्रें विमान । देदिप्ययान जें आलें ॥ ११ ॥ व्याधें देखोनि विमाना । हर्षें निर्भर झाला मना । तीन प्रदक्षिणा करूनि कृष्णा । नमूनि विमाना आरुढे ॥ १२ ॥ व्याध आरूढोनि विमाना । क्रमूनि इंद्रचंद्रग्रहगणा । अक्षय सुख स्वर्गभुवना । कृष्णकृपें जाणा तो पावला ॥ १३ ॥ जेणें अपकार केला पूर्ण । त्यासी उपकार करावा आपण । हें निज शांतिज्ञानलक्षण । स्वांगें श्रीकृष्ण स्वयें दावी ॥ १४ ॥ ब्रह्मज्ञानाचे बोल बोलती । तैसें नाहीं कृष्णनाथी । अंगीं दावूनियां स्थिती । व्याध निश्चितीं उद्धरिला ॥ १५ ॥ सकळ कुळाचें निर्दळण । झाल्याही मोह न धरी श्रीकृष्ण । जेणें निजांगें विंधिला बाण । तो व्याधही जाण सुखी केला ॥ १६ ॥ समुद्रतीरीं घेऊनि रथ । दारुक उभा होता तेथ । तेणें न देखतां श्रीकृष्णनाथ । गवेषणार्थ निघाला ॥ १७ ॥ दारुकः कृष्णपदवीमन्विच्छनधिगम्यताम् । वायुं तुलसिकामोदमाघ्रायाभिमुखं ययौ ॥ ४१ ॥ कृष्ण न देखतां दारुक । कासावीस झाला देख । शोधीत श्रीकृष्णपदांक । पृथ्वी सम्यक् अवलोकी ॥ १८ ॥ तंव कृष्णकंठींच्या तुळसीमाळा । त्यांचा आमोद दारुका आला । तेणें गंधाभिमुखें निघाला । तंव देखता झाला महातेज ॥ १९ ॥ तं तत्र तिग्मद्युभिरायुधैर्वृत्तं हाश्वत्थमूले कृतकेतनं पतिम् । स्न्नेहल्पुतात्मा निपपात पादयो रथादवल्पुत्य स्बाष्पलोचनः ॥ ४२ ॥ तंव धगधगीत तेजागळा । दिव्य आयुधांचा मेळा । त्यांमाजीं घनसांवळा । श्रीकृष्ण डोळां देखिला ॥ ३२० ॥ अश्वत्थातळीं धरूनि स्थान । घालूनियां वीरासन । निजतेजें विराजमान । दारुकें श्रीकृष्ण देखिला स्वयें ॥ २१ ॥ कृष्ण देखतां लवडसवडीं । रथाखालीं घालूनि उडी । पोटींच्या सप्रेम आवडीं । धरिले तांतडीं हरिचरण ॥ २२ ॥ नेत्री अश्रूचिया धारा । अंग कांपे थरथरा । तुजवेगळें शार्ङ्गधरा । अंधतम नेत्रा दृढ दाटे ॥ २३ ॥ अपश्यतस्त्वच्चरणाम्बुजं प्रभो दृष्टीः प्रनष्टा तमसि प्रविष्टा । दिशो न जाने न लभे च शान्तिं यथा निशायामुडुपे प्रनष्टे ॥ ४३ ॥ ऐके स्वामी श्रीकृष्णा । न देखतां तुझिया श्रीचरणां । जगदांध्य पडे नयनां । दिशांची गणना गणी कोण ॥ २४ ॥ ज्ञानेंसी मावळला विवेक । अणुमात्र न लभे सुख । तुज न देखतां मी देख । जड मूढ मूर्ख होऊनि ठेलों ॥ २५ ॥ जेवीं नष्टचंद्राचिये रात्रीं । निबिड अंवसेचिये आंधारीं । तेवीं तुजवीण श्रीहरी । दृढ दाटे संसारीं अंधतम ॥ २६ ॥ तुझे देखतांचि श्रीचरण । अंधतमा निर्दळण । जेवीं प्रकटतां रविकिरण । अंधारेंसीं जाण निशा नासे ॥ २७ ॥ इति ब्रुवति सुते वै रथो गरुदलाञ्छनः । खमुत्पपात राजेन्द्र साश्वध्वज उदीक्षतः ॥ ४४ ॥ ऐसें विनवी जंव दारुक । तंव परमश्वर्य कांहींएक । देखतां झाला अलोलिक । पाखेंवीण देख उडाला रथु ॥ २८ ॥ चहूं वारुवांसंयुक्त । गरुडध्वजेंसीं श्रीकृष्णरथ । ऊर्ध्वगतीं गगनाआंत । दारुकादेखत उडाला ॥ २९ ॥ शुक म्हणे परीक्षिती । निजधामा जातां श्रीपती । आपुली ऐश्वर्यसंपत्ती । स्वेच्छा ऊर्ध्वगती स्वयें नेत ॥ ३३० ॥ इहलोकीं ठेवूनि कीर्ती । निजवैभवविलाससंपत्ती । आवरूनियां निजशक्ती । स्वयें ऊर्ध्वगती स्वसत्ता नेत ॥ ३१ ॥ तमन्वगच्छन् दिव्यानि विष्णुप्रहरणानि च । तेनातिविस्मितात्मानं सूतमाह जनार्दनः ॥ ४५ ॥ रथ जातां ऊर्ध्वमंडळ । शंख चक्र गदा कमळ । तदनुलक्षित तत्काळ । दिव्यायुधें सकळ निघालीं ॥ ३२ ॥ ऊर्ध्वमंडळीं उडाला रथ । दिव्यायुधेंही समस्त । तें देखोनि अतिविस्मित । ठेला तटस्थ दारुक ॥ ३३ ॥ धुरे बैसोनियां नित्य । मी वागवीं श्रीकृष्णरथ । तो रथ ऊर्ध्वगतीं कृष्ण नेत । मज कां एथ सांडिलें ॥ ३४ ॥ मज सांडूनियां गोविंदें । नेलीं आपुलीं दिव्यायुधें । मी अभाग्य भग्यमदें । त्यजिलों मुकुंदें निश्चित ॥ ३५ ॥ म्यां उडी घातली रथाखालती । हेचि माझी मंदमती । येरवीं मीही जातों ऊर्ध्वगती । कां श्रीपती रुसला ॥ ३६ ॥ जेणें चरणीं विंधिला बाण । तो व्याधही उद्धरिला जाण । मी भाग्यें अभागी पूर्ण । यालागीं श्रीकृष्ण मज त्यागी ॥ ३७ ॥ नित्य कृष्ण दृष्टीं पुढें । धुरे बैसोनि वागवीं घोडे । तो मी कृष्णावेगळा पडें । भाग्य कुडें पैं माझें ॥ ३८ ॥ मी श्रीकृष्णाचा सारथी । ऐशी त्रिलोकीं झाली ख्याती । तो मी वेगळा पडें अंतीं । कां श्रीपती रुसला ॥ ३९ ॥ यावजन्म भोगिलें कृष्णसुख । त्या मज वोडवलें वियोगदुःख । कृष्णा कां झालासी विमुख । मी दीन रंक पैं तुझें ॥ ३४० ॥ माझा बोल अणुभरी । नाहीं अव्हेरिला हरी । त्या मज तूं श्रीहरी । अंतीं दुर्धरीं दुराविशी कां ॥ ४१ ॥ अपरधिया तारिलें व्याधासी । अश्व-ध्वजेंसीं रथ नेसी । तो तूं मज उद्धरावयासी । कां उबगलासी गोविंदा ॥ ४२ ॥ ऐसा अवस्थाभूत पूर्ण । पाहतां श्रीकृष्णाचें वदन । दारुकासी आलें रुदन । आसुवीं नयन लोटले ॥ ४३ ॥ दीर्घस्वरें देऊनि हांक । दारुक रडे अधोमुख । अंतीं श्रीकृष्ण झाला विमुख । हें अतिदुःख मजलागीं ॥ ४४ ॥ दुःखें चरफडीत मोठा । करें पिटीत ललाटा । मर मर विधातया नष्टा । वोखटें अदृष्टा काय लिहिलें ॥ ४५ ॥ मग म्हणे श्रीकृष्णनाथा । तुजपुढें बापुडें विधाता । तुजवेगळा मी राहतां । अतिदीनता पावेन ॥ ४६ ॥ तुझेनि बळें श्रीकृष्णा । म्यां कळिकाळा घातला आंकणा । तो मी काळाचा वोळंगणा । कां करिसी पोसण जगाचा ॥ ४७ ॥ ऐसें ऐकोनियां वचन । ‘ना भीं ना भीं’ म्हणे जनार्दन । मग आश्वासून पूर्ण । गुह्य आलोचन सांगत ॥ ४८ ॥ आजिच्या काळाचे काळगतीं । तूं एक उरलासी निकटवर्ती । तुज म्यां राखिलें निजकार्यार्थीं । वेगीं द्वारावतीं तूं जाईं ॥ ४९ ॥ गच्छ द्वारवतीं सूत ज्ञातीनां निधनं मिथः । सङ्कर्षणस्य निर्याणं बन्धुभ्यो ब्रूहि मद्दशाम् ॥ ४६ ॥ द्वारकायां च न स्थेयं भवद्भिश्च स्वबन्धुभिः । मया त्यक्तां यदुपुरीं समुद्रः प्लावयिष्यति ॥ ४७ ॥ स्वं स्वं परिग्रहं स्वर्वे आदाय पितरौ च नः । अर्जुनेनाविताः सर्व इंद्रप्रस्थं गमिश्यथ ॥ ४८ ॥ तूं जाऊनि द्वारकेआंत । यादवांचा निधनवृत्तांत । परस्परें कलहयुक्त । निमाले समस्त हें सांग ॥ ३५० ॥ बळिभद्रें निजात्मस्थितीं । देहो त्यजिला योगगतीं । माझीही दशा समस्तांप्रती । यथनिगुती सांगावी ॥ ५१ ॥ तुवां जाऊनियां त्यांपाशीं । शीघ्र सांगावें समस्तांशी । कोणी न रहावें द्वारकेसी । निघावें वेगेंसीं ममज्ञा ॥ ५२ ॥ द्वारका त्यागावयाचें कारण । तुज मी सांगेन आपण । दारुका तूं अतिसज्ञान । विश्वास पूर्ण मज तुझा ॥ ५३ ॥ यालागीं तुज राहवूनि एथ । अंतकाळींचें गुज सांगत । तुवां जाऊनि द्वारकेंत । बाहेर समस्त काढावे ॥ ५४ ॥ बाहेर काढावयाचें कारण । म्यां द्वारका त्यागिल्या जाण । समुद्र येऊनि आपण । नगर संपूर्ण बुडवील ॥ ५५ ॥ यालागीं सत्वर गमन । शीघ्र करावें आपण । माझीं माता पिता समस्त जन । द्वारकेहून काढावीं ॥ ५७ ॥ जंव समुद्र बुडविना तो ठावो । तंव आपुलाला समुदावो । घेऊनि सकळ परिग्रहो । शीघ्रतर पहा हो निघावें ॥ ५८ ॥ झालिया राज्यलोट । चोराकुळित होईल वाट । कोणीं नव जावें एकट । अवघीं एकवट करावीं ॥ ५९ ॥ अर्जुनाचेनि सांगातें । एकत्र मिळूनि समस्तें । शीघ्र जावें इंद्रप्रस्थातें । तो मागीं त्यांतें रक्षील ॥ ६० ॥ ऐसें ऐकतां श्रीकृष्णवचन । दारुकासी आलें रुदन । न वचे सांडूं पाहे प्राण । जळेंवीण मीन जैसा ॥ ६१ ॥ निजकुळासी करूनि घात । गेला गेला रे श्रीकृष्णनाथ । मी काळमुखा द्वारकेआंत । जावों हा वृत्तांत सांगावया ॥ ६२ ॥ गिळूनि श्रीकृष्णनिजसुखा । म्हणती हा आला काळमुखा । सकळ जगाचिया दुःखा । सूचक देखा मी होईन ॥ ६३ ॥ ऐकतां माझिया वचनासी । प्राणान्त होईल सर्वांसी । एवढ्या द्यावया महादुःखासी । न वचें हृषीकेशी मी तेथें ॥ ६४ ॥ ज्यासी म्यां सांगावी हे वार्ता । त्यांच्या करावें जीवघाता । एवढी घोर निष्ठरता । नव्हे कृष्णनाथा माझेनीं ॥ ६५ ॥ बहुतां मुंग्यांच्या विवरासी । जेवीं आगी लावावी हृषीकेशी । तेवीं हे वार्ता द्वारकेसी । म्यां सुहृदांपाशीं सांगावी ॥ ६६ ॥ जेवीं फळते फुलते वनीं । भडकोनि लावावा दावाग्नी । तैसा भडका हा सुहृदांचे कानीं । कृष्णनिधनाग्नी कोण लावी ॥ ६७ ॥ जेवीं बुडतयाचे माथां । पाषाण न देववे सर्वथा । तेवीं कृष्णसहित कुळाच्या घाता । मी नव्हें सांगता सुहृदांसी ॥ ६८ ॥ सुख द्यावें सुहृदंसी । तें राहिलें हृषीकेशी । घेऊनियां महादुःखांचिया राशी । सुहृदांपाशी मी न वर्चे ॥ ६९ ॥ आशंका ॥ म्हणसी जन्मवरी अवज्ञा । तुवां नाहीं केली अतिप्रज्ञा । तो तूं अंतकाळींच्या वचना । कां अवज्ञा करितोसी ॥ ३७० ॥ कृष्णा अंतकाळींचें तुझें श्रीमुख । पाहतां मज अत्यंत सुख । तें सांडूनि जनांसी दुःख । द्यावया देख मी न वचें ॥ ७१ ॥ कुळानिधनाचें घोर दुःख । कृष्णनिधनें संतापक । माझे वचनमात्रें हें विख । जगासी देख न देववे ॥ ७२ ॥ तुझे आज्ञेकरितां देख । जगासी द्यावें महादुःख । तुझे अवज्ञेचा उल्लेख । नरकदायक मज् होय ॥ ७३ ॥ मा आपणचि घेऊनि विख । तुजपुढें मरतां देख । उत्तम गति अलोलिक । मी निजनिष्टंक पावेन ॥ ७४ ॥ ऐसें म्हणोनि आपण । दारुकें घातलें लोटांगण । मस्तकीं धरिले श्रीचरण । सर्वथा जाण सोडीना ॥ ७५ ॥ देखोनि दारुकाचा भावो । कृपें द्रवला देवाधिदेवो । जेणें निर्दळे शोकमोहो । तों वर्म पहा हो सांगत ॥ ७६ ॥ त्वं तु मद्धर्ममास्थाय ज्ञाननिष्ठ उपेक्षकः । मन्मायारचनामेतां विज्ञायोपशमं व्रज ॥ ४९ ॥ माझ्या धर्माचें निजलक्षण । दृढ आश्रयितां आपण । पावोनि माझें ज्ञान विज्ञान । तूं ब्रह्मसंपन्न स्वयें होसी ॥ ७७ ॥ माझें धर्माचें निजलक्षण । तूं म्हणसी तें कोण कोण । ऐक दारुका सावधान । मद्धर्म पूर्ण ते ऐसे ॥ ७८ ॥ हृदयीं नित्य माझें ध्यान । मुखीं माझें नामकीर्तन । श्रवणीं माझें कथाश्रवण । करें मदर्चन सर्वदा ॥ ७९ ॥ नयनीं मम मूर्तिदर्शन । चरणीं मदालया गमन । रसनें मम तीर्थप्राशन । मत्प्रसादभोजन अत्यादरें ॥ ३८० ॥ साष्टांगें मजचि नमन । आल्हादें मद्भक्तां आलिंगन । सप्रेम माझे सेवेवीण । रिता अर्धक्षण जाऊं नेदी ॥ ८१ ॥ ऐसी सेवा करितां पहा हो । सर्वभूतीं देखें मद्भावो । हा सर्वधर्मांमाजीं रावो । तेथें अपावो कदा न रिघे ॥ ८२ ॥ सर्वभूतीं माझें दर्शन । तेव्हां ‘वैराग्य’ वोसंडे संपूर्ण । तेथ सहजें होय शुद्ध ज्ञान । देहाभिमानच्छेदक ॥ ८३ ॥ देहाभिमान होतां क्षीण । अपेक्षेसी पडे शून्य । तेव्हां ‘निरपेक्षता’ पूर्ण । सहजें जाण ठसावे ॥ ८४ ॥ निरपेक्षतेची दशा कैशी । विषय भेटलिया इंद्रियांसी । उपेक्षा करी त्यांसी । जेवीं मृगजळासी सज्ञान ॥ ८५ ॥ या दृष्टीं पाहतां चराचर । समूळ मिथ्या व्यवहार । जेवीं दोराचा सर्पाकार । तेवीं भ्रमें संसार भासत ॥ ८६ ॥ केवळ दोराचा सर्पाकार । तो श्वेत कृष्ण कीं रक्तांबर । तेवीं विषयीं विषयव्यवहार । मिथ्या संसार मायिक ॥ ८७ ॥ जेवीं शुक्तिकेचा रजताकार । न घडे एकही अलंकार । तेवीं हा आभासे संसार । मिथ्या व्यवहार मायिक ॥ ८८ ॥ मूळीं मिथ्या भवभान । त्याचें भ्रांतासीच बंधन । तेथील जें मुक्तपण । तोही भ्रम जाण सोलींव ॥ ८९ ॥ आम्हीं सज्ञान पूर्ण । निर्दळूनि भवबंधन । दृढ साधिलें मुक्तपण । हेंही जल्पन मायिक ॥ ३९० ॥ संसार मायिक रचना । हें सत्यत्वें कळलें ज्याच्या मना । तैं मनचि लाजे मनपणा । ‘विज्ञान’ जाण त्या नांव ॥ ९१ ॥ जागृति सुषुप्ति आणि स्वप्न । संसाराचें मिथ्या ज्ञान । हें ज्यासी ठसावलें संपूर्ण । ‘विज्ञान’ जाण त्या नांव ॥ ९२ ॥ मुख्य विज्ञानाचें लक्षण । साधक होय ब्रह्म पूर्ण । जगीं न देखे मीतूंपण । ‘उपशम’ जाण या नांव ॥ ९३ ॥ ऐसा उपशम ज्यासी पूर्ण । त्यासी मजसीं नाहीं भिन्नपण । दारुकें ऐकतां निरूपण । हृदयीं ते खूण चमत्कारली ॥ ९४ ॥ अलंकार सोनें पाहूं गेला । तंव तोचि सोनें होऊनि ठेला । तेवीं मी तंव कृष्णरसें वोतला । वियोग नाथिला देहलोभें ॥ ९५ ॥ मी कृष्णरूप आपण । मज कृष्णेंसीं नाहीं भिन्नपण । ऐशी चमत्कारली खूण । मी ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वें ॥ ९६ ॥ इत्युक्तस्तं परिक्रम नमस्कृत्य पुनः पुनः । तत्पादौ शीष्णर्युपाधाय दुर्मनाः प्रययौ पुरीम् ॥ ५०॥ इति श्रीमद्भागवते म्हापुराणे पारमहंस्यां संहितायामेकादस्कन्धे त्रिंशोऽध्यायः ॥ ३० ॥ ऐसें ऐकोनि श्रीकृष्णवचना । शिरीं वंदूनि श्रीकृष्णाज्ञा । खेद सांडोनियां मना । कृष्णचरणां लागला ॥ ९७ ॥ करूनि त्रिवार प्रदक्षिणा । पुनः पुनः लागोनि चरणां । चरणीं माथा ठेवूनि जाणा । घेऊनि कृष्णाज्ञा निघाला ॥ ९८ ॥ ब्रह्म सर्वत्र परिपूर्ण । त्याचा बोधक श्रीकृष्ण । तो निजधामा गेला आपण । तेणें दुर्मन दारुक ॥ ९९ ॥ पुढती श्रीकृष्णदर्शन । सर्वथा न लभे आपण । यालागीं अतिदुर्मन । करी गमन द्वारकेसी ॥ ४०० ॥ दारुक धाडिला दारकेसी । तंव मैत्रेय आला कृष्णापाशीं । तेचि काळीं हृषीकेशी । ब्रह्मज्ञान त्यासी उपदेशी ॥ १ ॥ तो ब्रह्मज्ञानउपदेशविधि । शुक बोलिला तृतीयस्कंधीं । म्हणोनि तें निरूपण ये संधीं । न प्रतिपादीं पुनरुक्त ॥ २ ॥ पाहावया कृष्णनिर्याण । उद्धव गुप्त होता आपण । तेणें ऐकोनि ज्ञाननिरूपण । संतोषें नमन करी कृष्णा ॥ ३ ॥ तेचि काळीं मैत्रेयासी । स्वमुखें बोलिला हृषीकेशी । विदुर येईल तुजपाशीं । त्यासी तूं उपदेशीं गुह्यज्ञान ॥ ४ ॥ उपदेशूनि मैत्रेयासी । देवें धाडिला तो स्वाश्रमासी । उद्धवेंही नमूनि हृषीकेशी । तोही बदरीसी निघाला ॥ ५ ॥ दारुक धाडिला द्वारकेसी । मैत्रेय धाडिला स्वाश्रमासी । उद्धव धाडिला बदरीसी । व्यधअधमासी धाडिलें स्वर्ग ॥ ६ ॥ निजरथसहित घोडे । निजायुधेंसीं धाडिलें पुढें । आतां आपणही वाडेंकोडें । निजधामाकडे निघेल ॥ ७ ॥ निजधामा निघतां श्रीपती । समस्त देव पाहों येती । ते सुरस कथासंगती । पुढिले अध्यायार्थी अतिगोड ॥ ८ ॥ अजन्मा तो जन्म मिरवी । विदेहाअंगीं देहपदवी । स्वयें अक्षयी तो मरण दावी । अतिलाघवी श्रीकृष्ण ॥ ९ ॥ ज्याचें निजधामगमन । शिवविरिंच्यादिकां अतर्क्य खूण । त्यांचे सांगेन उपलक्षण । श्रोता अवधान मज द्यावें ॥ ४१० ॥ एकादशाचा कळस जाण । श्रीकृष्णांचे निजनिर्याण । जेथ नाहीं देहाभिमान । तें ब्रह्म पूर्ण परिपक्व ॥ ११ ॥ भय नाहीं जन्म धरितां । भय नाहीं देहीं वर्ततां । भय नाहीं देह त्यागितां । ‘हे ब्रह्म-परिपूर्णता’ हरि दावी ॥ १२ ॥ एका जनार्दना शरण । पुढें अचुंबित निरूपण । संतीं मज द्यावें अवधान । सांगेन व्याख्यान सद्गुरुकृपा ॥ ४१३ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे परमहंससंहितायां एकाकारटीकायां ‘स्वकुलनिर्दळणं’ नाम त्रिंशोऽध्यायः ॥ ३० ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ५० ॥ ओंव्या ॥ ४१३ ॥
खाली दिलेल्या बँक खात्यात आपण दान करू शकता
संपर्क माहिती :
शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन,
द्वारा, श्री वेणीमाधव गोसावी,
श्रीनाथ गल्ली, श्रीक्षेत्र पैठण, जिल्हा छत्रपती
संभाजीनगर
पिन. ४३१००६
मोबाईल क्रमांक : +९१ - ९४२१४१११३५
ईमेल : info@santeknath.org